सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “१ मे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एक मे. हा दिवस प्रत्येक कामगारासाठी आणि प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती साठी खास आनंदाचा,सोनियाचा दिवस. कामगार दिनाबद्दल बोलायचं तर ह्या दिवशी कामगारांसाठी फायद्याची आणि फायदा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्याची रुपरेषा आखली गेली. आधी कामगार वर्गावर जी आपबिती होती नं ती नुसती कळूनही किंवा वाचूनही हळहळ वाटत होती.कामगारांचा आधी अक्षरशः कोणीही वाली नव्हता. पिळवणूक म्हणजे कशी असेल हे जेव्हा आम्ही लोकं आठ तास काम करुन माना टाकतो नं तेव्हा पूर्वी हा कामगार वर्ग पंधरा पंधरा तास नाँनस्टाँप काम करीत होता नं तेव्हा खरी जाणीव होते. आजच्या सुधारणांमुळे आम्ही काम करु त्या प्रमाणात, वाढत्या महागाई नुसार  आम्हाला त्या कामाचा मोबदला मिळतोयं पण खरचं पूर्वी जी वेठबिगारी होती नं ती फार भयानक होती हे आधीच्या कामगार मंडळींकडूनच समजतं आणि त्यांनी सहन केलेल्या आणि जिद्दीने तोंड दिलेल्या संकटाची कल्पना येते आणि तशी जाणीवही होते. बरं ह्या रुपरेषेत अनेक नानाविध मुद्द्यांमध्ये बदल फायदेशीर बदल करण्यात आले. ह्या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने बालकामगारांवर बंदी, महिला कामगारांच्या कामावर मर्यादा, तसेच रात्रीच्या व धोक्याच्या कामासाठी वेगळे नियम, कायद्याने साप्ताहिक सुट्टी, कामाचा मोबदला वस्तू रुपात न मिळता तो नगदी स्वरूपात मिळणे, समान काम तर समान वेतनं इत्यादी नियम अंतर्भूत केल्या गेलेत.भारतात कामगार दिनाची सुरवात 1 मे 1923 पासून झाली.

महाराष्ट्र दिन म्हंटला की ह्या बद्दलच्या आठवणींची सुरुवात शालेय जीवनापासून होते.

ह्या दिवशी शाळेत सकाळी झेंडावंदन व्हायचे. एक मे नंतर मग दोन तीन तारखेकडे निकाल लागून मग उन्हाळी सुट्ट्यांची सुरूवात व्हायची

1 मे ह्या दिवशी खास ऐकू येणारी गीतं म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं”बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा”, आणि दुसरं गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी ह्यांच “प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा”.

अन्याय, पिळवणूक ह्यांची सुट्टी होऊन कामगारांना स्वावलंबनाने रोजीरोटी मिळवून देणारा हा कामगार दिवस व महाराष्ट्रातील जनतेला आपलं असं वेगळं अस्तित्व, जागा मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र दिन चिरायू होवो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments