मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “विचारमोती…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “विचारमोती…”   ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

जी गोष्ट मनात आहे,

 ती बोलण्याची हिम्मत ठेवा,

आणि…

जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,

ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.

 

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून,

उदास राहण्यापेक्षा,

अनोळखी लोकात राहून,

आनंदी राहिलेलं कधीही चांगलं.

 

परिस्थितीप्रमाणे

बदलणारी माणसे, सांभाळण्यापेक्षा,

परिस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा.

आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही.

 

माणूस कोणत्याही वस्तूला, फक्त दोनच वेळा महत्व देत असतो.

एक तर ती मिळायच्या अगोदर, किंवा ती गमावल्याच्या नंतर.

 

कोणी तुमचा सन्मान करो, अथवा ना करो,

तुम्ही तुमचे कर्तव्य करत, चांगले काम करत रहा.

नेहमी लक्षात ठेवा…

करोडो लोक झोपेत असतात,

म्हणून सूर्य आपला विचार

कधीही बदलत नाही.

सूर्योदय हा होतोच…

 

बुद्धी सगळ्यांकडे असते,

पण तुम्ही चलाखी करता की, इमानदारी,

हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं…

चलाखी चार दिवस चमकते,

आणि इमानदारी,

आयुष्यभर…

 

दुसऱ्याच्या मनात, निर्माण केलेली निर्मळ व स्वच्छ जागा

हीच खरी सर्वात महाग,

व अनमोल जागा…

कारण…

तिचा भाव तर करता येत नाहीच,

पण एकदा जर का ती गमावली,

तर पुन्हा…

प्रस्थापित करता येत नाही…!!

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देव तेथेची जाणावा..!!…सुश्री साधना राजहंस टेंभेकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ देव तेथेची जाणावा..!!…सुश्री साधना राजहंस टेंभेकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कुठलीही संवेदनशील व्यक्ती एखाद्या अनोळख्या व्यक्तीचं दुःख बघून हळहळते, मनातून खूप दुःखी होते, बराच वेळ त्याचाच विचार करत राहते, कधीकधी थोडीफार आर्थिक मदत करते आणि शेवटी यापलीकडे आपण काय करू शकतो? असा विचार करून दिनक्रमाला लागते… पण काही लोक जात्याच वेगळे असतात….out of the way जाऊन ते पीडीतांसाठी काम करतात… अशा अनेक गोष्टी आपण वाचतो, अचंबित होतो… पण आता मी सांगणार आहे ती घटना आम्ही अगदी जवळून बघितलेली…. तुम्हा सगळ्यांना share करावीशी वाटली…!!

माझा नवरा आणि त्याच्या तीन मित्रांनी नुकतंच भारताच्या पश्चिम टोकापासून पूर्व टोकापर्यंत ( जवळ जवळ ४००० km) cycling च Expedition पूर्ण केलं त्यात घडलेली ही घटना..!! त्या चौघांना, Young Seniors चे काही सहकारी, गुहाटी ला join झालेत.. त्यात पुण्याचे प्रथितयश Maxillofacial and oral surgeon डॉ. दीपक कुलकर्णी हे सुद्धा होते.. एक दिवस (१३ डिसेंबर २०२२) रोजी ह्या सगळ्यांनी लोहित जिल्ह्यातील सनापुरा  येथील विवेकानंद mission च्या शाळेला भेट दिली.. तिथे डॉ. कुलकर्णींना सर्व मुलींमध्ये एक ९-१० वर्षांची मुलगी (तिचं नाव मुस्कान) जरा वेगळी आणि एकटीच बसलेली आढळली… नीट निरखून बघितले तर त्या मुलीची मान पूर्ण वाकडी असलेली आढळली, आणि मानेची नीट हालचाल पण होत नव्हती, त्यामुळे complex येऊन ती मुलगी कुणात मिसळत नसल्याचं कळलं… डॉ. नी अशा केसेस दुरूस्त झालेल्या बघितल्याने, ते प्रिन्सिपॉलना भेटून म्हणाले, ” यावर शस्त्रक्रिया हा उपाय आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. तुम्ही तिला  गुहाटी किंवा अरुणाचल प्रदेशात चांगल्या डॉ ना दाखवा..” त्यावर प्रिन्सिपॉल म्हणाल्या ,”आम्ही भरपूर ठिकाणीं दाखवलं पण काही उपयोग झाला नाही..” यावर डॉ. नी ताबडतोब उत्तर दिलं की ,”तुम्ही हिला पुण्याला घेऊन आलात तर मी तिथल्या चांगल्या डॉ. कडून हिच्यावर उपचार करवून घेईन , शिवाय तिच्या जाण्यायेण्याच्या, औषध पाण्याच्या खर्चाची तरतूदही करेन.. तुम्ही हिच्या पालकांशी बोलून घ्या “..!! आणि आपला फोन number देऊन डॉ. पुढे मार्गस्थ झाले..!!

त्यानंतर जानेवारी १० पर्यंत प्रिन्सिपॉल मॅडम डॉक्टरांशी  w app वर संपर्कात होत्या… त्यानंतर ४-५ दिवसात  डॉ.ना मुस्कानच्या काकांचा फोन आला.. त्यात ऑपरेशनच्या यशापयशाबद्दल विचारलं ( हे साहजिकच होतं कारण ते इतका खर्च करून येणार होते) डॉ. नी त्यांना आश्वस्त केलं…!! त्यानंतर पुढील एक महिना काहीच घडले नाही… डॉ. ना वाटले त्या लोकांना खात्री वाटली नसेल म्हणून येणार नाहीत …

पण २२ फेब्रुवारीला प्रिन्सिपॉल मॅडमचा फोन आला की मुस्कान आणि तिचे नातेवाईक लवकरच पुण्याला येत आहेत.. त्याप्रमाणे ७ एप्रिलला फक्त एकटे काका आणि ८ एप्रिलला इतर सगळे (मुस्कान आणि तिचे जवळचे नातेवाईक) पुण्यात येऊन धडकले.. डॉ. ना भेटले… डॉ. नी त्यांना ससूनमधील सगळी procedure समजावून सांगून admit करून घेतले… दरम्यान मुस्कानची, प्रसिद्ध शल्यचिकित्सक,डॉ. पराग सहस्रबुद्धे ( prof and head, plastic surgery department) यांचेकडून तपासणी करून, १२ एप्रिल ही तारीख operation साठी ठरवली… ठरल्याप्रमाणे, कुठलेही complication न येता , op व्यवस्थित पार पडले…!!

मुस्कान चे काका एक दिवस आधी फक्त डॉ. ना जोखायला आले होते.. एका अनोळखी मुलीला out of the way जाऊन हे इतकी मदत का करत आहेत हे त्यांच्या आकलनापलीकडचं होतं… त्यांनी नंतर डॉ.कडे कबूल केलं की, “ आम्ही जरा साशंक होतो , पण मग आम्ही विचार केला की, ” जे लोक इतक्या दूर सायकलवर येतात ते नक्कीच चांगल्या मनाचे असायला हवेत, म्हणून आम्ही केवळ तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून, फक्त आवश्यक तपासण्या करायला म्हणून इतक्या लांब आलो आणि तुम्ही आम्हाला चक्क ऑपरेशन करूनच परत पाठवत आहात…!! “

ऑपरेशन नंतर जाग येताच मुस्कानचा पहिला प्रश्न होता,” माझी मान सरळ झाली का? “…. डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी तरळलं…” इतका लहानसा जीव, जन्मापासून हे वेगळेपण आणि समाजाच्या विचित्र  नजरा झेलतच मोठा झालेला… हा सुखद धक्का तिच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवून आणणार आहे, याची तिला जाणीव तरी असेल का..??

मुस्कान ला discharge मिळाल्यावर डॉ. नी  Young Senior grp शी तिची भेट घडवून आणली… शेवटी या सगळ्या घटनांना जबाबदार YS grp च होता ना..?? (YS grp मधील cyclists नी सुद्धा contribution करून, खारीचा वाटा म्हणून मुस्कानला काही मदत केली )

अगदी वेळेवर ठरून, डॉक्टर दीपक कुलकर्णी, गुहाटीला या चौघांना join होतात काय, मुस्कानला बघून त्यांचं मन द्रवतं काय, ३००० km चा प्रवास करून एक गरीब कुटुंब केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे येतं काय आणि वेगाने सगळया घटना घडून मुस्कान ठीक होते काय…. सगळं स्वप्नवत भासत होतं…!!

मुस्कान लवकरच आपल्या घरी परत जाईल… op successful झाले असले तरी जादूची कांडी फिरवल्या सारखी मान एका मिनिटात सरळ होणार नाही… तिला काही महिने पट्टा आणि physiotherapy करावी लागेल… मात्र हळुहळू मान नॉर्मल position ला येणार हे नक्की !!

एका सहृदय माणसाने, आपल्या संवेदनशील मनाची हाक ऐकून ही जी कृती केली, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा हा प्रयास…!!

डॉक्टर दीपक कुलकर्णी तुम्हाला सलाम. —   संत तुकाराम महाराज यांच्या ,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या अभंगातील “साधू ” किंवा “देव” अजून वेगळा काय असू शकतो.??

लेखिका : साधना राजहंस टेंभेकर, कोथरूड, पुणे

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – १… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

सौ. यशश्री वि. तावसे

अल्प परिचय 

एक साधक व नर्मदा भक्त – १ एप्रिल २०१७ ते २० एप्रिल २०१८….

भगवंत व सद्गुरुंनी १७० दिवसात पायी नर्मदा परिक्रमा करवून घेतली. संत साहित्याचा अभ्यास यथाशक्ती चालू आहे.

? इंद्रधनुष्य ?

☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – १… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

अखंड मंडलाकारम्

व्याप्तं येन चराचरम्।

तत्पदं दर्शितं येन 

तस्मै श्री गुरुवे नमः।।

जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य यांचा जन्म, वैशाख शुद्ध पंचमी, नंदन नाम संवत्सर, युधिष्ठिर-शक 2631,  वसंत ऋतू,  रविवारी,  इसवी सन पूर्व 509 ला…. केरळमध्ये पूर्णा नदीच्या काठी, कालडी नावाच्या, गावात झाला.  त्यांच्या पित्याचे नाव शिवगुरू व आईचे नाव आर्यांबा. कुशाग्र बुद्धी,  तल्लख स्मरणशक्ती,  अत्यंत देखणी व बळकट शरीरयष्टी,  आजानुबाहू,  असे त्यांचे विलोभनीय व्यक्तिमत्व होते.  

शब्दोच्चार व लिपी यांचे ज्ञान पाचव्या वर्षीच झाल्याने त्यांच्या पिताजींनी पाचव्या वर्षीच,  त्यांचा व्रतबंध केला. आठव्या वर्षी ते चतुर्वेदी झाले. बाराव्या वर्षी सर्व शास्त्र संपन्न होते.

१६ व्या वर्षी  प्रस्थान-त्रयी…. म्हणजे उपनिषदे, ब्रह्म -सूत्र व श्रीमद् भगवद्गीता यावर जगप्रसिद्ध असे भाष्य केले.  

३२ व्या वर्षी ते दिव्यलोकी परतले. 

चार वर्षांचे असताना “देवी भुजंग स्तव” हे २८ श्लोकांचे स्तोत्र  त्यांच्याकडून रचले गेले.

बालशंकरांचे उपनयन झाल्यावर थोड्याच दिवसात त्यांचे पितृछत्र हरपले.  म्हणून त्यांच्या मातोश्रींनी, त्यांना गुरुकुलात दाखल केले. गुरुकुलात असताना एक दिवस ते भिक्षा मागायला गेले असता, त्या घरातील ब्राह्मणाची पत्नी, त्यांना देण्यासाठी,  घरामध्ये भिक्षा शोधू लागली.  घरात काहीच नव्हते.  तिला एक वाळलेला आवळा दिसला.  तोच तिने त्यांना दिला.  त्यावरून , त्यांना त्या घरातील दारिद्र्याची कल्पना आली. तेव्हा त्यांना स्फुरलेल्या कनकधारा स्तोत्राने,  त्यांनी श्री लक्ष्मी देवींची स्तुती केली.  तत्काळ लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन, देवींनी,  सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला व त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे दूर झाले. त्यामुळे त्या गावचे नाव कनकांबा असे पडले.

तीन वर्षांच्या कालावधीतच त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यांच्या बुद्धिमत्तेची ख्याती राजदरबारात पोहोचली.  राजाने त्यांना बरीच संपत्ती देऊन,  राजदरबारात आणण्यासाठी,  पालखी पाठवली.  ती संपत्ती नम्रतापूर्वक परत करून, ती प्रजेसाठी वापरावी. मला याचा काय उपयोग? असा निरोप राजाला दिला. आपण विद्वानांविषयी आदर बाळगता,  त्यामुळे आपले भलेच होईल असा राजाला आशीर्वाद दिला.  त्यांची विद्वत्ता पाहून गावातले प्रतिष्ठित त्यांना खूपच मान देत असत.  शंकराचार्यांना संन्यास घ्यायचा होता. पण आईला कोण सांभाळणार?  त्यांनी विचार केला.  त्यांनी त्यांच्या अनेक शिष्यांपैकी अग्नि शर्मा या आवडत्या असलेल्या शिष्याच्या नावावर सर्व संपत्ती करून आईची जबाबदारी सोपवली. अग्निशर्मांनी पण आचार्यांना त्यांच्या आईची काळजी घेण्याचे वचन दिले.  

आईला स्नानासाठी गंगेवर लांब जायला नको म्हणून आचार्यांनी गंगेचा प्रवाह आपल्या घराजवळ आणला.  एक दिवस आचार्य स्नानाला गंगेत उतरले असता मगरीने त्यांचा पाय पकडला.  तेव्हा आचार्यांनी आईला सांगितले,  आता मगर मला खाऊन टाकणार. तर तू मगरीच्या तावडीतून सोडवायला प्रार्थना कर.  आईच्या प्रार्थनेवरून ते मगरीच्या तावडीतून सुटले.  तेव्हा ते आईला म्हणाले, आता तू मला संन्यास घेण्यासाठी परवानगी दे. तू माझी आठवण काढलीस की मी नक्की परत येईन व तुला भेटेन.  असे म्हणून ते कालडी सोडून निघून गेले.  त्या दिवशी कालडी गावात कोणाच्याही घरी चूल पेटली नाही.  

गुरूंच्या शोधात प्रथम ते गोकर्ण महाबळेश्वरला आले. तिथे त्यांना विष्णू शर्मा नावाचा त्यांच्याबरोबर गुरुकुलात शिकत असलेला मित्र भेटला.  एके दिवशी एका संन्याशाने त्यांना सांगितले,  की ते ज्यांच्या शोधात आहेत ते “गुरुगोविंदयती” नर्मदा नदीच्या तीरावर,  ओंकार मांधाता येथे,  आश्रम स्थापून राहात आहेत.  गुरुगोविंदयती हे गौडपदाचार्यांचे शिष्य. गौडपदाचार्य पतंजलीचे शिष्य.  

आचार्य ओंकारेश्वरला गुरूंच्या गुहेत आले. गुरूंनी विचारले “ बाळा तू कोण?” आणि आचार्य उत्स्फूर्त उद्गारले …… 

मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम्।

नचश्रोत्र जिव्हे, नच घ्राण नेत्रे।

नचव्योम भूमिर्नतेजो न वायुः।

चिदानंद रूप शिवोsहम् शिवोsहम्।।

 गुरु गोविंदयतींना,  बद्रिकाश्रमात, व्यासमुनींनी,  या शिष्याची कल्पना आधीच दिली होती… की पृथ्वीवरील शिवाचा अवतार तुझ्याकडे शिष्य म्हणून येईल.  ते त्यांची वाटच बघत होते. तीनच महिन्यात आचार्यांचा अभ्यास पाहून गुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा दिली, व या बाल बृहस्पति शिष्याला, ‘ शंकराचार्य ‘ म्हणून उद्घोषित केले.  तिथे शंकराचार्यांनी अत्यंत अवघड अशा ‘ विवेक चूडामणी ‘ नावाच्या  ग्रंथाची निर्मिती केली.  नर्मदामाई वाट पाहत होती की, या  शंकराचार्यांचे लक्ष आपल्याकडे कधी जाईल? 

एकदा खूप पाऊस आला.  मोठाच पूरही आला.  ही संधी साधून शंकराचार्य व त्यांचे गुरु ज्या गुफेत होते,  त्या गुफेत वरपर्यंत मैय्या प्रवेश करू लागली.  तेव्हा श्री शंकराचार्यांनी नर्मदा मैय्याची स्तुती करून, नर्मदाष्टक रचले व कमांडलूमध्ये मैय्याला बंदिस्त करून,  गुरूंच्या गुफेत येण्यापासून रोखले.  

नंतर बद्रिकाश्रमात गुरूंचे गुरु गौडपादाचार्य यांचे दर्शनास ते गुरुगोविंदयतींबरोबर गेले.  

त्यानंतर गुरूंनी त्यांना वाराणसी म्हणजेच, वारणा + असी या दोन नद्यांचा संगम,  त्यावर वसलेले वाराणसी येथे पाठवले. तेथे प्रस्थान त्रयीवर भाष्य करण्यास सांगितले. 

गणेश पंचरत्न स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र, कालभैरवाष्टक इत्यादी अनेक स्तोत्रे, त्यांनी  रचली.

वाराणसीत आचार्यांची प्रवचने होऊ लागली.  प्रवचनाला भरपूर गर्दी होत असे.  आचार्यांचे शिष्यवैभव अपूर्व होते. एकदा एक वृद्ध भेटले. खूप प्रश्नोत्तरे झाली.  जेव्हा ते साक्षात विष्णू आहेत हे समजले,  तेव्हा आचार्य त्यांच्या पाया पडले.  तेव्हा श्रीविष्णूंनी आपले खरे रूप प्रकट केले. 

आचार्यांचे प्रस्थान- त्रयीवरचे भाष्य-लेखन पूर्ण झाल्यावर ते आपल्या शिष्यांसह गुरूंना भेटायला बद्रिकाश्रमात आले.  त्यांच्या या कर्तृत्वावर खूष होऊन,  आपल्या गुरूंच्या संमतीने,  गुरू गोविंदयतींनी आचार्यांना अद्वैत-वादाचा प्रसार करण्याचा आदेश दिला.

तिथून पुढे जात असता आचार्यांना साक्षात भगवान शिवांचे दर्शन झाले.  आचार्यांच्या प्रार्थनेवरून शिवांनी त्यांना अध्यात्म-संन्यास दिला.  त्याच क्षणी आचार्यांनी भगवान शिवांची मानसपूजा केली व रचली.  

एके दिवशी आचार्यांना समजले, की आपल्या मातेचा अंत जवळ आला आहे.  ती आपली आठवण काढत आहे.  ते कालडीला आले. आईच्या इच्छेनुसार आचार्यांनी त्यांना भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घडवले. “विजयी भव” असा आशीर्वाद देत,  तृप्त नजरेने पुत्राकडे पहात असतानाच आर्यांबा अनंताकडे झेपावल्या व चैतन्य, चैतन्यात विलीन झाले.

आचार्य संन्यासी असल्याने गावातील वैदिक ब्राह्मणांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना विरोध केला.  पण आचार्यांनी आईला तसे वचन दिले होते.  त्यामुळे आईचे अंत्यसंस्कार करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला.  सर्व मंडळी निघून गेली. आचार्यांचा शिष्य सुखाचार्य व आचार्य दोघेच राहिले. मध्ये काही वेळ गेल्यामुळे आईचा देह जड झाला होता.  तो एकट्यांना उचलणे शक्य नव्हते.  त्यांनी त्या देहाचे तीन तुकडे केले.  मृत्युंजयाचे स्मरण केले. आणि स्वतःच्या योगसामर्थ्याने त्या चितेला अग्नी दिला. आपल्याच हाताने मातेचे दहन केले.  

आईचे दिवस करण्यासाठी गावातील कोणी ब्राह्मण येईनात. त्याच वेळी तीन ब्राह्मण अतिथी म्हणून आले. आचार्यांचा वाडा रोज वेदघोषाने दणाणू लागला.  गावातील लोकांना जेव्हा सुखाचार्यांकडून सत्य समजले,  की ते  तीन ब्राह्मण, तर, साक्षात् ब्रह्मा, महेश व परशुराम होते. त्यावेळी गावातील लोकांना आचार्यांचा अधिकार समजला.

– क्रमशः भाग पहिला. 

(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 67 – उत्तरार्ध – स्वामी विवेकानंद, एक महान यात्रिक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 67 – उत्तरार्ध – स्वामी विवेकानंद, एक महान यात्रिक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

रामकृष्ण मिशन चे काम सुरू झाले. स्वामीजिंचा प्रवास, भेटीगाठी, काम वाढवण्याच्या दृष्टीने सुरूच होता. भारतात भारतीय शिष्य आणि परदेशी शिष्य काम करत होतेच. पण परदेशातील शिष्य यांच्याशी पण पत्रव्यवहाराने संपर्क होत होता. सतत मार्गदर्शन चालू होते, काश्मीर, पंजाब, खेतडी, नैनिताल, कलकत्ता, आल्मोरा, अमरनाथ, मायावती, पूर्व बंगाल असं सगळीकडे संचार झाला. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा दीड वर्षे ते पाश्चात्य देशांचा प्रवास करून परतले. बेलूर मठात पोहोचल्यावर मन प्रसन्न झाले. एक दिवस विश्रांती झाल्यानंतर एकेक वृत्तान्त कळू लागला. आपल्या कार्यासाठी ज्यांनी स्वतच्या देशाचा त्याग केला आणी आपल्या हिमालयासारख्या दुर्गम भागात राहून मोठ्या कष्टाने अद्वैत आश्रम उभा केला. आपले एक स्वप्न साकार केले ते सेव्हियर पती पत्नीने. त्यातले स्वत: सेव्हियर कार्य करता करताच निधन पावले, तर गुडविन आधीच गेले होते. या दोन इंग्रज शिष्यांनी भारतमातेच्या चरणी आपली जीवनपुष्पे वाहिली, याचे स्वामीजींना दु:ख झाले. मिसेस सेव्हियर मायावतीला होत्या, त्यांचे ताबडतोब सांत्वन करायला गेले पहिजे आणि तशी तार त्यांनी मिसेस सेव्हियर यांना केली. प्रकृती ठीक नसतानाही स्वामीजी प्रतिकूल हवामान व परिस्थितीत ,गैरसोयीचा प्रवास असतानाही ते शिष्यांबरोबर गेले.   

मदतीशिवाय त्यांना चालणेही कठीण झाले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला,  त्यावर बरोबर असलेल्या  विरजानंदाना ते म्हणाले, “पहा मी किती दुबळा आहे जणू वृद्ध होऊन गेलो आहे. हे एव्हढेसे चालायचे आहे तेही मला बिकट वाटते आहे, पूर्वी पर्वत प्रदेशात २५- २५ मैल चालायलाही काही वाटायचे नाही. माझ्या आयुष्याचा शेवट जवळ येत चालला आहे हेच खरं”. ते ऐकून विरजानंद मनातून हादरून गेले. मिसेस सेव्हियरना भेटणे आपले कर्तव्य आहे म्हणून हा खडतर प्रवास ते करत होते.मिसेस सेव्हियर ने आपले दु:ख बाजूला ठेऊन स्वामीजींचे स्वागत केले. पतीच्या निधनाचे दु:ख मोठे असतानाही आपण घेतलेले व्रत चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले, मायावतीला स्वामीजी पंधरा दिवस राहिले. सेव्हियर पती पत्नी ने  इथे अद्वैत आश्रमाचे काम मार्गी लावले होते. इथल्या वास्तव्यात अनेकजण स्वामीजींना भेटायला येऊन गेले. मायावती हून स्वामीजी कलकत्त्याला निघाले, बेलूर मठात आल्यावर आणखी एक धक्कादायक वृत्त समजले ते म्हणजे खेतडीचे राजा अजित सिंग यांचे अपघाती निधन झाले. या अकस्मात दुर्घटनेमुळे स्वामीजीना मोठा धक्का बसला. राजा अजित सिंग हा त्यांचा मोठा आधार होता.

बेलूरला आल्यावर मठाच्या व्यवस्थेतील काही कायदेशीर पूर्तता आणि विश्वस्त मंडळ करून घेतले. ब्रह्मानंद ,शिवानंद, प्रेमानंद, सारदानंद, अखंडानंद, त्रिगुणातीतानंद, रामकृष्णानंद, अद्वैतानंद, सुबोधानंद, अभेदानंद, आणि तुरियानंद यांचे विश्वस्त मंडळ करून त्यांच्यावर कारभार सोपवला, यात त्यांनी एकही पाश्चात्य शिष्य घेतला नाही, ते दुरदृष्टीने कायदेशीर गुंतागुंत होऊ नये म्हणून. ६ फेब्रुवारीला रीतसर नोंदणी करण्यात आली. विवेकानंदांनी कोणतेही अधिकार पद स्वीकारले नाही. स्वत:च्या मालकीच्या जागेत रामकृष्ण संघाचे काम आले. भारताच्या इतिहासात एक नवे पान उघडले गेले होते, स्वामीजींनि पाहिलेले स्वप्न साकार झाले होते. फेब्रुवारीत रामकृष्ण परमहंस यांचं जन्मदिन बेलूर मठात साजरा झाला तेंव्हाही स्वामीजीना खूप समाधान वाटले.

त्यानानंतर त्यांनी पूर्व बंगालचा प्रवास आखला आणि आई भुवनेश्वरी देविंची इच्छा पण पूर्ण करावी असे मनात होते. बंगालच्या या सुपुत्राने एकदा तरी आपल्या गावात यावे अशी तिथल्या लोकांची इच्छा होती. चंद्रनाथ आणि कामाख्यादेवी ही  तीर्थ क्षेत्रे भुवनेश्वरी देविंच्यासह स्वामिजिनी केली आणि आईसाठी काही केल्याचे समाधान त्यांना होते. या यात्रेत तिथल्या भेटी, स्वागत, आपल्या मुलाबद्दल लोकांचे प्रेम आणि आदर पाहून भुवनेश्वरी देविंना मनोमन समाधान वाटले. हाच तो आपला लहान बिले ना ? असे नक्की वाटले असेल.

पूर्व बंगाल आणि आसामचा हा प्रवास दोन महिन्यांचा झाला आणि स्वामीजींची प्रकृती आणखीनच ढासळली ,विश्रांती नाही, सतत कामाचा ताण यामुळे दम्याचा त्रास आणखीन बळावला .आपलं अखेरचा क्षण जवळ आला की के अशी शंका स्वामीजींच्या मनात डोकावली. प्रवासात ते अनेकांना पत्र लिहीत असत. अधून मधून जरा बारे वाटले की लगेच उत्साहाने पुढचे नियोजन करीत. एकदा त्यांचे शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती भेटले तेंव्हा त्यांनी सहज प्रकृती बद्दल विचारले, तर स्वामीजी म्हणाले, “ अरे बाबा आता प्रकृतीची चौकशी कशाला करायची? प्रत्येक दिवशी शरीराचा व्यापार बिघडत चालला आहे. जे काही आयुष्याचे थोडे दिवस आता राहिले आहेत ते मी तुम्हा सर्वांसाठी काहीना काही करण्यात घालवेन आणि असा कार्यमग्न असतानाच एके दिवशी या जगाचा निरोप घेईन”.

दुर्गापूजा उत्सव बंगाल मधला महत्वाचा उत्सव, आता स्थिरावलेल्या बेलूर मठात दुर्गा पूजा व्हावी असे सगळ्यांच्याच मनात आले. स्वामीजींच्या अंगात बराच ताप होता. श्री दुर्गा प्रतिष्ठापना झाली होती. अष्टमीला मुख्य पूजेला स्वामीजी कसेबसे आले. नवमीला थोडे बरे वाटले तेंव्हा देवीसमोर त्यांनी काही भजने म्हटली. श्रीरामकृष्ण यांची आवडती भजने त्यांनी गायली. हे पाहून भुवनेश्वरी देवींना बरे वाटले. बरोबर केलेल्या  तीर्थयात्रेपासूनच त्यांना माहिती होते की आपल्या मुलाची प्रकृती अलीकडे ठीक नसते. त्याला भेटायला त्या मधून मधून मठात येत असत. आल्यावर बाहेरूनच ‘बिले..’ अशी हाक मारत आणि विश्वविख्यात बिले, संन्यासीपुत्र नरेन आईची हाक आल्यावर भरभर खाली येइ. दोघांच्या गप्पा होत. मग त्या परत जात.  

एकदा नरेंद्र लहान असताना आजारी पडला, तेंव्हा तो बरा व्हावा म्हणून बोललेला देवीचा नवस आपल्याकडून पूर्ण करायचा राहिला हे अनेक वर्षानी लक्षात आले. तेंव्हा आता कालीमातेला जाऊन, विशेष पूजा करून मुलाला तुझ्यासमोर लोळण घ्यायला सांगेन असा तो, आता पूर्ण करायला हवा. आईची इच्छा पूर्ण करायची म्हणून विवेकानंद बरे नसतानाही गंगेत स्नान करून कालिघाटावर ओल्या वस्त्रानिशी मंदिरात गेले. पूजा केली, तीन वेळा  लोळण घेतली, गाभाऱ्याला सात प्रदक्षिणा घातल्या. विधिपूर्वक होम हवन केले. आईला खूप समाधान झाले आणि इतक्या वर्षानी नवस पूर्ण झाल्याचा आनंद पण.

साधारण २८ जून चा दिवस, शुद्धानंदाना विवेकानंद यांनी पंचांग घेऊन बोलावले आणि ते चालून तिथी पाहून ठेऊन घेतले. नंतर ची ४,५, दिवस रोज ते पंचांग चालायचे आणि स्वतशीच काही विचार करायचे ,बाकी सर्व रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते. १ जुलैला विवेकानंद, मठाच्या बाहेर हिरवळीवर फेऱ्या मारत होते. त्यावेळी प्रेमानंदाना एका  जागेकडे बोट दाखवून म्हणाले, “माझ्या मृत्यूनंतर या ठिकाणी माझे दहन करा”. अंत्यसंस्काराचा एव्हढा स्पष्ट उल्लेख केलेला कोणाच्याच लक्षात आला नाही.

२ जुलै बुधवार – एकादशी, विवेकानंदांनी शास्त्रोक्त पद्धतीने उपवास केला होता. त्या दिवशी भगिनी निवेदिता बेलूर मठात स्वामीजींना भेटण्यास आल्या होत्या. त्यांच्यासाठी काही पदार्थ विवेकानंदांनी मागवले, हात धुण्यासाठी निवेदिता उठल्या तेंव्हा स्वामीजींनी त्यांच्या हातावर स्वत पाणी घातले, एक पणचं घेऊन हात पुसले. हे पाहून निवेदिता खजील झाल्या. त्या म्हणाल्या स्वामीजी हे मी तुमच्यासाठी करायचे तर तुम्हीच..? स्वामीजी म्हणाले,  का? जिझसने तर आपल्या शिष्यांच्या पायांवर पाणी घातले होते ना? . पण ती त्यांची अखेरची वेळ होती असे निवेदिता म्हणणार पण आवंढा गिळला. कदाचित ही शेवटची वेळ..?ही खरचच दोघांची अखेरची भेट ठरली .

४ जुलैचा दिवस उजाडला. शुक्रवार, नेहमीपेक्षा स्वामीजी लवकर उठले. ध्यानसाठी देवघरात गेले. दारे खिडक्या बंद केल्या. तीन तास एकटे खोलीत होते. त्यानंतर दार उघडून बाहेर येताना कालिमातेचे गीत गुणगुणत बाहेर आले.श्री रामकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर बसून इतका वेळ ध्यान मग्न झालेले विवेकानंद स्वतच्याच नादात मुग्ध असे बाहेर येऊन फेऱ्या मारू लागले ,इतरत्र कुठेही लक्ष नव्हते. सकाळी पण अतिशय प्रसन्नपणे हसत खेळत सर्वांच्या बरोबर अल्पोपहार घेतला होता . आणि आज आपल्याला उत्साह वाटतोय असेही म्हणाले होते. दुपारच्या जेवणानंतर तीन तास संस्कृत व्याकरणाचा वर्ग त्यांनी घेतला. दुपारनंतर प्रेमानंदांच्या बरोबर बेलूर मध्ये तीन किलोमीटर लांब पर्यन्त फेरफटका मारून आले.आल्यावर संन्यासांशी गप्पा झाल्या.

आल्यावर खोलीत जाऊन आपली जपमाळ मागवून घेतली, तासभर जप झाला. मग अंथरुणावर आडवे झाले उकडते आहे म्हणून थोडा वारा घालण्यास शिष्याला सांगितले.थोडे तळपाय चोळले तर बरे वाटेल म्हणून तेही शिष्याने चोळले. डाव्या कुशीवर वळलेले, हातात जपमाळ तशीच, पाठोपाठ दोन वेळ दीर्घ श्वास घेतला. नंतर काही हालचाल नाही. न्यू वाजले होते, जेवणाची घंटा वाजली होती. जवळचा शिष्य घाबरत घाबरत खाली आला. प्रेमानंद आणि निश्चयानंद वर धावत आले. रामकृष्ण यांचे नाव घेतले तर ही दीर्घ समाधी उतरेल स्वामीजींची असे वाटले पण नाही, डॉक्टर महेंद्रनाथ मजुमदार यांना बोलावले गेले. मध्यरात्री पर्यन्त बरेच प्रयत्न केले. प्राणज्योत मालवली आहे हे डॉक्टरांचे शब्द ऐकून सारा बेलूर मठच दु:खाच्या छायेत गेला.

स्वामीजींचे वय यावेळी ३९ वर्ष, ५ महीने, आणि २४ दिवस इतके होते. सगळीकडे वाऱ्या सारखी बातमी गेली. भारतात, परदेशात तारा  गेल्या. बेलूर मठाकडे चारी दिशांनी दर्शनासाठी लोंढे येऊ लागले. भुवनेश्वरी देवी पण आल्या. त्यांचा अवखळ बिले अवखळपणेच साऱ्या जगात फिरून येऊन आता शांतपणे पहुडला होता. भले जगासाठी तो कीर्तीवंत असला, तरी या जन्मदात्रीचा तो पुत्र होता. पुत्रवियोगाने तिच्या हृदयाला किती घरे पडले असतील? शब्दच नाहीत.   

बिल्व वृक्षाची जागा प्रेमानंदाना विवेकानंद यांनी ४,५ दिवसांपूर्वीच दाखवली होती. तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या या महान, असामान्य, अलौकिक सुपुत्राची ही जीवनयात्रा.

 – मालिका समाप्त –

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थंड हवेचं ठिकाण –  पुणं — … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ थंड हवेचं ठिकाण –  पुणं — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

…. होय मंडळी. एकेकाळी पुणं चक्क थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं. मुंबईचे रहिवासी उन्हाळ्यात हवापालट म्हणून पुण्याला येत असत.  खोटं वाटत असेल तर विद्यापीठात चक्कर टाकून या. उगाच नाही ब्रिटिश गव्हर्नरनं एवढा आलिशान राजवाडा बांधला स्वतःसाठी… उन्हाळ्यात मुंबई इलाख्याचा गव्हर्नर मुक्कामाला पुण्यात असायचा. 

पूर्वीचं सोडा. अगदी आपल्या लहानपणीही वाडे होते. त्यातली थंडगार शहाबादी फरशी…. भर उन्हातून सायकल मारत आलं, की बाहेरच्या नळावर हात-पाय वगैरे धुवून सरळ त्या गारेगार शहाबादी फरशीवर आडवं पसरायचं….. माठातलं वाळामिश्रित थंडगार पाणी…. क्वचित पन्हं…. घराबाहेर असलो, तर कुठेतरी रसवंती गृहात बसून मस्त बर्फ टाकलेला उसाचा रस .. नाहीतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खोकड्यांमध्ये विक्रीला असलेली “निरा” प्यायची. कुठे हातगाडीवर ताडगोळेही विक्रीला असत. एरवी बेचव, गिळगिळीत वाटणारे ते ताडगोळे उन्हाळ्यात मात्र अमृतासमान वाटायचे….. उरलेल्या निरेपासून “हातभट्टीची” बनवतात अशी एक कथाही प्रचलित होती…. खरं खोटं परमेश्वरालाच माहीत….

पूर्वी पुण्यात रस्त्यावर चिंच, वड, पिंपळ असे डेरेदार वृक्ष होते. “रस्तारुंदी” या गोंडस नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल केली गेली.  ( आणि पुन्हा वाहतुकीचा बोजवारा उडतोच आहे). 

पूर्वी उन्हाळ्यात पुण्यात पाहुण्यांचं स्वागत कैरीचे पन्हं देऊन व्हायचं.  त्यात मस्त वेलची, मिरपूड घालून चटपटीत चव आणलेली असायची. संध्याकाळी सारसबाग, कमला नेहरू पार्क वगैरे ठिकाणी जाऊन भेळ खायची. हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. लाकडी पॉटमध्ये हँडल फिरवून फिरवून मॅंगो आईस्क्रीम बनवण्याची मजाच काही वेगळी होती.  ( मला वाटतं ही आइस्क्रीम पॉटस् भाड्याने मिळण्याची सोयही काही  ठिकाणी होती ). सारसबागेबाहेर काडी असलेलं “जम्बो आइस्क्रीम”  मिळायचं. शिवाय माझ्या लहानपणी खाऊ म्हणजे “लॉलीपॉप”.-  काठीला लावलेली गोल गोड चकती चाटत बसणं ही एक 

” मेडिटेशन ” होती…..

तेव्हा पुणं सगळ्याच अर्थांनी शांत होतं. सुंदर होतं. रमणीय होतं. कुठच्याही टेकडीवरून खाली पाहिलं की हिरव्यागार झाडीत लपलेलं पुणं दिसायचं. थंडीत तर पुण्यात चक्क धुकं पडायचं. पण पुण्यातला उन्हाळाही सुंदर होता. शहाबादी फरशीवर आडवं लवंडून रेडिओवर “वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा….” “माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी….” किंवा “ये रे घना ये रे घना…..” 

यासारखी अवीट गोडीची गाणी ऐकत निद्राधीन व्हायचं…. तेव्हा वाड्यांमधल्या काहीशा अंधारलेल्या स्वयंपाक घरांमधून येणारे वरण, मुगाची खिचडी, कांदेपोहे वगैरे वासही अप्रतिम वाटायचे. 

चहाबाज मस्त ब्रूक बॉण्ड, फॅमिली मिक्स्चर, आसाम वगैरे चहा प्यायचे. जवळच्या साने, सावरकर, खन्ना या डेअरीचं म्हशीचं दाट दूध असायचं. त्याच्या विरजणापासून घरीच भरपूर लोणी तूप बनायचं… 

कॉलेजात गेल्यावर अगदीच “मागासलेले” वाटायला नको म्हणून क्वचित कॅम्पमध्ये “मार्झोरिन” मधे जाऊन सॅन्डविच खा, चॉकलेट कुकीज खा, सहजच “कयानी” मधून “श्रूसबेरी” बिस्किटं घेऊन या,  अशा लीला चालायच्या. पण खरी मजा म्हणजे “संतोष” किंवा “हिंदुस्तान” चे पॅटीस…. रविवारी सकाळी नाश्त्याला चहाबरोबर हे पॅटीस खायचे…. रात्री भूक लागली तर “पॅराडाईज”,. “लकी”, किंवा “नाझ” या ठिकाणी क्रीम रोल खायचे….. मंडळी, हे काही नुसतं खाण्याचं वर्णन नाही…. पुणेकर या थोड्या थोड्या गोष्टींवर समाधानी होते… 

लिहिण्याचा उद्देश एवढाच की आता सुबत्ता आली, गाड्या – परदेशप्रवास, हॉटेलिंग… सगळं काही आहे…. 

पण ते साधं पुणं वेगळंच होतं….

ते ज्यानं अनुभवलं, त्यालाच पुणं खरं “कळलं” ….

बाकीचे नुसतेच “पुण्यात राहिले….”

 

लेखक –  अज्ञात 

प्रस्तुती : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शततंत्रवीणेचा सम्राट ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

?विविधा ?

☆ शततंत्रवीणेचा सम्राट ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

असे म्हणतात, कि संतूर हे वाद्य इराण आणि मेसोपोटेमिया या भूभागात विकसित झाले. परंतु जेंव्हा संतूर या शब्दाचा वेध घेतलाअसता, असे दिसून येते कि संतूर हा शब्द भारतीय लोकसंगीतात शततंत्रीवीणा या नावाने प्रचलित होता आणि अपभ्रंशाने त्याचे नाव संतूर म्हणून रूढ झाले.

अक्रोडाच्या झाडापासून तयार केलेले हे संगीत वाद्य सर्व साधारणपणे  समलंब चौकोनी आकाराचे असते.  या वाद्याची ओळख वैश्विक स्तरावर नेण्याचे श्रेय हे नि:संशय पंडित शिवकुमार शर्मा यांचेकडे जाते. पंडितजींची जन्मभूमी जम्मू काश्मीर आहे.. पण कर्मभूमी सारे विश्व आहे. आज त्यांची इहलोकाची यात्रा पुरी झाली. शिवकुमार शर्मा यांचे जसे संतूर वर प्रभुत्व आहे तसेच तबल्यावर देखील प्रभुत्व होते.

भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी त्यांचे पिताश्री यांचेकडून गिरवले आणि शिवकुमार यांनी त्यांचे, गॉड गिफ्ट असलेले चिरंजीव राहुल यांना, तो वारसा प्रदान केला. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत मी काही फार मोठा जाणकार नाही.. परंतु सिलसिला या चित्रपटातील गाणी आणि संगीत यांची भुरळ मला जी पडली, ती अमीट अशीच आहे. सिनेमातील सर्वच गाणी आगळी वेगळीच होती, त्यांना एक नवाच गंध होता. तेंव्हापासून सुरु झालेला हा सिलसिला रसिकांच्या मनात असाच आजन्म राहील हे निश्चित.

पंडित शिव ( कुमार शर्मा ) आणि हरी (प्रसाद चौरासिया ) या व्दयीला सिलसिला चित्रपटाने सिने संगीतकार म्हणून एक स्वतंत्र, विशेष असे स्थान, रसिकांच्या मनात मिळाले. तसे सिने संगीतकार म्हणून त्यांनी फार सिनेमांना संगीत दिले, अश्यातला भाग नाही. परंतु वरील सिनेमे वगळता व्ही शांताराम यांच्या “झनक झनक पायल बाजे” या चित्रपटात एका प्रसंगासाठी देखील त्यांनी पार्श्वसंगीत दिलेले होते.

शिवकुमार शर्मा , हरिप्रसादजी चौरासिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काबरा यांचे सह “कॉल ऑफ द व्हॅली” नामक अल्बम केला. त्याने शास्त्रीय संगीत विश्वात त्यांचे स्थान अढळ झाले. तत्पश्चात “व्हेन टाइम स्टुड स्टील”, “हिप्नॉटिक संतूर”, “ए सब्लाईम ट्रान्स”, “द ग्लोरी ऑफ स्ट्रिंग्ज”, “द फ्लो ऑफ टाइम” “द इनर पाथ” इत्यादी रसिकाला शाश्वतअनुभूती प्रदान करणारे, शुद्ध हिंदुस्थानी अल्बम रसिकांच्या भेटीला आले आणि पसंतीला उतरले. भारत सरकारने, त्यांच्या ह्या प्रतिभेची नोंद घेत राष्ट्रीय नागरी पुरस्कारांच्या क्रमवारीतील द्वितीय अर्थात पद्मविभूषण आणि चतुर्थ अर्थात पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव देखील केला.

अश्या यशस्वी विश्वमान्य संगीतकाराची भेट घेणे हे अशक्यप्राय होते. त्यांच्या पुणे भेटीचा कार्यक्रम असल्याचे कळताच मी पद्मश्री विजय घाटे यांचेशी संपर्क साधून त्यांची भेट निश्चित केली. पद्मश्री विजय घाटे यांचे देखील मी रेखाचित्र काढून त्यांची स्वाक्षरी मिळवली होती, तेंव्हापासून त्यांचा वरदहस्त मला सतत लाभत आहे.

एक मोठ्ठा कार्यक्रम, पुण्यात जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आयोजित केलेला होता. रसिकांच्या प्रचंड गर्दीत त्यांची भेट घेणे अशक्यच होते. मी आणि माझा मित्र सुनील दामले आम्ही दोघे कार्यक्रमाच्या स्थानी दाखल झालो. पोलिसांची एखाद दुसरी बाचाबाची वगळता आम्ही सुखरूप त्या अतिथी कक्षाच्या बाहेर पोहोचलो. पण तेथून सन्माननीय पद्मश्री विजय घाटे यांचेशी संपर्क होईना. थोड्या प्रतिक्षे पश्चात खुद्द पदमश्री विजय घाटेंचा निरोप आला तेंव्हा मात्र आमचा जीव जणू भांड्यातच पडला आणि आम्हाला कॅमेरा आणि रेखाचित्रासह आत जाण्याची अनुमती मिळाली. आम्ही अत्यंत विजयी चर्येने अतिथींच्या कक्षात पोहोचलो. मी दबकत दबकत, अंग चोरून एका कोपऱ्यात उभा होता. शिवकुमारजींनी मला त्यांचे शेजारी बसण्याची अनुमती खुणेने दिली… मी बिचकत बिचकत त्यांचे शेजारी बसलो. माननीय विजय घाटेंनी माझा परिचय एक आर्टिस्ट म्हणून करून दिला. एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पद्मश्रीने विभूषित असलेल्या कलाकाराने, माझा परिचय दुसऱ्या पदमश्री पदमविभूषण इत्यादी सन्मानाने विभूषित आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराला करून दिला हे माझ्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद होते. मला ह्या प्रथितयश कलाकारांच्या सोबतीला बसण्याचे सद्भाग्य लाभले, हे अभिमानास्पदच होते.

पंडितजींचे व्यक्तिमत्व अत्यन्त लोभस असे होते.. काश्मिरी सौंदर्य, चकचकीत त्वचा, मार्दव स्वर, सभ्य, सुसंस्कृत,  संभाषण मला अतिशय भावले. पंडितजींच्या प्रस्तुतीकरणाला थोडा अवकाश होता आणि त्यामुळे मला अपेक्षेपेक्षा अधिक अवधी मिळणार होता.

मी पुनश्च माझा त्रोटक परिचय करून दिला.. छंदासंबंधी सांगताच,

” बहोत खूब.. ” असे म्हणून माझी पाठ थोपटली.

” कुछ परेशानी तो नही हुई ना ? “ त्यांनी विचारले..

त्यावर मी नकार दिला..

” फोटोग्राफर तो बहोत आते है, लेकिन ऐसा मौका वीरलाही मिलता है.. “ पंडितजी उत्तरले. मी काढलेले पोर्ट्रेट त्यांनी उंचावून बघितले. त्यांना ते पोर्ट्रेट आवडले.

” मेरे बाल बनानेमे कोई दिक्कत तो नही आई ना ? “ त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण केसांवरून हात फिरवीत विचारले.

त्यांनी माझ्या वर्मावर जणू बोट ठेवले. खरेच शिवकुमार शर्माजी, झाकीर हुसेन, एपीजे अब्दुल कलाम इत्यादींचा चेहेरा चितारणे तुलनात्मक दृष्ट्या एकवेळ सोप्पे पण त्यांची गुंतागुंतीची केश रचना पेन्सिलने रेखाटणे एक दिव्य मला वाटते.

” सर दिक्कत तो आई .. “ मी प्रांजळपणे बिचकत बिचकत म्हणालो.

त्यावर ते हसत म्हणाले, ” फिर भी आपकी कोशिश अच्छी रही… है ना घाटेजी ? “ त्यांनी माननीय विजय घाटे यांना उद्देशून विचारले. त्यांनी रेखाचित्रवर स्वाक्षरी केली.

त्यावर मी म्हटले,  “सर उनके बाल भी वैसे हि है.. “ यावर सगळे खो खो हसले. एवढी खेळीमेळीची भेट होईल हे मला कदापि वाटले नाही..

हि माणसे खरोखरच मोठी असतात, विनम्र असतात, पण बरेचदा चहापेक्षा किटली अधिक गरम असते असेही अनुभव येतात..

मी त्यांचे चरण स्पर्शिले.. आणि विजयी मुद्रेने बाहेर पडलो.

हा प्रसंग देखील माझ्या मनाच्या कप्प्यात कोरल्या गेला.. आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करतांना हा प्रसंग आठवून डोळे पाणावतात..

© श्री मिलिंद रथकंठीवार

रेखाचित्रकार, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागतिक मातृदिन —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “जागतिक मातृदिन —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

दयादातृत्वाला जिथं सीमा नसते तिथे मातृत्व जन्माला येते….. 

 महिन्याचा दुसरा रविवार जागतिक स्तरावर मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. आईसाठी एक दिवस या संकल्पनेतून अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी १९१४ पासून मातृदिनाची सुरुवात केली.त्यापूर्वी ॲना ही सामाजिक कार्यकर्ती आपल्या आईच्या ऋणाचा उतराई होण्याचा भाग म्हणून मातृदिन साजरा करत होती.पुढे हीच संकल्पना रूजली व जगभर पसरली.

आपल्या देशात ‘आई ‘ या भावनेला भावनिक व सांस्कृतिक असे द्विमितिय महत्व असले तरी प्रत्यक्षात आईपण चौफेर व्यापलेलं आहे.  शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर आईचे महत्व आहेच. निसर्गानं सजीवाला स्व-वंश चालविण्यासाठी व टिकविण्यासाठी मातृत्व ही देणगी दिलेली आहे. इतर सजीवांमध्ये फक्त जीव जन्माला घालणं व प्राथमिक स्वरूपाचं संगोपन करणं इथपर्यंतच मातृत्व मर्यादित आहे. याउलट मानवी समूहात जीवाचा जन्म व जन्माला आलेल्या जीवाचं संगोपन अन् सरतेशेवटपर्यंत संगोपन केलेल्या जीवाची काळजी वाहणं हा मातृत्वाचा तहहयात प्रवास आहे. म्हणून मानवी कुळात आई हे नारीचे शरीर नसून ,ती जन्मदात्रीप्रती आजन्म ऋण भावना आहे. कोणत्याही वयात असताना ,ठेचाळलं वा वेदनेने विव्हळणं आलं की मुखातून फक्त आई नामाचाच जयघोष होतो. कारण ‘ आई गं ‘ चा उच्चार हा वेदनेवरचं सर्वात शेवटचं औषध आहे.

बदलत्या काळात आईच्या पदरात बदल झाला असेल, आईच्या राहणीत बदल झाला असेल, काळजीही थोडी डिजिटल झाली असेल, पण आईचं काळीज आजही तेच परंपरागत मायेचं आहे. माता ही कधीच कुमाता नसते या आचंद्रसूर्य कालीन सुभाषिताला तडा देणा-या माता कधीच उदयाला येणार नाहीत .असं सुभाषितकाराचं स्वप्न होतं, पण अगदीच थोड्याफार मातांनी या सुभाषिताला छेद दिला आहे. अशा कुकर्मी मातांचं प्रमाण सागरातलं पसाभर पाणी  सडलेलं निघावं ,इतकं अल्प आहे.

सिंधुताई सपकाळ, संध्याताई /दत्ता बारगजे, दीपक नागरगोजे ,संतोष गर्जे असे कितीतरी समाजसेवक आहेत ,जे भावनिक मातृत्वाचे धनी आहेत. जन्म दिलेल्या बाळाचे संगोपन करणं हे नैसर्गिक मातृत्व आहे पण बहिष्कृत  व वंचित ,अनाथ बालकांचे मातृत्व निभावणं हे  दैवी भावनेतलं मातृत्व आहे. असं मातृत्व निभावण्याचं धाडस फारच कमी लोकांमध्ये असते. मातृ दिनी अशा नरदेही दैवी मानवांना शतदा वंदन करावे.

मातृत्व म्हणजे निर्मळ व निस्वार्थ माया. दया दातृत्वाचा किनारा नसलेला सागर म्हणजे वात्सल्य सिंधू सागर आई. अपार मायेचे दृश्य स्वरूप म्हणजे आई. लाभाच्या अंशाचा लवलेशही मनी न ठेवता,डोळ्यात वात्सल्य व उरात काळजीच्या लाटा पेलाव्यात ;त्या फक्त आईनेच. आई ही शिल्पकार म्हणून श्रेष्ठ आहेच, पण त्याहीपेक्षा ती उत्कृष्ट व्यवस्थापक व नियंत्रक सुद्धा असते. गर्भारपणात जपलेल्या जीवाशी तिची नाळ कधीच तुटत नाही. आईला आई हेच उपमान आहे. तिच्यासारखी तीच – अन्य नाही कोणी.

माझ्या आयुष्याची जडणघडण होताना आईच्या ममतेने मायाममता ,वात्सल्य ,प्रेम ,सहकार्य देणा-या माझ्या रक्तबंधनातील सर्व आप्तांचा ,आई, चुलती ,आत्या, इतर आप्तगण ,संसार रथाची भागीदार पत्नी,  मुली,समाजसेवी आदर्श कृपाछत्री गण, सुखदुःखातले वाटेकरी मित्र-मैत्रिणी, व्यावसायिक सहकारी, गुरूजन ,विद्यार्थी, सेवाभावी क्लबचा परिवार ,पाहिलेले न पाहिलेले असे  सकल मानवजन या सर्वांप्रती आजच्या या दिवशी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

आपणा सर्वांस जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “’एक्स्पायर’ व्हायच्या अगोदरच् ‘आऊटडेटेड’…” लेखक – श्री सचिन  लांडगे ☆ श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “’एक्स्पायर’ व्हायच्या अगोदरच् ‘आऊटडेटेड’…” लेखक – श्री सचिन  लांडगे ☆ श्री सुनीत मुळे ☆

हळूहळू किती खर्च आपण वाढवून घेतलेत काही कल्पना आहे का? सकाळी उठल्यापासून.. “टूथपेस्ट में नमक” असायला पाहिजे, चारकोल असायला पाहिजे.. लवंग दालचिनी विलायची अजून काय काय टाकतील..! दात घासायचेत, का दातांना फोडणी द्यायचीय, काय माहिती !

आणि सगळ्याच टूथपेस्ट “डेंटिस्ट का सुझाया नंबर वन ब्रँड” असतात.. रातभर ढिशूंम ढिशूंम..

टूथब्रशच्या ब्रिसल्सवर जितके संशोधन झालेय तितके संशोधन ‘नासा’त तरी होतेय का नाही कुणास ठाऊक ! कोनेंकोनें तक पहुँचने चाहिए म्हणून मग आडवे तिडवे उभे सगळे प्रकार आहेत.. असोत बापडे.. पण त्या डेंटिस्टच्या गळ्यात स्टेथो का असतो, हे मला अजून समजलं नाही..!

आंघोळीचा साबण वेगळा, चेहरा धुवायचा वेगळा.. जेल वेगळं.. फेसवॉश वेगळं.. दूध, हल्दी, चंदन आणि बादामने अंघोळ तर क्लिओपत्राने पण केली नसेल, पण आता गरिबातली गरीब मुलगी पण सहज करतेय..

आधी शिकेकाईने पण काम भागायचं, मग शॅम्पू आला.. मग समजलं की, शॅम्पू के बाद कंडिशनर लगाना भी जरुरी हैं..

भिंतीला प्लास्टर करणं स्वस्त आहे, पण चेहऱ्याचा मेकअप फार महागात पडतो.. पण तो केलाच पाहिजे.. नाहीतर कॉन्फिडन्स लूज होतो म्हणे.. “दाग अच्छे हैं” हे इथं का नाही लागू होत काय माहिती.?!

मी “गॅस, नो गॅस” करत सगळे डिओ वापरून बघितले.. पण “टेढ़ा हैं, पर मेरा हैं” म्हणत एक पण पोरगी कधी जवळ आली नाही.. खरंच.. सीधी बात, नो बकवास..

केस सिल्की हवेत, चेहरा तजेलदार हवा, त्वचा मुलायम हवी, रंग गोरा हवा, आणि परफ्यूमचा सुगंधी दरवळ हवा बस्स.. बाकी शिक्षण, संस्कार, बॉडी लँग्वेज, हुशारी हे गेलं चुलीत..!

मला तर वाटतं, काही दिवसांतच सगळीकडे संतूर गर्ल, कॉम्प्लॅन बॉय, रॉकस्टार मॉम, आणि फेअर अँड हॅन्डसम डॅड दिसतील..

साबुनसे पण किटाणू ट्रान्सफर होतें हैं म्हणे..!!

(हे म्हणजे, कीटकनाशकालाच् कीड़े लागण्यासारखं आहे!)

आता, तुमचा साबण पण स्लो असतो.. मग काय.. धुवत रहा, धुवत रहा, धुवत रहा..

टॉयलेट धुवायचा हार्पिक वेगळा, बाथरूमसाठीचा वेगळा..! मग त्यात खुशबुदार वाटावं म्हणून ओडोनिल बसवणं आलंच.. जसं काय मुक्कामच करायचाय तिथे..

हाताने कपडे धुणार असाल तर वॉशिंग पावडर वेगळी, मशीनने धुणार असाल तर वेगळी.. नाहीतर, तुम्हारी महँगी वॉशिंग मशीन भी बकेट से ज्यादा कुछ नहीं, वगैरे…

आणि हो, कॉलर स्वच्छ करण्यासाठी वॅनिश तर पाहिजेच, आणि कपडे चमकविण्यासाठी “आया नया उजाला, चार बुंदोवाला”.. विसरून कसं चालेल..?

“अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?” हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे..

म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे वेडे.. आणि त्यात हॉर्लिक्स मिसळणारेच तेवढे हुशार !! ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं..

… आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग…

“इसको लगा डाला, तो लाईफ़ झिंगालाला” म्हणून मी टाटा स्काय लावलं खरं.. पण ते एचडी नाहीये.. म्हणून मग मी घरात टिव्ही बघत असलो, की लगेच दार लावून घेतो.. न जाणो, कुठूनतरी पाच-सात पोरं नाचत येतील आणि “अंकल का टिव्ही डब्बा, अंकल का टिव्ही डब्बा”.. म्हणून माझ्या ४००००च्या टिव्हीला चक्क डब्बा करतील.. याची धास्तीच वाटते..

“पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो”च्या जमान्यात आपणच खरे इस्तेमाल होतोय..  काल घेतलेल्या वस्तू, ‘एक्स्पायर’ व्हायच्या अगोदरच् ‘आऊटडेटेड’ होताहेत.. 

माणसांचंही तसंच आहे म्हणा…. असो..

लेखक : – डॉ सचिन लांडगे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बंकिमचंद्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “बंकिमचंद्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही गीतांच्या रचना ह्या जणू आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंगच बनल्यात. ह्या ऐकल्यावर स्फूर्ती, स्वाभिमान, देशप्रेम, निष्ठा, जागृत होऊन ताजतवानं झाल्यासारखं वाटतं. ह्या रचनांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रगीत, वंदेमातरम, ए मेरे वतन के लोगो, रंग दे बसंती, महाराष्ट्र गीत,मेरे देश की धरती आणि अशी कित्येक स्फुरणगीतं.

“वंदेमातरम” ह्या आपल्याला अतिशय पूज्य असणा-या गीताचे रचयीते बंकीमचंद्र ह्यांची जयंती नुकतीच  आठ मे ला झाली.त्यांना विनम्र अभिवादन.काही बाबी,काही घटना, काही प्रसंग तर काही गीतं ह्यांना आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान असतं.

आज अशी काही गीतं आठवलीत की आपण चटकन आदराने स्तब्ध उभे राहतो , काही गीतं ऐकली की स्फुरण चढतं. आजही “जन गण मन ” व “वंदेमातरम”गीत कानी पडले की आपली मान गर्वाने उंच होते.

१८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं ” वंदेमातरम” हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.

मुळात वंदे मातरम् हे गीत बंगाली व संस्कृत ह्या दोन भाषांच्या मदतीने फुललयं,तयार झालयं. ह्या दोन्ही भाषांचा सरसकट अभ्यास नसल्याने वा त्या नीट अवगत नसल्याने  काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं.

वंदेमातरम गीताचा विषय निघाल्यावर एका छोट्या मुलाने त्यातील काही शब्दांचा अर्थ विचारल्याने मला स्वतःला देखील त्याचा नीट, अभ्यासपूर्ण अर्थ जाणून घेण्याची अनिवार ईच्छा झाली.

पहिल्यांदा ह्यातील सुरवातीच्या तीन चार ओळी म्हणजेच ध्रुवपद आणि नित्य गायल्या जणारे कडवे ,त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे,

वंदे मातरम्, वंदे मातरम्!

सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,

शस्यश्यामलाम्, मातरम्!

वंदे मातरम्!

शुभ्रज्योत्सनाम् पुलकितयामिनीम्,

फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,

सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,

सुखदाम् वरदाम्, मातरम्!

वंदे मातरम्, वंदे मातरम्॥

 ह्या गीताचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे,

हे माते मी तुला मनोमन वंदन करते, पाणी म्हणजेच आपले जीवन,ह्या पाण्याने भरभरून ओसंडून वाहणारी, परिपूर्ण, फळांनी लदलदलेली,बहरलेली, पण त्याच बरोबर दक्षिणेकडील वा-याच्या झुळकांनी,लाटांनी शांत असणाऱ्या निरनिराळ्या पिकांनी समृद्ध  असलेल्या अश्या माझ्या मातेला,माझ्या भारतभू ला  मी प्रणाम करते.

शुभ्र धवल चमकत्या चांदण्यांमुळे बहरलेल्या ह्या पवित्र भूमीवरील रात्र ही  आल्हाददायक असते. फुलांच्या मदतीने फुललेली, वृक्षांच्या साथीने मढलेली, येथील ही आमची भूमाता ही खरोखरीच विलक्षण शोभून दिसते. म्हणूनच येथील पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी ची अनूभुती देणा-या ह्या  भूमातेला माझे वंदन, माझा  प्रणाम !

ह्या गीताचे रचयिते मा.बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

बंकीमचंद्र ह्यांच्या जयंतीनिमित्त त्याचे स्मरण करून वंदेमातरम ह्या गीताने दिवसाची चांगली सुरवात करत जाऊया.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आईचा व्हॉट्सॲप… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

आईचा व्हॉट्सॲप… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

चार दिवस झाले होते, मी आईला फोनच केला नव्हता. हिंमतच होत नव्हती माझी, पण कधीतरी कळवावं लागणारच होतं. कारण त्याआधीच बाबांचा फोन आला, तर ते फारच भयंकर होणार होतं. 

आज कळवू, उद्या कळवू म्हणत म्हणत इतके दिवस गेले, आजचाही दिवस गेला होता. अंथरुणावर पडून मी निद्रादेवीची आराधना करत होतो आणि तेवढ्यात व्हॉट्सॲप मेसेज आल्याची वर्दी देणारं पिंग वाजलं. गेले चार दिवस येणाऱ्या प्रत्येक फोनची रिंग आणि प्रत्येक मेसेजचं पिंग माझ्या काळजाचा ठोका चुकवत होतं – न जाणो बाबांचा फोन / मेसेज असला तर ?

पण आत्ता आईचा मेसेज होता.

“झोपला होतास का रे बाळा ?”— या परिस्थितीतही मी स्वतःशीच  खुदकन हसलो. कॉलेजला जाणाऱ्या – हॉस्टेलला रहाणाऱ्या घोड्याला “बाळा” असं फक्त आईच म्हणू शकते. 

“नाही ग, नुकताच पडत होतो.”

“चार दिवस झाले, फोन नाही तुझा, मेसेजही नाही. सगळं ठीक आहे ना रे ?”

” … “

“वाटलंच मला. काय झालं रे ? कुठं प्रेमाबिमात पडलास की काय ?”

“काहीतरी काय, आई ? तुझं आपलं काहीतरीच.”

“मग काय झालंय ? तू मेसेज टाकतोस का मी डायरेक्ट फोन करू ?”

“नाही, नाही. फोन नको करुस.” 

— सगळं आटोपून बाबाही आता झोपायला येत असतील, किंवा already शेजारी झोपलेही असतील. आई माझ्याशी फोनवर बोलत आहे, म्हटल्यावर तेही बोलायला येणार आणि मग नको तो विषय निघणार …नकोच ते. 

“आई, चार दिवसांपूर्वी पहिल्या सेमीस्टरचा रिझल्ट लागला.”

“हं, हं. आणि मग ?”

“आई, मला एका विषयात KT लागली आहे.”

“KT म्हणजे ?”

“KT म्हणजे मी त्या विषयात पास नाही झालो, आई. मी पुढच्या वर्गात जाईन, पण त्या विषयाची पुन्हा परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावं लागेल.”

— ‘पास नाही झालो’ हे ऐकल्यावर निशब्द होण्याची पाळी आता आईची होती. एका मोठ्ठ्या pause नंतर आईचा मेसेज आला —– 

“काय झालं रे ? विषय अवघड जातोय का ? शिकवलेलं कळत नाहीये का लक्षात रहात नाहीये ?”

“तसं काहीच नाहीये, आई. उगाच मी काहीतरी खोटंनाटं सांगणार नाही की बहाणेबाजी करणार नाही. थोडा अभ्यास कमी पडला आणि मी ओव्हरकॉन्फिडन्समध्ये गेलो हीच खरी कारणं आहेत. पण तू काळजी नको करुस, बघ पुढच्या परीक्षेत याच विषयात अव्वल गुण आणतो की नाही ते ! अगदी तुझी शप्पथ. पण …”

“तू खरं सांगितलंस ते आवडलं मला. उगाच रूममेटला करोना झाला होता, किंवा तुलाच बरं नव्हतं असली सहज पचून जाईल अशी थाप नाही मारलीस तू. तुझी चूक तुला कळली आहे. ती परत करू नकोस. आणि काळजी घेत जा रे स्वतःची. .. आणि तू ‘पण …’ म्हणून वाक्य अर्धवट सोडलंस ते काय ?”

“आई, मी नक्की छान मार्कस् आणेन पुढच्या वेळी, पण, पण तू बाबांना सांभाळून घे. त्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं ? मला तर काही सुचतच नाही बघ.”

आईने कसा लगेच विश्वास ठेवला (आता त्याला सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझी होती म्हणा). बाबा असते तर केवढं लेक्चर झाडलं असतं – परीक्षेचे गुण भविष्यासाठी कसे महत्त्वाचे आहेत, करिअर – वाढती महागाई – खर्च अशी त्यांची प्रवचनाची गाडी पटापटा पुढे सरकत गेली असती. 

पण एक मात्र होतं बाबांचं, कधी – आम्ही किती खस्ता काढला तुमच्यासाठी, कसं पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला मोठं केलं – वगैरे कॅसेट नाही वाजवायचे ते. बोलायचे ते माझ्यापायीच्या चिंतेनेच बोलायचे, पण त्रास खूप करून घ्यायचे स्वतःलाच. 

आईचं तसं नव्हतं. ती समजून घ्यायची मला. आता कसं तिला सांगितलं होतं, ती घेईल सांभाळून. मी निर्धास्त झालो होतो….. 

“हां, बाबांना मी सांगते, समजावते. ती काळजी नको करुस तू. पण तू काळजी घेत जा. हे असं चार चार दिवस फोन केल्याशिवाय रहात जाऊ नकोस. चल, झोप आता.”

मी फोन ठेवला, आणि पटकन झोपी गेलो.

— —

“काय हो, झोप येत नाहीये का ? आणि माझ्या फोनशी काय करताय ?” आई बाबांना विचारत होती. 

“अरे तू जागी झालीस वाटतं ? कुठं काय, गजर लावत होतो.” 

— बाबा खोटं बोलले. लेकाचा चार दिवस फोन नाही आला तर केवढी कावरीबावरी झाली होती ती, नाही नाही ते विचार येत होते तिच्या मनात. पण फोन लावायला घाबरत होती. 

बरं, हे महाशय बापाशी स्वतःहून बोलतील तर शपथ. बाप म्हणजे कर्दनकाळ अशीच त्यांची समजूत. 

हे मेसेजचं बरं असतं. कोण टाईप करतंय कळत नाही. 

बाबा स्वतःशीच हसले, लेकाच्या रिझल्टबद्दल उद्या आईची समजूत काढावी लागणार होती, त्याचं प्लॅनिंग करत तेही निद्रादेवीच्या अधीन झाले….. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares