कवी भूषण हे आधी राजा छत्रसाल व नंतर शिवाजी महाराजांच्या दरबारात कवी होते. कवी भूषण यांच्याविषयी फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म कानपूर जिल्ह्यातील त्रिविक्रमपूर येथे झाला. स्वाभिमानी भूषण लहान वयातच घर सोडून बाहेर पडले. अनेक रजपूत राजे तसेच औरंगजेब, कुमाऊँ राजे, छत्रसाल अशा अनेकांच्या दरबारी जाऊन त्यांच्यावर काव्यरचना केल्या. त्यांनी रचलेले भूषण हजारा, भूषण उल्हास व दूषण उल्हास सारखे अनेक ग्रंथ व काव्यरचना काळाच्या उदरात गडप झाल्या. मात्र त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाने, व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन लिहिलेला ‘शिवभूषण’ हा काव्यग्रंथ उपलब्ध आहे.
छत्रपतींना भेटण्यासाठी ते उत्तर भारतातून रायगडावर १६७० साली आले. तेथील व्याडेश्वर मंदिरात त्यांची महाराजांबरोबर भेट झाली. पण त्यावेळी त्यांना हेच शिवाजी महाराज आहेत हे माहित नव्हते. महाराजांनी विचारणा केल्यावर भूषण यांनी खाली उद्धृत केलेला छंद खड्या आवाजात गायला. तो ऐकून सर्व मावळे रोमांचित झाले. त्यांनी भूषण यांना तो पुनःपुन्हा गायला लावला. तब्बल अठरा वेळा गायल्यानंतर मात्र भूषण यांना थकवा आला.
मग महाराजांनी आपली खरी ओळख दिली व राजकवी म्हणून त्यांची नियुक्ती केली. गाव, हत्ती वगैरे इनाम दिले. भूषण यांनी तीन वर्षे रायगडावर वास्तव्य केले. मराठ्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास आपल्या वीररसपूर्ण, अलंकारिक काव्यात शब्दबद्ध करून तो ‘शिवभूषण’ काव्यग्रंथ १ जून १६७३ रोजी महाराजांना सादर केला. पं. विश्वनाथ प्रसाद मिश्र यांनी संपादित केलेल्या ‘भूषण ग्रंथावली’ या पुस्तकात कवी भूषण यांचे ५८६ छंद आहेत. त्यापैकी ४०७ शिवभूषणचे, ‘शिवबावनी’ चे ५२ ‘छत्रसाल दशक’ चे १० व इतर ११७ छंद आहेत. यात संभाजी महाराज, शाहू महाराज, थोरले बाजीराव पेशवे, मिर्झा जयसिंह यांच्यावर रचलेले छंद देखिल आहेत. एकूण त्यांच्या रचना वीररसपूर्ण आहेत. शृंगाररसयुक्त अशा फक्त ३९ रचना आहेत. त्यांनी औरंगजेबाची निंदा करणारे, मुघलांनी उद्ध्वस्त केलेली काशी, मथुरा इ. मंदिरे, तिथे उभ्या राहिलेल्या मशिदी यांचे व धार्मिक अत्याचारांचे वर्णन करणारे छंद देखिल रचले आहेत.
त्यांनी लिहिलेले ५८६ छंद प्रसिद्ध आहेत. त्यापैकी हा पुढील छंद, महाराजांवरील एका टी व्ही सिरीयलच्या शीर्षक गीतात वापरला गेल्यामुळे, अलीकडील काळात जास्त प्रसिद्ध झाला. हा पूर्ण छंद असं आहे —–
इंद्र जिमि जंभ पर,
बाड़व ज्यौं अंभ पर,
रावन सदंभ पर
रघुकुलराज है।
पौन बारिबाह पर,
संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाहु पर
राम द्विजराज है।
दावा द्रुमदंड पर,
चीता मृगझुंड पर,
भूषन बितुंड पर
जैसे मृगराज है।
तेज तम-अंस पर,
कान्ह जिमि कंस पर,
यौंन म्लेंच्छ-बंस पर
सेर सिवराज है॥
— कवी भूषण
याचा थोडक्यात अर्थ असा :-
जसे इंद्राने जंभासुर दैत्यावर आक्रमण करून त्याचा वध केला.
जसा वडवानळ समुद्रात आग निर्माण करतो.
जसा रघुकुल शिरोमणी श्रीरामाने अहंकारी रावणाचा वध केला.
जसे जलवाहक मेघांवर पवनाचे प्रभुत्व असते.
जसे रतीचा पती कामदेवाची क्रोधित शिवाने जाळून राख केली.
जसे सहस्त्र बाहु असलेल्या कार्तवीर्य अर्जुनाला परशुधारी रामाने, म्हणजेच परशुरामांनी त्याचे हजार बाहु कापून टाकून त्याचा वध केला.
जसा जंगलातल्या मोठमोठ्या वृक्षांना दावानल भस्मसात करतो.
जसा हरणांच्या कळपावर चित्ता तुटून पडतो.
जसा जंगलाचे भूषण असलेल्या हत्तीवर सिंह झेप घेतो.
जसा सूर्याच्या तेजाने अंधाराचा विनाश होतो.
आक्रमक कंसावर जसा श्रीकृष्णाने विजय मिळवला —
— तद्वतच, नरसिंह असलेल्या शिवाजी महाराजांनी मुघल वंशाच्या शत्रुला सळो की पळो करून सोडलेलं आहे.
कोथरूडच्या रोटरी क्लब मध्ये ‘ब्लड डोनर्स’ ची लिस्ट तयार केलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन येतो, ” एका मुलाचा accident झालाय. खूप bleeding झालंय. O- blood group असलेले कुणी डोनर असतील तर त्यांचे नाव व पत्ता मिळेल का? ” … लिस्ट चेक केली जाते व त्या व्यक्तिचे नाव व पत्ता त्या फोन करणाऱ्या व्यक्तिला दिला जातो. ते कार्यकर्ते गाडी घेऊन त्या पत्त्यावर जायला निघतात.
घराच्या जवळ गाडी येते. बघतात तर काय, एक गृहस्थ रस्त्यावर येऊन कुणाची तरी वाट बघत असल्यासारखे उभे असतात. ते गाडीला हात करून थांबवतात. “… हाँस्पिटल मधून आलात ना ?
मीच आहे डोनर. हे माझे कार्ड “. कार्यकर्ते झटकन गाडीचे दार उघडून त्यांना गाडीत घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह असतं. काका खुलासा करतात..” मलाही फोन आला होता, काही कार्यकर्ते तुम्हाला न्यायला येतील म्हणून. तुम्हाला घर शोधायला अडचण येऊ नये म्हणून बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो.”…
हाँस्पिटल येते. काका ब्लड डोनेट करतात. त्या जखमी मुलाला ते रक्त दिले जाते. त्याचा जीव वाचतो. कार्यकर्ते परत काकांना घरी सोडायला निघतात. त्यांच्या घराच्या गल्लीत गाडी वळते. लांबूनच काका म्हणतात, “ इथेच सोडा मला. जातो मी पुढे माझा माझा “. ती मुले गाडीतून बघत असतात काकांच्या घराकडे. ती म्हणतात,” काका, तुमच्या घरापुढे एव्हढी गर्दी कसली दिसतीये? काय झालंय? Anything serious? आम्ही येऊ का आत? “……
काका शांत होते. मग उत्तरले, ” आता सांगायला हरकत नाही. सकाळी तुम्ही आलात तेव्हा माझ्या एकुलत्या एक मुलाचे निधन झालेले होते. त्याचे पार्थिव घरात आणलेले होते. इतक्यात क्लबमधून रक्ताची गरज असल्याचा फोन आला. माझा रेअर ग्रूप आहे. मी एक क्षण विचार केला, माझा मुलगा आता काही केले तरी परत येणार नाही. पण कुणाच्या तरी मुलाचे प्राण मी वाचवू शकतो. मी निर्णय घेतला. पहिले ब्लड डोनेशन करून यायचे. मग अंत्यसंस्कार !. पण तुम्हाला हे समजलं असतं तर तुम्ही मला घेऊन गेला नसता. म्हणून मी घरापर्यंत तुम्हाला येऊच दिलं नाही व मी बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो. पण आता शेवटी ते तुम्हाला समजलंच “…..
कार्यकर्ते सुन्न झाले. डोळे फाडून ते काकांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. गाडी वळवायचे भान ही त्यांना राहिले नाही. नकळत त्यांचे हात जोडले गेले..
वंद्य वंदे मातरम्
राष्ट्रहित सर्वोपरी
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्वदेशीचा जादू… भाग – ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…
रेडिओवर तुकोबांचा अभंग लागला होता. लताबाई गात होत्या. त्या गाण्याच्या तालावर श्यामरावांनी ठेका धरला होता. तेही गुणगुणू लागले होते, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…’ एवढ्यात राजेशने त्यांची तंद्री भंग केली.. ‘ बाबा, ऐका ना मी काय म्हणतोय ते…? ‘ श्यामराव आपल्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाले, ‘ हं, बोला राजे. ‘ राजेश म्हणाला, ‘ बाबा, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना ? ‘ श्यामराव राजेशच्या ज्ञानावर खुश होत म्हणाले, ‘ अगदी बरोबर. बेटा, तुला आवडला का हा अभंग ? लता मंगेशकरांनी फार सुंदर गायला आहे बरं .’ ‘ अहो बाबा, अभंग तर सुदंर आहेच. पण मला विचारायचे ते वेगळेच आहे. ‘ ‘ बोल बोल काय विचारायचे आहे तुला ? ‘ बाबा म्हणाले.. राजेश म्हणाला, ‘ बाबा, आता जसे शाळेत पर्यावरणाचे महत्व शिकवतात. झाडे लावा वगैरे सांगतात. तसे तुकाराम महाराजांच्या काळी पण सांगत असावेत का हो ? ‘ हा प्रश्न ऐकल्याबरोबर बाबांना हसू फुटले. तशी पिंकी मध्ये येत म्हणाली, ‘ बाबा, हा राजेश ना काय विचारेल काही सांगता येत नाही..’
‘ नाही नाही पिंके, अग आपल्या राजेशला पडलेला प्रश्न बरोबरच आहे. या प्रश्नाचे उत्तर मी सांगतो. पण त्याआधी तू एक काम कर. तू आईला आपल्या सगळ्यांसाठी मस्त गरमागरम पोहे करायला सांग. आणि पोहे झाले की तिला पण इकडे ये म्हणावं. ‘
‘ हो बाबा, आता सांगते आईला ‘ असं म्हणत पिंकी स्वयंपाकघराकडे पळाली. ती गेली तशी परतलीही.
राजेश म्हणाला, ‘ आता सांगा ना बाबा माझ्या प्रश्नाचे उत्तर. ‘
‘ हो सांगतो. त्याचं काय आहे राजेश, त्या वेळी आजच्यासारख्या शाळा वगैरे नव्हत्या. गुरुजी किंवा पंतोजी घरी येऊन शिकवायचे. काही ठिकाणी गुरुकुलासारखी पद्धतही होती. पण वृक्षांचे, पर्यावरणाचे महत्व वेगळे सांगावे लागत नव्हते. कारण त्याची जाण त्या काळातील लोकांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना मुळातच होती. ते स्वतःच पर्यावरणाला जपायचे, त्याची काळजी घ्यायचे. त्याचे संस्कार आपोआपच त्या काळातील लहान मुलांवर व्हायचे. वृक्षांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जायची. कामापुरतीच विशिष्ट झाडे तोडली जायची. जंगले शाबूत होती, घनदाट होती. त्यावर लोकांची उपजीविका चालायची. आणि तुकाराम महाराजांसारखे संत तर वनातच राहायचे. तिथेच त्यांची उपासना, ध्यान, जपतप इ. गोष्टी व्हायच्या. त्या वनातील वृक्ष, प्राणी हेच त्यांचे सखेसोबती असायचे. त्यांच्या संगतीत त्यांचा वनवासही सुखकर व्हायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या साधूसंतांना मुळातच पर्यावरणाची जाण होती, त्याचे महत्व कळले होते. समर्थ रामदासांच्या दासबोधात सुद्धा कितीतरी ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने वृक्षांचा उल्लेख त्यांनी केला आहे. ‘ बाबांनी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला.
‘ बरोबर आहे बाबा तुमचं, ‘ पिंकी म्हणाली. आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला एक पुस्तक वाचायला सांगितलं आहे. अं, काय बरं त्याचं नाव ? हं , आठवलं. ‘ दास डोंगरी राहतो ‘ असं काहीतरी नाव आहे. म्हणजे समर्थ डोंगरातच राहत होते ना.. ?
‘ हो बरोबर आहे पिंकी,’ आई पोह्याच्या डिश ठेवत म्हणाली. ‘ अगं, गो नी दांडेकरांची आहे ती कादंबरी. आपल्याकडे आहे. मी देईन तुला काढून. ‘
‘ अहो, मी काय म्हणते ? उद्या रविवार आहे. आपण बऱ्याच दिवसात कुठे बाहेर गेलो नाही. आपण मुलांना घेऊन कुठेतरी जाऊ या का ? ‘
पिंकी, राजेश दोघांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या. ‘ बाबा, जाऊ या ना मस्त कुठेतरी. ‘ पिंकी म्हणाली.
‘ बरं बरं आता तुम्ही सगळे म्हणताय तर जाऊ या. आपल्या गावाजवळ एक अभयारण्य आहे. तिथे शंकराचं एक हेमाडपंती देऊळ पण आहे. तुम्हाला मस्तपैकी झाडं, प्राणी सुद्धा बघायला मिळतील. ‘ श्यामराव म्हणाले. चला, जा आता. तुमचा गृहपाठ पूर्ण करा. मग थोडावेळ बाहेर खेळायला जा. ‘ मुलं आनंदानं तिथून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच श्यामराव, श्यामलाताई, राजेश, पिंकी आणि त्यांची पिंकी जंगल सफारीला निघाले. काही ठिकाणी रस्ता कच्चा होता. त्यामुळे प्रवासाला वेळ लागत होता. आता ऊन झाले होते आणि मुलांना भूक लागली होती. रस्त्यात एक विस्तीर्ण पसरलेले वडाचे झाड श्यामरावांना दिसले. त्यांनी तिथे गाडी थांबवली. सगळे गाडीतून खाली उतरले. श्यामलाताईंनी गाडीतून जेवणाचे डबे काढले. श्यामरावांनी राजेश आणि पिंकीला गाडीतील सतरंजी काढून खाली टाकायला सांगितली. आता सगळेच छानपैकी बसून जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. राजेश म्हणाले, ‘ बाबा, इथे किती छान, फ्रेश आणि थंड वाटते आहे ! हवा पण छान आहे. ‘
‘ राजेश, हे कोणते झाड आहे माहिती आहे का ? ‘ बाबांनी विचारले. ‘बाबा, मी सांगू ? ‘ पिंकीने विचारले.
‘ हो सांग की ‘
‘ हे वडाचे झाड आहे. बाबा, बघाना याला पारंब्या किती फुटल्या आहेत ! पिंकी म्हणाली.
‘ अगदी बरोबर आहे पिंकी. वडाच्या झाडाला खूप पारंब्या फुटतात. त्या पुन्हा जमिनीत जाऊन वाढतात. हे झाड खूप मोठे वाढते. काही काही वटवृक्ष तर एवढे मोठे असतात की त्यांच्या छायेत एकाच वेळी पाच ते दहा हजार लोक सुद्धा बसू शकतात. प्राचीन काळामध्ये व्यापारी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या झाडाच्या सावलीत थांबत असत म्हणून या झाडाला इंग्रजीमध्ये बनियन ट्री असेही म्हटले जाते. आणि ही झाडे दीर्घायुषी असतात बरं का राजेश. काही झाडे तर हजार वर्षांपर्यंत जगतात. ‘
‘ बापरे, आश्चर्यच आहे. माणसापेक्षा सुद्धा ही झाडे जास्त जगतात. ‘ राजेश उदगारला.
‘ हो राजेश, वड, पिंपळ यासारखी झाडे खूप वर्षे जगतात. हे अक्षय वृक्ष आहेत. यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. ‘
राजेशची आई शाळेत विज्ञान विषय शिकवायची. ती म्हणाली, ‘ राजेश, पिंकी , तुम्हाला माहिती आहे का की वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, कडुलिंब यासारखी झाडे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करतात. पिंपळ वातावरणातील १००% कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो तर वड आणि कडुलिंब अनुक्रमे ८० आणि ७५ टक्के कॉ डा ऑक्साईड शोषून घेतात. वातावरण शुद्ध करणाऱ्या या निसर्गाच्या गाळण्याच आहेत. ‘
‘ अगदी बरोबर आहे राजेश, ‘ बाबा म्हणाले. पण राजेश आणि पिंकी तुम्हाला सांगतो की ही सगळी आपली देशी झाडं बरं का ! पर्यावरण शुद्धीसाठी ही फार मदत करतात. पण गुलमोहर, निलगिरी यासारखी झाडे मात्र या दृष्टीने फारशी उपयोगाची नाहीत. या झाडांची सावली फारशी पडत नाहीत. या झाडांवर पशुपक्षीही घरटे करत नाहीत. पण जे पशुपक्षांना कळते, ते मानवाला मात्र कळत नाही. बाळांनो, तुम्ही थोडावेळ आईशी बोला. तोपर्यंत मी जवळपास आणखी काही बघण्यासारखे आहे का त्याचा तपास करतो. ‘ असं म्हणून श्यामराव तिथून निघाले.
श्यामलाताई म्हणाल्या, ‘ बाळांनो, वड, पिंपळ, कडुलिंब, औदुंबर आणि आपली सगळीच झाडे अतिशय औषधी आहेत बरं का ! ते आपल्याला ऑक्सिजन तर देतातच पण आपले अनेक आजारही बरे करतात. कडुलिंबाच्या काडीने नियमितपणे दात घासल्यास दातांना कीड लागत नाही. पिंपळाची पाने तर किती सुंदर असतात. हृदयाच्या आकाराची ! जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हा ते छान गुलाबी, तांबूस असतात. मग हिरवी होतात. त्यांची सळसळ, वाऱ्यावर डोलणं किती मनमोहक असतं. पिंपळाची पाने, साल आणि मुळे औषधी असतात. पोटाच्या आजारांवर त्यांचा उपयोग होतो. पिंपळ पानांचा काढा आपले शरीर डिटॉक्स करतो म्हणजे त्यातील दोष किंवा टॉक्सिन्स काढून टाकतो. पिंपळाची फळे पक्षांचे आवडते खाद्य आहे. या वृक्षाला अश्वत्थ वृक्ष असेही म्हटले जाते. याचा उल्लेख भगवद्गीतेत सुद्धा येतो. गौतम बुद्धानी याच वृक्षाखाली तप केले. त्यांना त्या ठिकाणी दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून त्या वृक्षाला बोधिवृक्ष असेही म्हटले जाते. बिहारमधील बोधगया येथे हा वृक्ष आहे.
पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीचे म्हणजे अश्वत्थ मारुतीचे दर्शन पुण्यप्रद मानले जाते. श्रावण महिन्यात तर दर शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ वृक्षाचे महत्व सांगणारा एक छान श्लोक आहे. तू आता मी तुम्हाला सांगते. तुम्ही लक्षात ठेवा आणि पाठ करा तो.
मूले ब्रह्मा, त्वचा विष्णू , शाखा शंकरमेवच
पत्रे पत्रे सर्वदेवायाम, वृक्ष रादन्यो नमोस्तुते.
म्हणजे ज्या वृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मा, सालीमध्ये विष्णू, फांद्यांमध्ये भगवान शंकर आणि प्रत्येक पानात देवीदेवतांचा निवास असतो, अशा वृक्षराजाला ( पिंपळाला ) नमन असो. ‘
‘अरे वा, आई किती माहिती आहे ग तुला! आज तर आम्हाला खूप नवीन गोष्टी कळल्या. ‘ पिंकी म्हणाली.
राजेश म्हणाला, ‘ आई या वडाच्या झाडाभोवती नुसत्या फेऱ्या मारल्या तरी किती छान वाटते. ‘ श्यामलाताई हसल्या आणि म्हणाल्या, ‘ तुम्हाला माहिती आहे का की वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही याच झाडाची पूजा करतो. त्याला प्रदक्षिणा घालतो. ‘ पिंकी म्हणाली, ‘ आई, ते माहितीये, पण का पूजा करतात आणि प्रदक्षिणा का करतात ते सांग ना… ?’
श्यामलाताई म्हणाल्या, ‘ पिंकी तू सावित्री आणि सत्यवान यांची कथा ऐकली असशीलच. तरी मी सांगते. सावित्री ही पतिव्रता होती. यमाने सत्यवानाचे प्राण हरण केले होते. पण सावित्रीने आपल्या सामर्थ्याच्या आणि चातुर्याच्या बळावर यमाकडून त्याचे प्राण परत मागून घेतले. वटवृक्षाखालीच सत्यवानाचे प्राण पुन्हा परत आले. तेव्हापासून सवाष्ण स्त्रिया या वृक्षाची पूजा करतात. आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. त्याला प्रदक्षिणाही करतात. वडाचे झाड भरपूर ऑक्सिजन देणारे आहे. त्यामुळे त्याच्याभोवती प्रदक्षिणा केल्याने आपोआपच शुद्ध प्राणवायूचा आपल्या फुफ्फुसांना होऊन आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय वडाची मुळे, साल, पाने औषधी असतात. सांधेदुखीवर त्यांचा चांगला उपयोग होतो.
तसेच केस वाढण्यासाठी वडाच्या झाडाचा उपयोग करून तेल बनवतात.
कडुलिंबाचे झाड सुद्धा असेच औषधी असते. त्याची सावली तर खूप थंड असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंबाच्या कोवळ्या पानांपासून चटणी बनवतो. ती आरोग्यासाठी अतिशय चांगली असते, आपली प्रतिकारशक्ती वाढवणारी असते.
‘अबब ! किती उपयोगी असतात ही झाडे, नाही का ? पिंकी म्हणाली.
‘हो तर. म्हणून बाळांनो, आपल्याला नैसर्गिक आपत्तीपासून आणि ग्लोबल वार्मिंगपासून वाचायचे असेल, आपली वसुंधरा हिरवीगार ठेवायची असेल तर विदेशी झाडांचा मोह सोडून देऊन प्रत्येक १०० मीटर अंतरावर प्रत्येकी एक औदुंबर, वड, पिंपळ, कडुलिंब यासारखी झाडे लावली पाहिजेत. तसेच प्रत्येक घरासमोर, परसबागेत किंवा आपल्या गच्चीवर तुळस अवश्य लावावी. तुळस अत्यंत औषधी तर आहेच पण पण ती भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वनस्पती आहे. ‘
‘आई, आता कळले की तुकाराम महाराज, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ‘ असं का म्हणत असावेत. ‘
एवढ्यात श्यामराव परत आले. ‘ अरे, मायलेकांच्या गप्पा अजून संपल्या नाहीत का ? चला, आपल्याला अजून बरेच काही पाहायचे आहे. ‘
☆ पाऊस केव्हाचा पडतो… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
पाऊस केव्हाचा पडतो… काळ्या ढगातून जलाचे घड्यावर घडे आज तो रिते करतो… वाऱ्यालाही त्यानं तंबी दिलीय खबरदार आज माझ्या वाट्याला आलास तर कोसळणाऱ्या सरींवर सरीच्या भिंतीना हादरवून गेलास तर…वारा मग पावसाच्या वाऱ्यालाही उभा राहण्यास धजला नाही.. दुतर्फा झाडांची दाट राईचीं अंगे अंगे भिजली जलधारानी.. ओंथबलेले पानं न पान नि सरी वर सरीच्या माऱ्याने झाडांची झुकली मान…इवलीशी तृणपाती, नाजुक कोमल लतावेली चिंब चिंब भिजून जाण्यानं काया त्यांची शहारली… हिंव भरल्या सारखे थरथर कापे पान न पान.. खळखळ पाण्याचा लोट धावे वाट फुटे तसे मनास भावे… जीर्ण शिर्ण पिवळी पानं, काटक्या,काड्या, कागदाचा कपटा, सारं सारं मिळालेल्या प्रवाहात जाई पुढे पुढे ते वाहात.. सरली तुमची सद्दी उचला तुमची जुनीपुराणी रद्दी. आता नव्हाळीची असे गादी…स्वच्छ झाले शहर नगर, स्वच्छ झाले भवताल… चकचकीत झाले रस्ते… दर्पणाला देखिल त्यात स्वताला निरखून पाहावेसे वाटले…घन अंधार दाटला भवताल त्यात बुडाला.. रस्तावरचे पथदिवे आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने रस्ता रस्ता उजळून टाकला… निराशेच्या वाटेवर असतो आशेचाही एक किरण आणि तो शोधून सापडण्यास करावी खारीची मदत असा होता त्यांचा एक मनसुबा…दारं खिडक्या कडेकोट झाली बंद माणसा माणसांनी कोंडूनी जोडूनी घेतला घरोबा… स्थानबद्ध झाले सगळेच जीवबध्द…चिटपाखरू न धजे विहराया बसे घरटयात आपुल्या पिलांच्या कोंडाळ्यात… दाणा गोटा कुठे मिळावा त्यांना अश्या प्रलयंकारी पावसात…हतबल झाले सारे एका निर्सागा समोरी… पुरे पुरे बा पावसा कोसळणे तुझे हे.. शरणागत आलो तव पायी कळून आली आमची माजोरी…खाऊ देशील का कोरडी सुखी भाकरी… नको नको असा उतु मातू नको दावू ओला दुष्काळ तो… प्रसन्न तू सदा असावे म्हणून आरती तुझी आम्ही नित्य गातो…
गडगडाटी हास्य पावसानं केलं कडकडाटासह कोरडा चपलाने तो ओढला… नि पाऊस हळूहळू कमी होत गेला… पाऊस शांत शांत झाला..
☆ स्वदेशीचा जादू… भाग – २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
योग आणि आयुर्वेद
आपल्या देशात आणि आपल्या राज्यात स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या वस्तू, वनस्पती, फळे, फुले या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. म्हणूनच जाहिरातबाजीच्या मागे लागून विदेशी वस्तू वापरण्यापेक्षा स्वदेशी वस्तू वापरणे कधीही चांगलेच. स्वदेशी चळवळीचे एक महान प्रचारक आणि अभ्यासक राजीव दीक्षित यांनी आपले संपूर्ण आयुष्यच त्यासाठी वाहून घेतले होते. स्वदेशी चळवळीला त्यांनी योग आणि आयुर्वेद यांची जोड दिली होती. घरात विशेषतः स्वयंपाकघरात असणाऱ्या अनेक वस्तूंचा आपल्या आरोग्यप्राप्तीसाठी वापर कसा करून घेता येईल हे त्यांनी अनेक रुग्णांवर प्रयोग करून सप्रमाण सिद्ध केले. घरात असणाऱ्या हळद, दालचिनी, मिरी, लवंग या सारख्या मसाल्याच्या वस्तू तसेच मेथी, खाण्याचा चुना, मीठ यासारख्या अनेक गोष्टींचे अनेक आजारांवर उपयोगी पडणारे गुणधर्म सांगितले. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आज बाजारात अनेक औषधे आणि सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत आणि ती आपण घरच्या पदार्थांचा वापर न करता अत्यंत महागड्या किमतीने विकत घेतो.
मीठ, साखर,बेकरी पदार्थ, फ्रिज आणि फ्रिजमधील वस्तू यासारख्या गोष्टींच्या अतिवापरापासून दूर राहा असेही राजीव दीक्षित यांनी निक्षून सांगितले. तरी घरात मोठा फ्रिज असणे ही आम्ही प्रतिष्ठेची बाब समजतो. रोज मिळणाऱ्या ताज्या भाज्या आणि तयार झालेले अन्न लगेच खाल्ले तर फ्रिजची फारशी गरज राहणार नाही. आजचे आधुनिक संशोधन सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर आरोग्यासाठी चांगला नाही हेच सांगते.
आपला आयुर्वेद आणि योगशास्त्र ही भारतीयांनी जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. पण आपल्या एखाद्या गोष्टीचा जेव्हा परदेशात अभ्यास केला जातो, आणि त्याचे महत्व ते लोक जेव्हा आपल्याला सांगतात, तेव्हा आपल्याला आपल्या प्राचीन गोष्टींचा, परंपरांचा त्या चांगल्या आहेत असा साक्षात्कार होतो. आज भारतातील आयुर्वेद आणि योग यांचे महत्व जगाने मान्य केले आहे. आयुर्वेदाचा उपयोग विदेशात विशेषतः अमेरिकेत एक पर्यायी औषधपद्धती म्हणून केला जात आहे. योग आणि आयुर्वेद ही परस्परपूरक शास्त्रे असून त्या जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. त्यात मन, शरीर आणि आत्मा यांचे संतुलन साधले जाते.
आयु म्हणजे आयुष्य किंवा जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र. आयुर्वेद हे जगण्याचे शास्त्र आहे. आयुर्वेद हे शास्त्र अतिप्राचीन असून त्याचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे प्रणेते मानले जातात. आयुर्वेदात पुढे चरक, सुश्रुत, वाग्भट आदी महर्षींनी संशोधन करून मानव जातीवर अनंत उपकार करून ठेवले आहेत. याच महर्षींच्या ग्रंथांचा अभ्यास आजही आयुर्वेदाच्या अभ्यासकांना होतो आहे. सुश्रुत यांना तर सर्जरीचे जनक मानले जाते. त्यांच्या ‘ सुश्रुत संहितेत अनेक शस्त्रक्रियांचे वर्णन आले आहे. सृष्टीमध्ये कार्यरत असणारे पृथ्वी, आप, तेज, वायू, जल आणि आकाश या पंचमहाभूतांचा आपल्या आरोग्यावर पडणारा प्रभाव याचा अभ्यास त्यात आहे. त्यानुसार कफ, पित्त, वायू या शरीरातील प्रकृतीचा विचार त्यात आहे.
आयुर्वेद केवळ रोगाच्या लक्षणांचा विचार करून उपचार करीत नाही, तर रोगाचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन काळात जे परदेशातील व्यापारी आणि पर्यटन करणारे लोक भारतात आले, त्यांनी आपल्याबरोबर भारतातील हे आयुर्वेदाचे ज्ञान नेले. त्यांच्या बऱ्याच औषधोपचार पद्धतींवर भारतीय आयुर्वेदाचा प्रभाव त्यामुळेच दिसतो. आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध जपणूक करून प्रसार करण्याचे कार्य केरळ सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर होते. अनेक देशी विदेशी पर्यटक त्याचा लाभ घेतात. महाराष्ट्रातही अनेक नामवंत वैद्यांनी ही आयुर्वेदाची परंपरा जपली आणि वाढवली.
अर्थात वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक शोध लागताहेत. अनेक आजारांवर संशोधन होते आहे. अलोपथीतील उपचार आणि शस्त्रक्रियांमुळे अनेक रुग्णांना जीवघेण्या आजारातून जीवदान मिळाले आहे. विविध रोगांवर शोधल्या गेलेल्या लशींमुळे लाखो लोकांचे प्राण जगभर वाचले आहेत. त्यामुळे दोन्ही पॅथी आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. असे असले तरी या दोन्ही उपचार पद्धतींचा मेळ घालून त्यांचा वापर तारतम्याने करणे योग्य होईल. छोट्या मोठ्या आजारांसाठी आयुर्वेदातील उपचारांचा वापर करून अगदी आवश्यक तेव्हा अलोपॅथी उपचार पद्धती वापरता येईल. आयुर्वेद हा सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन असल्याचे पुरावे आहेत. त्यातील संशोधकांनी आपले आयुष्य त्यासाठी खर्ची घातले आहे. आयुर्वेदातील उपचारात रोग पूर्णपणे बरा करण्याची क्षमता असून त्या औषधांचे दुष्परिणाम अलोपथी औषधांच्या तुलनेत अतिशय कमी आहेत.
आपल्याला होणाऱ्या आजारातील सुमारे ऐंशी टक्के आजार हे मनोकायिक ( सायकोसोमॅटीक ) असतात असे संशोधन सांगते. म्हणजेच हे आजार संसर्गजन्य नसतात. योग आणि आयुर्वेद शरीर आणि मन या दोहोंचा विचार करून आपल्याला आरोग्यदायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. योग, आसन आणि प्राणायाम यांचे महत्व आज जगाने मान्य केले आहे. 21 जून हा दिवस तर जवळपास संपूर्ण जगात योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगाचा अभ्यास जगातील अनेक देशात आज केला जातो आहे. आयुर्वेद आणि योग यांच्यात आपल्याला निरामय आरोग्य देण्यापासून ते मोक्षापर्यंत पोहोचवण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. योगासने, प्राणायाम, ध्यान आदींच्या साहाय्याने अनेक असाध्य आजारांवर मात करता येते याचा अनुभव आज जगभरातील अनेक लोक घेत आहेत. आजच्या धकाधकीच्या आणि दैनंदिन तणावपूर्ण वातावरणात योग, आसने आणि प्राणायाम अनेक लोकांना आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करत आहेत. रामदेव बाबांसारख्या अनेक योगाचार्यांनी जगभर योगाच्या प्रसारासाठी मोठा हातभार लावला आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा नियमितपणे योगासने आणि प्राणायाम करतात.
रॉबर्ट स्वोबोदा हा अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारा एक तरुण. एकदा काही कारणाने तो आफ्रिकेत गेला. तिथे त्याला अतिसाराची लागण झाली. तेथील एका आदिवासी व्यक्तीने त्याला कसला तरी झाडपाला खायला दिला. त्याचा आजार आश्चर्यकारकरित्या बरा झाला. आपले ओक्लाहोमा विद्यापीठातील वैद्यकीय शिक्षण सोडून आपण शास्त्रशुद्ध असे आयुर्वेदाचे शिक्षण घेतले पाहिजे असे त्याच्या मनाने घेतले. त्यासाठी भारताइतका चांगला देश दुसरा नाही असे त्याला वाटले. आयुर्वेदाच्या ओढीने तो भारतात आला. पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाची पदवी घेतली. रॉबर्ट स्वोबोदा यांनी मग आयुर्वेदाबरोबरच योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, तंत्रविद्या इ. अनेक गोष्टींचा अभ्यास केला. आज ते जगभर आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. ‘ लाईट ऑन लाईफ ‘ हे त्यांचे पुस्तक त्यापैकीच एक.
आरोग्यपूर्ण जीवनासाठी दररोजचा शुद्ध आणि ताजा आहार, योगात सांगितलेल्या अष्टांग मार्गाचे आचरण या गोष्टी आपल्याला निरामय आणि आनंदी जीवनाकडे घेऊन जातात. नियमित योग आणि प्राणायाम करणाऱ्या आणि संतुलित आहार घेणाऱ्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. त्यांनी योगाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवले आहे. त्याशिवाय त्यांचा दिवस सुरु होत नाही आणि संपत नाही. वयाला, वृध्दापकाळाला आणि अनेक व्याधींना दूर ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. आज नव्वदी गाठली तरी पूर्वीच्याच क्षमतेने काम ते करीत आहेत. गाडी चालवताहेत, सभा, समारंभांना जाताहेत. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी प्रेरणादायी नाहीत काय ?
पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून महाबळेश्वरकडे जाताना रस्त्यात रश्मी चौक नावाचा बोर्ड दिसतो. त्याच्या बाजूचा रस्ता चेसन रोड आणि याच चेसन रस्त्यावरचं थोडं अंतर चालले की दोन पांढरे शुभ्र पिलर्स व त्यावर इंग्रजीमध्ये “मेडस्टोन ” लिहीलं आहे. तोच तो पेसी विरजी अंकलचा बंगला.
आठ एकर जागेत प्रशस्त ऐसपैस व ब्रिटिशांनी बांधलेला, गेटच्या आत जाताच दोन्ही बाजूला उंचच उंच सिल्व्हर ओकची झाडे आणि प्रशस्त गार्डन. या गार्डनमध्ये बोगन वेलींची कमान आणि उजवीकडे बंगल्याच्या पोर्चमध्ये उभी असलेली शेवाळी रंगाची जुनी फियाट गाडी.
गोरेपान, उंच, पांढरेशुभ्र केस व मिशा ,मिस्किल हास्य, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पुढाऱ्यासारखे जॅकेट,वार्धक्याने थकलेली मजबूत शरीरयष्टी.. पण त्यांचा उत्साह मात्र एका तरुणासारखा…………
बंगल्यात प्रवेश करताना डाव्या बाजूला शिलाई मशीनवर सुंदर डिझाईन्स करणारी डॉली आंटी, ती त्यांच्या मोठ्या भावाची विधवा. त्यांचं नाव फिरोज आणि त्यांच्या मृत्युनंतर, आठवणी विसरण्यासाठी सातत्याने मग्न होऊन शिवणकाम करणारी डॉली आंटी . उजव्या बाजूला सागवानी भव्य टेबल व त्या टेबलावर असंख्य वस्तू, पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, टेलीफोन, जुन्या कागदांची चवड, वर्तमानपत्रे , लिहिण्याचा स्टँड , जुना डायलचा टेलीफोन, प्लंबिंगचे सामान, रंगाचे सामान, ब्रशेस, स्क्रू ड्रायव्हर्स, गाडीचे पाने, ड्रिल मशीन आणि अनेक छोटया मोठया असंख्य सटरफटर वस्तू व त्यापाठीमागे ऐटीत बसलेले पेसी अंकल. ते त्यांचे छोटे ऑफिस कम प्रवेशद्वार. पेसी अंकलची ही स्टाईल मी कित्येक वर्ष पहात होतो.
पेसी अंकल घरगुती पण फक्त पारशी लोकांसाठीच हॉटेल चालवायचे, त्यांच्याकडे फक्त ओळखीचेच लोक राहायचे आणि मग राहायला जणू त्यांचा संपूर्ण बंगला वापरायला द्यायचे. त्यांच्या प्रशस्त हॉलमध्ये त्यांच्या आईचे चित्रकार एस . एल . हळदणकरांनी जलरंगात केलेले पोट्रेट लावलेले होते. त्यांच्या भव्य अशा डायनिंग टेबलवर सगळी गेस्ट मंडळी घरच्यासारखे जेवण करायची. त्यामध्ये कसलीही व्यावसायिकता नसायची. त्यांच्या बंगल्याचे लोकेशनच असे होते की त्यामधून खाली कृष्णा व्हॅलीची सुंदर चिखली गावाची दरी व छोटी छोटी शेती व धोम धरणाचे ,कृष्णा नदीचे विहंगम दृश्य दिसायचे. येणारा प्रत्येक माणूस भान हरपून जायचा.
त्यांच्या या प्रचंड मोठया माडीच्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्ती फक्त तीनच…डॉली आंटी, पेसी विरजी, व त्यांची बॉबकट केलेली… ब्रिटीशांसारखी दिसणारी गोरीपान ,थोडी बुटकी , फुलाफुलांचे फ्रॉक घालणारी पत्नी डॅफनी… डॅफनी मूळची ब्रम्हदेशातील ….ख्रिश्चन होती व अंकल तेथे नोकरीसाठी गेले होते त्यावेळी त्यांचा प्रेमविवाह झाल्यामुळे पेसी विरजी अंकलची ती फार लाडकी होती. अगदी प्रेमाने ते तिला
‘ डॉल ‘ म्हणत व तीही त्यांना प्रेमानेच ‘ पेस्तन ‘ म्हणे…………
हे संपुर्ण कुटुंब कलाप्रेमी, कलासक्त व जीवनातील सर्व आनंद घेणारे असे कुटुंब होते. गावापासून त्यांचा बंगला जरा लांब होता. पण रोटरी क्लब , पांचगणी क्लब, पारशी फायर टेम्पलचे ते अध्यक्ष असल्याने ते गावात प्रसिद्ध होते. पांचगणी क्लबमध्ये उन्हाळी सुट्टीत रोज संध्याकाळी हौजीचा खेळ लावत व तो खेळण्यासाठी अनेक पर्यटक, तसेच स्थानिक यांची गर्दी होत असे.
माझी आणि त्यांची ओळखही फार मजेशीर झाली. त्यावेळी मला लँडस्केप हा शब्दही माहीत नव्हता. पण कोऱ्या कागदावर दिसणारी कृष्णानदी व पांचगणीच्या रस्त्यालगतची वडाची व उंचच उंच सिल्व्हर वृक्षांची झाडे , टेबल लॅन्डची पठारे , रेखाटण्याचा मला छंद लागला होता. एकदा असेच रस्त्याच्या बाजूला चित्र काढत बसलो होतो. अगदी तल्लीन झालो होतो. त्यावेळी अचानक गाडी थांबल्याचा पाठीमागून आवाज आला व जोराने टाळ्या वाजवत पेसी अंकलने त्या चित्राला दाद दिली
‘ वेल डन माय बॉय’ !
मराठी शाळेत शिकत असल्याने माझी इंग्रजीची बोंब व त्यांची मराठीची…….पण ते त्यांच्या परीने मराठी बोलण्याचा खूप प्रयत्न करत… टिपिकल पारसी टोन…
पहिल्याच भेटीत ते चित्र पाहून खूप प्रभावित झाले होते. मग त्यांच्या फियाटमध्ये बसवून बंगल्यावर घेऊन आले. त्यांचा सर्व परिसर फिरून दाखविला. माणसांची ती नीटनेटकी अवाढव्य घरे, उंची सागवानी फर्निचर, सोफासेट , टिपॉय, पुस्तकांची भव्य कपाटे, घरातली लावलेली चित्रे, डायनिंग टेबल, असा मोठा थाटमाट मी प्रथमच जवळून पहात होतो. डॉली आंटी व डॅफनी आंटी यांनी माझे फार प्रेमाने स्वागत व कौतुक केले.
पुढे मी तिला ढाफनी आंटी म्हणायचो, कारण आंटीला मोठा चष्मा लावलेला असायचा. पेसी अंकलचे वडील व आजोबा चित्र काढायचे, त्यांची बहीण शिरिन विरजी मोठी शिल्पकार होती . पण पेसी अंकलला चित्रे काढता यायची नाहीत त्यामूळे आपल्या गावात कोणी चित्र काढणारा ” दुर्मिळ ” मुलगा सापडल्याचा त्यांना भारी आनंद झाला होता. दुपारची वेळ होती. मग त्यांनी मला त्यांच्या शेजारी डायनिंग टेबलवर बसून जेवायला थांबवले. भारी थाट होता त्यांचा. समोर ताटाखाली छोटे रुमाल , जेवताना
अॅप्रन, बाजूला ठेवलेले काटे चमचे व चिनी मातीच्या प्लेट्स. त्यादिवशी मटन बिर्याणी , ब्रेड, व मटन करी असा बेत होता. काटा चमच्याने मटन खाणे मला अजिबात जमत नव्हते. मी पूर्णपणे बावरून गेलो होतो . माझे सगळे पदार्थ प्लेट बाहेर पडत होते व तरीही पेसी अंकल हसत हसत मला म्हणत होते. “तू चांगला ट्राय करते……असाच होते, पन तुला जमेल…….”..मला खाताना त्रास होतोय हे पाहून डॅफनी आंटी पेसी अंकलला ओरडली ” Please let him use his hand. Why you are forcing him to eat with forks?” मग त्यांची जुगलबंदी सुरू झाली .. .ती नेहमीचीच होती. पुढे मला ती परिचयाची व सवयीची झाली.
माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच टेबलावर बसून जेवत होतो आणि असा प्रेमळ पाहुणचार घेत होतो. मग त्यांनी मला त्यांच्याकडची काही चित्रकलेची पुस्तके दाखवली. आयुष्यात मी पहिल्यांदाच लिओनार्दो, व्हॅन गॉग, टर्नर , मोने ही नावे ऐकली. ती चित्रे पाहून मी एका वेगळ्या विश्वातच गेलो. धुक्यात हरवलेल्या बोटीचे टर्नरचे चित्र आजही माझ्या डोक्यात पूर्णपणे बसलेय .मला जणू खजिनाच सापडला होता . त्या संध्याकाळी एका मंतरलेल्या अवस्थेतच मी घरी आलो . रात्रभर धुके , वारे, हलणारी झाडे, रेल्वे, व टर्नरचे पुस्तक आणि पेसी विरजींचे अवाढव्य घर डोळयांसमोर सारखे सारखे दिसत होते .
मला चित्रात पाचगणीची थंड हवा, धुके, वारे हे सगळे दाखवण्याचा जणू नादच लागला. आणि पेसी अंकलचे ते फेव्हरेट वाक्य……….” असा इफेक्ट आला पाहिजे फॉगचा, फॉगचा फिल आला पाहीजे, हवा आला पाहिजे…….फॉग एकदम पिक्चरमंधी घुसला पाहीजे…….” सतत डोक्यात ही वाक्य घुमायची.
मी चित्र काढत होतो पण मला कोणतीच चित्रशिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती .मी सायन्स शिकत होतो आणि माझा जीव चित्रांमध्ये अडकला होता . माझी तगमग पेसी अंकलना समजत होती . ” तू सायंटीस्ट नाय आर्टीस्ट हाय, तवा तू आर्ट कॉलेजमंदी जा . लई शिकला पाहीजे तुला ” त्यांचे ते शब्द मला नेहमी प्रोत्साहन देणारे ठरले.
एकदा ठाण्याच्या ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या नीलिमा कढे मॅडम व वर्षा कुलकर्णी मॅडम पाचगणीत माझ्या घरी आल्या होत्या. माझी एक पत्र्याची पेटीच भरली होती निसर्गचित्रांची , ती चित्रे त्यांनी पाहिली व मला आर्टस्कूलची माहीती दिली व प्रोत्साहन दिले. त्यानंतर मात्र चित्रकला कॉलेजला जाण्याचे मी मनोमन नक्की केले.
1985 साली एके दिवशी मी घरातून बारावी सायन्स पूर्ण करून कोल्हापूरला पळून आलो. तेथे एक वर्ष मी फौंडेशनचा कोर्स पूर्ण केला व नंतर पुण्याला आलो.
कोल्हापूरला निसर्गचित्रांची एक परंपरा आहे . त्यामुळे मी तोच निसर्गचित्रांचा ध्यास सातत्याने ठेवला. पुण्यात आल्यानंतर मी कमर्शियल आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला , सुट्टीमध्ये ज्यावेळी मी पाचगणीला जायचो त्यावेळी मी पेसी अंकलच्या बंगल्यावर हमखास जायचो आणि बंगल्याच्या सभोवतालची , पाचगणी परिसराची खूप निसर्ग चित्रे रेखाटायचो. अंकल ती चित्रे पाहून खूप खुष व्हायचे ……
त्यांनी मला एक कल्पना सांगितली. मी पाचगणी परिसरातील सर्व निसर्गचित्रे काढायची आणि ती त्यांच्याकडे विकायला द्यायची, विकलेल्या चित्रांचे जे काय पैसे होतील ते सर्व पैसे मला देण्यात येतील शिक्षणासाठी त्याचा मला उपयोग होईल आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन पेसी अंकल घेणार नाहीत. परंतु चित्रे खूप स्वस्तात असली पाहीजेत. ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.
ग्रहण म्हंटलं की माझ्या तर पोटात खूप मोठा गोळा येतो, कारण त्या दिवशी चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि माझ्या मुली ‘शिक्षित’ होताहेत या समजावरही सावली पडते…
गेल्या वर्षी पाटण मधली एक बातमी वाचली आणि हादरून गेले… एक आठ महिन्याची गर्भवती, ग्रहण आहे म्हणून वीस एक तास एकाच जागी, हातपाय न हलवता, काहीही न खाता पिता बसून राहिली. खूप खूप तहान लागली,घरी खूप विनवण्या केल्या ,माहेरून आईला बोलावून घेऊन पाणी देण्यासाठी विनंती केली. पण गर्भाला काही problem उद्भवू शकतो म्हणून कुणीही तिला घोटभरही पाणी दिलं नाही,
तडफडून तडफडून ,टाचा घासून घासून मरून गेली बिचारी शेवटी…
खूप रडले हो ही बातमी वाचून.आधी तिच्याभोवतालच्या मूर्ख बायकांचा खूप खूप राग आला,परत काही वेळानं त्यांची कीव आली आणि त्यानंतर काही वेळाने आपल्या समाजात ज्याप्रकारे रूढी रेटल्या जातात त्याचा विचार करून, आपण तरी ‘कुठे कुठे’ पुरे पडणार अश्या प्रकारचं औदासिन्य आलं………..
Msc, BE, वगैरे असलं क्वालिफिकेशन असणाऱ्या मुली जेव्हा विचारतात, “ मॅडम, शुक्रवारी ग्रहण आहे, काय काय काळजी घ्यायची ?” …. तेव्हा वाटतं अरे या भूगोल न शिकताच उच्चशिक्षित झाल्या की काय?
की आपली घोकंपट्टीवाली शिक्षणपद्धती त्यांना कुठे तर्क लावायला शिकवतंच नाही?
ग्रहण म्हणजे पृथ्वीची चंद्रावर पडणारी सावली, त्याच्यामुळे आपल्या पोटातील गर्भाला कसा काय प्रॉब्लेम होईल हा विचार करायची तसदी सुध्धा घ्यायची नाही. आम्ही डॉक्टर्स सांगतो की ग्रहण पाळण्याची वगैरे काही गरज नाही, बाळामधील व्यंगाचा आणि ग्रहणाचा दुरून दुरून सुदधा संबंध नाही तरी ,तरीही विषाची परीक्षा नको म्हणून ,घरातील पन्नाशी साठीतील ज्येष्ठ स्त्रिया दुखावल्या जातील ,आकांड तांडव करतील म्हणून या बिचाऱ्या गर्भवती ते पाळतात…
ग्रहण पाळतात म्हणजे काय तर ग्रहणाचे वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत खुर्चीवरती बसून राहायचं, हातपाय हलवायची नाहीत, मांडी घालून बसायचं नाही, काहीही खायचं प्यायचं नाही, काही चिरायचं नाही ,बोलायचं सुध्धा नाही म्हणे……नाहीतर……..नाहीतर काय होईल हे यांचे तर्क ऐकून चाटच पडते मी तर.
त्यांच्यामते हे असं ग्रहण न पाळल्यास ,बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं, म्हणजे गर्भवतीने त्या काळात भाजी चिरली तर बाळाचा ओठ आतल्याआत चिरला जाणार, तिने मांडी घातली तर बाळाचे पाय वाकडे होणार, तिने काही खाल्लं पिलं तर बाळाच्या नरड्याला छिद्र पडणार(?हा ,हा?)…
किती किती हास्यास्पद आहे हे. या अश्या समजुती तीस एक वर्षांपूर्वी एक वेळ मानूनही घेतल्या असत्या. पण आता गर्भवती माता साक्षर असतात, त्यांना बेसिक science तर माहिती असतंच की. त्या कशा काय अश्या खुळचट तर्कांबाबतीत प्रश्न विचारत नाहीत याचं आश्चर्य वाटतं.
अरे पोरीनो, गर्भामध्ये व्यंग होणे याची कारणे वेगळी आहेत. .. म्हणजे फॉलीक असिडच्या कमतरतेने बाळाला मेंदू आणि मज्जारज्जूचे व्यंग होते,अनुवंशिकतेने, गुणसूत्रांच्या दोषाने, काही व्यंग होतात. आपल्याकडे नात्यात ,समाजात लग्न होत असल्याने जोडप्याच्या खराब गुणसूत्र एकत्र येऊन त्यामुळे गर्भामध्ये व्यंग तयार होण्याचं प्रमाण जास्त आहे. काही औषधे गर्भावस्थेत चुकून घेतल्याने, गर्भावस्थेतील uncontrolled मधुमेहामुळे, अशी अनेक संशोधनामध्ये सिद्ध झालेली कारणे आहेत. पण ते आपण डॉक्टरांकडून कशाला समजून घ्यायचं हो ,आपण आपलं आपल्या आजूबाजूच्या अडाणी बायका काय म्हणतात त्यावरच डोळे झाकून विश्वास ठेवायचा, होय ना? या त्याच बायका असतात ज्या गर्भावस्थेत झोपलं की बाळाचं डोकं मोठं होतं, डिलिव्हरी झाल्यावर जास्त पाणी प्यायचं नाही नाहीतर पोट सुटतं, कॉपर टी ने अंगाची झीज होते, पिशवी कुजते, असले धादांत खोटे समज मुलींवर लादतात…जाऊ दे.. तो तर एक स्वतंत्रच लेखाचा विषय होईल…….
या सर्व ग्रहण पाळण्याच्या dramya मुळं त्या गर्भवतीचे रक्ताभिसरण मंदावते, त्यामुळे रक्तामध्ये गुठळी होऊन ती फुफ्फुसात जाऊन अडकण्याची शक्यता वाढते, हातापायांवर सूज चढते, bp वाढतो,रक्तातील साखर कमी होऊन तिला व तिच्या बाळाला जीवाला धोका उदभवतो, हे सगळं आम्ही डॉक्टर कानी कपाळी ओरडून सांगत असताना देखील या बायका काही आपला हेका सोडत नाहीत…..हेतू प्रेमापोटीची काळजी हा असेलही कदाचित त्यांचा ,पण त्याला बळी नको पडायला…….
कमीत कमी सुशिक्षित स्त्रियांनी तरी जरा तर्क वापरून आपापल्या आई, मावशी ,सासू ,आजेसासू ,शेजारणी यांना हे ग्रहण पाळण्याच्या अघोरी पद्धतींमधला फोलपणा आणि धोके स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजेत आणि तरीही त्या असे काही करायला भाग पाडत असतील तर थोडं बंड करायला हवं,
हो ना???
मग काय ,तरीही पाळणार ग्रहण????????????????
लेखिका : डॉ. साधना पवार.
संग्राहक – श्री सुनील देशपांडे
माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन (ऑर्गन डोनेशन) रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०.
उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई.
संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन, नाशिक.
सदस्य, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती (महाराष्ट्र शासन)
स्त्रीच्या आयुष्यात “पर्स” म्हणजे एक अविभाज्य घटक आहे !
कुठेही जायचे तर “पर्स” हवीच !!
.
काहीही विकत घ्यायचे नसेल तरी पर्स हवीच !!
.
ह्या मागची कारणमीमांसा थोडक्यात —-.
#सखी …. स्त्रीची एक जिवाभावाची सखीे….. तिच्याशिवाय ती अजिबात राहू शकत नाही,… जिथे ती तिथे पर्स आणि … ही सखी म्हणजे तिची पर्स
.
इतर सगळ्या बायकांच्यासारखं तिची पर्स म्हणजे एक अखंड जग आहे….
.
नको त्या वस्तू लगेच सापडणार आणि
हवी ती वस्तू नको झाल्यावरच सापडणार .
.
मोबाईल ची रिंग पूर्ण वाजून गेल्यावर ,
मिस कॉल पडल्यावर फोन सापडणार
.
गाडीवरून उतरल्यावर विस्कटलेले केस सारखे करावेत म्हणून कंगवा शोधताना मात्र हाच फोन दर दोन सेकंदला हातात येणार*.
.
*अचानक येणारी शिंक लपवायला रुमाल शोधावा
तर कंगवा न चुकता हातात येणार……
.
सुटे पैसे हवे असतील तेव्हा नोटा आणि नोटा शोधताना लाज निघण्याइतकी चिल्लर सापडणार….
.
… या गोंधळातून वाचण्यासाठी प्रत्येक स्त्री बरेच उपाय करते,अनेक कप्पे असलेली पर्स आणते.
आणल्या आणल्या प्रत्येक कप्प्यात काय आणि कसे व्यवस्थित ठेवायचं हे ठरवते.
.
पण हा असला व्यवस्थितपणा तिच्या पर्सला फार दिवस मानवत नाही….आईच्या मायेने सगळ्या चित्रविचित्र वस्तू पोटात घेऊन ती पुन्हा गोंधळ घालायचा तो घालतेच…….
.
त्यानंतर मग स्त्री एक कप्पा असलेली मोठी ,सुटसुटीत पर्स आणते,मग काय विचारता..
पर्समधे ठेवलेल्या वस्तू “तुझ्या गळा,माझ्या गळा” गाणं गात अगदी गळ्यात गळे, पायात पाय घालून एकजीव होतात…. आणि त्यांना वेगळं करण्याचं महापातक करताना स्त्रीचा जीव निघतो..
.
महत्वाच्या वस्तू, कार्ड्स ठेवायला स्त्री चोरकप्पे असलेली पर्स आणते. पण हा कप्पा कार्डांना आपल्यात कधीच सामावून घेत नाही. ती बिचारी अशीच इकडे तिकडे पडून राहतात, आणि ह्या चोरकप्प्याला रबर, पीन्स, टिकल्या, टुथपिक्स असल्या गोष्टीच आवडून जातात.
.
*एखादं पुस्तक नेहमी बॅग मध्ये ठेवत असते स्त्री, पण ते वाचायला वेळ असा मिळत नाहीच. म्हणून वैतागून ज्या दिवशी ती पर्स हलकी करण्यासाठी पुस्तक काढून ठेवते, नेमकं कुठंतरी वाट बघत बसायची वेळ येते.*
.
.नेहमी लागणारी औषध, वेलदोडा, चणे फुटाणे, चॉकलेट्स, पेन्सिल, लाल आणि निळ्या रंगाची पेन्स,
लिपस्टिक, पावडर कॉम्पॅक्ट, घरच्या किल्या, अशी न संपणारी वस्तूची यादी असते तिच्या पर्समध्ये ..
.
.त्या शिवाय हिशेब लिहायला एक छोटी वही (जिच्यात नंतर हिशोब लिहू असं ठरवून काही हिशोब लिहिलेला नसतो). .
.
अनेक लोकांची कार्डस (जी कधीच उपयोगी पडत नाहीत,आणि नेमक्या वेळेस सापडत नाहीत),अशा चिक्कार गोष्टी असतात.
.
.तिच्या पर्स मध्ये पैसे किती मिळतील याची मात्र फार गॅरेंटी नसते.
.
…… पण पर्स प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे हे नक्की…तिच्या शिवाय ती घर सोडू शकत नाही, कारण तिला फार एकट आणि असुरक्षित वाटतं.
.
*जुनी पर्स बदलणे म्हणजे तिच्यासाठी एक दिव्य असते, “जा मुली जा”अशी भावूक अवस्था असते तिची..*.
नवीन पर्स रूळे पर्यंत जुनी पर्स किती छान होती, हिच्यात काही अर्थ नाही असं म्हणून नव्या पर्सला नावं ठेवता ठेवता तिच्यावर अवलंबून राहायला सुरु होणे ….. या सगळ्या चक्रात ना स्त्री व्यवस्थित पर्स लावते ना ती व्यवस्थित राहते.