मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सु-शिक्षित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

सु-शिक्षित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

खूप वर्षांपूर्वी मी पावसाळी दिवसात लोणावळा एसटी स्टँड वर एका खूप गरीब आणि खूप म्हाता-या आजीकडून एक रुपया देऊन बारा आण्याच्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि एसटी कडे धावलो. माझी जागा खिडकीकडे होती. एसटी सुटायला वेळ होता. मी खिडकीशी जागा पकडली आणि तितक्यात मी त्या म्हाता-या आजीला निरनिराळ्या एसटी बसेस मध्ये डोकावून लंगडत लंगडत धावत येताना पाहिलं.

आमच्या एसटीत तिला मी दिसताच तिचे डोळे चमकले आणि ती निर्मळ हसली. तिने हात उंचावून मला तिच्याकडून येणे असलेले चार आणे दिले आणि म्हणाली “भ्येटला रं तू,  लय शोधला म्या तुला. ह्ये घे तुजं चार आनं. म्या म्हटलं की तुजं पैसं देण्यासाठी आता फुडला जल्म घ्यावा लागतोय मला बग.”

एसटी सुटायला वेळ होता, म्हणून मी तिला थांबायला सांगून आणि शेजा-याला ‘येतोय’ अशी खूण करून खाली उतरलो.

मी तिला विचारलं, ‘काय गं आज्ज्ये, एवढ्यासाठी तुझी पाटी तिथे तशीच सोडून मला शोधत आलीस होय ? त्यावर ती म्हणाली “बाबा, आंदळ्याची गुरं द्येव राखतोय बग. आनी बाजूची म्हतारी हाय की लक्ष ठिवायला”.  मी विचारलं, “आज्ज्ये, राहिले असते चार आणे तुझ्याकडे तर काय झालं असतं गं एवढं ?”

त्यावर ती जे उत्तरली, ते मला निरुत्तर करणारं होतं. ती म्हणाली, ‘असं बग बाबा, ऱ्हायलं असतं चार आनं माज्याकडं तर आपला दोगांचा पुन्ना जल्म काय चुकत न्हवता बग. माजा तुजं चार आनं देन्यासाटी आन् तुजा चार आनं घेन्यासाटी, आन् त्येला जबाबदार व्हते मी. आन् पुन्ना फुडला जल्म कंचा येतुंय कुणाला ठावं, माणसाचा, प्रान्याचा कीं आणखी कुनाचा, म्हंजी आला का पुन्ना चार आण्यासाटी पुन्ना पुन्ना जल्माचा फ्येरा ? आणि त्यात आपण पुण्य करतोय की पाप काय म्हाईत, आन् मग ह्ये चक्र बंद व्हनार कदी ?” मी खल्लास !

एसटी सुटायला अजून वेळ  होता. मी मनात म्हटलं, की अजून जरा आजीकडून काही तरी शिकावं, आणि म्हणून मी तिला म्हटलं, “आज्ये, माझे चार आणे देऊन टाकायचे कुणाला तरी गरीबाला.” त्यावर आजी म्हणाली “आरं, कुनाचं तरी पैसं कुनाला तरी द्यायचा अदिकार मला न्हाय, पैसं तुजं आणि त्यावर मी कशापाई पुण्य कमवू? मी तुजं चार आनं तुला दिलं, आता मी सुटले बग.”मी निरुत्तर झालो.

तितक्यात कंडक्टर आला, त्याने घंटी मारली, मी पटकन् त्या आजीला वाकून नमस्कार करून एसटीत शिरलो तर ती आजी मोठ्या समाधानात पाठमोरी आपल्या पाटीकडे लंगडत लंगडत निघाली होती. माझे डोळे भरून आले होते.

या घटनेतून मी इतकाच बोध घेतला की माझ्याहून ती कितीतरी अधिक सुसंकृत होती आणि म्हणूनच सुखी, समाधानी होती, मी ‘शिक्षित’ असेन पण ती ‘सु-शिक्षित’ होती, सु-संस्कृत होती.

म्हणून मी तत्क्षणी तिला गुरूपदाचा मान दिला.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकमान्य  आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “लोकमान्य आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर 

गणेश स्थापनेमागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का?

गणेशस्थापने मागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का? या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही याच फूटपट्टीत अपेक्षित असावं.  “हो” तर म्हणू शकतच नाही. उत्तर “नाही” हेच असले तरी नाही असे म्हणतानाही मनात अनेक विचार आणि प्रश्न वाहत राहतात.  त्याबद्दल लिहिण्यापूर्वी आधी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाची उद्दिष्टे, हेतू काय होते, यावर बोलूया. 

देश पारतंत्र्यात होता.  ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे  पिचलेला होता.  समाज विस्कटलेला होता.  अनेक जाती वंश, वर्ण, अंधश्रद्धा आज्ञान यामुळे समाज एकसंध नव्हता.  ब्रिटिशांचेच लांगुलचालन करणारा एक भारतीय वर्गही  होता.  मात्र सामान्य जनांना,   परकीय सत्तेचा जुलूम आणि अत्याचार याविरुद्ध  एकत्र आणणे हे जरुरीचे आहे असा विचार जाज्वल्य देशाभिमानी आणि राष्ट्रवादी,  स्वातंत्र्यप्रेमी लोकमान्य टिळकांच्या मनात सतत असे. 

वास्तविक तेल्या तांबोळ्यांचा नेता म्हणूनही त्यांचा उपहास करण्यात आला होता. ब्रिटिशांच्या मते तर भारतीय असंतोषाचे ते जनकच होते.  ब्रिटिशांशी सामना हा केवळ अर्ज विनंत्या करून होणार नाही हे जसे टिळकांनी  जाणले होते तसेच लोक भावनेची ही नस त्यांनी ओळखली होती. जाती,  उपजातीच्या जंजाळात अडकलेल्या जनतेला धार्मिक आवाहन केल्यास हेवेदावे विसरून,  ही जनता एकत्र येऊ शकेल हे लोकमान्य टिळकांनी जाणले आणि त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना सुचली. म्हणजेच या गणेशोत्सवाची मूळ कल्पना स्वराज्यासाठी संघटन ही होती.  आणि म्हणूनच घराघरातला गणेशोत्सव त्यांनी हमरस्त्यावर आणला. हा खाजगी उत्सव सार्वजनिक केला.

लोकमान्य टिळकांनी १८९३साली  केसरी वाड्यात त्याची सुरुवातही केली.  समाज प्रबोधन हा या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मागचा मूळ हेतू होता.  या माध्यमातून  त्यांनी क्षात्रतेज आणि देशप्रेम यांची अलौकिक सांगड घातली.  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांनी अशा पद्धतीने लोकांच्या मनावर बिंबवले.  थोडक्यात लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे  राष्ट्रकारण होते.  एक अत्यंत उदात्त,  प्रेरक असे कारण होते.  धर्मकार्य हा केवळ बहाणा होता.  स्वराज्य निर्मितीची आस उत्पन्न व्हावी हेच ध्येय होते. 

या सार्वजनिक गणेशोत्सवाची किर्ती चहुदूर पसरली आणि गावोगावी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन होऊ लागली.  आणि ती परंपरा आज सव्वाशे वर्षानंतरही टिकून आहे.

मात्र आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवातील उद्दिष्टे दिसतात का या प्रश्नाचे “नाही” असे ठाम उत्तर देताना माझ्या मनात काही विचार येतात आणि तेही मला इथे  व्यक्त करावेसे वाटतात. 

माझा जन्म स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला.  पारतंत्र्याच्या काळाचा फक्त इतिहास मी मनापासून अभ्यासला आणि त्याचा मला आजही अभिमान आहे.  या लेखाच्या निमित्ताने मला माझे बालपणी अनुभवलेले कित्येक सार्वजनिक गणेशोत्सव आठवले.  गणेश मूर्तीभोवती  केलेले ते सुंदर महाभारत, रामायणातल्या कथा सांगणारे देखावे आठवले.  गणेशोत्सवात सादर केलेली नाटके आठवली.  कित्येक नामवंत कलाकार या गणेशोत्सवांनी रंगभूमीला दिले.  उत्तम वक्त्यांची प्रबोधन पर भाषणे ऐकली.कीर्तने ऐकली. संगीत मैफिलीतले नामवंत गायक आठवले.  ते परिसंवाद, बौद्धिके सारं काही आठवलं आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे गणेशोत्सव अनुभवताना नक्कीच उदासीनता येते.  लोकमान्य टिळक तर यातून हरवलेलेच आहेत. आता उद्दिष्ट हरवले आहे आणि उत्सव राहिला आहे.  त्यातही पैसा, दिखावा, राजकारण यांचा प्रवेश झालाय.  सण उत्सव हे संघटनात्मक असतात.  समाजात ऐक्य, बंधुभाव प्रेम, समता, निर्माण करण्यासाठी असतात ही भावना न दिसता स्पर्धात्मक वादच दिसतात.  अहमहमिका, चढाओढ दिसते.  राष्ट्र कारण न दिसता राजकारण जाणवते. गोंगाट आणि धिंगाणा अनुभवायला मिळतो.  शहरात तर कित्येक वेळा सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गल्लोगल्ली वाहनांची कोंडी होऊन जनजीवनच विस्कळीत होते.  म्हणूनच आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पना टिकून आहेत का? या प्रश्नाचे नाही असे उत्तर देतानाही  एकच वाटते की आता काळ बदललाय. देश स्वतंत्र ही झालाय.

देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली.  स्वातंत्र्यासाठी जनजागृती किंवा संघटन हे या गणेशोत्सवा मागचे टिळकांचे उद्दिष्ट आज ऊरले नसले तरी उद्दिष्टे बदलू शकतात.  ती अधिक सकारात्मक असू शकतात. आज देश स्वतंत्र असला तरीही मानसिक गुलामगिरीत आहेच.  आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आपण आपला देश, आपल्या राष्ट्रीय समस्या, आपले विज्ञान प्रगत जीवन, त्याचबरोबर आपली घसरत चाललेली नीती मूल्ये, देशाभिमान  यासंदर्भात पुन्हा एकदा देशाला संघटित करण्याची,  ऐक्याच्या प्रवाहात आणण्याची प्रेरणा बाळगली पाहिजे.नव्या पिढीला आपल्या प्रेरक इतिहासाची ओळख करून द्यायला हवी.

म्हणूनच  नुसतेच ढोल ताशे नकोत. थिल्लरपणा नको.  एकापेक्षा एक गणेश मूर्तींचे प्रदर्शन नको.  नुसताच उत्सव नको. सोहळा नको. तर जी परंपरा सव्वाशे वर्ष आपण टिकवली आहे त्यात नवी आवाहने पेलण्याचं सामर्थ्य दिसलं पाहिजे.  आणि हे इतर अनेक सार्वजनिक उत्सवासाठीही लागू आहे.

तर आणि तरच लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक उत्सवाला दिलेला मान ठरेल आणि आजच्या ‘नाही” चे उद्याच्या ‘हो’ मध्ये परिवर्तन होऊ शकेल. असे मला वाटते…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(पण काळाच्या ताकतीपुढे सर्वांना झुकावेच लागते. हळूहळू का होईना पण सर्व कालबाह्य प्रथापरंपरांचा नाश होतोच.) – इथून पुढे —-

परंपराबद्दल माझी समज मी आपल्याला सांगितली. पण खरे विचाराल तर मी विचारलेला प्रश्न सनातन परंपरांबद्दल नव्हताच मुळी!  उत्तर देणाऱ्या व्यक्तीचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे हे तपासण्यासाठीची ही परीक्षा होती. तुमच्या मनाला हा प्रश्न पडेलच की तुमची परीक्षा घेऊन मला काय मिळाले? मला तुमच्याकडून काहीच नकोय. उलट मलाच तुम्हाला काही तरी द्यायचे आहे. मला तुम्हाला द्यायचे आहे सकारात्मक विचारांनी जगण्याचे भान! 

आमुक समाजातील सर्व परंपरावर चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत असा जनरल शिक्का मारणा-या व्यक्तीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यातून दिसतो.  सर्व चांगल्या परंपरा असणारा आदर्श समाज कुठेही अस्तित्वात नाही. तसेच सर्वच परंपरा खराब असणारा समाजही कुठे अस्तित्वात नाही. प्रत्येक समाजात काही चांगल्या तर काही वाईट प्रथापरंपरा आहेत.  परंपराच काय तर आपल्या वाट्याला आलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग वा संस्था यापैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. आपण स्वतःतरी कुठे परिपुर्ण आहोत? मग जगाकडून परिपुर्णतेची अपेक्षा ठेवायचा अधिकार आपल्याला कसा असेल? 

आपले सकारात्मक आणि नकारात्मक विचार आपल्या मानसिकतेवर कसा परिणाम करतात ते पाहू. नवरा बायकोचे उदाहारण घेऊ. नवरा-बायको दोघेही परिपुर्ण नाहीत. दोघांमध्येही चांगले-वाईट गुण आहेत. बायकोने नव-यातील केवळ चांगले गुण पहायला सुरवात केली. या सकारात्मक विचारांमुळे काही वेळात ‘आपल्याला देवासारखा नवरा मिळाला आहे’ अशी भावना बायकोच्या मनात निर्माण होते. ही भावना बायकोच्या मनाला सुखावणारी आहे. या भावनेने तिच्या मनात वैवाहिक जिवनाविषयी समाधान निर्माण होते. आता त्याच बायकोने त्याच नव-यामधील सर्व दुर्गुण पहायला सुरूवात केली. तासाभरात तिला जाणवेल की ‘मला राक्षस नवरा मिळाला आहे’. ही भावना बायकोच्या मनात दुःख निर्माण करणारी आहे. या भावनेने तिच्या मनात वैवाहिक जिवनाविषयी असमाधान निर्माण होणार आहे. दुःख आणि असमाधानाने भरलेले मन सुख आणि समाधान शोधायला बाहेर पडते. आनंद आणि समाधान मिळवायचा एकच मार्ग आपण शिकलेलो असतो. अपेक्षा ठेवायच्या आणि त्या पुर्ण करायच्या. अपेक्षा पुर्ण झाल्या की मन, तात्पुरते का होईना पण, आनंदी आणि समाधानी होते. या अपेक्षा असतात तरी कुठल्या? कुणाला सत्ता हवी असते तर कुणाला संपत्ती मिळवून आनंद मिळतो. कुणी प्रतिष्ठेच्या मागे लागतो तर कुणी मुलांच्या यशात आनंद शोधतो. पुरेशा प्रमाणात सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि गोड नातेसंबंध मिळालेले असतील तर अशा व्यक्तीचे आयुष्य यशस्वी झाले असे आपण म्हणतो. 

अपेक्षांच्या शेवटी थोडाफार आनंद असला तरी अपेक्षापुर्तीचा मार्ग मात्र काटेरी आहे. यशाची अपेक्षा निर्माण झाली की सोबत अपयशाची भीती आपोआप निर्माण होते. भीती ही मोठी त्रासदायक भावना आहे. तिचे लवकरात लवकर निरसन करणे क्रमप्राप्त ठरते. मग भीतीचे कारण आणि उपाय शोधण्यासाठी चिंतन चालू होते. यशाच्या अपेक्षेच्या प्रमाणात अपयशाची भीती वाढते आणि भीतीच्या प्रमाणात चिंतन गहन होत जाते. चिंतन गहन झाले की त्यालाच चिंता असे म्हणतात. चिंता मनासाठी अतिशय खराब असते.

“चिता मृत शरीरको एक बार मे जला डालती है.

लेकीन चिंता जिंदा मन को हर वक्त जलाती रहती है.”

प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्थांपैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत. बघायचे काय याचे स्वातंत्रही प्रत्येकाला आहे. तरी केवळ वाईट गोष्टी बघून स्वतःच्या मनात दुःख, असमाधान, अपेक्षा, भीती आणि चिंता अशा त्रासदायक भावनांना जन्म देणे कितपत शहाणपणाचे आहे? हा एक प्रकारे आत्मघातच आहे.

मानसशास्त्रज्ञांच्या मते माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांपैकी ८०% विचार हे आत्मघाती नकारात्मक विचार असतात. यामागे नेमके कारण काय? सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी समोर असताना लोक स्वतःलाच दुःखी करणाऱ्या नकारात्मक गोष्टीच का पाहतात?

जसे पाणी चढाकडून उताराकडे सहज वाहते तसाच मानवी मनाचा सहज प्रवाह सकारात्मकतेकडून नकारात्मतेकडे असतो. आपल्या आजुबाजुला असलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी या अपेक्षित असतात. अपेक्षित गोष्टी जागेवर असतील तर मेंदू त्याची नोंद सुद्धा घेत नाही. उदा. गृहणीने नेहमीप्रमाणे जेवनात अपेक्षित मीठ घातले तर त्याचे कुणी कौतुक करत नाही. याउलट सर्व नकारात्मक गोष्टी या अनपेक्षित असतात. उदा. नेहमी सुग्रण स्वयंपाक करणाऱ्या गृहणीने जेवनात जास्त किंवा कमी मीठ घातले तर सर्वजन लगेच ते बोलून दाखवतात. अनपेक्षित गोष्टी समोर आल्या तर आपल्या मेंदूला धक्का बसतो. मेंदू त्याची तात्काळ दखल घेतो. त्या धक्कादायक नकारात्मक गोष्टीची कारणमिमांसा होते. ती गोष्ट परत घडणार नाही यासाठी उपाय शोधले जातात. या चिंतनात एका नकारात्मक विचारांमधून दुसरा नकारत्मक विचार जन्माला येतो. प्रत्येक नकारात्मक विचाराचा शेवट दुःख, असमाधान, अपेक्षा, भीती आणि चिंतेत होतो.

प्रत्येकाला मनाच्या सहज प्रवाहाविरूद्ध नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे प्रयत्नपुर्वक जायचे आहे याचे भान देण्यासाठी हा लेख लिहला आहे. मी सुद्धा हीच धडपड करतो आहे. मनाच्या प्रवाहासोबत दुःख आणि असमाधानाकडे वाहावत जायला प्रयत्न करावे लागत नाहीत. पण प्रवाहाविरूद्ध सुख आणि समाधानाकडे आयुष्याची नाव न्यायची असेल तर मात्र तिला सतत वल्हवावे लागते. हे भान सुटले आणि वल्हवणे थांबले की लगेच आपली नाव नकारात्मतेकडे वाहू लागते. एका बाजुला आपल्या वाट्याला आलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी प्रयत्नपूर्वक शोधून त्यांची प्रशंसा झालीच पाहिजे. दुसऱ्या बाजुला धक्कादायकपणे समोर आलेल्या नकारात्मक गोष्टींना चघळत बसण्यात आत्मघात आहे याचे सदैव भान ठेवावे लागणार आहे. पण कुणी कर्तव्यास चुकले तरी पदरी दुःखच पडते. त्यामुळे नकारात्मक गोष्टी सुधारण्यासाठी आपल्या आवाक्यात असणारी आवश्यक ती कृती करून झाली की नकारात्मक गोष्टींशी गांधींजींच्या तीन माकडांप्रमाणे वागायचे. 

बुरा मत देखो

बुरा मत बोलो

बुरा मत सुनो

नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे जाण्याचे भान प्रत्येकामध्ये सदैव जागृत व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ! 

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा गणेशा !… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ बा गणेशा !… ☆ श्री सतीश मोघे

बा गणेशा ! येण्याचे आवाहन करत असतांनाच तुझ्या विसर्जनाची तारीख आम्ही निश्चित करत असतो. मुर्तीच्या ठायी देवत्व पाहिल्यावर तिचे विसर्जन करणे योग्य नाही, या समर्थांनी सांगितलेल्या सीमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन आम्ही करत असतो. पण हा आमचा अपराध तू पोटी घालतोस. या उल्लंघनासाठी खरे तर आम्हाला तू दंड करायला हवा. पण तसे न करता उदंड उत्साह, आनंदाचे दान तू पदरात टाकून जातोस. ज्या प्रसन्न मुद्रेने येतोस, त्याच प्रसन्न मुद्रेने निरोप घेता होतोस.

‘तू अनादि, तू अनंत’ हे आम्ही जाणत का नाही ! तुझ्या व्यापक ब्रम्हस्वरूपाचा अनुभव घेऊन क्षणोक्षणी ब्रम्हचैतन्याची सळसळ आणि त्याच्या भेटीचा आनंद अनुभवणे, हीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे, हे तूच दिलेल्या बुद्धीने आम्ही जाणून असतो. पण गरजा पूर्ण होऊनही इच्छा निर्माण होत राहतात. त्या अनंत इच्छांच्या मागे धावण्यात काळ लोटत असतो. तुला जाणण्यासाठी वेळच शिल्लक रहात नाही. पण तुला जाणणे, तुझे ध्यान करणे, किमान तुझ्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे, याची जाणीव मात्र आत खोलवर असते. ही जाणीवच वर्षातून दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, दहा दिवस का होईना, तुझ्यासाठी वेळ काढायला भाग पाडते. या दहा दिवसात तुझे व्यापक स्वरूप जाणणे शक्य नाही, हे आम्हाला ठाऊक असते. मग या व्यापक रूपाला आम्ही मुर्तीत पाहतो. छोट्याश्या मुर्तीच्या ठायी व्यापक ब्रम्हचैतन्याचा अनुभव घेऊ पाहतो. आभासी विश्वातले भास खरे मानून तुझ्या भेटीचा आनंद आम्ही घेऊ पाहतो. तू हा आनंद आम्हाला घेऊ देतोस. ‘तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरुन खऱ्या देवा’,हे तुकारामानी म्हटलेले चालतं. विठ्ठलाने असं म्हणायचं नसतं, हे तू जाणतोस.काही दिवस का होईना, तहान भूक विसरून केवळ आपल्या भेटीच्या ओढीने येणाऱ्या भक्तांना दर्शनाचे, भेटीचे सुख घेऊ दयायचे असते, खरा भक्तीमार्ग सांगण्याची, दाखविण्याची ती वेळ नसते, हे भगवान पांडुरंग जाणतो, तसेच तुही जाणतोस. व्यग्र जीवनात वेळ काढून तुझ्या आगमनाची प्रतिक्षा करणाऱ्या, तुला स्थापन करणाऱ्या, तेवढे दिवस का होईना तुझी मनोभावे पूजा करणाऱ्या आम्हा भाविकजनांना मुर्तीच्याच ठायी भेटीचा, चैतन्याचा अनुभव तु सुखेनैव घेऊ देतोस. 

मुर्तीच्या रुपाच्या बाबतीत तर पांडुरंगाच्याही एक पाऊल तू पुढे. पांडुरंगाची मुर्ती ठरलेली. काळ्या पाषाणाची, कटेवरी कर, कानी कुंडले. तुझे मात्र तसे नाही. तुला घडविण्याची सृजनशीलता आणि कल्पकता यांना तू पूर्ण वाव देतोस. तू म्हणजे एखाद्या चित्रकाराचे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग. त्यात तुला कोणीही, त्याला हवे तसे पाहू शकतो, हवे तसे घेऊ शकतो. कुणी तुला मूषकावर बसवतो, कुणी नंदीवर, कुणी कैलासावर तर कुणी चांद्रयानावर. विशिष्ट वाहनाचाही तुझा आग्रह नाही. कुणी तुला उभे ठेवतो, कुणी बसवितो यावरही तुझा आक्षेप नाही. केवळ गजानन आणि लंबोदर या दोन गोष्टी अंतर्भूत करून हवे तसे घडवून घ्यायला तू तयार असतोस.मुर्ती, बनविण्यापासून ते विसर्जनापर्यंत तुझ्या कोणत्याही अटी, शर्ती नाहीत. आम्हाला हवे तसे तू करू देतोस. आम्ही म्हणू तेव्हा निरोप घेतोस. बरे, निरोप घेतांना पुन्हा दूषणे लावत नाहीस वा खडे बोलही ऐकवत नाहीस. खरे सांगू… तू जेवढे आम्हाला मनाप्रमाणे करू देतोस, वागू देतोस ना, तेवढे दुसरे कुणीच करू देत नाहीत, वागू देत नाहीत. म्हणुनही असेल कदाचित….. तू आम्हाला सर्वांहून अधिक प्रिय आहेस.

तुझी मूर्ती साकारण्याचे कौशल्य तरी आमच्याकडे कुठे आहे ? आमच्यापैकी बोटावर मोजता येतील एवढयाच भाविकांना हे जमते. बाकी आम्ही सारे मुर्तीकाराने त्यांच्या कल्पकतेतून घडविलेल्या मूर्तींमधून तुझी मूर्ती निवडतो. ती निवडतांनाही मोजमाप घेऊन. घरात तुझ्यासाठी जागा किती, हे मोजतो. त्यानुसार तुझी उंची ठरवतो.  मुर्तीकाराने तुझी स्थापना केली असते, प्रदर्शन सजवले असते.त्यातून आमच्या मोजमापात बसणाऱ्या मुर्तीची आम्ही निवड करतो. तुला आणायचे मोजूनमापून. तुला ठेवायचे तेही काही दिवस मोजून. आमचे सर्वच मोजून मापून. पण तू मात्र या मोबदल्यात अमाप उत्साह आणि चैतन्याचे माप पदरात टाकून जातोस. समोरचा  कितीही मोजून मापून करत असो, आपण मात्र स्वतःला उधळतांना हिशेबी राहू नये, अशी छान शिकवण कृतीतून देऊन जातोस.

काही तुला विसर्जीत करतात, काही करत नाहीत..कायमचे घरात ठेवतात.तर काही ‘मुर्तीत देवच नसतो’, अशी वैचारिक बैठक असल्याने तुला स्थापितही करत नाहीत. महर्षि व्यासांचे महाभारत तुझ्या लेखणीतून उतरलेले. त्यातले अनेक दाखले देऊन, तुला विरोध करणाऱ्यांना खरे तर तू निरुत्तर करु शकतोस. पण तसे तू करत नाहीस. भूतलावावर आल्यावर समाजात वावरतांना सर्वांनीच तुला मोठे मानले पाहिजे, असा तूझा आग्रह नाही. विरोधी विचारधारेचाही तू आदर करतोस. तात्विक वाद घालून तिचे खंडन करुन स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचाही तुझा स्वभाव नाही.  समाजभान राखण्यासाठी अंगी सहनशीलता, सहिष्णूता असणे आवश्यक असते, याचा परिपाठ तू घालून देतोस. प्रत्येक वेळी आपल्याविरुद्ध कुणी काही बोलले तर लगेच त्याच्या अंगावर धावून जाऊन, तात्विक वाद घालून, त्याच्या बोलण्याचे खंडन करुन, आपला तात्विक विजय उन्मादाने साजरा करायचा नसतो. समोरच्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार मान्य करायचा असतो, याची शिकवणच तू देत असतोस. म्हणूनच असेल कदाचित…. तुझे आगमन, वास्तव्य आणि विसर्जन यात आम्ही प्रत्येकजणच दुसऱ्याला स्वातंत्र्य देत असतो. तेवढे दिवस तरी दुसऱ्याच्या घरात डोकावून न पटणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणे, वाद घालणे आम्ही टाळत असतो.

बा गणेशा ! तुझ्या आणखी एका गुणाचे आम्हाला खूप अप्रूप वाटते. सुखाने जगण्यासाठी तूझा हा गुण आत्मसात करायलाच हवा. हा गुण म्हणजे जीवन ‘तटस्थ साक्षीभावाने’ जगणं. खरं तर आम्हीच तुला बोलावतो. स्थापित करतो. पण तीन वेळच्या आरत्या सोडल्या तर तुझ्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळही नसतो. यावरही तुझा आक्षेप नाही. सकाळची फुलं तुला संध्याकाळी… बऱ्याचदा तर दुसऱ्या दिवशीही अर्पण करतो.. यावर तुझा आक्षेप नाही. नैवेद्य, आरती कधी वेळेत तर कधी उशीरा, तरीही तूझा आक्षेप नाही. हळदी, कुंकू थोडेसे जास्त लागले तरी लागलीच रुमालाने ते पुसणाऱ्या स्त्रिया आम्ही पाहतो. पण  येणारा प्रत्येकजण तुला हळदी-कुंकू लावत असतो. बऱ्याचदा ते तुझ्या डोळयातही जाते. तिकडेही आमचे लक्ष जात नाही, गेले तर बऱ्याच उशिरा जाते. त्याविषयी तुझी तक्रार नाही. स्थापना करतांना वर्षानुवर्षे तेच दागिने घातले तरी तुझी तक्रार नाही, विसर्जन करतांना दागिने काढले तरी तुझी तक्रार नाही. भक्तीगीतं लावली म्हणून तू अधिक प्रसन्न नाहीस वा नको ती गाणी लावली म्हणून तू नाराज नाहीस. ही तुझी तटस्थ साक्षीभावाने राहण्याची वृत्ती, हे आमचे खरे आकर्षण आहे. मधूनच वाटते, तू प्रकट व्हावेस, खडे बोल ऐकवावेस, खरे काय हे सांगावे. पण तू असे करत नाहीस. 

तटस्थता कधी अज्ञानातून येते,तर कधी ज्ञानातून. तुझी तटस्थता ज्ञानातून आलेली. तू जाणून असतोस.. तूझ्या खऱ्या, व्यापक, अनंत रूपाला. कोणी मोठी मुर्ती केली म्हणून तू मोठा होत नाहीस, लहान मूर्ती केली म्हणून लहान होत नाहीस, हे तू जाणून असतोस. आपल्या व्यापक स्वरूपाचे ज्ञान असले आणि या जगात आपण काही दिवसाचे पाहुणे आहोत याचे भान असले की घडणाऱ्या गोष्टींकडे तटस्थपणे साक्षीदार म्हणून पाहता येते. त्यातल्या काही मनासारख्या आहेत म्हणून उन्माद नाही आणि काही मनाविरुद्ध आहेत म्हणून दु:ख, तक्रार नाही, असे होऊन जाते. आमच्यासाठी तू जडमुर्तीत येतोस. आमच्या आनंदाचे निमित्त होतोस. तुला निमित्त करून, आनंद भोगुन आम्ही तुझे विसर्जन केले तरी पुन्हा मूळ व्यापक रुपात विलीन होण्याच्या आनंदात ‘तुझा केवळ वापर आम्ही केला’, अशी नैराश्याची भावना नाही. बा गणेशा ! द्यायचाच झाला तर  होणाऱ्या गोष्टींकडे तटस्थ साक्षीभावाने बघण्याचा हा तुझा दृष्टीकोन आम्हाला कायमचा देऊन जा. म्हणजे दीड दिवसाचा आमच्या आयुष्यातला हा आनंदसोहळा वर्षभर सुरु राहील.  

बा गणेशा ! या आपल्या संवादातही आता निरोपाची वेळ झाली आहे. खरे तर तू आमचा, सृष्टीचा निर्माता. पण आमच्या हातून निर्माण होतोस, आमच्या हातून विसर्जित होतोस. कधी विसर्जित करायचे, हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला देतोस. जन्माला आला त्याला विसर्जित व्हायचे आहे आणि जो जन्माला घालतो त्यालाच,  विसर्जित कधी करायचे याचा अधिकार असतो, या दोन गोष्टी तू ठसवतोस. या गोष्टी आम्ही नक्कीच ठसवून घेऊ.तू ठरवशील त्याप्रमाणे विसर्जन स्वीकारू. तोपर्यंत आम्हाला सांभाळून घे.

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी

चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी… 

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आभाळाचा भार ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

आभाळाचा भार ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

फुलांनी शाकारलेली शवपेटी….शवपेटीवरील त्या कोवळया फुलांचेही चेहरे मलूल झालेले !

शवपेटीवर आपल्या भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज पांघरलेला. सभोवताली भरून राहिलेल्या नीरवतेला खूप काही बोलायचे आहे…पण शब्द सुचत नाहीयेत..सुचलेले ओठांपर्यंत येत नाहीयेत. आजवर कधीही न डगमगलेली पावलं आता ते आठ-दहा पावलांचं अंतर चालायला नकार देताहेत….खूप मोठं अंतर आहे हे..खूप मोठं ! पोटचा एकुलता एक लेक शवपेटीत विसावलाय….त्याने आपल्या शवपेटीवर फुलं वहावीत असं स्वप्न पाहिलं होतं मी कधी काळी…आणि आज मी त्याच्या आणि तो माझ्या भूमिकेत आहे…मी उभा आणि तो आडवा आहे जमिनीला समांतर….काही वेळानं तो जमिनीच्या आणखी जवळ जाईल…तिच्या कुशीत चिरनिद्रा घ्यायला ! कुणी तरी पाठीमागे उभे राहिलं आहे…मागून माझे दोन्ही दंड धरले आहेत मला आधार देण्यासाठी. आता यापुढे दुसरा कुठलाही आधार पुरेसा ठरणार नाही आयुष्यात…..आधारवड उन्मळून पडलाय माझ्या हृदयातील अंगणातला.

मी शवपेटीजवळ पोहोचलो…त्याच्या डोक्याच्या बाजूला. लहानपणी कितीतरी वेळा तो मांडीवर येऊन निजायचा आणि मी त्याचं मस्तक कुरवाळू लागायचो…आताही हात पुढे झाले सवयीने. पण त्याचं मस्तक थंड….डोळे अलगद मिटलेले ! मी मला आधार देणा-याला स्पर्शातून सांगितले…आता मला एकट्याने उभं राहू द्यात माझ्या मुलाच्या सन्निध !

देशाच्या सेवेत दाखल झालो तेव्हा हुतात्म्यांच्या पार्थिवांवर पुष्पचक्रं वाहण्याचे प्रसंग येतीलच हे ठाऊक होतंच. तसं अनेक वेळा घडलंही. किंबहुना एखादे दिवशी आपणही अशाच एखाद्या शवपेटीत पहुडलेलं असू असंही वाटून जायचं….युद्धात मरणाची सवय करून घ्यावी लागते सैनिकांना…आपल्या माणसांचे क्षतविक्षत झालेले सुकुमार देह बघायचा सराव होऊन जातो डोळ्यांना…नजर मरून जाते ! पण मनालाही डोळे असतात…त्यांना असं काहीही पाहणं नामंजूर असतं. पण काय पहावं हे या डोळ्यांच्या हाती नसतं.

थरथरत्या हातांनी मी पुष्पचक्र हाती घेतलं. असं कितीसं वजन असेल त्या फुलांचं? खूप जड वाटली फुलं. आपण स्वप्नात नसू खासच. कारण दुःख स्वप्नात असं थेट मिठी मारत नाही….पण इथं तर प्रत्यक्ष स्वप्नानेच मिठी मारली आहे….मृत्यूला ! दोन पावलं मागं सरलो. दोन्ही पाय जुळवून उभे राहिलो…उजवा हात कोपरात वाकवून अगदी त्वरेने कपाळापर्यंत जायला हवा होता…पण या हातावर जन्माचं ओझं टाकलं होतं कुणीतरी. सावकाश हात कपाळापर्यंत नेला…सल्यूट ! जय हिंद साहेब !

हो…साहेब होतं पोरगं माझं. बापासारखंच त्यालाही पोलिस अधिकारी व्हायचं होतं….आणि बापाला सल्यूट ठोकायचा होता…पूर्ण गणवेशात. त्यानं खूप मेहनत घेतली आणि माझ्याच खात्यात अधिकारी पदावर विराजमान झाला. कामानं माझ्याही पुढं गेला. देशाचे,शांततेचे,माणुसकीचे,मानवतेचे शत्रू आसपास लपून छपून वावरत असताना…मृत्यूची छाया पावलांखालून निघून कधी डोईवर पडेल याचा नेम नसताना तो वर्दी आणि ईमान यांसाठी ठाम उभा राहिला. आमच्या गावांमध्ये मरण काही नवलाईचं नाही राहिलेलं…पण कुणाला स्वत:ला ते अजिबात नको आहे. पण त्याला सामोरं जाण्याशिवाय गती नाही जन्माला. मातीसाठी लढताना मातीत मिसळून जाण्याची तयारी ठेवावीच लागते.

जनाजा तयार आहे ! त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी विशाल जनसमुदाय जमला आहे. मरणाच्या वाटेवर निघून जाणा-यासाठी लोक अमरत्वाच्या घोषणा देताहेत. रक्ताची नाती अश्रूंनी भिजलेली आहेत. मैत्रीच्या नात्यांना आपण बरेच काही गमावल्याची खंत आहे. आता चार पावलं त्याच्यासवे चालावे लागणार…पुढे कबरीनंतर तो आपल्या सोबत नाही चालणार. तो विसावणार आणि मी उसवणार…अंतर्बाह्य !

जनाजा उचलला गेला….खांद्यांवर विसावला ! मला त्याला शेवटचं खांद्यांवर खेळवायचं होतं….लहानपणी अनेकदा खांद्यांवर उचलून डोंगर,द-या,झाडं दाखवली होती, बाजारातून हिंडवून आणलं होतं. मी डाव्या खांद्यावर जनाज्याच्या उजव्या, जमिनीला समांतर असलेल्या आधारकाठीचा भार घेतला ! पृथ्वी इतकी जड असते? या विश्वाचं ओझं एवढं महाप्रचंड आहे? विश्वास नाही बसला !

अंत्ययात्रा मुक्कामी पोहोचली…म्हातारपणीसाठी लेकाच्या भरवशावर पाहिलेल्या सुखाच्या स्वप्नांच्या मातीची ओंजळ भरून घेतली आणि ती ओंजळ त्याच्या निर्जीव देहावर अलगद रिकामी केली आणि जन्मभरीचं ओझं आणि त्याच्या पराक्रमाची कथा सांगणारा राष्ट्रध्वज घेऊन घराकडे निघालो….आता एकांत हवा…रडण्यासाठी !

त्याची मोठी तसबीर. तो रूबाबदार गणवेशात. आता मात्र अगदी सरळ, ताठ उभा राहिलो..त्याच्या डोळ्यांत पाहिले…आणि अगदी कडक सल्यूट  बजावला…जय हिंद साहेब ! तो त्याच्या डोळ्यांतून म्हणत होता…कर्तव्यपूर्तीसाठी कामी आलो…..फक्र है !

आणि काळजावरचा भार उतरल्यासारखा भासला….शांतपणे आतल्या त्याच्या लेकाच्या पाळण्याकडे गेलो….त्याचं जणू प्रतिरूपच ते बाळ….दोन महिन्यांचं ! डोळे अलगद उघडझाप करीत टुकूटूकू पाहू लागलं माझ्याकडे….मी बाळाला उचलून छातीशी कवटाळलं….त्याचा भार नाही जाणवला मला ! तो निघून गेला….मला जगण्याचं कारण मागे ठेवून !

(जम्मू-कश्मिर पोलिस विभागाचे माजी डेप्यूटी इन्सपेक्टर जनरल गुलाम हसन भट यांचे चिरंजीव डेप्यूटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस हमायूं भट साहेब अतिरेक्यांशी लढताना कामी आले. गुलाम भट साहेबांनी मोठ्या धैर्याने आपल्या मुलाला अखेरचा निरोप दिला. त्यांच्या भूमिकेतून लिहिलेले हे काल्पनिक मनोगत. याच अतिरेकीविरोधी कारवाईमध्ये हुतात्मा झालेल्या कर्नल मनप्रीत सिंग साहेब, मेजर आशिष धनौक साहेब, रायफलमॅन रविकुमार साहेब यांनाही तितकीच भावपूर्ण श्रद्धांजली.)  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जपानमधला टीचर्स डे… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

जपानमधला टीचर्स डे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

जपानमध्ये ‘टीचर्स डे’ नाही, हे माहीत झाल्यावर आश्चर्यचकित होऊन मी एका सहकाऱ्याला विचारले.

तो म्हणाला: “आमच्याकडे ‘टीचर्स डे’ असा अस्तित्वात नाही.”

माझ्या मनात एक विचार आला. ‘एक देश जो आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप अग्रगण्य आहे, तो शिक्षकांप्रती आदर दर्शविण्यासाठी ‘शिक्षक दिन’ का साजरा करत नाही?’

एकदा, कार्यालयातील कामानंतर, यमामोटा नावाच्या त्या मित्राने मला आपल्या घरी आमंत्रित केले. त्यासाठी आम्हाला मेट्रोने जावं लागलं. तिथं  लोकांची गर्दी होती. माझ्याकडे एक बॅग सुद्धा होती. अचानक, माझ्या बाजूला बसलेल्या वयस्क व्यक्तीने स्वतः उठून मला त्यांच्या आसनावर बसण्याची विनंती केली. वृद्ध व्यक्तीच्या अशा सत्कारपूर्ण व्यवहाराने मी ओशाळून गेलो.

हा वृद्ध माणूस मला त्यांची जागा बसायला का देत असेल, हा प्रश्न मी यमामोटा यांना विचारला. माझ्याकडे असलेल्या ‘शिक्षक’ या टॅग कडे पाहून त्यांनी बसायला आसन दिले आहे, असं तो म्हणाला. मला अभिमान वाटला.

ही यमामोटांना भेटण्याची माझी पहिली वेळ होती, त्यामुळे एखादी भेटवस्तू त्यांच्यासाठी घ्यावी, असं मला वाटलं. मी दुकानाबद्दल विचारलं. ते म्हणाले की थोडं अंतरावर खास शिक्षकांसाठीचं एक दुकान आहे, ज्यात विविध वस्तू कमी किंमतीने विकत घेण्याची सुविधा दिली जाते. हा मला दुसरा सुखद धक्का होता.

या सोयीसुविधा फक्त शिक्षकांसाठीच आहेत का? मी प्रश्न केला.

यमामोटा म्हणाले:

जपानमध्ये, शिक्षकी पेशा हा सर्वात प्रतिष्ठित पेशा आहे आणि शिक्षक ही सर्वात आदरणीय व्यक्ती आहे. जपानी उद्योजकांना शिक्षक त्यांच्या दुकानांमध्ये येताच अत्यंत आनंद होतो.त्यांना तो त्यांचा सन्मान वाटतो.

जपानमध्ये माझ्या प्रवासाच्या काळात, मला शिक्षकांच्या प्रती जपानी लोकांकडून अत्यंत सम्मान मिळतो, याची अनेकदा प्रचिती आली.  त्यांना मेट्रोमध्ये विशेष आसने आरक्षित असतात, त्यांच्यासाठी विशेष दुकाने आहेत, जपानमध्ये शिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या प्रवासाच्या तिकीटांसाठी रांगेत उभं राहावं लागत नाही.

म्हणूनच की काय ! जपानमध्ये शिक्षकांसाठी ‘शिक्षकदिन‘ या  दिवसाची गरज नाही, कारण तिथे शिक्षकांच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा सणच असतो.

 मी आपणां सर्वांकडून अनेक चांगल्या ज्ञानांचे धडे शिकलो…त्या माझ्या शिक्षकांनो, माझा तुमच्या चरणी प्रणाम!

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मृत्युंजय ‘ च्या निमित्ताने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “’मृत्युंजय ‘ च्या निमित्ताने” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

शिवाजी सावंत

24 सप्टेंबर.!

1995 साली आजच्या तारखेला मृत्यंजय ह्या जगप्रसिद्ध लोकप्रीय पुस्तकाला,” भारतीय ज्ञानपीठ”ह्या संस्थेतर्फे मुर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक होते.

माझ्या स्वतः च्या अत्यंत आवडत्या पुस्तकांच्या यादीत  “मृत्युंजय” हे अगदीं वरच्या लेव्हल वर विराजमान झालंय.ह्या पुस्तकाने मला एक नवी दृष्टी दिली. ह्या पुस्तकाने नव्या भूमिकेत शिरून अंतरंग कसे जाणून घ्यायचे हे खूप छान शिकविले. बरेचदा आपण ज्यांना खलनायक समजतो ते कधी कधी परिस्थिती मुळे खलनायक बनतात हे समजावून सांगितले. प्रत्येकाचे वागणे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबरच असतं हे मृत्युंजयमधून शिकायला मिळाले. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा अभ्यासता आल्या.कुठलीही अजरामर, असामान्य कलाकृती निर्माण करतांना त्यात स्वतःला झोकून द्याव लागतं हे सावंत ह्यांनी मृत्यूंजय लिहीतांना दाखवून दिलं. मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत ह्यांनी थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.  

महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित “मृत्युंजय ” कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधी झाला नाही हे माहीत होते . ही  कादंबरी अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते . वाचकांना,मराठी साहित्याला ,शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली ही एक अद्भूत देणगीच म्हणावी लागेल.कादंबरीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकसुरी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा सगळया भूमिकांचा परिपाक आहे. कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातून झालेला  कर्णाचा असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरू द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंबहुना आपण कधी ह्या अँगल ने विचारच केला नसतो.  हे पुस्तक आपल्या कित्येक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं नीट खुलासेवार, पटण्याजोगे समजावून सांगत.

हे पुस्तक वाचण्या आधी मला असलेल्या जुजबी माहितीमुळे महाभारतातील खूप प्रश्न मला भेडसवायचे त्यांची उत्तरे मला ह्या पुस्तकानेच मिळवून दिलीत.

ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेल त्यांनी आवर्जून वाचावे , एकदा हातात हे पुस्तक घेतले की वाचून पूर्ण केल्याखेरीज तुमच्याच हातून हे पुस्तक खाली ठेववणार हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(जातीव्यवस्थेसारख्या काही दुष्ट परंपरा मात्र अजूनही थोड्या मुळ धरून आहेत.) –  इथून पुढे —

आता चांगल्या परंपरामागील तर्क लोक का विसरतात ते पाहू. अनेक प्रथा-परंपरा पाळणा-या लोकांला आज त्यामागील तर्क सांगता येत नाही. तर्क माहित नसला तरी लोक परंपरा पाळतात. त्यामुळे ते आपल्या परंपरांचे कम्युनिस्टांसमोर तार्किक समर्थन करू शकत नाहीत. कधी कधी परंपरा कालबाह्य झाली तरी त्याची कल्पना लोकांना येत नाही. परंपरांमागील तर्क हळूहळू कसे नष्ट होतात यावर एक सुंदर प्रयोग झाला आहे. माकडांसाठी एक मोठा पिंजरा तयार केला गेला. पिंजऱ्याच्या मध्यभागी शिडी लावली आणि शिडीच्या वर केळ्यांचा घड लावला. विस माकडांना पिंजऱ्यात सोडले. केळी खाण्यासाठी कुठलेही माकड शिडी चढू लागले की सर्व माकडांवर थंडगार पाण्याचे फवारा मारला जाई. हळूहळू माकडांना या दोन गोष्टींमधील संबंध कळाला. मग बहुतेक माकडांनी केळ्याचा मोह सोडला. पण काही आगाऊ माकडे अधूनमधून शिडी चढायचा प्रयत्न करत. अशा माकडांमुळे काही वेळा थंड पाण्याचे फवारे सहन करायला लागल्यावर इतर माकडांनी शिडी चढायचा प्रयत्न करणाऱ्या माकडाला धरून चोप द्यायला सुरवात केली. अशा प्रकारे आगाऊ माकडांची खोड मोडली गेली. मग काही दिवसांनी शास्रज्ञांनी त्या पिंजऱ्यातील एक माकड काढून त्या जागी एक नवीन माकड पिंजऱ्यात सोडले. आता पिंजऱ्यातील माकडांवर थंड पाण्याचे फवारे मारले जाणार नव्हते. केळ्याच्या आशेने नवीन माकड लगेच शिडी चढू लागले. लगेच इतर सर्व माकडांनी त्याला धरून चोप दिला. त्याने जेव्हा जेव्हा हा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याला चोप पडला. मग त्याने धडा घेत शिडी चढण्याचा नाद सोडून दिला. नंतर दुसरे एक जुने माकड बदलले गेले. त्या नव्या माकडानेही चोप खाऊन धडा घेतला. चोप देणाऱ्या माकडांमध्ये कधीही थंड पाण्याचा फवारा सहन न केलेले पहिले नवीन माकड पण होते. त्यानंतर शास्रज्ञांनी एक एक करत सर्व माकडे बदलून टाकली. आता थंड पाण्याच्या फवारा सहन करावा लागलेले एकही माकड पिंजऱ्यात नव्हते. तरी नव्याने आलेल्या प्रत्येक माकडाला शिडी चढण्याच्या प्रयत्नासाठी सर्वांकडून चोप खावा लागत होता. पिंजऱ्यातील कुठल्याही माकडाला हे माहित नव्हते की ते शिडी चढणा-या माकडाला आपण का मारत आहोत. पण परंपरेनुसार ते कृती मात्र करत होते. याबाबतचे जिवंत उदाहरण बेटी व्यवहारात देता येईल. पुर्वी आपल्या जातीतच मुलीचे लग्न कले जाई. त्या काळी व्यवसाय जातीनुसार ठरे. जात जन्माने ठरत असल्याने व्यवसायही जन्माने ठरे. सोनाराचे मुलं सोनारकाम करी तर लोहाराचे मुलं लोहारकाम करी. व्यवसायाच्या स्वरूपानुसार जातीतील प्रत्येक स्री-पुरूषाला शारीरिक आणि मानसिक श्रम पडत. प्रत्येक व्यवसायाच्या उत्पन्नक्षमतेला मर्यादा असत. त्यामुळे प्रत्येक जातीतील व्यक्तीच्या वाट्याला ठराविक आर्थिक परिस्थिती, ठराविक सुखसुविधा आणि ठराविक त्याग येई. प्रत्येक मुलं आपल्या आईबापाकडे पाहून मोठेपणी आपल्या वाट्याला येणाऱ्या सुखसुविधांचा आणि त्यागाचा अंदाज बांधत असे. त्याप्रमाणे मुलांची मानसिक आणि शारीरिक तयारी लहानपणापासून होत असे. श्रिमंत सोनाराच्या घरात वाढलेल्या मुलीने गरीब लोहाराच्या मुलासोबत लग्न केल्यास तिला सुविधांचा अभाव असलेल्या घरी रहावे लागे. लोहाराच्या स्री प्रमाणे भाता चालवणे तसेच तापल्या लोखंडावर घणाचे घाव घालण्यासारखे अंगमेहनीचे कामे करावी लागत. लोहाराच्या घरातील अशा वातावरणात राहण्यासाठी सोनाराच्या मुलीची मानसिक आणि शारीरिक तयारी झालेली नसे. तरी नव-यावरील प्रेमापोटी वा जननिंदेच्या भयापोटी शंभरातील ऐंशी मुली या नवीन वातावरणाशी कशाबशा जुळवून घेतील असे आपण गृहीत धरू. विस मुलींना मात्र नव्या वातावरणाशी जुळवून घेता येणार नाही.  त्या शेवटी कंटाळून काडीमोड घेतील. तोपर्यंत जन्माला आलेल्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होईल. विस जोडप्यांचा काडीमोड झाल्यावर आता समाजात असे चाळीस लोक फिरू लागतील ज्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा अपुर्ण आहेत. ‘बुभुक्षिता किं न करोती पापम्’ यासुत्रानुसार शारीरिक गरजांसाठी भुकेलेले हे लोक समाज अमान्य संबंधांमध्ये लिप्त होत. आता हे चाळीस लोक आणखी चाळीस कुटुंबांसाठी डोकेदुखी ठरत. भावनांच्या आहारी जाऊन अनेक गुन्हे घडत. अशा प्रकारे कुटुंव्यवस्था बिघडे आणि त्यामुळे समाजव्यवस्थाही बिघडे. कुटुंबाचा व्यवसाय कुटुंबातील सर्व लहानथोरांचे शारीरिक आणि मानसिक अनुकुलन करवून घेत असे. व्यवसाय जातीने ठरत असल्याने सुज्ञ लोकांनी जातीत लग्न करण्याची परंपरा सुरू केली. आज परिस्थिती बदलली आहे. अंगभुत गुणवत्तेनुसार प्रत्येकाला कुठलेही व्यावसायिक शिक्षण घेण्याची आणि आपला व्यवसाय निवडण्याची मुक्त संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आज व्यवसाय जातीधिष्ठीत वा जन्माधिष्ठित राहिलेला नाही. त्यामुळे आज जातीत लग्न करण्याचा आग्रह धरणे वेडेपणाचे ठरेल. तरी पिंजऱ्यातील माकडांप्रमाणे परंपरामागील तर्क माहित नसल्याने आजही आंतरजातीय विवाहाला विरोध होतो आहे. काही ठिकाणी आॕनर किलिंग सारखे अपराधही घडत आहेत. 

तर्क हरवला असला तरी ‘जातील लग्न करावे’ हे मुळ तत्व आजही समाजहिताचे आहे. फक्त ती जात जन्माधिष्ठित जात नसावी तर स्विकारलेल्या व्यवसायामुळे मिळालेली जात असावी. डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्किटेक्ट, शिक्षक, इत्यादी व्यवसाय याच आजच्या काळातील जाती आहेत. डॉक्टर जातीच्या मुलीने डॉक्टर जातीच्या मुलाशी लग्न करावे. IT इंजिनियर मुलीने IT इंजिनिअर मुलाशी लग्न करावे. व्यवसायाईक शिक्षण निवडतानाच मुलांनी आपल्या व्यवसायात असणाऱ्या विशेष त्यागाशी आणि विशेष सुखसुविधांशी मानसिक समझोता केलेला असतो. एकाच व्यवसायात असलेल्या दोघां नवरा-बायकोला मिळणाऱ्या सुखसुविधा x त्याग समान आणि अपेक्षित असल्याने त्यांचे सहजीवन सुखद होते. दोघांना एकमेकांच्या कामातील समस्या माहित असल्याने ते दोघे एकमेकांना व्यवस्थित समजून घेतात आणि एकमेकांसाठी पुरक होतात. तेव्हा जातीत लग्न करण्याची परंपरा आजही व्यवहारी आहे. फक्त ती जात पुर्वीप्रमाणे जन्माधिष्ठित नाही. 

चांगल्या परंपरा वाईट ठरण्याचे तिसरे कारण म्हणजे काळ असते. समाजव्यवस्था गतिशील असल्याने ती सतत बदलत असते. प्रत्येक समाजात काही प्रथापरंपरा हळूहळू कालबाह्य होतात. त्याची उपरती होऊन अशा प्रथापरंपरांना नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होते. पण ही प्रक्रिया प्रथापरंपरांच्या निर्मितीप्रमाणेच वेळखाऊ असते. नवीन प्रथापरंपरा स्विकारायला समाज जसा विरोध करतो तसाच तो जुन्या प्रथापरंपरा सोडायलाही विरोध करतो. पण काळाच्या ताकतीपुढे सर्वांना झुकावेच लागते. हळूहळू का होईना पण सर्व कालबाह्य प्रथापरंपरांचा नाश होतोच.

– क्रमशः भाग दुसरा  

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विज्ञान विशारदा — डॉ. कमलाबाई सोहोनी… लेखिका – सुश्री वसुमती धुरू ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ विज्ञान विशारदा — डॉ. कमलाबाई सोहोनी… लेखिका – सुश्री वसुमती धुरू ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

इसवी सन १९३३. बंगलुरू (बंगलोर ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही शास्त्रीय संशोधनाला वाहून घेतलेली नावाजलेली संस्था. द्रष्टे उद्योगपती श्री यश यांनी १९११ साली स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये फक्त निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे.

इन्स्टिट्यूटच्या खूप मोठ्या आवारामध्ये घनदाट झाडीने वेढलेली दगडी इमारत शोभून दिसत होती. तिथल्या प्रशस्त ऑफिसमध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रामन हे  संस्थेचे डायरेक्टर राखाडी रंगाचा सूट टाय आणि डोक्याला फेटा बांधून रुबाबदारपणे बसले होते. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज झळकत होते. नारायणराव भागवत आपली लेक कमला हिला घेऊन सर रामन यांना भेटायला आले होते.  स्वतः नारायणराव व त्यांचे बंधू माधवराव हे दोघेही इथेच संशोधन करून एम. एससी झाले होते. संस्थेच्या स्थापनेपासून त्या दिवसापर्यंत एकही विद्यार्थ्यांनी तिथे आली नव्हती.

सर सी. व्ही. रामन यांनी स्पष्टपणे त्या दोघांना सांगितले की,  शास्त्रीय संशोधन हे स्त्रियांचे क्षेत्र नाही म्हणून कमलाला प्रवेश नाकारण्यात आला आहे.’

लहानसर चणीची, नाजूक, गोरी, व्यवस्थित नऊवारी साडी  नेसलेली, केसांची घट्ट वेणी घातलेली कमला धीटपणे ,शांत पण ठाम  स्वरात म्हणाली,

‘सर, मी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये बी. एससी फर्स्ट क्लास फर्स्ट आले आहे. इथल्या प्रवेशाचा निकष पूर्ण केला आहे. मला पुढील शिक्षणाची संधी नाकारून तुम्ही माझ्यावर आणि माझ्यानंतर इथे शिकू इच्छिणाऱ्या इतर मुलींवर अन्याय करीत आहात. मी मुंबईला परत जाणार नाही. इथेच राहणार. तुमच्या दारापुढे सत्याग्रह करीन.’

सर रामन यांनी या मुलीतले वेगळेपण ओळखले. कमलाला इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्षासाठी प्रोबेशनरी स्टुडन्ट म्हणून प्रवेश मिळाला. साधीसुधी दिसणारी ही मराठी मुलगी, श्रीनिवासय्या या तिच्या गुरूंनी घेतलेल्या अनेक कठोर परीक्षांमध्ये  उत्तम पद्धतीने उत्तीर्ण झाली. दिवसाकाठी १८ तास बौद्धिक व शारीरिक काम त्यांना करावे लागे. संध्याकाळचे दोन तास  कमलाबाईंना त्यांचे आवडते टेनिस खेळण्यासाठी मिळत.  पार्टनर म्हणून  त्या तिथल्या मदतनीसाबरोबरच खेळत असत .

नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांचे प्रबंध वाचून त्या टिपणे काढीत.  शंका निरसनासाठी त्या परदेशी  शास्त्रज्ञांना पत्र लिहून प्रश्न विचारत. एखाद्या मित्राला समजवावे अशा पद्धतीने या शास्त्रज्ञांनी त्यांचे शंकानिरसन केले.  कमलाच्या अभ्यासातली तळमळ त्यांना जाणवली होती. शंभराहून अधिक सायन्स रिसर्च पेपर्स कमलाबाई यांच्या नावावर आहेत.

कमलाबाईंचे कर्तृत्व पाहून सर रामन यांनी कमलाबाईंजवळ मोकळेपणाने कबूल केले की,’आता मी माझी चूक सुधारणार आहे. यापुढे इन्स्टिट्यूटचे दरवाजे लायक विद्यार्थीनींसाठी नेहमी खुले राहतील.’ शिवाय ते स्वतः कमलाबाईंबरोबर टेनिसचे दोन- चार सेट्स खेळू लागले. 

पुढे केंब्रिजमध्ये अध्ययन करून कमलाबाईंनी पीएच. डी मिळविली. तिथेच राहून काम करण्याची संधी  नाकारून त्या भारतात परतल्या.

बंगलोरला असताना त्यांनी, ज्या बालकांना मातेचे स्तन्य मिळत नाही त्यांच्यासाठी गाढविणीच्या दुधाचा विशिष्ट घटक विशिष्ट प्रमाणात मिळवून पोषणमूल्य असलेल्या  दुधाचा शोध लावला . कडधान्य व त्यातील प्रथिने यावर संशोधन केले. कुन्नूर येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’ मध्ये त्यांनी ब समूहातील जीवनसत्वावर काम केले. नीरा या नैसर्गिक रुचकर पेयातील तसेच ताडगूळातील पोषक घटक शोधला. १९६७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संशोधनाचे राष्ट्रपती पदक मिळाले .महाराष्ट्र सरकारच्या आरे मिल्क डेअरी प्रकल्पासाठी त्यांनी एकही पैसा मानधन न घेता संपूर्ण मार्गदर्शन केले. दुधाची प्रत व गुरांचे आरोग्य सांभाळण्याचे मार्गदर्शन केले.

कमलाबाईंनी मुंबईला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये जीव रसायनशास्त्र विभाग नव्याने उघडला तिथे १९४९ ते १९६९ अशी वीस वर्षे संशोधन व अध्यापन केले. एमएससी पीएच.डीच्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कमलाबाई व दुर्गाबाई या सख्या बहिणी. लहानपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या दोघींच्यातला जिव्हाळा मैत्रिणीसारखा होता. आणि बुद्धी तेजस्वी होती.

दिल्ली येथील ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या सुवर्ण महोत्सवात त्यांचा सत्कार करून  मानपत्र व पारितोषिक देण्यात आले. सत्काराला उत्तर देताना,  ‘शास्त्रीय संशोधनाचा देशासाठी पूर्ण उपयोग करा. ते लोकांच्या व्यवहारात आणा’ असे त्यांनी तळमळीने सांगितले. नंतर तिथल्या चहापानापूर्वीच कमलाबाई अकस्मात कोसळल्या आणि तिथेच वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू पावल्या . कमला नावाच्या ज्ञानदेवीला सरस्वतीच्या दरबारात भाग्याचे मरण आले.

भारतात कमलाबाईंमुळे शास्त्रीय संशोधन क्षेत्राचे दरवाजे स्त्रियांसाठी उघडले गेले. जगभर अनेक  स्त्रिया शास्त्रीय संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे काम  करीत आहेत. परंतु या क्षेत्रात महिलांना कमी महत्त्व मिळते. त्यांनी सिद्ध केलेले स्थानसुद्धा त्यांना नाकारले जाते ही वस्तुस्थिती आहे.

१९३३ साली आपल्या बुद्धिमान लेकीच्या, शास्त्रीय संशोधन करण्याच्या इच्छाशक्तीला सक्रिय पाठिंबा देणारे, विश्वासाने तिला एकटीला  इन्स्टिट्यूटच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या हवाली करून रातोरात मुंबईला परतणारे नारायणराव भागवत, पिता म्हणून नक्कीच आदरास पात्र आहेत.

लेखक – सुश्री वसुमती धुरू 

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ फिनिक्स… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ फिनिक्सकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

जीवनात चढउतार येतात, मानापमानाचे खेळ सुरू असतात. बरेचदा अपयश, बदनामीमुळे मानसिक, शारीरिक होरपळ होते. यातूनही नव्या जिद्दीने पुन्हा उभे रहात नवा डाव सुरू होतो. अशाच एका जिद्दी, नव्या उमेदीने पुन्हा डाव मांडणाऱ्या माणसाचे मनोगत डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘फिनिक्स’ या कवितेत मांडले आहे. तिचाच आज आपण रसास्वाद घेणार आहोत.

फिनिक्स  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

पुनःपुन्हा पुनःपुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

……….. नकळतच!

 

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहे तर …..

            ….. जिवंत आहे

विश्वासच बसत नव्हता!

 

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी!

 

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

            ….. नेहेमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला!

 

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला?

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

पुन:पुन्हा पुन:पुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

…. नकळतच !

आयुष्यात अपयशाचा, संकटांचा पुन्हा पुन्हा तोच दाहक अनुभव मी घेतला आहे. त्या धगीने नकळतच मी शरीराने आणि मनानेही पूर्णपणे होरपळून निघालो आहे.

या कवितेचे शीर्षकच कवितेचे सार सांगत आहे. आपल्याच राखेतून नवा जन्म घेत आकाशात झेपावणारा पक्षी म्हणजे फिनिक्स. पौराणिक कथांमध्ये त्याला अमरपक्षी म्हणतात. स्वतःच्या राखेतून उठण्याच्या क्षमतेमुळे त्याला अमर म्हटले जाते. अशीच विजिगीषू वृत्ती असणाऱ्या एका परिस्थितीशी लढणाऱ्याचे हे मनोगत.

मुक्तछंदात असणारी ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात लिहिलेली आहे. कवी मोकळेपणाने आपण आयुष्यात अनुभवलेले दाहक प्रसंग कथन करीत परिस्थितीशी संवाद साधतो आहे. या अनुभवाने आपण पूर्णपणे गलितगात्र झाल्याचे सांगत आहे. अपयश, बदनामी, प्रेमभंग, अपमान अशासारख्या गोष्टींनी पुन्हा पुन्हा या प्रसंगाला सामोरे जातो आहे. त्याची तीव्रता दाखवायला नुसते पुन्हा पुन्हा असे न लिहिता पुन:पुन्हा पुन:पुन्हा असा प्रभावी शब्दप्रयोग केलेला आहे.

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहेत तर…

… जिवंत आहे

विश्वास बसत नव्हता !

या अवस्थेची जाणीव झाली. संवेदना जागी झाली आणि खूप बरं वाटलं. कारण हे जाणवण्या एवढं माझं मन अजून सावध आहे म्हणजे मी अजून जिवंत आहे. पण खरंच माझा यावर विश्वासच बसत नाही.

बसलेल्या कठोर आघाताने आपण जणू निष्प्राण झालो, पूर्ण उमेद खचल्याने धुळीला मिळालो अशीच कवीची भावना झालेली असते. पण संवेदना जागृत आहेत हे लक्षात आल्यावर आपण अजून जिवंत आहोत ही जाणीव त्याला होते आणि थोडसं निर्धास्त पण वाटतं.

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी !

मी जिवंत आहे या जाणिवेचे सुख क्षणीकच ठरले. कारण त्या दाहकतेने बसणाऱ्या चटक्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं आणि त्यांच्या त्या भयावह आठवणींनी पुन्हा पुन्हा जीव पोळून निघत होता.

अशा जीवघेण्या आघातामुळे होणारे शारीरिक मानसिक त्रास, चटके हे नेहमी दृश्य असतात. ते सोसावेच लागतात. त्यामुळे विसरता येत नाहीत आणि त्यांच्या आठवणी या जास्त त्रासदायक असतात. त्यामुळे आपण आता संपलो असे वाटून आत्मविश्वास रसातळाला जातो.

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

…नेहमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला ?

आता मात्र मी ठरवलंय असा पुन्हा अनुभव आला की, नेहमीसारखं त्यात जळून खाक व्हायचं. म्हणजेच नेस्तनाबूत व्हायचं. पण आता या राखेतून त्या फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उठायचं मात्र नाही. पुन्हा होरपळत त्यात नव्याने जाळून घ्यायचं नाही. म्हणूनच आता पुन्हा कसलाही प्रयत्न करायचा नाही. जिवंत असूनही मेल्यासारखे जगायचे.

कवी झालेल्या होरपळीने इतका गलितगात्र झाला आहे की, आता पुन्हा पुन्हा हा अनुभव घ्यायची त्याची तयारी नाही. त्यामुळे त्याने आता पुन्हा उभारी घ्यायचीच नाही. असंच उध्वस्तपण सोसत रहायचं असा निर्धार केला आहे.

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला ?

या दाहक आघाताने जणू जळून राख झालेल्या माझ्या तापलेल्या मन आणि शरीराला तू का तुझा संजीवन देणारा स्पर्श केलास ? आता यातून पुन्हा एकदा नव्या फिनिक्सला जन्म द्यायचा काय ?

इथे कवीला कुणीतरी आधाराचा हात देणारे, मानसिक उभारी देणारे, पुन्हा लढण्याचे बळ देणारे भेटलेले आहे. त्यामुळे तो पुन्हा उभा राहतोय. पण त्याला या पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशाची, कटू अनुभवाची जबरदस्त भीती वाटते आहे. त्यामुळे तो त्या सुहृदाला विचारतो, ” का मला संजीवन देणारा तुझा स्पर्श केलास ? का माझी जीवनेच्छा पुन्हा जागृत केलीस ? “

झाल्या आघाताने कवीचे मानसिक खच्चीकरण होते. त्यातून तो सावरतो. पुन्हा उभा रहातो. पुन्हा कोसळतो. त्याची असह्य तगमग होते. ही सारी मानसिक, भावनिक आंदोलने सहजसुंदर शब्दरचनेत मांडण्यात कवी अतिशय यशस्वी झालेला आहे.

या कवितेत फिनिक्स या रूपकाचा खूप छान उपयोग केलेला आहे. परिस्थितीने पूर्ण हतबल झालेला कवी पुन्हा नव्या उभारीने परिस्थितीला सामोरे जात नव्याने डाव मांडतो. यासाठी योजलेले फिनिक्सचे रूपक अगदी यथार्थ आहे.

ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात असली तरी प्रत्येकजणच आपल्या आयुष्यात अशा परिस्थितीला केव्हा ना केव्हा सामोरा गेलेलाच असतो. त्यामुळे ही कविता फक्त एकट्या कवीची न रहाता सर्वस्पर्शी होते. कारण असे अनुभव हे सार्वत्रिक असतात. हे अनन्योक्ती अलंकाराचे छान उदाहरण म्हणता येईल.

माणसाला आयुष्याच्या वाटचालीत कधी शत्रूकडून त्रासदायक आघात, व्यवहारात, व्यवसायात पूर्ण अपयश, मित्रांकडून फसवणूक, जोडीदाराकडून प्रेमात अपेक्षाभंग अशा जीवघेण्या अनुभवांना तोंड द्यावे लागते. तो मोडून पडतो. शारीरिक, मानसिक होरपळ होते. आत्मविश्वास लयाला जातो. अशावेळी एखादा मित्र, एखादा हितैषी, जिवलग, जोडीदार आधाराचा हात देतो. पाठीशी खंबीर उभा राहतो. मनाची उभारी वाढवून पुन्हा लढण्याचे बळ देतो. पुन्हा वाटचाल सुरू होते. पुन्हा अशा अनुभवाची पुनरावृत्ती होते. पण माणसाची दुर्दम्य  इच्छाशक्ती, जबरदस्त जीवनेच्छा गप्प बसू देत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने तो जगण्याला सामोरा जाण्यास तयार होतो.

अशाच पद्धतीने लढणाऱ्याच्या मानसिक आंदोलनाचा एक सुंदर आलेख कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी फिनिक्स मध्ये मांडलेला आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares