(आजची कथा ‘धाग्या’वीण‘ सुश्री संपदा जोगळेकर कुळकर्णी’ यांची आहे. त्या लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री आहेत. खालील चित्र हे प्राप्त चित्रावरून प्रेरित होऊन आकाश पोतदार यांनी काढलेले आहे.)
तुझी पोर्टरेट मला का आवडतात माहित्येय?
उत्तर जर कलात्मक नसेल,प्रॅक्टिकल असेल तर नको सांगूस.
ए काय रे कुचकटासारखं बोलतोयस ! मी सांगणार…मला तुझे डोळे आवडतात आणि तुझ्या प्रत्येक पोर्टरेटमधे मला तेच,तसेच दिसतात.
छान ! अहो सायन्स स्टुडंट,डोळे बायोलॅजिकली सारखेच असतात,फक्त त्याच्या आत आणि भोवती काय घडलय यावर त्याचं वेगळेपण असतं.हं! आता तू म्हणतेस तर कदाचित मी माझेच डोळे शोधत असतो बहुधा त्या कॅरेक्टर मधे किंवा मी अशीच कॅरेक्टर शोधतो.हम् म् म्…म्हणजे ‘कला’ नाहीच म्हणा आवडत आमची.
ए ! ही थट्टा असेल तर बास कर हं,तुला माहितेय ना? तू कलाकार आहेस आणि मी न’कलाकार.
हं..विज्ञानाच्या चष्म्यातून सतत फॅक्ट शोधणे…….
आज १० वर्षानंतर आयुष्याचं ‘फॅक्टच’ माझ्या कागदपत्राच्या रूपानं माझ्या हातात होतं. आधी डोळे, मग दोन्ही किडण्या आणि आता… हृदय आणि मग माझ्या रवीचं संपूर्ण शरीर मेडीकलच्या स्टुडंट्सच्या अभ्यासासाठी मी दान करणार. पेंटीग करताकरताच सांडलेल्या रंगाच्या दाट पाण्यावरून पाय घसरण्याचं निमित्त, थेट डोक्याच्या पार्श्वभागावरच दाणकन आपटला. किती काळ गेला होता मधे, किमान चार तास. तळपायाला विविध रंगांचा लेप होता तर डोक्याखाली मात्र लाल रंगाचा पाट वाहिला होता.मधल्या तासांमुळे बहुधा लालसर चॉकलेटी…डोंट नो….रंगांच्या बाबतीत सतत मला करेक्ट करणारा रवी आत्ता शुद्धीत होता कुठे ….नंतर तर तो शुद्धितच नाही आला. आता जो रवी ’कोमा’त आहे त्याला, त्याएका चित्रकाराला किती वर्ष अंधाराच्या काळ्या गर्द रंगात जगवत ठेवायचं? असा विचार केला, डॉक्टरांचे सल्ले घेतले.
वेगवेगळ्या ठिकाणची गरज ओळखून त्याला वेगळ्याजिवांशी धागे जुळवून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय.
माझा रवी कित्येकांच्या आयुष्यात आता उगवलाय.दिवसाच्या सगळ्या प्रहरांचे रंग तो रंगवत असेलच की.
क्लिनीकमधे येणाऱ्या प्रत्येकाचे डोळे मी निरखून बघत असते, बहुधा फॅक्टच शोधत असते, शोधत असते की या डोळ्यांचा आणि माझा काही बंध असेल का ? असाच “धाग्याविण”!
❤ ❤ ❤ ❤ ❤
टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.
☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- “अश्विनी,मित्रांच्या आग्रहाने कधीतरी एक पेग घेतला म्हणून मी लगेच दारुड्या होत नाहीss”
अश्विनी संतापाने त्याच्याकडे पहात राहिली…
‘आता जे काही बोलायचे ते आत्ता न् याच क्षणी. नाहीतर नंतर बोलू म्हटलंस तर वेळ हातून निघून गेलेली असेल..’
तिने स्वत:ला बजावलं.)
” मला त्याबद्दल कांहीच बोलायचं नाहीये. वास काल रात्री आला होता पण आत्ता या क्षणापर्यंत मी गप्प बसले होतेच ना? अहो तुमचे आई-वडील आपल्या लग्नानंतर प्रथमच आपल्याकडे रहायला आलेत याचं तरी भान ठेवायचं. ‘तो आला की एकदम सगळे जेवायला बसू’ म्हणून रात्री कितीतरी वेळ ते दोघे ताटकळत वाट पाहत होते. आण्णांची रोजची झोपायची वेळ झाली तेव्हा मीच त्या दोघांना आग्रह करून जेवणं करुन घ्यायला लावलं. तुमच्या काळजीने ते धड जेवलेही नव्हते माहितीय.? मलाही ‘तू पण जेवून घे’ म्हणत राहिले पण मी थांबून राहिले ताटकळत. तुमची वाट पहात. तुमच्यासाठी. उपाशी. पण तुम्हाला त्याचं सोयरसुतक होतंच कुठं? तुम्ही आलात आणि वास लपवायचा म्हणून पाठ फिरून झोपून गेलात. मी जेवलेय की उपाशी आहे याची साधी चौकशी करायच्याही मनस्थितीत नव्हतात तुम्ही. आणि एकटंच बसून गारगोट्या झालेला भात खायच्या मन:स्थितीत मीसुद्धा. पण माझ्या जवळच्या तुमच्या ‘दुसऱ्या जीवाचं’ धन जपायचं होतं ना मला?मग उपाशी राहून कसं चाललं असतं? झकत दोन घास पोटात ढकलले आणि मगच झोपले.”
अश्विनीच्या तोंडून ‘दुसऱ्या जीवाचा’ उल्लेख ऐकून अविनाश त्याही मनस्थितीत आनंदला. त्याने अश्विनीला अलगद जवळ घेतलं. ही गोड बातमी डोळ्यांत असं पाणी आणून सांगायला लागली म्हणून अश्विनी मात्र हिरमुसलेलीच होती.
“अश्विनी, अशी चूक आता यापुढे माझ्याकडून पुन्हा कधीच….”
“तुमची चूक दाखवून द्यायला किंवा तुमच्याशी भांडायला हे सगळं मी बोलले नाहीय. पण आण्णा बोलतात, चुका दाखवतात म्हणत त्यांनाच तुम्ही मोडीत काढायला निघालात तेव्हा बोलावं लागलं. त्यांना असं डावलून तुमचा मार्ग कधीच सुखाचा होणार नाहीय. स्वतः काबाडकष्ट करून, जास्तीतजास्त चांगले संस्कार देत त्यांनी तुम्हाला वाढवलंय. जपलंय. ‘स्वतःचा फ्लॅट घेतल्याशिवाय मी लग्न करणार नाही’ म्हणून तुम्ही हटून बसला होतात, तेव्हा बँकेचं कर्ज गृहीत धरून कमी पडणारे सगळे पैसे हा फ्लॅट घ्यायच्या वेळी आण्णानीच एक रकमेने तुमच्या स्वाधीन केले होते हे तुम्हीच सांगितलं होतंत मला. आयुष्यभर कष्ट करून मिळवलेलं सगळं धन तुम्हाला देऊनही आजपर्यंत त्याचा साधा ओझरता उल्लेखही त्यांनी माझ्याजवळ कधी केला नाही.त्यांनी नाही आणि आईंनीही नाही. आपल्या दोन अडगळीच्या खोल्यातल्या संसारात दोघं तिकडे काटकसरीने रहातायत. आपण काय देतोय त्यांना या सगळ्याच्या बदल्यात? त्यांना प्रेम आणि आपुलकी या खेरीज दुसऱ्या कशाचीच आपल्याकडून अपेक्षा नाहीये आणि त्यांना देण्यासारखं यापेक्षा अधिक मौल्यवान आपल्याजवळही काही नाहीय.निदान ते तेवढं जरी मनापासून देऊ केलंत तरच आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान त्यांना मिळेल ना?”
अश्विनीचं बोलणं ऐकून अविनाश भारावून गेला. आण्णांचा हा आणि असा विचार त्याने कधी केलाच नव्हता. बालपणापासूनचे त्याच्या आयुष्यातले सगळेच प्रसंग या क्षणी त्याच्या नजरेसमोर तरळून गेले. प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणी आण्णांनी कौल दिला होता तो याच्याच मनासारखा! तो म्हणेल तसंच प्रत्येक वेळी ते करीत आलेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल अश्विनीशीच नव्हे तर आई आण्णांशीही आपण किती खोटं वागलो होतो याची जाणीव होताच अपराधीपणाची भावना त्याला सतावू लागली.
या अपराधीपणाची उघडपणे कबुली देण्याचं धाडस मात्र त्याच्याजवळ नव्हतं. पण त्याचं प्रायश्चित्त म्हणून तो आज्ञाधारक मुलासारखा उठला. आण्णांच्या खोलीकडे वळला.
”हे बघ. मी अडचणी,वाईट वेळा दबा धरून अचानक आधी न सांगता झडप घालतात म्हणतो ना ते असं. बघ ही बातमी.”
पेपर वाचता वाचता आण्णा आईंना सांगत होते. आईही उत्सुकतेने त्यांच्याजवळ सरकल्या. आण्णा ती बातमी आईंना मोठ्याने वाचून दाखवू लागले.
‘काल बॅंकेत लाॅकर-ऑपरेशनसाठी गेलेल्या नितीन पटेल आणि त्याच्या गर्भवती पत्नीला दागिन्यांच्या मोहापायी कुणीतरी किडनॅप केल्याचा संशय असल्याची तक्रार नितीन पटेलचे वडील बन्सीलाल पटेल यांनी पोलीस स्टेशनवर केली आहे’
ऐकून अविनाश हादरलाच. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा आत झेपावला. सकाळच्या गढूळ वातावरणात अविनाशने नेहमीसारखा पेपर वाचलाच नव्हता.
“आण्णा, बघू कोणती बातमी म्हणालात..”
बातमी वाचून तो सून्न झाला. हे असं,इतकं अघटित घडू शकतं? त्या दिवशी संध्याकाळी धावतपळत लॉकर ऑपरेशनसाठी बँकेत आलेले नितीन आणि त्याची बायको त्याला आठवत राहिले.आज ही बातमी वाचली आणि नुकताच भेटलेला कुणीतरी जवळचा, धडधाकट, चालता बोलता माणूस अचानक गेल्याचंच समजावं तसा अविनाश अस्वस्थ झाला.
रविवारची सगळी सकाळच नासून गेली. दुपार त्याच अवस्थेत. अखेर स्कूटर काढून तो एक-दोन स्टाफ मेंबर्सच्या घरी जाऊन आला पण जोडून सुट्ट्या म्हणून ते सर्वजण इथे तिथे बाहेरगावी गेलेले. मग दिलासा देण्यासाठी आपण नितीनच्या आई-वडिलांना भेटून येणे आवश्यक आहे असं त्याला वाटलं आणि त्याने स्कूटर पटेल यांच्या बंगल्याकडे वळवली.
नितीन पटेलच्या आईवडलांना भेटून तर तो अधिकच अस्वस्थ झाला. उतार वयात झालेल्या आणि म्हणूनच लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलाच्या आणि सुनेच्या काळीज पोखरणाऱ्या काळजीने ते दोघेही वृद्ध व्याकुळ झालेले होते..! ‘आमचे सगळे ऐश्वर्य घ्या पण आमच्या मुलासूनेला सुखरुप परत करा’ म्हणत ते आकांत करीत होते..!!
त्यांना भेटून आल्यापासून तर अविनाश पार खचूनच गेला.
त्या रात्री अश्विनीच्या कुशीत शिरुन तो एखाद्या लहान मुलासारखा पडून राहिला. आईलाच घट्ट बिलगल्यासारखा. त्याच्या केसातून आपली बोटं फिरवत अश्विनी मनोमन जणू आपल्या गर्भातल्या बाळाचं जावळच कुरवाळत राहिली होती!
“अश्विनी…”
“अं?”
“मला सारखं वाटतंय गं अश्विनी, त्यादिवशी मी नितीन पटेलना वेळ संपल्याचं किंवा दुसरंच काहीतरी कारण सांगून त्यांना अटेंड करायलाच नको होतं. मग त्याला व्हाॅल्ट ऑपरेट करून दागिने काढून नेताच आले नसते आणि दागिन्यांच्या लोभाने त्यांना कोणी किडनॅपही केले नसते..”
अश्विनीला त्याच्या या लहान मुलासारख्या निष्पाप निरागस मनाचं हसूच आलं. एखाद्या लहान मुलाला समजवावं तसं ती म्हणाली,
“आता सगळं घडून गेल्यानंतर या सगळ्या जर-तरच्याच तर गोष्टी.खरं सांगू? आपल्या हातात खरंतर कांहीच नसतं. दान असं टाकायचं की तसं एवढंच आपण ठरवायचं. पण ते कसं पाडायचं ते फक्त ‘त्या’च्याच हातात तर असतं!
अश्विनी सहज म्हणून बोलली खरं, पण पुढे ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं.कारण..? कारण नेमकं घडलं होतं ते वेगळंच..!!
त्यादिवशी नितीन आणि त्याची बायको व्हाॅल्ट ऑपरेट करायला गेल्यावर थोडं राहिलेलं काम हातावेगळं करून अविनाशने ड्रॉवर लाॅक करून घेतले होते आणि तो टॉयलेटला गेला होता. टॉयलेटला जाऊन आल्यावर व्हाॅल्टरूमची कॉल बेल त्याने दाबून पाहिली होती पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही, तेव्हा आपण टॉयलेटला जाऊन येईपर्यंत ते दोघे गेले असावेत त्या कल्पनेने पार्टीला जायच्या गडबडीत व्हाॅल्टरुम आणि नंतर बँक तशीच बंद करून तो निघून गेला होता..आणि…ते दोघे मात्र आत व्हाॅल्टमधेच अडकून पडलेले होते…!!
‘दागिन्यांच्या लोभाने त्यांना कुणीतरी किडनॅप केलेलं असावं’ या संशयाच्या आधारे पोलीस तपास त्या एकाच चुकीच्या दिशेने सुरू होता!
या घटनेला या क्षणी तीस तास उलटून गेलेत. सुटकेचे सारे निरर्थक प्रयत्न संपल्यानंतर थकलेले,गलितगात्र झालेले, भेदरलेले ते दोघे अन्नपाणी आणि मोकळ्या श्वासाविना आत घुसमटत पडून आहेत..!
अद्याप बँक पुन्हा उघडण्यासाठी पूर्ण ३४ तास सरायला हवेत.
या सगळ्या अघटितापासून अविनाश,अश्विनी, आई आणि आण्णा सगळेच निदान या क्षणी तरी लाखो योजने दूर आहेत..!
अविनाश अर्धवट झोपेत आणि अस्वस्थतेत याच अघटिताचा विचार करतोय. याच विचारांच्या भाऊगर्दीतून वाट काढत अचानक एक प्रश्न पुढे झेपावतो आणि एखाद्या तीक्ष्ण बाणासारखा त्याच्या अस्वस्थ मनात घुसतो.रुतून बसतो….!!
‘त्या दोघांना आपण व्हाॅल्टरुम मधून बाहेर पडताना अखेरचं पाहिलंच कुठं होतं?’ हाच तो प्रश्न!
त्या तीक्ष्ण बाणाच्या जखमेने विव्हळल्यासारखा अविनाश दचकून उठतो. पहातो तर अश्विनी शांत झोपलेली आणि मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली!
या अशा पूर्णतः निराधार भेदरलेल्या मनोवस्थेत त्याला तीव्रतेने आण्णांची आठवण होते. आधारासाठी,..मदतीसाठी तो त्यांच्या खोलीकडे झेपावतो.
… तिकडे नितीन आणि त्याची बायको श्वास कोंडल्या अवस्थेत पडून राहिलेत. तिच्या गर्भातली हालचाल हळूहळू मंदावत चाललीय. तिला आधार द्यायची नितीनची उमेद संपून गेलीय. एखाद्या क्रूर श्वापदासारखा दबा धरून बसलेला मृत्यू त्यांच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकू लागलाय. येणारा प्रत्येक क्षण या साऱ्यांचे भविष्य घडवत सरत चाललाय. या भविष्याच्या पोटात काय दडलेय ते फक्त ‘त्या’लाच माहीत आहे!
‘तो’ म्हणेल तसंच आता घडणार आहे!!
हे एखादं स्वप्न नव्हे की एखादा चित्रपट. वास्तव जग आहे हे. इथे या वास्तव जगात स्वप्न किंवा चित्रपटातल्यासारखा हमखास सुखान्त कुठून होणार?
वास्तव जगात सुखान्त होत नाहीथ असं नाही.ते होतात पण.. क्वचित कधीतरीच!!
☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – “हे बघ अश्विनी, अविनाश हुशार आहे.समंजस आहे.पणअतिशय घुमा आणि एककल्ली आहे. तूच आता त्याला वेळोवेळी समजून घ्यायचंस. तो चुकतोय असं वाटेल तेव्हा आधार देऊन त्याला सावरायचंस” बोलता बोलता आण्णांचा आवाज त्यांच्याही नकळत भरून आला…”)
“आण्णा, इतक्या गंभीरपणे तुम्ही विचार करावा असं खरंच काही नाहीये. काल बँकेत कामं आवरायला उशीर झाला आणि सगळेच बाहेर जेवायला गेले. दोन दिवस आपला फोन बंद आहे, एरवी त्यांनी निरोप दिला असता.”
अश्विनीला खरंतर स्वतःलाही हे जाणवत होतं की आपण आण्णांना बरं वाटावं म्हणून हे बोलतोय. तिने स्वतःला कसंबसं सावरलं आणि ती अविनाशला उठवायला गेली.
“बघितलंत? प्रत्येक गोष्टीत सूतावरुन स्वर्ग गाठता आणि उगीचच काळजी करता.तो एवढ्या लहान वयात बॅंकेत आॅफिसर म्हणून नोकरीला लागला,नवा संसार थाटला.कांही म्हणून तोशीश ठेवली नाहीय,ना कधी कसला घोर लावलायन् तुमच्या जीवाला. चार दिवस आलो आहोत त्याचं सुख पहायला तर कधी जवळ बसवून प्रेमानं कौतुकाची थाप दिलीयत कां त्याच्या पाठीवर? आजारपण असो नसो सतत आपले कडू औषधाचे डोस देत रहायचं. हे कर,ते करु नको.रांगतं बाळ आहे कां हो तो अजून ?अशाने तो कशाला तुमच्यासमोर येतोय न् तुमच्याशी मोकळेपणाने बोलतोय..?”
आण्णांना एकदम गहिवरून आलं. त्यांना खूप बोलायचं होतं, सांगायचं होतं. पण नेमके शब्द चाचपडत ते गप्प बसले….
‘आजवरचं आपलं आयुष्य म्हणजे सगळा खाचखळग्यातला प्रवास! पायपीट करता करता धडपडत,पडत, ठेचकाळत इथवर आलो.या नवसासायासाने जगल्या-वाचलेल्या एकुलत्या एका मुलाला तळहाताच्या फोडासारखं जपलं. वाढवलं. खंबीर आधार देणारे आई-वडील, समंजस बायको, भक्कम पगाराची नोकरी,या सगळ्यामुळे तो गाफील असल्यासारखा वागला तर त्याला मी सावध नाही का करायचं? माझ्या अनुभवांच्या शिदोरीतला एखादा घास तरी त्याच्यापर्यंत नाही का पोचवायचा? त्याला नाही भरवायचा?…’ ते स्वतःतच हरवले.
“अहो,..कसला विचार करताय?”
“तुला सांगू? आयुष्यात सुखाचे,आनंदाचे क्षण नेहमी नाचत-बागडत,हुंदडत येतात. गाजावाजा करत येतात. पण अडचणी आणि वाईट वेळा मात्र लपतछपत येतात. दबा धरून अचानक घाला घालतात. अशा वेळी नेमका हा जर गाफील राहिला तर…?”
“किती काळजी कराल त्याची?तो लहान आहे का हो आता?त्याचं त्याला सगळं छान समजतंय.मोठ्ठा साहेब झालाय तो.त्याला पांघरुणात लपवून ठेऊन त्याच्या जागी रोज तुम्ही जाऊन बसणार आहात का?आणि बसलात तसे,तरी ते व्याप तुम्हाला झेपणारायत का?मग त्याचं स्वत:चं आयुष्य,त्याचं म्हणून जसं येईल तसं जगू दे ना त्याचं त्याला.तुमचं सांगणं, विचार करणं मी समजू शकते हो. पण हे सगळं गोड गोळीसारखं दिलंत तर त्याला घ्यावंसं वाटेल ना? कडू औषध दिलंत तर तो झिडकारतच राहील. आणि याही पलीकडचं एक सांगू? या वयात कुणी आपणहोऊन मागितला तरच सल्ला द्यावा माणसानं. नाहीतर हरी हरी करीत स्वस्थ बसावं.”
————-
“अहोs,उठा बरं आता. आणि पटकन् तोंड धुऊन घ्या.मी तुमचा आणि आण्णांचा चहा ठेवतेय”
ऐकलं आणि आळसावलेली झोप झटकून अविनाश ताडकन् उठलाच.
“आण्णा मघाशीच फिरून आलेत ना गं?” तो त्रासिकपणे म्हणाला.
“हो”
“मग? त्यांचा अजून चहा झाला नाहीये?”
“पुन्हा घेतील अर्धा कप. त्या निमित्ताने तरी दोघं एकमेकांशी बोलत बसाल”
अविनाश छद्मीपणाने हसला.
“का हो?”
“त्यांच्याशी बोलायचं कधी असतं का गं कांही?.फक्त ते बोलतील ऐकायचंच तर असतं. ते किती चांगले, किती व्यवस्थित, किती काटेकोर, किती हुशार… आणि मी ?आळशी,धांदरट, गचाळ, मूर्ख… “
“किती लहान मुलासारखा विचार करता हो तुम्ही?” अश्विनीला त्याचं हसूच आलं.
“तुला हसायला काय जातंय? तू त्यांची मुलगी असतेस ना म्हणजे समजलं असतं.”
“समजायचंय काय त्यात? आवडलं असतं मला ते. चुकीचं किंवा काही वाईट कुठं सांगत असतात ते? काही सांगायचा, शिकवायचा एरवीही त्यांना हक्क आहेच ना?. तुम्ही उठा बरं आता. मी जातेय. या लगेच.
अविनाशला अश्विनीच्या या सरळपणाचा हेवा वाटत होता आणि कौतुकसुद्धा !
“हं.काय म्हणतेय बॅंक?”
“कांही नाही.ठीक आहे.”
“कशी चाललीय नोकरी?”
“छान.मजेत.”
“छान चालू दे.पण मजेत नको.हरघडी साक्षात् लक्ष्मीशी संबंध येतोय तुझा.ती अनेक मायावी रुपात तुझ्यासमोर येईल.त्या प्रत्येक वेळी तू कणखर आणि जागरुक असायला हवंस.”
त्याने होकारार्थी मान हलवली पण त्याची अस्वस्थता वाढत होतीच.
“अहो त्याला सकाळचा चहा तरी शांतपणे घेऊन देणार आहात का?”
“तो त्याच्या कानाने चहा पीत नाहीये ना? ऐकू येतंय ना त्याला चहा घेता घेता?”
“होय हो.पण आता त्याचं त्याला आवरु दे ना. त्याला आधीच उठायला उशीर झालाय ”
“मी तेच म्हणतोय. रात्रीची एवढी जागरणं करायचीच कशाला? वेळच्यावेळी घरी यावं. नियमित जेवण आणि ठराविक झोप घ्यावी. तरच शरीराचं यंत्र ठणठणीत राहील न् दामदुप्पट काम देईल. त्याच्या या अनियमित वागण्यामुळे निम्मी तब्येत खलास झालीय त्याची.”
“आण्णा, पण मी कामासाठीच तर…”
“योजनाबध्द रीतीने कामं केलीस, तर रात्री बारा बारा वाजेपर्यंत ताटकळायची आवश्यकता रहाणार नाही. एकत्र येऊन बाहेर जेवायला आणि चकाट्या फिटत बसायला बँकेच्या कामाचं निमित्त कशाला हवं?”
मनात साठत चाललेल्या संतापाचा आता स्फोट होणार हे जाणवताच चहा तसाच अर्धवट टाकून अविनाश उठलाच. तडक बेडरूममधे निघून गेला. कावरी बावरी झालेली अश्विनी त्याला समजवायला त्याच्यामागे धावली.. पण..
“थांब अश्विनी. जाऊ दे त्याला. अगं, तुला हे नवीन असेल पण त्याला कळायला लागल्यापासून आमचा हा लपंडावाचा खेळ असाच सुरू आहे आणि तेव्हापासून कितीही दम लागला, तरी डाव नेहमी असा माझ्यावरच येत रहाणाराय.”
तिची समजूत घालायला हे बोलताना ते वरकरणी हसत होते पण मनातून ते दुखावलेत हे त्या हसण्यातूनही अश्विनीला कळून चुकलं होतं!
—————-
“असं मधेच उठून कशाला आलात हो?”
“नसतो आलो तर अजून तासभर तरी त्यांचं प्रवचन संपलं नसतं.”
“हे फार होतंय हं”
“आता तूही मला..”
“आपलं लग्न झाल्यापासून गेले सहा महिने मी प्रत्येक पत्रातून त्या दोघांना आग्रहाने इकडे बोलवत होते तेव्हा कुठे यावेळी ते पहिल्यांदाच आलेत. ते इथे रहातील तितके दिवस त्यांना आनंदाने राहू द्या ना. तुम्ही शांत रहा आणि कृपा करून घरचं वातावरण बिघडवू नका. ते दुखावून किंवा कंटाळून निघून गेले ना तर मला चैन पडणार नाही सांगून ठेवते.” तिच्या डोळ्यांत टचकन् पाणीच आलं.
“मी भांडलोय का त्यांच्याशी? त्यांना कांही बोललोय तरी कां? “
“तुमचं हे काही न बोलणंच त्यांच्या जिव्हारी लागतं.”
“काहीही बोललो, काहीही सांगितलं तर ऐकून तरी घेतात का ते? वर त्यांचं म्हणून काहीतरी असतंच.तरीही तू त्यांचीच री ओढतेयस.”
“ते रागावून,चिडून, संतापून का़ही बोलले असते तर ते मलाच आवडलं नसतं. पण ते आपला प्रत्येक शब्द अतिशय शांतपणे मांडत असतील तर तुम्ही एक तर तो व्यवस्थितपणे खोडून तरी काढायला हवा किंवा तो मान्य करून स्वीकारायला तरी हवा “
“स्वीकारतेस काय? बँकेत तिथं किती कामं असतात हे यांना घरी बसून काय माहित?” त्याचा आवाज चढलाच.
“तुम्ही स्वतःचं समर्थन ठामपणे करू शकत नाही ना त्याचाच राग येतोय तुम्हाला.”
“म्हणजे मी..मी बँकेत झोपा काढतोय असं म्हणायचंय का तुला? “तो तारस्वरात ओरडला.
“हे बघा, हळू बोला. आण्णांना हे ऐकू जावं म्हणून ओरडून बोलत असाल तर सरळ त्यांच्या खोलीत जाऊनच बोला ना आणि अगदी खरं, प्रामाणिकपणानं सांगा त्यांना काल रात्री तुम्हाला यायला कां उशीर झाला होता ते आणि आलात तेव्हा तुमच्या तोंडाला कां आणि कसला वास येत होता तेसुध्दा… “
“अश्विनी?”
“येत होता ना? ” अश्विनीच्या घशाशी हुंदका दाटून आला.
“…… “
“मग एकत्र येऊन जेवायला आणि चकाट्या पिटायला बँकेचं काम तुम्ही निमित्त म्हणून वापरता असं आण्णा म्हणाले तेव्हा त्यांचा राग कां आला तुम्हाला? ते बोलले त्यात चुकीचं कांही नव्हतं याचाच ना? “
“अश्विनी, मित्रांच्या आग्रहाने कधीतरी एखाद्या पेग घेतला म्हणून मी लगेच दारुड्या होत नाहीss “
अश्विनी संतापाने त्याच्याकडे पहात राहिली.’ … ‘…आता जे कांहीं बोलायचं ते आत्ता न् या क्षणीच.नाहीतर नंतर बोलू म्हंटलंस तर वेळ हातातून निघून गेलेली असेल..’ तिने स्वत:ला बजावलं.
☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆
क्वचित कधीतरी घडतं असं. सहज चालता चालता अचानक ठेच लागावी ना तसं. आणि अशा क्वचित घडणाऱ्या घटनेच्या पोटात दबून राहिलेला असतो उध्वस्त करु पाहणारा भविष्यकाळ. ठेच लागलेल्याचाच नव्हे तर त्याच्याशी संबंधित सर्वांचाच! त्याचीच ही कथा!!
यावेळी रविवारला जोडून सलग दोन दिवस सुट्ट्या आल्या. त्यामुळे तीन पूर्ण रिकामे दिवस म्हणजे सर्व नोकरदारांसाठी मोठी पर्वणीच होती.या तीन दिवसात ब्रॅंच मधील सर्वांनी मिळून कुठेतरी बाहेरगावी ट्रीपला जायचं ठरत होतं. ब्रॅंच-मॅनेजर रजेवर असल्याने बँकेत कामाचं दडपण अविनाशवरच होतं. पण तरीही कामं झटपट आवरुन जायची त्याची तयारी होती. मात्र घरी अश्विनीनेच त्याचा हा प्रस्ताव धुडकावूनच लावला.
“आई-अण्णांना असं घरी ठेवून आपण दोघांनीच उठून जाणं बरं दिसेल का हो? जोडून सुट्ट्या काय पुन्हा कधीतरी येतील. या तीन दिवसात हवं तर आपण घरीच काहीतरी प्रोग्राम ठरवूया” तिने बजावून सांगितलं होतं.
आई-अण्णा कांही दिवस आराम करायला म्हणून आले होते. ते खरंतर त्याचे आई-वडील. त्याच्या लहानपणापासून तो म्हणेल तसं ते वागत आलेले असल्यामुळे हा त्यांना नेहमीच गृहीत धरूनच चालायचा. पण त्यामुळेच कदाचित आई आणि आण्णांच्या बाबतीत अश्विनी अशी विचारपूर्वक वागायची. अश्विनीचं रास्त म्हणणं झिडकारून स्वतःचा हट्ट हवा तसा रेटण्याइतका अविनाश निगरगट्ट नव्हता.
अविनाश पिकनिकला येणार नाही म्हणून मग सगळ्यांच्याच तो बेत बारगळला. मग शनिवारी रात्री ड्रिंक पार्टी तरी करायचीच अशी ब्रॅंचमधे टूम निघाली. याला ‘नाही’ म्हणता येईना. घरी कांही सांगायचं म्हटलं तर अश्विनी विरोध करणार हे उघडच होतं. शिवाय पार्टी कां आणि कसली याबद्दल आण्णांनी शंभर प्रश्न विचारले असते ते वेगळेच. यातून सरळ सोपा मार्ग म्हणून बँकेतल्या जास्तीच्या कामांचं खोटं कारण सांगून त्यामागे लपणं अविनाशला जास्त सोयीस्कर वाटलं.
त्या दिवशी शनिवारी बाकीचे सगळे स्टाफ मेंबर्स संध्याकाळी पार्टीसाठी एकत्र यायची गडबड म्हणून आपापलं काम आवरून निघून गेले. पण मॅनेजर रजेवर असल्याने अविनाशला जबाबदारीची सगळी कामं आवरल्याशिवाय निघणं शक्यच नव्हतं. म्हणूनच शनिवारचं कामकाज अर्ध्या दिवसाचं असूनही संध्याकाळ कलत आली तरी हा अजून कामातच. घरी जायची तशी गडबड नव्हती कारण घरी काही सांगायचं नसल्याने परस्परच पार्टीला जायचं होतं.पण तरीही कामं आवरायला अपेक्षेपेक्षा तसा उशीरच झाला होता.आणि.. तेवढ्यात…अगदी अचानक..ते दोघे धावत,धापा टाकत आत घुसले. नितीन पटेल आणि त्याची बायको. या दोघांना अशावेळी कांही काम घेऊन बॅंकेत आलेलं पाहून अविनाश मनातून उखडलाच. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने धुडकावूनच लावलं असतं. पण नितीनसारख्या महत्त्वपूर्ण ग्राहकाला ‘नाही’ म्हणणं शक्यच नव्हतं आणि रास्तही.ते दोघे मोठ्या आशेने आले होते.
नितीनची बायको अवघडलेली होती. त्या धावपळीने ती घामेजलेली दिसली.त्याने अगत्याने दोघांना बसायला सांगितलं आणि थंड पाण्याचे दोन ग्लास त्यांच्यापुढे केले. तेवढ्यानेही ते सुखावले. थोडे विसावले.आणि मग त्यांनी असं घाईगडबडीने येण्याचं प्रयोजन सांगितलं. सोमवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि हा जोडून सुट्ट्यांच्या घोळ त्यांच्या उशिरा लक्षात आला होता. त्यांना लॉकरमधले त्यांचे सोन्याचे दागिने आज घरी न्यायचे होते.त्यासाठीच घाईघाईने ते बँकेत आले होते. बँक उघडी असायची शक्यता नव्हतीच त्यामुळेच अविनाशला इथे पाहून ते दोघे निश्चिंत झाले होते.
राष्ट्रीयकृत बॅंकेसारख्या सेवाक्षेत्रात नेमक्या गडबडीच्या नको त्यावेळी नको असताना असे क्षण परीक्षा बघायला आल्यासारखे येतातच. ते नेमकेपणाने झेलणं हा अविनाशच्या स्कीलचा भाग होताच.काम करायचंच तर ते कपाळाला आठ्या घालून करण्यापेक्षा हसतमुखाने करावं याच विचाराने याने त्यांचं वरकरणी कां होईना पण हसतमुखाने स्वागत केलं होतं.. आणि ते पाहून त्यांचे श्रांत चेहरे समाधानाने फुलून गेले होते.
—————
थंडीच्या दिवसातला आजचा हा पाऊस तसा अनैसर्गिकच म्हणायचा. त्यामुळे रविवारची आजची सकाळ अंधारलेलीच आणि मलूल होती. अविनाश काल रात्री उशिरा घरी आला होता. कांहीच निरोप नसल्याने अश्विनी थोडी काळजीतच होती. आणि आई- आण्णाही रात्री उशीरापर्यंत कितीतरी वेळ वाट पहात बसून होते!
आपण उठलो की त्या दोघांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार या कल्पनेने जाग येऊनही अश्विनी पडून राहिली होती. गेल्या चार-सहा दिवसांपासून तिला खरंतर बरं वाटत नव्हतं. अस्वस्थपणाही होताच. आईंनी आडून आडून विचारून पाहिलं होतं पण अश्विनीने हसण्यावारी नेलं होतं. ‘अविनाश आज घरी आला की हे गोड गुपित आधी एकांतात त्याला सांगायचं आणि मगच आई आण्णांना’ असं तिने ठरवूनच ठेवलं होतं. आणि नेमकं कधी नव्हे ते तो न सांगतासवरता काल रात्री खूप उशिरा घरी आला होता. त्यामुळे ‘ते’ सांगणं राहूनच गेलं होतं.तो आला तेही परस्पर बाहेर जेवूनच. त्यामुळे काल वरवर थोडी शांत राहिली तरी अश्विनी मनातून त्याच्यावर नाराजच होती.
आण्णा दार उघडून फिरायला बाहेर पडल्याचं जाणवलं तशी अश्विनी उठली. तिची चाहूल लागताच तिचीच वाट पहात पडून असलेल्या आईंनीही मग अंथरूण सोडलं. उतारवयामुळे त्यांना तशी झोप कमीच. त्यात काल रात्री अवीची वाट पाहण्यात नको ते विचार मनात गर्दी करू लागलेले. त्यामुळे शांत झोप अशी नव्हतीच.
“अश्विनी, तू तोंड धुऊन घे. मी बघते चहाचं”
अश्विनीला खूप बरं वाटलं. आईंचे दिलासा देणारे हे चार शब्द तिचा उत्साह वाढवून गेले.
“अहो, चहाची तयारी करून ठेवलीय मी. आण्णा फिरून आले की लगेच टाकतेच चहा”
“काल रात्री किती वाजता आला गं अवी?”
“बारा वाजून गेले होते”
“सांगतेस काय? आता हे येतील तेव्हा हा विषय नको बाई. फट् म्हणता ब्रह्महत्या व्हायची”
“अहो,काहीतरीच काय?”
“हे बघ,आम्ही चार दिवस आलोय तसं सुखाने राहू दे बाई. एकदा का यांचं भांड्याला भांडं लागायला लागलं की मला चंबूगबाळं आवरायलाच लावतील हे.तुला माहित आहे ना त्या दोघांचं विळ्याभोपळ्याचं सख्य?”
“असू दे.तुम्ही विळा सांभाळा,मी भोपळा सांभाळते. काहीही भांडणं वगैरे होत नाहीत. तुम्ही भरपूर दिवस रहा हो मजेत. उगीच जायची कसली घाई?”
अश्विनीचे हे शब्द ऐकले आणि आईना अगदी भरून आलं.चार भावंडातला वाचलेला हा अविनाश एकटाच.म्हणून एकुलता एक.बाकी सगळी तोंड दाखवायला आल्यासारखी आली आणि गेली.नाही म्हणायला अविनाशच्या पाठीवरची मुलगी मात्र बोबडं बोलायला लागेपर्यंत छान होती. पुढे साध्या तापाचं निमित्त झालं आणि सगळ्यांच्या जीवाला चटका लावून तीही अचानक निघून गेली. अश्विनीचं आजचं बोलणं ऐकलं आणि अगदी अचानक,उत्कटतेने त्यांना तिचीच आठवण झाली. आज ती असती तर अशीच असती. हिच्याच वयाची. अशीच लाघवी आणि प्रेमळ!
आई विचारात गुंतून पडल्या आणि तेवढ्यात आण्णांची चाहूल लागली.
“झाला कां चहा?” त्यांनी खड्या आवाजात विचारलं.
चहाचा पहिला घोट घेताच आण्णा समाधानाने हसले.
“अश्विनी,चहा एकदम फर्मास झालाय गं. अगदी या तुझ्या सासूच्या हातच्या चहासारखा..’
“पुरे हं..”आई मनातून सुखावल्या होत्या पण वरकरणी म्हणाल्या.” पाहिलंस ना यांचं एका दगडात दोन पक्षी मारणं?”
“अगं चहा चांगला जमून आला तर त्याचं कौतुक नको कां करायला?”
“कौतुक का करताय ते मला ठाऊक आहे मला चांगलं. आणखी अर्धा कप चहा हवा असेल”
ऐकलं आणि अश्विनी चपापली. नेहमीसारखा त्यांच्यासाठी जास्तीचा चहा टाकायला ती आजच्या अस्वस्थ मनस्थितीत विसरूनच गेली होती. तिने तत्परतेने स्वतःसाठी ठेवलेल्या चहाचा कप आण्णांच्या पुढे सरकवला.
“आणि तुला..?”
“हा घ्या तुम्ही. हे उठले की मी त्यांच्याबरोबर करीन माझा.”
अविनाशचा विषय तिला खरं तर टाळायचा होता. पण अनवधानाने तिनेच तो असा काढला होता. ती थोडी धास्तावली.
“हे उठले की म्हणजे? अविनाश उठला नाहीय अजून?” अण्णांचा आवाज तिला चढल्यासारखा वाटला.
“अहो उठतील एवढ्यात. आज रविवार आहे ना हक्काचा?” वातावरणातला ताण कमी करण्यासाठी अश्विनी हसत म्हणाली.
“रविवार असला म्हणून काय झालं ? अगं साडेसात वाजून गेलेsत..” यावर तिला पटकन् काही बोलता येईना. ती कावरी बावरी होऊन गप्प बसली. मग आईच तिच्या मदतीला धावल्या.
“अहो उठू दे ना सावकाश. त्याच्यावरून तुमचं काही काम अडलंय कां?”
“तू त्याला लहानपणापासून लाडावून ठेवलायस आणि आता..”आण्णा संतापाने म्हणाले.
वातावरण गढूळ होत चाललेलं पाहून अश्विनी जागची उठलीच. ते पाहून अण्णा थोडे शांत झाले.
” थांब अश्विनी.आधी हा चहा घे आणि मग उठव त्याला.त्याचा करशील तेव्हा माझा अर्धा कप टाक हवंतर.”
मग तिला थांबावंच लागलं. तिने आढेवेढे न घेता मुकाट्याने तो चहा घेतला.
“हे बघ अश्विनी,अविनाश हुशार आहे. समंजस आहे. पण अतिशय घुमा आणि एककल्ली आहे. त्याला बोलतं करणं प्रयत्न करूनही मला कधी जमलेलं नाही. तूच त्याला आता वेळोवेळी समजून घ्यायचंस. तो चुकतोय असं वाटेल तेव्हा आधार देऊन त्याला सावरायचंस..” बोलता बोलता अण्णांचा आवाज त्यांच्याही नकळत भरून आला आणि ते बोलायचे थांबले.
१. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
“मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!”
२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, “एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची.”
३. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं, ” या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील? ” तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.
४. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ?
एक हिरा लुकलुकला. म्हणाला, “वेडा रे वेडा !!”
५. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं. त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, ‘ करून बघायचं कि बघून करायचं, ठरवू दे की मला मी कसं जगायचं !’
७. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं
“जगलास किती दिवस?”
८. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं –
“माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?”
लाकडं म्हणाली, ” मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला? “
९. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी पोळी त्याला भरवताना म्हणाली ,” बाळा दमला असशील ना? खा पोटभर !!”
१o. माणसानी देवाला विचारलं “ संकटं का पाठवतोस ? “
देव म्हणाला “ माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते. “
११. ‘विश्वास’ या शब्दात “श्वास” का आहे?
दोन्हीही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं !
१२. दरवेश्याचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली
माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न, ” माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला? “
त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न. ” माकडानं दरवेश्याला खेळवताना पाहिलं आहेस कधी? “
१३. नाती का जपायची ?
रेशमाच्या धाग्याचा गुंता सोडवून पहा एकदा…
१४. आठवणींची एक गम्मत आहे.
त्याच्यात गुंतून राहिलात तर नवीन निर्माण नाही होत !!
१५. माणूस देवाला म्हणाला ” माझा तुझ्यावर विश्वासच नाही.”
देव म्हणाला ” वा !! श्रद्धेच्या खूप जवळ पोहोचला आहेस तू. प्रयत्न सुरु ठेव.”
१६. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला,” तू नसलास तर कसं होईल माझं? “
तानपुरा म्हणाला ,” अरे वेड्या ! माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे.”
१७. विठु माऊली एकदा एकादशीला दमून खाली बसली. मी विचारलं,”काय झालं ?”
विठुराय म्हणाले, ” पुंडलिकाचा गजर करतात लेकाचे, पण मायपित्यांना एकटं सोडून अजून माझ्याच पायाशी येऊन झोंबतात.. वेडे कुठले. !”
१८. एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. त्याला विचारलं “कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष ?”
तो म्हणाला “एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वराने लाटा दिल्या आहेत ना मला.”
मी विचारलं “माझं काय?”
तो हसून म्हणाला — ” नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला ? “
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(मागील भागात आपण पाहिले – मला माझी माणसे हवीत. आता मला कोणी अडवायचे नाही. नाईकांचा अपघातात मृत्यु झाला पण त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेन तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा.’’ आता इथून पुढे -)
आशा गप्प होती. आपला नवरा या आजारपणात पुरता खचला आहे. त्याला परत चालता फिरता करायचा असेल तर त्याच्या मनाविरुध्द वागायचे नाही हे तिने ओळखले. मोहनरावांनी भोसले वकिलांना सांगून केस मागे घेण्याची तयारी दाखवली.
वसंता नलिनीचा मुलगा शंतनु बारावी पास करुन कणकवलीत लॉ कॉलेजला जाऊ लागला होता. लॉ च्या दोन्ही वर्षात तो कॉलेजमध्ये पहिला आला. सुरुवातीला तो गावाहून जाऊन येऊन करत होता. पण आता अभ्यास वाढला म्हणून आणि नाडकर्णी वकिलांकडे अनुभवासाठी काम करत होता म्हणून तो कणकवलीतच हॉस्टेलमध्ये राहू लागला. मोहन-वसंताची आई सुमतीबाई अधून मधून आजारी असायची. तिलापण कणकवलीत अधून मधून डॉक्टरांकडे न्यायला लागत होते. शंतनु आता बाईबाबांना म्हणत होता. आपण सर्व कणकवलीत भाड्याची जागा घेऊन राहूया.
मोहनरावांना आईला, वसंताला, बहिणीला भेटायचं होतं. कोर्टात जाऊन केस मागे घ्यायची होती. जवळ जवळ तीन वर्षांनी मोहनराव आणि आशा घरी आली. काका घरी येणार आहेत हे कळताच शंतनु पण गावी आला. बहिण यशोदा पण माहेरी आली. मोहनराव घरी आले ते आईच्या खोलीत गेले. आईच्या पाया पडले. वसंता पण तेथेच त्यांच्या मागोमाग आला. वसंताच्या पाठीवरुन हात फिरवला. आशाने बॅगेतून सासुबाईंसाठी साडी बाहेर काढली. वसंतासाठी पॅन्टशर्ट बाहेर काढले, नलिनीसाठी साडी बाहेर काढली. शंतनुसाठी मोबाईल बाहेर काढला. बहिणीसाठी साडी, बहिणीच्या मुलीला मोबाईल हे सर्व टेबलावर ठेवून मोहनराव बोलू लागला.
‘‘आई, वसंता, यशोदे माझा चुकलाच. मी तुमका नको नकोता बोल्लयं, यशोदा मागच्यावेळी बोलली ता खरा आसा. खरंतर मी घरातलो मोठो मुलगो. मी घरातली जबाबदारी घेवक होई होती. आईबाबांनी माका मोठो केलो, शिकवलो. पण तेची जाण ठेवलयं नाय मी. मी मुंबईक गेलय आणि सगळ्यांका विसारलयं. लग्नानंतर माका सासुरवाडीची लोका मोठी वाटाक लागली आणि गावची बावळट. मी सासुरवाडच्यासाठी खुप केलय पण माझ्या आईवडिलांका, भावाक, बहिणीक विसारलयं. माझी चुक माका कळली. माझ्या वडिलांनी मृत्युपत्र करुन माका जमिन देवक नाय म्हणून मी रागान बेभान झालयं. त्यामागचो वडिलांचो हेतू माझ्या लक्षात ईलो नाय. वडिलांका या जमिनीचो तुकडो पाडूचो नाय व्हतो. माझी एकुलती एक बहिण यशोदा – तिच्या घराकडे कधी गेलयं नाय. तिची कधी विचारपुस केली नाय. तिच्या चेडवाक कधी जवळ घेतलय नाय. माझी चुक माका कळली. मी पैशाच्या धुंदीत होतय. पण एक फटको बसलो. आजारपणात मरणातून वाचलयं. कारण आईबाबांचे आशिर्वाद पाठीशी होते. हॉस्पिटलमध्ये एक महिनो बिछान्यावर पडलयं आणि सगळा डोळ्यासमोर इला. मी खूप चुक केलयं. आई, वसंता, यशोदे माझा चुकला. मोठ्या मनान सगळा इसरा.’’ मोहनराव गदगदून रडत रडत बोलत होता. बाजूला आशापण गप्प राहून ऐकत होती. त्यांच्या आईचेपण डोळे ओले झाले होते. वसंता, नलिनी, यशोदापण भावूक झाली होती. एवढ्यात वीस-एकवीस वर्षाचा वसंताचा मुलगा शंतनु बोलू लागला.
‘‘मोहनकाका तुम्ही म्हणालात सगळा विसरा, पण आम्ही कसे विसरतलवं, आजोबा वारले तेव्हा मी बारावीत होतय. सतरा वर्षाचो. मृत्युपत्रात तुमच्या नावावर जमीन ठेवक नाय म्हणून तुम्ही आजी, बाबा, यशोदे आते हेंका काय काय बोल्लात. माझ्या आई-बाबांनी मुद्दाम तसा मृत्युपत्र आजोबांका करुक सांगल्यानी असो आरोप केलात. यशोदा आतेन जाब विचारल्यान तेव्हा तिचा थोबाड फोडूक निघालात. मी लहान होतय म्हणून गप्प रवलंय आणि माझी आई माका काही बोलूक देईना. ही आशा काकी म्हणाली आंब्याच्या बागेचे लाखो रुपये घेतास – सव्वीस कलमांचे लाखो रुपये येतत ? कलमा आधी एक वर्षाआड येतत. तेंका मोठा करुन काय करुचा लागता त्या शेतकर्याक माहित. बागेची साफसफाई, खत, किटकनाशका किती महाग झाली याची तुमका कल्पना नसतली. आणि हल्ली माकडांचो त्रास किती सुरु आसा. माकडा लहान लहान फळा अर्धी खाऊन नासधुस करतत. बागवाल्याक कसला उत्पन्न मिळतला ? माझे आजोबा आणि बाबा वर्षभर तेच्या मागे रवत म्हणून थोडे आंबे. ही आशा काकी मागे म्हणाली, तुम्ही सगळे आयत्या घरात रवतात. ह्या जुन्या घरांका सांभाळना म्हणजे काय दुसर्याक कळाचा नाय. किती कौला फुटतत, माकडा उडी मारुन फोडतत, लाकूड खराब होता, वाळवी लागता, पावसात कौला फुटून गळता. गावात रवल्याशिवाय ह्या कळाचा नाय. ह्या असल्या घराक कंटाळून लोकांनी स्लॅबची घरा बांधल्यानी. आमच्याकडे पैशे नाय म्हणून – आणि तुम्ही जर पैशाची मदत केला असतास तर आम्ही स्लॅबचा घर बांधला असता पण तुमका तशी बुध्दी होना नाय. गणपतीक दुसर्या दिवशी येतास आणि पुजेक बसतास. गणपतीची तयारी आधी पंधरा दिवस असता. गणपतीक येवक होया तर त्या तयारीक येवक होया. गावात आळशी माणसा रवतत अशी ही काकी म्हणाली, असू दे आम्ही आळशी. आता या पुढे या घरातलो मोठो मुलगो म्हणून ह्या घर, आंब्याची झाडा, शेती, सण, देवपूजा सगळा तुम्ही सांभाळा. मी, आईबाबांका आणि आजीक घेवन कणकवलीक जातय. ती तिकडे भाड्याची जागा बघलय. माझे बाबा गवंडी आसत तेंका थय काम मिळतला. आम्ही बिर्हाड केला तर माझ्या आईक थोडी विश्रांती गावात. या घरात लग्न होऊन इल्यापासून तिका विश्रांती कसली ती माहिती नाही. आजीक पण मी घेवन जातय. कारण तिका वारंवार कणकवलीचो डॉक्टर लागता. आमची गुरा आसत तेंका मी माझ्या मामाकडे पाठवलयं. कारण तुमच्याकडून तेंची देखभाल होवची नाय. माझे बाबाही अशी कामा करत करत पन्नासाव्या वर्षी म्हातारे झाले, आई पंचेचाळीसाव्या वर्षी म्हातारी झाली. तेनी आयुष्यात कधी विश्रांती घेवक नाय. या दोघांचा आयुष्य वाढवचा आसात तर या घर सोडूक व्हया आणि आम्ही कणकवलीक बिर्हाड करुक व्हया. तेवा तुम्ही आणि काकी ह्या घर सांभाळा. तसे तुमी आता रिटायर्ड आसात, तुमचो मुलगो अमेरिकेत गेलो हा. तुम्ही मुंबईक रवलास काय आणि हय रवलास काय फरक पडना नाय. आजच संध्याकाळी मी आई बाबा आणि आजीक घेवन जातय. आता एकदम गणपतीक येव. तुम्ही कसे तिसर्या दिवशी गणपतीक येवास. तुम्ही मोठे भाऊ वडिलानंतर या घरची जबाबदारी तुमची. या घरातले देव, त्यांची पूजा, सण सगळे मोठ्या भावानच करुचे आसतत. आजपासून ह्या घर तुमचाच, शेती फक्त तुमचीच, आंब्याची झाडा, काजूची झाडा फक्त तुमचीच.’’ एवढे भडाभडा बोलून शंतनु थांबला. मोहनराव आणि आशा आ वासुन ऐकत राहिली. एवढासा शंतनु मोठा केव्हा झाला हे कळलेच नाही. वसंता आणि नलिनी सुध्दा आपल्या मुलाकडे पाहत राहिली. या शंतनुला आपण अजून लहान लहान म्हणत होतो, पण खरंच जे आम्ही बोलू शकणार नव्हतो ते हा मुलगा बोलला. वसंताला वाटले आयुष्यभर मी या घरासाठी झटलो, एक दिवस विश्रांती नाही. शहरातल्या लोकांसारखे ना नाटक, ना सिनेमा. पण किंमत कोणाला आहे ? ही आशा वहिनी गावातले सगळे लोक आळशी असे म्हणून मोकळी झाली. खरचं शंतनु म्हणतोय तर जाऊया कणकवलीला. मी गवंडी काम करेन. नलिनीला विश्रांती मिळेल. नलिनी मनात विचार करत होती. कमाल आहे या मुलाची. मोठ्या काकांना मनातले बोलला. मला असे कधी बोलायला जमले नसते. घर सोडून कणकवलीला बिर्हाड करायचं म्हणतोय सोप आहे का ते ? एवढी वर्षे या घरात राहिले. चला आता बिर्हाड करुया. तो म्हणतोय तर जाऊ कणकवलीला. शंतनुचे बोलणे मोहनराव आणि आशा ऐकत होती. शंतनु एवढा मोठा झाला हे त्यांना माहितच नव्हते. तो खरच घर सोडून आईवडिलांना, आजीला घेऊन कणकवलीला जाईल असे त्यांना वाटत नव्हते. मोहनरावांना वाटत होते. आपल्याला आणि आशाला हे घर सांभाळणे जमायचे नाही. नलिनी दिवसभर राबराब राबत असते. आशाला थोडेच जमणार ? आशाला आता शहरात राहून सुखाची सवय झाली आहे. पण करणार काय ? मागच्या वेळी आपण आणि आपली बायको काय काय बोलून गेलो. आता आपणाला हे सर्व ऐकून घ्यावेच लागेल.
मोहनराव आणि आशा पाहत होती. खरेच नलिनी कपड्यांच्या पिशव्या भरत होती. वसंता तिला मदत करत होता. मध्येच नलिनीने दोघांचे जेवण आणून ठेवले आणि रात्रीसाठी तुम्हा दोघांसाठी जेवण ठेवले आहे असे सांगून गेली. नलिनी वसंताने भरलेल्या पिशव्या पाहून आशा बोलू लागली.
‘‘वसंत भावोजी, आमचं चुकलंच, आम्ही रागाच्या भरात बोलून गेलो. मी तुम्हाला आळशी म्हणाले, ऐतखाऊ म्हणाले, आंब्याचे एवढे पैसे खाता म्हणाली, चुकच झाली. आम्ही तुमच्या सगळ्यांवर दावा दाखल केला. त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. माझा नवरा मरणाच्या दारातून परत आला. पण आता तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मी शहरात राहिलेली. मला हे गावातील घर सांभाळता येणार नाही. गावातले सण, रितीरीवाज मला जमणार नाहीत. मी सासुबाईंना उलट-सुलट बोलले. सासुबाई मला क्षमा करा.’’ असे काहीबाही आशा मोहन बोलत होते. हात जोडत होते. डोळे पुसत होते. पण वसंता, नलिनी, यशोदेने तिकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्यांनी बाहेर जायचे कपडे घातले एवढ्यात शंतनु टेम्पो घेऊन आला. त्यात शंतनुने आणि वसंताने मिळून सर्व सामान भरले. एक रिक्षा आली त्यात शंतनुची आजी, आईबाबा आणि आते बसली. टेम्पोबरोबर शंतनु बसला. सर्वांनी देवाला नमस्कार केला. घराकडे एकदा डोळे भरुन पाहिले. रिक्षा आणि टेम्पो कणकवलीच्या दिशेने निघाली.
बाहेर लोट्यावर बसून मोहनराव आणि आशा डोक्याला हात लावून हे सर्व पाहत होते आणि त्यांच्या समोरील टेबलावर त्यांनी मुंबईहून आणलेल्या साड्या, शर्टपॅन्टपीस, मोबाईल्स त्यांचेकडे पाहत होते……
(मागील भागात आपण पाहिले – ‘‘मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे हे मला कळवत रहा.’’ ‘निश्चित॰ कसलीच काळजी करु नका.’’ आता यापुढे –)
मोहनरावांनी फोन ठेवला आणि विजयी मुद्रेने पत्नीकडे पाहिले. आशापण खुश झाली. तिला सासुबाईला, दिराला, जावेला, नणंदेला धडा शिकवायचा होता.
दुसर्या दिवशी मोहनराव आणि आशा मुंबईस निघाली. मोहनरावांच्या सुचनेनुसार भोसले वकिलांनी सर्व कागदपत्रे तयार केले आणि त्यांच्या नोटीसा मोहनरावांची आई, भाऊ वसंता, बहिण यशोदा यांना पाठवल्या. आपल्या मुलाकडून कोर्टातर्पेâ अशी नोटीस आल्याने सुमतीबाईंना फार वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात राहून राहून अश्रू जमा होऊ लागले. आपल्या नवर्याने कोणत्या हेतूने मृत्युपत्र केले आणि त्याचा परिणाम कुटुंब फुटण्यात होईल याची त्यांना कल्पना नव्हती. उलट मोहन सर्व समजून घेईल असे त्यांना वाटत होते. या गावच्या थोड्याशा जमिनीसाठी त्याला स्वार्थ नसणार असे त्यांना वाटत होते. पण झाले उलटेच. वसंताला नोटीस मिळताक्षणी तो खिन्न झाला. काही झालं तरी आपण कोर्टात जाणार नाही किंवा वकिलपत्र देणार नाही असा त्याने निर्णय घेतला. पण त्यांची बहिण यशोदा तिला आपल्या मोठ्या भावाचा राग आला. वडिलांच्या इच्छेविरुध्द त्यांच्या मृत्युपत्राला तो आव्हान देतो आहे हे पाहून या केसमध्ये आपल्या भावाविरुध्द उभे रहायचे एवढेच नव्हे तर कुणालातरी वकिलपत्र देण्याचा तिने निर्णय घेतला. त्याप्रमाणे तिने आणि तिच्या नवर्याने कणकवलीतील एक तरुण पण हुशार वकिल पाहिला आणि कोर्टात उभा केला. मृत्युपत्राला आव्हान देणारी केस कोर्टात उभी राहिली पण कागदपत्र अपुरं, पत्ता अपुरा या कारणाने पुढच्या तारखा मिळत गेल्या. भोसले वकिल प्रत्येक तारखेचे मोहनरावांकडून पैसे उकळत होता. मोहनराव आणि आशा यांना वाटले होते दोन-तीन महिन्यात केसचा निकाला लागेल. पण केस लांबत गेली आणि अचानक कोल्हापूरच्या प्रमोद नाईकांचा मोहनरावांना फोन आला.
नाईक कणकवलीत होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. वडिलांच्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मान्य केला होता. प्रमोदरावांच्या या फोनने मोहनराव खुश झाले. मोहनरावांना खात्री झाली की आपल्यालापण असाच निर्णय मिळणार कारण दोघांचे वकिल एकच होते. मोहनरावांनी मोठ्या आनंदाने ही बातमी आशाला सांगितली. दोघेही आनंदात मग्न झाले. आता सासुचे, नणंदेचे आणि दिराचे नाक कापायला उशिर होणार नाही याची तिला खात्री वाटू लागली. तिने तातडीने ही बातमी वडिलांना कळविली आणि लवकरच आपणास कोकणातली प्रॉपर्टी मिळेल याची खात्री तिने वडिलांना दिली. या आनंदाच्या बातमी निमित्त मोहनराव, आशा तिचा भाऊ उमेश आणि त्याची पत्नी सर्वजण मोठ्या हॉटेलात जेवायला गेले. सर्वजण खुशीत होते. हॉटेलमधून मोहनराव आणि आशा रात्रौ ११ च्या सुमारास घरी पोहोचले.
मोहनराव कपडे बदलत असताना अचानक त्यांचा फोन वाजला. कणकवलीहून भोसले वकिलांचा फोन होता. भोसले वकिलांनी एक भयानक बातमी मोहनरावांना कळविली – ‘‘संध्याकाळी सातवाजता कणकवलीहून कोल्हापूरला निघालेले प्रमोदराव नाईक यांच्या गाडीला बावडा घाटात समोरुन येणार्या खाजगी बसने धडक दिली आणि त्यात दोघही नवरा बायको ठार झाली.’’
ही बातमी ऐकताच मोहनराव किंचाळले, थरथरले. त्यांच्या घशाला कोरड पडली. संध्याकाळी चारच्या सुमारास प्रमोदरावांनी फोन करुन केस जिंकल्याची बातमी सांगितली आणि आपण त्यांचे अभिनंदन केले आणि आता सहा तासात दुसरी बातमी अपघातात नाईक नवरा बायको ठार झाल्याची. मोहनराव सुन्न झाले. त्यांनी आशाला कशीबशी ही बातमी सांगितली. आशाही घाबरली. मोहनरावांनी कपडे बदलले आणि ते कॉटवर पडले. त्यांना एकसारखे भोसले वकिलांनी फोनवर सांगितलेले कानात ऐकू येत होते. प्रमोद नाईकांनीपण आपल्या सारखेच वडिलांच्या मृत्युपत्रातील इच्छेला कोर्टात आव्हान दिले आणि केस जिंकून प्रमोदराव कोल्हापूरला जात होते आणि…. मोहनराव मनात म्हणत होते – आपण पण तेच करतोय. आपण पण वडिलांच्या मृत्युपत्राला कोर्टात आव्हान दिले आहे. केस सुरु आहे. आपण आपली जन्मदाती आई, पाठचा भाऊ आणि एकुलती एक बहिण यांना नोटीस पाठविली. आपली सख्खी माणसे त्यांना नोटीस पाठविली….. एक सारखे हे विचार मोहनरावांच्या डोक्यात घोंगावू लागले. मोहनरावांना दरदरून घाम सुटला. डाव्या पाठीत ठणके बसू लागले. छाती ठणकू लागली आणि मोहनराव बेशुध्द झाले.
बाथरुममधून बाहेर आलेल्या आशाने नवर्याकडे पाहिले, तिच्या लक्षात आले – नवर्याची तब्बेत बरोबर नाही. तिने एसी चालू केला. धावत जाऊन पाणी आणून तोंडात घातले. पण शुध्द येईना. तिने भाऊ उमेशला फोन केला आणि येताना अॅम्ब्युलन्स आणायला सांगितली. उमेशने तिला घरात सॉर्बिट्रेटची गोळी असेल तर जिभेखाली ठेवायला सांगितली. आशाने कपाटात शोधून सॉर्बिट्रेटची गोळी काढली आणि मोहनरावांच्या जिभेखाली ठेवली. दोन मिनिटानंतर मोहनराव श्वास घेऊ लागले. पंधरा मिनिटात उमेश अॅम्ब्युलन्स घेऊन आला आणि मोहनरावांना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले.
हिंदूजा हॉस्पिटलमध्ये सर्व तातडीच्या तपासण्या झाल्या. भराभर छातीत इंजेक्शने दिली गेली. दोन दिवसांनी मोहनरावांची एन्जीओग्राफी केली गेली आणि त्यांना बायपास करण्याची शिफारस केली. दोन दिवसांनी मोहनरावांची बायपास झाली. आशा विचार करत होती. गेल्या दहा दिवसात किती धावपळ झाली. कणकवलीतील त्या भोसले वकिलांनी कोल्हापूरच्या नाईकच्या अपघाताची बातमी सांगितली आणि आपला नवरा हादरला. केवळ नशिब म्हणून आपला नवरा वाचला.
बायपास नंतर मोहनरावांना आयसीयु मधून जनरलमध्ये आणले. पण मोहनराव खिन्न होते. आपण किरकोळ जमिनीसाठी आईवर, भावंडांवर केस केली. त्यांना नोटीसा पाठविल्या ही आयुष्यातली फार मोठी चुक केली असे त्यांना वाटत होते. त्यांच्या डोळ्यासमोर वडिल येत होते. गावातील महाजनांच्या बागेत अळी काढणे, कोळम्याने पाणी काढणे, झाडावर चढून आंबे, रतांबे काढणे अशी कामे करुन त्या मजूरीतून घरात साखर पावडर मीठ आणायचे. रोज कष्टाची कामे, बागेतली नारळ सुपारी घेऊन दहा मैलावरील कणकवलीच्या बाजारात चालत जायचे आणि येताना मुलांना खाऊ, शाळेची पुस्तके-वह्या आणायचे. आपण हुशार म्हणून आपल्याला कणकवलीला अभ्यासाला ठेवले. तेव्हा त्यांची आणि आईच्या जीवाची किती घालमेल झालेली. आईफक्त रडत होती पण बापाने आपल्याला गावात अडकवले नाही. उलट शिक्षण घेऊ दिले. मुंबईहून आपले पत्र आले नाही तर दोघांचा जीव वर खाली व्हायचा. भाऊ वसंता आपण कणकवलीला शिकत होतो तेव्हा एवढासा होता. मी गावी गेलो की मागून मागून असायचा. अजूनही आपण गावी गेलो की माझ्यासाठी काय चांगले मिळेल ते आणायचा. कधी शहाळी, चांगले मासे, आंबे. बहिण यशोदा तर सर्वांची लाडकी. नेहमी दादा दादा करत मागे मागे. सर्व माझीच माणसे. रक्ताची माणसे. एका आईच्या पोटातून सर्वांनी जन्म घेतला. पण गावच्या किरकोळ गुंठ्यातील जमिनीसाठी आपण कोर्टात गेलो. वडिलांचे पण काही चुकले नाहीच. एवढ्याशा जमिनीत दोन भाग पाडले तर प्रत्येकाला काय येणार ? वसंताला काय राहणार ? त्याची तिन माणसे आणि आई जगणार कसे ? आपण आई-वडिलांना कधी पैसे धाडले नाहीत की बहिणीला काही पाठविले नाही. आपण पत्नी आशा, मुलगा आणि सासुरवाडीच्या माणसांचा विचार करत राहिलो. आपली बुध्दी भ्रष्ट झाली होती. छे छे… आपले चुकलेच. आता बरे वाटले की गावी जायचे. आईच्या पायावर डोके ठेवायचे. वसंताच्या पाठीवर थाप द्यायची. बहिणीच्या घरी जाऊन तिची खुशाली घ्यायची आणि कोर्टातली केस मागे घ्यायची. त्याशिवाय आपल्याला चैन नाही की सुख नाही. आशा समोर येऊन बसली. म्हणाली – ‘‘कसाला विचार करताय?’’
‘‘मी फार मोठी चुक केली. तुझ्या आणि तुझ्या माहेरच्या माणसांच्या बुध्दीवर चाललो. माझ्या सख्ख्या रक्ताच्या माणसांना विसरलो. वडिलांना त्यांच्या आजारपणात हाक मारली नाही, मदत केली नाही. खरतर त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना मुंबईत आणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर ते अजून जगले असते. पण मला तशी बुध्दी झाली नाही. त्यांचे सर्व वसंता आणि नलिनीने केले. तोंड मिटून केले. माझ्या वडिलांचे आजारपण त्या दोघांनी काढले म्हणून खरतर मी त्यांचे आभार मानायला हवे होते. त्या ऐवजी मी वाट्टेल तसे बोललो. मी ही केस मागे घेणार आहे. मला नको जमिन. नको हिस्सा. मला माझी माणसे हवीत. आता मला कोणी अडवायचे नाही. नाईकांचा अपघातात मृत्यु झाला पण त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेन तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा.’’
(मागील भागात आपण पाहिले – ‘‘वा रे ! एक लक्षात ठेव माझो पण ह्या प्रॉपर्टीत हक्क आसा. आता प्रॉपर्टीत मुलांसारखे मुलींचो पण हक्क असतत.’’ तेवढ्यात आशा नवर्याला म्हणाली – चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही. कायदेशीर हिसकाच दाखवला पाहिजे यांना.)
आशा आत जाऊन कपड्याची बॅग घेऊन आली. वसंता रडत रडत म्हणाला – ‘‘दादा, जाऊ नको आज बाबांचा तेराव्या घातला, तेंका काय वाटात ? तू आणि मी उद्या तहसिलदारांकडे जाऊया. मी लिहून देतय ह्यो माझो मोठो भावस आसा ह्या प्रॉपर्टीत हेचो पण अर्धो हक्क आसा.
आशा कडाडली.
‘आम्हाला कोणाची भिक नको. आम्ही हक्काने येऊ या घरात. चला हो. आमचे मोठे मोठे वकिल ओळखीचे आहेत. आता येऊ तो हक्काने येऊ.’
असे बडबडत मोहन आणि आशा बॅग घेऊन बाहेर पडली. रस्त्यापलिकडे त्यांची गाडी उभी होती. त्यात बॅग ठेवून गाडीने निघून गेली. आत बसलेली वसंताची बायको आणि मुलगा शंतनु आता बाहेर आले.
‘‘काय ह्या ? रागान चलते झाले. सकाळी बापाचा तेराव्या आणि दुपारी भांडण करुन गेले’’ नलिनी रडत रडत म्हणाली. यशोदा येऊन तिच्या शेजारी बसली. सासुबाई पण तिथेच खुर्चीवर बसलेली. त्यांच्याही डोळ्यात पाणी होते. वसंता स्फुंदून स्फुंदून रडत होता. यशोदा वसंताला म्हणाली, ‘वसंता भिया नको ही बहीन तुझ्या पाठी आसा. आपण दोघांनी मिळून या मोहनाक आणि त्याच्या बायकोक धडो शिकवया.’
मोहन आणि आशा कणकवलीला पोहोचली. लॉजवर गेल्यानंतर आशाने मामांना फोन लावला. तिचे मामा पुण्यातील मोठे वकिल. त्यांना सर्व हकिगत सांगितली आणि आमचा हिस्सा कसा मिळेल याची विचारणा केली. आशाच्या मामांनी कणकवलीत त्यांचे मित्र भोसले वकिल यांची भेट घ्यायला सांगितले. आपण भोसलेंशी बोलतो असे सांगितले. दुसर्या दिवशी मोहन आणि आशा भोसले वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचले.
‘‘नमस्ते, वकिल साहेब ! मी मोहन मुंज आणि ही माझी पत्नी’’
‘‘या या मोहनराव. पुण्याहून साळुंखे साहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले मला आपले जावई तुम्हाला भेटणार म्हणून. बोला, काय झालं ?’’
‘‘माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीत मृत्युपत्र करुन सगळी प्रॉपर्टी माझा दोन नंबरचा भाऊ वसंता याचे नावे केली. मी त्याचा मोठा भाऊ असताना सुध्दा त्यांनी मला पूर्णपणे डावललं. माझ्यावर पूर्णपणे अन्याय झाला. मला त्या प्रॉपर्टीत माझा हिस्सा हवा, तो मला मिळवून द्या.’’
‘‘ठिक आहे, तुम्ही बाहेरच्या मुलीकडे तुमचे नाव, पत्ता, मोबाईल वगैरे द्या. आणि मला सांगा तुम्ही किती भावंडे?’’
‘‘तीन. एक लग्न झालेली बहिण आहे आणि आईपण आहे.’’
‘‘म्हणजे या प्रॉपर्टीत चार वारस आहेत बरोबर ? म्हणजे तुम्हाला या तिघांना नोटीस पाठवावी लागणार. त्यांची नावे, पत्ते द्या. बाकी प्रॉपर्टीचे सातबार, आठ-अ ही कागदपत्रं लागतील.’’
‘‘पण या मृत्युपत्राला चॅलेंज देऊ शकतो का आपण ?’’
‘‘हो, का नाही ? पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा.’’
मध्येच आशा म्हणाली – ‘‘खर्च होऊंदे पण या वसंताला, यशोदेला आणि त्यांच्या आईला धडा शिकवायचा आहे मला.’’
‘‘मग ठिक आहे, सुरुवातीला पन्नास हजार जमा करा.’’
‘‘पण मिळेल का मला हिस्सा?’’ मोहनराव उद्गारला.
‘हो मिळणारच, कारण ही इस्टेट आहे ती वडिलांनी मिळवलेली नाही की विकत घेतलेली नाही. ती तुमच्या आजोबांकडून वारसाने वडिलांकडे आली आहे. म्हणजेच वंशपरंपरेने आलेली आहे. त्यामुळे त्यांना मृत्युपत्र करुन कुणाला देताच येणार नाही असा युक्तिवाद करू आपण. तुम्ही आपल्या आजोबांचे वारस म्हणून त्या इस्टेटीत हक्क सांगताय असा युक्तिवाद करायचा.’’
‘‘पण यात यश मिळेल ना ?’’ मोहनरावांचा प्रश्न.
‘‘प्रयत्न करायचाच. ही अशीच एक केस मी लढतो आहे. कसालचे एक गृहस्थ आहेत. तुम्हाला नाव सांगतो – प्रमोद नाईक. हे कोल्हापूरला राहतात. त्यांच्या वडिलांनी वंशपंरपरेने आलेली इस्टेट आपल्या मुलीच्या नावावर केली. कारण म्हातारपणी त्या मुलीनेच त्या दोघांना सांभाळलं. प्रमोदरावांच्या वतीने मी चॅलेंज केलय. तुम्हाला या प्रमोद नाईकांचा नंबर देतो. त्यांना विचारा.’’ वकिलांच्या सेक्रेटरीने त्यांना प्रमोद नाईक यांचा कोल्हापूरचा पत्ता आणि फोन नंबर दिला.
‘‘बर मी करतो फोन यांना. मग आम्ही निघू ?’’
‘‘हो. सर्व भावंडांचे पत्ते द्या, बहिणीचा पण द्या.’’
पण हा, गावातील सातबारा वगैरे कागदपत्रे मिळवायला मला वेळ नाही. मला मुंबईला तातडीने जायचंय.’’
‘‘ठिक आहे. मग अजून पाच हजार द्या. म्हणजे एकूण पंचावन्न हजार. मग माझा माणूस सर्व कागदपत्रे गोळा करेल.’’
मोहनरावाने पंचावन्न हजाराचा चेक वकिलांच्या सेक्रेटरीकडे दिला. सेक्रेटरीने आवश्यक त्या सह्या घेतल्या. सेक्रेटरी म्हणाली – ‘‘ठिक आहे साहेब, सर्व कागदपत्रे तयार झाली की, तुम्हाला स्वतः एकदा येऊन कोर्टात दावा दाखल करायला लागेल. तेव्हा एकदा या.’’
वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडून लॉजवर आल्यानंतर मोहनरावाने प्रमोद नाईकांना फोन लावला.
‘‘हॅलो, प्रमोद नाईक बोलतात का ?’’
‘‘होय, मी प्रमोद नाईक, तुम्ही कोण ?’’
‘‘मी मोहन मुंज. मुळ गांव आंबेरी सध्या मुंबईत राहतो.’’
‘‘बोला काय काम होतं, आणि माझा नंबर कोणी दिला ?’’
‘‘तुमचा नंबर कणकवली भोसले वकिलांनी दिला. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्युपत्राला चॅलेंज केलंय ना कोर्टात त्या संबंधी बोलायचं होतं.’’
‘‘तुमचा काय संबंध?’’
‘‘माझ्या वडिलांनी पण असचं केलयं. वडिलोपार्जित जमिन मृत्युपत्राने माझ्या एकट्या भावाच्या नावाने केली. मला एक गुंठापण ठेवला नाही. मी भोसले वकिलांमार्फत कोर्टात दावा ठोकायचा विचार करतोय. भोसले वकिल म्हणाले, असाच एक दावा सध्या त्यांचेकडे आहे. त्यांनी तुमचे नाव आणि पत्ता दिला.’’
‘‘होय, होय. मी त्या मृत्युपत्राला चॅलेंज केलयं. आता दावा कोर्टात आहे. भोसले वकिल म्हणाले कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूने निकाल येईल. फक्त पैसे सोडायला लागतील.’’
‘‘मला पण तसेच सांगितले. पण खरोखर तसे होईल काय ?’’
‘‘निश्चित होईल. भोसले वकिल सर्व फिक्स करण्यात हुशार आहे. तो कशी मांडवली करतो बघा. तुम्ही निश्चिंत रहा. माझी केस चालू आहे त्याच्या निकालाने तुम्हाला अंदाज येईलच.’’
‘‘मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे हे मला कळवत रहा.’’
(मागील भागात आपण पाहिले – वसंता घाबरुन म्हणाला, ‘‘दादा, खराच माका काय म्हायती नाय रे ! बाबांनी माका कायएक सांगूक नाय, नायतर मी असा करुक दिलय नसतयं, व्हया तर आईक विचार.’’ आता इथून पुढे -)
मोठ्या मोठ्याने बोलणे ऐकून त्यांची आई एव्हाना आपल्या खोलीतून बाहेर आली. थोरल्याचे आणि सूनेचे बोलणे तिने ऐकले होते. ती बोलायला लागली.
‘‘मोहना, या वसंताक खराच काय म्हायती नव्हता. तुझ्या वडिलांनी फक्त माका सगळा सांगितलेल्यानी, नायतर ह्यो वसंतापण तयार झालो नसतो.’’
‘‘मग असं का केल? मी त्यांचाच मुलगा आहे ना ? थोरला मुलगा. मग माझा हक्क का डावलला ?’’
आई बोलू लागली – ‘‘मोहना, चिडा नको, तुझ्या बाबांचा म्हणणा होता पाच-सहा वर्षापूर्वी ते सतत विचार करत रवत तेव्हा मी त्यांका विचारलय इतकी कसली विवंचना आसा?’’
पाच वर्षापूर्वी…..
केशवराव सतत विवंचनेत असत. आपल्या दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल याची त्यांना काळजी वाटे. या दोन मुलातील मोठा मोहन अभ्यासात हुशार. पहिल्यापासून एक दोन नंबराने पास होत गेला. आपणास त्याचे कौतुक वाटे. आपल्या या परिस्थितीत पाचवीपासूनच त्याला कणकवलीतील एस.एम. हायस्कूलमध्ये घातले. त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स, प्रोफेसर्सची मुले होती. सातवी स्कॉलरशीपमध्ये तो जिल्ह्यात पाचवा आला. त्याचे फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले. त्याच्या शिक्षकांनीपण त्याच्या अभ्यासात लक्ष घातले. दहावीत तो जिल्ह्यात तिसरा आला. त्याची आवड म्हणून तो कॉमर्सकडे गेला. बारावीत पुन्हा चांगले मार्क्स मिळाले. त्याच्या मुंबईच्या मामाने त्याला मुंबईस नेले. तेथे तो बी.कॉम. झाला सी.ए. झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. त्याची प्रगती होतच राहिली. मामांच्या मुलीशी आशाशी त्याने लग्न केले. सासर्याने त्याला अंधेरी भागात मोठा ब्लॉक दिला. त्याचा एकच मुलगा त्यांच्यासारखाच हुशार, शिवाय चांगली शाळा, क्लास यामुळे तो शिकत गेला. मोहनच्या घरात सुबत्ता. मोहनने पुण्यातपण घर घेतल्याचे ऐकले. हल्ली मोहन काही सांगत नाही. पण त्याच्या मित्रांकडून कळले. त्याच्या बायकोने आशाने आपल्यापासून तोडलच त्याला. दोन वर्षातून केव्हातरी गणपतीत येतो. येतो पण तो तिसर्या दिवशी. तिसर्या दिवशी येऊन गणपतीच्या पुजेला बसतो आणि दोघजन जातात कणकवलीत लॉजवर. परत पाचव्या दिवशी गणपती पोहोचवायला येतो आणि गाडीत बसून मग कणकवली आणि मग मुंबई. वर्षातून चुकून कधी फोन केला तर. तो आपल्यापासून लांब गेला पण धाकटा वसंता तसा हुशार होता पण बारावीनंतर आपण त्याला पुढे पाठवल नाही. त्यालाही तशी अभ्यासाची आवड नव्हतीच. म्हटले, आपल्या सोबत म्हातारपणी कोणीतरी हव. तो पण प्रामाणिकपणे शेतीत, बागायतीत लक्ष घालतो. कष्टाची कामं करतो. शिवाय घरचे देव, सण वगैरे त्याच्या बायकोलाच करावे लागतात. त्याची बायकोपण आहे गुणी. आम्हा दोघांचे तीच मान खाली घालून करते. तिच्या माहेरीपण तशी गरीबीच. वसंताचा मुलगापण आहे लाघवी. आम्हाला दोघांना त्याने लळाच लावला. गेली दहा-पंधरा वर्षे आंब्याचे पिक व्यवस्थित येत नाही शिवाय माकडे फार वाढली आहेत. खूप नासधुस करतात. गाईच्या दूधांना आता मागणी नाही. शहरात दूध पिशव्या येतात. एकंदरीत वसंताला यापुढे घरखर्च भागविणे कठीण. आपली थोडीशी बागाईत, थोडी शेती यात जर दोन मुलांचे दोन भाग केले तर वसंताला काय राहणार ? त्याने आयुष्यभर बागायतीत, शेतीत कष्ट केले त्याला काय मिळणार ? मोठ्या मोहनने कधीच मातीत हात घातले नाहीत. पण तो हक्क मागणार म्हणून वकिलांचा सल्ला घेतला. आपल्या मागे आपली थोडी जमिन वसंताकडे राहील हे पाहणे योग्य. तो जमिन विकायचा नाही पण या शहरातल्या मुलाचा काय भरवसा ? तो बायकोच्या नादाला लागून जमीन विकेल आणि शहरात बसेल. कणकवलीत जाऊन नाडकर्णी वकिलांचा सल्ला घ्यावा. असा विचार करुन केशवराव नाडकर्णी वकिलांच्या ऑफिसात पोहोचले. वकिलांना सांगून त्यांनी मृत्युपत्र करुन घेतले आणि गावातील जमिन वसंताच्या नावे केली.
सुमतीबाईंनी आपल्या नवर्याने असा का निर्णय घेतला हे सांगितले. आणि या निर्णयामागे वसंता किंवा त्याची बायको नलिनी यांचा काहीही संबंध नसून आपण त्यांना काहीच सांगितले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आशा खवळली.
‘‘काहीच सांगू नका, याला माहित नाही आणि त्याला माहित नाही. तुम्ही सर्वांनी आमच्या विरुध्द कट रचलाय कट. हा इथे भावासमोर बसून रडतोय आणि ती आतमध्ये चहा करणारी एक नंबरची लबाड बाई आहे. तरी बरं बाबा नुसता भिकारी म्हणून आवाज कमी नाहीतर कुणाला ऐकली नसती.’’ नलिनीच्या दिशेने तोंड करत आशा बडबडत होती.
गावचे लोक तुम्ही सगळे आळशी, काम करायला नको. मग तुमचं भागणार कसं ? बापाला मुलाची एवढी काळजी वाटते तर त्याला मजूरीच्या कामाला पाठवायचं. आंब्याच्या एवढे लाखो रुपये येतात त्याचे करता काय? आम्हाला फक्त दोन पेट्या पाठवतात. बाकी सर्व तुम्ही खाता ना ? मी एकेकाला सोडणार नाही. आई कसली ही तर कैकयी. रामाला विसरली.
ही तणतण ऐकून वसंता रडू लागला. आणि आतमध्ये त्याची बायको नलिनी हुंदके देऊ लागली. शंतनु आईशेजारी बसून हे सर्व ऐकत होता. सुमतीबाई मोहनला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. पण मोहन आणि आशाने आरोपावर आरोप सुरु केले. हे ऐकून कंटाळलेली बहिण यशोदा बाहेर येऊन मोहनला बोलू लागली.
‘‘तुका फक्त हक्क व्हयो, जमिनीत वाटो व्हयो पण कसले जबाबदारे उचलतस ते सांग? एवढो मोठो ऑफिसर तू आणि श्रीमंताचो जावय कधी आईक यॅक लुगडा तरी पाठवलसं ? बापाशीक कधी लेंगो पाठवलस, या भावाशीक काय व्हया नको इचारलस ? आणि तुझी एकुलती एक बहिण मरे मी माझ्या लग्नानंतर कधी माका बघुक इलस ? बहिणीक साडी कधी धाडलसं ? नाय ना ? पण ह्यो वसंता दोन तीन महिन्यांनी बहिणीकडे येता. माझी चौकशी करता, सुट्टी पडली की माझ्या चेडवाक आजोळाक घेवन जाता. माका दरवर्षी दोन साडये घेवन येता. हेका भावस म्हणतत. तुका कसली जबाबदारी नको. फक्त प्रॉपर्टीवर नाव व्हया. ही तुझी बायल आशा सासर्याक कधी बघुक इल्ली ? तु एवढो बापूस शिक तर बघुक तरी इलस? आता बापूस मेलो तर हक्कासाठी भांडतस. बाबांनी केला ता बरा केल्यानी. ह्या वसंतान आणि नलिनीन तेंका बघल्यानी आणि म्हातार्या आईक पण तोच बघतलो.’’
तिचे हे बोलणे ऐकून मोहनराव चिडून बोलू लागला.
‘‘यशोदे, तुझा तोंड फोडीन पुढे बोल्लस तर. तु लग्न करुन दिलेली मुलगी, ह्या प्रॉपर्टी बद्दल बोलू नकोस.’’
‘‘वा रे ! एक लक्षात ठेव माझो पण ह्या प्रॉपर्टीत हक्क आसा. आता प्रॉपर्टीत मुलांसारखे मुलींचो पण हक्क असतत.’’
तेवढ्यात आशा नवर्याला म्हणाली – चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही. कायदेशीर हिसकाच दाखवला पाहिजे यांना.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ‘पाट’ (Pat) गावात राहतात.
कुडाळ येथे प्रिंटिंग स्टेशनरी चा व्यवसाय आहें.
दोन वर्षी पासून लेखनाला सुरवात केली. दोन वर्षात 22 कथा लिहिल्या.
अनेक स्पर्धा मध्ये क्रमांक मिळाला.
डिसेंबर 22 मध्ये “एका पेक्षा एक ‘नावाने कथा संग्रह प्रसिद्ध झाला
जीवनरंग
☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 1 ☆ श्री प्रदीप केळुस्कर☆
केशव काकांच्या तेराव्याचे जेवण जेवून शेजारी, नातेवाईक पांगले आणि घरात राहिले मोहन, वसंता हे केशवरावांचे दोन मुलगे, यशोदा ही लग्न झालेली मुलगी, मोहनची बायको आशा, वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमतीबाई. मोहन आणि मोहनची बायको आशा उद्याच मुंबईला जायची आणि बहिण यशोदापण उद्याच आपल्या घरी जायची. सकाळपासनू भटजींची गडबड. जेवण, येणारे नातेवाईक. गडबड नुसती. वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा पडले होते. मोहन, वसंता लोट्यावर आणि मोहनची बायको आशा, बहिण यशोदा आत वाणशीमध्ये. त्यांची आई आत काळोखाच्या खोलीत. नलिनी येथेच राहणारी. त्यामुळे तिला घरची भांडीकुंडी, धुणी याची काळजी. त्यामुळे ती बिचारी भांडी धुत होती. गळून झाली की स्टॅण्डवर ठेवत होती. ती मनात म्हणत होती. उद्या मोहन भावोजी आणि आशा वहिनी मुंबईला जाणार म्हणून त्यांचे कपडे उन्हात सुकवायला हवेत. एकीकडे तिला तिचा मुलगा शंतनु याची बारावीचा अभ्यास चुकतो आहे याचे वाईट वाटत होते. पण उद्या सर्व मंडळी गेली की घर खायला येणार असेही वाटत होते. गेले पाच महिने सासरे आजारी त्यामुळे त्यांचे करताना तिला वेळ पुरत नव्हता. सासुबाई असतात पण त्यांचे गुढगे संधीवाताने सतत दुखत असतात. त्यामुळे सासर्यांचे सर्व तिनेच केले. त्यांना जाऊन आज तेरा दिवस झाले. आता उद्यापासून नेहमीचेच. नवरा उठून बागेत जाईल, शंतनुची शाळा त्यामुळे उरलो आपण आणि सासुबाई. सकाळपासून भाकरी, चहा मग पेज, दुपारी जेवण पुन्हा चहा, पुन्हा रात्रीचं जेवण यामध्ये विहिरीवरुन पाणी आणायचे, गोठ्यातल्या जनावरांना पाणी द्यायचे, शेण काढायचे, गवत काढायचे. दुपारी बाजारात जाऊन घर सामान आणायचे. दुपार उतरली की, बागेत जाऊन पतेरा गोळा करायचा. तो भातशेतीच्या जमिनीवर टाकायचा. तिन्हीसांज झाली की गाईचे दूध काढायचे. गुरांना गवतकाडी घालायचे. नवरा वसंता घरी असला तर मदत करायचा. पण तो गवंडीकाम करायला गेला तर सकाळी बाहेर पडायचा तो रात्रीच घरी यायचा. शंतनुचा आतल्या खोलीत अभ्यास. मध्येच उठून तो आजीची औषधे देतो. त्याचे आजोबा त्याच खोलीत बाकावर पडलेले असत. त्यांना स्वच्छ करायचा. तोंडात औषधे घालायचा. झाले ! उद्यापासनू रोजचेच काम… असे मनातल्या मनात म्हणत नलिनी चहा करायला गेली. गोबरगॅस तिने चालू केला पण लक्षात आले गॅस येत नाही. कारण घरच्या गडबडीत गोबरगॅसमध्ये शेण घालायचे राहिले. तिने माडाच्या चुडत्या पेटवल्या आणि चुलीवर आधण ठेवले. घरातल्या भांड्यांचा आवाज ऐकताच बाहेर वामकुक्षी करणारी मंडळी जागी झाली. तोंड वगैरे धुवून चहा प्यायला जमली. नलिनीने स्टीलच्या कपात प्रत्येकासाठी चहा ओतला आणि एक-एक कप प्रत्येकाच्या हातात दिला. एक कप नेऊन आत सासुबाईंना दिला. चहा पिता पिता वसंता मोठ्या भावास म्हणजेच मोहनला विचारु लागला.
‘‘दादा ! मग विवेक केव्हा चललो अमेरिकेक ?’’
‘‘बहुतेक पुढच्या महिन्यात. काय आसता अमेरिकेतल्या विद्यापीठाकडून निश्चित अॅडमिशनचा कळला की मग तिकिटासाठी धडपड करुक व्हयी.’’
‘‘मग विवेक आता मोठ्या कॉलेजमधून इंजिनिअर झालो, मग पुढचा शिक्षण आपल्या देशात मिळणा नाय काय ?’’
‘‘काय आसता, अमेरिकन विद्यापीठांका जगात मोठो मान आसता. तिकडे अॅडमिशन मिळणा कठीण आणि खर्च भरपूर. पण एकदा का तो एमएस झालो की मग खोर्यांनी पैसे कमवतलो.’’
‘‘पण खर्चपण खूप येता ना रे ?’’
मध्येच आशा बोलली – ‘‘हो येणारच, शिक्षण आहे ना स्टॅण्डर्ड, मग खर्च करायलाच हवा आणि आम्ही कर्ज घेतलयं बँकेकडून. त्यात इकडे तातडीने याव लागलं तो खर्च वाढला नाहीतर आम्हाला एवढ्यात गावी यायचं नव्हत. खर्च खूप होतो.’’ आशा बडबडत सुटली.
आत नलिनी नारळाच्या झावळ्या पेटवून काजू भाजताना हे सर्व ऐकत होती. मोहनरावांची बायको आशा आतमध्ये बॅग भरायला गेली. एवढ्यात दारात मारुती कार येऊन थांबली. गाडीतून कोण येतय म्हणून वसंता आणि त्याचा मुलगा शंतनु खळ्यात आले. गाडीतून कणकवलीचे वकिल नाडकर्णी आणि त्यांचा ड्रायव्हर हातात बॅग घेऊन उतरले. अचानक एवढे मोठे कणकवलीचे वकिल कसे काय ? अशा आश्चर्यात असताना मोहनरावांनी वकिलांना खुर्ची दाखवली. समोरच्या बाकावर मोहनराव बसले. बाजूला येऊन वसंता बसला. आत बॅग भरायला गेलेली आशा मोहन वसंताची लग्न झालेली बहिण यशोदा उंबर्यावर येऊन उभ्या राहिल्या. आत चहाची भांडी धुणारी वसंताची बायको नलिनी वाणशीतून वकिलांकडे पाहू लागली. वसंताचा बारावीतील मुलगा शंतनु तो पण आईच्या बाजूला येऊन उभा राहिला.
नाकडर्णी वकिलांनी सर्वांकडे एकदा नजर टाकली आणि ते बोलू लागले.
‘‘मंडळी, मला तुम्ही ओळखत असालच. मी अॅड. ज्ञानेश नाडकर्णी, कणकवलीत गेली पंचवीस वर्षे वकिली करतो. आता आज अचानक मी तुमच्याकडे का आलो याचा आश्चर्य वाटले असेल. पण त्याचे कारण वैâ. केशवराव मुंज म्हणजेच या घरचे कर्तेपुरुष हे चार वर्षापूर्वी कणकवलीत माझ्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांना त्यांची या गावात असलेल्या मालमत्तेचे मृत्युपत्र करायचे होते. त्यांच्या इच्छेन्ाुसार मी रजिस्ट्रारकडे जाऊन त्यांचे मृत्युपत्र रजिस्टर्ड केले. केशवराव मुंज यांचे निधन होऊन आज तेरा दिवस झाले. त्यामुळे त्यांचे हे मृत्युपत्र मी तुमच्या समोर ठेवतो. सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. मोहनला किंवा वसंताला आपल्या वडिलांनी मृत्युपत्र केल्याचे माहित नव्हते. असे मृत्युपत्र का केले असेल याचा प्रत्येकजन विचार करत होता.
तेवढ्यात वकिल साहेब पुढे म्हणाले – ‘‘केशवराव मुंज यांच्या इच्छेनुसार हे त्यांचे राहते घर त्यांचे दोन मुलगे मोहन आणि वसंत यांच्या नावावर केले आहे. आणि केशवराव मुंज यांच्या नावावर असलेली या गावातील ३२ गुंठे जमिन त्यावरील २६ आंब्याची कलमे, २० काजूची झाडे आणि १० गुंठे भातशेती जमिन फक्त वसंत केशव मुंज याच्याकरिता ठेवली आहे. तसेच या दोघांनी आपली लग्न केलेली बहिण सौ. यशोदा हिचे माहेरपण करावे अशी सूचना केली आहे. बाकी केशवरावांकडे सोने किंवा बँकेत पैसे वगैरे काहीच नाही. एवढेच मला सांगायचे होते. आता हे मृत्युपत्र महसूल विभागाकडे देऊन त्याप्रमाणे नावे लावून घेणे. नाडकर्णी वकिल निघण्याच्या तयारीत असताना संतापलेला मोहनराव वकिलांना म्हणाला – ‘‘नाडकर्णी साहेब मृत्युपत्रासाठी माझे वडील एकटे आले होते की हा वसंता आला होता ? कारण वडीलांनी माझ्यासाठी काहीच जमिन ठेवली नाही याचे मला आश्चर्य वाटते.’’
‘‘मोहनराव माझ्या आठवणीनुसार मृत्युपत्र करण्यासाठी एकटे तुमचे वडीलच आले होते.’’
‘‘वकिल साहेब निश्चित आठवा हा वसंता त्यांना घेऊन आला असणार. नाहीतर माझ्यावर असा अन्याय करणार नाहीत ते.’’ मोहनराव चिडून बोलत होता.
‘‘नाही मोहनराव, ते एकटेच आले होते आणि आपल्या हयातीत आपण केलेले मृत्युपत्र तिनही मुलांना कळता कामा नये अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार आजच आपणासमोर मी हे उघड करतो आहे.’’
मोहनराव आणि त्याची पत्नी आशा भयंकर संतापली होती. आशा आपल्या नवर्याला एकाबाजूला बोलावून काही सांगत होती. वसंता मान खाली घालून ऐकत होता. आत वसंताची बायको नलिनी आणि शंतनु काकांचा चढलेला आवाज ऐकून कावरेबावरे झाले होते. नाडकर्णी वकिल गाडीत बसून निघून गेले.
मोहनराव वसंताकडे पाहून कडाडले.
‘‘तू जाणूनबुजून हे केलस. मी बाबांचा मोठा मुलगा असताना मला जमिनीतील एक इंच जमिन दिली नाही. सगळी जमिन तुझ्या नावावर. एवढा कारस्थानी असशील असे वाटले नव्हते.’’ आशा आता चिडून बोलू लागली.
‘‘खाली मुंडी पाताळ धुंडी, आम्ही आलो की दादा दादा म्हणत मागे येतो. मग दादाला साफ फसवलं कसं?”
वसंता घाबरुन म्हणाला,
‘‘दादा, खराच माका काय म्हायती नाय रे ! बाबांनी माका काय एक सांगूक नाय, नायतर मी असा करुक दिलय नसतयं, व्हया तर आईक विचार.’’