श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

क्वचित कधीतरी घडतं असं. सहज चालता चालता अचानक ठेच लागावी ना तसं. आणि अशा क्वचित घडणाऱ्या घटनेच्या पोटात दबून राहिलेला असतो उध्वस्त करु पाहणारा भविष्यकाळ. ठेच लागलेल्याचाच नव्हे तर त्याच्याशी संबंधित सर्वांचाच! त्याचीच ही कथा!!

यावेळी रविवारला जोडून सलग दोन दिवस सुट्ट्या आल्या. त्यामुळे तीन पूर्ण रिकामे दिवस म्हणजे सर्व नोकरदारांसाठी मोठी पर्वणीच होती.या तीन दिवसात ब्रॅंच मधील सर्वांनी मिळून कुठेतरी बाहेरगावी ट्रीपला जायचं ठरत होतं. ब्रॅंच-मॅनेजर रजेवर असल्याने बँकेत कामाचं दडपण अविनाशवरच होतं. पण तरीही कामं झटपट आवरुन जायची त्याची तयारी होती. मात्र घरी अश्विनीनेच त्याचा हा प्रस्ताव धुडकावूनच लावला.

“आई-अण्णांना असं घरी ठेवून आपण दोघांनीच उठून जाणं बरं दिसेल का हो? जोडून सुट्ट्या काय पुन्हा कधीतरी येतील. या तीन दिवसात हवं तर आपण घरीच काहीतरी प्रोग्राम ठरवूया” तिने बजावून सांगितलं होतं.

आई-अण्णा कांही दिवस आराम करायला म्हणून आले होते. ते खरंतर त्याचे आई-वडील. त्याच्या लहानपणापासून तो म्हणेल तसं ते वागत आलेले असल्यामुळे हा त्यांना नेहमीच गृहीत धरूनच चालायचा. पण त्यामुळेच कदाचित आई आणि आण्णांच्या बाबतीत अश्विनी अशी विचारपूर्वक वागायची. अश्विनीचं रास्त म्हणणं झिडकारून स्वतःचा हट्ट हवा तसा रेटण्याइतका  अविनाश निगरगट्ट नव्हता.

अविनाश पिकनिकला येणार नाही म्हणून मग सगळ्यांच्याच तो बेत बारगळला. मग शनिवारी रात्री ड्रिंक पार्टी तरी करायचीच अशी ब्रॅंचमधे टूम निघाली. याला ‘नाही’ म्हणता येईना. घरी कांही सांगायचं म्हटलं तर अश्विनी विरोध करणार हे उघडच होतं. शिवाय पार्टी कां आणि कसली याबद्दल आण्णांनी शंभर प्रश्न विचारले असते ते वेगळेच. यातून सरळ सोपा मार्ग म्हणून बँकेतल्या जास्तीच्या कामांचं खोटं कारण सांगून त्यामागे लपणं अविनाशला जास्त सोयीस्कर वाटलं.

त्या दिवशी शनिवारी बाकीचे सगळे स्टाफ मेंबर्स संध्याकाळी पार्टीसाठी एकत्र यायची गडबड म्हणून आपापलं काम आवरून निघून गेले. पण मॅनेजर रजेवर असल्याने अविनाशला  जबाबदारीची सगळी कामं आवरल्याशिवाय निघणं शक्यच नव्हतं. म्हणूनच शनिवारचं कामकाज अर्ध्या दिवसाचं असूनही संध्याकाळ कलत आली तरी हा अजून कामातच. घरी जायची तशी गडबड नव्हती कारण घरी काही सांगायचं नसल्याने परस्परच पार्टीला जायचं होतं.पण तरीही कामं आवरायला अपेक्षेपेक्षा तसा उशीरच झाला होता.आणि.. तेवढ्यात…अगदी अचानक..ते दोघे धावत,धापा टाकत आत घुसले. नितीन पटेल आणि त्याची बायको. या दोघांना अशावेळी कांही काम घेऊन बॅंकेत आलेलं पाहून अविनाश मनातून उखडलाच. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने धुडकावूनच लावलं असतं. पण नितीनसारख्या महत्त्वपूर्ण ग्राहकाला ‘नाही’ म्हणणं शक्यच नव्हतं आणि रास्तही.ते दोघे मोठ्या आशेने आले होते.

नितीनची बायको अवघडलेली होती. त्या धावपळीने ती घामेजलेली दिसली.त्याने अगत्याने दोघांना बसायला सांगितलं आणि थंड पाण्याचे दोन ग्लास त्यांच्यापुढे केले. तेवढ्यानेही ते सुखावले. थोडे विसावले.आणि मग त्यांनी असं घाईगडबडीने येण्याचं प्रयोजन सांगितलं. सोमवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि हा जोडून सुट्ट्यांच्या घोळ त्यांच्या उशिरा लक्षात आला होता. त्यांना लॉकरमधले त्यांचे सोन्याचे दागिने आज घरी न्यायचे होते.त्यासाठीच घाईघाईने ते बँकेत आले होते. बँक उघडी असायची शक्यता नव्हतीच त्यामुळेच अविनाशला इथे पाहून  ते दोघे निश्चिंत झाले होते.

राष्ट्रीयकृत बॅंकेसारख्या सेवाक्षेत्रात नेमक्या गडबडीच्या नको त्यावेळी नको असताना असे क्षण परीक्षा बघायला आल्यासारखे येतातच. ते नेमकेपणाने झेलणं हा अविनाशच्या स्कीलचा भाग होताच.काम करायचंच तर ते कपाळाला आठ्या घालून करण्यापेक्षा हसतमुखाने करावं याच विचाराने याने त्यांचं वरकरणी कां होईना पण हसतमुखाने स्वागत केलं होतं.. आणि ते पाहून त्यांचे श्रांत चेहरे समाधानाने फुलून गेले होते.

—————

थंडीच्या दिवसातला आजचा हा पाऊस तसा अनैसर्गिकच म्हणायचा. त्यामुळे रविवारची आजची सकाळ अंधारलेलीच आणि मलूल होती. अविनाश काल रात्री उशिरा घरी आला होता. कांहीच निरोप नसल्याने अश्विनी थोडी काळजीतच होती. आणि आई- आण्णाही रात्री उशीरापर्यंत कितीतरी वेळ वाट पहात बसून होते!

आपण उठलो की त्या दोघांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार या कल्पनेने जाग येऊनही अश्विनी पडून राहिली होती. गेल्या चार-सहा दिवसांपासून तिला खरंतर बरं वाटत नव्हतं. अस्वस्थपणाही होताच. आईंनी आडून आडून विचारून पाहिलं होतं पण अश्विनीने हसण्यावारी नेलं होतं. ‘अविनाश आज घरी आला की हे गोड गुपित आधी एकांतात त्याला सांगायचं आणि मगच आई आण्णांना’ असं तिने ठरवूनच ठेवलं होतं. आणि नेमकं कधी नव्हे ते तो न सांगतासवरता काल रात्री खूप उशिरा घरी आला होता. त्यामुळे ‘ते’ सांगणं राहूनच गेलं होतं.तो आला तेही परस्पर बाहेर जेवूनच. त्यामुळे काल वरवर थोडी शांत राहिली तरी अश्विनी मनातून त्याच्यावर नाराजच होती.

आण्णा दार उघडून फिरायला बाहेर पडल्याचं जाणवलं तशी अश्विनी उठली. तिची चाहूल लागताच तिचीच वाट पहात पडून असलेल्या आईंनीही मग अंथरूण सोडलं. उतारवयामुळे त्यांना तशी झोप कमीच. त्यात काल रात्री अवीची वाट पाहण्यात नको ते विचार मनात गर्दी करू लागलेले. त्यामुळे शांत झोप अशी नव्हतीच.

“अश्विनी, तू तोंड धुऊन घे. मी बघते चहाचं”

अश्विनीला खूप बरं वाटलं. आईंचे दिलासा देणारे हे चार शब्द तिचा उत्साह वाढवून गेले.

“अहो, चहाची तयारी करून ठेवलीय मी. आण्णा फिरून आले की लगेच टाकतेच चहा”

“काल रात्री किती वाजता आला गं अवी?”

“बारा वाजून गेले होते”

“सांगतेस काय? आता हे येतील तेव्हा हा विषय नको बाई. फट् म्हणता ब्रह्महत्या व्हायची”

“अहो,काहीतरीच काय?”

“हे बघ,आम्ही चार दिवस आलोय तसं सुखाने राहू दे बाई. एकदा का यांचं भांड्याला भांडं लागायला लागलं की मला चंबूगबाळं आवरायलाच लावतील हे.तुला माहित आहे ना त्या दोघांचं विळ्याभोपळ्याचं सख्य?”

“असू दे.तुम्ही विळा सांभाळा,मी भोपळा सांभाळते. काहीही भांडणं वगैरे होत नाहीत. तुम्ही भरपूर दिवस रहा हो मजेत. उगीच जायची कसली घाई?”

अश्विनीचे हे शब्द ऐकले आणि आईना अगदी भरून आलं.चार भावंडातला वाचलेला हा अविनाश एकटाच.म्हणून एकुलता एक.बाकी सगळी तोंड दाखवायला आल्यासारखी आली आणि गेली.नाही म्हणायला अविनाशच्या पाठीवरची मुलगी मात्र बोबडं बोलायला लागेपर्यंत छान होती. पुढे साध्या तापाचं निमित्त झालं आणि सगळ्यांच्या जीवाला चटका लावून तीही अचानक निघून गेली. अश्विनीचं आजचं बोलणं ऐकलं आणि अगदी अचानक,उत्कटतेने त्यांना तिचीच आठवण झाली. आज ती असती तर अशीच असती. हिच्याच वयाची. अशीच लाघवी आणि प्रेमळ!

आई विचारात गुंतून पडल्या आणि तेवढ्यात आण्णांची चाहूल लागली.

“झाला कां चहा?” त्यांनी खड्या आवाजात विचारलं.

चहाचा पहिला घोट घेताच आण्णा समाधानाने हसले.

“अश्विनी,चहा एकदम फर्मास झालाय गं. अगदी या तुझ्या सासूच्या हातच्या चहासारखा..’

“पुरे हं..”आई मनातून सुखावल्या होत्या पण वरकरणी म्हणाल्या.” पाहिलंस ना यांचं एका दगडात दोन पक्षी मारणं?”

“अगं चहा चांगला जमून आला तर त्याचं कौतुक नको कां करायला?”

“कौतुक का करताय ते मला ठाऊक आहे मला चांगलं. आणखी अर्धा कप चहा हवा असेल”

ऐकलं आणि अश्विनी चपापली. नेहमीसारखा त्यांच्यासाठी जास्तीचा चहा टाकायला ती आजच्या अस्वस्थ मनस्थितीत विसरूनच गेली होती. तिने तत्परतेने स्वतःसाठी ठेवलेल्या चहाचा कप आण्णांच्या पुढे सरकवला.

“आणि तुला..?”

“हा घ्या तुम्ही. हे उठले की मी त्यांच्याबरोबर करीन माझा.”

अविनाशचा विषय तिला खरं तर टाळायचा होता. पण अनवधानाने तिनेच तो असा काढला होता. ती थोडी धास्तावली.

“हे उठले की म्हणजे? अविनाश उठला नाहीय अजून?” अण्णांचा आवाज तिला चढल्यासारखा वाटला.

“अहो उठतील एवढ्यात. आज रविवार आहे ना हक्काचा?” वातावरणातला ताण कमी करण्यासाठी अश्विनी हसत म्हणाली.

“रविवार असला म्हणून काय झालं ? अगं साडेसात वाजून गेलेsत..” यावर तिला पटकन् काही बोलता येईना. ती कावरी बावरी होऊन गप्प बसली. मग आईच तिच्या मदतीला धावल्या.

“अहो उठू दे ना सावकाश. त्याच्यावरून तुमचं काही काम अडलंय कां?”

“तू त्याला लहानपणापासून लाडावून ठेवलायस आणि आता..”आण्णा संतापाने म्हणाले.

वातावरण गढूळ होत चाललेलं पाहून अश्विनी जागची उठलीच. ते पाहून अण्णा थोडे शांत झाले.

” थांब अश्विनी.आधी हा चहा घे आणि मग उठव त्याला.त्याचा करशील तेव्हा माझा अर्धा कप टाक हवंतर.”

मग तिला थांबावंच लागलं. तिने आढेवेढे न घेता मुकाट्याने तो चहा घेतला.

“हे बघ अश्विनी,अविनाश हुशार आहे. समंजस आहे. पण अतिशय घुमा आणि  एककल्ली आहे. त्याला बोलतं करणं प्रयत्न करूनही मला कधी जमलेलं नाही. तूच त्याला आता वेळोवेळी समजून घ्यायचंस. तो चुकतोय असं वाटेल तेव्हा आधार देऊन त्याला सावरायचंस..”  बोलता बोलता अण्णांचा आवाज त्यांच्याही नकळत भरून आला आणि ते बोलायचे थांबले.

क्रमश:

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments