मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुलु आणि नंदू … – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सुलु आणि नंदू … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(एवढ्यात नंदूची आई किचन मधून बाहेर आली.) –इथून पुढे –

आई -चलात का चलात… मला चालणार नाही, ती कुठल्या जातीची मुलगी आमच्या घरात राहू शकत नाही.

आजोबा – आम्ही कधी जातीचा विचार केला नाही, ज्याला गरज आहे त्याच्या शिक्षणासाठी मदत करणे हा आमचा खरा धर्म. वरच्या जातीचा खालच्या जातीचा उल्लेख करणे आमच्या घराण्याला शोभत नाही.

आई – पण माझ्यावर माझ्या माहेरी तसे संस्कार झाले त्याचे काय?

आजोबा चिडून म्हणाले ” अशा संस्कारामुळे समाजाचे आणि देशाचे नुकसान होते आहे ‘

असे मोठ्याने बोलून आजोबा घराबाहेर पडले.

नंदूच्या बाबाच्या बँकेत शिपाई होता, त्याची बायको त्याचा डबा घेऊन बँकेत द्यायची.  नंदूच्या बाबानी तिला बोलावून घेतले आणि सुलुची राहायची व्यवस्था तिच्याकडे केली. त्यामुळे सुरू चा रोज जाण्या-येण्याचा त्रास वाचला आणि ती शहरातच राहू लागली.

नंदू अकरावीच्या क्लासला जात होती, क्लासच्या शिक्षकांचे नोट्स  सुलु ला दाखवत होती, अकरावी बारावीत सुद्धा सुलु वर्गात पहिली आली. त्या काळात बारावीनंतर मेडिकलला प्रवेश मिळत होते.

  नंदूचे आजोबा पुन्हा तिच्या मागे राहिले, आपल्या सुनेच्या रोशाकडे दुर्लक्ष करून सुलु ला मेडिकल ला पाठवायचा चन्ग त्यांनी बांधला, पैशाची गरज होती.

एक दिवस सकाळीच ते त्यांच्या विभागात निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याच्या घरी गेले, एवढी प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या घरी आले म्हणून तो सदस्य गडबडला.

नंदूचे आजोबा – मी तुमच्यकडे एका मुलीच्या शिक्षणा साठी मदत मागूक इलंय, माझ्या नातीसाठी न्हय, आमच्या गावाततली सुभाष मेस्त्रीच्या मुलीक मेडिकल कडे ऍडमिशन मिळतली, लहानपणा पासून हुशार मुलगी, आता पर्यत चो खर्च कसो तरी केलो पण हो मोठो खर्च आसा, चार वर्षाची फी आणि हॉस्टेल आणि इतर खर्च, एक गरीब कुटुंबातील मुलगी डॉक्टर झाली तर समाजाचो फायदो आसा, तुमी त्या मुलींसाठी काय मदत करशात?

तो जिल्हा परिषद सदस्य आश्चर्यचकित झाला, आतापर्यंत येणारे,आपल्या मुलासाठी किंवा नातू नातवा साठी मदत मागायचे, पण हा माणूस एका गरीब मुलींसाठी सकाळी सकाळी घरी येतो?

त्यांनी आजोबांना आमदारांना सांगून तिचा सर्व खर्च उचलण्याचा शब्द दिला, आमदार पण मुद्दाम येऊन भेटले, सुलु चें कौतुक केले आणि नंदुच्या आजोबांना नमस्कार करून गेले.

सुलुची ऍडमिशन पक्की झाली आणि अख्ख्या गावात आनंद झाला.आमदारांनी आपला शब्द पाळला, दर वर्षी नियमित पैसे पाठविले. सुलु MBBS झाली, मग एक वर्ष एंटर्नल कोल्हापूर मध्ये करून पोस्ट graduation चा अभ्यास करू लागली.

बारावी काठावर पास झालेल्या नंदूने बीएससी ला ऍडमिशन घेतले, पण पहिल्याच वर्षाला ती दोनदा नापास झाली, आणि शेवटी तिचे शिक्षण थांबले, आपल्या मुलीसाठी नंदूच्या आईने खूप प्रयत्न केले पण नंदूला अभ्यासात गती नव्हती हे खरे, नंदू ने  डीएड ला ऍडमिशन घेतली, डीएड होऊन एक वर्ष घरी बसल्यावर ती प्राथमिक शिक्षिकेच्या नोकरीला लागली. आणखी एक वर्षांनी तिचे एका हायस्कूल शिक्षकाबरोबर लग्न झाले.

त्या दरम्यानच नंदूच्या आजोबांचे निधन झाले. नंदूची आजी गावी एकटी राहू लागली.

दीड वर्षानंतर नंदूची प्रसूती जवळ आली, शहरातल्या एका डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये तिचे नाव घातले होते. त्या काळात छोट्या शहरात सोनोग्राफी वगैरे यंत्रे आली नव्हती.

प्रसूती वेदना सुरू झाल्याबरोबर नंदूला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, डॉक्टरनी तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आले मुल आडवे आले आहे, सर्जरी करावी लागेल, एकतर डॉक्टर बाहेरून मागवावा लागेल किंवा किंवा जिल्हा रुग्णालयात नवीन लेडी डॉक्टर आली आहे तिच्याकडे तातडीने न्यावे लागेल. नंदूच्या बाबांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. ॲम्बुलन्स वीस किलोमीटर वरील जिल्हा रुग्णालयात पोहोचली, तेव्हा नवीन लेडी डॉक्टर जवळ भरपूर पेशंट जमले होते. सिरीयस पेशंट आल्यामुळे डॉक्टरने आपली ओपीडी थांबवून पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेण्यास सांगितले. त्या छोट्या हॉस्पिटलमध्ये गुंगीचे औषध पण स्वतः डॉक्टरच देणार होत्या. गुंगी देण्याची तयारी करण्यासाठी पेशंटच्या बेड जवळ आल्या, तर डॉक्टरना बेडवर दिसली त्यांची प्रिय मैत्रीण नंदू.

तशाच डॉक्टर सुलभा मिस्त्री बाहेर आल्या, बाहेर काळजीत बसलेल्या नंदूच्या आई आणि बाबांना त्यांनी वाकून नमस्कार केला. प्रत्यक्ष सुलभाला डॉक्टरच्या वेशात समोर पाहून   आश्चर्य वाटले व आनंद झाला. काही काळजी करू नका मी सर्व काही योग्य करते असं सांगून डॉक्टर मिस्त्री आत गेल्या.

तीन तासानंतर प्रसुती उत्तम पार पडून मुलगा झाला. नंदूच्या आई-बाबांना आणि नातेवाईकांना ही बातमी कळली. ते दोघे आणि नंदूचा नवरा डॉक्टर मिस्त्री ला भेटायला आले. डॉक्टरांनी त्यांना प्रसूती अवघड होती पण मी उत्तम केली काही काळजी करू नये असे सांगून निर्धास्त केले.

आणखी दोन तासांनी नंदू शुद्धीवर आली, तिच्या शेजारी तिची प्रिय मैत्रीण सुलु उभी होती, नंदू ने सुरु चा हात घट्ट पकडला.

“सुले, तुझ्यामुळे माझा पुनःर्जनम झाला ग.’.

“तसा काय नसता गो नंदू, तूझ्या माझ्या आजोबानी जन्म घेतलोवा तूझ्या पोटी, तेंचो जन्म होऊक माझो हात लागलो इतकोच ‘.

हातात हात घेऊन सुलु आणि नंदू हसू लागल्या, शाळा सुटल्यावर घरी जाताना हसायच्या तशाच, तीच मैत्री अजून तशीच,.

नंदूची आई भरलेल्या डोळ्यांनी त्यांची मैत्री अनुभवत होती.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुलु आणि नंदू … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सुलु आणि नंदू … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

इयत्ता दुसरीतील सुलु आणि नंदू घरी निघाल्या. दोघींच्या हातात परीक्षेचे रिझल्ट होते, सुलु वर्गात पहिली आली होती  आणि नंदू जेमतेम पास झाली होती. पण सुलु आणि नंदू यांना त्याची जाणीव नव्हती. ओढ्यातील पाण्यात खेळत, एकमेकांवर पाणी उडवत त्या घरी निघाल्या.

ओढा संपल्या संपल्या मेस्त्रीची आळी लागायची, सर्व मेस्त्रीची घर, घराच्या छप्पर दुरुस्तीचे काम करणारे मेस्त्री. सुलु मातीच्या, जुन्या घरात शिरली तेंव्हा आई ओढ्यावर कपडे धुवायला गेली होती, मोठया दोन बहिणी जंगलात लाकडे गोळा करायला गेल्या होत्या, सुलु च्या आईने चुलीवर पेज शिजवून ठेवली होती, त्या मडक्यातील पेज भांड्यात ओतून सुलु पेज जेऊ लागली.

नंदूची आई नंदूची वाटच बघत होती, नंदू गावातील सुस्थितीतील मुलगी, तिचे बाबा बँकेत तालुक्याच्या गावी नोकरीला होते, आजोबा प्रतिष्ठित माणूस, गोरगरिबांच्या उपयोगी पडणारे, गरिबांचा कनवाळा असलेले. नंदूची आई रत्नागिरीतील शहरात राहिलेली, तिचे माहेरचे सगळे शिकलेले.

नंदू ने दुसरीचे मार्कलिस्ट आईच्या हातात दिले, नंदूची आई चिडली, तिने नंदूच्या पाठीत दोन धपाटे घातले. नंदूच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे आजी आणि आजोबा धावून आले.

आजोबा – अग का मारतेस तिला?

आई – मार्क बघा तिचे, अशी बशी पास झाली आहे, एवढा मी अभ्यास घेते तरी हिच्या अभ्यासात सुधारणा नाही, माझ्या भावाची बहिणीची मुले किती हुशार, पण हिचे या खेड्यात राहून नुकसान होते आहे.

आजोबा –मग ती मेस्त्रीची सुलु कसे मार्क मिळविते? तिचा वर्गात पहिला नंबर आला आहे.

आई – मला माझ्या मुलीची काळजी आहे, या खेड्यात राहून तिचे नुकसान होणार, नाहीतरी तिच्या बाबांची नोकरी तालुक्याच्या गावीच आहे, तेव्हा यांना सांगणार आपण आता तालुक्याच्या गावी बिऱ्हाड करू, त्याशिवाय नंदूच्या अभ्यासात प्रगती होणार नाही.”

नंदूची आजी काहीतरी सांगायला जात होती, पण आजोबांनी हात दाखवून तिला गप्प केले, नाहीतरी हल्ली नंदूची आई सतत आम्ही तालुक्याच्या गावी बिऱ्हाड करणाऱ्याचे तुंतून वाजवत होती.

संध्याकाळी नंदूचे बाबा आल्यानंतर नंदूच्या आईने नंदूचे मार्क दाखवले, आणि आता शहरात जाण्याशिवाय मार्ग नाही तेव्हा शहरात बिऱ्हाड करायचे आहे असे निक्षुन सांगितले. नंदूच्या आईला काहीतरी समजावत होते, पण आजोबा म्हणाले” मिलिंद, नंदुच्या आईचे जर असे मत असेल की शहरात गेल्यावर तिची प्रगती होईल, तर होऊ दे तिच्या मनासारखे.

अशा रीतीने जून महिन्यात नंदूच्या बाबांनी शहरात बिऱ्हाड केले. नंदू शहरात जाताना सुलू च्या घरी जाऊन सुरूला मिठी मारून खूप रडली. सुलु ने तिची समजूत घातली, नंदू म्हणाली अधून मधून मी घरी येतच असणार तेव्हा आपण भेटू.

शहरात आल्यावर नंदूच्या आईने नंदूचे नाव कलासात घातले तसेच चांगले शाळेमध्ये नाव घातले, पण नंदूची तिसरीतही प्रगती दिसेना, चौथी स्कॉलरशिप साठी नंदूच्या आईने नंदूसाठी खूप प्रयत्न केले, पण चौथी स्कॉलरशिप नंदूला खूप कमी मार्क मिळाले, खेडेगावात राहून सुलु ने स्कॉलरशिप मिळवली.

नंदूच्या आजोबांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून सुलु चा सत्कार केला, नंदूच्या आईला आजोबांचा फार राग आला. तिने रागाने नंदूच्या आजोबांनाविचारले

नंदूची आई – तुमच्या नातीला स्कॉलरशिप मध्ये एवढे कमी मार्क असताना, तुम्ही त्या गावातल्या सुलु चा सत्कार का घडवून आणलात? तुम्हाला तुमच्या नातीचें मार्क बघून वाईट नाही का वाटले?

आजोबा – माझ्या नातीला जर चांगले मार्क मिळाले असते तर मला त्याचा खूप आनंद झाला असता, पण तिला ते मिळाले नाहीत,  खेडेगावात राहून कसलेही क्लास न करता सुलु ने स्कॉलरशिप मिळवली याचा पण मला खूप आनंद आहे. यापुढे पण मी तिच्या मागे असणार. तिला चांगले शिक्षण मिळावे म्हणून मी तिला प्रोत्साहन देत राहणार.

नंदूच्या आईचा जळफळात झाला, तिने आपल्या नवऱ्याला पण सांगण्याचा प्रयत्न केला, पण नंदूच्या बाबांनी पण तिच्याकडे दुर्लक्ष केले.

दहावी परीक्षेतही नंदू कशीबशी पास झाली उलट मेस्त्रीची सुलु जिल्ह्यात दुसरी आली, परत एकदा नंदूचे आजोबा तिच्या पाठी उभे राहिले, सुलुच्या आई बाबांना पटवून सुलूला तालुक्याच्या गावी अकरावी बारावी साठी पाठविले.

दहावी जेमतेम पास झालेली नंदू पण त्याच शाळेमध्ये अकरावीसाठी आली, पुन्हा नंदू आणि सुलु एका बेंचवर बसू लागल्या, सुलु गावातून st ने जाऊ लागली, पण गावातून फक्त जाणाऱ्या दोन एसटी बसेस होत्या, त्यामुळे सुलूची पंचायत होऊ लागली, संपले की दुपारी चार वाजेपर्यंत गावी जाण्यासाठी गाडी नव्हती. त्यामुळे उपाशी सुलु एसटी स्टँडवर एसटी  ची वाट पहात बसू लागली.

नंदूच्या आजोबांच्या हे लक्षात आले, ते आपल्या मुलाच्या बिऱ्हाडी आले आणि आपल्या मुलाला म्हणाले

आजोबा –अरे मिलिंद, त्या मेस्त्रीच्या सुलु चो वेळ st ची वाट बघण्यात जाता, पाच नंतर ता दमान घरात पोचता, अशाने तेचो अभ्यास कसो व्हतलो, तसा नंदू आणि सुलु लहानपणापासून मैत्रिणी, आता एका वर्गात असत एका बेंचवर बसतात,तेव्हा सुलु हय तुमच्या कडे रवान शाळेत गेला तर…

मिलिंदप्रदीप केळूसकर – हो चलत ना बाबा..

एवढ्यात नंदूची आई किचन मधून बाहेर आली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुखाचा पासवर्ड – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ सुखाचा पासवर्ड – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे

(अशी मी पुस्तकांशी मैत्री असलेली , अगदी टिपीकल भाषेत ‘पुस्तकी किडा’. कोणी काहीही म्हणू दे, मी तर सुखी आहे ना.) — इथून पुढे —

माझ्याही आयुष्यात तो दिवस आला, ज्या घरात मी जन्मले, लहानाची मोठी झाले, त्याच घराची मी पाहुणी होणार होते, माझं घर आता माहेरात परिवर्तित होणार होतं. मी खूप हळवी झाले होते.

“जगाची रितच आहे ही पोरी. एक ना एक दिवस प्रत्येक मुलीला आई बाबांचं घर सोडावं लागतं कारण हे रोपटं सासरी  रूजणार असतं, फुलणार असतं. ही जगरहाटी टाळून कसं चालेल.”

“पण आई, संपूर्ण वेगळं कुटुंब, वेगळी माणसं, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, वेगळं वातावरण, कशी सामावली जाणार मी त्यांच्यात, कशी रूजणार नात्यांच्या विविध बंधनात?”

“होय बेटा, बंधनं तर भरपूर असतात. सासू सासर्‍यांचा सन्मान, नणंदेचा तोरा, जावा जावातील हेवेदावे. पण बाळा चिडायचं नाही. शांत राहायचं. वेळप्रसंगी कुटुंबाच्या सुखापुढे आपल्या इच्छांना मुरडही घालावी लागते, आणि यातच गृहिणीधर्म असतो.” 

“पण आई, यासाठी काय मी माझी सगळी ओळखंच मिटवायची काय ?आणि माझ्या ज्ञानाचं काय ? तूच म्हणत होतीस ना ज्ञानाने माणूस मोठा होतो. आता हे ज्ञान काय असंच वाया जाऊ द्यायचं, तुझ्यासारखं स्वयंपाक घरातच राहायचं.” 

“नाही गं बाई, तुझं म्हणणं तू तुझ्या कुटुंबाला समजावून सांगू शकतेस. तुझा होणारा जीवनसाथी ही सुशिक्षित आहे. त्याला पटेल तुझं म्हणणं कि भरारी घेणारी पक्षीण घरटं मात्र विसरत नाही. तुझ्या कला गुणांचा, तुझ्या शिक्षणाचा आदरच होईल तेथे ही. फक्त ते व्यवस्थित सांगता मात्र आलं पाहिजे. काही समस्या असल्यास त्यातून मार्ग ही काढता आला पाहिजे. हे जमलं कि सुखाचा पासवर्ड गवसला असं समज.”

आज मी एक यशस्वी बँक अधिकारी आहे, दोन मुलांची आदर्श माता आहे, सासू सासर्‍यांची मी जणू मुलगीच आहे आणि अरविंदची जीवलग सहचारिणी आहे. हे सगळं मी जमवू शकले सुखाच्या पासवर्डने. तो कोठे, कसा वापरायचा हे आईने दिलेल्या सखोल ज्ञानाने उमजलं आहे.

“ए सुनीता तू एवढी सुखी कशी गं? आम्हांलाही दे ना काही टिप्स. पण तू सुखी आहेस कारण तू स्वावलंबी आहेस. मी पण तुझ्यासारखं शिक्षण घेतलं असतं तर कोठे ना कोठे नोकरी मिळाली असती. पण नशिबातचं नव्हतं गं माझ्या.” 

“रमा, पहिल्यांदा तू ही रडकथा थांबव. शिक्षण नाही म्हणून तू काही करू शकणार नाहीस असंच नाही काही. मुलांचे शिकवणी वर्ग चालव. तुझ्या पुढच्या हाॅलमध्येच तुला ते घेता येतील. तू चांगली सुगरण आहेस, काॅलेजच्या मुलांचे डबे करू शकतेस. स्वावलंबी व्हायला अनेक मार्ग आहेत गं. पण ते शोधायला हवे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुख हे मानण्यात असतं. अति महत्वाकांक्षा, अति लोभ, अति अपेक्षा केव्हाही घातकच, कारण त्यांना कुठे अंतच नसतो. म्हणूनच कुठे थांबायचं हे ठरवता आलं पाहिजे. मग सुखाचा धागा आपसूकच हाती येतो.”

माझ्या फोनची रिंग वाजली. कामगार कल्याण मंडळातून फोन होता. मॅडम, परवा दहावी बारावीतील उत्तीर्ण कामगार पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. आपण प्रमुख पाहुणे म्हणून तर यावेच पण मुलांना काही प्रेरक मार्गदर्शनही करावे अशी आमची इच्छा आहे. आपण येणार ना मॅडम?” 

“होय सर, येईन मी.” 

“ठीक आहे मॅडम, धन्यवाद. मी Whatsapp वर निमंत्रण पाठवले आहेच. सायंकाळपर्यंत Hard copy ही मिळून जाईल.”

दहावीनंतर काय ? बारावी नंतर काय ? विविध शैक्षणिक मार्गदर्शनानंतर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काय करावे याकडे मी वळले.

“मुलांनो, जीवनवाट वाटते तितकी सोपी नाही. आयुष्यात अनेक समर प्रसंग येतात. सगळं संपलं असं वाटायला लागतं. चोहीकडे अंधारच वाटतो. पण प्रकाशकिरण आम्हांलाच शोधायचा असतो. त्यातूनच वाट शोधत मार्गक्रमणा करावी लागते. बाळांनो मी आज काही सुखाचे पासवर्ड देणार आहे.

आता तुम्ही म्हणाल सुखाचा पासवर्ड म्हणजे काय ? तर जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टी कोनातून पाहाणे. ही सकारात्मकताच तुम्हांला नवऊर्जा देईल, प्रेरणा देईल. कशी ती पाहुयात.    

1) कोणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा.

2) स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा.

3) खोटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची परिक्षा समजा.

4) तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा.

5) विनाकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा.

6) उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा.

7) तुमच्या जीवनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा.

बाळांनो हा सुखाचा कानमंत्रच माणसाला यशस्वी करतो. मी फार काय सांगणार ? तुम्ही ही सुजाण होणारच आहात, देशाचे होणारे आधारस्तंभ आहात, देशाची भावी पिढी आहात.

यशस्वी व्हा हा आशिर्वाद देते. All the best.”

“मॅडम खूपच छान, मार्गदर्शन तर मुलांसाठी होतं, पण आम्हांलाही त्यातून खूप काही शिकायला मिळालं. मानलं बुवा तुम्हाला.” कामगार कल्याण अधिकारी प्रशांत कदम चहा बिस्कीटांचा आस्वाद घेता घेता बोलत होते.

“मी फार काय सांगितलं असं नाही प्रशांतजी, प्रत्येकात हे गुण असतातच.”

“असतात ना मॅडम, पण त्यांचा परिचय, त्यांची ओळख ही हवीच ना, शिवाय त्यावर अंमलही करता यायला हवा. सगळ्यांना तो जमेलच असं नाही.”

“सुधीर आपलं अभिप्राय नोटबुक आणा. मॅडम अभिप्राय लिहितील आणि मानधनाचं पाकिटही आणा.”

एक अनामिक समाधान घेऊन मी कामगार कल्याण मंडळातून बाहेर पडले .

— समाप्त —

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुखाचा पासवर्ड – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ सुखाचा पासवर्ड – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

नेहमी प्रमाणे रविवारच्या सुटीनंतरची बँकेत गर्दी. ‘मॅडम गर्दी कंट्रोल करा’ माझ्या वरिष्ठांची सूचना. “येस सर, नरेश ग्राहकांना व्यवस्थित रांगेत यायला सांग. आपला परीसर लहान असल्याने दहा/दहा च्या संख्येने दरवाज्याच्या आत घे. बाकींना बाहेरच रांगेत राहायला सांग.”

मी कॅशियर केबिनमध्ये डोकावत कॅशियर अशोकला विचारले “मिलिंदला पाठवू का मदतीला ?”

“पाठवा मॅडम.”

“आणि छोट्या डिपाॅझीट बँक ग्राहक मित्र केंद्रावर वर्ग करा‌.” 

“होय, काही ग्राहक कॅश डिपाॅझीट मशिनचीही मदत घेत आहेत.”

एक ग्राहक तक्रार घेऊन आले, “मॅडम एक तास झाला कॅश डिपाॅझीट करून, अजून अकोल्याला पार्टीच्या खात्यात जमा झाले नाही.”

“अहो, होइल जमा. नेटवर्क कनेक्टीव्हीटी नाही आहे.” 

“कनेक्टीव्हीटी नाही किती सहजतेने म्हणता हो तुम्ही. तिकडे आमचा पेशंट तळमळतोय. ऑपरेशन करायचंय. पैसे जमा झाल्याशिवाय होणार नाही ते.” 

मी आमच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क केला. संपूर्ण सर्व्हर डाऊन होता. प्रधान कार्यालयाशीही संपर्क झाला. तासभर तरी लागणार होता. “सर, तासाभराने कनेक्टीव्हिटी येईल.”

“एक तास ? मॅडम अहो, जीवन मरणाचा प्रश्न आहे. एका एका सेकंदाचा हिशोब आहे आणि तुम्ही एक तास म्हणतात? काय होईल पेशंटची हालत, काही माणुसकी आहे कि नाही तुमच्याजवळ ?” 

“शांत व्हा सर,” मी त्यांना पिण्यास पाणी दिलं . “मी करते काहीतरी.” मी अकोला शाखेला फोन केला. शाखा व्यवस्थापकांना सगळी परिस्थिती सांगितली, ग्राहकांची एमरजन्सी सांगून माझ्या रिस्कवर पैसे द्यायला सांगितले. त्यांनी माझं नाव, GBPA नंबर घेतला व ग्राहकाला पैसे दिले. माझ्या समोर बसलेले ग्राहक मोहन वैद्य शांत झाले. 

“धन्यवाद मॅडम, आम्ही अगतिक होतो, म्हणून बोललो मी. माफ करा.” 

“ठीक आहे, तुमचं काम झालं ना, आनंद आहे मला.” 

मोहन वैद्य गेले तशी मी थोडंसं हुश्श् केलं. माझी सहकारी प्रणिता सगळं पहात होती. ती म्हणाली, “सुनीता, कनेक्टीव्हीटी नसणे यात आमचा काय दोष. येतात काही तांत्रिक अडचणी. ग्राहकसेवा काही वेळापुरती खंडित होते हे मान्य. पण त्यात आपली चूक नाही ना. आपण काही हातावर हात धरुन बसत नाही. follow up सुरूच असतो. तो ग्राहक इतकं बोलत होता, तरी तू शांत राहिलीस. कसं शक्य होतं तुला हे बाई.”

“प्रणिता, येतातच असे समर प्रसंग आयुष्यात. ATM चालू नाही, बोलवा टेक्निशियन, त्यांना ताबडतोब येता येत नाही, कारण त्यांनाही अनेक ठिकाणची कामं असतात. ग्राहक ऐकत नाहीत. त्यांना ताबडतोब सुविधा हवी. ही तर काही उदाहरणं झाली. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ग्राहक त्रास हे देतातच. पण मी ते दुर्लक्षित करुन त्यांचं काम करुन देते.”

“अग तेच तर म्हणतेय मी. तू इतकी मवाळ कशी ? तुला त्रास नाही होत या गोष्टींचा?”

“खरं सांगू प्रणिता, स्वतःला त्रास होऊ नये हाच माझा उद्देश असतो. कारण ‘तू तू मी मी’ करण्यात मनःशांती जाते. आपलंच बी. पी. वाढतं. मन अस्वस्थ होतं. बरं एवढंच नाही तर आपल्याला घरही सांभाळायचं आहे. कुटुंबाकडे लक्ष द्यायचं आहे. मग अशा गोष्टीत का आपली शक्ती खर्च करायची.

प्रणिता माझ्या कृतीने कुणाचं भलं होत असेल, चांगली सेवा मिळत असेल, पण यातून मला समाधान मिळतं, शांती मिळते, मी सुखी होते. बहुदा हाच माझा सुखाचा पासवर्ड असेल.”माझ्यापुढे दोन्ही हात जोडत प्रणिता बोलली, “धन्य आहेस गं बाई”.

प्रणिताने विषय छेडला आणि मी हळूहळू शिरले भूतकाळात.

“ए छकुली ऊठ गं, शाळेत जायचंय ना.”

मी अंथरूणात हातपाय हलवत, ‘आज नाही जात शाळेत’ सांगितलं.

“अगं, न जाऊन कसं चालेल. चांगलं शिक्षण घेशील तर जीवनात काही चांगलं करून दाखवशील. स्वतःच्या पायावर उभी राहशील. ज्ञानाने तुझ्या व्यक्तीमत्वात प्रगल्भता येईल. जगात जो ज्ञानी तो मोठा गणला जातो. तुला मोठं बनायचं आहे ना. मग तुला शाळेत जायला हवं. भरपूर शिकायला हवं. ऊठ बाळ, तुझ्या सुखी जीवनासाठीचा हा पासवर्ड समज आणि शाळेला जा.”

शाळेतही माझा पहिला नंबर कधी चुकला नाही याचे कारण मी वेळच्यावेळी अभ्यास करायचे, गृहपाठ करायचे, इतर माझ्या वर्गमैत्रिणी मात्र ‘तहान लागली की विहीर खोदायची’ या तत्वाने परीक्षा आली कि अभ्यासाला लागायच्या. मला विचारायच्या “सुनीता तुझ्या यशाचं रहस्य काय गं.”

मी त्यांना सांगायचे, “अगं, अगदी सोपं आहे ते, वेळच्यावेळी अभ्यास, हाच माझा यशाचा पासवर्ड, मग ऐनवेळी माझी धावपळ होत नाही कि रात्र /रात्र जागरणं करावी लागत नाहीत म्हणून कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येत नाही. म्हणून मी अगदी बिनधास्त असते.” 

“आम्हांलाही आत्मसात करावा लागेल ग हा सुखाचा पासवर्ड.”

अशी मी पुस्तकांशी मैत्री असलेली , अगदी टिपीकल भाषेत ‘पुस्तकी किडा’. कोणी काहीही म्हणू दे, मी तर सुखी आहे ना.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन अनुवादित कथा – १. त्या ग्रोसरी शॉपमध्ये – डॉ. हंसा दीप २. संस्कार – श्री सीताराम गुप्ता ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ दोन अनुवादित कथा – १. त्या ग्रोसरी शॉपमध्ये – डॉ. हंसा दीप २. संस्कार – श्री सीताराम गुप्ता ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

१. त्या ग्रोसरी शॉपमध्ये – डॉ. हंसा दीप 

त्या ग्रोसरी शॉपमध्ये पीटर नुकताच कामाला लागलाय. डेली नीड्स विभागाकडे लक्ष देण्याचे जबाबदारी त्याच्यावर देण्यात आलीय. मार्था रोज तिथे येते. सामान नीटपणे रचलेल्या शेल्फांमधून असलेल्या वाटेमधून ती जाते. तिथली प्रत्येक वस्तू हाताळते. उलटी-पालटी करून बघते. त्याची किंमत , त्याचा ब्रॅंड बघते. गेल्या आठवड्यातल्या किमती आणि या आठवड्यातल्या किंमती यात काय आणि किती फरक पडलाय, याचा शोध घेते. तासाभराने ती शॉपमधून बाहेर पडते.

मार्था करणार तरी काय बिचारी? ऐंशी वर्षाची मार्था घरी एकटीच असते. वेळ तरी कसा घालवणार? बाहेर थंडीचा कहर. भरभुरणारं बर्फ. त्यामुळे निसरडी झालेली वाट. पण व्यायाम नसेल, हता-पायांना चलन – वलन नसेल, तर झोप तरी अशी लागणार? त्यावर मार्थाने उपाय शोधून काढलाहे, या ग्रोसरी शॉपमध्ये रोज येऊन इथल्या वस्तू, फिरत फिरत बघून जायचा. इथे तासभर फिरताना तिचा व्यायाम होतो.

पीटरला मात्र पहिल्या दिवसापासूनच मार्था आवडली नाही. तिचे साधे खरबरीत, मळकट कपडे, विस्कटलेले केस, ठराविक वेळी येऊन वस्तू निरखून पहाणं, हाताळणं, तिथे घुटमळणं… त्याला काहीच आवडत नाही तिचं. रागच येतो. त्याला वाटते, ती चोर आहे. रोज चोरी करण्याच्या उद्देशानेच इथे येत असणार. हळू हळू त्याची खात्रीच झालीय याबद्दल. तो सतत तिच्यावर पाळत ठेवून आहे, पण ती अजून तरी कुठे सापडली नाही. आपण तिला पकडू शकलो नाही, हा आपला पराभव आहे, असा त्याला वाटतय. त्याच्या मनात कधीपासून एक विचार कुलबुलतोय. आज काही झालं, तरी तो तो उपाय अमलात आणणार आहे.

नेहमीप्रमाणे मार्था तासभर त्या शॉपमध्येफरून वस्तू हाताळून दोन-तीन वस्तू घेऊन, पेमेंट करण्यासाठी कौंटरजवळ गेली. घेतलेल्या वस्तूंचे पेमेंट केले आणि ती दुकानाबाहेर पडू लागली.

ती दाराशी पोचेपर्यंत पीटर तिथे उभा आहे. ‘मॅम, मला आपलं सामान आणि पावती दाखवा.’अतीव सभ्यतेने पीटर म्हणाला, ‘हे रूटीन चेक अप आहे.’ मार्थाने आपली पावती आणि सामानाची थैली पुढे केली. पीटरने सामान तपासले. त्यात बीन्सचे तीन डबे जास्त होते. त्याचं पेमेंट केलेलं नव्हतं. तो म्हणाला, ‘या तीन डब्यांचं पेमेंट केलेलं नाही.’

‘पण मी हे सामान मी घेतलेलच नाही. मी कधीच टीनमधले बीन्स कधीच खात  नाही.’

‘चोरी सापडली की प्रत्येक चोर असंच म्हणतो.’ रागारागाने डोळे वटारत तो मनाला. त्याने मॅनेजरला आणि मॅनेजरने पोलिसांना बोलावले.

दहा मिनिटात पोलिसांची गाडी त्या शॉपसमोर उभी राहिली. दोन पोलीस खाली उतरले. त्यांनी मॅनेजरची तक्रार ऐकून घेतली. मग कार्यालयातील सीसीटीव्ही.चे फूटेज तपासले. त्यात आक्षेपार्ह काहीच दिसले नाही. मॅनेजरचे आभार मानून आणि मारठला घेऊन पोलीस गाडी निघून गेली. पीटरचा भाव आता वाढला होता. त्याला आता तिच्यापासून मुक्ती मिळाली होती. मोठ्या खुशीत होता तो.

अर्ध्या तासाने पुन्हा पोलिसांची गाडी त्या शॉपसमोर उभी राहिली. दोन पोलीस खाली उतरले. मार्था मात्र गाडीत तशीच बसून राहिली होती. पोलीस मॅनेजरशी काही बोलले. मॅनेजर त्यांना आपल्या रूममध्ये घेऊन गेले. दहा मिनिटांनी ते तिघे बाहेर आले. मॅनेजरनी पीटरला हाक मारली आणि कामावरून ताबडतोब काढून टाकल्याचा निर्णय सांगितला.

‘ का पण? चोरी पकडली म्हणून?’ त्याने तणतणत विचारले.

‘ नाही. चोरी केली म्हणून!’ मॅनेजर म्हणाला.

पोलिसांनी त्याला मॅनेजरच्या खोलीत असलेल्या सीसीटीव्ही.चे फूटेज दाखवले. त्यात पीटर मार्थाने पेमेंट केल्यानंतर दाराशी जाताना तिच्या थैलीत बीन्सचे डबे टाकताना स्पष्ट दिसत होतं. पीटरला या सीसीटीव्ही.ची काही कल्पना नव्हती. त्याने मार्थाच्या थैलीत टीन टाकताना कार्यालयातल्या सीसीटीव्ही.चा स्वीच ऑफ केला होता. पण दुकानात मॅनेजरच्या खोलीत आणखी एक सीसीटीव्ही.असू शकेल,याचा त्याला अंदाज आला नाही. पोलिसांनी मार्थाची क्षमा मागत तिला गाडीतून खाली उतरवलं आणि पीटरल ते घेऊन गेले. पीटरला  मार्थापासून  मुक्ती हवी होती. त्याला ती मिळालीही. पण कशी? त्याला दोषी ठरवून त्याचा सोनेरी भविष्यकाळ कळवंडत मिळालेली मुक्ती होती ती.

मूळ कल्पना – डॉ. हंसा दीप        

लेखन – सौ. उज्ज्वला केळकर 

♥ ♥ ♥ ♥ ♥

२. संस्कार – श्री सीताराम गुप्ता          

रमेश कुमारांचा मुलगा रजत पिंपरीला राहून  इंजिनियरिंगचा अभ्यास करत होता. योगायोगाने रमेश कुमारांच्या मित्राने तिथे एक फ्लॅट विकत घेतला होता. तो रिकामाच होता. रजत वर्षभर हॉस्टलमध्ये राहिला. मग वडलांच्या मित्राच्या फ्लॅटवर राहू लागला. रजतने आपल्या आणखी तीन मित्रांना तिथे राहायला बोलावले. एकूण चार विद्यार्थी तिथे राहत होते. तिथे त्यांना घरासारखाच आराम वाटायचा.

रमेश कुमार आग्र्याचे. त्यांनी स्वैपाक – पाणी आणि इतर कामे करण्यासाठी एका माणसाला नेमले. तो तिथेच राहत असे. एकदा मुलाची ख्याली-खुशाली बघण्यासाठी रमेश कुमार स्वत:च तिथे गेले. संध्याकाळची वेळ झाली, तेव्हा रजतचे अनेक मित्र तिथे आले. सगळे जण तिथेच जेवले. रमेश कुमार जोपर्यंत तिथे होते, तोवर रोज रोज हेच दृश्य ते पाहत होते. रोज संध्याकाळी मुले तिथे यायची. जेवायची. गप्पा-टप्पा व्हायच्या. थोडा दंगा-धुडगूसदेखील घातला जायचा. मग ती निघून जायची. त्यांचं अस्तित्व, गप्पा-टप्पा यामुळे मोठं चैतन्यपूर्ण वातावरण तिथे तयार व्हायचं.

रजतचे सगळे मित्र त्यांच्याशी अतिशय आदराने वागायचे. त्यांचा मान ठेवायचे. रमेश कुमारांना बरं वाटायचं. पण एक दिवस रजतचे सगळे मित्र निघून गेल्यावर त्यांनी रजातला विचारले, ‘रजत, तू इथे इंजिनियरिंगचा अभ्यास करण्यासाठी आला आहेस, की ढाबा चालवायला?’ त्यांच्या प्रश्नाने रजतचा चेहरा उतरला. तो जड आवाजात म्हणाला, ‘पापा, हेसुद्धा माझ्यासारखेच घरापासून दूर रहातात. बाहेर कसं जेवण मिळतं, आपल्याला कल्पना आहेच. हे कधी कधी यासाठीच इथे येतात, की घरी बनवलेलं चांगलं जेवण त्यांना कधी तरी मिळावं. इथे त्यांना घरी बनवलेलं चांगलं जेवण मिळतं. ‘

त्यावर रमेश कुमार म्हणाले, ‘पण त्यामुळे तुझा खर्च वाढत जातो, त्याचं काय? आणि तुझ्या अभ्यासावरदेखील त्याचा परिणाम होतो. अशा फालतू मुलांचं इथे येणं आणि रात्री दंगा घालणं बंद कर.’

रजत रोषपूर्ण आवाजात म्हणाला, ‘नाही बाबा, मी असं नाही करू शकणार! मुलं आली की जेवणासाठी त्यांना विचारावंच लागेल आणि ती जेवूनच जातील. खर्चाचं म्हणाल, तर मी माझ्या खर्चात तेवढी काटकसर करतोच आहे. आता मुले जमल्यावर थोड्या गप्पा-टप्पा, दंगा होणारच. ती काही रात्र रात्र दंगा करत नाहीत. त्यांनाही त्यांचा अभ्यास आहेच. ‘

राजतच्या या उत्तराने रमेश कुमार प्रसन्न झाले. ते एक प्रकारे रजतची परीक्षाच घेत होते. तो म्हणाला असता की पापा त्यांना उद्यापासून येऊ नका, म्हणून सांगतो, तर त्यांना वाईट वाटलं असतं. रमेश कुमारांच्या परिवारात ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या, दुसर्‍याचा विचार करणं, त्यांचा आदर-सत्कार करणं, मान-सन्मान ठेवणं हे संस्कार बाहेर राहूनही किंवा काळाचा प्रभाव पडूनही रजतच्या बाबतीत बदलले नव्हते.

आता रमेश कुमार म्हणाले, ‘मी काही मनापासून बोललो नव्हतो. तुझी प्रतिक्रिया काय होते आहे, हेच मला बघायचं होतं.  आता उद्या मला आग्र्याला परत जायला हरकत नाही.’ हे ऐकल्यावर राजताच्या चेहर्‍यावर आलेल्या प्रसन्न भावाने रमेश कुमारांची प्रसन्नता आणखी वाढवली.

मूळ कथा – संस्कार   

मूळ लेखक – श्री सीताराम गुप्ता  

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

♥ ♥ ♥ ♥ ♥

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अतिशहाणा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “अतिशहाणा…” ☆ श्री मंगेश मधुकर 

नेहमीप्रमाणे कंपनीत राऊंड मारताना डीकेना काही ठिकाणी कॉम्प्युटर आणि स्टाफच्या बसण्याची जागा बदलल्याचं लक्षात आलं. 

“हे कोणी करायला संगितलं”

“संकेत सरांनी !!”सुप्रीटेंडेंटने  उत्तर दिलं.

“मॅनेजर कोणयं ?”

“तुम्ही !!”

“मग हे बदलायच्या आधी विचारलं का नाही ? ”

“जे सांगितलं ते करावं लागतं. दोघंही साहेबच.”

“मला भेटायला सांगायचं”

“मी त्यांना बोललो पण गरज नाही असं म्हणाले.” .. हे ऐकून डी के भडकले.वादावादी सुरू झाली. 

“सर,रागावणार नसाल तर एक बोलू ? ”

“बोल. ” 

“इतके वर्षे सोबत काम करतोय.आपल्यातही वाद झालाय. पण गेल्या काही दिवसांपासून कंपनीत सतत काही ना काही कटकटी चालूयेत..  कारण तुम्हाला चांगलंच माहितीयं.” 

“आलं लक्षात.काय करायचं ते. बघतो. परत जसं होतं तसं ठेव आणि कोणीही सांगितलं तरी मला विचारल्याशिवाय काहीही करू नकोस.”

—-

या घटनेनंतर संकेत डी के विरुद्ध जास्तच आक्रमक झाला.मुद्दाम त्रास होईल असं वागायला लागला.हवं तेच करण्याच्या हटवादीपणामुळे संकेतचं कोणाशीच पटत नव्हतं.मोठे साहेब सोडले तर इतरांना तो किंमत द्यायचा नाही.त्यावरून वाद झाले. संकेतविरुद्ध अनेकांनी तक्रारी केल्या परंतु केवळ कामातला उत्तम परफॉर्मन्स आणि  कंपनीचा होणारा फायदा त्यामुळं सिनियर्सनी दुर्लक्ष केलं.सांभाळून घेतलं,कायम झुकतं माप दिलं परंतु हळूहळू कुरबुरी वाढून त्याचा कामावर परिणाम व्हायला लागला.शेवटी मोठया साहेबांना लक्ष द्यावं लागलं. साहेबांच्या केबिनमध्ये डी के आणि संकेत समोरासमोर बसले होते.

“दोघंही हुशार,मेहनती आहात. एकत्र काम केलंत तर कंपनीसाठी फायद्याचं आहे.”

“मी नेहमीच बेस्ट काम करतो. बाकीच्यांचं माहीत नाही” संकेतनं पुन्हा स्वतःची टिमकी वाजवली.तेव्हा वैतागून डीके म्हणाले “सर,काहीतरी करा.आता पाणी डोक्यावरून जातंय.तुम्ही सांगितलं म्हणून गप्प बसलो पण दिवसेंदिवस काम करणं अवघड झालयं.याचं वागणं सहन करण्यापलीकडं गेलयं. सगळ्याच गोष्टीत नाक खुपसतो.दुसऱ्यांच्या कामात लुडबूड करून विचार न करता परस्पर निर्णय घेतो.कंपनीच्या दृष्टीनं हे चांगलं नाही.यापुढं मला सांगितल्याशिवाय कोणताही निर्णय घायचा नाही हे फायनल.”

“मी जे काही करतो ते कंपनीच्या भल्यासाठीच आणि मला असले फालतू प्रोटोकॉल फॉलो करायला जमणार नाही.”संकेत उद्धटपणे म्हणाला.

“फालतू?विल शो यू माय पॉवर”डी के भडकले.

“आय डोन्ट केअर.जे वाटतं ते मी करणारच.हू आर यू”संकेत. 

“संकेत,बिहेव युअरसेल्फ,से सॉरी तो हिम.”मोठे साहेब चिडले पण संकेतनं ऐकलं नाही.

“सर,आपल्या इथं टीम वर्क  आहे.हा टीममध्ये फिट नाही.  आता यावर जास्त काही बोलत नाही.तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल याची खात्री आहे.एक सांगतो,इतके दिवस दुर्लक्ष केलं पण आता लिमिट क्रॉस झालीय.”एवढं बोलून डी के बाहेर गेले तेव्हा संकेत छदमीपणे हसला.

“संकेत,धिस इज नॉट गुड. बी प्रोफेशनल”

“सर,मी काहीच चुकीचं केलं नाही.”

“असं तुला वाटतं पण कंपनीचे काही नियम तुला पाळावेच लागतील.अडजेसटमेंट करावी लागेल.दरवेळेला “मी” मह्त्वाचा नसतो.प्रसंगानुसार तो बाजूला ठेवावाच लागतो.तडजोड करावी लागतेच ”

“पण सर,माझ्यामुळे कंपनीचा फायदाच होतोय ना मग मी कशाला तडजोड करू. आतापर्यंत मी कधीच चुकलेलो नाही.”

“पुन्हा तेच.जरा हा ‘मी’पणा कमी करून दुसऱ्यांचंसुद्धा ऐकायला शिक.”साहेबांच्या स्पष्ट बोलण्याचा संकेतला फार राग आला पण गप्प बसला.  

“हुशार,बुद्धिमान,धाडसी आहेस.पंचवीशीतचं मोठं यश मिळवून इतरांच्या तुलनेत पुढे गेलास.कामातल्या स्किल्समुळं सांभाळून घेतलं,वागण्याकडं दुर्लक्ष केलं.परंतु…..”

“माझी योग्यता फार मोठी आहे.इथल्या कोणाशीच बरोबरी होऊ शकत नाही.मी फार मोठा होणार असं सगळेच म्हणतात.”संकेतची आत्मप्रौढी सुरूच होती. 

“नेहमी कामाचं कौतुक होतं त्याच गोष्टीचा तुला अहंकार झालाय.कौतुकाची इतकी चटक लागलीय की थोडंसुद्धा मनाविरुद्ध बोललेलं सहन होत नाही.“आपण करतो ते बरोबर,तेच बेस्ट”या भ्रमानं  आत्मकेंद्री बनलायेस.”साहेबांनी पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला पण संकेतनं ऐकलं नाही उलट जास्तच हेकेखोर झाला.शेवटी नाईलाजानं साहेबांनी निर्णय घेतला.फायनल वॉर्निंग दिली. संकेतच्या ईगोला फार मोठा धक्का बसला.प्रचंड अस्वस्थ झाला.अपमानाने राग अनावर झाला त्याच तिरमिरीत कसलाही विचार न करता रिजाईन केलं.हे अपेक्षित असल्यानं साहेबांनी ताबडतोब राजीनामा मंजूर केला.संकेतला रिलीव्ह लेटर दिलं.तीन वर्ष काम करत असलेल्या नोकरीला एका फटक्यात लाथ मारली या आनंदात संकेतला नोकरी गेल्या विषयी वाईट वाटलं नाही.

लगेच दुसरी नोकरी मिळाली पण तिथंही पुन्हा तेच झालं. वागणुकीमुळे कंपनीनं बाहेरचा रस्ता दाखवला तरीही संकेतची धुंदी उतरली नाही.स्वतःला बदलण्याऐवजी इतरांना दोष देत तो नोकऱ्या बदलत राहिला.विचित्र स्वभावामुळं लोक टाळू लागले.मित्र मंडळी लांब झाली.संकेत एकटा पडला.

फक्त बाहेरच नाही तर घरीसुद्धा संकेत मग्रूरीत वागायचा. त्यामुळं घरात सतत अशांतता.रोजची वादावादी. शेवटी त्याच्या एककल्ली वागण्याला कंटाळलेल्या बायकोनं घटस्फोट घेतला.

सर्व काही उत्तम असूनही केवळ आडमुठेपणामुळं एकाकी पडलेल्या संकेतचं आयुष्य भरकटलं.दिशाहीन झालं.

असे स्वप्रेमात अडकलेले अनेक संकेत आपल्या आजूबाजूला आहेत जे कधीच तडजोड करायला राजी नसतात. हेकेखोरपणे आपलं तेच खरं करण्याच्या नादात जबर किंमत मोजतात,  पण ‘अहं’ सोडत नाहीत .स्वतःची फरपट करतातच आणि जिवलगांची सुद्धा…..

थोडा लवचिकपणा स्वभावात आणला तर अनेक प्रश्न निर्माणच होत नाही.

अतिशहाण्यांना एवढं साधं शहाणपण नसतं हे मात्र खरं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुलगी – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ मुलगी – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पहिले- अंजलीला  सासूसासरे असेपर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता.सासूसासरे वारल्यानंतर मात्र सगळं सुरळीत झालं होतं.आता इथून पुढे)

तिला आता भयंकर उदास वाटू लागलं होतं.प्रिया म्हणत होती तसं खरंच झालं तर नसेल?पावसामुळे झालेल्या अपघातात रितेशचं काही बरं वाईट तर…

एकदम तिला आठवलं रितेशच्या येण्याच्या रस्त्यावरच एक नाला होता आणि दरवर्षी त्याला पूर यायचा.पुर आलेल्या स्थितीत तो पार करतांना दरवर्षी चारपाच जण तरी वाहून जायच्या घटना घडायच्या.रितेशने तर तसा प्रयत्न केला नसेल?आणि…

त्या कल्पनेनेच तिचा घसा कोरडा पडला.जीव घाबराघुबरा होऊ लागला.डोळ्यात आसवं जमा होऊ लागली.घशात हुंदका दाटून आला.ती आता मोठ्याने रडणार तेवढ्यात प्रिया डोळे चोळत चोळत बाहेर आली.

“आई बाबा अजून आले नाहीत?” तिने रडवेल्या स्वरात विचारलं.अंजलीने उठून लाईट लावला.

” नाही बेटा.पण ते येतीलच थोड्या वेळात “अंजली तिला कसंतरी समजावत म्हणाली

” तू केव्हाची म्हणतेय येतील येतील म्हणून.पण ते का येत नाहियेत?”

” बेटा पाऊस किती जोरात पडतोय बघ.ते कुठतरी थांबले असतील”

” तू फोन लाव ना त्यांना.त्यांना म्हणा प्रियू वाट.बघतेय त्यांची “

” मी मगाशी लावला होता फोन पण लागलाच नाही “

” मग तू परत एकदा लाव ना गं  फोन ” ती परत एकदा रडायला लागली.अंजलीने उठून तिला जवळ घेतलं.तशी ती हमसून हमसून रडायला लागली.तिच्या रडण्याने अंजलीच्याही डोळ्यात पाणी आलं.

” असं रडायचं नाही बेटा.तू शहाणी आहेस ना?बघ पाऊस कमी झालाय ना.येतीलच आता बाबा.तू झोप बरं “

” मी तिकडे झोपणार नाही”

” बरं चालेल.इथेच झोप”

” आणि बाबा आले की मला लगेच उठव “

” बरं उठवते “

अंजलीने तिला सोफ्यावरच टाकून तिला थोपटायला सुरुवात केली.तशी ती झोपून गेली.ती झोपलीये हे पाहून अंजली तिला बेडरुममध्ये घेऊन गेली.ती उठू नये म्हणून ती बराच वेळ तिला थोपटत राहिली.मग ती परत हाँलमध्ये येऊन बसली.अकरा वाजत आले होते.तिने मोबाईल उचलून रितेशला फोन लावला.तो लागला नाही म्हणून तिने प्रकाशला लावला.पण त्यालाही लागला नाही. तिने मोबाईलच्या स्क्रिनकडे पाहिलं.तिथं रेंजच नव्हती.थोडाफार का होईना जो प्रकाशचा आधार वाटत होता तोही नाहिसा झाला होता.आता तिलाही खचल्यासारखं वाटू लागलं.काळजीने मन पोखरु लागलं.त्या नाल्याल्या पुरात रितेश वाहून तर नाही ना गेला या विचाराने तिचे डोळे अश्रूंनी भरुन आले.आता एकच उपाय उरला होता.गणपतीला पाण्यात ठेवायचा.तिने डबडबत्या डोळ्यांनी मनाशी निश्चय केला आणि ती धीर एकवटून देवघराकडे जायला निघाली तेवढ्यात …..

होय तोच तो आवाज ज्याची ती जीवाच्या आकांताने वाट बघत होती.तोच तो फाटक उघडण्याचा आवाज.रितेशची वाईट बातमी घेऊन कुणी आलं तर नव्हतं?धडधडत्या ह्रदयाने ती उठली.डोळ्यातले आसू तिने पुसले.धीर धरुन तिने दार उघडलं.बाहेर काळ्या रेनकोटमधली एक आकृती गाडी लावत होती.तिने पटकन अंगणातला लाईट लावला.समोर रितेश उभा होता.रेनकोट असूनही नखशिखांत भिजलेला आणि थंडीने थरथर कापणारा.आनंदाने तिला भडभडून आलं.त्याला जाऊन घट्ट मिठी मारावी असं तिला वाटू लागलं पण तो ओला होता त्याला अगोदर घरात घेण्याची गरज होती.

“काहो इतका उशीर.आणि फोन तर करायचा.वाट बघून जीव जायची वेळ आलीये “

” अगं काय करणार!पावसाने सगळीच वाट लावलीये.कंपनीतून निघालो तर पंचमुखी हनुमान जवळच्या नाल्याला हा पूर!एकदोन जण वाहून गेले म्हणे.त्यामुळे तो रस्ता बंद झालेला.सुभाष चौकाकडून यायला निघालो तर एका डबक्यात गाडी स्लिप झाली आणि मी पडलो.शर्टाच्या खिशातला मोबाईल पाण्यात पडला.तो शोधुन काढला.नंतर गाडी सुरुच होईना.पावसामुळे बहुतेक गँरेजेस बंद.एका गँरेजवाल्याकडे गेलो त्याने एक तास खटपट केली पण गाडी काही सुरु होईना.त्याच्याकडे गाडी ठेवायला जागा नव्हती म्हणून गाडी ढकलत आणू लागलो तर ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे रस्ते बंद.मी कसा घरापर्यंत पोहचलो ते माझं मलाच माहित”

“अहो पण एखादा फोन तर  करायचा.मी शंभरवेळा तुम्हांला फोन लावायचा प्रयत्न केला पण तुमचा मोबाईल बंदच.प्रकाश भाऊजींनीही प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही”

“हो अगं.डबक्यात पडल्याने मोबाईल खराबच झाला असावा.मी गँरेजवाल्याच्या मोबाईलने तुला फोन केला होता पण त्याचं नेटवर्कच गायब होतं.बरं या तुफान पावसात मोबाईल बाहेर काढायलाच लोक तयार होत नाही ” रितेश रेनकोट काढत म्हणाला

” थांबा मी टाँवेल आणते तुमच्यासाठी”ती टाँवेल आणायला वळत नाही तोच प्रिया जोरजोरात रडत बाहेर आली आणि “बाबाsssss” असं जोरात ओरडत तिने रितेशच्या पायांना मिठी मारली

“अगं थांब.त्यांना आत तर येऊ दे”अंजली ओरडली पण प्रियाने ऐकलं नाही.

लेकीच्या त्या आक्रोशाने रितेशच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तशाच ओलेत्या स्थितीत तिला उचलून छातीशी धरलं॰

“बाबा तुम्ही लवकर का नाही आले?मला खुप भिती वाटत होती.” त्याच्या गळ्याला मिठी मारुन ती रडत रडत म्हणाली.

” हो गं बेटा.साँरी हं बेटा या पावसामुळे मला येता नाही आलं.आता यापुढे असं नाही करणार”

“प्राँमिस?”

” हो बेटा.प्राँमिस “

रितेशच्या गळ्याला मिठी मारुन प्रिया रडत होती।

अंजली टाँवेल घेऊन आली.बापलेकीचा तो संवाद ऐकून तिलाही गहिवरुन आलं.मोठ्या मुश्किलीने तिने अश्रू आवरले.

“उतर बेटा खाली.बाबांना कपडे बदलू दे.तुझाही फ्राँक ओला झाला असेल तोही बदलून घे” 

थोड्यावेळाने ती आणि रितेश जेवायला बसली असतांना प्रिया आली आणि रितेशच्या मांडीवर जाऊन बसली.

” आई मला पण खुप भुक लागलीये.पण मी बाबांच्याच हातून जेवणार आहे”

अंजली आणि रितेश दोघांनाही हसू आलं.रितेश तिला हाताने भरवू लागला.आता मात्र प्रिया चांगली जेवली.जेवण झाल्यावर प्रिया अंजलीला म्हणाली

“आई मी आज मी बाबांजवळ झोपणार आहे”

अंजलीला हसू आलं.रोज खरं तर ती दोघांच्या मध्ये झोपायची पण आज ती रितेशच्या कुशीत झोपणार हे नक्की होतं.

झालंही तसंच ती रितेशच्या कुशीत त्याला मिठी मारुन  झोपल्यावर अंजलीने रितेशला संध्याकाळपासूनच प्रिया किती बैचेन होती ते सांगितलं.तिच्या मनात चाललेल्या घालमेलीबद्दल,भीतीबद्दल सांगितल्यावर रितेश म्हणाला

“खरंच अंजू मुलींचं बापावर किती प्रेम असतं हे आज मी प्रत्यक्ष पाहिलंय.त्या मोठ्या झाल्यावरही असंच रहातं का गं हे प्रेम”

“प्रश्नच नाही. मुली कितीही मोठ्या झाल्या,अगदी लग्न होऊन त्यांची मुलं मोठी झाली तरी वडिलांवरचं त्यांचं प्रेम थोडंही कमी होत नाही. तुम्हांला आठवतं मागच्या वर्षी माझे वडिल वारल्यावर सात दिवस मी जेवले नव्हते.एकही मिनिट असा गेला नसेल ज्यात मी रडली नसेन”

“तसं असेल अंजू तर आपल्याला दुसरीही मुलगीच झाली तरी मला आवडेल”

अंजू समाधानाने हसली.मुलगी झाल्याचा सल रितेशच्या डोक्यातून कायमचा गेला हे बरंच झालं होतं.कारण अंजली आता गरोदर होती.पुन्हा मुलगीच झाली तर नवऱ्याची नाराजी आता रहाणार नव्हती.

रितेश प्रेमाने प्रियाच्या डोक्यावर, अंगावर हात फिरवू लागला.त्याच्या स्पर्शाने प्रिया जागी झाली.झोपाळलेल्या स्वरात ती रितेशला म्हणाली

“बाबा तुम्ही मला खुप आवडता”

रितेशने तिला छातीशी कवटाळलं.तिच्या गालाचा मुका घेत तो म्हणाला

“बेटा तू पण मला खूप खूप खूप खूप आवडतेस “

– समाप्त –

(ही कथा माझ्या ” अशी माणसं अशा गोष्टी “या पुस्तकातील आहे.) 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “घरभरणी !” भाग -१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “घरभरणी !” भाग -१ श्री संभाजी बबन गायके 

“ब्राह्मणाला फसवलंस! तुझा वंशखंड होईल,इस्कोट होईल सगळ्याचा!” सुदामने भरबाजार पेठेच्या मोक्याच्या जागी बांधलेल्या नव्या कोऱ्या घरासमोर उभे राहून गोविंदभट अगदी सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाले तसे सुदामच्या घरातले सगळेच बाहेर आले.

कालच सुदामने साग्रसंगीत गृहप्रवेश,वास्तुशांती, सत्नारायण इत्यादी धार्मिक विधी करून घेतले होते. रात्री सात ते नऊ कीर्तन कार्यक्रम झाल्यावर येईल त्याला जेवू घातले होते.

वडिलांच्या माघारी सुदामने घरगाडा मोठ्या नेटाने हाकला आणि आईच्या उतारवयात तिचं मोठ्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं होतं. त्याच्या बायकोच्या माहेरची काही मंडळी आजही मुक्कामालाच होती. आणि अशात ही भलती शापवाणी ऐकून सारेच भांबावले आणि रागावले सुध्दा आणि हे साहजिकच होतं.! पण नक्की काय झालं हे सुदामला सुद्धा उमगत नव्हतं.

“आवो,काका! ही काय बोलायची रीत झाली का काय? शाप कशापायी देतात माझ्या भरल्या घराला?” सुदाम आवाजात शक्य तेवढा मऊपणा आणीत बोलला,पण त्याच्या काळजाला डागणी मात्र बसली होतीच.

“हा गोविंदभट काय मेला होता की काय की तू बाहेरचे ब्राह्मण बोलावून एवढी मोठी घरभरणी घातलीस ते? आम्ही काय दक्षिणेसाठी कधी अडून बसलो होतो की काय? अरे,तुझ्या बापजाद्यापासून भिक्षुकी करतोय या पंचक्रोशीत. चिमुटभर शिधा आणि मूठभर तांदळाशिवाय कधी काही अधिकचं मागितलं का ते विचार तुझ्या म्हातारीला!” गोविंदभट एखाद्या वळवाच्या पावसाच्या सरीगत बरसत होते,त्यात सुदाम चिंब भिजून गेला!

सुदामची आई हौसाबाई डोक्यावरचा पदर सारखा करीत बाहेर आल्या. “आवो,काका! का असं वंगाळ बोलताय? आमची आतापर्यंतची सारी कार्यं तुमच्याबिगर कधी झालीत का? पण तुम्हीच या वक्ताला आम्हांला फशिवलं!”

यावर गोविंदभट तडकले. “मी का तुम्हांला फसवू? आज सकाळी आलो तर तुमची घरभरणी कालच झाल्याचं दिसलं! मला सोमवारी सांगताय आणि रविवारीच कार्यक्रम उरकून घेताय म्हणजे काय? आणि तो सुद्धा बाहेरचे ब्राम्हण बोलावून?”

यावर सुदाम मध्ये पडला. “काका, मागल्या महिन्यात बाजारात भेटला होता तुम्ही तेंव्हा रविवारच ठरला होता की आपला! तुम्हीच नव्हता का मुहूर्त सांगितला आणि यादी दिली होती सामानाची?”

“रविवार नाही सोमवार म्हणालो होतो मी! हे बघ या डायरीत सर्व लिहिलेलं असतं माझं. काय आज नाही करत मी भिक्षुकी. जन्म गेलाय यातच माझा. तुम्हांला शहरातल्या शिकलेल्या ब्राम्हणांचं वेड लागलंय. सारं कसं अगदी भारीतलं पाहिजे!”

गोविंदभटांचाच खरं तर तारखेचा आणि सुदामचा समजूतीचा घोटाळा झाला होता. बरं या आधी असं कधीच झालेलं नव्हतं. गोविंदभटांनी डायरीत नोंद तर घेतली होती पण ती भलत्याच पानावर. वयोमानानं चष्मा लागलेला आणि स्मरणावर विसंबून राहण्यासारखी परिस्थिती नव्हती राहिली त्यांची.  शिवाय सुदामने कुणा हाती दिलेला आठवणीसाठीचा निरोप देणं राहून गेलं होतं त्या माणसाकडून. आणि गोविंदभटांची त्या आठवड्यात बाजारात फेरी काही झालेली नव्हती. त्यांनी नेमका रविवारचा एक उद्योग घेतला होता पलीकडच्या एका आडगावातला. रात्री यायला त्यांना उशीरच झाला होता. पायी फिरूनच ग्रामीण भागात भिक्षुकी करावी लागत असे त्यावेळी.

सुदाम म्हणाला,”काका, काही झालं असेल तर ते होऊन गेलं. आता आलाच आहात तर तेवढी उत्तरपूजा करून द्या की.”

यावर तर गोविंदभटांचा राग अगदी पराकोटीला गेला. “बोलवा की तुमच्या त्या शहरातल्या भटांना!”

सुदाम म्हणाला,”आवो,त्यांना यायला जमणार नाही म्हणाले इतक्या लांब. सकाळी आरती करून तुमची तुम्ही पूजा काढून घ्या म्हणाले! एकतर कालच त्यांना मी अर्जंट बोलावून घेतलं होत्ं तुम्ही आला नाहीत म्हणून!”

“असली उष्टी कामं नाही करीत मी! पूजा काढून घ्या नाहीतर राहू द्या!” गोविंदभट काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते सुदामच्या घरावरून तसेच ताडताड चालत पुढं निघून गेले. त्यांच्या गावाकडे निघालेल्या एका वडाप वाहनाला हात दाखवला आणि तो ही बिचारा काकांना बघून लगेच थांबला. पुढच्या सीटवरच्या एकाला मागे पिटाळून त्याने काकांना पुढे बसायला बोलवलं. गोविंदभटांचा पारा अजूनही चढलेलाच होता. वडापवाल्यानं विचारलं,”काका, काय झालं? चेहरा का असा लालेलाल दिसतोय?”

“लोकांना लाजा नाही राहिल्या आजकाल. सांगतात एक आणि करतात भलतंच. अरे, बाजारातल्या सुदामने मला आजची घरभरणी सांगितली होती. आणि येऊन बघतोय तर कालच उरकून घेतला कार्यक्रम पठ्ठ्यानं!” त्या जीप गाडीतल्या सर्व प्रवाशांनी हा सगळा संवाद ऐकला होताच. त्यांपैकी अनेकांना गोविंदभटांचा शीघ्रकोपी स्वभाव माहित होताच. पण उभ्या पंचक्रोशीत गोविंदभटाचं एकच घर भिक्षुकाचं. आणि शहरातून इतक्या लांबवरच्या ‘उद्योगांना’ कुणी धार्मिक कृत्ये करून देणारा सहजासहजी यायचा नाही. शिवाय इतरांचा वारसाहक्क असणा-या गावांत इतर भिक्षुकांनी व्यवसाय करू नये, असा शिरस्ताच असतो.

अर्ध्या तासाभरात गोविंदभटांच्या गावचा फाटा आला. “काका,इथं सोडू का? आज तुमच्या गावातलं तुम्ही एकटंच शीट आहात म्हणून विचारलं. गाडी गावात नेण्यात वेळ जाईल म्हणून म्हणलं.” ड्रायवरने असं म्हणताच गोविंदभट आणखीनच करवादले. त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकीत पायउतार झाले. घरभरणीसाठी अत्यावश्यक साहित्य भरलेली पिशवी आता त्यांना जड झाली होती. उन्हाचा चटका वाढत चाललेला होता. त्यांच्या नशीबाने त्यांच्या गावाकडं निघालेला एक मोटारसायकलवाला त्यांच्या दृष्टीस पडला आणि गोविंदभट गावात पोहोचले.

गोविंदभटांच्या पत्नीला ते असे लवकरच परत आल्याचे आश्चर्य वाटले. काहीतरी गडबड झाल्याचे तिच्या लक्षात आले. पण लगेचच काही विचारावं तर स्वारी एकदम अंगावर येण्याची शक्य्ता तिने नेहमीप्रमाणे गृहीत धरली होती. रीतसर पाणी वगैरे दिल्यानंतर तिने विचारले,”लवकर उरकला का उद्योग? कुणी सोबतीला नेलं होतं का?” यावर झाल्या प्रकाराची अगदी साग्रसंगीत पुनरावृत्ती झाली. याही वेळी गोविंदभटांचा आवेश तोच होता. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(दुसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन ठेऊ. आपल्याला उसना उत्साह दाखवावाच लागेल.”) – इथून पुढे  

मी गप्प राहिले, मला चहा करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती, अरुण ने सकाळी चहा केला, आपल्यासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवला. मग अरुणने धावपळ करून एक छोटा हॉल ठरवला. 50 माणसांसाठी लग्नाची तयारी केली, जुहू मधील एका मोठ्या हॉटेलात रिसेप्शन ठेवले. शंभर पत्रिका छापल्या. जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पत्रिका आणि काहींना फोन करून आमंत्रण दिले. सर्वांनाच धक्का बसला, माझी आई, बहिणी, अरुणची बहीण, भाचा, भाची सर्वजण आश्चर्यचकित झाले. कोणाला काही अंदाजच नव्हता. अरुण गावी जाऊन देवांना आणि घरच्या माणसांना आमंत्रण देऊन आला.

लग्नाच्या आधी दोन दिवस अमिता आणि जॉन आले. जॉन मला भेटायला आला. मला तो मुळीच आवडला नाही. वाढवलेले केस, दाढी, ढगळ कपडे, तोंडात सतत इंग्लिश मध्ये शिव्या, भारताला कमी लेखणे. पण मी असाहाय्य होते, माझ्या मुलीने त्याच्याशी लग्न केले होते, अरुण ला पण तो आवडला नव्हता हे कळत होते, पण अरुण तोंड मिटून गप्प होता.

यावेळी माझी मुलगी मला अनोळखी वाटली, तिचे प्रेम आटून गेले की काय अशी मला शंका आली. ती तिच्या बाबांना स्पष्टपणे म्हणाली, “अमिता – बाबा, आता मी फारशी भारतात येणार नाही, तुम्हा दोघांना वाटल्यास तुम्ही अमेरिकेत या. जॉन हा अमेरिकेतील मोठा पॉप सिंगर आहे. त्याच्या गाण्याचे त्याला खूप पैसे मिळतात. मी पण नोकरी सोडणार नाही. मला अमेरिकेत डॉलर्स मध्ये पैसे मिळतात. त्यामुळे यापुढे माझ्यासाठी पैसे जमवू नका. आता दोघांनी आराम करा. व्यवसाय कोणाकडे तरी सोपवून मोकळे व्हा.” 

तिचे हे बोलणे ऐकून तिचा बाबा गप्पच झाला. आमच्या समाधानासाठी अमिता आणि जॉन यांचे आमच्या पद्धतीने छोटेसे लग्न लावले. दुसऱ्या दिवशी जुहू मधील मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवले. माझ्या माहेरील सर्वजण  हजर होते, अरुण च्या घरची मंडळी पण उपस्थित होती. सर्वजण अभिनंदन करत होते, कौतुक करत होते, पण मला कळत होतं काही काही लोकांच्या डोळ्यात कुचेष्टा होती, काहींच्या सहानभूती. प्रत्येकाच्या डोळ्यात मी वाचत होते, एकुलती एक मुलगी आई-वडिलांना न जुमानता निघाली असल्या धेंडा बरोबर लग्न करून.

दोन दिवस मुंबईत राहून अमिता आणि जॉन अमेरिकेला निघाले. मला वाटले होते जाताना तरी अमिता माझ्या गळ्यात पडेल, मला मिठी मारून रडेल, बाबाला सावरेल… पण तसे काहीच झाले नाही. ती अतिशय आनंदात तिच्या जॉन बरोबर अमेरिकेला गेली.

गाडीतून परत येताना अरुण गप्प गप्प होता. तो तसा मनस्वी, मनातील खळखळणारा समुद्र जाणवू न देणारा. मी मात्र सुन्न झाले होते. कशासाठी आणि कोणासाठी ही सर्व धडपड.?

घराचे दार उघडून आम्ही दोघे घरात आलो आणि अरुण ओक्साबोक्सी रडू लागला. “आपली लेक आपल्याला परकी झाली गं, मुंबईत आली चार दिवस पण परक्यासारखी वावरली. जन्म दिला आपण, लहानाचे मोठे केले आपण, शिक्षण दिले संस्कार दिले आपण आणि त्या जॉन पुढे आपण तिला परके झालो”.

मग मी पुढे झाले, त्याला जवळ घेत मी म्हणाले, “खूप धडपडलास तू आमच्यासाठी, मुंबईत आलास तेव्हा तुझ्याकडे काहीही नव्हतं. आपलं लग्न झालं तेव्हा तू मामाकडे राहत होतास. मग छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवलंस. मग अमिताचा जन्म झाल्यानंतर तू आणखी धडपडलास, स्वतःची जागा घेतलीस, ऑफिस साठी जागा घेतलीस, मग पुण्याला एक फ्लॅट घेतलास, घर, गाडी, फर्निचर, सर्व झालं, पण हे कुणासाठी? माझ्यासाठी आणि त्यापेक्षा लाडक्या लेकीसाठी, किती धडपड करशील रे…? कुणाला त्याची काही किंमत तरी आहे का? ती आपली लेक सांगून गेली, ‘आता सर्व कमी करा’ मग करा ना कमी सर्व, आपणा दोघांसाठी कितीसं काही लागणार आहें?

तुमच्या गावात तुमच्या चुलत भावाबरोबर कोर्टात केस? दहा गुंठे जमिनीसाठी? दहा वर्षे झाली त्या केसला, अजून काही निकाल लागत नाही, कशाला हवी गावची जमीन? तुमचा चुलत भाऊ झाला तरी तो तुम्हा मांजरेकर कुटुंबापैकीच आहे ना? म्हणजे तुझे आणि त्याचे आजोबा एकच. मग मिळू दे त्या मांजरेकर कुटुंबातील माणसाला. दुसऱ्यांनी जमीन खाण्याऐवजी तुझ्या कुटुंबातील एकाला मिळाली तर का नको? घेऊन टाक ती केस मागे, सर्व मांजरेकर कुटुंब एक होऊ दे. 

तुझ्या मित्राचा मुलगा तुझ्याबरोबर व्यवसायात आहे, गेली कित्येक वर्षे इमाने इतबारे काम करतोय, हळूहळू त्याच्या हातात सर्व धंदा दे. पुण्यात तुझ्या बहिणीचा मुलगा अश्विन आहें, त्याला जागा नाही आहें, त्याला म्हणावं आपल्या फ्लॅटमध्ये राहा, हळूहळू सर्व काही कमी करायला हवं रे, जिच्यासाठी राखून ठेवलं होतं तिला त्याची गरज नाही, मग ज्यांना गरज आहे त्यांना का देऊ नये?

सांभाळ स्वतःला, आम्ही बायका रडत असलो तरी आतून खंबीर असतो, लहानपणापासून अनेक त्याग करायची सवय असते बायकांना.

आपल्या आई-वडिलांना, भावा बहिणींना सोडून आम्ही नवऱ्याच्या घरी जातो, आमचं नाव सुद्धा विसरतो आम्ही, पण तुम्ही पुरुष बाहेरून कणखर दाखवता पण मनातून मेणा सारखे मऊ असता. आपली लेक आपल्याला टाटा करून गेली, तिच्या मनातही आलं नाही की आपल्या आई-वडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. 

नटसम्राट नाटकात गणपतराव बेलवलकर बोलून गेलेत, “आपण उगाच समजतो, आपण आई झालो, बाप झालो, खरं तर आपण कुणीच नसतो. अंतराळात फिरणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने खाली उतरतो, आणि आम्ही समजतो आई झालो, बाबा झालो’.

अरुण, आपली पोर आपल्यासाठी तीस वर्षांपर्यतच होती असं म्हणायचं, आणि गप्प राहायचं. त्या पेक्षा तूझ्या ऑफिस मधील शरद सतत तुझी काळजी करतो, तुला किंवा मला बरं नसतं तर त्याचा जीव कासावीस होतो, तो जवळचा नाही का?

“अरुण, पुरे झालं हे शहर, इथे धड श्वास घायला मिळत नाही, पुरे झाले पैशासाठी धावणे…. आता इथला पसारा कमी करून तूझ्या गावी जावू, जुने घर आहें, ते नवीन बांधू, तुम्ही मांजरेकर एक व्हा, पुन्हा पूर्वी सारखे सण साजरे करूया.”

माझे बोलणे अरुणला पटले असावे बहुतेक, डोळे पुसत तो मान हलवत होता, मी त्याला थोपटता थोपटता सलील कुलकर्णी म्हणतो ते गाणे गुणगुणु लागले. 

“सांगायचे आहें माझ्या सानुल्या तुला,

दमलेल्या बाबाची कहाणी तुला,

तूझ्या जगातून बाबा हरवेल का गं,

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं 

ना.. ना… ना, ना.. ना.. ना…

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

नवरा ऑफिसमध्ये गेला आणि माझी आवराआवर सुरू झाली. आज अंथरुणं पांघरूणं धुवायला काढायची असं मी म्हणत होते, एवढ्यात मोबाईल वाजला म्हणून मी फोन घेतला, कन्येचं नाव दिसलं म्हणून मी खुश झाले. गेल्या महिन्याभरात किमान दहा स्थळांचे फोटो मी पाठवले होते. तिचे एवढे फोन आले पण कुठल्या स्थळाबद्दल तिने होकार कळवला नव्हता. पण माझा अंदाज होता एक दोन दिवसात ती निश्चित कळवेलच, कदाचित त्यासाठीच तिचा अचानक फोन असेल ह्या उत्सुकतेने मी फोन उचलला.

“मग काय, आज सकाळी सकाळीच फोन, म्हणजे भारतात सकाळ गं, नाहीतर तुझा रात्रीचा फोन ठरलेला. हाच फक्त सकाळी आला. आईशीच काही बोलायचे का? कुठला फोटो आणि कुठलं स्थळ तुला पसंत सांग लवकर?” 

“अगं आई, त्या करताच मी फोन केला. तू मला एवढ्या स्थळांचे फोटो पाठवू नकोस, माझ्या लग्नाची तयारी पण करू नकोस, आम्ही लग्न ठरवलंय. ‘

लग्न ठरवलं हे ऐकून माझा श्वासच अडकला. “अगं आम्ही म्हणजे कोणी?”

“मी आणि जॉन ने. “

मी घाबरून किंचाळले, “अगं कोण हा जॉन?”

“अग आई, मागे मी तुला फोटो पाठवलेला ना जॉनचा. “

“अगं असे तुझ्या मित्र-मैत्रिणींचे फोटो तू नेहमीच पाठवतेस, माझ्या कसं लक्षात राहील जॉन कोण आणि  कोणता ते. “

“अगं जॉन, जॉन विली त्याचं नाव, पॉप गायक आहे तो. “

” केवढा धक्का दिलास तू अमिता, मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती, तुझ्या बाबाला आता केवढा धक्का बसेल माहिती आहे? आणि काकांना मावशी ना काय सांगू गं मी?” 

मी रडू लागले. फोन बंद करून खुर्चीत बसले. केवढ्या अपेक्षा या मुलीकडून ठेवल्या होत्या आम्ही? तिच्या लग्नाच्या तयारीसाठी काय काय जमवत होते मी. तिचा बाबा तर तिच्या बाबतीत खूपच सेन्सेटीव्ह, एकुलती एक मुलगी, त्यात पहिल्यापासून हुशार. तिच्या बाबाला गर्व होता की आपल्यासारखी हुशार म्हणून.

नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेली पण आज ना उद्या भारतात परत येईल ही आशा आम्हाला होतीच. तिची आता तिशी जवळ आली तशी आम्हाला आता जास्त काळजी वाटायला लागली. कुठून कुठून तिच्यासाठी स्थळं येत होती, त्यातील चांगल्यात चांगलं स्थळ तिच्यासाठी आम्ही निवडणार होतो पण….

मला माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याची, अरुणची जास्त काळजी वाटायला लागली. मी निदान रडून तरी दाखवीन, तो बाहेरून दाखवायचा नाही पण आतल्या आत कोसळून जाईल. एकुलत्या एक मुलीसाठी आयुष्यभर झटतोय, अजून उमेदीने व्यवसाय वाढवतोय, या वयात आठवड्यातून एकदा तरी दुसऱ्या शहरात व्यवसायासाठी धावतोय, कुणासाठी हे सर्व?

मी दिवसभर कॉटवर झोपून राहिले. काही करायची इच्छाच मला होईना, एवढी एवढी छोटी अमिता, शाळेत जाणारी अमिता, टेनिस खेळायला जाणारी अमिता, इंजिनीरिंग ला जाणारी अमिता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी अमेरिकेत जाणारी अमिता मला आठवत राहिली. अमेरिकेत जायला माझा विरोध होताच पण तिच्या बाबाचा तिला पाठिंबा होता.

सायंकाळी अरुणला कसं सांगायचं याचा मी विचार करत होती, कदाचित तिने बाबाला फोन केला पण असेल, मी तिचा फोन कट केला तसा बाबा फोन कट करणार नाही, तो शांतपणे तिचं म्हणणे ऐकून घेईल, आतून कोसळेल पण बाहेर दाखवणार नाही. मला माझ्या नवऱ्याची अरुणची पद्धत माहिती होती. तॊ जेव्हा जास्त टेन्शनमध्ये असेल तेव्हा जास्त हसेल, गडबड करेल. आपलं टेन्शन दुसऱ्याला दाखवणार नाही. आतल्या आत आपणच ते सहन करील.

आज रोजच्या पेक्षा लवकर अरुण घरी आला. येताना माझ्या आवडीचे गुलाब जामुन घेऊन आला. तेव्हाच मी ओळखले याला सर्व कळले आहे. माझा तणाव घालवण्यासाठी याने मुद्दाम गुलाबजामून आणलेत. हाच तो माझी जास्त चेष्टा करेल, गमती जमती सांगेल. मनातल्या मनात रडत असेल पण बाहेर दाखवायचा नाही.

माझ्या हातात गुलाबजाम देऊन तो म्हणाला, “चल आज कुठेतरी फिरून येऊ”.

“आज एवढा खुशीत का, लाडक्या लेकीचा फोन आलेला दिसतो. “

“हो ना, तिनं लग्न ठरवलंय म्हणे, जॉन बरोबर. “

“मग झापलं नाहीस तिला, का खूप आनंद झाला जॉन बरोबर लग्न ठरवले म्हणून, एवढे गुलाबजामून आणलेस म्हणून विचारले. “

“विरोध करून काही उपयोग नसतो गं, उगाच आपल्या मुलीच्या मनातून आपण उतरतो, ती आता तिशीची झाली, तिचे बरे वाईट तिला कळते. “

“म्हणून काही उघड्या डोळ्यांनी आपण लग्न लावून द्यायचं? मी आई आहे तिची, कोण कुठला तो जॉन, ना ओळखीचा ना पाळखीचा, आपल्या मुलीच्या शरीराचा मनाचा तो मालक होणार, आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं?”

” मग काय करू शकतो आपण? तिने लग्न करू का हे विचारलेले नाही, तिने याआधीच त्याच्याशी लग्न केले आहे ना”

“काय म्हणतोस?” मी किंचाळत विचारले.

“होय, तिने त्याच्याशी रजिस्टर लग्न केले आहे, दोन महिन्यापूर्वी. “

“आणि ती आता आम्हाला सांगते? आपली मुलगी एवढी परकी होते?”

“हे असंच असतं, तिला तिचा साथीदार मिळाला की तिचे आई-वडील पण परके होतात, तेव्हा तिला कसलाही विरोध न करता त्यांना आशीर्वाद देणे हेच योग्य”.

“पण अरुण, मी दुखावले गेले आहे रे, माझ्या मुलीकडून मलाही अपेक्षा नव्हती. मी तिला माफ करू शकणार नाही”.

“काय करू शकतो आपण? आपण तिला मोठ्या मनाने माफ करायला हवे, आपल्याला आपल्या मुलीला गमवायचे नसेल तर आपण तिला माफ करायलाच हवे”.

“पण तिने या आधीच लग्न करून ती मोकळी झाली, आणि ही गधडी आत्ता सांगते लग्न केले म्हणून? आपले संस्कार कुठे कमी पडले का? आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना काय सांगायचे? तिने दोन महिन्यापूर्वी लग्न केले म्हणून? माझी आई काय म्हणेल? माझ्या बहिणी, भाऊजी, तुझे गावचे भाऊ, काय उत्तर द्यायचे त्यांना?”

“उत्तर हे द्यावेच लागेल, लग्न याआधी झाले हे कळवायचे नाही कुणाला, मी अमित शी बोलतो, तिला म्हणतो तुम्ही दोघेही भारतात या, आपण त्यांचे परत इथे लग्न लावूया, एखादे रिसेप्शन ठेवूया, त्याला सर्वांना बोलऊया, आणि एक लक्षात ठेव, people’s memory is always short, कोणाला फारसे आठवणार पण नाही काही दिवसांनी. “

मी जेवण न करता उशीत डोकं खुपसून रडू लागले, अरुण येरझाऱ्या घालत होता. त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजला असेल याची मला कल्पना होती. काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचे मला ऐकू येत होते.. निश्चितच तो अमिताशी बोलत असणार.

सकाळी अरुण मला म्हणाला, पुढील महिन्यात अमिता आणि जॉन भारतात येत आहेत. आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळी साठी परत एकदा त्यांचे लग्न करू. दुसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन ठेऊ. आपल्याला उसना उत्साह दाखवावाच लागेल. “

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares