☆ जीवनरंग ☆ सांताक्लॉज (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
सांताक्लॉजला बघताच गरीब वस्तीतल्या त्या सगळ्या मुलांमध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या. काही क्षणात तिथल्या सगळ्या मुलांच्या हातात सुंदर सुंदर भेटी होत्या. बिल्लूने मात्र या भेटी घेण्यास नकार दिला. सांताक्लॉजने अतिशय प्रेमाने विचारले, `बेटा तुला या भेटी का नकोत? काय कारण? तुला हवय तरी काय?’
बिल्लू अतिशय भोळेपणाने म्हणाला, `मला भेटवस्तू नकोत. त्यापेक्षा तुम्ही मला सांताक्लॉजच करा ना!’
सांताक्लॉज बनलेल्या पीटरने विचारले, `बेटा, इतक्या चांगल्या भेटी सोडून तुला सांताक्लॉज का व्हावसं वाटतय?’
बिल्लू प्रथम गप्प बसला, पण पीटरने पुन्हा पुन्हा विचारले, तेव्हा तो म्हणाला, `अंकल मी गरीब आहे. मला खूप थंडी वाजते. मी डोक्यापासून पायापर्यंत लोकरीचे कपडे कधी घातलेच नाहीत. फक्त त्यासाठीच…’
मूळ कथा – ‘सांता क्लॉज’ – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
“ताई, तुला आठवतं? आपण लहानपणी आई-बाबांबरोबर मुंबई बघायला आलो होतो…….”
“मला लहानपणचं काही सांगू नकोस. मी विसरलेय सगळं.”
“असं थोडंच विसरता येतं मागचं?” मीही हट्टालाच पिटले होते.
“मी प्रयत्नपूर्वक विसरलेय ते. मला पुन्हा आठवायला लावू नकोस.”
“असं काय वाईट होतं ग तेव्हा?”
“ते एवढंसं घर. बाबांचा तुटपुंजा पगार……”
“पण आपण तर समाधानी, सुखी होतो ना?”
“कारण आपल्याला मोठं घर, भरपूर पैसा म्हणजे काय असतं, तेच माहीत नव्हतं ना तेव्हा. तुला ठाऊक आहे? माझ्या सासरच्या बायका मला कमी लेखायची एकही संधी सोडायच्या नाहीत. माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण, माहेरची बेताची परिस्थिती…. खूप अपमान करायच्या त्या. मग साहेब माझी समजूत घालायचे-तुझ्या रूपावर जळतात त्या. म्हणून तर मी माझ्या दिसण्याची एवढी काळजी घ्यायला लागले. तेवढी एकच तर गोष्ट होती माझ्याकडे. दुसरं म्हणजे…. ”
बोलू की नको ,असा विचार करून मग तिने सुरुवात केली.
“साहेबांच्या सुलभाकाकी आहेत ना-. आहेत म्हणजे होत्या. गेल्या बिचा-या पाच-सहा वर्षांपूर्वी. तर काय सांगत होते, त्या काकांनी एक बाई ठेवली होती. ते तिला घेऊन दुसरीकडे घर करणार होते; पण त्यांच्या आईंनी सांगितलं-इथेच राहू दे तिला. मग काय , ती घरातच राहायला लागली.
सासूबाई सांगायच्या ना, त्या सुलभाकाकी रोज रात्री नटूनथटून बसायच्या नव-यासाठी. पण काका, त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता त्या बाईच्या खोलीत जायचे. मग सुलभाकाकी सगळं विसकटून टाकायच्या .बिचा-या!
मला नेहमी भीती वाटायची, म्हणजे अजूनही वाटते, माझ्यावर तशी पाळी आली तर?”
“पण हे घरातल्या इतर बायकांच्या बाबतीतही घडू शकलं असतं की.”
“त्यांच्या बाबतीत घडलं असतं, तर त्यांच्या माहेरचे आले असते जाब विचारायला आणि तशीच वेळ पडली असती, तर त्यांना माहेरी घेऊन गेले असते. एकेकीची माहेरं बघशील तर अशी श्रीमंत आहेत ,माहीत आहे? सुलभाकाकीचं माहेर मात्र माझ्यासारखं. फाटकं.
म्हणून तर सासूबाई मला सांगत राहायच्या-‘डोळ्यांत तेल घालून जप नव-याला.”
मला आतापर्यंत ताईचा राग येत होता पण आता मात्र दया येऊ लागली तिची.
☆ जीवनरंग ☆ बोध कथा – संस्कार प्रभाव ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा १२. संस्कार प्रभाव
विंध्यपर्वतावर एका वटवृक्षावर पोपटाचे जोडपे वास करत होते. त्यांना राम व लक्ष्मण अशी दोन पिल्ले होती. एकदा एका व्याधाने जाळे पसरवून त्या दोघांना पकडले. गोदावरी तीरावर राहणाऱ्या एका साधूला राम विकला व एका कसायाला लक्ष्मण. त्या दोघांनीही छोट्या पोपटांचे प्रेमाने लालन पालन केले. आता त्या पिल्लांचे मातापिता वृद्ध झाले होते. राम व लक्ष्मणाच्या आठवणीने ते व्यथित होत होते. त्यांना त्या दोघांच्या भेटीची ओढ लागली होती. आता दोघांना शोधूनच काढायचा त्यांनी निर्धार केला. त्यानुसार ते जोडपे पर्वतांवर, झाडांवर, गावांमध्ये, उद्यानात, देवळांत, राजवाड्यात इत्यादी सर्व ठिकाणी पिल्लांना शोधत कालांतराने गोदावरीच्या तीरावर आले. तेथे साधूच्या कुटीत व कसायाच्या घरात मधुर कूजन करणाऱ्या, पिंजऱ्यात असलेल्या आपल्या पिल्लांना बघून ते खूप आनंदित झाले .
प्रथम त्या जोडप्याने साधू जवळ येऊन त्याला प्रणाम केला व पिंजऱ्यातील पोपट आमचा पुत्र आहे असे सांगितले. तेव्हा साधूने त्या वृद्ध पोपटांना काही दिवस आदराने स्वतःच्या कुटीत ठेऊन घेतले. साधूने कसायाघरचा पोपटही काही मूल्य देऊन विकत घेतला व दोन्ही पिल्ले वृद्ध पोपटांना दिली. ते जोडपे काही दिवस पिल्लांसह आनंदात राहिले व नंतर मृत्यू पावले. माता-पित्याच्या मृत्युनंतर राम-लक्ष्मणाला एकत्र राहणे अशक्य झाले. ते दोघेही वेगवेगळ्या आम्रवृक्षांच्या फांदीवर घरटे बांधून राहू लागले.
एक दिवस कोणी एक ब्राह्मण नदीवर स्नानासाठी जात असताना थकून लक्ष्मण रहात असलेल्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. त्याला पाहून लक्ष्मण इतर पक्ष्यांना बोलावून “हा कोणी मनुष्य आला आहे. त्याचे चोचीने डोळे टोचून गळा फोडून खाऊ या” असे जोरजोराने ओरडू लागला. त्याचा तो आक्रोश ऐकून त्रस्त झालेल्या ब्राह्मणाने तेथून पळ काढला, व तो थेट राम रहात असलेल्या झाडाखाली आला.
ब्राह्मणाला पाहताच राम इतर पक्ष्यांना म्हणाला, “हा कोणी थकलेला मनुष्य आला आहे. आपण वृक्षाच्या पानांना जमिनीवर टाकूया, जेणेकरून हा सुखाने त्यावर बसू शकेल. फळेसुद्धा खाली टाकू व या अतिथीचे स्वागत करू.” ते रामशुकाचे बोलणे ऐकून ब्राह्मण आनंदित झाला. त्याने त्या पोपटाला विचारले, “मला प्रथम भेटलेला शुक ‘याला मारा, मारा’ असे ओरडत होता आणि तू तर माझे आतिथ्य करा असे सांगतो आहेस. हे कसे?” तेव्हा रामशुक म्हणाला, “आम्ही दोघे बंधू आहोत. मी साधूच्या घरी वाढलो. तिथे मी साधूला सगळ्यांचे आतिथ्य करताना पहिले. म्हणून माझी बुद्धी तशी संस्कारित झाली. तो कसायाच्या घरी वाढला. तिथे त्याने बोकड, मेंढे वगैरे मारताना पहिले, म्हणून त्याची बुद्धी तशी संस्कारित झाली.”
तात्पर्य – दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींची पूर्वी जशी दुर्बुद्धी असते, त्याचप्रमाणे ते वर्तन करतात. वृद्धावस्थेत सुद्धा त्यांची दुर्बुद्धी नष्ट होत नाही आणि सुबुद्धी जागृत होत नाही.
☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
मध्येमध्ये मला ऑफिसमधून फोन येत होते.
“किती फाडफाड इंग्रजी बोलतेस ग तू! कुठे शिकलीस?”
मी बघतच राहिले तिच्याकडे.
“साहेबांना खूप लाज वाटायची माझी,मला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही म्हणून. शिकवणीही लावली होती. पण ती दीडदमडीची पोर माझ्या चुकाच काढत राहायची, म्हणून काढून टाकलं मी तिला.”
“अग पण ताई,तुझ्या चुका तुला कळल्या नाहीत, तर तू त्या सुधारणार कशा?”
“तेही खरंच म्हणा .”
“तू ‘इंग्लिश विंग्लिश’ बघितला होतास ना? त्यात ती कसं नेटाने शिकते इंग्लिश!”
“पण मला नाय बाय येत बुंदीचे लाडू करायला.”
मी लग्नापूर्वीच्या ताईला आठवायचा प्रयत्न केला. ती एवढी बावळट नक्कीच नव्हती. घमेंडखोरही नव्हती. उलट माझ्या हुशारीचं तिला कौतुकच वाटायचं.
“तुला शिकायचंय इंग्लिश?”
“पण आता वेळ कुठे आहे?”
“मी चौकशी करते. तू इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त इंग्लिशवरच लक्ष केंद्रित कर. जमेल तेवढे दिवस इथे शिक. पुढचं घरी गेल्यावर.”
“या वयात नाही ग जमायचं मला. शिवाय मी हुशार थोडीच आहे तुझ्यासारखी?”
“आठवून बघ जरा. शाळेत असताना माझ्यासारखा पहिला नसला तरी सात-आठच्या आत नंबर यायचा तुझा. तू नक्की शिकू शकशील.”
“ते तुझं इंग्लिश-बिंग्लिश नंतर.आधी डॉक्टर.”
"बरं। मी घेते अपॉइंटमेंट.”
“आणि रजा घे हं तू. नाहीतर मला बसवशील डॉक्टरकडे आणि जाशील निघून ऑफिसला.” हे असं ठणकावून की जसं काही हीच मला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे.
मग तिला डॉक्टरकडे घेऊन जाणं, त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या टेस्टस, सोनोग्राफी वगैरे, ते सगळे रिपोर्टस डॉक्टरना दाखवणं…….सगळ्या गोष्टी साग्रसंगीत झाल्या.
“अजिबात घाबरायचं कारण नाही. तुम्ही ठणठणीत आहात. सगळे रिपोर्टस नॉर्मल आहेत.”
मी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पण तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा ताईची कटकट सुरू झाली, “कुठची डॉक्टरीण शोधून काढलीस ही? तसंही बाई डॉक्टर म्हटल्यावर मला शंका आलीच होती. पण आता तर खात्रीच पटलीय. तिला काहीही येत नाही. मला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन चल. पैशाकडे बघू नकोस.”
मग मी दुस-या -तेही पुरुष डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. पुन्हा नव्याने टेस्टस, सोनोग्राफी सगळे सोपस्कार झाल्यावर त्यांनीही ताईला काहीही झालेलं नसल्याचा निर्वाळा दिला.
“ह्याच्यापेक्षा चांगला डॉक्टर…..”
“ताई, हे दोन्ही मुंबईतले बेस्ट डॉक्टर्स होते. तरीही तुला पटत नसेल, तर मी भावोजींना कळवते. ते तुलाही युएसला बोलावून घेतील. तुला काहीही झालेलं नसलं तरी तुझ्या दोन्ही बाजू काढून टाकतील आणि नंतर प्लॅस्टिक सर्जरी करतील. मग तर खूश?”
“नको ग. साहेबांना नको कळवूस. कदाचित तू म्हणतेस तसं डॉक्टरांचंच बरोबर असेल.”
☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
खरंच. ताईला घराबाहेरचं जगच ठाऊक नव्हतं. कसं असणार म्हणा? कोणाच्या तरी लग्नाला गेलेली लावण्यवती ताई सासूच्या नजरेत भरली. खरं तर ती सतरा वर्षांचीच होती पण उफाड्याची होती. आईसारखीच देखणी होती. त्यांचा बंगला, एकंदर श्रीमंती, उमदा नवरा हे सगळं बघून आई आणि ताई, दोघींचंही देहभान हरपलं आणि ताईचं लग्न झालं.
खरं तर बाबांना हे पसंत नव्हतं. ताईने निदान पदवी तरी घ्यावी, असं त्यांना वाटत होतं.
“पदवी काय चाटायचीय? एवढा देखणा,श्रीमंत नवरा मिळाल्यावर माझी बाय सुखात डुंबेल” आईच्या या बोलण्याने दुखावलेला बाबांचा चेहरा माझ्या अजून लक्षात आहे. त्या दोघांमधल्या नात्याचा हा पदर तोपर्यंत कधी जाणवलाच नव्हता मला.
मग बाबांनी आपलं लक्ष माझ्यावर केंद्रित केलं.
तशी मी बाबांच्याच वळणावर गेले होते. सुंदर नसले तरी दिसायला ब-यापैकी. पण बुद्धिमान. चेह-यावर आत्मविश्वासाचं तेज.
चांगलं शिकून सवरून उच्चपदावर नोकरी करत होते. तिथेच विकास भेटला. बाबांना आवडला तो पण आईचा विरोध होता. दोन खोल्यांच्या घरात- तेही जॉइंट फॅमिलीत – राहणारा म्हणून. मी हट्टाने विकासशीच लग्न केलं.
पुढे आई कॅन्सरने आजारी होती, तेव्हा बाबांना मदत करण्यात माझ्याएवढाच वाटा विकासनेही उचलला. कष्टांतही आणि आर्थिकही. जाण्यापूर्वी आई म्हणालीसुद्धा ,”शेवटी दिसणं, पैसा या गोष्टींपेक्षा माणसाचा स्वभाव महत्वाचा.”
ताई तेव्हा स्वत:च्याच व्यापात गर्क होती. आई असताना एकदा आणि गेल्यावर एकदा अशी दोनदाच, ती फक्त भेटून गेली. भावोजींना थांबायला वेळ नव्हता म्हणून तीही लगेचच परत गेली. आता ही एकटीच येतेय म्हणजे भावोजींशी भांडून बिंडून येतेय की काय?
मी ड्रायव्हरला आमच्या घराचा पत्ता, लॅन्डमार्क वगैरे सांगितलं.
“युवराज कुठे आहेत?”
‘युवराज?’ मला पूर्वीची आठवण झाली.
स्वप्नीलच्या वेळी माझे दिवस भरत आले, तेव्हा ताईचा फोन आला होता ,”आई गेली म्हटल्यावर तुझं बाळंतपण मलाच करावं लागणार. ये तू इकडे. आमच्याकडे नोकर-चाकर आहेत. शिवाय रूम्सही भरपूर आहेत. तुझं पोर रात्रभर रडत राहिलं तरी कोणाची झोपमोड होणार नाही.”
ज्याची आम्ही एवढी स्वप्नं बघत होतो आणि विकास ज्याचा उल्लेख नेहमीच ‘प्रिन्स’ असा करायचा, त्या आमच्या छकुल्याला ताईने पोर -तेही रडवं म्हणावं, याचा मला इतका राग आला की मी आमच्याच घरी राहिले. मदतीला एक बाई ठेवून बाबा आणि विकासने माझं बाळंतपण निभावलं. बाबा तर म्हणायचेसुद्धा, “तू माझी एकुलती एक लेक आहेस, असंच समजतो मी.”
पण एकंदरीत ताई बरीच बदललेली वाटत होती. मोठेपणा, खवचटपणा खूपच कमी झाला होता. घराकडेही तिने फारसं बघितलं नाही.
जेवण झाल्यावर विचारलं तिला, तर ती एकदम रडायलाच लागली. “मला वाटतं, मलाही आईसारखाच ब्रेस्ट कॅन्सर झालाय.”
“तू चेक-अप करून घेतलंस का तिकडे?”
“नाही अग. मला भीती वाटली, साहेबांना कळलं तर….”
“कळलं तर म्हणजे? भावोजींना सांगितलं नाहीस तू अजून?”
“नाही. समजा, मला एक बाजू काढून टाकायला सांगितली… तर? त्यांच्या मनातून साफच उतरेन मी. मला सोडलं त्यांनी, तर कुठे जाऊ ग मी?”
“असं का करतील भाऊजी?”
“तुला नाही कळणार माझं दु:ख. तुला असा आजार झाला आणि विकासने तुला सोडलं, तरी तू नोकरी करते आहेस. स्वत:च्या पायावर उभी आहेस.”
“एक मिनिट. समजा, मला असा आजार झाला आणि माझ्या एक नाही, अगदी दोन्ही बाजू जरी काढाव्या लागल्या, तरी विकास मला अंतर देणार नाही. अग, नवरा-बायकोचं नातं फक्त शारीरिक थोडंच असतं?”
“आमच्यातलं नातं फक्त शारीरिकच आहे.”
“कशावरून? बरं ते जाऊ दे. मुलांना तर तू नंतरही तेवढीच आवडशील ना?”
“खरं सांगू? माझा आणि मुलांचा संबंधच येत नाही फारसा. लहानपणापासून ते नोकरांकडेच वाढले. आता मोठे झाल्यावर तर काय, स्वत:च्याच विश्वात असतात. मघाशी स्वप्नील शाळेतून आल्या आल्या तुला बिलगला ना, तसे ते कधी माझ्याजवळ आल्याचं मला आठवतच नाही.” इतक्या तटस्थपणे बोलली ती! जरासुद्धा विषाद नव्हता त्यात.
☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
“एनी प्रॉब्लेम? आज एवढी चिडचिड का करतेयस?” विकासचं हेच मला आवडतं. मी त्याच्यावर चिडले, करवादले तर तो इतरांच्या नव-यांसारखं माझ्यावरच न डाफरता शांतपणे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतो.
“जाऊ दे. तुला कळलं, तर तूही वैतागशील.”
“एक तर ‘जाऊ दे’ म्हणून शांत हो, नाहीतर बोलून मन मोकळं कर.”
“अरे, ताईचा फोन आला होता. तिचं काहीतरी काम आहे मुंबईत म्हणून आपल्याकडे राहायला येणार आहे.”
“नोsवेs. त्यांना सांग, हॉटेलमध्ये उतरा म्हणून. आमचं घर लहान आहे म्हणावं.”
“मी सांगितलं तिला तसं पण रडत होती रे ती.”
“वा! पैसेवाली, बंगलेवाली माणसं रडतात?”
“विकास, प्लीsज.”
“ठीक आहे. येऊ दे त्यांना. मी दादाकडे राहायला जातो .मला तो स्वत:चा मोठेपणा, दुस-याला सतत खिजवणं वगैरे अजिबात आवडत नाही .त्यात पुन्हा सकाळच्या वेळी त्या बाथरूम अडवून बसणार.”
” आधीच मला एवढं टेन्शन आलंय आणि असं काय काय बडबडून तू ते आणखी वाढवतोयस.”
आता मी रडायला सुरुवात करणार, म्हटल्यावर विकासने चटकन माघार घेतली, “ओके.ओके. डोन्ट वरी. आय अॅम विथ यू. आपण दोघं मिळून संकटाचा सामना करू या आणि लवकरात लवकर त्या संकटाला पळवून लावूया. बाकी तुझी ताई पळताना………..”
मग आम्ही दोघंही हसायला लागलो.
अर्थात तेव्हा हसू आलं, तरी पूर्वीची आठवण डंख मारतच होती.
लग्नाला वर्ष व्हायच्या आतच आम्ही स्वत:चं घर -तेही वन बी-एच-के – घेतलं, तेव्हा आम्हाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. आम्ही दोघांनी किती हौसेने सजवलं ते! आमचा स्वर्गच होता तो. मी कौतुकाने आई, बाबा आणि ताईला राहायला बोलावलं.
घरात शिरताक्षणीच ताई वैतागली, “एवढं अगदी ‘घर घेतलं, घर घेतलं’ करत होतीस, ते हेsघर? आमच्या बंगल्यातली माझी खोलीच तुझ्या अख्ख्या घराएवढी आहे .आणि तुझ्या या बेडरूमएवढं माझं बाथरूम आहे.”
“अग, लग्नापूर्वी तू राहायचीस ते घर केवढं होतं, ते विसरलीस?” बाबा चिडले.
“ते आता जुनं झालं. आता मला ऐसपैस राहायची सवय झालीय. मला नाही बाई जमायचं एवढ्याशा खुराड्यात राहायला.”
माझे डोळे भरले. विकासचाही चेहरा पडला.
“आता तीन-चार तास प्रवास करून आलेय. लगेच परत जायचं त्राण नाहीय माझ्यात. माझा ड्रायव्हरही दमला असेल. पण उद्या सकाळी उठल्या उठल्या मी निघणार.”
सकाळी उठल्याबरोबर ती जी बाथरूममध्ये जाऊन बसली, ती बाहेर येण्याचं नावच घेईना. तासाभराने ती बाहेर आली. मग आरशासमोर पाऊण-एक तास तरी तिचं प्रसाधन चाललं होतं.
ती निघाली, तेव्हा मी तोंडदेखलंही “पुन्हा ये ग” म्हटलं नाही. विकास नाराजच होता. बाबाही चिडलेले होते. आईने मात्र “जाऊ दे. आपल्या संसारात सुखी आहे ना! मग झालं तर,” म्हणून स्वत:चीच समजूत घातली.
“ड्रायव्हरला कुठे उतरवायला सांगू मी? चांगल्या पॉश ठिकाणी सांग हं. तिथून तू मला तुझ्या घरी ने. त्याला कळायला नको, तू कसल्या जागी राहतेस ते.”
तिला पेडर रोडला उतरायला लावून आपण तिथे अजिबात न फिरकण्याचा मला मोह झाला. पण मग कोणाला फोन करायचं तरी ताईला सुचलं असतं की नाही, कुणास ठाऊक.
नुकतंच उजाडलं होतं. सूर्याची कोवळी सोनेरी किरणं सगळीकडे पसरली होती. रस्त्यावर रहदारी वाढायला लागली होती. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोकळ्या जागेत काही झोपड्या उभारलेल्या होत्या. आणि तिथे, आज दिवसभर काय काय करायचं यावर विचार चालला होता.प्रत्येक जण काही ना काही सांगत होता. त्यातली एक बाई तिच्या मनातली योजना सांगतांना म्हणाली की —-
“बिन्नी, अगं काल सकाळी केलेल्या खेळात तू तर कमालच केलीस अगदी. दोर तुटला तेव्हा तू त्याचं टोक कसं घट्ट पकडलंस, आणि त्याला लोंबकळत शेवटपर्यंत कशी पोहोचलीस हे कुणाला कळलंही नाही. पाहणाऱ्यांना वाटलं की तो तुझ्या खेळाचाच एक भाग आहे. किती टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी ….. बाप रे….. त्या खेळात सगळ्यात जास्त पैसे मिळाले.”
“खाली पडले असते ना तर मेलेच असते माय मी. बानी आणि भैयानी तो दोर खूप उंचावर बांधला होता. खाली पहातांना मला चक्कर येत होती खरंच.”
“अगं पोरी, दोर बांधण्यासाठी कात्रीसारखे जे बांबू बांधले होते ना, त्यातला एक बांबू ऐनवेळी मोडला. म्हणून तुझ्या बाने दोराचं दुसरं टोक झाडाला बांधलं होतं. पण आज परत असं होणार नाही. त्याने नवे बांबू विकत आणलेत. आणि ढोलही चांगले शेकून घेतले आहेत. आणि आज रविवार आहे ना? आज बाजारात चार-पाच ठिकाणी दोर बांधुयात. भैय्या आणि बा अगदी जोरात ढोल वाजवतील. तू हातात काठी पकडून नाचत नाचत अगदी आरामात दोरावरून पलीकडे जायचंस. आणि घाई अजिबात करायची नाही. लोक अगदी श्वास रोखून तुझ्याकडे बघत असतात. त्या दोरावरून चालत दुसऱ्या टोकावर पोचायला तू जेवढा वेळ लावशील ना, तितकी लोकांवर जास्त छाप पडते, आणि मग त्यांचे खिसे जास्त मोकळे होतात. आणि हो, लक्षात ठेव, दोर कितीही उंचावर असला तरी जमिनीकडे अजिबात बघायचं नाहीस. तसं जर पाहिलंस तर डोळ्यावर अंधारी यायला लागते आणि मग तोल बिघडतो ….” बोलता बोलता आईने आणखी दोन चॉकलेटं बिन्नीपुढे धरली.
पण बिन्नीला ती चॉकलेटं घेण्याची इच्छाच झाली नाही. एकदम मान उंचावून तिने सूर्याकडे पाहिलं. जणू काही त्याच्यातली ऊर्जा ती स्वतःत भरून घेत होती. आणि तिने अचानक विचारलं ….. “आई तुम्ही लोक दरवेळी मलाच का चढायला लावता त्या दोरावर? भैय्याला का नाही चढवत कधी?”
“अगं आपल्या या सबंध वस्तीतल्या एका तरी मुलाला असा दोरावरचा खेळ करतांना कधी पाहिलं आहेस का तू? जास्त शहाणपणा सुचायला लागला आहे तुला. चल पटकन आंघोळ करून घे. गरम गरम पाणी काढून देते तुला….” असं म्हणत बिन्नीची आई उठून बाहेर गेली आणि उघड्यावर पेटवलेल्या चुलीतला विस्तव फुंकर मारून तिने आणखी फुलवला.
बिन्नीचे डोळे भरून आले होते… ते दुःखाने की संतापाने हे तिलाही सांगता आलं नसतं. डोक्यात एकच विचार घुमत होता—” म्हणजे एक वेळ मुलीचा जीव गेला तरी चालेल यांना…. पण मुलाचा?
मूळ हिंदी कथा : श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मोहल्ल्याचा कचरा खरकटं ज्या कचराकुंडीत टाकले जाते; त्याच्या आजूबाजूसही कचर्याचा ढीग साचलेला असतो. पॉलिथिनच्या पिशव्या, वर्तमानपत्राचे कागद, नारळ, तुटलेले कप, काचेचे तुकडे, फुटक्या बशा, फाटक्या चपला बूट, कपड्यांचा चिंध्या आणि काय न् काय!
आतासुद्धा त्या कचर्याच्या पसार्यात गाई, बकर्या, कुत्री तोंड खुपसत हिंडत आहेत. त्याबरोबरच माशांच्या झुंडीच्या झुंडी त्यावर भिनभिनताहेत. इतक्यात दोन दहा-बारा वर्षांची पोरं तिथं आली, त्यांच्या हातात प्लास्टिकची मोठी पोती होती; त्यांना कचरा वेचून विशिष्ट वस्तू पोत्यात टाकायच्या होत्या. गाई, बकर्या, कुत्रे आणि पोरं सगळेच आपल्या उपयोगी वस्तु त्या कचर्यात शोधत होते.
अचानक एका पोराच्या हातात एका पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठाचे पान आले, ज्यावर भारताचा नकाशा, तिरंगा झेंडा आणि काही नेत्यांची चित्र छापली होती.
त्याने दुसर्याला ते दाखवत विचारले, ‘‘पाहा तर, हे काय आहे?’’
‘‘काय माहीत, असेल काही तरी, पण आपल्या कामाचे नाही.’’ तेवढ्याच त्याची दृष्टी दुसरीकडे गेली, जिथे सिनेमाविषयक मासिकाची काही पाने पडली होती. झडप मारून त्याने ती उचलली आणि म्हणाला, ‘‘पाहा तर, हे काय आहे?’’
‘‘अरे ही तर आपली श्रीदेवी आहे, ही माधुरी दीक्षित आणि हा अमिताभ!’’ त्यांचे डोळे एकदम लकाक् लागले.
‘‘आपण ही चित्रं आपल्या खोलीच्या भिंतीवर लावू…’’ दोघं मग खाली बसली, आपल्या फाटक्या-मळक्या शर्टने त्या चित्रांवर लागलेली घाण पुसली आणि घडी करून नीटपणे खिशात ठेवली.
मग शांतपणे त्यांनी कचरा निवडण्याचा आपला उद्योग परत सुरू केला.
मूळ हिंदी कथा – सौभाग्य चिन्ह – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा
मो.- ९३२५२६१०७९
अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन
मो.-९८५०५६६४४२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 5 ☆ श्री आनंदहरी ☆
तो अचानक घरी आलेला पाहून त्याच्या आईला काळजीही वाटली होती आणि खूप आनंदही झाला होता. ‘ती का आली नाही?’ असे आई आपल्याला विचारेल असे त्याला वाटत होतं पण आईने काहीच विचारले नाही की बाबांनी नेहंमीसारखी तिची क्षेम-खुशाली विचारली नाही.. याचे त्याला राहून राहून आश्चर्यही वाटत होते आणि ‘सुंठीवाचून खोकला जातोय’ याचा आनंद ही होत होता.
घरी आल्यावर ज्या एका प्रश्नाने तो अस्वस्थ होता तो उद्भवलाच नव्हता. दुसऱ्या दिवशी कितीतरी वर्षांनी तो गावात फेरफटका मारून गावातच असणाऱ्या काही मित्रांना भेटून गप्पा मारून आला होता. तो आला होता त्या दिवशीच्या अस्वस्थतेचा मागमूसही त्याच्या मनात उरला नव्हता. ‘आपण उगाचंच फार विचार करत होतो, घरी यायचं टाळत होतो.’ असा विचार त्याच्या मनात येत होता.
बाबानी मळ्यात जाताना त्याला ‘येतोस?’ का विचारले आणि तो झटकन तयारही झाला. त्यालाही मळ्यात जाऊन यावे असे वाटत होतंच. तो शाळेत असताना मळ्यात गहू, हरभरा असायचा एखादा तुकडा खपली गहू ही केलेला असायचा.. भाजीचे चारदोन वाफे ही असायचे.. मळ्यात पाऊल ठेवताच त्याला हे आठवलं. आता जास्तीत जास्त ऊसच होता. गहू, हरभरा, खपली केली होतीच पण पोटापूरती. रानातल्या छपरात एक बाजलं टाकलेलं होतं. बाबा म्हणाले, “ऊसातली वैरण काडंस्तवर बस वाईच सपरात निवांत…”
“मी पण येतो ..”
“नगं, तुला सवं न्हाय ऱ्हायल्याली.. आलोच मी ..”
बाबा वैरण काढायला गेले.. तो मळ्यात फिरत राहिला. तो नोकरीला लागल्यावर दुसऱ्याच वर्षी मळ्यात दुसरी विहीर काढली होती. पाईपलाईन केली होती.. तेंव्हापासून बाबांची मोट सुटली होती.. नुसतं बटन दाबलं की साऱ्या मळ्यात पाणी दौडत होतं.. तो फिरून येऊन बांधावरच्या आंब्याखाली जाऊन गार सावलीत बसला. कितीतरी दिवसांनी तो मळ्यात असा निवांत आला होता.. कसलीही घाई नव्हती, गडबड नव्हती.
बाबांनी वैरणीचं ओझं छपराजवळ टाकलं आणि तो आंब्याखाली असणार हे ठाऊकच असल्यासारखे खांद्यावरच्या टॉवेलने घाम पुसत त्याच्याजवळ आले.
“आलास व्हय रं फेरी मारून ?”
“होय. बरेच दिवस जमलंच नाही यायला.. पण मळ्यात आले की जीव रमतो चांगला..” काहीतरी बोलायचं म्हणून पण मनातलं तो बोलून गेला.
“व्हय रं, अजून तुझी नाळ हाय मातीशी .. त् तुला ब्येस वाटणारच रं… आरं, येक डाव नाळ जुळली का मग न्हाय गमत त्येच्याबिगर .. मन ऱ्हातच न्हाय मग माणूस असूदेल न्हाय तर गावची माती. आन नाळ जुळायबी टाइम लागतो. पोरा, माणसाचं कसं असतंय बघ, सुकाळाची धा सालं ध्येनात ऱ्हात न्हाईत पर दुष्काळाचं एक साल तो इसरता इसरत न्हाई बग.. आरं, सुक्यात वलं बी जळून जात असतं..तसेच हाय आयुष्याचे.. आरं आपलीच पाच बोटं सारखी नस्त्यात ततं दोन माणसं सारखी कशी असतीली रं?.. अरं, शेजार शेजारी दोडका न दुधी टोकला तर दोन्हीबी संगच वाढतील, एकमेकांत गुततीली बी पर म्हणून दोडका दुधीगत आन दुधी दोडक्यागत कसा आसंल रं? आरं, तू कायबी बोलला न्हाईस तरी आय-बा ला काईचं उमगत न्हाई असे न्हाई… सूनबाई येत न्हाई ह्येचं वाईट वाटतं.. पर म्हणून ती फकस्त वाईटच हाय आसं नसतंय रं… परत्येक माणसात चांगलं वाईट असायचंच आन ती आस्तय ती बी फकस्त दुसऱ्याच्या नजरंत … परपंचा कुणाचाबी असुदेल त्यो असाच अस्तुय आन फुडबी तसाच ऱ्हाणार हाय.. .. कवा आपुन दोन पावलं माग तर कवा पुढं जायाचं आस्तं.. माणूस एकमेकांच्या दिशेनं चालाय लागलं तर जवळ ईल आन ईरुद्ध दिशेला चालाय लागला तर…? आरं , नाती जुळणं, तुटणं असुदेल न्हायतर माणसाचं असणं, नसणं असुदेल.. येवडंच नव्हं तर जगातलं समदंच एका घटकंचा खेळ असतोय रं.. आरे, परपंचातलं भांडान बी तसंच… तेवढी येक घटका टाळाय पायजे येवडं ध्येयात ठेव पोरा…”
तो बाबांचं ऐकत होता.त्यांना न बोलता, न सांगताही सारेच कळले होते… ते जे म्हणाले ते सारेच खरे होते.. आयुष्यातील सारेच क्षणिक असते ,.. त्याच्या -तिच्यातील राग, लोभ, मतभेद भांडण तंटा सारेच क्षणिक होतं, एका घटकेचाच खेळ होता …. तो क्षण, ती घटका विसरली तर…? तो क्षण तिथेच सोडून दिला तर?
तो उठला त्याने फोन लावला, “उद्या सकाळच्या बसला बस… मी वाट पाहतोय… बसशील ना?”
त्याच्या बाबांना फोनवरचे तिकडचे उत्तर ऐकू आले नव्हते तरी ते उत्तर त्याच्या खुललेल्या चेहऱ्यावरून कळले होते.. ते खुशीत हसले.
☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 4 ☆ श्री आनंदहरी ☆
आई – बाबांनी तिच्याबद्दल विचारलं तर काय सांगणार ? असा प्रश्न पडल्यामुळे गेले दोन दिवस त्याने मनातून गावी जावेसे वाटत असूनही स्वतःला रोखलं होते. दोन दिवस तसे खूपच चांगले गेले असे त्याला वाटत होतं.. पण मनात गावी जाऊन यायची इच्छा प्रबळ होऊ लागली होती. तो ती इच्छा जितकी मनात दाबत होता तितकीच ती उसळी मारून वर येत होती.
आपल्या मनातील, वागण्यातील बदल आपल्यापेक्षा आपल्या समोरच्या, जवळच्या व्यक्तीच्या चटकन लक्षात येत असतो.. दुपारी एकत्र चहा पीत असताना ऑफीसमधला त्याचा जवळचा मित्र म्हणाला,
“काय रे अस्वस्थ दिसतोयस ? काही अडचण आहे काय ?”
क्षणभर तो त्या मित्राकडे पहातच राहिला. पुढच्याच क्षणी म्हणाला,
” काही नाही रे… कधी वाटतंय गावी जाऊन आई- बाबांना भेटून यावे… कधी वाटतंय नको जायला..”
मित्राने जायला नको वाटण्याचे कारण विचारलं नाही पण म्हणाला, “धी कोणता विचार मनात आला होता?”
“गावी जावे असा..”
“मग टाक रजा आणि जा … मी तर तसेच करतो. मला तर असे वाटतं पहिला विचार काळजातून येतो.. आणि दुसरा नकारात्मक विचार मेंदूतून येतो.. हृदय आणि बुद्धी यांच्यातील हे युद्ध नेहमीच चालू असते रे आपल्या मनात..”
मित्रांचे बोलणे ऐकता ऐकताच त्याचे गावी जायचे निश्चित झाले होते.
दुसऱ्यादिवशी बस मध्ये बसताच त्याला त्याच्या आणि तिच्या पहिल्या प्रवासाची आठवण झाली.. क्षणभर मनात आठवणींची मालिकाच सुरू झाली.. आणि शेवटी तिच्या बेंगलोरच्या बदलीच्या वाक्क्यापाशी येऊन थांबली.. व्यथित मनाने त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं.. बस वेगात धावत होती जवळ पाहिलं तर गती जाणवत होती पण दूरवर पाहिलं तर गती न जाणवता दृश्याची स्थिरता जाणवत होती… पावसाळ्याचे दिवस नसतानाही आभाळ दाटून आले होते.. अवेळी पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. ‘ असा अवेळी पाऊस सुखावह की दुःखावह ? ‘ अचानक त्याच्या मनात आले..
मनात आलेल्या या प्रश्नाने तो उगाचच दचकला.. त्याने प्रश्न झटकण्याचा प्रयत्न केला पण तो प्रश्न मनातून जाईन.. कोणत्याही प्रश्नाचे, समस्येचे असेच असते, जोवर आपण उत्तर शोधत नाही, उत्तर सापडत नाही तोवर ती सतावत राहते.. मोठी वाटत राहते.. तो क्षण सरला, उत्तर सापडले, उकल झाली की मात्र किरकोळ वाटत राहते. त्याचे मन विचार करत राहीलं..
‘असा पाऊस पीक काढणीच्यावेळी आला तर दुःखदायक वाटतो पण तोच दुष्काळी मुलखात पडला तर सुखावह ठरतो’ त्याच्या मनात उत्तर आले आणि त्याला बरे वाटले… म्हणजे कोणतीही गोष्ट चांगली की वाईट हे भावतालच्या परिस्थितीनुसार ठरते तर. त्याच्या मनात आले.
तो तासाभरात गावी पोहोचणार होता…’आपल्या मनात कधी कोणता विचार येईल काही सांगता येत नाही.. ‘ त्याच्या मनात येऊन तो स्वतःशीच हसला. पुढच्याच क्षणी’ घरी गेल्यावर आई तिच्याबद्दल विचारेल तेंव्हा काय उत्तर द्यावे?’ असे त्याच्या मनात आलं आणि तो विचार करतच मागे डोके टेकून बसला.. त्याने डोळे मिटले.. काही क्षणातच शिणल्यामुळे की रात्री पुरेशी झोप न झाल्यामुळे की खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळुकीमुळे कुणास ठाऊक पण त्याची झोप लागली.