मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोलकरीण… भाग – २ – लेखिका : सौ. आशा दिपक पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ मोलकरीण… भाग – २  – लेखिका – सुश्री आशा पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मिटींगला हजर झाले. विनया खाली मान घालुन अंग चोरुन उभी होती. मिटींग सुरु झाली.) – इथून पुढे — 

सोसायटीच्या सेक्रेटरीने मूळ मुद्यालाच हात घातला आणि डायरेक्ट चारुलता बाईंना प्रश्न केला, “मॅडम आपल्या सोसायटीतल्या मोलकरणीबाबत सगळं ठाऊक असतांनाही तुम्ही तिला कामावर ठेवलंत, इतकंच नाही तर सोसायटीतल्या इतर फॅमिलीनाही तिला कामावर ठेवण्यास तुम्ही सांगत आहात. या असल्या बाईमुळे आमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील का?

‘हो ना, आमच्या घरी तर वयात आलेली मुलं आहेत. शिवाय आमच्या सगळ्यांचे पतीही घरी एकटेच असतात कधीकधी. कसा विश्वास द्यायचा ह्या बाईचा?’ लेलेबाई बोलल्या त्यांच्या मिस्टर आणी इतर बर्‍याचजणांनी त्यांची री ओढली.

“हिला कामावरुन बंद करा चारुलताबाई, आत्तापर्यंत आम्ही हिला सोज्वळ म्हणत होतो. पण नवरा गेल्यापासुन ही बदललीच. विधवा, बेसहारा म्हणून कामं देतो आम्ही पण अहो ही चक्क धंदा करते. “रागिणी धुसफुसली

तशा, चारुलताबाई ओरडल्या, ‘थांब रागिणी, एखाद्यावर आरोप लावण्याआधी, विचार करावा माणसानं, गेली सहा वर्षे ही काम करते आपल्याकडे. आत्तापर्यंत तिची कोणती तक्रार होती?सहा महिन्यापुर्वी तिचा नवरा वारला. एक छोटं लेकरु घेऊन, खाली मान घालून आपलं काम करत जगते ती. ‘

‘म्हणून काय तिने असं….. ‘

मध्येच बोलणार्‍या रागिणीच्या मिस्टरांना थांबवत चारुलताबाई म्हणाल्या, ‘माझं पूर्ण होऊ दे, मिस्टर ऋषी. असं अचानक काय झालं की तुम्हाला विनया धंदा करते याचा शोध लागला जरा सांगाल आम्हाला?’

‘मी पाहिलंय हिला एका माणसाबरोबर. हे हिच्या लक्षात आलं आणि अहो ही चक्क रागिणी नसतांना मलाही खाणाखुणा करते, घाणेरडे हावभाव करते. ‘

‘नाही ओ साहेब मी कधीच असं केलं नाही. मी नाही ओ तसली बाई. कसं पटवून देऊ तुम्हाला?’विनया कळवळली.

तसं लेलेबाई पुन्हा करवादल्या.. ‘गप्प गं, तुझ्यासारख्या खाली मान घालणार्‍यांच्या अंगातच खेळ असतात. ‘.. खरं म्हणजे लेलेबाईंचा खरा राग चारुलतावर होता. कारण नेहमी टिपटाॅप राहणार्‍या, हसतमुख आणि इंप्रेसिव्ह चारुलताचा त्यांना हेवा वाटे. आता त्यांना विनयाला त्यांनी कामाला ठेवल्याचं आयतं कोलीत मिळालं होतं. ‘

‘पण माझेही मिस्टर बर्‍याचदा घरी असतात एकटे. त्यांना नाही अनुभव आला कधी असला. ‘चारुलताबाई बोलल्या.

तेवढ्यात सौ. पाटणकर कुजबुजल्या ‘तुमचं ध्यान शामळू आणि बायकोच्या ताटाखालचं मांजर’आणि हास्याची खसखस पिकली.

तशा आवाज चढवून चारुलताबाई म्हणाल्या, ‘ माझे मिस्टर शामळू नाहीत. तर स्त्रीचा आदर कसा करावा हे जाणतात ते. पाटणकरबाई तुमच्या ह्यांना विचारा. तुमच्या मिस्टरांनी आॅफिसमध्ये केलेली अफरातफर त्याना तुरुंगात घेऊन गेली असती. ती भानगड माझ्या शामळू मिस्टरांनीच हाताळली होती बरं का?’

तसे पाटणकर बायकोवर खेकसले, ‘ तूला कुठं काय बोलावं हे कळत नाही. आता तोंड मिटा.

‘चर्चेला भांडणाचं रुप येणार असा रंग दिसताच ‘ कामावरुन काढून टाका म्हणजे प्रश्न मिटेल.’..

तशा चारुलताबाई म्हणाल्या, ‘ते शक्य नाही. सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगते, मिस्टर ऋषी तुम्ही विनयाचा विनयभंग केला आहे, हे मान्य करा. गेल्या महिन्यात बुधवारी तुम्ही आॅफिसमधून दुपारीच घरी आला होता. कारण तुम्हाला माहित होतं विनया तुमच्याकडे दुपारनंतर येते आणि त्यादिवशी रागिणी मुलांना घेऊन भावाकडे गेली होती. तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये शिरलात आणि विनयाबरोबर चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केलात. त्याचवेळी विनयानं तुम्हाला बाजूला ढकललं आणि ओरडली मी हे सगळ्या सोसायटीला ओरडून सांगेन. तुम्ही घाबरलात विनयाची माफी मागितली. विनयानही एक संसार तुटायला नको म्हणून मोठ्या मनानं तुम्हाला माफ केलं. पण त्यानंतर रागिणी घरी असतानाच ती कामावर येऊ लागली. तुमच्याकडे ती ढूंकुनही पाहत नसे. चूकून लक्ष गूलं तर तिरस्कारानं मान फिरवत असे. तिला बिचारीला माहितच नव्हतं. माफी मागून तुम्ही स्वःतःला वाचवलं होतं, पण तुमच्यातलं भुकेलेलं जनावर अजूनही तसंच होत. आणि त्या रविवारी पुन्हा तुम्ही तोच प्रकार केलात. तेही रागिणी घरी असतांना. विनया स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करीत होती. तुम्ही मात्र तिनंच आपल्याला फशी पाडलंय याचा ओरडून कांगावा केलात. आणि रागिणीनेही कोणताही विचार न करता विनयावरच सगळं खापर फोडलं. ‘

‘काहीही बोलू नका. ह्यांच्यावर खोटे आरोप करतांना तुम्हाला लाज वाटायला हवी थोडी. ‘ रागिणी ओरडली.

तशा चारुलताबाई रागिणीला म्हणाल्या, ‘लाज तुझ्या नवर्‍याला वाटायला हवी रागिणी. विसरलीस दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन तू इथं आलीस आणि त्याचवेळी तुझ्या सासूबाई पाय घसरुन पडल्या तेव्हा ह्याच विनयानं एखाद्या पोक्त बाईसारखं आई होऊन तुझं सगळं काम केलं होतं स्वतःच्या सहा महिन्याच्या लेकराला घरी सोडून, ती तुला जपत होती. तेव्हा हा तुझा नवरा कंपनीच्या कामाच्या नावाखाली तूला घरात काडीची मदत करत नव्हता. कसं जमतं गं तुला इतक्या चटकन पलटायला. खरी कृतघ्न तर तू आहेस. कसलाच विचार न करता तू विनयाला दोषी ठरवलंस. ‘

”फुकट नाही केलं तिनं काम. जादाचे पैसे मोजलेत तिला. ह्या जादा पैशाची चटक लागली आहे तिला आणि तुम्ही बिनबुडाचे आरोप करता आहात. काय पुरावा आहे तुमच्याकडे?’

‘पुरावा… ?हा.. हा. पुरावा हवा. तुमच्या आॅफिसमध्ये तुम्ही त्यादिवशी पत्नीबरोबर तिच्या माहेरी जायचं असं सांगून अर्धी सुट्टी घेतलीत. आणि आपल्या सोसायटीतल्या प्रवेशद्वारावरचा सी. सी. टी. व्ही. सांगेलच.. तुम्ही घरी आलात पण रागिणीच्या माहेरी नाही गेलात. खरं आहे ना हे. आपल्या गेटवरचा वाॅचमनही हेच सांगेल. हो ना मिस्टर ऋषी. बर्‍याचवेळा अशी बरीच कारणं देऊन तुम्ही सुट्ट्या घेता कंपनीतून. कशासाठी ते सांगू का?’

आपलं बिंग फुटणार हे लक्षात येताच आणखी तमाशा नको म्हणून रागिणीच्या नवर्‍याने सरळ माफी मागितली. पण चारुलताबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी सरळ पोलिसकेसची धमकी दिली. तेव्हा रागिणीने पुढे येऊन विनयाची माफी मागितली आणि ह्यातून वाचव अशी विनवणी केली.

विनया हात जोडून म्हणाली ‘बाईसाहेब, तुम्ही होतात म्हणून मी वाचले. ह्यांना माफ करा. नवरा नसलेल्या बाईची काय हालत होते हे भोगतेय. रागिणीमॅडमनां त्रास नको. ‘

विनयाच्या मोठ्या मनाचं सगळ्यानाच कौतूक वाटलं. चारुलताबाई म्हणाल्या, ‘विनया माझ्याकडे कामाला राहिलच. तिचा मुलगा शिकून मोठा होईपर्यंत आणि हो आपल्या सोसायटीच्या औटहाऊसमध्ये तिची राहण्याची सोय करु. त्याचं भाडं मी स्वतः भरेन. ‘

चारुलताबाईंच्या आभाळाएवढ्या मोठ्या आधारानं विनया भारावून गेली. अश्विन दहावीला गेला आणि चारुलताबाई आॅस्ट्रेलियाला त्यांच्या मुलाकडे गेल्या. जवळजवळ दहा वर्षे त्या तिथेच राहिल्या. पण विनयाची चौकशी, तिच्या मुलाच्या शिक्षणाला मदत करणं त्यांनी सोडलं नाही. म्हणून तर अश्विनच्या इतक्या मोठ्या शिक्षणाचा खर्च विनया पेलू शकली होती.

पण दिड वर्षापूर्वी मिस्टर गेले आणि चारुलताबाईंना भारताची खूप आठवण येऊ लागली. म्हणून त्या परत ह्याच गुलमोहर सोसायटीतल्या आपल्या फ्लॅटमध्ये रहायला आल्या. रोज योगा, मैत्रिण कट्ठा, भजन, सत्संग ह्यात त्यांचा वेळ आनंदात जाऊ लागला. पण चार महिन्यापुर्वी त्यांना चक्कर येऊन पडल्याचं निमित्त झालं आणि त्या अंथरुणाला खिळल्या. मग मात्र विनयाचा जीव खालीवर होऊ लागला. सुरवातीला निमित्त काढून आत्ता मात्र राजरोसपणे ती चारुलताबाईंच्याकडे जायची. त्यांच्या मुलग्याने सुट्टी मिळत नसल्याने २४तास एक नर्स त्यांच्या सेवेसाठी ठेवली होती पण विनया मात्र दररोज त्यांना अगदी हलक्या हाताने आंघोळ घालत असे. त्यांना छान साडी नेसवून वेणी फणी करत असे. स्वतःच्या हाताने त्यांना भरवत असे. त्यांच्याशी गप्पा मारत असे. तशी नर्सही चांगलीच होती. पण विनयाच्या मायाळू स्पर्शात जी जादू होती त्याचा असर दिसू लागला चारुलताबाई प्रसन्न राहू लागल्या. परवा तर डाॅ. म्हणाले अशीच प्रगती राहिली तर थोड्याच दिवसात तुम्ही स्वतःहून चालू लागाल. तेव्हा चारुलताबाई म्हणाल्या, ‘नक्कीच होईन डाॅ. कारण ही माझी लेक आहे ना विनया. तिच्यामुळे तर ही जादू झाली आहे. ‘

— हे सगळं सांगून झाल्यावर विनया म्हणाली, ‘आता तूच सांग अश्विन. एका बेसहारा, विधवा स्त्रीला तिचं लेकरु अनाथ होऊ नये म्हणून लेक मानणार्‍या, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार्‍या त्या महान आईला मी कशी विसरु? मला आता जायलाच हवं. माझ्या मालकीणबाई माझी वाट पहात असतील. ‘ इतकं बोलून विनया घराबाहेर पडली. काय व्हायचं ते होऊ द्या पण सगळं बोलल्यावर तिला आता हलकं झाल्यासारखं वाटत होतं.

सायंकाळ झाली. चारुलताबाईंना चहा बिस्किटे भरवून घरी जायच्या तयारीत असलेल्या विनयाला फ्लॅटची बेल ऐकू आली. तिसरं कुणीही घरी न येणार्‍या घराची बेल अशी कुणी वाजविली हे पहायला तिनं दार उघडलं आणि ती पाहतच राहिली. दारात अश्विन आणि अस्मि उभे होते. दोघेही आत आले. बेडवर उठुन बसलेल्या चारुलताबाईंकडे पहात अश्विन म्हणाला, “अगं आई, आटप लवकर. तुझ्या आईलाही तयार कर. अगं आजीची सेवा फक्त तिच्या लेकीनेच केलेली तुझ्या लेकाला आणि सुनेलाही नाही आवडणार. आपण ह्यांना आपल्या घरी घेऊन जात आहोत. तिच्या लेकीकडे. चल आटप लवकर. ” विनयाचे डोळे भरुन आले. तिला वाटलं, बघता बघता आपला लेक कित्ती मोठा झाला, वयानं आणि मनानही. तिनं लेकाला आणि सूनेला घट्ट छातीशी धरलं. चारुलताबाई मात्र ह्या आनंदी आणि सुखद धक्क्यानं प्रसन्न हसल्या.. नेहमीसारखं…

— समाप्त —

लेखिका : सौ. आशा दिपक पाटील

कोल्हापूर (काॅपीराईट सुरक्षित)

प्रस्तुती –  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोलकरीण… भाग – १ – लेखिका : सौ. आशा दिपक पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ मोलकरीण… भाग – १ – लेखिका – सुश्री आशा पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

“आज पुन्हा गेलीस तू आई तिकडे?तुला कितीदा सांगितलं ह्या श्रीमंत बायकांना फार माज असतो. पुन्हा तू जर त्या चारुलताबाईंकडे गेलीस तर खबरदार” मुलाचं हे रोजचंच होतं;पण आज त्यांच्या सुनेनंही त्यामध्ये तोंड घातलं, “घरात इतकी श्रीमंती असतांना ह्या रोज जाऊन कामवालीसारखं त्या बाईची सेवा करतात. मला तर बाई सोसायटीत कित्ती लाज वाटते. काही तर मुद्दाम विचारतात, तुझी सासू मोलकरीण आहे का गुलमोहरमध्य?”हे बोलणं ऐकून विनया आतल्या आत तुटत होती. “आज सोक्षमोक्ष लागू दे आई. तू जाणं बंद करणार आहेस की नाही तिकडे?” मुलाने निर्वाणीचं विचारलं. विनयाला माहित होतं, तिचा मुलगा अश्विन ह्या गुलमोहर सोसायटीतल्या जुन्या घरमालकीणींचा तिरस्कार करतो आणि त्याला कारणही तसंच होतं. गरीबीपोटी आईचा अपमान, हिडीस पिडीस करणार्‍या ह्या सोसायटीनं त्याचं बालपण करपून टाकलं होतं. पण ह्याच गुलमोहरातल्या एका गुलमोहराच्या घरानं आईला गुलमोहर बनवलं होतं हे त्याला माहित नव्हतं आणि ते कळायचं त्याचं वयही नव्हतं. श्रीमंतांवरच्या ह्या रागापोटीच तर तो पोटतिडकीनं शिक्षण घेऊन आज एका मोठ्या कंपनीत आॅफिसर होता. त्याची बायकोही त्याच्यासारखीच उच्च नोकरदार. महिन्याला घरात लाखानं पैसा येत होता. त्या पैशातूनच त्याने ह्याच सोसायटीसमोर हा पाच खोल्यांचा प्रशस्त बंगला बांधला होता. डोळ्याचं पारणं फेडणार्‍या सुखसोयी होत्या त्याच्या बंगल्यामध्ये. नोकरचाकर होते. जाणारे येणारे क्षणभर बंगल्यावर नजर फिरवूनच पुढे जात. आईच्या कष्टाची जाण असणारा तो आईला तर काडीलाही हात लाऊ देत नसे. अस्मि त्याची बायकोही सासूबाईंचं मन राखून राहत असे. ज्या सोसायटीत त्याची आई धुणीभांडी करत असे, त्याच सोसायटीत आज त्याच्या आईला मानानं आग्रहानं बोलावलं जाई. काही वर्षापूर्वी त्यांना हिडीसफिडीस करणार्‍या ह्या बायका जेव्हा त्याच्या आईला असा मान देत तेव्हा अश्विनला स्वतःचा फार अभिमान वाटे.

पण गेल्या तीन महिन्यापासून घरातलं वातावरण बिनसलं होतं. त्याला कारण होत्या ह्याच सोसायटीतल्या आईच्या जुन्या मालकीणबाई चारुलताबाई. भरजरी वस्त्रांत नटलेली आणि दागिन्यानं सजलेली त्याची आई ह्यांच्या घरी जाऊन चक्क ह्या चारुलताबाईंचं सगळं काम करायची. त्यांना रोज एक नवीन आणि हौसेनं आरोग्यवर्धक पदार्थ बनवून भरवायची. आजही विनयाने साबूदाण्याची मऊसुत, गोड खीर बनवून तो नक्षिदार वाडगा घेऊन ती चारुलता बाईंच्या फ्लॅटकडे चालली होती आणि तेच पाहून हट्टाला पेटल्यासारखा अश्विन आडवा आला होता. एरवी समंजपणे वागणारी सूनही चक्क विरोधात जाउन बोलायला लागली होती. हा सगळा ताण सहन न होऊन विनया ओरडली, “बस्स कर रे अश्विन, हो मी आजही मोलकरीणच आहे पण फक्त चारुलताबाईंची आणि हे बाईंनाही आवडत नाही पण मी स्वेच्छेने स्वीकारलंय हे पद. का ते तुला कळणार नाही पण आज बोलतेच तुझ्याशी. आणि हो सूनबाई तू ही ऐक. ‘

असं म्हणून विनयाने सगळं सांगायला सूरवात केली. अख्खा भूतकाळ एका व्यथेची गाथा होऊन तिच्यापुढे उभा राहिला.

विनया आणि सुहास गावाकडून शहरात काम मिळेल म्हणून आलेलं एक गरीब जोडपं. शहरातल्याच झोपडपट्टीत इतर अनेकासारखं त्यांचं जगणं सुरु झालं. सुहास एका छोट्या फॅक्टरीत हेल्पर म्हणून जाऊ लागला आणि विनयानंही इथल्या बायकांच्या ओळखीनं धुण्याभांड्याचं काम मिळवलं. ती ज्या सोसायटीत काम करीत होती, त्या सोसायटीचं नाव होतं गुलमोहर. गुलमोहरासारखीच श्रीमंत आणि उच्चभ्रु सोसायटी. श्रीमंतीचा तोरा मिरवणार्‍या फॅमिली. पण स्वच्छ, चटपटीत आणि कामापुरतंच काम ठेवणारी मितभाषी विनया सोसायटीत सगळ्यांची आवडती होऊन गेली. चापुनचोपुन साडी, कपाळावर मोठी लाल टिकली, गळ्यात काळ्या मण्यांचं दोन अगदी छोट्या सोन्याच्या वाट्या असणारं मंगळसूत्र, लांबलचक केसांचा घट्ट अंबाडा, गव्हाळ शेलाटा बांधा आणि काळेभोर मायाळू डोळे असणारी विनया सुहासचीही खूप लाडकी होती. अफाट प्रेम होतं दोघांच एकमेकांवर. वर्षभरातच त्यांच्या सुखात अश्विनच्या येण्यानं आनंदाचं चांदणं पसरलं. बघताबघता अश्विन चार वर्षांचा झाला. दोन अडीच महिन्याचा झाल्यापासून त्याला शेजारच्या आजीकडे ठेवून विनया कामाला जायची. पण घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी अशी तिची अवस्था व्हायची. सुहास तर बाळाचे कित्ती लाड करायचा. ओढाताण असायची पण आहे त्यात समाधान मानणारी ही नवराबायको त्यामुळेच सुखी होती. पण म्हणतात ना, काहीवेळा नियती खूप परीक्षा घेते एखाद्याची. अगदी तस्सच झालं. साहित्य टेंपोत चढवत असतांना कसं कोण जाणे पण सुहासचा तोल गेला आणि तो एकदम साहित्य अंगावर घेऊन पडला. दवाखान्यात नेईपर्यंत सगळं संपलं होतं. त्याचा निष्प्राण देह पाहून विनयानं फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकत होता. सैरभैर झाल्यासारखी ती आक्रोश करत होती. माती चावत होती. आसपासच्या बायांनी तिला सावरलं. लेकराकडे तरी बघ असं म्हणत छोट्या अश्विनला तिच्याजवळ दिलं. अश्विनकडं पाहताच तिला थोडं भान आलं. या पोरासाठी तिला जगणं गरजेचं होतं. सुहासचा जीव की प्राण होतं हे लेकरु. त्याला शिकवायचं खूप मोठं करायचं हे स्वप्न होतं त्याचं आणि तोच आता स्वप्नात येण्यासाठी निघून गेला होता. दुःखाचे कढ जगण्याला कठोर बनवत होते. नियतीनं केलेल्या विचित्र खेळानं एक हसतं खेळतं घर उजाड झालं होतं. मनावर दगड ठेवत विनया सावरली. पोटात अति रक्तस्त्राव झाल्यामूळे सुहास गेला असं निदान झालं. कंपनीकडून काही मिळणार नव्हतंच. गरीबाला विम्याचे लाड कुठले करता येणार?त्यात ही टेंपररी नोकरी असल्यानं, कंपनीही खाजगी असल्यानं हातात रुपयाही आला नाही.

सुहासचे बारा दिवस झाले आणि दुःखाचे कढ पोटात घेऊन पोटासाठी विनया कामावर रुजू झाली. कोरडी सहानूभुती दाखवण्यापलीकडे सोसायटीत काही झालं नाही. काम आटपत शेवटचं काम करण्यासाठी विनया चारुलताबाईंच्या घरी गेली. ह्या बाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. अगदी शिस्तप्रिय आणि कडक. विनयाही टरकून असे त्यांना. पण बाई विनाकारण कुणाला त्रास देत नसत. त्यांचे मिस्टर सरकारी खात्यात उच्च पदावर. मुलगा आॅस्ट्रेलियात आणि मुलगी सासरी दूर पेरु देशात. हे दोघेच पती पत्नी. सामाजिक कार्याची आवड असणार्‍या बाई आणि त्यांना पाठींबा देणारे साहेब. अगदी मेड फॉर इच आॅदर. आत्तापर्यंत कामास काम आणि बोलणं ठेवणार्‍या चारुलताला मोकळा गळा, मोकळं कपाळ घेऊन आणि दहाबारा दिवसातच रया गेलेली विनया पाहून भडभडून आलं. त्यांच्या लेकीच्याच वयाची होती ती. त्यांनी काही न बोलता चहाचा कप विनयाच्या हातात दिला आणि तिच्या पाठीवर थोपटलं. बस्स ह्या एका साध्या कृतीनही विनयाला जाणवलं, कुणीतरी आहे आपल्या वेदना जाणणारं. हळूहळू दुःख मागे पडत गेलं. विनया कामात रुळून गेली. अश्विन आता शाळेत जाऊ लागला होता. नाही म्हटलं तरी खर्च वाढतच होता. ह्या महागाईच्या दिवसात कठीण होत होतं दिवसें दिवस. अाणि अशातच एक आभाळ कोसळणारी घटना घडली. दाणदाण पाय आपटत आणि तोंडाचा पट्टा चालवत रागिणीने विनयाला फ्लॅटबाहेर ढकललं आणि ती ओरडली, ‘नवरा नाही म्हणून असले धंदे करते. माझ्याच घरात शेण खायला तुला लाज नाही वाटत. पुन्हा ह्या सोसायटीत पाय टाकलास तर याद राख. ‘ रागिणीच्या ह्या आकांडतांडवानं अख्खी सोसायटी जमा झाली तिच्या फ्लॅटसमोर. प्रत्येकजण काय झाल?काय झालं? असं विचारु लागला. तसं रागिणी जोरात ओरडली, “अहो ही धंदा करते चक्क. माझ्या मिस्टरांनी पाहिलंय हिला. म्हणून त्यांनाही.. शी, सांगवत नाही. इथं अगदी सोज्वळ म्हणून मिरवते आणि असले धंदे. हिला कुणीही कामावर ठेवायचं नाही आजपासून. ” असं सांगून रागिणीने तिला बाहेर काढलं. रडूनभेकून हात जोडणार्‍या, हतबल, अभागी स्त्रीला कोणत्याही स्त्रीनं आधार दिला नाही. आत्तापर्यंत निष्कलंक असणारी एक स्त्री आज क्षणात कुलटा ठरली होती. तोंडात पदराचा बोळा घेऊन, चेहरा लपवत निघालेली विनया नुकत्याच बाहेरुन येणार्‍या चारुलताना धडकली. त्यांच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या. ‘अगं जरा बघून चाल की’, असं म्हणत तिच्याकडे त्या पाहतात तोच, ‘चुकलं हो बाईसाहेब. ‘ म्हणत त्यांच्या हातात भरभर साहित्य गोळा करुन विनया देऊ लागल्या. तिच्या ह्या भांबावलेल्या, घाबरलेल्या, गालावर बोटांचे ठसे उठलेल्या, बेहाल अवस्थेला पाहून चारुलताबाईंनी तिचा हात धरला आणि त्या म्हणाल्या, ” विनया तू?आणि हे काय झालंय तुला? ” आत्तापर्यंत सगळ्यांनी लाथाडून, फिरवलेल्या नजरांनी घायाळ झालेली विनया कोसळली आणि गदगदून रडू लागली. चारुलताबाई तिला सरळ आपल्या फ्लॅटवर घेऊन आल्या. काय, कसं झालं ते सगळं त्यांनी विनयाकडून ऐकलं. त्या शांतपणे म्हणाल्या, ‘ तू उद्या सोसायटीत कामाला ये. कुणी नाही घेतलं तर मी तूला कायम कामावर ठेवीन. ‘ ‘पण रागिणीमॅडम, त्या मला कच्ची फाडून खातील. ‘ ती घाबरुन म्हणाली. ‘तिचं मी पाहून घेईन. पण तू कामावर यायचं बंद करु नको’ चारुलताबाईंनी तिला धीर दिला. ह्रदयात वेदनेचा अंगार लपवत विनया दुसरे दिवशी गुलमोहर सोसायटीची पायरी चढली. गरीबीला गरज असते आणि गरजेला लाज नसते हेच खरं. तिनं नेहमीच्या घरांची बेल दाबली पण तिला पाहताच सगळ्यांनी फटाफट दरवाजे बंद केले… आम्हाला तुझी गरज नाही म्हणत. पण चारुलताबाईनी तिला घरचं काम करू दिलं. ही बातमी सोसायटीभर पसरली. दहा पंधरा दिवस झाले तरी विनया सोसायटीत येतच होती. चारुलताबाईंबरोबर आणखी एकदोघींनी तिला पुन्हा घरकामावर घेतले आणि रागिणीचा थयथयाट झाला. तिने सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार केली. सोसायटीची मिटींग बोलावली. आरोपीच्या पिंजर्‍यात होत्या चारुलताबाई कारण त्यांनी एका चारित्र्यहीन बाईला आपल्या घरी कामावर ठेवलं होतं ना. झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मिटींगला हजर झाले. विनया खाली मान घालुन अंग चोरुन उभी होती. मिटींग सुरु झाली.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सौ. आशा दिपक पाटील

कोल्हापूर (काॅपीराईट सुरक्षित)

प्रस्तुती –  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लाईफ विदाऊट पुणे…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ लाईफ विदाऊट पुणे☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

दहा वर्ष.

दहा वर्ष झाली रेवाच्या लग्नाला.

खरंच कळलं नाही. भुर्रकन उडून गेली ही वर्ष.

आठवतंय तर..

किती तरी चांगली स्थळं नाकारलेली तिनं.

बरं झालं. नाहीतर, रवी कसा मिळाला असता तिला ?

कारण ?.. कारण एकच… पुण्याबाहेर जायचं नाही… पुणं रक्तात… नसानसात… रोमारोमात.

.. ‘पुणं’ जगण्याचा आॅक्सीजन.

रेवा विदाऊट पुणे ? शक्यच नाही.

रेवानं आधीपासूनच ठरवलेलं. “मुलगा कसाही असला, तरी चालेल. काळा कुट्ट, तिरळा, टकला.

दोन खोल्यांत सुखानं संसार करीन. पण… पुण्यातला हवा… “

अगदी आयटी वाल्यांनाही, सरळ नाही म्हणायची ती.

‘अय्यो… यांचा काय भरवसा ? म्हणायला आज हिंजवडीत… उद्या उठून चालायला लागतील, बंगलोरला.

नाहीतर हैद्राबादला… परवा एकदम स्टेटस् ला. नको रे बाबा.. ‘

नशीब काढलं पोरीनं. रवी मिळाला तिला. शनवारात माहेर… नारायणात सासर. अगदी मुठेला सुद्धा ओलांडायला नको.

सुख म्हणजे दुसरं काय असतं ? हेच…

नारायणात पत्र्या मारूतीशी तिचं सासर.

“परशुराम क्षुधाशांती गृह”.. अस्सल मराठमोळ्या चवीचं, धो धो चालणारं हाॅटेल.

रवी, गल्ल्यावर बसणारी तिसरी पिढी… हाॅटेलमधल्या कामगारांचीही तिसरी पिढी. रवीच्या आजोबांनी चालू केलेलं.

तिथलं थालीपीठ, साबुदाण्याची खिचडी, आणि साजूक तुपातला अस्सल बदामी शिरा.. अजून बरच काही.

एकही पदार्थ कधी शिल्लक रहायचा नाही.

हाॅटेल पहिल्यापासून फेमस… टोकन सिस्टम. दोन मजली हाॅटेल… जागा कमी पडायची. मोस्ट अवेटींग वेटींग..

तिसऱ्या, चौथ्या मजल्यावर घर… ऐसपैस… प्रशस्त.

रवी हाॅटेलमधे कमीच असायचा. त्याचे बाबाच सांभाळायचे हाॅटेल. रवीनं रीतसर हाॅटेल मॅनेजमेंट केलेलं.

आयटी कंपनीतली दोन कॅन्टीन्स घेतलेली चालवायला. त्याच्याकडे चांगली टीम होती. थोडी धावपळ व्हायची. मस्त बस्तान बसलं होतं.

रवी तसा मवाळ… करलो दुनिया मुठ्ठीमें टाईप. रेवाच्या मुठीतला प्राणी. सासू सासरे प्रेमळ. साठ डेसीबल्सच्या वरच्या आवाजाची सवयच नव्हती घराला.

रेवा तिच्या माहेरी, शनवारात नर्सरी स्कूल चालवायची. लग्न झाल्यावर रवी म्हणाला…

” कॅरी आॅन रेवा… “

रवीनं नळस्टाॅपला एक बऱ्यापैकी मोठी जागा घेतली. सध्या भाड्यानेच.

रेवाचं नर्सरी स्कूल झोकात. ” लिटील एन्जल्स “

त्यांच्या घरात पण आलीय, आता एक लिटील एन्जल… तन्वी.

तन्वी आता जरा, मोठी झालीय. आजीबरोबर मस्त राहते. रेवा दिवसभर तिच्या नर्सरी स्कूलमधे बिझी.

पुढच्या वर्षी तन्वी पण जायला लागेल. घरची शाळा.

एकंदर काय ? रेवा जाम खुष होती. ” जिंदगी का सफर… ” काहीच suffer नव्हतं.

– – अचानक काल विनायकराव… रवीच्या बाबांचे सख्खे मित्र. परशुरामला रहायचे. मोठ्ठी वाडी होती त्यांची… डोंगरउतारी… वाशिष्ठीकडे तोंड करून. अप्रतिम नजारा दिसायचा. ऐसपैस मोठ्ठं घर. नुकतंच बांधलेलं. समीर.. त्यांचा एकुलता एक मुलगा आस्ट्रेलियात असतो. इकडे परत यायची शक्यता नाही.

तिथं दोघंच म्हातारा म्हातारी. बऱ्याच वेळा जाऊन आलीयेत, सगळी तिथं. दोन घरात खूप घरोबा.

काल रात्री विनायकराव अचानक आले. बऱ्याच वेळ रवीशी, त्याच्या बाबांशी बोलणं चाललेलं. रेवा, तिची सासू स्वयपाकघरात. जेवणं आटोपली. सगळी हाॅलमधे जमली. रवीच्या बाबांनी सुरुवात केली.

.. ” विनायकनं एक प्रोपोजल ठेवलंय. परशुरामला त्याची वाडी, तुम्ही बघितलीच आहे. तिथं एक हाॅलीडे रिसाॅर्ट डेव्हलप करतोय तो. समीरनं… त्याच्या लेकानं, बऱ्याच डाॅलर्सचा रतीब घातलाय तिथं. काम पूर्ण होत आलंय. पंचवीस तीस एसी रूम्स… काॅन्फरन्स हाॅल… स्विमिंग पूल… ईनडोअर गेम्स… प्युअर व्हेज रेस्टाॅरंट… सगळ्या थ्री स्टार फॅसिलिटीज … सगळा सेट अप रेडी आहे. समीर काही इकडे येणार नाहीये.

रवीला पार्टनरशीप ऑफर करतोय तो. मला वाटतं रवीनं जावं. फूड इंडस्ट्रीजचा त्याला एक्सपिरीयन्स आहेच. हाॅलीडे होम थ्रू बरंच शिकायला मिळेल. इथलं हाॅटेल अजून काही वर्ष तरी मी नक्की सांभाळीन.

निदान वर्षभर तरी जावं. नाही आवडलं तर, ये परत… “

रवी कनफ्युजलेला. तो रेवा की नस नस से वाकीफ. पुण्याबाहेर पडायचं ? शक्यच नाही… त्याचा डिसीजन ठरलेला… बायकोशी दुश्मनी ?.. नको रे बाबा ?

तो नाही म्हणणार, एवढ्यात रेवा उवाच.

” बाबा, आम्ही तयार आहोत. पण एकच वर्ष. जास्त नाही. पुढे मागे पुण्यात एखाद मोठ्ठ हाॅटेल, चालवायला घेवू आपण. हा एक्पेरीअन्स खूप काही शिकवून जाईल. “

…. अजूबा… रेवानं सोप्पं गणित मांडलेलं. एकच वर्ष तर काढायचंय. यूऽऽ कट जायेगा..

खरं सांगू ? एक नाही, साडेचार वर्ष झालीयेत आता. “वाशिष्ठी दर्शन मोटेल” जोरात चाललंय. विनायकराव आणि काकू खूष.

समीर तर रवीला म्हणतोय, ‘तूच सांभाळ सगळं, लाईफटाईम. ‘

वाडीतल्या रिकाम्या जागेवर, रेवाचं स्कूल उभं राहिलंय… ‘समीर फायनान्स’च्या सहकार्यानं.

चिपळूणातलं पहिलं आय सी एस ई स्कूल… जोरात चालंलय. ” पुण्याच्या बाईंची शाळा ” फेमस झालीये.

तन्वीही मस्त रमलीये. रेवा पुणं विसरलीय बहुतेक.

परवाचीच गोष्ट… एक निवांत संध्याकाळ. रेवा आणि रवी गॅलरीत उभे…काॅफीच्या सोबतीला समोरची वाशिष्ठी.. वळणदार, नागमोडी.

“रेवा, मै तुम्हे कभी समझ ही नही पाया…. पुणं सोडून, तू कशी काय राहिलीस इथं ?”

रेवानं मोठ्ठा पाॅझ घेतला.

“रव्या, कोण म्हणतंय मी पुण्यापासून लांब आहे ? पुणं इथंच आहे, माझ्यासोबत.

पुणं म्हणजे फक्त पिनकोड नाहीये… पुणं म्हणजे संस्कार… पुणं म्हणजे लाईन ऑफ थिंकींग… पुणं म्हणजे वर्क कल्चर.. जे फक्त पुण्यात राहूनच, शिकता येतं. आज तू अन् मी इथं, आपापलं छोटसं विश्व उभारू शकलो ते याच संस्काराच्या जीवावर. आहे ते शिस्तीत सांभाळायचं, वाढवत न्यायचं. फुकाचा माज करायचा नाही. स्वतःची ओळख निर्माण करायची. अटकेपार डंका फडकवायचा. अन्… रिटायरमेंनंतर पुण्यात परत यायचं….. हे असलं, अस्सल जगणं, म्हणजेच पुणं… मी चुकत होते रव्या.. पुण्यापासून लांब गेलं की, पुण्याची किंमत कळते. माणूस शहाणा होतो. प्रगती करतो. “पुण्या”च्या वाटेवर चालू लागतो.

अस्सल पुणेकरानं, दोन चार वर्ष बाहेर काढावीतच… ते जाऊ दे. ही शाळा मला बारावीपर्यंत न्यायचीय.

तुझं हाॅटेल बारा महीने फुल्ल रहायला हवं.. ”

“होणार.. असंच होणार. वाशिष्ठीच्या साक्षीनं… ओंकारेश्वराच्या आशीर्वादानं… एकदा लेकीचं लग्न झालं, की जाऊ पुण्याला परत. अजून एक, जावई मात्र पुण्यातलाच हवा.. “

खरंय.. रेवा पुण्याशिवाय राहूच शकत नाही. रग रग में पुणे.. ” ये बयो लवकर परत…पुणं वाट बघतंय. ” 

– – ‘पुण्या’ची गणना कोण करी ?”

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चैत्रपालवी… भाग – २ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

सौ. राधिका भांडारकर 

? जीवनरंग ?

☆ चैत्रपालवी… भाग – २ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

(“या कशावरही आपण विश्वास ठेवायचा नाही. लोकांना म्हणावं आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. “…. पण असं होत नाही ना?) – इथून पुढे —

आणि आजकाल तर नंदा प्रत्येक गोष्ट वैयक्तिक व्यथेशाच जोडत होती.

कुणी म्हणायच, “देव तरी कसा असतो, नको तिथे उदंड देतो. आणि इथे पहा कशाचीही कमतरता नसूनही. “.

लोक का बोलतात?

काही दिवसांपूर्वी मैत्रिणीच्या डोहाळे जेवणाला ती खूप उत्साहाने गेली होती. खरोखरच ती खूप आनंदात होती. कुठलीही असूया, मत्सर, द्वेष भावनाही तिच्या मनात नव्हती. स्वच्छ, निर्मळ भावनेने त्या सोहळ्यात ती सामील झाली होती. पण मैत्रिणीच्या ओटी भरण्याच्या वेळी, तिच्या सासूबाई नंदाला अडवत म्हणाल्या,

” तू राहू दे. तू जे काय आणलं आहेस ना ते इथे ठेव. “

भयंकर दचकली नंदा. खूप मोठा धक्का होता हा. सर्वांसमोर आपण कुठेतरी कमी आहोत याचा जाहीरपणे केलेला उच्चार होता तो.

समाज बदललेला नाही. कुठला विकास? कुठली प्रगती? तेच सारे नासलेले विचार.

दुसऱ्या दिवशी मैत्रिणीचा फोनही आला.

” सॉरी ग! माझ्या सासूबाईंना कुठे काय बोलावं याचं भानच नसतं. तू नको इतकं मनावर घेऊस. त्यांच्या वतीने मीच तुझी क्षमा मागते. “

पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. यानंतर मात्र बारसे, डोहाळे जेवण अशा समारंभाला जाणं ती टाळू लागली. हळूहळू ती अशी तुटत चालली होती. एका कोषात जाऊ लागली. एकाकीपणाच्या भयानक पोकळीत शिरत गेली. सगळच मावळत गेलं. आनंद, हास्य, सौख्य. आयुष्य कोरडं झालं.

शास्त्रोक्त उपचारातूनही जी पंधरा वीस टक्क्यांची शक्यता होती, तीही फोल ठरली. श्रीरंगच्या नकळत नंदाने काही व्रतं, पूजा, स्तोत्रपठणे वगैरे केलं होतं. पण ईश्वराने झोळी भरलीच नाही.

ते निष्पर्ण झाड पुन्हा पुन्हा तिला सतावत होतं.

तिने मॉन्टेसरीचा कोर्स केला होता. श्रीरंगच्या हट्टा मुळेच तिने जवळच्या एका शाळेत बालवर्ग घेण्याचे ठरवले. ती शाळेत जाऊ लागली. मुलांची किलबिल, चिवचिव, हसणं, रडणं यात ती गुंतू लागली. एक विरंगुळा तिला मिळाला. पण एक दिवस तिच्या वर्गात, मुलांचे खेळ घेत असताना एक छोटासा अपघात झाला. एका मुलाला थोडं लागलं. त्याच्या नाकातून रक्त आलं. नंदाने त्याला व्यवस्थित सांभाळलेही. शांतही केलं. पण संध्याकाळी जेव्हा त्या मुलाच्या आईला हे समजलं तेव्हां ती थोडी तिच्यावर नाराज झाली.

” मुलाला काही झालं ना तर जीव कसा कळवळतो हे तुम्हाला नाही कळणार. “

या तिच्या बोलण्याने नंदाच्या डोळ्यातून अश्रुंचा पाऊसच कोसळला.

काय आपलं आयुष्य? कसं सावरायचं?? हे युद्ध होतं. फक्त हरवणारं.

अशीच उदासपणे गॅलरीत उभी राहून ती त्या निष्पर्ण झाडाकडे पाहत होती. खरं म्हणजे कधीतरी हे झाड हिरवगार होतं. बहरलेलं होतं. ही पानगळ कधी झाली? आणि आपल्याला ती आत्ताच का सतावते?

तिच्या पाठमोऱ्या खांद्यावर श्रीरंगने हलकेच हात ठेवले. तिला वळवलं. तिचा चेहरा हातात घेतला. डोळ्यातले वाहणारे अश्रू पुसले. आणि म्हणाला,

” ऐक. माझ्याकडे एक प्लॅन आहे. खरं म्हणजे ही कल्पना माझ्याच ग्रुप मधल्या मित्रांची. आमच्यात बरेच दिवस चर्चा चालू होती. योग्य, अयोग्य साऱ्या पातळीवर ताऊन सुलाखून या निष्कर्षावर पोहोचलो आहोत. “

नंदाला काहीच समजत नव्हतं. हा नक्की काय सांगतोय?

” हे बघ, ऐक ऐक, मी काय म्हणतोय ते.

” बोल. “

” आपण मूल अॅडाॅप्ट करूया. काय हरकत आहे? अगं जगात कितीतरी अनाथ मुलं आहेत, ज्यांच्या आई-वडिलांचा ठाव ठिकाणा नाही. जन्माला येणाऱ्या मुलांचा काय दोष असतो? आपण अशाच एखाद्या मुलाचं पालकत्व स्वीकारलं तर? “

नंदा पार हादरून गेली. इतकं सोपं आहे का हे?

” बघ. बायोलॉजिकली नसलो तरी आपण प्रेमाचं एक नातं नक्कीच निर्माण करू शकतो. “

” थांब. मला थोडा विचार करू दे. ” 

मात्र यानंतर दोघांच्या संवादाला एक विषय नक्कीच मिळाला होता. निराशा, मरगळ एका वेगळ्या वाटेवर वळवली जात होती. काहीतरी रचनात्मक मनात आकारत होतं. आता निसर्गाची वाट पाहायची नाही. मुल अडॉप्ट करायचं. कदाचित आपल्यासाठी हीच परमेश्वरी योजना असेल.

अनेक प्रश्नांचा उहापोह केला. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र मैत्रिणी, यांची नेमकी काय प्रतिक्रिया होईल? जे मूल घेऊ त्याच्यासोबत येणार्‍या अज्ञात अनुवांशिक गुणांचं काय? मूल वाढत असताना इतरांच्या, सभोवतालच्या, बेधडक प्रतिक्रियांचा त्याच्या मनावर काय परिणाम होईल? भविष्यात त्याने विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तरं देऊ शकू का? इथपर्यंत सगळ्या शंका कुशंकांचं चर्वण झालं. पण एक मात्र खरं— मूल अडॉप्ट करण्याच्या विचारातून मात्र माघार घेतली गेली नाही. मुलगी अॅडाॉप्ट करुया या विचारावरही एकमत झालं.

श्रीरंगच्या मित्राच्या, एका सामाजिक काम करणाऱ्या नातेवाईक महिलेनी एका आश्रमाची संपूर्ण माहिती दिली. अॅडाॅप्शनच्या कायदेशीर बाबी, भरावे लागणारे अर्ज, अटी, नियम, लागणारा वेळ याविषयी सविस्तर माहिती तिने दिली.

श्रीरंग आणि नंदा एक दिवस त्या आश्रमात जाऊनही आले. तिथल्या संचालकांना भेटले. तिथली ती खेळणारी बागडणारी, काम करणारी लहान मोठी मुले पाहून मन गदगदलं. आणि खरोखरच मुल अडॉप्ट करण्याच्या विचाराला एक प्रकारची पुष्टीच मिळाली.

श्रीरंग— नंदाच्या आयुष्यात या नव्या विचाराने खरोखरच नवी पालवी फुटत होती. एका वेगळ्याच विश्वात, , कृतीशीलतेत, एका धाडसी अथवा जोखमीच्या निर्णयानेही निर्माण झालेल्या सुखद वळणावर दोघेही खूप आनंदी होते. आयुष्यातल एक निराळंच आवाहन त्यांनी स्वीकारलं होतं. आणि त्यात गंमत होती.

सर्व प्रक्रियेत अर्थातच काही दिवस उलटले. त्यादरम्यान घरात एका बाळ पाहुण्याची स्वागत तयारी सुरू झाली. बालसंगोपनाचे वर्गही त्या दोघांनी अभ्यासले. जे घडणारच नव्हतं ते घडणार म्हणून त्या घराच्या भिंतीही हसू लागल्या.

खूप दिवसांनी नंदा गॅलरीत आली. रस्त्यावरची वर्दळ, वाहनांचे आवाज, खेळणारी मुलं, आरडाओरडा या चैतन्यपूर्ण वातावरणाचा ती नकळत एक भाग बनली. आणि ते दूरवरचे झाड? अरेच्या! त्या निष्पर्ण झाडावर पोपटी, लालसर, इटुकल्या पानांची पालवी अंगभर फुटली होती. त्या चैत्रपालवीने ते झाड आता कसं बहरलं, हसलं. ते आता ऊर्जीत वाटत होतं.

श्रीरंग तिच्पा मागेच उभा होता. त्यानं नंदाला प्रेम भावनेने मिठीत घेतलं.

दूरवरचं पालवलेलं झाडही हळुवार सळसळलं.

 – समाप्त – 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चैत्रपालवी… भाग – १  + संपादकीय निवेदन – सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या “दुर्वांची जुडी “ या नव्या कथासंग्रहाचे प्रकाशन दि. ०६/०४/२०२५ रोजी शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे करण्यात आले. वीर सावरकर अध्यासन केंद्र पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मा. ममता सकपाळ यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. (प्रकाशक:अमित प्रकाशन)

या नव्या कथासंग्रहाबद्दल आपल्या सर्वांतर्फे राधिकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच अखंड साहित्य सेवेसाठी असंख्य शुभेच्छा.

आजच्या आणि उद्याच्या अंकात वाचूया या नव्या संग्रहातली एक कथा चैत्रपालवी – दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

☆ चैत्रपालवी… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

गॅलरीतून दूरवर दिसणाऱ्या त्या निष्पर्ण झाडाकडे नंदा कितीतरी वेळ पहात होती. दिवस सरत्या हिवाळ्यातले असले तरी उन्हातलं ते निष्पर्ण झाड अगदी भकास दिसत होतं. एखाद्या सुकलेल्या काड्यांच्या खराट्या सारखं. भासत होतं. त्या झाडाकडे पाहता पाहता नंदाच्या मनात आलं, “आपलंही आयुष्य असंच आहे. भकास, निष्पर्ण, शुष्क, ओलावा नसलेलं.

आजूबाजूला अनंत गोंधळ होते. वाहनांची वर्दळ होती. हॉर्न चे आवाज होते. समोरच्या मैदानात मुले खेळत होती. कोणाचे मोठ्याने बोलण्याचे ही आवाज होते. हसणे, ओरडणे, सारं काही होतं. खरं म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणात नकळत एक ऊर्जा असते. हालचालीतलं चैतन्य असतं. पण नंदा, या क्षणी तरी या वातावरणाचा भाग होऊच शकत नव्हती. जणू काही तिचं सारं अस्तित्व, त्या दूरच्या पानं गळून गेलेल्या बोडक्या झाडाशीच बांधलेलं होतं. कुठेतरी तिच्या अंत:प्रवाहात एक लांबलचक कोरडा उसासा फिसकारला.

ती घरात आली आणि पुन्हा एका शून्यात हरवली. भिंतीवर कोलाज केलेली अनेक छायाचित्रे होती. दोघांची. ती आणि श्रीरंग. दोन हसरे, आनंदी चेहरे. घट्ट प्रेमाने बांधलेले, मिठीत विसावलेले, हातात हात धरलेले. जणू एक गाढ भावनेचा प्रवाहच त्या भिंतीवर या स्वरूपात दृश्यमान होता. फोटोतला नदीचा किनारा, फेसाळलेल्या लाटा, पौर्णिमेचा चंद्र, नारळाची गर्द झाडी, पाण्याने वेढलेल्या खडकावर बसलेल्या तिचा निवांत चेहरा. हे नुसतेच फोटो नव्हते, त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे बंदिस्त क्षण होते.

एकमेकांबरोबर आयुष्याला सुरुवात करताना किती नादमय होतं सारं! नंदा आणि श्रीरंग सारखं जोडपंच नसेल कुठे? सौंदर्य, आरोग्य, बुद्धी, पैसा सारं काही होतं. कशाचीच उणीव नव्हती. पण बेभानपणे आयुष्य जगत असताना, कुठेतरी जीवनातला पोकळपणा नकळतच आजकाल जाणवायला लागला होता. काही प्रश्न सभोवती झडत होते.

“काय नंदा? संपलं नाही का तुमचं फॅमिली प्लॅनिंग? किती दिवस दोघे दोघेच राहणार? येऊ देत की आता बालपावलांची दुडदुड. “

कधी तिची आईच म्हणायची,

” लवकर विचार करा बाबा! आता आमचीही वय होत चालली आहेत. अधिक उशीर झाला तर आमच्याकडूनही काही होणार नाही बरं! आणि हे बघ प्रत्येक गोष्टीचं वय ठरलेलं असतं बरं का! आता उशीर नका करू, मग पुढे अवघड जाईल. निसर्गाचे काही नियम असतात. “

कोणी बोललं म्हणून नव्हे, पण नंदाला तिच्या स्वतःच्या देहाबद्दल आजकाल काहीतरी परकेपणा जाणून लागला होता.

त्यादिवशी बागेतल्या कुंड्यांना पाणी घालत असताना तिला जाणवलं, ही सदाफुली फुलली आहे, मोगऱ्यालाही वेळेवर फुले येतात, गुलाब उमलतात, घाणेरी सुद्धा सदाबहार असते, पण ही जास्वंदी? हिरवीगार, टवटवीत, भरपूर पान असूनही आजपर्यंत हिला एकदाही एकही फुल आलं नाही. असं का? मग तिने ठरवलं, आता विशेष लक्ष देऊन या झाडाला खत पाणी घालायचं. पण या विचारा बरोबरच एक उदासीनता तिच्या मनाला घट्ट पकडून राहिली.

या विषयावर व्हायला हवी तशी चर्चा त्या दोघांमध्ये आजपर्यंत झाली नव्हती. कदाचित दोघेही, कुणी कुणाला दुखावू नये म्हणून मुद्दामहून हा विषय टाळत असावीत. पण एक लक्षात आलं होतं की कसलेही अवरोधन वापरत नसताना ते का घडू नये? 

सुरुवातीला माणसं नाकबुलीमध्ये मध्ये असतात. आशावादी असतात. ‘होईल की. एवढी काय घाई आहे?’ याही विचारात असतात. पण मग असा एक क्षण येतो की तो शक्याशक्यतेच्या पलीकडे घेऊन जातो. माणसाला खडबडून जागा करतो. आणि गडद अंधारातही ढकलतो.

श्रीरंग तसा फारसा गंभीर नसावा. पण नंदाच्या उदासीनतेकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. अखेर त्यांनी दोघांनी वैद्यकीय सल्ला घ्यायचा ठरवले. तोही काळ नंदाला खूप कठीण गेला. दोष कुणात असेल? तिच्यात दोष निघाला तर त्यांच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होईल? श्रीरंग नक्की कसा रिऍक्ट होईल? समजून घेईल की दुरावेल?या अपूर्णतेचा तो कसा स्विकार करेल? प्रेमाचं सहजीवन यांत्रिक होईल की आणखी भलतंच काही सोसावं लागेल? या विचारांनी नंदा पार विस्कटून जायची. आणि समजा, दोष श्रीरंग मध्ये निघाला आणि तो डिप्रेशन मध्ये गेला तर? सगळंच अनाकलनीय आणि अस्वस्थ करणार होतं.

श्रीरंग मात्र नंदाला म्हणायचा “नको इतका विचार करूस. काहीतरी मार्ग निघेल. आणि अगं! मुल झालंच पाहिजे या विचारापासूनच थोडी दूर जा की. जीवनात इतर आनंद नसतात का?”

असं कसं बोलू शकतो हा? स्त्री आणि मातृत्व यांचं अतूट भावनिक नातं याला समजत नाही का?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चौफेर, नाना प्रकारच्या टेस्ट्स दोघांच्याही झाल्या. डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तर देतानाही कधी कधी मन खचायचं.

पण वैद्यकीय चाचण्यांमधून काहीच निघाले नाही. डॉक्टर म्हणाले, ” व्यंधत्वाचे कुठलेही दोष शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर दोघांतही नाहीत. तुम्हाला मूल न होण्याचं तसं वैज्ञानिक कारण काहीच नाही. “

” मग?”

त्यानंतर डॉक्टर म्हणाले,

” काही वेळा वाढतं वय, मानसिक स्थिती, थकलेपण, ताण-तणाव, दडपण याचाही परिणाम होऊ शकतो. जितकी लैंगिक उत्कटता असायला हवी तितकी नसते. आजकालच्या पीढीची ही समस्याच आहे. पण निराश होऊ नका. शास्त्र खूप पुढे गेले आहे आता. आपण काही प्रगत तंत्रज्ञान वापरून प्रयत्न करू शकतो. म्हणजे इन्सेमिनेशन, आयव्हीएफ, यु आय आय वगैरे. विचार करा आणि पुन्हा भेटा. “

खरोखरच हे सगळं मानसिक दृष्ट्या खूप त्रासदायक होतं. अवघडवून टाकणार होतं. प्रगत शास्त्राच्या उपयोगालाही मर्यादा असतातच. शक्याशक्यताही असतातच. सारं कितीही अवघड असलं तरी याही प्रवाहात जाण्याचं नंदा आणि श्रीरंग ने ठरवलं.

आशावाद नव्हता असंच नाही. पण एक डोंगराएवढं ओझं होतं मनावर. शरीराच्या व्यथेपेक्षा मनाची व्यथा खूप मोठी होती. भावनांचे प्रचंड चढउतार होते. कमतरता, उणीव, काहीतरी नसल्याची जी भावना असते ना ती खचवून टाकणारी असते. सुखाची पानगळच असते ती.

यामधला एकच, अत्यंत सकारात्मक भाग म्हणजे दोघांमधलं नातं! ते अधिक घट्ट होत होतं. दोघंही एकमेकांची मनं जपत होते. पण त्यातही एक होतं की नंदाची मानसिक पडझड जास्त होत होती. श्रीरंगला तेही जाणवत होतं.

त्यादिवशी प्रधानांच्या आजी बोलता बोलता नंदाला सहज म्हणाल्या,

” का ग? तुमच्या पत्रिकांमध्ये एकनाड योग आहे का?”

“म्हणजे?” नंदाने विचारले.

” म्हणजे पत्रिकेत दोघांचीही अंत्यनाड असेल तर मुलं होण्यास बाधा येऊ शकते. कितीही प्रयत्न केले तरी मुल होत नाही, असं म्हणतात. “

नंदाने जेव्हा श्रीरंगला हे सांगितले तेव्हा तो उसळलाच. आणि ठामपणे म्हणाला,

” या कशावरही आपण विश्वास ठेवायचा नाही. लोकांना म्हणावं आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. “

पण असं होत नाही ना?

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(आज दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी परशुराम जन्मोत्सव आहे. — त्यानिमित्ताने सादर.) 

|| कराभ्यां परशुं चापं दधानं रेनुकात्मजम ||

|| जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकम || १ ||

*
|| नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम || 

|| मोचिताम्बार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनं || २ || 

*
|| भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम || 

|| गतवर्गप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम || ३ ||

*
|| वशीकृतमहादेवं दृप्तभूपकुलान्तकम || 

|| तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम || ४ || 

*
|| परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनुः || 

|| रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम || ५ || 

*
|| शुद्धं बुद्धं महाप्रज्ञामंडितं रणपण्डितं || 

|| रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनं || ६ || 

*
|| मार्गणाशोषिताब्ध्यंशं पावनं चिरजीवनं || 

|| य एतानि जपेद्रामनामानि स कृती भवेत || ७ ||

*
॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीपरशुरामस्तोत्रं संपूर्णम् ॥

☆ ☆ ☆ ☆

☆ श्री परशुराम स्तोत्र : मराठी भावानुवाद  ☆

रेणुका तनय धनुर्धारी हाती परशु धारिला

जामदग्नी भार्गव रामा नमन क्षत्रियसंहारकाला ॥१॥

*
भार्गव रामासी वंदन रेणुकाचित्तनंदना नमन

मातृसंकट विमोचक अद्भुत क्षत्रियांचा विनाशन ॥२॥

*
दक्ष भयभीत स्वजनांस्तव दक्ष धर्मा रक्षित 

प्रिय गतवर्गासी वीर जमदग्नी जिवलग सुत ॥३॥

*
महादेवा केले वश दृप्तभूप कुलाचा नाश

तेजोमय कार्तवीर्य संहारक करी भवभयनाश ॥४॥

*
दक्षिण करात परशु धरिला वाम हस्ते धरी धनू

भृगुकुलवंशज रमणीय मनोहारी घनश्याम तनू ॥५॥

*

शुद्ध बुद्ध महाप्रज्ञावान पण्डित रणधुरंधर

श्रीदत्तकरुणापात्र राम विप्रगणांचे करी रंजन ॥६॥

*
चिरंजीव पावन पंथे शोषितो अंश सागराचा 

जपतो जो राम नामासी प्रसाद तया कार्यसिद्धीचा ॥७॥

*

॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचित निशिकान्त भावानुवादित श्रीपरशुरामस्तोत्र संपूर्ण ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ It’s a Pause, Restart…! ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

It’s a Pause, Restart…!  ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

रोहिणी सकाळी नेहमीप्रमाणे उठली. तिच्या अगोदरच तिचा पती विनोद उठला होता. बेडरूमचे दार उघडून ती स्वयंपाक घरात गेली. विनोद सकाळचा चहा एक एक घोट घेत मोबाईल बघत बसला होता. ती उठून आलेली पाहून विनोदने तिला विचारले, ” तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे ? विनोद कोणत्या गोष्टीविषयी विचारतो हे तिला अजिबात लवकर लक्षात आले नाही. ती काहीच न बोलता ब्रश करायला निघून गेली.

नंतर त्याच्यासमोर असलेल्या खुर्चीत, एक-दोन मिनिटे ती शांत बसून राहिली. आणि मग तिला थोडंस लक्षात आले की त्याला कशाविषयी बोलायचे आहे ते. रात्री काय घडले होते हा विचार ती करु लागली. मग तिला लक्षात आले की, त्याने रात्री तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला होता पण तिने त्याचा हात बाजूला काढून टाकला होता. काय बोलावं या विचारात होती. थोडी भानावर आली आणि म्हणाली,

”तुझा तो हात घट्ट मिठी मारुन झोपणे या हेतूने नव्हता, तर तो डायरेक्ट स्तनाकडे गेला होता. मग मला वैताग आला आणि तो हात मी झिडकारून लावला. मी अशी का वागले किंबहुना बऱ्याच वेळा मी अशी का वागते, हेच तुला विचारायचा आहे ना ? 

“होय मला हेच जाणून घ्यायचं आहे! ”तो उत्तरला.

ती त्याला शांतपणे म्हणाली, ”मी तुला खूप वेळा सांगितलं आहे. मला हल्ली इच्छा होत नाही. मला काही वेळा संभोग नकोसा वाटतो. मला फक्त जवळ घेऊन, मिठी मारून झोपलेलं आवडतं. पण तू डायरेक्ट लैंगिकतेकडे जातोस. तेव्हा मात्र मला खूप इरिटेशन होतं. जेव्हा मला नको असते तेव्हा मी तुला बाजूला सारते. शिवाय माझी रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही. अधून मधून सारखी जाग येते. मला वाटतं या विषयावर आपण खूप वेळा बोललो आहोत. त्याच त्याच विषयावर मला परत परत बोलायची इच्छा नाही. ” 

“अगं पण बरेच दिवस झाले ना..! हे ऐकल्यावर ती चिडली. ती रागाने म्हणाली, ”अरे, तीन चार दिवसच तर झाले आहेत. ”

“मला इच्छा झाली पण तुझी इच्छा नसेल तर मग मी काय करावं? “ तो वैतागून म्हणाला 

ती ओरडून रागाने त्याला म्हणाली, “ थोडा संयम ठेवायला शिक. तुझ्या हाताचा वापर कर. शीss सकाळी सकाळी माझ्या डोक्याला ताप देऊ नको. तुला जो हवा तो मार्ग तू काढू शकतोस. या गोष्टीवर मला वाद घालायचा नाही. मी तुला खूप वेळा सांगितलेलं आहे की मला जेव्हा इच्छा नसते तेव्हा मी तुझ्याशी संभोग करू शकत नाही That’s it. ”

असे म्हणून ती रडू लागली. तेव्हा त्याला जाणवले की ही खूपच काहीतरी गंभीर गोष्ट आहे. ती कोणत्यातरी अडचणीतून जात आहे. आज पर्यंत, लग्नाला 24 वर्षे झाली. नोकरी, घर, मुलांच्या शाळा सगळ्या गोष्टीला हिंमतीने तोंड देणारी, स्वतःचं मुलांचं जगणं आनंदमय करणारी रोहिणी आज-काल अशी का वागत असावी ? हा प्रश्न त्याला पडला होता. काहीतरी अडचण आहे याची त्याला जाणीव झाली.

तो उठला. त्याने लगेच तिला जवळ घेतले आणि विचारले, ” रोहिणी तुला नेमकं काय होतंय? सांगशील का मला प्लीज. मलाही त्रास होतो ग रोहिणी. आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ”

तिच्या डोळ्यातून झरझर पाणी ओघळत होते. आणि ती बोलू लागली, “अरे, मला हल्ली खूप एकटं वाटतं. अचानक गरम होतं, घाम सुटू लागतो. हात पाय दुखतात, पायात गोळे येतात. अचानक रडू येतं, खूप चिडचिड होते, राग अनावर होतो. काही करण्याची इच्छा होत नाही. अधून मधून सारखं इरिटेशन होतं. झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठावसं वाटत नाही. बऱ्याच वेळा डोक दुखतं. अंगात हॉट फ्लसेस आल्यासारखे वाटतात. अगोदर सारखी संभोगाची इच्छा होत नाही. कधी कधी छातीत दुखतं, कधी कधी खूप धडधड जाणवते रे विनोद. काय काय आणि किती किती सांगू तुला ?” तिचे हुंदके चालूच होते.

“मधे एकदा तुला न सांगताच ऑफिस मधून मी डॉक्टरांच्याकडे गेले होते. ब्लड प्रेशर आणि ईसीजी नॉर्मल आहे म्हणाले ते डॉक्टर. विटामिन्सच्या काही गोळ्या लिहून दिल्या. रोज रात्री एक घेते मी त्या गोळ्या. ” बोलता बोलता थोडा वेळ ती थांबली. विनोद शांतपणे तिचं सगळं ऐकत होता. थोडा वेळ गेल्यावर डोळे पुसत अचानक म्हणाली,

“आईसारखं आपल्याला कोणीतरी मायेनं, आपुलकीनं जवळ घ्यावं असं मला वाटतं.. अंगात वाटतो तसा मनातही खूप कोरडेपणा जाणवतो. रात्री अचानकच खूप घाम येतो खूप गरम होऊ लागते. मला भिंती वाटते रे विनोद..!

“काय करू सांग ना ? मी रोज व्यायाम करते. सूर्यनमस्कार घालते. मेडिटेशन करते. पण तरीही काही फरक जाणवत नाही. ” 

हे ऐकून विनोद म्हणाला, “रोहिणी माझं ऐक आपण Psychiatrist/मानसरोग तज्ञांच्या कडे जाऊया. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. काही काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे.”

त्याच दिवशी संध्याकाळी ते दोघेही सायकियास्ट्रीस्ट कडे गेले. सायकियास्ट्रीस्ट दोघांशी बोलतात. आणि म्हणतात, ” तुम्हाला झोप लागावी यासाठी आपण काही दिवसांसाठी औषध देऊ शकतो पण तुम्हाला जाणवणारी ही सगळी लक्षणं रजोनिवृत्तीशी म्हणजेच menopausal symptoms शी निगडीत आहेत का हे पहावं लागेल. मला वाटतं ही सगळी लक्षणं, तुमच्या वयाचा विचार करता मेनोपॉजशी निगडित आहेत असे मला वाटते. बाकी तुमच्या मनाची अवस्था खूप काही अडचणीची आहे असे मला वाटत नाही. ”

असे म्हणून त्या डॉक्टरांनी त्या दोघांना स्त्रीरोगतज्ञ/ gynecologist ना भेटण्याचा सल्ला देतात. आणि गायनॅकॉलॉजिस्टनी कन्फर्म केल्यानंतर आपण सायकोथेरपीची मदत घेऊ शकतो असे ते सांगतात.

दुसऱ्या दिवशी रोहिणी आणि विनोद दोघेही gynecologist कडे जातात. रोहिणीची सगळी लक्षण डॉक्टर ऐकून घेतात.

“रोहिणी तुझं वय काय म्हणालीस ? 

“50years मॅडम..

Menstrual cycle म्हणजे तुझे periods regular आहेत?

“नाही मॅडम, कधी चार महिन्यांनी, कधी तीन महिन्यांनी, कधी सहा महिन्यांनी, खूप irregular आहेत. ”

“तुला ब्लड प्रेशर चा त्रास किंवा शुगर वगैरे काही आहे ?

“अजून तरी नाही मॅडम..

“काही काळजी करू नकोस ही सगळी लक्षणं Premenopausal symptoms ची वाटतात. ”

बाकीच्या काही अडचणी नाहीत ना हे बघण्यासाठी आपण सोनोग्राफी करूया आणि काही ब्लड टेस्ट करून घेऊ. चालेल..!

“हो मॅडम करून घेऊया आपण सगळं..

रजोनिवृत्तीच्या काळात जी अनेक लक्षणं दिसून येतात त्याची सगळी माहिती डॉक्टर, रोहिणीला देतात.

45 ते 55 हा स्त्रियांच्या आयुष्यातला रजोनीवृष्टीचा काळ असतो. Menopause/ रजोनिवृत्ती इस्ट्रोजनच्या पातळीत घट झाल्यामुळे निर्माण होणारा नैसर्गिक बदल आहे. अनियमित मासिक पाळी, मूड स्विंग्सज्, सतत स्नायू दुखणे, हाॅट फ्लशेस, थकवा आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्या रजोनिवृत्तीत प्रत्येक स्त्रीला जाणवतात.

Estrogen संप्रेरकाची पातळी कमी झाल्यामुळे, योनीत कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे कामेच्छा कमी होते. घटत्या इस्ट्रोजेन पातळीमुळे अस्वस्थता निर्माण होते. शरीराच्या तापमानात सतत चढ-उतार झाल्यामुळे काही वेळा अचानक गरम वाटते. आणि रात्री घाम फुटतो. त्वचेला खाज सुटते. यामुळे म्हणावी तशी रात्रीची झोप पूर्ण होत नाही. दिवसा थकवा जाणवतो. वारंवार विश्रांती घ्यावीशी वाटते. झोप जितकी कमी होईल तितके जीवनातील गोष्टी आणि घटना लक्षात ठेवणे कठीण होते. त्यामुळे काही गोष्टी विसरतात हे जाणवू लागते.

रोहिणी प्रश्न विचारते, “मॅडम यापुढे हे असेच चालू राहणार का, की यातून मलि बाहेर पडता येईल?

“रोहिणी आणि विनोद हे पहा, हा काळ प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळा असतो. पण साधारणतः दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतचा काळ हा menopausal symptoms चा काळ धरला जातो. Mild to moderate सौम्या ते तीव्र अशा प्रकारची लक्षणे यात दिसू शकतात. शारीरिक, मानसिक, भावनिक या सर्व गोष्टीवर योग्य काम करून आपण या काळात जाणवणारे चढ-उतार योग्य प्रकारे मॅनेज करू शकतो. यासाठी हार्मोनल थेरपी शिवाय कौन्सिलिंग, सायकोथेरपी या गोष्टींचा वापर करता येतो.”

“पण मॅडम, हे सगळं कधीपासून चालू करायचं.?”

“तुला जे होतंय ते काय होतं, आणि ते कशामुळे होतं हे आता तुला लक्षात आले आहे. त्यातून तू हळूहळू मार्ग काढत जाशील. लक्षणं खूप तीव्र झाली तर काय करायचं ते आपण नंतर ठरवू! ”

नंतर डॉक्टर त्या दोघांना Premenopausal, menopausal, Postmenopausal याविषयी माहिती सांगतात. तसेच पूर्ण बारा महिने जेव्हा मासिक पाळी येत नाही त्यानंतरच आपण रजोनिवृत्ती झाली असं म्हणू शकतो हे नमूद करतात. अधूनमधून कधी कधी ब्लीडिंग, स्पाॅटींग होऊ शकतं तेव्हा घाबरायचं नाही तसेच एक- दोन वर्षातून एकदा pap smear ची test स्वतःच्या सवडीने करण्याचा सल्ला देतात.

संतुलित आहार, दररोज व्यायाम, स्वतःच्या छंदासाठी काही वेळ, मित्र-मैत्रिणींशी संवाद, आपल्या आवडत्या कामात रममाण होणे, जीवनशैलीत योग्य प्रकारे बदल करून आपण ही लक्षण कमी करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींसाठी कौन्सिलर आणि सायकोथेरपीस्ट यांचा उपयोग कसा करून घ्यायचा असा सल्ला देतात. गरज पडली तर असावे म्हणून रोहिणी आणि विनोद यांच्या आग्रहास्तव त्यांच्या ओळखीच्या दोन-तीन कौन्सिलरचे फोन नंबर डॉक्टर त्यांना देऊन ठेवतात.

सर्व माहिती ऐकल्यावर रोहिणी, मॅडमना म्हणाली, ” Thank you madam! तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितले. मी स्वतःची काळजी घेईन. काही लागलं तर तुम्हाला संपर्क करेन! ”

विनोद म्हणतो, “मॅडम, मीही तिची काळजी घेईन, आणि मुलांनाही सांगेन, पण मॅडम, ती अगोदर सारखी आनंदी राहू शकेल ना!

डॉक्टर म्हणतात,” हो नक्की, कोणत्याही अडचणीत आपलं जगणं, आणि आपलं सहजीवन आनंदी करणं, सुंदर करणं हे आपल्याच हातात असतं. नाही का ?” 

“It’s a pause, restart yourself Rohini…!

“Vinod take care of her!”

विनोद, रोहिणीचा हात हातात घेतो. दोघेही केबिनच्या बाहेर पडायला निघतात. दोघेही, “Thank you madam” Blood report झाल्यावर परत तुम्हाला आम्ही भेटायला येतो.

बाहेर पडताना रोहिणीच्या मनाला एकच वाक्य साद घालत होते. It’s a Pause, Restart…!

© डॉ. सोनिया कस्तुरे

कस्तुरे आरोग्य केंद्र, सांगली 

9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धक्के पे धक्का… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ धक्के पे धक्का… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

मी माझ्या कौटुंबिक सल्ला केंद्रात बसले होते.. तशी मी नवीनच.. बँकेतून राजीनामा देऊन या आवडीच्या कामात गुंतले होते. माझे शिक्षण वकिलीचे.. पण पटकन बँकेत नोकरीं केली आणि पैशाची गरज म्हणून स्वीकारली.. पण कंटाळा आला लवकरच.. तेच डेबिट आणि क्रेडिट.. लग्न नाही केल.. नको ती गुंतवणूक कोणामध्ये.. सर्वाशी प्रेमाने वागायचं.. अनेक माणसे जोडायची.. अनेक पर्याय समोर ठेवायचे आणि शेवटी… पेन्शन आहे तर छान वृद्धाश्रम पकडायचा… आपल्या वयाच्या माणसात रमायचे.. असे माझे ठरलेले पण….

माझे नाव विजया.. माझी एक सहकारी आहे, म्हंटल तर मैत्रीण म्हंटल तर सहकारी, माझे सगळे टायपिंग करते, शिवाय पोस्टात जाणे, बँकेत चेक जमा करणे इत्यादी.. काही काम नसेल तेंव्हा गप्पा मारते.. ती पण एकटीच आहे… तिने का लग्न केल नाही कोण जाणे.. कदाचित प्रेमभंग झाला असेल किंवा कोणी मनासारखा कोण मिळाला नसेल. मी लग्न केल नाही कारण माझा प्रेमाभंग झाला असे काही नाही.. पण मनासारखा कोणी मिळाला नाही हेच खरे..

माझ्या या कौटुंबिक सल्ला केंद्रात काही पीडित येत.. सल्ला विचारत.. माझा एवढ्या वर्षाचा जगाचा अनुभव आणि वकिलीचे शिक्षण, त्यामुळे बहुतेक मी चांगले सल्ले देत असावी.. पण बरीच मंडळी येत हॆ खरे.

एक दिवस मी आणि माझी सहकारी शांता ऑफिसात बसलेलो असताना माझी बँकेतील जुनी सहकारी लीना आत आली. लीना आणि मी जुहू शाखेत दहा वर्षे एकत्र होतो.. मग तिची बदली झाली आणि भेटी कमी होत गेल्या पण मोबाईलमुळे संपर्क होता.

“अग विजू.. छान ऑफिस काढलंस ग.. मला कुंदा म्हणाली.. गोरेगाव ईस्टला सेंट थॉमसजवळ तू ऑफिस थाटल्याच.. नोकरीं केंव्हा सोडलीस?

“अग हो हो लीने.. किती वर्षांनी भेटतेस? असतेस कुठे?

“मी अजून नोकरीं करते ग.. सध्या माहीम ब्रँचला आहे.. मुलगी कॅनडात गेली जॉबला.. आणि मी एकटीच..

“हो हो… मला आठवण आहे लीने.. तुझा नवरा खुप लवकर गेला ते माझ्या लक्षात आहे, त्यानंतर तू तूझ्या मुलीला धिटाईने वाढवलंस.. सोपं नाही ते.

“मुळीच सोपं नाही.. पण बँकेत नोकरीं होती आणि तुझ्यासारखे सर्व सहकारी मित्र मैत्रिणी म्हणून मुलीला मोठं केल.. ती आर्किटेक झाली आणि तीन वर्षांपूर्वी कॅनडाला गेली पण.. छान नोकरीं मिळाली तिला.

“मग तू नाही गेलीस कॅनडाला?

“ती म्हणते आहे इकडे ये म्हणून.. पण अजून नाही गेले.. नाही जाणार असेही नाही.. शेवटी महिमा म्हणजे माझा जीव आहे, तिला लांब ठेऊन कसे चालेल? नवरा गेल्यानंतर आम्ही दोघी एकमेकांसाठी आहोत.

‘हो, बरोबर आहे ग.. एवढी वर्षे तुम्ही दोघीच ना सतत.. सहज आलीस ना?

‘सहज असं नाही.. तुझा सल्ला हवा होता.. तू हॆ ऑफिस काढलंस. म्हणजे तू सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास पण केला असणार. म

“म्हणजे काय? अग मी लॉ केलय.. बर तुला कसला सल्ला हवाय?

“विजू.. लीना शांताकडे साशंक नजरेने पहात बोलली..

“अग बोल. बोल.. ती आपली मैत्रीणच समज.. शांता तीच नाव.. ती पण एकटी आहे माझ्यासारखी.. मला मदत करते या ऑफिस मध्ये.

‘बर.. मग मी बोलते.. विजू, तुला माहित आहे माझा नवरा मुलगी अगदी लहान असताना गेला… त्यानंतर आईबाबा मागे लागले पण मी लग्न केल नाही.. मुलीला मोठं केल.. शिकवलं.. ती परदेशीं गेली आणि माझी एक जबाबदारी कमी झाली. बाबा गेल्यानंतर आईला माझ्याकडे आणलं.. मग आम्ही तिघ आनंदाने राहिलो.. गेल्या वर्षी आई गेली. माझ्या भावाने आईकडे दुर्लक्ष केल पण मी आईच सर्व केल. आई गेली, मुलगी परदेशी त्यामुळे मी एकटी पडले.

“खरे आहे, सतत सोबत असणारी मानस दूर गेली की फार फार एकटं वाटतं. मग काय केलंस तू?

‘मी नोकरीं करतेच पण बऱ्याच ऍक्टिव्हीटी मध्ये भाग घेते… योगा.. जिम जॉईन केल.

“बर केलंस.. आपली तब्येत चांगली राहते आणि वेळ पण चांगला जातो.

“हो.. आणि माझ्या जिममध्ये मला भेटला कुमार.. डॉ. कुमार.

“अरे वा.. डॉ. कुमार.. मग?

“डॉ कुमार हा सर्जन आहे.. अंदाजे पंचाव्वान वयाचा..

“म्हणजे आपल्याच वयाचा..

“होय.. त्याची बायको तीन वर्षांपूर्वी कॅन्सरने वारली.

“बर.. मग?

“गेले सहा महिने आम्ही एकमेकांना ओळखतो.. त्याने मला मागणी घातली.

“लग्नाची?

“नाही.. लिव्ह मध्ये राहण्याची.

“मग? तू काय उत्तर दिलस? आणि डॉ कुमार तुला आवडतो काय?

“कुणालाही आवडवा असाच आहे कुमार.. हुशार, स्मार्ट, प्रेमळ पण?

“पण तो लग्न करायला तयार नाही..

“का?

“त्याच्या मुलाचं ऑब्जेशन आहे म्हणे?

“त्याला मुलगा आहे? कोण कोण आहे त्याच्या घरी.

“मुंबईत तो एकटाच असतो… त्याचा मुलगा आणि सून सिंगापुरला असतात.

“ठीक आहे.. तूझ्या कुमारला घेऊन ये इकडे.. मी बोलते.

“हो, त्यासाठीच मी आले होते.. तुझं मत घयायला.. तुझा सल्ला हवा मला..

“तुम्ही दोघे येत्या रविवारी दुपारी चारला या.. मी वाट पहाते..

“मी निघते तर..

“अग, अशी कशी जाशील.. माझी मैत्रीणना तू? शांता.. मी हाक मारली. न सांगता शांताने कॉफीचे मग हातात दिले.

मी आणि शांता लीनाची वाट पहात होतो. पण चारच्या सुमारास एका महागड्या गाडीतून एक मध्यम वयाचा माणूस उतरला. आमच्या ऑफिसकडे पहात आत आला. माझ्याकडे पहात म्हणाला..

“मी डॉ. कुमार.. लीनाने सांगितलंच असेल..

मी गडबडले.. हा लीनाचा मित्र.. किती देखणा.. वय लक्षातच येत नाही याच..

“हो.. लीना नाही आली..

“नाही.. लीना म्हणाली तू भेटून ये, ती बोलली आहे सर्व..

“हो हो.. लीना मला म्हणाली.. डॉ. कुमार यांनी मला लिव्ह इन बद्दल विचारलं.

‘हो.. माझी पत्नी तीन वर्षांपूर्वी गेली.. मी डॉक्टर असूनही तिला वाचवू शकलो नाही मी… खरं तर ती पत्नी नंतर आधी मैत्रीण.. गिरगांवात आमच्या चाळीत रहाणारी. त्यामुळे शाळेत असताना पासूनची मैत्रीण. माझ्या मुलाची आई.. ती गेली आणि मी एकटा झालो. विजया, एकटेपणाना फार वाईट असतो.

“हो डॉक्टर, मला कल्पना आहे त्याची.. कारण मी पण एकटीच असते.. एकटीच रहाते..

“का? तुमचे मिस्टर हयात नाहीत?

“मी लग्नचं केल नाही..

“असं का? का बर? तुम्ही देखण्या आहात.. सुशिक्षित आहात.. बँकेत नोकरीं करत होत्या.. कुणी मनासारखा राजकुमार भेटला नाही का?

“तस असेल कदाचित.. लग्न करावेसे वाटलं नाही हॆ खरे..

“बर.. लीना बोलली असेल माझ्या बद्दल..

“हो.. लीना माझी बँकेतील मैत्रीण.. मी असे सल्ले देते हॆ कळल्यामुळे ती माझ्याकडे आली.. लीना म्हणाली तिची तुमची भेट जिममध्ये झाली.

“होय.. जवळजवळ सहा महिने मी तिला पहातोय.. ओळख झाली.. मन चहा कॉफी घेणे झाले.. तिने तिच्या नवऱ्या बद्दल सांगितले आणि एकटीने मुलीला वाढवल्याचे पण सांगितले.. मला तिचे कौतुक वाटले.. मुलगी कॅनडाला गेल्याचे सांगितले.

तेंव्हा मला वाटायला लागले, आता लीना एकटी झाली आहे.. तिला कुणीतरी जोडीदार हवा आहे.. मी पण एकटा आहे.. दिवस हॉस्पिटल, पेशन्ट यात जातो पण घरी येताना एकटेपणा जाणवतो… कुणीतरी ‘दमलास का रे’ म्हणणारी हवी असते. पाणी आणून देणार हक्काच हवं असत.. मला लीना तशी वाटली.. मी तिला विचारलं..

“पण तुम्ही लग्नाचं नाही विचारलात.. लिव्ह इन बद्दल विचारलात.

“हो.. तस दोन्ही एकच असत ना?

“नाही.. लिव्ह इनमध्ये बायकोचे अधिकार नसतात.. फक्त एकत्र राहणे असत.

“बरोबर.. पण मागील संसार असतो ना.. तो मोडता येत नाही. माझा मुलगा आहे, सून आहे.. नातवंड येईल दोन महिन्यात.. त्यामुळे त्यान्च्या अधिकारात अडचण होता कामा नये नवीन लग्नामुळे. त्यामुळे माझा मुलगा, सून म्हणालीत ” तुम्हाला एकटेपणा वाटतोय.. हॆ खरेच.. तुम्हाला पण जोडीदारीण हवी.. पण लग्न करू नका.. लिव्ह इन हा चांगला पर्याय आहे.

“मग लीनाच काय मत आहे?

“म्हणून लीना तुझा सल्ला विचारायला आली होती.. मग ती आपल्या मुलीशी बोलेल.

“ठीक आहे.. मी बोलेन तिच्याशी..

“मग मी निघतो..

“थांबा डॉक्टर, शांता.. “ मी हाक मारली. शांता कॉफीचे मग घेऊन आली. कॉफी घेता घेता मी म्हणाले

“डॉक्टर, तुमच्या मुलाचा फोन नंबर द्या आणि त्याला केंव्हा वेळ असतो? मी बोलेन त्याच्याशी. ” 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती कोण होती ? ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ ती कोण होती ? ☆  सुश्री नीला महाबळ गोडबोले

पंचवीसएक वर्षांपूर्वीची गोष्ट… लेकीचा जन्म अजून झालेला नव्हता.. मी आणि माझे यजमान दोघेच रहात होतो…

नक्की महिना कोणता ते आठवत नाही.. पण पावसाळ्याचे दिवस होते.

बहुतेक रविवार असावा…

यजमानांचा सेमिनार होता… ते दिवसभर बाहेर असणार होते..

सकाळपासून रिपरिपणारा पाऊस नि त्यामुळे झालेलं कुंद वातावरण…

मन उदास झालं होतं… त्यात एकटेपणा..

अपर्णाकडे जायचं ठरवलं.. बरेच दिवस ती बोलावत होतीच..

“जेवायलाच ये “.. तिचा हट्टी आग्रह.. नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं..

बरेच दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता. स्वयंपाकाचं झंझट नव्हतं…

पद्मजा फेणाणींची माझी आवडती कॅसेट लावली.. नि मस्तपैकी सगळी कपाटं आवरून काढली…

स्वयंपाकघर चकचकीत केलं. बरेच दिवस रेंगाळलेलं केस धुण्याचं कामही उरकून घेतलं…

छान तयार झाले.. पर्स घेतली नि बाहेर पडले. दाराला कुलूप लावणार एवढ्यात पुस्तक विसरल्याचं आठवलं.. माझ्याकडचं ” चारचौघी ” हे पुस्तक अपर्णाला वाचायचं होतं. ते घेऊन यायला तिने आवर्जून सांगितलं होतं..

तशीच पुन्हा आत गेले.. कपाटातून पुस्तक काढलं.. पर्समधे टाकलं.. नि बाहेर पडले..

कुलूप लावलं… नि चारचारदा कुलूप ओढून पाहिलं…

खरंतर मी संशयी नाही.. पण कुलुपाच्या बाबतीत मला नेहमी माझाच भरवसा वाटत नाही..

कुलूप व्यवस्थित बसल्याची खात्री करून एकदाची निघाले..

अपर्णाचं घर जवळच असल्याने चालतच गेले.. पावसात मस्त भिजत..

ती वाटच पहात होती.. तिचे यजमान पुण्याला गेल्याने तीही घरात एकटीच होती..

गॅलरीत बसून दोघींनी वाफाळतं टोमॅटो सूप प्यायलं.. वाहत्या रस्त्यावरची रहदारी न्याहाळत..

अपर्णानं मला जेवायला बसवलं नि गरमागरम आलू पराठे तव्यावरून माझ्या पानात वाढले…

माझे आवडते आलू पराठे.. तेही गरम नि आयते. घरच्या लोण्याचा गोळा, कवडी दही,. रायतं, कैरीचं लोणचं.. गृहिणीला अजून काय हवं असतं?

पण सुगरण अपर्णाने मला आवडतो म्हणून ढोकळाही केला होता.. गोड पाहिजेच म्हणून बदाम, केशर घातलेली शेवयाची खीर.. शिवाय पुलाव होताच…

भरपेट जेवण झालं.. खरंतर पोटात इवलीशीही जागा नव्हती.. तरी पोटभर गप्पा झाल्या..

यजमानांचा फोन आला.. तेव्हा संध्याकाळचे सात वाजल्याचं कळलं.. ते अर्ध्या तासात घरी येणार म्हटल्यावर मीही घरी जायला निघाले.. पंधरा मिनिटे पुन्हा दाराशी गप्पांची मैफिल झोडून घराकडे कूच केलं..

घराच्या कोप-यावर पोहोचायला नि दिवे जायला एकच गाठ पडली.. पावसाळी वातावरणात अंधाराने घातलेली भर भीतीला आवतण देत होती..

घराच्या दाराशी आले.. दाराच्या बाजूलाच स्वयंपाकघराची खिडकी.. सताड उघडी..

मी जाताना सगळी खिडक्या दारं घट्ट बंद केलेली.. नेहमीच्या सवयीने..

मग ही खिडकी उघडी कशी? कदाचित वादळ आलं असेल.. त्यामुळे उघडली गेली असेल वा-याने..

खिडकीतून आत डोकावून पाहिलं.. सगळा कट्टा भांड्यांनी भरलेला.. फुलपात्रे, ग्लास, चमचे, कप.. यांची मैफल भरलेली.. सोबत चिवडा नि बिस्किटांचा डबाही..

…. मी तर कट्टा साफ करून गेले होते.. मग एवढी भांडी कुठून आली? घरात कधीतरी एखादा उंदीर शिरतो.. किंवा या रिकाम्या खिडकीतून मांजरही शिरलं असेल..

पण उंदीर नि मांजर अशी भांडी कशी काढतील फडताळातून कट्ट्यावर ? शिवाय तो चिवड्याचा डबा?

आता मात्रं भीतीनं जीव कापायला लागला..

म्हणजे एखादा चोर शिरला असेल का घरात?

पण कुलूप तोडलेलं नाही.. कुठलंही दार उघडलेलं नाही.. खिडकीचं दार उघडं आहे पण खिडकीच्या जाळीमधून चोर शिरणं शक्य नाही…

मग. ?

म्हणजे ते भूत, प्रेत वगैरे तर नसेल ? की काळी जादु.. करणी. भानामती तसलं काही?

अरे देवा…

हो.. बरोबरच आहे.. आज अपर्णा म्हणतच होती अमावस्या आहे.. म्हणून तिने घरात नारळ फोडला…

पण असलं काही नसतं.. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.. असले विचार करणंही चुकीचं आहे.

पण मग हा कसला प्रकार ?.. खूप विचार केला.. डोक पिंजून काढलं…. आणि ट्यूबलाईट पेटली..

मिस्टरांकडे एक किल्ली असते.. तेच आले असणार.. चहासाठी भांडी काढली असणार.. चिवड्याच्या डब्यातून चिवड्याची फक्की मारली असणार… अन् मी मात्रं वेड्यासारखी काहीबाही विचार करत बसले होते.. स्वत:चीच मला लाज वाटली..

एकदाचं हुश्शही झालं..

आता निर्धास्तपणे मी कुलूप काढलं.. घरात संपूर्ण अंधार होता … बेडरूममधे टॉर्च होता.. तो आणला.. चालू केला… हॉलमधे टॉर्चचा प्रकाश टाकत स्वयंपाकघराकडे पाणी पिण्यासाठी निघाले..

…. कोप-यात टॉर्चचा उजेड पडला आणि डोळ्याला जे दिसलं ते पाहून जोराची किंकाळी तोंडातून बाहेर पडली..

त्या कोप-यात एक अतिशय कृश आणि बुटकी बाई पाय पोटाशी घेऊन बसली होती..

अंधाराशी स्पर्धा करणारा अव्वल वर्ण, पिंजारलेले मोकळे केस.. बारीक डोळे, नाकात मोठी चमकी नि कशीतरी नेसलेली इरकल साडी.. हे कमी होतं म्हणून की काय..

.. तिचे पुढे आलेले पांढरे पिवळे दात काढून ती माझ्याकडे पाहून हसू लागली..

” कोण आहे तुम्ही ?” मी धीर एकवटून विचारलं.. नि ती पुन्हा खदाखदा हसू लागली..

आता मात्रं माझं अवसान संपलं.. ही नक्कीच कुणीतरी हडळ बिडळ असणार.. माझी खात्री पटली.. मी भीतीने दाराशी पळत सुटले.. नि दाराशी आलेल्या माझ्या यजमानांना धडकले..

” काय झालं ? अशी का पळतेयस?”

माझ्या तोंडातून शब्दच फुटेना..

” भूत.. भूत “

मी कोप-याकडे बोट दाखवायला नि दिवे यायला एकच गाठ पडली..

मिस्टरांनी कोप-यात पाहिलं..

“चिन्नम्मा.. तू कधी आलीस ?”.. मिस्टरांनी तिला सहजपणे विचारलं..

उत्तर न देता ती पुन्हा तशीच हसली..

” तुम्ही या बाईला ओळखता ?”

” ओळखता काय? चांगला ओळखतो.. अगं हिनं दहा वर्ष आपल्या घरी काम केलय.. खूप प्रामाणिक.. अगदी घरच्यासारखं काम करायची.. मुलं मिळवायला लागल्यावर तिने काम सोडलं. परवाच हिचा मुलगा दवाखान्यात माझ्याकडे तपासायला हिला घेऊन आला होता.. हिला स्किझोफ्रेनिया झालाय… कोणीतरी कानात बोलतय.. कोणीतरी फोटो काढतय.. असे भास होतायत.. घरी न सांगता कुठेतरी हिंडत बसते..

अनेक वर्षांनी आज आपल्या घरी आली…. पण तू एवढी घाबरलीयस का? तूच तिला घरात घेतलं असशील नं?”

मी नाही म्हटलं नि घडलेलं सारं सांगितलं..

” पण मग ही घरात कशी शिरली ?”

आम्ही खूप चर्चा केली.. तिला विचारलं.. पण हसण्याशिवाय तिच्याकडून कोणताच प्रतिसाद नव्हता..

नि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.

मी अपर्णाकडे जाण्यासाठी दारात आले नि पुस्तक विसरलं म्हणून दार तसेच उघडे ठेऊन खोलीत गेले..

तेवढ्यात ही चिन्नम्माबाई घरात शिरली नि सरळ स्वयंपाकघरात गेली.. आणि मी दाराला कुलूप लावून निघून गेले..

हिने स्वयंपाकघरातील भांडी काढली.. भूक लागल्यावर कदाचित चिवडा, बिस्कीटे खाल्ली नि नंतर बिचारी हॉलच्या कोप-यात येऊन बसली..

– – आम्हाला या प्रकारावर हसावं की रडावं तेच कळेना..

मी तिला चहा करून दिला. चहा, बिस्कीटे खायला घालून, खणानी तिची ओटी भरली नि आम्ही दोघे तिला तिच्या घरी गाडीतून सोडून आलो..

तिच्या घरच्यांची दिवसभर शोधाशोध सुरूच होती. त्यांनी चारचारदा आमची क्षमा मागितली नि आभारही मानले..

चार दिवसांनी ती पुन्हा गायब झाल्याचं तिच्या मुलाकडून कळलं…

पण यावेळी मात्र ती आमच्याकडे आली नव्हती…

– – पंचवीस वर्षात ना ती कुठे सापडली.. ना तिची खबरबात मिळाली..

पोलीस स्टेशनमधे ती अजूनही ” मिसिंग ” आहे..

….. जायच्या आधी मात्र तिच्या ” डॉक्टरदादांना ” भेटून, आमच्या घरी चहापाणी करून गेली.. !!

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “काशा…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ काशा… ☆ प्रा. भरत खैरकर 

“मॅडम बाई नमस्कार.. ओळीखलसं कां मला? मी.. मी काशा.. ” एका भिकारीवजा तरुणाचा आवाज माझ्या कानावर पडला. ऑफिस सुटल्यामुळे मी घाईघाईने शंकरनगरच्या सिटी बस स्टॉप वर जात होते. मला बर्डी बस पकडायची होती. सोबत माझ्या ऑफिस मधल्या माझ्या मैत्रिणी होत्या. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपली ‘पोझिशन’ मला राखायची होती. पण तो गडी पडल्यागत “मॅडम, मी काशा.. मला ओळखलं नाहीस.. मॅडम बाई म्या भेटलो नव्हतो कां तुम्हास्नी.. तुम्हीच नाही कां मला खाऊ पिऊ घातलं होतं.. उपदेश नव्हता कां दिला.. अरे, भिक मागू नकोस नव्हतं कां म्हटलं मला तुम्ही.. ऐकून तर घ्या मॅडम बाई, मी काय म्हणतो ते!!” मी सारखी त्याच्याकडे दुर्लक्ष करून जसं आपण त्याला ओळखतच नाही उगीचच गळी पडू इच्छितो.. असा भाव दाखवत मैत्रिणी सोबत चाललेली होती. सोबत त्याची तीच कॅसेटही चाललेली होती.. पण नाही.. बस स्टॉप वर पोहोचताच बस आली. मी भरकन

बस मध्ये बसले. तो खिडकीतून मला शोधीतच होता आणि सारखा ” मॅडम बाई.. मॅडम बाई ऐकून तर घ्या. ” असा ध्वनी मला माझा चिरत चालला होता.. बसच्या वेगासोबत… !

सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी बी. ए. फायनल ला होते. माझ्या अभ्यासिकेतून दूरवरची घरं.. आला गेला.. येणारे जाणारे दिसायचे. अभ्यासाचा कंटाळा आला तर मी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची धावपळ बघायची.. किती वेळ मी असं बघत बसलेली असायची माझं मलाच कळायचं नाही..

अशीच एक दिवस अभ्यासिकेतून बाहेर डोकावले तर समोरच्या घरी “देवो मा भिकाऱ्याला एखादी भाकरं. ” असं म्हणून आपली ताटली सरकावून समोरच्या घराच्या दारा खेळत असलेलं एक भिकाऱ्याचा पोर मला दिसलं.. मी अभ्यास सोडून सारखी त्याच्या हालचालीकडे लक्ष देत होती. ” देवो मा भिका-याले.. ” त्याची लाचारयुक्त हाक पुन्हा पुन्हा ऐकायला येत होती.. नखान दारावरच्या पेन्टशी तो खेळत होता.. हे सगळं नकळत घडत होतं.. मी “शुक.. शुक.. इकडे ये.. ” करून त्याला हाक दिली. ही मुलगी आपल्याला कां बोलवेल ? असं समजून की काय त्यांना माझ्याकडे लक्ष देऊन.. पुन्हा ” देवो माय भिकाऱ्याला.. ” ची कॅसेट वाजवली. मी पुन्हा “शुक.. शुक.. अरे, तूच.. तूच.. तू इकडे ये.. ” म्हणून त्याच्याकडे पाहून हात हलविला. तो येऊन अभ्यासिकेच्या दारात उभा राहिला. मी त्याला आत बोलावलं. नुकताच वहिनींनी माझ्यासाठी आणून ठेवलेला नाश्ता टेबलवर तसंच होता.. मी ती प्लेट त्याच्याकडे देत माझ्यासाठी दुसरी प्लेट वहिनी कडून मागितली.. त्यानं ती घेतली आणि मी इशारा केलेल्या बाजूच्या खुर्चीत तो बसला.. त्यानं पायजामा फाडून तयार केलेली भीक मागायची मळकट झोळी खाली

ठेवली. त्यातलं पीठ जमिनीवर आपण आत असल्याची जणू आठवण त्याला देत होतं.. जमिनीवरच्या पिठानं पिशवीच्या आजूबाजूला पांढरं कुंपण तयार केलं होतं!

त्यानं “ताईसाहेब, तुम्ही घ्या की.. असं म्हणत प्लेट माझ्याकडं सरकवली.. तितक्यात माझी प्लेट सुद्धा वहिनीने आणली. आम्ही दोघेही नाश्ता करायला बसलो.. मी उत्सुकता म्हणून त्याला बोलत केलं कदाचित माझा उद्देशही तोच होता.

“नाव काय रे तुझं?”

“काशा”

” आई वडील काय करतात तुझे?”

” ते नाहीत. “

” कां रे काय झालं?”

” मेलीत दोगं बी”

“कशी रे? “माझा प्रश्न.

“ताईसाहेब, माझा ‘बा ‘सुदीक असाच भीक मागून पीठ आणायचा.. ते पीठ किराणा दुकानात नेऊन विकायचा.. मिळालेल्या पैशात दारू ढोसायचा.. उरलेला पैका मायला देऊन घर चालवायला सांगायचा.. “

” मग रे? ” माझी तंद्री लागली प्लेटमध्ये चमचा तसाच पडून राहिला.

“असाच एक दिवस बा घरी आला.. खूप खूप खोकलला.. एकाएकी आमची सगळ्यांची घाबरगुंडी उडाली.. पण काही उपाव नव्हता. बा चा ठसा नड्डयात अडकला.. अन् मेला तो.. असाच उभ्या उभ्या ! काही दिसानं लोक म्हणायचे डोमा भिकाऱ्याले टीबी. झालती म्हणून.. लोकांचं ते म्हणणं समजत नवतं मले.. “

“मग रे?”

” मग काय ? माझ्या माय वर आली जबाबदारी सगळी.. तिनं जमा केलेल्या पैशातून एक म्हैस विकत घेतली. माझी मोठी ताई लग्नाला आलेली.. ती दिसायला एकदम तुमच्यासारखीच सुंदर.. ताई, घरची गरीब परिस्थिती इकडे झाकलं तर तिकडे उघड पडायची.. मायच्या जीवाले तिची काळजी लागली होती एक दिवस म्हशीले पाणी पाजायला ताई शिवारातल्या आडावर गेली.. माय चारा कापत होती धुर्‍यावर.. पाणी काढता काढता ताईचा पाय घसरला.. ती पडली अडात.. बादलीसकट.. “धप्पक्कन “झालेल्या मोठ्या आवाजाने माय धावत आली.. तर पोरगी विहिरीत पडली.. तिला कां करावं काही सुचत नव्हतं.. तिनं आंगचं लुगडं सोडलं.. पाण्यात टाकलं.. आडात.. “पकड… पकड.. “म्हणून ती ताईला सांगू लागली. तीनही ते लुगडं धरलं.. आई खंगलेली ताकद नसलेली.. कशी काय वडणार ताईला वर.. !! उलट ताई चांगली अठरा-एकोणीस वर्षाची तुमच्या एवढीच.. तिचं वजन हे जरा जास्तच.. आईच ओडल्या गेली आत मध्ये.. आडात..

अर्ध्या तासाने कोणीतरी गडी माणूस बैलांना पाजायला म्हणून आडावर आला.. त्यांना पाहिलं आडात पडलेल्या माझ्या मायला.. बहिणीला.. त्यानं उडी टाकून ताईला वर काढली.. तिच्यात जीव होता.. आई आतच मेली होती.. तिलाही त्यानं बाहेर काढलं.. मग गावात निरोप धाडला.. मी माझ्या लहान भावासकट धावत गेलो.. तर अडावर माय मरून पडली होती.. त्या इसमाने तिचं शरीर आपल्या टाॅवेलनं झाकलेलं.. ताई ही वलीचीप झाली होती.. फुगलेली होती.. तिची छाती अजूनही खालीवर होत होती.. तेवढीच फक्त जिवंत असल्याची खूण! मला वाटत होतं एखाद्यानं ताईला खांद्यावर घेऊन गरगर फिरवावं अन काढावं सार पाणी नाकातोंडातून बाहेर.. पण मी लहान हाय.. माझं कोण ऐकल.. म्हणून मी चूप राहिलो.. पाच-सहा तासातच ताई सुद्धा आईबाच्या रस्त्याला गेली.. मेली..

झालं संपलं सारं.. काही उपाव राहिला नाही जगण्याचा आम्हां भावंडापुढं.. म्हणून आली ही ताटली आमच्या हातात.. ” असं म्हणत त्यानं नास्त्याची प्लेट दाखविली. तो सांगताना इतका रमला होता की आपण नाश्ता करीत आहोत.. हेही तो विसरला होता.. आणि ती प्लेट त्याला आपली ताटलीच वाटली होती.. माझा घास तोंडातल्या तोंडात फिरला.. काय हे अपार दुःख !!काय ही दैना भगवंता!! ह्या विचाराने मी चरकले. तू एखादी नोकरी कां करत नाहीस ? मी त्याला पुन्हा बोलतं केलं.

“कोण देतो ताईसाहेब नोकरी.. साऱ्यांना वाटतें मी लहान आहे.. काय करल हे इतकसं हुतकाड.. म्हणून कोणी बी कामाला घेत नाही.. दुसरी गोष्ट कमी मोबदल्यात जास्त काम करून घ्यायची सवय आहे आपल्या इथल्या लोकायले.. म्हणून कोणीच ठेवले पाहत नाही मायासारख्याले.. उपदेश मात्र सारेच देते..

मी समाजाचं खरं चित्र दाखविणाऱ्या त्या पोराकडे अवाक् होऊन पाहतच राहिली.

“मग कसं भागतं रे तुम्हां दोघांचं?” “कां भागणार नाही.. म्या उन्हाळ्यामंदी शहरात जातो भावाला घेऊन.. तिथे एसटी स्टँड.. रेल्वे स्टेशनमंदी कधी कधी १०० रुपये येते.. कधी कधी २०० रुपये.. कधीकधी तर ३०० रूपये बी.. भिक म्हणून मिळतात.. चांगल भागतं आम्हां दोघांचंबी त्याच्यात.. “त्याचं उत्तर आणि इन्कम ऐकून मी चाटच पडली.

“बरं ताई साहेब, निघालं पाहिजे मला! आता बाया वावरात जायच्या आधी चार-पाच घर मागून घेतो.. मंग झालं आजच्या पुरतं काम. ” असं म्हणून त्यानं खाली प्लेट माझ्याकडे देत, आपल्या पिशव्या घेतल्या अन निघालाही.. मी पाहतच राहिले.. तो दिसेनासा झाला तरी त्याची कहाणी आठवतच राहिले..

तोच ‘काशा’ आज मला भेटला होता.. एकेकाळी समाजसेवेच्या उद्देशाने भारावलेली मी. माझ्या पोझिशनला.. प्रेस्टीजला.. धक्का लागेल म्हणून.. त्याला ओळखत असूनसुद्धा ओळख दाखवली नव्हती.. माझ्यातल्या ह्या परिवर्तनाचा आणि काशात अजून न झालेल्या बदलाचा विचार करत मी घरी केव्हा येऊन पोहोचले, माझं मलाच कळलं नाही..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares