मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अवयवदान – जनजागृती… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

अवयवदान – जनजागृती… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

अवयव आणि देहदान महासंघ म्हणजेच Federation of   Organ and Body Donation ही संस्था ऊतीदान, देहदान व अवयवदानासाठी आपल्या अनेक जिल्हा शाखांमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काम करते.  जसं नेत्रदान आणि त्वचा दान करता येतं, तसंच हृदय, यकृत, किडनी, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, फुफ्फुसे , गर्भाशय वगैरे अवयवांचेही  दान करता येतं.

अर्थात वरील पैकी देहदान आणि त्वचा व नेत्रदान सोडता बाकीच्या गोष्टींचं दान फक्त ब्रेनडेड या मृतावस्थे पर्यंत पोहोचू शकणारे पुण्यवानच करु शकतात. 

एक किडनी, यकृताचा काही भाग,  गर्भाशय वगैरे काही जीवित व्यक्ती देखील दान करु शकते पण त्यासाठीचे कांही वेगळे नियम आहेत.

आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा अधिक आनंदाचे असे काय असेल?

अवयवदान केल्यानंतर देखील पार्थिवाचे, संबंधितांच्या धार्मिक प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करता येऊ शकतात. तेव्हा धार्मिक क्रियाकर्म शक्य होतील का नाही, हा विचार मनात येत असेल तर त्याचं उत्तर निश्चीतच तुमच्या तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यविधी करता येतील असंच आहे.

मुळात अशी इच्छा व्यक्त करुन डोनर कार्ड भरले तरी काही ठरावीक केसेस मधे ती इच्छा पुर्णत्वास नेणे अशक्य होते. (जसं कॅन्सर, एडस्, हेपाटायटिस वगैरे)  तरी देखील आपली इच्छा नोंदवून तसे आपल्या जवळच्या कुटूंबियांस सांगणे व या संबंधी कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक यांचेशी वारंवार चर्चा करीत रहाणे केव्हाही उत्तमच.* 

आपल्यापैकी कोणाला जर ह्या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, मनात असलेल्या शंकांचे समाधान करून घ्यायचे असेल,

आणि

आपणाकडे माईकची सोय असेल अथवा नसेल……

बंदिस्त सभागृह असेल अथवा नसेल……

मानधन देण्याची तयारी असेल अथवा नसेल……

कार्यकर्त्यांची फौज असेल अथवा नसेल……

पॉवर पॉइंट सादरीकरणाची सोय असेल अथवा नसेल……

अशा कोणत्याही अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत अवयवदानाच्या जागृती / प्रबोधन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात कोठेही आपण कमितकमी  १००  व जास्तीतजास्त ५००० श्रोते जमा करू शकत असाल 

तर कृपया संपर्क साधावा—- 

फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन, मुंबई

अध्यक्ष : श्री पुरूषोत्तम पवार

मुंबई 

मो ९८२२०४९६७५

उपाध्यक्ष : श्री सुनील देशपांडे  

पुणे 

मो ९६५७७०९६४०

© श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ २०२४ सुरू होतांनाच… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ २०२४ सुरू होतांनाच लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

२०२३ संपताना आणि २०२४ ला सुरुवातीपासूनच ….

दुःख — Delete करून टाका

आनंद– Save करून घ्या

नाते—-Recharge करा

मैत्री —-Download करा

शत्रूत्व — Erase करून टाका

सत्य —Broadcast करा

खोटे—Switch Off केलेलेच बरे

तणाव—Not Reachable होईल तेवढे चांगले

प्रेम — Incoming असूदे

दुस्वास–Outgoing

                 होईल तर बरे

हास्य—Inbox मध्ये घ्या

अश्रु — Outbox मध्येच राहू द्या

राग—-Hold वर ठेवा

स्मितहास्य—Send करत रहा

मदत—-Ok म्हणा

मन—Vibrate मोड वर ठेवा

मग बघा आयुष्यातील Ringtone  कसा सुंदर वाजतो —- 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निघाले आज स्मृतींच्या घरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

निघाले आज स्मृतींच्या घरी? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

खूप दिवसांनी रेडिओ लावला आणि रेडिओवर गाणे लागले होते निघाले आज तिकडच्या घरी…

लगेच डोळ्यासमोर निरोप घेणारी मुलगी तिला निरोप देणारे आई-वडील लग्न सोहळा एकाला निरोप देणे दुसऱ्याचे स्वागत करणे हे सगळे सगळे डोळ्यापुढे उभे राहिले…

दुसरे स्टेशन लावले तर ते इथे कोणाच्यातरी वाढदिवसाच्या कार्यक्रम चालू होता प्रत्येक जण गाण्यातून शुभेच्छा देत होता बार बार दिन ये आये बार बार दिल ये गाये तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू… पुन्हा विचार आला एक वर्ष संपून दुसऱ्या वर्षात पदार्पण केले म्हणून वाढदिवसाचे हे क्षण आनंदी उत्साही करून हा उत्सव साजरा करणे म्हणजे वाढदिवस…

पुन्हा स्टेशन बदलले आणि तेथे गाणे लागले होते आनेवाला पल जानेवाला है |हो सके तो इसमें जिंदगी बितादो पल ये भी जानेवाला है ||खरच सगळेच जाणारे असते ना?

तसेच आज ३१ डिसेंबर… २०२३ संपून २०२४ घेऊन येणारे काही भारीत क्षण. सरत्याला निरोप येणाऱ्याचे स्वागत. सासरी चाललेल्या मुलीला निरोप द्यायच्या वेळे सारखेच. किंवा वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण झालेल्या वर्षांना धन्यवाद देऊन नवे वर्ष सुख शांती समृद्धीचे जावो म्हणून केलेले अभिष्टचिंतन हे आदर्श क्षण जसे आपण जगतो ना अगदी तसेच नव्या वर्षातील शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी जल्लोष हर्ष उल्हास यांनी सरत्या वर्षाला दिलेला निरोप आणि नव्याचे केलेले स्वागत यांचा एकत्र मिलाप.

किती भान हरपून मनात कुठलाच विचार न ठेवता सगळ्यांच्याच भावना साजरा करण्याच्या आंनदी असल्याने साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी आनंदाने भारलेले हे क्षण असतात.

मग मनात विचार आला फक्त ३१ डिसेंबरचे नव्हे तर रोजचा येणारा दिवस दिवसातील प्रत्येक सेकंद हा जाणारच असतो. हा क्षण आपल्याला आनेवाला पल जानेवाला है याचा संकेत देत असतो आणि ती वेळ निघाले आज स्मृतीच्या घरी असे सांगत असते. येणारा प्रत्येक क्षण आठवण होऊन मनात साठवायचा असेल तर फक्त ३१ डिसेंबरच नाही तर प्रत्येक क्षण साजरा करता यायला हवा.

वर्षातले सगळेच महिने, आठवडे दिवस, तास, मिनिटे, क्षण हे जाणारेच असतात तो प्रत्येक क्षण जाणार म्हणून दुःख आणि नवा येणार म्हणून आनंद अशा संमिश्र भावना असायला हव्यात फक्त ३१डिसेंबरलाच नको.

जेव्हा तुमच्या प्रत्येक क्षणात सकारात्मकता भरलेली असेल तेव्हा आता असणारा क्षण हा जाणारच असल्याने तोच क्षण जगून घ्यायची वृत्ती ठेवली तर जाणारे वर्षच फक्त निघाले आज स्मृतीच्या घरी असे न होता प्रत्येक क्षण तसा होईल.

मग जीवनातील प्रत्येक क्षण उत्सव होऊन राहील. तेव्हा नव्या वर्षाच्या प्रत्येक क्षणाचा उत्सव व्हावा या नव्या वर्षाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांची वृत्ती अशी सदा हर्ष उल्हासाने भरलेली रहावी ही प्रार्थना 🙏

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते. 

पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.

“बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना” आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले. 

एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.

“ओ आजोबा नीट घेऊन खा की?” मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे. 

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला. 

“काळजी करू नकोस, बाबा सापडले!!” कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!

त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली. 

“काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???”

त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले. 

“हे आजोबा कोण आहेत तुमचे?” मी विचारले.

“वडील आहेत माझे.” त्याचे उत्तर.

“त्यांना काही त्रास आहे का?” माझा पुढचा प्रश्न.

“हो त्यांना अल्झायमर आहे.”

अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता. 

” मग हे आजोबा असे कुठेही जातात का?” 

” हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत.”

मी शॉकच झालो. 

“मग तुम्ही यांना शोधता कसे?”मी विचारले.

“आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी.”

“असे वारंवार होत असेल” मी आश्चर्याने विचारले. 

तो स्मितहास्य करून म्हणाला “महिन्याला एक दोन वेळेस”

“काळजी घ्याआजोबांची ! बाप रे काय हा वैताग” मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, “बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं.”

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.              

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.

उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो…                 

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बहुता सुकृतांची जोडी ☆ श्री किशोर पौनीकर ☆

श्री किशोर पौनीकर नर्मदापुरकर

परिचय :  

महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे काम केले आहे.

युवकांनी देशसेवेसाठी दोन वर्ष पुर्ण वेळ द्यावे, या बाळासाहेब देवरसांच्या आवाहनानुसार पहिले चार महिने आसाम ला व नंतर मध्यप्रदेशात अभाविप चे काम केले.

कामासाठी होशंगाबाद जिल्हा मिळाला असता एका आक्रमणकाऱ्याचे नाव आपण आपल्या सुंदर शहराला का देतो, असे म्हणत, “होशंगाबाद नहीं नर्मदापुर कहो!” हे अभियान सुरू केले. त्याला ३१ वर्षांनी यश आले व होशंगाबाद चे नामांतरण नर्मदापुरम् झाले. या नामांतरणादरम्यान भव्य मंचावर अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले होते.

आजकाल नर्मदा परिक्रमा करून आलेल्यांना संगठित करत, माझी गावनदी हीच माझी नर्मदा हे अभियान चालवतो. यासाठी गुगलमिटवरून नर्मदाष्टक उपासना मंडळ चालवतो. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील गावांमध्ये गावनदी अभियान सुरू झालेले आहे.

व्यवसाय – मुद्रण

छंद – स्वदेशी चळवळी अंतर्गत हेअर आॅईल शिकाकाई शाम्पू, दंत मंजन व आंघोळीचे नदीपुरक साबण बनवत असतो.

? इंद्रधनुष्य ?

☆ बहुता सुकृतांची जोडी ☆ श्री किशोर पौनीकर ☆

वय केवळ ११७ वर्ष

केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री. नितीनजी गडकरींनी नर्मदा परिक्रमा मार्गात रस्ते बांधतो म्हटल्यावर, परिक्रमा मार्ग हा पारंपरिक पद्धतीचाच असावा, असा आग्रह करणारा लेख मी लिहिला होता. तो अनेकांना आवडला व भरपूर शेअर, फाॅरवर्ड झाला. लगोलग तिसऱ्याच दिवशी नर्मदा परिक्रमा क्षेत्रातील काही परिक्रमींच्या गैरवर्तणुकीवरही लेख लिहावा लागला. हा लेख सपाटून शेअर व काॅपी पेस्ट झाला. साम टिव्ही मराठी वर माझी मुलाखतही झाली. गेल्या चार दिवसांपासून सकाळी ८.०० ते रात्री ९.३० फोन सतत वाजतोय. व्हाॅटस् ॲपवरही कितीतरी मेसेजेस येत आहेत.

असाच एक मेसेज आला….. 

डाॅक्टर स्वामी केशवदास.

करनाली, तालुका डभोई, जिला बड़ौदा, गुजरात.

इतक्या फोन व मेसेजमध्ये या मेसेजकडे विशेष लक्ष जाणे शक्यच नव्हते. त्यांना विचारले, “आपल्याला मराठी येते का?” तर ते म्हणाले की, “गुजराती/हिंदी/इंग्लिश/तमिल/तेलगु/कन्नड़ भाषा अच्छी तरह जानते है। मराठी समझता हूं, पर बोल नहीं सकता!”

मी त्यांना माझे नर्मदा मैय्यावरील काही हिन्दी लेख पाठवलेत. त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

(सततचे फोन व मेसेजेस मध्ये गुंतून पडल्याने दुर्देवाने मी कोणाशी चॅटिंग करत आहे, हे मला माहितच नव्हते.) मी त्यांना म्हणालो की, केंव्हाही फोन करा.

आज त्यांचा मेसेज आला की, ते रात्री ८.३० नंतर मला फोन करतील. फोन तेच करणार होते, त्यामुळे मला चिंता नव्हती. नर्मदाप्रेमी अलग अलग बंधु भगिनींचे फोन व मेसेज सुरूच होते.

रात्री ९.३० ला फोन वाजला. हा नंबर व्हाॅटस ॲप चॅटिंग मुळे माझ्या जवळ सेव्ह होता. स्क्रिनवर नाव आले. #स्वामी_केशवदास, बडोदा, गुजरात.

मी फोन सुरू केला. अंदाजे ६५ वर्षे वय असलेला तो आवाज वाटला. मी बोलणे सुरू केले. स्वामीजींचेही बोलणे सुरू झाले. त्यांना माझा ‘गडकरींवरील लेख’ व ‘परिक्रमा की बेधुंद तमाशे’  हे दोन्हीही लेख फार आवडले होते. त्यांनी माझी साम टिव्ही मराठी वरील लाईव्ह मुलाखतही बघितली होती. मुलाखत संपल्यावर लगोलगच त्यांनी मला फोन लावला होता. पण तेंव्हा माझा फोन सतत बिझी असल्याने आमचे बोलणे झाले नव्हते. म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता.

स्वामीजींना बोलतं करावं म्हणून मी काही प्रश्न विचारले व त्या दरम्यान ते बोलत असतांना दर वाक्यागणिक थक्क होण्याची वेळ माझ्यावर आली होती.

म्हैसूरला जन्म झालेले स्वामीजी प्रख्यात डेहराडून स्कूल मध्ये शिकले व नंतर ब्रिटनमध्ये ते वयाच्या ६७ वर्षापर्यंत प्रख्यात हार्ट सर्जन म्हणून कार्यरत होते. अमाप पैसा कमावला. त्यांनी लाहिरी महाशयांकडून क्रिया योगाची दिक्षा घेतली आहे. 

मी सहजच त्यांना विचारले, “स्वामीजी, आपने नर्मदा परिक्रमा कब की?”

“१९५६ में ” ते म्हणाले व मी एकदम उडालोच….

“स्वामीजी आपकी उम्र कितनी है? ” मी आतुरतेने नव्हे अधिरतेने विचारले…

“११७ वर्ष “

“ क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या????”

मी जवळपास किंचाळलोच. चौथ्या मजल्यावरच्या गॅलरीत उभा राहून बोलणारा मी, मला कोणीतरी १०० व्या मजल्यावर पॅराफिट वाॅल नसलेल्या गॅलरीत उभे केलेय, अशा चक्रावलेल्या अवस्थेत होतो.

मला, मी काहीतरी चुकीचेच ऐकत आहे, असे वाटत होते. मी पुन्हा त्यांना विचारले, “आपका जन्म वर्ष कौनसा है?”

“सन १९०५” ते उत्तरले.

माझे वय वर्ष ५७ होत असल्याने, आता बरीच कामं कमी करावीत, अशा सर्वसामान्य मराठी विचारांचा मी, मनातल्या मनात तुटक गणित मांडू लागलो….. १९०५ ते २००५ म्हणजे १०० वर्ष. २००५ ते २०२२ म्हणजे १७ वर्ष….. म्हणजे ११७ वर्ष बरोब्बर होते.

गॅलरीत वाहत असलेल्या हिवाळी थंड हवेतही मला घाम आला…

तिथूनच मी नर्मदा मैय्याला व मला घडवणाऱ्या वैनगंगेला नमस्कार केला…. एक साधा यःकश्चित व्यक्ती मी, ४५ वर्ष विदेशात विख्यात हार्ट सर्जन म्हणून काम केलेल्या, ११७ वर्षांच्या विभुतीने मला स्वतःहून फोन करून तुमचे व माझे विचार एकसारखे आहेत, हे म्हणावे…. मी पुन्हा चक्रावलो होतो.

पण…. 

माझे हे चक्रावणे येवढेच असावे, असे जे वाटत होते, ते त्यांच्या दर वाक्यागणिक वाढतच होते.

मी त्यांना त्यांच्या आश्रमा बद्दल विचारू लागलो. मला वाटले की एक हाॅल व कुटी, असे काहीसे ते सांगतील….

ते म्हणालेत, “नर्मदाजी के दोनो तट मिलाकर हमारे सात आश्रम है, पर हर आश्रम में मंदिर बनाने की जगह मैने २००, २५० काॅट के अस्पताल बनवाये है। पर इसकारण आप मुझे नास्तिक मत समझना। “

त्यांच्या आश्रमाचे सेवाकार्य ते सांगू लागले. “हमारे तीन आश्रम में ही नर्मदा परिक्रमावासी आते है, बाकी में अस्पताल, क्रियायोग साधना व स्वावलंबन के कार्य चलते है। हमारे किसी भी आश्रम में दानपेटी नहीं है, न ही हमने कोई रसिदबुक छपवाये है। हमारे ट्रस्ट में जो पैसा है, उसके ब्याज पर हमारे सब कार्य चलते है।”

मी जे ऐकत होतो, ते सर्व भव्य-दिव्य व व्यापक होते… स्वतःच्या आकलनशक्तीची संकुचितता मला कळली होती. मी हतबल होतो की, दिःग्मुढ, हेच मला कळत नव्हते.

काहीतरी बोलायचे म्हणून मी बोललो,” आपकी हिन्दी तो बहुत अच्छी है, आप दक्षिण भारतीय नहीं लगते। “

ते म्हणालेत, “हां ठिक पहचाना, वैसे हम उत्तर भारतीय है। मेरे पिताजी मैसूर के महाराजा के कुलपुरोहित थे।”

अजून एक मोठा धक्का मला बसायचा बाकी आहे, हे मला माहीत नव्हते…

मी विचारले, “आपके दादाजी कौन थे? “

“पंडित मदन मोहन मालवीय!”

” क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या?” आपण कितव्यांदा आश्चर्यचकित होत आहोत, हे मोजणे मी बंद केले होते.

“महामना पंडित मदन मोहन मालवीय?” न राहवून मी त्यांना पुन्हा विचारले.

“हां!  मेरे दादाजी बॅरिस्टर थे…. ” ते महामना पंडित मदन मोहन मालवीयांबद्दल सांगू लागलेत.

थोड्या वेळाने त्यांनी आपली गाडी पुन्हा नर्मदा परिक्रमेकडे वळवली. म्हणालेत, “आप परिक्रमा के बारे में जो आग्रह कर रहे है, वह बहुतही सटिक है। गुरू आज्ञा के बिना नर्मदा परिक्रमा करना मात्र चहलकदमी ही है! “

मग ते मराठी परिक्रमावासी व त्यांचे वागणे, परिक्रमेत शूलपाणी झाडीतून जाण्याचा अवास्तव आग्रह, शूलपाणीतील सेवाकेंद्रांची काही गडबड, असे बोलू लागले.

पुढे ते म्हणालेत,”मै अब तक खुद होकर केवल “राहूल बजाज” से फोनपर बात करता था। आपके परिक्रमापर के लेख व परिक्रमा फिरसे अध्यात्मिक ही हो, यह आपका प्रयास मुझे बहुत भाया। इसलिये आज मै आपसे खुद होकर फोन से बात कर रहा हूं।”

नर्मदा मैय्या अनाकलनीय चमत्कार करत असते, हे मला माहीत होते. यातले काही माझ्या वाहन परिक्रमेत मी अनुभवले होते. पण ती सामाजिक जीवनातही चमत्कार करते, हे मला यावर्षीच्या ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान कळले होते. होशंगाबादचे नामांतरण नर्मदापुरम् होण्याचे पूर्ण श्रेय तिने मला त्या भव्य मंचावर मुख्यमंत्री, खासदार व आमदारांच्या सोबत बसवून दिले होते.

आता राहूल बजाज यांचे शिवाय स्वतःहून कोणालाच फोन न करणारे स्वामी केशवदास, माझ्याशी स्वतःहून फोनवर बोलत होते.

मी पण नर्मदेच्या या चमत्काराचा फायदा घेतला. त्यांना म्हणालो की, “परिक्रमेतील वाढत्या गर्दीमुळे वमलेश्वर (विमलेश्वर) ला परिक्रमावासींना तीन चार दिवस अडकून पडावे लागते. त्यांच्यासाठी विमलेश्वर गावाअगोदर अंदाजे १५०० परिक्रमावासी राहू शकतील असा आश्रम बनवायला हवा, जेणेकरून नावाडी व ट्रॅव्हल कंपन्यांच्या साटेलोट्यांचा त्रास पायी व छोट्या वाहनाने परिक्रमा करणाऱ्यांना होऊ नये. तसेच आज केवळ १२ नावा चालतात, त्या वाढवून किमान २५ तरी व्हाव्यात.”

स्वामीजी म्हणालेत,”अभी गुजरात मे चुनाव का मौसम चल रहा है। चुनाव होने के पंद्रह बीस दिन बाद अपने उस समय के मुख्यमंत्री से ही सिधी बात करेंगे। विमलेश्वर में बडा आश्रम तो हम खुद ही बना देंगे। “

गेल्या दोन दिवसांपासून वमलेश्वर/विमलेश्वरच्या गर्दीमुळे मी फारच चिंतीत होतो. यावर काय तोडगा निघू शकतो? म्हणून मी भरपूर जणांना फोन केले होते. आपण यावर काय करू शकतो? हे चाचपडणे सुरू होते.

अशा वेळी नर्मदेने त्या क्षेत्रातला सुप्रिम बाॅसच माझ्याकडे पाठवून दिला. ११७ वर्षांचा हा तरुण आपल्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान, नाव किशोर, पण स्वतःला प्रौढ समजायला लागलेल्या मला, नर्मदा प्रेरित सामाजिक कार्यासाठी नवचैतन्य भरत होता. 

नर्मदा मैय्या के मन में क्या चल रहा है, यह तो बस वहीं जानती है! 

नर्मदे हर ! नर्मदे हर! नर्मदे हर !

© श्री किशोर पौनीकर नर्मदापुरकर,

नागपूर

मो – 9850352424

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – पॅराशूटस्… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – पॅराशूटस्… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एअर कमांडर विशाल एक जेट पायलट होता. एका मिशन मध्ये त्याचं फायटर विमान मिसाईल ने उडवलं गेलं. तत्पूर्वी त्याने पॅराशूट घेऊन उडी मारली आणि बचावला.  सर्वांनी त्याचं फारफार कौतुक केलं.

पाच वर्षांनंतर पत्नीसोबत तो एका रेस्टोरन्टमध्ये बसला असताना बाजूच्या टेबलवरील एक व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुम्ही कॅप्टन विशाल ना? तुम्ही जेट फायटर चालवायचात आणि ते पाडण्यात आले होते.”

“पण हे तुला कसे माहीत?” विशालने त्याला विचारले.

तो मंद स्मित करीत म्हणाला, “मीच तुमचं पॅराशूट पॅक करून विमानात ठेवत असे”.

विशाल आश्चर्य आणि कृतज्ञतेने आ वासून विचारात पडला की जर पॅराशूट नीट उघडलं नसतं तर मी आज इथे नसतो.

त्या रात्री विशाल त्या व्यक्तीच्या विचाराने झोपू शकला नाही.

त्याला आश्चर्य वाटत राहिलं की त्या व्यक्तीला कितीवेळा पाहिलं असेल, पण साधं शुभप्रभात, तू कसा आहेस? एवढं देखील आपण विचारलं नाही. का तर तो स्वतः फायटर पायलट आहे आणि ती व्यक्ती एक साधी सुरक्षा  कामगार.

तर मित्रानो, तुमचं पॅराशूट कोण बरं पॅक करतेय?

प्रत्येकाला कोणी ना कोणी दिवसभरात काही न काही आवश्यक त्या गोष्टी पुरवत असतो.

आपल्याला विविध प्रकारच्या पॅराशूटची आवश्यकता पडत असते – आपल्याला शारीरिक पॅराशूट, मानसिक पॅराशूट, भावनात्मक पॅराशूट आणि अध्यात्मिक पॅराशूटची गरज पडत असते.

सुरक्षा जोपासण्यासाठी आपण या सर्व आधारांची मदत घेत असतो.

काहीवेळा दैनंदिन आव्हानांना सामोरे जाताना आपण काहीतरी महत्वाचं विसरत असतो.

आपण समोरच्याला हॅल्लो, प्लिज, धन्यवाद, त्याच्या आयुष्यात घडलेल्या आनंददायी गोष्टींसाठी अभिनंदन, एखादी छानशी कॉम्प्लिमेंट किंवा त्यांच्यासाठी काहीही कारण नसताना काहीतरी चांगलं करावं  हे करायचं राहून गेलं असणारच.

आता जरा आठवून पहा, ह्या वर्षभरात कोणी कोणी तुमचं पॅराशूट पॅक केलं ते.

या वर्षभरात ज्यांनी ज्यांनी शब्दांद्वारे, कृतीद्वारे, प्रार्थनेद्वारे माझं पॅराशूट पॅक केलं आहे  त्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. कुणालाही गृहीत धरू इच्छित नाही. 

अगदी मनःपूर्वक प्रेमपूर्वक मी आपणा सर्वांना 2023 च्या संस्मरणीय अखेरीसाठी आणि 2024 च्या सुंदर प्रारंभासाठी शुभेच्छा देतो

कवी : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “झालं गेलं विसरुन जा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “झालं गेलं विसरुन जा…” ☆ सौ राधिका भांडारकर 

एखादे वेळेस काय होतं, एखादी व्यक्ती बोलताना काहीतरी बोलून जाते आणि ऐकणाऱ्याच्या मनात त्या व्यक्तीच्या बोलण्याचा निराळाच अर्थ उमटतो. जो चांगला नसतो, नकारात्मक असतो, दुखावणारा असतो.  नात्यांमध्ये अंतर निर्माण करणारा  असतो.

वास्तविक बोलणारी व्यक्ती सहज बोलून जाते. कदाचित तिच्या मनात कुणाला दुखवावं असा हेतूही नसतो किंवा यातून असा काही अर्थ निघेल याचे भान तिला नसते. पण तरीही तडा जातो, जोडलेलं तुटतं, जखम वाहत राहते, केवळ गैर समजामुळे. असा गैरसमज मनात राहिला तर त्याचे स्वरूप वाढत राहते, प्रबळ होते आणि ते नातेसंबंधात अतिशय घातक ठरते.

एक साधा प्रसंग.

दारावर बेल वाजली.  वास्तविक मी सकाळच्या कामांच्या घाईत आणि पळत्या घड्याळाबरोबर कामावरून ऑफिसात वेळेवर पोहोचण्याच्या चिंतेत असतानाच कोणीतरी आलं होतं. दार उघडले.

दारात शेजारचे आप्पा मुळगुंद होते. मी पटकन त्यांना विचारले,” काय काम आहे आता तुमचे आप्पा? मी जरा घाईत आहे.”

आप्पांचा चेहरा कसनुसा झाला आणि ते आल्या पावली परत गेले.

त्यानंतरचा माझा सर्व दिवस व्यस्त गेला. आप्पांचे येणे मी विसरूनही गेले. मी काहीतरी गैर बोलले, गैर वागले हे मला तेव्हां कळले जेव्हां रात्री आप्पांच्या सुनेचा मला फोन आला.

“ काकू !तुम्ही आप्पांना असं काय बोललात? त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा? ते फक्त चावी द्यायला आले होते तुमच्याकडे. पण तुमच्या फटकन्  विचारलेल्या प्रश्नामुळे ते खूप दुखावले आहेत. ठीक आहे मी त्यांना समजावले आहे. पण इथून पुढे तुम्हाला त्रास होईल असे सहकार्य तुमच्याकडून आम्ही घेणार नाही.”

तिने फोन ठेवला आणि मी डोक्यावरच हात मारला.

किती साधी गोष्ट इतकी भरकटली? आप्पा अनेक वेळा माझ्याकडे त्यांच्या घराची चावी द्यायचे मग आजच इतका पराचा कावळा त्याने का करावा? परिणामी मलाही खूप राग आला.  “नाही तर नाही” अशा मोडमध्ये मीही गेले. पुन्हा आप्पा कधीही आले नाही आणि मी त्यांना “का आला नाहीत?” म्हणून विचारलेही नाही.

“शेजारी” हे नातं मात्र तुटलं.

कोण बरोबर,कोण चुक हा प्रश्नच नव्हता. होता तो फक्त गैरसमज.

तसे या गैरसमजाचे तोटे आयुष्यात अनेकदा अनुभवले. काही गैरसमज काळाच्या ओघात वाहून गेले. तुटलेले पुन्हा जुळले.  काही मात्र मनात अढी करून कायमचे वास्तव्यात राहिले.

बहिणीकडे नवरात्रीतले अष्टमीचे सवाष्णी पूजन होते. मीही गेले होते. दहा माहेरवाशींणी सवाष्णींची यादी आधीच झालेली होती.  बहिणीने मला त्या सवाष्णं पूजनात समाविष्ट केलेच नाही.  तशी मी काही संकेतांना मानणारी नाही. पण कधी कधी मन मऊ  होतंच की!शिवाय विवाहानंतर आची जात, कुटुंब बदलले. बहिण उच्च जातीतली.   बहिणीच्या या मला डावलण्याच्या कृतीमुळे माझ्या सौभाग्याचा, सवाष्णीपणाचा अपमान तर  झालाच शिवाय एका जातीभेदाचं भूतही डोक्यात शिरलं.तिच्या स्टेटस मधले आपण नसू  असेच मला त्यावेळी वाटले. आणि तिने असे का करावे याचा मला आजही प्रश्न आहे. मी तिला याविषयी कधीच बोलले नाही. तिनेही कधी विचारले नाही कारण मुळातच तिला कल्पनाच आली नाही की एका लहानशा कृतीने तिने मला दुखावले. असो. शेवटी सारे गैरसमजच.

पण आता विचार करताना वाटतं गैरसमज एक अशी शक्तिशाली गोष्ट आहे जी जगाले सर्वात सुंदर नातं एका क्षणात मोडते. गैरसमज हे एक अत्यंत जहाल विष आहे. हे विष शंभर आनंदांच्या क्षणांना विसरायला लावते. व्यक्ती मधलं अंतर वाढवते. यासाठी एकच करावे मनातली अढी बोलून, चर्चेद्वारे दूर करावी. प्रश्न चर्चेने सुटू शकतो. झालं गेलं विसरून जा” म्हणून नात्यातला गोडवा टिकवावा. तारतम्याचा विचार करून,अहंकार सोडून, सह अनुभूतीने एकमेकांना समजून घेऊन, झालेले गैरसमज दूर करणे हेच योग्य आहे. कधी क्षमा मागावी कधी क्षमा मागण्यारांना क्षमा करावी आणि जीवनाच्या प्रवाहात आनंदाने उतरावे. सगळ्यांना सोबत घेऊन. अत्यंत समंजसपणे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ @ २५ डिसेंबर @ नाताळ सण… लेखक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ @ २५ डिसेंबर @ नाताळ सण… लेखक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा आणि आनंदोल्हासाचा सण असणाऱ्या नाताळाचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे ख्राईस्ट मास. याचा अर्थ, येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहीक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली. येशूच्या जन्माची कथा न्यू टेस्टामेट मध्ये दिली आहे.

त्यानुसार, देवाने आपला दूत गॅब्रियलला पृथ्वीवर मेरी नावाच्या एका तरूणीकडे पाठविले. गॅब्रियलने मेरीला सांगितले की, तुझ्या पोटी इश्वराचा पुत्र जन्म घेणार आहे. त्याचे नाव जीझस असेल. तो महान राजा असेल आणि त्याच्या राज्याला कोणतीही सीमा नसेल. मेरी कुमारीका व अविवाहित होती. त्यामुळे आपल्याला पुत्र कसा होईल, असा प्रश्न तिला पडला. तिने गॅब्रियलला तसे विचारलेही. त्यावेळी गॅब्रियल म्हणाला, इश्वरी आत्मा येऊन तिला शक्ती देईल. ज्या योगे तिला मूल होईल. लवकरच मेरीचे जोसेफ नावाच्या युवकाशी लग्न झाले. देवदूताने जोसेफच्या स्वप्नात जाऊन सांगितले, की मेरी गर्भवती असून तिला लवकरच मुलगा होईल. त्यामुळे तिची योग्य काळजी घ्यावी. तिला सोडून देऊ नये. त्यावेळी जोसेफ व मेरी नाजरथ मध्ये रहात होते. नाजरथ आता इस्त्रायलमध्ये आहे. त्या काळी ते रोमन साम्राज्याचा भाग होते आणि ऑगस्टस हा रोमचा सम्राट होता. ऑगस्टस याने एकदा आपल्या राज्याची जनगणना करण्याचे ठरविले. त्यासाठी बेथेलहेमला जाऊन प्रत्येकाला आपले नाव लिहावे लागत असे.

त्यामुळे बेथेलहॅमला मोठी गर्दी झाली होती. सर्व धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाणे भरून गेली होती. गर्भवती मेरीला घेऊन जोसेफही तेथे आला होता. पण खूप हिंडूनही त्यांना कुठे जागा मिळत नव्हती. शेवटी एका घोड्याच्या पागेत त्यांना जागा मिळाली. तेथेच मध्यरात्री भगवान येशूचा जन्म झाला. त्यांना गुंडाळून ठेवण्यात आले होते. तेथे जवळच काही धनगर गायींना चारत होते. त्यावेळी तेथे एक देवदूत आला, त्याने या धनगरांना सांगितले, की जवळच एका बाळाचा जन्म झाला आहे. हे बाळ म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून दस्तुरखुद्द परमेश्वरच आहे. धनगरांनी तेथे जाऊन पाहिले तर खरोखरच त्यांना बाळ दिसले. त्यांनी गुडघे टेकून त्याला नमस्कार केला. हे धनगर खूप गरीब असल्याने त्यांच्याकडे भेट म्हणून द्यायला काहीही नव्हते. म्हणून त्यांनी येशूला भगवान म्हणून स्वीकारले. ख्रिश्चनांसाठी या घटनेचे मोठे मह्त्त्व आहे. कारण त्यांच्या मते येशू हा इश्वरपुत्र होता. म्हणूनच ख्रिसमस हा आनंदोत्सव आहे. कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी पृथ्वीवर आला होता. म्हणूनच प्रार्थना, ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन, शुभेच्छा पत्रांचे आदानप्रदान, विविध खाद्यपदार्थ या द्वारे येशूचा जन्मोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. जगभरातील चर्च मध्ये या दिवशी यात्रा काढल्या जातात. भक्तीगीतांचे गायन होते. २४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांचा गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. रोट व पवित्र मद्याचा प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. खरे तर सध्या साजरा केला जातो तशा पदधतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमस मध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. या दिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. १८७० पर्यंत त्याचा प्रसार सर्वत्र झाला. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो. २५ डिसेंबर दोन गोष्टीं शिवाय अपूर्ण असतो. सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. बेकरी मध्ये ख्रिसमसची तयारी एक महिन्यापूर्वी सुरू होते. ड्रायफ्रूट्स रम मध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. याशिवाय इतरही केकचे प्रकार असतातच.

लेखक : संजीव वेलणकर

पुणे

९३२२४०१७३३

संकलन : मिलिंद पंडित

कल्याण 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगी हा खास वेड्यांचा…! लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ जगी हा खास वेड्यांचा…! लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

हजारो वेड्यांना नाना प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करण्याचं वेड असतं. नोटा, नाणी, पोस्टाची तिकीटं, दिग्गज व्यक्तिंच्या सह्या, पुरातन कालीन वस्तू … आणि नाना प्रकारची पुस्तकं सुद्धा! विशेष म्हणजे ही सारी वेडी मंडळी, आपापले संग्रह झपाटल्यासारखे, अतिशय कष्टाने, स्वतः पदरमोड करून, वैयक्तिक पातळीवर करत असतात.

श्री. अंकेगौडा हा कर्नाटकातील असाच एक पुस्तक वेडा माणूस. गरीब शेतकऱ्याच्या घरांत जन्माला आलेला आणि आता सुमारे पासष्ट वर्षे वय असलेला हा माणूस गेली पन्नास वर्षे पुस्तकांचा संग्रह करतोय. आज मितीला त्याच्या संग्रही किती पुस्तक असावीत असा अंदाज आहे? हजार? पाच हजार? दहा हजार? …. नाही !! आपल्याला अंदाज लावणं कठीण आहे पण आज घडीला त्यांच्या संग्रहामध्ये पंधरा लाखाहून जास्त पुस्तके आहेत !!

आमचा आपला एक व्यावहारिक विचार —

अंकेगौडा यांच्या जिद्दीला, चिकाटीला आणि एवढ्या मोठ्या अवाढव्य कामाला त्रिवार सलाम !!

पण …

हे एवढं मोठं शिवधनुष्य पेलणं आता त्यांनाही खूप कठीण होत चाललं आहे. एवढी पुस्तकं ठेवण्यासाठी लागणारी जागा, कपाटं, स्टॅन्डस् , बुकशेल्फ यांची सोय नसल्यामुळे ढिगावारी पुस्तकं नुसती अस्ताव्यस्त पडली आहेत. त्यांची कुठे कसली यादी नाही, वर्गवारी केलेली नाही, अनुक्रम नाही. वाळवी, कसर हे पुस्तकांचे मोठे शत्रू. त्यांच्या बंदोबस्ताचं काय? एकेकाळी रोज शंभर-दीडशे माणसं संग्रहालय पहायला यायची, आता दोन-तीन माणसं सुद्धा येत नाहीत. कारण हवं असलेलं पुस्तक शोधणार कुठे आणि कसं? समुद्रकाठच्या वाळूतून आपल्याला हवा असलेला कण शोधणार कसा?

आणि त्यामुळे भला मोठा पुस्तक संग्रह, एवढंच कौतुक शिल्लक राहतं ! व्यावहारिक उपयोग काहीच नाही !!

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? काव्यानंद ?

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆

छातीत फुले फुलण्याची

वार्‍यावर मन झुलण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

डोळ्यात ऋतुंचे पाणी

मौनात मिसळले कोणी

वाळूत स्तब्ध राहताना

लाटेने गहिवरण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

तू वळून हसलीस जेव्हा

नक्षत्र निथळले तेव्हा

मन शहारून मिटण्याची

डोळ्यात चंद्र टिपण्याची …

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

ज्या चंद्र कवडशा खाली

कुणी साद घातली ओली

मग चंद्र वळून जाताना

किरणात जळून जाण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

पाऊस परतला जेव्हा

नभ नदीत हसले तेव्हा

कोरड्या मनाने कोणी

गावात परत येण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

थबकून थांबल्या गाई

की जशी शुभ्र पुण्याई

त्या जुन्याच विहिरीपाशी

आईस हाक देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

गावाच्या सीमेवरती

जगण्याच्या हाका येती

त्या कौलारु स्वप्नांना

आयुष्य दान देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

हे गाणे जेव्हा लिहिले

मी खूप मला आठवले

शब्दास हाक देताना

आतून रिते होण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 – श्री अरुण म्हात्रे 

काही काही गोष्टी आपल्या समोर येण्याच्या वेळा किती अचूक असतात असं ही कविता पुन्हा पुन्हा वाचताना मला जाणवलं. वर्षाचा शेवटचा महिना   मला आठवणींचा महिना  वाटतो… वर्षभरातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या एखाद्या चित्रपटातल्या फ्लॅशबॅकप्रमाणे आपल्या नजरेसमोरून तरळत जात असतात. वर्ष आणि वय जसं उलटत जातं तसं भूतकाळाची वही भरायला सुरुवात होते.

या वहीतल्या प्रत्येक पानावर वर्षभरातले अनेक प्रसंग आपल्याही नकळत लिहिले जातात… गंमत म्हणजे काही प्रसंग लिहायचं ठरवलं नसलं तरीही आपसूकच लिहिले जातात. आणि एका छोट्याशा ज्योतीनं सारा आसमंत नजरेत यावा तसे ते प्रसंग कुठल्यातरी एका छोट्याशा जाणिवेतून स्मृतीतल्या एखादा दिवस, विशिष्ट प्रहर लख्ख उजळवून टाकतात.

अरुण म्हात्रे यांच्या या कवितेत या कवीच्या स्मृतिकोषात अशाच काही आठवणी बद्ध झालेल्या आहेत. ज्या साध्या दिवसांनाही ‘विशेष पण’ बहाल करून गेल्या आहेत. प्रत्येकाचा भूतकाळ हा तसा रमणीय असतो. पण कवी हा भूतकाळ ज्या पद्धतीने बघतो ती पद्धत जास्त ‘रमणीय’ असते. कारण त्याला गेलेल्या वेळेची किंमतही माहिती आहे आणि आत्ताच्या वेळेचीही जाण असते. ऋतुंप्रमाणे बदलणाऱ्या निसर्गा इतकंच सहजपणे ऐलतीरावरून पैलतीराकडे बघण्याची ताकद कवी आत्मसात करतो, किंबहुना ते त्याचं बलस्थान असतं.

आर्तता, आत्मीयता, आत्ममग्नता आणि त्याचवेळी आत्मसमर्पणता अशा सगळ्यांच भावना तो कवितांमधून मांडत जातो. इतक्या सहज की जणू सागराच्या लाटेनं जोमाने उसळुन आपलं वेगळेपण सिद्ध करावं आणि ते लक्षात येईस्तोवर समुद्रात तितक्याच वेगाने मिसळून जावं. ‘क्षणाचा जन्म’ आणि ‘क्षणाचा मृत्यू’ इतक्या सुंदर पद्धतीने कवी मांडतो की जणू कविता ही त्याची प्रेयसी असावी आणि तिचं वर्णन करण्याची शब्दांची अहमिका लागलेली असावी.

या कवितेतील ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’ या ओळीतून आपल्यालाही दोन वेळांमधला आणि दोन परिस्थिती, मनस्थिती यांतला फरक चटकन जाणवतो.

मला तर ही कविता कवितेलाच उद्देशून लिहिलीय असं वाटतं. जणू तो कवितेलाच सांगतो आहे ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’. एका टप्प्यावरती आल्यावर कवीनेच आपल्या कवितांकडे तटस्थपणे बघण्याचा आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तो याच पद्धतीने तिच्याशी बोलेल.

घटना जेव्हा वर्तमानात घडत असतात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना अर्थ असतोच असं नाही. अनेकदा काळ उलटून गेल्यावर त्या घटनांना विशेष अर्थ प्राप्त होतो. या कवितेतल्या सगळ्या कडव्यांमधून कवीला हेच मांडायचं असावं.

येणाऱ्या नव्या वर्षाकडे आशेने पाहताना मागील वर्षातल्या अनेक बारीक बारीक गोष्टी देखील आपण आता अशाच नजरेने पाहतो आणि आपल्याला त्या तेव्हा साधा वाटलेल्या घटनाही, आता विशेष वाटतात. ही जगण्यातली गंमत कवीला खूप छान उमगलेली असते.

मला भावलेली कविता अशी आहे. तुम्हाला ती आणखीन वेगळ्या प्रकारे भावू शकते. कारण आपल्या प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print