(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झालक देखने को मिलती है। हम भविष्य में आपके उत्कृष्ट साहित्य की अपेक्षा रखते हैं। आज प्रस्तुत है उनका आत्मकथ्य “देवा होऊ कशी उतराई”।)
☆ देवा होऊ कशी उतराई ☆
आज वळून मागे पहाताना मला दिसतंय की, भगवंताने मला जन्मल्यापासूनच किती भरभरुन दिलंय.
जन्म पिता रामचंद्र माता सरस्वती यांच्या पोटी. आजी राधा माझी प्रियतमा.काका काकू ज्यांनी जन्म दिला नसला तरी मातपित्यापेक्षाही उच्च प्रेम व संस्कारांनी वाढवलं. शिकवलं अतिशय मायेनं पालनपोषण करुन लग्न करुन देऊन पुढे माझं बाळंतपण, माझ्या मुलांनाही तितक्याच मायेनं किंबहुना त्यापेक्षा जास्त. वाढवलं संस्कारित केलं.
माझ्या लहानपणी मी काका काकूंकडे म्हणजे आम्ही सर्वच भावंडं वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून काकू म्हणजे माईकडेच वाढलो. काका म्हणजे आण्णा तालुक्याच्या गावी तालुकामास्तर म्हणून सेवेत होते. त्यामुळे आमचं शिक्षण त्यांचेकडेच झालं. किंबहुना त्यादोघांमुळेच झालं.
खेड्यात राहूनही आमच्याकडून बोलताना लिहिताना उच्चार चुकले तर ओठावर फट्कन् आण्णांची दोन बोट उमटायची. त्यामुळे बाळपणापासूच वाणी शुद्ध झाली.
पहाटे चार वाजता आम्हा भावंडांना उठवून काही व्यायाम व अभ्यास याची सवय बाळपणापासूनच लागली. आजही वयाच्या पंच्याहत्तरीत मी पहाटे उठून नियमित व्यायाम प्राणायाम,आता अध्यात्मिक अभ्यास,लिखाण व कविता करते.
भाषा समृद्ध होण्याचे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे मला सुदैवाने शालामाऊलीही अत्यंत चांगली लाभली. न्यू इं.स्कूल सातारा. या माझ्या शाळेत मला सर्वच विषयाचे शिक्षक अतिशय भले भेटले. संस्कृत या माझ्या अत्यंत आवडत्या विषयाला पू. गुरुवर्य आपटीकर लाभले. संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होतेच परंतु बऱ्याच पौराणिक ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता. त्यांच्यामुळे माझं संस्कृत विषयाचं ज्ञान उत्तम झालं. आयुष्यात मला त्यांचा खूप मोलाचा उपयोग झाला. आजही मी माझ्या नातवंडांनाच नाही तर शेजारच्या मुलांनाही संस्कृत शिकवते, मार्गदर्शन करते.कारण ती देवभाषा आहे सर्वांना ती माहिती असणे आवश्यक आहे. असा माझा दृढ विश्वास आहे.
(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। सुश्री रंजना एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं। सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से जुड़ा है एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है। निश्चित ही उनके साहित्य की अपनी एक अलग पहचान है। अब आप उनकी अतिसुन्दर रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनका एक आलेख “प्राथमिक शाळेतील समस्या” जो प्राथमिक शालाओं की समस्याओं एवं शिक्षकों के दायित्व की विवेचना करता है। उनके जीवन में उनके प्रत्येक विद्यार्थी की शिक्षा का कितना महत्व है,आप यह आलेख पढ़ कर ही जान सकेंगे। मैं ऐसी शिक्षिका और उनकी लेखनी को नमन ही कर सकता हूँ। )
साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #-6
? प्राथमिक शाळेतील समस्या ?
*शिक्षणाचा लावी लळा
माझा गुरूजी सावळा।
कलागुणांचा सोहळा
बाल गोपाळांचा मेळा*
अशा आमच्या गुरूजींच्या खांद्यावर शिक्षणाची धूरा अगदी गुरूकुल परंपरे पासून आजपर्यंत समाजाने सोपवली आहे.
याच समाजाने गुरूला ब्रह्मा विष्णू महेशाचीही उपमा दिलेली.
विद्यार्थी जीवनात,अगदी विधात्या प्रमाणे विद्यार्थ्यांच्या उत्पत्ती, स्थिती व लय निर्मितीचे अधिकारच समाजाने आपल्याला दिलेले आहेत. आपण विद्यार्थ्यांचे भाग्यविधाता आहोत या भूमिकेतून जर आपण सर्व अडचणींकडे पाहिले तर निश्चितच सर्व अडचणी क्षुल्लक वाटायला लागतील .कारण भाग्य विधाता ही उपाधी सर्व अडचणीवर मात करण्याची स्फूर्ती नक्कीच देऊन जाते.
*माझाएक विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहिला म्हणजेच मी एक आयुष्य लयालानेले* ही जाणीव जेव्हा आपल्याला होईल तेव्हा शिक्षकांना कुठली अडचणच दिसणार नाही. मुख्य म्हणजे शाळेतील मुलं ही माझी मुलं आहेत ही भावना ज्या दिवशी निर्माण होईल, त्या दिवशी आपोआपच त्यांच्या संबंधातील सारे हक्क आणि कर्तव्य आपोआपच माझ्याकडे असतीलच यात तिळमात्र शंका नाही. तेव्हा आपण आज समोर बसलेली माझीच मुले आहेत असे गृहीत धरून अडचणींकडे पाहू या म्हणजे त्यांच्या सर्व समस्या माझ्या होतील आणि माझी समस्या कितीही कठीण असेल तरीही मी ती सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ असेन कारण मुलं माझी आहेत ही भावना खूप महत्त्वाची आहे. जर क्रांतीज्योती सावित्रीबाईंना दीडशे वर्षापूर्वी याहून कठीण समस्या कुठल्याही मदती शिवाय सोडवायला कठीण वाटल्या नसतील तर तिच्या लेकींना 21व्या शतकात त्या इतक्या कठीण का वाटाव्यात हा विचार केला की समस्या क्षुल्लक वाटायला लागतात, मार्ग नकळत सापडायला लागतात.
*विधाता बनने निश्चितच सोपे काम नाही*.
मग अडचणीच सोप्या दिसायला लागतील.
पालकांचे दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा, पालकांचे स्थलांतर, लहान भावंडे सांभाळणे, घरकाम करणे, इ.अडचणी
तर अपुऱ्या शालेय सुविधा, शैक्षणिक साधनांचा अभाव, अपुरे खेळाचे मैदान नियोजनाचा अभाव, अधिकाऱ्यांचा दबाव, अपुरे विषय ज्ञान, शिक्षक पालक संबंधातील तफावत, शिक्षकातील मतभेद, समाज व शाळा यांच्यातील दरी अशी अनेक कारणे गुणवत्ता विकासात अडसर निर्माण करतात परंतु कुशल शिक्षक मनाचा पक्का निर्धार करून यातून योग्य मार्ग नक्कीच काढू शकतो यात यत्किंचितही शंका नाही. फक्त माझी 100% देण्याची तयारी हवी. आणि जो भरभरून देतो त्याला मागण्याचा नक्कीच हक्क असतो आणि तो कोणी नाकारू शकत नाही, आणि खरंतर विद्यार्थी आणि पालक यांचे प्रेम जिव्हाळा आपुलकी यात तो नकळत आकंठ बुडालेला असतो. चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला गुणवत्ता विकाचा एक दृढ निश्चय घेवून सकारात्मक सुरुवात करूयात
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी (सुश्री आरुशी अद्वैत जी ) का एक सामाजिक कुप्रथा पर आधारित आलेख। इस आलेख में उद्धृत निष्पक्ष विचार सुश्री आरुशी जी के व्यक्तिगत विचार हैं। हम किसी भी सामाजिक कुप्रथा जो संविधान , समाज अथवा व्यक्ति की मनोभावना व वैचारिक स्वतन्त्रता तथा आत्मसम्मान के विरुद्ध हो उससे कदापि सहमत नहीं हैं। )
☆ कौमार्य चाचणी… अमानुष पद्धत.. ☆
लग्न झाले की नवऱ्या मुलीला ही चाचणी करावीच लागते, ह्यातून सुटका नाही… कंजारभाट समाजातील ह्या घृणास्पद रितिरिवाजावर काल करम प्रतिष्ठान तर्फे चर्चासत्र आणि विषयाधारीत कवितावाचन ठेवण्यात आलं होतं…
तिथे लीलाताई इन्द्रेकर ह्यांच्याकडून जी माहिती मिळाली ती ऐकल्यावर मन विषण्ण झालं, सुन्न झाले… काही वेळा अंग थरथरायला लागलं, तर कधी दगडासारखं घट्ट बनलं, तर कधी पोटात ढवळाढवळ होऊ लागली.. एकंदरीत काय रितिरिवाजांमधील फोलपणा समोर येत होताच, त्याचबरोबर त्यातील भीषणता अस्वस्थ करून मनाला डागण्या देत होते… नुसतं ऐकून आमची ही अवस्था झाली होती, तर ज्या मुलींना ह्या पद्धतीला नकार देता येत नाही आणि सगळं निमूटपणे सहन करायला लागत असेल त्या मुलींना, स्त्रियांना ह्या राक्षसी वृत्तीच्या पुरुषांची चीड आल्याशिवाय राहत नसेल… जे जे ऐकलं ते इतकं भयंकर आहे की लिहितानासुद्धा अंगावर काटा येतोय आणि लिहिण्याचं धैर्य तर अजिबात नाही…
कौमार्य चाचणी घेताना मुलीवर, तिच्या कुटुंबियांवर जे दडपण, दबाव टाकला जातो, त्यामुळे लग्नानंतर सुरू होणाऱ्या नाजूक, कोमल नात्याबद्दल स्वप्न पाहणं तर दूरच, पण ह्या चाचणीमुळे जो मनस्ताप सहन करावा लागत असेल ते शब्दात सांगणे कदापि शक्य नाही… दुर्दैवाने जर ही चाचणी फेल गेली तर त्या मुलीचे आणि कुटुंबाचे हाल हाल केले जातात, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो, अगदी जीवनावश्यक गोष्टीही पुरवल्या जात नाहीत, मुलीला मारहाण, तिचा छळ, ह्याची परिसीमाच… मुलीला शंभर लोकांसमोर उत्तरे द्यावी लागतात… बिचारीची धिंड काढायची बाकी असते… हे सगळं तिच्या इच्छेविरुद्ध घडत असतं, आणि तिला कोणीच एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून मदत करायला तयार नसतं… सगळं चव्हाट्यावर आणून तिला दोषी ठरवून तिच्यावर अत्याचार करतात, आणि ह्याला कोणीच विरोध करत नाही, करण जात पंचायत जे सांगेल ते बरोबर ह्या अंधश्रद्धेच्या आंधळ्या कुबड्यावर चालणं इथल्या पुरुषांना सोपं वाटतं, शिवाय जमातीत राहायचं आहे तेव्हा जमातीच्या नियमांना डावलण्याचं धाडस नसतं किंवा सोयीस्कर रित्या हे धाडस गुंडाळून ठेवलं जातं… देशातील कायद्याला धाब्यावर बसवून जात पंचायत फक्त त्यांचा इगो आणि सो कॉल्ड पद भूषवण्यात धन्यता मानतात… चर्चासत्रातून असेही निदर्शनास आले की ही पद्धत फक्त कंजार भाट समाजात नसून, इतर अनेक उचचभृ समाजातही पाळली जाते…
आज एक स्त्री म्हणून मी देवाचे आभार मानते की त्याने माझ्यावर अशी वेळ कधीच आणली नाही, तरी माझ्या तक्रारी संपत नाहीत, ह्या अवस्थेतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे… जणू दुःखाची काय किंवा सुखाची व्याख्या पडताळून पाहणे आवश्यक आहे…
इंटरनेट वर search केलं तर ह्यावर इथांभूत माहिती मिळेल.
सध्या ह्याच समाजातील काही तरुणांनी ह्या अमानुष रूढी परामपरेविरुद्ध आवाज उठवला आहे, त्यात विवेक तामचीकर आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या भात ह्या लढ्याला सुरुवात केली आहे, शिवाय लीलाताई इन्द्रेकर ह्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत, हे कार्य करणाऱ्या , मुलांना त्यांच्याच समाजातूनच अनेकविध लोकांकडून धमक्या येतात, तरी ही लोकं आता थांबणार नाहीत, हे नक्की.. ही अमानुष रीत समूळ नष्ट करण्यात देव त्यांच्या प्रयत्नांना यश देवो, हीच प्रार्थना…
ह्या विषयावर कविता लिहायचं आव्हान पेलणे खूप अवघड गेले, मी एक स्फुट लिहायचा प्रयत्न केला, ते पुढे मांडते आहे…
लग्नाला नक्की या हं…
आणि हो, आहेर अजिबात स्वीकारला जाणार नाही…
तुमचे शुभाशीर्वाद हाच मोठा आहेर…
हे माझ्याही लग्न पत्रिकेवर छापलेलं पाहून थोडासा दिलासा मिळाला…
आई बाबांना हे पटवून देणं खरंच कठीण गेलं की
भेटवस्तूंची प्रथा मोडून
सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज कशी जास्त आहे… !
प्रत्येक वस्तू खरेदी करताना
तिचा योग्य वापर, फायदे, नुकसान
ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि गॅरंटी / वॉरंटी,
ह्याची खातरजमा झाली की,
ती वस्तू खरेदी होते, हो ना !
आई, थोड्याच दिवसात ह्या लग्नाच्या दुकानात तू प्रेमाने, वात्सल्याने वाढवलेल्या,
ह्या संस्कारित मांसाच्या गोळ्याची अवस्था होणार आहे…
रुखवतात मांडलेल्या अनेक वस्तूंप्रमाणे माझी स्थिती होईल…
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की दसवीं कड़ी व्यक्ती पूजा…। सुश्री आरूशी दाते जी ने व्यक्ति पूजा की अत्यन्त सुंदर रूप से विवेचना की है। किसी व्यक्ति विशेष के विचारों से सहमत होना या उसका सम्मान व्यक्ति पूजा की श्रेणी में नहीं आता है, यह अत्यन्त स्पष्ट है। किन्तु, कई बार इस भावना को न समझने से दोनों पक्ष असहज स्थिति में आ जाते हैं। हमारा आत्मसम्मान हमें समय समय पर सचेत भी करता रहता है। आवश्यक है हम अपने हृदय की सुनें। सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं। इस शृंखला की क ड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #10
☆ व्यक्ती पूजा… ☆
ती कधी फारशी जमली नाही… (खरंच का?)
का?
कदाचित आपले विचार कोणावर लादायचे नाहीत, ही शिकवण जोपासलेली आहे.. आणि विचार कोणावर लादता येतील ह्यावर विश्वास नाही… एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून देऊ शकतो कदाचित, आणि पटवून दिले तर त्याचाच ध्यास असावा हे ही अयोग्य आहे, नाही का?
काही लोकांना हे जमतं बाई… कसं ना म्हणजे… जाऊ दे, आपण विचार कशाला करायचा, ह्या भावनेतून गप्प बसते…
पण खरंच मी कधी व्यक्ती पूजा केली नाही का? हा प्रश्न मनात येतो आणि मन वेगवेगळ्या दिशांवर आरूढ होते… जे काही चांगलं आहे, किंवा जे चांगलं नाही, ते ठरवताना आपण नक्की काय करतो… त्यात कधी स्वतः विचार असतो तर कधी दुसऱ्यांनी दिलेले सल्ले असतात… सल्ले अनेकांकडून मिळत असले तरी ठराविक लोकांचेच सल्ले आपण आचरणात आणतो… मग ही व्यक्तीपूजा झाली का?
नाही नाही, असं स्वतःला सांगत पुन्हा त्या विचार चक्रात अडकून जाते… नक्की कोण – व्यक्ती की विचार ? हे द्वंद्व दूर होत नाही… कधी कधी असं वाटतं की ती व्यक्ती आवडते, जवळची वाटते किंवा विश्वासक वाटते म्हणून आपण तिचे विचार, सल्ले मान्य करतो, म्हणजे व्यक्ती पुज़ाच झाली की !
स्वतःचं समाधान व्हावं म्हणून मग मी स्वतःलाच समजावते, ही व्यक्ती पूजा नाही गं, फक्त त्या व्यक्तीचे विचार घेतेस तू !
तुम्हालाही असंच वाटतं का?
पुन्हा एक गोंधळ सुरू होतो… व्यक्ती, माणूस म्हणजे तरी नक्की काय?
विचारांचे मूर्त रूप… हो ना! मग विचारांची स्वीकृतता म्हणजे त्या व्यक्तीचाही स्वीकार !
असो, खूप गुंतागुंतीचा विषय आहे… पण आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती (जरी आपण तिचे पूजक नसलो तरी) आपल्याला काही तरी देऊन जाते ह्याची जाणीव जिवंत राहिली पाहिजे… !
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पुष्प पाचवे – धावती भेट. . . . !” ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प पाचवे #-5 ☆
☆धावती भेट. . . . ! ☆
किती बरं वाटतं *धावती भेट* हा शब्द ऐकल्यावर. खरच आजच्या स्पर्धेच्या युगात ही धावती भेट आवश्यक झाली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या अलिशान वातानुकुलित गाडीतून विहंगम दृश्यांची धावती भेट मनाला टवटवीत करून जाते.
ब-याच वर्षानी महाविद्यालयीन जीवनातील एखादा मित्र लोकलमध्ये, प्रवासात बसमध्ये घाई घाईत आपला मोबाईल क्रमांक घेतो. अचानक पणे कधीतरी आपला पत्ता शोधत आपल्या ऑफिस वर, घरी येऊन धडकतो. त्याच अस अवचित येण मनापासून आवडत. एकमेकांना कडकडून भेटताना दोघांच्या चेहर्यावरचा आनंद खूप काही देऊन जातात. हे समाधान मिळण्यासाठी योग यावा लागतो. हल्ली मित्रांच्या गाठी भेटी व्यावहारिक पातळीवर अस्तित्वात येतात. पार्टी साठी येणारा मित्र जेव्हा पार्ट टी वर खूष होतो ना तेव्हा ते समाधान काही औरच असते.
धावत्या भेटीत मिळालेली आठवणींची वस्त्रे आपल्याला मनाने चिरतरुण ठेवतात. धावत्या भेटीत वेळेचा हिशेब नसतो पण ही भेट संपू नये असे वाटत असतानाच एकमेकांचा निरोप घ्यावा लागतो. धावती भेट घ्यायला कुठल्याही नियोजनाची गरज नसते. एक विचार मनात येतो आणि परस्परांना भेटण्याची ओढ ही धावती भेट घडवून आणते.
कौटुंबिक जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी आपल्या आवडत्या पर्यटन स्थळाला धावती भेट दिली तर मिळणारं समाधान नवी उमेद देत ही उर्मी, उर्जा मनाला उभारी देते. हल्ली या व्यवहारी जगात एकमेकांच्या मनाचा फारसा विचार कुणी करत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने विचार करून मोकळा होतो. सहजीवनात याच गोष्टी वादाचे कारण बनतात. एकमेकांशी मनमोकळा संवाद साधायचा असेल तर अशा धावत्या भेटी व्हायला हव्यात. आवडती वस्तू, आवडत्या व्यक्तीला आठवणीने देण्यात जे समाधान मिळते ते अनमोल आहे. त्यासाठी पैसा नाही थोडा समंजस पणा हवा. आपले पणा हवा.
देवाचे दर्शन घेताना देवळाबाहेर उभे राहून चप्पल बूट न काढता केवळ बाहेरून हात जोडून देवदर्शन करता येते पण जरा थोडा वेळ काढून गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन घेतल्यावर मनाला मिळणारे समाधान अवर्णनीय आहे. तेव्हा या धकाधकीच्या जीवनात आपल आयुष्य अधिक आनंदी करायचे असेल लोकाभिमुख रहायचे असेल तर धावती भेट घ्यायलाच हवी. संवाद साधताना मी देखील घेतोय धावती भेट. . . तुमच्यातल्या रसिकाची आणि माणसातल्या माणसाची. . . . !
(श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है । e -abhivyakti पर पिछले दिनों आपके द्वारा लिखी गई श्री विजय यशवंत सातपुते जी की पुस्तक “प्रकाश पर्व ” की समीक्षा प्रकाशित की थी जिसे अच्छा प्रतिसाद मिला। समाजसेवी श्री शांताराम गरुड जी के सेवाभाव पर यह आलेख वास्तव में उनका एक अविस्मरणीय संस्मरण है जिसे हम अपने पाठकों के साथ साझा कर रहे हैं। यह आलेख श्री विक्रम आप्पासो शिंदे जी की समाज सेवा भावना को भी प्रदर्शित करता है। )
☆ पुष्पकचा सेवाभावी गरुड़ ☆
(श्री शांताराम गरुड़ – आयुष्यपणाला लावून अखंड सेवेच व्रत चालवणारा एक सच्चा समाजसेवक, माणुसकिचा कैवारी..!)
एखदाचा साताऱ्याहुन पुण्याला पोहोचलो.पाच-सव्वापाच वाजल्या असतील..वरती आभाळाच थैमान चालू झालं होत आणि माझ्या डोक्यातदेखिल विचारांनी थैमान माजवल होतं. कारण आज बऱ्याच दिवसांनी त्या साताऱ्या मधील yc कॉलेज मध्ये बराच वेळ एकांतात घालवला होता…जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या आणि तिच्याशी जवळपास 1 मिनीट 12 सेकंदाचाच संवाद झाला होता. बाकि संवाद मुकाच होता.
गरुड काका आणि मी…अव्यक्त सर्व काही?
स्वारगेट ला pmt च्या स्टॉपवर थांबलो होतो. बऱ्याच वेळ झालं डोक्यातल काहूर शांत होत नव्हतं…आजुबाजुला गर्दीही वाढत होती. अजुनतरी सेनापती बापट रोड ला जाणाऱ्या बसचा कुठेही थांगपत्ता नव्हता.चर्..चिक..चिक.. या बस च्या जोरात दाबलेल्या ब्रेक च्या आवजाने भानावर आलो ..! समोर सेनापती बापट रोड वरुन जाणारी बस थांबली आणि अखेर मी मोठ्या कसोशिने मार्गस्थ झालो.बसल्या बसल्या सीटवर एक मोठासा सुस्कारा टाकला आणि तेवढ्यात खाकी वर्दीतील एक निरागस..भाबड़ ..चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव स्पष्ट दिसणार्ं पन्नाशीतल व्यक्तिमत्व शेजारी येवून बसले.मला जरा त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली. न राहून त्यांच्याशी बोलता झालो.थोडेसे चोचरे बोलत बोलत तेही माझ्याशी संवाद साधू लागले. आणि त्या साध्या सरळ विभूती पलिकडचे लाखमोलाचे कार्य स्पष्ट होवू लागले….मी ते सर्व अचंबित होवून ऐकतच राहिलो. त्याचं नाव होत “शांताराम गरुड़” आणि ते महानगर पालिकेच्या शव वाहणाऱ्या बस “पुष्पक” वरती गेली 12 वर्षे ड्राईवर म्हणून कार्यरत होते. म्हणजे आयुष्यातील एक तप या माणसाने मृत्युपलिकडच्या माणसांमध्ये घालवले होते. दररोज स्वारगेट डेपो अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण पुणे क्षेत्रातील दोन व्यक्तींच्या पार्थिवाशी सामना होत होता या माणसाचा. कित्येकांची प्रेतं या माणसाने उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. कित्येकांचे रडवलेले मुखवटे हा इसम दररोज पाहत होता. दुर्दशा झालेल्या कुटुंबाची व्यथा याच माणसाने पाहिली होती. 12 वर्षामध्ये न थकता अविरतपने गरुड़ काका मृत्युच्या पलीकडे गेलेल्या माणसांची सेवा करतच होते. पुष्पक हे शव वाहन चालविन्यास दुसरा कोणताच ड्राईवर तयार होत नसे मात्र गरुड़ काका खऱ्या अर्थाने पुष्पकाचे गरुड़ ठरले होते. 12 वर्ष्यात जवळपास 7500 हजार पार्थीव् वाहुन न्हेणारे गरुड़ काका आता बोलता बोलता पाप पुण्य आणि खऱ्या अर्थाने सेवा सुश्रुषा काय असते याबद्दल बोलते झाले. मी सुन्न होवून ऐकताच राहिलो. त्या चोचरेपनातून त्यांनी एक किस्सा सांगितला..तो त्यांच्या आयुष्यातील.!! काकांचा two व्हीलर वरुन वार्जे मध्ये मोठा एक्सीडेंट झाला होता.त्यावेळी ते pmt त बस ड्राईवर म्हणूनच काम करत होते. 3 वर्षे कोमात गेल्यावर काका पुन्हा हळूहळू चांगले झाले. तेव्हा त्यांच्या घरच्यांची झालेली दयनीय अवस्था काकांनी पाहिली होती. ती दुःखाचि व्यथा जणू त्यांनी तिथुनच प्यायली होती. आणि पुन्हा कामावर रुजू होताना त्यांनी ठरवल होते की “जिवंत माणसांची सेवा सुश्रुषा फार झाली आता..या मेलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबसाठी उरलेले आयुष्य सेवा सुश्रुषा करण्यात वेचायच्. आणि तेव्हापासून आज अखेर पर्यन्त हा माणूस तितक्याच् निष्ठेने पुष्पक च्या माध्यमातून प्रेतवाहिनिवर कार्यरत झाला. कित्येक आक्रोश ऐकले त्यांच्या कानांनी..आकांत करणाऱ्या स्त्रीया-माणस…गहिवर घालणारे चिमुकले जिव…हाम्बरडा फोडणाऱ्या माउली..तर कधी शांतपणे केविलवाण्या होऊन त्यांच्या पुष्पक मधून स्मशानाकडे फुंदत चाललेल्या प्रेतयात्रा..बस्स!!! आता मी पुन्हा अस्वस्थ झालो होतो आणि काका सहजपणे बोलत होते. कल्पनाशक्ति आता माझाच खून करू पाहत होती आणि त्याच क्षणाला माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी पुन्हा मोठासा सुस्करा सोडला आणि अखेर त्यांना बोलता बोलता थाम्बवलच..!! त्याचं खुप कौतुक केल. ती कौतुकाची थाप माझ्यासारख्या त्यांच्या मुलाच्या वयाच्या पोराकडून मिळताना देखील ते तेवेढेच उत्साही आणि समाधानी दिसत होते. आज खऱ्या अर्थाने आयुष्यपणाला लावून सामाजासाठी झटनारा प्रामाणिक समाजसेवक मला भेटला होता. त्या सेवेतच त्यांनी त्यांच्या आयुष्याचा राम पाहिला होता जणू,,.कोणत्याही पुरस्काराचा मानकरी हा माणूस कधीच झाला न्हवता ना कधी श्रेयवादासाठी हा माणूस रुसला होता!! हाच खरा समाजसेवक होता…! पण तरीही दुर्लक्षित??
श्रेयवादासाठी…नावासाठी….वैयक्तिक स्वार्थासाठी..नावलौकिकसाठी समाजकार्याच्या नावाखाली समाजालाच थुका लावणारे असामाजिक कार्यकर्ते आजपर्यंत कैक पाहिले होते पण त्यात शांताराम गरुड़ कुठेही गवसले नव्हते..गाडगेबाबा ही नव्हते आणि नव्हते तिथे कधी आमटे कुटुंब..!!!
बालभारतीच्या कार्नर ला बस टर्न घेवू लागली तेव्हा मी त्यांच्या सोबत एक माझ्या आठवणीसाठी सेल्फ़ी घेतला आणि पुढच्याच् शेती महामंडळ च्या स्टॉपवर् त्यांचा निरोप घेऊन उतरलो.
आता पुन्हा डोकं गरम झाल होत..
आज तीन प्रसंगांनि तीन वेगळ्या दुनियेंच दर्शन घड़वल होत..! वैयक्तिक,नैसर्गिक आणि सामाजिक जगण्याची..कर्तव्याची सूत्र एकाच दिवसात अनुभवायला मिळाली होती. तिचा,पावसाचा आणि गरुड़ काकांच्या चिंतनाचा हिशोब करता करता अखेर रूमवर पोहोचलोच आणि मग ही लेखनी तुमच्याशी बोलू लागली..!!!
अजुन अंधारात असणाऱ्या खऱ्या समाजसेवकांचा गौरव होणार की नाही..! त्यांच्या कार्याचे किमान त्यांना समाधान मिळावे म्हणूनतरी सन्मान होईल की नाही.खरे हीरो फ़िल्म मध्ये डायलाग मारताना कधीच नाहीत दिसणार ..तर ते समाजाच्या तळागाळात समाजाचा बोझा आपल्या खांद्यावर घेताना दिसतील.त्यांनाच सलाम माझा..!! तुमच्याकडे असेल एखादा पुरस्कार तर त्या पुरस्काराचाच सन्मान होईल ऎसा सेवक पाहून न्याय देण्याचा प्रयत्न करा..! परिवर्तन नक्की होईल.!
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की नौवीं कड़ी पणती । जीवन में कुछ घटनाएँ किसी अन्य घटना का संकेत देती है। हम अक्सर उन्हें समझने की कोशिश नहीं करते और वास्तव में कई बार समझ ही नहीं पाते। 9 जून को गुजरे हुए मात्र कुछ ही दिन हुए हैं किन्तु 14 वर्ष पूर्व की घटना जैसे आँखों के सामने चलचित्र की तरह गुजर गई और नेत्र नम हो गए। बस बोझिल हृदय से एक ही शब्द कह सकता हूँ – “नमन”। सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #9
☆ पणती ☆
आली आली दिवाळी आली, पणती लावायची वेळ झाली… खरंच, पणती लावल्याशिवाय दिवाळीची सुरुवात होऊच शकत नाही…
गेली चार पाच वर्षे भरपूर पणत्या रंगवून विकल्या, अनेकांनी त्या दिवाळीत लावल्या असतील, त्यांची घरं उजळून गेली असतील ह्यात शंकाच नाही… अंधारावर मात करणारे हे तेज हवेहवेसे वाटते… उत्साहाची, चैतन्याची उधळण असते… पण…
पण काय?
आज एका वेगळ्याच पणातीची आठवण येत आहे, का ते माहीत नाही… आनंदी वातावरण असताना हा प्रसंग सतत डोळ्यासमोर येतो आहे… सुरुवातीला तो विचार झटकण्याचा बराच प्रयत्न केला, मग म्हटलं असू दे ह्या विचारांची सोबत, कदाचित तेच योग्य असेल… पणातीलाही नशिबात असेल तेच करावं लागतं, ह्याची जाणीव झाली, आणि प्रत्यय आला…
१० जुन २००५… एक दिवा विझला होता, म्हणून एक पणती मिणमिणत होती… आमच्या आयुष्यातील अंधार दूर करू पहात होती…
अजूनही तो कोपरा डोळ्यासमोर येतो… ९ जून २००५ ला रात्री १० वाजता माझ्यासमोर बाप (माझा बाबा बाप माणूसच होता) नावाचा दिवा कायमचा विझला, अचानक… आमच्या आयुष्यातील तेज त्या दिवशी लोपले होते… दादा पुण्याहून बंगलोरला येणार म्हणून बाबांना शीत पेटित ठेवले गेले… हॉस्पिटलमधील सर्व सोपस्कार संपवून आम्ही माझ्या घरी आलो, कारण मी आईच्या घरी जायचं धाडस करू शकले नाही… मग दुसऱ्यादिवशी सकाळी आईच्या घरी गेलो, दादापण 12 वाजेपर्यंत पोचला… शेवटचं दर्शन घेतलं आणि त्यांना उचलण्यात आलं आणि तिथे एक पणती लावली गेली, दोऱ्याची वात शांतपणे जळत होती…
आजही आठवलं तरी अंगावर शहारा येतो… प्रत्येक पणातीच्या ज्योतिमध्ये त्यांना शोधलं जातं, ते जवळपास असल्याचा भास होतो…. अशा प्रसंगी त्या पणातीची भावना नक्की काय असेल, तिच्या मनातील तगमग माझ्या मनासारखीच असेल का? तिला हे प्रसंग असहनीय होत असतील का? कोणी ह्या बाबत विचार करत असेल का? एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांची वाट पहात ती शांत, मंद तेवत राहते, जणू स्वतःच्या जळण्यातून इतरांना थोडा प्रकाश द्यायचा प्रयत्न करते… दुःखावर फुंकर घालता येत नाहीच, पण स्वतः त्या दुःखात जळून घरच्या इतर मंडळींना प्रकाशवाटेवर न्यायचा प्रयत्न करते… अर्थातच ती तिचे कार्य निरपेक्षपणे पार पाडत असते… दिवाळी असो किंवा तेरावा असो… तीसुद्धा तिचं नशीब घेऊन येते, पण ती तिचे कर्तव्य विसरत नाही… असे प्रसंग तिच्यावर येऊ नयेत हीच मागणी त्या विधात्याकडे करू शकते… शेवटी सगळं त्याच्या हातात !
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की आठवीं कड़ी नातं…। जीवन में रिश्ते और रिश्तों पर आधारित दिवसों को मनाना रिश्तों को पुनर्जीवित करने जैसा है। श्री आरूशी जी का यह आलेख मानवीय रिश्तों के अतिरिक्त ईश्वर एवं प्रकृति के रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ता है। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #8
☆ नातं… ☆
जे नातं माझ्या चेहऱ्यावर हसू आणतं, ते हृदयस्थ आहे !
पाडवा असला की नवऱ्याला ओवळायचं… आज भाऊबीज म्हणजे भावाला ओवाळायचं… मातृदिन, पितृ दिन, मैत्री दिन अशा वेगवेगळ्या दिवसाचं औचित्य साधून आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या नात्याचं स्मरण करतो… हे असे दिवस साजरे केलं ना की मला खूप आनंद मिळतो… हा उत्सव खूप काही देऊन जातो… एक तर ही नाती rejuvenate होतात असं मला नेहमी वाटतं आणि त्या नात्यातील खोली कळते, वीण अजून घट्ट होते…
काही नाती खूप वेगळी असतात… कुठल्याही व्याख्येत बसत नाहीत… किंवा त्यांना कुठलंही नाव देता येत नाहीत… मग अशी नाती खरंच टिकतात का? तर हो टिकतात… नक्कीच… फक्त ह्यात कधी दिखावा नसतो, कारण त्याची गरज नसते… ही अंतरबाह्य दैवी असतात… आजही काही जणांचा आधार फक्त त्यांच्या स्मरणाने देखील बळ देतो…
ही नाती फक्त दोन व्यक्तींमध्येच असतात असं नाही… येतंय ना लक्षात मी काय सांगायचा प्रयत्न करतीये ते ! म्हणजे कसं आहे माहित्ये का?
समुद्र किनारी गेले की तो समुद्र, त्या लाटा आणि तो सूर्य माझं आयुष्य परिपूर्ण करतात ही भावना खूप सुखावह वाटते… संध्याकाळी देवापाशी दिवा लावला की त्या तेजाबरोबर मिळणारा लख्ख आधार, जणू त्या नात्याचं अस्तित्व प्रकाशमान करतो…. किंवा रात्रीची शाल पांघरून जेव्हा आकाशातील चांदण्या प्रसन्नतेची उधळण करतात, तेव्हा आकाशाशी असलेलं मायेची पाखरण करणारं हे नातं वात्सल्यपूर्ण वाटतं…
ह्या नात्याला नाव द्यायची कधी गरज पडलीच नाही… आणि तसा कधी प्रयत्नही केला नाही… ह्यातच त्या नात्याचं यश दडलेलं आहे, हो ना!
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पुष्प तिसरा – या माहेरी ….!” ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प तिसरा #-3 ☆
☆या माहेरी. . . . !☆
कवितेच घर हेच शब्दांचे माहेर. …किती भावस्पर्शी जाणिवा नेणिवेच्या या कवितालयात पहायला मिळतात …… कल्पना आणि वास्तवता यांच्या नाजूक संवेदनशील पण जागृत अनुभुतींनी साकारलेल्या या शब्द रचना जेव्हा मनाशी संवाद साधतात ना तेव्हा मनाचा एकटे पणा कुठल्या कुठे पळून जातो. डोळे आणि मन भरून येत. . . आठवणींची पासोडी खांद्यावर टाकून आपण या माहेरात विसावतो आणि . . .
……अनेक जीवनातील सुख दुःख पचवलेली, जीवनसंघर्ष करीत कवितेचा शब्दसुतेचा दर्जा देणारी संवेदनशील व्यक्ती मत्वे , मनात रेंगाळत रहातात. मनातील ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न ही शब्द पालवी करते आणि म्हणावस वाटत *वसंत फुलला मनोमनी*
खरंच . . . ही फुलं फुलतात कशासाठी? माणस माणसांना भेटतात कशासाठी? थोड तुझ थोड माझं परस्परांना समजण्यासाठी . . तसच या माहेरी घडत. या कवितेच्या घरात कवितेचे विविध प्रकार मांडवशोभेसारखे नटून थटून येतात. त्यांच नुसते दर्शन देखील मनाची मरगळ दूर करते. आजची कविता काय आहे, कशी आहे , तिच रूप, स्वरूप, तिचा प्रवास याच्या खोलात न जाता मी फक्त इतकेच म्हणेन आजची कविता प्रवाही आहे. सोशल नेटवर्किंग साईट वरून ती लोकाभिमुख होते आहे. प्रत्येक कविता आपला स्वतःचा वाचक वर्ग निर्माण करते आहे. हा साहित्य प्रवाह नसला तरी हा जीवनप्रवास आहे माणसातल्या सृजनशील मनोवृत्तींचा. ही निर्मिती माणसाला धरून ठेवते. माणसाशी संवाद साधते. त्याचं एकटेपण दूर करू पहाते. म्हणून कविता महत्वाची आहे.
कवितेने किती पुरस्कार मिळवले, * आपल्या लेकिच्या अंगावर किती दागिने आहेत* यापेक्षा आपली लेक किती लोकाभिमुख आहे हे पहाणं मनाला जास्त भावत. मनान मनाशी जोडलेले भावबंध हाच उत्तम कवितेचा पाया असतो. नाते जपताना शब्दांना उकळी आणून उसन्या गोडव्याने पाजलेला चहा भावाच्या मनात बहिणीची माया उत्पन्न करू शकत नाही त्याप्रमाणे कविता लोकांपर्यत किती पोचली तिचा समाजाभिमुख प्रवास कविला समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देतो.
माहेर. . . माहेर .. म्हणजे नेमक काय. ? मनातली दुःख, चिंता, काळजी, ताणतणाव, बाहेर जाताना रांगत्या पावलांनी किंवा अनुभवी वृद्ध व्यक्तीच्या आश्वासक खोकल्याने घरात कुणीतरी असल्याची दिलेली चाहूल, *शब्दांना भावनांनी दिलेला आहेर* म्हणजे माहेर. हे माहेर ममत्वाचा,मायेचा, माझ्या तला कलागुणांचा सर्वांगीण अविष्कार करत, माझ माझ म्हणून ज्याला जोजवावं त्या विचारप्रवाहांचा जे स्वीकार करत ते माहेर माणसाला माणूसपण कवितेला घरपण प्राप्त करून देत.
कविता श्लोकातून जाणवायला हवी. अभंगातून निनादत ओवीतून उदरभरण करणा-या , गहू, ज्वारी, बाजरीच्या पिठात एकजीव व्हायला हवी. कवितेने जुन्याची कास आणि नाविन्याची आस सोडू नये यासाठी हे माहेर प्रत्येक साहित्यिकासाठी फार महत्वाचे आहे. या माहेरात कुणाला एकटे सोडायचे अन कुणाला बांधून ठेवायचे हे काम आपले लेखन, आपला दैनंदिन लेखन कला व्यासंग बिनबोभाट करतो. तुलना नावाची मावशी किंवा मंथरा या माहेरात आपल्याला पदोपदी भेटते. ही तुलना मावशी कविच्या कवित्वाचा देखील घात करू शकते. या माहेरात आपल्या कार्यकरतृत्वाचं गुणांकन करायला *दामाजी* नाही तर *आत्माराम* कामी येतो हे ध्यानात ठेवा आणि जेव्हा जेव्हा स्वतःला एकट समजाल तेव्हा तेव्हा या माहेरी निःशंकपणे या. पायवाट आणि हमरस्ता दोन्ही ही आपलीच वाट पाहत असतात. सुख, समाधान, हाकेच्या अंतरावरच असत त्याचा शुभारंभ या माहेरी होऊ शकतो.
हा प्रवास ह्दयापासून ह्रदयापर्यतचा असतो. यात शब्द जितका महत्वाचा तितकाच एकेका शब्दासाठी आपल सारं जीवन वेचणारा माणूसही तितकाच महत्त्वाचा. या शब्दालयात, माहेरपणात कविता नांदायला हवी.कविनं कविता अन माणसान कटुता या माहेरी निवांत सोडून द्यावी. कविता तिचा प्रवास करीत रहाते आणि मनातली कटूता एकटी होती.. एकटी आहे.. एकटी राहिल .. असा विश्वास देत पुढच्या जीवनप्रवासाला लागते.
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी गजल यात्रा का एक और पड़ाव “कवितेवरची कविता“। अब आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं । )
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 3 ☆
☆ कवितेवरची कविता☆
कवितेमधला गझल हा प्रकार मनाला खुप भावला. १९९२ साली अनिल तरळे या अभिनेत्याने बालगंधर्व परिसरात गझलकार इलाही जमादार यांची ओळख करून दिली, कॅफेटेरियात आमची कविता-गझल अशी मैफल जमली,इलाहींच्या गझलांनी मी खुपच भारावून गेले, असे वाटले कविता लिहिणं सोडून द्यावं,वरचेवर इलाहींशी भेटी होत होत्या, इलाहींनी गझलतंत्र, गझलची बाराखडी या विषयी काहीच सांगितलं नाही, ते म्हणाले तुम्ही, “आपकी नजरोने समझा प्यारके काबील मुझे”.. ही ओळ गुणगुणत रहा, त्या मीटर मध्ये तुम्हाला गझल सुचेल! पण तसं काही झालं नाही!
बरेच दिवसांनी अचानक शब्द आले…गझल पूर्ण झाली! शरद पाटील हा कवी त्या काळात झपाटल्यासारखी गझल लिहित होता, त्याला दाखवली,त्यानी सांगितलं होतं पहिल्या शेरात गडबड आहे बाकी सगळे शेर बरोबर आहेत, पहिला शेर मी सुरूवातीला असा लिहिला होता,
“यायचे स्वप्नी तसे हे गाव नाही
ओळखीचा एकही पहेराव नाही”
काय गडबड आहे हे त्यालाही सांगता आलं नाही आणि मलाही समजलं नाही, एका खाजगी मैफलीत इलाही, दीपक करंदीकर यांच्या समोर सादर केली,त्यांनी ही ईस्लाह वगैरे केलं नाही, माझ्या पहिल्या संग्रहात मी तशीच छापली आहे, पुढे डाॅ. राम पंडितांचे लेख वाचून गझलची लगावली समजली मग मी सानी मिसरा बदलला….घेतलेले राज्य अन तो डाव नाही…आणि लक्षात आलं हे मंजुघोषा वृत्त आहे, अचानकच हातून लिहिलं गेलेलं!
पुढे गझलेवरची गझल ही झाली… *आज अचानक लेखणीस गवसली गझल, स्नेहभराने काळजात उतरली गझल*
माझी पहिली गझल
यायचे स्वप्नी तसे हे गाव नाही
घेतलेले राज्य अन तो डाव नाही
आज मज हाका नका मारू कुणीही
जे तुम्ही घेताय माझे नाव नाही
का असे डोळ्यात पाणी पावलांनो
स्वैर आभाळी तुम्हा का वाव नाही
जायचे वस्तीत चोरांच्या कशाला
सोबती येथे कुणीही साव नाही
सोनियाचे मुकुट डोई देवतांच्या
भक्तिला आता कुठेही भाव नाही
जाहल्या जखमा किती या काळजाला
मारणारा एकही मज घाव नाही
झुरत अंधारात आहे एकटी मी
सावलीला ही इथे शिरकाव नाही
संपता आयुष्य माझे भेटण्या ये
मरणयात्रेला कुणा मज्जाव नाही