मराठी साहित्य – विविधा ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 2 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 2 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

 (कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई ! ) पुढे चालू…..

सिनेमाचा विषय निघाला म्हणून एक आठवण सांगण्या सारखी आहे, तेव्हढी सांगतो आणि पुढे जातो. “पुरश्या” नावाचा आमचा एक मामा होता. तो म्हसळा या गावी (श्रीवर्धन-दिवेअगार जवळ) शेती वाडी करत असे. त्याच्या सुपारीच्या बागा होत्या आणि तो आपला माल तेंव्हा मुंबईला “मार्केटात” पाठवत असे व त्याचे पैसे वसुल करायला दर सहा महिन्याने मुंबईला यायचा. अर्थात दोन चार दिवसाचा त्याचा मुक्काम आमच्या घरी ठरलेला. त्याच पैसे वसुलीच काम झालं की तो आमच्या आईला “बयो उद्या सकाळच्या एस्टीनं जातोय गं परत !” असं सांगायचा. मगं आम्ही मुलं त्याला “मामा उद्या तू परत गावी जाणार, मग आज रात्री ‘हिंदमाताला’ सिनेमाला जाऊया नां !” असा घोषा लावत असू. पण आमचा मामा पक्का बेरका होता. तोंडात कुड्याची पेटती विडी ठेवून म्हणायचा, “त्या सिनेमात बघण्यासारखं काय असत मला कळत नाही ! अरे बाहेर जे तुमच्या हिरो हिरोईनचे फोटो लावलेत नां, ते फक्त आत थेटरात पडद्यावर हलतात आणि बोलतात, एवढाच काय तो फरक ! त्यासाठी आपल्या दिडक्या कशास खर्च करायच्या म्हणतो मी ? त्यापेक्षा ही पाचाची नोट घ्या आणि आईस्क्रीम खा बघू सगळ्यांनी !” अस म्हणून आमच्या तोंडाला आईस्क्रीम पुसायचा, सॉरी पान पुसायचा !

आज वयाच्या सत्तरीत “डोक्याने” किंवा “डोक्याची” कामं करून म्हणा, अथवा अनूवांशीक जीन्समुळे म्हणा, आजमितीस मानेवर जी काय पांढऱ्या केसांची तुरळक झालर उरल्ये, ती वाढल्यावर कापायला सटी सामाशी “सलूनमधे” जायचा योग येतो, तोच काय तो ! पण आता पूर्वीसारखी “भावजा” समोर लहानपणी जशी मान तुकवावी लागत असे, तशी आता सलूनमध्ये तुकवावी लागत नाही, हेच काय ते त्यातल्या त्यात मनाला समाधान ! फक्त या बाबत एकच तक्रार मी मनातल्या मनांत स्वतःलाच करत असतो मंडळी.  माझ्या मानेवरची केसांची पांढरी तुरळक झालर कापायलासुद्धा, एखाद्याच्या डोक्यावरील संपूर्ण जंगल कापण्या इतकेच पैसे द्यावे लागतात ! त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपलं पाकीट किंवा खिसा कापला जातोय, याच नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या पेन्शनराला आत कुठेतरी दुःख होतच !

खिसा आणि पाकीट कापण्यावरून आठवलं, साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रेनच्या किंवा बेस्ट बसच्या प्रवासात ज्याच पाकीट किंवा खिसा कापला गेला नाही, असा चाकरमानी मिळणं विरळाच !  आणि कोणी फुशारकीने तसं म्हटलं तर त्याने त्यावेळच्या ट्रेनच्या “थर्ड क्लासने” गर्दीच्या वेळेस डोंबिवली किंवा विरार लोकल मधून, संध्याकाळच्या रश अवर मधे प्रवास केलेलाच नसावा, हे तुम्ही त्याला खात्रीपूर्वक सांगू शकता.

त्यावेळच्या ट्रेनमधल्या खिसा कापण्याच्या एक एक चमत्कारिक आणि सुरस कथा आज नुसत्या आठवल्या तरी खूपच मनोरंजन होतं. सध्या पाकीट आणि खिसा कापणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी शंका घेण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. कारण आत्ताच्या कलियुगी अशा चिल्लर चोऱ्या करण्यापेक्षा, आजकाल सगळ्यांनाच स्वतःच्या जिवापेक्षा प्यारा झालेल्या एखाद्या महागड्या “मोबाईलची” चोरी करण्यावर सांप्रत काळातील चोरांच्या नवीन पिढीने आपला मोर्चा वळवला आहे, हे आपण सुद्धा मान्य कराल. त्यामुळे पुन्हा एकदा मी “कालाय तस्मै नमः” म्हटलं, तर आपल्याला त्यात वावगं वाटणार नाही अशी आशा करतो !

एखाद्या वास्तूच उदघाटन त्याच्या दाराला लावलेल्या आडव्या “लाल फीतीला” कापून, कोणा मान्यवरच्या हाती करायची पद्धत आपल्याकडे कधी पासून आली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण स्वातंत्र्यापुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष मान्यवरांच्या हस्ते “दिप प्रज्वलनकरून” एखाद्या कार्यक्रमाची सुरवात व्हायची, हे आपल्याला आठवत असेलच.  स्वातंत्र्यानंतरच्या काळात तेव्हांच्या स्वतःला फॉरवर्ड समजणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी अशा समारंभात ही फीत कापायची पद्धत सुरु केली असावी, असा आपला माझा अंदाज ! अर्थात त्याचा उगम नक्कीच त्यांच्या डोक्यतून न हॊता, त्यांनी या बाबतीत सुद्धा इंग्रजांचेच अनुकरण करण्यातून झाला असावा, हे ही तितकंच खरं असण्याची शक्यता जास्त !

हल्ली गल्ली बोळात स्वतःला “नेता” म्हणवणाऱ्या लोकांना तोटा नाही आणि त्यांच्या निरुद्योगी अनुनायांचे तर “सगळं काही” फुकट मिळत असल्यामुळे मोहोळच उठलेलं आपल्याला पाहिला मिळतं. अशा या स्वयंभू नेत्यांना काही उत्साही लोकं आपल्या कुठल्याही “वास्तूची” उदघाटनाची फीत कापायला बोलवत असतात आणि हे नेतेही तेवढ्याच तत्परतेने, उत्साहाने असे समारंभ अगदी अगत्यपूर्वक अटेंड करत असतानां आपण पाहिले असेल. मी वर “कुठल्याही वास्तूची” उदघाटनाची फीत असं म्हटलं, कारण सध्या आधीच नावापुरत्या राहिलेल्या फुटपाथवर, एखाद्या नवीन बांधलेल्या “सार्वजनिक शौचालयाची” फीत कापून त्याच उदघाटन सुद्धा असे नेते करत असतात ! एवढच कशाला, त्या सार्वजनिक शौचालयावर स्वतःचा मोठा फोटो आपल्या नावासकट, मोठ्या आणि भडक रंगात रंगवला आहे की नाही याची आधी खात्री करून घेतात आणि मगच त्या शौचालयाचे फीत कापून उदघाटन करतात !

“सकल उत्पन्नाच्या मूलभूत गुंतवणूकीवर मुळापासून कर कापला जाईल !” हे एखाद्या कंपनीच्या गुंतवणूक विषयीच्या फॉर्मवरच्या सर्वात छोट्या फॉन्ट मधलं प्रिंट केलेलं वाक्य, शुद्ध मराठीत असलं तरी, वाचायला म्हणण्यापेक्षा “कळायला” बऱ्याच जणांना जरा जड जाईल ! म्हणून सोप्या भाषेत सांगायचं तर, “Tax will be deducted at source !” असं म्हणतो, म्हणजे 99% वाचकांचा जीव भांड्यात पडेल, याची मला खात्री आहे !

“अरे काय सांगू तुला, या वेळेस मी दीड लाखाचं फुल सेव्हिंग केलं, तरी पंचावन्न हजार टॅक्स भरायला लागला !”

“टॅक्स !” तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या तमाम मध्यमवर्गीयांचा, अगदी कधीही, कुठेही आणि कोणाबरोबरही उगाच “फुकट” चर्चा करण्याचा जागतिक विषय ! आता या आधीच्या वाक्यात मी जो “फुकट” शब्द वापरला त्याला कारण म्हणजे, आपल्या सारख्या लोकांनी या विषयावर कितीही वायफळ चर्चा केली तरी, त्याचा सरकारवर दबाव पडून, सरकार टॅक्सच्या टक्केवारीच्या स्लॅबमधे बदल करेल ही शक्यता अजिबातच नसते. हे जरी आपल्या सारख्या लोकांना दरवर्षीच्या अनुभवावरून माहित असलं तरी, त्यावर चर्चासत्र किंवा परिसंवाद हे सगळ्याच बजेट नंतर झडतच असतात !

मंडळी, अजूनही कुठं कुठच्या “कापण्याचे इव्हेंट” होऊ शकतील असे अनेक प्रकार जे मला माहित आहेत, ते आपल्याला सुद्धा माहित असतील. पण एखाद्या लेखाची पण काही शब्दमर्यादा असते हे सुद्धा आपल्या सारख्या चाणाक्ष वाचकांना माहित असेलच ! त्यामुळे वरील लेख कोणी छापणार असेल तर, त्यांच्या “एडिटरकडून” मूळ लेखाची (मला) नको इतकी “काट छाट” होण्याआधीच लेख संपवतो !

 – समाप्त –

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आठवणीतील सांस्कृतिक पुणे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आठवणीतील सांस्कृतिक पुणेलेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी, किंबहुना त्यापेक्षाही अगोदरपासूनच्या कालखंडात पुणे हे एक छोटेखानी पण टुमदार, आटोपशीर गाव होतं…” पुणे शहर ” झालेलं नव्हतं….

सदाशिव, शनिवार, नारायण, शुक्रवार वगैरे पेठांमध्ये वाडे एकमेकांना चिकटून, जणू एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते. चोर-पोलीस खेळतांना सहज एका वाड्यातून दुसऱ्या वाड्यात जाता येत असे. किंबहुना शेजारच्यांच्या घरात घुसून बिनदिक्कत कॉटखाली वगैरे लपता येत असे. लाकडी जिन्यातून कुणी भरभर खाली उतरलं की अक्षरशः ढगांच्या गडगडाटाचा आवाज येत असे. चौकात संध्याकाळी डबडा ऐसपैसचा नाहीतर इस्टॉपाल्टीचा डाव रंगत असे. फार दमायला झालं, किंवा धो धो पाऊस पडला, तर कुठे तरी वाड्यात वळचणीला बसून गाण्यांच्या भेंड्या रंगत असत. मग एक तरी सुरेल गाणारी तिखट चिमुरडी “आ जा सनम मधुर चांदनीमें हम….” हे गाणं म्हणतच असे. 

किंवा देशांच्या राजधान्या ओळखणे, चेरापुंजी कशासाठी प्रसिद्ध आहे?? वगैरे “जनरल नॉलेज” च्या गप्पा होत होत,

” तुला माहितीये का ?? पाकिस्तानकडे शंभर ऍटम बॉम्ब आहेत…”  किंवा ” माझे बाबा एकदा अमावास्येला शनिवारवाड्याच्या जवळून रात्री येत होते, तेव्हा त्यांनी ‘ काका मला वाचवा….’ असा आवाज ऐकला होता ” 

अशा स्वरूपाच्या दंतकथा रंगत. एखादा शी – शू विहार मधला गडी मग तिथेच रडू लागे. आणि मग 

” ए … कशाला रडवता रे त्याला?? ” असा सज्जड दम एखादी आई देई.

शाळांच्या पटांगणात रात्री ” गीत रामायण,” “ जाणता राजा ” यासारख्या कार्यक्रमांची रेलचेल आणि मेजवानी असे. मग रात्री भारावलेल्या वातावरणात शांत झोपी गेलेले वाडे बघत बघत घरी पायी, नाही तर सायकलवर वाटचाल करायची. क्वचित थंडीत स्वेटर, शाल, चादर पांघरून कुडकुडत घरी जायचं….. गोदरेजचं कुलूप उघडून जाड लोखंडी साखळी असलेला दरवाजा उघडायचा….. काळ्या बटनावर लागणारा पिवळा साठचा बल्ब लावायचा…. कुणाकडे हातात सेलची बॅटरीही असायची…. 

पुण्याचं तेव्हाचं सांस्कृतिक केंद्र म्हणजे ” भरत नाट्य मंदिर “…. मध्यंतरात भजी खायची… चहा प्यायचा…. आणि अंधारात चाचपडत येऊन आपली सीट पकडायची….

भरत नाट्य बाहेर मधू आपटे हे ज्येष्ठ अभिनेते खुर्ची टाकून बसलेले असायचे…..

कुणी नाटकानंतरही “गुडलक” “पॅराडाईज” “रीगल” वगैरे इराणी हॉटेलात तळ देत…. किंवा वाड्याच्या दारातच मध्यरात्रीपर्यंत कुडकुडत गप्पा छाटायच्या……

तेव्हाचं पुणं मध्यमवर्गीय, साधं…..पेरूगेट, नु.म.वि., अहिल्यादेवी, विमलाबाई गरवारे, हुजूरपागा या संस्कारकेंद्रांभोवती विणलेलं….. “स्वामी”… “छावा”…. “नाझी भस्मासुराचा उदयास्त”…… इत्यादि साहित्यविश्वात रमणारं होतं…… भीमसेन जोशींना अगदी समोर बसून ऐकता येत होतं किंवा भेटता येत होतं…..

ना. ग. गोरे… एस. एम. जोशी अशी थोर नेतृत्वं होती…

खरोखरच तेव्हाचं पुणं हे त्यावेळच्या पहाटेच्या सुंदर धुक्यासारखं एक गोड सांस्कृतिक स्वप्न होतं…..

सुंदर स्वप्नातून जागं झाल्यावरही त्या स्वप्नाची आठवण दिवसभर मनात रेंगाळत रहावी, तसं हे तेव्हाचं सुंदर पुणं मनात सदैव रेंगाळत राहतं……….!!!

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… – लेखक : श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

📖 वाचताना वेचलेले  📖

 ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… – लेखक : श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

मुलांना जबाबदार  बनवायचं असेल, तर अर्थातच त्यांना काही गोष्टीचं स्वातंत्र्य द्यायला हवं. याचाच अर्थ त्यांच्याकडं जसं लक्ष द्यायला हवं, तसंच थोडं दुर्लक्षही करायला हवं. रेणू दांडेकर यांनी यासाठी ‘ हेल्दी निग्लिजन्स ‘ हा शब्द सुचवला आहे. त्या म्हणतात, ‘आजकाल घरात एकच मूल असतं. फार फार तर दोन. या ‘दोन बाय दोन’,च्या रचनेत मुलंच केंद्रस्थानी असतात. लक्ष्य असतात. त्यामुळंच कधी कधी आपलं नको इतकं लक्ष मुलांकडे असतं.

त्यांनी असं एक उदाहरणही दिलंआहे: माझी एक मैत्रीण मुलांच्या बाबतीत अत्यंत जागृत होती. तिनंच तिच्या मनानं मुलांच्या अभ्यासाच्या वेळा…जेवायच्या वेळा… आहार… कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास, या सगळ्याचंच वेळापत्रक बनवलं होतं. सतत त्यानुसार ती आपल्या मुलांवर देखरेख ठेवायची. मुलं अगदी जखडून गेली, कंटाळली, हळूहळू ऐकेनाशी झाली.

आईची प्रतिक्रिया, ‘ मी मुलांचं इतकं करते,तरी मुलं अशी वागतात. यापेक्षा किती लक्ष द्यायचं? ‘

” तू जरा जास्तच लक्ष देते आहेस.” रेणूताईंनी म्हटलं ,” थोडं दुर्लक्ष कर .मुलांना त्यांचं स्वतःचं जगणं आहे. जर त्यांच्या प्रत्येक क्षणावर ताबा ठेवलास तर कसं चालेल? जरा ‘हेल्दी निग्लिजन्स’ करायला शिक.” 

मुलांना मोकळेपणा, स्वातंत्र्य दिल्याशिवाय ती जबाबदार कशी होतील? फक्त एवढंच की ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करत आहेत ना, हे त्यांच्या नकळत पहायला हवं. लक्ष हवंच, पण न जाचणारं ! मूल पोहायला लागलं तरी आईनं त्याच्या पाठीवर डबा बांधला, त्याचा हात धरला तर ते तरंगणार कसं?हात पाय हलवणार कसं? ते आता पोहू शकतंय यावर विश्वास ठेवायला हवा. आपण ते बुडेल ही भीती सोडायला हवी. थोडं काठावर उभं राहता आलं पाहिजे, थोडं पाण्यातही भिजता आलं पाहिजे. पालक प्रशिक्षणातला हा एक धडा फार महत्त्वाचा आहे. शोभा भागवत म्हणतात त्याप्रमाणे, ‘मूल मोठं व्हावं, शहाणं व्हावं, असं तोंडानी बोलत, मनात ठेवत, प्रत्यक्षात आपण त्याला ‘लहान’च ठेवत असतो. तोंडी बोलण्यापलीकडं मूल आरपार आपल्याला पहात असतं. आपण ‘ मूल ‘ राहण्यातच पालकांना समाधान आहे, हेही ते जाणतं आणि तसं वागत राहतं.’

ते विश्वासानं शहाणं व्हायला हवं असेल, तर पालकांनी सतत पालक म्हणून वागायचं सोडून द्यायला हवं. पालकपणाचा (अधून मधून) राजीनामा द्यायला हवा.

लेखक : श्री शिवराज गोर्ले

प्रस्तुती : सुश्री सुनिता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 1 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 1 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

कापणे – एक इव्हेंट ! 😂😢😟

माझ्या समवयस्क पिढीतील लोकांना लहानपणी हातात पडलेल्या पहिल्या “शिस पेन्सिलीच” त्या काळी, त्या वयात काय अप्रूप होतं ते नक्कीच आठवत असेल ! मला आज सत्तरीत आठवतंय त्याप्रमाणे तेंव्हा मराठी चौथीपर्यंत काळीशार दगडी पाटी आणि चुन्याची पांढरी षटकोनी किंवा चौकोनी पेन्सिल, यावरच ‘लिहित्या हाताच्या’ बोटांना आम्हां मुलांना समाधान मानावं लागत असे ! या वाक्यातील ‘लिहित्या हाताच्या’ या माझ्या शब्दप्रयोगावर आपली वाचनाची गाडी अडखळली असेल, तर त्याबद्दल आपलं समाधान होईल असा खुलासा आधी करतो,  म्हणजे मग तुम्ही पुढचा लेख वाचायला आणि मी पुढे लिहायला मोकळा !

आपण म्हणालं आता हे काय तुमच नवीनच ? “लिहिता हात” म्हणजे काय ?  तर त्याच कसं आहे मंडळी, जसं काही काही लोकं बोलतांना “खाता हात” आणि “धुता हात” असे शब्दप्रयोग करतात, तसा मी “लिहिता हात” असा शब्दप्रयोग केला तर कुठे बिघडलं ? कारण आपल्यापैकी बरेच जण डावरे (का डावखुरे?) असण्याची शक्यता गृहीत धरूनच मी या नवीन हाताचा “शोध” सॉरी, नवीन शब्दप्रयोगाचा शोध लावलाय ! दुसरं असं की समस्त डावऱ्यां मंडळींकडून, मी माझ्या सारख्या उजव्यांना उजवं माप देतोय, असा बिनबुडाचा आरोप कशाला  ऐकून घेवू ? काय बरोबर ना मंडळी ?

हां, तर काय सांगत होतो मंडळी, हातात आलेल्या पहिल्या शिस पेन्सिलीच अप्रूप ! तर अशी ही शिस पेन्सिल आपल्या स्वतःच्या मालकीची म्हणून पाचवीत हाती येई पर्यंत, जर आपण कुतूहलापोटी आपल्या ताई किंवा दादाच्या शिस पेन्सिलीला नुसता हात जरी लावला असेल, तरी आपण तिचा किंवा त्याचा ओरडा त्याकाळी नक्कीच खाल्ला असेल. शिवाय एखाद्याचा दादा किंवा ताई जास्तच रागीष्ट असेल तर ? त्या ओरडयाबरोबर त्याची किंवा तिच्या हातची चापटपोळी खायचा प्रसंग पण आपल्यावर नक्कीच ओढवला असेल, बघा आठवून ! आपण म्हणालं, हे सगळं जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी या सगळ्याचा आणि आजच्या लेखाच्या शीर्षकाचा संबंध काय ? सांगतो, सांगतो मंडळी, जरा सबुरीन घ्या !

तर पाचवीत पहिल्यांदाच हाती आलेल्या नव्या कोऱ्या “शिस पेन्सिलीला” टोक काढायला, त्याकाळी आजची “शार्प” लहान मुलांची पिढी जे “शार्पनर” वापरते, त्याचा शोध बहुतेक लागायचा होता म्हणा किंवा माझ्या सारख्या मध्यमवर्गातल्या मुलांना त्याकाळी ते विकत घेणं परवडत नव्हतं म्हणा, पण तेव्हा आम्ही मुलं शिस पेन्सिलीला टोक काढण्यासाठी एखाद जुनं अर्ध “भारत ब्लेड” वापरत असू. पण मंडळी, त्या शिस पेन्सिलीला अर्ध्या ब्लेडने टोक काढता काढता, पेन्सिलीतून तीच टोक बाहेर येण्या आधीच हाताच्या एखाद्या बोटातून हमखास लाल भडक रक्त बाहेर येई !  मग काय, अशावेळी माझी जी काय रडारड सुरु व्हायची त्याला तोड नसायची ! कारण त्या वयात असं एखाद “कठीण” काम, स्वतःच स्वतः अभिमानाने करतांना, आपल्याच हातून आपल्याच चुकीमुळे बोटातून रक्त आलेला, बहुदा तो आयुष्यातला पहिलाच प्रसंग असायचा.  मग हे सगळं आईला कळताच तिची बोलणी खात खात, कधी त्या सोबत तिच्या हातचे धपाटे तोंडीलावण्यासारखे खाता खाता, तिने आठवणीने बरोबर आणलेला मातकट रंगाचा “रामबाण कापूस” ती मला बोटावर झालेल्या माझ्या जखमेवर लावी. तो लावता लावता तोंडाने, “साधी एका शिस पेन्सिलला टोक काढता येत नाही आणि म्हणे मला पेन्सिलचा अख्खा नवीन बॉक्स हवाय ! टोक काढतांना गाढवासारखं (?) स्वतःच बोट कापून घेतलंस, तरी त्या नावाखाली आज तुझी अभ्यासातून मुळीच सुटका नाही, कळलं?”

मंडळी, तेंव्हा जरी साने गुरुजींची “श्यामची आई” त्याकाळच्या आयांच्या कितीही आवडीची असली, तरी सगळ्याच मुलांच्या आया काही “श्यामच्या आईसारख्या” आपापल्या मुलांशी वागत नव्हत्या नां ! त्यामुळे माझ्या आईच्या तोंडातल्या वरच्या डायलॉगचा शेवट, माझ्या शरीराचा कुठला अवयव त्यातल्या त्यात तिच्या उजव्या हाताच्या जवळच्या टप्प्यात असेल, त्यावर त्याच हाताची एक सणसणीत बसूनच होत असे !

मंडळी, त्या औषधी “रामबाण कापसाची” एक खासियत होती. तो नुसता जखमेवर दाबून धरताच एका क्षणात जखमेतून येणार रक्त, रेड सिग्नल मिळाल्यावर पूर्वी जशा गाड्या थांबत तसं थांबत असे !  हल्ली रेड सिग्नल आणि त्याच्या जोडीला पोलिसाचा आडवा हात व त्याच्या जोडीला त्याच्या तोंडातली शिट्टी, याला सुद्धा कोणी जुमानत नाही हा भाग निराळा. दुसरं असं की आजच्या सारखा तो काही “वॉटरप्रूफ बँडेडचा” जमाना नव्हता. त्यामुळे औषधी “रामबाण कापसाच्या” फर्स्टएडवरच अशा जखमांची तेंव्हा बोळवण केली जायची. अशी “रामबाण कापसाची” त्या काळातली फर्स्टएड मलमपट्टी आपण सुद्धा कधीतरी अनुभवली असेल ! आजकाल कशातच “राम”  उरला नाही, मग हा “रामबाण कापूस” तरी कसा उरेल, खरं की नाही ? असो ! कालाय तस्मै नमः !

“भावजा, रविवारी सकाळी ७ !” “भावजा, बुधवारी सकाळी ९ !” “भावजा,….  सकाळी………. !” असे निरनिराळे आदेश वजा सूचना, आमचा “भावजा” खाली रस्त्यावरून जातांना दिसला की त्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात, चाळी चाळीच्या कॉमन गॅलेरीतून ऐकायला येत.

मंडळी “भावजा” हे आमच्या आठ चाळीच्या मिळून वसलेल्या समूहातल्या, अंदाजे पाचशेपैकी चारशे खोल्यातील लहान लहान मुलं आणि त्या प्रत्येक खोलीतली वडील मंडळी, साधारण साठ वर्षांपूर्वी ज्याच्या समोर दर दोन ते तीन महिन्यांनी स्वतःच डोकं भादरून घ्यायला “नतमस्तक” होत त्या “नाभिकाचे” नांव !

तुम्ही म्हणालं, “भावजा” हे काय नांव आहे ? पण मंडळी मी तुम्हांला शपथेवर सांगतो, माझ्या जन्मापासूनच्या चाळीतल्या पन्नास वर्षाच्या वास्तव्यात मला कळायला लागल्या पासून तरी, त्याला आठही चाळीतले समस्त चाळकरी आणि पोरं टोरसुद्धा त्याच नावाने हाकमारीत असत. त्यामुळे त्याच्या खऱ्या नावाचा पत्ता, मी माझा चाळीतला पत्ता बदलेपर्यंत तरी मला लागला नाही. शिवाय त्याच खरं नांव जाणून घ्यावं असं त्याकाळी मलाच काय, इतर चाळकऱ्यांना सुद्धा कधी वाटलं नाही, हे ही तितकंच खरं ! तरी सुद्धा आज त्याच “भावजा” हे नांव आठवताच, त्याची वामन मूर्ती अजूनही इतक्या वर्षांनी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते !

पांढरं स्वच्छ धोतर, त्यावर निळा ढगळ म्हणावा असा, समोर दोन मोठे खिसे असलेला आणि त्या दोन खिशांना बाहेरून बटनाने बंद करायला असलेले दोन फ्लॅप असलेला शर्ट, डोक्यावर काळी गोल टोपी, पायात कोल्हापुरी चपला आणि उजव्या हातात पत्र्याची, त्याला लागणाऱ्या सगळ्या आयुधांची पेटी ! अशा अवतारातली त्याची ठेंगणी ठुसकी वामन मूर्ती, आठही चाळीचे जिने चढता उतरतांना मी तेंव्हा अनेक वेळा बघितली आहे.

असा हा “भावजा” आपल्या डाव्या शर्टाच्या खिशात चांदीची साखळी असलेलं एक छोटेखानी गोल घड्याळ बाळगत असे. अर्थात त्या घडाळ्याचा उपयोग तो त्या वेळेस तरी, आजच्या भाषेत सांगायचं तर “शायनींग” मारण्यासाठीच करत असावा. कारण त्याला तुम्ही जरी एखाद्या दिवशी सकाळी सात वाजता बोलावलं असेल आणि त्यानं तसं तुमच्या नावासकट खिश्यातल्या छोट्या डायरीत लिहिलं असेल, तरी स्वारी त्या ठरलेल्या दिवशी दहाच्या आत उगवेल तर शपथ !

याला कारण पण तसंच होत. तेंव्हा आजच्या सारखी गल्ली बोळात उगवलेली, वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणारी महागडी एसी “सलोन” तर सोडाच, पण साधी “शंकर केश कर्तनालय” सारखी “सलून” सुद्धा शहरातल्या ठराविक उच्चभ्रू वस्तीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नव्हती ! आणि त्यावेळेस ती असली काय किंवा नसली काय, तेंव्हा त्याची पायरी चढून स्वतःच डोकं भादरण चाळीतल्या कोणालाच त्या वेळेस तरी परवडण्यासारखं नव्हतं ! किंबहुना त्या सलूनमधे जाऊन एका वेळच्या डोकं भादरायच्या खर्चात, “भावजा” पुढे अख्खी दोन वर्ष नतमस्तक होता आलं असतं, असा साधा सरळसोट मध्यमवर्गीय हिशेब त्यात होता, हे ही तितकंच खरं ! त्यामुळे “भावजाच्या” सकाळच्या सातच्या अपॉइंटमेंटसाठी चाळकऱ्यांना दहा दहा वाजेपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्याय नसायचा. कधी कधी त्याला जास्तच उशीर झाला, तर घरातली वडील मंडळी आम्हां पोरांना त्याची स्वारी कुठल्या चाळीत आपल्या हातातलं कसब दाखवत बसली आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवत असे.  आता मी जरी “भावजाच्या” केस कापण्याला त्याच्या हातातलं कसब म्हटलं, तरी तेंव्हा बहुतेक “क्रू कटचा” शोध त्याच्याच “मशीन” मधूनच जन्माला आला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  पुढे आमच्या या “भावजाचा” तो “क्रू कट” त्यावेळच्या पोलीस शिपायांच्या माथी जाण्यामागे आमच्या “भावजाचाच” तर हात नाही ना ? इतपत शंका घेण्यास काही चाळकऱ्यांची मजल तेंव्हा गेली होती.

केस कापायला आपल्यापुढे कोण बसलंय, त्याच वय काय, त्याला कसे केस कापून हवेत अशा क्षुल्लक गोष्टींची चर्चा न करता, समोरच्या व्यक्तीच डोकं आपल्यापुढे त्याची मान दुखेपर्यंत जास्तीत जास्त वाकवून, दिसला केस काप करत, तो डोक्यावरील केसांची “कतले आम” त्याच्या पद्धतीने करत सुटे !  या त्याच्या केस कापण्याच्या स्वतःच्या स्टाईलमुळे एखाद्या सोमवारी, आठ चाळीतल्या समस्त आयांचा आपापली मुलं मागच्या बाजूने ओळखण्यात फारच गोंधळ उडे मंडळी. कारण केस कापल्यावर सगळी मुलं मागून थोडे दिवस तरी सारखीच दिसायची ! मग काही कारणाने एखाद्या मुलाला दुसऱ्याच आईचा फटका खायचा प्रसंग सुद्धा ओढवायचा !

त्या जमान्यात हिंदी सिनेमे पाहण्यापेक्षा लोकं मराठी संगीत नाटकं पहाणं जास्त पसंत करीत असतं. त्यामुळे हिंदी सिनेमांतल्या एखाद्या “कुमारा” सारखी आपण पण हेअरस्टाईल करावी असं कोणाला वाटत नसे.  शिवाय तशी फॅशन पण तेंव्हाच्या तरुण मंडळीत फोफावली नव्हती आणि मराठी संगीत नाटकातल्या एखाद्या कळलाव्या नारदा सारखी हेअरस्टाईल (?) करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई !

क्रमशः…

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डॉ. भाऊ बोत्रेची गोष्ट — (एक सत्यकथा) — डाॅ.शंकर बो-हाडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ डॉ. भाऊ बोत्रेची गोष्ट — (एक सत्यकथा)  — डाॅ.शंकर बो-हाडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

काल परवाची गोष्ट.  शिपाई तास संपता संपता वर्गात आला. म्हणाला, “ सर त्या मुलाला पाय-या चढता येत नाही. तरी त्याला पहिल्या तासाला वर्गात बसायचं आहे.  तुम्हीच त्याला समजावून सांगा.”  मी त्याला भेटलो. तो म्हणाला, “ मला पहिल्या तासाला बसायचं आहे.” 

“अरे पण तुला दुस-या मजल्यावर यायला वेळ लागेल.  तुला त्यासाठी लवकर यावे लागेल.” – मी

“ सर , मी घरातून तासभर लवकर निघेल. तासाला वेळेवर येईन .” – तो 

मी त्याच्या जिद्दीला सलाम केला.  मला आमच्या सैय्यद प्रिप्रीच्या शाळेतील संतोष आठवला. तो न चुकता शाळेत यायचा. त्यासाठी एका लाकडाच्या फळीला त्याने चाकं बसवून त्याची गाडी केलेली होती. एका हाताने तो ती पुढे ढकलत होता. ऊन ,वारा, पाऊस, गारा–  त्याच्या शाळेत खंड पडत नसे. पाय पोलिओने गेलेल्या संतोषने मनात घर केले होते.  पुढे नाशिकमधील समाजसेवेच्या वेडाने झपाटलेल्या रमेश जाधव यांनी गणेश उत्सवाच्या काळात दानपेटी ठेऊन दान जमा केले. त्यातून संतोषसाठी सायकल घेतली.  संतोष तीनचाकी सायकलवर शाळेत येऊ लागला. संतोष फार गोड मुलगा होता.

मी पुणे विद्यापीठात होस्टेलला राहत होतो. संशोधन चालू होते.  तिथे भाऊ बोत्रे नावाचा मित्र भेटला. भाऊकडे तीनचाकी सायकल होती आणि स्कूटरही. गणेशोत्सवात त्याच्या स्कुटरवर त्याने मला पुण्यातले गणपती दाखवले. त्याला पुण्याचे गल्लीबोळ माहित होते.  

भाऊची गोष्ट मजेशीर  होती. मित्र त्याला पाठकुळीवर बसवून शाळेत घेऊन जात. भाऊला शाळा आवडायची. घरात बसून तो अभ्यासही करायचा. घरच्या मंडळींची  मोठा झाल्यावर त्याने दिव्यांगासारखा एखादा टेलीफोन बुथ चालवावा एवढीच अपेक्षा होती. घडले ते उलटे. तो एस.एस.सी. झाला. चांगले गुण मिळाले. असा मुलगा कला, वाणिज्य शाखेत शिकेल अशी आपली सामान्य अपेक्षा. तो वाडीया काॅलेजला गेला. म्हणाला, ‘ मला विज्ञान शाखेत प्रवेश हवा आहे. ‘  प्राध्यापकांनी त्याला समजावले.  विज्ञानशाखेत प्रयोगशाळेत उभे राहून प्रात्यक्षिके करावी लागतात. ते तुला जमणार नाही , वगैरे .’  भाऊ म्हणाला, ‘ सर , मी स्टुलावर बसून प्रात्यक्षिके करीन.’  प्राध्यापकांचा नाईलाज झाला. भाऊ काॅलेजमध्ये नियमित येत होता. अभ्यास करीत होता. तो बारावीची परीक्षा पास झाला. असा मुलगा बी. एस्सी झाला नसता तर नवल. भाऊ बोत्रे बी.एस्सी झाला आणि एम.एस्सीच्या तयारीला लागला. त्याला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. वडील रिक्षा चालवायचे. कसे जमणार ? पुण्यात काही माणसं शिक्षणासाठी मदत करीत असतात, हे भाऊला माहीत होते. त्याचे हात आता पाय झाले होते. भाऊ हाताचा वापर करुन चालत असे. एकदा एका कार्यालयात गेल्यावर जनावर आले असल्यासारखं आधिका-याला जाणवलं. आधिकाऱ्याची घाबरगुंडी उडाली होती. रस्त्याने हाताने चालताना त्याला जनावराची भीती असते. कुत्रे त्याच्यावर हल्ला करण्याची भीती असते.  भाऊ संबंधित दानशूराकडे गेल्यावर ते म्हणाले, ‘ किती मदत हवी ? ‘ भाऊने त्यांच्या टेबलवर विद्यापीठाचे प्रवेशाचे चलन ठेवले. त्यावरची रक्कम विद्यापीठाच्या खात्यावर भरण्याची विनंती केली. भाऊचा एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्सला प्रवेश झाला. आता भाऊला शिष्यवृत्ती मिळू लागली. विद्यापीठाचे वसतिगृह मिळाले. भाऊची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल झाली. भाऊ कपडे धुणं, इस्त्री करणं आणि विभागात जाऊन लेक्चर, प्रॅक्टीकल करू लागला. दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्याने यशस्वीपणे पूर्ण केला. 

भाऊ बोत्रेची गोष्ट इथेच संपत नाही.  आता भाऊला Ph.D. करायचे वेध लागले. त्याने त्यासाठी मार्गदर्शकाची निवड केली.  संशोधनाच्या वाटा धुंडाळल्या. भाऊ दिवसभर प्रयोगशाळेत विविध प्रात्यक्षिके करुन पाहू लागला.  विज्ञानात प्रयोगाला, त्यातून येणाऱ्या निष्कर्षाला महत्व असते. त्यासाठी तो तज्ञांना भेटू लागला. एकदा त्याच्या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर येऊन काम पाहून गेले होते. एखादा पदार्थ किती जुना आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे, या विषयावर भाऊचे काम चालू होते. संशोधकाला संशोधन चालू असताना आपले शोधनिबंध सादर व प्रकाशित करावे लागतात. भाऊने असाच एक शोधनिबंध अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठाला पाठवला आणि चमत्कार झाला.  बोस्टन विद्यापीठाने तो स्वीकारला आणि सादर करण्यासाठी थेट बोस्टनला बोलावले. परदेश प्रवासाची तयारी सुरू झाली. भाऊने पासपोर्ट काढला. व्हिसा मिळवला. त्यासाठी नो एजंट. भाऊ प्रत्येक ठिकाणी स्वतः गेला. अगदी विमान प्रवासाची तिकीटे स्वतः काढली. मार्गदर्शक म्हणाल्या, ‘ चाललाच आहेस तर तुझ्या विषयाच्या अनुषंगाने काही नवीन स्वरूपाचे संशोधन चालू आहे का ? याचा शोध घे . ‘  सगळी नाटकं करता येतात पण पैश्याचे? भाऊ बोत्रे तीन दिवस तिथे राहणार होता.  त्यासाठी त्याला ट्रॅव्हल ग्रॅंट मिळाली होती. भाऊने घरी त्याच्या परदेश प्रवासाची आजिबात कल्पना दिली नव्हती. दिली असती तर ह्या लंगड्या पांगळयाची काळजी वाटून आई वडीलांनी खोडा घातला असता ना ! भाऊने कुलगुरू नरेंद्र जाधवांना भेटायचा प्रयत्न केला.  पण कुलगुरू मिटींगमध्ये असल्याने त्याच्या चार चकरा फुकट गेल्या. टेक ऑफचा दिवस जवळ आला. आवराआवर सुरू झाली. मी भाऊला नाशिकला बोलावले. शुभेच्छांचा घरगुती समारंभ होता. पत्रकार विश्वास देवकर आले. ” हातावर चालणारा भाऊ निघाला बोस्टनला ” , अशी मुखपृष्ठ कथा सकाळ पेपरमध्ये प्रसिद्ध झाली आणि भाऊला काॅल,  मेल सुरू झाले. अमेरिकेतली मराठी माणसं म्हणाली, ‘ हाॅटेलात राहू नको . इथली हाॅटेल्स तुला परवडणार नाहीत . आमच्याकडे रहायला ये.’  कुलगुरू नरेंद्र जाधवांनी डाॅ. विद्यासागर यांचेवर त्याला काय हवे ते पहायची जबाबदारी सोपविली. कुलगुरू ऑफिसातून भाऊचा शोध सुरू झाला. आईवडिलांना पेपरमधून पोराची किर्ती ऐकायला मिळाली. बाबा कल्याणी यांनी भाऊच्या हातात खर्चासाठी पैसे दिले. भाऊला विमानतळावर पोहचवायला काही नातेवाईक हजर होते.  मी टेक ऑफच्या दिवशी विमानतळावर त्याला निरोप देण्यासाठी गेलो होतो. 

भाऊची गोष्ट इथे अधिक मजेदार वळण घेते.  भाऊ बोस्टन विद्यापीठात संशोधन मांडतोच,  पण अमेरिकेतल्या विविध विद्यापीठात जातो . संशोधकांना भेटतो. यासाठी अमेरिकतली मराठी माणसं त्याच्या पाठीशी उभी रहातात.  तीन दिवसासाठी गेलेला भाऊ एकवीस दिवस अमेरिकेत फिरतो आणि भारतात परततो. असा माणूस Ph.D पदवी मिळवतो हे आता फार नवलाचे राहत नाही. 

शिक्षण कधी थांबते का ? थांबला तो संपला . भाऊला एकदा पुणे विद्यापिठाने संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी जपानला पाठवले होते.  त्याचदरम्यान त्याची दिल्लीत आय.आय. टी. साठी मुलाखत होती. मुलाखतीची तयारी चालू होती. तरी भाऊ जपानच्या टीममध्ये दाखल झाला.  तिथून मुंबई गाठली. दिल्लीचे तिकीट काढलेले होते. तसाच दिल्लीत पोहोचला. फ्रेश होऊन मुलाखतीसाठी हजर झाला. तज्ञांना जेव्हा भाऊची पुणे – जपान – मुंबई – दिल्ली प्रवासाची हकीगत कळली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि  ते भाऊला म्हणाले, ‘ बोल कधीपासून नोकरीत रुजू होतो. हे घे तुझे नियुक्ती आणि निवडीचे पत्र. ‘ 

भाऊ म्हणाला,  ‘ मला वेळ द्या.  घरी जातो. आईवडिलांना भेटतो. चार दिवस आराम करतो आणि नोकरीला सुरुवात करतो .’ 

हाताचा वापर पाय म्हणून करणारा  डॉ.भाऊ बोत्रे आज राजस्थानच्या बिट्स पिलानी मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सक्रिय आहे. त्याला तेथून भारतभर फिरावे लागते. जगभरच्या संशोधनावर लक्ष ठेवावे लागते आणि दिव्यांगांसाठी काहीबाही करावे लागते.  म्हणून भाऊची ही कथा सफळ संपूर्ण नाही. तो आणखी काही करण्याची तयारी करतो आहे. त्याचा संसारही फुलला आहे. त्यावरची कळी खुलू लागली आहे आणि भाऊ प्रयोगशाळेत व्यस्त आहे. 

लेखक : डॉ.शंकर बो-हाडे 

९२२६५७३७९१

shankarborhade@gmail.com

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || मालक ||…भाग 1 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ || मालक ||…भाग 1 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

(११ नोव्हेंबर : वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. “स्वरमंगेश” ह्या गौरवग्रंथामध्ये “मालक” ह्या शीर्षकाने, सोमवार दिनांक २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! मा. लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं !) ……   

” माझ्या घरांत मी तुला काही काम पडू देणार नाही “, असं मालकांनी मला लग्नाच्यावेळीच सांगितलं होतं ! अगदी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही कधी. एकदा मालक आंघोळीला निघाले म्हणून मी धोतराच्या निऱ्या करून ठेवल्या, तर किती रागावले माझ्यावर, ” तू काय हमालाची बायको आहेस का ?”

– आज माझ्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मी मालकांच्या आठवणी आठवू पहाते, तर अगदी काल परवा घडल्या असाव्यात, अशा साऱ्या  स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागतात !

माझ्या माहेरी जेवणानंतर, मला पान खायची सवय होती ! लग्नानंतर दोन दिवसांनी मालकांना काय वाटले, कोणास ठाऊक ? ” यापुढे पान बंद “, असं मालक म्हणाले. पानाचे सगळे साहित्य मालकांनी फेकून दिले. नंतर काय झाले, मालक गड्याला म्हणाले, ” जेवण झालं की एक विडा करून हिच्या उशापाशी ठेवत जा. ” !

एक दिवस मालक, खालूनच “माई, माई”, अश्या मोठ्याने हाका मारीत आले. “अहो काय झालं?” मी विचारलं.  पाहते तर काय, एका खिशात पानाचं सगळ साहित्य, नि दुस-या खिशात पिकलेली पानं. म्हणाले, ” तुला लागतात ना, म्हणून पिकलेली पानं घेऊन आलोय “! मालकांचा असा भोळा अन् प्रेमळ स्वभाव !

माझी सासू फार कडक होती. मी खानदेशातली म्हणून सासू मला ” घाटी ” म्हणायची, पण मालक इतके शांत की, आईला कधीही काहीही बोलायचे नाहीत. मी थोडी रागावले की, मालक म्हणायचे, “अगं माई, कां रागावलीस ? प्रेमाच्या राज्यांत तलवारीचं आणि भाल्याचं काय काम ?” इतका शांत स्वभाव होता ह्यांचा ! हं दिवसभर शब्दांच्या कोट्या करायचे आणि दुसऱ्याला हसवायचे !

मालाकांचं जेवण अगदी कमी असायचं, पण षोक मात्र खूप जेवण करून ठेवायचा. ह्यांना ओल्या हरभऱ्याची भाजी फार आवडायची. मटण, मासे, कोंबडी सगळं एकदमच करून ठेवायचं. दर पंगतीला ह्यांना कुणीतरी लागायचं. कधीही एकटे जेवले नाहीत. कुणीच नसलं, तर गॅलरीत उभे राहायचे आणि लोकांना हाका मारायचे, ” काय रे बाबा, कुठे चाललास ? जेवलास का नाही ? नाही तर ये आणि जेवून जा.”

काही वेळा मालक अगदी बेफिकीर असायचे. एकदा गोव्याला रस्त्यानं आम्ही दोघे चाललो होतो. ते पुढे आणि मी मागे. ह्यांनी शर्टामध्ये गळ्याशी नोटा खोचून ठेवल्या होत्या. जोराचा वारा आला आणि शर्टामधल्या काही नोटा उडून खाली पडल्या. मी त्या नोटा उचलायला खाली वाकले, तर माझ्यावर ओरडलेच, ” खाली पडलेल्या नोटा भिकाऱ्यासारख्या उचलू नकोस, गेले पैसे तर गेले, त्याच्या मागे कधी जाऊ नये.”

प्रसंगी मालक अगदी लहान मुलासारखे हळवेही व्ह्यायचे. एकदा पुण्याला भाजीमंडईमध्ये, मी भाजी आणायला गेले होते, मुलं माझ्याबरोबर होती. घरी यायला आम्हाला जरा उशीर झाला तर इकडे जीव कासावीस होऊन, बायको-मुलं हरवली, अशी मालकांनी पोलिसात तक्रारही केली !

मालकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मीही त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. बैठकीचं गाणं ठरवायला कुणी आलं, तर म्हणायचे, ” माईला विचारा, तिने सांगितलं तर एका रुमालावरही गाईन.”

मालक अगदी सनातनी होते. मुलींच्या लहानपणी, त्यांची सक्त ताकीद होती की, मुलींनी स्टेजवर यायचं नाही. मुलींनी पावडर लावायची नाही.

मालक उदार वृत्तीचे होते. एकदा मुंबईला रेडिओवर गायला गेले होते, तर हातातल्या अंगठ्या कुणाला तरी देऊन, रिकाम्या बोटांनी घरी आले. मैत्री कशी करावी, हे तर मी मालकांच्या स्वभावातूनच पाहिलं. आयुष्यात फार मोठा दानधर्म मालकांनी केलेला मी स्वतः जवळून पाहिला आहे. पण शेवटी मालकांच्या अंगावर काय आलं, तर भगवं धोतर !

मला चार मुली झाल्या, पण लोकांसारखे मालकांनी कधी, “मुलीच का झाल्या ?” असं नाही म्हटलं. त्यांना मुलींचीच भारी हौस होती. मुलींना रागे भरलेले त्यांना आवडायचे नाही. मुलींना ते जराही दृष्टीआड होऊ द्यायचे नाहीत.

– (क्रमशः भाग पहिला ) 

— माई मंगेशकर 

शब्दांकन : श्री उपेंद्र चिंचोरे

ईमेल – chinchoreupendra@yahoo.com 

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

बहिणी…..​​

दुःख  वाटून घेणाऱ्या…. सुख वाटत जाणाऱ्या

सल्ला देणाऱ्या …. सल्ला घेणाऱ्या 

खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या 

आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या 

स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणाऱ्या 

शाबासकीची पहिली थाप पाठीवर देणाऱ्या .

खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या.

 

​​बहिणी ….. 

आयुष्याला मिळालेलं एक वरदान.

जागेपणीचं स्वप्न छान …. पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान.

सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान

मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर

हळुवार हात पुसतात डोळ्यातले नीर

उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर

 

​​बहिणी ….. 

गातात नाचतात, खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम.

त्या सुगरण असोत  नसोत…. प्रत्येक  घास वाटतो अमृताहून गोड.

बहिणीत नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती… लहान थोर… शहर गाव.

बहीण असते एक सरिता ….. या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी……. 

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बदल… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ बदल…  ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

एका प्रसिद्ध टीव्ही  मालिकेतील नायिका सोज्वळ आहे. जुन्या काळातील नायिकांसारखी ती दोन वेण्या घालते. अलीकडं कोणी वेण्या घालत नाहीत. आंबाडा, एक वेणी या हेअरस्टाईल्स तर कालबाह्य झाल्या आहेत. पॉनिटेल फक्त मध्यमवयीन महिलांनी घातलेला दिसतो. तरूणी, नवयौवना यांच्या हेअरस्टाईलनं क्रांतिकारक बदल केलेला दिसतो. खरं तर या नवयुवती हेअरस्टाईल करतच नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण या सगळ्या आजकाल केस बांधतच नाहीत. केस मोकळे सोडणं हीच सध्याची फॅशन आहे.

एक काळ असा होता की केस मोकळे सोडणं असभ्य मानलं जाई. आंबाडा, एक वेणी, दोन वेण्या एवढेच पर्याय उपलब्ध असत. पोनीटेल ची फॅशन ही लहान केस असणाऱ्यांसाठी वरदान ठरली. ज्या मुलींचे केस खरोखरच टेल सारखे, शेपटी सारखे लहान होते त्या मुली एक आडवी क्लिप लावून पोनी बांधू लागल्या. मानेच्या नाजूक झटक्यानं ही पोनी डौलदार झोका घेऊ लागली. आकर्षक दिसणं कोणाला नको असतं बरं? ही स्टाईल वेगानं समस्त महिला वर्गानं उचलून धरली. लांब केसांचा आता कंटाळा येऊ लागला. वेळ वाचतो या नावाखाली लहानथोर सगळ्याच महिला पोनी बांधण्यासाठी केसांची लांबी मर्यादित ठेवू लागल्या. वेणी घालणं ही जुनाट फॅशन झाली. काकूबाई स्टाईल म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि काकूबाई म्हणवून घेणं कोणाला चालेल, हो ना?

मधल्या काळात साधना कट, बॉबकट, बॉयकट अशा काही कटस्टाईल्स लोकप्रिय झाल्या. पण त्यांची लोकप्रियता फारशी मोठी नव्हती. बघता बघता हिंदी सिनेमा, टीव्ही मालिकांतील नायिका केस मोकळे सोडून फिरू लागल्या. ग्लॅमरस लूक मिळवण्यासाठी आमच्या मुली, सुना देखील मुक्त केस आणि मुक्त मनानं मोकळ्या ढाकळ्या बिनधास्त जगू लागल्या. स्वच्छता, हायजिन साठी घातलेली बंधनं या मुलींनी झुगारून दिली. घरभर केस पडू नयेत म्हणून एका जागी बसून केस विंचरणं, स्वयंपाक करताना, घरकाम करताना ते बांधून ठेवणं हे नियम जाचक वाटू लागले. मोकळे केस हे मुक्त जगण्याचं, मुक्त विचारांच प्रतीक ठरलं. इथंपर्यंत थोडं ठीक आहे असं वाटतंय तोच कुरळे केस नकोसे वाटू लागले. स्ट्रेट, स्मूथ, सिल्कि केस पसंतीची पावती मिळवू लागले.त्यासाठी महागड्या ट्रिटमेंटस् केल्या जाऊ लागल्या. पण केसांची नवी मुक्त स्टाईल वाऱ्याच्या वेगानं पसरली.

मुक्तांगण कितीही प्रिय असलं तरी वैविध्यपूर्ण केशरचना देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत असं दिसतं. फ्रेंच रोल, हाय बन, लो बन आणि अगणित हेअरस्टाईल्स सण समारंभ, लग्न मुंजीत मानाचा मुजरा घेतात.

चांगलं दिसणं, आधुनिक राहणं, काळाबरोबर चालणं जमायल हवंच. तो आपला हक्कच आहे. फॅशन करताना स्थळकाळाचं भान मात्र असायला हवं. आपण कुठं आहोत, कोणत्या समारंभाला जाणार आहोत, आजूबाजूला कोणत्या वयोगटातील लोक आहेत, अशा काही गोष्टींचा विचार करावा इतकंच. स्वयंपाक करताना बांधलेले केस कामात अडथळा आणत नाहीत . शिवाय ते हायजेनिक आहे.

पूजा असेल, धार्मिक विधी असतील तर बांधलेले केस बरे. आजूबाजूला पणत्या,दिवे,समया असतील तर मोकळे केस धोकादायक ठरू शकतात. वयस्कर किंवा आदरणीय मोठी माणसं आजूबाजूला असतील तर केस मोकळे सोडू नयेत. ते छानसे बांधावेत.अशा वागण्यातून आदर, नम्रता व्यक्त होते. आधुनिकपणाचा स्वीकार करताना तारतम्य ठेवायला हवंच.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते. पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटेड असतं !! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि ‘पुरेसाची’ व्याख्या पुन्हा बदलते ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं ! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो ! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आल्यामुळे मिळणारं सुख मोठं? की खर्चल्यामुळे मिळणारं? हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ ही म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युलर, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही !! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमवावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको, असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे . पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!

लेखक : – प्रसाद शिरगांवकर

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित. 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ !! पन्नाशी पार करतांना !! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

!! पन्नाशी पार करतांना !!  … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एकदा एका पन्नाशी ओलांडलेल्या आणि साठीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, 

” मित्रा, पन्नाशी ओलांडल्यावर आणि साठीकडे जाताना तुझ्यात काय बदललंय असं तुला वाटतंय? ” 

— यावर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित ! त्याने जे उत्तर दिले ते असे……… 

— आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय

— मला याची जाणीव झालीय की, आता मी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही, की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.

— आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना ! 

— आता मी माझ्या जीवनसंघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.

— आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.

— आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.

— आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.

— ज्यांना माझी किंमत नाही अशांकडे मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहिती नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.

— आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.

— आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.

— आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून ! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.

—  आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. 

— मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत… आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा…!!

— आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.

 — आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जाऊन रडतो. त्याच्या तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असल्याची भावनाही मनात येते.

खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?

— आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.

खूप खूप शुभेच्छा पन्नाशी ओलांडताना !! —

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares