अन ‘त्या दोघी’ हे मराठी मनाच्या अगदी जिव्हाळ्याचे विषय!
मकर संक्रांतीला मान गुळाच्या पोळीला. वर्षातून एकदा…. पण एकदाच ! त्यामुळे ही जरा ‘एक्सक्लुजीव’ वाटते.
पुरणाच्या पोळीचे मात्र तसं नाही…. गौरी, श्रावणी शुक्रवार, होळी हे खास दिवस आहेतच, परंतू कुळधर्म कुळाचार याही वेळेस पुपो शिवाय पान हलू शकत नाही.
गुळाच्या पोळीचा सोबती एकच…. साजुक तूप.
तर पुरणपोळीची जिवलग दोस्त तुपाची धार…आणि शिवाय इतरही. म्हणजे दूध, नारळाचे दूध, कटाची आमटी.
हे ही तिचे प्रिय सोबती…. अगदी आमरस सुद्धा.
गुळपोळी साखरेची बनवता येत नाही.
पुरणपोळीत साखरेचे पुरणही चालते… असं ऐकलंय. खाल्ली नाहीये मी कधी.
एका बाबतीत मात्र साम्य दोघींमध्ये….गृहिणीची कसोटी लागते त्या बनवतांना…. त्या उत्तमपैकी करायला जमणे हे म्हणजे ‘फेदर इन कॅप’!.. दोन्ही पोळ्यांत व्यवस्थित पुरण असणे, ते पोळीच्या कडेपर्यंत भरलेले असणे, पोळीचे आवरण अधेमधे फाटलेले नसणे, त्यातून पुरण ओघळलेले नसणे, ती तव्यास न चिकटणे ….अश्या बऱ्याच कसोट्यांवर पोळी उतरावी लागते, तेव्हा कोठे ‘सुगरणी’चा किताब प्राप्त होतो !
पुपो तव्यावरची गरम गरम खाण्यात मजा.
तव्यावरून थेट ताटात.
गुळपोळी गरमगरम खायची अट नाही. अन तशी ती खाणेही कठीण.
कारण त्यातला चटका देणारा गुळ.
गुळाचीपोळी कधी शिळीबिळी होत नाही.
पुरणपोळी जरी झाली शिळी तरी ती शिळी झाली की जास्तच छान लागते. खुसखुशीत होते.
आता ‘मोस्ट इंपॅार्टंट’ सवाल!
“गुळपोळी आणिक पुरणपोळी यातील कोण आवडे अधिक तुला?
सांग मला रे सांग मला”
असं कोणी गाऊन मला जर विचारू लागले तर?
अवघड आहे उत्तर देणे.
हं…..पण गुळाची पोळी हे उत्तर द्यावं लागेल.
आज तरी.
तुम्हाला वाटेल, आज संक्रांत म्हणून ‘देखल्या देवा दंडवत’ असणार!
ते एक आहेच.
पण अजुन एक कारण आहे.
पुरणपोळ्या दोन खाल्या, फार फार तर तीन, की पोट कसं भरून जातं.
पुपो अंगावर येते.
गुळाच्या पोळीचे मात्र तसे नाही.
गुळाचीपोळी म्हणजे चोरटे खाणे!
चार पाच सहज पोटात जातात, अन तरीही अंगावर येत नाहीत म्हणून.
लेखिका : अज्ञात
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला फक्त मज्जा हवीय… लेखक – अनामिक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
(अतिशय गंभीर चिंतनीय पोस्ट!)
“मला फक्त मज्जा हवीये” (Todays Goal of Every Youth)
तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे?
प्राचीन काळी “ज्ञानप्राप्ती आणि परमार्थसाधना” हे उदात्त उत्तर मिळत असे.
अर्वाचीन काळी “प्रापंचिक सुख” हे व्यवहारात बसेल इतपत उत्तर देत असत.
आत्ता काल-परवा “पैसा, समाधान, शांती” हे शब्द ऐकू यायचे.
हल्ली थेट विकेट पडते –
“मला फक्त मज्जा करायचीये”.
विषय संपला.
“मज्जा केलीच पाहीजे” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या ऊरावर पांघरू लागलीयेत.
इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती “निकड” झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.
तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –
“बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी…”
“पार्टी नाही? शी…”
“फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी… पथेटिक…”
तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला!? फारच बोरिंग ….
“तू आजवर कधी पब मध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं…”
यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले.
तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात।पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच.
TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला.
न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं.
“अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं?” असं झालं.
जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं.
एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेन्ट्स” झाले.
मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.
तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल.
कमवा; आणि उडवा.
तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho !!
भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा.
विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही “वीड”, “ग्रास” हे शब्द येऊ लागलेत.
यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही.
या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. “मनाली ट्रान्स” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवणऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो मुक्तहस्ते सपोर्ट करणारा !!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या !!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं.
चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.
मग मेलात तरी चालेल.
आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?
चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत”, “आमचं कित्ती मस्त चालू आहे”, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय”, हे दुसऱ्याला दाखवणं, हा चंगळवादाचा अट्टहास असतो.
ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो.
मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना; त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो.
तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.
मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात.
गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात.
त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग “तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही”, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात.
हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यातली बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच.
जागे होऊया रे.
स्वत्व नको विकूया आपण.
दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत !!
उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंतकाळ चमकतो.
आपण सूर्य निवडू या.
लेखक – अज्ञात
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या, एका तथाकथित ‘सेक्युलर’ स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं :
पत्रकार : “इस्लामचा संस्थापक कोण आहे?”
स्वामीजी : “मोहम्मद पैगंबर”
पत्रकार : “आणि ख्रिस्ती धर्माचा?”
स्वामीजी : “येशु ख्रिस्त.”
पत्रकार : “आणि हिंदु धर्माचा संस्थापक?”
आपण स्वामीजींना निरुत्तर केलं आहे, असा तिचा समज झाला होता. ती विजयी स्वरात पुढे म्हणाली.. :
” या धर्माचा कुणीच संस्थापक नाही आणि म्हणूनच हिंदुत्व हा धर्म नाही, हेच सिद्ध होतं.”
स्वामीजी म्हणाले :
“अगदी बरोबर.!”
” हिंदुत्व हा धर्म नाहीच मुळी ! हिंदुत्व म्हणजे निखळ विज्ञान आहे. मानवी जीवन जगण्याचा सत्य मार्ग आहे.”
— त्या महिला पत्रकाराला काहीच कळलं नाही….
आता, स्वामीजींनी तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली.
स्वामीजी : ” भौतिक शास्त्राचा संस्थापक कोण? “
पत्रकार : ” कुणाही एका व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार.”
स्वामीजी :- ” बरं, रसायनशास्त्राचा संस्थापक कोण? “
पत्रकार : ” इथंही कुणा एका व्यक्तीचं नांव, नाही सांगता येणार.”
स्वामीजी : ” प्राणिशास्त्राचा संस्थापक कोण?”
पत्रकार : “अर्थातच, कुणा एका व्यक्तीचं नांव नाही सांगता येणार. अनेक शास्त्रज्ञांनी, तसंच वेगवेगळ्या काळात; ह्या शास्त्रांबद्दलच्या ज्ञानात आपापल्या परीनं वेळोवेळी भर घालून, ही शास्त्रे समृद्ध केली आहेत.”
यावर स्वामीजी बोलले –
“आधुनिक शास्त्रज्ञांनी मानवाच्या भौतिक गरजांचा विकास करण्यासाठी, वैज्ञानिक संशोधन केले आहे. त्याप्रमाणे,
हिंदूधर्मही विज्ञानच आहे—
‘ ऋषी ‘ या शब्दाचा अर्थ ‘शास्त्रज्ञ’ ! त्यांनी मानवाचा मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास करण्यासाठी संशोधन करून, लोक जागृती केली. अनेक ग्रंथ लिहून मार्गदर्शन केले आणि शतकानुशतकं त्याचा विकास होत आलेला आहे. अनेक थोर संतमहंतांनी, ऋषिमुनिंनी यावर वेळोवेळी संस्कार करून आणि आपल्या संशोधन आणि अनुभवांद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य अव्याहतपणे सुरूच ठेवलेलं आहे.—- इस्लामचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – कुराण – पुरेसा आहे. ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – बायबल – पुरेसा आहे.——
— पण हिंदुत्व म्हणजेच ‘ मानव जीवन मार्गाचा ‘ अभ्यास करण्यासाठी, अनेक ग्रंथालयांत जाऊन शेकडो पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. कारण हिंदू धर्म हा संपूर्णपणे विज्ञानाधिष्ठित धर्म आहे. तो एकाच कोणी व्यक्तीने स्थापन केलेला धर्म नाही. मानवाच्या जीवन विकासाकरिता आणि मानवाचे जीवन सुखी आणि संपन्न होण्याकरिता जो मार्ग भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, अनेक ज्ञानी ऋषी, मुनी आणि संतांनी दाखवला आहे; त्या सत्य महामार्गालाच ‘ सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म ‘ असे म्हणतात.”
— यावर ती महिला पत्रकार निरुत्तर झाली.
आज हिंदू धर्मीय लोकांनाही त्यांच्या धर्माबाबत अज्ञान आहे, कारण ते धर्मग्रंथांचा अभ्यास करत नाहीत. म्हणूनच म्हणतात, की जर ग्रंथ समजले तर संत समजतील, आणि संत समजले तर भगवंत समजेल; तसेच धर्म ही समजेल.
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
त्यामुळे शाळेतून घरी आलं की आधी मॅसेजेस चेक करावे लागतात की आज किती घरी हळदीकुंकू आहे. मग एक घरी असेल तर ड्रेस, दोनचार घरी असेल तर साडी शोधावी लागते..
काय आहे ना…… एका घरासाठी साडी नेसणं म्हणजे बारशासाठी लग्नाची तयारी करण्यासारखं आहे… त्यामुळे मग ड्रेस अडकवायचा.
जर आपल्याला फारच मेकअप वगैरे काहीही करायला वेळ नसेल तर मग तर मी त्या घरी पटापट सहा वाजताच जाऊन यायचं बघते… म्हणजे अगदी सुंदर तयार होऊन आलेल्या बायकाही भेटत नाहीत आणि आपल्याला उगच आपल्याकडे सगळं असून लंकेची पार्वती बनल्याचं दुःखही होत नाही..
असो. पण हळदीकुंकवामुळे ज्या मैत्रिणी गणपतीच्या मिरवणुकीनंतर भेटल्या नव्हत्या त्याही भेटतात आणि त्या भारतातच असल्याची खात्री पटते….. तेवढेच बरे वाटते हो दुसरं काय…
शिवाय अनेक ठेवणीतल्या साड्यांना हवा लागते नी त्यानिमित्ताने त्या नेसल्या जातात……..
काही मैत्रिणींच्या नवीन साड्यांच्या घड्या मोडल्या जातात…
चांदीची भांडी त्यानिमित्ताने कपाटरुपी जेलमधून बाहेर येतात आणि त्यांना आंघोळ पांघोळ घालून आपण चकाचक करतो…
तेच ठेवणीतल्या मोठ्या पातेल्याच्या बाबतीतही होतं…. कपाटात वर कुठेतरी पडलेले मोठ मोठे भांडे बाहेर येतात नी चकाचक स्वच्छ होऊन त्यात मसाला दूध खळखळ उकळायला लागतं…
दार झाडून पुसून स्वच्छ होतं नी तिथे सुंदर रांगोळी काढली जाते… भलेही मग उठताना पायही आखडतात आणि कंबरही… तुटून हातात येतात की काय असं वाटायला लागतं, नी पाच मिनिटं म्हाताऱ्या आज्जीसारखं वाकूनच चालावं लागतं..
हळदीकुंकवाच्या दिवशी पोळ्या सकाळीच केल्या जातात आणि एखादी साधी भाजी किंवा खिचडी होणार हे जगजाहीर असतं..
घरातला पुरुष वर्ग दबकत दबकत बुटासकट थेट बेडरूम गाठतो नी तिकडेच आरामात डुलक्या घेतो….
…. असं करत करत पावणेदहा होतात आणि आता कुणी राहिलं तर नाही ना?? याचा कानोसा घेत आपण साडी फेडून गाऊन घालतो आणि जेवायला पान घेतलं की टाणकन बेल वाजते…
“ उशिरच झाला गं जरा “म्हणत मैत्रिण येते नी पुन्हा आपण हळदीकुंकवाचं ताट हाती घेतो…… आणि अशा रितीने साडीपासून सुरु झालेला हळदीकुंकवाचा प्रवास गाऊनवर येऊन संपतो..
संक्रांतीचा हा पर्वकाळ म्हणजे खरंच एक पर्वणीच असते सगळ्या मैत्रिणींना भेटण्याची…… आणि लई म्हणजे लईच बिजी असण्याची….
सखी (फक्त महिलांसाठी)
लेखिका – सुश्री योगिता कुलकर्णी
प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दोन दिवसांपासून वातावरणात हलका बदल व्हायला सुरवात झालीयं. ही शिशिराची चाहूल . हे बदलते ऋतू आणतात आयुष्यात वैविध्य, रंगत आणि शिकवितात एक मोलाचा संदेश. आयुष्यात दिवस हे देखील ऋतुंप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे कुठल्याही चांगल्या स्थितीत हुरळून जायचं नाही आणि कुठल्याही वाईट स्थितीत डगमगायचं नाही, कारण दिवस हे ऋतुंप्रमाणे बदलत असतात.
दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष आणि पौष ह्या मराठी महिन्यात शिशिर ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या इंग्रजी महिन्यात शिशिर ऋतू असतो.
शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिवळी पडतात व गळतात. त्यानंतर त्या झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या ऋतूत काही प्रमाणात गारवा व थंडी असते आणि काही प्रमाणात उन्हाळ्याची चाहूल देखील एकीकडे येणे सुरू होते. या ऋतूत फळे व फुले बहरलेली असतात .
या काळात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात. उन्हाळा सुरू झाला की पहिले दोन चार दिवस ती पानगळ,पिकली पानं गळतांना बघून मन हुरहुरतं,उदास होतं पण हे तर निसर्गचक्र. परत नवीन पालवी फुटतांना बघितली की परत मन हरखतं,प्रफुल्लित होतं.सगळे आपले मनाचे खेळ. आंब्याचा मोहोर,डवरलेला गुलमोहर आणि फुललेला पळस बघणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं सुख,आनंद.तो पळस आणि गुलमोहर डोळ्यात किती साठवून ठेवू असं होतं खरं.
ह्या शिशिराची आठवण होतांना हमखास आठवण होते वा.रा.कांत ह्यांच्या “शिशीरऋतूचे गान ” ह्या कवितेची.त्या कवितेतील शेवटचे कडवे आणि त्याचे माझ्या शब्दांत रसग्रहण पुढीलप्रमाणे
हलके हलके हसते,गळते तरुचे पान न पान
पानझडीत या ऐकुन घ्या गं शिशीर ऋतुचे गान
फुले जळाली, पाने गळली,
फळांत जरी रसधार गोठली,
सर्व स्रुष्टी जरी हिमे करपली,
पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान
पानझडीत ह्या ऐकून घ्या गं शाशीरऋतुचे गान
खरंच हा ऋतु साक्षात वृक्षांच्या उदाहरणावरुन आपल्याला शिकवून जातो.अगदी हलके हलके सहजतेने वृक्षाची पानगळ झाली, फुलं जळाली, अगदी परिसीमा म्हणजे अवघी स्रुष्टी जरी हिमे करपली. तरी आपलं मनं मात्र कायम आशावादी सकारात्मक ठेवा कारण येणारा उद्या कायम आपल्यासाठी वसंत ऋतू म्हणजे भरभराट घेऊन येणारच आहे.त्यामुळे खचून न जाता उद्याची वाट बघत आशावादी सकारात्मक हसतमुख रहा. आपल्यातील कित्येक आदर्श पिकली पानं जरी गळून पडली तरी त्यांचा आदर्श आपल्याला कायम शिकवण देत राहील
त्यांच्या आठवणी,आदर्शवाद आपल्याकडे असलेला अनमोल ठेवा असेल,तो कायम स्मरणात ठेवा आणि आचरणात आणा.
☆ ही सर्व श्रीरामाची इच्छा …! ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
स्वामी विवेकानंद यांनी भ्रमंतीमध्ये अनेक गोष्टी अनुभवल्या. काही चांगल्या तर काही वाईट…
अनेकदा ते उपाशी रहात तर कित्येकदा अत्यंत थकून जात. खूपदा भुकेलेही असत. अनेक दयाळू माणसेही त्याना भेटली व त्यांनी स्वामीजींना मदतही केली. बहुतेक गरीब आणि कनिष्ठ म्हणवणाऱ्या जातीतील अनेक लोकांनी त्यांना अन्न व आश्रय दिला आहे…
एकदा उत्तर प्रदेशात ते एका रेल्वे स्टेशनवर रणरणत्या उन्हात भुकेले व तहानलेले बसले होते. खिशात एकही पैसा नव्हता. एक जवळच बसलेला व्यापारी त्याना टोमणे मारत होता. त्याला संन्याशाविषयी वावडे होते.
तो स्वामीजीना म्हणाला, ” पहा बरं मला कसे सुग्रास अन्न पाणी चाखायला मिळते ! कारण मी पैसे मिळवतो व मला हव्या त्या उत्तम गोष्टी घेऊ शकतो. तुम्ही पैसे मिळवत नाही मग अशी उपासमार काढावी लागते.”
यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत. पण थोड्याच वेळात एक अद्भुत प्रसंग घडला. एक हलवाई आला.
त्याने स्वामींजीसाठी जेवण आणले होते. चटई अंथरुन त्याने ताट वाढले, पाणी ठेवले आणि त्यांना जेवायला बसायची विनंती करु लागला.
स्वामीजी त्याला म्हणाले, “अहो तुमची काही तरी गल्लत होत आहे. यापूर्वी मी तुम्हाला कधीही पहिल्याचे आठवत नाही.”…
हलवाई सांगू लागला,
” नाही हो ! मी तुम्हालाच स्वप्नामध्ये पाहिले. माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष श्रीराम आले व म्हणाले, यांना स्टेशनवर जेवण घेऊन जा. म्हणून तर मी आपणास लगेच ओळखले. आता सर्व जेवण गरम आहे तोवर कृपया आपण खाऊन घ्यावे.”
स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हलवायाला वारंवार धन्यवाद देऊ लागले.
तो मात्र.. ” ही सर्व श्रीरामाची इच्छा !” असेच म्हणत राहिला.
बाजूचा व्यापारी हे सर्व पाहून हतबुद्ध झाला. त्याला आपली चूक समजली. त्याने क्षमायाचना करीत स्वामीजींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले….
(रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांच्या ‘स्वामी विवेकानंद – जीवन आणि उपदेश’ या पुस्तकामधील काही भाग.)
संग्राहक : अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चं म त ग ! 😅 एक अफलातून सोमवार ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“अहो उठा, पाच वाजून गेले!”
“हो गं, जरा गजर तर होऊ दे “
“मी दोनदा गजर बंद केलाय म्हटलं!”
“दोनदा ?”
“मग, साडे चारचा गजर एकदा त्याच्या वेळेला झाला तेव्हा आणि मी बंद केल्यावर snooz ला जाऊन परत पाच वाजता झाला तेंव्हा “
“अरे बापरे, म्हणजे आता वाजले तरी किती ?”
“साडेपाच वाजत आले, मला पण सगळे आटपून आठ पाच पकडायची आहे”
“जाऊ दे, आज कंटाळा आलाय ऑफिसला जायला”
“हे तुमच दर सोमवारच झालंय हल्ली”
“हल्ली म्हणजे?”
“हल्ली म्हणजे डोंबिवलीला रहायला आल्यापासून म्हणतेय मी”
“हो, पण फ्लॅटात रहायची हौस कोणाला होती?”
“म्हणजे, हौस काय मला एकटीलाच होती? उलट आपल्या गिरगांवातल्या जागेपासून, माझी आर्यन education ची शाळा हाकेच्या अंतरावर आणि तुमच BMCच ऑफिस दोन बस स्टॉपवर होतं.”
“हो नां, मग मी जे म्हणतोय ते बरोबरच आहे ना?”
“काय डोंबलाच बरोबर?
अहो, तुम्हांलाच BMC मधे प्रमोशन मिळाल्यावर गिरगांवातल्या चाळीतल्या दोन खोल्या, काडेपेटीच्या आकाराच्या वाटायला लागल्या आणि तुम्ही तसं बोलून पण दाखवत होतात हजारदा, विसरले नाही मी अजून.”
“अग म्हणून तर मी गिरगांवातली जागा विकून ठाण्याला वन बेडची जागा घेऊया म्हटलं, तर तुझ्या आईनं खोडा घातला त्यात”
“उगाच माझ्या आईला दोष देवू नका यात”
“का, का दोष देवू नको? तिच्यामुळेच तर आपण येवून पडलो ना डोंबिवलीला?”
“हो क्का, मग मला आता एक सांगा, तुम्ही जी ठाण्याला वन बेड बघितली होती, ती कुठेशी होती हो ?”
“कुठेशी म्हणजे तुला जस काही माहितच नाही, वाघबीळला!”
“हां, म्हणजे सांगायला ठाण्याला राहतो, पण स्टेशन पासून रिक्षाने फक्त वीस मिनिटावर, काय बरोबर ना ?”
“अग पण तिथे सुद्धा हजारो लोकं राहून, नोकरी साठी रोज मुंबई गाठतातच ना ?”
“बरोबर, पण त्याच वीस मिनिटापैकी फक्त दहा मिनिट पुढे ट्रेनने प्रवास करून तुम्ही डोंबिवलीला पोचता त्याच काय ?”
“ते जरी खरं असलं तरी आपली जागा स्टेशनपासून लांब असल्यामुळे, इथे डोंबिवलीला उतरल्यावर सुद्धा रिक्षाच्या भल्या मोठया लायनीत, वीस वीस मिनिट उभ रहावं लागतच ना?”
“हो, पण या सगळ्या गोष्टीत तुम्ही एक महत्वाचं विसरताय ?”
“काय, दोन सोसायटया सोडून तुझी आई रहाते ते?”
“ते तर आहेच, पण त्या वाघबीळच्या जागेच्या बजेट मध्ये माझ्या आईने आपल्याला डोंबिवलीला दोन बेडची जागा मिळवून दिली ते!”
“अग हो, पण ठाणा म्हटलं की कसं ऐकायला जरा बरं वाटत आणि शिवाय स्टेटस वाढल्यावर त्या प्रमाणे नको का रहायला?”
“हवं ना, मी कुठे नाही म्हणत्ये ? मग त्या चांगल्या BMC च्या quarters मिळत होत्या मोठया, त्या का नाही घेतल्यात हो ? म्हणजे ही वेळ आली नसती नां?”
“तुला ना काही कळत नाही”
“काय, काय कळत नाही?”
“अग, quarters घेतली की house allowance मिळत नाही आणि शिवाय तिकडे सुद्धा रोज ऑफिस मधल्या लोकांचेच चेहरे बघायचे ना?”
“मग इथे गोपाळ नगर मधल्या आपल्या आराधना सोसायटीत तुमचे शेजारी पाजारी रोज बदलतात की काय ?”
“अग तसं नाही, पण नाही म्हटलं तरी मॉनिटरी लॉस हा होतोच होतो आणि शिवाय…”
“ही तुमची पळवाट झाली”
“अग पळवाट वगैरे काही नाही. Quarters न घेण्यात दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा आहेच.”
“अस्स, तो कोणता?”
“अग रिटायर झाल्यावर quarters सोडावी लागते आणि त्या जागेची आपल्याला नंतर इतकी सवय झालेली असते, की रिटायरमेंट येई पर्यंत आपण विसरूनच जातो, की आता काही महिन्यातच आपल्याला ही जागा सोडायची आहे आणि रहायची दुसरी सोय करावी लागणार आहे आता ते”
“हो ना, पण आता आपण काही quarters मधे रहात नाही त्यामुळे ती भीती नाही! तेव्हा आता उठा आणि पाणी
जायच्या आत सगळं आवरून ऑफीसला पळा”
“अग खरंच कंटाळा आलाय आज. तू पण दांडी मारतेस का ?”
“अशक्य, आताच नवीन वर्ष सुरु झालय आणि परीक्षा…”
“मी तुला कधी सांगतो का गं दांडी मारायला ? आज जरा आग्रह करतोय तर एवढा काय भाव खातेस”
“पुरे, पुरे, तुम्ही आता जाताय अंघोळीला का मी जाऊ ?”
“असं काय ते ?आज जरा मजा करू, गोपी टॉकीजला पिच्चर टाकू आणि मॉडर्न प्राईड मध्ये मस्त हादडू”
“अरे बापरे, आज कसले डोहाळे लागलेत एका माणसाला?”
“म्हणजे नवरे मंडळीच विसरतात असं नाही तर ?”
“मी नाही समजले तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, उगाच आमच्या सारखं कोड्यात बोलू नका, सरळ काय ते सांगा”
“म्हणजे तुम्ही बायका कोड्यात बोलता हे मान्य आहे तर तुला ?”
“आता बऱ्या बोलाने सांगणार आहात की जाऊ मी अंघोळीला?”
“मॅडम आज जर का तुमचा वाढदिवस असता आणि मी तो विसरलो असतो, तर अख्ख घर डोक्यावर घेतल असत आपण !”
“होच मुळी, आपल्या एकुलत्या एक बायकोचा वाढदिवस नवरा विसरतो म्हणजे काय?”
“आणि नवऱ्याचा वाढदिवस बायको विसरली तर चालतं वाटतं मॅडम ?”
“Oh my God, सॉरी सॉरी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”
“It’s OK, थँक्स! मग काय आज मी सांगितलेला प्रोग्राम follow करणार की दुसरं काही विशेष तुमच्या डोक्यात आहे मॅडम ?”
“दुसरं काही विशेष नाही, पण आज एक काम मात्र मी न चुकता नक्कीच करणार आहे”
“काय सांगतेस काय, खरंच?”
“खरंच म्हणजे? तुम्हाला माहित्ये मी शाळेत मुलांना खरं बोलायला शिकवते आणि स्वतः चुकून सुद्धा खोटं बोलत नाही.”
“अग हो, पण आज एक काम नक्की करणार आहेस म्हणजे काय करणार आहेस, ते आणखी सस्पेन्स न वाढवता सांगशील का प्लिज?”
“सांगते ना, आज कुठल्याही परिस्थितीत आठ पाच चुकवायची नाही म्हणजे नाही !”
☆ विचार–पुष्प – भाग – ५३ – सायक्लोनिक हिंदू ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
वृत्तपत्रातील विवेकानंद यांच्या बद्दल आलेल्या, मजकुरामुळे अस्वस्थ झालेल्या बॅगले यांनी अॅनिस्क्व्याम हून पत्रात लिहिलं, “विवेकानंद यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे.याचा माला फार आनंद वाटतो. जे कोणी त्यांच्या विरूद्ध लिहीत आहेत,त्यांच्या मनात विवेकानंदांची श्रेष्ठता आणि आध्यात्मिक धारणा यांबद्दलचा मत्सर आहे. धर्माचा उपदेष्टा आणि सर्वांनी ज्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे अशी त्यांच्या तुलनेची दुसरी योग्य व्यक्ती मला दिसत नाही.ते संतापी आहेत हे साफ खोटे आहे. माझ्या घरी त्यांचे तीन आठवड्याहून जास्त काळ वास्तव्य होते. माझ्या कुटुंबातील सर्वांशी त्यांचे वागणे अतिशय सौजन्याशील होते. आनंद देणारा एक मित्र आणि हवाहवासा वाटणारा पाहुणा असे त्यांचे वागणे बोलणे असे”.
“ शिकागोचे हेल कुटुंब अशीच साक्ष देणारे आहेत. ते प्रेस्बिटेरियन आहेत,पण विवेकानंदन यांना आपल्यापासून दुसरीकडे कोठे जाऊ देण्यास ते तयार नसत. विवेकानंद हे असे एक सामर्थ्यसंपन्न आणि अतिशय थोर व्यक्तिमत्व आहे की जे ईश्वराचा हात धरून चालत राहणारे आहे. त्यांची भाषणे ऐकून अनेकजण उद्गार काढतात की, असे बोलणारा दुसरा वक्ता आपण या आधी कधी ऐकला नाही.ते श्रोत्यांना एका उदात्त विश्वात घेऊन जातात आणि ऐकणारे सारेजण त्यांच्या धर्माविषयक श्रद्धेशी तद्रूप पावतात. माणसाने निर्माण केलेले पंथ आणि संप्रदाय या सर्वांच्या अतीत असणारे असे काहीतरी श्रोत्यांना जाणवते . विवेकानंदांना समजून घेतले आणि त्यांच्या सहवासात एका घरात राहता आले तर , प्रत्येक व्यक्ती उन्नत होऊन जाईल.प्रत्येक अमेरिकन माणसाने विवेकानंद जाणून घ्यावेत. आणि भारताजवळ असतील तर असेच आणखी विवेकानंद त्याने आमच्याकडे पाठवावेत. हे मला हवे आहे”.
प्रा.राईट यांनी विवेकानंद यांच्या असामान्य योग्यतेबद्दल सर्व धर्म परिषदेसाठी पत्र लिहिलं होतं, त्याच अॅनिस्क्व्याम मधून बॅगले यांनी हे पत्र लिहिलं होतं.मिसेस स्मिथ यांनी विवेकानंद यांच्या बद्दल छुपा प्रचार चालुच आहे हे ऐकून पुन्हा बॅगले यांना न राहवून विचारले होते. बॅगले यांनी पुन्हा उत्तर दिले ,त्यात आधीच्या पत्रातील मजकूर होताच पण त्यात चिडून म्हटले होते, “ माझे अनेक नोकर आहेत. मोलकरणी आहेत. सारे जण माझ्याकडे अनेक वर्षे काम करीत आहेत”.म्हणजे बदनामी करण्याची किती हीन पातळी गाठली होती. त्यांनी काही तक्रार नाही केली आणि हे सांगणारी ही कोण? त्याच्या नंतर बॅगले यांच्या मुलीनं स्मिथ यांना कडक पत्र लिहून कानउघडणी केली.
चारित्रहननाची ही मोहिम सव्वा वर्ष सुरू होती पण विवेकानंद यांनी काहीही व्यक्त केले नव्हते, शांतपणे ते सहन करत होते.
आपणही असे अनुभव घेत असतो. मत्सरी लोक आपल्या आसपासच असतात. त्यामुळे इतर लोकांचे आपल्याबद्दल कान फुंकायचे ,विरोधी मत तयार करायचे अशा चुकीच्या गोष्टी लोक करत असतात. पण बॅगले यांच्या सारख्या सत्यासाठी परखड शब्दात कान उघडणी करणारे असले की किमान दुसरी बाजू लोकांसमोर येते आणि न्याय अन्याय, खरे खोटे, काय? कोणाचे? हे स्पष्ट होते, हेही तितकेच खरे आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे!
डेट्रॉईटला विवेकानंद यांची आणखी व्याख्याने होत होती. इतक वादळ उठलं होतं पण स्वामीजी धर्म परंपरा, स्त्रिया, निर्बंध ,त्यातून तयार झालेल्या रूढी यावर भारत व अमेरिका यांच्यावर तुलनात्मक बोलत होते.त्यांनी वाचलेला आणि पाहिलेला अमेरिका आणि आपल्या देशाची मूल्ये आणि शिकवणूक त्या लोकांना, श्रोत्यांना समजून सांगत होते.त्यांच्यात आणि श्रोत्यांमध्ये मनमोकळा संवाद होत होतं. गप्पा होत होत्या. भारतातील धार्मिक आणि सामाजिक अस्वस्थेवर प्रश्न विचारून लोक स्वामीजींकडून समाधान करून घेत. विवेकानंद सर्व प्रश्नांची उत्तरे प्रांजळपणे देत असत. काही दोष तर सरल मान्य करत आणि काही प्रश्न सुटणे अवघड आहे हेही सांगत. राजकीय आक्रमणामुळे सामाजिक निर्बंध स्वीकारावे कसे लागतात ते समजावून देत. हेच निर्बंध मग पुढे जाऊन कशा रूढीत बदलतात हे सविस्तर सांगत .
भारतातील स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल लोक जाणून घ्यायला उत्सुक असत.
इथे एका व्याख्यानात विवेकानंद सांगत होते, “ भारतातील स्त्रिया काही शतकांपूर्वी मोकळेपणाने फिरत असत. सिकंदराने केलेल्या स्वारीच्या वेळी तर राजकन्याही इकडे तिकडे संचार करीत होत्या. पण पुढे मुसलमानांच्या उगारलेल्या तलवारीमुळे आणि इंग्रजांच्या रोखलेल्या बंदुकांमुळे आन्तरगृहाचे दरवाजे बंद करावे लागले होते. पुढे विनोदाने म्हणाले दाराशी वाघ आला तेंव्हा दार लावून घेतले. असे निर्बंध पुढे रूढी झाल्या.
भारतातील स्त्रिया या विषयवार विवेकानंद यांनी व्याख्यान दिले. ते खूप गाजले. अमेरिकेतील बुद्धीमान आणि कर्तृत्व संपन्न स्त्रियांबद्दल त्यांनी कौतुक केले. पण ते करताना हेही बजावले की, वैवाहिक जीवनात चारित्र्याचा आणि पतिपत्नीच्या नात्यातील निष्ठेचा अभाव हा पाश्चात्य संस्कृतीचा एक महान दोष आहे. वृत्तपत्रीय वादळात ही डेट्रॉईट मध्ये विवेकानंद यांच्या विचारांनी लख्ख प्रकाश पडला होता. तीन आठवड्याचा हा काळ भरगच्च कार्यक्रमांचा झाला.
मिसेस बॅगले यांच्याकडे विवेकानंद राहत होते पण थॉमस विदरेल पामर यांच्या आग्रहाखातर काही दिवस स्वामीजी त्यांच्याकडे राहायला गेले होते. पामर मोठे उद्योगपती आणि अमेरिकेचे सिनेट सदस्य होते.तिथल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी ४० वर्षे प्रयत्न केले होते.कोलंबियन एक्सपोझिशन चे चीफ कमिशनर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी तर डेट्रॉईट मधल्या अनेक लोकांना सतत आमंत्रित करून भोजन समारंभ केले. सर्व क्षेत्रातल्या नामवंतांसहित कोणीही स्वामीजींना जवळून बघितले नाही असा कोणी बाकी राहिला नाही. स्वामीजींच्या एव्हढ्या प्रेमात ते पडले होते.
विवेकानंद यांची व्याख्याने १८९३ च्या नोहेंबर पासून स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो यांच्या झालेल्या कारारा नुसार झाली होती.पण दोन महीने होत नाहीत तो विवेकानंद यांना शंका येऊ लागली. आपली फसवणूक होते आहे हे लक्षात आलं. एका कार्यक्रमाचे उत्पन्न दोन हजार डॉलर्स झाले असताना विवेकानंदांना फक्त दोनशे डॉलर्स देण्यात आले होते. त्यांनी हेल यांचा सल्ला घेतला. पामर यांनाही सांगितले . या करारा बाबत वकिलांचा सल्ला ही घेतला. आणि सरळ स्लेटन यांना रीतसर सांगून ते या करारातून मुक्त झाले. यात पामर यांनी स्वता शिकागोला जाऊन मदत केली. तीन वर्षांचा झालेला करार तीन महिन्यातच संपला होता. अतिशय वाईट अनुभावातून एकच चांगली गोष्ट घडली होती की, तिथल्या थोरा मोठ्यांचा परिचय व भेटी झाल्या होत्या. प्रसिद्धीही भरपूर मिळाली होती.
तिथल्या जाहिरात बाजी आणि धावपळीला ते कंटाळलेच होते. सायक्लॉनिक हिंदू म्हणून त्यांची जाहिरात केली होती. जी स्वामीजींच्या शांत आणि गंभीर व्यक्तिमत्वाला शोभेशी नव्हतीच.ते हेल भगिनींना याविषयी पत्रात म्हणतात , “ मी तुफानी वगैरे काही नाही त्याहीपेक्षा वेगळा आहे. मला जे हवे आहे ते या करारा नुसार कराव्या लागणार्या कामात नाही. हे तुफानी वातावरण मी आता फार काळ सहन करू शकत नाही. स्वता पूर्णत्व प्राप्त करून घेणे आणि काही मोजक्या स्त्री पुरूषांना पूर्णत्वाकडे नेणे हा माझा मार्ग आहे. असीम कर्तृत्वाची माणसे तयार करावीत अशी माझी कल्पना आहे. आलतूफालतू माणसांमध्ये आपली विचार रत्ने विखरून टाकावीत आणि वेळ, शक्ति आणि आयुष्य व्यर्थ घालवणे हा माझा मार्ग नाही”
व्याख्यानच्या द्वारे पैसे मिळवायचे नाहीत असा निर्णय विवेकानंद यांनी घेतला.भारतात जाऊन एखादी शिक्षण संस्था उभी करायची ही योजना पण बाजूला ठेवली. आपण योजना प्रत्यक्षात आणणार नसलो तर मिळालेल्या देणग्या ठेऊन घ्यायचा काय अधिकार ? म्हणून ज्यांनी पैसे दिले होते त्यांना ते परत करू लागले तर त्या लोकांनी ते नाकारले. त्यांना बाकीच्या तपशीलाशी काही देणे घेणे नव्हते. स्वामीजींवरील प्रेम आणि आदरापोटी ते पैसे दिले होते. भारतात आता परत जावे इथला मुक्काम हलवावा असे मनात आले होते पण विवेकानंद यांना आता न्यूयॉर्क चे आमंत्रण आले होते…