सांगलीत जुन्या स्टेशन रोडवरून आमराईकडे जाणाऱ्या रस्त्यावरच LIC ऑफिस लागतं. “जीवन के साथ भी जीवन के बाद भी ” या आशेवर लोकांच्या जीवन विमा पॉलिसीवरचा विश्वास जपणाऱ्या या इमारतीमध्ये दिवसभर लोकांची लाईफ लाईन धावपळ करीत असते.
बऱ्याच वेळा संध्याकाळी सात नंतर सांगलीतून घरी येताना याच LIC ऑफिसच्या गेटच्या बाजूच्या भिंतीवर सिग्नलकडे तोंड करून आरामात बसलेला हा अनामिक कुत्रा दिसायचा. त्याची ऐट मनाला भावून जायची. नकळत त्याची छबी टिपण्याचा मोह आवरायचा नाही.
” बचत भी और सुरक्षा भी – हे ब्रीद उराशी बाळगून ही पॉलिसी घराघरांशी नातं जोडून आहे. स्वतःचं जीवन समृद्ध करणारी माणसं रस्त्यात कुत्रं आडवं आलं की हाड हाड करतात. तोच हा कुत्रा याच माणसांच्या पैशाचं ईमानईतबारे रक्षण करत बसलाय असं याच क्षणी वाटून जायचं.
गेली कित्येक दिवस सायंकाळी हाच एकटा कुत्रा ऐटित, याच जागेवर बसायचा. येता जाता त्याची आणि माझी अशी वारंवार नजर भेट व्हायची….पण काही दिवस झालं तो आता तिथं दिसत नाही. येता जाता मनात हूरहूर वाटत रहायची.
ते ठिकाण आल्यानंतर आजही काही क्षण नजर त्या ठिकाणी जाते. त्याची रिकामी जागा अस्वस्थ करते . त्याचं काय झालं असेल ? त्याचं बरं वाईट तर झालं नसेल ना ?( पुन्हा भीती रस्त्यावर त्याचं बेवारस चिरडण्याची ). झालं असेल बरं वाईट तर माणसासारखा त्याचा वीमा कोणी काढला असेल का ? असे अनेक प्रश्न घेऊन मी त्याच रस्त्यावरच्या गतिरोधकावरून हळू केलेली गाडी रोजच्याच स्पीडनं पुढं दामटवतो.
मनात मात्र तो कुत्रा, LIC ची ती “जीवन के साथ भी जीवन के बाद भी ” ची टॅगलाईन आणि माझाच जीव मुठीत घेऊन मी तुमच्यासारखाच धावत असतो….!
☆ 8 मार्च, जागतिक महिला दिवस… लेखक – श्री राजेश खवले ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून ८ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. ८ मार्च हा जागतिक महिला दिवस कसा ठरला? त्याचा मागोवा घेणे खरोखरच गरजेचे ठरते.
युरोप, अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती झाली. मोठ्या प्रमाणावर कारखाने उभे राहिले. या कारखान्यांमध्ये महिला काम करू लागल्या. काम करणाऱ्या महिलांमध्ये कृष्णवर्णीय महिला, स्थलांतरित महिला यांचेही प्रमाण फार मोठे होते. महिलांना सार्वत्रिक मताधिकार असावा, लिंग, वर्ण , वंश अशा कोणत्याही कारणावरून भेदभाव न करता महिलांना सार्वत्रिक मताधिकार मिळावा याकरिताचा विचार जोर धरू लागला होता. या अनुषंगाने १८९० साली अमेरिकेत स्थापन झालेली द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशनचा उल्लेख करावा लागेल. महिलांना सार्वत्रिक मताधिकार मागणारी ही पहिली चळवळ. तथापि, ही चळवळ काहीशी वर्णद्वेषी होती. हिला फक्त गो-या महिलांना सार्वत्रिक मताधिकार अपेक्षित होता. दक्षिणेतील कृष्णवर्णीय महिला आणि उत्तर पूर्वेतील स्थलांतरित नागरिक यांना सार्वत्रिक मताधिकार मिळवून देण्याच्या विरुद्ध ही संघटना होती. त्यामुळे या संघटनेच्या कामाला कृष्णवर्णीय कामगार महिला आणि स्थलांतरित महिलांनी विरोध केला. १९०० च्या सुमारास अमेरिकेमध्ये सार्वत्रिक मताधिकाराची चळवळ जोर धरू लागली. या चळवळीवर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव होता. याच चळवळीच्या माध्यमातून १९०७ साली स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद पार पडली. स्टुटगार्ट हे जर्मनीमधील एक महत्त्वाचे शहर. जर्मनीच्या बेडन उटंबर्ग या राज्याची राजधानी आहे. मर्सिडिज-बेंझ चे मुख्यालय येथेच आहे. विल्हेमा हे युरोपातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि युरोपातील सर्वात मोठ्या बॉटनिकल गार्डनसाठी स्टुटगार्ड प्रसिद्ध आहे. स्टुटगार्ड येथील त्या परिषदेमध्ये क्लारा झेटकिन या कार्यकर्तीने सार्वत्रिक ‘मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे’ अशी घोषणा दिली. (क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट विचारसरणीच्या जर्मन विचारवंत आणि कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म १८५७सालचा.या वेळी त्यांचे वय जवळजवळ सुमारे ५० वर्ष होते. अनुभवाची भक्कम अशी शिदोरी त्यांच्या गाठीशी होती.आज जर्मनीच्या प्रत्येक शहरात क्लारा झेटकिन यांच्या नावाने एक तरी रस्ता सापडतोच.)
त्याकाळी महिलांच्या कामाचे तास निश्चित नव्हते. कामाच्या जागी महिलांना सुरक्षितता नव्हती. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, पाळणाघराची सोय या सुविधा तर सोडाच, कामाच्या जागी महिलांना चक्क भेदभावाची वागणूक मिळत असे. समान कामाकरिता समान वेतन हे तत्त्व देखील नव्हते. महिलांना समान हक्क मिळावे यासाठीची चळवळ अधिकच गतिमान होत गेली. त्यातूनच महिलांची निदर्शने होऊ लागली.
आठ मार्च १९१८रोजी न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योग उद्योगात काम करणाऱ्या महिलांनी रूटगर्स चौकात हजारोच्या संख्येने निदर्शने केली. दहा तासांचा कामाचा दिवस असावा. कामाच्या जागी सुरक्षितता असावी आणि सर्व प्रौढ महिलांना कोणताही भेदभाव न करता सार्वत्रिक मताधिकार मिळावा या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. महिला हक्क आणि महिलांना सार्वत्रिक मताधिकार मिळावा म्हणून अशी चळवळ अधिक गतिमान होत गेली. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला.
१९१० साली कोपनहेगन येथे दुसरी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आहे. रूटगर्स चौकात १९०८ साली महिलांनी हजारोच्या संख्येने केलेल्या निदर्शनांच्या स्मृतीला या परिषदेत उजाळा देण्यात आला. रूटगर्स चौकात महिलांनी केलेल्या निदर्शनाची स्मृती म्हणून ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला. हा ठराव पारित झाला आणि तेव्हापासून ८ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. यानंतर युरोप अमेरिकेत सार्वत्रिक मताधिकाराच्या चळवळींना जोर चढला. १९१८ साली इंग्लंडमध्ये आणि १९१९ साली अमेरिकेमध्ये महिलांना सार्वत्रिक मताधिकार मिळाला.
भारताचा विचार करता भारतामध्ये मद्रास प्रांतात १९२१ साली स्त्री-पुरुषांना सार्वत्रिक मताधिकार मिळाला. परंतू त्याकरिता संपत्तीची अट होती. खऱ्या अर्थाने २६जानेवारी १९५०रोजी भारतीय संविधान लागू झाल्यानंतर भारतातील सर्व महिलांना सार्वत्रिक मताधिकार प्राप्त झाला.
महिलांच्या संघर्षाला सलाम !!! जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!
लेखक – श्री राजेश खवले
संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
☆ विचार–पुष्प – भाग 61 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान – लेखांक दोन ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरातील कालीमातेचं/जगन्मातेचं दर्शन घेऊन परिव्राजक म्हणून प्रवास सुरू केला तो आता कन्याकुमारी मंदिरात दर्शनाने संपणार होता.
उत्तरेकडील बर्फाच्छादित हिमालयापासून सुरू झालेली स्वामीजींची प्रदीर्घ यात्रा आता भारताच्या दक्षिण टोकास संपली होती. तामिळनाडू मध्ये जिथे अरबी समुद्र, हिंद महासागर, आणि बंगालची खाडी यांचा संगम होतो तिथे माता कन्याकुमारीचे प्राचीन मंदिर आहे. तिचे पौराणिक संदर्भ पण आहेत.
या मंदिरात स्वामीजी गेले आणि साष्टांग नमस्कार करून, कन्यारूपातील जगन्मातेचं दर्शन घेऊन बाहेर आले. तशी समोर लांबवर नजर गेली, दीड फर्लांग अंतरावर दोन प्रचंड शिलाखंड दिसले.यावरच माता कन्याकुमारीने /पार्वतीने स्वत: इथे तपस्या केली होती. या शिला खंडावर तिचे पदचिन्ह आज ही आहेत म्हणून त्याला ‘श्रीपाद शिला’ म्हणून ओळखले जाते. मनशांती साठी व चिंतनासाठी आपल्याच भूमीवरच्या या शिलाखंडावर जायची त्यांना मनोमन इच्छा झाली. तिथे गेलो तर खर्या अर्थाने मातृभूमीचे दक्षिण टोक आपण गाठले असा अर्थ होईल. म्हणून कसही करून त्या खडकांवर आपण जावं असं वाटून, ते किनार्यावर आले. समोर उंच उंच फेसाळत्या लाटा होत्या.त्याची जराही भीती वाटली नाही कारण, मनात तर याहीपेक्षा मोठे वादळ उठलेले होते. समोरच होड्या होत्या. काही कोळी पण उभे होते. स्वामीजींनी त्यांची चौकशी केली. त्या नावेतून खडकापर्यंत पोहोचविण्यास नावाडी तयार होते, फक्त पैसे द्यावे लागणार होते. नावाड्यांनी त्याचे ३ पैसे सांगितले. स्वामीजी तर निष्कांचन होते.तीन काय, एक पैसा सुद्धा त्यांच्या जवळ नव्हता. पण साहस तर होतं. झालं,क्षणाचाही विलंब न करता, त्यांनी त्या उंच लाटांमध्ये उडी घेतली आणि पोहत पोहत जाऊन ते खडक गाठले. समुद्राला रोजचे सरावलेले असतांनाही नावाडी हे बघून स्तब्धच झाले. लाटा उसळणार्या तर होत्याच पण तिथे शार्क माशांपासून पण धोका होता हे त्यांना माहिती होतं. हे पाहून दोन तीन नावाडी स्वामीजींच्या पाठोपाठ गेले. ते सुखरूप पोहोचले हे बघून, त्यांना काही हवे का विचारले. आम्ही आणून देऊ असे सांगीतल्यावर थोडे दूध आणि काही शहाळी पुरेशी आहेत असे स्वामीजींनी सांगितले.
राष्ट्र चिंतन पर्व – २५, २६ २७ डिसेंबर
स्वामी विवेकानंदांनी या आधी आध्यात्मिक साधना म्हणून अनेक वेळा एकांतात ,अरण्यात वगैरे ध्यान केलं होतं. पण आता चे ध्यानचे रूपच वेगळे होते. अरण्य नाही,झाडं झुडुपं नाही, गुहा नाही ,उघड्या खाडकावर आकाशाचे चं छत आणि आजूबाजूला प्रचंड आणि चोवीस तास खळाळणार्या समुद्राच्या लाटा,दिवसा सूर्यची प्रखर किरणे, जोरात येणार्या वार्याचे झोत असा पारंपरिक ध्यान धारणेचा वेगळाच एकांतवास तिथे होता.२५ डिसेंबर १८९२ रोजी स्वामी ध्यानास बसले. स्वामीजींनी या शिलाखंडावर तीन दिवस, तीन रात्र अखंड ध्यान केलं. लाटांच्या अखंड गंभीर नादाबरोबर स्वामीजींचे गाढ चिंतन सुरू झाले. कलकत्त्यातून बाहेर पडल्यापासुनचे सर्व दिवस, त्यात आलेले अनुभव, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. जगन्मातेचं ध्यान आणि भारत मातेचं चिंतन तीन दिवसात झालं. चौथ्या दिवशी सकाळी तरुण नावाड्यांनी जाऊन होडीतून त्यांना पुन्हा किनार्यावर आणलं. जे शोधायला स्वामीजी आले होते ते त्यांना इथे मिळालं. भारताचा गौरवशाली इतिहास, भयानक वर्तमानकाळ आणि आणि आधी पेक्षाही अधिक स्वर्णिम भविष्यकाळ याचा चित्रपटच जणू त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला.सिंहावलोकन करण्याचा तो क्षण होता. भारताच्या श्रेष्ठ संस्कृतीतले वास्तव तसाच त्यातलं सुप्त सामर्थ्य त्यांना या क्षणी जाणवलं होतं. त्याच्या मर्यादा ही त्यांना जाणवल्या होत्या.
प्राचीन इतिहास असलेला हा विशाल देश, इतिहासाचे केव्हढे चढउतार, सार्या जगाला हेवा वाटेल असे प्राचीन काळातील द्रष्ट्या ऋषीमुनींनी दिलेले आध्यात्मिक धन. पण तरीही आज भारत कसा आहे? त्याची अस्मिताच हरवलेली दिसत आहे. सगळ्या मानव जातीने स्वीकारावीत अशी शाश्वत मूल्यं पूर्वजांकडून लाभली आहेत तरीही त्यातल्या तत्वांचा त्याला विसर पडला आहे. अभिमान वाटावा असा भूतकाळाचा वारसा आहे पण वर्तमानात मात्र घोर दुर्दशा आहे. यातून समाजाचं तेज पुनः कसं प्रकाशात आणता येईल? अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायची होती. उपाय शोधायचे होते. एखाद्या शिल्पकाराने उत्तम मूर्ती घडविताना त्याचा सर्वांगीण विचार करावा तसा स्वामीजी भारताचा विचार यावेळी करत होते.
☆ काही टाकायचे आहे पण टाकणार नाही… –– सुश्री योगिनी पाळंदे ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆
मधुचंद्रहून ठाण्याला घरी आल्यावरची पहिली रात्र ….. नाही नाही….ती..वाली रात्र नव्हे….
त्या रात्रीचा पहिला स्वैपाक……
शेजारच्या शेगडीवर कुकर फुसफुसत होता.
(कोकणस्थ) गोड-आमटी करायची गोड जबाबदारी माझ्यावर होती
मी गॅस लावायला काडेपेटी हातात घेतली मात्र….. माझ्या पाठीवर एक स्पर्श झाला …
मी लाजून चूर..मनाने कायशिशी मोहरून गेले… अजूनही आमचा माफक रोमान्स चालू होता ना.
माझे गाल लाल व्हायला लागले…. सॉरी…मी गोरी नाही..सबब..माझे गाल चॉकलेटी व्हायला लागले !!
तिरपा कटाक्ष टाकून मागे बघते तो साक्षात सासुमा… “ शेजारी गॅस चालू आहे ना,मग नवीन काडी कशाला पेटवली??”
त्या काडीने माझ्या रोमान्सची झिंग क्षणात काडीमोल होऊन मी भानावर आले.
सासूमानी मला दुसरी काडेपेटी दाखवली, ज्यात जळलेल्या काड्या होत्या.. एक शेगडी पेटलेली असेल तर नवीन काडी लावायची नाही.. जळलेल्या जुन्या काडीनेच पेटलेल्या शेगडीवरून विस्तव उचलायचा.
आता कुकरचा अतीप्रशस्त-ओबेस देह शेगडीवर तापलेला असताना, त्याखालून जुन्याकाडीने विस्तव कसा पळवावा? …. मग सांडशीच्या तोंडात जुनी काडी.. आणि तो पलीता कुकरच्या कुल्ल्याखाली.. अशी कसरत झाली. अखेर आमटीखाली गॅस लागला.
तोपर्यंत मी गॅसवर होते, कारण कर-कटेवरी घेऊन सासुमा माझ्या प्रत्येक कृतीकडे डोळे बारीक करून बघत होत्या.
दुसऱ्या दिवशी फुरसतीत सासुमांनी मला उभेउभे तुकडे केलेली जुनी पिवळी-पोस्टकार्ड दाखवली.
त्या लांबलांब-तुकड्यांनी ह्या शेगडीवरून त्या शेगडीवरचा अग्नी प्रज्वलित करायला सोप्पा कसा पडतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं…” हे बघ प्रत्येकवेळी नवीन काडी लावायची नाही. आम्ही काडी-काडी जोडून वाचवलेलं आहे, तेव्हा कुठे हे आजचे दिवस दिसतायत.”…. आज मनात येतं, नवीन पिढीची सून असती तर त्या एका न पेटवलेल्या काडीने तिने एव्हाना काडीमोडसुद्धा घेतला असता.
सासूमांची काडी-काडी कॉन्सेप्ट स्वैपाकघरातच नव्हे तर घरभर वावरत असे. प्रत्येक वस्तू वापरताना आणि जुनी होऊन टाकताना त्यांची परमिशन लागे. अगदी अंतर्वस्त्रसुद्धा त्यातून सुटली नव्हती !!
चिंधीवालीकडे अंतर्वस्त्र विकली जातात हा ज्ञानसाक्षात्कार मला त्यांनीच घडवला. जुने परकर,ब्लाऊझ,साड्या वगैरे मंडळींची रवानगी, कपाटातून स्वैपाकघरात होत असे.
घासलेली भांडी पुसून जागच्या जागी ठेवायला, हात पुसायला आणि स्वैपाकघरातला कार्यभाग संपला की त्यांचे deputation पाय पुसणे म्हणून होत असे.
आंघोळीच्या गरम पाण्यात रवी व ताकाचं भांडं धुणे. दुधाच्या पिशव्या धुवून वाळवून विकणे. दुधाच्या कोरड्या पिशव्यांनी तर आमच्या घरात इतिहास घडवला होता…..त्या पिशवीने काय काय पाहिलं नव्हतं?
त्यात सासुमाच्या प्रभातफेरीतील पुष्पचौर्य-कथा लपलेल्या असत. जास्वंदीच्या टप्पोऱ्या कळीचा उमलण्यापूर्वीचा कळीदार प्रवास त्या पिशवीतून होत असे… त्यातच देवळातल्या मैत्रिणींना वाटण्यासाठी तिळगुळ असत… दशभुजा गणपतीच्या देवळातून संकष्टीच्या प्रसादाचे मोदक त्या दूधपिशवीच्या पालखीतूनच घरी येत. हनुमानजयंतीचा सुंठवडा त्यातूनच येई आणि….. रामा-शिवा-गोविंदा ह्या मानकऱ्यांचे प्रसादसुद्धा कधी चैत्र तर कधी श्रावण महिना साधून, त्या पिशवीतून आमच्या घरी येत.
त्यात कधी सुट्टी नाणी विराजमान होत, तर एखादी फाटलेली पण खपवायची असलेली दहा रुपयांची नोटही असे…. कहर म्हणजे एकदा तर बँकेच्या लॉकरमधले किडुक-मिडुक सासुमांनी त्या पिशवीतून घरी आणल्यावर मात्र मी त्यांना कोपऱ्यापासून हात जोडले होते.
जी गत दुधाच्या पिशवीची तीच इतर वस्तूंची. आणि केवळ सासुमाच नव्हे तर तिच्या पिढीने हाच पुनर्वापरमंत्र जपला. दिवाळीच्या वेळी वापरलेल्या मातीच्या पणत्या स्वच्छ पुसून माळ्यावरती चढत. तीच कथा कंदील किंवा चांदणीची असे. इस्त्रीची एकदा वापरलेली साडी त्याच घडीवर घडी पाडून कपाटात जायची आणि अर्थातच पुन्हा नेसली जायची… अश्या कित्येक गोष्टी !!
चहाच्या कानतुटक्या-अँटिक-कपमध्ये वाटलेली हिरवी चटणी ठेवणे, क्वचित तो कप विरजणासाठी वापरणे, त्याच क्रोकरी सेटच्या (?) विजोड झालेल्या बश्या झाकण म्हणून वापरणे… तुटक्या प्लास्टिक बादल्यामध्ये झाडे लावणे… रिकाम्या डालडा-डब्यात तुळस लावण्याचे सत्कार्य ज्या कुणी सर्वप्रथम केले असेल त्याला काटकसर आणि पर्यावरणप्रेमाचे एकत्र नोबेल का बरं देऊ नये?
पूर्ण वापर झाल्याशिवाय फेकणे ह्या गुन्ह्याला त्या सर्वांच्याच राज्यात क्षमा नव्हती. फ्रीजमधे हौसेने आणून ठेवलेल्या आणि न वापरून एक्सपायरी डेटलेल्या सरबताच्या, व्हिनेगरच्या बाटल्या टाकायला काढल्या की सासुमांचा तिळपापड होत असे… “वापरायची नव्हती तर आणली कशाला इतकी महागातली बाटली?आम्ही नाही बाई अश्या वस्तू कधी टाकल्या.” एक्सपायरी डेट नसलेले अमर आयुर्वेदिक काढे त्यांना भारी प्रिय.
वस्तूंचा पुनर्वापर हा शब्द कधीही न ऐकता सासूमांनी त्या कल्पनेची अम्मल बजावणी कितीतरी वर्षे आधीच केलेली होती. साधे इस्त्रीचे कपडे घरी आले तरी त्या कागदाचा बोळा न होता तो रद्दीच्या गठ्ठ्यात जाई आणि त्याला बांधलेला पांढरा दोरा गुंडाळून एका विशिष्ठ ठिकाणी ठेवलेला असे. भेटवस्तुचे चकचकीत रंगीत कागद निगुतीने घडी करून ठेवलेले असत… त्यांच्या पिढीने अश्या अनेक प्रकारे कचरासंवर्धन केले.
लाकूड,प्लास्टिक,काच आणि कपड्यांचेच नव्हे, तर तव्यावरच्या उष्णतेचेसुद्धा रीसायकलिंग केले !!!
पोळ्या झाल्यावर त्या तापलेल्या तव्यावरच फोडणी करणे. फोडणीचे काम नसेल तर क्वचित त्या तव्याचा शेक दुधाच्या पातेल्याला देणे. वरणभात शिजल्यावर कुकर गरम असतानाचे तळातले पाणी फोडणीची-वाटी, किंवा दह्याची-वाटी वगैरे ओशट भांडी धुवायला वापरणे हे सर्वमान्य होते.
भांड्याच्या बिळात लपलेले तूप गरम कुकरात ठेवून पातळ करून ते पोळीला लावणे आणि शेवटी ते भांडं घासायला टाकण्यापूर्वी त्यातून हात फिरवून तो ओशटपणा हाता किंवा पायाला चोळणे हे करणारी सासुमांची पिढी आता राहिली नाही.
” काय ती जुनी बोचकी सांभाळून ठेवता तुम्ही? सगळं फेकून द्या ” हे वाक्य त्या पिढीला आमच्या पिढीकडून अनेकदा ऐकायला लागलं असेल. आणि त्या मंडळींनीही नव्या संसारात आमच्या वस्तूंची अडगळ नको म्हणून गपचुप ऐकलेही असेल…. आम्हीही शोर्य दाखवून अशी अनेक प्लास्टिकची, कपड्यांची,भांड्यांची, काचेची, कागदाची बोचकी बेमुर्वतखोरपणाने फेकली आहेत.
जुन्या वस्तू फेकून देऊन नव्या आणणे ह्याला मुळीच डोकं नाही लागत, लागते ती फक्त मस्ती आणि बेफिकिरी…. पण वस्तू ,तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत वापरायला बुध्दी आणि मन ह्या पलीकडेही जाऊन एक पर्यावरण प्रेम लागतं, ज्याचा उल्लेख त्या पिढीने कधी केला नसेल, पण त्या विचाराचं आचरण मात्र आवर्जून केलं. ती पिढी जगलीही तशीच आणि गेलीही तशीच …. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा पूर्ण वापर करून ते जीर्ण शिर्ण झाल्याशिवाय त्या पिढीतल्या कुणी मरणही पाहिले नाही. सासुमासुद्धा अठ्याईंशी वर्षे परिपूर्ण जगून मग गेल्या.
आज निसर्गाचा, सृष्टीचा पोएटिक जस्टिस लावायला बसलं तर आमच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढीला निसर्ग पूर्ण जगून नाही देणार. आम्ही न वापरता फेकलेल्या,आणि अकाली टाकलेल्या वस्तूंसारखाच आमच्याही शरीराचा आणि आयुष्याचाही अकाली शेवट होईल आणि आम्हीच ह्या पृथ्वीतलावर तयार केलेल्या, टाकलेल्या वस्तूंच्या कचऱ्यात विलीन होईल असं वाटत राहतं.
लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे
संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ रंग बरसे, रस छलके… ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆
पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले, तरी भैरवी कमी अधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं, की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य होतात !
पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे, तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे, आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे.
डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा !
गूळ म्हणजे यमन!
यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व !
इथं तीव्र मध्यम श्रुती मनोहरच लागायला हव्यात; म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा (अन्यथा बट्ट्याबोळ!).
हां, आता ज्यांना जमत व गमत नाही (‘प्रभू अजि गमला’ या अर्थाने), ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात; म्हणजेच गुळात साखरही मिसळतात.
जायफळाची एखादी ठुमरी झाली, की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. ‘ग नी सा’ ही संगती देसची ओळख (सिग्नेचर); तसंच, “रटरट” आवाजाबरोबर “घमघमाट” येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघवते असावेत, पण चंचल नकोत.
नंतर होरीप्रमाणे पुरणाचं वाटण करायचं. म्हणजेच लवकर आटपायचं ….
आता महत्वाचा ‘टप्पा’ ! पोळ्या करणे ! बिहागचा टप्पा साधायला कुण्या दिग्गज हाद्दूखान – हास्सूखान अशांचीच तालीम हवी. आणि सगळेच मालिनीताई होत नाहीत, हे ही विनयशीलतेने मान्य करायला हवं. रागाला शरण जावं तशी निगर्वी शरणागती झाली तर हळूहळू जमेल. पण तपश्चर्या हवी.
आता अशा कमालीच्या रंगरस-संपन्न मैफलीत तराणा यावा, तशी तुपाची धार!
तराणा मूळ आलाप-जोड यापासून वेगळा काढता येऊ नये, अगदी तस्संच तुपानं पोळीशी अद्वैत करून असावं.
मग .. ‘जो भजे हरिको सदा’, ‘चिन्मया सकल हृदया”, “माई सावरे रंग राची” अशा विविध रूपांनी सर्वगुणसंपन्न भैरवीचं रसग्रहण करावं, त्याप्रमाणे एकेक घास जिभेवर ठेवून असीम आनंद घ्यावा.
आणि मग “हेचि दान देगा देवा” अश्या थाटात ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणावं.
भैरवीचे सूर मनात दीर्घ काळ रेंगाळावेत, तशी पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळावी. दिवस सार्थकी लागावा …… आयुष्य सार्थकी लागावं !!!
होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
आपल्या रोजच्या जीवनात अनेक व्यवहारिक गोष्टींना सामोरे जावे लागते. तो व्यवहार बघतांना कधी आपला आर्थिक संबंध येतो तर कधीकधी परिचयातून व्यवहारात भावनिकता पण येते. कधी आपण ग्राहक असतो तर कधी विक्रेता. अर्थातच प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या व्यवहारात ग्राहकाची भुमिका निभावतेच.
आपल्याला आपल्या मुलभूत हक्काच्या गोष्टी आपसूकच मिळाल्या तर आपण नशीबवान ह्या सदरात मोडतो असं समजावं परंतु जर आपल्याला आपल्या हक्काच्या मुलभूत, जीवनावश्यक, अर्थातच नियमांना धरून जर पुरवठा झाला नाही तर प्रत्येकाने त्यासाठी लढायची,आपले हक्क मिळवायची तयारी ही ठेवलीच पाहिजे. कारण अन्याय करणाऱ्या इतकाच तो सहन करणाराही दोषी असतो हे विसरून चालणार नाही.
त्यामुळे आपल्याला आपल्याच हक्काच्या गोष्टी मिळतांना वा गरजेनुसार गोष्टी विकत घेतांना आपली कुठे फसगत तर होत नाही नां ह्याकडे अत्यंत डोळसपणे,जागरुकतेने प्रत्येकाने बघण्याचीच खरी गरज आहे म्हणून “जागो ग्राहक जागो” ह्या घोषवाक्याची आज 15 मार्च ह्या आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवशी हटकून आठवण ही येतेच.
15 मार्च हा दिवस “आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन”म्हणून ओळखल्या जातो.15 मार्च 1962 साली अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी ह्यांनी ग्राहकांसाठीच्या हक्कांची सनद त्यांच्या भाषणात मांडली.ते हक्क पुढीलप्रमाणे आहेत.
1 सुरक्षेचा हक्क,2 माहिती मिळविण्याचा हक्क,3 निवड करण्याचा हक्क,4 मत मांडण्याचा हक्क,5 तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क,6 ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क.
दुर्दैवाने आपल्याकडील ग्राहकच अनभिज्ञ राहून ह्या विषयाची माहिती करून घेण्याच्या बाबतीत उदासीन असतो.कितीही जाहीरातीत “जागो ग्राहक जागो”हे घसा फोडून सांगितल्या गेले तरी शेवटी “पालथ्या घड्यावर पाणी”असो.
अनेकदा खरेदी करतांना किंवा सेवेच्या बाबतीत त्याचा वापर करतांना ग्राहकांचे अनेक गोष्टींकडे असलेले दुर्लक्ष, माहितीचा अभाव हे विक्रेत्यांच्या पथ्थ्यावर पडते.ग्राहक ह्या नात्यानं मिळालेल्या अधिकारांचा वापर आपण अतिशय जागरूकतेनं केला तर हे अधिकारच आपल्याला जागरूक ग्राहक म्हणून तयार करतील. सरकार कडूनही ग्राहकांच्या जनजागृती साठी वेळोवेळी आवश्यक ती माहिती पुरविली जाते.उदा.फसवणूक झाली तर तक्रार कोठे करावी, फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीला आपण धडा कसा शिकवू शकतो,त्यानंतर नुकसानभरपाई कशी मिळवू शकतो ह्याची माहिती ग्राहक सेवेअंतर्गत आपल्याला मिळते.ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, वस्तुचे गुणवत्ता प्रमाण आणि दर्जा तपासून घेण्याचा अधिकार आहे.ग्याहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच,ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करते.
ग्राहक आणि विक्रेते ह्यांच नातं खरतरं पोळपाट आणि लाटण्यासारखं असतं.दोन्हीही व्यवस्थित असल्यासच पोळी नीट लाटली जाणार बघा.
आमच्या बँकींग सेक्टर मध्ये तर “ग्राहक देवो भवः “हे वाक्य जणू आमचे ब्रीदवाक्य समजल्या जातं.सध्या तर बँकींग सेक्टर मधील वाढत्या स्पर्धेमुळे आणि कोरोनाने आलेल्या आर्थिक गंडांतरामुळे आम्हाला एक एक ग्राहक जोडून ठेवावा लागतो.सध्याच्या बँकींग सेक्टर वरील विश्वास नाहीसा होण्याच्या काळात आपल्या ग्राहकांचा विश्वास ढळू न देण्याचं आव्हानात्मक काम आम्हाला जिकरीनं करावं लागतं.
तर अशा ह्या ” जागतिक ग्राहक दिनी” ग्राहकांच्या हक्कांची,सुरक्षेची,अधिकारांची पायमल्ली कधीच होऊ नये हीच मनोकामना.
☆ रामदासांची पत्नी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
समर्थ रामदासांना आठवताना त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणं ही क्रमप्राप्त ठरते, ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी ! होय मी समर्थांनी ज्या मुलीला लग्नमंडपात अर्धवट सोडलं होतं त्या मुलीला , त्यांची पत्नीच म्हणेन मी . आज तिला आठवणं हे संयुक्तिक ठरेल, कारण त्या स्त्रीने समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवटपर्यंत जागृत ठेवली. त्या मुलीची बरीच लोक कीव करतात. काही लोक तर समर्थांना हे शोभलं नाही असाही समर्थांना उपदेश करतात. आपल्या भारतीय लोकांना स्वत: पेक्षा इतरांच्या घरात काय चाललंय याचीच जास्त चिंता असते. एकाने आचार्य अत्रेंना हाच प्रश्न विचारला होता, “त्या मुलीचं पुढे काय झालं हो समर्थांनी लग्नमंडपात सोडलेल्या ?” – तेव्हा आचार्य अत्रेंनी मार्मिकपणे उत्तर दिलं, ” मला माहीत नाही, कारण मी त्यावेळी त्या लग्नाला हजर नव्हताे.” पण पुढे जाऊन त्या मुलीचं काय झालं याचा शोध घेणे हे खूपच कमी लोक करतात. इतिहासाने काही व्यक्तींवर खूप अन्याय केला आहे, त्यातीलच रामदासस्वामींच्या पत्नी या एक होत. आज त्यांना आठवणं त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते.
रामदासस्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील मुलीला म्हणाले,” बाळ घरी चल.” तर ती मुलगी बाणेदारपणे म्हणाली,” बाबा तुम्ही कन्यादान केले आहे, आता मी त्या घरात येणार नाही.” गंगाधरपंत, समर्थांचे वडीलबंधू, मुलीला म्हणाले,” मुली तू आपल्या घरी चल, मुलीप्रमाणे तुला सांभाळेन.” त्या वेळी ती मुलगी म्हणाली, ” दादा पाणिग्रहण झालेले नाही, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.”
मग त्या मुलीने काय केले? ती चालत राहिली. गावे मागे पडली, नगरं मागे पडली, आणि तिला एक जंगल लागले. तिथे तिला झुडूपात एक मंदिर दिसलं. त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला. तिने आजूबाजूची झुडपं साफ केली. एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ती तिथेच राहू लागली. त्या अंगणात मुले खेळायला येत, त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरूवात केली. त्यांना तलवारबाजीचे, भालाफेकीचे, दांडपट्ट्याचे शिक्षण दिले आणि ती फौजच्या फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे पाठवू लागली… सैन्यात भरती होण्यासाठी. आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीलाही प्रश्न पडला की आपलीही फौज इतकी निष्णात नाही, या लायकीची नाही…. कोण पाठवतंय ही फौज? त्याने ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानी घातली आणि शिवाजी महाराजांना चिंता वाटली. त्यांना वाटलं गनीम तर करत नसावा असं काही? आपल्या फौजेची गुपिते हस्तगत करण्यासाठी! त्यांनी आपल्या हेरखात्याला शोध घ्यायला सांगितलं.
हेरखात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करते आहे. शिवाजी महाराज मग वेष पालटून त्या माऊलीस भेटायला गेले. त्या माऊलीने शिवाजी महाराजांना सतरंजी दिली बसायला , गुळपाणी दिलं. तेव्हा तशी रीत होती.आजकालसारखे लोक कुणी आलं की तोंड वेडेवाकडे करत नसत. शिवाजी महाराजांनी मुद्दामच तिची परीक्षा घ्यायला, शिवाजी महाराजांना नावं ठेवण्यास सुरुवात केली… “काय तुमचा तो राजा ! का करता त्याच्यासाठी हे सगळं? ” असं खूप भलतेसलते शिवाजी महाराज बोलू लागले स्वत :विरुद्धच ! ते ऐकलं मात्र आणि त्या माऊलीने एकदम तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर टेकवली ,”खबरदार” ती गरजली, ” शिवाजी महाराज आमचे राजे आहेत, त्यांच्याबद्दल काही भलतंसलतं बोललात तर.” शिवाजी महाराजांनी ओळखलं ,काय पाणी आहे ते !आणि ते निघून गेले. दुसर्या दिवशी शिवाजी महाराज पूर्ण इतमामात त्या स्त्रीला भेटायला आले आणि आपला जिरेटोप काढून त्यांनी त्या माऊलीच्या पायावर ठेवला…. म्हणजे काय माहितीय का? तुम्ही गादीवर बसा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो असेच जणू शिवरायांना सांगायचं होतं . पण त्या माऊलीने तो जिरेटोप परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली,” हा तुम्हालाच शोभतो.”
समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त पाचच मिनिटं झालं. तिला खबर लागली की समर्थ कृष्णेच्या काठी येताहेत. ती बघायला गेली त्यांना. समर्थ कृष्णा नदीच्या एका काठावरून चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशी दुसर्या काठावरून चालत गेली. एवढ्या लांबून फक्त पाच मिनिटं तिने समर्थांचा चेहरा बघितला. काय पातिव्रत्य होतं तिचं ! म्हणतो ना इतिहासाने काही लोकांवर खूप अन्याय केले.. त्यातीलच ही एक !
आजकालच्या युगात जेव्हा मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या जोडीदाराबद्दल, मुंबईला तर चाळीत राहणार्या मुलांची लग्नच होत नाहीत कारण मुलींना फ्लॅट हवा असतो. कशाला फ्लॅट हवा असतो कुणास ठावूक? जीवनात फ्लॅट व्हायला ? मुंबई कोर्टात रोज शंभर विवाह रजिस्टर होतात, पण त्याच वेळी पन्नास अर्जही घटस्फोटासाठी आलेले असतात. म्हणजे कुटुंबव्यवस्था आपल्याकडेही पन्नास टक्के तुटत आहे. अशावेळी असे आदर्श समाजात प्रस्तुत करणे उचित ठरेल. रशिया तुटला, झेकोस्लोवाकिया तुटला. इतरही खूप देशांचे तुकडे झाले. पण भारताला तोडणं शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे. कारण इथली कुटुंबव्यवस्था ! इथला शेजारपाजार !! माणसामाणसात असलेले संबंध. बघा एखाद्या शेजार्याची बायको गावी गेली असेल तर त्याचा शेजारी त्याचं सगळं बघतो ,त्याला जेवण देतो ,सगळं काही पुरवतो. हे अजूनही आपल्याकडे अस्तित्वात आहे म्हणून भारताला तोडणे शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे. हल्ली स्त्रीमुक्तीच्या वादळात जेव्हा अनेक घरे वाहून चालली आहेत तेव्हा असे आदर्श प्रस्तुत करणे हे उचितच ठरेल. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात त्याप्रमाणे, त्या काळात स्त्रीमुक्तीवादी संस्था नव्हत्या हे एका अर्थी बरं आहे . नाहीतर त्या…. त्या उर्मिलाला भेटल्या असत्या आणि नक्की सांगितलं असतं,’ घटस्फोट घे.’ लक्ष्मण आणि ऊर्मिलेचा चौदा वर्षांचा वियोग आहे .चेहरासुद्धा पाहिला नाही चौदा वर्षात ! म्हणून त्यांनी नक्की सांगितलं असतं,” तुला त्यांनी टाकली चौदा वर्ष, घटस्फोट घे .” पातिव्रत्य ज्यांना कळत नाही, आदर्श जीवनमूल्यं काय आहेत हे ज्यांना कळत नाहीत ते असं काहीतरी बोलत असतात. पण असं झालं नाही . म्हणून तर रामायण, महाभारत अजूनही सगळीकडे वाचली जातात. तोच आदर्श आपल्याला रामदासस्वामींच्या पत्नीतही दिसतो. त्यामुळे आज रामदास स्वामींना आठवताना त्या माऊलीला आठवणं ही उचित ठरेल.
संग्राहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले . कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतपटू.’
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कधी काळी सुवर्णभुमी म्हणून प्रख्यात असणारा आपला भारत देश जगाला संस्कारांचे , संस्कृतीचे, मानवतेचे विश्वबंधुत्वाचे , आदर्श राजकारणाचे, मार्गदर्शन करण्यात आघाडीवर होता. आपली भरतीय संकृती अति पुरातन आहे. रोम, ग्रीक, संस्कृतीपेक्षाही श्रेष्ठ तर आहे . हे जगन्मान्य आहे. आपल्या पुरातन वैभवशाली मात्रृभुमीने भारतीय स्त्रियांच्या अतिउच्च संस्कारांचे महान आदर्श संपूर्ण जगाला दिले आहेत . जगाने ते वंदनीय व सर्वश्रेष्ठ असल्याचे मान्य केले आहे. त्याना अनुकरणीय मानले आहे . आपल्या देशाने पारतंत्र्य ही अनुभवले आणि त्यातून प्राणपणाने लढून स्वातंत्र्यही मिळवले . या लढ्यात अनेक विरांगणानी परमोच्या त्यागाचे , औदार्याचे ,स्वसंरक्षणाचे वस्तूपाठ समाजाला दिले आहेत. आजच्या काळातही ते आदर्श असून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. भारतीय मातांनी अनेक तेजःपुंज आपत्याना जन्मदेउन त्यांना उत्तम प्रकारे घडवून त्याच्याकडून सामाजिक , सांस्कृतिक, धार्मीक,क्रांती घडवून आणली आहे. आज तगायत ती तशीच घडतेय . मातृसत्ताक, किंवा पितृसत्ताक पध्दतीत स्रियांची कुटुंबावरची पकड कधीच कमी झालेली नाही . म्हणूनच “जिच्या हाती पळण्याची दोरी ती जगा उद्धारी” असे म्हटले जाते.
पुरातन, ऐतिहासिक, आणि वर्तमान काळातही स्त्री शक्तीची धगधगती मशाल सातत्याने तेवतरहून समाजहिताचे समर्थपणे संरक्षण करत आहे.
पाश्यात्य संस्कारांच्या आणि संस्कृतीच्या मोहजालाच्या आहारी जावून काही नवी स्थित्यंतरे घडत आहेत. ती सारीच तकलादू व असमर्थनीय आहेत असे नाही. पण आपले आदर्श बाजूला ठेवून त्यांचेच अनुकरण करावे इतकी ती प्रतिष्ठीत आहेत असेही नाही. आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धी ने त्यातील श्रेष्ठ कनिष्ठ निवडून घेवूनच त्यांची अंमलबजावणी करावी हेच हितकारक ठरेल.
काही बदल झाला तरी तो वरपांगी असेल. आपली मुळातली आणि तळागाळातील संस्कृती कायम टिकून राहील यात शंकाच नाही. भारतीय महिला संघटनांच्या माध्यमातून या निवडीला योग्य दिशा देण्याचे कार्य सुरू आहे . त्याला बळ दिले जावे आणि आपल्या भारतमातेच्या पुरातन पण परिवर्तनीय जलजाज्वल संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त व्हावे हीच अपेक्षा. आपले आदर्श आपलेच आहेत. त्याना सुरक्षीत ठेवून पुढची सांस्कृतिक वाटचाल आदर्श करण्यासाठी . आता महिलांनीच पुढाकार घेण्याचे नियोजन करावे. ही आग्रही विनंती
☆ अस्तित्व आणि अधिकारासाठी दिलेला लढा… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन☆
8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन . स्त्रीचे अस्तित्व आणि अधिकार यासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण म्हणून जगभर साजरा केला जाणारा दिवस. Clara Zenth या जर्मन स्त्रीच्या पुढाकाराने हा जगभर पसरला आणि यशस्वी झाला..याची सुरुवात १९१० मध्ये झाली.
असं म्हणतात भरपूर वेळ घेऊन ईश्वराने निर्माण केलेली एक नितांत सुंदर, भावपूर्ण, प्रेमळ, प्रसंगी कणखर अशी कलाकृती म्हणजे स्त्री. “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती या जगाते उध्दारी “, “क्षणाची पत्नी अनंत काळाची माता ”, “ देवी, राक्षसांचा, दुर्जनांचा संहार करणारी “ वगैरे भारदस्त विधानं जरी तिच्याबद्दल केली गेली असली, तरी समाजात तिला सहसा कायमच दुय्यम स्थान मिळालेले आपण पाहतो.
एक निर्बल भोगवस्तू म्हणून तिच्यावर अधिकार गाजवण्यासाठी झालेल्या लढाया आणि त्यात तिने केलेले आत्मदहन, जोहार हे जसे सर्वश्रुत आहे, तसेच एकीकडे हेही सर्वश्रुत आहे की इतिहासात अनेक शूर स्त्रिया होऊन गेल्या. स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्त्रियांचे योगदान आहे. आणि आता स्त्रियांच्याच प्रयत्नांनी स्त्रियांना स्वातंत्र्य आणि समानता मिळत आहे हेही महत्वाचे आहे. अशा सगळ्याच स्त्रियांची आठवण म्हणून हा महिला दिन.
फक्त अतिशय समजूतदारपणा, प्रेमळपणा, सहनशीलता हे सहज दिसणारे गुणविशेषच नाहीत, तर बुद्धी, कल्पकता, चातुर्य, साहस ,जिद्द, हेही गुणविशेष पुरुषांइतकेच तिच्यामध्येही आहेत हे स्त्रीने आता वेळोवेळी आणि अनेक क्षेत्रात सिद्ध केले आहे. मी तर म्हणेन की ती multi taskerआहे, आणि हा विशेष गुण पुरुषांमध्ये बराचसा अभावानेच आढळतो हेही आता उघड सत्य ठरले आहे. म्हणूनच जगाला आवर्जून स्त्रियांची जाहीर दखल घ्यावीशी वाटते. कारण समाजात स्त्रीचे अस्तित्व पुरुषांइतकेच महत्त्वाचे आहे हे सत्य आता विवाद्य राहिलेले नाही. स्त्रीच्या अस्तित्वासाठी आणि अधिकारासाठी सुरु झालेल्या लढ्याचं पहिलं पाऊल आता जणू एक मैलाचा दगड म्हणून इतिहासात कायमचं नोंदलं गेलं आहे.
मुळातच स्त्री ही पुरुषापेक्षा शक्तीने कमी असते हा निसर्ग नियम आहे. पण काही स्त्रिया यावरही मात करतांना आता वरचेवर दिसून येते. थोडक्यात काय, तर लिंगभेद, रिप्रॉडक्टिव्ह राईट, व्हायलेन्स अब्युज या विरुद्ध तिला द्यावी लागणारी लढाई आता खूपच मिळमिळीत झाली आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
विविध संशोधन क्षेत्रे, राजकारण ,सायन्स, मेडिसिन,अर्थ ,खेळ, सैन्यदल, यामध्ये तर ती आता सर्रास आहेच. शिवाय वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्येही तिचा दमदार सहभाग आहे. पोलीसदल, रिक्षा किंवा चारचाकी वाहनचालक, शिक्षणक्षेत्रात लक्षवेधी वाटचाल अशा विविध प्रांतात, आणि अध्यात्मासारख्या सहजसाध्य नसलेल्या प्रांतातही ती यशस्वीपणे मिळवत असलेले ज्ञान…..सगळंच अतिशय कौतुकास्पद. खरंतर आता असे एकही महत्वपूर्ण क्षेत्र उरलेले नाही, जिथे स्त्रीने आपले कर्तृत्व सिद्ध केलेले नाही. अगदी अवकाशातही भरारी घेण्यात, त्यासाठीच्या अतिशय गुंतागुंतीच्या महत्वपूर्ण संशोधनात पुरुषांच्या बरोबरीने तिचा सहभाग आहे…. स्त्री आता खरोखरच ‘ स्वयंसिद्धा ‘ ठरलेली आहे. सिंगल मदर म्हणून एकटीने मुलांचे उत्तम संगोपन करण्यात देखील ती यशस्वी झालेली आहे – होते आहे.
इथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. शहरवासीयांसाठी अनेक मार्ग खुले असतात. पण विपरीत परिस्थितीतून, आडगावातून पुढे आलेल्या अशाही स्त्रिया आहेत, ज्या “पद्मश्री” पुरस्काराच्या मानकरी आहेत. अशा स्त्रियांबद्दल मला विशेष आदर वाटतो. असे पुरस्कार मिळवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही जणींचा उल्लेख करायचा तर —
१) मध्यप्रदेशातील काटक्या गोळा करणारी दगडफोड करणारी दुधीयाबाई– एक चित्रकार– पद्मश्री मानकरी
२) कलकत्ता येथील प्रीती कोना–कांथा वर्क
३) छत्तीसगडची कलाकार उषा बारले– नाच
४) झाबुवा ,मध्य प्रदेश, मधील दाम्पत्य शांती आणि रमेश पवार— आदिवासी गुडिया
५) हिमोफेलियावर संशोधन करणाऱ्या डॉक्टर नलिनी पार्थसारथी
६) गणित प्रेमी सुजाता— अनेक पुरस्कार आणि पद्मश्री.
अर्थात या सगळ्याच्या जोडीने एक वेदनादायक सत्य अजूनही काही ठिकाणी आपले नकोसे अस्तित्व दाखवून देत असते. ठराविक पद्धतीनेच आयुष्य व्यक्तीत केले पाहिजे हा विचार अडाणी अशिक्षित वर्गातच फक्त नसतो, तर तो शिक्षित उच्चभ्रू समाजात देखील दिसतो हेही असेच एक सत्य. छत्तीसगडच्या आदिवासी समाजात जन्मलेली एक लहानशी मुलगी… तिला नाचाची अत्यंत आवड… पण नाच म्हणजे समाजात मान खाली घालायला लावणारी कला… म्हणून बापाने त्या मुलीला विहिरीत फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि कोणीही त्याला प्रतिकार केला नाही. पण ही मुलगी केवळ स्वतःच्या मनोबलावर जिद्दीने त्या परिस्थितीतून आपला मार्ग शोधते आणि स्वतःला सिद्ध करते हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे. अशा अनेक स्त्रिया. अगदी सुधा मूर्ती यांच्यासारख्या प्रचंड बुद्धिवान स्त्रीला देखील जेंडर डिस्क्रिमिनेशनला तोंड द्यावं लागलं. पण त्यांनी खंबीरपणे आणि चिकाटीने सगळ्या अडथळ्यांना यशस्वीरीत्या पार केले आणि आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. आज ‘ सुधा मूर्ती ‘ हे नाव कुणाला माहित नाही ? अशी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कर्तबगारी दाखवणाऱ्या किती जणींची नावं घ्यावीत … ज्या सगळ्या पद्म पुरस्कारांच्या मानकरी आहेत …. सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवलेल्या आहेत .
अर्थात जसे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते म्हणतात, तसेच यशस्वी स्त्रीच्या मागेही पुरुष असतो हे तर खरेच. पण ही गोष्टही स्त्री जास्त दिलखुलासपणे मान्य करते हेही तितकेच खरे.
८ मार्च प्रमाणेच १३ फेब्रुवारी हा दिवसही श्रीमती सरोजिनी नायडूंच्या स्मरणार्थ ‘ नॅशनल वूमन्स डे ‘ म्हणून साजरा केला जातो. देशबांधणीत हातभार लावलेल्या स्त्रियांचा हा गौरव दिन असतो. कदाचित याची माहिती फारशी सर्वश्रुत नसेल म्हणून इथे आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करायलाच हवा.
या सगळ्या ज्ञात-अज्ञात स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लढ्याला… कार्याला आणि… त्यांनी मिळवलेल्या गौरवास्पद यशाला माझं मनःपूर्वक अभिवादन…
संग्राहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈