मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जीवनपथ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जीवन पथ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“.. ये ये असा भांबावलास का? “

“..आणि या वळणावरून पुढे चालता चालता थांबलास का? “

“..हाच आपला मार्ग बरोबर असेल ना ? ही शंका का आली बरं तुला?”

“..इतका मजल दरमजल करीत प्रवास करून मध्य गाठलास आणि आता या वाटेवरून पुढची वाटचाल करण्यास घुटमळतोस का ?.”

“…निर्णय तर त्यावेळी तूझा तूच घेतला होतास! याच वाटेवरून जाण्याचा आपलं इप्सित साध्य इथेच मिळणार असा आत्मविश्वासही त्यावेळी तुझ्या मनात होता की!”

“..ते तुझं साध्य गाठायला किती अंतर चालावे लागेल, त्यासाठी किती काळ ही यातायात करावी लागेल याचं काळ काम नि वेगाचं गणित तूच मनाशी सोडवलं होतसं की! उत्तर तर तुला त्यावेळीच कळलं होतं .”

.”. वाटचाल करत करत का रे दमलास!, थकलास! इथवर येईपर्यंत चालून चालून पाय दमले..आता पुढे चालत जाण्याचं त्राण नाही उरले..”

“..घे मग घटकाभर विश्रांती.. होशील पुन्हा ताजातवाना, निघशील परत नव्या दमाने. काही घाई नाही बराच आहे अवधी .”

“.ही काय कासव सश्याची स्पर्धा थोडीच आहे? अरे इथं कुणी हारत नाही किंवा कुणी जिंकत नाही. कारण हा आहे जीवन प्रवास आदी कडून अंता कडे निघालेला.. “

“..पण पण कुणालाही न चुकलेला. जो जो इथे आला त्याला त्याला याच वाटेवरून जावं लागलंच.. हा प्रवास मात्र ज्याला त्याला एकटयालाच करावा लागतो.. “

.”.साथ सोबत मिळते ना घडीची पण निश्चित नसते तडीची. “

“..तू पाहिलेस की कितीतरी जणांचे चालत गेलेल्यांचे पावलांचे ते ठसे , त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूनच तू ही चालत निघालास .काही पावलंं तुझ्या बरोबरीने चालली त्यात काही भरभर पुढे निघून गेली तर काही मागे मागेच रेंगाळली.. “

“..पण तू ठरवलं होतसं की आपण चालायचं अथक नि अविरत त्या टप्यापर्यंत..आणि हे ही तू जाणून होतास या वाटेने जाताना चालणे हाच एकमेव पर्याय आहे इथं दुसरं वाहन नाही मुळी. “

.”.आशा निराशेच्या दिवस रात्री दाखवत असतात मैलाचा टप्पा

..सुखाच्या सावलीचे मृगजळ दुःखाच्या उन्हात कायम चमचमते दिसते.. “

“..आल़ं हातात म्हणत म्हणत उर किती धपापून किती घेतेय याचं भान नसतयं.. “

“..दुतर्फा घनदाट वृक्षलता लांबवर पसरत गेलेल्या त्या लपवून ठेवतात संकटानां दबा धरुन बसवतात.. “

“..खाच खळगे प्रतिकुलतेचे नि समस्यांचे दगडधोंडे वाटेवर जागोजागी पसरलेले असतात तुझ्याशी सामना करण्यासाठी डोकं उंचावून..,”

“..कुठे उंच तर कुठे सखल, कुठे वळण तर कुठे सरळ, कुठे चढण तर कुठे उतार.. यावर चालूनच व्हायचं तुला पैलपार.. ही आहे तुझी जीवन वाट .. ”  

 आणि आणि माझी…

“.. मी आहे हा असाच ना आदी ना अंताचा माझा मलाच ठावठिकाणा नाही.. “

.”. कशा कशाचंच मला सोयरसुतक नाही… आणि कशाला ठेवू म्हणतो ते तरी.. “

“किती एक आले नि गेले किती एक अजूनही चालत राहिलेत.. आणि उद्याही कितीतरी येणार असणार आहेत… हीच ती एकमेव वाट आहे ना सगळ्यांची.. “

“.. आणि आणि माझा जन्मच त्यासाठी आहे तो सगळयांचा भार पेलून धरण्यासाठी.. “

“कोवळया उन्हाचे किरणाचे कवडसे गुदगुल्या करतात माझ्या अंगावर… दवबिंदूचे तुषार नाचतात देहावर.. ओले ओले अंग होते नव्हाळीचे न्हाणे जसे..चिडलेला भास्कर चिमटे काढतो तापलेल्या उन्हाने… दंगेखोर वारा फुफाटयाची माती उधळून लावतो भंडाऱ्यासारखी.. मग रवी हळूहळू शांत होत केशर गुलाबाच्या म्लान वदनाने मला निरोप देतो.. अंधाराचा जाजम रात्र टाकत येते… चांदण्याच्या खड्यांना चमकवित चंदेरी रूपेरी शितल अस्तर पसरवते..अंधारात बागुलबुवा झाडाझुडपांच्या आडोशाला दडतो… मी मी असाच पहुडलेला असतो.. दिवस असो वा रात्र मला काहीच फरक पडलेला नसतो… कारण मला तर कुठेच जायचं वा यायचं नसतं..” 

“..माझं कामं प्रवाश्यांच्या पदपथाचं असतं. .”

“.. मी आहे हा असाच ना आदी ना अंताचा अक्षय वाटेचा…” 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाषा…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ भाषा…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

जगात मनुष्याने अधिकाधिक घातक अशी शस्त्रे निर्माण करून दाखवलीत. एकापेक्षा एक धारदार , हिंसक आणि थरारक अशी शस्त्रे जगाने आजवर पाहिली आहेत. मानवी समुदायाची मोठी कत्तल या घातकी शस्त्रे चालवूनच झाली. कुणी न्यायासाठी शस्त्र उचलले तर कुणी अन्याय करण्यासाठी शस्त्र पारजले. एकाहून एक अशी ही शस्त्रे बाळगणारी मानवी जमातीकडे आणखी एक महत्त्वाचे शस्त्र उपलब्ध आहे याची फारशी दखल घेतली जात नाही . या शस्त्राची एकच बाजू मोठ्या गौरवाने सांगितली गेली आणि त्याची दुसरी धारदार बाजू दुर्लक्षीत होत गेली. भलेभले चांगले लोक या शब्दाला शस्त्र देखील मानतील का ? माझ्यापुढे प्रश्न आहे.

भाषा ….हे मानवी समाजाकडे उपलब्ध असे शस्त्र आहे. भाषा मनुष्याला जोडण्याचे काम करते, योग्यपणे व्यक्त होण्याचे भाषा हे माध्यम आहे , भाषा मनुष्याच्या विकासात सर्वाधिक महत्त्वाची भुमिका बजावते ही सत्ये कुणीही नाकारणार नाहीच. मात्र भाषा शस्त्र म्हणून जेव्हा वार करते तेव्हा त्या जखमा वर्षानुवर्षे फक्त चिघळत राहतात , राज्य व राष्ट्रे यांचे अवयव कुरतडत राहतात , बहुतांशी वेळा दोन माणसांमध्ये , राज्यांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये देखील जोडण्याऐवजी तोडपाणीचे काम करते ती भाषाच. मानवी समाजात अनेक वेगवेगळ्या विविधतेने भरलेल्या भाषा आहेत. प्रत्येक भाषेला एक गोडवा आहे .इतर काही बलस्थाने आहेत. प्रत्येक मानवी जीवाला त्याची मातृभाषा अत्यंत प्रिय असते हे देखील निखालस नैसर्गिक सत्य आहे. तरीही भाषा शस्त्र म्हणूनच नव्हे तर घातक शस्त्र म्हणून काम करते हे देखील कटूपणाने नोंद करावे लागतेच. भाषेचा वापर ( गैर ? ) करून वर्चस्ववादी वृत्ती आपल्या धारणा शोषीतांवर लादतात. आपलीच भाषा ” प्रमाण ” व शोषीतांची भाषा ” तुच्छ ” अशी घातकी भाषीक मांडणी करून शोषीतांची गुलामगिरी कायदेशीर बनवू पाहतात. जगभर ही अवस्था भूतकाळात होती , वर्तमानात आहे आणि भविष्यात देखील दिर्घकाळ जिवंत असेल हे कटू वास्तव आहे. मग भाषेची नेमकी कोणती जाणीव आपल्याला कळली पाहिजे ? मुद्दा हा आहे. कोणत्याही भाषेला दुधारी धार असते .यापैकी एक विधायक असते आणि दुसरी विघातक. विधायक बाजू वाढवत नेणे हे योग्य .याचवेळी विघातक बाजू संपवत नेणे हे अधिक योग्य असते. स्वभाषेचा रास्त अभिमान जितका योग्य असतो त्याचबरोबर इतर भाषांविषयी आणि त्या भाषा बोलणारे समूहांविषयी देखील रास्त आदरभाव असावा.भाषेचे शुद्ध रुप आणि तथाकथित अशुद्ध रुप ही विभागणी टाळली पाहिजे .

भाषा…बोलण्यात सौम्य पण स्पष्ट , वर्तनात स्वच्छ पण आदरभावी , लिहिण्यात नेमकेपणा पण सच्चेपणा जपणारी असावी. खरा दोष भाषेचा नसतोच…तो असतो भाषावाद्यांचा. हे भाषावादी लोक अत्यंत संकुचित मात्रेने भाषा हाताळतात आणि भाषेची विघातक धार तेज करु पाहतात. अशावेळी जबाबदारी असते ती भाषेच्या संवादाकर्त्यांची. जे संवादकर्ते भाषेची विधायक बाजू अधिकाधिक उजळवीत राहतील आणि मानवी समूहात संवादप्रियता वाढवत राहतील. भाषेचे हे सामर्थ्य जपले पाहिजे .

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काही राहून तर नाही ना गेलं…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ काही राहून तर नाही ना गेलं…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

तीन महिन्याच्या बाळाला  दाईपाशी ठेवून कामावर जाणाऱ्या आईला 

दाईनं विचारलं ~ “ काही राहून तर नाही ना गेलं ?  पर्स, किल्ल्या सगळं घेतलंत ना ?

— आता ती कशी हो, हो म्हणेल ?

पैशापाठी पळता-पळता,  सगळं काही मिळविण्याच्या महत्वाकांक्षेपोटी —

ती जिच्यासाठी एवढा आटापिटा करतेय —  तीच तर राहून गेलीय !

 

लग्नात नवऱ्यामुलीस सासरी पाठवताना –  लग्नाचा हाॅल रिकामा करून देताना 

मुलीच्या आत्यानं विचारलं ~ “ दादा, काही राहून तर नाही गेलं ना ? चेक कर जरा नीट..!

— बाप चेक करायला गेला, तर वधूच्या खोलीत काही फुलं सुकून पडलेली दिसली.

— सगळंच तर मागं राहून गेलंय…. २१ वर्षे जे नाव घेऊन आपण जिला लाडानं हाक मारत होतो,

… ते नाव तिथंच सुटून गेलंय, आणि …. त्या नावापुढे आतापर्यंत अभिमानानं जे नाव लागत होतं, 

— ते नावही आता तिथंच राहून गेलंय.

 

“ दादा, बघितलंस ? काही मागे राहून तर नाही ना गेलं ?”

— बहिणीच्या या प्रश्नावर, भरून आलेले डोळे लपवत बाप काही बोलला तर नाही, 

पण त्याच्या मनात विचार आला~

—  सगळं काही तर इथंच राहून गेलंय .!

 

मोठी मनिषा मनी बाळगून मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं,

– आणि तो शिकून तिथंच सेटल झाला.

नातवाच्या जन्मावेळी मोठ्या मुश्किलीनं तीन महिन्यांचा  व्हिसा मिळाला होता,

– आणि निघतेवेळी मुलानं विचारलं ~ “ बाबा सगळं काही चेक केलंय ना ?—

काही राहून तर नाही ना गेलं ?” 

— काय सांगू त्याला, की आता…. “आता राहून जाण्यासारखं  माझ्यापाशी उरलं तरी काय आहे ..!”

 

सेवानिवृत्तीचे दिवशी पी.ए. नं आठवण करून दिली ~

— “ चेक करून घ्या सर ..! काही राहून तर नाही ना गेलं ?”

– थोडं थांबलो, आणि मनात विचार आला, “ सगळं जीवन तर इथंच येण्या-जाण्यात निघून गेलं.

— आता आणखी काय राहून गेलं असणार आहे?”

 

स्मशानातून परतताना ….. मुलानं मान वळवली पुन्हा एकदा, चितेकडे पाहण्यासाठी …

—   पित्याच्या चितेच्या भडकत्या आगीकडे पाहून त्याचं मन भरून आलं.

—  धावतच तो गेला — पित्याच्या चेहऱ्याची एक  झलक पाहण्याचा असफल प्रयत्न केला….

—  आणि तो परतला…….  मित्रानं विचारलं ~-  “ काही राहून गेलं होतं कां रे ?”

—    भरल्या डोळ्यांनी तो बोलला ~  “ नाही , काहीच नाही राहिलं आता — आणि जे काही राहून गेलंय,

ते नेहमीच माझ्या सोबत राहील !”

 

एकदा… थोडा वेळ काढून वाचा—कदाचित …जुना काळ आठवेल, डोळे भरून येतील, आणि

– आणि आज मन भरून जगण्याचं.. कारण मिळेल   ..

 

मित्रांनो !  कुणास ठाऊक ? केव्हा या जीवनाची संध्याकाळ होईल….. 

 

— असं काही होण्याआधी सर्वांना जवळ घ्या, 

              त्यांच्या पाठीवर हात फिरवा.

              त्यांच्याशी प्रेमानं बोलून घ्या

              जेणेकरुन काही राहून जाऊ नये ..!!!                                      

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “श्री सखी राज्ञी जयति…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “श्री सखी राज्ञी जयति…” ☆ सौ राधिका भांडारकर

युवराज शंभुने कविता लिहिली 

प्राणप्रिय पत्नीसाठी शब्द स्फुरले

 श्री सखी राज्ञी जयति

 ओळीतून या त्यांचे भार्या प्रेम प्रकटले १

 

 स्वराज्याच्या धगधगत्या निखाऱ्याला 

समजून घेत जपले आपल्या पदरात 

कणखर, हळवी ,प्रेमळ सोशिक

 कधी न डगमगली वादांच्या प्रवाहात ..२

 

 पत्नीच असते लक्ष्मी, सखी, राणी 

भावना पतीची आहे गौरवा समान

 या शब्दांच्या अर्थांना जाणले  येसुने

 सदा मानले स्वराज्याचे कर्तव्य महान ..३

 

आज वळून पाहता इतिहासाकडे 

काळाने  दिल्या किती  रणरागिणी

 मूर्तीमंत जणू लखलखत्या तलवारी

 दुःखात हसल्या  या शूर विरहिणी…४

 

 झळकले चार शब्द राजमुद्रेवर

धन्य तो  शिवरायांचा  छावा 

ज्याने केला जय जयकार स्त्रीचा 

शब्द भावनेतून केवळ कसा वर्णवा ?..५

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆‘स्वतःत शोधून पहा…’ – लेखक – श्री गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री श्रेया साने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘स्वतःत शोधून पहा…’ – लेखक – श्री गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री श्रेया साने ☆

नेहमीच नसतं अचूक कुणी,

घड्याळ देखील चुकतं राव.

जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता

निसटून जातो हातून डाव.

 

पडत जातात उलटे फासे

घरासोबत फिरतात वासे,

अश्या वेळी मोडू नये

धीर कधी सोडू नये.

 

नशिबाच्या नावानेही

उगीच बोटं मोडू नये.

भरवश्याचे  करतात दावे,

आठवू नये त्यांची नावे.

 

सगळी दारं मिटतात तेव्हा

आपणच आपला मित्र व्हावे…

 

मग अचूक दिसते वाट,

बुडण्या आधीच मिळतो काठ,

खडक होऊन हसत हसत

झेलता येते प्रत्येक लाट,

 

ज्याला हे जमलं त्याला

सामील होतात ग्रह तारे,

केवळ तुमच्या शिडासाठी

वाट सोडून वाहतील वारे,

 

म्हणून म्हणतो इतकं तरी

फक्त एकदा जमवून बघा,

आप्त, सखा, जिवलग यार,

स्वतःत शोधून पहा.…!

 

कवी : श्री गुरु ठाकूर

प्रस्तुती – सुश्री श्रेया साने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शाळा सुटता, पुस्तक मिटता, सुट्टी लागता… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌸 विविधा 🌸

☆ शाळा सुटता, पुस्तक मिटता, सुट्टी लागता… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

आपल्यापैकी खास करून आई, बाबा, आजी, आजोबा अन इतर सर्वाना प्रेमळ प्रणिपात, नमन, आणखीन खूप खूप शुभेच्छा, बस आत्ता इतकच! (आणखीन एक नम्र निवेदन, तुमच्या घरातल्या छोट्या मंडळींना साष्टांग नमस्कार, विचारा का? हा लेख शेवटपर्यंत वाचा, म्हणजे आपोआपच कळेल!)

शाळकरी मुलांची कुठलीही सुट्टी, म्हणजे पालक किंवा तत्सम मंडळींचा बहुदा घातवार असा अलिखित नियम असावा! त्यात सर्वात मोट्ठी सुट्टी म्हणजे उन्हाळी सुट्टी, खरे पाहिले तर ही सरकारी योजना असून, ती नेहमीप्रमाणे फेल का होत नाही, हा प्रश्न अत्यंत वाजवी आणि समयोचित आहे! पण त्याची अंमलबजावणी करायला शाळेचे प्रिन्सिपॉल आणि शिक्षक तत्पर असतातच. शाळेतील शिक्षकांना देखील ब्रेक हवा, त्यांना पण घरची कामे असू शकतात, हे लक्ष्यात घ्याल की नाही! ती मंडळी या निमित्याने त्यांच्या मुलांच्या सुट्टीचे व्यवस्थापन करणार की! म्हणून एरवी शाळेत धुमाकूळ घालणाऱ्या मुलांच्या समस्त घराला सुट्टीत मुलांचा ब्रेथलेस परफॉर्मन्स बघणे हे क्रमप्राप्तच!

शाळेत नियोजनबद्ध गोष्टींसाठी नियत अवधी असतो, मात्र शाळा नसेल तर मग आपल्या घरात असे सुसंवाद घडत असतीलच! 

“आई, उद्या सकाळी उठवू नकोस प्लीज़, मी उठेन तेव्हा उठेन (म्हणजे कदाचित दुपार होईल)”

“आई, आज ऑफिसला जाऊ नकोस! घरीच मस्त वेळ घालवू (म्हणजे तू मस्त काही बाही कुकिंग कर अन मी खाईन)” 

“आई, आज जरा घर नीट आवरून ठेव, अन मस्त स्नॅक्स, कोल्ड-ड्रिंकचे प्रिपरेशन कर (माझे फ्रेंड्स येणार आहेत अन आम्ही एन्जॉय करणार आहोत)”

“आई, आत्ता कुठे सुट्टी लागली, अभ्यास करून कंटाळा आलाय, मी आधीच सांगतो/सांगते, मी जरा रिलॅक्स होणार आहे( घरची कुठलीच कामे करणार नाहीये)”

“आई, आज तू दमली असशील ना, आज किचनला सुट्टी! कित्ती करतेस ग आमच्यासाठी, आज तू आराम कर बरं! (आज मस्त बाहेरच लंच, डिनर करायचं)”

दृश्य १९५५ आणि पुढचा उन्हाळी काळ- स्थळ नागपूर, पहाटे ५ वाजता, आमच्या वडिलांची एकच हाक, अन काही मिनिटं जाता जाता आम्ही तयार, घरापासून २.५ मैल अंतर कापायला, अंबाझरी तलावाची सैर करायला! तिथले तलावा काठीचे भटकणे, बागेत फिरणे, अन झुल्यावर झुलणे, तहान लागली तर तिथल्याच नळाचे पाणी पिणे. परत येतांना रस्त्याच्या काठी माठातली नीरा मिळायची. सकाळी ७ पर्यंत परत येणे, हा ठराविक कार्यक्रम असायचा.  

आता पर्याय भरपूर आहेत, मुलांना सकाळी उठवण्याचा कार्यक्रम जमला की पुढचे सगळे सोप्पे असते! फक्त स्वच्छ स्वछंद हवा, हिरवीगार झाडे, मोकळी मैदाने, स्वच्छ पाणी, हे शोधायचा अवकाश की सुट्टीचे प्लानिंग झालेच समजा! 

सुट्टीचे दिवसागणिक, आठवड्यागणिक अन महिन्यागणिक नियोजन करणे, म्हणजे तारेवरची कसरत! यात (किमान) दोन प्रकार असू शकतात. एक, मुलांच्या सोबत बसून प्लानिंग करा किंवा मुलांना वगळून ते (शांतपणे) करा! अर्थात हे सर्व मुलांकरता असल्यामुळे त्यांचा सहभाग असावा, हे मान्य, पण त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीपुढे पालक किती टिकणार हे दोन्ही पक्ष् किती ताकदीचे बाहुबली आहेत त्यावर वैयक्तिकपणे ठरवावे. या व्यतिरिक्त वेळेवर येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्लॅन बी ते प्लॅन झेड ठरवावा. (कांही काळापूर्वी कोरोना आला आणि आपले कित्येक प्लॅन धुळीला मिळाले!)  

आता आपण मुलांसाठी सुट्टीत बहुसंख्य वेळा कशा-कशाचे नियोजन करतो ते बघू. यात मुलांना हे आवडेल हे गृहीत धरलेलेच आहे, शिवाय गुगल आणि इतर वेबसाइट्स आहेतच मदतीला! पिझ्झा पार्टी, पाजामा पार्टी, थीम पार्टी, उन्हाळी शिबीरे (यांचे विषय अनंत!), मॉलला भेट, मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमे बघणे, वॉटर पार्क, अम्युझमेंट पार्कला भेटी देणे हे सर्वांचे सर्वकालीन सर्वप्रिय कार्यक्रम!

वरील सफरीं व्यतिरिक्त मी इथे काही पर्यायांचा विचार मांडते, बघा तुम्हाला आवडताहेत का?

*आपल्या शहरातील संग्रहालय, तारांगण, ऐतिहासिक वास्तू , गड, किल्ले  आणि जंगले यांना भेटी, तसेच निसर्गाच्या सानिध्यात  पक्षी, प्राणी, झाडे, वृक्ष आणि वेलींचे निरीक्षण करणे: या  जागांना भेट देण्याआधी जर इंटरनेट आणि इतर स्त्रोतातून माहिती गोळा केली तर निरीक्षण आणखी चांगले करता येईल. तिथे गेल्यानंतर माहितीपुस्तिका देखील वाचता येईल. भेट दिल्यानंतर माहितीत भर घालून आपले सामान्य ज्ञान समृद्ध करावे! घरच्या वडीलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन असेल तर अत्युत्तम! याने मुलांची निरीक्षण शक्ती, जिज्ञासा आणि अभ्यासू वृत्ती वाढेल! तसेच हे मुलांनी लिहिले अन तेही मातृभाषेत, तर खूपच मजा येईल

*जवळपासच्या गावात राहून ग्राम्य जीवनाचा आनंद घेणे: नदीकाठी फिरणे आणि गावातील मुलांशी संवाद साधणे, तिथल्या जेवणाचा आस्वाद घेणे, सूर्योदय, सूर्यास्त आणि रात्री निरभ्र आकाशात चंद्र, ताऱ्यांचे निरीक्षण करणे, गावांत प्रदूषण बरेच कमी असल्याने हे जास्त आनंददायी असते. हे गाव मामाचे असेल तर आनंदाला काय तोटा?  

*अनाथाश्रमाला आणि वृद्धाश्रमाला भेटी देणे, जमेल तसे दान करणे आणि तिथे वेळ देणे:  मला वाटते सद्य परिस्थितीची जाणीव होण्याकरता, तसेच आपण किती सुस्थितीत आहोत याची मुलांना जाणीव व्हावी याकरता पालकांनी मुलांबरोबर या भेटी अवश्य द्याव्यात. 

* बालनाट्य बघणे, लहान मुलांसाठी असलेले चित्रपट बघणे (मला असे वाटते की, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये तयार होणाऱ्या नाटकांना बालप्रेक्षकांनी आणि त्यांच्या पालकांनी भरघोस प्रतिसाद देणे आवश्यक आहे).

याच संदर्भात कांही मोजक्या आठवणी परत जाग्या करते!

साधारण १९५७-१९५८ चा काळ: स्थळ नागपूर मधील एक सिनेमागृह:  बालप्रेक्षक आणि अति बालप्रेक्षकांच्या पालकांनी ते तुडुंब भरलय. सकाळी ९ ची वेळ! सिनेमा आहे “शामची आई”. पुस्तक वाचले होते, पण ती कहाणी रजतपटावर बघतांना कधी नव्हे इतके प्रेक्षक भावविवश झाले होते. मी तर आजवर इतर कुठलाही चित्रपट बघितल्यावर इतके रडल्याचे मला आठवत नाही. घरी आल्यावर देखील त्या सिनेमाचा आफ्टर इफेक्ट जाण्यासाठी खूप दिवस जावे लागले!

साधारण १९९८ चा काळ: तेच दृश्य, नागपूर मधील एक सिनेमागृह बालप्रेक्षक आणि पालकांनी तुडुंब भरलय. सकाळी ९ ची वेळ. सिनेमा आहे छोटा चेतन (३D) व त्याकरता खास रंगीत चष्मा घेण्याकरता लागलेली लांब रांग! सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली! मी पण मुलांसोबत मुद्दाम सिनेमा बघायला आलेय, मित्रांनो अशा वेळेस सिनेमाच्या व्यतिरिक्त बालप्रेक्षकांचा प्रतिसाद बघण्याचा आनंद काही वेगळाच! 

साधारण २०१८ चा मे महिना:  आता मी ठाण्यात नातीबरोबर आलेय, एक सुपर हिट नाटक अर्थातच “अलबत्या गलबत्या” बघायला! चिंची चेटकिणीची वाट बघता-बघता आली एकदाची!!! तिचे मंत्र-तंत्र, तिचे घाबरवणे अन तिचा ऍक्शनने भरगच्च भरलेला अन भारून टाकणारा फेमस डायलॉग “किती ग बाई मी हुश्शार, किती ग बाई मी हुश्शार!” इतकी गोड, लव्हेबल अन गुणाची (?) चेटकीण! मीच काय सर्वच तिच्या प्रेमात पडलेत! आधी वैभव मांगले अन आता निलेश गोपनारायण, तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा!!! हे चेटकिणीचे लोभस आऊटफिट अन अभिनयाचं आव्हान लीलया स्वीकारलेय तुम्ही अन विलक्षण ताकदीने पेलले!  

मित्रांनो! काळ कुठलाही असू द्या, सिनेमा अन नाटकांना बालप्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद जवळपास सारखाच! बडबड, गप्पा आरडाओरडा, धमाल, कधी घाबरणारे अन कधी आनंदाचे चीत्कार, हसणे खिदळणे, वाहवा!

मोहोरून टाकणाऱ्या फुलांचे ताटवे, रंगीबेरंगी फुलपाखरांचे बागडणे, मोराचा मोरपंखी नाच, मनमोहक हास्याची दिलखुलास कारंजी अन मधुर, निरागस व लोभस बालपणाचे नयनरम्य दर्शन एकाच ठिकाणी हवे आहे का?  मग कोणत्याही भाषेत बालनाट्य सुरु असलेल्या एखाद्या रंगमंदिराला जरूर भेट द्या, अँड don’t worry! भावनेला भाषेचा अडसर कधीच भासत नाही!!! 

चला तर मंडळी, सुट्टीत धम्माल मज्जा करू या!!!

तूर्तास तुमची रजा घेते, एका बालनाटकाचे अर्जंट बुकिंग करायचे आहे!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आयुष्याचं सार्थक … ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ आयुष्याचं सार्थक … ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

आज मी माझ्या घराला विचारलं की मी तुझ्यात कसा राहू? म्हणजे मला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल !

माझ्या रहात्या खोलीनेच मला अगदी अचूक उत्तर दिलं.

सीलिंग म्हणालं – माझ्यासारखं उंच स्वप्न डोळ्यापुढे असू दे !

पंखा म्हणाला – डोकं शांत ठेवायला शीक !

घड्याळ म्हणालं – नेहेमी वेळेचं भान असावं !

कॅलेंडर म्हणालं – स्वत:ला कायम अप् टु डेट ठेवायला शीक !

पैशाचं पाकिट म्हणालं – भविष्यासाठी बचत करायला हवी !

आरसा म्हणाला – आपल्या मनाचं प्रतिबिंब निरखून बघ !

दरवाजा म्हणाला – मनाच्या दारांना कड्या-कुलुपं नकोत !

खिडकी म्हणाली – दृष्टी व्यापक असेल तर सृष्टी नीट कळेल आणि सौख्याची वृष्टी होइल !

भिंती म्हणाल्या – संकट काळातही ताठ उभं रहाता आलं पाहिजे !

खुंटी म्हणाली – कुठचेही प्रश्न लोंबकळत ठेवायचे नाहीत !

फरशी म्हणाली – पाय नेहेमी जमिनीवर असावेत !

एवढं सगळं ऐकल्यावर नाही म्हटलं तरी थोडा उडालोच !

उदासपणे बेडकडे बघितलं.

बेड म्हणाला – डोकं पिकेल तुझं. आता एक उशी घे आणि सरळ ताणून दे ! त्यानं सौख्य मिळेल आणि आयुष्याचं सार्थकही होईल. बाकी सगळी मोहमाया आहे !!!

© सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कशाला द्यायचे आपण १५०  कोटी रुपये ?”… लेखक – श्री सतीश खाडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री जितेंद्र जाधव

? इंद्रधनुष्य ?

☆ “कशाला द्यायचे आपण १५०  कोटी रुपये ?”… लेखक – श्री सतीश खाडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

“ कशाला द्यायचे आपण १५०  कोटी रुपये रशियाला ? आपण पाच कोटी रुपयात तेजस (LCA ) वेपन सिस्टिम बनवू शकतो !”

भारताला त्यावेळी संरक्षण व्यवस्थेसाठी तेजस वेपन सिस्टिम  घायची  होती. जगात त्यावेळी मोजक्याच देशात ती बनवली जात होती. त्या दिवशी रशियाचे शिष्टमंडळ भारतात  होते. दुसऱ्या दिवशी, भारत व रशिया यांच्यात खरेदी विषयी करार होणार होता. वेपन  सिस्टिम  अँड मिसाईल ईंटेग्रेशनची किंमत ₹ १५० कोटी  सांगितली होती. उद्या करार होणार म्हणून पंतप्रधानाचे तत्कालीन प्रमुख सल्लागार डॉक्टर कलाम साहेबांनी भारतातील त्या संबंधित प्रमुख लोकांची बैठक घ्यायला सांगून मतं कळवायला सांगितले होते. 

त्या बैठकीत तेजस वेपन सिस्टिम विषयी  सर्व माहिती ऐकल्यावर एक शास्त्रज्ञ उभा राहिला ….त्याने आत्मविश्वासपूर्वक सांगितले की “ कशाला द्यायचे १५० कोटी रुपये?  ह्याच गुणवत्तेची  वेपन सिस्टिम  मी व माझा विभाग पाच कोटी रुपयात बनवून देऊ.” –   सगळी सभा स्तब्ध झाली !!

ही चर्चा डॉक्टर कलाम सरांना कळवली गेली. त्यांनी या शास्त्रज्ञाला तातडीने भेटायला बोलावले. हा शास्त्रज्ञ त्यांना जाऊन भेटला आणि त्याने  सर्व शंकांचे निरसन केले. डॉक्टर कोटा हरिनारायणा ( LCA -तेजस प्रोग्रॅम डायरेक्टर ) यांनाही त्या सर्व तंत्रज्ञान व नियोजनावर विश्वास बसला. ते म्हणाले, “ तू लाग कामाला.”.. …दुसऱ्या दिवशी  करार होणार होता तो चक्क रद्द  करण्यात आला. भारतभरातील सर्व संबंधितांच्या भुवया उंचावल्या गेल्या. रशियन शिष्टमंडळाला तर मोठा धक्का होता.

पुढे दोन ते तीन  वर्षातच या शास्त्रज्ञाने शब्द दिल्याप्रमाणे  वेपन  सिस्टिम बनवली आणि   मिसाईल चाचणी  तेजस Aircraft  वरून यशस्वी केली. त्याबद्दल त्या शास्त्रज्ञाला  ‘DRDO Scientist of the year’ हा पुरस्कारही मिळाला. 

तेजस fighter  ने आतापर्यन्त २००० हून अधिक weapon release  चाचण्या यशस्वी करून नवीन विश्वविक्रम केला आहे.– नंतर त्या शास्त्रज्ञाची २०१६ मध्ये नॅशनल ऐरोस्पेस  लॅबोरेटरी (NAL )येथे डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली. त्याने धडाडीने ७ वर्ष थांबलेला १४ सीटर सारस पॅसेंजर  aircraft  प्रोजेक्ट revive करून, दोन वर्षात तो ट्रॅक वर आणून विमानाने जानेवारी २०१८ मध्ये पहिले उड्डाण केले. सरकारने आता NAL ला १९ सीटर रिजनल  ट्रान्सपोर्ट aircraft डेव्हलपमेंट ची मंजुरी दिली आहे. हे विमान २०२३ मध्ये उड्डाण घेईल. 

आणि आता तर आणखी कमाल केली त्याने…. जगातील सर्वात कमी किमतीचा, तंत्रज्ञानात कोणतीही उंची कमी नसलेला हंसा ट्रेनर aircraft  बनवलाय फक्त एक कोटी रुपयात !! ….. गेल्याच आठवड्यात त्याचेही राष्ट्रार्पण  झाले आहे ……..

तो शास्त्रज्ञ आहे ‘प्रवरा इंजिनीयरिंग कॉलेजच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी  आमचा लाडका मित्र “जितेंद्र जाधव” !! 

मित्रा तुझा खूप खूप अभिमान वाटतो!!! देशाला व जगाला अभिमान वाटावा इतके उत्तुंग यश तू संपादन केले आहेस.  त्रिवार नाही हजारदा अभिनंदन  !!!

— श्री सतीश खाडे

प्रेसिडेंट, माजी विद्यार्थी संघ, प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आधुनिक भूपाळी… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आधुनिक भूपाळी… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

लिसन माझ्या सोन्या बाळा

केव्हाच झाली मॉर्निंग

वेक अप फ्रॉम द बेड आता 

शेवटची ही वॉर्निंग

 

छानपैकी ब्रश कर

चमकव तुझे टीथ

स्मॉल थिंग समजू नकोस

त्यातच तुझं हित

 

हॉट हॉट मिल्क केलंय

घालून बोर्नव्हीटा

या ड्रिंकने सहज फोडशील

हाताने तू विटा

 

वन ग्लास ट्वाईस घेताच

व्हीटामीन्स मिळतील मेनी

थोड्याच दिवसात तूही

होशील महेंद्रसिंग धोनी

 

मॅथ्सवाल्या टीचरला त्या

विचार सगळ्या क्वेरी

पाठ कर लंच ब्रेकला

मराठी लॅंग्वेज स्टोरी

 

स्कूल फिनिश करून इव्हला

होम झटपट गाठ

येता येता बसमध्येच

फ्रेझेस होऊ दे पाठ

 

ग्रॅंडपाच्या बर्थ डेची

आहे नाईट ला पार्टी

असल्या एनव्हायर्नमेंट मध्ये

ग्रो होतात कार्टी !

 

मराठी च्या स्पीकिंगचेही लावू तुला कोर्स,

शोधलं खूप टाईम्स मध्ये पण सापडला नाही सोर्स.

 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ छावणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

 

🌸 विविधा 🌸

☆ छावणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

दिवे लागणीची वेळ होती. मी गॅलरीत उभे राहून समोर अथांग पसरलेली वनराई पहात होते. बर्‍यापैकी अंधारून आले होते. पानगळ झालेल्या झाडांतून पलिकडे कैगा धरणावरील (कर्नाटक) दिवे लुकलुकताना दिसत होते. डोंगराआडून चंद्राची स्वारी डोकवत येत होती. आकाशात एक एक चांदणी उगवत आपली हजेरी लावत होती.  दोन दिवसातच पौर्णिमा असल्यामुळे चंद्राची,  टपोऱ्या चांदण्यांची रूपेरी चादर हिरव्या झाडांवर पसरली होती.

दिवसभराची किलबिल घरट्यात विसावून शांत झाली होती. नाहीतरी विविध पक्षांचे वेगवेगळे आवाज ऐकून कान तृप्त होतातच. आपल्या गावापासून, माणसांपासून दूर असल्यामुळे मनात निर्माण झालेली हुरहूर, त्यांच्या दूर असण्यामुळे मनाला  जाणवणारी उणीवेची भावना पक्षी, प्राणी, घनदाट पसरलेली ही हिरवीगार वनराई यांच्यामुळे  काहीशी कमी होते  हे ही तितकेच खरे .

कैगा धरणापासून दोन कि.मी. अंतरावर आमची छावणी होती. एका डोंगराच्या पायथ्याला वसलेली. समोर दूरवर पसरलेला निसर्ग म्हणजे ‘देवाने सढळ हाताने रेखाटलेली अतिसुंदर चित्रकृतीच. उंच उंच डोंगर, दऱ्या-खोऱ्यातून पसरलेली हिरवाई पाहून मन सुखावते, तृप्त होऊन जाते.

आजही मी अशीच टपोऱ्या चांदण्यात उजळलेला निसर्ग पहात  उभी होते. गॅलरीतून पहाता पहाता समोरून अनशी घाटातून उतरत असलेल्या वाहनांच्या दिव्यांचे प्रकाश झोत  दिसले  आणि गावाकडे जाणारा रस्ता डोळ्यांसमोर उभा राहिला.  एकदम मन उदास झाले. या घाटातूनच आम्ही आमच्या गावाकडे ये जा करत असतो..

आमचे छावणीतले जीवन आणि गाव यात किती फरक असतो नाही, या विचाराने मन हेलावून गेले. माझे पती पंधरा दिवसांसाठी आऊट ड्युटीवर गेले होते.  मी आणि माझी मुलगी,  आम्ही दोघीच होतो. मनात आले आपल्या गावापासून दूरवर प्रत्येक जवान असे कितीतरी डोंगर ओलांडून जात, येत असतो.  देशासाठी प्रवास करत असतो. छावणीत आपला परिवार आणतो, आपला संसार थाटतो. कधी येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर, परिस्थितीवर मात करत परिवार सांभाळतो.  कधी तर अशी परिस्थिती येते की ,  नोकरी एकीकडे असते तर  परिवार दुसरीकडे असतो. पण तो येणाऱ्या प्रत्येक संकटास धैर्याने तोंड देतोच. ना कधी देशसेवेत कमी पडतो ना कुंटुबाच्या कर्तव्यात कमी पडतो..  प्रत्येक  जवान देश आणि आपला परिवार अशी दोन्ही कर्तव्ये अगदी व्यवस्थित पार पाडत असतो..

कधी आउट ड्युटीवर परिवार सोडून बाहेर जावे लागले तर जवानाच्या अर्धांगिनीला आपल्या मुलांसाठी हिरकणी व्हावेच लागते.

छावणी हा मात्र जवानाचा विसावा असतो. देशाच्या विविध राज्यांतून, कित्येक गावातून येणारे जवान आणि त्यांचे  परिवार मिळून  आमची छावणी होते.  वेगळी भाषा, वेगळे पेहराव , वेगवेगळे खाणे-पिणे, आचार,विचार  अशी कितीतरी गोष्टींत विविधता असते. हीच आमची विविधतेतून एकता दर्शवणारी आमची भावकी. छावणीच्या गेटमधून आत येताच इथे प्रत्येकांत आपलेपणाची भावना असते. घर सरकारीच असते पण ते’ माझे घर ‘ आहे अशी आपलेपणाची भावना छावणीत येताच प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. नाती रक्ताची नसतात, पण अडी-अडचणीत  एकमेकांना साथ देणारी, एकमेकांसाठी धावून जाणारी असतात. सण,  उत्सव सगळे मिळून साजरे करतात. एकमेकांच्या विविध सण उत्सवात सर्वजण एकत्र येतात, मिळून सण साजरे करतात. असे विविधतेतही एकोप्याचे , एकात्मतेचे वातावरण छावणीच निर्माण करू शकते. आपण गावाकडे एका गावात एका भावकीत सुद्धा असे मिळून-मिसळून, एकोप्याने  रहात नाही . मनात इर्षा,  वैरभाव ठेवून रहातो, तसेच वागतो . पण छावणीत येताच छावणी एकीने रहायची शिकवण देते. तीन – चार वर्षांत बदली होते.  जिवाभावाचे नाते निर्माण झालेले लोक दूर जातात. एकमेकांचे निरोप घेता-देताना कुणी आपलेच जवळचे दूर जातेय या भावनेने मने कष्टी होतात, प्रत्येकाचे काळीज पिळवटून जाते. . निरोपाच्या वेळी खोलवर मनात रुतून बसणारे दुःख होते. तीन-  चार वर्षांनी येणाऱ्या बदल्या, पुन्हा नवीन राज्य, नवा प्रदेश, नवा गाव, हवा,  पाणी,  संस्कृती, भाषा सगळे काही नवं, निराळे.  छावणी जाणाऱ्याला जड अंतःकरणाने  निरोप देते. येणाऱ्याचे आनंदाने स्वागत करते. पण प्रत्येक  जवानाला या सगळ्यांशी जुळवून घेत नवी छावणी शोधावीच लागते.

प्रत्येक जवान या छावणीत रूळत असला तरी एक स्पष्ट करावे वाटते. देशासाठी लढणारा जवान हा आपल्यामागे आपले आई-वडील, भाऊ, बहिण,  कितीतरी जिवाभावाची माणसं  सोडून आलेला असतो. पण आपल्या घरापासून ते गल्लोगल्लीतला आख्खा गाव, दूर आलेल्या जवानाच्या डोळ्यांत सदा उभा असतो, दाटून राहिलेला असतो हे ही खरे आहे. मायभूसाठी लढण्याचे बळ, जन्मभूमीकडे परत येण्याच्या सुखद हिंदोळ्यातूनच मिळते. आख्खा गाव नजरेत भरून छावणीत राहणाऱ्या जवानाला, त्याचा गाव किती आठवणीत ठेवत असतो हे गावच जाणत असेल.

किती वेळ मी छावणीच्या विचारचक्रात गॅलरीतच उभी होते. समोरच्या घाटातून गावाकडे जाणारा रस्ता पहात माझाही गाव आठवणीच्या हिंदोळ्यात मनात रुंजी घालत होता. इतक्यात रात्रपाळीला जाणाऱ्या एका जवानाला खिडकीतून “बाय बाय “केलेला आवाज कानावर आला आणि मी विचारातून भानावर आले.

मनाला मात्र एक सत्य स्पर्शून जाते की ही छावणी हेच आपले गाव, इथले सदस्य, इथले परिवार हेच सगे-सोयरे, आणि हीच नातीगोती. या घनगर्द जंगलातील प्राणी, उंच उंच गगनाशी भिडणाऱ्या झाडे- वेली, आनंदाने बागडणारे पक्षी हेच आपले जीवन. कधी इथली छावणी  आपली होऊन गेलेली असते तर कधी दुसर्‍या ठिकाणची छावणी.……

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares