मराठी साहित्य – विविधा ☆ जरतारी हे वस्त्र मानवा… — लेखक – श्रीनिवास बेलसरे ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? विविधा ?

☆ जरतारी हे वस्त्र मानवा… — लेखक – श्रीनिवास बेलसरे ☆ डॉ. ज्योती गोडबोले

‘जगाच्या पाठीवर’ हा आजही अनेकांच्या स्मरणात असलेला सिनेमा आला होता १९६०ला. म्हणजे तब्बल ६२वर्षापूर्वी! त्यातली जवळजवळ सर्वच गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. गीतकार होते ग.दि.मा.! या सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जसे मनोजकुमारच्या सिनेमात ‘सबकुछ मनोजकुमार’ असे असते तसेच इथे राजा परांजपे यांचे होते. दिग्दर्शक राजा परांजपे, लेखक राजा परांजपे आणि निर्मातेही राजाभाऊच!

तशी त्याकाळी राजाभाऊ परांजपे ही मोठी हस्ती होती. त्यांच्या कोणत्याच सिनेमात सिनेमाचे संवादलेखन कुणीतरी मुद्दाम केले आहे, पटकथा कुणीतरी ‘रचली’ आहे, चटकदार संवाद जाणीवपूर्वक ‘पेरले आहेत’ असे वाटतच नसे. एखाद्या ठिकाणी, एखाद्याच्या घरात किंवा एखाद्या कार्यालयात अगदी नैसर्गिकपणे जे घडू शकते तेच राजाभाऊंच्या सिनेमात दिसायचे. जणू राजाभाऊ कोणतीही तयारी न करता अशा एखाद्या ठिकाणी नुसते हळूच कॅमेरा घेऊन गेलेत आणि त्यांनी तिथे जे घडले ते सगळे शूट करून आणले, असेच वाटायचे! इतका त्यांचा सिनेमा खरा वाटे!

या सिद्धहस्त मराठी कलाकाराने एकूण २९ सिनेमांचे दिग्दर्शन केले आणि २० सिनेमात तर स्वत: कामही केले. आज किती मराठी प्रेक्षकांना हे माहित असेल की ‘मेरा साया’ (१९६६) हा हिंदी सिनेमा राजाभाऊंच्या ‘पाठलाग’ (१९६४)चा रिमेक होता! येत्या २४ एप्रिलला राजा परांजपेंचा ११३वा वाढदिवस येतो आहे. ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पाठलाग’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘आधी कळस मग पाया’, ‘सुवासिनी’, ‘पडछाया’, ‘आधार’, ‘ऊन पाउस’, ‘पुढच पाउल’ असे एकापेक्षा एक सिनेमे देण्या-या या मराठी कलाकाराची आठवण निदान मराठी चित्रपट सृष्टीत तरी कितीजण ठेवतात बघू या!

‘जगाच्या पाठीवर’ची सगळी गाणी गदीमांनी अर्थात मराठीच्या वाल्मिकी मुनींनी लिहिली होती. एकेक गाणे ऐकले की गदीमांना त्रिवार वंदन करावेसे वाटते. केवढी प्रतिभा, केवढी अचाट कल्पनाशक्ती, कसल्या चपखल उपमा आणि केवढे महान तत्वज्ञान गाण्यातल्या चार शब्दांच्या पेन ड्राईव्हमध्ये कोंबून बसवायची त्यांची जादू! गदिमांना शब्दप्रभू नाही म्हणायचे तर कुणाला? या सिनेमात गदिमांनी चक्क एक छोटीशी भूमिकाही केली होती. सिनेमात सुधीर फडके यांनी गायलेले एक अत्यंत सुंदर गाणे होते-

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…’

हे त्या वेळच्या समाजाचे सर्वसाधारण वास्तव गदिमांनी नेमक्या शब्दात पकडले होते. त्या गाण्याशी सर्वांना आपली परिस्थिती जुळवून घेता यायची आणि कदाचित म्हणूनच ते अतिशय लोकप्रियही झाले होते. हल्ली जसे गगनचुंबी इमारत बांधताना मोठमोठ्या यंत्राचा वापर होतो, प्रचंड लोखंडी फाळ जमिनीत घुसवून मोठमोठ्या यंत्रानीच माती उपसली जाते, खोल पाया खणला जातो, तसे औद्योगिक जगाने त्याकाळी आपली राक्षसी नखे भूमातेच्या पोटात खुपसून तिची आतडी बाहेर काढून भौतिक सुबत्ता वाढवलेली नव्हती!! त्यामुळे माणसाच्या जीवनात ‘एकच धागा’ सुखाचा असे. दुखाचे धागे मात्र शंभर असायचे! कारण सगळ्याच गोष्टींची कमतरता होती. वस्तू कमी, नोक-या कमी, पगार कमी, दळणवळ कमी, सुखाची सगळीच साधने कमी. त्यामुळे ‘चित्ती कितीही समाधान’ असले तरी भौतिक सुखाची वानवाच होती. म्हणून कवी गदिमांनी म्हटले होते-

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे… जरतारी हे वस्‍त्र माणसा तुझिया आयुष्याचे..’

इथे गदिमा समग्र जीवनाचे तत्वज्ञान एका अगदी वरच्या पतळीवर जाऊन सांगत आहेत. ते म्हणतात, ‘मानवा, तुझ्या आयुष्याचे वस्त्र हे दोन धाग्यांनी विणलेले आहे. त्यात एक धागा सुखाचा आहे आणि शंभर धागे दु:खाचे आहेत. तू जरी या जगात असे हे जरतारी वस्त्र पांघरत असला तरीही येताना तू उघडाच येतोस आणि हे जग सोडून जातानाही तू उघडाच असतोस.’ खरे तर श्रीकृष्णाने गीतेत ज्याला ‘आत्म्याचे वस्त्र’ म्हटले आहे ते शरीरही आपण इथेच सोडून जात असतो. मग ‘या जगातल्या व्यर्थ बडेजावासाठी कशाला खोट्या स्वप्नात रंगतोस रे?’ असा त्यांचा प्रश्न आहे. 

‘पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा.     कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे.’

आपली उपमा अधिक स्पष्ट करताना गदिमा किती चित्रमय शैली वापरून सगळे समजायला सोपे करून टाकतात ते पहाणे मोठे रंजक आहे. त्यांनी अलगद शेक्सपियरने आयुष्याला दिलेली तीन अंकी नाटकाची उपमा सूचित केली आहे.

गदिमा म्हणतात लहानपणी बाळाला कौतुकाने जी अंगडी-टोपडी घालतात ती जणू शरीराचीच प्रतीके आहेत. त्या बाळाला काही कळत नसते. आईवडील आजी आजोबा कौतुकाने जे काही घालतील त्यात ते खुश असते. मात्र तरुणपणी एकंदरच शारीरभावना सर्वार्थाने तीव्र होते. आपले शरीर हा आपला प्रेमविषय झालेला असतो. मग यौवनातील व्यक्ती हौशीने रंगीबेरंगी कपडे परिधान करते. पण कपडे म्हणजे केवळ वस्त्रे का? कविता गदिमांची आहे, त्यांना एवढा मर्यादित अर्थ कसा अपेक्षित असेल? त्यांचा अंगुलीनिर्देश आहे तारुण्यातील आसक्तीकडे, विषयात रममाण होण्याच्या वृत्तीकडे! त्याचे वर्णन ते फक्त तीन शब्दात करतात ‘रंगीत वसने तारुण्याची’.

‘मुकी अंगडी बालपणाची.. रंगीत वसने तारुण्याची..जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे’

गदिमांची प्रत्येक उपमा किती यथार्थ आहे ते पहा! म्हातारपणी शरीर थकलेले असते, ते झिजलेले, आकसलेले, छोट्याशाही आघाताला बाध्य झालेले असते. म्हणून ते वृद्धपणातील शरीराला जीर्ण शालीची उपमा देतात.  

शेवटी कवी स्वत:च अंतर्मुख होतो कारण त्याला श्रोत्यालाही अंतर्मुख करायचे आहे. शेवटच्या कडव्यात काहीशा स्वगतासारख्या ओळीत तो स्वत:लाच विचारतो? ‘हे माणसाच्या जीवनाचे असे सुखदुखाचा असमतोल निर्माण करणारे वस्त्र निर्माण करतो तरी कोण?’ तरीही किती विविधता असते या वस्त्रांत! कोणत्याच दोन माणसांचे आयुष्य सारखे असत नाही. अगदी जुळ्या भावंडातही काही ना काही वेगळेपणा असतोच.

इथे गदिमा थांबतात आणि स्वत:च पुन्हा स्वत:च्या प्रश्नाचे उत्तर देतात. तेच म्हणतात, युगानुयुगे माणसांच्या कोट्यावधी पिढ्यांच्या आयुष्याची वेगवेगळी वस्त्र विणणारा तो ‘वरचा’ विणकर तर अदृश्यच आहे. अखंड चालणारे त्याचे हातही अदृश्यच आहेत-

‘या वस्‍त्रांते विणतो कोण? एकसारखी नसती दोन. कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे.’

असे अगदी साधेसाधे विषय घेऊन जुने कवी त्यातून जीवनाचा केवढातरी गूढ अर्थ सहज सांगून जात असत. म्हणून तर ही अनमोल गाणी आठवायची. त्यासाठीच तर आपला हा ‘नॉस्टॅल्जिया’!

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक – श्रीनिवास बेलसरे.

संग्रहिका – डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विठ्ठल गोरा की सावळा? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

??

☆ विठ्ठल गोरा की सावळा? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

भारतीय सनातन परंपरेतील विविध देवतांची नावे ही गुणदर्शक आहेत. शं म्हणजे शुभ;  शुभ करणारा तो शंकर, तर वर्णाने काळा असणारा तो कृष्ण , सुंदर व मोहक गर्दन असणारा तो सुग्रीव आणि रमविणारा तो राम. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.   शंकरांचे वर्णन कर्पूरगौरा म्हणजे कापरासारखा गोरा असे असून देखील काही चित्रकारांनी महादेवाला काळे दाखवून त्याचा कृष्ण वर्ण प्रचलित केला आहे. 

तसेच पांडु म्हणजे पांढरा किंवा गोरा; पांडुरंग या संज्ञेचाच अर्थ जो रंगाने गोरा आहे असा होतो.  असे असतांना  आजकालच्या बहुतेक साहित्यिकांनी विट्ठलाचे सावळा किंवा काळा असे वर्णन  का केले आहे हेच समजत नाही ! पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणातून बनविलेली असल्याने कदाचित हा अपप्रचार झाला असावा. तथापि तशा अनेक देवतांच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्याच असतात की !

माझे स्पष्ट मत आहे की विट्ठल ऊर्फ पांडुरंग ही देवता गोऱ्या रंगाचीच आहे.  

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – ‘गदिमांची आई !’— प्रत्यक्षातली व गाण्यातली… — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ – ‘गदिमांची आई !’— प्रत्यक्षातली व गाण्यातली… — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  

आईवर गदिमांचं अपार प्रेम ! त्यांची आई बनूताई ही विलक्षण करारी स्त्री. ‘माडगूळ्यात’ तिचा अतिशय दरारा. अख्ख्या गावात तिच्या शब्दाला वजन. नंतर ‘कुंडल’मधे रहाताना तर ती संपूर्ण कुटुंबाचं ‘कवचकुंडल’च बनली. एकदा, गदिमांच्या वडिलांना, गावच्या मामलेदारीण बाईनं घरचं पाणी भरायला सांगितलं म्हणून बनूताईनं चारचौघात तिला थप्पड मारली व ‘पुन्हा घरची कामं सांगायची नाहीत’ असा सज्जड दम भरला. आत्यंतिक गरिबीतही मुलांमधला स्वाभिमान तिनं जोपासला. पण एके दिवशी घरात खायला काहीच नव्हतं तेव्हा मठातल्या गोसाव्यासमोर पोरांसाठी पदर पसरण्यातही संकोच मानला नाही. ती स्वतः ओव्या रचत असे. गदिमा आपल्या गीतांना, ‘आईच्या ओव्यांच्या लेकी’ म्हणत असत. ‘वाटेवरल्या सावल्या’मधे त्यांनी आईच्या अनेक हृद्य आठवणी सांगितल्या आहेत. आईचं व्यक्तित्व असं प्रभावी असल्यानं, गदिमा मातृभक्त झाले नसते तरच नवल. 

सिनेगीतं ही कथानुसारी असतात हे खरंच. पण गदिमांचं ‘मातृप्रेम’ त्यांच्या गीतातून अगदी ठळकपणे जाणवतं.

वैशाख वणवा’ मधे ‘आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही’ हे गीत त्यांनी लिहिलं आहे. त्यात, 

‘नकोस विसरु ऋण आईचे

स्वरुप माऊली पुण्याईचे

थोर पुरुष तू ठरुन तियेचा 

होई उतराई’ 

अशा ओळी त्यांनी लिहिल्या. स्वतः ‘थोर पुरुष’ ठरुन मातृऋणातून ते उतराई झाले. 

‘खेड्यामधले घर कौलारु’ मधे ‘माजघरातील उजेड मिणमिण.. वृध्द कांकणे करिती किणकिण’ असे भावोत्कट शब्द लिहून ‘दूरदेशीच्या प्रौढ लेकराच्या’ वाटेकडे डोळे लावून बसलेली आई त्यांनी रंगवली.  ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गीत तर ‘मातृत्वाचं सायंकालीन स्तोत्र’च आहे. ‘लिंबलोण उतरु कशी असशी दूर लांब तू’  हे गाणंही आईच्या सनातन वात्सल्याचं हृदयस्पर्शी शब्दरुप आहे.

आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला‘ या बालगीतात, 

‘कुशीत घेता रात्री आई

थंडी वारा लागत नाही

मऊ सायीचे हात आईचे

सुगंध तिचिया पाप्याला’ 

हे शब्द लिहिताना त्यांना आपलं लहानपण आठवलं असेल का? 

‘वैभव’मधल्या ‘चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा’ या गाण्यात गीताची नायिका, ‘खिडकीतून हळूच डोकावून माझ्या माऊलीची मूर्त न्याहळा’ असं चंद्रकिरणांना विनवते. ‘पाडसाची चिंता माथी, करी विरक्तीची पोथी’ अशा ओळी यात गदिमांनी लिहिल्या आहेत. 

‘त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे’ हे संपूर्ण गीत रुपकात्मक आहे असं प्रतिपादन नरहर कुरुंदकरांनी केलं होतं. यात ‘वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे’ म्हणजे ‘वृध्द वडील’ आणि ‘कौलावर गारवेल वा-यावर हळू डुलेल’ मधली ‘गारवेल’ म्हणजे ‘आई’ असा अर्थ त्यांनी लावला होता. उन्हापावसापासून घराला आडोसा देणारी ही ‘गारवेल’ रंगवताना गदिमांच्या नजरेसमोर कदाचित ‘कुंडल’मधली ‘बनूताई’ही असेल. 

गदिमांच्या सिनेगीतात मातृमहात्म्याच्या अशा अनेक पाऊलखुणा आढळतील. त्यांची भावगीतं, कविता यातून तर असे भरपूर संदर्भ वेचता येतील. 

‘तुझ्या वंदितो माउली पाऊलांस’ ही ‘मातृवंदना’  तर त्यांनी खास स्वतःच्या मातेसाठीच लिहिली होती. 

‘धुंद येथ मी स्वैर झोकितो’ या गाण्यात ‘एकीकडे बाळाला अमृत पाजणारी आई आणि दुसरीकडे मद्यरुपी विष रिचवणारा तिचा पती’ असा पराकोटीचा विरोधाभास त्यांनी रेखाटला होता. आपल्या जीवनातदेखील असा दाहक विरोधाभास घडेल याची त्यांना कल्पनाही  नसेल. बनूताईना ‘आदर्श माता पुरस्कारानं’ गौरवलं जात असतानाच घरी त्यांच्या लाडक्या ‘गजाननानं’ … गदिमांनी या जगाचा निरोप घेतला. (14 डिसेंबर 77) केवढा हा दैवदुर्विलास !

गदिमांच्या अंत्यसंस्कारावेळी सुधीर मोघेंनी ‘मातृवंदना’ मधे चार पंक्तींची भर घातली…

‘क्षमा मागतो जन्मदात्री तुझी मी

निघालो तुझ्या आधी वैकुंठधामी’

सुखाने घडो अंतीचा हा प्रवास

तुझ्या वंदितो माऊली पाऊलांस !’

लेखक : धनंजय कुरणे

9325290079

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईची लेक…” ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईची लेक…” ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

मुलीची आई असणं किती भाग्याचं!

 

आई ग्ग.. चटका लागून जीव कळवळला..

इवलीशी पावलं स्टूल वर चढून बर्नोल घेऊन आली..

आई भाजलं ना तुला..

फुंकर घालत क्रीम लावलं ..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ,आई, थांब ती पिशवी दे माझ्याकडे..

तू पिल्लूला घेतलंय ना..

ओझं होईल तुला..

छोटासा का होईना पण भार हलका करून पळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

पिल्लू रडू नको ना..

आई येते आत्ता… अले अले..

गप बश..गप बश..

माझ्या माघारी ती आई झाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

चप्पल नाही घातलीस आई तू?

राहू दे.. मी जाईन स्कूल बस पर्यंत..

वजनदार दप्तर इवल्या खांद्यांवर चढवून तुरुतुरु गेली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

‘बाबा, आई चा बर्थडे आहे उद्या..

तिला मायक्रोव्हेव हवा आहे..

बुक करून ठेवा हां..

आणि साडी .. पिकॉक ग्रीन कलरची.. तिला हवी होती कधीची..’

आईची आवड तिला कळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ग, लग्नाला जायचंय ना तुला, साड्या प्रेस करून ठेवते आणि उद्या बॅग भरून देते..

शाळेच्या अभ्यासातही आई ची लगबग तिच्या लक्षात आली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

मामी, आईला ना सतरंजी नाही चालणार, गादी लागते, नाहीतर पाठ धरते तिची..

लेक्चर्स प्रॅक्टिकल, सबमिशनच्या धामधुमीत

आईची गरज तिने ओळखली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दादा, तू फराळाचं समान न्यायला हवं होतं.. किती आनंदाने केलं होतं तिने..

तेवढ्याचं ओझं झालं तुला. पण आई किती हिरमुसली!

आईची माया तिला उमजली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दुपारच्या निवांत क्षणी टीव्ही पाहताना अलगद डोळा लागला,

 ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये आलेली ती, मला पाहून पाय न वाजवता अंगावर पांघरूण घालून गेली,

शाल नव्हे, लेकीने मायची मायाच पांघरली,

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

लग्न, संसार, मूलबाळ, जबाबदाऱ्या, करिअर, सारं सारं सांभाळून  गोळ्या घेतल्यास का, बरी आहेस का, डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, दगदग करू नकोस, मी किराणा ऑर्डर केलाय..घरी येऊन जाईल, प्रवासाची दमलीयेस स्वयंपाक करू नको.. डबा पाठवतेय दोघांचाही, अजुन काय काय अन् काय काय..

लेक होती ती माझी फक्त काही दिवस..त्यानंतर तिच्यात उमटली आईच माझी..

मीच नाही, आम्हा दोघांचीही आईच ती..

लोक म्हणतात, देव सोबत राहू शकत नाही म्हणून आई देतो,

आई तर देतोच हो, पण आईला जन्मभर माय मिळावी म्हणून आईची माया लावणारी लेक देतो..

मुलगा हा दिवा असतो वंशाचा; पण मुलगी दिवा तर असतेच, सोबतच उन्हातली सावली, पावसातली छत्री, आणि थंडीत शाल असते आईची.. किंबहुना साऱ्या घराची…

हे शब्द तर नेहमीच वाचतो आपण, पण जाणीव तेव्हा होते जेव्हा आपलंच पिल्लू कोषातून बाहेर पडून पंख पसरू बघतं आपल्याला ऊब देण्यासाठी,

परी माझी इवलीशी खरंच कधी मोठी झाली कळलंच नाही…

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शतदा प्रेम करावे…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

? विविधा ?

☆ “शतदा प्रेम करावे…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रौढत्वी निज शैशवास जपणे; बाणा कविचा असे!

 वरील काव्यपंक्ती अगदी शालेय जीवनापासून ऐकत आणि वाचत आले आहे.निबंधात आणि भाषणात या ओळींचा वापर मी अगदी माझ्याच लिहिलेल्या असल्याच्या दिमाखात वापरून मोकळी होत असे. अगदी..

कवी चा बाणा असल्याच्या ताठ्यात!!

पण तुम्हाला सांगते..तेव्हा कधीच हा प्रश्न पडला नाही की…हा बाणा फक्त कविचाच कां ?

पण आज प्रौढत्वी या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटलं.

 आतापर्यंत जगलेलं…भोगलेलं…घालवलेलं..

वाट्याला आलेलं..आणि उपभोगलेलं

असे सगळेच कंगोरे दृष्टीस पडले आयुष्याचे!! बालदिनाच्या निमित्ताने..व्हॉट्स ॲपवर फिरणार्या पोस्ट्स मधून डोकावणारं…डोळे मिचकावून हसणारं..खोड्याळ आणि खट्याळ..

गोडुलं बालपण दिसलं…आणि आलेलं प्रौढत्व शैशव जपण्यास सिद्ध झालं की!!

 बालपण आणि कविचा बाणा यांचा काही अन्योन्य संबंध आहे कां बरं?

आणि मग माझी स्वारी निघाली की कविच्याच मदतीने…कवी यशवंत देव यांच्या मदतीने..कवितेच्या गर्भात शिरूनी भावार्थाला भिडायला!*

शब्दांच्या पलीकडले स्पंदन..

शब्दांतूनच ओवायला!!*

 बालपण…..निर्व्याज, निरागस, निरामय, नितळ अशा वृत्तींचा देखणा आविष्कार!! बालकाचं मन सतत कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात..विक्रमराजाच्या मानगुटीवर च्या वेताळा सारखं!

सतत कुतुहल, औत्सुक्य, जिज्ञासा,

त्यामुळेच सतत खळखळ वाहणार्या

पाण्याच्या प्रवाहा सारखं…निर्मळ, नितळ…अगदी तळ दिसावा इतकं!!!

कविचं मन ही असंचं….सतत अंतस्थ मनाची साद ऐकणारं, मनात उत्स्फूर्त विचारांचा धबधबा पेलून धरलेलं,

निसर्गा च्या हाका ऐकणारं, गूज, गूढ उकलण्या साठी धडपडणारं…निर्व्याज मन!! नव्या युगातील नव्या मनूचा शूर शिपाई बनून उभं ठाकणारं मन!!

(आई मला छोटीशी बंदूक दे ना! आठवलं ना बालगीत?)

तीच जिज्ञासू वृत्ती…अगदी..

को ऽहम् ते सोऽहम् चा शोध लागेपर्यंत चा शोध लागेपर्यंतची ओढ जपणारं मन!!

बघा…निराश, हताश, हतोत्साहित झाला असाल तर…लहान बालकांत बालक होऊन रमून पहा…एखादी कविता वाचून पहा….मग बघा…

ते बालपण…ती कविता तुमच्या रोमा-रोमांत संचरित होत झिरपत जातं…आणि थकलेल्या मनाला म्हणजेच पर्यायाने शरीरालाही कशी उभारी येते ती!!

नव्याने प्रेमात पडाल या जगण्याच्या..

आणि म्हणाल…” या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!!”👍🏻

आणि मग या प्रौढत्वी ही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतला…अगदी तुमच्याच आसपास असलेला आनंद सापडेल.एक आगळंच समाधान मिळेल. संतोष पावेल मन!!तृप्त मन,

आनंदी मन..मग आपोआपच निरोगी शरीर…तृप्त आत्मा!!

मग हा आत्मा आत्मरंगी रंगून…रामरंगी रंगायला मोठ्या समाधानाने तयार न झाला तरच नवल!!!!

म्हणूनच…कविमनाने…जिगिविषु वृत्तीने…प्रौढत्वी निज शैशवास जपण्याची खिलाडू वृत्ती अंगी बाणण्यास..सज्ज होऊ या कां??

चला तर मग…” ले शपथ..ले शपथ!

 भले ही हो…अग्निपथ! अग्निपथ!

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जेवणात जर मीठ बरोबर असलं तर मिठाची आठवण कोणालाच येत नाही. परंतू हेच मीठ मात्र कमी पडलं की च्च…च्च…म्हणत सगळ्यांची मीठ शोधायची धांदल सुरू होते….! 

आपलं आयुष्यही या मिठासारखंच असावं…! 

…. आपल्या असण्याची जाणीव कोणाला असो किंवा नसो, परंतु आपल्या नसण्याची उणीव कोणाला तरी भासणे हे खरं सुख !…… मात्र, ज्यांच्या असण्या आणि नसण्याचं सोयर सुतक कोणालाच नाही….असे अनेक जण मला या महिन्यात भेटले…! 

त्यापैकीच या चौघी….

१. एक अंध ताई, डोळ्यातील ज्योत पूर्णपणे विझली आहे, परंतु मनातला अंगार मात्र विझलेला नाही…. 

—शिवाजीनगर परिसरात भीक मागायची. जिथे ती भीक मागायची, तिथेच तिला खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.

२. दुसरी एक दिव्यांग ताई… तिचे पती सुद्धा दिव्यांग आहेत. एकमेकांच्या साथीने आयुष्याचं ओझं डोक्यावर पेलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतू दरवेळी ते शक्य होत नाही, म्हणून ही ताई भीक मागायची…..

— हिला एक wheel chair दिली आहे. Artificial Jewellery त्याचप्रमाणे स्त्रियांची इतर प्रसाधन साधने तिला विक्रीसाठी घेऊन दिली आहेत. नानावाडा परिसर, तसेच शनिवार वाडा परिसर येथे ती आता हा व्यवसाय करू लागली आहे. 

३.  भवानी मातेसमोर जोगवा मागणारी ही तिसरी मावशी… कोणाच्याही आधाराशिवाय जगते आहे. तिला आपण भाजी, तसेच फळं विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे–= त्यासाठी तराजू, वजन काटे, इत्यादी सर्व साहित्य घेवून दिले आहे. कॅम्प, भवानी पेठ, तसेच पुण्यातील राजेवाडी परिसर येथे तिने फिरून विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

४. एक तरुण महिला शनिपार मंदिर, बाजीराव रस्ता येथे भीक मागत होती, त्याच परिसरात तिला खेळणी विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे. 

…… या महिन्यात “महिला दिन” होता हा फक्त योगायोग ! 

“दीन” असणाऱ्या महिलांना, तुम्ही सुद्धा “माणसं” आहात याची जाणीव करून देत, आम्ही रोजच महिला दिन साजरा करत आहोत. 

कोणताही समारंभ नाही… “हार – तुरे” नाहीत…! 

…. आयुष्यात जगताना, कायम ज्यांची “हार” झाली, अशा दुर्दैवी आयुष्य जगणाऱ्यांना… पुन्हा गळ्यात “हार” घालण्याचं प्रयोजन काय…? 

…. खाली झुकलेली मान, जेव्हा सन्मानाने ताठ होते, त्यावेळी आमच्यासाठी तोच सण असतो… समारंभ असतो… महिला दिन तोच असतो….! आठ मार्चला आम्ही महिला दिन साजरा करत नाही…. तर तो रोज रोज जगतो…!!! 

५. याच महिन्यात रंगपंचमी येवून गेली…! आयुष्य रंगपंचमी सारखंच आहे…. कितीकदा चेहऱ्यावर रंग चढतो आणि कितिकदा परिस्थिती तो उतरवून टाकते…

…… असेच रंग उडालेले… पाय मोडून रस्त्यात खितपत पडलेले ते दोघे….! 

यांच्यावर आधी उपचार केले, दोघांनाही व्हीलचेअर दिल्या. त्यातील एकाच्या अंगी दाढी कटिंग करण्याचे कसब होते, त्याला लागणारे सर्व साहित्य घेऊन दिले. दुर्गंधीत असणाऱ्या आमच्या भिक्षेकर्‍यांचीही दाढी कटिंग करायला कोणी पुढे येत नाही…. मग यालाच आम्ही आमच्या भिक्षेकर्‍यांची दाढी कटिंग करायला लावून पगार द्यायला सुरुवात केली… ! 

…. इकडे “याला” रोजगार मिळाला तिकडे “ते” स्वच्छ झाले…

It’s our Win – Win situation….!!! 

६. दुसऱ्या एका व्यक्तीचा पूर्वी पायपुसणी विकायचा व्यवसाय होता… एक्सीडेंट होऊन, रस्त्यावर आल्यानंतर तो स्वतःच “पायपुसणं” होऊन बसला…

…. आता, पायपुसणी विकायचा व्यवसाय याला पूर्ववत टाकून दिला आहे…. ! पर्वती पायथा परिसरात तो फिरून हा व्यवसाय करत आहे…. 

…. या रंगपंचमीत आम्ही त्या अर्थाने जरी रंग खेळलो नाही… तरी, ज्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले आहेत, अशांच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाचा एक तेजस्वी रंग मात्र नक्की लावला आहे…. ! 

“भिकारी” या शब्दांची लक्तरं आम्ही होळीच्या आगीत अर्पण केली आहेत…. ! 

७. एक अपंग आजी... जंगली महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भीक मागते…! 

….. या महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर… तिला एक व्हीलचेअर आणून दिली…. त्यावर तिला व्यवस्थित बसवलं, आणि तिच्या पायाशी वजन काटा ठेवला… तिला सांगितलं, ‘ लोक येतील, यावर आपलं वजन करतील आणि तुला पैसे देतील ‘…… अर्थातच बोहनी (भवानी) करण्याचा मान मला मिळाला…. ! 

८. पूर्वी पती असतांना सुस्थितीत असणारी एक मावशी…. पती अचानक गेल्यानंतर, सर्व काही बिघडले…. शनिपार येथे मग गळ्यात माळा घालून भीक मागायला सुरुवात केली… तिला स्वतःला भीक मागायची लाज वाटत असे… परंतु उपाशी पोटाला कुठं लाज असते ? अनेकांनी तिला अनेक सल्ले दिले…. परंतू भरल्या पोटानं दिलेला सल्ला, उपाशी पोटाला कधीही पचत नाही…! गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासाठी, पूजा करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात या सर्व वस्तू, सणाअगोदरच या मावशीला घेऊन दिल्या आहेत… जेणेकरून ती या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करू शकेल…. ! 

या विक्रीतून जमा झालेल्या भांडवलातून आम्ही आता दुसरा कायमस्वरूपी व्यवसाय सुरू करणार आहोत. 

९. नवऱ्याने सोडून दिलेली बाळासह रस्त्यावर राहणारी एक ताई…. ! 

…. आमचा अन्नपूर्णा प्रकल्प चालवणारे, श्री अमोल शेरेकर यांचा मला एके दिवशी फोन आला, ‘ सर, या ताईचं काय करू ? ‘ 

.. मी विचार करून उत्तर देईपर्यंत ते म्हणाले, ‘ मी जिथे राहतो त्याशेजारी एक रूम खाली आहे. आपल्याला फक्त डिपॉझिट आणि या महिन्याचे भाडे आणि किराणा भरून द्यावे लागेल. माझ्या नजरेत एक काम आहे, मी या ताईला तिथे कामाला लावतो…. मार्च नंतर एकदा का हिला पगार मिळायला लागला, की मग आपल्यावर आर्थिक जबाबदारी राहणार नाही.’ 

…. मी काहीही बोलण्याअगोदर माझा होकार गृहीत धरून श्री अमोल शेरेकर कामाला लागले….

त्या रूमचे डिपॉझिट, मार्च महिन्याचे भाडे आणि किराणामाल भरून दिला आहे…. ! 

…. ही ताई स्वाभिमानाने एका कंपनीत आता छोटा जॉब करते, आज ३१ मार्चला तिचा पगार होईल…. ! 

कोणाच्याही आधाराशिवाय ती ताई तिच्या बाळासह स्वयंपूर्ण होईल….! 

.. या ताईला मी सांगून ठेवलं आहे, बाळ जेव्हा शाळेत जायच्या वयाचं होईल, तेव्हा मला सांग. संपूर्ण शाळेची जबाबदारी आमची…. ! 

… कृतज्ञतापूर्वक ती म्हणाली, ‘ उद्या एक तारीख आहे. आज माझा पगार होईल, आता माझा बोजा कोणावर पडणार नाही. मी खूप खूष आहे…’ असं म्हणून ती ओक्साबोक्षी रडायला लागली… ! 

…. आज प्रथमच कोणीतरी रडत होतं आणि तरी मी मनापासून हसत होतो…. ! अर्थात हे सर्व श्रेय श्री. अमोल शेरेकर यांचं, मी फक्त माध्यम होतो…. श्री अमोल शेरेकर यांचा मला अभिमान आणि कौतुक आहे ! 

…. या तिघींच्याही मनात “आत्मविश्वासाचा ध्वज” उभारून दिला आहे…. 

…. “प्रतिष्ठेच्या पताका” दारात नाही… पण मनात लावल्या आहेत…

…. नवीन जोमानं आयुष्य जगण्याची “गुढी” आम्ही उभारून दिली आहे…. 

…. नुसतं “नवीन वर्ष” नाही तर त्यांना “नवीन आयुष्य” सुरू करून दिलं आहे…

…. त्यांच्या आयुष्यातल्या “कडू आठवणी”…. कडुनिंबाचं पान चावता चावता, कधी गोड होऊन गेलं कळलंच नाही…. ! 

अशात भर दुपारी आईचा फोन आला, ‘अरे, येतो आहेस ना ? किती उशीर ? आज गुढीपाडवा आहे… घरची पूजा तुझ्या वाचून खोळंबली आहे…! ‘

…. पूजा माझ्या वाचून खोळंबली आहे…??? मला गंमत वाटली….

‘अजून कुठली पूजा राहिली आहे ?’ मी आईला हसत म्हणालो. 

‘ म्हणजे ?’ तिने भाबडेपणाने विचारले….

पूजा…पूजा…. म्हणजे काय असतं…. ? 

पूजा ज्यावेळी भुकेत शिरते त्यावेळी ती “उपवास” होते….

पूजा ज्यावेळी अन्नात शिरते, त्यावेळी ती “प्रसाद” होते…. 

पूजा ज्यावेळी पाण्यात शिरते, त्यावेळी ती “तीर्थ” होते…

पूजा प्रवास करते, तेव्हा ती “वारी” होते….

पूजा घरात येते, तेव्हा ते घर “मंदिर” होतं….

पूजा जेव्हा डोक्यात शिरते तेव्हा ती “नामस्मरण” होते…

पूजा जेव्हा हृदयात शिरते तेव्हा ती “अध्यात्म” होते…

आणि पूजा जेव्हा हातात शिरते, तेव्हा ती “सेवा” होते… !!! 

— आता अजून कुठली पूजा मांडू… ???

माझ्या या पुजेमध्ये आपण दिलेल्या समिधाच अर्पण केल्या आहेत…. आणि म्हणून भिकेच्या आणि लाचारीच्या दलदलीमधून बाहेर निघालेल्या, “त्या” जीवांनी दिलेल्या आशीर्वादाचा प्रसाद, लेखाजोखाच्या रुपाने आपल्या पायाशी अर्पण करतो…. गोड मानून घ्यावा ! 

प्रणाम 

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “श्री कलमपुडी राव…” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ “श्री कलमपुडी राव…”  ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

कलमपुडी राव, वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होऊन अमेरिकेत नातवंडांना सोबत मुलीकडे रहायला गेले. तिथे वयाच्या ६२ व्या वर्षी पिटसबर्ग विद्यापीठात संख्याशास्र विषयाचे प्राध्यापक तर वयाच्या ७० व्या वर्षी पेनसुलव्हाणीया विद्यापीठात विभाग प्रमुख. वयाच्या ७५ व्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व. वयाच्या ८२ व्या वर्षी National Medal For Science हा व्हाईट हाऊस चा सन्मान.

आज वयाच्या १०२ व्या वर्षी संख्या शास्र (Statistics) विषयातील नोबेल पारितोषिक मिळालंय त्यांना.

भारतात सरकारने त्यांना पदम भूषण (१९६८) आणि पदम विभूषण (२००१) देऊन अगोदरच गौरविले आहे.

राव म्हणतात: “ भारतात सेवानिवृत्त झाल्यावर कोणी विचारीत नाही. अगदी शिपाई सुध्दा पदावर असेल तर नमस्कार करील. सहकारी देखील सत्तेचा आदर करतात, प्रज्ञेचा (scholarship) नाही.” 

वयाच्या १०२ व्या वर्षी, उत्तम शरीर प्रकृती असताना नोबेल मिळणं हे बहुदा पहिलं उदाहरण असावे.

मानवी प्रज्ञेची दखल घ्यावी अशी घटना !

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆  हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

काव्यानंद

☆तुकाराम गाथा – अभंग ☆

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥

बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

रसग्रहण 

मला जाणवलेला व उमगलेला अर्थ…….

मनाचा निर्धार आणि संपूर्ण श्रद्धा यांचा अर्थ प्रकट करणारा हा अभंग आहे.

आता हाच माझा नेम (निश्चय केला, व्रत घेतले  किंवा मी ठरवले ) आहे.गोविंदा जवळ आहे,तिथून माघारी फिरायचे नाही.

संसाराचा मोह धरायचा नाही.

त्या गोविंदाच्या घरात मोठ्या प्रयासाने ( जप,तप,नामस्मरण, सदाचारी वर्तणूक, भूतदया इ.मुळे) आले आहे.व माझ्या वर्तणुकी मुळे पट्टराणी झाले आहे. त्या सावळ्या परब्रह्माला मनापासून वरले आहे.आता तेथून माघारी फिरणे नाही.

त्या बलवान म्हणजे सर्वव्यापी,सर्वांना जीवदान देणारा,चिंता हरणारा व षडरिपूं पासून दूर नेणारा असा जो गोविंद आहे त्याचा सहवास लाभला आहे.म्हणून आता कोणतेही भय,चिंता राहिली नाही.

यात गोविंद हा शब्द अचूक वापरला आहे. गो म्हणजे गायी पण त्याचा अजून एक इंद्रिये असाही अर्थ आहे.गोविंद म्हणजे इंद्रियांचा व्यवहार जाणतो व त्याचे नियमन  ( इंद्रिय विषयी विचारांचे उन्नयन ) करतो.

“घररिघी झाले” या चरणात “बळे” म्हणजे बळजबरीने असा अर्थ नसून बळे म्हणजे जो सर्वशक्तिमान आहे त्याची पट्टराणी असा आहे.

या वर विचार केल्यावर असे लक्षात आले की ते जीव व आत्मा यांच्या संदर्भात बोलत आहेत.जो जीव आजवर द्वैताच्या भावनेने वेगळा रहात होता,तोच जीव आता आत्मस्वरूपाच्या आनंदाने सर्वशक्तिमान परब्रह्माशी एकरूप झाला आहे. व संपूर्ण स्वयंभू झाला आहे.

अशा सर्वसाक्षी सर्वव्यापी गोविंदा पासून दूर जायचे नाही. इतर कोणत्याच मोहपाशात परतायचे नाही.परत षडरिपूंच्या आहारी जायचे नाही.आता कोणतीच भय,चिंता राहीली नाही.असे तुकाराम महाराज म्हणतात.

हा अर्थ व्यक्ती परत्वे भिन्न असू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोणत्याही आजारावर औषध नकोच… लेखिका : डॉ..मनीषा सोनवणे ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ कोणत्याही आजारावर औषध नकोच... लेखिका : डॉ..मनीषा सोनवणे ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

कोणत्याही आजारावर औषध नकोच…. फक्त योग आसन….विश्वास ठेवा….

सप्रेम नमस्कार….

मी डॉ .मनिषा सोनवणे…! मेडिकल डॉक्टर …. आणि योग शिक्षिकाही ……!!! 

1999 साली डॉक्टर झाले तेव्हा असं वाटलं, की चला आता भराभर सगळे पेशंटस् बरे करण्याची  आपल्याला जादुची छडी मिळाली….मी हवेत होते….

पण दवाखान्यात प्रत्यक्ष पेशंटस् चेक करायला सुरुवात केल्यावर माझे पाय जमीनीवर आले…. 

कित्येक आजारांवर allopathy मध्ये औषधं उपलब्धच नाहीत…. जी औषधे आहेत त्यांचे साईड इफेक्ट्स इतके की भी क नको पण…..! कितीही औषधं दिली तरी तात्पुरतं बरं वाटून पेंशंट पुन्हा काही दिवसांनी दारात हजर…. देणेक-यांसारखा…. 

मी खूप विचार करायचे, यावर काय उपाय करता येईल… ?

मी स्वतः आयुर्वेद पारंगत असल्यामुळे allopathy च्या जोडीला आयुर्वेदिक औषधंही देवू लागले…. 

आता फरक थोडा जास्त होता… पण  चिवट आजार म्हणावे तसे काही पिच्छा सोडत नव्हते… पेशंटस्चा आणि माझाही….!

मग मी योगाचा आधार घेऊ लागले…. प्रत्येक आजारावर योगाचे एक आसन देऊ लागले… आणि काय आश्चर्य…. चिवट आजाराचा प्रत्येक पेशंट पुन्हा तोच आजार घेऊन यायचा बंद झाला की…. ! 

मग मी उलटा प्रयोग चालू केला… आजारांवर औषधी देण्याऐवजी मी फक्त योगाचे आसन सांगू लागले… आणि जवळपास प्रत्येक आजार हळुहळु बरा होऊ लागला… कुठल्याही गोळी औषधांशिवाय…

तशी मी डॉक्टर असूनही योग शास्त्रातली पदवी घेतली आहे, त्यानिमित्ताने या विषयाचा माझा ब-यापैकी अभ्यास झालाय.  शिवाय मुळात डॉक्टर असल्यामुळे योग आणि शरीर शास्त्र यांची मी सांगड घालायला लागले…. 

मी प्रयोग करत गेले, आणि १० वर्षांच्या माझ्या या प्रयोगातून मी माझ्यापुरतं एक टेक्निक डेव्हलप केलंय Disease wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने …. 

मग मी माझ्या पुण्यातल्या  पाषाणच्या योगा सेंटरमध्ये  केवळ Disease Wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने घेवू लागले…. एकही औषध न देता…..

… डायबेटीस, हृदयाचे आजार, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, कंबरदुखी, सायटिका, फ्रोझन शोल्डर, अती चिंता, तणाव, डिप्रेशन, पी. सी. ओ.डी., महिलांचे इतर आजार यावर एकही गोळी न देता केवळ योगाची ठराविक आसनं घेऊन  हे आजार बरे होतात यावर कुणाचाच विश्वास बसत नाही…. पण हे १०० टक्के खरंय…!!!

 योगासन ट्रीटमेंटपूर्वीचे रिपोर्टस् आणि योगासन ट्रीटमेंटनंतरचे रिपोर्टस् यात जमीन अस्मानाचा फरक असतो…. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे पेशंटस् च्या चेह-यावर रोगमुक्त झाल्याचं समाधान…. एका डॉक्टरला आणखी काय हवं असतं….? 

आपल्या या प्राचीन योगशास्त्राला अनुसरुन आपण आपली जीवनशैली ठेवली तर, कदाचित कोणत्याही आॕपरेशनची भिती भविष्यात उरणार नाही….!

जुनाट सर्दी, दमा, वजन वाढवणं किंवा कमी करणं, थायराॕइड … हे फक्त योगासनाने शक्य आहे. ? होय आहे….यामागे शास्त्रीय कारणं आहेत…. म्हणून हे आजार फक्त आणि फक्त योग्य पद्धतीने करवून घेतलेल्या  योगाच्या आसनाने बरे होतात….. १०० टक्के नाही… ११० टक्के …!!!

लोकांनी गोळ्या औषधींच्या नादी लागून हजारो रुपये घालवू नये….

गोळ्या औषधी घेऊन स्वतःच्या शरीराला प्रयोगशाळा बनवू नये… 

एक आजार बरा करण्यासाठी इतर १० आजार मागे लावून घेऊ नयेत …. 

याचसाठी हा सर्व लेखन प्रपंच …. !!! 

तेव्हा चला ….  योगासनाने सर्व आजार घालवू आणि तुमच्या सध्याच्या चालू असलेल्या गोळ्या औषधींना करु बाय बाय….कायमचा…..!!! 

लेखिका : डॉ..मनीषा सोनवणे

ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वर मंदीर समोर, सोमेश्वर वाडी, पुणे  मोब – 8308315494 / 9422017342

प्रस्तुती – डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ आयुष्य अजिबात कठीण  नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

कधी नळाला पाणी नसतं…

कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं…

 

कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .

कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .

 

कधी जागा नसते . .

कधी जागा असून स्पेस नसते . .

कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची ऊब नसते . .

 

कधी डब्यात आवडती भाजी नसते . .

कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . .

दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

 

कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . .

कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्यासारखे वाटते . .

 

कधी काही शब्द कानावर पडतात . .

कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .

 

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . .

कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

 

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . .

कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

 

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . .

कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

 

कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटू लागतो. .

कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

 

कधी पैसा असला, की नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली, की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत, म्हणून जीव हिरमुसतो

. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ?

 

ताण घेतला तर तणाव . .

आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते.

 

आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात रहावं

या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं ….  –

 

लेखक : श्री विजय बोंगिरवार

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares