मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – ३” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – ३ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(खरंच तसंच झालं होतं…. त्याच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली होती ! डॉक्टरसाहेबांनी त्याला धीर नसता दिला तर तो कदाचित घाबरल्याने आणखीन गंभीर झाला असता !) – इथून पुढे — 

दुसरी रात्र… पुन्हा एक चढाई.. आज आणखी एक शिखर काबीज करायचे होते…. जाताना एक सैनिक म्हणाला… ”जा रहा हूं साहब. ” त्यावर डॉक्टर साहेब सहज म्हणाले होते… ”देखो, जा तो रहे हो… लेकीन जीत के ही वापस आना!” तासाभरात तोच सैनिक जखमी होऊन उपचारासाठी परत आला! प्रचंड गोळीबारात त्याच्या कमरेला गोळी लागली होती… पण कमरेला बांधलेल्या गोळ्यांच्या सहा मॅगझीन (गोळ्या ठेवण्यासाठीची व्यवस्था) पैकी एका मॅगझीन मधल्या एका स्प्रिंगमध्ये ती गोळी अडकून बसली… हा बचावला! दुसरी गोळी डाव्या खांद्याला लागली…. हा उजव्या हाताने लढला… मग उजव्या हातालाही गोळी लागली… नाईलाज झाला! “साहब, मुझे पैरोंसे फायरींग सिखाई गयी होती तो मैं पैरोंसे भी लडता! लेकीन वापस नहीं आता… आप मुझे ठीक कर दो.. मै फिरसे जाना चाहता हूं लडने के लिये!”

एका सैनिकाच्या तर नाकात गोळी घुसली होती… त्याचे नाकच नाहीसे झाले होते… पण निष्णात डॉक्टर राजेश यांनी त्यालाही वाचवले… आता तो माजी सैनिक व्यवस्थित आहे.

हे एवढे देशप्रेम, एवढी हिंमत सैनिकांच्या मनात येते तरी कुठून हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीत आहे डॉक्टरांच्या मनातला. पण यातून एक निश्चित होते.. ते म्हणजे आपल्या देशाला अशा सैनिकांची वानवा नाही… आणि असणारही नाही!

आपल्या महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात एक गांव आहे.. आष्टी नावाचे. या गावाला शहीद आष्टी म्हणून इतिहासात ओळख आहे… १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात या गावातील पाच नागरीकांनी महाराष्ट्रात सर्वांत प्रथम प्राणांची आहुती दिली होती म्हणून हे गाव शहीद अर्थात हुतात्मा आष्टी! येथे एक हुतात्मा स्मारक उभारले गेले आहे. राजेश यांचा जन्म याच गावातला. वडील वामनराव डॉक्टर तर आईचे नाव कुमुदिनी. त्यांची शाळा या स्मारकामध्ये दरवर्षी स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रम करीत असे. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते गायली जात… शाळकरी राजेश या गाण्यांच्या वाद्यवृंदामध्ये बासरी वाजवणा-या मुलांच्या पहिल्या रांगेत असत. तिथूनच त्यांच्यावर देशप्रेमाचे संस्कार झाले. राजेश यांनी पुढे उत्तम शिक्षण घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजात एम. बी. बी. एस. साठी प्रवेश मिळवला आणि डॉक्टर झाले! समाजासाठी काही तरी उत्तुंग करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. आपण आय. ए. एस. अधिकारी व्हावं, ग्रामीण भागात जनतेची प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सेवा करावी, असे त्यांच्या मनाने घेतले आणि ते घरी न सांगता थेट दिल्लीला पळून गेले… तेथे त्यांनी आय. ए. एस. होण्यासाठीच्या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. दिल्लीत राहण्याची सोय नव्हती म्हणून खासदार महोदयांच्या निवासस्थानी मुक्काम केला. यु. पी. एस. सी. ची तयारी करीत असताना काही पैसे कमवावेत म्हणून त्यांनी तिथल्या सफदरजंग रुग्णालयात डॉक्टर म्हणून तात्पुरती नोकरी स्वीकारली.. दिवसातील जवळजवळ वीस तास ते डॉक्टर म्हणून सेवा बजावत. त्यातच त्यांच्या एका वरिष्ठ सहकारी डॉक्टरांनी त्यांना लष्करी डॉक्टर होण्याचा सल्ला दिला… आणि तीन हजार उमेदवारांमधून डॉक्टर राजेश आढाव पहिल्या साडेतीनशे मध्ये निवडले गेले. पहिलेच जबाबदारी मिळाली ती जम्मू-कश्मीर मध्ये तैनात असलेल्या १३, जम्मू & काश्मीर रायफल्सचे वैद्यकीय अधिकारी म्हणून. सुमारे आठशे ते हजार सैनिक-अधिकारी यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे काम! लवकरच डॉक्टर राजेश या कामांत रुळले… सैनिकी गणवेश अंगावर चढताच त्यांच्यातील देशभक्त, समाजसेवक पूर्ण जागा झाला!

जवान राजेश यांना डॉक्टर देवता म्हणून संबोधत असत. त्यांनी उपचार केले तर रुग्ण निश्चित जगतो.. असे ते मानीत असत. आणि ते खरे ही होते.. कारगिल लढाईत त्यांनी ९७ जवान आणि अधिकारी यांचे प्राण वाचवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यासाठी त्यांना विशेष सन्मान देण्यात आला!

सैनिकांचा खूप विश्वास त्यांनी कमावला होता. लढाईच्या काळात…. उंच पहाडावर असलेल्या सैनिकांना जेवण पोहोचवले जायचे. पहाटे बनवलेले खाद्यपदार्थ पहाडावर पोहचेपर्यंत खूप उशीर व्हायचा. एकदा भात दही असा बेत होता. तेथील वातावरणामुळे त्या भातावर असलेल्या दह्यावर एक वेगळाच थर दिसू लागला. जवानाना वाटले की दही खराब झाले… खायचे कसे? यावेळी डॉक्टर राजेश यांनी स्वत: ते दही खाल्ले… आणि म्हणाले… ”अगर मुझे आधे घंटे तक कुछ नहीं होता है.. तो यह दही खाने लायक है ऐसा समझो… ! ते पाहून ते भुकेलेले सर्वजण दही भातावर तुटून पडले! जवान मजेने म्हणायचे यह डॉक्टर साहब तो जादू टोना के डॉक्टर है!

एल. ओ. सी. कारगिल चित्रपटात मिलिंद गुणाजी यांनी डॉक्टर राजेश यांची भूमिका केली होती. विक्रम बात्रा साहेबांच्या जीवनावर आधारीत चित्रपटातही डॉक्टर राजेश यांची भूमिका दाखवली गेली आहे.

कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या पत्नी दिपाली या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. कारगिल मधून परतल्यावर 2 डिसेंबर २००१ रोजी डॉक्टर साहेब दिपाली यांचेशी विवाहबद्ध झाले… आणि तेरा दिवसांनी कर्तव्यावर पोहोचले… ऑपरेशन पराक्रम मध्ये भाग घेण्यासाठी!

त्यांचे चिरंजीव ओम एम. बी. बी. एस. चा अभ्यास करत आहे. ओम लहान असताना जेंव्हा राजेश साहेबांच्या कारगिलच्या कहाण्या ऐकायचा… तेंव्हा त्याला त्या ख-या वाटत नसत… पण तो मोठा झाला आणि त्याला आपल्या पित्याची महान कामगिरी माहीत झाली!

कारगिल लढाईत एका डॉक्टर साहेबांना गोळी लागून ते हुतात्मा झाल्याची बातमी पसरली होती. ही बातमी घेऊन जेंव्हा बातमीदार डॉक्टर राजेश यांच्या घरी पोहोचले तेंव्हा यांच्या मातोश्री यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते… त्या म्हणाल्या… आम्ही दूध विकतो.. त्यात मी कधी एक थेंब पाणी मिसळले नाही… माझ्या मुलाला असे काही होणारच नाही! आणि त्यांचे शब्द खरे झाले… डॉक्टर साहेब सुखरूप होते… बातमी अर्धवट होती… राजेश यांना बॉम्बमधील धारदार splinter लागून त्यांना जखम झाली होती! दुधात थेंबभरही पाणी न घालणे याचाच अर्थ पूर्ण प्रामाणिक व्यवहार! यातून संस्कारही दिसतात!

कारगिल युद्धावेळी captain असलले डॉक्टर राजेश पुढे कर्नल पदावर पोहचले… त्यांना सेना मेडल दिले गेले. अशी कामगिरी करणा-या मोजक्या आर्मी डॉक्टर्समध्ये राजेश साहेबांचा समावेश आहे.

पुढे कोरोना काळातही डॉक्टर राजेश यांनी सैन्याची काळजी यशस्वीरीत्या घेतली. त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले.

 २९ जानेवारी, २०२५… आफ्रिकेतील कांगो येथून एक बातमी आली… संयुक्त राष्ट्र शांतीसेनेत तिथल्या लष्करी रुग्णालयाचे प्रमुख कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या निवासस्थानाच्या कुंपणावर एक नव्हे तर दोन RPG अर्थात Rocket Propelled Grenade म्हणजे रॉकेटवर बसवून डागला जाणारा हातगोळा पडला! पण सुदैवाने राजेश साहेब केवळ दहा सेकंद आधीच तिथून बाहेर पडले होते! त्यांचे आई-वडील, पत्नी यांची पुण्याई थोर आहे.. हेच खरे!

काल ६ फेब्रुवारी रोजी कर्नल डॉक्टर राजेश आढाव साहेबांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त माहिती घेऊन हा लेख लिहिला आहे. यात चुका तर असतीलच. पण डॉक्टर साहेबांचा पराक्रम अधिक लोकांना माहीत व्हावा… म्हणून हे धाडस केले आहे. विविध मुलाखाती, बातम्या पहिल्या… आणि किंचित लेखन स्वातंत्र्य घेऊन, कोणाचीही परवानगी न घेता लिहिले आहे.. क्षमस्व! पण माझी भावना प्रामाणिक आहे! कर्नल डॉक्टर राजेश अढाऊ (Adhau असे spelling लिहिले जाते बऱ्याच ठिकाणी) यांच्यावर एक छान चित्रपट निघावा.. ही इच्छा आहे. किमान नव्या पिढीला आपल्या बहाद्दर माणसाची माहिती तर होईल. जयहिंद.

Happy Birthday, Colonel साहेब !

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘खरा प्रॉमिस डे याला म्हणतात !’ — लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘खरा प्रॉमिस डे याला म्हणतात ! — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

प्रॉमिस डे म्हणजे

राजं तुम्ही विशाळगड गाठा एक भी गनिम पुढे सरकू देत नाही –

असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे बाजीप्रभू देशपांडे

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

राजं आधी लगीन कोंडाण्याचे, मगच माझ्या रायबाचं –

– असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे तानाजी मालुसरे

प्रॉमिस डे म्हणजे – 

थुंकतो मी तुझ्या जहागिरीवर, माझा जीव स्वराज्यासाठीच

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे मुरारबाजी देशपांडे 

*

प्रॉमिस डे म्हणजे- 

आमचं राज्य घेणं तर राहूदे औरंग्या, तुझीच कबर या मातीत बांधली जाईल

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे संताजी धनाजी 

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

राजं ६० मावळे द्या, एका रात्रीत गड घेतो –

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे कोंडाजी फर्जंद

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न पूर्ण केलं –

-असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे छत्रपति शिवाजी महाराज

*

असा असतो खरा

प्रॉमिस डे…

ते शिकूया, तसे प्रॉमिस पाळूया !

जय भवानी, जय शिवाजी…

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? काव्यानंद ?

☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

#विशेष कविता रसग्रहण उपक्रम#

…आज मी तात्यांची म्हणजेच कवि कुसुमाग्रज अर्थात वि.वा शिरवाडकरांची, आगगाडी व जमीन ही कवितेच रसग्रहण करत आहे. 

सन 1942 साली पहिला प्रसिध्द झालेल्या विशाखा या कविता संग्रहातील ही कविता आहे. कवितेच्या शेवटी कविता लेखनाचा काल 1938 नि स्थल पुणे अस दिलेल आहेत.

तात्यांनी अहि-नकुल,हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम, शेवटचे पान ,आव्हान,कुतूहल, भक्तिभाव, बालकवी ,आणि आगगाडी व जमीन या सारख्या कविता लिहिल्या…त्यांच्या विशाखा या कविता संग्रहाला भाऊसाहेब तथा वि.स.खांडेकरांनी अर्ध्यदान स्वरुपात प्रस्तावाना लिहली आहे .ते म्हणतात त्यांची  प्रतिमा ही लुकलुक करणारी चांदणी नाही,ती चमचम करणारी बिजली आहे,आपली कविता ही मुरली नाही,ती तरवार आहे याची योग्य  जाणीव त्यांना आहे.या तरवारीला कल्पकतेच्या सुंदर आणि बळकट मुठीची जोडही सुदैवाने मिळालेली आहे,त्यामुळे अनुभूतीच्या कुठल्याही प्रदेशात त्यांची प्रतिभा रणरागिणीच होईल. आणि भविष्यवाणी पुढे तंतोतंत खरी ठरलेली आपण पाहिलीच आहे…

☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’ ☆

नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन

पायाशी लोळत विनवी नमून-   2

 *

धावसी मजेत वेगात वरून

आणिक खाली मी चालले चुरुन !

 *

छातीत पाडसी कितीक खिंडारे

कितीक ढाळसी वरून निखारे !   2

 *

नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन

जाळीत जाऊ तू बेहोष होऊन.

 *

ढगात धुराचा फवारा सोडून

गर्जत गाडी ती बोलली माजुन- 2

 *

दुर्बळ ! अशीच खुशाल ओरड

जगावे जगात कशाला भेकड !

 *

पोलादी टाचा या छातीत रोवून

अशीच चेंद्त धावेन ! धावेन ! 2

 *

चला रे चक्रानों,फिरत गरारा

गर्जत पुकारा आपुला दरारा !

 *

शीळ अन कर्कश गर्वात फुंकून

पोटात जळते इंधन घालून ! 2

 *

शिरली घाटात अफाट वेगात

मैलांचे अंतर घोटात गिळीत !

 *

उद्दाम गाडीचे ऐकून वचन

क्रोधात इकडे थरारे जमीन ! 2

 *

“दुर्बळ भेकड !”त्वेषाने पुकारी

घुमले पहाड घुमल्या कपारी !

 *

हवेत पेटला सूडाचा धुमारा

कोसळे दरीत पुलाचा डोलारा ! 2

 *

उठला क्षणार्ध भयाण आक्रोश

हादरे जंगल कापले आकाश

 *

उलटी पालटी होऊन गाडी ती

हजार शकले पडली खालती ! 2

या कवितेचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे सरल सरल दोन भाग पडलेले दिसतात. पूर्वार्धात जमीन आगगाडीची विनवणी करताना दिसतेय.. तू अशी धाड धाड दाण दाण करत तूही पोलादी चाक माझ्या अंगावरुन नेऊ नकोस त्याने माझ्या मातीचा ,आजूबाजूच्या परिसरसराची धूळधाण होते.शिवाय तू अशी जोशात जातेस तेव्हा ते जळते लालभडक निखार्‍यानीं अंग अंग पोळून निघते. तूला जायाला मज्जाव करत नाही पण तुझ्याइतकी सशक्त नाही.तेव्हा माझा तू सहानुभूतीने विचार कर.माझं अस्तित्व टिकल तरच तुझ्या असण्याला फिरण्याला अर्थ आहे. या ठिकाणी जमीन ही शोषित वर्गाच्या प्रतींनिधीचे प्रतीक दाखवले आहे. मजुरांची कामगारांची मालकवर्गाने काळजी घेतली तर मालकांचा व्यवसाय अव्यहात टिकेल अन्यथा…

तर उत्तरार्धात आगगाडी जमिनीच्या विणविणीची अवहेलना करते. दुर्बल भेकड म्हणून तिचा अवमान करते.पायाची वाहाण पायीच बरी असते. आपल्या उद्दाम, सहानुभूतीशून्य वागण्याने जमिनीला चेंदून टाकण्यास तयार होते. प्रचंड वेगाने आगीचे लोळ फुत्कारत घाटाला गिळत पुढे पुढे निघते. मालक वर्ग कामगार वर्गाची एनकेण प्रकारे पिळवणूक करत राहतो. कामगरांच्या सुख्दुखाशी त्याच काहीएक देण घेण नसत.

आणि शेवटी अन्यायाने,अपमानाने,कष्टाने त्रस्त झालेली जमीन सूडाचा बदला म्हणून आगगाडीच्या वाटेवरचा खींडितला पूल जेव्हा पाडून टाकते तेव्हा गुरमीत असलेलली पण बेसावध आगागडीचा अपघात होतो.मोठी जीविहहाणी बरोबर साधनसंपत्तीचा सर्वनाश होतो. कामगार जेव्हा पेटून उठतो तेव्हा संप,दंगल,क्रांतीचा,बंड करून उठतो आणि मालकाला दे धरणीमाय करून सोडतो. भांडवलशाही विरूध्द समाजवादाची लढाईच चित्रचं या कवितेत दाखवलेले दिसते.

कुसुमाग्रज हे मानवतेचे कवि आहेत.आजच्या सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितेतून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही ,तो अग्निरसाचा वर्षाव करीत सुटतो.विषमता,पिळवणूक,गांजणूक आणि अन्याय यांच्याविषयीची बहुजनसमाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुंदर स्वरुपात आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे.

आगगाडी व जमीन  या कवितेत कवीची कल्पकता व त्याची प्रेरकता यांच्यामध्ये जणूकाही शर्यतच लागली आहे !दलितवर्गावर होणार्‍या जुलूमाचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे या कवितेतील चित्रण अत्यंत प्रभावी आहे.क्षणाक्षणाने आणि कणाकणाने सुधारणा होऊन मानव जात सुखी होईल हा भोळा आशावाद दुर्बल ठरतो आणि क्रांतीचे निशाण हातात घेतलेल्या समतादेवीकडे समाजाचे डोळे लागतात. ‘हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम,बंदी आणि आगगाडी व जमीन  या तेजस्वी कवनांतून कुसुमाग्रजांनी क्रांतीच्या दर्शनाचा मानवजातीला लागलेला ध्यास मोठ्या तन्मयतेने वर्णन केला आहे.त्यांची कल्पकता प्रत्येक वेळी नव्या नव्या सुंदर रूपकांचा आश्रय करून या ध्यासाचे चित्रण करते, अश्याप्रकारच्या सर्व कवितांतून  कुसुमाग्रज एकच तुतारी फुंकत आहेत असेच मला वाटत राहते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

शेवटी काल मी माझे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रयत्न होता तो बायकोला टू व्हीलर शिकवण्याचा. यासाठी मी सगळे प्रयत्न केले.

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… फोर व्हीलर सारखं खूप किचकट नाही… किती दिवस तू माझ्यावर किंवा रिक्षावर अवलंबून राहशील… अशा प्रोत्साहन देणाऱ्या अनेक वाक्यांपैकी काही मी मनापासून ऐकवली… तर काही मनात नसतांना सुध्दा…

आता नवीन गाड्या आहेत. किक फार कमी वेळा मारावी लागते. बटन दाबलं की सुरू होते. पाय जमिनीवर टेकतील इतकीच उंची असते. आणि एक्सीलरेटर हळूहळू वाढवलं कि आपोआप पुढे जाते. असा अभ्यासक्रमाचा काही भाग तोंडी सांगून झाला होता.

थोडफार प्रात्यक्षिक सुध्दा सुरू झालं होतं. पण त्यात गाडी शिकण्यापेक्षा सुरुवातीला अडचण आली ती साइड मिररची…

ते गोल गोल आरसे काढून टाका, आणि दुसरे चांगले चौकोनी, उभे, आणि स्लिम असतील ते लावा… पहिली सुचना…

आता काय झालं मला काही सुचेना… का?… असं विचारण्याची मी हिंमत केली. तसंही बऱ्याचदा का?… असं हिंमत करुनच विचारावं लागतं…

त्या गोल आरशात मी गोल गोलच दिसते…

अगं पहिला मुद्दा तो आरसा आपल्या स्वत:ला पाहण्यासाठी नसतोच. मागून कोण येतय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी असतो. आणि असंही बाहेर पडतांना तु मोठ्या, पूर्ण उंचीच्या, आणि गोल नसलेल्या आरशात पाहूनच बाहेर पडतेस नां. मग परत त्या छोट्या आरशात स्वत:ला पाहण्याची काय गरज… आणि आरसा जे आहे तसंच काहीसं दाखवण्याचा प्रयत्न करतो… शेवटचं वाक्य मी हळूच म्हंटल. तरीसुद्धा माझा चेहरा चौकोनी आणि तिचा गोल झाला आहे असं उगाचच पण खरं तेच वाटल…

मागून कोण येतंय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आरसा असतो हे वाक्य तिला पाठ झाल्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या प्रात्यक्षिकात ती गाडी चालवत असतांनाच तिने गाडीचा वेग कमी केला, आणि थोडी बाजूला करून उभी राहिली…

आता काय झालं?… माझा प्रश्न..

काही नाही, आरशात एक बाई मागून येते आहे ती दिसली… म्हणून…

तीला पुढे जायचं असेल तर ती जाईल नां… तितकी जागा आहे… पण तु वेग कमी करत बाजूला गाडी थांबवली हे मस्त…

प्रश्न तिला जायला जागा आहे का नाही याचा नाहीच… तिची साडी मस्त आहे… कुठली आहे… आणि पदर कसा आहे हे बघायचं आहे‌… त्या बाईंच सोडा, पण या आरशात साडी काही नीट दिसलीच नाही…

मी निरुत्तर…

पण या थांबण्यामुळे तिने साडी सह बाईंकडे… आणि मी त्या… बाईंसह साडीकडे पाहून घेतलं…

पण या कारणांमुळे मी माझे प्रयत्न सोडले असं नाही. त्याला कारण वेगळंच होतं…

आज सुटिचा दिवस होता. रोज दोघांच सकाळी कामावर जाणं. सकाळचं जेवण डब्यात. यामुळे घरी नाश्ता हा प्रकार जवळपास नसतोच. आज मी सहज म्हटलं. खायला जरा पोहे करा… वर मस्त नारळाचा किंवा खोबऱ्याचा किस… कोथिंबीर… लिंबू… मजा येइल…

त्यावर उत्तर आलं… हं तो वरचा डबा घ्या… पोहे आहेत त्यात… चाळणीने चाळून घ्या… थोडे भिजवा… दोनचार मिरच्यांचे तुकडे करा… बाकी फोडणी, मीठ, हळद हे मी सांगते… आणि खोबऱ्याचं पण बघते…

एखाद्या गोष्टीचं खोबरं होण म्हणजे काय असतं, ते मला समजलं…

येवढ्यावरच ते बोलणं थांबलं नाही, तर फक्त रिक्षेचा उल्लेख सोडला तर माझी वाक्य…

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… हि वाक्य तशीच, तेवढ्याच तन्मयतेने आणि उत्साहाने मलाच ऐकून दाखवली…

यात परत फोर व्हीलर सारखं किचकट नाही, या माझ्या वाक्याप्रमाणे पाकातले चिरोटे करण्याइतकं किंवा अनारशा सारखं किचकट नाही… असं पण ऐकाव लागलं.

आणि मी माझे शिकवण्याचे प्रयत्न सोडून द्यायचे ठरवलं… तिला फक्त गाडी शिकवायची होती… पण मला बरंच काही शिकावं लागलं असतं… शिकवणं कठिण असेल पण शिकणंही सोप्पं नसतं…

आता काय?… तिने पोहे करायला घेतले आहेत… आणि पोहे खाऊन झाल्यावर तिला एका ठिकाणी जायचं आहे तिथे सोडायला मी…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिव… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ शिव… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

# जगाने ऐश्वर्य उपभोगावे म्हणून स्वतः स्मशानात राहतो तो शिव असतो…

# जगाला मांगल्याचे अमृत मिळावे म्हणून जो स्वतः हलाहल कंठी धारण करतो तो शिव असतो…

# पत्नीचे वाहन व्याघ्र, एका मुलाचे वाहन उंदीर, एकाचे मोर आणि स्वतःचे वाहन नंदी असताना, तसेच स्वतः कंठी व्याल {सर्प } धारण करतो ( अर्थात परस्पर विरोधी वाहनं/स्वभाव असताना… ) आणि तरीही गुण्या गोविंदाने स्मशानात आपला संसार थाटतो आणि आदर्श संसार करतो, तो शिव असतो…

# सर्व विद्यांचा निर्माता, सर्व कलांचा निर्माता, सर्व गुरूंचा गुरू असताना, सर्वांपासून अलिप्त राहून स्मशानात कायम ध्यानस्थ राहू शकतो, तो शिव असतो…

# आपल्याला असलेले सर्व ज्ञान जगाला प्राप्त व्हावे म्हणून सर्वप्रथम आपल्या पत्नीला देतो, तो शिव असतो…

# साऱ्या विश्वाचा पसारा सांभाळताना, त्यातूनच वेळ काढून आपल्या पत्नीशी निवांत गप्पा मारतो, तो शिव असतो…

( कोणत्याही कथेच्या आधी शिव पार्वती संवाद झाल्याचे आपल्याला आढळेल…! )*

# जो स्वतः शिव असताना, जगाचा आद्यगुरू असताना, अखंड रामनाम स्मरण करीत असतो, तो शिव असतो…

# जो देव दानव, मानव, भूतखेते सर्वांना पूज्य असतो, तो शिव असतो…!

# जो कधीही सत्याची कास सोडत नाही, त्यामुळे तो शिव होतो आणि जसा असतो तसा तो सुंदर दिसतो…

“सत्यम् शिवम् सुंदरम्”

भगवान शंकर महाराज की जय !!! सद्गुरू नाथ महाराज की जय!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ह्याचा इन्श्युरन्स निघत नाही” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “ह्याचा इन्श्युरन्स निघत नाही” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

माझा एक दुकानदार मित्र आहे. वडिलोपार्जित व्यवसायात आहे. कधीही येता जाता त्याच्या दुकानापाशी हात करताना मला दुकानाबाहेर ठेवलेले उंदरांचे दोन पिंजरे दिसतात. पण त्यात पकडले गेलेले उंदीर मात्र कधी दिसले नाहीत. मी त्याला एकदा सहज विचारलं, “बाबा रे, आजतागायत एकदा तरी उंदीर सापडला का पिंजऱ्यात?” तो हसून म्हणाला,” दुकान सुरुवातीला नवं होतं,तेव्हां सहा महिने उंदीर सापडायचे. नंतर पुन्हा कधी सापडले नाहीत. सगळे उद्योग करुन झाले. भजी ठेवली,कॅडबरी ठेवली,चीज क्यूब्ज ठेवून पाहिले,नॉनव्हेजचे तुकडे ठेवून बघितले. पण हे उंदीर अफाट हुशार झालेत. त्यांच्या आवडीची कुठलीही गोष्ट त्यात ठेवा,तो सापळा आहे,हे त्यांना अगदी बरोबर समजतं. ते सगळ्या दुकानात धुडगूस घालतात, पण सापळ्याकडे फिरकतच नाहीत. मी आपला रित म्हणून रोज मोठ्या आशेनं पिंजरा लावूनच दुकान वाढवतो.” मीही हसण्याचा आनंद घेऊन त्याचा निरोप घेतला. पण त्याचं वाक्य मात्र डोक्यात घुमत राहिलं – आजकालचे उंदीरसुद्धा हुशार झालेत…!

असाच एक दुसरा प्रसंग माझ्या अगदी चांगला लक्षात राहिला आहे. आमच्या दारी गायींसाठी एका मोठ्या सिमेंटच्या पात्रात पाणी ठेवलेलं असतं. उन्हाळ्यात अनेकदा गायी फार लांबून लांबून पाण्यासाठी येतात. त्या कुणालाही कसलाही त्रास देत नाहीत. त्या येतात आणि पाणी पिऊन शांतपणे निघून जातात. पण एकानं त्या गायींना हुसकून लावण्याचा उद्योग सुरु केला. दगड मारणे, काठीने मारणे असे प्रकार सुरु केले. गायींचं त्यांच्या दारात थांबणं बंद झालं. आमच्याकडे येऊन पाणी पिऊन जायच्या. पुढं एका दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी मी गायींना खाऊ घालत होतो, तेव्हां तेच गृहस्थ पुरणाची पोळी घेऊन आले आणि गायीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करु लागले. त्या गायीनं बाकी सगळ्यांचे गोग्रास घेतले, पण ह्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता शांतपणे निघून गेली. गायीसुद्धा हुशार झाल्यात..!

हीच गोष्ट मधमाशांची आणि मुंग्यांची. एखाद्या ठिकाणी त्यांच्या जिवाला धोका असेल तर त्या ठिकाणी त्या वसत नाहीत. उलट त्या त्यांची अधिकाधिक सुरक्षितता शोधतात. माणसांचा उपद्रव होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतात. ‘लक्ष्मणरेषा’ नावाचा मुंग्यांचा उपद्रव टाळण्यासाठी उपयुक्त असा खडू मिळतो. त्याच्या रेषा धान्याच्या पोत्याभोवती मारल्या तर मुंग्या त्या बाजूनं फिरकत नाहीत. पण त्यावरचा मार्ग बरोब्बर शोधून काढतात. एकदा उन्हात आईनं वाळवणं घातली होती आणि बाजूनं लक्ष्मणरेषा मारल्या होत्या. पण मुंग्या असल्या बिलंदर की, त्यांनी गच्चीत पडलेलं एक छोटंसं वाळकं भुईमुगाच्या शेंगेचं टरफल ढकलत आणलं आणि त्या रेषेवर ठेवून वेढा फोडला. संध्याकाळी उन्हं कलल्यावर गोळा करायला गेलो तर सगळा प्रताप लक्षात आला. पण तोवर मुंग्यांचा डाव बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. म्हणजे, मुंग्यासुद्धा शहाण्या झाल्यात..!

प्रश्न आहे तो आपण माणसांचाच..! पर्यावरणातला सर्वात बुद्धिमान प्राणी असूनसुद्धा जगण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारं शहाणपण माणसाला का मिळवता येत नाही? स्वतःच्या बुद्धीचा वापर करुन मार्ग काढता येत नसेल तर किमान इतरांच्या अनुभवातून तरी योग्य तो बोध मनुष्यप्राणी का घेत नाही? ‘जब वुई मेट’ नावाच्या हिंदी सिनेमात भर रात्री अनोळखी प्रवाशाचा शोध घेण्यासाठी रेल्वेतून उतरलेल्या करिना कपूरला वयानं तिच्याहून वडील असणारा स्टेशन मास्तर “अकेली लडकी खुली हुई तिजोरी की तरह होती है” हे सांगत असतो. पण “यह ग्यान मुफ्त का है या इसके पैसे चार्ज करते हैं? क्योंकी चिल्लर नहीं है मेरे पास” असं मोठ्या तोऱ्यात सुनावणाऱ्या त्या करिना कपूरच्या तोंडचं ते वाक्य आपल्याला विनोदी वाटतं. पण त्या स्टेशन मास्तरच्या सांगण्यातली काळजी एकालाही दिसत नाही,जाणवत नाही. हाच तर आपल्या माणसांच्या शहाणपणातला उसवलेला टाका आहे.

रात्री तीन वाजता कुणालाही न सांगता, मित्रांसोबत घराबाहेर भटकणारी तरुण मुलंमुली दिसणं पुणेकरांना नवीन नाही. पावसाळ्यात कुणालाच न सांगता, कॉलेजला दांडी मारुन, खोटं बोलून परस्पर लोणावळा, भुशी डॅम, ताम्हिणी घाट अशा ठिकाणी भटकणारी मुलंमुली खरोखरच व्यवहारज्ञानी असतात का? सेल्फी काढण्याच्या नादात कड्यावरून कोसळलेली मुलं मुली, धोकादायक धबधब्यात उतरलेली माणसं खरोखरच प्रॅक्टिकली शहाणी असतात का? हा प्रश्न माझ्यासारखाच अनेकांना पडत असेल.

“आईवडील म्हणजे आपले सर्वात मोठे शत्रू” असं वाटणाऱ्या तरुण पिढीची आपल्या समाजात मुळीच वानवा नाही. मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या कित्येक गोष्टी अनेकांना ठाऊक असतात, पण त्यांच्या पालकांनाच ठाऊक नसतात. कित्येकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे पालक ॲड नसतात. आपल्या मुलामुलींचं मित्र-मैत्रीण मंडळ पालकांना माहितच नसतं. आपल्या आयुष्यात काहीही घडलं तरी घरच्यांना सांगावंसं मुलांना का वाटू नये? हा खरोखरच काळजीचा मुद्दा आहे. आपल्याच परिवारातल्या माणसांपासून मुलंमुली गोष्टी लपवून का ठेवतात? अत्यंत महत्वाच्या गोष्टींबाबत सुद्धा आईवडीलांपेक्षा त्यांना मित्र अधिक जवळचे का वाटतात? आपल्या आयुष्यातली अत्यंत मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा मुलंमुली पहिला फोन आपल्या पालकांना का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर गांभीर्यानं शोधलं पाहिजे.

नागरिकशास्त्र हा विषय १०० गुणांचा केला पाहिजे,असं आता अनेकांना वाटतं. ते समाजातली एकूण परिस्थिती पाहता खरंच आहे. पण त्याहीआधी व्यवहारज्ञानाचं आणि स्वतःची सुरक्षितता जपण्याचं शिक्षण आपल्या कुटुंबातूनच मुलामुलींना मिळणं नितांत आवश्यक आहे. जगण्यातलं शहाणपण शिकण्यासाठी मुंग्या,उंदीर,गायी किंवा अन्य प्राणिमात्र कुठल्याही वेगळ्या व्यवस्थेकडे जात नाहीत. त्यांना ते शिक्षण त्यांच्या पालकांकडून मिळतं. मधमाशा सुद्धा त्यांची कुटुंब प्रमुख असलेल्या राणीमाशीचं ऐकतात. जगण्यातली शिस्त मोडत नाहीत. मन मानेल तसं वागत नाहीत किंवा वडीलधाऱ्यांचं सांगणं धुडकावून सुद्धा लावत नाहीत. त्यांच्या जगण्यातले निसर्गधर्म आणि परिवार व्यवस्था ते पूर्ण निगुतीनं आणि आदरानं जपतात, मोडीत काढत नाहीत.

आईवडील आणि कुटुंबातल्या अन्य मोठ्या माणसांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याशी चांगला संवाद असणं, वागण्याबोलण्यात पारदर्शकता असणं म्हणजे बिनकोठडीचा तुरुंगवास नसतो. उलट तेच आपल्यासाठीचं अतिशय सुरक्षित आणि सहृदय वातावरण असतं, हे शहाणपण आपण माणसं कधी शिकणार? कारण, जगण्यातलं शहाणपण नसल्यापोटी जी किंमत मोजावी लागते, तिचा इन्श्युरन्स निघत नसतो..!

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, झुरळ आणि संवेदनक्षमता…! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मी, झुरळ आणि संवेदनक्षमता…! ☆ सुश्री शीला पतकी 

नातीने माझ्यापुढे वही धरली आणि मला म्हणाली, ” आजी तु शीला.. मग संवेदनाशीला कोण?” मी म्हणाले संवेदनाशीला अशी व्यक्ती नसते संवेदनाशीलता हा गुण आहे.. खरं तर ती क्षमता आहे म्हणून त्याला संवेदनक्षम असेही म्हणतात. म्हणजे पहा परवा दारात एक मरतूकडे कुत्रे कुडकुडत बसले होते… मग तू त्याला लगेच चादरीचा छोटा तुकडा टाकलास खायला दिलं कारण तू संवेदनाक्षम आहेस असं ज्याच्या मनात येतं ना दुसऱ्याबद्दल तो माणूस संवेदनाक्षम असतो… आता पाचवीतल्या मुलीला यापेक्षा वेगळं काय सांगणार… !

प्रत्येक माणूस संवेदनाक्षम असतोच हा गुणवर्धिष्ण होणं गरजेचं आहे… आपण लहान असताना संवेदनाक्षम असतोच पण जसे जसे मोठे होत जातो.. व्यवहारी बनत जातो.. जगाचा अनुभव घेत जातो तसे तसे ही संवेदना कमी होते. ही ज्याची टिकून राहिली त्याचे बालपण पण टिकते त्याला दुसऱ्याचं दुःखाशी समरस होता येते.

मला आठवतं लहानपणी म्हणजे सुमारे 60 /65 वर्षांपूर्वी आमच्या घरामध्ये झुरळं झाली होती त्यांना मारण्यासाठी कुणीतरी एक औषधाची डबी दिली. काड्यापेटी सारख्या तो बॉक्स होता आणि आत एक गुलाबी रंगाची पुडी होती. ते औषध पिठात मिसळून ठेवले की झुरळ खातात आणि मरतात. ते लहान मुलांपासून वेगळे ठेवावे असे त्या वेळेला आवर्जून सांगत अगदी नवीन औषध निघाले होते !आम्हा सगळ्या घरातल्या छोट्या मुलांना बोलवून.. याला हात लावायचा नाही.. हे निक्षून सांगितले आम्ही म्हणलं हे कशासाठी आहे? तर ते झुरळ मारण्यासाठी आहे विषय संपला!… मी चौथीत होते माझ्या डोक्यात विषय अधिक पक्का झाला झुरळ मारण्यासाठी औषध… खरंतर औषध बरं करण्यासाठी देतात मग हे मारण्यासाठी का वापरतात मग त्या झुरळाना किती वाईट वाटेल आणि समजा एक आई झुरळ आणि एक मूल झुरळ असेल किंवा एक मित्र झुरळ असेल तर त्यांना किती वाईट वाटेल कोणीतरी मेल तर आणि या माझ्या विचारातून मी दोन पानी संवाद लिहिला… दोन झुरळं एकमेकांशी बोलतात आणि माणसाने आपल्यासाठी मरावयाचे औषध तयार केले आहे त्यामुळे आपण आता नक्कीच मरणार ही माणसं किती वाईट आहेत ना…. असा विचार घेऊन मी मोठी फुलस्कॅप दोन पानं लिहिली होती अर्थात ती कुणाला दाखवली नाहीत त्यावेळेला ते लाज वाटत होती आणि खरंच आजपर्यंत मी कोणाशी बोलले पण नाही पण मला वाटतं ती माझ्या संवेदनाक्षम मनाची खूण होती आणि तिथूनच मी लिहायला सुरुवात केली असावी!

माणसं म्हातारपणी संवेदनाक्षम, हळवी होतात असं सर्वत्र म्हटलं जातं असं काही नसतं फक्त त्या त्या काळात आपण इतर भावनांना अधिक महत्त्व देतो. मग कधी कर्तव्याला कधी कठीण होण्याला कधी कठोर निर्णय घेण्याला आणि त्यामुळे ती संवेदनक्षमता थोडी बाजूला पडते याचा अर्थ माणूस संवेदन क्षमता हरवून बसलाय असं नसतं थोड्या अधिक प्रमाणात हे कमी होऊ लागले हे सत्य आहे आपण अगदी जेवण करीत टीव्हीवर दाखवली जाणारी प्रेत यात्रा पहात असतो हे कोणत्या संवेदनक्षमतेचे उदाहरण आहे? आपण थोडे बोथट झालो आहोत एवढे मात्र खरे!…….

प्रत्येक माणसाच्या अंगी संवेदनक्षमता असतेच त्याचे एक छान उदाहरण मी परवा एका कार्यक्रमात ऐकले रुळानुबंध नावाचे श्री कुलकर्णी यांचे पुस्तक आहे त्याबद्दल सांगताना त्यांनी असे सांगितले की ते रेल्वे इंजिन चालवत असत त्यांच्या त्या डब्यात म्हणजे इंजिनाच्या आत एक फुलपाखरू आले आणि ते डबाभर इकडे तिकडे हिंडू लागले ब्रेकच्या याच्यावर बस वरती टपावर बस असे ते इकडून तिकडून धावत होते त्याला पाहण्यात लेखकाला खूप आनंद मिळत होता इथं पावेतो गाडी पंधरा-वीस किलोमीटर पुढे आलेली होती आणि लेखकाच्या मनात विचार आला.. अरे बापरे हे फुलपाखरू आपल्या सवंगड्यांना मित्रांना भावंडाला सोडून आता इतकं पुढं आलंय…. हे आता परत त्यांना कधी भेटेल ना?.. इतक उडून जाणं त्याला शक्य होईल का? त्याला मार्ग सापडेल का?.. कितीतरी प्रश्न… असा विचार हजार माणसांना घेऊन जाणारी रेल्वे चालवणाऱ्या माणसाच्या मनात हे येते, तो संवेदनाक्षम नाही का?.. मला ते ऐकल्यानंतर खूप मजा वाटली किती छोटी घटना किती जबाबदारीचे काम पण ते करत असतानाही हा माणूस किती संवेदनाक्षम होता…!

अनेक संवेदनाक्षम माणसांमुळे फार मोठी सामाजिक कार्य उभी राहिली आहेत… बाबा आमटे यांनी रस्त्यावर वेदनाने जखमाने तळमळत पडलेला महारोगी पाहिला आणि त्यांच्या संवेदनक्षम मनाला त्या यातना कुठेतरी भिडल्या आणि त्यातूनच कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी मोठे कार्य उभे राहिले… माझी मानस कन्या अनु आणि प्रताप मोहिते यांच्या संवेदनाक्षमतेमधून अनाथ मुले आणि बेघर झालेले आजी आजोबा संभाळण्याचे एक मोठे काम सोलापूर जवळ चालू आहे तेथील एकूण संख्या 80 आहे हा मुलगा फक्त रिक्षा चालवतो पण अनेकानी मदतीचा हात पुढे केला. अनु स्वतः 80 माणसांचा स्वयंपाक रोज करते एक मोठं काम उभे राहिले आहे ते त्यांच्या संवेदनक्षमते मधून…. ! दुसऱ्या माणसाचे दुःख आपल्या काळजाला भिडले की खूप मोठं काम उभे राहते! अशी संवेदनाक्षम माणस हवीत त्या कामाने त्यांना सुख नव्हे समाधान मिळाल आहे… कारण ती निस्वार्थी सेवा आहे… मुलांमधील संवेदना क्षमता आपण जपायला हवी त्यांचे टीव्हीवर खेळले जाणारे खेळ भयानक आहेत बंदुका मारामारी रक्त याला उडव हे क्रुरतेकडे कडे नेणारे आहेत त्यांचे अभ्यासातील धडे सुद्धा माहिती वजा आहेत भाषेच्या पुस्तकात भावना समृद्ध होतील असे धडे हवेत जसे की आमच्या लहानपणी पाडवा गोड झाला. बाळ जातो दुर देशी ही कविता आई ही यशवंत ची कविता दोन मेणबत्ती हा धडा देशभक्त बाबू गेनू चा धडा इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातही गोपाळ सीता सुरेश अहमद त्यांची आई त्यांनी शेजाऱ्यांना केलेली मदत लिटिल मॅच गर्ल भयानक थंडीत ख्रिसमसच्या काळात काड्यापेट्या विकणारी ही मुलगी त्यात थंडीत गोठून मरते हे सगळे धडे माणसातली संवेदना वाढवणारे होते अशा धड्यांची गरज आहे तर ती संवेदनाक्षमता टिकेल. हाणामारीचे चित्रपट मुलांना आवडतात खलनायक हिरो वाटायला लागले आणि असे खलनायकावरती हिरो म्हणून बेतलेले चित्रपट हि आले हे दुर्दैव आहे माणसाची संवेदनक्षमता टिकवण्याचे कार्य मनोरंजनातून शिक्षणामधून साहित्यातून काव्यातून आपल्या घरातून.. घरातल्या मोठ्या माणसांकडून आणि समाजातून होणे गरजेचे आहे त्याबरोबर माध्यमांनी ही काय दाखवावे याचे भान ठेवून हे गुण वर्धिष्णू होतील असे काही दाखवणे गरजेचे आहे आपल्याला काय वाटतं? आपले मत नक्की नोंदवा

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कधीतरी स्वतःसाठी… – लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ कधीतरी स्वतःसाठी… – लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

आनंदात रहायचे असेल तर कमी बोला. इतरांच्या खोचून टोचून बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. दिखावा करू नका, की दुसऱ्यांना मी असा मी तसा सांगण्यात वेळ घालवू नका. तुमच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा. स्वतःला आत्मसन्मान नक्कीच द्या. तुम्ही कुणासाठी नाही, पण स्वतःसाठी खुप अनमोल अमूल्य आहात. हे पक्के लक्षात घेऊन जगणे गरजेचे आहे. सतत त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू नका. त्यात कोणीही इंटरेस्ट घेत नाही.. सगळे माझ्यासारखेच वागले पाहिजेत हा हट्ट सोडा. तुम्ही सर्व जगावर कार्पेट घालू शकत नाहीत. हा, पण स्वतःच्या पायात नक्की चप्पल घालू शकतात.

मेडीटेशन, अध्यात्म, व्यायाम ह्या गोष्टी तुमच्या शरीराला टॉनिक आहे त्याचा कंटाळा करू नका. प्रत्येक गोष्टीत काहीना काही भावार्थ असतो. व्यायाम तब्येत शेवटपर्यंत ठणठणीत ठेवते. अध्यात्म तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. मेडीटेशन तुमचा राग लोभ मद मोह मत्सर यावर नियंत्रण ठेवायला शिकवते.

मुलांकडून फार अपेक्षा ठेऊ नका त्यांच्या आणि आपल्या पिढीत फार मोठा फरक असतो आणि तो कधीच मॅच होणार नाही ही भावना ठेवा म्हणजे अपेक्षांचे ओझे त्यांच्या बाबतीत रहाणार नसते. काळानुसार गरजा व्यक्ती बदलत जातात. अगदी साधे उदाहरण 2000 ची नोट जी पूर्वी आपण फार जपून ठेवली आता रस्त्यात पडली तरी कोणी उचलणार नाही. कारण काळानुरूप त्याचे महत्व कमी झाले. *नाती कितीही जवळची असली तरी वेळ आली की लोक काढता पाय घेतातच. आपण रामायण महाभारत वाचतो ते दुसरे तिसरे काहीही नसून जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. रामासारखा पती असून देखील सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. भर सभेत द्रौपदी वस्त्रहरण झाले एव्हढे सर्व समोर आपली लोक असूनदेखील द्रौपदीला वाचवायला प्रत्यक्ष नारायण ह्यांना यावे लागले. केवळ तिच्या एका चींधीने श्रीकृष्णाने तिची लाज राखली. त्यामुळे सत्ययुग, द्वापार युगातील ही एकवचनी लोक असूनदेखील असे दाखले दिसतात तर कलयुगात आपण अपेक्षा कुणासाठी आणि का ठेवायची. लोकांकडे, नको त्या आठवणी, नाते संबंध फार चर्वीचरन करत बसू नका. जास्त लक्ष न देता, आपले जगणे कसे छान होईल हे बघा.

मी माझ्या रोजच्या जीवनात खूप छान छान सकारात्मक बदल घडवून आणले आहेत का? याचा अभ्यास केला पाहिजे. तेच ते पुन्हा पुन्हा बोलणे विचार करणे माझ्याकडून होते का. आणि त्यात मी स्वतःला गुरफटून घेतले का? त्यातून माझे काढून घ्यायला, काय केले पाहिजे. हेही कळणे तितकेच महत्वाचे आहे. अहो उद्याचा दिवस आपला आहे की नाही ह्याचा भरवसा नाही. मग कशासाठी मनाला त्रास देऊन जगत रहायचे. दिलखुलास मनमोकळे जगणे, म्हणजेच आपणच आपले फुलत राहणे होय. ह्यामुळे ताणतणाव कमी होऊन, मनाची अवस्था आनंदित राहते. कधीच स्वतःला दुर्लक्षित करू नका. तुम्ही खूप महत्त्वाची व्यक्ति आहात. स्वतःला सक्षम बनवा. आदर करा स्वतःचा. कुणा दुसर्‍याची गरजच पाडणार नाही.

दुसर्‍याने तुमची स्तुती केली तरीही हुरळून जाऊ नका, आणि दुर्लक्ष, तिरस्कार केलत तरीही मनाला लावून घेऊ नका. त्यात आपल्याला आपले अनमोल आयुष्याचे अजिबात दिवस घालवायचे नाहीत, भारी जगायला आपण आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा, त्यातून तुमच्या मनाचे प्रतिबिंब उठून दिसते… हसायला फार पैसे लागत नाहीत. त्यात अजिबात कंजूषी करू नका. रोज सकाळी उठून जसे जमेल तसे मस्त व्यायामाने सुरुवात करा. दिवसभर चांगली एनर्जी टिकून राहते. वेळ नाही वेळ नाही, ही नुसती पळवाट असते. वेळ मिळत नसतो. तो काढावा लागतो. उपवास शरीराला चांगला. तसेच मनाला आनंदी, फ्रेश ठेवायचे असेल तर. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नको तो विचारांचा गुंता, त्यात अडकायचे नसते. मानस शास्त्र असे सांगते की दिवसाला तुमच्या डोक्यात 80 हजार विचार येतात. जर तुम्ही सगळेच घेऊन बसलात तर जगणे हराम होईल. आपली आण, बाण, शान आपणच आहोत हे लक्षात घेऊन जगणे सुरू ठेवले की मग फारसे काही जाणून बुजून करावेच लागत नाही, की नको ते प्रश्न फारसे डोक्यात पिंगा घालत नाहीत.

परमेश्वराची आठवण स्मरणात राहू द्या. केवळ आणि केवळ तोच तरून नेणारा आहे. फक्त आपला त्यावर विश्वास पाहिजे. देव कधीही कुणाचे चांगले किंवा वाईट करत नाही. मनुष्य आपल्या कर्मानेच चांगले वाईट दिवस आणतो. देव कुठे माझ्याकडे लक्ष देतो असे म्हणून त्याच्यावर अविश्वास दाखवू नका किंवा त्याला टाळू नका. कितीही पैसा प्रॉपर्टी आली तरी सगळे इथेच सोडून जायचे आहे ही जाणीव ठेवली की मग अहंकार आपोआप गळून पडतो. ख-या गरजवंताला नक्की मदत करा. आपण फक्त शंभर वर्षाच्या लिजवर इथे आलो अहोत हे लक्ष्यात ठेवले तर मीपणा निघून जातो, आणि आयुष्याचे सोने झाल्याशिवाय रहात नाही. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यांना मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.

लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी

प्रस्तुती – श्री अनिल वामरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

ओंजळ☆ सौ शालिनी जोशी

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।

करमुले तू गोविंदम् प्रभाते कर दर्शनम्।।

सकाळी झोपेतून जागे झाल्यावर आपण दोन मिनिटे अंथरुणावर बसून वरील श्लोक म्हणतो. यावेळी आपण दोन्ही हात एकमेकांना चिकटवून त्याची ओंजळ करतो. त्यावर लक्ष स्थिर करून त्यामध्ये सामावलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती आणि गोविंद यांचे दर्शन घेतो. त्यांची आठवण ठेवून हाताने दिवसभर कार्य करण्याची जणू आपण प्रतिज्ञा करतो. लक्ष्मी आणि सरस्वती यांना प्राप्त करण्याचे सामर्थ्य तो गोविंद करमुले स्थित होऊन आपणाला देतो. असे हे ओंजळीचे महत्त्व तीनही देवांचे वरदान ओंजळीत आपण सामावून घेतो. त्यामुळे सर्व दिवस सार्थकी लागतो.

ओंजळ म्हटलं की समोर येते पारिजातकाच्या किंवा मोगऱ्याच्या फुलांनी भरलेली ओंजळ. ओंजळीत ही फुले अलगदपणे सांभाळली जातात. त्याच्या कोमल पणाला कोणताही धक्का लागत नाही. देवाला फुले वाहताना ओंजळीने वाहतात. ओंजळ मोकळी झाली तरी सुगंध टिकून राहतो. कोणाला दान द्यायचे झाले तरी देणाऱ्याच्या ओंजळीने घेणाऱ्याच्या ओंजळीत दिले जाते. खूप तहान लागली तरी ओंजळभर पाणी समाधान करते. सूर्याला अर्ध देताना ओंजळीने देतात. हात उंचावून ओंजळभर पाणी त्याला अर्पण करतात. सवाष्णीची किंवा देवीची ओटी भरताना ओंजळीतून तांदूळ सुपारी ओटीत घालतात. लाजलेली स्री आपले तोंड ओंजळीत लपविते, तर दुःखी स्त्री ओंजळीत आपल्या अश्रूंना वाट करून देते. ओंजळीत आपण देवाचा प्रसाद घेतो. प्रियजनांचे हात ओंजळीत घेतल्यावर वेगळ्या प्रेमाची अनुभूती येते. कोणाला धीर देतानाही दोन्ही करतल आपल्या करतलात घतले की दिलासा मिळतो. या अंजलीचे दोन्ही हात जेव्हा जवळ येतात तेव्हा नमस्कार होतो. मिटलेली ही ओंजळ नम्रता शिकवते. अशा प्रकारे ओंजळ भासते छोटी पण असते मोठी. हेच दातृत्वाचे रूप, भावनेचे द्योतक. स्वीकारायला ओंजळ तशी द्यायलाही. ती रिती होत नाही, भरत असते कधी सुखदुःखाने तर कधी आशीर्वादाने.

एखादा मानी म्हणतो मी कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. म्हणजे दुसऱ्याच्या पदरचे खाणार नाही. ओंजळीला अंजली असेही म्हणतात. तर ज्ञानेश्वर ‘अंजुळी’ म्हणतात. अकराव्या अध्यायाचे शेवटी ते म्हणतात,

भरुनी सद्भावाची अंजुळी। मिया ओविया फुले मोकळी।

अर्पिली अंघ्रियुगूली ।विश्वरूपाच्या।।

११/७०८

ज्ञानेश्वरांची ओंजळ ही सदभावाची आहे आणि ती ओव्या रुपी फुलांनी भरली आहे. विश्वरूपाच्या चरणांवर त्यांनी ती मोकळी केली आहे अर्पण केली आहे. ण

निसर्गाच्या रुपाने परमेश्वर असेच आपल्याला भरभरून देत असतो. घ्यायला आपली ओंजळ अपुरी होते.

अनंत हस्ते कमलाकराने

देता किती घेशील दो कराने।

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “धरतीवरचा स्वर्ग…” – लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “धरतीवरचा स्वर्ग…” – लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

(कोकणात जन्म घेण्याचं आपल्या हातात नसतं पण त्या नंत्तर ही कोंकणी होण्याचं किंवा कोकणी माणसांशी एकरुप होण्याच सौभाग्य मात्र नक्की मिळू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील एका सरकारी कर्मचारी महिलेची आपल्या कर्मभुमी कोकणाविषयीची सुंदर पोस्ट.) 

माझं जन्म गाव, शिक्षण सगळं सांगली जिल्ह्यातील आहे. पण माझी कर्मभूमी कोकण आहे.. जन्मभूमी म्हणून ओढ आहे, पण मी कोकण शिवाय जगू शकत नाही… मी कोकणाशिवाय राहू शकत नाही… कारण, कारणं तर खूप आहेत..

कोकणात सगळ्या चालीरीती आहेत ना त्या सगळ्या मानवाला आनंदी ठेवणाऱ्या आहेत, जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत…

इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही… त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही.. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो…

इथं मुलींना सासुरवास नसतो, सून नोकरी करणारी असेल तर, सासू तिच्या हातात डबा तयार करून देते, किंवा सासरे डबा पोचवायला ऑफिस मध्ये येतात हे मी स्वतः पाहिले आहे…

इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीच्या 20 आंबोळ्या(घावन) टाकून घर जेवू घालते इथली बाई..

फणसाच्या अठळ्या शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला..

इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल!

आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे!

पुरात, वादळात नष्ट झालीत झाडं.. वीजेच्या तारा तुटल्याने महिना महिनाभर वीज नव्हती… पण, आरडाओरडा न करता, एकमेकांनी श्रमदानातून नवीन झाडांची लागवड केली…

एकदा पीक गेलं की शेतकऱ्यांचं एक वर्षाचं नुकसान होतं.. पण, इथं वादळात, 60-70 वर्षांची झाडं उन्मळून पडली, तरीही चिकाटीने नवीन बाग रोवली…

मागच्या वादळातली बाब.. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते, वादळामुळे सगळं ठप्प… मनात विचार केला, की याच जनतेने दिलेल्या महसूल करामधून दरमहा पगार मिळतो, त्यातला थोडा भाग त्यांच्यासाठी देऊ! मग आम्ही ZP तल्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका रात्रीत 2. 50 लाख रुपये वर्गणी जमा केली, अन त्या लोकांपर्यंत पोचलो अन त्यावेळी त्यांच्या मनातलं जाणलं, हृदय जाणलं!

त्यांचं म्हणणं एकच,”माझ्या पणजोबाची बाग, त्यांनी लावली म्हणून मी खाल्ली, आता मी लावली तर माझे वारस खातील…”

कोकणात मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे… मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही… आपलीच पोरं म्हणून आईवडील त्यांना डोळसपणे समजून घेतात आणि मुलही स्वातंत्र्य मिळूनही संस्कारांच्या बाहेर कधी जात नाहीत. आईवडिलांना कमीपणा देत नाहीत.

येथली लोक बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण, खून पडणार नाहीत…

कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा… नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील…

जीव लावणे, घासातला घास देणे हे कोकणात शिकावे..

इथं मी कामानिमित्त रात्री 3 वाजता सुध्दा एकटी फिरले आहे, अजिबात भीती वाटत नाही.. इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो..

मी स्वतः पाहिलंय, एका माणसाचे दुकानातून घेतलेले गहू, रस्त्यावर सांडले.. तर लोकांनी त्यावर गाड्या न घालता, 3-4 जणांनी गाडी थांबवून उतरून गहू जमा करून भरून दिले!

आम्ही सरकारी कर्मचारी सुध्दा, आपण या जनते साठी आहोत याची जाण ठेवून लोकाभिमुख काम करतो!

सरकारी कर्मचाऱ्यांना किलोभर तांदूळ, 4 आंबे, 2 नारळ, कुळीथ.. ही प्रेमाने दिलेली भेट इथं मिळते… त्यात गरिबांचे प्रेम असते..

भाऊंनो, बाईंनो अशी प्रेमाने हाक असते..

मी 18 वर्षे कोकणात एकटी, माझं लहान मूल घेऊन राहिले, मूलगा आता 21 वर्षाचा आहे… पण, मला कधी इथं असुरक्षित वाटलं नाही… उलट नारळातल्या गोड मलाईसारखा स्नेहच मिळाला.

माझे शेजारी अन माझे कार्यालयातले सहकारी यांनी माझी कधीही अडचण निर्माण होऊ दिली नाही…

मी आजारी असताना औषधे आणून देणे, मी बाहेर असेल तर माझ्या घरात दूध भाजी पोचवणे, गाडी बंद पडली तरी ती त्या स्पॉट वरून नेऊन परत घरापर्यंत आणून देणे… सगळं घरपोच सेवा देणे हे सगळं इथली लोक आपुलकीने करतात…

इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे.. ओल्या नारळाची स्निग्धता आहे. हापुस सारखा स्वभावात राजबिंडेपणा आहे.

खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..

धो धो पावसासारखे प्रेम बरसणार..

हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार…

अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं…

फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..

रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..

करवंद, जांभळे, तुरट गोड… तशीही काही मंडळी 

गणेशोत्सव, शिमग्याची (होळी) गोष्टच न्यारी… माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं, त्यासाठी हे उत्सव..

एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं…

अन मग… मी पण इथलीच झाले आहे… माहेराहून येताना, साखरप्याच्या हद्दीत गाडी आली की माझा श्वास मोकळा होतो..

हातखंबाच्या तिठ्यावरून रत्नागिरीत शिरलं की माझ्या कानात आपुलकीचं वारं भरतं

या मातीत मिसळून जायची तयारी आहे…

मी रिटायर्ड झाले तरी, जग फिरत राहीन पण जग फिरून पुन्हा कोकणातच येईन…

माझं घर आहे इथं…

प्रोमोशन झाले तरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्ये घेईन… पण कोकण नाही सोडणार.

(तळटीप: चांगलं वाईट सगळीकडे असतं, अपवादात्मक बाबी सगळीकडे असतात, पण कोकणात मी खूप सुखी आहे. कारण धरतीवर कुठे स्वर्ग असेल तर तो कोकण आहे.)

लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख

रत्नागिरी

प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares