“आई आज असं अचानक तुला मला प्रेमानं जवळ घेऊन थोपटत का आहेत सगळे?… ते ओवळणं, हिरवा चारा खाऊ घालणं, अंगावर भरजरी शाल टाकणं!.. अगदी आपण देव असल्यासारखे पुजन का करताहेत?… नमस्कार तर कितीजण करताहेत… आज कुठला विषेश दिवस आहे वाटतं… आज अचानक आपल्या बद्दल त्यांना प्रेमाचा पान्हा फुटावा!.. सांग ना गं आई!.. “
“.. वासरा त्यांच्या या प्रेमाच्या दिखाव्याला भुलू नको बरं… अरे वर्षानुवर्ष चालत आलेली ती वसुबारसाची परंपरा चालवताहेत झालं.. त्यांची दिवाळी सुरु होतेय ना आजपासून म्हणुन पहिला मान गोधनला देतात… आपणं भरपूर दुधदुभतं कायम देत राहावं असा मतलबी डाव असतो त्यांचा… वासरा पूर्वीचे आपले वंशज प्रत्येक घराघरात गोठ्यात राहतं होते.. मोठ्या संख्येने.. मोठ्या घरात अविभक्त कुटुबाचा काबिला तसं गोठ्यात पण मोठ्ठ कुटुंब गाई, म्हशी, बैल, शेळ्या, कोंबड्या एकत्रित राहत होतो.. देखरेखीला चौविसतास माणसं असायची.. खाण्यापिण्याची तरतूद भरपूर, रानावनात भटकणे भरपूर, नदी तळ्यात मनसोक्त डुंबणं सारं सारं काही पाहिलं जात असे… मग ईतकी काळजी घेतल्याने आपणही संतत कासंड्या भरभरून फेसाळते दूध देत गेलो… वयोमानानुसार ज्यांची कास सुकत गेली, गाभण राहता येईना, दूध आटत गेले त्या भाकड गाईनां रेडा महणून पोसले गेले होते.. पण त्यांना कधीच गोठ्याबाहेर काढले गेले नाही.. दैववशात पंचत्त्व पावलेलीच घराचा गोठा कायमचा सोडून जात असे… अंगी धष्टपुष्टपणा आणि तजेलदारपणा असल्याने घरातली गोठ्यातले गोधनाची वाढती संख्या श्रीमंतीचं मापदंड ठरला जात असे… कडबा, वैरण, पेंड याने गोठ्यतला एक कोपरा कायम भरलेला असे… पाऊस भरपूर असल्याने कोरडा दुष्काळ कधी दिसलाच नाही… झाडं, डोंगर, कधी छाटले नव्हते… आपल्यात देवत्त्वाचा अंश असल्याची त्यांची पुज्य भावना होती तेव्हा… पण पण हळूहळू माणसांच्या प्रवृत्तीत बदल होत गेला.. आधुनिकतेचे वारे वाहू लागले.. गावात सुधारणेचा सोसट्याचे वादळ घुमले.. शिक्षणाचे फायदे दिसू लागले अन जुने संस्कार काटे होउन टोचू लागले.. भावकीत दरी पडली नि घरं दुभंगून मोडली.. शेताचा भार एकीकडे नि दुधाचा बाजार दुसरीकडे.. विभक्त कुटुंबाची घरचं टाचकी मग गोठ्यावर का न यावी टाच ती… हळूहळू एकेक गाई गुरं जनावरांच्या बाजारात गेली… दुधाच्या मिळकती पेक्षा वैरणीचा खर्च परवडेना, , माणसाच्या हातातलं घड्याळ देखभालीची वेळच दावेना.. काही गणित जुळेना म्हणून गाई गुरांना ठेवले पांजरपोळच्या आश्रयाला.. तर काही हडखलेली, उताराला लागलेली कसायाने लाटली… शेण गोमुत्र सुद्धा आटले तिथे दुधाची काय कथा… मग आपल्याला पोसणार कोण?… कशाला बांधुन घेईल गळ्यात आपल्या फुकाची धोंड!… वासरा ! अरे हे माणसांचं जगचं मतलबी… इथे खायला कार नि भुईला भार होणारी त्यांना जड होतात ;अगदी वृद्ध असाह्य जन्मदात्या माता पिता सुद्धा.. त्यांना देखिल त्या वयात वृद्धाश्रमाला पाठवतात तर तिथं तुमची आमची काय कथा… वर्षभर सांभाळताना, दुधाचा गल्ला वाढता राहताना, आखुडशिंगी, चारा कमी खाणारी नि शेणा गोमुत्राचा कमीत कमी उपद्रव देणारी गाई गुरं असतील तोवर आपला प्रतिपाळ करत राहणं फायद्याचं असतं.. यातलं एक जरी मागं हटलं कि लगेच त्याचं आपलं नातचं तुटलं… जोवरी हाती पैका तोवरी इथं बुड टैका हा जसा माणसाने माणसाला न्याय लावलेला असतो अगदी तसाच न्याय आपल्याला असतो… मग एक दिवस करतात आपली साग्रसंगीत पुजा… वासरा आपल्यासाठी म्हणून ती काही पूजा नसतेच मुळी ती असते त्यांच्यासाठी… एक आदराची प्रेममय कृतज्ञतेची दृष्टी असली आपल्यावर तरीही पुरेशी असते रे… कितीही झालं तरी ते माय लेकराचं नातं असते ते.. माय आपल्या लेकरावर माया लावणारी चिरतंन असणारी.. मग ती माय कालची असो वा आजची किंवा उद्याची असणारी… तिला कसही असलं तरी आपलं लेकरू कधी जड होत नसतं… पण हे लेकराला कधीच कळत नसतं..
प्रज्ञा मिरासदार. मूळ गाव पंढरपूर. द.मा. मिरासदार हे माझे दीर. शिक्षण- मराठी विषयात पदवी. मी संस्कृत व इतरही विषयांच्या ट्यूशन्स घेत होते. गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित भजनाचे क्लासेस चालविले. सध्या एकच क्लास चालविते. अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत. कविता करते. अनेक काव्यसंमेलनात कविता सादर केल्या आहेत. पारितोषिके मिळाली आहेत. प्रत्येक सहलीची प्रवासवर्णने लिहिणे, हा माझा छंद आहे. अमेरिकेत जितक्या वेळा गेले त्या प्रत्येक वेळेची प्रवासवर्णने लिहिली आहेत.
दि. २३ सप्टेंबरपासून यंदा श्रीमद्भागवत सप्ताह सुरू झाला. तो २९ सप्टेंबरपर्यंत चालला. अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे, घरे, मठ इथे हा सप्ताह अत्यंत भक्तिभावाने साजरा होतो. तो ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. खरोखरच या ग्रंथात प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि विज्ञान भरलेले आहे. हे श्रीमद् भागवत मूळ संस्कृत भाषेतूनच सांगितले आहे. सर्वसामान्य जनांना संस्कृत भाषा आकलनास अवघड असते. म्हणून पुण्यातील एक विद्वान पंडित कै. प्रा. डॉ. प्रकाश जोशी ( एम्. ए. पी.एच्. डी. ) यांनी आमच्यासारख्या सामान्य जनांसाठी त्या श्रीमद् भागवताचा सारांश सांगणारी सात पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत.
त्यामधे नुसताच अनुवाद नाही तर पूर्ण भागवत पुराणाचा भावार्थ, त्यातील तत्वज्ञान त्यांनी उलगडून सांगितले आहे. शिवाय भाषा सोपी आहे. सुमारे ९० पृष्ठांचा प्रत्येक भाग आहे. त्यामध्ये त्यांनी सुरवातीलाच ही पुस्तके लिहिण्याचा उद्देश सांगितला आहे.ते म्हणतात की, कलियुगात नामस्मरण आणि श्रीमद् भागवत पुराण कथा श्रवण हाच एकमेव उपाय आहे.असे महर्षि वेदव्यासांनी म्हटले आहे. अनेक पुराणे वेदव्यासांनी रचली. तरीही भगवंताच्या अवतार स्वरूपांचे वर्णन करणारे भक्तिरसपूर्ण असे श्रेष्ठ पुराण भागवत पुराण रचल्यानंतरच त्यांना अतीव समाधान प्राप्त झाले होते.
हा भागवताचा ज्ञानदीप प्रथम श्रीविष्णु भगवंतांनी ब्रह्मदेवांना दाखविला. नंतर नारदमुनींना आणि नारदांच्या रूपाने भगवंतानेच महर्षि वेदव्यासांना दाखविला. व्यासमुनींनी त्यांचे पुत्र शुकाचार्य मुनींना दाखविला,तर शुकाचार्यांनी मृत्यूच्या वाटेवर असणाऱ्या राजा परिक्षिताला तो दाखविला.
राजा परिक्षित हा पांडवांचा नातू. अतिशय न्यायप्रिय होता. धर्मानुसार आचरण व राज्य करीत होता.तो शिकारीस गेला असताना तहानेने व्याकुळ होऊन शृंग ऋषींच्या आश्रमात गेला. तिथे ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यामुळे त्यांचे लक्ष राजाकडे गेले नाही. याचा राग आल्यामुळे राजाने जवळच एक मरून पडलेला साप ऋषींच्या गळ्यात अडकविला आणि तो तिथून निघून गेला. थोड्या वेळाने शृंग ऋषींचे पुत्र शौनक ऋषी आश्रमात आले. त्यांनी शापवाणी उच्चारली की, ज्याने हे कुकर्म केले आहे, त्याला आजपासून सात दिवसांच्या आत तक्षक नाग दंश करून मारून टाकील. ऋषींचा हा शाप खराच होणार होता. त्या सात दिवसांत प्रायोपवेशन म्हणून परिक्षित राजा गंगानदी तीरावर नैमिषारण्यात राहिला. तिथे महामुनी शुकाचार्य आले. त्यांना राजा अनेक प्रश्न विचारीत राहिला आणि मुनी शुकाचार्य राजाला श्रीमद् भागवत कथा कथन करते झाले.अशी ही प्रस्तावना आहे.
भाद्रपद शुद्ध नवमी (किंवा अष्टमी ) पासून ते प्रोष्ठपदी पौर्णिमेपर्यंत सात दिवस भागवत पुराण सप्ताह ऐकण्याची, ऐकविण्याची परंपरा भारत देशात हजारो वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे. तसे त्याचे पारायण केव्हाही केले तरी चालते. त्यासाठी डॉ. प्रकाश जोशी यांनी सर्वसामान्य जनांसाठी ही सात अत्यंत श्रवणीय, भागवताचे पूर्ण सार सामावलेली पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत. चार ते पाच तासात एक पुस्तक वाचून होते.
दुर्दैवाने लेखक डॉ. प्रकाश जोशी वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी अकालीच निधन पावले. त्यांच्या मृत्यूनंतर गीताधर्म मंडळाने ही सात पुस्तके प्रकाशित केली आहेत. मी स्वतः प्रतिवर्षी ही पुस्तके वाचते. माझ्या घरी श्रीमद् भागवत सप्ताह साजरा होतो. अत्यंत साधेपणाने पण भक्तिभावाने आम्ही सगळे मिळून तो संपन्न करीत असतो.
ती पुस्तके वाचल्यानंतर श्रीमद् भागवत वाचनाचे, श्रवणाचे पूर्ण समाधान मिळते. या सात पुस्तकांचे संक्षिप्त वर्णन मी पुढे काही भागात करीत आहे. सर्वांना ते वर्णन आवडेल अशी आशा करते.
रस्ता…… एक निर्जीव असला तरी आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग. किती प्रकाराने, वेगवेगळ्या अर्थाने आपण याचा उल्लेख करतो.
रस्ता…… सरळ, वेडावाकडा, चढ उताराचा, डोंगरदरीतून जाणारा, छान, खड्डे असलेला, किंवा नसलेला, घाटाचा अशा अनेक प्रकाराने आपण त्याबद्दल बोलतो. तर कधी कधी खडतर, प्रगतीचा, साफ अस म्हणत आपल्या आयुष्याशी त्याचा संबंध लावत त्या बद्दल व्यक्त होतो.
रस्त्याने आपण सहज कधीच जात नाही. अगदी सहज म्हणून बाहेर पडलो, अस म्हटलं तरी वेळ घालवण हाच उद्देश त्यामागे असतो.
रस्त्याने जातायेता आपण काही गोष्टी बघतो, काही नजरेआड करतो, काही गोष्टींकडे आपल लक्ष वेधल जात, काही गोष्टी आपण टाळतो. अस बरच काही रस्त्यावर करतो.
कोणी येणार असेल तर ते येण्याच्या आधीपासूनच अधूनमधून आपण रस्त्यावर नजर टाकतो. तर कोणाला निरोप द्यायचा असेल तर ते दृष्टीआड होईपर्यंत आपली नजर रस्त्यावर खिळलेली असते.
रस्ता निर्जीव आहे अस म्हटल तरी प्रत्येक रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा, इमारतींचा, तिथल्या परिस्थितीचा प्रभाव रस्त्यावर आहे अस आपल्याला वाटत.
इस्पितळं असणाऱ्या रस्त्यावर एक प्रकारची शांतता, तणाव, काळजी, हुरहूर, किंवा सुटकेचा निःश्वास असल्याचं, तर शाळेच्या रस्त्यावर मुलांचा कलकलाट बागेतल्या पक्षांच्या चिवचिवाटा सारखा मुक्त वाटतो. महाविद्यालयाच्या रस्त्यावर तारुण्याची कारंजी उडत असतात. तर चित्रपटगृह, आणि उद्यानाच्या रस्त्यावर उत्साह.
बाजाराच्या रस्त्यावर भाजीपाला, फळं, फुलं यांची रेलचेल असते. तर मध्येच उपहारगृहातील पदार्थांचे वास आपल्याला नाक, जीभ, आणि पोट असल्याची जाणीव करून देतात. सोबत रसवंतीच्या घुंगरांचा नाद कानावर येतो. सराफ बाजारातील रस्त्यावर चकचकाट व लखलखाट असतो. तर धार्मिक ठिकाण असलेल्या रस्त्यावर प्रसन्नता जाणवते.
रस्त्यावर असलेल्या इमारतींचा, हालचालींचा, आणि वातावरणाचा संबंध आपण रस्त्याशी लावतो, तसच रस्त्यांच रुप सकाळ, दुपार, संध्याकाळ, आणि रात्र अशावेळी वेगवेगळ असत, आणि ते आपल्याला जाणवतं.
सकाळी लगबगीचा, दुपारी थोडा सुस्तावलेला, लोळत पडलेला, संध्याकाळी उत्साहाने वाहणारा, तर रात्री, दिवसभराच्या धावपळीने हळूवारपणे, हातात हात घेत रमतगमत पावलं टाकत जाणारा वाटतो.
उत्सवाच्या आधी आणि उत्सवाच्या वेळी असलेल रस्त्यावरच वातावरण उत्सव संपल्यावर बदलल्या सारख वाटत.
शहर, प्रांत, बोलीभाषा, राहण्याचे ठिकाण यावरून जसं माणसाच वेगळेपण लक्षात येत, तसच रस्त्यांच सुध्दा आहे. गावातला, शहरातला, कच्चा, पक्का, रुंद, दोन, चार पदरी, राष्ट्रीय अस वेगळेपण असत.
कितीतरी गाण्यांमध्ये सुध्दा रस्ता या शब्दाचा वापर केला आहे. रस्ता…… तोच तसाच असतो. पण वेळ आणि प्रसंगानुसार आपण त्याचं वेगळेपण अनुभवत असतो. मिरवणूक, प्रचार, उपोषण, मोर्चा, वारी या सारख्या अनेक गोष्टींसाठी लागतो तो रस्ता…….
☆ काळी माय का विकली जातेय ?… लेखक : श्री संदीप काळे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे☆
मराठवाड्यातल्या धाराशिव, बीड, लातूर या रस्त्याने मी प्रवास करत होतो. त्या प्रवासादरम्यान एक विषय समोर येत होता. तो विषय म्हणजे रस्त्यावरच्या ‘ शेती विकणे आहे’ असे लिहिलेल्या खूप साऱ्या पाट्या. बऱ्याच अंतरावर मी माझी गाडी थांबवायला सांगितली. ‘ शेती विकणे आहे’ अशा एका पाटीसमोर गेलो. तिथे थांबून मी अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत होतो, इथून शहर खूप दूर आहे. इथं कुठली वस्ती होणं शक्य नाही. मग हा शेतकरी जमीन का विकतोय. आसपास पाहिलं तर कोणी नव्हतं.
आता मी तिथून परत निघणार, तितक्यात मला एका माणसाने आवाज दिला. तो माणूस तिकडं दूरवरून मला म्हणाला, ‘ काय अडचण आहे, कोणाला भेटायचे आहे. शेती घेण्यासंदर्भात काही बोलायचे काय?’ मी म्हणालो, ‘तुम्हालाच भेटायचं आहे.’ तो अजून माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, ‘मी आपल्याला ओळखलं नाही.’ मी म्हणालो, ‘ओळखणार कसे काय? मी पहिल्यांदाच इथं आलोय. मी हा माहिती फलक वाचून थांबलोय. तुम्ही जमीन विकत आहात का?’ त्या माणसाने जमिनीकडे बघितलं आणि होकाराची मान हलवली.
त्याला वाटलं मी शेतीचा भाव विचारतो, पैसे कसे द्यायचे, जमीन वादाची नाही ना असे विचारतो काय असे त्याला अपेक्षित होते. पण मी त्याला म्हणालो, ‘का विकता एवढी चांगली जमीन?’ त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की मी जमीन घेण्यासाठी आलो नाही. तरी जमीन का विकतोय हे विचारण्यासाठी थांबलोय.
मी थांबलोय हे पाहून आजूबाजूचे तीन शेतकरी आले. त्या प्रत्येकाला उत्सुकता होती, ही जमीन काय भावाने जाणार, मी काय भाव म्हणतो. त्या सगळ्यांनी माझी चौकशी सुरू केली. मी कुठून आलोय. मी कोण आहे. मी माझी ओळख सांगितल्यावर त्यांना लक्षात आलं, की मी जमीन घ्यायला आलेलो नाही.
शहरापासून जवळच्या जमिनीवर ‘शेतजमीन विकणे आहे’ असे फलक लागतात, ते आपण समजू शकतो, पण शहरापासून खूप दूर दूर अंतरावर असणाऱ्या अनेक भागांमध्ये शेत विकणे आहे, या स्वरूपाचे फलक चारी बाजूला लागल्याचे पाहायला मिळत होते. एखादा माणूस अडचण आहे म्हणून जमीन विकत असेल तर ठीक आहे, पण सर्वांनाच अडचणी कशा, हा प्रश्न मला पडला होता. मी आजूबाजूला थांबलेल्या शेतकऱ्यांना माझी ओळख सांगितली आणि त्यांना बोलते केले. त्या प्रत्येकाची कहाणी वेगळी होती.
सचिन पाटील, मकरंद जाधव, समीर वानखेडे, प्रभू गायकवाड… ही सारी शेतकरी मंडळी. या सर्वांचा वडिलोपार्जित शेती हाच व्यवसाय. जमीन का विकली जात आहे आणि त्यामागे कारण काय, हे मी सारे समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ‘ जमीन विकणे आहे’ या तीन शब्दांमागे खूप मोठी कारणे आणि लांबलचक इतिहास होता. तो सारा इतिहास त्यांच्या तोंडून ऐकताना मी चकित होत होतो. त्यांच्याशी बोलताना अनेक वेळा त्यांना काय उत्तर द्यावे मला काही सुचत नव्हते.
सचिन पाटील यांची साठ एकर जमीन, मागच्या तीन वर्षांपासून कधी पाऊस जास्त, तर कधी पाऊस नाही, या कात्रीमध्ये सचिन यांची शेती अडकली. दोन मुलींची लग्न केली. दर दिवसाचा मोठा खर्च, सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाचे कर्ज. त्या कर्जाच्या व्याजावर लागलेले व्याज, यातून मोकळा श्वास घ्यायचा असेल, तर शेती विकणे हाच पर्याय सचिनसमोर होता, असे तो सांगतो.
मी म्हणालो, ‘तुमचे आई- बाबा यासाठी परवानगी देतात का?’ सचिन थोडा वेळ शांत झाले आणि म्हणाले, ‘त्यांच्या परवानगीने तर शक्य नाही. मी इंजिनिअर आहे. बायकोही उच्च शिक्षित आहे. आम्ही रस्त्याची काही खासगी कामे घेऊन ती करायचो. एका प्रोजेक्टमध्ये आम्ही खूप अडचणीत आलो. तिथे आम्हाला दोन एकर जमीन विकावी लागली. हे आजारी असलेल्या माझ्या वडिलांना कळले आणि वडिलांनी तीन दिवसांत प्राण सोडला. वडील का गेले हे कुणालाच कळले नाही. तेरावे झाल्यावर आईने एकदम रडून आक्रोश करीत सांगितले, ‘ तू बापाच्या काळजाचा तुकडा असलेली काळी माय विकली म्हणून तुझ्या बापाने प्राण सोडला.’ आईचे मला हे ऐकून फार वाईट वाटले. बरेच दिवस मीच माझ्या बापाला मारले, असे मला वाटत होते.
आमच्या मराठवाड्यात काहीही झाले तरी जमीन विकत नाहीत. ही जमीन, काळी आई म्हणजे आपल्या पूर्वजांची, वडिलांची आई आहे, असे समजले जाते. आता त्या माईला आपण विकले नाही तर स्वतः मरावे लागेल, अशी अवस्था आहे. त्याला कारणेही अनेक आहेत.
आता आई फार थकली आणि तितकेच माझे कर्जही थकले. आता कर्जमुक्त व्हायचे असेल, तर दहा एकर जमीन विकावी लागेल. नाहीतर दर वर्षी व्याजावर एक एकर जमीन विकावी लागेल. सचिन एकीकडे सांगत होता आणि दुसरीकडे डोळ्यात आलेले अश्रू पुसत होता. मी ज्या दुसऱ्या शेतकऱ्याशी बोलत होतो त्याचे नाव मकरंद जाधव. मकरंदची शेती सचिनच्या शेताजवळच आहे. मकरंद म्हणाला, ‘ माझ्याकडे तीस एकर जमीन आहे. पाण्याची कमी नाही, नापिकीचा फटका बसत नाही, कारण जमीन उंचावर आहे. सोने पिकावी अशी जमीन आहे, पण ती जमीन कशी कसायची, हा प्रश्न आहे. स्थानिक मजूर येत नाहीत. बाहेरचे मजूर येतात आणि चोरी करून पळून जातात. गेल्या दोन वर्षांपासून दहा एकर जमीन पडीक आहे. कुणी बटाईने पण करायला तयार नाही.’ मी म्हणालो, ‘तुम्ही इतरांपेक्षा मजुरी कमी देता का?’ मकरंद म्हणाले, ‘नाही, मजुरी योग्य तीच देतो. नेण्या-आणण्यासाठी वाहन आहे, पण मजूर येत नाहीत.’
सचिन, मकरंद, समीर, प्रभू सारे जण मजुराला घेऊन एक एक किस्से सांगत होते. ते मला जे सांगत होते ते माझ्यासाठी सारे काही नवीन होते. मजूर नाममात्र दरावर मिळणारे धान्य बाजारात नेऊन कसा रविवार साजरा करतात हेही ते मला सांगत होते. मी म्हणालो, ‘ मग तुम्ही शेती कसायला कुणी भेटत नाही म्हणून शेती विकताय तर…, मग शेती विकून भेटलेल्या पैशांचे काय करणार ? ’ मकरंद म्हणाले, ‘ मला शेती विकून कर्जमुक्त व्हायचे आहे. मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवायचे आहे. ’ मी म्हणालो, ‘ मग परदेशात शिकून तो पुढे काय करेल. ’
मकरंद शांतपणे म्हणाले, ‘मी मुलाला सांगितले, बाबा, तिकडेच राहा. तिकडेच मोठा हो. इकडे नको येऊ. इकडे सारा गोंधळ आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही. मला माझ्या आई-बापाच्या मोहापायी घर सोडता आले नाही. तू घरी येऊन मोहात नको अडकू. आता गावातल्या मुलासोबत तो एक दिवस मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसला होता. मी तेव्हाच ठरवले, एकदा का तो तिकडे गेला की परत इकडे नकोच.’आम्ही बोलत बोलत सचिनच्या आखाड्यावर गेलो. तिथे सचिनच्या वडिलांची समाधी होती. त्या समाधीचे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले.
सचिनचा सालगडी काम सोडून झोपला होता. सचिन म्हणाला, ‘पाहा, आपण सोबत असलो तर मजूर शेतात काम करतात. नाही तर झोपा घेतात. त्या सर्वांनी तो काळा चहा प्यायला. मी त्या विहिरीचे नितळ पाणी प्यायलो. मी पाणी पिताना सचिन म्हणाला, ‘माझ्या बापाने भर उन्हाळ्यात ही विहीर खंदली, बापाने जिवाचे रान केले, म्हणून या विहिरीचे पाणी इतके चवदार आहे.’ मी समीरशी बोलत होतो, समीर म्हणाला, ‘मला दहा एकर शेती आहे. मला कुणीतरी असा खमका माणूस पाहिजे जो माझी पूर्ण जमीन विकत घेईल. ’ मी म्हणालो, ‘काही भांडणे झाली का? काही वाद आहे का?’ समीर म्हणाले, ‘हो,’मी म्हणालो,‘भावा-भावाचा वाद आहे का? ’ समीर म्हणाले, ‘नाही नाही, माझा आणि माझ्या बहिणीचा वाद आहे. तिला माझी अर्धी जमीन पाहिजे. या वादातून पाच वर्षांपासून जमीन पेरली नाही. ’
मी म्हणालो, ‘आता बहिणीला हिस्सा कायद्याप्रमाणे द्यायचा आहे ना.’ तो म्हणाला,‘छे हो, कशाचा कायदा, आमच्या पूर्वजांनी जे ठरवले ते महत्त्वाचे आहे. बरं बहीण, मेव्हणे मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांनाही चाळीस एकर शेती आहे.’ प्रभू यांचे जमीन विकायचे कारण वेगळे होते, प्रभू म्हणाला, ‘ माझी दोन मुले अपघातात वारली. खूप वर्षांनंतर मला मुलगा झाला. तो खूप लाडका असल्यामुळे शिकला नाही. मित्राच्या संगतीने पुण्याला गेला आणि वॉचमन झाला. त्याला आता दोन छोटी मुले आहेत. माझी बायको सारखी म्हणते, माझी वारलेली ती दोन्ही मुले पुन्हा जन्माला आली आहेत. मला आता मुलासोबत जाऊन पुण्याला राहायचे आहे. माझी पाच एकर जमीन आहे. मागच्या चार वर्षांत मी जे काही पेरले ते कधी उगवले नाही. जेव्हा उगवले तेव्हा बाजारात कवडीमोल विकले गेले. नापिकीत जमिनीच्या जमिनी मोजून नेल्या. नेते फोटो काढत शेतात आले आणि बँकेत जमा होणारे पैसे अजून जमा होतच आहेत. या सरकारवर आणि प्रशासकीय यंत्रणेवर माझा जराही विश्वास नाही.’ ते सारे जण एक एक करून आम्ही आमची जमीन का विकतोय याची कारणे सांगत होते.
गावकी, भावकी आणि निसर्गाचे सतत वाईट फिरणारे चक्र आणि या चक्राचे हे सारे झालेले शिकार. शेतीसंदर्भात असणारे चुकीचे कायदे, हे सारे यामागे आहे. या साऱ्यांची कहाणी एकदम वेगळी होती. ही कहाणी या चार जणांची नाही तर राज्यात, देशात काळ्या माईची सेवा करणाऱ्या त्या प्रत्येक माणसाची आहे. ज्याला आपल्या काळ्या मायचा तुकडा काळजाचा वाटतो, पण त्या काळजाच्या तुकड्याला विकल्याशिवाय पर्याय नाही. बरं, यात शंभर एकर आणि एक एकर जमीन असणाऱ्यांची गत सारखीच झालेली आहे.
लेखक – श्री संदीप काळे
मो. 9890098868
प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दहावी माळ) – न केलेले ‘सीमोल्लंघन‘… ☆ श्री संभाजी बबन गायके☆
“ राजा बोले अन दल हाले “ ही पहिल्यापासूनची रीतच म्हणायची. मानवी वर्चस्ववादाच्या संघर्षात एकमेकांचा नाश करणे अपरिहार्य झाले, तसे प्रत्येक समुदायाने स्वत:ची सैन्यदले उभारली. राजाने निश्चित केलेल्या शत्रूचा समाचार घेण्यासाठी त्याचा जीव घेणे आणि या प्रयत्नात स्वत:चा जीव देण्याची तयारी
ठेवणे , हा रणबहाद्दरांचा स्थायीभाव बनून गेला.
असंख्य राजे-रजवाड्यांचा आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या युद्धांचा देश.. ते आताचा स्वतंत्र, सार्वभौम लोकशाही गणराज्य असलेला देश .. म्हणून आपल्या भारत देशाची जगाला ओळख आहे.
स्वत:हून आक्रमण करायचं नाही असं तत्व उराशी बाळगून असलेला आणि ते तत्त्व हरत-हेची किंमत मोजून पालन करणारा देश म्हणून भारत उभ्या जगाला माहित आहे आणि आदर्शवतही आहे.
सैन्य पोटावर चालत असले तरी या चालणाऱ्या सैन्याला अतिशय सक्षम नेतृत्वाची अनिवार्य गरज असते. भारताच्या सुदैवाने सुमारे पंचेचाळीस वर्षांची दैदिप्यमान कारकीर्द गाजवणारा एक रणधुरंधर सेनापती स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात निर्माण झाला….. गुजरात प्रांतातील वलसाड येथे वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले Hormizd Manekshaw हे आपली गरोदर असलेली पत्नी Hilla, née Mehta.. हीला मेहता यांना घेऊन त्यावेळच्या लाहौर येथे निघाले होते. तेथे वैद्यकीय व्यवसाय थाटावा असा त्यांचा मनसुबा होता. रेल्वेप्रवासात प्रकृती बिघडल्यामुळे हीला यांना पुढे प्रवास करणे अशक्य झाल्याने हे दाम्पत्य अमृतसर स्टेशनवरच उतरले. तेथील स्टेशनमास्टरच्या सल्ल्यानुसार हीला यांना हर्मिझ यांनी स्थानिक रूग्णालयात दाखल केले. तेथे त्या अगदी बऱ्या झाल्या. अगदी थोड्या दिवसांच्या वास्तव्यात ह्या माणेकशा दाम्पत्याला अमृतसर शहर खूप भावले आणि त्यांनी तेथेच कायम वास्तव्य करण्याचे ठरवले. डॉक्टरसाहेबांनी थोड्याच कालावधीत या नव्या शहरात वैद्यकीय व्यवसायात आपला जम बसवला.
एका दशकाच्या अवधीत या पती-पत्नींनी सात अपत्यांना जन्म दिला. सॅम हे एकूणातले पाचवे अपत्य. दोघे भाऊ इंजिनियर व्हायला परदेशात गेले. साहेबांना डॉक्टर व्हायचं होतं, पण वडिलांनी ‘ हा खर्च झेपण्यासारखा नाही ‘ असं बजावलं. मग साहेब काहीसा बंडात्मक पवित्रा अनुसरून थेट सैन्यात भरती झाले. पाठचा भाऊ जॅम डॉक्टर बनून त्यावेळच्या हवाई दलात रुजू झाला. सॅम साहेब मात्र त्यावेळच्या ब्रिटिश सेनेत स्थिरावले. हिंदी, इंग्लिश, गुजराती, पंजाबी, उर्दू भाषांवर उत्तम पकड असल्याने त्यांना
‘हायर स्टॅन्डर्ड आर्मी इंटरप्रीटर ‘ म्हणून जबाबदारी मिळाली होती. अत्यंत निर्भीड असलेल्या सॅम साहेबांनी त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिलेल्या पंजाबी सैनिकालाच आपल्या तंबूबाहेर रात्री पहाऱ्यावर नेमून इतर सैनिकांच्या मनात आदर निर्माण केला होता. सैनिकांची ते अत्यंत आस्थेने काळजी घेत.
जपान्यांशी लढताना एका मोहिमेत त्यांनी शौर्य गाजवले. मोहिम यशस्वी झाली खरी, पण मोहिम संपता संपता त्यांच्या पोटात सात गोळ्या लागून मूत्रपिंड,यकृत, फुप्फुस यांना गंभीर इजा होऊन ते कोसळले. ही लढाई पाहणाऱ्या मेजर जनरल कोवान यांनी त्यांना स्वत:ला मिळालेला मिलिट्री क्रॉस बॅज त्यांना बहाल केला….हा सन्मान प्रत्यक्षात स्वीकारायला ते काही जगणार नाहीत असे त्यांना वाटले होते. जखमी सॅम साहेबांना त्यांचे सहाय्यक मेहर सिंग यांनी चौदा किलोमीटर अंतर खांद्यावर वाहून नेऊन इस्पितळात पोहोचवले…. यांचा जीव वाचणे शक्य नाही असे म्हणून डॉक्टरांनी उपचारास नकार दिला होता….पण मेहर सिंग यांनी कडक पवित्रा घेतल्यावर डॉक्टर तयार झाले…त्यांनी साहेबांना विचारले तुम्हाला अशा जखमा कशा झाल्या.. त्यावर तशाही गंभीर परिस्थितीत सॅम मस्करीत उत्तरले….’ मला एका खेचराने ठोकरले ! ‘ उपचार मिळाले आणि सॅम बहादूर बचावले, हे पुढे स्वतंत्र भारतीय सैन्याचे नशीब म्हणावे लागेल.
स्वतंत्र भारतात त्यांची कारकीर्द बहरली. मात्र सैन्याच्या कारभारात राजकारणी लोकांचा हस्तक्षेप त्यांना मान्य नसे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना सेनेतील नोकरी जवळजवळ सोडण्याची पाळी आली होती. त्यांच्याविरुद्ध लष्करी न्यायालयात खटला सुरू असतानाच १९६२ मध्ये चीनने आक्रमण केले. खटल्याचा निकाल न लागल्याने या युद्धात सॅम साहेबांना भाग घेता आला नाही. चीनकडून पराभव झाल्याने भारतीय सैनिकांचे मनोबल खच्ची झाले होते. अशा स्थितीत सॅम साहेबांकडे सैन्याचे नेतृत्व सोपवले गेले. त्यांनी सैन्याला आक्रमक होण्याचे आदेश दिल्याने सैन्याचे मनोबल उंचावले गेले. त्यांनी सैन्याच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला. त्यामुळे भारतीय सैन्य हे केवळ प्रतिकार करणारे सैन्य नव्हे, तर प्रसंगी आक्रमण करू शकणारे सैन्य बनले. १९६४ मध्ये सॅम साहेबांना नागालॅन्ड भागात नेमण्यात आले. तेथे त्यांनी नागालॅन्डमधील बंडखोरी मोडून काढली..याबद्दल त्यांना पदमभूषण किताब प्रदान करण्यात आला.
सन १९७१ मध्ये सीमांवर खूप धामधुम सुरू होती. परंतु या दरम्यान झालेल्या घटना सॅम माणेकशा यांचा करारी बाणा, निर्भीडता, निर्णयक्षमता आणखी ठळकपणे अधोरेखित करणा-या आहेत.
त्यावेळच्या पाकिस्तानात घडलेल्या राजकीय, तसेच लष्करी घटनांमुळे लाखो निर्वासित भारतात घुसले होते. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. शेजारील देशातील अशांतता भारताला त्रासदायक ठरू पाहत होती. अशा परिस्थितीत देशाच्या नेतृत्वाने पाकिस्तानमधून फुटून स्वतंत्र बांगलादेश निर्माण करण्याच्या त्या लोकांच्या प्रयत्नांना सक्रीय पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारले होते. पण यातून भारताचे आणि पाकिस्तानचे जोरदार युद्ध सुरू होण्याची शक्यता होती. एप्रिल १९७१ मधल्या एका सकाळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या विषयावर एक तातडीची बैठक बोलावली. सॅम माणेकशा त्यावेळी लष्करप्रमुख म्हणून उपस्थित होते. बराच उहापोह झाल्यानंतर सॅम माणेकशा यांना “ तुम्ही युद्धास तयार आहात का? ” असा प्रश्न विचारण्यात आला. आणि अर्थातच राजकीय नेतृत्वाला सकारात्मक उत्तराची अपेक्षा होती.
परंतु अनुभवी, बेधडक निर्णय घेण्यात वाकबगार असलेले आणि हाडाचे सैन्याधिकारी असलेले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी अत्यंत स्वच्छ, स्पष्ट शब्दांत असे घाईघाईने सीमोल्लंघन करण्यास नकार दिला. या नकारामागे अत्यंत सूक्ष्म अभ्यास होता साहेबांचा. देशात सुगीचा हंगाम सुरू आहे. रेल्वेने धान्याची वाहतूक सुरू आहे. आपले सैन्य देशाच्या विविध भागांतून सीमेवर आणायला रेल्वेगाड्या लागतील आणि त्यामुळे धान्य वाहतुकीसाठी रेल्वे उपलब्ध राहणार नाहीत. देशात अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पावसाळा फार दूर नाही. सीमेवर पावसामुळे दलदल, पूरस्थिती असेल, त्यात अडकून राहावे लागेल. साहेबांनी अभ्यासपूर्ण परिस्थिती स्पष्टपणे विशद केली. तरीही आग्रह धरला जाऊ लागताच त्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘ आता आपण युद्धात उतरलो तर आपला पराभव शंभर टक्के निश्चित आहे.’ यावरून त्यांनी राजीनामाही देण्याची तयारी दाखवली होती… आणि अर्थातच ही सोपी गोष्ट नाही.
अगदी नेमकेपणाने परिस्थिती समजावून सांगितल्याने नेतृत्वाला सॅम साहेबांचे म्हणणे पटले. सॅम साहेबांनी पुढील योग्य काळात युद्ध केले जाईल आणि ते खात्रीने जिंकले जाईलच याची हमी दिली. नेतृत्वाचा आग्रह डावलून फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशा साहेबांनी हे न केलेले सीमोल्लंघन पुढील विजयादशमीसाठी किती महत्त्वाचे ठरले, हा इतिहास आहे !
साहेबांनी अतिशय योजनाबद्धरित्या पावले उचलली. बंगाली स्वातंत्र्ययोद्ध्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. आपल्या सैन्याला सर्वांगाने सिद्ध केलं आणि तीन डिसेंबरला सुरू झालेलं युद्ध सोळा डिसेंबरला संपुष्टात आणून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले.
दुस-या महायुद्धात जपानने शरणागती पत्करल्यानंतर त्यांच्या साठ हजार युद्धकैद्यांची सारी व्यवस्था करण्याचे काम सॅम साहेबांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने पार पाडले. १९७१ मध्ये शरण आलेल्या सुमारे ब्याण्णव हजाराच्या आसपास पाकिस्तानी सैनिकांची व्यवस्था करताना त्यांना हा अनुभव कामी आला. शरणागतीच्या आधी त्यांनी पाकिस्तानी सैन्यासाठी एक रेडिओ संदेश प्रसारीत केला होता…. “ आमच्या सैन्याने तुम्हाला चारही बाजूंनी पुरते घेरले आहे. तुम्हाला कुठूनही मदत मिळणे अशक्य आहे. तुम्ही केलेल्या अनन्वित अत्याचारांचा बदला घेण्यासाठी मुक्ती वाहिनीचे लोक टपून बसलेले आहेत. तुमचे जीव कशाला वाया घालवता…तुम्हांला घरी जाऊन तुमच्या बायका-पोरांना भेटायचे नाहीये का? एका सैनिकाने एका सैनिकापुढे हत्यारे म्यान करण्यात काहीही कमीपणा नसतो. आम्ही तुम्हांला एका सैनिकाला द्यावी तशीच सन्मानाची वागणूक देऊ !” …. या संदेशाचा खूप मोठा प्रभाव पडला यात नवल नाही.
(फिल्ड मार्शल सॅम ‘बहादूर’ माणेकशा यांच्या आयुष्यावर बेतलेला एक हिंदी चित्रपट डिसेंबरात येऊ घातलेला आहे. या ख-याखु-या बहादूर सेनानीची माहिती नव्या पिढीला व्हावी असा विजयादशमीच्या निमित्ताने सुचलेल्या या लेखाचा उद्देश आहे. संदर्भ, माहिती अपुरी असण्याची शक्यता दाट आहे. दिलगीर आहे. परंतु सेनाधिका-यांचे योग्य निर्णय देशासाठी काय करू शकतात याचे उदाहरण म्हणजे सॅम साहेबांचे त्यावेळी ‘ न केलेले सीमोल्लंघन ‘ होय, असे म्हणता येईल.)
प्रोटॉन-न्युट्रॉनने बनलेले अणुकेंद्रक आणि सभोवताली वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन मिळून एक अणू (Atom) तयार होतो. जसे, सर्वात लहान अणुमध्ये म्हणजे हायड्रोजनमध्ये अणूच्या केंद्रकात एक प्रोटॉन असतो आणि त्याच्याभोवती एक इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये फिरत असतो. कुठलीही गोष्ट फिरवायला ऊर्जा लागते. म्हणजे प्रत्येक अणुमध्ये उर्जा असते. ही उर्जाच इलेक्ट्रॉन, न्युट्रॉन, प्रोटॉन वा स्वतः अणुचे वागणे (गुणधर्म) ठरवते. कुणाकडून काय कार्ये करून घ्यायची याबाबत ऊर्जेला ज्ञान असते. अशाप्रकारे प्रत्येक अणुमध्ये ठराविक ज्ञान साठवलेले असते.
एकाच प्रकारचे अणू एकत्र येवून एक पदार्थ बनतो. पदार्थाच्या घटक अणुमधील माहिती आणि ऊर्जेनुसार तो पदार्थ कसा वागेल हे ठरते. त्यानुसार त्या पदार्थाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म ठरतात. वेगवेगळे अणू एकत्र येवून रेणू (Molecule) तयार होतात. एका प्रकारचे रेणु एकत्र येऊन जटिल पदार्थ तयार होतो. त्या जटिल पदार्थाचे गुणधर्मही त्यातील घटक रेणूमधील ऊर्जा ठरवते.
वेगवेगळे अणु-रेणू एकत्र येवून पेशीचा एक अवयव बनतो. शरीराच्या प्रत्येक पेशीला केंद्रक (nucleus), रायबोझोम, लायझोझोम, मायटोकोन्ड्रीया असे वेगवेगळे अवयव असतात. पेशीच्या प्रत्येक अवयवाचे कार्य तिच्या घटक अणु-रेणुमध्ये साठवलेली ऊर्जाच करत असते. पेशीच्या अनेक अवयवापासून एक पुर्ण पेशी बनते. पेशीचे गुणधर्म आणि कार्य तिच्या घटक अवयवांमध्ये साठवलेली उर्जा ठरवते.
अनेक पेशी एकत्र येवून समुद्रातील एखाद्या साध्या बहुपेशीय जीवाचे संपुर्ण शरीर तयार होते. वेगवेगळी कामे करणाऱ्या पेशी एकत्र येऊन उन्नत जीवाच्या शरीराचा एखादा अवयव तयार होतो. उदा- हृदय, फुफ्फुस, लिव्हर, किडनी, आतडे, इत्यादी. घटक पेशींच्या कार्यानुसार त्या अवयवाचे गुणधर्म आणि कार्य ठरलेले असते. उदा- हृदयाचे स्नायू आकुंचन प्रसरण पावून रक्त पंप करतात. त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य घडते. फुफ्फुसांमध्ये हवेतील आणि रक्तातील आॕक्सिजन तसेच कार्बन डायऑक्साइड यातील आदलाबदल होण्याचे कार्य घडते.
अनेक अवयव एकत्र येवून एक जटील शरीर संस्था निर्माण होते. शरीर संस्थेच्या अवयवांमधील घटक पेशींमध्ये असणाऱ्या अणुरेणुंमध्ये साठवलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमुळे शरीर संस्था वेगवेगळे कार्य पार पाडत असते. उदा – तोंड, अन्न नलीका, जठर, लिव्हर, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे मिळून पचन संस्था तयार होते. पचनसंस्था अन्न पचनाचे कार्य करून शरीराला आवश्यक पोषणतत्वे शोषून घेते.
अनेक शरीर संस्था एकत्र येऊन मानवी शरीरासारखे एक महाजटील शरीर तयार होते. विविध शरीर संस्थांच्या कार्यांत समन्वय निर्माण होत त्यानुसार शरीराचे कार्य चालते. मेंदूतील पेशींमध्ये चालू असलेल्या रासायनिक उर्जेच्या खेळातून विद्युत करंट (Action potential) निर्माण होतात. ते मेंदूच्या पेशींमधून ठराविक मार्गाने फिरले की ठराविक विचार निर्माण होतात. विचारांमधून मानवी मन तयार होते. मनाचे कार्य या विचारांवर अवलंबून असतात.
अणु-रेणु एकत्र येवून मानवी शरीरासारखी एक किचकट मशीन तयार होते. कुठलेही मशीन उर्जेवर चालते. ATP सारख्या अणुरेणूंमध्ये साठवलेल्या उर्जेवर शरीररूपी मशीन चालते. अणूपासून संपूर्ण शरीरापर्यंत प्रत्येक घटकामध्ये नेमके कुठले कार्य घडवून आणायचे याचे ज्ञान असलेली ऊर्जा कार्यरत आहे. ब्रह्म म्हणजे ज्ञान. ज्ञानाने संपन्न या जीवनउर्जेला ब्रम्हउर्जा असे म्हणता येईल. ही ब्रम्हऊर्जाच आपल्या अस्तित्वाचे मूळ कारण आहे. आपले अस्तित्व या ज्ञानउर्जेमुळेच शक्य झाले आहे.
मानवी जीवनास कारणीभूत ठरणाऱ्या ब्रम्हउर्जेचे एक जटिल स्वरूप म्हणजेच अनुवंश. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत असतो. मागील अनेक जन्मांपासून अनुवंश चालत आला आहे आणि पुढे अनेक जन्म तो चालत राहणार आहे. आता अनुवंश म्हणजे नक्की काय ते पाहू. मानवी शरीर ३७ लाख कोटी पेशींनी बनलेले आहे. प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक (Nucleus) असते. या केंद्रकामध्ये ४६ गुणसुत्र म्हणजे chromosomes असतात. त्या ४६ गुणसुत्रांपैकी 23 गुणसुत्र आईकडून तर 23 वडिलांकडून आलेले असतात. हे गुणसुत्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून DNA चा एक बंडल असतो. हा DNA एक प्रकारचा दोरीसारखा लांब जटिल रेणू आहे. प्रत्येक मानवी पेशीमध्ये एकुण 2.2 मीटर लांबीचा DNA असतो. एवढा मोठा DNA सूक्ष्म पेशीच्या अतिसूक्ष्म केंद्रकात कसा मावणार? त्यासाठी DNA चा एक एक तुकडा स्वतःभोवती गुंडाळून गुंडाळून एका गुणसुत्राच्या रूपाने आकाराने अतिसूक्ष्म केला जातो. DNA चे ४६ बंडल म्हणजे आपले ४६ गुणसुत्र. ते इतकी कमी जागा व्यापतात की पेशीकेंद्रक या 10 micro meter इतक्या लहान जागेत सर्व ४६ गुणसुत्रे मावतात.
DNA मध्ये अनुवांशिक माहिती जीन्सच्या स्वरूपात साठवलेली असते. एक ठराविक प्रथिन (Protein) तयार करण्याची माहिती लांबलचक DNA च्या एका ठराविक तुकड्यात कोडच्या स्वरूपात साठवलेली असते. ठराविक प्रथिनं तयार करणाऱ्या DNA च्या त्या ठराविक तुकड्याला एक जनुक वा जीन असे म्हणतात. प्रत्येक जनुकामधील कोडनुसार एक प्रथिन तयार होते. ते प्रथिन शरीरात ठराविक काम करते. आपले संपूर्ण शरीर आणि त्याला नियंत्रित करणाऱ्या यंत्रणा या मुख्यत्वे प्रथिनांपासून बनलेल्या असतात. अशा प्रकारे DNA मधील अनुवंशाचे शरीर आणि मनाच्या कार्यावर पूर्ण नियंत्रण असते. मनुष्याचे दिसणे, विचार करणे, बोलणे, वागणे इत्यादी सर्व अनुवंशानुसार घडते. DNA पासून प्रथिने तयार होण्याची प्रक्रिया रसायनांमध्ये साठवलेल्या ब्रम्हउर्जेशिवाय शक्य नाही. पुढे प्रथिने ब्रम्हउर्जेचाच उपयोग करून शरीरातील विविध कार्य पार पाडतात.
☆ महानायक आजारी पडतो तेव्हा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
(तीन वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन कोरोनामुळे आजारी पडून दवाखान्यात भरती झाले होते. त्यावेळी सिनेसृष्टीतील विविध कलाकार आणि नेते त्यांच्या भेटीसाठी येतात अशी कल्पना करून हा लेख लिहिला आहे हा लेख पूर्णपणे काल्पनिक आहे. वाचकांना काही क्षण आनंद द्यावा हाच या लेखाचा उद्देश आहे )
चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ अर्थात बिग बी स्मॉल बी, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांच्यासह कोरोनाची बाधा झाल्यामुळे मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. या प्रसंगी त्यांना राजकारणी आणि सिने क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती भेटायला येतात. त्यांच्यामध्ये काय काय संवाद होतात ते बघा.
सुरुवातीला नानावटीचे डॉक्टर, ‘ बच्चनसाब, आप चिंता मत किजीये. आप जल्दी ठीक हो जायेंगे. वैसे मै आपका बेड कहा लगवा दु ? ‘
‘ये भी कोई पुछनेकी बात है डॉक्टर साहब? आप तो जानते है की हम जहाँ खडे (अब पडे) होते है, लाईन वहींसे शुरु होती है. आप जहाँ चाहे हमारा बेड लगवा सकते है.’
अमिताभला स्पेशल रूम दिली जाते. तो बेडवर पडलेलाच असतो तेवढ्यात त्याला भेटायला राजेश खन्ना येतो.
‘ ए बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये. लंबी नही. ये तो मेरा डायलॉग है. ये मेरी जगह तुमने कैसे ले ली बाबू मोशाय.? मै जानता हूं तुम्हे कुछ नही होगा. भगवान तुम्हारे सारे दुख मुझे दे दे और तुम्हे लंबी आयु दे. ‘ असं म्हणून आपल्या खास स्टाइलमध्ये काका उर्फ राजेश खन्ना त्याचा निरोप घेतो.
तो जात नाही तोपर्यंत शशी कपूर येतो. अमिताभला बेडवर पाहून त्याला वाईट वाटते. तो म्हणतो
‘ मेरे भाय, तुम्हारी जगह यहा नही है. शायद तुम गलतीसे यहा आ गये हो. ‘
अमिताभ त्याला म्हणतो, ‘ हां, मेरे भाई. होता है ऐसा कभी कभी. ये सब तकदीर का खेल है. तुम हमेशा कहते थे ना की तुम्हारे पास क्या है ? तो लो आज सून लो. मेरे पास कोरोना है. बिलकुल नजदिक मत आना. वरना ये तुम्हे भी पकड लेंगा. ‘
शशी कपूर घाबरतच निघून जातो. तेवढ्यात धर्मेंद्रचे आगमन होते.
‘ जय, ये कैसे हो गया जय ? क्या हमारी दोस्ती को तुम भूल गये ? तुम्हे याद है ना वो गाना जो हम कभी गाया करते थे. ये दोस्ती हम नही तोडेंगे. मै तुम्हे अकेला नही लडने दूंगा इस बिमारीसे . तुम बिलकुल अकेले नही हो मेरे दोस्त. हम दोनो मिलके इसे खत्म करेंगे.’
एवढ्यात तिथे संजीवकुमारचे आगमन होते. त्याने अंगावर शाल पांघरलेली असते. धर्मेंद्रचे बोलणे त्याच्या कानावर पडलेले असते. तो दातओठ खाऊन म्हणतो
‘ तुम उसे नही मारोगे. तुम उसे पकडकर मेरे हवाले करोगे. इन हाथोमे अब भी बहुत ताकत है. ‘
धर्मेंद्र आणि अमिताभ म्हणतात, ‘ हम कोशिश जरूर करेंगे, ठाकूरसाहब. लेकीन ये अब बहुत कठीन लगता है.’
‘ कोशिश नही, तुम उसे पकडकर मेरे हवाले करोगे. हमे उसे इस दुनियासे खत्म करना है. और भी अगर पैसोंकी जरूरत हुई तो मांग लेना. मगर ध्यान रहे की आसान कामोके लिये इतने पैसे नही दिये जाते. ‘
ठाकूरसाब उर्फ संजीवकुमार गेल्यानंतर तिथे अमजदखान उर्फ गब्बरचे आगमन होते. ( इथे गब्बर म्हणजे कोरोना आहे असे आपण समजू. ) सगळे नर्सेस, वॉर्डबॉय घाबरून एका कोपऱ्यात लपतात. डॉक्टर्स त्यांच्या रुममध्येच असतात. त्याची एंट्री झाल्याबरोबर ते विशिष्ट शिट्टीचे संगीत वाजते. नंतर ऐकू येते ते गब्बरचे गडगडाटी हास्य.
‘ आ गये ना इधर ? अपनेको मालूम था भिडू की एक दिन तुम इधरच आनेवाला है. जो अपने पीछे पडता है, उसका यही अंजाम होता है. पता है तुम्हे की घरमे जब बच्चा रोता है और बाहर जाने की जिद करता है, तो माँ उसे कहती है की बेटा बाहर मत जा. कोरोना तुम्हे पकड लेगा. जो नही सुनता है उसका यही हाल होता है. कितना इनाम रखा है सरकारने हमारे सरपर, लेकिन अभीतक कोई हमारी दवा नही बना पाया . ‘ असे म्हणून तो घोड्यावर स्वार होऊन तेथून निघून जातो. (उगवतीचे रंग -विश्वास देशपांडे)
काही वेळाने त्या ठिकाणी अमरीश पुरीचे आगमन होते. गेटच्या बाहेरूनच त्यांचा खर्जातला आवाज ऐकू येतो. हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरवर कोणी तरी त्यांचे ओळखपत्र मागतं.
‘ तुम्हारी हिम्मत कैसे हुई ? मुझसे मेरा पहचानपत्र मांगते हो ? खबरदार अगर किसीने भी मुझे रोकने की कोशिश की तो. ‘ सगळे घाबरून बाजूला होतात. अमरीश पुरींचा प्रवेश थेट अमिताभच्या रूममध्ये होतो. आपल्या खर्जातल्या आवाजात अमिताभला मोठे डोळे करून विचारतात
‘ ऐसे क्या देख रहे हो ? क्या मै तुम्हे मिलने नही आ सकता ? देखो, इस वक्त तुम बिमार हो. मुगाम्बो खुश हुआ ये तो नही कह सकता ना…! मै तुम्हे एक हफ्ते की मोहलत और देता हूँ. इतने समयमे अगर तुम ठीक नही हुए तो मूझेही कुछ करना पडेगा. ‘
अशातच प्रवेशद्वारावर अभिनेत्री रेखाचे आगमन होते. तिच्या हातात सामानाच्या दोन पिशव्या असतात. रेखाचे आगमन झाल्यानंतर सगळेच तिचे मोठ्या अदबीने स्वागत करतात. डॉक्टर विचारतात, ‘ क्या आपको जया भाभी और ऐश्वर्यासे मिलना है ? ‘
रेखा म्हणते जी नही उन्हे तो मैं बाद मे मिलुंगी. मुझे पहले अमितजी से मिलना है.
एक नर्स तिला अमिताच्या रूम मध्ये घेऊन जाते. तिला पाहिल्यानंतर अमिताभचे चेहऱ्यावरती हास्य फुलते आणि तो उठून बसायला लागतो तेव्हा रेखा म्हणते, ‘ जी नही आप उठीये मत आप. आपको आराम की जरूरत हैं.
मैंने आपके लिए कुछ लाया है. ये जो छोटा बॉक्स है इसमे मेरे हाथ से बनाये हुये कुछ मास्क है. आप इन्हे पहनने से जल्दी ठीक हो जायेंगे. दुसरी बॉक्स मे आपके लिये स्टीमर लायी हूं. दिन मे दो तीन बार स्टीम लेना. मैने अपने हाथोसे तुम्हारे लिये बादाम की खीर बनाई हुई है. जो आपको बहुत पसंद है. इसे जरूर खाना.’ असे म्हणत ती डोळे पुसते. आप जल्दी ठीक हो जाइये अमितजी… और क्या कहू…? बाकी तो आप जानते हैं…’
अशातच बातमी येते की माननीय मुख्यमंत्री अमिताभच्या भेटीला येताहेत. नर्सेस, वॉर्डबॉय यांची धावपळ सुरु होते. डॉक्टर्स आपलं ते पीपीई की काय ते किट घालून तयार असतात. साफसफाई करणाऱ्यांवर उगीचच आरडाओरडा केला जातो. अमिताभची रूम स्वच्छ असली तरी परत एकदा जंतुनाशकाचा फवारा मारून आणि फरशा स्वच्छ पुसून चकाचक केली जाते. मुख्यमंत्री थेट अमिताभच्या खोलीत येतात. सोबत डॉक्टरांची टीम आहेच. अमिताभ त्यांना पाहिल्यानंतर उठून नमस्कार करण्याचा प्रयत्न करतो.
‘ अरे, आप उठीये मत. आराम किजीये . आपको जल्दी ठीक होना है. अब कैसा लग रहा है आपको ? ‘
‘ जी मै बिलकुल ठीक हूँ. ‘
‘ कोई परेशानी तो नही ना..? अगर हो तो हमे बताओ. ‘
डॉक्टरांकडे वळून, ‘ हे बघा, यांची नीट काळजी घ्या. अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांच्याकडेही नीट लक्ष द्या. मला कोणतीही तक्रार यायला नको आहे. ‘
प्रमुख डॉक्टर, ‘ साहेब, आम्ही आमच्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करतो आहोत. आपण कोणतीही काळजी करू नका. ‘
मुख्यमंत्री ‘ मग ठीक आहे. प्रयत्न करताय ना. केलेच पाहिजे. काळजी घेताय ना ? काळजी तर घेतलीच पाहिजे. काळजी घेतल्याशिवाय कसं चालणार ? काळजी घेणंच फार महत्वाचं आहे. कोरोनाचं संकट आपल्या सर्वांवरच आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केली पाहिजे. त्याशिवाय तो जाणार कसा ? ‘ डॉक्टरांना सूचना देऊन मा मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह निघून जातात.
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलच्या बाहेर अजून कडक बंदोबस्त दिसतो. सुरक्षा वाढवली जाते. ब्लॅक कॅट कमांडो इमारतीचा ताबा घेतात. बातमी येते की मा पंतप्रधान अमिताभची विचारपूस करण्यासाठी येत आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला त्यांचे आगमन होते. आपल्या सुरक्षा पथकाला बाहेरच ठेवून ते एकटेच अमिताभच्या भेटीला येतात. प्रवेशद्वारावर डॉक्टरांची टीम त्यांचं अदबीनं स्वागत करते. चालता चालता ते डॉक्टरांना विचारतात
‘ कहिये, सब ठीक तो है ? ‘
सगळे डॉक्टर्स एका आवाजात, ‘ येस सर. एव्हरीथिंग इस ओके. वी आर ट्राईन्ग अवर बेस्ट. ‘
अमिताभच्या रूममध्ये येतात. अमिताभ आधीच बेडवर उठून बसलेला असतो. त्यांना पाहिल्यावर हात जोडून नमस्कार करतो.
‘ कैसे हो ? यहां कोई कमी तो नही ? ‘ मा. पंतप्रधान
‘ जी नही. आप हमे देखने आये ये तो हमारा सौभाग्य है. ‘
‘ अरे ऐसे क्यू कहते हो अमितजी ? आपकी ओर तो पुरे देश का ध्यान लगा हुआ है. आपको जल्दी ठीक होना है और लोगोंको बताना भी है की कोरोना महामारी का मुकाबला आपने कैसे किया. तो आप जल्दी ठीक हो जाईये. ‘
मग एका हॉलमधेय मा पंतप्रधान हॉस्पिटलच्या नर्सेस, वॉर्डबॉय आणि डॉक्टर्सना पाच मिनिट संबोधित करतात.
‘भाइयों और बहनो, मै जानता हूँ की इस परीक्षा की घडी मे आप सब जी जानसे मेहनत कर रहे हो. ध्यान रहे की कोरोना को हमे हर हाल मे हराना है. दुनिया की ऐसी कोई बिमारी नहीं है की जो ठीक नहीं हो सकती. हमे सावधानी बरतनी होगी. अपनी इम्युनिटी बढानी होगी. योग और प्राणायाम के नियमित करनेसे हमे इसे दूर रखनेमे सहायता होगी. जल्दी ही हम इस बिमारी पर काबू पाने की कोशिश करेंगे और दुनिया को ये दिखा देंगे की भारत के पास हर समस्या का समाधान है और हम दुनियाको भी मार्गदर्शन कर सकते है. जय हिंद. आप सभी को मेरी शुभ कामनाये. ‘
अशा रीतीने मा. पंतप्रधानांच्या भेटीने अमिताभला भेटणाऱ्यांचा सिलसिला संपतो. नंतर डॉक्टरांनी इतरांना भेटीची मनाई केली आहे
लेखक – श्री विश्वास देशपांडे,
चाळीसगाव
९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (नववी) – तृतीय पुरूषार्थ ! ☆ श्री संभाजी बबन गायके☆
ती आता दोन जीवांची होती. तिचा आहे हाच जीव तिला नीट सांभाळता येत नव्हता तर तिथं तिच्या पोटातल्या जीवाची काय कथा? जीव राखायला चित्त था-यावर असावं लागतं. किंबहुना चित्तावरच तर देहाचा डोलारा उभा असतो अन्यथा चित्ताशिवाय देह म्हणजे केवळ भास. प्राणवायूचे उपकार वागवणारे श्वास यायला-जायला कुणाची परवानगी विचारत नाहीत. त्यामुळे काया आपल्या अस्तित्वाची पावलं जीवनाच्या मातीवर उमटत पुढे चालत असते. आणि मागे राहिलेल्या पाऊलखुणा पुसट पुसट होत जातात. त्यांचा कुणीही माग काढत येऊ नये म्हणून. चालणारा कुठल्या दिशेला जातो आहे, याचं वाटेला कुठं सोयरसुतक असतं म्हणा !
तिचे नात्या-गोत्यातले तिला आणि ती स्वत:ला विसरून कित्येक वर्षे उलटून गेली असावीत. देहाचे धर्म तिच्या देहाला समजत नव्हते तरीही ती मोठी झाली होती. हाडा-मांसाच्या गोळ्याला निसर्गाने दिलेली आज्ञा पाळत फक्त वाढण्याचं माहीत होतं, आणि निसर्ग आपली कामं करून घेण्यात वाकबगार. तो देहाची आणि बुद्धीची फारकत झालेली असली तरी त्या तनूच्या मातीतून अंकूर फुलवू शकतोच.
नऊ महिने उलटून गेलेले असले तरी नऊ दिवस शिल्लक होते, नवरात्रीतल्या नऊ दिवसांसारखे. पण या नऊ दिवसांत गर्भघटातल्या मातीत निसर्गानं पेरलेलं बीज फळाचं रूप धारण करून प्रकट व्हायला उतावीळ झालेलं असतं. नववा संपला की बाईच्या हाती काही उरत नाही…आता सुटका होण्याची प्रतीक्षा करीत दिवस ढकलायचे !
बाईची आई होण्याचे क्षण नजीक आलेले असताना ती अंधारात एकाकी होती. काया रया गेलेली.. वस्त्रं आपले कर्तव्य पार पाडून स्वत:च गलितगात्र झालेली… त्यात स्त्रीचं शरीर…झाकावं तरी किती त्या फाटक्या चिंध्यांनी ! पोटात भुकेनं दुखत असेल नेहमीसारखं असं तिला वाटत असावं म्हणूनच ती निपचित पडून राहिली होती. आपल्या पोटात कुणाच्या तरी देहांची आसुरी भूक मांसाचा जिवंत गोळा बनून लपून बसली आहे, हे तिच्या गावीही नव्हतं…तिला मागील कित्येक महिन्यांपासून नेहमीपेक्षा जास्त भूक लागायची याचा अर्थ तिला समजण्यापलीकडचा होता.
इथं देह हाच धर्म मानून माणसं देव विसरून जातात हे तिला उमगायचं काही कारण नव्हतं. कुणी कधी फसवून, तर कधी कुणी भाकरीची लालूच दाखवून तिच्याशी जवळीक साधत होतं….आणि पुन्हा कधीही जवळ करीत नव्हतं. उष्ट्या पत्रावळीवरची शितं वेचून झाल्यावर कावळे पुन्हा त्या पत्रावळीकडे एकदाही वळून पहात नाहीत, अगदी तसंच … .
आजची रात्रही अंधाराचीच होती. नेहमी गजबजलेला उड्डाणपूल आता थोडी उसंत अनुभवत होता. त्याच्याखाली शहराची अनौरस पिलं आस-याला जमा झालेली होती. इथं उजेडाची अडचण होते सर्वांना.
त्या दहा जणी दिवस संपवून आपल्या वस्तीकडे निघालेल्या होत्या. त्यातल्या एकीच्या कानांनी एक ओळखीचा आवाज टिपला. तिच्या पाठच्या भावाच्या वेळी तिच्या आईने ओठ दातांत दाबून धरून रोखून धरलेला आणि तरीही उमटणारा आवाज…आई ! काय असेल ते असो…आई नसली तरी ओठांवर आई कायम रहायला आलेली असते. ती लगबगीने अंधाराकडे धावली. तिच्या सख्या तिच्यामागे झपझप गेल्या. “आई होईल ही….कधीही !” तिने त्यांना खुणावलं.
शृंगार बाईचा असला तरी शरीरं राकट असलेल्या त्यातील दोघी-तिघींनी तिच्या अंगाचं गाठोडं उचललं आणि तिथून दीडशे पावलांवर असलेल्या माणसांच्या इस्पितळाकडे धावायला सुरूवात केली. अपरात्री घराकडे पळणारी श्रीमंत वाहने यांनी हात दाखवून थांबणार नव्हतीच आणि पैशांसाठी माणसं वाहणारी वाहनं यांच्याकडून काही मिळेल की नाही या शंकेने थांबली नाहीत.
इस्पितळ बंद आहे की काय असा भास व्हावा असं वातावरण. लालसर पण जणू मतिमंद उजेड विजेच्या दिव्यांचा. एक रूग्णवाहिका थकून-भागून झोपी गेल्यासारखी एक कोपरा धरून उभी होती. रखवालदार पेंगत होते आणि कुठल्या कुठल्या खाटांवरून वेदनांची आवर्तनं उठवणारे ध्वनीच तेवढे शांतता भंग करीत होते.
त्यांनी तिथलंच एक स्ट्रेचर ओढून घेतलं आणि तिला त्यावर आडवं निजवलं… मामा, मावशी, दीदी, डॉक्टरसाहेब असा पुकारा करीत त्या आत घुसल्या. दरम्यान रखवालदारांनी डोळे उघडले होते. या कधी आपल्या इस्पितळात येत नाहीत .. सरकारी आणि मोफत असलं तरी… आणि आज आल्यात तर एकदम दहाजणी? त्यांच्यातलीच कुणी मरणपंथावर निघाली की काय? आधी एक परिचारिका आणि पाचेक मिनिटांनी डॉक्टर तिथं आले. इथं काहीही होणार नाही….मोठ्या दवाखान्यात न्या… त्यांनी फर्मावले. त्यांच्या हातापाया पडून अॅम्ब्यूलन्स मिळवली. त्या आयुष्यात प्रथमच अॅम्ब्यूलन्समध्ये बसलेल्या होत्या. घाईगडबडीत दुसरं हॉस्पिटल गाठलं. कागदी सोपस्कार तिथल्या एका रूग्णाच्या नातेवाईक पोराने पूर्ण करून दिले. तोपर्यंत आई होणारी शुद्धीवर आलेली दिसत होती. “ काय घाई होती? हिला डिलीवर व्हायला अजून दहा-पंधरा दिवस जातील !” तिथल्या डॉक्टरांनी थंडपणे सांगितले. एका रूग्णाचे असे एवढे नातेवाईक, तेही सारखे दिसणारे त्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच असे एकत्रित पाहिले असावेत. “ घरी घेऊन जा ! आणि पुढच्या वेळेस एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्या !” असं म्हणून डॉक्टरसाहेबांनी केस तात्पुरती हातावेगळी केली. अॅम्ब्यूलन्स निघून गेली होती.
घरी न्यायचं म्हणजे पुलाखाली? त्यांच्यातल्या प्रमुख दिसणारीने काहीतरी ठरवलं आणि त्यांनी इस्पितळाबाहेर रिक्षेत झोपलेल्या चालकाला हलवून उठवलं…पैसे देईन…म्हणत त्याला इस्पितळात आणलं. स्ट्रेचरवरच्या देहाला रिक्षेत टाकलं आणि रिक्षेत बसतील तेवढ्या जणी त्यांच्या घराकडे निघाल्या. बाकीच्या येतील तंगडतोड करीत…रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसदादांचा ससेमिरा चुकवीत चुकवीत.
ती कितीतरी वर्षांनी घर नावाच्या जागेत आली होती. तिला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या जीवनावश्यक गोष्टी पहिल्यांदाच एकत्रित मिळाल्या होत्या…आणि त्या थंडीच्या दिवसांत ऊबही….ती विवाहिता नव्हती तरीही तिला माहेर मिळालं होतं….आणि नको असलेलं मातृत्व !
सकाळ झाली. आज कुणीही पोटामागे घराबाहेर पडणार नव्हतं तसंही…त्यांना त्यांच्या देवीचा कसलासा विधी करायचा होता म्हणून त्या सा-या घरातच होत्या. बिनबापाचं लेकरू म्हणून जन्माला येऊ घातलेल्या तिच्या पोटातल्या बाळाने डॉक्टरांची दहा-पंधरा दिवसांची मुदत आपल्या मनानेच अवघ्या बारा तासांवर आणून ठेवली बहुदा ! दुपारचे बारा-साडेबारा वाजले होते….आणि त्या आईसह त्या दहाही जणींनी निसर्गाच्या नवसृजनाचा सोहळा अनुभवला. तिला वेदना झाल्याच इतर कोणत्याही स्त्रीला होतात तशा, पण तिच्या भोवती राठ शरीराची पण आत ओलाव्याच्या पाणथळ जागा असलेली माणसं होती….मुलगी झाली,,,अगदी नैसर्गिक प्रसुती ! या दहाजणींपैकी कुणी आजी झालं, कुणी मावशी तर कुणी आत्याबाई ! त्यांची स्वत:ची बारशी दोनदा झालेली..एक आईवडिलांनी ठेवलेली पुरूषी नावं आणि तिस-या जगात नियतीने बहाल केलेली बाईपणाच्या खुणा सांगणारी नावं…पुरुषपणाच्या पिंज-यात अडकून पडलेली पाखरं !
घरात ढोलक वाजले. नवजात अर्भकाच्या स्वागताची गाणी झाली आणि बाळाची अलाबला घेण्यासाठी वीस हात सरसावले. त्या प्रत्येकीला आई झाल्याचा आनंद झाला जणू ! स्त्री की पुरुष या प्रश्नाच्या जंजाळात अडकून पडलेल्यांच्या हातून एक स्त्री जन्माला आली होती.
घरातल्या कुणालाही नवजात अर्भकाला सांभाळण्याचा अनुभव असणे शक्य नव्हते… त्यांनी तिला घेऊन तडक इस्पितळ गाठले…एकीने दोघा-चौघांना विचारून एका समाजसेवी संस्थेशी संपर्क साधला. कालचे दहा-पंधरा दिवस मुदतवाले डॉक्टर तिथेच होते. आश्चर्यचकीत होत त्यांनी जच्चा-बच्चा उपचारांसाठी दाखल करून घेतले. बाळ-बाळंतीण सुखरूप.
जन्मसोहळा पार पडला आणि आता भविष्याची भिंत आडवी आली. पुढे काय करायचं? कुणी पोलिसाची भीती घातली होतीच. कुठे जाणार ह्या मायलेकी…त्यात ही आई मनाने अधू ! कुणी म्हणालं आता ही सरकारी केस झाली. सरकार ठरवेल यांना आता कुठं ठेवायचं ते.
दहा जणींपैकी एक म्हणाली, ” डॉक्टरसाहेब….ही पोर आम्हालाच देता का? दत्तक घेऊ आम्ही हिला. वाढवू,शिकवू !”
“ कायदा आहे. सरकारकडे अर्ज करावा लागेल !” त्यांना सांगितले गेले.
त्या निघाल्या….सा-या जणींचे डोळे पाणावलेले ! स्त्री-पुरूषत्वाच्या द्विधावस्थेत भटकणा-या त्या दहाही जणींनी सहज सुलभ अंत:प्रेरणेनं तृतीय’पुरूषा’र्थ गाजवला मात्र होता.
आपल्याकडे बघून पोटासाठी टाळी वाजवणा-या या दशदुर्गांसाठी आपले तळहात जोडले जावेत…टाळ्यांसाठी आणि नमस्कारासाठीही !
( त्रिपुरा राज्यातील गोमती जिल्ह्यातल्या उदयपूर-बंदुआर येथे मागील एका महिन्यापूर्वी घडलेल्या या अलौकिक सत्यघटनेचे हे कथारूपांतर…कथाबीज अस्सल…पदरच्या काही शब्दांची सावली धरली आहे या बीजावर. धड पुरूषही नाही आणि धड स्त्रीही नाही अशा देवमाणसांनी सिद्ध केलेल्या या पुरूषार्थास नवरात्रीनिमित्त नमस्कार. )
मराठी भाषा ही १५०० वर्षे जूनी असून तिचा उगम संस्कृत मधून झाला. समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत गेली. मराठीचा आद्यकाल हा इ. स. १२०० च्या पूर्वीचा म्हणजे ज्ञानेश्वरीच्या लिखाणाच्याही आधीचा होय. या काळात विवेकसिंधू या साहित्यकृतीची निर्मिती झाली. यानंतरच्या काळाला यादवकाल म्हणता येईल. इ.स. १२५० ते इ. स.१३५० हा तो काळ. या काळात महाराष्ट्रावर देवागिरीच्या यादवांचे राज्य होते. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता. लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात वारकरी संप्रदायची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सर्व जातींमध्ये संत परंपरा जन्माला आली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेस सुरुवात केली. नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, कान्होपात्रा यांनी भक्तीपर रचना केल्या व मराठी भाषेचे दालन भाषिक वैविध्याने समृद्ध व्हायला सुरुवात झाली. इ. स. १२९० साली ज्ञानेश्वरमाऊलींनी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहिली. ती लिहिण्यापूर्वी माऊली म्हणतात,
‘माझा मराठीची बोलू कौतुके |
परि अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ||’
आणि ज्ञानेश्वरी वाचल्यावर मराठी भाषा अमृताहून गोड आहे याची सार्थ जाणीव होते. याच काळात महानुभव पंथ उदयास आला. चक्रधर स्वामी, नागदेव यांनी मराठी वाङमयात मोलाची भर घातली. त्यानंतर येतो बहामनी काळ. हा काळ इ. स.१३५० ते इ. स. १६०० असा मानता येईल. सरकारी भाषा फारसी झाल्याने, मराठी भाषेत अनेक फारसी शब्द घुसले. या मुसलमानी आक्रमणाच्या धामधूमीच्या काळातही मराठी भाषेत चांगल्या साहित्याची भर पडली. नृसिंहसरस्वती, एकनाथ, दासोपंत, जनार्दन स्वामी यांनी मराठी भाषेत भक्तीपर काव्यांची भर घातली. यानंतर येतो शिवकाल. तो साधारण इ.स.१६०० ते इ. स.१७०० असा सांगता येईल. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली होती. शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांना राज्यव्यवहार कोष बनवितांना फारसी ऐवजी संस्कृत शब्दयोजना करण्यास सांगितले. याच काळात मराठीस राज्य मान्यतेसोबत संत तुकाराम, संत रामदास यांचेमुळे लोकमान्यताही मिळू लागली. यानंतर येतो पेशवेकाल. हा इ. स.१७०० ते इ. स. १८२० असा सांगता येईल. या काळात मोरोपंतांनी ग्रंथ रचना केली. कवी श्रीधर यांनी आपले हरिविजय व पांडव प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात मराठी भाषा रुजविली. याच काळात शृंगार व वीर रसांना वाङमयात स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा यांची निर्मिती झाली. वाङमय हा रंजनाचा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. वामन पंडित, रामजोशी, होनाजी बाळा हे या काळातील महत्वाचे कवी होत. या नंतरचा काळ आंग्लकाळ म्हणता येईल. हा इ. स. १८२० ते इ. स.१९४७ पर्यंतचा मानता येईल. याच काळात कथा व कादंबरी लेखनाची बीजे रोवली गेली. नियतकालिके छपाईच्या सुरुवातीचा हा काळ. त्यानंतर मराठी भाषेचा उत्कर्ष वेगाने होत गेला. १९४७ ते १९८० हा काळ सर्वदृष्टीने मराठीच्या उत्कर्षाचा काळ म्हणता येईल. विजय तेंडुलकरांच्या नाटकांनी मराठीला वास्तववादी बनविले. छबीलदास चळवळ या काळात जोरात होती. दलित साहित्याचा उदयही याच काळातला. सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष यांच्या साहित्य व समीक्षांचा दबदबा या काळात होता. मध्यम वर्गीयांसाठी पु.ल., व.पु. होते. प्रस्थापिताला समांतर असे श्री. पु. भागवतांचे ‘सत्यकथा’ व वाङमयीन क्षेत्रातील गॉसिपचे व्यासपीठ ‘ललित’ याच काळातील. याच काळात ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ ही काळाच्या पुढची नाटके येऊन गेली. थोडक्यात म्हणजे इ.स.१२०० च्या सुमारास सुरु झालेली मराठी भाषेची प्रगती इ.स. १९८० पर्यंत चरम सीमेला पोहोचली. समजातील सर्व विषय कवेत घेणारी अशी ही मराठी भारतीय भाषा भगिनींमध्ये मुकुटमणी आहे.
मराठीत पु. ल. देशपांडे, चि. वि. जोशी यांनी लिहिलेले विनोदी लिखाण आहे, ज्ञानदेव, तुकारामादि संतांनी लिहिलेले भक्तीरसाने ओथंबलेले संत वाङ्मय आहे, ना.सी.फडके आदिंनी लिहिलेले शृंगारिक वाङ्मय आहे, लावणीसारखा शृंगारिक काव्यप्रकार आहे, आचार्य अत्रे लिखित ‘झेंडूची फुले’ सारखे विडंबनात्मक साहित्य आहे, वि.स.वाळिंबे सारख्यांनी लिहिलेले चरित्रग्रंथ आहेत, नारळीकर, बाळ फोंडके लिखित वैज्ञानिक कथा आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ सारखे वीर रसाने युक्त ग्रंथ आहेत, पोवाडे आहेत, अनंत कणेकर, पु. ल. देशपांडे सारख्यानी लिहिलेली उत्तमोत्तम प्रवासवर्णने आहेत, ग. दि. मा. लिखित ‘गीत रामायण’ म्हणजे नवरसांचे संमेलनच जणू!! यातील प्रत्येक काव्य वेगळ्या रसात आहे. मराठीत बाबुराव अर्नाळकर लिखित गुप्तहेरकथा व भयकथा आहेत, नारायण धारप लिखित गूढकथा आहेत, साने गुरुजींची शामची आई म्हणजे मराठीचे अमूल्य रत्नच जणू! रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध म्हणजे निवृत्ती व प्रवृत्ती यांचे सुयोग्य संमिलनच आहे. त्यांनीच लिहिलेल्या मनाच्या श्लोकांत मानसशास्त्राची मूलभूत तत्वे सामावलेली आहेत. मराठीत इतर भाषांतून अनुवादिलेल्या उत्तमोत्तम कलाकृती आहेत. मराठी नाटक म्हणजे मराठी भाषेतील रत्नालंकार होत. अगदी राम गणेश गडकरींचा ‘एकच प्याला’ ते विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ पर्यंत मराठी नाटकांचा एक विस्तृत पटच आहे. हे सर्व बघितल्यावर मराठी ही एक अभिजात भाषा आहे याची खात्री पटते.
मातृभाषेची गोडी शालेय वयापासून लावणे हे पालक व शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळ ते साधारण १९८० पर्यंत मराठी शाळांची स्थिती ‘चांगली’ म्हणावी अशी होती. पालक मुलांना मराठी शाळांत पाठवत. घरी देखील मराठी बोलले जाई. पण १९८० नंतर हळूहळू सर्व बदलत गेले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. पालक मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे प्रतिष्ठेचे मानू लागले. जागतिकरणानंतर स्थिती आणखी बिघडली. खेडोपाडी व घराघरात पाश्चात्य संस्कृतीबरोबरच पाश्चात्य भाषेनेही सर्रास प्रवेश केला. ‘माझ्या मुलाला /मुलीला मराठी बोलता येत नाही’ असं सांगणं यात पालकांना प्रतिष्ठा वाटू लागली. अशा परिस्थितीत मराठीचे भवितव्य काय?
मला तर वाटतं मराठीचे भवितव्य उज्वलच आहे. याचे महत्वाचे कारण ‘नवीन शैक्षणिक धोरण’. यात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे.अगदी अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण देखील मातृभाषेतून देण्यात यावे असे सरकारचे धोरण आहे. विज्ञानातील मूलभूत संकल्पना मातृभाषेतून चांगल्या समजतात हे आता सर्वमान्य झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक विध्यार्थी मराठीकडे वळतील व मराठीला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. यासाठी आपलीही कांही जबाबदारी आहे. अगदी आपल्या राज्यातही परभाषी व्यक्तीशी आपण हिंदीतून अथवा इंग्रजीतून बोलतो. असे न करता आपण आवर्जून मराठीतूनच बोलले पाहिजे. मराठीतून बोलण्यात न्यूनगंड बाळगण्यासारखे अजिबात नाही. जेव्हा पत्रकार परिषद होते तेंव्हा आपले नेते प्रथम मराठीतून बोलतात, पण जेंव्हा एकदा पत्रकार ‘हिंदीमे बोलिये’ असे म्हणतो, तेंव्हा आपले नेते परत तीच वक्तव्ये हिंदीत करतात. हे आवर्जून टाळायला हवे. नेत्यांनी पत्रकाराला ठणकवायला हवं कि, मी हिंदीत वगैरे अजिबात बोलणार नाही, तूच मराठीत बोल. अशा छोटया छोटया गोष्टी आपण करत गेलो कि, आपोआपच मराठीला इतर लोकंही सन्मानाने वागवायला लागतील.