भगवान शिवाच्या उपासनेचा पवित्र दिवस म्हणजे माघ वद्य चतुर्दशी. या दिवशी शिव म्हणजे महादेव यांची भक्ती भावाने पूजा व उपासना करतात. शिवलीलामृत, शिवमहिम्न, रुद्र अशा ग्रंथांचे पारायण करतात. मूर्तीला अभिषेक करतात. बेल व धोत्र्याचे फुल वाहतात. बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी व इतर शिवमंदिरात जत्रा भरतात. या पूजेमागे काही कथा सांगितल्या जातात.
त्यातील एक पौराणिक कथा-
समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून विष बाहेर निघाले. पृथ्वीचा नाश करू पाहणारे ते विष भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह झाला. देह काळा पडला. वैद्यानी रात्रभर जागरणाचा उपाय सांगितला. तेव्हा सर्व देवानी रात्रभर जागरण व नृत्य केले. शंकराने तांडव नृत्य केले. म्हणून आजही महाशिवरात्रीच्या रात्री जागर केला जातो. म्हणून ही चतुर्दशीची रात्र महाशिवरात्र म्हणून ओळखले जाते.
अशीच आणखी एक पौराणिक कथा-
एक पारधी सावज शोधण्यासाठी झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला तरी त्याला शिकार मिळाली नाही. एक हरीण पाणी पिण्यासाठी आले. पारधी बाण सोडणार इतक्यात ते हरीण म्हणाले,’ मी माझ्या कुटुंबीयांना भेटून त्यांचा निरोप घेऊन येतो’.पारधी ‘हो’ म्हणाला. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. व झाडाखाली शिवपिंड होती. पारध्याने सहज नकळत किंवा सावज स्पष्ट दिसावे म्हणून बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकायला सुरुवात केली. ती पाने शिवपिंडी वरती पडली. नकळत का होईना पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आले. त्याच्या बरोबर त्याचे कुटुंबही आले. प्रत्येक जण ‘मला मार, मला मार’ असे पारध्याला विनवू लागला. ते पाहून पारध्याच्या मनात त्यांच्या विषयी दया उत्पन्न झाली .प्राणी असूनही हरणे आपले कर्तव्य विसरत नाहीत. मी ही माझ्या मानवता धर्म, दया धर्म पाळला पाहिजे. त्यांने त्या सर्वांना जीवदान दिले. हे पाहून शिवशंकर सर्वांवर प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना कृपा प्रसाद दिला. त्या हरणाला मृगनक्षत्र आणि पारध्याला व्याध म्हणून आकाशात नेहमी करता स्थान दिले.तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशीच शिवाची कृपा सर्वांवर व्हावी म्हणून ही शिवाची उपासना .
शिवपार्वतीच्या विवाहाचा हा दिवस असेही म्हणतात. भगवान शिव हे आदि गुरु त्यांच्या पासून योग परंपरा निर्माण झाली. योग विज्ञान उगंम पावले .हजार वर्षे ध्यान केल्यावर ते स्थिर बनले, तो हा महाशिवरात्रीचा दिवस. म्हणून योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र म्हणून बघतात.
हिंदीमध्ये ‘ दृष्टिकोन ‘ या मराठी शब्दासाठी ‘ नजरिया ‘ असा एक छान शब्द आहे. नजर आणि नजरिया यात फरक आहे. नजर म्हणजे दृष्टी आणि नजरिया म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किंवा विचार करण्याची दिशा. त्यावरून एक सुंदर आणि प्रेरणादायी वाक्य आहे. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘
या वाक्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत असताना, त्यातील काही प्रसंग वाचून मनात उठलेली विचारांची वादळं. त्या दोन गोष्टींनी मनाला अगदी हलवून सोडलं. व पु काळेंचं ‘ माझं माझ्यापाशी ‘ या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वेळ मिळाला की मी अधूनमधून वाचत असतो. या पुस्तकात ‘ अमर चित्रपट ‘ या नावाचा एक लेख आहे. त्यात ‘ प्रभात ‘ चित्रपट निर्मित १९३७ सालच्या ‘ कुंकू ‘ चित्रपटाबद्दल अतिशय मूलभूत विचार वपुंनी मांडले आहेत. दुसरं पुस्तक मी सध्या वाचतो आहे त्याचं नाव आहे ‘ आश्रम नावाचं घर : कहाणी श्रद्धानंद महिलाश्रमाची ‘. अचला जोशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. आधी या दोन घटना कोणत्या ते जाणून घेऊ या.
आजच्या काळात बालाजरठ विवाह होत नाही पण काही वर्षांपूर्वी असे विवाह सर्रास होत असत. बालाजरठ विवाह म्हणजे एखाद्या अगदी कोवळ्या लहान मुलीचे लग्न साठ सत्तर वर्षाच्या वृद्धाशी लावणे. नाटककार गो ब देवल यांचं ‘ संगीत शारदा ‘ हे नाटक याच विषयावर आधारित आहे. ‘ कुंकू ‘ या व्ही शांताराम दिग्दर्शित चित्रपटात हाच विषय हाताळला आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. ‘ कुंकू ‘ चित्रपटाची सुरुवातच लहान मुले नाटकाचा खेळ खेळतात आणि त्यात एक सात आठ वर्षांची मुलगी संगीत शारदा मधील शारदा बनते. एक दहा बारा वर्षांचा मुलगा दाढी मिशा लावून वृद्ध बनतो. शारदेचा विवाह या वृद्धाशी लावून देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ही चिमुरडी मुलगी मी म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असं ठणकावून सांगते. तिला मग इतर मुलं सांगतात की अगं, हे नाटक आहे. नाटकापुरती भूमिका करायची. पण नाटक म्हणून सुद्धा ती वृद्धाशी लग्न करायला सुद्धा नकार देते. मग पुढे चित्रपटातील कथा सुरु होते. चित्रपटातील नीरा नावाच्या नायिकेचा विवाह तिचा दारिद्र्याने गांजलेला आणि पैशाचा लोभी असलेला मामा वकील असलेल्या आणि ज्यांना सगळे काकासाहेब असे संबोधतात अशा एका वृद्धाशी लावून देतो.
नीरासुद्धा आपल्या मनाविरुद्ध झालेल्या या लग्नाबद्दल जणू बंड करून उठते. ती ग्रुप फोटो काढायच्या वेळी सुद्धा येत नाही. त्यावेळी तिचा मामा तिला म्हणतो, ‘ फोटोला सुद्धा आली नाहीस. तुला जराही लाज वाटली नाही का ? ‘ तेव्हा ती त्या मामांना, मामीला आणि ज्यांच्याशी लग्न झाले त्यांना खडे बोल सुनावते. ती म्हणते, ‘ एका लहान तरुण मुलीचा वृद्धाशी विवाह करताना, गरीब गायीला कसायाच्या गळ्यात बांधताना तुम्हाला लाज नाही वाटली ? ‘ ती आपल्या नवऱ्याला, काकासाहेबांना म्हणते, ‘ तुमच्या मुलीच्या\नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न करताना तुम्हाला लाज नाही वाटली ? लाज तर तुम्हाला वाटायला हवी. ‘
ती आपल्या पतीच्या खोलीत त्याच्याबरोबर झोपायला जात नाही. घरातील मोठ्या बायकांचं सांगणं ऐकत नाही. तिचा तिच्या मनाशी आणि या सगळ्यांशी उघड संघर्ष सुरु आहे. त्या घरात पूर्वीच्या काळातील षट्कोनी आकाराचे एक टोल देणारे लंबकाचे घड्याळ दाखवले आहे. ते घड्याळ एकदा बंद पडलेले असते. तेव्हा काकासाहेब आपल्या वृद्ध नोकराला घड्याळाला चाबी दिली नाहीस का असे विचारतात. तो नोकर म्हणतो, ‘ मालक, ते घड्याळ बी आता माझ्यासारखंच म्हातारं झालं आहे. कितीबी चाबी द्या, कव्हा बंद पडंल त्याचा नेम न्हायी. ‘ हे वाक्य तो बोलतो स्वतःसाठी पण ते झोंबतात मात्र काकासाहेबांना. हे घड्याळ म्हणजे जणू काकासाहेबांच्या वृद्धत्वाचे प्रतीक.
चित्रपटात एक क्षण असा येतो की काकासाहेबांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो. ते नीरेचं कुंकू आपल्या हातानं पुसतात. त्यावेळी नीरा देखील वाघिणीसारखी चवताळून उठते. आता कुंकू लावीन तर काकासाहेबांच्या हातूनच असा निश्चय ती करते. एखाद्याचं हृदयपरिवर्तन, विचारपरिवर्तन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तीच या चित्रपटात दाखवली आहे आणि तेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. शेवटी काकासाहेब नीरेच्या कपाळी कुंकू लावतात पण ते पित्याच्या मायेनं. मनातली वासना नष्ट झालेली असते. यावेळी समाज काय म्हणेल असा विचार करत असलेल्या नीरेला ते म्हणतात, ‘ कसला विचार करतेस या जगाचा ? ज्या जगाला एका तरुणीचा एका म्हाताऱ्याशी विवाह लावून देताना काही वाटलं नाही अशा जगाचा काय विचार करायचा ! पित्याच्या जागी असलेल्या वृद्धानं आपल्या तरुण बायकोला मुलगी समजून शुद्ध भावनेनं कुंकू लावलं हे जर चालणार नसेल तर अशा समाजाची काय पर्वा करायची ?
चित्रपटात शेवटी काकासाहेबांना आत्महत्या करताना दाखवलं आहे. मृत्यूपूर्वी ते आपल्या तरुण पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘ बाळ, माझ्या मृत्यूशिवाय तुझी सुटका होणं शक्य नाही हे मी जाणून आहे. माझ्या मृत्यूनंतर तो पुनर्विवाह करावास, तुला भरपूर संसारसुख मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. तुझा प्रेमळ पिता. ‘ इथे खरं तर चित्रपट संपतो पण खरा चित्रपट सुरु होतो तो आपल्या मनात. मनाला आतून हलवून टाकण्याची ताकद या चित्रपटातील घटनात आहे. व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन तर अप्रतिम. वपुंनी या चित्रपटाबद्दल फार सुंदर आणि सविस्तर लिहिलं आहे. ते मुळातूनच वाचावं. ते वाचून मी हा चित्रपट आवर्जून पाहिला.
दुसरी घटना आहे ‘ आश्रम नावाचं घर ‘ या पुस्तकातली. श्रद्धानंद महिलाश्रमाची ही कहाणी आहे. या आश्रमाने अनेक निराधार स्त्रिया, विधवा, अन्याय, अत्याचाराने होरपळलेल्या स्त्रियांना आधार दिला आहे. अशा अनेक स्त्रियांच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यातीलच एक कृष्णाबाई. तिची कहाणी वाचून मी अस्वस्थ झालो आणि वाईटही वाटले. न कळत्या वयात म्हणजे वयाच्या केवळ नवव्या वर्षी कृष्णीचं लग्न एका मोठ्या एकत्र कुटुंबातील मुलाशी झालं. कृष्णेला न्हाण येण्यापूर्वीच मुदतीच्या तापानं तिचा नवरा वारला. माहेरची वाट बंदच होती. सासरच्यांनी तिच्यावर अनेक बंधनं लादली. तिला बाहेर जायलाच काय पण बाहेरच्या घरातही यायला बंदी केली. पण कृष्णी जसजशी वयात येऊ लागली, तशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी तिच्यावर वाईट नजरेनं पाहायला सुरुवात केली. कधी सासूबाई चार दिवस बाहेरच्याला बसल्या तर सासरे तिला पाय चेपायला बोलावू लागले. एके दिवशी पाय चेपता चेपता त्यांनी दार बंद करून घेतलं. नंतर चुलत सासऱ्यांनी हाच कित्ता गिरवला. कृष्णीला सुरुवातीला जरा वेगळं वाटलं. अर्थात बरं वाईट कळण्याचं तिचं फारसं वय नव्हतं आणि जे काही घडत होतं त्यात तिचा दोषही नव्हता. पण तिने आपल्या सासूबाईंच्या कानावर ही गोष्ट घातली. पण घरातील कर्त्या पुरुषांसमोर बोलण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. पुरुष जे काही आपल्याला देतात ते मुकाट्यानं घ्यायचं असं त्यांनी कृष्णीला सांगितलं. तीस माणसांच्या एकत्र कुटुंबात ही गोष्ट कर्णोपकर्णी व्हायला कितीसा वेळ लागणार ? दिरांनीही तिचा फायदा घायला सुरुवात केली. लवकरच ती घरातल्या सर्वांची हक्काची मत्ता झाली. अशातच तिला दिवस राहिले. मग तिच्या सासऱ्यांनी तिला आश्रमात आणून सोडले. तेव्हा तिला नववा महिना लागला होता. बाळंत झाल्यावर मुलाला आश्रमातच सोडून सासरी परत यायला तिला सासऱ्यांनी बजावले होते.
आश्रमातील बाईंना तिची ही अवस्था पाहून वाईट वाटले. त्यांनी तिला समजावून सांगितले की बाळ तू इथेच निर्धास्तपणे राहा. इथे कोणीही तुला त्रास द्यायला येणार नाही. पण कृष्णीचा मनात परत जायचे होते. तिला त्या जीवनाची चटक लागली होती. बाईंनी तिला सांगितलं की तुझं रूप, वय साथ देतं आहे, तोपर्यंतच तुला सासरी विचारतील. एकदा का वय सरलं की मग तुझे हाल कुत्राही खाणार नाही. एके दिवशी कृष्णी प्रसूत झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. एका सकाळी कोणाला नकळत त्या बाळाला तिथेच टाकून कृष्णी पुन्हा आपल्या सासरी निघून गेली.
तसं पाहिलं तर या दोन घटनांचा परस्पर संबंध काही नाही. ‘ कुंकू ‘ चित्रपटातील नीरा आणि या महिलाश्रमात आलेली कृष्णी या दोघीही परिस्थितीच्या बळी ठरल्या. पण दोघींच्या आयुष्याला नंतर जे वळण मिळालं त्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. निराला बऱ्यावाईटाची जाण आहे. ती परिस्थितीचा बळी ठरली तरी आहे त्या परिस्थितीत जगण्याचे ती नाकारते. परिस्थितीविरुद्ध बंड करून उठते. तिच्या वागण्याने काकासाहेबांना सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. तिने पुन्हा लग्न करून तिचा संसार भविष्यात फुलावा यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे समर्पण केलं. याउलट गोष्ट कृष्णीची आहे. ती जरी परिस्थितीची बळी ठरली आणि जे काही घडले त्यात तिचा दोष नसला, तरी मुळातच त्या नरकात आपले आयुष्य वाया घालवण्यापेक्षा काही वेगळा विचार ती करू शकली असती. तिला उर्वरित आयुष्य महिलाश्रमात घालवून स्वतःची प्रगती साधता आली असती. पुढे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता आले असते. पण अशा प्रकारची उर्मीच तिच्या मनात उठत नाही. हा दृष्टिकोनातला फरक नीरा आणि कृष्णी यांच्यात आपल्याला दिसतो.
आहे त्या परिस्थितीत तसेच जगणे किंवा कसेबसे दिवस काढणे याला जगणं म्हणता येणार नाही. परिस्थितीशी संघर्ष तर सगळ्यांच्या नशिबी असतो. पण मी आहे त्याच परिस्थितीत राहणार नाही. स्वकष्टाने, प्रयत्नाने, बुद्धीने, जिद्दीने मी पुढे जायचा प्रयत्न करीन यातच मानवी जीवनाचे साफल्य आहे. मी जे कोणते काम करतो, ज्या कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा आणखी काही वर्षांनी मी नक्कीच पुढे गेलेलो असेन, मी काहीतरी नवीन शिकेन.
ज्या परिस्थितीत मी जन्मलो, जगलो त्याच परिस्थितीत नक्कीच निवृत्त होणार नाही, त्याच परिस्थितीत नक्कीच मरणार नाही अशा प्रकारची दुर्दम्य आशा आणि जिद्द जो मनात बाळगतो, त्याच्या आयुष्याचे सोने होते. यातील आहे त्याच परिस्थितीत खितपत राहून आनंद मानणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी कृष्णी आहे तर प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करून पुढचं प्रगतीचं पाऊल टाकू पाहणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी नीरा आहे. हा दृष्टिकोनातला फरक आहे. म्हणून त्या प्रसिद्ध हिंदी ओळी पुन्हा आठवतात. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तीया बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘
‘मौन म्हणजे काय?’ विचारल्यावर रमण महर्षींनी चूप राहणे म्हणजे मौन नाही तर तेच अनंत असं प्रकटीकरण आहे, असे सांगितले. वाणी आणि कुठलाही संकल्प नसलेली अवस्था म्हणजे मौन आहे! ते साधण्यासाठी कुठलीतरी धारणा मनात घेऊन त्याचं मूळ शोधलं पाहिजे. अशा एकाग्रतेनेच मौन प्राप्त होईल हे अभ्यासाने शक्य आहे. कोणतीही मानसिक क्रिया न करता केलेली साधना म्हणजे मौन आहे. मनाला वश करणे हेच खरं मौन आहे.
ज्यावेळी स्त्रिया डोक्यावर घागर घेऊन इतर बायकांशी बोलत असतात.. चालत असतात. तेव्हा त्यांचं लक्ष डोक्यावरच्या घागरीतल्या पाण्यावरच असतं त्या केवळ बोलत असतात. अशाच प्रकारे जेव्हा एखादा ज्ञानी पुरुष समाजात वावरत असतो. तेव्हा त्याच्या साधनेत कुठलाही प्रकारची बाधा तो येऊ देत नाही. कारण त्याचं मन हे त्या घागरी सारखं ब्रह्मात स्थिर असतं.
माणसाचा स्थायीभाव हा शांती आहे. पण मन मात्र त्यामध्ये बाधा आणत असल्याने तो अशांत बनतो. त्यामुळेच मौन साधल्याने आपोआपच शांतीकडे प्रवास सुरू होतो.
मनाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यावर आपणास लक्षात येईल की ते लपून बसते ते दिसतच नाही. आत्ता इथे तर थोड्यावेळात दुसरीकडे!असं ते लपाछपी खेळतय. मात्र मन दुसरं तिसरं काही नसून विचारांची सरमिसळ आहे. आपल्या विचारात संकल्पाची निर्मिती झाल्यामुळे आपण त्याच्या निवारणासाठी, पूर्तीसाठी पुन्हा विचार करू लागतो. ह्या स्थितीला.. प्रक्रियेला आपण मन ह्या संज्ञेने संबोधतो.
विचार आणि विवेक जोडणारी गोष्ट म्हणजे बुद्धी होय. अहंभाव, मन, बुद्धी ह्या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आपण ज्याला वस्तुतः आत्मा मानतो ते वास्तविक पाहता अहंभाव, मन किंवा बुद्धी ह्यापैकीच कुणाची तरी कल्पना असते. कोणत्याही संकल्पनेचा उदय हा ‘मी’ पणातूनच होतो. त्या मीपर्यंत पोहोचणे कठीण काम आहे कारण तो सतत असणारच आहे तो नष्ट होणे शक्य नाही. ‘दृष्टीम ज्ञानमयी कृत्वाम. ‘ आपल्या दृष्टीला ज्ञानमय करणे म्हणजे सगळीकडे समत्व आणि ब्रह्मत्व दिसेल. मात्र आपला दृष्टिकोन बाह्य झाल्याने बाहेरच्या वस्तूंवर टिकून असल्याने आपल्याला हे सगळं लक्षात येत नाही. पण दृष्टीला अंतर्मुख केल्याने.. आत अजून डोकावून बघितल्याने आपण केवळ आणि केवळ आत्मा आहो हे लक्षात येईल.
चोर जसा स्वतःलाच शोधून देणार नाही. तसं मनही शोधायला गेल्यावर ते स्वतःला शोधून घेणार नाही. नजरेसही पडणार नाही. कारण ते खोटं आहे. खोट्याचा शोध घेतला तर तो लागणारच नाही कारण ते आहेच नाही. तो एक भास असतो आपली तशी मान्यता असते. ह्यामुळे खरं असलेलं आत्मतत्त्व आपण हरवून बसलो आहे. म्हणून आत्म्याचा शोध घ्या.. मनावर राज्य करण्याचा तोच एक उपाय आहे. आणि तेच सत्य आहे.
आपण कागदावर लिहिलेले अक्षर वाचतो.. मात्र हे करत असताना केवळ अक्षरांवर आपले लक्ष असते त्याला आधार देणाऱ्या कागदावर नाही.. अगदी तसंच आपलं झालेला आहे.. आत्म्यावर असलेल्या मन आणि अहंभाव ह्यालाच आपण महत्त्व देत आहोत त्याला आधार देणाऱ्या आत्म्यावर कुणाचेही लक्ष नाही. ह्या दोष कुणाचा आहे ?आपलाच! जसं की एखाद्या कॅनव्हास वर चित्रकार अलग अलग चित्रे रेखाटतो देखावे काढतो. अगदी तसंच आपणही आपल्या मनपटलावर अनेक अनेक स्वप्निल चित्रे रंगवत असतो. ती नाहीशी होणारी असतात मात्र त्या मनपटलाला आधार देणारा.. पृष्ठभूमी देणारा कॅनव्हास.. आत्मा आपण विसरून जातो. आपण आत्म विचारात सलग्न असलं पाहिजे. तेव्हाच लोक विचार आपोआप निघून जाईल. अनात्म निघून जाईल. हाच खरा आत्मविचार आहे. आत्मा ह्या शब्दातच देह, मन, मनुष्य, व्यक्ती, परमात्मा, इत्यादी चा समावेश असल्याचे लक्षात येईल.
आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भविष्याच्या चिंतेबद्दल.. संशयाबद्दल विचार करणाऱ्याला पकडल्यावर लक्षात येईल की आत्म्यामध्ये स्थिर नसल्याने आपण क्षुब्ध होत आहोत.. भुकेजलेलो आहोत. जगातल्या चिंता आणि समस्यांनी आपण ग्रासलेलो आहोत. हे केवळ आत्म्यापासून दूर गेल्याने होते. म्हणून जर तुम्ही आत्म्याशी दृढतेने टिकून राहिला.. जुळून राहिला तर सर्व समस्या नाहीशा होऊन जातील लुप्त होतील. अशाने मन हळूहळू त्याच्या सर्व मागण्या सोडून देईल आणि तुम्ही आत्म्यामध्ये शांतीने जगू शकाल राहू शकाल.
दोन अक्षरी शब्द ज्यात सर्व विश्व व विश्वाचे गुपित दडले आहे. विश्व जसे अनादि अनंत आहे तशीच भूक पण अनादी अनंत आहे. किंबहुना जशी विश्वनिर्मिती झाली तशी भूक पण निर्माण झाली. मनुष्य, पशु पक्षी चर अचर ह्या जीव वैविध्यपूर्ण सृष्टीत भूक ही अशी गोष्ट आहे की त्यासाठीच सर्व जग राहाटी चालू होती, आहे, आणि राहील हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जो जो प्राणी जन्माला आला तो तो जन्मजात भूक घेऊन आला. भूक आहे म्हणूनच सर्व काही आहे भुकेसाठीचा संघर्ष अबाधित चालू आहे.
“काय आहे ही भूक”. भूक ही अनेक प्रकारची आहेच, सरळधोटपणे जीवन जगताना जी ऊर्जा हवी ती शरीराला पुरवणारे अन्नघटक, पोटात घेऊन त्याचे रूपांतर शरीर अवयवात, शरीरवाढीसाठी करणे म्हणजेच शरीर पोषण करणे. आम्ही म्हणतो भूक पोटात लागते पण मित्रांनो भूक ही सर्व शरीररसरक्तादि अवयवांची भूक ही पोटातील अवयव, ज्याला आपण अन्नाशय किंवा आमाशय पुरवत असते.
सर्व प्राणीमात्रादी अन्नप्रकार हे वेगवेगळ्या पद्धतीने असले तरी सगळ्यांचं काम एकच भूक शमवणे व आपले अस्तित्व कायम राखणे, जीवित राहणे. जीवन जगण्याचा केलेला आटापिटा हा भुकेसाठीच असतो.
॥ अन्नपूर्णा ॥
।। अन्नपूर्णे सदा पूर्णे
शंकर प्राण वल्लभे
ज्ञान वैराग्य सिद्धर्थम
भिक्षां देहीच पार्वती ।।
वरील श्लोकात शंकराचार्य काय म्हणतात बघा… अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वती. चक्क महादेवसुध्दा पार्वतीकडे भिक्षा मागतात. कुठल्या प्रकारची तर ज्ञान मिळण्यासाठी व वैराग्य प्राप्तीसाठी भिक्षा मागतात. भिक्षा म्हणजे भीक मागणे.
भीक कशासाठी तर पोट भरण्यासाठी नव्हे तर ज्ञान” व ज्ञानेश्वर” मिळवण्यासाठी. याचाच अर्थ मित्रानो भूक म्हणजेच मोह आहे, हा मोह साक्षात पार्वती आहे, तिच्याकडे. शरीरवाढीसाठीची भिक्षा भूक शमविण्यासाठी मागितली आहे.
किती प्रकारची भूक आहे.
शरीरासाठी आवश्यक अन्न!
14 विद्येसाठीची भूक !
64 कलेची भूक ही ! ज्ञानप्राप्तीसाठीची आहे
वैराग्य भूक ही सर्व आयुष्यातील टप्पे पार झाल्यावरची आहे.
भूक ही कलेसाठी,
भूक शरीर शय्यासुखासाठी’:
भूक शरीर रक्षणासाठी,
भूक ही ज्ञान, मिळविण्यासाठी
शेवटी भूक वैराग्य ! प्राप्तीसाठी
म्हणजेच चारीही आश्रम मिळण्यासाठी आहे.
भूक मारणे म्हणजे उपवास. उपवास म्हणजेच अग्नी प्रदीप्त… अग्नी प्रदीप्त म्हणजेच सत्वगुण.. सत्वगुण म्हणजेच प्रकाश… प्रकाश म्हणजेच ज्ञान प्राप्ती…
बघा मित्रांनो आपण एवढया सगळ्या गोष्टी कुणाकडे मागतो आहोत तर अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती म्हणजेच प्रकृती म्हणजेच स्त्री कडे. ह्या एवढया गोष्टी स्त्री म्हणजेच मोहाकडे आपण मागतो याचाच अर्थ भोगाकडून वैराग्याकडे !
मग मित्रांनो हाच निसर्गदत्त सिद्धांत आहे. हाच सिध्दांत ओशो रजनीश यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितला. संभोगातून समाधीकडे…
पण पण पण
मित्रांनो असंही आहे की जे जन्मतः वैरागी आहेत ते कसे तर ते अवधुतच असतात. त्यांचा ज्ञान परिसीमा ही सत्वगुण प्रकाशितच असते, त्यांना भूक तहान इतर गोष्टीची आवश्यकता नसतेच. ते अवलिया असतात. सामान्य जनांनाच कैक प्रकारची भूक असते किंबहूना भूक आहे म्हणूनच जगातील इतर व्यवहार चालत असतात. ! लौकिक व अलौकिक भूक हेच खरे दोन प्रकार म्हणता येतील. सांख्य ह्या दर्शनशास्त्र प्रकारात काही सिध्दांत मांडले ते अभ्यासनीय आहेत.
भूक अनेक प्रकारची आहे हे खरंच, सर्व प्रकारची भूक ही जीवनात असणे यालाच तर आयुष्य म्हणतात, ज्ञानाचा सम्यक उपयोग करून भूक भागवणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
कोणती भूक ज्यास्त हाताळावी हे ज्यांनी त्यांनीच ठरवावे.
समुद्र तहान थोडीच भागवतो? त्यासाठी हवी असते नदी.. मग ती कोणतीही असो.. प्रत्येक तहानेचं उत्तर नदीकडे असतं.. जोवर ती आटत नाही किंवा संपून जात नाही.. आपल्या प्रवाहात येणार्या प्रत्येकाला भिजवत, त्याची तहान भागवत नदी वाहत राहते. स्वत:चे तट, चौकटीत सांभाळते. आपल्यातील अमृताचा झरा ती रिकामा करते वर्षानुवर्ष, येणार्या पुढच्या प्रत्येक पिढीसाठी. हे नदीचे दायीत्व आहे की तिच्याकडे येणार्या प्रत्येकाला तिथे तृप्त करावे, सांभाळावे, प्रसंगी पोटात घ्यावे. पण नदीही आटते कधीकधी. पोटातले सारे विकार, भावना, साल यांचा गाळ साठत जातो. क्षणांचे थरावर थर साचत जातात आणि वाहती नदी साचायला लागते जागोजागी. तिची निर्मळता, स्वच्छता, शुचिता संपायला लागते आणि मग नदीचे डबके होते. या भावना तरी कशा असतात? सगळीकडून सारख्या वाहणार्या. असलाच तर थोडाफार किंचितसा इकडचा, तिकडचा फरक असेल कदाचित. या भावना काळसापेक्ष असतात बर्याचदा. काळ बदलेल तशा बदलतात. नदीही प्रवाह बदलतेच की पण तिचा प्रवाह बदलण्याची क्रिया खूप संथ होते. एखाद्या संसारात मुरत गेलेली बाई जशी कालांतराने शांत होते तशीच नदी खोल खोल होत जाते नाहीतर मग किनार्यांच्या चौकटी मोडते.
नदीलाही हवाच की पाण्याचा पुरवठा सतत प्रवाही राहण्यासाठी. नदी आटायला लागली की आपण पात्र खोल करतो. नदीचे झरे मोकळे करतो नदीला प्रवाहित करण्यासाठी.. आपल्या मनाचंही असचं असतं थोडफार. तुझं आहे तुजपाशी असं असताना आपण शोधत राहतो बाह्यजगात.. मग वाटत राहातं.. आधी होतं तेच चांगलं होतं
‘वक़्त बीतने के बाद अक्सर ये अहसास होता है…
कि, जो छूट गया वो लम्हा ज्यादा बेहतर था…. ‘
दुःख माणसाला जगण्याची सवौत्तम अनुभूती देतं, फक्त ते.. प्रवाहित करता यायला हवं. मला नेहमी वाटत बायका या नदीसारख्या असतात. कधी अल्लड झर्यासारख्या गात सुटलेल्या, कधी भावनांच्या दरीत स्वत:ला झोकून देणार्या धबधब्यासारख्या, साचलेल्या डोहासारख्या गहन आणि गूढ. कधी तारुण्याच्या अवखळ काठावर ; पाणी भरायला आलेल्या तरुणीसारख्या किंवा मग वेगाबौंड होत रस्त्यातले सारे खाच-खळगे पार करणार्या, वाटेतल्या दगड-धोंड्यांना स्वत:च्या प्रवाहासोबत वाहून नेणार्या, प्रसंगी रौद्ररूप धारण करून आपलं अस्तित्व दाखवणार्या, आसपासच्या परिसराला तृप्त करून… त्या हिरवाईला स्वतःच्या अंगावर दागिन्यांसारखे मिरवणार्या या परिपक्व बाया कायम नदीसारख्याचं दिसतात मला..
अनेक कथा-कहाण्या स्वत:सोबत जगताना नदी, आपलेच काठ रुंदावत जाते. स्वत:च्या विचारांच्या कक्षा वाढाव्यात तशी आपली सारी निर्मळता काठांनी जपत राहते. एखाद्या युगाची पापनाशिनी होवून उद्धारत राहते पिढ्या न पिढ्या. नदी सामावून घेते तिच्याजवळ येणार्या प्रत्येकाला जशी आई आपले तान्हुले कुशीत घेते. किंवा मिठीत घेते तिच्यावर प्रेम करणार्याला प्रत्येकाला, तिच्या आसर्याला आलेल्या प्रत्येकाला. बाया पण तशाच तर असतात. जरी भावनांनी कोरड्या झाल्या तरी मधूनच त्यांना मायेचे उमाळे फुटतात आणि त्या वाहू लागतात अविरत. अशावेळी जाणवतो तो त्यांच्यातला मायेचा अथांग समुद्र. प्रत्येक बाई आपल्यात समुद्राचा उणापुरा एक तरी अंश जपतेच. बायका आणि नदी सारख्याच असतात सर्वार्थाने. आपल्यातले प्रवाहीपण जपताना दोघीही.. जिवंत रहात, खळाळत जगताना आपल्यातला समुद्र काही मरू देत नाहीत.
अशावेळी जिथे नदी समुद्राला जावून मिळते तिथे तिचा, तिच्या वाहण्याचा अंत होतो हे माहिती असूनही ती कोणत्या ओढीने समुद्राकडे धावते ? हे न उमजणारे कोडे आहे. का आहे हे नदीचे संपूर्ण समर्पण? नव्या जन्माच्या ओढीने की संपून जाणार्या प्रवाहाला जपण्यासाठी? काहीही असो ती जीवन संपवते हे निश्चित. हेच तर… आहेही आणि नाहीही… मनात रुजलेला क्षण सांभाळायचा, वाढवायचा, फुलवायचा आणि तो सरला की कृष्णार्पणमस्तू म्हणून पुढच्या क्षणाचं स्वागत करायचं. इतकं सोपं असतं जगणं? नदी होणं? आणि बाई ही होणं?
☆ उगवतीचे रंग – तू गाये जा ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
तू गाये जा…
बेकरार दिल तू गाये जा
खुशियों से भरे वो तराने
जिन्हे सुनके दुनिया झूम उठे
और झूम उठे दिल दीवाने…
‘दूर का राही’ या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेलं हे सुरेख गाणं ! असेच आयुष्य जणू जगल्या सुरील्या आवाजाच्या धनी असलेल्या प्रसिद्ध गायिका चारुशीला बेलसरे. त्यांच्या गाण्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला. आई-वडिलांच्या असलेल्या संगीताचा वारसा घेऊन हे रोप वयाच्या अकराव्या वर्षीच बहरलं आणि मग पुढे त्याचा वटवृक्ष होऊन रसिकांवर सूर-सुमनांचा वर्षाव करू लागला.
गाणं चारुशीलाच्या रक्तातच होतं. वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी आपल्या बोबड्या बोलात ‘ विठ्ठला समचरण तुझे धरिते ‘ हे गीत ती गुणगुणायला लागली. या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम केलं ते तिच्या आई-वडिलांनी आणि त्यातून एवढी सुंदर मूर्ती घडवली की प्रत्यक्ष हृदयनाथ मंगेशकरांनी तिला ‘ बाल लता ‘ असं संबोधलं. आई वडील हे तिचे आद्य गुरु झाले. आपली नोकरी सांभाळून त्यांनी स्वतःची गायनकला जोपासली आणि विकसित तर केलीच पण या आपल्या चिमुकलीला गान कलेचा वसा आणि वारसा दिला. ‘ बोलात बोबडीच्या संगीत जागविले. ‘ आणि मग एक एक सूर अमृतात न्हावून येऊ लागला.
वयाच्या केवळ ११ व्या वर्षीच तिने आपला स्वतंत्र संगीताचा कार्यक्रम केला. १५ फेब्रु. १९७० या दिवशी हा कार्यक्रम झाला. तो ही तिकीट लावून. अर्थात आई-वडील साथीला होतेच. या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदीयाळी हजर होती. तिच्या गायनाला बाल लता म्हणून दाद देणारे स्वतः हृदयनाथ मंगेशकर, पंडित सी आर व्यास, शिरीष पै, गायक अरुण दाते, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग. या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थिनी असलेली चारुशीला एवढ्या आत्मविश्वासाने आणि तन्मयतेने गायली की श्रोत्यांसह या मान्यवरांची दाद तिला मिळाली.
मग तिचे एकेक पाऊल पुढे पडत गेले. प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी तिचे गाणे ऐकले आणि तिला आपल्या चित्रपटात संधी देण्याचे मान्य केले. तसेच प्रख्यात गायक आणि संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनीही तिचे गायन ऐकून तिला शाबासकी दिली आणि मग ‘ कार्तिकी ‘ या चित्रपटासाठी तिचं पहिलं गीत रेकॉर्ड झालं. त्यानंतर १९७५ पर्यंत आहुती, बाईने केला सरपंच खुळा, पाच रंगाची पाच पाखरं, चंदनाची चोळी अंग अंग जाळी या पाच चित्रपटातील गीते गाण्याची संधी मिळाली या काळात राम कदम, सुधीर फडके, एल बी सारंग, विश्वनाथ मोरे, यशवंत देव, शांकनिल, शशिकांत राजदेरकर यांच्यासारख्या विविध संगीतकारांकडून त्यांना गायनातील बारकावे शिकता आले. केवळ नववीत असताना प्रख्यात संगीतकार सी रामचंद्र यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गीते त्यांनी गायली.
याच काळात महाराष्ट्रात विविध ठिकाणी गीत रामायणाचे आणि सुगम संगीताचे कार्यक्रम करण्याची संधी त्यांना मिळाली यातूनही त्यांच्या गायनात परिपक्वता येत गेली. मराठी चित्रपटांप्रमाणेच अनेक नाटकांमध्ये पार्श्वगायनाची संधीही त्यांना मिळाली. त्यामध्ये यज्ञ, दुभंग, प्रतापगड, भक्तीमहिमा, दुर्गा झाली गौरी, वृक्षवल्ली आम्हा, सत्य महाभारत अशा नाटकांचा समावेश आहे. १९७५ च्या सुमारास दूरदर्शनवर झालेल्या ‘ किलबिल ‘ या कार्यक्रमात त्यांनी काही बालगीते गायली. याच कालावधीत प्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘ रिमझिम झरती श्रावणधारा.. ‘ हे गीत गायले. काही गीते सुरेश वाडकर यांबरोबर गायली. दिल्ली दूरदर्शनवरही कार्यक्रम झाले. मुंबई आकाशवाणीवर भावसरगम या कार्यक्रमात गजानन वाटवे, श्रीनिवास केसकर, प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगम यांच्यासारख्या संगीतकारांनी त्यांच्याकडून विविध लोकप्रिय गीते गाऊन घेतली आणि एक गायिका म्हणून चारुशीला बेलसरे हे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरही रसिकमान्य झाले.
पं सी आर व्यास हे शास्त्रीय संगीतातील मोठे व्यक्तिमत्व ! त्यांनी चारुशीला यांना सहा वर्ष शास्त्रीय संगीत शिकवले. ग्वाल्हेर घराण्याची गायकी आणि बसंत, मालकंस, अहिरभैरव, यमन आदी विविध राग त्यांनी शिकवले. ‘फुल खिले है गुलशन गुलशन ‘ हा लोकप्रिय कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर सादर करणाऱ्या बेबी तबस्सुम यांच्याबरोबर चारुशीला यांनी अनेक ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम ‘ तबस्सुम हिट परेड ‘ या नावाने केले केवळ पाच वर्षात जवळपास २००० कार्यक्रम संपूर्ण भारतभर त्यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये नामवंत कलाकारांची हजेरी असायची.
कोणाही व्यक्तीला आपला शिष्य म्हणून सहजपणे न स्वीकारणारे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांनी जेव्हा चारुलता यांचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांना शिकवण्याचे मान्य केले आणि पंडितजींनी कडून त्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या. या काळात त्या एसएनडीटी महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात संगीत शिकवत होत्या. परंतु गायन शिकायचे तर त्यासाठी वेळ दिला पाहिजे असे पंडितजींनी सांगितल्यावर त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला. आणि पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतले. पंडितजींनी जवळपास दहा वर्षे त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांची अवस्था ‘ देता किती घेशील दो करांनी ‘ अशी झाली.
आपणा सर्वांना मोहन जोशी हे नाव उत्तम अभिनेते म्हणून माहिती आहे परंतु ते उत्तम गातातही हे फार थोड्या लोकांना माहिती असेल. त्यांच्यासोबत चारुशीला यांनी ‘ गोविंदा आला रे ‘ या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये अनेक गीते गायली. साक्षात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासमोर त्यांची गाणी त्यांनी गाऊन दाखवली आणि लतादीदींनी त्यांचे खूप कौतुक केले. मॉम कॅसेट कंपनीने त्यांची ‘ हिट्स ऑफ लता ‘ ही कॅसेट प्रसारित केली. ती अतिशय लोकप्रिय ठरली.
पुढे त्या पुण्याला स्थायिक झाल्या. योगायोगाने त्यांची संत साहित्याचे अभ्यासक असलेले डॉ अरविंद नेरकर यांच्याशी भेट झाली. मग त्यांच्या दोघांच्या सहकार्यातून अनेक सुंदर कार्यक्रमांची निर्मिती झाली. त्यामध्ये मन हे राम रंगी रंगले, पांडुरंगी मन रंगले, दिंडी चालली चालली, अमृतवाणी ज्ञानियांची, रंग भक्तीचे यासारखे अनेक कार्यक्रम सादर झाले. या कार्यक्रमांना डॉ अरविंद नेरकर यांचे रसाळ निवेदन आणि चारुशीला यांचे सुश्राव्य गायन असा सुरेख संगम असायचा. हे कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. २४ गायत्री मंत्रावर आधारित २४ गायत्री मंत्राचा लाभ सांगणारा ‘ स्वरगायत्री ‘ हा आगळावेगळा कार्यक्रमही त्यांनी सादर केला. त्यासोबतच स्वरांच्या हिंदोळ्यावर सप्तसूर रंगले, चांदणे शिंपीत जाशी, रागांचे रंग यासारखे अनेक सुगम संगीताचे अनेक कार्यक्रम त्यांनी डॉ नेरकरांसोबत सादर केले आहेत आणि ते रसिकांचे अतिशय आवडते आहेत. केवळ इथेच त्या थांबल्या नाहीत तर साहित्यातील शब्द आणि संगीतातील गांधार असा विचार डोळ्यासमोर ठेवून या दोघांनी ‘ शब्दगांधार ‘ या दिवाळी अंकाची निर्मिती केली आणि गेल्या पंधरा वर्षापासून दर्जेदार दिवाळी अंक वाचकांना हे दोघे सादर करीत आहेत.
संगीत क्षेत्रात जवळपास ५० वर्षानूनही अधिक काळ साधना, तपश्चर्या करणाऱ्या आणि आपले अमूल्य योगदान देणाऱ्या चारुशीला यांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा अनुभव या क्षणी येतो आहे. यापुढील आयुष्यात समाजातील उपेक्षित घटकांची जास्तीत जास्त सेवा करायची आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम करायची असे त्यांनी ठरवले आहे. विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. विजया फाउंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार त्याचप्रमाणे मॉम इंडिया कंपनीतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे इतरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना लाभले आहेत. नुकताच स्वरगायत्री प्रतिष्ठान या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. या गानतपस्विनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
☆ विवाह समुपदेशन — काळाची गरज… ☆ श्री उद्धव भयवाळ ☆
आपल्या भारतीय विवाह संस्थेला जागतिक पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त आहे. भारतीयांमधील विवाहबंधनाला एक पवित्र नाते मानले जाते. भारतात वैवाहिक संबंध हे केवळ दोन व्यक्तीमधील न मानता दोन कुटुंबातील संबंध असे मानले जातात. पाश्चिमात्य देशासारखे विवाह म्हणजे एक करार ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये नाही. मात्र तंत्रज्ञान आणि आधुनिक समाज व्यवस्था यामुळे नातेसंबंधाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे.
आज इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकवरूनही विवाह जमवला जात आहे. तसेच मॅरेज ब्युरोमार्फत ऑनलाईन स्थळे सुचवण्याचा जमाना आहे; परंतु त्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत, हे वधू-वरांच्या पालकांनी लक्षात घ्यायला हवे. सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढत आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून, पती-पत्नीतील किरकोळ मतभेदांमुळेदेखील जोडपी न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेताना दिसतात. या पार्श्वभूमीवर विवाह समुपदेशन ही काळाची गरज झालेली आहे.
एखादा कौटुंबिक अगर वैवाहिक वाद जेव्हा कोर्टात जातो, तेव्हा त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त होते, तो वाद खासगी राहात नाही. कोर्टासमोर पती-पत्नी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत राहतात. कोर्टात त्याची नोंद होत राहते. आणि नाती इतकी दुभंगतात की, कधीही न जुळणारी बनतात.
घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यास सामाजिक समस्येचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वैवाहिक संबंध दृढ, आपुलकीचे आणि प्रेमाचे ठेवण्यासाठी लग्नापूर्वी विवाहपूर्व समुपदेशन आणि लग्नानंतर पुन्हा समुपदेशन याची गरज भासत आहे. लग्नाआधी एकमेकांतील न दिसलेले गुण-दोष जोडप्यांना लग्न होऊन मधुचंद्रानंतर स्पष्ट दिसू लागतात व जोडीदारास दोषांसोबत स्वीकारण्याची मनाची तयारी नसल्याने संबंध टोकास जातात, कधीही न जुळणारे बनतात. त्यामुळे जोडीदार निवडताना आणि निवडल्यानंतर विवाहपूर्व समुपदेशनसुद्धा आजच्या काळात आवश्यक झाले आहे.
विवाहपूर्व समुपदेशनामुळे जोडीदारांना विवाहापूर्वीच एकमेकांना समजून घेण्यास मदत होते व भविष्यातील गुंतागूंत अथवा मतभेदांना अगोदरच फाटा देता येतो. संस्कारातील अंतर व मतभेद यांचे प्रमाण खालच्या पातळीवर आणण्यात मदत होते. तसेच विवाहापूर्वी वधू-वर आपल्या अपेक्षा एकमेकांसमोर उघड न करता एकमेकांपासून काही अपेक्षा ठेवून असतात व त्या अपेक्षा विवाहानंतर पूर्ण झाल्या नाहीत की नात्यामधील गोडवा संपून वाद-विवाद वाढतात. विवाहपूर्व समुपदेशनामुळे जोडीदारांना एकमेकांकडून विवाहानंतरच्या अपेक्षा, आवड-निवड याबाबत उघडपणे बोलण्यास व्यासपीठ प्राप्त होते.
विवाहानंतरचे समुपदेशन तर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. नवरा-बायकोमधील तुटू पाहणारे नाते योग्य वेळी समुपदेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकजीव होते. फॅमिली कोर्टामध्ये धाव घेण्यापूर्वीही जोडप्यांना काऊन्सेलिंगद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला जातो. विवाह समुपदेशनाच्या माध्यमातून
पती-पत्नीच्या दरम्यानच्या समस्यांचा अभ्यास केला जाऊन त्याबाबत योग्य तो आणि परिणामकारक सल्ला दिला जाऊ शकतो. विवाह समुपदेशनाच्याद्वारे पती-पत्नीमधील भांडणाचे मूळ शोधून तसे प्रसंग टाळण्याबाबत मार्गदर्शन मिळू शकते. मुलांचे संगोपन आणि त्यांच्या भविष्याच्या जबाबदारीची जाणीव जोडप्यांना करून दिली जाते. त्यामुळेही जोडप्यांना घटस्फोट घेण्यापासून परावृत्त करता येणे शक्य होते. विवाहपूर्व समुपदेशनाद्वारे योग्य मार्गदर्शनामुळे मानसिक स्थिती, स्वभाव लक्षात घेऊन योग्य सल्ला दिला जाऊ शकतो. तसेच लग्नानंतरच्या समुपदेशनाने दोन कुटुंबांतील तुटणारे रेशीमबंध पुन्हा साधण्याचे पवित्र कार्य होते.
त्यामुळेच विवाह समुपदेशन ही काळाची गरज आहे, यात शंका नाही.
(पूर्वसूत्र- हॉस्पिटल येताच मी पटकन् उतरून निघालो. सोबत घोरपडेसाहेबही होतेच. आम्ही आत गेलो तेव्हा आरती, माझी आई आणि भाऊ केबिनच्या बाहेर बसलेले दिसले. मी आरती जवळ गेलो. मला पहाताच तिचे डोळे भरून आले.
“समीर सिरीयस आहे. डॉक्टर तुझीच वाट बघतायत. जा लगेच. बोल त्यांच्याशी. ” आईचाही आवाज बोलताना भरून येत होताच.
आज माझ्यापुढे काय वाढून ठेवलं असेल या आशंकेनेच मी कसंबसं स्वतःला सावरत डॉक्टरांच्या केबिनकडे धाव घेतली… !!)
पाठोपाठ घोरपडे साहेब होतेच.
भूतकाळातला चटका लावून गेलेला इथवरचा प्रसंग आरतीला सांगण्याची आवश्यकता नव्हती आणि पुढचं सगळं सांगायचं मला धाडस होत नव्हतं.
” मी शांतपणे ऐकून घेईन.. त्रास करुन घेणार नाही.. पण सांगा लवकर.. काय सांगणार होतात?… “
” त्यादिवशी डॉक्टरांच्या केबिनमधून आम्ही बाहेर आलो तेव्हाच डॉक्टर काय म्हणाले ते तुला जाणून घ्यायचं होतं. पण मोघम कांहीतरी तुला दिलासा देणारं सांगून मी वेळ मारून नेली होती. खरी परिस्थिती वेगळीच होती….. “
“वेगळीच म्हणजे.. ?”
” ऍलोपॅथिक औषधांच्या सततच्या टाळता न येणाऱ्या उपचारांमुळेच त्यादिवशी त्याला मॅनेन्जायटीसचा अॅटॅक आला होता. म्हणूनच त्याची घुसमट होऊन त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या तोंडाला फेस आला होता आणि तो काळा निळा पडत चालला होता. मला हे सगळं सांगून शांतपणे डॉक्टरांनी मला समजावलं होतं आणि मी कधी कल्पनाही केली नव्हती असा एक प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता… “
” कसला प्रस्ताव.. ?”
मी धीर गोळा करून तिच्या नजरेला नजर देत अंदाज घेत असतानाच माझ्याही नकळत माझ्याच तोंडून स्वतःशीच बोलावं तसे शब्द निसटलेच…..
“समीरला या यातनांतून सोडवण्याचा… “
ती अविश्वासाने माझ्याकडे पहात राहिली. आता सगळं सांगण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता.
” डाॅक्टर म्हणाले होते,
‘मॅनेन्जायटीसच्या अटॅकमुळे तो यापुढचं त्याचं संपूर्ण आयुष्य अंथरुणाला खिळून रहात मतिमंद म्हणूनच जगणार आहे. ते आयुष्य त्याच्यासाठी फक्त यातनामय असं असह्य दु:खच असेल. या अवस्थेतून त्याच्या अशा दयनीय अवस्थेमुळे तो कधीच बाहेर पडू शकणार नाही. जितकी वर्षं तो जगेल तोपर्यंत अंथरुणावर पडल्या अवस्थेत पूर्णत: परावलंबी आयुष्य ओढत राहील. किती दिवस, किती वर्षं हे सांगता येणार नाही. आणि तोवर त्याची देखभाल आणि सर्व प्रकारची सेवा त्याच्या आयुष्यभर तुम्हाला करावी लागेल. त्याला या सगळ्या यातनांमधून मुक्त करायची हीच वेळ आहे. पण त्यासाठी जन्मदाते पालक म्हणून तुमची संमती गरजेची असणार आहे. “
असं म्हणून त्यांनी माझ्यापुढे सहीसाठी एक फाॅर्म ठेवला. त्याकडे नजर जाण्यापूर्वीच हे सगळं ऐकून मी गोठून गेलो होतो. शून्यात पहात क्षणभरच तसाच उभा असेन तेवढ्यात घोरपडे साहेबांनी मला थोपटलं.. आणि मी भानावर आलो…
“आजपर्यंत खूप सोसलंय बाळानं आणि तुम्ही सगळ्यांनीही. जे जे करायचंय ते ते सगळं केलंयत. आता जे करायचं ते त्या बाळाच्या हितासाठी, डाॅक्टर म्हणाले तसं करणं गरजेचं आणि योग्यही आहे. ऐक माझं… ” असं म्हणून घोरपडे साहेबांनी स्वतःच्या खिशातलं पेन माझ्या हातात दिलं. त्यांचे सगळे शब्द माझ्या कानाला स्पर्शून विरून गेले. कारण मी काय करायला हवं ते मी डॉक्टरांचं बोलणं ऐकलं तेव्हाच मनोमन ठरवलंच होतं जसंकांही. मी ते पेन घेतलं. शांतपणे डॉक्टरांकडे पाहिलं. त्यांनी जे सुचवलं होतं त्यात त्यांचा कणभरही स्वार्थ नाहीय हे मला समजत होतं, पण तरीही.. ?
“डॉक्टर, तुम्ही म्हणताय त्यातलं तथ्य मी नाकारत नाही. पण निर्णय घेण्यापूर्वी एकच प्रश्न विचारायचाय. “
“कोणता प्रश्न?”
“विज्ञानाने लावलेल्या शोधांमुळे हे आपण सहज सुलभ पद्धतीने करू शकतो हे खरं आहे, पण समजा आत्ता मी बाळाला या पद्धतीने यातनामुक्त करायला परवानगी दिली, तर आमच्या संसारात पुढे येणारं आमचं अपत्य त्याच्या आयुष्यभर पूर्णतः निरोगी राहील याची खात्री हेच विज्ञान देऊ शकणाराय कां?”
डॉक्टर माझ्याकडे थक्क होऊन पहात राहीले.
“हे कसं शक्य आहे?अशी खात्री कुणीच देऊ शकणार नाही. ” ते म्हणाले.
“असं असेल तर बाळाचे जे कांही भोग असतील ते तो पूर्णपणे भोगूनच संपवू दे. मी अखेरच्या क्षणापर्यंत त्याची सोबत करेन. जन्म आणि मृत्यू हे देवाचे अधिकार आपण आपल्या हातात नको घ्यायला. तो जिवंत असेल तितके दिवस त्याची सगळी सेवा मनापासून करणं हेच माझं सुख समजेन मी. आपण शक्य असेल ते सगळे उपचार सुरू ठेवूया डॉक्टर… “
माझं बोलणं संपलं तरी आरती त्यातच हरवल्यासारखी क्षणभर गप्प बसलीय असं वाटलं पण ते तसं नव्हतं. आतून येणारे दु:खाचे कढ ती महत्प्रयासाने थोपवू पहातेय हे मला जाणवलं तोवर तिनं स्वतःला कसंबसं सावरलं. आपले भरून येणारे डोळे पुसून कोरडे केले पण ते आतून ओलावतच राहिले.
“आणि.. हे.. हे सगळं आज सांगताय तुम्ही? इतके दिवस स्वतः एकटेच सहन करत राहिलात? मला विश्वासात घेऊन कां नाही सांगितलंत सगळं.. ?”
दोघांनीही दडपणात राहून काय केलं असतं आम्ही? कुणातरी एकाच्या मनातला आशेचा किरण तरी विझून चालणार नव्हता ना? आणि ती हे सगळं सहन नाही करु शकणार असंही वाटत होतं हेही खरं.
“तुला मुद्दाम सांगावं अशी ती वेळ नव्हती. आणि ते तुला सांगायलाच हवं अशी हीच वेळ आहे म्हणून आत्ता सांगितलं. आता मी बोलतो ते नीट समजून घे. माझ्या मनात अनेक प्रश्न गर्दी करतायत. लिलाताईच्या पत्रानं मला सावरलंय, दिलासा दिलाय, म्हणूनच या परिस्थितीतही मी सर्व बाजूंनी या घटनेचा शांतपणे विचार करु शकतोय. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधांनी बरा होण्याच्या पलीकडे गेलाय ही आपल्यापैकी डॉक्टर, मी आणि घोरपडे साहेब याखेरीज बाकी कुणालाच माहित नसलेली गोष्ट लिलाताईपर्यंत पोचणं शक्य तरी आहे कां?आणि तरीही… ? तरीही ते तसं ती तिच्या पत्रात अगदी सहजपणे लिहितेय. हो ना? शिवाय समीर बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि पूर्ण बरा होऊन तो परत येणार आहे हेही आपल्याला सांगतेय. यावर आपला विश्वास बसावा, आपण सावरावं म्हणूनच जणू मला आज तिच्या आईना भेटायला जायची बुद्धी होते, तिथे जाण्यापूर्वीचं तुझ्या अस्वस्थतेमुळं मनात निर्माण झालेलं त्यांच्याबद्दलचं अनाठायी किल्मिष त्यांना अंतर्ज्ञानाने समजले असावे इतक्या सहजपणे त्या आपुलकीच्या शब्दांनी अलगद दूर करतात काय आणि आपल्याला निश्चिंत केल्यासाठीच बोलल्यासारखं लिलाताईच्या वाचासिध्दिबद्दल उत्स्फूर्तपणे सांगतात काय… सगळंच अतर्क्य आहे असं नाही तुला वाटत?”
सगळं ऐकलं आणि खऱ्याखोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत असावी तशी ती विचारात पडली. पण क्षणार्धात तिने स्वत:ला सावरलं आणि ठामपणे म्हणाली, ” तुम्ही समजता आहात तसं सगळं घडलं तरी तेवढ्याने माझं समाधान होणार नाहीs….. “
“म्हणजे.. ?”
“म्हणजे आपल्याला पुन्हा मुलगाच झाला तर आपला समीरच परत आलाय असं तुम्ही म्हणालही, पण मी…. ? तुम्हाला कसं सांगू… ? रात्री अंथरुणाला पाठ टेकली, अलगद डोळे मिटले की केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात दोन्ही हात पुढे पसरत झेपावत असतो हो तो मी जवळ घ्यावं म्हणून, आहे माहित?आणि मग मनात रुतून बसलेल्या त्याच्या सगळ्या आठवणी खूप त्रास देत रहातात मलाs… तो गेल्यापासून रात्रभर डोळ्याला डोळा लागलेला नाहीय हो माझ्याs. त्याचे टपोरे डोळे,.. गोरा रंग,.. लांबसडक बोटं,.. दाट जावळ.. सगळं सगळं मनात अलगद जपून ठेवलंय मी. मुलगा झालाच तर तो आपला ‘समीर’च आहे की नाही हे फक्त मीच सांगू शकेन… बाकी कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली न् उठून आत निघून गेली… !
तिच्या बोलण्यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. माझ्यासाठी हा प्रश्न तिच्या भावना आणि माझी श्रद्धा अशा दोन टोकांमधे तरंगत राहिला… ! यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं आणि या महिन्यातली पौर्णिमाही लगेचच तर होती. जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला?बोलावं तिच्याशी? हो. जायला हवंच. या विचाराच्या स्पर्शाने दडपण निघूनच गेलं सगळं. मन शांत झालं.. !
मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पहात राहिलो खरा पण? गूढ.. उकलणार.. नव्हतंच. ते अधिकच गहिरं होत जाणार होतं.. !!
☆ प्राणायाम… एक वैज्ञानिक अभ्यास… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(पुरस्कार प्राप्त लेख)
नमस्ते प्राण प्राणते नमो अस्त्व
पानते/ पराची नाय ते नमः,
प्रतीचीनाय ते नमः, सर्वस्मैत इदं नमः//
” हे प्राणा, जीवनाच कार्य करणाऱ्या तुला नमस्कार असो. अपानाचे कार्य करणाऱ्या तुला नमस्कार असो. पुढे जाणाऱ्या आणि मागे सरणाऱ्या प्राणास नमस्कार असो. सर्व कार्य करणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. “
रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फिरायला निघाले. जाता जाता दवाखाने पाहिले. जवळजवळ 30-35 दवाखाने बरीच गर्दी असलेले दिसले. मनात विचार आला, खरंच इतके आजार का बरं वाढले असतील? इतके भौतिक प्रगती होऊनही आरोग्य नीट राखता येत नाही असं दिसतं. त्यासाठी जीवन पद्धती बदलायला हवी ; ही गोष्ट पाश्चा त्यांनाही कळल्याने ते लोक आता भारतीय अध्यात्म, आणि योग साधनेचा अभ्यास आणि अनुभव घेऊ लागले आहेत.
मानवाच्या कल्याणासाठी आदर्श आणि निरामय जीवन कसे जगावे, याबद्दल अनुभवातून, (इ. स. पूर्व 200 वर्षे) ऋषी पतंजलीनी शास्त्रीय दृष्ट्या अष्टांग योगाची रचना सांगितली आहे. उपनिषदे हे तत्त्वज्ञान (theory). आणि पतंजली योग ही साधना. (Practical) आहे. त्यांनी ‘योग म्हणजे चित्त वृत्तींचा निरोध’ अशी व्याख्या केली आहे. “तस्मिन्सती श्वास प्रश्वासयो: गतिविच्छेदः” म्हणजे प्राणायामात श्वासाची गती तुटणे. “त्यांनी सांगितलेले ज्ञान हे एक आचरण शास्त्र आहे. त्यांनी सांगितलेली अष्टांगे यापैकी बाह्यंगे— यम (सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य अपरिग्रह) नियम— (शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान). आसन— –शरीराची सुख स्थिती. प्राणायाम— प्राणाचे नियमन किंवा दिशा देणे. अंतरंगे— प्रत्याहार –इंद्रियांची बाहेरची धाव बंद करणे. धारणा —- एखाद्या गोष्टींवर मन स्थिर करणे. ध्यान— धारणेशी एकता- नता. आणि शेवटी समाधी स्थिती. प्राणायाम हा प्रकार अंतरंग आणि बहिरंग यांना जोडणारा सेतू आहे असे म्हणायला हरकत नाही. सुदृढ शरीर, मन आणि आत्मा पवित्र करायचा असेल तर ते कार्य प्राणायामाद्वारे होऊ शकते. जवळ जवळ 80 टक्के व्याधी प्राणायामाच्या अर्ध्या तासाच्या नियमित सरावाने लवकर दूर होतात. तसेच ध्यान आणि समाधी ही ही सहज प्राप्त होते. ही एक पूर्ण वैज्ञानिक पद्धत आहे.
संपूर्ण ब्रह्मांडाचे निर्माण ज्या पंचतत्वांच्या योगाने झाले, त्याच्या मुळात एक तत्व जे सर्वत्र आहे ते म्हणजे ‘प्राणतत्व’. पंचप्राणांपैकी प्राणायाम कोष, चेतन करून, विश्वव्यापी प्राणातून प्राणतत्व आकर्षित केले जाऊ शकते. त्यामुळे योगशास्त्रात प्राणायामाचे खूप महत्त्व सांगितले आहे. प्राणायाम (प्राणाला दिशा देणं किंवा प्राणाचे नियंत्रण) म्हणजे केवळ श्वास घेणं आणि सोडणं इतकच नाही तर त्या प्राण किंवा परमशक्ती बरोबर (vital force) जोडून राहण याचा अभ्यास हाच प्राणायाम. स्थूलरुपाने
श्वासोश्वासाची एक पद्धत आहे. श्वास आत घेणं (अभ्यंतर )म्हणजे तो पूरक. आत मध्ये रोखून धरण म्हणजे कुंभक. आणि बाहेर सोडणे म्हणजे रेचक. शरीरातील सर्व हालचालींचा वायू हा कारक असल्याने, पेशींच्या केंद्रकातील हालचाल चालू असते. त्या वायुचे नियमन म्हणजे चौथा सूक्ष्मतर प्राणायाम. विज्ञानानुसार छातीतील दोन्ही फुफ्फुसे श्वासाला शरीरात भरण्याची यंत्रे आहेत. नेहमीच्या श्वासात फुफ्फुसाचा एक चतुर्थांश भाग कार्य करतो. त्यामध्ये सात कोटी 30 लाख स्पंजासारखी कोष्टक किंवा वायुकोष असतात. पैकी दोन कोटी छिद्रातूनच प्राणवायूचा संचार होतो. प्रत्येक पेशी प्राणवायू घेते आणि CO2 (कार्बन डाय-ऑक्साइड) बाहेर टाकते. यालाच आजच्या विज्ञानात (celular tissue respiration )म्हणतात. पेशींची ही देवाणघेवाण रक्तामार्फत होत असते. विज्ञानाने बाह्य (external) आणि आंतर ((internal) असे म्हटले आहे. पण पतंजलींनी ‘स्तंभ ‘ हा तिसरा प्रकार सांगितला आहे. हवा रक्तात पुढे पेशीपर्यंत जाऊन, देवाणघेवाण होऊन, रक्ताचा दुसरा स्तंभच त्याला विज्ञान (column of blood) म्हणते. शरीरातील उत्सर्जक पदार्थ, (toxins) ही कान, नाक, डोळे, त्वचा, मलमूत्राद्वारे बाहेर पडतात. पण श्वास हा निरंतर चालत असल्याने टॉकसिन्स बाहेर पडण्याचे काम हे सतत चालू असते. श्वास घेताना जर दीर्घ श्वास घेतला, आणि रोखून धरला तर फुफ्फुसाचे कार्य 90 ते 95 टक्के पर्यंत होऊ शकते. आपोआपच श्वसन पेशींच्या माध्यमातून रक्तात येणारा प्राणवायू जास्त प्रमाणावर येतो. पुढे तो इंद्रियांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बरेच आजार दूर होतात. आधुनिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की, आजारांचे मूळ कारण, प्राणवायूची अल्प उपलब्धता हे आहे. प्राणाचा मनाशी संबंध असल्याने मनावर संयम ठेवल्याने मनही शक्तिमान होते. इतर इंद्रिये प्राणाच्या स्वाधीन होतात. योगासनांनी स्थूल शरीराच्या विकृती दूर होतात. तर प्राणायामाने सूक्ष्म शरीरावर (फुफ्फुसे, हृदय, मेंदू वगैरे) तसेच स्थूल शरीरावरही प्रभाव पडतो. त्यामुळे प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. षट्र् चक्रांचा अर्वाचीन उपचार विज्ञानाशी तुलनात्मक अभ्यास केला, तेव्हा असे लक्षात आले की, लोहचुंबक व त्याचे कार्यक्षेत्र (magnet) आणि (magnetic field )यांचा जो अन्योन्य संबंध आहे, तसाच काहीसा प्रकार (nerve plexuses ) षट्चक्रांचा आहे. मानवी शरीरात ७२ हजार पेक्षाही जास्त नाड्या आहेत. पैकी इडा (डावी चंद्रनाडी), पिंगला (उजवी सूर्य नाडी) या सक्रिय राहतात. इडेचा उगम डाव्या नासिका छिद्रातून होऊन प्रवाहित होणारा प्राणवायू लहान मेंदू (cerebellum )व ( medulla oblongata) मध्ये प्रवेश करत सुषुम्नेच्या (तिसरी नाडी )डाव्या बाजूस थांबते. याच्याच उलट पिंगला नाडीचे कार्य होते. नासिकेच्या वरील भागात दोन्ही छिद्र एकत्र येतात. तिथेच दोन्ही नाड्यांचे उगमस्थान असल्याने तेथेच शरीराचा प्रमुख जीवनीय बिंदू (vital spot) तयार होतो. येथेच इडा (parasympathetic) आणि पिंगला (sympathetic) एकत्र येऊन एक चक्र (plexus) तयार होते. तेच आज्ञाचक्र. (तिसरा डोळा). याच प्रमाणे शरीरात आणखीही चक्रे आहेत. त्याच्या स्थानाप्रमाणे त्याच्या आजूबाजूच्या इंद्रियांवर प्राणायामाद्वारे ध्यान करून संतुलित ठेवता येते. १) मूलाधार चक्र (pelvic plexus) शिवणी स्थान व reproductory संस्थेवर कार्य करते. २) स्वाधिष्ठान चक्र (hypogastric plexus) लिंगस्थान व excretory वर कार्य करते. ३) मणिपूर चक्र (solar plexus) नाभी स्थान. digestive संस्थेवर कार्य करते. ४)अनाहत चक्र (cardiac plexus) हृदय स्थान, circulatory संस्थेवर कार्य करते. ५) विशुद्ध चक्र (carotid plexus) स्थान कंठ. respiratory संस्थेवर कार्य. ६) आज्ञा चक्र (medullary plexus) स्थान भ्रूमध्य, nervous संस्थेवर कार्य) याला गंगा, यमुना, सरस्वती असा त्रिवेणी संगम म्हणतात. सर्व चक्रे मेरुदंडाच्या मुळापासून वरच्या भागापर्यंत असतात. प्राणायाम आणि ध्यानाने ती विकसित करून त्या त्या ठिकाणच्या व्याधी कमी होऊ शकतात.
योगासन आणि प्राणायामाच्या द्वारा शरीरातून बाहेर पडणाऱ्या शक्तीला बांधून ठेवणे म्हणजे बंध होय. प्राणायामात हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. १) श्वास भरून, हनुवटी कंठाला स्पर्श करून रोखून धरणे तो जालंधर बंध. २) पोट मोकळे सोडून छाती वरच्या बाजूला उपटली की तो उड्डियान बंध. ३) गुद आत ओढून घेतला की, तो मूलाधार बंध. तीनही बंध एकदाच केले (महाबंध) की, तिन्हीचेही फायदे एकत्र मिळतात.
देश, काल आणि संख्येचा परिणामही प्राणायामावर घडतो. थंड प्रदेशात हालचाली कमी होत असल्याने प्राणशक्ती जास्त लागत नाही. याउलट उष्णता असताना हालचाली जास्त, त्यामुळे प्राणशक्तीही जास्त लागते. त्याच प्रमाणे दिवस रात्रीचाही परिणाम होतो. प्रत्येक प्राण्याचे आयुष्य त्याच्या श्वासक्रीयेवर, संख्येवर अवलंबून असते. धावपळ करताना श्वास जास्त घ्यावे लागतात. उदाः- ससा मिनिटला 38 वेळा व आयुष्य आठ वर्षे साधारण, घोडा सोळा वेळा आणि आयुष्य 35 वर्षे, कासव, सर्प पाच आणि आठ वेळा त्यांचे आयुष्यही भरपूर असते. मनुष्य बारा ते तेरा वेळा आणि आयुष्य 90 ते 100 असे धरले आहे. असा श्वासाचा खजिना जितक्या काळजीपूर्वक आपण खर्च करू तितके दीर्घायुषी होऊ. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत
१) अनुलोम विलोम— मेंदू तंत्रातील द्रवामध्ये (cerebrospinal fluid)संदेश वहनाचे कार्य करणार्या अणूच्या तंत्रात (neuropeptide) शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित होत असतात इतकेच नाही तर मेंदूत होणाऱ्या भावनात्मक क्रियानाही नियंत्रित करते.
जेव्हा द्रवाचा संचार उच्च पातळी गाठतो तेव्हा मेंदूचा डावा व उजवा भाग समान क्रियाशील होतो. हे अनुलोम विलोम प्राणायामाने होते. आणखी एक गोष्ट, मेंदूच्या माध्यमातून होणाऱ्या श्वसनक्रियेत, सूर्यकिरणापासूनच्या ऊर्जा, आणि प्राणवायूचा संचार शरीरात होऊ शकतो. मेंदू सुद्धा श्वसन आणि स्पंदनाची क्रिया करतो, असा आयुर्वेदात आणि अनेक देशांच्या दर्शनात उल्लेख आहे.
२)कपालभाती—- अंतः श्वसन आणि प्रयत्नपूर्वक उश्वास यामुळे रक्तदाब वाढवून हृदयात रक्त बळपूर्वक परत आल्याने तेथील अवरोध दूर होतो. किंवा अवरोध कधीच होत नाही. आधुनिक शास्त्रात ई. ई. सी. पी द्वारे पायाच्या खालच्या भागात मिनिटाला 60 वेळा (extrnal stroke)देऊन एन्जिओ प्लास्टीच्या रुपाने त्याच्या गतीला हृदयाच्या गतीशी समान केल्याने अवरोध दूर होतो. तसेच एस. एल. ई. सारख्या असाध्य आजारावर व पोट व छातीतील सर्व अवयवांना या प्राणायामाने फायदा मिळतो.
भस्त्रिका—- साधारण श्वसनचक्रात 500 एम एल वायूचा उपयोग करतो. दीर्घ श्वास घेऊन बलपुर्वक बाहेर टाकला तर 46500 एम एल ही असू शकतो. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
सूर्यभेदी, चंद्रभेदी प्राणायाम— हे प्राणायाम क्रमशः उन्हाळ्यात कमी व हिवाळ्यात कमी करावा. करताना जालंधर व मूलबंधाबरोबर करावेत. सित्कारी, शीतली, मूर्छा, प्रणव, उद्गिथ, उज्जयी, भ्रामरी असे अनेक प्राणायाम आहेत. सर्वांचेच पद्धत आणि फायदे येथे सांगणे अवघड आहे. पण एकूणच प्राणायामाने सर्वच अवयव ऊर्जावान व शरीर निरोगी होऊन प्रतिकारशक्ती वाढते. इतकेच नाही तर प्राणायाम करणारी व्यक्ती प्रेम, करूणा, धैर्य, शक्ती, पवित्रता अशा गुणांनी युक्त होते. वाढत्या हिंसा, चोऱ्या, भ्रष्टाचार, अत्याचार या सर्व अवगुणांवर उपाय म्हणजे प्राणायाम. आजच्या युगात याची नितांत गरज आहे.
प्राणायामाचे जितके फायदे आहेत तितकेच ते नियमानुसार केले नाहीतर ते त्रासदायकही होते.
प्राणायामाचे नियम—- प्राणायाम करताना पद्मासन किंवा वज्रासनात बसावे. ज्यायोगे पाठीचा कणा ताठ राहतो. शक्य नसेल तर खुर्चीवर बसून करावा. आसन स्वच्छ असावे शक्य असेल तर पाणी व तुपाचा दिवा जवळ असावा. ज्यायोगे प्रदूषण होणार नाही. श्वास नाकानेच घ्यावा. पंचेंद्रियांवर तणाव न ठेवता मन प्रसन्न ठेवावे.
(हॅलो एन एम टी) आहार सात्विक व शाकाहारी असावा. प्राणायाम सावकाशपणे व सावधानतेने करावा. प्रथम तीन वेळा ओंकार म्हणावा. प्राणायाम तज्ञ व्यक्तीकडूनच शिकावा. वाचून करू नये. प्राणायामैन युक्तेन सर्व रोग क्षय भवेत/ आयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभवः// ( हटयोग प्रदीपिका) प्राणायामाच्या बाबत वेद, उपनिषदे, पतंजली, मनू, दयानंद या सर्वांचेच एकमत आहे. खरंच प्राणायामाला एक किमयागार असं म्हणायला हरकत नाही.
मी स्वतः रोज दीड तास योग साधना करते. आज वयाच्या 77व्या वर्षीही शरीराने मन सुदृढ, निरोगी आणि आनंदी असल्याचा अनुभव मी घेत आहे. असाच सर्वांनी अनुभव घेऊन आपले आयुष्य निरामय व आनंदात घालवावे घालवावे.
“सर्वेपि सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः/ सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख माप्नुयात// अशी सर्व जीवांसाठी प्रार्थना करुया. नमस्कार.
मी फिरत फिरत समुद्र किना-यावर गेले तांबूस पिवळा मावळता सूर्य मला नेहमीच भुरळ घालतो, लाटा आज जरा मोठ्याच होत्या जमेल तेवढी पुढे गेली, दगडांवर, भिंतीवर आपटणा-या लाटांचे तुषार छान पैकी उसळून अंगावर येत होते त्यांची खारट चव ओठांवर जाणवत होती. हलकेच पण बोचरा होऊ लागलेला सांजवारा.. पक्षांचे थवे घरट्याच्या ओढीने परतीला निघाले होते पण असं का वाटत होतं मला की आज सूर्य अस्ताला जायला उशिर करतोय… ?
आज संध्याकाळ जरा जास्तच रेंगाळली.. तिलाही कळलं मला तुझी आठवण आली.. ! स्वाभाविकच आहे म्हणा. अश्या रम्य वेळी त्याची आठवण येणारच की.. निसर्गच तो आपल्याला स्वत:त गुंतवतो हे मात्रं खरं.. समुद्र किना-यावरची संध्याकाळ आणि श्यामल काळे ढग जमा होता होता दूरवरून येणारा मातीचा सुगंध येऊ लागला कि आपसूकचं आठवणी जिवंत होऊ लागतात. पावसासोबत आमचं खूप प्रेमळ नातं आहे किंबहुना प्रत्येकाच तसं असतचं नाही का ? मग
ढगांनी केली सरींची पाठवण मग तो आला तर एकटा कसा येईल? त्याला सुद्धा आठवण करून देईल… ! आली असेल का त्याला माझी माझी आठवण ?
पाऊस पडायला लागला की सारं कसं मस्त, प्लेझंट, वेगळच हव हवंस वाटायला लागतं. पावसानं यावं, धुवांधार बरसावं आणि हो अशा वेळी नेमकी आपल्याकडेच छत्री असावी व त्यानं स्वतःची विसरून यावी.. ! किंवा याच्या उलट झालं तरी चालेल मग सर्वांच्या देखत, स्वतःच्या नकळत मला सावरत, भिजत घेउन जायचं, पुन्हा दुस-या दिवसासाठी त्याच ओढीनं एकमेकांकडे पहायचं… जसं.. धरणीच्या ओढीनं सरी येतात नी बरसतात.. केव्हा तरी परिस्थिती गडबड करते त्याच नसणं जास्त बोचरं भासतं.. एकटेपणाचं वाटतं मग माझ मन कशातच रमत नाही… उगीचच छातीत धडधडायला लागतं पण चेह-यावर ते न दाखवता काम करत रहायचं.. पण मनाचं काय ? ते तर केव्हाच ट्रांन्समध्ये गेलेलं असतं आठवणींच्या सरीत चिंब भिजत राहीलेलं असतं…. दोन्हीकडे तिचं परीस्थिती कुणी कुणाला समजावयच ? पण ते शक्य नसतं उरतं फक्त परस्परांसाठी झुरणं… कधी थेंब थेब अश्रुंचं झरणं..
चिंब पावसात आठवणींच्यात भिजायचं..
सवय लागते मग एकमेकांसाठी झुरण्याची.. !
पाऊस दरवर्षी येतच राहतो ॠतूचक्रा सोबत जीवनचक्र पण चालत रहातं आता एक छोटी छत्री सोबत आलेली असते मग पावसाची परीभाषा थोडीशी बदलते बोबडी होऊ लागते… पाऊस येतच राहतो… येतच राहतो
मग येते अशीच एक सांज संध्याकाळ आयुष्याची… पुन्हा नवा भूतकाळ दुस-याला गोठवतो. आराम खुर्चीत बसून आठवणींचे झोके घेत रहातो डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन सुकत जात असतात… आपोआप डुलकी लागते. शरीराच्या थकव्याने व मनाच्या एकटेपणाने.. मग सारी मरगळ दूर होते व त्या सोबतच परत एक संध्याकाळ स्मरू लागते आणि ती संध्याकाळ मनात रेंगाळत राहते..