पोर्ट ब्लेअर च्या सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सेलर जेलच्या दर्शनाने भारावून गेलो होतो. पण आता निसर्गाच्या सानिध्यात समुद्रावर फिरून काही दिवस तोही अनुभव घ्यायचा होता. पोर्ट ब्लेअरच्या आसपास समुद्रात बरीच बेटे आहेत. त्यापैकी हॅवलॉक आयलंड या ठिकाणी आम्ही जाणार होतो. एक दिवस माउंट हॅरियट येथे जाऊन आसपासचा अप्रतिम सुंदर निसर्ग पाहिला. गन पॉईंटवर फोटो काढले. ‘सागरिका’ म्युझियम पाहिले आणि हॅवलॉक आयलँड ला जाण्यासाठी तयार झालो.
हाय लॉक आयलँड ला जाण्यासाठी प्रथम समुद्रातून बोटीने साधारणपणे दीड तास प्रवास केला व पुढे कारने काही अंतर जाऊन ब्ल्यू रिझाॅर्ट या ठिकाणी पोहोचलो. इथून अगदी जवळ होता. त्यामुळे संध्याकाळी साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बीचवर आम्ही चालत गेलो. सेल्युलर जेल पाहून आलेला गंभीरपणा नकळत जाऊन निसर्गाच्या या रम्य रूपात रमून गेलो. समुद्रकिनाऱ्यावर बरीच गर्दी होती. पाण्यात खूप वेळ खेळायला मिळाले. सूर्यास्त होत आल्यावर दिसणारे सागराचे घनगंभीर रूप डोळ्यात साठवले गेले. सूर्यास्त लवकर म्हणजे साडेपाच वाजता सूर्यास्त झाला की बीच बंद होत असल्याने पोलीस गाडी घेऊन सर्वांना बाहेर काढले जाते! आम्ही येताना गोड पाणी आणि खोबरे खाऊन रेसोर्ट वर आलो. त्या दिवशीचा मुक्काम तिथेच होता. सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा समुद्राला भेटायला जाऊन आलो. सकाळी नाश्ता करून एलिफंटा बीचवर जाण्यासाठी प्रथम कारने आणि पुढे छोट्या बोटी ने एक दीड तास प्रवास करायचा होता. समुद्राचे रूप कितीदा आणि कितीही पाहिले तरी मनोहारी वाटते. इथे तर पाण्याचा रंगही बदलताना दिसत होता. कुठे पाचू सारखा हिरवा रंग तर कुठे निळा, ग्रे कलर दिसत होता.
दृष्टिकोन ही एक अशी गोष्ट आहे की, जी प्रत्येक माणसागणिक बदलत जाते. पण ती सकारात्मक असण फार आवश्यक आहे. मग ती एखाद्या माणसाकडे बघण्याची असो किंवा घटनेकडे. प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे. एखादे संकट जरी आले, तरी तेही आपल्याला खूप काही शिकवून गेले असा दृष्टीकोन पाहिजे, नाहीतर त्यावर रडत कुढत बसुन काहीच साध्य होत नाही. काहीजण प्रत्येक गोष्ट सकारात्मकपणे घेऊन पुढे जातात तर काही प्रत्येक गोष्टीतच रडत बसतात. काहीजणांना अर्धा ग्लास भरलेला दिसेतो तर तोच काहींना अर्धा रिकामा.
तिर्हाईत माणसांकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा. एखाद्याला एखादी व्यक्ति खूप आवडते, दुसर्याला तीच व्यक्ति आजिबात आवडत नसते. मला एक कळत नाही की, एखाद्याशी चार वाक्य बोलली की लगेच आपण त्याच्या बद्दल मनात एक चित्र म्हणजेच आपला त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टीकोन तयार करून टाकतो. आपल्याला सर्वसाधारण पणे अस वाटत असत की I’m the best judge आणि आपण कोणत्याही व्यक्तीला आगदी पंधरा वीस मिनटात पूर्ण ओळखू शकू. पंधरा वीस वर्ष संसार करूनही जिथे आपण आपल्या जोडीदारला ओळखू शकत नाही तिथे तिर्हाईत माणसाला आपण पंधरा मिनटात ओळखू शकतो असं आपण ठामपणे कसं काय सांगू शकतो ह्याच मला नवल वाटते.
मी एवढेच म्हणेन की पटकन कोणाबद्दल दृष्टिकोन बनवू नका मग तो चांगला असेल किंवा वाईट त्याच्या मनात खोल शिरा, काही वेळा जे वर दिसत नाही, ते खोल दडलेले असते. जिभेवर साखर पेरून बोलणारा माणूस आतून कारल्या सारख्या कडू असू शकतो किंवा तलवारी सारखी जिभेला धार असणारा माणूस आतून मृदू.
माणूस सोडा एखाद्या निर्जीव वस्तूकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा वेगवेगळा असतो. एकच वस्तू एखाद्याला विलक्षण आवडते, मोहून जाते हवीहवीशी वाटते तर तीच वस्तू दुसर्याला नको नकोशी, कुरूप तिटकारा आणणारी वाटू शकते.
एखाद्या फुलाची सुंदरता एखाद्याला मोहरून टाकेल तर दुसर्याला नाही. पहाटेच्या रम्य वेळी पक्ष्यांची किलबिलाट काहीजणांचा सुखकर वाटेल तर काहींना त्याच किलबिलाटीची कटकट वाटेल.
दृष्टिकोन दृष्टीकोन म्हणजे काय हो? आपणच आपल्या विचारांना दाखवलेली दिशा. आपल्याच मनाचे विचार एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे. काही वेळा आपण ज्याचा वेग इतका ठेवतो की आपल्या नकळत समोरच्या बद्दल, एक आपले मत बनवून बसतो.
प्रेक्षकांना सर्कशीत काम करणारा जोकर हा केवळ विदुषक असतो, सगळ्यांना हसवणारा पण त्याच्या दृष्टीकोनातून मात्र तो एक कलाकार असतो आणि आपला प्रत्येक कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे असा असतो त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. लोक तुमच्या बद्दल काय विचार करतात याचा विचार करू नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जात रहा.
शेवटी एवढचं म्हणेन की कदाचित माझा हा लेख वाचून तुमचा प्रत्येकाचा माझ्याकडे बघण्याचा किंवा माझ्या लिखाण बद्दलचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो हे नक्की?
अंदमान सहलीचे बुकिंग करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या ठिकाणी दहा वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली तो सेल्युलर जेल बघणे हेच ध्येय मनाशी होते. सेल्यलर जेल म्हणजे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र म्हटले पाहिजे. ब्रिटिशांनी सावरकरांना दोन जन्मठेपांची शिक्षा देऊन अंदमानला पाठवले होते. 1910 ते 1921 या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर देशासाठी कारावास भोगत अंदमानला होते. तीव्र बुद्धिमत्ता पण तितकेच कणखर मन आणि प्रतिभा त्यांच्या ठायी होती. आत्तापर्यंत ‘माझी जन्मठेप’चे पारायण झाले होते. त्यामुळे कोलू फिरवणे, काथ्या कूटणे यासारखे शारीरिक कष्ट, अंगावरची दंडा बेडी, बारी नावाच्या ब्रिटिशाच्या तुरुंग सुप्रिटेंडंटचा होणारा जाच, स्वातंत्र्य सैनिकांना होणाऱ्या यातना ,काहींना फाशी या सर्व गोष्टी आठवून या परिसरात गेल्या बरोबरच मन खूप भारावून गेले. अंदमानच्या भिंती हा इतिहास बोलका करीत असल्या तरी प्रत्यक्ष तेव्हा त्यांचा छळ कसा झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. सेल्युलर जेलमध्ये प्रवेश करताच उजव्या हाताला जो पिंपळाचा पार आहे तो आजही या सर्वांची साक्ष देत उभा आहे. या पाराखाली सावरकरांनी अनेकांना साक्षरतेचे, स्वातंत्र्याचे धडे दिले म्हणून हे जणू आपले पहिले विद्यापीठच होते!
अंदमान सहलीच्या पहिल्याच दिवशी आम्ही सेल्युलर जेल पहायला गेलो. सात फूट रुंद, दहा फूट उंच आणि साडेतेरा फूट लांब कोठडी होती.तिथे फक्त एक खिडकी होती. इथेच सावरकरांनी भिंतीवर ‘कमला’ काव्य लिहिले.
आम्ही सावरकर कोठडीत काही वेळ थांबून सर्व परिसर बघितला. फाशी गेट तसेच सावरकरांना देण्यात येणाऱ्या शिक्षांची पुतळ्यांच्या रूपात दाखविलेली झलक पाहिली. तेथील साऊंड आणि लाईट शो बघून बाहेर आलो. मन खूप भारावून गेले होते. बाहेर सावरकर बागेतील इतर क्रांतिकारकांचे पुतळे पाहिले. संध्याकाळी हॉटेलवर परत आलो, पण मन अजूनही तिथेच होते.
दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही दुपारच्या वेळी सेल्युलर जेल ला गेलो तेव्हा शांतपणे सावरकर कोठडीत बसून ‘जयोस्तुते श्री महन्मंगले..’ हे गीत म्हंटले, तेव्हा मन आणि डोळे नकळत भरून आले.
☆ विविधा ☆ बोलणे-विचार करून बोलणे ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆
निसर्गाने बोलण्याची शक्ति फक्त मनुष्यालाच दिली आहे. कोणताही प्राणी, पक्षी बोलु शकत नाही. मनुष्यप्राणीच फक्त बोलु शकतो. हे निसर्गाने मनुष्याला दिलेले वरदानच आहे.
आपल्या भावना, विचार, इच्छा, गरजा व्यक्त करण्याचे ते एक मोठे साधन आहे. आपण बोललो ते बरोबर आहे का, योग्य आहे का अयोग्य हे मनुष्याला बोलल्यानंतरच त्याच्या परिणामावरूनच समजते. तेंव्हा मनुष्याने विचार करूनच बोलले पाहीजे. बोलल्यानंतर विचार करण्यात काय अर्थ? न विचार करता बोलले तर समोरची व्यक्ति दुखावली जाण्याची, दुरावली जाण्याची शक्यता अधिक असते. बोलल्यानंतर मी असे बोललोच नाही, मी असे कांही म्हणालोच नाही, मला तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव करण्यात काय अर्थ? म्हणुन बोलल्यानंतर विचार करीत बसण्यापेक्षा विचार करूनच बोलणे अधिक चांगले. त्यामुळे अनेक अनर्थ टळतील.
तुम्ही कसे आहात हे तुमच्या बोलण्याच्या पध्दतीवरून समजते. बोलताना तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातील खरेपणा, प्रामाणिकपणा यावरूनच तुमची पारख केली जाते. तसेच त्यावरून तुमचा “सुसंस्कृतपणा” लक्षांत येतो. आवाजाची पट्टी नेहमीच मध्यम असावी. वरच्या पट्टीत बोलणे टाळावे.बोलताना योग्य शब्द वापरले पाहीजेत. अयोग्य शब्द, अपशब्द टाळावेत. बोलण्यातुन समोरच्याबद्यल आदर व्यक्त झाला पाहीजे. बोलण्यात कोरडेपणा असु नये. आपुलकी जिव्हाळा असावा. आणि तो खरा असावा.त्यामध्ये तोंडदेखलेपणा नसावा. बोलणे नेहमी मुद्देसुद आणि मुद्याला धरूनच असावे. पाल्हाळ लावले की समोरचा माणूस कंटाळतो.ऐकुन घेण्यास टाळाटाळ करतो.
“कौन बनेगा करोडपती” मधील अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकत रहावे असे वाटते. समोरची व्यक्ति कितीही लहान असो अथवा मोठी, अमिताभ बच्चन त्यांच्याशी आदरानेच बोलतात. त्यांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे समोरची व्यक्ति अधिक मोकळी होते, रिलॅक्स होते आणि ऊत्साहित होते. बच्चन यांचेबद्दलची भिती जाऊन तिही मोकळेपणाने बोलायला लागते. हे बच्चनजींच्या बोलण्याचे, संवाद साधण्यामागचे कौशल्य आहे. अशा निरीक्षणातुनच आपलाही विकास होतो.
कसे बोलावे हे खरे तर अनेक गोष्टीतून साध्य करता येते. अनेक दिग्गजांचे बोलणे ऐकुन, विद्वान लोकांचे मार्गदर्शन घेऊन आपण ही कला अवगत करू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे साहित्य वाचुन आपण आपले शब्द सामर्थ्य वाढवु शकतो. यामधुनच बोलताना आपल्याला योग्य शब्दांची निवड करता येते.
भाषण देणारे अनेकजण असतात. पण मुद्दाम आवर्जुन ऐकावे ते आदरणीय श्री अटल बिहारी वाजपैयीजी तसेच प्राचार्य श्री शिवाजीराव भोसले सर यांची भाषणे,व्याख्याने. आपले बोलणे नेहमीच अर्थपूर्ण असले पाहीजे. निरर्थक बोलण्याला कांहीच अर्थ नसतो आणि कोणी ऐकतही नाही. बोलताना मोजकेच बोलले पाहीजे. अती बोलले की त्यामध्ये हमखास वावगे, अनावश्यक बोलले जाते. समोरचा माणुस त्यामुळे दुखावला जाऊ शकतो.
शब्द हे शस्र आहे. शस्रापेक्षाही अधिक घायाळ करण्याची शक्ती त्यामध्ये असते हे कायम लक्षांत ठेवले पाहीजे. तेंव्हा बोलताना विचार करूनच बोलले पाहीजे.
☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून… – भाग-5 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆
शिर्डीचे साईबाबा खूप जणांना माहिती असतात. पण त्यांचे शिष्य उपासनी महाराजांबद्दल फार कमी माहिती असते. काशिनाथ गोविंदराव उपासनी हे नाशिकमध्ये सटाणा येथे जन्मले. कर्मठ सनातनी घराण्याचे संस्कार असलेला हा मुलगा औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत उदासीन होता. पण जन्मतः अलौकिकत्वाची लक्षणे घेऊन आला होता. त्यांचं सविस्तर चरित्र सांगण्याची ही जागा नाही. पण लहानपणी विवाह झाल्यावर त्यांची ती पत्नी वारली. दुसराही विवाह (जो त्यांना नको होता..) त्या पत्नीच्या निधनामुळे संपुष्टात आला आणि महाराज योगसाधना करायला मोकळे झाले. ती साधना करीत असताना श्र्वासाचा त्रास होऊ लागला. त्यांना गुरुंनी साईबाबांकडे जायला सुचवलं. पण ते मुस्लिम असल्यामुळे महाराजांनी जायला नकार दिला. पण साईबाबा येऊन उपाय सुचवून गेले. असं दोन वेळा झालं पण उपाय न करण्यामुळे त्रास वाढला. शेवटी निरुपायाने ते शिर्डिला गेले आणि साईबाबांनी त्यांना बरं केलं. यानंतरही त्यांनी शिर्डि सोडून जायचा प्रयत्न केला पण जमला नाही आणि साईबाबांच्या इच्छेनुसार ते तिथेच राहिले. चार वर्षं अत्यंत कठोर, अकल्पनीय साधना केल्यावर ते सद्गुरुपदाला पोचले.
साईबाबांनी त्यांना दिलेल्या अंत: प्रेरणेनुसार त्यांनी शिर्डिजवळच साकुरी इथे कन्याकुमारी स्थान उभं केलं. त्यांच्या पहिल्या आणि त्यांच्यानंतर गुरुपदावर बसलेल्या शिष्या म्हणजे पू.गोदावरीमाता. उपासनी बाबांनी मूळ २४ कन्यांना साकुरीत ठेवून घेऊन चारही वेद, यज्ञकर्म, पौरोहित्य शिकवलं. त्यासाठी संस्कृतचा पाया भक्कम करून घेतला. स्त्रियांमधे पावित्र्य, सहनशीलता, श्रध्दा, चिकाटी, करूणा, समर्पणभाव असे गुण असतात हे एक कारण… पण बाबांना स्त्रियांना वेदाधिकार, साधनेचा अधिकार द्यायचा होता. कडक ब्रह्मचर्याचं तेज आणि स्त्रीत्वाची कोमलता यातून एक कार्य उभं करायचं होतं. पण त्यांच्या कार्याची दिव्यता लक्षात न आल्याने त्यांच्यावर खटला भरला गेला.. विलक्षण बदनामी झाली. स्त्रियांना घेऊन केलेलं काम… त्यामुळं चारित्र्य हनन करण्याचे प्रयत्न केले गेले. पण महाराज यातून अग्नीतून झळाळत्या सोन्यानं बाहेर पडावं तसे बाहेर पडले. अत्यंत सन्मानाने त्यांना दोषमुक्त केलं गेलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव झाला. पुढे आकाशवाणीवर वेदांमधले काही भाग ऐकवण्याची योजना आखली गेली. तेव्हा अत्यंत अचूक, अधिकृत वेदोच्चार करणाऱ्या फक्त उपासनी महाराजांच्या शिष्याच आहेत हे लक्षात आलं. खूप वर्षे आकाशवाणीवर “उपासनी कन्यां” चे वेदपठण /उपनिषदांचे पठण/सूक्ते ऐकवली जात असत.
हिंदू स्त्रियांना विविध क्षेत्रात विविध लोकांनी स्थान मिळवून दिले आणि हिंदू स्त्रियांनीही या संधींचा सोनं केलं. वेद पठण, पौरोहित्य यांचा अधिकार देऊन यज्ञसंस्था त्यांच्याकरवी जिवंत ठेवण्याचं काम उपासनी महाराजांनी साईबाबांनी दिलेल्या अंत:प्रेरणेनं केलं आज सनातन हिंदु धर्मातील शास्त्रशुध्द पूजाअर्चा, यज्ञयाग, वैदिक ज्ञान साकुरीमधे व्रतस्थ स्त्रिया जतन करीत आहेत.
अशा विभूतींनी हा धर्म काळाबरोबर प्रवाहित ठेवला. त्याचं डबकं होऊ दिलं नाही.
☆ विविधा ☆ उंबरठा.. घराचा आणि मनाचाही..! ☆ श्री अरविंद लिमये ☆
घराची दारं जशी संरक्षक कवचं, तसाच उंबरठा त्या दारांचा भक्कम आधार. दारं घट्ट मिटून निश्चिंत होतात दारांच्याच चौकटीच्या भरवशावर, पण त्या चौकटीला स्वबळावर तोलून धरत असतो तो उंबरठाच..!
उंबरठा एका क्षणकाळा साठीचाच पण अडसर असतो येणाऱ्या आणि जाणाऱ्यां साठीही. योग्य विचारांसाठीचा एक थांबा..! या थांब्याची सवय, सराव असणारी पावलं न अडखळता निश्चिंत मनानं जा ये करीत असतात अगदी सहजपणे तिथं क्षणभर थांबून, पण त्या त्या वेळी उंबरठा असतोच प्रत्येकाच्या मनात, जाणाऱ्या आणि येणाऱ्यांच्याही, ठाण मांडून बसलेला मनाच्याच सताड उघड्या दारात मनाच्याच पहारेकऱ्यासारखा..!
त्या प्रत्येकांसाठी रांगोळी रेखला उंबराच असतो प्रत्येकाच्या मनात बालपणापासूनचा. आजकालच्या रांगोळी नसलेल्या उंबऱ्यांच्या किंवा उंबराच नसलेल्या घरांमधल्याही त्या पूर्वकालीन सर्वांच्या मनातही उंबरा असतो तो रंग ओळी रेखलेलाच. तो दृश्य किंवा अदृश्य उंबराच होतो मग नंतरच्या पिढ्यांसाठीही एक प्रतिक मर्यादांचं. या संदर्भात स्त्री असो वा पुरुष, रोज उंबरा ओलांडून बाहेर पडावं लागतं ज्यांना, त्यांनी मनातल्या संस्कारांनी घालून दिलेलं मर्यादांचं उल्लंघन न करायचं भान ठेवणं ही अखेर त्यांचीच जबाबदारी. तिची तशीच त्याचीही. . !
या जबाबदारीचं भान सतत जागं रहाण्यासाठी प्रत्येकाच्या मनाच्या चौकटीला पेलून धरणारा हवाच एक उंबरठा, घराला नसला समजा तरीही. . !
हा मनाचा उंबरठा असतो मनाच्या घरात येणाजाणाऱ्या विचारांसाठीचा थांबा आणि अविचारांसाठीचा अडसरही. . !
तोच सांभाळत असतो तोल स्वतःबरोबरच मनाचाही. तोच जागती ठेवतो मनातली जाणिव जबाबदारीची आणि स्विकारलेल्या बांधिलकीचीही.
आजच्या काळात उंबरा ओलांडून जाणं आणि थकून परत येणं सर्वांसाठी नित्याचंच असतं. जाताना मिटल्या दारांना संध्याकाळी अंधारेपर्यंत अंधारं कुलूपच असतं उंबऱ्याच्या सोबतीला. क्वचित एखाद्या घरी येणाऱ्यांची वाट पहाणारंही असलंच कुणी घर सांभाळणारं किंवा त्यांच्या निगराणीखाली तग धरुन असलेलं थकून गेलेलं वार्धक्यही कदाचित, तर येणाऱ्या पावलांना भान देतो, मनातलाच उंबरा. पावलांच्या बूट चपलांबरोबर, बाहेरच्या कामांचे, जबाबदाऱ्यांचे सगळेच विचार, सगळीच दडपणं अलगद मनातल्या मनातच वेगळी करुन मनातल्याच एका खास कप्प्यात बंद करुन टाकायचं भानही तोच देतो. घरात उंबरा ओलांडून आत पुन्हा प्रवेश करताना घरातल्या वेगळ्या भूमिकाचंही. जाताना आणि येतानाच्याही परस्पर वेगळ्या भूमिका न् जबाबदाऱ्यांचं भान देणारा स्विच त्या त्या वेळी आॅन आॅफ करायचं भान मनातला उंबराच करुन देतो जाण्यायेणाऱ्या तिला आणि त्यालाही. समाधानी सहजीवनातील आनंदाचं असा अधिष्ठान असतो हा मनातला उंबरठा. . घराचं घरपण जपणाऱ्या घराच्या चौकटीतल्या उंबऱ्यासारखाच. . !!
☆ विविधा ☆ मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ??
हॅलो सर तुम्ही पत्रिका बघता का? असा एखाद्या मुलीचा फोन येणे (आजकाल व्हाटसप मेसेज), किंवा सर तुम्ही पत्रिका जुळवून देता का? (न जुळणारी पत्रिका) असे फोन यायला लागले की ओळखायचे “संत प्रेम बाबा दिवस” ( १४/२) लवकरच येत आहे.
माझ्या जोतिषाच्या अभ्यासात ‘ग्रहांकित ‘प्रेम’ प्रकरणांची ‘प्रमेय’ मला अनेक गोष्टी शिकवून गेली. माझी सगळ्यात जास्त भकिते जी बरोबर आली आहेत ती ‘ प्रेम ‘ – प्रकरणाबाबतच. ( लगेच हुरळून जाऊन माझा नंबर घेऊ नका, पुढे वाचा. भाकिते बरोबरच आली यात शंकाच नाही पण ती भकिते प्रेमभंग होईल / अपेक्षित मुलाशी -मुलीशी लग्न होणार नाही अशीच होती. आणि ती एकूण एक बरोबर आली. बाकी संपर्क करायला हरकत नाही, तुमची मर्ज्जी ? )
शास्त्राच्या अभ्यासाबरोबर मानशास्त्राचा ही अभ्यास असणे जोतिषाला गरजेचे असते असे सांगितले जाते. याची प्रचिती ग्रहांकित ‘प्रेम प्रकरणात’ नक्की येते. म्हणजे अगदी हातात पत्रिका नसताना ही समोरचा जातक जे बोलतो त्यावरून हे ‘प्रेमप्रकरण’ आहे हे लगेच लक्षात येते. त्याचवेळी शुक्र – मंगल रुलींग मध्ये असला किंवा त्यावेळी पंचमात चंद्र वगैरे असला की या गोष्टीची १०० % खात्री समजावी. याची सुरवातीलाच दोन उदाहरणे दिली आहेत.
नुसत्या पत्रिकेचा विचार करता पत्रिकेतील पंचम स्थानाचे ( प्रेमप्रकरण ), सप्तम स्थानाशी ( विवाह) सूत जुळले की प्रियकर/ प्रेयसी ‘पंचम’दांची ‘ सप्त’ सुरांतील गाणी आळवायला सुरवात करून सप्त-पदीच्या अपेक्षापूर्ती साठी झटू लागतात. खरं म्हणजे पाचव्या पासून सप्तम स्थान फक्त २ पाय-या दूर पण पत्रिकेतील ‘ मंगल, राहू ‘ सारख्या व्हिलनशी सामना करून जे तिथं पोहोचतात ते प्रियकर/प्रेयसी चे नवरा/बायको होतात. जे पोहचू शकत नाहीत ते अपेक्षाभंगाचे दु:ख कायम ठेऊन राहतात. टँरो कार्डेस मध्ये “२ ऑफ कप्स” ( आनंदी जोडपं असं चित्र असलेलं कार्ड ) हे कार्ड मला पंचम ते सप्तम स्थान या दोन पाय-या यशस्वी पणे पार करणा-यांच प्रतीक वाटत. तर “३ ऑफ स्वाँर्ड” हे कार्ड प्रेमभंग झालाय हे स्पष्ट सांगतं
जेव्हा जेव्हा प्रेमभंग हा शब्द ऐकतो तेव्हा तेंव्हा वपुंचं हे लेखन आठवते //
प्रेमभंग झालेल्या तमाम मित्र-मैत्रिणींनो माझ्या अशाच एका मित्राला त्याच्या प्रेयसीनं जे सांगितलं, ते सुत्र हे –
संसार हा धीरगंभीर, उदात्त रागदारीसारखा असतो. तासंतास चालणारा. केंव्हा केंव्हा फार संथ वाटणारा. आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण, ही मोठा राग आळवून झाल्यानंतर ठुमरीसारखी असते. दहा मिनिटात संपणारी; पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी. पण त्याचं काय असतं, की काही काही स्वर वर्ज्यच असतात. त्याला काय करणार? – म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही. वर्ज्य झालेला स्वर वाईट नसतो, वगळायचा असतो, तर एक राग उभा करायचा असतो, त्यासाठी आपण तो खुषीनं विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकून द्यावयाच्या नसतात. त्यांना गाता – गाता, वाजवता फक्त चुकवायचं असतं
हे सूत्र तुम्हाला पेललं, तर संसाराची तुमची मैफल, रागदारीप्रमाणे बहरेल.
//
‘प्रेम ‘ म्हणलं की पाडगावकरांची ही एक कविता हटकून आठवते. हीच कविता “ग्रहांकित प्रेमाला” अनुसरून अशी लिहावीशी वाटली
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच्या आमच्या ‘पत्रिकेत’ अगदी सेम नसतं
काय म्हणता?
या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे
फसल्या तर फ सु दे
तरीसुध्दा
तरीसुध्दा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं
पंचमातील शुक्रकडून
प्रेम करता येतं
सप्तमातील राहू कडून
‘अंतरजातीय” होता येतं
घरचा विरोध पत्करून
गुरुजींना धरता येतं
पत्रिका न पाहता ही’
पळून जाता येतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच्या आमच्या ‘पत्रिकेत’अगदी सेम नसतं
//
१४ फेब्रुवारी या ‘ संत प्रेमबाबा दिनाच्या ‘ निमित्याने सदर लेखन संत प्रेम बाबांना प्रेम पूर्वक समर्पीत ?
व्हॅलेंटाईन डे ही संकल्पना पाश्चांत्यांची असली तरी,एक प्रेम दिवस म्हणून त्याचं महत्व वैश्विक आहे. प्रेम, प्रेमिक, शृंगार, प्रणय हे मानवी जीवनाचेच भाव विश्व आहे. स्त्री पुरुषांच्या नात्यातला तो एक भावपूर्ण बंध आहे. मग सहजच कवी बींच्या काव्यपंक्ती आठवतात,
।।हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण
ऊणे करु आपण दोघे जण
जन विषयाचे कीडे यांची धाव बाह्याकडे
आपण करु शुद्ध रसपान रे…..।।
असा शुद्ध प्रेमाचा संदेश देणारा,या दृष्टीकोनांतून आपण या व्हॅलेंटाईन डे चा सोहळा करुया..
तिसर्या शतकाच्या सुमारास रोम मधे क्लाउडीयस नामक राजा होता. त्याने, सैन्यात भरती होणार्यांनी लग्न न करण्याचा आदेश काढला होता. तरीही व्हॅलेंटाईन हा पादरी (priest) सैनीकांची गुपचुप लग्न लावून द्यायचा. हे राजाला कळल्यावर त्याने व्हॅलेंटाईनला देशद्रोही म्हणून अटक केली आणि त्यास फाशीची शिक्षा ठोठावली.तेव्हांपासून तेथील प्रेमी युवक व्हँलेॅटाईन या व्यक्तीच्या नावाने हा दिवस साजरा करत आहेत.. वास्तविक हा बलीदान दिवस आहे. तारीख होती १४ फेब्रुवारी. म्हणून दर वर्षी हा दिवस १४ फेब्रुवारीलाच साजरा केला जातो. आणि या सणाच्या साजरेपणातली मूळ कल्पना ही शुद्ध प्रेमाचीच आहे.
मात्र आपल्या संस्कृती रक्षकांनी टीकेचा भडीमार या व्हॅलेंटाईन डे वर केला. त्यांच्या मते युवापीढीचे राष्ट्रांतर आणि धर्मांतर करणारा दिवस म्हणजे व्हॅलंटाईन डे! तो साजरा करणे म्हणजे नीतीहीनतेचे अनुकरण. आणि हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन!!!
वास्तविक हिंदु संस्कृती ही सर्वधर्म समावेशक आहे.
सर्व धर्मातल्या रीतीभातींकडे सहिष्णुतेने पाहणारी आपली संस्कृती आहे… ती इतकीही लेचीपेची नाही की केवळ अनुकरणापायी तिचा र्हास होईल.
वास्तविक होळी हाही एकप्रकारचा प्रेम दिवसच आहे. मनातील जळमटं, किल्मीषं, कडवटपणाला अग्नी देउन प्रेमभावनेला ऊजाळा देणाराच तो दिवस आहे.
एक रंगाचा दिवस. एकमेकांवर रंग उडवून प्रेमानंद साजरा करण्याचा दिवस. राधा कृष्णाच्या प्रेमरंगाचीच आठवण.
आता ग्लोबलायझेशन झाले. तांत्रिक विकासाने जग जवळ आले. खर्या अर्थाने विश्व एक कुटुंब बनले.
मग सणांची, सोहळ्यांची आनंदी संकेतांची देवाण घेवाण मुक्तपणे होण्यास संकुचीत विचारांचे अडसर कशाला?
शेवटी मर्यादा पाळणं, स्वैराचार, अनाचार टाळणं, शुद्धता राखणं, हे व्यक्तीसापेक्षच आहे.
म्हणूनच १४ फेब्रुवारीच्या, वैश्विक प्रेमाचा संदेश देणार्या व्हॅलेंटाईन डे चं आनंदाने स्वागत करुया…. त्याचा थोडा विस्तार करुया वाटल्यास… फक्त युवा प्रेमींपुरताच मर्यादित न ठेवता,सारीच प्रेममय नाती जपण्याचा, व्यक्त होण्याचा संकल्प करुया… देऊया, या ह्रदयीचे त्या ह्रदयाला… सारेच करुया शुद्ध रसपान…..!!!
☆ विविधा ☆ लोकसाहित्य – आम्ही जाऊ म्हयेराला – भाग – 1☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
बाई आपल्या घर-संसारात, मुला-बाळात, घरच्या काम-काजात गुरफटून गेली असली, तरी मनाच्या एका कोपर्यात कुठे तरी माहेरची, विशेषत: आईची, तिच्या मायेची आठवण घमघमाट असते. अगदी आपल्या संसारात ती सुखी असली, रमून गेली असली तरी.
नवी नवी सासुरवाशीण सकाळी जात्यावर दळायला बसते. दळताना आई आठवते. मग ती जात्याला विनवते,
‘जात्या तू ईश्वरा नको मला जड जाऊ। बयाच्या दुधाचा सया पाहयतात अनुभावु।।‘
जात्याला ईश्वरा म्हणताना, आईच्या दुधामुळे बळ आल्याचं अभिमानाने सांगते. हे दूध म्हणजे काही तान्ह असताना प्यालेलं नव्हे. आईने केलेल्या संस्काराचं दूधसुद्धा. तिला माहीत आहे, ती जरा जारी चुकली तरी तिच्या माहेराचा उद्धार होईल. ‘हेच का तुझ्या आईनं लावलेलं वळण असं म्हंटलं जाईल म्हणूनच आपण कुठे चुकू नये, आणि माहेरच्या लोकांना कुणी नावे ठेवू नयेत, म्हणून ती दक्ष असते.
मग इतर काम करताना, स्वैपाक-पाणी करतानाही तिला आई आठवते.
‘काई आगीबिगनीच्या पुढं। का ग जळतं वलतोल।। काई गं बयाबी वाचुईनी। कोण म्हणील काम केलं।।‘
पण कधी तरी त्यांच्या ओव्यातून एखादी सासू अशीही सापडते, जी आपल्या सुनेचं कौतुक करते॰
‘पहाटेच्या पार्यामंदी। कोंबडा आरवला। बाळयाची राणी झोपेची जागी झाली। दुरडी दळण झालं पायली।।‘
पाट मांडून, ताट वाढून वाट पाहणारीही एखादी सासू दिसते. नाही असं नाही. अशा सासूबद्दल सूनही कृतज्ञतेने म्हणते,
‘काई सासूबाई आत्याबाई। तुम्ही ग तुळशीची जशी पानं । काई ग तुमच्या हाताखाली। आम्ही नांदतो सुना छान।‘
जेवतानाही तिला पुन्हा आईची आठवण होते. ‘काई बारीक गं पिठायाची। तेची गं भाकरी चवघडी। बया गं माझीच्या जेवणाची। याद येतीया घडोघडी।।‘ आईच्या चविष्ट जेवणाची, तिने केलेल्या सुघड ‘चवघडी’ भाकरीची आठवण काढत ती एकेक घास घेते.
नव्या नवेल्या सुनेला तर आईची आठवण पदोपदी येते. आई म्हणजे जशी साखरंच. ‘काई आईला गं म्हणू आई । गोड गं इतकं काही नाही। जशी साखर ती गं बाई। जर्रा गं कडूपणा ठाव नाही।। आई वाचून माया दुसर्या कुणाला नाही, हे सांगताना कधी ती म्हणते, ‘काई पुरबीगणाची पोळी । पोळी पोटात गं फुटईली । काई गं बयाच्या वाचूईनी। मया लोकाला गं कुठईली।।‘ कधी ती सांगते, ‘काई वाट नि गं वैला वड। फांद्या गं फुटल्या ठायी ठायी। सारी गं पिरतीमी हिंडलो बाई। बया गं शिवाय माया नाही।।‘
अशा मायेचा मायेशीसुद्धा कधी कधी भांडण होतं बरं का! पण ते भांडण कसं? ‘माय गं लेकीच गं भांडाईन। दूधा गं तुपाची उकईळी। काई गं माझी ती बयाबाई। बया गं मनानं मोकईळी।। विस्तव काढला की उकळणारं दूध, तूप खाली बसतं. तसं प्रसंग संपला की आईचा रागही ओसरतो. ती मनमोकळी असल्याचं ती सांगते. तिला नेहमीच वाटत राहतं, ‘काई गं सगळ्या गोतामंदी। जल्म दिल्याली बया थोर।‘ आईला कधी ती तुळस म्हणते, तर बाप म्हणजे चाफा. कधी ती दोघे म्हणजे आपल्या वाटणीला आलेला समिंदर आहे, असं सांगते. समुद्रातून कितीही घ्यावं, तो थोडाच कोरडा पडणार? आई-बापाच्या मायेचाही तसंच आहे. ‘काई वळवाच्या गं पावसानं। नदी वढ्याला गं नाही धर। काई गं बापाजी बयाबाई। माझ्या गं साठयाचं समिंदर।।‘ तर असं मायेचं माहेर.
बाळराजा आणि भ्रातार याच्या पाठोपाठ, विपुल ओव्या सापडतात, त्या बंधुजीबद्दल लिहीलेल्या. बंधुजी कसा? तर गळ्यातला ताईत जसा. ताईत जसा अगदी जवळ गळ्याला लागून बांधलेला असतो, तसाच भाऊ मनाच्या अगदी जवळ, मनाला बिलगून असतो. ताईत, इडा-पीडा, आंनिष्टापासून रक्षण करतो, असा मानलं जातं, भाऊदेखील तसाच रक्षणकर्ता असणार, याची खात्री असते. म्हणूनच अशा ’ताईता बंधुराजाच्या प्रेमाच्या मायेच्या तिने खूप खूप ओव्या गायल्या आहेत. त्यातून त्याच्या रुबाबाचं, दिलदारपणाचं, त्याच्या कर्तृत्वाचं वर्णन केलय. ‘आटपाट नगराचा। भाऊ माझा ग राजा। टोलेजंग इमारत । भरजरी गाजावाजा।।‘ यात भावाच्या कर्तृत्वाचं आणि रुबाबाचं दोन्हीचं वर्णन आहे. त्याची टोलेजंगी इमारत आहे. गावात त्याचा ‘गाजावाजा’ आहे. काइतुक, आदर, कीर्ती असं सगळच त्या ‘गाजावाजा’ शब्दातून व्यक्त होतय. गाजावाजा तिला भरजरी वाटतो. म्हणजे नजर्दीपावणारा वाटतो. ‘भरजरी’ हाशब्द भावाची समृद्धी व्यक्त करण्यासाठीही आलेला असेल.
बहीण – भावाचं प्रेम कसं? तर ती म्हणते, सीताफळासारखं. ‘फोडील ग सीताफळ। आत साखरेची काया।।
बहिणीचा लग्न होतं. ती सासरी येते. साना-वाराला तिला माहेरी न्यायला भाऊ मुराळी येतो. बहीण मनोमणी हरखते. त्याचं आदरातिथ्य, त्याचा पाहुणचार किती करू आणि किती नको, असं तिला होऊन जातं. ‘पंचामृताचं जेवण।याला गुळाचं लेवण। असा जेव माझ्या बंधू । भाऊबीजेचं जेवण।। तो उशिरा आला, तिन्हीसांजेला आला, तरी त्याच्यासाठी काही करणं तिला जड जात नाही. अनारशासारखा किचकट वेळखाऊ पदार्थ करण्याचीही तिची तयारी आहे.
आपल्या भावाचा रुबाब राजासारखा आहे, हे सुचवताना ती म्हणते, बंधू पाहुणा आला तर,
‘सया ग म्हणती कोण राजा? राजा ग नव्हे त्यो ग बंधू माझा।।
आपला हा बंधू दिलदार असल्याचही ती सांगते. कसा? ‘काळी नि ग चंद्रकळा। एका धुण्यानं झाली गोळा।‘ तर ‘धाकल्या बंधुजीनं दिलं रुपये साडे सोळा।।’ असा मायेचा बंधुजी आणि माया का असणार नाही? अखेर ‘अशी ना बहीण भावंड । एकया झाडाची संतर ‘ च ती. एका झाडाची संत्री, एका झाडाची फुलं, फळं आशा तर्हेचं वर्णन ओव्यातून येतं.
अशा या राजस भावाला परदेशी सांभाळ असं ती सूर्यनारायणाला विनवते. ‘नारायण बाप्पा तुला सोन्याचं कमळ। भाई राजसाळा माझ्या परदेशी सांभाळ।।’ तसच ती आई लक्ष्मीला विनवते, ‘आई तू सोन्याच्या पावलांनी ये आणि माझ्या बंधूचा धरला पालव तू सोडू नको.’ भावाची भरभराट पाहून बहिणीला समाधान वाटतं. ‘ती म्हणते, ‘लक्ष्मीबाई आली पांगळया पायाची। बंधूला केली बोली नाही फ्रून जायाची।।
अशा या राजबिंडया भावाचं लग्नं होतं. लाडा -कोडाची भावजय घरात येते. शहाणी, समजुतदार नणंद म्हणते,
‘काई बंधुजी ग आपाइला। भावज का लोकाची कशी म्हणू। बचा नागाची ती ग पद्मीण।।‘
हा समजूतदारपणा दुही अंगी हवा पण भावजय हळू हळू आपले रंग दाखवू लागते. तरी पण सामोपचाराने घेत ती म्हणते, ‘आपुल्या सोन्यासाठी चिंधी करावी जतन।’ भाऊ सोन्यासारखा तर भावजय चिंधीसारखी. सोन्यासाठी तिला सांभाळायलाच हवीजुन्या काळात जुन्या फाटक्या कपड्यांच्या चिंध्या म्हणजे त्या काळातला बायकांचा लॉकरच. निगुतीनं त्यात सोनं बांधून ठेवायचं. त्यासाठी चिंधीही सांभाळून ठेवायचे. म्हणजेच भावासाठी भावजयीला ही मान द्यायचा. बहीण-भाऊ एका झाडाची संत्री खरी, पण भावजय आली आणि तिने अंतर पाडलं. ‘अशी साखरची पुडी। कशी मुंग्यांनी वेढीली। भावाला होती माया। भावजयीनं तोडली ।।
भावा-बहीणीतलं अंतर हळू हळू इतकं वाढत जातं की आता तो तिला माहेरीदेखील न्यायला येइनासा होतो. सणाला बाकीच्या माहेरी चालल्या आहेत. भाऊ मुराळी त्यांना घेऊन जातोय. आपल्या दारावरून आशा किती तरी गाड्या जाताहेत. आपल्या दाराशी मात्र गाडी थांबत नाही, याची खंत ती सूचकतेने व्यक्त करते.
बाईला कधी तरी माहेरी जावसं वाटतच. पण तिथे काय अनुभव येतो?
‘आई- बापाच्या ग राजामंदी। दुधा ग तुपाची केली न्याहारी। भाऊ नि भावजयच्या राजामंदी। शिळ्या ताकाची मला चोरी।।
आता दिवस बदलले आहेत. भाऊ वेगळा राहू लागलाय. ते पाहून तीदेखील कष्टी होते.
‘काई मावबिगळ्याच्या घरी। भाच्या बाळाची ग सवती खोली। काई ग धाकट्या बंधुजीनं। निम्म्या राज्याची केली बोली।।
हे सगळं भावजयीमुळे झालं, असंही तिला वाटत राहतं. अर्थात सगळ्याच जणी काही आशा घर मोडणार्या आणि माणसं तोडणार्या नसतात. अशा पद्मिनीचं गुणगानही ओव्यातून केलेलं आढळतं. सुंदर, तरुण, गुणी बाईसाठी पुष्कळदा ‘पद्मीनी’ असं अनेक ओव्यातून म्हंटलं गेलय.
कसंही झालं, तरी एक तरी भाऊ हवाच, असं बाईला आसासून वाटतं. एका अहिराणी ओवीत म्हंटलय,
‘दुबळा पाबळा बंधू बहिणीले असावा। पावलीनी चोळी एक रातना विसावा।‘ अगदी अशीच एक ओवी कोल्हापूरच्याकडे ऐकायला मिळाली.
‘काई बहिणीला भाऊ बाई। एक ग तरी असावा। काई चोळीचा एक खण। एक रातीचा ग विसावा।।