जन्मतः च बाळाला रंग ओळखता येत नाहीत पण हळू हळू कळू लागतात… म्हणजे भडक काही दिसले की ते तिकडेच पहाते म्हणून मग पाळण्याच्या चिमण्या रंगीत… जरा मोठे झाले की मग येतो सोबतीला चेंडू, प्लास्टिक पोपट,वेगवेगळी खेळणी वेगवेगळे रंग घेऊन ! लाल, हिरवा, निळा तिकडे मग बाळ आकर्षित होते अन खेळण्यात हरवते.
अशा रीतीने रंग जीवनात हळू हळू डोकावू लागतात.शाळेत जाऊ लागले की होते मग रंगांची ओळख अन मग रंगीत कपडे, खेळणी, बांगड्या, मेंदी, रांगोळी रंग भरत जातात जीवनात ! कळत्या वयात एकच कुठला तरी रंग आवडतो अन त्याच रंगांच्या सोबतीने मनुष्य चालत रहातो..
खरेच देवाने रंगांची ही दुनिया दिलीच नसती तर ? माणसाचे जीवन निरस बेरंग असते ! उगवतीला अन तिन्ही सांजेला क्षितिजावर सूर्याने उधळलेले लाल पिवळे, केशरी रंग… फुलांचे, पानांचे रंग, पक्ष्यांचे रंग, काजव्याचे… कीटकांचे रंग.. किती रंग असतात अवतीभोवती !
आकाशाचा… ढगांचा… झाडांचा… रंग पांघरता यायला हवा, घेता आणि जगताही यायला हवा अन नकोसे रंग टाकताही यायला हवेत चटकन नाहीतर मग बेरंग होतो जीवनाचा !
समोरच्याचा राग रंग ओळखता यायला हवा.. अन्यथा आपला रंग बिघडतो ! असे असले तरी फरुडासारखे रंगही बदलणे नकोच कारण मग तुमचा रंग नक्की कोणता ? कळणे मुश्किल होईल अन विश्वासही उडेल तुमच्यावरचा !
सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा अन आवडीचा रंग प्रेमाचा ! हा रंग एकच पण तो जीवन रंगीबेरंगी करतो ! सप्तरंगी इंद्रधनू छेडतो. प्रीतीचा हा गुलाबी रंग ज्याच्या आयुष्यास लाभला त्याचे जीवन विविधरंगानी बहरते,ताजेतवाने होते,सदाबहार ठेवते जीवनाला अन वयालाही !
रागाचा रंग लाल अन शांतीचा पांढरा, दुःखाचा काळा, रात्रही काळी अन निसर्ग हिरवा !
जीवनातला महत्त्वाचा गडद न पुसणारा रंग अध्यात्माचा… जीवन सन्मार्गावर नेणारा… शांत संयमित जगायला शिकवणारा तो भक्तीचा रंग…
विठूच्या भाळी सजणारा तो अबिराचा काळा, विठ्ठलही काळा अन माणसाचे पोट भरणारा मातीचा रंगही काळा ! सर्वच रंग जीवनात तितकेच महत्वाचे..
रंगांची ही विविधरंगी दुनिया मानवाचे जीवन रंगीत करते हेच खरे !
कसं असतं ना ,मनुष्यप्रवृत्ती मूळातच आनंद साजरा करणारी असते.भले आनंदाची माध्यमे बदलोत पण हेतु नाही बदलत…दिवाळी हा तर आनंदाचा, प्रकाशाचा, स्नेहबंधनाचा ,स्नेहवर्धनाचा सण!!
शिवाय या सणांत निसर्ग,देवदेवता ,पशुपक्षी झाडंपानं सार्यांचं संवर्धन असतं…आपल्या संस्कृतीत केरसुणीलाही लक्ष्मी मानून तिचीही पूजा केली जाते.
यामागचा संदर्भ खूप अर्थपूर्ण आहे…चराचरात लहान थोर असं काही नसतं…मनातली विषमता दूर करुन सार्यांना सामावून घ्यायचं असतं… एका वातीनं दुसरी वात पेटते म्हणूनच तेलाचा दिवा पूजनीय…
बालवाडीतल्या माझ्या भावाची फी द्यायची म्हणून शिशु वर्गाची पायरी चढले,आणि पायरीवर पायरीगत दिसणाऱ्या कुत्र्यावर माझा पाय पडला.लगेच ‘सॉरी’ म्हटलं मी त्याला पण कुत्रचं ते… ‘जशास तसे’ या उक्तीनुसार ते चावलं मला अन् मी केकाटले. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून शिरोळे गुरुजी धोतराचा सोगा सावरत बाहेर आले.मला एक जोरदार शिवी हासडून म्हणाले,” तू त्याच्यावरचं कशाला पाय ठेवलीस? पायरी नव्हती तुला पाय ठेवायला?त्याच्या का नादी लागलीस? गप पडलं होतं ना ते?” गुरुजी कुत्र्याची वकिली करत होते. कुत्र्याची खोडी काढायला, त्याचा नाद करायला मी निर्बुद्ध का आहे? पण गुरुजींच्या नादी कोण लागणार?माझ्या हातातले फीचे पैसे काढून घेऊन,”चल हेड बाईकडं..असं म्हणून माझा रट्टा धरून शिरोळे गुरुजींनी मला हेड बाईच्या पुढ्यात उभं केलं. हेडबाईच्या सांगण्यावरून त्यांनी मला माझ्या घरी पोहोचवलं.
कुत्रा चावल्यानं सरकारी हॉस्पिटल मध्ये माझ्या पोटांनं चौदा दिवस इंजेक्शनचा त्रास सोसला. मला कुत्रा चावल्याची बातमी पेपरमध्ये कदाचित येईल या आशेवर मी होते आणि पेपर चाळत होते.”अगं कुत्रा तुला चावला तर ती बातमी होऊ शकत नाही. याउलट तू कुत्र्याला चावली असतीस तर ती बातमी झाली असती” असं बाबा म्हटल्याचं आठवतं मला.
कुत्रा हा बातमीचा विषय नसून जिव्हाळ्याचा विषय आहे.हे माझ्या लक्षात आलं पण जेव्हापासून तो मला चावला तेव्हापासून कुत्र म्हटलं की मी नखशिखांत हादरते.तो माझा वीक पॉइंट झाला आहे. लहानपणी ‘हाथी मेरे साथी’ दोन-चारदा पाहिला…..प्रत्येक वेळी नव्याने पाहतो असा पाहिला…. प्रत्येक वेळी तेवढ्याच संवेदनशीलतेने रडून थिएटर डोक्यावर ही घेतलं.माझं मुसूमुसू रडं पाहून इतरेजन खुसूखुसू हसायचे, पण….. कुत्र्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तेरी मेहरबानियाॅ’ या सिनेमाच्या पोस्टरकडेसुद्धा ढुंकून बघायची माझी इच्छा नसायची. इतका तिटकारा मला त्या कुत्र्याच्या चेहऱ्याचा….
स्वामीनिष्ठ, इमानदार अशा विशेषणांनी सुशोभित आणि रतन टाटा, बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज अशा प्रतिथयश लोकांच्या कुत्र्यावरील प्रेमाने प्रसिद्ध आलेल्या या जातीचा मला कधीकधी हेवा वाटतो. रतन टाटांनी गोव्याहून आणलेल्या ‘गोवा’ नावाच्या आपल्या कुत्र्याला आपल्या ग्लोबल हेडक्वारटर मधील म्हणजेच बॉम्बे हाऊस मधील खास जागेत ठेवलं आहे. शिवाजी महाराजांचा ‘वाघ्या’ तर सगळ्या मराठी माणसात प्रसिद्ध !! बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘टाॅबी’ कुत्रा सर्वश्रुत आहे.अमेरिकेतील एका शहरात एका मालकाने आपल्या मृत्यूनंतरची छत्तीस कोटीची प्रॉपर्टी ‘लुलू’नावाच्या त्याच्या कुत्र्याच्या नावे केली आहे. अहोभाग्य त्या कुत्र्यांचं !!!
कुत्र्यांच्या नावावरून एक गंमत अशी की आमच्या वाड्याच्या मालकिणीनं स्वतःच्या कुत्र्याचं नाव ‘पुराणिक’ठेवलं होतं. मी त्यावेळेस सात आठ वर्षाची असेन….मला आठवतंय मी बाबांना कळकळीनं असं सांगितलं होतं की माझं लग्न ‘पुराणिक’ आडनावाच्या माणसाची होता कामा नये.बाबांना फार उशिरा माझ्या त्या कळकळीच्या विनंतीचं प्रयोजन समजलं होतं…..
प्रेम म्हणजे प्रेम असतं,ते कुणी कुणावर करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कुत्र्याबद्दलची माझी भूमिका स्वच्छ आहे.माझं त्याच्याशी वैर नाही पण त्याच्याविषयी प्रेम बिलकुल नाही. एकदा एका
मैत्रिणीकडे गेले होते. कसं कोणास ठाऊक पण ‘कुत्र्यापासून सावध राहा’ या पाटीकडं माझं लक्ष गेलं नाही. तिच्या घराची पायरी चढणार तो पुनश्च पायरीवर एक पायरीच्याच रंगाचं कुत्र झोपलेलं….. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी अर्थातच मी घेतली.तिला खालूनच फोन केला. “अगं काही करत नाही ते.” प्रत्यक्ष भगवंताला देखील इतक्या गॅरंटीनं सांगता येणार नाही तसं तिनं सांगितलं. “ओलांडून ये त्याला”( तो कोणावरच भुंकत नाही कोणालाच काही करत नाही. तर मग पाळलासंच का बिचारे ?असा प्रश्न मनांत आल्यावाचून राहिला नाही.) घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत मी त्याला ओलांडायला गेले आणि माझा पाय त्याच्यावर पडलाच. सिंहाच्या पिंजऱ्यात लाईट गेलेल्या रिंगमास्टरची काय अवस्था होईल तशी माझी झाली. इतक्यात मैत्रीण खाली आली. “किती घाबरतेस ग ?काही केलं का त्यांनं तुला?भुंकला देखील नाही गं तो!!”असं म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं.”कम हनी, कम टू मम्मा” असं मातृप्रेम दाखवणाऱ्या तीच श्वानप्रेम बघून मी धन्य झाले, पण अप्रूप अजिबात वाटलं नाही त्या गोष्टीचं….
सकाळी फिरायला जाताना टापू टापूत बसलेली भटकी कुत्री आता माझ्या ओळखीची झाली आहेत. अर्थात असा हा माझा दावा…. माहित नाही कधी घेतील ती माझा चावा…. मालकाचं गळ्यात पट्टा बांधलेलं कुत्र दिसलं की संघटितपणे जोरजोरात त्याच्यावर ती भुंकायला लागतात. अगदी थेट ते टापूतून बाहेर पडेपर्यंत… वाघासारखं दिसणारं ते मालकाच्या संरक्षणाखाली ऐटीत चालत असतं. मालकाला जणु ते सांगत असतं आत्ता मला तू संभाळ. नंतर तुझं रक्षण करायची जबाबदारी माझी….तसा त्या दोघांत एक अलिखित करार असावा बहुदा…चार आण्याचा जीव असलेली ती भटकी कुत्री पण त्यांचा आवाज एखाद्या डॉल्बी लाऊड स्पीकर सारखा! आसमंत हादरवून टाकणारा!गांधीजीं सारख्या अहिंसावादी माणसानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर घेतला होता त्या बापूजींना माझे प्रणाम…..
रस्त्यावरच्या सार्वजनिक वाचन केंद्रावरची दोन कुत्री कुठलंही वाहन आली की त्या वाहनाच्या वेगानं फर्लांग भर पळत जातात आणि माघारी येतात. हे मी रोज पाहते. एक दिवस न राहून मी त्याच्या प्रमुखांना म्हटलं,”अहो यांना बांधून ठेवा की! उगा आपलं वाहनांच्या मागे पळत सुटतात.”त्यावर ते म्हणाले.”असुद्या मॉर्निंग रनिंग करतात !एरवी लडदूछाप आहेत. खाऊन खाऊन माजलीत दोघं.पहुडलेलीच असतात दिवसभर…. कोणावर भुंकत नाहीत. एन्जॉय करतात लाइफ झालं”….
जेव्हा मी ह्यांची अर्धागीनी झाले तेव्हा मात्र कुत्रं पाळणं हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न बनला. याचं कारण हे ‘श्वानप्रेमी’ आणि कुत्रा हा माझा वीक पॉइंट… अर्थात लग्नानंतर इतके चांगले विषय आम्हा दोघात होते की कुत्र्यासारखा विषय संभाषणात कधी आलाच नाही. त्यामुळं मला कुत्र्या विषयी इतका आकस आहे हे त्यांना ठाऊक नव्हत. तीन महिन्याची ओली बाळंतीण मी जेव्हा परतले त्यावेळी ह्यांनी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून घरी आणलेलं छोटासं कुत्र्याचं पिल्लू मला दाखवलं. मला ह्यांनी दोन बाळाची आई करून टाकलं होतं. पण मला मंजूर असायला हवं होतं ना ते?
मी अजूनही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. ह्या गोष्टीचे त्यांनाही आश्चर्य वाटत होतं. दोन्ही पिल्लं अखंड कुई कुई करत होती. त्यात भरीस भर म्हणजे मालकिणीचं कुत्रं! एरवी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणणारं ते आज आपल्या टापूत आलेल्या या नवख्या कुत्र्यावर अखंड भुंकत होतं. मालकीण यथावकाश खाली आली. माझं बाळ तिच्या हातात होतं ती म्हणाली,”आजच आलाय.आमचं कुत्र भुकायचं थांबणार नाही तेव्हा तुमच्या कुत्र्याला आजची रात्र घरातच बांधा. उद्या काहीतरी व्यवस्था करू” ……
दोन्ही पिल्लानी रात्र जागवली हे सांगायला नकोच. त्या दोघांकडे पाहात मी यांना माझं सगळं श्वासनपुराण सांगितलं आणि पहाटे पहाटे मी यांच्याकडून मला हवं असलेलं ते एक वचन घेतलं. वचन देता देता, ‘जे लोक कुत्रं पाळतात त्यांच्या घरी लक्ष्मी येते’असंही माझं समुपदेशन झालं, पण मला ‘लक्ष्मी’ नको होती, ‘शांती’ हवी होती. स्त्रीहट्ट कुणाला सुटलाय ?….सकाळ सकाळी कुत्र्याच्या पिल्लाची गावाकडं रवानगी झाली.. आणि माझं पिल्लू शांत झोपू लागलं.
भविष्यात पुन्हा या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी ह्यांना निक्षून सांगितलं,” एका म्यानात दोन तलवारी कधीच बसत नाही.ज्या दिवशी कुत्रं या घरात येईल त्या दिवशी मी बाहेर पडलेली असेन…..” अजून तरी तशी वेळ आलेली नाही.
सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या करोना काळात कधीतरी कुत्र्याचं रडणं अपशकुनाचा संकेत देतं, तेव्हा हे म्हणतात…
“अगं ,आम्ही जसे कुत्र्याचे शौकीन तसेच कुत्र्यांनाही आमची सवय… आताशा आम्ही त्यांना फारसे दिसत नाही आहोत ना रस्त्यावर म्हणून ती कावरीबावरी होऊन रडतात…..”
ते काही असो. कुत्र्याला ‘श्वान’ किंवा ‘सारमेय’ म्हणावं असं मला कधी वाटत नाही .कुत्रं समोर आलं की या जन्मी तरी हाssssड ……
☆ भाऊबीज: आठवणी दाटतात….. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
आज भाऊबीज. आज बहिणीने भावाला ओवाळायचं आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची. ओवाळणीच्या तबकातील दिवा हे सूर्याचे प्रतीक. सूर्य हा जीवनदाता. ’तू अनेक सूर्य पहा’ असा अर्थ त्या ओवाळण्यात आहे. भाऊ-बहीण यांच्या नात्यात एक अनोखे माधुर्य आहे. या नात्याचे कौतुक करताना लोकसाहित्याने खूप खूप ओव्या रचल्या आहेत. बहिणींना आपला लाडका भाऊ अगदी जवळचा वाटतो. जणू भाऊ म्हणजे गळ्यातला ताईत. एका ओवीत एकीनं म्हंटलयं, ‘दुबळा पाबळा का होईना, पण एक तरी भाऊ बहिणीला असावाच. का? भाऊबीजेला एक पावलीची चोळी आणि कधीतरी, थकल्या भागल्या देह-मनाला एका रात्रीचा विसावा.’
भाऊ मोठा असला, तर तो बहीण आणि वडील यांच्यामधला दुवा असतो.तो मित्र असतो. सल्लागार असतो. रक्षणकर्ता असतो. धाकटा असला, तर त्याच्या खोड्याही बहिणीला आनंद देतात. तो बहिणीला आपल्या मुलासारखाच वाटतो. असेच काही-बाही विचार मनात येत होते. विचार करता करता त्यांची वावटळच झाली. या वावटळीने मला एकदम उचललं आणि बालपणीच्या अंगणात नेऊन उतरवलं. तिथे आठवणी झिम्मा खेळत होत्या.
एक जण लगबगीने पुढे आली, ‘मी आठवते तुला?’
‘हो ग, तुला कशी विसरेन? ‘बालपणीच्या त्या निरागस वयातली, तितकीच निरागस आठवण. … आठ वर्षाची असेन मी तेव्हा. आजोळी होते मी तेव्हा. माझे मुंबईचे मामा-मामी, लता दिलीप सगळे आले होते. दिलीप माझ्या बरोबरीचा. लता आमच्यापेक्षा चार वर्षाने मोठी. तो भाऊबीजेचा दिवस होता. दिलीपने आमच्या दोघींकडून छान चोळून मोळून घेतले. आदल्या दिवशी तिळाचे वाटण केलेले होते. ते लावायला लागताच तो म्हणाला, तो चिखल मला लावू नकोस!’ त्यावर आजी म्हणाली, ‘अरे त्यामुळे शरीरावरची छिद्रे मोकळी होतात. अंग मऊ होतं.’ मगं तो काही बोलला नाही. मी वाटण जरा जास्तच खसखसून त्याला लावलं. आज महाराजांना पाण्याची बदली आयती द्यायची होती. विसण घालायचं होतं. उटणं लावायचं होतं. त्यावेळेपर्यंत मोती साबण आला नव्हता. निदान आमच्या घरात तरी. दोन बादल्या पाणी त्याला घालून झालं, तरी त्याचं ‘अजून घाल’ संपेना. एव्हाना बंबातलं गरम पाणी संपून नुकतच वरून घातलेलं गार पाणी येऊ लागलं होतं. मी म्हंटलं, ‘घालू गार पाणी?’ तशी महाराजांनी एकदाचा टॉवेल गुंडाळला. अंग पुसून नवे कपडे घातले. दादामामांनी त्याला दहा रूपयाच्या दोन नोटा दिल्या. एक मला घालायला आणि एक लताला घालायला.
मी पण आंघोळ करून जरीचं परकर –पोलकं घातलं. तशी त्याने सुरू केलं, ’सुंदर ते ध्यान । समोर उभे राही। जरी परकर घालूनिया ।। ‘आहा, काय ध्यान दिसतय?’ माझ्यावरून हात ओवाळत तो म्हणाला. मी काही चिडले नाही. त्याच्या खिशातल्या नोटेकडे बघत होते ना मी!. मग ओवाळण्याचा कार्यक्रम झाला. लताताईच्या तबकात त्याने नोट टाकली. नंतर मी ओवाळलं. मी आपली ओवाळतेय … ओवाळतेय… ओवाळतेय. नोट काही खिशातून बाहेर येईना. मी म्हंटलं ,’टाक की लवकर. माझा हात दुखायला लागलाय.’
त्याने खिशावर आपला हात ठेवत म्हंटलं , ‘घे बघू घे.’ आणि तो पाटावरून उठून चक्क पळायलाच लागला. ‘म्हणाला, ‘हे पैसे माझे आहेत.’ मी म्हंटलं , ‘दादामामांनी मला ओवाळणी घालण्यासाठी तुला दिलेत.’ ‘असं? मग मला पकड आणि घे.’ मी जवळ गेले की तो पळायचा. आमची शिवाशिवीच सुरू झाली. पण मी काही त्याच्याइतकी चपळ नव्हते. शेवटी रडत रडत आजीकडे गेले. आजीची आणि त्याची काही तरी नेत्रपल्लवी झाली. आजी खोटं खोटं त्याला रागावली. मी म्हंटलं, ‘दादांनी दिलेले पैसे द्यायचेत, तर इतका कंजूषपणा करतोयस, स्वत:चे द्यायचे झाले, तर काय करशील? बहुतेक माझ्याकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाहीस.
‘घ्या. रडूबाई… रडूबाई रडली… आजीपुढे जाऊन रडली….’ त्याने नोट माझ्या परकराच्या झोळात फेकून दिली. त्या दहा रुपयाचे मी काय केले हे आता आठवत नाही. मोठे छान दिवस होते ते. पुन्हा किती तरी वर्षं आम्ही भाऊबेजेला भेटलो नाही.आणि पुन्हा भेटलो, तेव्हा खूप सुजाण झालो होतो. तेव्हा, जुन्या भाऊबीजेची आठवण काढायची आणि लोट-पोट होत हसायचो. आता हेही आठवतय, की तो मिळवायला लागला आणि आता भाऊबीजेला आम्ही प्रत्यक्ष भेटत नसलो, तरी माझ्यासाठी कधी साडी, कधी ऊंची पर्स, कधी नेकलेस, कधी भारी अत्तराच्या किंवा सेंटच्या बाटल्या असं काही ना काही भाऊबीज म्हणून येत रहातं.
इतक्यात एक जण लाजत… संकोचत माझ्याकडे आली. ‘ मी… मी आठवते तुला.’
‘तुला कशी विसरेन? दुसर्याच्या कष्टाचा कळवळा येणार्या माझ्या भावाची आठवण तू…त्या वर्षी दिवाळीला मी माझ्या काकांकडे होते. माझी चुलत बहीण नलिनी. ती आणि मी एकाच वयाच्या. तिने खूप आग्रह केला की आमच्याकडे ये म्हणून. त्यावर्षीची माझी दिवाळी काकांकडे झाली. मला चार मोठे चुलत भाऊ. नर्कचतुर्दशीला आणि भाऊबीजेला सगळ्यांनी आम्हा दोघींकडून छान अंगमर्दन करून घेतलं. माझा दोन नंबरचा चुलतभाऊ बाबू म्हणाला , ’सगळ्यांना तेल लावून तुमचे दोघींचे हात चांगले भरून आले असतील. चला! आता तुम्ही पाटावर बसा. मी तुमच्या हाता-पायांना तेल लावतो. आम्ही म्हंटलं, ‘तू म्हणालास ना, पुष्कळ झालं, आमचं हात दुखणं कमी झालं. नाही म्हंटलं तरी दुसर्याच्या कष्टाचा विचार करणारा भाऊ आपल्या घरात आहे याचा मला आनंद झाला. अभिमान वाटला. ‘ऐसी कळवळ्याची जाती। लाभावीण करी प्रीति।‘ दुसर्याचा विचार करणारं त्याचं हरीण –काळीज त्या दिवशी प्रथम लक्षात आलं. मग त्याने आम्हा सर्वांना ‘सुवासिनी’ सिनेमा दाखवला.
एवढ्यात आणखी एक जण इतरांना मागे सारत धिटाईने पुढे आली. म्हणाली, ‘तुला ‘गणेश नगरचे’ महादेवराव आठवतात की नाही?’ मी म्हटलं, ‘त्यांना कशी विसरेन? ते तर माझ्या ‘मर्मबंधातली ठेव’ आहेत.
पुण्यात एका लग्नाच्या वेळी दादा आणि वसुधाताई यांची भेट झाली. सहज गप्पा मारता मारता तेही सांगलीचेच आहेत, असं कळलं. त्यांचं नाव महादेव आपटे. मी एकदम म्हणाले, ’मीही माहेरची आपटे.’ त्यावर ते म्हणाले, ‘अरे वा! मग तू आमची माहेरवाशीणच झालीस की! आता यायचं आमच्याकडे. गणेशनगरला. ’ मी मान डोलावली. अशा लग्नकार्यात किंवा प्रवासात झालेल्या ओळखी आणि त्यावेळी दिलेली आश्वासनं तिथल्या तिथे विरून जातात. पण यावेळी तसं झालं नाही. ती दोघं एक दिवस फोन करून आमच्या घरी आली आणि जाताना ‘आता तुमची पाळी’ असं बजावून गेली. दोघंही पती-पत्नी अतिथ्यशील. लाघवी. भेटेल त्याच्याशी मैत्री जोडण्याची अनावर हौस. हळूहळू मी खरोखरच त्यांच्या घरच्यासारखी झाले. त्या वर्षी त्यांनी मला भाऊबीजेला बोलावले. मी संध्याकाळी गेले. त्यानंतर राखी पौर्णिमेला काही मी गेले नाही. संकोच वाटला, की दरवेळी आपण त्यांच्याकडून ओवाळणी घेत राह्यचं, हे काही बरं नाही. दुसर्या दिवशी सकाळी फोन …. ‘काल वाट पहिली. तू आली नाहीस. असं चालणार नाही…’ वगैरे… वगैरे… मला माझ्या कोत्या विचारांची लाज वाटू लागली. प्रेमाचं रागवणं. त्यानंतर ही चूक मी पुन्हा केली नाही. बरं त्यांना बहीण नाही, म्हणून त्यांनी हे नातं जोडलं असंही नाही. त्यांना सख्ख्या, चुलत, मावस अशा अनेक बहिणी होत्या. शिवाय वसुधाताईंच्या बहिणीही ओवाळायला यायच्या. वसुधाताई स्वत:च ओवळणीची छान तयारी करून ठेवत. भेटलेल्या प्रत्येकाशी नातं जोडणं आणि निभावणं हा दादांचा स्वभावधर्म होता. आता दादा नाहीत. वहिनीही नाहीत. पण त्यांनी होते तोवर अगदी निरपेक्ष असं प्रेम आमच्यावर केलं.
असंच निरपेक्ष प्रेम आमच्या दादांनी म्हणजे माझ्या मोठ्या भाऊजींनी माझ्यावर केलं. अगदी लग्न झाल्यापासून. ते माझ्या वडलांसारखेच होते. माझे सल्लागार होते. मित्र होते. दुसर्यांच्या उपयोगी पडायचा त्यांचा स्वभावच होता. माझे लग्न झाल्यावर माझा भाऊ काही वर्ष भाऊबीजेला यायचा. पण पुढे दरवर्षी ते शक्य होत नसे. असंच एका वर्षी कुणीच नव्हतं ओवाळायला. आमच्या वाहिनी (माझ्या जाऊबाई) म्हणाल्या, ‘आज कुणाला तरी ओवाळल्याशिवाय राह्यचं नसतं. तू यांना ओवाळ. मग तेव्हापासून, माझे भाऊ आलेले असले, नसले, तरी आमच्या दादांना ( माझ्या मोठ्या भाऊजींना ) मी ओवाळू लागले. राखी पौर्णिमेला राखी बांधून ओवाळू लागले आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांना ओवाळून औक्षण करू लागले, ते अगदी परवा परवापर्यंत. गेल्या दोन वर्षांपूर्वी धनत्रयोदशीलाच ते गेले. तेव्हा ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यात मी माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक, संरक्षक आणि सल्लागार पाहिला.
आज अशा सगळ्या भावांच्या आठवणी काढता काढता, मनात एक हुरहूर दाटून आलीय. कालप्रवाहात सगळे वाहून गेले. मी या प्रवाहाच्या काठाशी उभी राहून म्हणते आहे, ‘गेले ते दिन गेले….’
बलिप्रतिपदा! दीपावलीच्या उत्सवातील हा तिसरा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. बलिराजाच्या स्मरणार्थ साजरा होणारा दिवस. कोण हा बलिराजा? पौराणिक कथेनुसार हा अत्यंत सत्वशील,दानशूर असा हा राजा. पण गर्वाने धुंद झालेला.तो दानशूर असल्याने दिलेला शब्द पाळत असे.त्याच्या या गुणाचा फायदा घेऊन भगवान विष्णूंनी त्याचे गर्वहरण केले.त्यांनी बटू वामनाचा अवतार धारण केला व भिक्षा मागण्यासाठी बलिराजाकडे गेले.त्यांनी त्याच्याकडे फक्त तीन पाऊले जमीन मागितली.बलिराजाने ती देण्याचे वचन देताच विष्णूने भव्य रूप धारण केले.एक पाऊल स्वर्गात,दुसरे पृथ्वीवर ठेवले व तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारले.तेव्हा आपला शब्द पाळण्यासाठी बलिराजाने आपले मस्तक पुढे केले.या संधीचा फायदा घेऊन विष्णूंनी आपले पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले व आपले अवतार कार्य पूर्ण केले.मात्र त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांची कदर करून त्याला पाताळाचे राज्य देऊ केले व आपण स्वतः या राज्याचे द्वारपाल बनले.त्याच्या सद्गुणांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी म्हणून हा दिवस त्याच्या नावाने साजरा केला जाईल असे वरदानही दिले.तो हा दिवस.त्याच्या प्रजा हित कारक वृत्तीमुळे आजही ‘इडा पीडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते.कितीही सद्गुण अंगी असले तरी एखादा दुर्गुण सुद्धा त्या गुणांवर मात करतो व विनाशाला कारणीभूत होतो याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.
हा दिवस वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने व पद्धतीने साजरा केला जातो. खरे तर हा शेतक-याचा सण. शेतकरी झेंडूच्या माळांनी जनावरांचा गोठा सुशोभित करतात. काही ठिकाणी शेणाचा गुराखी, गवळणी, कृष्ण, पाच पांडव केले जातात.आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांचा बळीराजा केला जातो.तांदूळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. धनगर समाज आपल्या मेंढरांचे कौतुक करतो तर आदिवासीही आपल्या पशूधनाकडे विशेष लक्ष देतात. संपन्नतेच्या या दिवसांत ज्यांच्यामुळे संपन्नता आली त्या पशूधनालाही आनंदात सहभागी करून घेतले जाते. हीच आपली कृषी संस्कृती आहे.आपले सगळे सण उत्सव हे निसर्गाशी निगडीत असे आहेत आणि ते तसेच ठेवण्याचे आपले प्रयत्न असले पाहिजेत.
उत्तर भारतात हा दिवस नवीन विक्रम संवत म्हणून साजरा होतो. तसेच काही ठिकाणी गोवर्धन पूजाही केली जाते. पक्वान्न व मिठाई मोठ्या प्रमाणात अर्पण केले जातात. त्यामुळे याला अन्नकूट असेही म्हणतात. काही ठिकाणी बलिराजा व त्याची पत्नी विंधावली यांचे चित्र काढून पूजा केली जाते.
याच दिवशी पार्वतीने महादेवाना द्यूतात हरवले.म्हणून ही द्यूतप्रतिपदा.
कृषी संस्कृतीतील नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होण्याचा हा दिवस.व्यापारी मंडळीही आदले दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर प्रतिपदेला हिशेबाच्या नव्या वह्यांचे पूजन करतात व नवे आर्थिक व्यवहार सुरू करतात.नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने गुढी पाडव्याप्रमाणेच या दिवसाचे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. आपल्या संस्कृतीत शुभ मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त. या मुहूर्तावर सोने तसेच नव्या वस्तुंची खरेदी, गुंतवणूक केली जाते. या शुभदिनी पत्नी आपल्या पतिला ओवाळते व ओवाळणीच्या रूपात पती पत्नीला भेटवस्तू घेऊन देतो. नव विवाहीत मुलीच्या माहेरी विवाहानंतरच्या पहिल्या दिवाळीला जावयाला व त्याचे आप्तेष्टांना बोलेवले जाते. त्यांचा विशेष आदर सत्कार केला जातो. भेटवस्तू दिल्या जातात. पहिली दिवाळी दिवाळसण म्हणून दणक्यात साजरी होते. बदलत्या काळानुसार भेटवस्तूचे स्वरूप बदलत गेले तरी त्यामागील भावना मात्र टिकून आहेत हेच आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
हा दिवाळी पाडवा आणि नूतन वर्ष सर्वांनाच आनंदाचे ,सुखसमृद्धीचे जावो. निसर्गावर मात करण्यापेक्षा निसर्ग मित्र बनून आपल्या मूळ संस्कृतीचे जतन करण्याचा संकल्प करू! शुभ दीपावली !
☆ गोव्यातील नरकचतुर्दशी.. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
आपण जशी आतुरतेने दिवाळीची वाट पहात असतो तशी गोवेकर मंडळी दिवाळीची वाट पहात असतात.
गोवा म्हटले की आपल्याला तिथला ख्रिसमसची आठवण होते तसे इथल्या दिवाळीचे वेगळेपण आहे गोव्यात गणेशोत्सव प्रमाणे दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते उत्तर प्रदेशात दसऱ्या दिवशी रावणाचे दहनकेलं जातं तसं नरक चतुर्दशी दिवशी नरकासुराच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा गोव्यात आहे.एक वर्ष गोव्यात असताना हा सोहळा पहाण्याचा योग आला.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या प्रतिमा उभारल्या जातात. ह्या प्रतिमा अगदी ऐंशी फुटापर्यंत आणि अक्राळविक्राळ बनविल्या जातात अशी माहिती मिळाली. पुण्यातील गणेश उत्सवाप्रमाणे ढोल,ताशा झांजे गजरात मिरवणूक काढली जाते., त्यांची स्पर्धा ठेवली जाते. या प्रतिमा तयार करण्यासाठी घराघरातून वर्तमानपत्र रद्दी व कागद गोळा केले जातात., तसेच थर्माकोलचा वापरही केला जातो.ही प्रथा शेकडो वर्षापासून .सुरू आहे. गोवा मुक्ती संग्रामानंतर नरकासुराच्या प्रतिमेचे दहन केले गेले आणि पुढे ही पद्धत सुरू झाली अशी माहिती मिळाली.
पूर्वी दिवाळीच्या सुमारास भाताचे पीक निघाले की शेतातील तण, घराच्या आजूबाजूचे गवत,सुका पालापाचोळा यापासून नरकासुराच्या प्रतिमा तयार करत यातूनच आजचे नरकासुराचे महाकाय रूप तयार झाले.
गोव्यामध्ये पणजी, मडगाव,फोंडा, म्हापसा वास्को याठिकाणी मोठमोठ्या प्रतिमा उभ्या केल्या जातात. हल्ली कारखान्यात मुखवटे बनवले जातात , काही कुटुंबे नरकासुराचे मुखवटे तयार करण्याचे काम करतात. नरकचतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून दिवाळीच्या पूर्वसंध्येला उभारलेल्या नरकासुराच्या प्रतिमेचे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे दहन करतात .हा सोहळा पाहण्यासाठी खूप लोक येतात. त्यानंतर अभ्यंगस्नान करून दिवाळीचा फराळ केला जातो. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव तसाच खाद्यपदार्थांचा उत्सव आहे. फराळ म्हटले की लाडू करंजी ,चकली, शंकरपाळी आलीच.पणगोव्यात पहिल्या दिवशी मात्र फोवच म्हणजे पोह्यांचे पांच प्रकार करतात.गोडाचे पोहे त्यात गुळ आणि ओला नारळाचा चव घालतात,तिखसे फोव हिरव्या मिरच्या व ओले खोबरे घालून करतात,ताकाचे फोव ताकातभिजवून त्यात मिरची कोथिंबीर घालतात, आगीचे फोव म्हणजे सोलकढीत भिजवलेले आणि फोटो फोव फोडणी करून केलेले पोहे . हा फराळ करून मग एकामेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. हल्ली बऱ्याच घरात दिवाळीचा फराळ आपल्या सारखा बनवला जातो.
ह्या काळात सुट्टी असल्यामुळे पर्यटक हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करतात.आणि या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचा आनंद लुटतात.
“जाशील रे मोऱ्या, जरा घोटभर चहा घे आणि मग निघ, काय ?”
“बरं, आता तुम्ही इतका आग्रह करताच आहात तर…”
“अरे माझं जरा कामं होतं, म्हणून म्हटलं चहा पिता पिता बोलू !”
“पंत, आज गंगा उलटी कशी काय वाहायला लागली ?”
“म्हणजे ?”
“पंत मी नेहमी तुमच्यकडे काहीतरी कामं घेऊन येतो, सल्ला मागायला येतो आणि आज….”
“अरे गाढवा, गंगेला सुद्धा कधीतरी वाटत असेल नां, प्रवाहाच्या उलट वहावं म्हणून ! ते सगळं असू दे, मला सांग तुझी ती चाळीतली दुसरी खोली रिकामीच आहे नां अजून, का कोणी भाडेकरू ठेवला आहेस ?”
“नाही पंत, अहो ती रिकामीच आहे. गावाकडचे पै पाहुणे आले की बरी पडते वापरायला !”
“हे बरीक चांगल झालं!”
“चांगल झालं म्हणजे ?”
“अरे चांगल म्हणजे, मला ती खोली जरा वापरायला देशील का ?”
“पंत, हे काय विचारण झालं ? काही सामान वगैरे ठेवायच होत का ?”
“हो रे मोऱ्या, दोन नवीन मोठे led tv ठेवायचे होते !”
“मग पंत, त्यासाठी आख्खी खोली कशाला ? माझ्या राहत्या घरी मी ठेवतो की !”
“अरे नुसते दोन tv नाहीत, आणखी बरंच सामान आहे रे !”
“बरंच सामान म्हणजे, मी नाही समजलो! आणि मुळात तुमच्याकडे एक tv ऑलरेडी असतांना हे दोन नवीन LED कशाला घेतलेत ?”
“आता तुला सार काही सविस्तर सांगतो. अरे आमच्या पमी आणि सुमीच लग्न आहे दोन महिन्यांनी, हे तुझ्या कानावर आलं असेलच !”
“हो, बायको म्हणाली मला तसं चार पाच दिवसापूर्वी. त्या दोघींचे लग्न एकाच मांडवात लागणार आहे म्हणून.”
“हो रे, माझे दोन्ही जावई मला खरोखरचं भले भेटले बघ, म्हणून तर एकाच मांडवात एकाच दिवशी दोघींची लग्न लागणार आहेत. एका लग्नाच्या खर्चात दोन लग्न !”
“हे चांगलंच आहे पंत आणि म्हणून मला वाटलं तुमचे पाहुणे वगैरे येणार त्यासाठी तुम्हाला खोली वापरायला हवी आहे.”
“नाही रे. अरे सध्या दिवाळी ऑफर चालू होती LED tv ची, एकावर एक फ्री ! म्हणून म्हटलं घेऊन टाकू एक सुमीला आणि एक पमीला !”
“अस्स होय, पण मग tv शिवाय आणखी काय काय सामान ठेवायचं आहे पंत त्या खोलीत ?”
“अरे सध्या दिवाळी मुळे offer चा नुसता सुकाळ आहे बघ ! सोफा कम बेडचा सेट घेतला तर त्यावर मोठ डायनींग टेबलं आणि आठ खुर्च्या मोफत ! बोल आहेस कुठे ? म्हणून म्हटलं…..”
“घेऊन टाकू सोफा कम बेडचा सेट, जो होईल पमीला आणि डायनींग सेट सुमीला, काय बरोबर नां ?”
“अगदी बरोबर बोललास मोऱ्या !”
“पण पंत, हे सगळं सामान जरी माझ्या खोलीत ठेवलं तरी माझी अर्धी खोली रिकामी….”
“रहाणार नाही, याची गॅरंटी देतो मी !”
“म्हणजे ?”
“अरे अजून मला त्या खोलीत एक मोठं गोदरेजच कपाट आणि त्यावर फुकट मिळणारी मोठी लाकडी शो केस ठेवायची आहे नां !”
“अरे बापरे, त्या वस्तूंची पण काही स्कीम चालू आहे का ?”
“हो ना रे मोऱ्या ! अरे गोदरेज कपाटावर एक लाकडी मोठी शोकेस फुकट आहे कळल्यावर म्हटलं घेऊन टाकू लग्नात द्यायला, एक….”
“सुमीला आणि एक पमीला, काय बरोबर नां ?”
“बोरोब्बर ओळखलंस मोऱ्या !”
“पंत तरी पण माझी खोली….”
“अजून सामान आहे म्हटलं !”
“काय ?”
“अरे अजून त्या खोलीत दोन मोठे टिबल डोर फ्रीज, दोन मोठे मायक्रो वेव्ह, दोन डिनर सेट, दोन व्ह्याकूम क्लीनर आणि दोन डिश वॉशर पण ठेवायचे आहेत, एकावर एक फ्री मिळालेले !”
“बापरे, म्हणजे त्या दोघींच्या नवीन संसाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्ही देताय म्हणा की.”
“अरे मला दोनच मुली आणि दोघींच्या घरच्यांनी काहीच मागितल नसलं, तरी आपण समजून नको का द्यायला ?”
“ते ही खरचं म्हणा ! पण पंत त्या दोघी लग्न लागल्यावर राहणार कुठे ?”
“अरे तुला सांगतो त्यांच्या रहायच्या जागेची सोय पण मीच करून ठेवली आहे !”
“काय सांगताय काय आणि ती कशी काय बुवा ?”
“अरे त्याच काय झालं विरारच्या एका बिल्डरची ऑफर होती, एका फ्लॅटवर एक फ्लॅट फ्री म्हणून, म्हटलं घेऊन टाकू एक सुमीला होईल आणि एक पमीला होईल !”
“खरंच कमाल झाली तुमची पंत ! पण तुम्हाला एक खाजगी प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?”
“अरे मोऱ्या, राग कसला बोल तू बिनधास्त !”
“तसं नाही पंत, आता तुम्ही एवढा सगळा खर्च करताय तर त्यासाठी भरपूर पैसे पण लागले असतीलच नां ?”
“अर्थातच मोऱ्या ! अरे एकावर एक वस्तू किंवा जागा फुकट असली तरी पहिल्या वस्तूला पैसे हे मोजावेच लागले मला !”
“मी तेच म्हणतोय, तुम्ही तर गेल्या वर्षी म्युनिसिपालिटी मधून रिटायर झालात आणि इतका खर्च एकदम कसा काय झेपला तुम्हाला पंत ?”
“मला वाटलंच, तू हा प्रश्न नक्की विचारणार म्हणून ! अरे माझ्या या सगळ्या खर्चाची तरतूद आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारनेच केली आहे बघ !”
“ती कशी काय पंत ? मी नाही समजलो !”
“मोऱ्या, चाळीत कोणाला बोलू नकोस, तुला म्हणून सांगतोय ! अरे मला आपल्या राज्य सरकारच्या लॉटरीच दिवाळी बंपर सोडतीच दोन कोटी रुपयांचे पाहिलं बक्षीस लागलंय, आहेस कुठे ?”
☆ दिन दिन दिवाळी – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
दारावरती तोरण, अंगणी
ताजी सडा – रांगोळी
अवतीभवती लखलखती
सांगती पणत्यांच्या ओळी
आली, आली दिवाळी आली ——
——– दिवाळी आली आणि घरोघरी जराशी विसावली की मग ती दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते “ नरकचतुर्दशी “ या नावाने. या दिवशी नरकासुर या राक्षसाचा, कृष्ण, सत्यभामा, आणि काली यांनी वध केला, आणि त्याचा आनंद यादिवशी साजरा केला जाऊ लागला, अशी पुराणकथा तर सर्वश्रुतच आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी, म्हणजे चंद्रप्रकाशात , वाटलेले तीळ अंगाला चोळून मग अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे, आणि असे केल्याने, दारिद्र्य, दुर्दैव आणि अनपेक्षित अप्रिय घटना, यापासून संरक्षण होण्यास मदत होते, असेही मानले जाते. नंतर नरकासुराचे प्रतीक म्हणून
‘करट‘ नावाचे छोटे फळ पायाने चिरडणे, अशासारख्या प्रथाही आहेत. विचारांती असे जाणवते की या प्रथा-पद्धतींमागचा खरा आणि उदात्त हेतू हाच असावा की, ‘ आळस , वाईट विचार आणि त्यामुळे घडणारी वाईट कृत्ये यामुळे आयुष्यात नरकसदृश परिस्थिती निर्माण होते याची जाणीव सर्वच माणसांना व्हावी, आणि सर्वांच्याच आयुष्याला सज्ञानाचा, सत्प्रवृत्तींचा , आणि सत्कर्मांचा प्रकाश सदैव व्यापून रहावा.’
या दिवसाला — काळी चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी, भूत चतुर्दशी, काली चौरस, आणि नरक-निवारण चतुर्दशी– अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते.
हा दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो—
कालीमातेने नरकासुराचा वध केला होता असे मानून काही भागात यादिवशी महाकाली म्हणजे शक्तीचे पूजन केले जाते.
काही तमीळ कुटुंबांमध्ये या दिवसाला “ नोम्बू “ असे म्हणतात, आणि याच दिवशी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.
कर्नाटकात तसेच गोवा आणि तामिळनाडूमध्ये दिवाळी वसुबारसेला नाही, तर नरकचतुर्दशीला सुरु होते, असे मानतात.
राजस्थान-गुजरातमध्ये याला “ काली चौरस “ असे म्हणतात. दुष्ट आत्मे आणि दुष्ट माणसांची काळी- म्हणजे वाईट नजर कोणावर पडू नये म्हणून कुलदेवतेचे पूजन केले जाते. याच सुमारास शेतातले नवे धान्य घरात आलेले असते, त्यासाठी यादिवशी देवाचे आभार मानले जातात.
गोव्यात कागद-गवत आणि फटाके यापासून नरकासुराचा प्रतीकात्मक पुतळा बनवून, त्याचे दहन केले जाते. तिथेही ‘ करट ‘ हे कडू फळ पायाखाली चिरडून जणू नरकासुराला चिरडून मारतात.
पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेचा आदला दिवस “ भूत-चतुर्दशी “ म्हणून पाळला जातो. तिथे असा विश्वास बाळगला जातो की, या दिवशी आधीच्या चौदा पिढयांमधल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या कुटुंबातल्या हयात असलेल्या नातेवाईकांना भेटायला येतात. त्यावेळी त्यांना घराचा रस्ता कळण्यासाठी आणि घराभोवती घुटमळणाऱ्या दुष्ट आत्म्यांना आणि दुष्ट शक्तींना हुसकावून लावण्यासाठी घराभोवती चौदा दिवे लावले जातात. घरातले अंधारे कोपरे-कोनाडे प्रकाशाने उजळून टाकले जातात.
दक्षिण भारतातील काही भागात या दिवसाला “ दीपावली भोगी “ असे म्हटले जाते. म्हणजे दिवाळीचा आदला दिवस.
“विविधतेत एकता “ हे आपल्या देशाचे अनेक बाबतीत दिसणारे वैशिष्ट्य या दिवशीही प्रकर्षाने दिसून येते, कारण हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या चालीरीतींनुसार साजरा केला जात असला, तरी प्रत्येक ठिकाणी त्यामागील विचारात मात्र “संपूर्ण एकता “ आहे, असे निःशंकपणे म्हणायला हवे — आणि तो विचार म्हणजे– माणसाच्या मनातल्या विनाशकारक दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट विचार-आचार, घातक सवयी, आणि एकूणच आयुष्य दुःखदायक आणि नरकसदृश्य करणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा संपूर्ण विनाश व्हावा, आणि संपूर्ण मानवजातीलाच आनंदी- शांत- समाधानी, असे साफल्याने उजळलेले संपन्न आयुष्य जगता यावे. हाच विचार नरकासुरासारख्या इतर कितीतरी उदाहरणांचा प्रतीकात्मक उत्तम उपयोग करून, विविध सणांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ठसवण्याचा विचार ज्या ज्या कुणी इतका जाणीवपूर्वक आवर्जून केला असेल, त्या सर्व महान माणसांना यानिमित्ताने कृतज्ञतापूर्ण मनःपूर्वक नमस्कार.
यानंतरचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. दिवाळीतला हा महत्वाचा दिवस. या दिवशी श्रीविष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या बंदिवासातून मुक्त केले, ही पौराणिक कथा बहुतेकांना माहिती आहे. भारतीय संस्कृतीतील ही वैशिष्ट्यपूर्ण पूजा मानली जाते. कारण अमावस्या, एरवी इतर अकरा महिन्यांमध्ये अशुभ मानली जात असली, तरी अश्विन महिन्यातली ही अमावस्या मात्र अतिशय शुभ मानली जाते. अशी आख्यायिका आहे की, या अमावास्येच्या रात्री स्वतःला राहण्यासाठी योग्य असे स्थान शोधण्यासाठी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. आणि ज्या घरी चारित्र्यसंपन्न, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, आणि क्षमाशील पुरुष, आणि गुणवती, पतिव्रता स्त्रिया राहतात, त्या घरी रहाणे तिला आवडते. आत्ताच्या काळात मात्र लक्ष्मीचे हे योग्य घर शोधण्यासाठीचे जे निकष आहेत, त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव लक्ष्मीने तरी करू नये अशी तिला मनापासून विनंती करावीशी वाटते, कारण पतिव्रता या शब्दात अपेक्षित असलेला एकनिष्ठपणा, आणि गुणसंपन्नता ही दोघांमध्येही असली पाहिजे. तसेच वर उल्लेखलेले गुणही दोघांनी , किंबहुना घरात राहणाऱ्या सर्वांनीच अंगी बाळगले, तरच ते पूर्ण कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी-समाधानी, आनंदी आणि इतरांना — आणि अर्थात लक्ष्मीलाही हवेहवेसे वाटेल —- पण हा विचार, काही अपवाद वगळता, जनमानसात अजून तरी म्हणावा तसा रुजलेला दिसत नाही याचा खेद वाटतो . असो.
या दिवशी समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची संध्याकाळनंतर पूजा केली जाते. ही पूजा मुख्यतः धनलक्ष्मीची आणि कुबेराची केली जाते. पैसे, दागिने, व्यवसायाच्या वह्या, अशी चल आणि अचल लक्ष्मीची, थोडक्यात स्वतःकडे असणाऱ्या समृद्धीची ही पूजा असते. तिच्यामुळेच आपण शक्य तितके सुखाचे जीवन जगू शकत आहोत ही कृतज्ञतेची भावनाच यावेळी म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांमधून, प्रार्थनांमधून व्यक्त होतांना दिसते. लक्ष्मीबरोबर कुबेराची पूजा का ? तर कुबेर हा देवांच्या संपत्तीचा संग्राहक समजला जातो. आणि संपत्ती कशी राखावी याची शिकवण त्यांनी द्यावी अशी प्रार्थना त्यांच्याकडे केली जाते.
चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती “ अलक्ष्मी “ समजली जाते, जिला अजिबातच पूजनीय म्हणता येत नाही, हे मात्र ही लक्ष्मीपूजा करतांना ध्यानात ठेवलेच पाहिजे. जिथे सर्वतोपरी पावित्र्य, शुद्धता, सत्यता, आणि भक्ती असते तिथेच लक्ष्मी निवास करते. अशा ठिकाणी धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, आणि मुख्य म्हणजे गृहलक्ष्मीही समाधानी असणे गृहीत असते. घर स्वच्छ ठेवणाऱ्या केरसुणीचीही यादिवशी लक्ष्मी म्हणून पूजा करणारी आपली थोर संस्कृती आहे खरं तर. पण एरवी प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता, कितीतरी घरांमध्ये गृहलक्ष्मीला केरसुणीसमानच वागणूक दिली जात असल्याचे जाणवते. अशी घरे पाहतांना, “ यांच्याकडे लक्ष्मी म्हणजे केरसुणी “ असे उलटे समीकरण आहे की काय ? ” असा उपरोधिक प्रश्न आपसूकच पडतो. म्हणून लक्ष्मीपूजनाचे बाकीचे सोपस्कार आणि प्रार्थना करतांना, “ आता माझी गृहलक्ष्मीच या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याइतकी सक्षम आणि पुरेशी खंबीर होऊ दे गं लक्ष्मीमाते–कृपा कर. माझे आयुष्य- माझे घर तिच्याशिवाय समृद्ध होऊच शकणार नाही — “ ही प्रार्थनाही प्रत्येक विचारी माणसाने फक्त यादिवशीच नाही तर नेहेमीच करावी ही माफक अपेक्षा आहे.
ही आणि आयुष्यातली यापुढची प्रत्येकच दिवाळी सर्वांना अतिशय सुख-शांती देवो या हार्दिक शुभेच्छा.
☆ दिन दिन दिवाळी – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
दिन दिन दिवाळी ।
गाई- म्हशी ओवाळी ।।
असं अगदी आनंदाने म्हणत, दिवाळीचं स्वागत करण्यासाठी अगदी घराबाहेरच्या गोठ्यापर्यंत जायचं, अशी एक छान “ अगत्यशील “ प्रथा आपल्याकडे आहे. आणि हा स्वागताचा दिवस म्हणजे “ वसुबारस “, ज्याला “ गोवत्सद्वादशी “ असेही म्हटले जाते. आपल्या शेतीप्रधान देशात गाई-गुरे-जनावरे यांना रोजच्या आयुष्यातच अतिशय महत्वाचे स्थान आहे. त्या सर्व गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशी “ गोधनपूजा “ ही प्राधान्याने केली जाणारी पूजा. बैलपोळा खास बैलांच्या पूजेसाठी असतो, तशी वसुबारस खास गाईंच्या पूजेसाठी. आता काही ठिकाणी स्वतःला जगतांना उपयोगी पडणाऱ्या इतर काही प्राण्यांचीही पूजा केली जाते. यादिवशी घरोघरी दारात, अंगणात रांगोळी काढून दिवाळीची जणू पूर्वतयारी केली जाते.
पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून पाच कामधेनू बाहेर आल्या होत्या. त्यापैकी “ नंदा “ नामक कामधेनूसाठी वसुबारसेचे व्रत अंगिकारले जाते. यादिवशी गो -वासराची मनोभावे पूजा केल्याने अनेक जन्मांच्या कामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. आजच्या काळाचा विचार करता, कृषी-उत्पादन भरघोस आणि दर्जेदार व्हावे, उत्तम दूधदुभते उपलब्ध व्हावे आणि त्यायोगे मुलाबाळांना चांगले आरोग्य आणि सुख लाभावे, अवघा देशच धनधान्यसमृद्ध व्हावा, अशी कामना मनी बाळगून सर्वांनीच गाई-वासराची प्रतीकात्मक का होईना, पण कृतज्ञतापूर्वक पूजा करणे संयुक्तिक ठरणारे आहे. आता प्रत्येकाच्या घरी गाय पाळणे दुरापास्तच आहे. त्यामुळे अनेक घरात रांगोळीने किंवा तांदुळाने पाटावर गायीचे चित्र रेखाटून, किंवा मातीच्या बनवलेल्या प्रतिमा आणून ही पूजा करतात. दिवाळीचे स्वागत करण्यासाठी, एरवी सतत बंद असलेली, आणि घराची बेल वाजल्यानंतर ‘ कोण आहे ‘ असं त्रासिकपणे विचारून, किँवा की-होलमधून बघून, आत बोलावण्यास हरकत नाही याची खात्री करून उघडली जाणारी हल्लीच्या घरांची दारे, यादिवशी मात्र सताड उघडी ठेवली जातात, म्हणून ही “ अगत्यशील प्रथा “ आहे असे आवर्जून म्हणावेसे वाटते. आणि अर्थातच सर्वात महत्वाचे म्हणजे, पूजा करण्याची पद्धत, किंवा पूजासामग्रीतला नेमकेपणा , यापेक्षा पूजा किती श्रद्धेने, आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा मूळ उद्देश लक्षात ठेवून केली जाते, हे सर्वात जास्त, किंबहुना हे एवढेच महत्वाचे असते. बरोबर ना ?
या अनुषंगाने असा विचार मनात येतो की, अशा सणाच्या निमित्ताने सगळं कुटुंब, आप्तेष्ट प्रत्यक्ष किंवा आजकाल निदान virtually तरी आवर्जून एकत्र येतात, काहीवेळ एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतात, एकमेकांची आस्थेने चौकशी करतात, आणि हा सणांचा मोठाच फायदा सगळ्यांनाच होतो, हे अगदी १००% खरे आहे. पण इतके सारे सण साजरे करण्याची सुरुवात फक्त याच उद्देशाने झाली असावी, असे मात्र नक्कीच वाटत नाही. सण साजरा करण्याचे हे सगळे ancillary किंवा complementary फायदे आहेत, हे सुजाण माणसांनी नक्कीच ध्यानात ठेवायला हवे. याचं कारण असं की, आपल्या प्रत्येक श्वासात, रोजच्याच जगण्यात, अर्थार्जनाच्या आणि इतर प्रत्येकच कामात, अनेक सजीव तसेच निर्जीव वाटणाऱ्या गोष्टींचा महत्वाचा हातभार अतिशय गरजेचा असतो, हे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. आणि अशा सर्व गोष्टींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपल्या बहुतेक सर्व सणांचे आणि उत्सवांचे प्रयोजन विचारवंत आणि ज्ञानी सत्पुरुषांनी खूप पूर्वीपासूनच केलेले आहे. त्यामुळे नेमकी तेवढीच भावना वगळून, बाकी सगळे आनंदाने साजरे करणे, म्हणजे सण साजरा झाला का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवा—- प्रत्येक सण साजरा करतांना— आणि आता हाच विचार मनात ठेऊन दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाकडे वळू या.
“धनत्रयोदशी “ – धनतेरस -. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्वाचा असतो, कारण यादिवशी त्यांच्या हिशोबाच्या नव्या वह्यांची साग्रसंगीत पूजा करून त्यांचा वापर करण्यास ते सुरुवात करतात — हिशोबाच्या वह्या म्हणजे, ते कुठल्या दर्जाचे जीवन जगू शकतील हे दाखवणारे अदृश्य आरसेच–महत्वाचे मार्गदर्शक- त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून वापरण्याआधीच त्यांची पूजा. काही ठिकाणी याच दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पूजाही केली जाते. दागिने -कपडे -नवीन वस्तू खरेदी करायला हा दिवस म्हणजे एक हुकमी कारण.
हा दिवस आणखी एका कारणाने शेतकरीवर्गातही साजरा केला जातो. त्यांच्यासाठी ‘ धान ‘ म्हणजे स्वतःच्या शेतात पिकलेले धान्य, हे त्यांचे धनच असते. म्हणून यादिवशी घरात आलेल्या धान्याची तर ते मनोभावे पूजा करतातच, पण त्याच्या जोडीने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांचीही कृतज्ञभावनेने पूजा करतात.
या दिवसाला “ धन्वंतरी जयंती “ असेही म्हटले जाते, आणि पौराणिक कथांनुसार यामागची प्रचलित कहाणी अशी आहे की—— देव- दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीच्या पाठोपाठ, हातात अमृतकुंभ घेऊन श्री धन्वंतरी प्रकटले. भगवान विष्णूंचा अवतार समजले जाणारे धन्वंतरी सर्ववेदविद्यापारंगत, मंत्र-तंत्रांचे जाणकार तर होतेच , आणि त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे, त्यांनी अमृतरूपाने देवांना अनेक औषधींचे सार प्राप्त करून दिले होते. म्हणूनच की काय, बऱ्याच दवाखान्यांमध्ये, अगदी मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्येही श्रीगणेशाच्या जोडीने धन्वंतरीची, एका हातात कलश असलेली चतुर्भुज मूर्ती, सहजपणे दिसेल अशी, अगदी मापाची काचेची उभी पेटी तयार करून, त्यात ठेवलेली हमखास पहायला मिळते. या दिवशी ईशान्य दिशेला तोंड करून भगवान धन्वन्तरींची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते, असेही मानले जाते.
यादिवशीपासून घराभोवती, घरासमोर सगळीकडे भरपूर पणत्या, आकाशकंदील लावून सर्व परिसर लखलखीत प्रकाशाने उजळून टाकला जातो. घर आणि घराचा परिसर जसा प्रकाशमान– अंधःकारहीन होतो, तशी त्या घरातल्या माणसांची मनेही तेवढ्या काळापुरती का होईना, दुःख – चिंता -यातना – वेदना, तसेच राग, मत्सर, हेवेदावे, दुस्वास, तुलना, अशासारख्या सगळ्या नकारात्मक भावनांना विसरून, निखळ आनंदाच्या प्रकाशाने उजळून जावीत, हाच त्या इतक्या सगळ्या पणत्या लावण्यामागचा हेतू असायला हवा.
पुराणांमध्ये या लखलखाटाचे कारण सांगणारीही एक गोष्ट आहे — एका राजपुत्राचा सोळाव्या वर्षी अकाली मृत्यू होईल, आणि तोही त्याच्या लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी, असे भविष्य वर्तवलेले असते. त्यादिवशी त्याची नववधू त्याच्या अवतीभवती आणि महालाच्या प्रवेशद्वारात सोन्याचांदीच्या मोहरांची रास ठेवते, आणि मग महालात मोठमोठे दिवे लावून लखलखीत प्रकाश केला जातो, आणि राजपुत्राला जागे ठेवले जाते. रात्री यमाने सर्परुपात महालात प्रवेश केल्यावर तिथल्या लखलखीत प्रकाशाने डोळे दिपल्यामुळे त्याला काहीच दिसत नाही, आणि तो यमलोकात परत जातो. राजपुत्राचा प्राण वाचतो.
एकूण लक्षात घेण्यासारखे काय, तर ज्ञानाचे – सारासार विचारांचे – योग्य आणि आवश्यक तितक्या प्रयत्नांचे – सहभावनांचे, सद्भावनांचे आणि सकारात्मक विचारांचे अनेक दीप प्रत्येकाने नंदादीपासारखे स्वतःच्या मनात सतत आणि श्रद्धेने तेवते ठेऊन, अंध:कारजनक नकारात्मक भावना त्याच वातीने फटाक्यांसारख्या पेटवून संपवून टाकून, मन निर्मळ निर्व्याज आनंदाने सतत लखलखते ठेवले, तर आयुष्यात फक्त चारच दिवस नाही, तर रोजच दिवाळी साजरी होईल यात शंकाच नाही.
करंजी आवडणारे फार कमी लोक आहेत असं मला वाटतं. माझी आई खूप सुंदर पुडाच्या करंज्या करायची आणि तिची आईही आई आणि आजीच्या हातच्या त्या अलवार करंजा लहानपणापासून खाल्लेल्या दिवाळीत !
एका दिवाळीत बडोद्याहून आत्या सहपरिवार आल्या गावाकडे, माझी आई आणि काकी दोघींना मोठ्ठा पितळेचा डबा भरून पुडाच्या करंज्या केल्या रात्रभर जागून. आणि तो पितळी डबा मी उठायच्या आत पाठवला!
आत्या सहकुटुंब मळ्यातल्या घरी रहिल्या होत्या. तिकडे, ताजी करंजी खायला न मिळाल्याची खंत मला अजूनही आठवतेय मी तेव्हा नववी दहावीत असेन आम्ही तीन चार मुलं गावातल्या घरात असताना सगळ्याच्या सगळ्या करंज्या तिकडे का पाठवल्या होत्या ते आता आठवत नाही, घरात सुबत्ता होती आणि घरातल्या सगळ्या बायका सुगरणी होत्या … नंतर करंजी सह सगळे पदार्थ केले आणि भरपूर खाल्लेही असतील, पण तो भला मोठा करंज्यांनी भरलेला पितळी डबा आणि आम्हाला त्यातली एकही करंजी न देता सकाळी गड्याबरोबर पाठवलेला……अजूनही आठवतो आणि खूप हसू येतं त्या वेळी करंजी न मिळाल्याचं!
माझ्या लग्नानंतर मी ही दिवाळीला त्याच पद्धतीने पुडाच्या करंज्या करू लागले, एकदा दिवाळीत सरोज फडके नावाची केटरिंग व्यवसाय करणारी मैत्रीण आली तिला दिवाळीच्या पदार्थाची ताटली दिली,तर ती म्हणाली “ती करंजी काढ पहिल्यांदा “मी म्हटलं तू खाऊन तर बघ, मग तीने फक्त चार करंज्याच खाल्ल्या! माझ्या हातची पुडाची करंजी खूप जणांना आवडलेली आहे हे माझं मलाच खूप छान वाटतं,
माझी मैत्रीण स्वाती सामक आणि मी आम्ही दोघींनी एका दिवाळीत काही पदार्थ एकत्र केले होते, तिला पण करंजी अजिबात आवडत नव्हती पण तिने माझ्या करंजीची खूप तारीफ केली होती, आणि ती आजही म्हणते, “प्रभा करंजी मला फक्त तुझीच आवडली होती. ” बरेच वर्ष केली नाही करंजी, यावर्षी कंटाळा न करता पुडाची करंजी करीन, मागच्या दिवाळीत एका सीकेपी मैत्रीणीने दुस-या एका मैत्रीणीकडे कानवले आणले होते तिथे मी एक कानवला खाल्ला खूप प्रशंसा केली, मी आणि इतरांनीही !पण माझी पुडाची करंजी काकणभर सरसच असायची ! फरक इतकाच ती सीकेपी मैत्रीण पंचाहत्तरी पार केली तरी अजून घरी दिवाळीत कानवला (करंजी )करते आणि मी साठीतच माझ्यातल्या सुगरण पणाला तजेला देणं सोडून दिलं . गेली अनेक वर्षे करंजी केली नाही.
माझ्या पुतणीचं लग्न झाल्यानंतर तिला करंज्या पाठवल्या दिवाळीत….तेव्हा ती गावाला गेली होती , एकत्र कुटुंबात रहाणारी माझी पुतणी- प्रीती गावाहून आल्यावर ,मला म्हणाली, “काकी मी तुझी करंजी ओळखली, मी मम्मींना म्हटलं, “ही काकीची करंजी आहे”.
खूपजणी माझ्या पेक्षा सुंदर पुडाच्या करंजा करत असतील, पण अशा पद्धतीची प्रशंसा माझ्या करंजीला मिळाली आहे!
समस्त भारतीय सुगरणींच्या कुळात माझ्या करंजीची ही खसखशी एवढी नोंद!