सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ रंग जीवनाचे ….⛱ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

जन्मतः च बाळाला रंग ओळखता येत नाहीत पण हळू हळू कळू लागतात… म्हणजे भडक काही दिसले की ते तिकडेच पहाते म्हणून मग पाळण्याच्या चिमण्या रंगीत… जरा मोठे झाले की मग येतो सोबतीला चेंडू, प्लास्टिक पोपट,वेगवेगळी खेळणी वेगवेगळे रंग घेऊन !  लाल, हिरवा, निळा  तिकडे मग बाळ आकर्षित होते अन खेळण्यात हरवते.

अशा रीतीने रंग जीवनात हळू हळू डोकावू लागतात.शाळेत जाऊ लागले की होते मग रंगांची ओळख अन मग रंगीत कपडे, खेळणी, बांगड्या, मेंदी, रांगोळी रंग भरत जातात जीवनात !  कळत्या वयात एकच कुठला तरी रंग आवडतो अन त्याच रंगांच्या सोबतीने मनुष्य चालत रहातो..

खरेच देवाने रंगांची ही दुनिया दिलीच नसती तर ? माणसाचे जीवन निरस बेरंग असते !  उगवतीला अन तिन्ही सांजेला क्षितिजावर सूर्याने उधळलेले लाल पिवळे, केशरी रंग… फुलांचे, पानांचे रंग, पक्ष्यांचे रंग, काजव्याचे… कीटकांचे रंग.. किती रंग असतात अवतीभोवती !

आकाशाचा… ढगांचा… झाडांचा… रंग पांघरता यायला हवा, घेता आणि जगताही यायला हवा अन नकोसे रंग टाकताही यायला हवेत चटकन नाहीतर मग बेरंग होतो जीवनाचा !

समोरच्याचा राग रंग ओळखता यायला हवा.. अन्यथा आपला रंग बिघडतो ! असे असले तरी फरुडासारखे रंगही बदलणे नकोच कारण मग तुमचा रंग नक्की कोणता ? कळणे मुश्किल होईल अन विश्वासही उडेल तुमच्यावरचा !

सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा अन आवडीचा रंग प्रेमाचा ! हा रंग एकच पण तो जीवन रंगीबेरंगी करतो ! सप्तरंगी इंद्रधनू छेडतो. प्रीतीचा हा गुलाबी रंग ज्याच्या आयुष्यास    लाभला त्याचे जीवन विविधरंगानी बहरते,ताजेतवाने होते,सदाबहार ठेवते जीवनाला अन वयालाही !

रागाचा रंग लाल अन शांतीचा पांढरा, दुःखाचा काळा, रात्रही काळी अन निसर्ग हिरवा !

जीवनातला  महत्त्वाचा गडद न पुसणारा रंग अध्यात्माचा… जीवन सन्मार्गावर नेणारा… शांत संयमित जगायला शिकवणारा तो भक्तीचा रंग…

विठूच्या भाळी सजणारा तो अबिराचा काळा, विठ्ठलही काळा अन माणसाचे पोट भरणारा मातीचा रंगही काळा !  सर्वच रंग जीवनात तितकेच महत्वाचे..

रंगांची ही विविधरंगी दुनिया मानवाचे जीवन रंगीत करते हेच खरे !

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments