काही महिन्यांपूर्वी माझी पुण्यामध्ये संगीत उपचार करणाऱ्या एका ट्रेनरसोबत ओळख झाली. ते Music Therapy वर रिसर्च करतात आणि लेक्चर्स देतात. संगीत उपचारने आपण बऱ्याच त्रासांवर मात करू शकतो किंवा ते कमी करू शकतो. वेगवेगळ्या लोकांच्या वर सध्या पुण्यात खूप ठिकाणी असे उपचार चालू आहेत आणि याचे रिझल्ट्स खूप आश्चर्यकारक आहेत. बऱ्याच लोकांना फरक पडत आहेत. पूर्वी लोकं ग्रामोफोनवर असे बरेच राग ऐकत असत. त्यामुळे त्यांचे आरोग्यही उत्तम राहत असे.
खाली दिलेले सर्व राग तुम्हाला YouTube वर मिळतील.
जात्याच संगीताची आवड असणारी मी, एक प्रयोग म्हणून 30 दिवस दररोज 45 मिनिटे हेडफोन लावून शांत ठिकाणी यातील काही राग ऐकले. आणि मलाही आश्चर्यकारक फरक जाणवले. संगीतावर माझा शास्त्रीय अभ्यास नाही; पण संगीत आणि गाणी हा माझा खूप आवडता छंद आहे.
राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ:
१. राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.
२. राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.
३. राग देस – उत्थान व संतुलन साधणारा.
४. राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.
५. राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणीव करून देणारा राग.
६. राग शाम कल्याण – मूलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.
७. राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारा.
८. राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारा, भरपूर उर्जा निर्माण करणारा, तसेच मूलाधार उत्तेजित करणारा.
९. राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.
१०. राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा, प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.
११. राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा, भावनाप्रधान राग, सर्व सदिच्छा पूर्ण करून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.
१२. राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग. प्रेमभाव निर्माण करणारा व सांसारिक सुख वृध्दिंगत करणारा.
१३. राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग. हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जागृत करणारा असा आहे.
१४. राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यशदायक आहे. विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.
१५. राग भीमपलासी – संसार सुख व प्रेम देणारा.
१६. राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो. आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.
१७. राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहीशा करणारा.
विशेष सूचना:-
डॉक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डॉक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.
#हृदयरोग
राग दरबारी व राग सारंग
१) झनक झनक तोरी बाजे पायलिया( मेरे हुजूर )
२) तोरा मन दर्पण कहलाए ( काजल )
३) बहुत प्यार करते है, तुमको सनम ( साजन )
४) जादूगर संय्या छोडो मेरी ( नागिन).
#विस्मरण
लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा
१) मेरे नयना सावन भादों (मेहबूबा)
२) ओ मेरे सनम (संगम)
३) दिल के झरोखे मे तुझको बिठाकर(ब्रह्मचारी )
४) जाने कहा गये वो दिन(मेरा नाम जोकर )
#मानसिक_ताण_अस्वस्थता
ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत.
१) पिया बावरी ( खूबसूरत )
२) मेरे सूर और तेरे गीत (गूँज उठी शहनाई )
३) मतवारी नार ठुमक ठुमक चली(आम्रपाली)
४) तेरे प्यार में दिलदार ( मेरे मेहबूब )
#रक्तदाब
हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात.
#उच्च_रक्तदाब
१) चल उड़ जा रे पंछी ( भाभी )
२) चलो दिलदार चलो ( पाकीजा )
३) नीले गगन के तले( हमराज )
४) ज्योती कलश छलके ( भाभी की चूड़ियाँ )
#कमी_रक्तदाब
१) जहाँ डाल डाल पर ( सिकंदरे आज़म )
२) पंख होती तो उड़ आती रे ( सेहरा )
३) ओ निंद ना मुझको आये ( पोस्ट बॉक्स नं. ९०)
#रक्तक्षय_ऍनिमिया
अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.
१) खाली शाम हाथ आई है ( इजाजत )
२) आज सोचा तो आँसू भर आये ( हँसते जख्म )
३) नदियाँ किनारे ( अभिमान )
४) मैने रंग ली आज चुनरिया ( दुल्हन एक रात की)
#अशक्तपणा
शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय, उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंतीवर आधारित गाणी ऐकावीत.
१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ( उड़न खटोला )
२) मनमोहना बड़े झूठे ( सीमा )
३) साज हो तुम आवाज हूँ मै ( चंद्रगुप्त )
#पित्तविकार_ॲसिसिटी
ॲसिसिटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत.
१) छूकर मेरे मन को ( याराना )
२) तुम कमसीन हो नादां हो ( आई मिलन की बेला )
३) आयो कहाँ से घनश्याम ( बुढ्ढा मील गया )
४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये ( सेहरा )
राग केदार:
१) हमको मन की शक्ती देना ( गुड्डी)
२) आपकी नजरो में (घर)
३) पल दो पल के ( द बर्निंग ट्रेन)
४) दर्शन दो घनश्याम नाथ मोरी
राग भैरवी:
१) तुमही हो माता पिता तुमही हो
२) ये गलिया ये चौबरा ( प्रेमरोग)
३) दिल दिया हैं जान भी देंगे ( कर्मा)
४) दुनिया बनाने वाले क्या तेरे मन मे (तीसरी कसम)
राग यमन:
१) धुंदी कळ्यांना ( धाकटी बहीण)
२) जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा)
३) इक प्यार का नगमा है( शोर)
४) नाम गुम जायेगा ( किनारा)
राग मालकंस:
१) आधा है चंद्रमा रात आधी ( नवरंग)
२) पग घुंगरू बांध मिरा नाचे( नमक हलाल)
३) दिल पुकारे आरे आरे (jewel thief)
४) ये मालिक तेरे बंधे हम ( दो आंखे बाराह हाथ)
राग अहिरभैरव:
१) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
२) अलबेला सजन आयो रे ( हे गाणे हम दिल दे चुके सनम मधले न ऐकता बाजीराव मस्तानी ह्या सिनेमातले ऐकावे)
३) सोला बरस की बाली उमर को सलाम ( एक दुजे के लिये)
४) कोमल काया विमोह माया ( नटरंग)
राग हंसध्वनी:
१) अखेरचा हा तुला दंडवत( मराठा तितुका मिळवावा)
२) अग नाच नाच राधे उडवूया रंग ( गोंधळात गोंधळ)
राग भूप:
१) इन आंखो की मस्ती के ( उमराव जान)
२) देखा एक ख्वाब तो सिलसिले हुये (सिलसिला)
३) कांची रे कांची ( हरे राम हरे कृष्ण)
४) सायोनारा ( लव इन टोकियो)
राग आसावरी:
१) इक राधा इक मीरा ( राम तेरी गंगा मैली)
२) मेरे महबूब कयामत होगी ( Mr. X in Bombay)
३) हम तेरे बिन अब रह नही सकते (आशिकी)
४) कौन तुझे यू प्यार करेगा (MS Dhoni)
राग दुर्गा:
१) सावन का महिना, पवन करे शोर ( मिलन)
२) तू इस तरह से मेरे जिंदगी में शामील है ( आप तो ऐसे ना थे)
राग देस:
१) वंदे मातरम्
२) प्यार हुआ छुपके से ( 1942 love story)
३) अजी रुठकर कर के कहा जाईएगा ( आरजू)
४) चदरिया झिनी रे झिनी ( जुदाई)
राग बिलावल:
१) लग जा गले ( वो कौन थी)
२) जय जय संतोषी माता ( जय संतोषी माता)
३) जण गण मन अधिनायक
४) ओम जय जगदीश हरे
राग श्यामकल्याण:
१) शूरा मी वंदिले
राग भीमपलासी:
१) तू चीज बडी है मस्त मस्त ( मोहरा)
२) ये अजनबी तू भी कभी ( दिल से)
३) तू मिले दिल खिले ( Criminal)
४) नैनो में बदरा सावन (मेरा साया)
रागाची चव कळावी म्हणून मी ही सर्वपरिचित चित्रपटगीते दिली आहेत. जेव्हा केव्हा मी माझी काही favourite गाणी ऐकत असते तेव्हा ती कोणत्या रागावर आधारित आहे हे आवर्जून पाहत असते. अजूनही तुम्हाला वरील रागावर YouTube वर खूप गाणी मिळतील.
पण मी म्हणेन प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.
लेखिका : श्रीमती सरस्वती
प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ते आजोबा नातवाला घेऊन रोज बागेत यायचे. त्याच्यासाठी कायम फिल्डर कम बॉलर बनून तो थकेस्तोवर त्याला बॅटिंग करू द्यायचे.
क्रिकेट खेळून मन भरलं की मग आजोबा घोडा बनणार… आणि त्यांचा पाचेक वर्षाचा नातू त्यांच्या पाठीवर घोडेस्वार बनून त्यांना त्या लॉनमध्ये इकडे तिकडे फिरवणार.
मग दोघेही थकले की आजोबा त्याला जवळ घेऊन कसली तरी गोष्ट ऐकवायचे…
‘मग एवढा मोठ्ठा राक्षस आला…’ आजोबा अगदी राक्षसारखं तोंड वगैरे करून गोष्ट रंगवायचे.
‘…आणि मग त्या राक्षसाला मारून तो राजकुमार राजकुमारीला सुखरूप घेऊन गेला आणि त्यानं खूप वर्षे राज्य केलं…’
रोज एका नव्या गोष्टीचा सुखांत व्हायचा. तृप्त मनानं आजोबा आणि तृप्त कानांनी तो नातू मग चांदणं बघत घरी निघायचे. ठरल्याप्रमाणं तो भेळ-पाणीपुरीवाला बागेच्या दारात वाट पाहत उभा असायचा.
“आजोबा, सुकी पुरी…”
नातवानं फर्माईश केली की आजोबा एक प्लेट तिखट पाणीपुरी आणि त्यांचा नातू एक प्लेट फक्त सुकी पुरी खाणार…
मग आजोबा खिशातून रुमाल काढून त्याचं तोंड पुसणार आणि बॅगेतून छोटीशी बाटली काढून त्याच्या तोंडाला लावणार.
त्यानं पूर्ण पाणी प्याल्यावर शिल्लक राहिलं, तर एखादा घोट आपण पिणार आणि त्याला हाताला धरून पलीकडल्या गल्लीत अंधारात नाहीसे होणार.
त्यांचं ते निर्व्याज प्रेम आणि त्या नातवाच्या बाळलीला बघून बरेच जण तृप्त होत होते… ज्यांना जमेल त्यांनी आपापला नातू आणायला चालूही केलं होतं आणि ज्यांना शक्य नव्हतं ते एखादा जास्तीचा फोन करून नातवाशी गप्पा मारत होते– कुणी शहरातल्या नातवाशी, कुणी गावातल्या, तर कुणी सातासमुद्रापार गेलेल्याशी…
त्या दिवशी आजोबा एकटेच होते. त्यांना एकटं पाहून त्यांच्याहून जास्त बेचैनी रोजच्या बघ्यांना झाली होती. एखादं सुंदर कारंजं अचानक थांबल्यावर किंवा एखादी गार वाऱ्याची झुळूक अचानक थांबल्यावर, एखादी सुरेल लकेर वरच्या पट्टीत गेल्यावर मध्येच रेडिओ खरखरल्यावर हमखास जसं होतं, अगदी तस्सं…
“आजोबा आज एकटेच… नातू नाही?”
आजोबा फक्त हसले. थोडा वेळ बागेत चकरा मारून झाल्यावर झोपाळयावर खेळणाऱ्या मुलांपाशी थोडेसे रेंगाळले. सुरकुतीतल्या मिशा थोड्याशा हलल्या. त्या मुलांना एकदोन चेंडू टाकून निघाले.
दारात नेहमीचा भेळवाला भेटला; पण आज काही त्यांनी तिखट पाणीपुरी घेतली नाही… त्यांची पावलं झपझप पुढच्या काळोखात विरून गेली.
“एक सेवपुरी देना…उसमे शेव कम डालनेका और कांदा थोडा जास्ती. तिखट मिडीयम रखना…” मी त्या भेळवाल्या भय्याला सांगितलं.
“ही घ्या साहेब तुमची कमी शेव, जास्त कांदा आणि मध्यम तिखटाची शेवपुरी…” त्याचं अस्खलित मराठी माझ्या अस्तर लावून बोललेल्या हिंदीची लक्तरं टांगत होतं.
“ते आजोबा थांबले नाहीत आज… छान खेळतात रोज नातवाशी आणि पाणीपुरी खातात तुझ्या गाडीवर… त्यांचा नातू नव्हता नाही का आज सोबत?” माझी अस्वस्थता मी बोलून दाखवली.
“तो त्यांचा नातू नाहीच साहेब… समोरच्या वस्तीतला पोरगा आहे तो… सैनिक स्कूलला गेला काल. एकदा चोरी करताना आजोबांनी त्याच्या बापाला आणि त्याच्या मित्राला पकडलं. प्रकरण पोलिसांत गेलं. घरची गरिबी बघून आजोबांनी केस मागं घेतली. त्याला चार चांगल्या गोष्टी सुनावल्या आणि पदरमोड करून त्याला सैन्यात भरती केलं.
लग्न लावून दिलं त्याचं आणि वर्षाचा पोरगा मागे ठेवून काश्मीरमधून तिरंग्यात गुंडाळून परत आला! सरकारी मदत जी मिळायची ती मिळालीच पण त्याची बायको आणि पोरगं वाऱ्यावर उघडे पडू नयेत म्हणून यांनी त्यांना स्वतःच्या घरात घेतलं. स्वतःच्या नातवासारखं त्याला आणि पोटच्या पोरीसारखं त्याच्या आईला जपतात…”
“मग आजोबांच्या स्वतःच्या घरचं कुणी…?”
“ उभी हयात सीमेवर शत्रूशी लढण्यात गेली, साहेब… शत्रूला डावपेचात मागं टाकण्याच्या विचारात संसाराचा डाव मांडणं जमलंच नाही… अजूनही सगळी पेन्शन आणि वेळ अशा रुळावरून खाली घसरू लागलेल्या पोरांना सावरण्यात घालवतात…”
“तुला इतकं सारं तपशीलवार कसं रे माहीत?”
“साहेब, तो चोरी करताना पकडलेला दुसरा पोरगा मीच होतो. ही भेळेची गाडी त्याच देव माणसानं टाकून दिलीय!”
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जागं होणारे बेगडी देशप्रेम कुठंतरी डोळे ओले करून गेलं!
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
गौतम बुद्धांकडे एकजण आला आणि त्याने विचारलं, भगवान, आत्मा आहे की नाही?
बुद्ध म्हणाले, स्वत:च्या आत उतरूनच याचा शोध घेता येईल तुला.
तो म्हणाला, ते मी करीनच. पण, मुळात आत्मा आहे की नाही, ते सांगा.
बुद्ध म्हणाले, मी तुला आत्मा आहे, असं सांगितलं तरी ते खोटं आहे आणि आत्मा नाही, असं सांगितलं तरी तेही खोटंच आहे.
तो माणूस म्हणाला, असं कसं होईल? दोन्ही खोटं कसं असेल? एकतर आत्मा आहे हे खोटं असलं पाहिजे किंवा आत्मा नाही हे खोटं असलं पाहिजे.
बुद्ध म्हणाले, मी यातलं काहीही एक खरं आहे, असं सांगितलं तर तीच धारणा घेऊन तू अंतरात्म्यात उतरशील आणि मग आत्मजाणीव झाली तरी नाकारशील किंवा ती झाली नाही, तरी ती खोटी खोटी करून घेशील.
माणसांना हव्या त्या गोष्टी ‘पुराव्याने शाबित’ करता येतात, त्याचं कारण हेच आहे. आपली धारणा हेच अंतिम सत्य आहे, यावर माणसाचा विश्वास पटकन् बसतो आणि तो त्यादृष्टीनेच सगळ्या विचारव्यूहाची मांडणी करतो, तसेच पुरावे त्याला सापडत जातात. तेवढेच ‘दिसतात. ‘ माणसं ध्यानात, अंतरात्म्यापर्यंत उतरतानाही धारणांची ही वस्त्रं त्यागू शकत नाहीत. ती ‘स्व’च्या तळात उतरतानाही हिंदू असतात, मुसलमान असतात, ख्रिस्ती असतात, बौद्ध असतात… मग त्या त्या धारणांनुसार त्यांना ‘स्वरूप’दर्शन घडतं आणि तीच त्यांना आत्मजाणीव वाटू लागते… तो त्यांच्या धारणांनी निर्माण केलेला एक आभास आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
☆
लेखक: ओशो
प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो .
चढलेला मोठा आवाज…
आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की, घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा.
घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे.
घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये. कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृष्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये. मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसा आपलाही राग आवरला जातो.
शुभ लहरींचेही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.
एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. एखाद्या सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, ‘थँक यू’ म्हणणार नाही; पण त्याच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरींमुळे तुमच्या शरीराभोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग तयार होऊन तुम्हाला आगळावेगळा उत्साह वाटेलच.
म्हणून दानधर्माचे अपार माहात्म्य आहे.
फक्त मनुष्ययोनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते.
म्हणून संवाद साधताना, मंत्रपठण करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना, आपला स्वर कमालीचा मृदू असावा. भले तुम्ही मग कितीही बैठक, सत्संग करा; पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच तुमचा रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा. तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल. नाही तर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ अवयवांची गंमत.. पण खरं आहे… लेखक : रेडिओ मामा☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆
☆
०१. जिभेचे वजन खूप हलके असते. तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते.
०२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.
०३. पाठ मजबूत ठेवा. कारण शाब्बासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.
०४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये. एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते, हे विसरु नये.
०५. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात; पण एकमेकांना न पाहता.
०६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे असावं. कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात.
०७. एकदा हाताने पायांना विचारले: तुझ्यावर सगळे डोके ठेवतात. तो अधिकार मला का नाही?त्यावर पाय हसून म्हणाले:यासाठी जमिनीवर असावं लागतं, हवेत नाही.
०८. दुःखात बोटं अश्रू पुसतात, तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात. आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची !
०९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो.
१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली: तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात? त्यावर हारातील फुले म्हणाली :त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते.
११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो तेच डोळ्यांना बघायला लावतो.
१२. या जगात चपलेशिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही. कारण एक हरवली की दुसरीचं जीवन तिथेच संपते.
लेखक : रेडिओ मामा
प्रस्तुती :सौ. उषा नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ घराला स्पर्श कळतात ?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जिवावरच येतं. एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून निरोप देताना. मग मनातल्या मनात आपणच घराला सांगतो, “येतो परत आठ दिवसांत. तोवर सांभाळ रे बाबा.. “
तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं.
मग कधी कधी आठ दिवसांचे आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजासमोर उभे राहतो, त्या वेळचे समाधान काही वेगळेच असते. प्रवासाचा अर्धा शीण नाहीसा होतो.
पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं. दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं. मलूलतेची छाया पसरलेली असते. घर आळसावलेलं, रुक्ष, निर्जीव भासतं.
जाताना बदललेले कपडे, गडबडीत न विसळलेल्या कपबश्या, वह्यापुस्तकं, खेळण्यांचा पसारा….. आरशावर एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो. रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते,
फ्रीज उघडल्यावर उरल्या सुरल्या भाज्या, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटोचा येणारा दर्प. सिंक वॉश-बेसिन बाथरूम सुकून गेलेले असतात. वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅनसारखाच टांगणीला लागलेला असतो. भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं.
आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!
रुसलेल्या, रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते, मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते.
दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं. ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा बहाल करते. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते..
त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं.
घराला स्पर्श कळतात? हो. कळतात! त्याला आपली माणसेही कळतात. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात. आठवून पहा. काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.
तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते, तेव्हा लाडात आलेल तिचं घर तिच्याकडे पाहत हसतं. तिलाही मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”… !
शेवटी “बाईच” घराची “आई” असते.. !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈