बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपवताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले. त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का,याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या. तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.
साधारण तासाभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला. तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता.
न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले आणि म्हणाले, ” आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले. . ?”
चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,
” आपला प्रवास किती घडीचा असतो?
निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. ? जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. !”
आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवत राहिले. . .
” बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दो घडीचे. !
जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस,हाच जीवनाचा गोडवा. . !
त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण. . !
बाळ,या दोन्ही वेळी आपण स्वतः त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे कडू-गोड क्षण. . त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. !
अनेक माणसं भेटतात या प्रवासात. . त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात. . त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले. . काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात. . त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी. . त्यांचा पिंड निराळाच असतो. आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत. . !
जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं. . ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे. . ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही. या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. “
रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत,तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे. . खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.
थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.
त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,
” बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा. . पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं. . वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो. !
धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला असतो. . पण एक मात्र खरं. व पु एके ठिकाणी लिहितात,
” जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते. कारण ‘भाळणं ‘ संपल्यावर उरतं ते ‘सांभाळणं. . ‘ हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच ‘जीवन जगणं’ कळलं. . !”
असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहीत. .
बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले. . सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले, “पोरी, अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत गं. . !”
मीही उत्तरादाखल पुटपुटले, ” आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो. . !”
दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या. .
आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.
” दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. . . “
साैजन्य :सुश्री जयंती यशवंत देशमुख
प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने ‘माफ’ करा.
दुसरे रत्न – विसरा
दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. ‘निःस्वार्थ’ भावना ठेवा.
तिसरे रत्न – विश्वास
नेहमी ‘स्वकष्ट’ आणि ‘निसर्गा’वरअतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.
चौथे रत्न – नातं
समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होतं ते नातं. नात्याला जपा, नात्याला तडा जाऊ देऊ नका.
पाचवे रत्न – दान
नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही. उलट दान केल्याने मिळतो मान.आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं.
सहावे रत्न – आरोग्य
दररोज व्यायाम करा, योगासने करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा.
सातवे रत्न – वैराग्य
नेहमी लक्षात ठेवा की, ‘जन्म’ आणि ‘मरण’ कधीच कुणालाच चुकलेले नाही. ‘जन्म’ घेतला म्हणजे ‘मृत्यु’ अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळत बसू नका. ‘जीवन’ खूप सुंदर आहे, आनंदाने जगा.
माणूस जसा बदलत चालला आहे, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.
निसर्गाची ताकद आहे बघा.निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.
ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत,
तो तोडताना दहा वेळेस विचार करतो.
आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो,
मग ती झाडे असो की नाती…
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विठूमाऊलीचा प्रसाद ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
आर्मी सर्व्हिसेस कोरचे कॅप्टन प्रकाश कदम पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनाला आले होते. आज त्यांची सुट्टी संपत होती. दर्शन झालं की इथून मुंबई आणि मग तिथून पोस्टिंगवर – ड्युटीवर रुजू व्हायचं म्हणून कॅप्टनसाहेब लष्करी गणवेषातच दर्शनाला आले होते.
दर्शन झालं, आता बाहेर पडणार एवढ्यात एका छोट्या मुलीनं त्यांना हटकलं – काका, तुम्हीपण सैन्यात आहात ना ? इथून आता शत्रूशी ढिशूम ढिशूम करायला तुम्ही काश्मीरला जाणार ना ? माझे बाबाही तिथेच आहेत. त्यांच्यासाठी हा विठोबाचा प्रसाद घेऊन जाल ? आई म्हणते बाबा आता कधीच परत येणार नाहीत, त्यांना एवढा प्रसाद तर द्या.
आणि कदमांचा पंढरपूरचा मित्र त्यांच्या कानात कुजबुजत सांगत होता – ही उमंग. शहीद मेजर कुणाल गोसावींची मुलगी. मेजरसाहेब २०१६ साली काश्मीरमध्ये नग्रोटा इथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले, तेव्हा ही फक्त ४ वर्षांची होती….
कदमांच्या डोळ्यात पाणी तरारलं आणि त्यांना पुढचं काही ऐकूच आलं नाही.
लेखक : मकरंद पिंपुटकर
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवूनही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.
जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.
जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक.. उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.
बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं.. म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनरही बघितला आहे
फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमधे, तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको.. आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.
हे नको खायला .. असं होईल, ते नको प्यायला .. तसं होईल.. ह्या टेंशनमधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे, आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत बिनधास्त खाऊनही ‘ काही नाही होत यार ‘ म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.
आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं .. पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात
आता त्याला कोण काय करणार —- जगा की बिनधास्त……..
संग्राहक : श्री माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का ?
देव : विचार ना .
माणूस: देवा , माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास . असं का केलंस तू देवा ?
देव : अरे काय झालं पण ?
माणूस: सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .
देव: बरं मग ?
माणूस: मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा मिळाली .
देव: मग ?
माणूस : आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण बेकार होतं .
देव : (नुसताच हसला )
माणूस : मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .
देव : बरं मग
माणूस : संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती . मी इतका थकलो होतो की ए . सी . लावून झोपणार होतो . का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?
देव : आता नीट ऐक —- आज तुझा मृत्यूयोग होता . मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला . त्या गडबडीत अलार्म पण थांबला .तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती . ते सँडविच वर निभावलं .तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता .संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .
माणूस : देवा मला क्षमा कर .
देव : क्षमा मागू नकोस . फक्त विश्वास ठेव . माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला
— आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो . मग श्रवणाच्या वेळी डुलक्या का येतात ? – तीन तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही . …
— आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो …..
— देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं
माणूस हा सवडीनुसार वागत असतो …! चहात माशी पडली तर चहा फेकून देतो , पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो .. तूप नाही .. अगदी तसच …आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, पण जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो.
— ‘ माझं ‘ म्हणून नाही ” आपलं ” म्हणून जगता आलं पाहिजे …
— जग खूप ‘ चांगलं ‘ आहे, फक्त चांगलं ” वागता ” आलं पाहिजे …
– सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
— समुद्र आणि वाळवंट कितीही आथांग असले, तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही
… देह सर्वांचा सारखाच।
…… फरक फक्त विचारांचा।
संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈