मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

हल्ली एक बदल अगदी ठळकपणे दिसून येतो. पूर्वी कुठल्याही सणा – समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत. कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गटात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु होत.कुठलेही खेळणे उपलब्ध नसताना मुलांचा धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितावृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही एकमेकांत मानापमान,हेवेदावे, रुसवेफुगवे,वितुष्ट,असूया, धुसफूस, अबोला असायचा,पण तो ठराविक मर्यादेपर्यंत. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह माणसं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती.हे सारे अगदी बळवंतराव, सदुकाका, दामुअण्णा, अनुसूयाकाकू, गंगामावशी, सिंधूआत्या, बंड्या, चिंगी, चंदू यांच्यापासून ते अगदी वसंतराव, विश्वासराव, मालती, उषा, मोहन, किशोर यांच्यापर्यंत व्यवस्थित चालू होतं !

आता मात्र बदल इतका झालाय की लोकांचा एकमेकांशी संवाद जवळजवळ बंदच झाला आहे. हल्ली घरांमध्ये होणारे छोटेखानी समारंभ बंद झाले आहेत. मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात मग लगेचच स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे, कोण कोण आलंय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसं मोबाईलमध्ये व्यस्त होतात. हा ‘ शब्देवीण संवादु ‘ संपला की थोडंसं जुजबी बोलायचे… ‘ अरे आहेस कुठे हल्ली तू ? काय नवीन विशेष? US ला गेला होतास ना तू? ‘ ‘ काय ग किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते, मुलगा काय ICSE ला ना,’ ..  असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी बोलतच नाही. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की ” तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो ” ! बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं ” हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक “!…… हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय आपल्याला ? का आपण हल्ली इतके तुसडेपणाने वागतो ?

मला त्याची कांही कारणे अशी वाटतात. माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे. सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार, अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत. आता एकत्र कुटुंब मोडून विभक्त कुटुंब झाली. माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली. बँकांमधून मिळणारी कर्ज, एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागते. पैसे टाकले की मनुष्यबळ उभे करता येते हा आत्मविश्वास. घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील केटररच्या सेवेपर्यंत सर्व काही उभे करता येते. अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्व काही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतात. ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे तर दुकानात जायची देखील आवश्यकता राहिली नाही.

समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय. मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय. अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की काय झालय आपल्याला ? वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसत असतांना अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग वेगाने वाढतोय. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation ) थांबलंय ! जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात. लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली. आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत….. मग पुन्हा माणूस ‘ एकला चालो रे ‘ कडे वळतो. तुडडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते !

कळतच नाही आपण असे का वागतो?

पहा … तुम्हाला काही उत्तर सुचतंय का ?

काही सुचले तर अवश्य शेअर करा. 

आपल्यातील माणुसकी एकदमच संपायच्या आत आपणच काही करू शकलो तर परत एकदा आनंदी समूह म्हणून रहायला लागू.

लेखक : श्री दिलीप

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – एक सुंदर पंचाक्षरी कविता… – कवि – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – एक सुंदर पंचाक्षरी कविता… – कवि – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

  पाय जपावा

   वळण्याआधी

   तोल जपावा 

   ढळण्याआधी !

  

 अन्न जपावे

   विटण्याआधी

   नाते जपावे

   तुटण्याआधी !

   

शब्द जपावा

   बोलण्याआधी

   अर्थ जपावा

   मांडण्याआधी !

   

रंग जपावे

   उडण्याआधी

   मन जपावे

   मोडण्याआधी !

  

 वार जपावा

   जखमेआधी

   अश्रू जपावे

   हसण्याआधी !

  

 श्वास जपावा

   पळण्याआधी

   वस्त्र जपावे

   मळण्याआधी !

   

द्रव्य जपावे

   सांडण्याआधी

   हात जपावे

   मागण्याआधी !

   

भेद जपावा

   खुलण्याआधी

   राग जपावा

   भांडणाआधी !

  

 मित्र जपावा

   रुसण्याआधी

   मैत्री जपावी 

   तुटण्याआधी !!!

कवी : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलीची आई… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 मुलीची आई… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)  

मुलीची आई असणं किती भाग्याचं!!

आई ग्ग.. चटका लागून जीव कळवळला..

इवलीशी पावलं स्टूल वर चढून बर्नोल घेऊन आली..

आई भाजलं ना तुला..

फुंकर घालत क्रीम लावली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ,आई, थांब ती पिशवी दे माझ्याकडे..

तू पिल्लूला घेतलंय ना..

ओझं होईल तुला..

छोटासा का होईना पण भार हलका करून पळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

पिल्लू रडू नको ना..

आई येते आत्ता… अले अले..

गप बश..गप बश..

माझ्या माघारी ती आई झाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

चप्पल नाही घातलीस आई तू?

राहू दे.. मी जाईन स्कूल बस पर्यंत..

वजनदार दप्तर इवल्या खांद्यांवर चढवून तुरुतुरु गेली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

‘बाबा, आई चा बर्थडे आहे उद्या..

तिला मायक्रोव्हेव हवा आहे..

बुक करून ठेव हां..

आणि साडी आन.. पिकॉक ग्रीन कलरची.. तिला हवी होती कधीची..’ 

आईची आवड तिला कळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ग, लग्नाला जायचंय ना तुला, साड्या प्रेस करून ठेवते आणि उद्या बॅग भरून देते..

शाळेच्या अभ्यासातही आई ची लगबग तिला लक्षात आली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

मामी, आईला ना सतरंजी नाही चालणार, गादी लागते, नाहीतर पाठ धरते तिची..

लेक्चर्स प्रॅक्टिकल, सबमिशनच्या धामधुमीत

आईची गरज तिने ओळखली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दादा, तू फराळाचं सामान न्यायला हवं होतं.. किती आनंदाने केलं होतं तिने..

तेवढ्याचं ओझं झालं तुला. पण आई किती हिरमुसली.

आईची माया तिला उमजली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दुपारच्या निवांत क्षणी टीव्ही पाहताना अलगद डोळा लागला,

 ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये आलेली ती, मला पाहून पाय न वाजवता अंगावर पांघरूण घालून गेली,

शाल नव्हे, लेकीने मायची मायाच पांघरली,

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

लग्न, संसार, मूलबाळ, जबाबदाऱ्या, करिअर, सारं सारं सांभाळून ‘ गोळ्या घेतल्यास का, बरी आहेस का, डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, दगदग करू नकोस, मी किराणा ऑर्डर केलाय..घरी येऊन जाईल, प्रवासाची दमलीयेस स्वयंपाक करू नको.. डबा पाठवतेय दोघांचाही, अजून काय काय अन् काय काय..

लेक होती ती माझी फक्त काही दिवस..त्यानंतर तिच्यात उमटली आईच माझी.. 

मीच नाही, आम्हा दोघांचीही आईच ती..

लोक म्हणतात, देव सोबत राहू शकत नाही म्हणून आई देतो,

आई तर देतोच हो, पण आईला जन्मभर माय मिळावी म्हणून आईची माया लावणारी लेक देतो..

मुलगा हा दिवा असतो वंशाचा पण मुलगी दिवा तर असतेच, सोबतच उन्हातली सावली, पावसातली छत्री, आणि थंडीत शाल असते आईची.. किंबहुना साऱ्या घराची…

हे शब्द तर नेहमीच वाचतो आपण, पण जाणीव तेव्हा होते जेव्हा आपलंच पिल्लू कोषातून बाहेर पडून पंख पसरू बघतं आपल्याला ऊब देण्यासाठी,

परी माझी इवलीशी खरंच कधी मोठी झाली कळलंच नाही……

सर्व आईना व लेकीना समर्पित

लेखक : अनामिक 

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाविषयीचे प्रश्न — लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाविषयीचे प्रश्न — लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

१) देव कुठे आहे?

२) देव काय पाहतो?

३) देव काय करतो?

४) देव केव्हा हसतो?

५) देव केव्हा रडतो?

६) देव काय देतो?

७) देव काय खातो?

१) देव कुठे आहे? – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.

तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ||

– नामदेव…

विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला ||

– ज्ञानदेव…

२) देव काय पाहतो? – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.

‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ |

– श्रीशंकराचार्य…

त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो.

३) देव काय करतो? – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन.

घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो ||१||

भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी ||

– तुकाराम…

तुका म्हणे आले समर्थाच्या मना | तरी होय राणा रंक त्याचा ||

– तुकाराम…

४) देव केव्हा हसतो? – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, “या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे.” जीव म्हणतो, “सोहं, तू आणि मी समान.” पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं (क्यां)! मी कोण आहे?” देव तेव्हा हसतो. आणि देवास फसविणाऱ्या जीवाच्या मागे अहं लावून देतो. अहंमुळे जीव दु:ख भोगतो.

५) देव केव्हा रडतो? – भक्ताची दीन दशा पाहून. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णास भेटण्यास आले. त्यांनी सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेले. हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत. 

देव दयाळ दयाळ | करी तुकयाचा सांभाळ ||

– तुकाराम…

६) देव काय देतो? – देव सर्वांना सर्व देतो. देह देतो, इंद्रिय देतो, प्रेम, क्षमा शांती आणि शक्ति देतो.

देवे दिला देह भजना गोमटा | तया झाला फाटा बाधीकेचा ||

– तुकाराम…

दिली इंद्रिये हात पाय कान | डोळे मुख बोलाया वचन |

जेणे तू जोडसी नारायण | नाशे जीवपण भवरोग ||

– तुकाराम…

प्रेम देवाचे हे देणे | देहभाव जाय जेणे ||

– तुकाराम…

देव सर्वांना उचित तेच सर्व देतो. कारण हे सर्व देवाचेच आहे.

७) देव काय खातो? – देव प्रथम भक्ताचे दोष खातो.

माझ्या मीपणाचा करोनि फराळ | उरले खावयासी बैसला सकळ |

ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ | यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ ||

– निळोबा…

यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म-मरणपण खाऊन टाकतो. हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कण्या खातो.

“सप्त द्विप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार |

एक बार शबरीके घर, एक बार विदुरके घर स्वाद लिया दो बार ||”

भक्ताने सद्भावपूर्ण अर्पण केलेले पत्र, पुष्प, फळ, पाणी प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेला नमस्कारसुद्धा  आनंदाने ग्रहण करतो… अगदी भृगू ॠषिंनी मारलेल्या लाथेच्या पदचिन्हालाही श्रीवत्स चिन्ह म्हणून छातीवर ग्रहण केले!

देवाबद्दल अनंत प्रश्न आणि शंका आपल्याला असतात पण त्याचं असणं मान्य नसतं. साक्षीभावाने तो सर्वांबरोबर सर्वकाळ असतोच फक्त त्याच्या कुठल्याही स्वरुपाचे श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने स्मरण केले की तो आपल्या जीवनात कार्यशील होतो.

॥श्रीगुरुदेवदत्त॥

जय जय श्री स्वामी समर्थ

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘स्त्रियांच्या सुंदरछटा…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘स्त्रियांच्या सुंदरछटा…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो.

तिथे एकाच ठिकाणी

” दूध, दही, ताक, लोणी, तूप”

बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!

पाहूया कसे ते..?

“दूध”

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:.. कुमारिका .

दूध म्हणजे माहेर .

दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .

शुभ्र,

सकस,

निर्भेळ,

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.

त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.

“दही”

कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं की कुमारिकेची वधू  होते .

दुधाचं  नाव बदलून दही होतं !

दही म्हणजे त्याच अवस्थेत  थिजून घट्ट होणं !

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते.

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. ” कितीही मारहाण करणारा, व्यसनी, व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी ” स्त्री त्याच्याप्रती  एवढी निष्ठा का दाखवते ?

नवरा हा “पती परमेश्वर” म्हणून ? नव्हे तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.

“ताक”

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात, त्यांची आता सून होते, म्हणजे “ताक” होतं.

“दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी.”

‘बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती) किंवा  खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती)’

ताक दोघांनाही शांत करतं.. यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.

“ताक” म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच !

‘दूध’ पाणी घालून बेचव होतं पण ‘ताक’ मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं .

“लोणी”

अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा, मऊ .. रेशमी ..  मुलायम .. नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो .

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण  कण  ‘लोणी’ होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात  लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही.

तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.

‘ताकाला’ पुन्हा ‘दूध’ व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?

“तूप”

‘लोणी’ ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.

ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,

नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं “साजूक तूप होतं”

वरणभात असो

शिरा असो

किंवा

बेसन लाडू असो

घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात  बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे ‘तूप’ संपून जातं. हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.

“दूध ते तूप”

हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास.

“स्री आहे तर श्री आहे हे म्हणणं वावगं ठरूं नये.”

“असा हा स्रीचा संपूर्ण प्रवास …. न थांबणारा, सतत धावणारा, न कावणारा, न घाबरणारा, कुटूंबासाठी झिजणारा, कुटूंबाची काळजी घेणारा”

… ह्या प्रवासास तथा ” स्त्री ” जातीस मानाचा मुजरा.ll.

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा,

चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे,

चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे,  दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे,

चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे, 

चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत,मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे,

चोरामुळे पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काठ्या, पिस्तुल आणि बंदुका आहेत, त्यात गोळ्या आहेत,

चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत,

चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत.

मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू  तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नविन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो,

त्यामुळे सर्वांनी चोराचा पण आदर करावा …..

चोर आणि दारू अर्थ व्यवस्थेचा कणा आहेत !

कवी : अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सहावे सुख… — लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सहावे सुख… — लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

चिनी लोकांत एक प्रथा आहे. ते परस्परांचे अभिष्टचिंतन करतात त्यावेळी ” तुला सर्व सहा सुखे मिळोत ” असा आशीर्वाद देतात. पाच सुखे म्हणजे – आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार व चांगली मुलं.

सहावे सुख म्हणजेच ज्याचे त्याला कळावे असे सुख. ते त्याचे त्यानेच आयुष्यात शोधून काढायला हवे. ते सहावे सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभिष्टचिंतन करणारा म्हणत असतो.

आपल्याकडे तर ज्ञानेश्वरमाऊलींनी सांगितले आहेच  “जो जे वांछील तो ते l लाहो प्राणिजात “

प्रत्येकाचं हे सहावे सुख निराळे असेल.

 समाजात प्रत्येकाचे राहणीमान वेगळे, आर्थिक स्तर वेगळे, गरजा वेगळ्या. ह्या सगळ्याचा विचार केल्यावर वाटलं त्याचं त्याचं सहावे सुख वेगळे.

आजच्या टप्प्यावर ज्या गोष्टी मला व्हायला हव्या आहेत त्या त्या माझं सहावे सुख असू शकतात.

पण त्या सहाव्या सुखामागे पळायला मला आवडणार नाही. जे आहे, जे मिळतंय ते माझं सहावं सुख आहे.

छान कार्यक्रम बघायला मिळावेत, ट्रिपला जायला मिळावं, आरोग्यपूर्ण असावं – निदान तब्येतीची तक्रार नसावी. चांगलं चांगलं लिहायला सुचावं. ही माझी सहावी सुखं आहेत. तसं तर यादी करू तितकी कमी वा जास्त होईल.

आत्तापर्यंत राहिलेल्या गोष्टी करायला मिळाल्या तर ते ही सहावं सुख असेल. ह्या लेखाच्या शेवटाकडे येताना शांताबाई ते सुख कसे सापडेल हे सांगतात. त्या म्हणतात, त्याचा शोध आपोआपच लागतो.

खरं आहे ते. सुखाच्या खूप मागे लागण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीच्या मागोमाग जाण्यातच खरं सुख आहे. त्या वाटेवर चालताना आनंदाचं झाडं मिळेल, खळाळणारा झरा लागेल, कधी ऊन कधी सावलीचा लपंडाव असेल, गाणारी वाट असेल…. स्वतःची चित्तवृत्ती समाधानी ठेवणं हे सहावं सुख सगळ्यांना लाभावं.

लेखिका : शांता शेळके

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “काळ जुना होता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “काळ जुना होता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

काळ जुना होता.

अंग झाकायला कपडे नव्हते,

तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे. आज कपड्यांचे भंडार आहेत. तरीही जास्तीत जास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरू आहेत.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

रहदारीची साधने कमी होती. तरीही कुटुंबातील लोक भेटत असत.

आज रहदारीची साधने भरपूर आहेत.पण प्रत्येक जण  लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती. आजची मुलगी ही शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

लोकं गावातील वडीलधार्‍यांची

चौकशी करायचे. आज पालकांनाच

वृद्धाश्रमात ठेवले जाते.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

खेळण्यांचा तुटवडा होता. तरी शेजारची मुलं एकत्र खेळायची .

आज खूप खेळणी आहेत, मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

रस्त्यावरील प्राण्यांनासुध्दा भाकरी दिली जायची. आज शेजारची मुलंही भुकेली झोपी जातात.

समाज सुसंस्कृत झाला आहे

 

काळ जुना होता.

शेजारच्या व आपल्या घरी नातेवाईक भरलेले असायचे, आता परिचय विचारला तर आज मला शेजाऱ्याचे नावही माहीत नाही.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भांडणशास्त्र…” – लेखक :श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “भांडणशास्त्र…” – लेखक :श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त फुकट गेलेला वेळ कोणता? तर निरर्थक, हेतुशून्य, आणि फक्त ‘मी’ ( ! ) जपण्यासाठी भांडणात घालवलेला.

हो. हेसुद्धा शास्त्र आहे,प्रशिक्षण आहे. जगाच्या शाळेत आपण ते शिकतो.एक भांडण आपलं नियतीशीसुद्धा सुरूच असतं, आतल्या आत.पद्धत चुकली की आपण चुकतो आणि जीवनाची रहस्ये कायम गूढच रहातात. उत्तरं न मिळता नियतीशी झगडण्यातच सगळं आयुष्य निघून जातं.

संतपदाला पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. सॉक्रेटीसच्या बायकोने एकदा चिडून त्याच्यावर पाणी फेकलं. यावर तो म्हणाला,

“जरा जास्त तरी फेकायचेस. अंघोळीचं काम झालं असतं.”

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा वाद सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचं ‘स्मृतीचित्रे’  वाचलं तर लक्षात येईल की तापट व्यक्तीसोबत भांडण टाळणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे,कौशल्य आहे.हे शिकून झालं, असं कधीच नसतं. आपण आयुष्यभर शिकतच असतो.

भांडण करताना काही नियम पाळले, तर आपलं जगणं सोपं होऊ शकेल.मनाला हे नियम पाळण्याची सक्ती करा.कुठेतरी लिहून ठेवा पण काहीही करून या नियमांना अनुसरूनच भांडण करायचे, हे आधी पक्कं करा.

सर्वात पहिला नियम म्हणजे मूळ मुद्दा,विषय सोडायचा नाही.आज, आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं. भूतकाळ, भविष्यकाळ नकोच, विधाने करायची नाहीत. म्हणजे ‘तू नेहमी …, तू … ने सुरु होणारी वाक्ये टाळायची.नातेवाईक, मित्रमंडळी यांचे उल्लेख वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल तरच करायचा.आपण भांडण करताना सुंदर दिसत नाही, हा विचार केला तरी संयम येईल.

प्रश्न सुटला पाहिजे हा हेतू हवा आणि भविष्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तो सुटला पाहिजे ही तळमळ हवी.सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका विषयावर एकदाच भांडायचं. पुन्हा कधीच नाही,वेळ आणि शक्ती वाया जाऊ द्यायची नाही हे मनात पक्के हवं.

आपल्या सगळ्या संस्कारांचा, वाचनाचा, शिक्षणाचा कस लागतो तो याच परीक्षेत.त्यामुळे हे शिकलंच पाहिजे.यशस्वी व्यक्ती,आपले आदर्श हे टीकेला किंवा नकारात्मक वर्तणुकीला कसा प्रतिसाद देतात, याचं खरंच सूक्ष्म निरीक्षण करायला हवं. यासाठी चरित्रे,आत्मचरित्रे वाचता येतील.

आपल्या नकळत आपण अनुकरण करत असतो आपल्या आई वडिलांचे, मोठ्यांचे, समाजाचे.सतत जिंकणारे,शब्दात पकडणारे काही  हुन्नरी कलाकार या क्षेत्रात पहायला मिळतात.यांची स्मरणशक्ती दांडगी असते. शब्दांचे अचूक अर्थ यांना माहीत असतात.नवखे तर गोंधळून जातात यांच्या समोर.हे मात्र जिंकूनसुद्धा आतल्या आत हरलेले असतात. कारण कधीकधी जिंकण्यापेक्षा जे गमावलेले असते तेच मौल्यवान सिद्ध होते.

एकदा एका नवरा बायकोचं भांडण झाले.दोघांनी दोन कागद घेतले आणि एकमेकांचे दोष लिहायचे ठरवले. लिहून झाल्यावर बायकोने दोषांचा कागद वाचून दाखवला.आणि नव-याने तिच्या हातात कागद दिला त्यावर फक्त लिहिलं होतं,

… But I like you.

कधी कधी ‘हारके जितनेवाले बाजीगर’ असतात ते असे.

जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम,

फिर नहीं आते … हेच खरं !

असं म्हणतात की एखादा माणूस गेल्यावर आपण कधी कधी रडतो. ते तो गेला म्हणून नाही तर तो जिवंत असताना आपण त्याच्याशी किती वाईट वागलो, ते आठवून! अशी वेळ येऊच नये यासाठी हा अट्टाहास.

लेखक :श्री. विकास शहा

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आनंद…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आनंद…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

काहीच पुरेसं नसूनही

हसतखेळत आनंदात राहणारे बघितले आहेत.

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायासे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सर मुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक, उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे.

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमध्ये  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.

हे नको खायला- असं होईल, ते नको प्यायला- तसं होईल ह्या टेंशन मधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत  बिनधास्त खाऊनही काही नाही होत यार म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं. पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात, आता त्याला कोण काय करणार. प्रत्येकाला कधी, कुठे, कशात आनंद, सुख, समाधान मिळेल ते सांगता नाही येत. पण त्यांना ज्यात आनंद मिळेल ते त्याने करावे. कोणाला निसर्गात फिरण्यात आनंद मिळतो, तर कोणाला फक्त डोंगर दऱ्या चढण्यात आनंद मिळतो, कोणाला फक्त घरात लोळत राहण्यात तर कोणी कायम हसत खेळत मजेत राहण्यात आनंद मानतात.

आनंदी असण्याचे प्रत्येकाचे मोजमाप वेगवेगळे आहे.

कोणी वस्तू खरेदी करून आनंदी होतं. कोणी भटकंती करून आनंद मिळवतं . कोणाला नवनवीन पदार्थ करण्यात आनंद मिळतो तर कोणाला खाऊ घालण्यात आनंद वाटतो.

जितक्या व्यक्ती तितक्या प्रत्येकाच्या तऱ्हा असतात.

या सगळ्या आनंद व्यक्त करण्याच्या वाटा झाल्या.

मी आनंदी आहे. कसल्याही प्रकारच्या त्रासाशिवाय निरोगी आयुष्य जगतेय म्हणून. आई बाबा प्रत्येक निर्णयात सोबत असतात म्हणून. जीव लावणारी भावंडं आहेत म्हणून. ते प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करतात म्हणून. थोडाही चेहरा उतरला तर “तू ठीक तर आहेस ना” विचारणारी मित्र आहेत म्हणून. आणखी काय हवं?

अडचणी कुणाच्या आयुष्यात नसतात? आणि सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टी मला तरी नकोत! सतत आनंद वा मनाला समाधान देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या कधी लक्षात सुद्धा आलेल्या नसतात, त्यांची किंमत अशावेळीच तर कळते.

एक निरोगी शरीर, जे लढण्यासाठी समर्थ असेल. बास्स. जास्त काहीच नको. माझ्यासाठी तोच आनंद आणि तेच समाधान!

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares