मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुक्ती…” – लेखिका : सुश्री स्वाती नितीन ठोंबरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मुक्ती…” – लेखिका : सुश्री स्वाती नितीन ठोंबरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

योगिनी सकाळी लवकरच उठली. आज वर्षश्राध्द होतं ना तिचं…! चोच घासली, पंख फडफडवले आणि आकाशातून खाली झेपावली घराकडे जाण्यासाठी…

वर्षभरापुर्वी याच घरातून निरोप घेतला होता तिनं सगळ्यांचा. तसा कारभार लवकरच आटपला होता तिचा. क्षुल्लक आजाराचं निमित्त झालं. मग एकात एक दुखणी. वर्ष-दीड वर्ष अंथरुणात… आणि एक दिवस सकाळी खेळ संपला! 

अगदी भरल्या संसारातून उठावं तसं झालं. मोठी २० वर्षांची आणि धाकटी १७ वर्षांची. म्हटलं तर दोघी सज्ञानच… पण आई म्हणून योगिनीचा जीव तुटायचा.

मोठी जगन्मित्र… सतत मित्र-मैत्रिणींचा गराडा. बहुधा घराबाहेरच बराचसा वेळ. अभ्यासात तशी हुशार… पण फारसं लक्ष नसायचं तिचं अभ्यास करण्यात. ‘hi mom… bye mom…’ केलं की पायात सॅन्डल्स सरकावून स्कूटीला कीक मारून पोरगी पसार!

कधी घरात सापडलीच, तर चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याची पण सोय नाही… ‘मॉम्, प्लिज लेक्चर नको!’ मित्रपरिवार चांगला असला तिचा, तरी या वयात नको ती आकर्षणं काय कमी असतात का? मग योगिनी चिंता करत बसायची.

धाकटीचं तंत्र वेगळंच… ती अगदीच घुमी होती. सगळ्यात अलिप्त. तिला ना कधी आनंद व्यक्त करताना बघितलं, ना कधी दु:ख… तिच्या मनात काय चालू आहे, याचा थांगपत्ताही ती कधी लागू द्यायची नाही.

कधी कधी योगिनीला वाटायचं, ही आपलीच मुलगी का…? कसलाच संवाद नाही तिच्याशी! योगिनीच्या नवऱ्याच्या वळणावर गेली होती बहुधा… कारण तोही असाच अलिप्त, कोरडा. ऑफिसात पाटी टाकून घरी आला की, बराचसा वेळ टिव्ही बघण्यात, सोफ्यावर लोळण्यात जायचा त्याचा.

डोंबिवली–चर्चगेट प्रवास करून, दमून भागून योगिनी संध्याकाळी घरात यायची, तरी हा सोफ्यावरच…! तिच्या येण्याची दखलसुद्धा नाही. योगिनी होती म्हणून चार माणसं जोडून होती. नातेवाईकांचं येणं-जाणं, रीतीप्रमाणं देणं-घेणं, कार्याला हजेरी, कुणाचं हळदीकुंकू, डोहाळजेवण, बारसे, मुंज, लग्न… सगळे हिनंच बघायचं.

योगिनी आता घराकडे झेपावली… मुलींना डोळे भरून बघायला आतुर झाली होती ती. जरा कानोसा घेतला किचनच्या खिडकीत बसून, पण काही हालचाल दिसेना.

‘काव… काव…’ करत, पंख सावरत, कठड्यावरून चालत योगिनी हॉलच्या खिडकीपाशी आली. फोटो दिसला तिचा भिंतीवर… हार घातलेला.

नवरा आणि धाकटी एकमेकांना चिकटून बसले होते सोफ्यावर… ‘अंगानं भरली ही…’ धाकटीकडे बघत योगिनी स्वतःशीच पुटपुटली. घर तसं टापटीप दिसत होतं. ती जाताना जसं होतं तसंच… तिनं लावलेल्या तुळशीनं पण चांगलाच जोम धरला होता.

खिडकीबाहेर कपडे वाळत घातले होते. अगदी एका रेषेत… सुरकुतीसुद्धा नाही! योगीनीला जरा नवलच वाटलं. इतका टापटीपपणा ना कधी नवऱ्यानं दाखवला, ना कधी मुलींनी…! श्राद्धाची मात्र काही तयारी दिसेना. योगिनी हिरमुसली.

जरासंच पुढं माहेर होतं तिचं… आई थकली असेल, वाट बघत असेल… योगिनी माहेरच्या कठड्यावर विसावली. तिची आवडती जागा होती ती. तिथं बुचाचं गच्च भरलेलं झाड होतं. त्याच्या फुलांचा वास योगिनीला फार आवडायचा.

आईची चाहूल कुणी न सांगताच कळली तिला… हातात ताट घेवून थबकत आई कठड्यापाशी आली. नजरेनंच खूण पटली…

“घे बाई, भरपेट खा… तुझ्या आवडीचे भाजणीचे वडे केलेयत. केळ्याची कोशिंबीर आणि साय-भात… तुला आवडतो तस्साच. मुली एका वर्षात मोठ्या झाल्यात. मोठी धाकटीची अगदी आईच्या मायेनं काळजी घेते. मुलींची आत्या आणि काकू तर एक दिवसाआड एक फेरी मारतातच तुझ्या घरी… मुलींचे सगळे लाड अगदी प्रेमानं होतायत… आणि जावईबापूसुद्धा जातीनं कुकर लावतात. अगदी बेसिक, पण थोडा स्वयंपाकही करतात…

“श्राद्धाची तयारी घरी दिसली नाही म्हणून नाराज होऊ नकोस. तुझी मोठी… तुला आवडणारा शिरा घेऊन सकाळीच गेलीये अनाथाश्रमात मुलांना वाटायला… धाकटीनं तुला आवडणारं बटमोगर्‍याचं रोप लावलंय आज अंगणात…

“घडी नाही विस्कटली तुझ्या संसाराची… तू होतीस म्हणून सगळे लाडावलेले होते. मात्र घराला जे वळण लावून तू निघून गेलीस, त्या वळणानं हळूहळू का होईना नीटनेटका प्रवास चाललाय त्यांचा… 

“आता गुंत्यातून मोकळी हो… तू बावीस वर्षं सिंचलेलं संस्काराचं रोपटं छान फोफावलंय… आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेऊन भक्कमपणे उभं आहे, हे बघ आज… आणि निश्चिंतपणे मुक्त हो!”

लेखिका : स्वाती नितीन ठोंबरे

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवीची ओटी… लेखिका – सुश्री संजना इंगळे ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 देवीची ओटी… लेखिका – सुश्री संजना इंगळे ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

“मध्ये कुठेही थांबू नकोस, 10 च्या बसने तडक गावच्या लक्ष्मी मंदिरात ये… “

“हो सासूबाई.. “

“आणि काय काय घ्यायचं लक्षात आहे ना. ?”

“हो पण.. परत एकदा सांगता का, चेक करून घेते.. “

“किती गं वेंधळी तू, देवीची ओटी कधी भरली नाहीये का?? बरं एक काम कर, तुपाचा दिवा लागेल… तूप घे एका डबीत.. देवीसाठी एखादी साडी घे, बांगड्या आणि नारळ.. थोडीशी फुलं… आलं का लक्षात??”

“हो हो सासूबाई.. “

नीरा आज ऑफिस ला उशिरा जाणार होती, महत्वाची मिटिंग होती त्यात नीरा चे sugestions वापरण्यात येणार होते… पण सासूबाईंचा हट्ट…

नीरा आणि सूरज नोकरीनिमित्त फ्लॅट मध्ये रहात होते… सासर 30 किमी वर होतं… देवीची ओटी भरायची म्हणून सासूबाई गावच्या मंदिरात जाणार होत्या, सूनबाईनेही ओटी भरावी म्हणून त्यांनी तगादा लावला.. नीरा ने सासूबाईंच्या शब्दाचा मान ठेऊन त्यांना प्राधान्य दिलं आणि तयारीनिशी ती निघाली.. धावपळ बरीच झालेली तिची…

अखेर ती बस पकडून मंदिरात पोचली, सासूबाई तिचीच वाट बघत होत्या..

“हे काय?? ड्रेस वर आलीस?? साडी तरी घालायची… “

“अहो आई इथून सरळ ऑफिस ला जायचं म्हणून.. “

“काय बाई आजकालच्या मुलींना देवाधर्माचं काही कळत नाही.. बरं चल ओटी भरून घेऊ.. “

दोघीजणी आत गेल्या… तिथे एक वृद्ध पुजारी होते… देवीसमोर ओटी ठेवली की ते घेत असत.. आणि आत गाभाऱ्यात देवीला ठेवत..

त्यांना पाहून नीरा हसली, त्यांनीही प्रतिसाद दिला..

“तुम्ही ओळखता काय एकमेकांना??”

“हो… आम्ही.. “

“ते जाऊदे, गुरुजी ओटी भरून घ्या देवीला.. “

सासूबाई तिला तोडत म्हणाल्या… सासूबाईंनी साग्रसंगीत एकेक वस्तू परंपरे प्रमाणे देवीला वाहिली… नीरा गोंधळून गेली… तिला काही समजेना नक्की काय करायचं..

“आधी हळद कुंकू वाहा… अगं हे बोट नाही, त्या बोटाने.. आता अक्षता.. आता साडी ठेव, त्यावर पाच मुठा तांदूळ… एक मूठ परत घे… नारळ दे… “

नीरा सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे सर्व करत होती.. सासूबाई मधेच ओरडल्या..

“अगं ही कुठली साडी?”

“मी दिवाळीत काही साड्या घेतलेल्या, ही काही वापरत नाही मी.. “

“अगं एक दीड हजार ची साडी आहे ती… देवीला साधी 100 रुपयाची साडी द्यायची असते.. अरे देवा.. दिवाळी काढणार ही मुलगी… आणि हे तुप कुठलं?”

“घरी कढवलेलं… “

“अगं दिव्यासाठी बाजारातून स्वस्तातलं तूप आणायचं… आणि ह्या बांगड्या??”

“माझ्याच… नवीन घेतलेल्या, पण वापरल्या नाहीत.. “

सासूबाई डोक्याला हात लावतात… देवीला हात जोडतात, “देवी माते… सुनबाई अजून नादान आहे, तिची चुकी माफ कर, आणि ओटीचा स्वीकार करून आम्हाला पाव बाई.. “

गुरुजी सगळं बघत असतात, हे सगळं बघून म्हणतात..

“देवी तुम्हाला नाही पण तुमच्या सूनबाईला पावेल हो.. “

“काय?”

“होय… तुम्ही पूजा करताना स्वस्त, टाकून दिलेल्या, आपल्याला उपयोगात नसलेल्या वस्तू देवाला वाहतात, पण तुमच्या सुनेने घरी काढवलेल्या तुपाचा दिवा लावला, तिचीच एक साडी देवीला दिली, स्वतःच्याच बांगड्या देवीला दिल्या… देवीला तुम्ही जे अर्पण करता त्याच्यामागचा भाव हवा असतो.. तुमचा मोह तूप, साडी, बांगड्यांत आहे… पण तुमच्या सुनेने कसलाही मोह न धरता स्वतःच्याच वापरातील एक भाग काढून देवीला दिला… हेच महत्वाचं असत… एखादा लहान मुलगा आपला आवडता खाऊ खात असताना एक घास हळूच आईला भरवतो तेव्हा आईला किती कौतुक वाटतं, तेव्हा उष्टा घास भरवला म्हणून आई रागवत नाही… तसंच आहे हे… आणि देवीला मिळालेल्या चांगल्या वस्तू मी अनाथाश्रम मध्ये देऊन येतो, तुमच्या सुनेशी तिथेच भेट झालेली, ती दर महिन्याला तिथे देणगी देऊन येते… “

सासूबाईंना खूप वाईट वाटलं, देवाधर्माचं करत नाही म्हणून आपण सूनबाईला किती बोललो, पण खऱ्या अर्थाने तीच खरी भक्ती करतेय.. आपण फक्त स्वार्थीपणाने मोहात अडकून यांत्रिक पूजा करतोय याची त्यांना जाणीव झाली.

लेखिका : संजना सरोजकुमार इंगळे

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  पितृअष्टक… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ पितृअष्टक – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला

पुढे वारसा हा सदा वाढविला 

अशा नम्र स्मरतो त्या पितरांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||

*

इथे मान सन्मान सारा मिळाला 

पुढे मार्ग तो सदा दाखविला

कृपा हीच सारी केली तयांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||

*

मिळो सद् गती मज पितरांना

विनती हीच माझी त्रिदेवतांना

कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना 

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||

*

जोडून कर हे विनती तयांना

अग्नि वरूण वायु आदी देवतांना 

सदा साह्य देवोनी उद्धरी पितरांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||

*

वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना

सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना 

मुक्तीमार्ग द्यावा उद्धरून त्यांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||

*

करूनी सिध्दता भोजनाची तयांना

पक्वान्ने आवडीनें बनवून नाना

सदा तृप्ती होवो जोडी करांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||

*

मनोभावे पुजूनी तिला, यवाने

विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने 

आशिष द्याहो आम्हा सकलांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||

*

सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा 

न्यून काही राहाता माफी करा ना 

गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना 

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ ||

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निर्व्याज भक्ती …. लेखक – अज्ञात ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ निर्व्याज भक्ती …. लेखक – अज्ञात ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

एकदा एक तरुण मुलगी एका संत महात्म्याकडे गेली आणि त्यांना आर्जवानं विनंती करत म्हणाली, “माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काहीही हालचाल तर करता येत नाहीच, परंतु ते रुग्णशय्येला खिळून आहेत. तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटाल का?”

“का नाही… ? नक्कीच येईन मी… ” करुणासागर असलेले संत उद्गारले.

त्या घरी भेट दिली असता, त्या संतांना असं दिसलं की रुग्णशय्येला खिळून असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगाशेजारी एक रिकामी खुर्चीही ठेवलेली आहे.

“तुम्ही कदाचित् मी येण्याचीच वाट पहात होता असं दिसतंय?” त्या खुर्चीकडे पहात संत म्हणाले.

“नाही… नाही… तसं नाहीये. ” वृद्ध व्यक्ती उद्गारली.

त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, “हे महाराज! कृपया खोलीचं दार लावून घ्याल का?”

संतांनी दार बंद केल्यावर, वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलू लागली, “खरं सांगायचं तर, या क्षणापर्यंत, मी या रिकाम्या खुर्चीचं रहस्य कोणापुढेही उघड केलेलं नाही… अगदी माझ्या लाडक्या मुलीलाही ते ठाऊक नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो, संपूर्ण आयुष्यभर, प्रार्थना कशी करतात ते मला कधीच समजलं नाही. नित्यनियमानं देवळात जाण्याचा परिपाठ कटाक्षानं पाळूनही मला प्रार्थनेचा खरा अर्थ कधी समजला नाही.

परंतु चारएक वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला असता, त्यानं मला सांगितलं की मी माझी प्रार्थना थेट परमेश्वरालाच सांगू शकतो. त्या मित्रानं मला सांगितलं की आपल्यासमोर एक रिकामी खुर्ची ठेवायची आणि तिथे प्रत्यक्ष परमेश्वरच स्थानापन्न झालेला आहे असं समजून समोर कोणी असताना आपण जसं त्या व्यक्तीशी संवाद साधतो ना तसाच संवाद खुर्चीत बसलेल्या परमेश्वराशी साधायचा. परमेश्वर आपली प्रत्येक प्रार्थना अगदी काळजीपूर्वकपणे ऐकत असतो. माझ्या मित्राचा हा सल्ला मी जसा जसा न चुकता पाळू लागलो तसा तसा तो मला अधिकच आवडू लागला. “

“त्यानंतर आता रोज दोन तास मी परमेश्वराशी गप्पा मारत असतो. मात्र, माझा हा संवाद माझ्या लेकीच्या दृष्टीला पडू नये याची मी दक्षताही घेत असतो, कारण जर एका रिकाम्या खुर्चीकडे पाहून मी गप्पा मारतोय असं तिनं पाहिलं तर तिचा गैरसमज होईल की आजारामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. ”

त्या वृद्ध व्यक्तीचे हे शब्द ऐकून संतमहात्मा हेलावून गेले. प्रेम आणि भावनांचं मिश्रण असणारे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आपल्या आश्रमात परतण्यापूर्वी संतांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, “तुम्ही सर्वोच्च पातळीची भक्ती करत आहात. तुमच्या या साध्याभोळ्या भक्तीमधे खंड पडू देऊ नका. ”

पाच दिवसांनी, त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी संतांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेली आणि वंदन करुन तिने त्यांना सांगितलं, “त्या दिवशी तुमच्याशी भेट झाल्यानं माझ्या बाबांना अत्यानंद झाला… पण काल सकाळी ते देवाघरी गेले.

त्या दिवशी मी कामासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला हाक मारली आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. यापूर्वी कधीही न दिसलेल्या एक प्रकारच्या आत्मिक आनंदानं आणि शांततेनं त्यांचा चेहरा न्हाऊन गेला होता. परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. संध्याकाळी मी जेंव्हा घरी परतले, तेंव्हा एका अद्भुत दृश्यानं मी थक्क झाले – गेले काही महिने ज्यांना मदतीशिवाय स्वतःला कोणतीही हालचाल करता येत नव्हती, ते माझे बाबा पलंगात उठून बसलेले होते, परंतु त्यांचं मस्तक मात्र त्यांच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या खुर्चीवर होतं… जणूकाही त्यांनी कोणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवलंय. नेहमीप्रमाणे खुर्ची रिकामीच होती. जगाचा निरोप घेताना बाबांनी खुर्चीवर डोकं का बरं ठेवलेलं होतं याचं कृपया उत्तर मला द्याल का?”

त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्युची वार्ता ऐकून संतमहात्मा ढसाढसा रडू लागले आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून ते कळवळून परमेश्वराची प्रार्थना करु लागले, “हे प्रभू! जेंव्हा या जगाचा निरोप घेण्याचा माझा क्षण येईल ना तेंव्हा मीदेखील या मुलीच्या बाबांसारखाच निरोप घ्यावा एवढी कृपा माझ्यावर करा. ”

प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेऊन जगाचा निरोप घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणी ‘तो’ सर्वत्र आहे हा विश्वास आधी निर्माण करता यायला हवा. असं ज्याला जमलं त्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं अशक्य नाहीच आणि मानवीजन्माची हीच तर इतिकर्तव्यता आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सपने… – लेखक – श्री रवीन्द्र भूरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

सपने… – लेखक – श्री रवीन्द्र भूरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

पार्ल्याची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला निघाली. मुलीच्या आग्रहाखातर मालाडला पॉश कॉम्लेक्समध्ये भाड्याने जागा घेतली. 36 मजल्याचे तीन टॉवर. नवीनच होती. त्यामुळे कमी लोक शिफ्ट झाली होती.

 

सकाळी फिरून येताना एक मुलगा गाडी पुसत होता. सुरेश …. बहुतेक यूपीचा असावा. त्याला म्हटले “ माझी गाडी पुसशील का ?” तो हो म्हणाला.

“पैसे किती घेशील ?”

तो …”. तुम्ही द्याल ते.” … अश्या वेळेस आपण नेहमी जास्तच देतो.

 

आता खूप लोक शिफ्ट होऊ लागली. गाड्याही वाढल्या. गाडी पुसणारी खूप मुले दिसू लागली.

सुरेशला म्हणालो… “ तुला कॉम्पिटिशन वाढली. ”

तो म्हणाला “ नाही, ही मुले मीच आणली, मीच कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ह्यांना पगार देतो. ”

 

त्या भागात कबुतरे जास्त होती. एक दिवस एक कबुतर गॅलरीत मरून पडले. काय करावे कळेना. शेवटी सुरेशला बोलावले. त्याने ते उचलून नेले. दुसऱ्या दिवशी तो जाळी लावणाऱ्या माणसाला घेऊन आला. जाळी लावून घेतली

 

US ला जाताना वरून बॅग्स काढणे, आल्यावर परत वर ठेवणे … सर्व सुरेश करत होता. पंखे पुसणे, काचा पुसणे ही कामे त्याचीच झाली. मला फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरु झाला. ड्रायविंग जमेना. एक दिवस सुरेशला म्हणालो.. “ ड्राइवर शोध “.. त्याने खिशातून काढून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले, मग तो वेळ असेल तेव्हा माझा ड्राइवर झाला. सकाळी एका माणसाला घेऊन आला…

“साहेब… हा चांगला मसाज करतो. आपल्या बिल्डिंग मध्ये बऱ्याच जणांकडे करतो, चांगला आहे.” 

 

एक दिवस फिरून येताना गेटसमोर भाजीची गाडी दिसली. घरी आलो तर घरात भाजीची पिशवी.

बायको म्हणाली सुरेशने आणून दिली. त्याच्या भावानेच ती गाडी लावली आहे.

 

पार्ल्याची जागा तयार झाली. सुरेशला म्हटले “ घर साफ करायला चल “… गाडी तोच चालवत होता.

मी …” सुरेश काय नवीन ?”

सुरेश …”.. चायनीज फूडची गाडी टाकतोय … रात्री 11 ते 2 म्युनिसिपालिटी, पोलीस सर्वांची सोय केली आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये एक पोलिटिकल लीडर राहतो.. त्याने मदत केलीये. साहेब एक सांगू..

ये बम्बई शहरमे कुछ सपने लेके आया हुं, वो पुरे करकेही रहुंगा…. माझे प्रिंसिपल एकच… कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही … “ 

 

मध्ये 1 -2 वर्ष गेली. मुलगी US हुन येणार होती. बायको म्हणाली घर साफ करून घ्या. चांगल्या प्रोफेशनल लोकांकडून. मग गूगल सर्च करून एका प्रोफेशनल क्लीनर्सला फोन केला. काम आणि रेट ठरला. दुसऱ्या दिवशी बेल वाजली. दोन मुले मस्त युनिफॉर्म मध्ये आली. मला धक्काच बसला …. त्यातला एक सुरेश होता.

सुरेश…” साहेब ही माझीच कंपनी. मीच फॉर्म केली आहे. काम वाटताना तुमचा पत्ता बघितला म्हणून मी स्वतः च आलो. कामाची सवय मोडायची नाही …” 

मला त्याचे शब्द आठवले …. “ सपने पूरे करकेही रहूँगा…. ” 

 

मला त्याचे स्वप्न पुरे होताना दिसू लागले….

नाहीतर आम्ही मुंबईकर… भूमिपुत्र… आमची स्वप्नं तरी काय … 

  1. ते 5 नोकरी….

ट्रेन मध्ये बसायला चवथी सीट.. फार फार तर विंडो सीट 

नाहीतर 

एखादी वडा पावची गाडी…

लेखक : रवींद्र भुरे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बावन पत्ते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बावन पत्ते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

५२ पत्ते … या बद्दल आजवर वाईट किंवा फार तर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल. पत्त्यांचा खेळ म्हटला, की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही… म्हणजे यापलीकडे आपण विचारही करत नाही. पण त्यापलीकडे पत्त्यांविषयी खूप काहीही जाणून घेण्यासारखे आहे………

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे किंवा प्लॅस्टिकचे बनविलेले असतात.

बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो. पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात. तर…….

1) हे 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे.

2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतू….. प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.

3) या सर्व पत्त्याची बेरीज 364

4) एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.

5) 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.

6) 52 पत्यातील 12 चित्र पत्ते. म्हणजे 12 महिने

7) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश.

2) तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश

3) चौकी म्हणजे चार वेद  (अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद)

4) पंजी म्हणजे पंच प्राण  (प्राण, अपान, व्यान, उदान, समान)

5) छक्की म्हणजे षड रिपू  (काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ)

6) सत्ती- सात सागर

7) अटठी- आठ सिद्धी

8) नववी- नऊ ग्रह

9) दसशी- दहा इंद्रिये

10) गुलाम- मनातील वासना.

11) राणी- माया.

12) राजा-सर्वांचा शासक.

13) एक्का- मनुष्याचा विवेक.

14) समोरचा भिडू – प्रारब्ध.

 मित्रांनो, लहानपणा पासून पत्ते बघितले असतील. काहींनी खेळले असतील; परंतु त्या पत्त्यांच्या संचाबद्दल माहिती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!

नवरा बायको — पहिली पिढी

2) मुलं (सख्खी भावण्डं) — दुसरी पिढी —आई वडलांकडून 50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसूत्रे share करतात.

3) तिसरी पिढी — नातवंडे — पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसूत्रे share करतात.

4) चौथी पिढी — पहिल्या पिढीचे 12. 5% गुणसूत्रे share करतात.

5) पाचवी पिढी — पहिल्या पिढीचे 6. 25% गुणसूत्रे share करतात.

6) सहावी पिढी — पहिल्या पिढीचे 3. 12 % गुणसूत्रे share करतात.

7) सातवी पिढी — पहिल्या पिढीचे 1. 56% chromosome share करतात.

8) आठवी पिढी —पहिल्या पिढीचे < 1% share गुणसूत्रे करतात.

म्हणून मूळ पुरुष, जोडप्यापासून सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्यजात गुणसूत्रीय आजारांची शक्यता असते. अनेक समाजात मामाच्या मुलीशी विवाह करतात. पण धार्मिक/ वैज्ञानिक दृष्टीने निषिद्ध आहे.

आठव्या पिढीपासून नातं, भाऊबंदकी मानत नाहीत.

म्हणून पती-पत्नी चं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.

तीन पिढ्या सपिंड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.

आणि सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात. !!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकटेपणा – लेखक : ऐश्वर्य पाटकर – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ एकटेपणा – लेखक : ऐश्वर्य पाटकर – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(‘थिंक पॉझिटिव्ह’ नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे “एकटेपणा”. पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे. या दिवाळी अंकातील “एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज!” हा श्री ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी आहेत आणि त्यांची ‘भुईशास्त्र’ आणि ‘जू’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे…)

“मला आमच्या इथं गावातील बियावाल्या बाईची गोष्ट आठवते. बियावाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं. हा तिचा हात गुण होता की झाडा-कोडावरची माया? माहित नाही.

मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं. ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तिने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही.

बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही. तिला एकदा आई म्हणाली होती, “आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू-पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!”

तेव्हा तिचे उत्तर होतं, “नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती ?”

“कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा ?”

तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली, “जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का ? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती ? होती गं.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली. म्हणाली, “आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना… !”

दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला.. अन् तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे. माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत, हे एका अर्थी बरंच झालं. ! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. “

खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने. वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं ? एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी तीन सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या…

पाहिलं सूत्र म्हणजे, “आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा. ” 

दुसरं, “आपलं दुःख कुरवाळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा. “

आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, “आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका, थोडक्यात, detach राहायला शिका, दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या. “

लेखक : ऐश्वर्य पाटकर 

संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कळीचं झालं फूल… कवयित्री : सुश्री शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

कळीचं झालं फूलकवयित्री : सुश्री शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एक दिवस लेकीला आई हळूच बोले

रांधा, वाढा, उष्टी काढा.. दुसरे मी काय केले ?

*

लेक म्हणे हसून, श्लोक, ओव्या, सुरेल गाणी

तूच ना आम्हा ऐकवलेस

स्वच्छ वाणी, सुरेल शब्द

भांडार तूच खुले केलेस 

*

तुझा स्वयंपाक बघून बघून

मलाही लागली गोडी

तुझ्यातली अन्रपूर्णा

माझ्यातही आली थोडी

*

संस्कारवर्गात नाही आई

जावे लागले आम्हाला

कसे वागावे, कसे बोलावे

ठेवा तुझाच सर्वांना

*

नव्हते यू ट्यूब, नव्हते गुगल

तरी काहीच अडले नाही

तुझ्यासोबत बोलताना

गोष्टी कधीच संपल्या नाहीत

*

सण, सोहळे, लग्नकार्य

तुझेच इव्हेंट मॅनेजमेंट

जमाखर्च, देणीघेणी

तूच शिकवलीस अॅडजेसमेंट

*

आमच्या छोट्या दुखण्यांसाठी

डाॅक्टर आमचा तूच होशी

ओवा, हळद, शेवपा, हरडा

आजही असते माझ्यापाशी

*

तुझी रांगोळी, तुझे भरतकाम

कलात्मकता शिकवून गेली

माहित नाही कशी केव्हा

सुंदरता या जीवनी आली

*

पै पाहुण्यात वाढलो म्हणून

कंटाळा आजही येत नाही

माणसं जोडण्याची कला

जणू जगण्याचाच भाग होई

*

तरीही आई आता म्हणतेस

आयुष्यात मी काय केले

तुझ्याशिवाय का गं आई

माझ्यातल्या कळीचे फूल झाले? 

कवयित्री : सुश्री शुभांगी देशपांडे

चिकूवाडी, बोरीवली

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आपल्या काळात…’ – लेखक : दलाई लामा –  अनुवाद : शोभा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘आपल्या काळात…’ – लेखक : दलाई लामा –  अनुवाद : शोभा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली.

पण माणुसकीची कमी झाली

रस्ते रुंद झाले, पण दृष्टी अरुंद झाली.

खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली

घरं मोठी पण कुटुंब छोटी…

सुखसोयी पुष्कळ, पण वेळ दुर्मिळ झाला

पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग

माहितीचे डोंगर जमले, पण नेमकेपणाचे झरे आटले

तज्ज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या

औषध भरपूर, पण आरोग्य कमी झालं

मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी

आपण बोलतो फार… प्रेम क्वचित करतो… आणि तिरस्कार सहज करतो…

राहणीमान उंचावलं. पण जगणं दळभद्री झालं

आपल्या जगण्यात वर्षाची भर पडली, पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही.

आपण भले चंद्रावर गेलो-आलो,

पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही.

बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत. पण आतल्या हरण्याचं काय?

हवा शुध्द करण्यासाठी आटापिटा, पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय?

आपली आवक वाढली, पण नीयत कमी झाली

संख्या वाढली, गुणवत्ता घसरली

हा काळ उंच माणसांचा, पण खुज्या व्यक्तिमत्त्वांचा

उदंड फायद्यांचा, पण उथळ नात्यांचा

जागतिक शांतीच्या गप्पांचा पण घरातल्या युध्दांचा

मोकळा वेळ हाताशी, पण त्यातली गंमत गेलेली

विविध खाद्यप्रकार, पण त्यात सत्त्व काही नाही

दोन मिळवती माणसं, पण त्यांचे घटस्फोट वाढलेले

घरं नटली, पण घरकुलं दुभंगली

दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलें, पण कोठीची खोली रिकामीच.

हे पत्र तुमच्यापर्यंत पोचवणारं तंत्रज्ञान आज आहे

आणि आज आहे तुमचं स्वातंत्र्यही…

या पत्राकडे लक्ष देण्याचं किंवा न देण्याचं

यातलं काही वाटलं तर बदला…

किंवा… विसरून जा…

लेखक : दलाई लामा

अनुवाद : शोभा भागवत

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तीच अनंत चतुर्दशी…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘तीच अनंत चतुर्दशी…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

*

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत – चतुर्दशी !

*

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा…

*

थोडा वेळ आहोत इथे

तर थोडं जगून घेऊया

बाप्पा सारखे थोडे 

लाडू मोदक खाऊन घेऊया…

*

इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा…

*

मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद 

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद…

*

जातील निघून सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला…

*

बाप्पासारखं नाचत यायचे 

आणि लळा लावून जायचे

दहा दिवसांचे पाहुणे आपण 

असे समजून जगायचे…

*

किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख…

*

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव 

हा काळ दोन घडीच्या सहवासाचा…

कवी : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares