मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रियतमा – लेखिका –  डॉ तारा भवाळकर ☆ संकलन – सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रियतमा – लेखिका –  डॉ तारा भवाळकर ☆ संकलन – सौ.मंजिरी येडूरकर ☆

गडकर्‍यांच्या अंतर्मनाला ज्या प्रियतमेची ओढ आहे, ती प्रिया उत्कट प्रियकराचे रूप घेऊन कवितेत येते आणि तिचेच दुसरे रूप नाटकातून समर्पित पतिव्रता म्हणून सामोरे येते. मात्र नाटकात पतिव्रतेचे रूप अवतरत असता पिढ्यान् पिढ्या घडलेला समाज मनाच्या मान्या- मान्यतेचा संस्कार नकळत त्यावर होतो. तिचा गाभा मात्र ‘माझ्याच साठी तू’ असलेल्या आंतरिक ओढीचा असतो. ‘माझ्याचसाठी तू’ या ओढीला मिळते जुळते असे समाज मान्य रूप पतिव्रतेच्या धारणेत प्रतिबिंबित होते, पण त्याच वेळेला ‘तुझ्याचसाठी मी’ ( स्त्रीसाठी असलेला पुरुष) हरवलेला असतो. पतिव्रतेच्या संकल्पनेत तो बसतच नाही, कारण ‘तो ‘कसाही असला तरी ‘ति’ची निष्ठा अव्यभिचारिणी असावी, अशीच तिथे अपेक्षा असते. म्हणून नाटकातून दिसणारी स्त्रीची पतिव्रता ही प्रतिमा या कलावंताच्या मनातील स्त्री-पुरुष प्रीतीच्या आदर्शाचा एक अद्वितीय अंशच आहे.

तात्पर्य, राम गणेश गडकरी या कलावंताच्या मनात ‘तुझ्याचसाठी मी आणि माझ्याचसाठी तू’ अशी आदर्श प्रीतीची एक पूर्ण प्रतिमा आहे. प्रत्यक्षात ती मूर्त व्हावी, ही ओढ आहे. परस्परांसाठीच असलेले आपण – मी आणि तू आदिम ओढीतून एकत्र येणार. तिथे वैश्विक कामभावही सनातन ओढीतूनच येणार, म्हणून चुंबनालिंगनाची महापूजा तिथे अपरिहार्य आहे. प्रत्यक्षात ही आस अधुरीच राहते. त्यामुळे कवितेत ‘तुझ्यासाठी मी’ हा त्या ओढीचा अर्धा भाग कलारूप घेऊन येतो, तर ‘माझ्यासाठी तू’ हा दुसरा अर्धा भाग नाटकातल्या पतिव्रतेच्या रूपात अवतरतो. स्वप्न आणि सत्य यांची सरमिसळ होत होत असे व्यामिश्र रूप त्याच्या कलाकृतीला येते. ‘ईड’ची आदीम प्रेरणा आणि ‘इगो’ (संस्कारीत मन) ची त्याच्यावर कुरघोडी ही तर मानवी मनाची सततच ओढाताण असते. कलावंताच्या कलाकृतीत ती व्यक्त होताना निरनिराळे विभ्रम करते. त्याच्या मनाचे खंडितत्त्व इथे- तिथे विखुरले जाते. वरवर पाहता त्याच्या खंडित व्यक्तिमत्त्वाचे (स्प्लिट पर्सनॅलिटी चे) हे अविष्कार असंबद्ध, परस्पर विसंगत, परस्परविरोधी वाटतात. पण त्यांच्यातही एक आंतरिक सुसंगती असते. त्याच्या खंडित मनाचे तुकड्या तुकड्यांनी होणारे हे अविष्कार माणूस म्हणून जगताना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे एका परीने सलगपण टिकवीत असतात, त्यात सुसंगती आणीत असतात.

कलाकृती ही कलावंताच्या मनाची स्वप्नपूर्तीच असते. अपुऱ्या इच्छांना जसा स्वप्नातून पूर्णत्व देण्याचा प्रयत्न अभावितपणे होत असतो, तसेच कलावंताच्या आंतरमनाचे स्वप्न त्याच्या कलाकृतीत पूर्ण होते. स्वप्नांचा अर्थ लावणे दुर्घटच असते. कारण ती वर वर पाहता विस्कळीत असतात कारण ती अनेकदा प्रतीकेच असतात. तीच गोष्ट कलावंताच्या कलाकृतीची. कलेचा मूर्त अविष्कार म्हणजे कलावंताचे सुप्त मनच! मूर्ततेतून अमूर्ताचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे समोर असलेल्या कलाकृतीतून कलावंताच्या मनाचे आदिरूप शोधण्याचा प्रयत्न असतो.

नाटककार राम गणेश गडकरी आणि कवी गोविंदाग्रज यांच्या कलाकृतींतून अनुक्रमे नाटकातून आणि कवितेतून जी स्त्री रूपे प्रकट झाली आहेत, त्यांचे स्वरूप सकृत्

दर्शनी परस्पर विरोधी असले तरी त्याच्यामागचे कलावंताचे मन मात्र आपल्या सर्व कलाकृतींतून एक ‘संवाद ‘ साधण्याचा प्रयत्न करते. हा ‘संवाद’ अनेक अर्थांनी संवाद आहे. रसिक आणि कलावंत यांच्यामधला जसा हा संवाद आहे, तसाच एकाच कलावंताने अंगिकारलेल्या निरनिराळ्या वाङ्मय प्रकारातल्या अविष्कारातलाही हा संवाद आहे आणि कलावंताच्या मनाची प्राकृतिक ओढ आणि परिसरजन्य वास्तव यांच्या विरोधी ताणांतूनही संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे. कलावंत अर्थातच हे सगळे जाणून बुजून, समजून उमजून घडवीत नाही. आपातत: ते तसे घडत जाते. गडकर्‍यांच्या नाटक- कवितेतून ते आपातत: घडले आहे. त्याचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे, इतकेच!

नाटककार राम गणेश गडकरी, कवी गोविंदाग्रज आणि विनोदकार बाळकराम या त्रिविध भूमिकांतून स्वतःला अविष्कृत करणाऱ्या या असाधारण प्रतिभेच्या कलावंतांचे मन स्वभावतः स्त्री पुजकाचे मन होते. प्रियतमेच्या ओढीने झपाटलेले, व्याकुळलेले मन होते, याचा प्रत्यय प्रत्येक प्रेमधर्मी संवेदनशील वाचकाला सहज यावा, एवढी ती ओढ अनावर पणे प्रकट झालेली आहे. या प्रत्ययाला अडसर ठरणारा वाचकांचा पूर्वग्रह दूर करण्यासाठीच माझा हा शब्द प्रपंच आहे.

‘प्रियतमा’ वरून

संकलन – मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ काही राहून तर नाही ना गेलं? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

 

📖 वाचताना वेचलेले 📖

काही राहून तर नाही ना गेलं? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

           तीन महिन्यांच्या बाळाला

             दाईपाशी ठेवून

        कामावर जाणाऱ्या आईला

                 दाईनं विचारलं ~

     कांही राहून तर नाही ना गेलं ?

        पर्स, किल्ल्या सगळं घेतलंत ना ?

             आता ती कशी हो, हो म्हणेल ?

         पैशापाठी पळता-पळता

       सगळं काही मिळविण्याच्या

        महत्वाकांक्षेपोटी

    ती जिच्यासाठी एवढा आटापिटा

      करतेय तीच तर राहून गेलीय !

 *

      लग्नात नवऱ्या मुलीस सासरी

       पाठवताना लग्नाचा हाॅल

       रिकामा करून देताना

      मुलीच्या आत्यानं विचारलं ~

  दादा, कांही राहून तर नाही गेलं ना ?

            चेक कर जरा नीट..!

       बाप चेक करायला गेला, तर

          वधूच्या खोलीत

     कांही फुलं सुकून पडलेली दिसली.

       सगळंच तर मागं राहून गेलंय.

        २१ वर्षे जे नाव घेऊन आपण

    जिला लाडानं हाक मारत होतो,

     ते नाव तिथंच सुटून गेलंय, आणि

       त्या नावापुढे आतापर्यंत

        अभिमानानं जे नाव लागत होतं,

     ते नावही आता तिथंच राहून गेलंय.

 *

       दादा, बघितलंस ?

   काही मागे राहून तर नाही ना गेलं ?

      बहिणीच्या या प्रश्नावर

  भरून आलेले डोळे लपवत बाप

  काही बोलला तर नाही, पण

    त्याच्या मनात विचार आला~

     सगळं काही तर इथंच राहून गेलंय !

 *

     मोठी मनीषा मनी बाळगून मुलाला

     शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं,

   आणि तो शिकून तिथंच सेटल झाला.

     नातवाच्या जन्मावेळी मोठ्या

      मुश्किलीनं तीन महिन्यांचा

      व्हिसा मिळाला होता,

  आणि निघतेवेळी मुलानं विचारलं ~

      बाबा, सगळं कांही चेक केलंय ना ?

          काही राहून तर नाही ना गेलं ?

         काय सांगू त्याला, की आता..

      आता राहून जाण्यासारखं 

      माझ्यापाशी उरलं तरी काय आहे ..!

 *

            सेवानिवृत्तीचे दिवशी

         पी.ए.नं आठवण करून दिली ~

                 चेक करून घ्या सर ..!

           काही राहून तर नाही ना गेलं ?

     थोडं थांबलो, आणि मनात विचार

             आला, सगळं जीवन तर

       इथंच येण्या-जाण्यात निघून गेलं.

      आता आणखी काय राहून

          गेलं असणार आहे?

 *

      स्मशानातून परतताना मुलानं …

      मान वळवली पुन्हा एकदा,

         चितेकडे पाहण्यासाठी …

               पित्याच्या चितेच्या

           भडकत्या आगीकडे पाहून

              त्याचं मन भरून आलं.

                 धावतच तो गेला

       पित्याच्या चेहऱ्याची एक

         झलक पाहण्याचा

           असफल प्रयत्न केला….

             आणि तो परतला.

                 मित्रानं विचारलं ~

            काही राहून गेलं होतं कां रे ?

 *

          भरल्या डोळ्यांनी तो बोलला ~

      नाही , काहीच नाही राहिलं आता.

        आणि जे काही राहून गेलंय,

        ते नेहमीच माझ्या सोबत राहील.

 *

एकदा… थोडा वेळ काढून वाचा,

   कदाचित …जुना काळ आठवेल,

             डोळे भरून येतील, आणि

          आज मन भरून जगण्याचं

         कारण मिळेल !

 *

  मित्रांनो, कुणास ठाऊक ?केव्हा या जीवनाची संध्याकाळ होईल.

 *

             असं काही होण्याआधी

               सर्वांना जवळ घ्या,

           त्यांच्या पाठीवर हात फिरवा.

         त्यांच्याशी प्रेमानं बोलून घ्या

     जेणेकरुन कांही राहून जाऊ नये ..!                                 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जेवणावरून स्वभाव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “जेवणावरून स्वभाव” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत.

जसे: हस्ताक्षर, सही, दिसणे, काही लकबी, वगैरे वगैरे.

 

पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट–

जेवताना,

जेवण्याच्या आधी वा

नंतर…

जेवणाराची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.

 

म्हणजे बघा…

 

समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे, तेव्हा पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून तो उचलतो.

जसे की,

१) ताटातील गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात.

२) तळण, पापड उचलणाऱ्या आणि पापड लवकर मोडतो अश्या माणसांत, संयम कमी असतो.

३) वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे साधी सरळ असतात. ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.

४) भजी उचलणारी माणसे भज्यासारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात. यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.

५) जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहीभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात.

६) लोणचे कुठले आहे? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स?- हे पाहणारे आंबटशौकीन असतात.

७) काही सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात. ते लोक अतिचिकित्सक असतात.

 

यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.

 

अ) पहिला: जेवणाच्या आधी काही प्रतिक्रिया असणारे आणि

ब) दुसरा: जेवणानंतरची प्रतिक्रिया असणारे.

 

१) जेवणाच्या आधी ताट,

भांडी वाढायला सुरुवात झाली की भांडी स्वच्छ आहेत कां नाही? – हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे कां नाही?- हे बघून त्याची चर्चा करणारे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात.

अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून घेणारी नसतात. अशांना मित्रमंडळी कमी किंवा असतीलच तर ते पण याच Category तील असतात.

२) पंगतीत वाढणे सुरु आहे, अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे… माझ्या पानात नाही.. आत्ताच हवे म्हणून वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढवून घेतात, भले त्यांना तो पदार्थ आवडणारा असो वा नसो.

हे लोक मत्सरी असतात. सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते.

३) गोड पदार्थ वाढला जात असताना

“मी काय म्हणतो? फक्त बासुंदीच आहे, म्हणजे १६० रुपये ताट! स्वस्त पडले. “

असा डायलॉग मारणारे, मुलाकडचे असतात वा अत्यंत व्यवहारी कंजूष मनोवृत्तीचे असतात.

४) जेवणाच्या आधी वा जेवताना जे लोक

“बाकी सगळे ठीक होते, पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते. ” म्हणणारी अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीची असतात.

समोर चांगले ताट वाढले आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून, असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.

५) ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी !

या सर्वांपलीकडे एक विशेष Category आहे.

६)जेवण झाल्यावर

“ताक आहे का?” म्हणून विचारणार आणि नाही म्हणल्यावर

“अरेरे, ताक असते ना तर, मजा आली असती. “

असा शेरा मारणारे कुजकटच.. !.

 

वाचा आणि ठरवा!

तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता?

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निर्जीवातील जिवंतपणा… – लेखिका: श्रीमती मानसी चापेकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ निर्जीवातील जिवंतपणा… – लेखिका: श्रीमती मानसी चापेकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

“अगं, किती जुनी  झाली आहे ही मीठ ठेवायची बरणी! टाकून दे की आता. छान, नवीन, सुबक अशा कितीतरी काचेच्या  बरण्या आहेत आपल्याकडे. वापर की त्यातली एखादी.”

त्या दिवशी सकाळी-सकाळी ऑफिसला जायच्या आधी मी सगळी कामं पटापट आवरत असताना भाजीत मीठ टाकताना साठवणीची मिठाची बरणी काढली आणि नवरोबांचे नेमके लक्ष त्या मिठाच्या बरणीकडे गेले . खरंतर ती तुटली किंवा रंगही पांढऱ्याचा काळा-बिळा झालाच नव्हता मुळी.पण काय आहे ना, त्याची सवय झाली होती. उगाच काय टाकून द्यायच्या ना वस्तू? नवीन आणलं की जुनं टाकून द्यायचं, हा काय न्याय झाला का?

ह्या पुरुषांना कुठे कळते आमच्या स्त्रियांचे असे वस्तूंमध्ये गुंतणे!

“अरे खराब कुठे झाली आहे, फक्त जुनीच तर झाली आहे, आणि मला हिचा आकार खूप आवडतो.असा कुठे हल्ली मिळतो?”

“अगं, पण आईने जवळजवळ पंचवीस- तीस वर्षं वापरली आणि आता तू वीस एक.बास झालं की. मी आत्ताच काढतो बघ, काचेच्या कपाटातील ती तुझ्या रुखवतातील चिनी मातीची बरणी,” असे म्हणून तो ती काढायला गेलासुद्धा.

ही एक अजून चांगली सवय आम्हा स्त्रियांची(सगळ्याच नाही बरं का !).  मिळालेल्या वस्तू जपून ठेवणं आणि वापरात असेलल्या वस्तूंची काळजी घेणं. म्हणजे हे माणसांसारखेच असते नाही का? म्हणजे आपण माणसं जपतो, त्यांच्या मनाची काळजी घेतो, कधीकधी अगदी भावनाशील होतो, तसंच असतं नाही का वस्तूंबाबतसुद्धा?

सहवासाने प्रेम वाढते म्हणतात, तर वस्तूंवर, जरी त्या सजीव नसल्या तरी जीव जडतोच हो !

आता लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही रुखवतातील कितीतरी काचेच्या वस्तू कपाटात दिसतील. काढल्याच गेल्या नाहीत. कितीतरी काचेचे सेट असतील, जे फक्त पाहुणे आले की वापरायचे ह्या सदरात मोडतात.

त्या दिवशी नवरा म्हणालाच, “वस्तू आपल्यासाठी असतात, आपण वस्तूंसाठी नाही.ते सगळे काचेचे सेट वापरले आपण, तर काय बिघडणार आहे? पाहुणे येणार महिन्यातून एकदा. आणि काय होईल जास्तीतजास्त? तुटतीलच ना? आणू की परत नवीन, फक्त ‘पाहुणे आल्यावर वापरायचे’ हे काय लॉजिक असतं तुम्हा बायकांचे कळतंच नाही.”

आता त्याला काय सांगणार की रोज ह्या वस्तू वापरायच्या म्हणजे आलं त्यांना जीवापाड जपणं. कामवाल्या मावशी रोजची भांडीच आपटून आपटून घासतात.त्यात ही काचेची भांडी रोज एक फोडतील. म्हणजे काळजीपोटी ही भांडी मी घासणं आलं.म्हणजे वेळ हवा त्याला.त्यात आपल्याच हातून फुटलं की जीव हळहळणार ते वेगळंच.

वस्तू काय, कपडे काय, अगदी घरातील कोपरासुद्धा आपण जपतो मनाच्या कोपऱ्यासारखा. जुने झालेले कितीतरी ड्रेस होत नाहीत,तरीही आठवण म्हणून कपाटात अगदी खालच्या कप्प्यात ठेवले आहेत मी जपून. प्रत्येक ड्रेसची आठवण वेगळी. हा तुला पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा घातलेला, हा इंटरव्हूला जाताना,  हा नवीन जॉबला पहिल्या दिवशी घातलेला, अशा अनेक आठवणींचा वस्तूंचा खजिना आपण कुठे कुठे जपून ठेवलेला असतो नाही का बायकांनी?

अगदी परवा ओटा पुसायचं फडकंसुद्धा विरल्यावर टाकून देताना वाईट वाटलं, की किती छान टिपला जायचा ओटा ह्याने. आता नवीन फडकं घेणार आपण , आणि ते सवयीचे होईपर्यंत जुन्याची आठवण येणारच . काय आणि कुठे कुठे जीव आणि मन गुंतवून ठेवतो आपण !

त्यात अजून एक चांगलं असतं, वस्तू आपल्याला दगा देत नाहीत माणसांसारखा. काहीवेळा आपण ना वेड्यासारखा जीव लावतो माणसांना आणि अचानक काहीही कारण नसताना ती माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात. पण वस्तूंचं तसं मुळीच नसतं. त्या आपल्या असतात , आपल्यापाशीच राहतात , जोवर आपण त्यांना जपत असतो.   

वस्तूची होणारी सवय आणि त्यात गुंतलेल्या भावना ह्यावरून माहेरची एक आठवण सांगते. मी अगदी नववी दहावीत असल्यापासून पोळ्या करायला शिकले. म्हणजे आईने जबरदस्ती वगैरे नाही केली, पण मलाच आवड होती. शेवटच्या दोन पोळ्या लाटता लाटता आईच्या हाताच्या प्रॉब्लेममुळे मी सगळ्याच पोळ्या लाटायला लागले. मी केलेल्या पातळ पोळ्या सगळ्यांनाच आवडायच्या. त्यामुळे कौतुकही व्हायचे.आई सगळी कामे करायची, पण पोळ्या मात्र मीच करायचे , तर ते लाटणं माझ्या इतकं सवयीचं झालं की मी गमतीने म्हणायचे आईला, “आई, मी लग्न झाल्यावर हे लाटणं सोबत घेऊन जाणार.” आई हसूनच म्हणायची, “तुझ्या दोन्ही मोठ्या बहिणी पण हेच म्हणायच्या, पण होते, बाळा, सवय सासरच्या गोष्टींचीसुद्धा”.

खरंच, आपण लग्न झाल्यावर आपला नवीन संसार आहे, नवीन सुरुवात आहे म्हणून अनेक जुन्या गोष्टी केवळ जुन्या झाल्या म्हणून नाही टाकून देत, त्यात आपल्या सासूचे प्रेम, त्यांच्या आठवणी आणि नंतर आपण त्या वस्तूंच्या करून घेतलेल्या सवयीमुळे आपल्याला त्याच गोष्टी वापरायला मनापासून आवडते.

मला वाटतं, हे असं जीव गुंतणं जिवंतपणाचं लक्षण असतं, आणि नुसतं श्वास चालू आहेत म्हणजे आपण जिवंत, हे समीकरण जोडण्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्याशी निगडित असणं आणि त्याला आपण आपलेपणाची जोड देणं म्हणजे जगणं माझ्या मते तरी.

माणसं काय नी वस्तू काय एकदा जीव गुंतला की दुरावा सहन होतच नाही…..

लेखिका: श्रीमती मानसी चापेकर

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ☆ “बोलताना थोडं सांभाळून बोला…” – लेखिका: श्रीमती संध्या घोलप ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “बोलताना थोडं सांभाळून बोला…” – लेखिका: श्रीमती संध्या घोलप ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

१) “हॅलो, अगं निशू, काय मेलीस की काय? मी एवढी आजारी होते तर साधा फोनही नाही केलास? “

“हॅलो काकू, मी जाई बोलतेय. निशा ताईंची सून. आई थोड्या आजारी होत्या. पण अचानक गेल्या हो. तीन आठवडे झाले. “

“काय?”

“हो, मला म्हणाल्या की नलूचा फोन येईल आणि ती विचारेल नेहमीप्रमाणे ‘मेलीस का?’ तर सांग तिला की खरंच मेली!”

 

२) अजयला promotion मिळाल्याचं समजलं आणि ऑफिस मध्ये सगळे पार्टी मागायला लागले.

“Done. येत्या रविवारी सगळे घरी या जेवायला. “

“अरे अजय, जरा वहिनींना विचार ना आधी. एवढ्या सगळ्यांना एकदम जेवायला बोलावतो आहेस!”

“त्यात काय विचारायचं? लग्नाची बायको आहे माझी! आमच्याकडे पद्धत नाहीये बायकांना विचारायची. ‘नाही ‘ म्हणायची हिंमत नाही तिची. “

“Very good, Mr Ajay. बरं झालं. मला तुमचा खरा चेहरा आज कळला. मी तुमचं promotion cancel करतोय. तुम्ही घरी जसं वागता, तसंच ऑफिस मधल्या महिलांशी वागलात, तर चालणारच नाही आम्हाला. “

 

३) ” मूर्ख, बावळट, बेअक्कल!” तात्या ओरडले.

” बाबा, तुम्हाला आमची खरी नावं आठवतात तरी का हो? आम्ही लहान असल्यापासून तुम्ही मला, ताईला आणि अगदी आईलाही हेच बोलायचात. कधी प्रेमाने काही हाक मारल्याचं आठवतंय? आई तर बिचारी एका शब्दाने तुम्हाला उलट बोलली नाही. ताई लग्न करून गेली आणि सुटली. माझी पन्नाशी उलटली तरी मी तेच ऐकतोय. आणि आता तुम्ही माझ्या बायको मुलांनाही असच बोलताय? ” सुजय शांत स्वरात बोलला.

तात्या विचारात पडले.

खरंच, बोलताना जपून बोलणं आवश्यक आहे!

लेखिका: श्रीमती संध्या घोलप

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय असते गिरनार वारी…? लेखक : श्रीकांत कापसे पाटील ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

काय असते गिरनार वारी…? लेखक : श्रीकांत कापसे पाटील ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

नेहमी गिरनारला जायचे म्हटले की काही जण म्हणतात, ” काय वेड लागले की काय? दर 2 महिने झाले की गिरनारला पळतोस!”

हो. आमच्या भाषेत वेडच ते आणि आम्ही तेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालच कशाला? बरोबर ना? (कारण… वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात.)

काय मिळतं तिथे सारखं जाऊन?

काम धंदे सोडून पळतात तिकडे ते…?

असं काय आहे गिरनार?

अहो, काम धंदे सोडून कोणी जात नाही तर आमच्या गिरनारीसाठी वेळ काढून जातो, दर्शनासाठी… जिथे प्रत्येक पायरी चढताना चांगली, वाईट केलेली कर्मं आठवतात ना ते आहे गिरनार…

तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते, ते आहे गिरनार…

जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली, बाहेरची कटकट विसरून पाच दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख, समाधान मिळतं ना, ते आहे गिरनार…

भक्तीमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ना, ते आहे गिरनार…

श्रीमंत, गरीब जिथे एकत्र येतात ना, ते आहे गिरनार…

सगळ्या सुख दुःखांची जिथे बेरीज वजाबाकी करूनसुद्धा शिल्लक काही राहत नसेल, तरी सुध्दा काहीतरी मिळतं, ते आहे गिरनार….

आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षणं, लग्न, घरदार सगळं काही मनासारखे होते जिथे गेल्यावर, ते म्हणजे गिरनार….

ढोपरं दुखतात, दम लागतो, तरीसुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजे गिरनार…

जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो, व मग अक्कल ठिकाणावर येते, अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते, ते गिरनार…

असे हे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार… आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथे सारखं सारखं जाऊन? गिरनार…

माहेर वाशीण जशी माहेराला येते व तिला जो आनंद होतो ना आल्यावर व निघताना पाय निघत नाही, तसंच आमचं हे गिरनार…

हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे, व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना, ते हे गिरनार…

तर असंआहे गिरनार…

जय गिरनारी

अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त

लेखक: श्री. श्रीकांत कापसे पाटील

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कसाटा आईस्क्रीम आणि आजी –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कसाटा आईस्क्रीम आणि आजी –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

१९७० ते ७५ च्या दरम्यान लग्नासाठी दिवसभर हॉल बुक करायचे. खास आमंत्रित दुपारी जेवायला आणि आम जनता, बिल्डिंग मधले, ऑफिसवाले‌ संध्याकाळी‌ स्वागत समारंभाला. कसाटा‌ किंवा पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचं, चौकोनी आकाराच्या स्लाईसचं आईस्क्रीम संध्याकाळी. काही वेळा आमच्या घरी स्वागत समारंभाचे आमंत्रण असायचे. हॉल दादर किंवा गिरगावातला असला तर वडील ऑफिसातून येताना जाऊन यायचे. आम्ही विचारलं की काय होतं पाहुण्यांसाठी तर म्हणायचे कसाटा. पार्ले, सायन, माटुंगा असेल, रविवारी असेल आमंत्रण तर आम्हा भावंडांपैकी एखाद्याला सोबत न्यायचे. घरी आल्यावर तोच संवाद.

तेव्हा आमच्याकडे आमच्या वडिलांची आई, निव्याची आजी होती. ७५ची. ती हे कसाटा नेहमी ऐकायची.

एकदा संध्याकाळी ती आईला म्हणाली… ‘उषा, हे कसाटा म्हणजे काय असतं ग? एकदा आण हं माझ्यासाठी! खाऊन तरी बघू. लग्नाला जाऊन आलात की, आईस्क्रीमच्या थरात‌ सुका मेवा घातलेला तो केशरी, फोडीच्या आकाराचा तुकडा मुलुंड स्टेशनहून चालत चालत घरी कसा आणायचा. फ्रीज तर नव्हताच.. म्हणून आई म्हणाली ‘ हो. पण तुम्ही आणि सुवर्णा हॉटेलात जाऊनच खा तो. ‘

काहीच दिवसांत आईने मोजकेच पैसे देऊन मला आणि आजीला मुलुंड पूर्वच्या स्टेशनसमोर असलेल्या हाॅटेल अजित पंजाब मध्ये पाठवलं. दुपारी ४ वाजता. माझा हात घट्ट धरून आजी आणि मी चालत चालत २० मिनिटांनी पोचलो. तिथले वेटर, आजी आणि मला पाहून समजूतदारपणे पुढे आले. मी रूबाबात‌ दोन कसाटा आईस्क्रीमची ऑर्डर दिली. आजी त्या उंच पाठीच्या, गुबगुबीत कोचमध्ये बुडून गेली होती. ए. सी. चा थंडावा, मंद दिवे, चकचकीत सन्मायकाची टेबलं, तुरळक‌ वेटरचा‌‌ वावर, उन्हातून आल्यावर पुढे आलेले थंडगार पाण्याचे उंच, काचेचे ग्लास, आपला‌ जाड काचांचा चष्मा सारखा करत आजी‌ मिटीमिटी पहात होती. सराईतासारखा‌‌ आव आणत मी म्हटलं ‘ आजी, पाणी पी ना’ आणि मी‌ स्टाईलमध्ये पाणी प्यायला लागले. आजी थोडीशी पुढे झाली, दोन्ही हातांनी काचेचा‌‌ ग्लास सरकवत टेबलाच्या कडेवर आणून थंडाव्याचा‌‌ अंदाज घेत चार घोट पाणी प्यायली.

तेवढ्यात एका ट्रेमध्ये ठेवलेल्या कसाटाच्या दोन डिशेस घेऊन वेटर आला आणि‌ दोघींसमोर ठेवून गेला.

चमचे सावरत आजीने आधी कसाटा नीट पाहिलं आणि कडेने हळुवारपणे थोडंस्सं आईस्क्रीम चमच्यावर घेऊन जिभेवर ठेवलं आणि माझ्याकडे पहात मान डोलावली.

पुढची दहा‌ मिनिटं बाकीचं सगळं विसरून आम्ही चवीचवीने कसाटाला‌‌ न्याय दिला. ‌

आलेलं बील‌ पाहून, तेवढेच पैसे ठेवून, आजीचा‌ हात धरून मी‌ बाहेर‌ पडले. चालत चालत घरी आलो.

कपातील ५५ पैशाला‌ मिळणारं जॉय आईस्क्रीम कधीतरी घरी आणून खायचो आम्ही, पण असं फक्त आईस्क्रीम खायला दुपारी चार वाजता आजीला आईने पाठवणं यातला‌ स्नेह कळायला बरीच वर्षं उलटावी लागली.

ते लक्षात ठेवून मी एखाद्या आजी आजोबांना भेटायला जाताना आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या, पण त्यांच्या साठी अपूर्वाई वाटेल असा उसाचा रस, बर्फाचा गुलाबी गोळा, बडीशेपेच्या रंगीबेरंगी गोळ्या, ओली भेळ आवर्जून नेते.

 

आज आजीही नाही, आईही‌ नाही…

पण आजही कधीतरी हॉटेलात जाऊन कसाटा खाताना आधी आई, मग आजीच आठवते.

आईस्क्रीम जरा जास्तच मलईदार लागतं आणि कडेचा तो पावाचा तुकडा अगदी‌ नरम होऊन जातो.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटायर्ड वडील… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ रिटायर्ड वडील… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

आज जेवून झाल्यावर

वडील बोलले…

” मी आता रिटायर होतोय.

मला आता नवीन कपडे नकोत.

 जे असेल, ते मी जेवीन.

रोज वाचायला पेपर नको.

आजपासून बदामाचा शिरा नको,

मोटर गाडीवर फिरणं बंद,

बंगला नको, बेड नको,

एका कोप-यात, झोपण्यास थोडी जागा मिळाली तरी खूप झालं.

आणि हो तुमचे, सुनबाईचे मित्र व मैत्रिणी,

चार पाहुणे आले तर

मला अगोदर सांगा.

 मी बाहेर जाईन.

 पण त्यांच्यासमोर ‘बाबा, तुम्ही बाहेर बसा’

 असं सांगू नका.

 तुम्ही मला जसं ठेवाल,

तसा राहीन. “

 

काहीतरी कापताना सुरीनं

बोट कापलं जावं आणि

टचकन डोळ्यांत पाणी यावं,

काळीजच तुटावं,

अगदी तसं झालं…

 

एवढंच कळलं, की

आजवर जे जपलं,

ते सारंच फसलं…

 

का वडिलांना वाटलं,

ते ओझं होतील माझ्यावर… ?

 

मला त्रास होईल,

जर ते गेले नाहीत कामावर… ?

 

ते घरात राहिले, म्हणून

कोणी ऐतखाऊ म्हणेल…

 

की त्यांची घरातली किंमत

शून्य बनेल… ?

 

आज का त्यांनी

दम दिला नाही… ?

 

“काय हवं ते करा, माझी तब्बेत बरी नाही,

मला कामावर जायला जमणार नाही… “

 

खरंतर हा अधिकार आहे,

त्यांचा सांगण्याचा.

पण ते काकुळतीला का आले… ?

 

ह्या विचारातच माझं मन खचलं.

 नंतर माझं उत्तर

मला मिळालं…

 

जसजसा मी मोठा होत गेलो,

वडिलांच्या कवेत

मावेनासा झालो.

 

तेव्हा नुसतं माझं शरीरच वाढत नव्हतं, तर त्याबरोबर

वाढत होता तो माझा अहंकार

आणि त्यानं वाढत होता,

तो विसंवाद…

 

आई जवळची वाटत होती.

पण, वडिलांशी दुरावा साठत होता…

 

मनांच्या खोल तळापर्यंत

प्रेमच प्रेम होतं.

पण,

ते कधी शब्दांत

सांगताच आलं नाही…

 

वडिलांनीही ते दाखवलं असेल.

पण, दिसण्यात आलं नाही.

 

मला लहानाचा मोठा करणारे वडील,

स्वत:च स्वतःला लहान समजत होते…

 

मला ओरडणारे – शिकवणारे वडील,

का कुणास ठाऊक

बोलताना धजत नव्हते…

 

मनानं कष्ट करायला

तयार असलेल्या वडिलांना,

शरीर साथ देत नव्हतं…

 

शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला,

घरात नुसतं बसू देत नव्हतं…

 

हे मी नेमकं ओळखलं… !

 

खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,

सांगायचंच होतं त्यांना,

की थकलाहात, तुम्ही आराम करा.

पण

आपला अधिकार नव्हे,

सूर्याला सांगायचा, की

“मावळ आता”… !

 

लहानपणीचे हट्ट पुरवणारे

वडील…

 

मधल्या वयांत अभ्यासासाठी

ओरडणारे वडील…

 

आणि नंतर चांगलं वागण्यासाठी

कानउघडणी करणारे वडील…

 

आजवर सारं काही देऊन

कसलीच अपेक्षा न ठेवता,

जेव्हा खुर्चीत शांत बसतात,

तेव्हा वाटतं, की जणू काही

आभाळच खाली झुकलंय !

 

कधीतरी या आभाळाला

जवळ बोलवून

खूप काही

बोलावसं वाटतं… !

 

पण तेव्हा लक्षात येतं, की

आभाळ कधीच झुकत नाही,

 ते झुकल्यासारखं वाटतं… !

 

आज माझंच मला कळून चुकलं,

की आभाळाची छत्रछायाही

खूप काही देऊन जाते… !

कवी : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ताल थांबला .. तबला रडला .. कवी : श्री सुधीर विट्ठल मुळे  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ताल थांबला .. तबला रडला .. कवी : श्री सुधीर विट्ठल मुळे  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

ताल थांबला तबला रडला

कवी: श्री.सुधीर विठ्ठल मुळे

प्रस्तुती: सौ. स्मिता पंडित

*

ॐकारातून ध्वनी प्रकटले

अवघे ब्रह्मांड गजबजले

मृदुंग तबला ढोल वाजले

जणू शिवाने तांडव केले

*

तिरकीट धा  तिरकीट धा

कडकडून वाजला तबला

अवघे श्रोते थरारून गेले

टाळ्यांचा कडकडाट झाला

*

उ. झाकीरभाई गोड हसले

रसिकांना अभिवादन केले

पुन्हा भेटण्याचे कबूल केले

सहज शांतपणे निघून गेले

*

आयुष्यभर तालात राहिले

तालासाठी सारे सोडले

ध्यास एक घेऊनी जगले

तालसुरांशी नाते जोडले

*

तालशास्त्र रोशन केले

तबल्याचे महत्त्व वाढवले

किती विद्यार्थी  शिकवले

आयुष्याचे सार्थक केले

*

झाकीरभाई –

का जाण्याची घाई केली

श्रोतेगण सारे दु:खी झाले

तबला डग्गा पारखे झाले

सूर ताल सारे अवघडले

*

जगात इतुके नाव झाले

तरी पाय जमिनीवर राहिले

विनम्रभाव सदैव दिसले

हेच आम्हा शिकवून गेले

कवी: श्री सुधीर विठ्ठल मुळे

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग २ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

 ***** पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन *****

☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग २ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

उस्ताद झाकीरजींची आणखी एक छान गोष्ट आहे. जगभर भ्रमंती करणारा हा महान कलावंत जवळचं अंतर लोकल ट्रेनने किंवा रेल्वेने कापतो. कल्याण, डोंबिवलीला जर कार्यक्रम असेल तर त्याचा रवीकाकाला फोन येतो व त्याला तो सांगतो, अमक्या दिवशी कार्यक्रम आहे, मला तू रेल्वेने घेऊन जा. मग रवीकाकाचा एक रेल्वेतला मित्र, व रवीकाकाचं शेपूट असल्यासारखा मी त्याला घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जातो आणि ट्रेनने घेऊन गंतव्य स्थळी पोहोचवतो. त्याला स्टेशनवर बघून अनेकांचा विश्वास बसत नाही. पण, तो अगदी सहजपणे स्टेशनवर असणारे हमाल, तिकिट कलेक्टर, प्रवाशांच्यात मिसळतो, प्रत्येकाला हवे तितके फोटो काढू देतो. आता तो एक काळजी घेतो, बाहेर कुठेही काहीही खात नाही. त्याचा पिण्याच्या पाण्याचा एक ठराविक ब्रँड आहे, तेच पाणी तो पितो, ते मिळालं नाही तर तो पाणी पिणार नाही.

त्याची आणखी एक सवय आहे, त्याचा कार्यक्रम जिथं असेल तिथं, तो कार्यक्रमाच्या काही तास आधी जातो. मला आठवतंय, माझ्या मावसभावानं संतोष जोशी, त्याचे पार्टनर्स प्रियांका साठे आणि अभिजित सावंत यांनी झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांचा ठाण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता. मी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर होतो. शंकर महादेवनने झाकीरजी कधी येणार आहेत, याची विचारणा केली आणि त्याप्रमाणे तो झाकीरकाका त्या कार्यक्रमाला पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी तिथं पोहोचला.

डोंबिवलीला एम्. आय्. डी. सी. मैदानात झाकीरकाकाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आम्ही त्याला ट्रेनने घेऊन आलो. कल्याण स्टेशनवर उतरल्यावर आयोजकांनी मोटारीनं डोंबिवलीला नेलं. कार्यक्रम रात्री साडे-सात आठच्या दरम्यान सुरू होणार होता. आम्ही मैदानात साडेपाचच्या सुमारास पोहोचलो. तिथं गेल्या गेल्या झाकीरकाकानं तबल्याचं व विविध तालवाद्यांचं त्याच्याकडचं भांडार उघडलं. मोटारीतून स्वत:च्या तबल्याचं कीट त्यानं स्वत: उचललं आणि थेट स्टेजवर गेला. ध्वनिव्यवस्था ज्यांच्याकडे होती, त्यांनी त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम केलेले असल्याने त्यांनी सर्व तयारी ठेवलेली होती. नंतर दीड तासभर झाकीरकाका स्वत:ची वाद्ये लावत होता, ती आधी स्वत:ला कशी ऐकू येत आहेत ते तपासून घेत होता. स्पीकरवरून मैदानाच्या सर्व कोपर्‍यांत त्यांचा आवाज कसा पोहोचतो आहे याची चाचपणी करत होता. मध्येच मला म्हणाला, “बॉबी, उस कोने में जाकर सुन ले कैसे सुनाई देता है. ” नंतर दुसर्‍या कोपर्‍यात त्यानं मला पाठवलं. मला त्यातलं काय कपाळ कळणार होतं? पण त्याची परफेक्शनची धडपड केवढी होती!!

आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गौरव दिवस हा एक कार्यक्रम सुरू केला. पहिल्या वर्षी आम्ही रवींद्र जैन यांना बोलावलं. दुसर्‍या वर्षी बावीस जानेवारी २००२ रोजी ते व मी बोलत होतो, तेव्हा त्यांना मी विचारलं की, ‘आपण यावर्षीचा गौरव पुरस्कार उस्ताद झाकीर हुसेन यांना देऊ या का?’ सरांनी माझ्याकडे आश्चर्यानं बघितलं व विचारलं, “तू जानता है उनको? एवढ्या थोड्या अवधीत ते येतील का?” मी आत्मविश्वासानं, “हो, मी ओळखतो आणि तो येईल. ” सर थोडे वैतागले, “अरे, इतने बडे आदमी को तू अरे तुरे क्या करता है? अकल नहीं है. ” मी सरांना म्हणालो, “तो माझ्या काकाचा मित्र आहे. ” सुदैवानं झाकीरकाकानं गौरव पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. पण तो म्हणाला, “२६ जानेवारीला मी परदेशात आहे. २ फेब्रुवारी चालेल का ते बघ. ” तो रविवार होता. सरांना विचारलं, “सर उत्तेजित झाले. म्हणाले, बिल्कूल चालेल. मध्ये पाचसहा दिवस होते आम्ही झाकीरजींच्या आगमनानिमित्त एक सुंदरसा कार्यक्रम आखला. बदलापूरच्या अंध मुलांच्या शाळेचा एक छोटेखानी कार्यक्रम आणि आमच्या मुलांचा शास्त्रीय गायन-वादनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला. आमच्या विवेक भागवतने छान तबला वाजवला. तो जेमतेम सेकंड ईयरचा विद्यार्थी. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मी या सगळ्या पोरांना घेऊन प्राचार्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा हा जागतिक कीर्तिचा पद्मभूषण तबलानवाज विवेकला बघून म्हणाला, “अरे, आओ उस्ताद आओ. ” विवेकला त्यांनी प्रेमानं जवळ घेतलं, पाठीवर थाप मारली, “कोणाकडे शिकतोस” असं विचारल्यावर त्यानं पैठणकरांकडे शिकतो असं म्हटल्यावर त्यानं पटकन विचारलं, “त्यांच्याकडे थेट तिरखवांसाहेबांचा तबला आहे, ते त्यांचे डायरेक्ट शिष्य आहेत. ” पैठणकरबुवांची व त्याची मी गाठ घालून दिली, तेव्हा त्यानं त्यांचे हात जवळ घेऊन कपाळावर लावले. आमच्या सचिन मुळ्येची आई कांचन मुळ्ये, ह्या पं. गजाननबुवा जोशी यांची कन्या. मी त्यांची ओळख करून दिल्यावर झाकीरकाकानं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. पं. गजाननबुवांनी अब्बाजींना म्हणजे उस्ताद अल्लारखांसाहेबांना त्यांच्या मुंबईतील प्रारंभीच्या काळात जी मदत केली होती, ती जाणून घेऊन त्याने तो नमस्कार केला. हे सर्व मला माहिती असण्याचं काही कारण नव्हतं, झाकीरकाकानं सर्वांसमोर ही वस्तुस्थिती सांगितली तेव्हा ते कळलं. याच कार्यक्रमाच्या वेळी एक अविस्मरणीय घटना घडली. झाकीरकाकाचा सत्कार झाला, त्या सत्काराला उत्तर द्यायला तो जेव्हा उभा राहिला तेव्हा समोर असलेले तीन साडेतीन हजार विद्यार्थी अगदी शांत बसले होते. आमचं कॉलेज उल्हासनगर स्टेशनच्या अगदी समोर आहे. कॉलेजच्या पुढच्या मैदानात कार्यक्रम सुरू होता. झाकीरकाका बोलायला जेव्हा उठला, तेव्हा अशी शांतता पसरली की आम्हाला रेल्वे स्टेशनवरची उद्घोषणा ऐकू यायला लागली. तो बोलायला प्रारंभ करणार तोच दूरवरच्या मशिदीतून अज़ान ऐकू येऊ लागला. झाकीरकाका स्टेजवर शांत उभा राहिला. स्टेज शांत, श्रोते शांत, आसमंत शांत आणि दूरवर ईश्वराची केली जाणारी आर्त आळवणी. सार्‍यांचा श्वास एक झाला होता. अजान संपला आणि झाकीरकाकानं बोलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला, तो श्वास संवेदनशील माईकनं पकडला, त्याचा आवाज सर्वदूर पसरला. समोरून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हे लिहितानाही माझ्या अंगावर काटा फुलतो आहे. साडे तीन हजार तरुण मनं आणि त्या मनांवर नकळत अधिराज्य करणारा एक महान कलावंत यांच्यातलं ते अद्वैत अद्भूत असंच होतं.

मी रवीकाकाबरोबर झाकीरकाकाच्या घरी अधून मधून जात असे. अम्मीच्या निधनानंतर आमचं जाणं येणं जरासं कमी झालं. एकदा अब्बाजींच्या बरसीच्या पूर्वी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही नेपीअन सी रोडवर त्याच्या घरी गेलो होतो. झाकीरकाका जेवायला ज्या टेबलावर बसायचा त्याच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लता मंगेशकरांनी सही करून दिलेला फोटो लावलेला होता. (आता घराचं रिनोव्हेशन झालंय) त्याखाली अब्बाजी, अम्मी आणि तरुण हसर्‍या चेहर्‍याचा झाकीर असा एक छान फोटो होता, त्याच्या खाली झाकीरकाकाच्या खांद्यावर हात टाकलेला पु. ल. देशपांडे यांचा फोटो होता. मी त्याला प्रश्न विचारला, “अब्बाजी आणि अम्मीबरोबरचा फोटो लावलाय हे कळलं. पण लता मंगेशकरांचा आणि पु. लं. बरोबरचा फोटो का?” तो उत्तरला, “लताजी तर साक्षात सरस्वतीचं रूप आहेत आणि पु. लं. सारखा रसिक आणि कलाकार कुठेही सापडणार नाही. ” मला अचानक आठवण झाली, आमच्या कर्जत गावात वनश्री ज्ञानदीप मंडळ होतं. त्यांनी पु. ल. देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या आरती प्रभूंची कविता या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आरती प्रभू त्यांच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या काळात कर्जतला कावसजीशेट काटपटपिटीया यांच्या चाळीत अक्षरश: आठ बाय दहाच्या खोलीत राहात होते. कार्यक्रम झाला व नंतर दुसर्‍या दिवशी पु. ल. व सुनीताबाई आमच्या घरी जेवायला आले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांचं माझ्या काकांना- मनोहर आरेकर यांना एक पत्र आलं. त्यात त्यांनी कर्जतच्या एकूण संयोजनाबद्दल आभार मानले आणि नंतर त्यात लिहिलं की, ‘कालच बालगंधर्वला झाकीरचा तबला ऐकला आणि त्यानंतर असं वाटलं की झाकीर जे वाद्य वाजवतो तो तबला. ‘ मी ती आठवण झाकीरकाकाला सांगितली. त्यानं मला पु. लं. चं वाक्य इंग्रजीत भाषांतरित करायला सांगितलं. मी म्हणालो, “P. L. says Zakir is the definition of Tabla. ” त्यानं पुन्हा एकदा ते वाक्य माझ्याकडून म्हणून घेतलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. तो कधीही त्याच्या भावनांचं प्रदर्शन करत नाही. त्या क्षणी तसं घडलं खरं.

कित्येकदा मला असं वाटतं, उद्या म्हातारा झाल्यावर माझ्या नातवंडांना या गोष्टी सांगत असेन, नातवंडं तोंडात बोटं घालून त्या गोष्टी ऐकत असतील. नंतर म्हणतील, “आजोबा. किती थापा मारता. ” मग मी हसेन, आणि मनातल्या मनात म्हणेन, “बाळांनो, खरं आहे. पृथ्वीवर गंधर्व येऊन गेले यावर सामान्यांचा विश्वास बसत नाही. ज्यांचं भाग्य होतं त्यांना ते गंधर्व पाहता आले. मी भाग्यवान आहे, मी या गंधर्वाला पाहिलं. “

समाप्त

लेखक : डॉ. नितीन आरेकर

nitinarekar@gmail. com

Tel:+91 880 555 0088

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares