मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पसारा…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ पसारा…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

शेजारणीने आवाज दिला म्हणून बायको कुकर लावून शेजारी गेली …. 

.. म्हणाली ३ शिट्या झाल्या की बंद करा गॅस .. वर टाकीतही पाणी भरतंय, लक्ष असू द्या .. मोटर बंद करा वेळेत …  मी म्हटलं हो ..

इतक्यात नळाला पाणी आलं .. लगेच धावत जाऊन बादली नळाखाली धरली धावताना शेंगदाण्याचा डबा उपडी झाला .. शेंगदाणे जमा करीतच होतो, इतक्यात कुकरची पहिली शिटी झाली .. अचानक झाली त्यामुळे दचकलोच .. 

झटकन मागे गेल्यामुळे दळून आणलेल्या पिठाची पिशवी कलंडली , आणि त्या सांडलेल्या पीठात कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, भाज्या, गोऱ्यापान झाल्या .. 

काय करावं ? सुचेना ….  

परत नळाखाली भरत असलेल्या बादलीची आठवण झाली. लगबगीने बादलीकडे गेलो तर अजून बादली भरली नव्हती … 

पुन्हा शिटी झाली … पटकन गॅस बंद केला. नंतर लक्षात आलं …  दुसरीच शिटी होती ती .. 

लाईटरने गॅस पेटवायला भीती वाटते .. मग माचीस घेतली .. १, २, ३ श्या ! माचीस काड्या फुकट गेल्या .. मग काय आधी कंटाळा केला ते केलं .. पंखा बंद केला … गॅस पेटवला .. 

आता सांडलेले पीठ उचलू, की पसरलेले शेंगदाणे भरू.. बादली भरत आली ते पाहू.. की वर पाण्याची टाकी किती भरली ते पाहू .. 

…. मी हैराण …काय करावं ? सुचेना 

आवाजावरून लक्षात आलं .. पाणी वाहून जातंय .. बादली भरून सांडत होती .. 

भरलेली बादली काढून दुसरी लावतोय .. तोच तिसरी शिटी झाली .. 

तसं धावत येऊन पंखा लावला .. मनात म्हटलं माझं डोकं फिरलंय नक्कीच .. 

सगळं सोडून आधी गॅस काढला .. इतक्यात पाणी वाहून जातंय असा आवाज .. वरची टाकी ओव्हर फ्लो … मोटर बंद केली …. 

पण या नादात पंखा जरा उशिराच बंद केला .. 

वाऱ्याने पीठ चांगलंच पसरलं, त्यात माझे ओले पाय … लादी चिकट.. बाप रे .. 

व्हायचा तो पसारा झालाच .. आता बायको ओरडणार, हे मनात आलं तोवर  बायको ही आलीच दारात.. काय करावं ? सुचेना 

झाला पसारा पाहून आता ही मला झापणार .. म्हणेल “ काय हो, किती हा पसारा ?”

पण ती मात्र एकच म्हणाली.. “ अहो, तुम्ही या बाहेर. मी आवरते सगळं. तुम्ही तुमचं काम करा.” 

एक टप्पा बॉल सारखा .. मी तडक किचनमधून हॉल मध्ये .. पण ह्या उडीत ही ओट्यावरची तेलाची बाटली कलंडलीच .. मी पुन्हा किचनमध्ये प्रवेश करणार तोच.. 

बायको पुन्हा त्याच स्वरात .. “राहू दे मी आवरते.”

मी सोफ्यावर शांत … चिडीचूप काय करणार ..?

…. पसारा का होतो याचे उत्तर मिळाले होते ना …….. 

(किती तो पसारा असं बायकोला कितीतरी वेळा ठणकावून विचारून नवरेशाही गाजवणाऱ्या त्या सर्व नवरोबांसाठी) 

लेखक – अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ।। एक होती राणी।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

??

।। एक होती राणी ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले

मला  माणसांशी बोलायला, त्यांच्याशी संवाद साधायला फार आवडतं आणि खरं सांगायचं तर ते जमतंही पटकन ! माणसं मनातल्या गाठी माझ्याजवळ उकलतात हे मात्र खरं. त्यादिवशी दवाखान्यात नुसतीच बसले होते. मनात दुसरेच विचार घोळत होते. इतक्यात एक बाई दवाखान्यात शिरली. मी नीट बघितलं तर ती एक तृतीयपंथी व्यक्ती होती.

“ दीदी,आप मुझे दवाई दोगी क्या? पेटमें बहुत दर्द हो रहा है “. ती कळवळून सांगत होती. मी तिला टेबलवर घेतले आणि नेहमीप्रमाणे तपासले. ‘ माझ्याजवळच्या गोळ्या लगेच घ्या ‘असं सांगितलं आणि घरी घ्यायला दोन दिवसाचं औषधही दिलं. पाण्याचा ग्लास पुढं केला आणि ‘ गोळ्या घ्या ‘ असं म्हटलं. तिने त्या गोळ्या घेतल्या आणि मी म्हटलं,” थोडा वेळ बसा इथं खुर्चीवर.अर्ध्या तासानंतर जा.बघूया किती कमी होतं ते हं.” मी तिला बसवलं आणि वाचनात गुंगून गेले.अर्धा तास सहज झाला. ती संकोचून म्हणाली, “दीदी मला  खूप बरं वाटायला लागलंय. खूप थांबलंय पोट दुखायचं. थँक्स दीदी “.ती स्वच्छ मराठीत माझ्याशी बोलत होती. “अहो,तुमचं नाव काय? कुठं रहाता? ” – “ दीदी, इथंच तर रहाते मी ! तुम्ही रोज स्कूटरवरून त्या शॉर्टकटने येता ना, मी रोज बघते तुम्हाला. आज खूप त्रास व्हायला लागला ना, म्हणून तुमची आठवण आली. नाहीतर कोणी डॉक्टर आम्हाला तपासायला तयार होत नाहीत. तुमचे खूप आभार ! “

मी म्हटले “ नाव काय म्हणालात तुमचं? ”  

“ राणी “ किती सुंदर होती राणी . नीट बघितल्याशिवाय समजणारही नाही हिच्यात असं काही कमी आहे.

 “ दीदी,किती पैसे झाले? “ 

 मी म्हटलं “ राहू द्या हो !मग बघू.”

” असं नको !आहेत माझ्याकडे.” ती संकोचून म्हणाली. 

मी म्हटलं, “ पुढच्या वेळी द्या नक्की. आज राहू दे. “ 

राणी खुशीनं हसली .तिचे अगदी एक ओळीत असलेले पांढरेशुभ्र दात चमकले.  हळूहळू राणी माझी नेहमीची पेशन्ट झाली. माझ्या दवाखान्यात बाकावर बसलेल्या इतर पेशन्टनाही  तिची सवय झाली होती.  किती अदबशीर वागणं होतं तिचं ! आपला नंबर येईपर्यंत ती टेबलावर ठेवलेली मासिकं वाचायची. माझ्या चौकस स्वभावानुसार मी हळूहळू तिची माहिती विचारायला लागले. 

राणीचं कुटुंब पुण्यातलंच ! मी जिथून शॉर्टकटने येते त्या वस्तीत तिची आई भाऊ त्याची बायका मुले सगळे एकत्रच रहातात. राणीचा भाऊ सिक्युरिटी गार्ड आहे. भावजय एका मॉलमध्ये नोकरी करते. राणी खरं तर एस.एस.सी.झालीय,  पण आपल्या इथले दुर्दैव ! तिला कुठेही नोकरी मिळाली नाही. पण राणी फार उत्तम शिवण शिवते. तिच्याकडे वस्तीतल्या सगळ्या बायका कपडे शिवायला टाकतात. निरनिराळे फॅशनेबल  ब्लाउज राणी इतके सुंदर शिवते की बस. वस्तीतल्या बायका तिच्याशी अगदी मैत्रिणीसारख्या वागतात. 

सहज एकदा तिला विचारलं, “ किती ग मिळतात महिन्याला पैसे?” 

” मिळतात की सहज दहा हजार रुपये ! “ ती म्हणाली. मी हे ऐकून गारच पडले. तशी राणी हसून म्हणाली, “ दीदी,तसं नाही. माझं शिवण बघून कॅम्पमधला एक माणूस मला शोधत आला. मला बघून म्हणाला, ‘अरे बापरे, तूच का ती राणी ?”  मी म्हणाले, “ हो मीच ! नेमकं काय काम आहे तुमचं माझ्याकडे ? “  तो म्हणाला, “ तुमचं शिवण फार छान आहे. मी तुम्ही शिवलेले ब्लाउज बघितले आहेत, माझ्या एका गिऱ्हाईकाने घातलेले ! तिने तुमचा पत्ता दिला ! पण ….” आणि तो माणूस क्षणभर काहीच बोलला नाही.  मग अवघडत म्हणाला .. “ पण तुम्हाला माझ्या दुकानात नोकरी नाही देऊ शकणार मी ! “ मग मीच आपणहून त्यांना म्हटलं ..  “भय्या, तुम्ही मला कटिंग करून आणून द्या, मी तुम्ही सांगाल तसे देईन शिवून. माझी ऍक्टिवा गाडी आहे. मी आणून पोचवीन की दुकानावर.” मी त्यांना नमुन्याचे ब्लाउज आणि ड्रेस शिवून दिले. तो इतका खूष झाला. आता माझ्याकडे त्याचे खूप काम असते. मला सहज दहा हजार रुपये मिळतात त्याच्याकडून. दीदी, मी आता फॅशन डिझाइन मशीनही  घेतली आहे मागच्या वर्षी ! “ किती अभिमानाने राणी सांगत होती. 

मला राणीचं अतिशय कौतुक वाटलं. मी दवाखान्यात जातायेता राणी दिसायची. रस्त्यावरच घर होतं त्यांचं ! राणी भांडी घासताना, केर काढताना दिसायची. तिची आई, शेजारणी, गप्पा मारताना दिसायच्या. राणी बाहेर टाकलेल्या खाटेवर बसून तिच्या भाचरांचा अभ्यास घेतानाही दिसायची कधीकधी. मला मोठं कुतूहल आणि कौतुक वाटायचं या कुटुंबाचं. मी राणीच्या आईला हळूहळू बोलतं केलं. राणीच्या आई फार साध्या, अगदी गरीब स्वभावाच्या होत्या. मी बिचकतच विचारलं, “ राणीच्या आई, असं मूल झाल्यावर तुम्हाला काय वाटलं हो? राग  नाही ना आला माझा? नाहीतर नका देऊ उत्तर.” — “ नाही हो बाय ! कसला राग आणि काय ! पहिला मुलगा माझा एकदम छान हो. त्याच्या पाठीवर  हे बाळ झालं. आम्ही घाबरूनच गेलो असलं मूल बघून. तो डॉक्टर म्हणाला, “ देऊन टाका याला कोणत्यातरी आश्रमात. तुमचं आणि त्याचं जिणं हराम होईल बघा.”  पण माझा जीव नाही झाला हो असं करायला. म्हटलं मी वाढवीन याला. कसाही असला तरी माझ्या पोटचा आहे ना हा. चार वर्षे होईपर्यंत मी मुलगा म्हणूनच वाढवला याला. पण मग मोठं झाल्यावर तो मुलाचे कपडे घालीचना. बहिणींचे फ्रॉक, स्कर्ट घालायचा. दिसायलाही किती सुंदर आहे तुम्ही बघताच की ! मग मी त्याला मुलींसारखा वाढवला. लै हाल काढलं लेकरानं शाळेत. पण झाला बघा एसएससी. पण नोकरी कोण देणार हो याला… पण देवानं बघा कशी कला ठेवली हातात. मस्त पैसे मिळवते राणी. आम्ही मोठ्या भावाचं लग्न करताना हेही सगळं आपणहूनच सांगितलं. त्या मुलीला याला भेटायला पण सांगितलं. तीही पोरगी इतकी गुणांची बघा, म्हणाली, ‘ मला आवडल्या राणीताई. मी एकत्र राहीन तुमच्या सगळ्यांबरोबरच. आणि बघा आता, आज किती वर्षे झाली, मोठ्या भावाला दोन लेकरं झाली. अजूनही आम्ही सगळे गुण्या गोविंदानं राहतोय बघा. तेवढं व्यंग सोडलं तर काय कमी आहे हो माझ्या राणीत? बायकांना मागं सारील अशी कामं करती माझी राणी. वस्तीत पण सर्वांना आवडती बघा. धावून जाती मदतीला लोकांच्या. तिचा मोठा भाऊ म्हणायचा, ‘राणीला सिग्नलला टाळ्या  वाजवून पैसे  मागताना नाही बघायची आपल्याला. तिला पायावर उभी करू आपण.’  कोणी चेष्टा केली तर हा धावून जायचा अंगावर. खूप केलं त्यानं राणीसाठी ! आता वस्ती धड वागती…  पण आधी? जिणं हराम केलं व्हतं आम्हाला याच लोकांनी. पण राणीनं सगळं निमूट सोसलं. आपल्या गोड स्वभावानं जिंकून घेतलं लोकांना. म्हणून आज उभी आहे मानानं. भाऊ भावजयीचा भक्कम आधार आहे तिला.” राणीच्या आई सांगत होत्या. क्षणभर थांबल्या आणि आवंढा गिळत म्हणाल्या, “ काय सांगू डाक्टरबाई, पन्नासवेळा आले हिजडे, आमचं आहे हे मूल, आम्हाला देऊन टाक. तिच्या भावाने मग पोलीस  कम्प्लेन्ट केल्यावर गेले बघा. खूप दिलाय त्रास त्यांनी पण हो. पण आता सगळं छान आहे. काळजी वाटतं हो की हिचं पुढचं आयुष्य कसं जाईल. पण भाऊ भावजय सांभाळतील नीट. खूप चांगले आहेत दोघे.”  राणीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाल्या,” असतात तुमच्यासारखी देवमाणसं पण जगात. तुम्ही नाही का, कोणत्याही चौकश्या न करता औषध दिलं त्या दिवशी ! राणी लै नाव काढती बघा तुमचं.” 

त्या दिवाळीला मी माझ्या मुलींचे दोन ड्रेस  राणीकडे शिवायला टाकले. राणी दवाखान्यात आली. म्हणाली, “ ताई,दोघींचे ड्रेस शिवून तयार आहेत. पण एक विचारू? मला तुमच्या घरी बोलवाल का? मला खूप आवडेल तुमच्या मुली, घर हॉस्पिटल बघायला. बोलवाल का?’ माझ्या पोटातच तुटलं. किती साधी अपेक्षा यामुलीची ! मी म्हटलं, “ अग त्यात काय ! ये की या रविवारी. मला सुट्टी असते ना तेव्हा.”  

ठरल्या दिवशी राणी आपल्या आईला घेऊन ऍक्टिव्हावरून ऐटीत आली. छान साडी, माफक मेकअप. माझ्या सगळ्या नर्सेस,आया बघतच राहिल्या. मी राणीला हॉस्पिटल दाखवलं, सगळ्या स्टाफशी ओळख करून दिली. राणी वर घरात आली. माझ्या देवघरात तिने डोक्यावर पदर घेऊन देवांना नमस्कार केला. माझ्या मुलींना जवळ बोलावलं आणि म्हणाली, ‘ बघा ग पोरीनो… आवडले का मावशीनं शिवलेले ड्रेस?”  त्यांनी तिला ते लगेच घालून दाखवले. काय सुरेख शिवले होते आणि किती सुंदर एम्ब्रॉयडरी केली होती राणीनं ! केवळ अप्रतिम ! माझ्या मुलींची अलाबला घेऊन म्हणाली, “ सुखात रहा ग पोरीनो. आई कसली, देवी आहे देवी तुमची आई ! माझी पण आईच आहे हो ही.” माझ्या बाईने केलेले पोहे ,लाडू आनंदानं खाल्लं दोघीनी. मी राणीला सुंदर भारी साडी आणि तिच्या आईलाही साडी दिली. डोळ्यात पाणीच आलं दोघींच्या. “ कशाला हो बाई? आमच्याशी इतकं चांगलं कुणीपन वागलं नाही हो आजपर्यंत ! तुम्ही खूप वेगळ्या आहात बाई ! देव तुम्हाला काही काही कमी नाही पडू देणार ! “ राणीच्या आईनी म्हटलं. “ अहो त्यात काय एवढं? माझ्या मैत्रिणींना नाही का मी देत? तुम्हीही नाही का माझ्या मैत्रिणी? आणि राणी लहान मैत्रीण !”  राणीनं माझं हॉस्पिटल हिंडून नीट बघितलं. पाळण्यातली लहान बाळं बघितली. आमच्या नर्सेस, आयांशी गप्पा मारल्या  आणि हसतमुखाने गेली सुद्धा.

सगळा स्टाफ हळहळला तिच्यासाठी ! “ बया,द्येव तरी कसा बाई अन्याय करतो हो एखाद्यावर ! किती हो गुणांची आहे तुमची राणी !”  आमची सिस्टर मनापासून कळवळून म्हणाली. 

याही गोष्टीला खूप वर्षे लोटली. नंतर राणीच्या भावाने ती जागा सोडली आणि ते मुंबईला गेले असं ऐकलं मी. अजूनही मला राणीची आठवण येते. कोणी तृतीयपंथी सिग्नलवर पैसे मागताना दिसला तर सांगावेसे वाटते…… 

…… “ अरे,त्या राणीचं उदाहरण घ्या रे ! बघा किती सन्मानाने जगतेय ती आयुष्य. देवानं एवढा अन्याय करूनही कधी तिने त्याला दोष नाही दिला.” …… अजूनही वाटतं कधीतरी …..  राणी अशीच समोर येऊन उभी राहील आणि विचारील, “ बाई, बऱ्या आहात ना? राणीला विसरला नाहीत ना?” आणि माझे डोळे माझ्याही नकळत पाणावतात राणीसाठी !

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रीमंत पदर… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? मनमंजुषेतून ?

☆ श्रीमंत  पदर… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आपल्या संस्कृतीत सोळा श्रृंगार सांगितले आहेत, त्यातील एक साडी परिधान करणे हा आहे. मग साडी म्हटलं की ओघाने पदर येणारच•••

पण राज्य बदलले की साडी तीच रहाते पण पदर घ्यायची पद्धत बदलते. कोणी डाव्या खांद्यावर घेतो कोणी उजव्या खांद्यावरून पुढे घेतो, कोणी त्याला चावीचा गुच्छा बांधून दुसर्‍या खांद्याच्या मागे सोडतो कोणी डोक्यावर घेतो कोणी दोन खांद्यावर कोणी डोक्याच्याही पुढे चेहर्‍यापर्यंत ओढतात तर कोकणी स्त्रिया चक्क कमरेला गुंडाळतात. कसेही कोणत्याही प्रकारचे पदर घेतलेले हे स्त्रीचे रूप नेहमीच मनाला मोहवित आले आहे. 

पण या पदराची किमया त्याच्यापुढे लावलेल्या क्रियापदामुळे कृष्णलीला वाटतात. या पदराच्या लीला काही पाहिलेल्या काही अनुभवलेल्या काही ऐकलेल्या एकत्र वाचायला नक्कीच मजा येईल.

दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेली उषा आईला म्हणाली आई हीच साडी तू घे. अगं पदर बघ किती छान आहे . युनिक आहे युनिक. 

नुकताच पदर आलेल्या म्हणजे पदरेकरीण झालेल्या आपल्या लेकीचं ज्ञान पदरात पडलं आणि तीच साडी आईने घेतली. 

जरी पदरेकरीण झाली असली तरी आईचा पदर धरून चालणे तिची सवयच होती. आईने पदर खोचून दिवाळीची सफाई केली.

दिवाळीच्या वेळेस आईने लक्ष्मी पुढे पदर पसरला म्हटली सगळ्या चुका पदरात घे आणि सगळ्यांचे सुख आरोग्य पदरात टाक गं आई. माझ्या पदरी निराशा नको येऊ देऊ.

आईचा जरतारी पदर भरून पावला होता जणू. पदरात मावेल एवढे दान मिळाल्याचा भास तिला झाला होता पण पदरात न मावेल एवढा आनंद उत्साह चेहर्‍यावरून ओसंडत होता.

त्याच उत्साहात दिवाळी संपली आणि आई उषाला म्हणाली आता पोरी तू मोठी झालीस. आता आईच्या पदरामागे लपणे, आईच्या पदराला तोंड पुसणे, शेंबुड पुसणे असे करायचे नाही. आता आपल्या पदराला आपणच जपायचे . पदर ढळू देऊ नकोस. पण जर कोणी पदराला हात घालू पाहील त्याला पदर झटकून वठणीवर आणायचे आणि मानानं पदर डोईवर घ्यायचा .  

हे काही पदरचं सांगत नाही. अगं समाजाची रीत आहे ही. 

आईच्या संस्कारामुळे उषाच्या जीवनाला पदर लाभत होते.एक एक पदर छान सुटून येत होते. दोघींचाही पदर फाटका नाहीये हे समजत होते.

स्वाभिमानाची शिकवण देताना आई म्हटली अंगी असेल ते काम अन् पदरी पडेल तो दाम करण्याची तयारी हवी. अगं पोरी पदरचे खावे पण नजरचे खाऊ नये.  नेहमी पदरचे खावे अन चौघात जावे उषा अजून मोठी झाली. तिच्यावर प्रेम करणारा तिच्या आयुष्यात आला आणि ती नकळत पदराशी चाळे करू लागली.आईच्या नजरेतून हे सुटले नाही. आई म्हटली आता त्याची तुझ्या पदराशी गाठ बांधली की होईल बाई जबाबदारीतून सुटका. जरा पदर फडकायला मोकळा होईल. 

तू तुझ्या मनाने त्याला निवडलं आहेस तर छान पदर अंथरून स्वागत कर त्याचं. त्याचे काही चुकले तरी शक्य तेवढे सावरून घेत ‘ पदरी पडलं अन पवित्र झालं ‘ म्हणायचं . एकमेकांचे होऊन रहाताना पदरी पडली झोड हसून केली गोड  म्हणत गुण्यागोविंदाने रहायचे.

आईचे  पाठ , शिकवण यातुन सुसंस्काराने न्हाऊन उषाच्या पदराशी त्याची गाठ पडली एकदाची. आयुष्याचा हा पदरही चांगला असल्याने ती कधी पदराची चवरी करून त्याची रिद्धी तर कधी पदराने वारा घालून त्याची सिद्धी होत होती. जरी सुखवस्तु कुटुंबात पडली असली तरी पदरपेशी होऊन जगणं तिला जमतच नव्हते तिला समजून घेणारा तिच्या पदरचा माणूस ; तिचा नवरा तिला काही कमी पडू देत नव्हता म्हणून गरजूंना ती पदरमोड करून मदत करत होती. चांगल्या मनाने केले तर पदरास खार पडणार नाही हे तिला माहित होते. पदर खर्च करून जणू स्वत:च्याच पदरात पुण्याचे माप घालत होती. 

त्यामुळे पदर गमावण्याचा प्रश्न नव्हताच. ती क्षम्य चुकांवर हसत पदर घालत होती. आईने सांगितल्या प्रमाणे पदर सावरत “ पदरचे द्यावे मग सांगावे “ या धोरणाने मदत करत जीवन जगत होती. सासरच्या कुत्र्याला सुद्धा अहो म्हणायचे या संस्कारातून ती कधीच एक पदरावर येत नव्हती. शिवाय आपला पदरही पाडत नव्हती. त्यामुळे नियतीच  पदरचं घालायला तिच्यापुढे ठेपली तेव्हा दैव आले द्यायला अन पदर नाही घ्यायला अशी तिची गत झाली नाही.  तोंडाला पदर आणि गावाला गजर तिच्या बाबतीत घडले नाही. कायम पदराची शुद्ध जपत पदरास खाच न पाडता ती समाधानाने रहात होती. म्हणूनच उषाच्या जीवनात सुवर्णपहाट येण्याची चाहूल तिला लागली होती. ती आई होणार होती. सातव्या महिन्यात ओटी पदरात भरून ती आईकडे बाळंतपणासाठी आली होती.  

आता ती सुखरूप प्रसूत झाली होती आणि चिमुकले बाळ तिचा पदर ओढत होते आणि त्या कान्ह्याला पदराखाली घेताना तिला पदराची महती समजली होती आणि असा श्रीमंत पदर लाभण्याचे भाग्य आपल्या पदरी आहे या जणिवेने तिच्या डोळ्याचे पदर ओलावले. 

जीवनाच्या चिरोट्याचा एक नाजूक पदर खुलला होता तो हृदयाच्या एका पदरात तिने लपेटून घेतला होता.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती ‘गुलाबी’ नोट !… लेखक – श्री रवी वालेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ ती ‘गुलाबी’ नोट !… लेखक – श्री रवी वालेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

काल ICICI मध्ये पैसे काढायला गेले होतो. फार नाही पण बऱ्यापैकी गर्दी होती. पैसे जमा करायला आणि  काढायला अशा दोन वेगवेगळ्या रांगा होत्या. सगळ्यांनाच लगीनघाई ! २०-२२ वर्षांच्या दोन-तीन चुणचुणीत मुली हा सगळा पसारा हसतमुखाने सांभाळत होत्या. रांगेत मोदी हा एक आणि मागच्या आठवड्यात पैसे नसल्याने झालेली तारांबळ हा दुसरा, हेच विषय सगळे चघळत होते. गुलाबी नोटेवरून हमखास होणारे विनोद होतेच. एकंदरीत झकास चालले होते.

सत्तरीच्या आत बाहेर असणारे ५-६ जण घाबरतच आत आले. बँकांमध्ये असणाऱ्या गर्दीविषयी टीव्हीवर येणाऱ्या बातम्या बघून धास्तावलेले असावेत (बहुतेक NDTV जास्तच बघतं असावेत !).

ह्या नव्या बँका त्यांच्या त्या भव्यतेने, इंटिरियरने अगोदरच कोणालाही बिचकाउन सोडतात. त्यात ते मधाळ इंग्रजीतले अगत्य ! जुन्या बँका कशा ‘आपल्या’ वाटायच्या ! टेबलाटेबलांच्या गर्दीतुन आपला-आपला ‘साहेब’ हुडकायचा आणि डायरेक्ट काम सांगायचं ! नमस्कार करायचीही गरज नसायची. एकदम घरगुती वातावरण अन् रोखठोक बोलणे !

‘ ऊद्या या ‘ 

‘ ह्याच नोटा मिळतील ‘

‘आम्ही काय गोट्या खेळतोय का? ‘

‘ घरी नाही छापत आम्ही ‘

‘ जा,हो, कमिशनरला जाऊन सांगा, असले छप्पन पायलेत ‘

— असा कसा स्वच्छ, आरस्पानी कारभार ! या नव्या बँका एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखेच नव्या पिढीलाही दबकुन वागायला लावतात, तिथे जुन्या पिढीचं काय !

मी लांबून त्या सगळ्या ग्रुपकडे बघत होतो. एकमेकांत चर्चा करून त्यांच्यातल्या एकाने धीर करून फॉर्म भरत असलेल्या एकाला काही विचारले, त्यानेही त्याचे हातातले काम थांबवून त्यांना एक फॉर्म आणून दिला. त्या फॉर्मचे सामुदायिक वाचन झाल्यावर ग्रूपमध्ये पुन्हा चर्चा झडली. मी अंदाज बांधला की या प्रत्येकाचे काम वेगवेगळे असावे. कोणाला पैसे भरायचे होते, कोणास नोटा बदलून हव्या होत्या, तर कोणाला पैसे काढायचे असावे. त्यांच्यातला जीन्स- टी शर्ट घातलेला एकजण धीटपणे सर्वांना सांभाळत होता. ( हे काका बहुधा बँकेतूनच रिटायर झालेले असावे ) तरीपण त्यांच्याही चेह-यावरचा गोंधळ काही लपत नव्हता ! सिनीयर सिटिझन्ससाठी वेगळी रांग असावी, अशा अंदाजाने आलेले ते, रंगीबेरंगी हाफपँटी न घालणाऱ्यांची तिसरी रांग चष्म्याआडून शोधत होते आणि ती काही सापडत नव्हती !

लोक येतच होते, रांग वाढतच होती. त्याचवेळी अजून  २-३ वरिष्ठ नागरीक बँकेत आले ! पहिल्या ग्रूपमधल्या दोन चतुर काकांनी लगेच एका रांगेत उभे राहून घेतले ! (फॉर्मचं काय ते नंतर बघू, नंबर तर लाऊन ठेऊ !)

गर्दी वाढलेली बघून, काचेच्या केबिनमधून ब्रँच मॅनजेर बाहेर आल्या. त्या सुद्धा पंचविशीच्या आत बाहेर ! (या नव्या बँका तिशीतच VRS  देतात का?) त्या गेल्या त्या डायरेक्ट या ग्रुपकडे ! २ मिनीटे बोलल्या असतील नसतील, सारी सिनीयर मंडळी निवांत सोफ्यावर बसली ! त्या ब्रँच मँनेजरने हाक मारून स्टाफमधल्या एका मुलीला बोलावले. ती आली. एकदम उत्साही आणि तरतरीत ! (या नव्या बँका बायोडेटात ‘चुणचुणीत’ आणि ‘तरतरीत’ हे शब्द असतील, तरच नोकऱ्या देत असावेत !)

त्या विशीतल्या पोरीने तिथेच त्यांच्या बरोेबर सोफ्यावरच  बसुन कोणाला फॉर्म देे, कोणाला चेक लिहून दे, कोणाची आयडी प्रूफवर सही घे, पेईंग स्लिप चेक कर असा झपाटा लावला ! एवढच नाही, मध्ये उठून ती खुद्द ‘रोकड’ सुद्धा या काका लोकांना सोफ्यावरच हातात आणून देत होती, कोणाच्या नोटा बदलून आणत होती !

१५ ते वीस मिनीटात तिने सगळ्या कामाचा फडशा पाडला ! सारे अवाक होऊन बघत राहिले !

१५-२० मिनीटात सगळ्या वरिष्ठांना वाटी लाऊन,जवळ जवळ २-४ लाखांची ऊलाढाल करून, २-४ कोटींचे पुण्य कमवून, ती कन्यका आपल्या स्वत:च्या जागेवर जाऊन कामाला भिडलीसुद्धा !.. रांगेतल्या कनिष्ठांचे माहित नाही, पण आम्ही (ना कनिष्ठ ना वरिष्ठ असे मधल्यामधले ) आदराने तिच्याकडे आणि असूयेने वरिष्ठांकडे बघतच राहिलो!

माझा नंबर आला, नोटा मिळाल्या. नवी दोन हजाराची नोट पहिल्यांदाच हातात आली होती ! नोट अपेक्षेपेक्षा छोटी होती, आणि खरं सांगू? खोटी वाटतं होती !  पण काहीही असो, पाकिटात व्यवस्थित बसली. छान वाटले ! पूर्वीची हजाराची नोट उनाडपणे पाकिटाबाहेर डोकवायची. ही नवी नोट निव्वळ दिसायलाच देखणी नव्हती, तर घरंदाज- शालिनही होती, तरतरीतही होती !

मला एकदमं त्या ओरीजनल ‘तरतरीत’ मुलीला भेटावसं वाटलं.

‘स्सर?’ मोठ्ठे डोळे माझ्यावर रोखत तिने प्रश्नार्थक चेहरा केला. तिटकारा किंवा तुसडेपणाचा भावही त्या निर्मळ चेहऱ्यावर नव्हता ! मी तिला वरिष्ठांसाठी तिने जे केलं आणि जी धावपळ केली, ते सगळ्यांना कसे आवडले, ते सांगितले. (आणि हो, थोडेसे  अस्पष्ट असे आभार ही मानले !)

‘अरे स्सरं! सालभर थोडी ऐसा करना पडता है? ये तो बस, हप्ता दस दिन की बात है ! और ऐसे समय पर सबको मदद करना अच्छा लगता है !’

घरी येईपर्यंत तिचे ते ‘अच्छा लगता है ‘ कानात, मनात घुमत होतं !

मोदीजींनी भारताची सर्वात जास्त किंमतीची नोट ‘गुलाबी’ का बनवली, याचा लख्ख उलगडा झाला !

या नव्या पिढीने आणि या असल्या ‘अच्छा लगता है!’ म्हणण्याऱ्या मुलीनेच त्यांना २०००ची नोट ‘Pink’ बनवायला भाग पाडले असणार !

जगलो-वाचलो तर एक दिवस मी पण ‘सिनीयर सिटिझन’ होईन, पण तेव्हा सुद्धा जेव्हा-जेव्हा दोन हजाराची नोट बघेन  तेव्हा-तेव्हा हे ‘अच्छा लगता है’ आठवेल आणि मी माझ्या नातवांना विचारेन, ‘ ही नोट ‘गुलाबी’च का आहे, माहितीये?

लेखक : रवि वाळेकर             

(ही नोट कधीकाळी रद्द होईल, असे हा लेख लिहिताना वाटलेही नव्हते!)

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग -2 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग-2 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

कविश्रेष्ठ इंदिरा संत

विदुषी दुर्गाबाई भागवत

अभिजात संगीत आणि काव्याच्या अभ्यासात मला नेहमीच प्रोत्साहन देणार्‍या पितृतुल्य, गुरूतुल्य अशा नाशिकच्या बाबा दातार आणि परिवाराने माझ्या पहिल्यावहिल्या स्वतंत्र ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटची आणि नंतर ‘रंग बावरा श्रावण’ अशा अनेक कॅसेट्सची निर्मिती केली. स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ असलेल्या दुर्गाबाईंच्या पवित्र हस्ते या कॅसेटचं उद्घाटन झालं. योगायोग म्हणजे आणीबाणीच्या काळी, नाशिकमधले माझे ‘निमंत्रक’ म्हणून बाईंनी, दातार परिवाराचा उल्लेख केला. गंमत म्हणजे दिलखुलासपणे बोलताना त्या एवढ्या रंगून गेल्या की, त्यांनी दीक्षित मास्तरांनी शिकवलेल्या ‘ सुखवी बहु केदार जनमन…’ या केदार रागातल्या बंदिशीत, शुद्ध निषाद आणि कोमल निषाद एकमेकांवर रेललेले असताना किती सुंदर सुरावट होते, ती गाऊनही दाखवली. 

आदरणीय कुसुमाग्रजांच्या सांगण्यावरून, दातार कुटुंबियांनी, इंदिराबाईंच्या बेळगांवी, ‘रंग बावरा श्रावण’ – निवड कुसुमाग्रजांची– भाग १ या कॅसेट – सीडीचा सोहळा प्रचंड उत्साहाने, इंदिराबाईंच्याच शब्दांत ‘कुबेरालाही लाजवेल’ अशा थाटात संपन्न केला. त्यादिवशी अक्कांच्या वक्तव्याची सुरुवात ‘आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस…’ अशी अत्यानंदाने झाली. या कार्यक्रमासाठी मुंबईहून बेळगांवला निघताना, अक्कांच्या सख्ख्या मैत्रिणीने, दुर्गाबाईंनी माझ्याजवळ इंदिराबाईंसाठी पत्रातून शुभेच्छा दिल्या… 

… “ लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आहे आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा, कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले तरी मनाने त्यात आहे बरं का !” अक्कांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाच्या तरी करंटेपणाने हुकले असले तरी, धीर देताना दुर्गाबाईंचे हे शब्द, थोरल्या बहिणीने पाठीवरून मायेचा हात फिरवल्यासारखे वाटतात आणि डोळ्यांत पाणी तरळते. मी बेळगांवहून परतताना माझ्या हाती दुर्गाबाईंसाठी पत्रोत्तर पाठवताना अक्का म्हणतात, “ मी पद्मजाला म्हटले, खरे म्हणजे साहित्यसृष्टीत दुर्गाबाईच माझा आधार आहेत. तो आधार त्यांच्या साहित्यावर आहे. तो नकळत मला कित्येक गोष्टी देतो. सूर्याचा प्रकाश किरणांतून आला तरी, तो जसा सर्व बाजूला एकदम फाकतो – तेजाळतो तसे तुमच्या बुद्धीचे आहे. तुमच्या प्रत्येक लेखनात हे दिसून येते.”

— अशाप्रकारे या ‘गार्गी – मैत्रेयी’च्या पत्रांचे पोस्टमन होण्याचे भाग्य मला लाभले !  

दुर्गा आणि इंदिरा ही देवीची दोन रूपंच ! एका दुर्गेने आणीबाणीच्या वेळी जो प्रखर दुर्गावतार धारण केला, त्याला तोड नाही. एकटं असूनही तिला कुणाचंही भय वाटत नसे. कुणालाही हार जाणे, शरण जाणे हे तिच्या स्वभावात नव्हतेच. शरीर जर्जर झाले, तरी अगदी मृत्यूलाही  त्यांच्या  ‘देहोपनिषदात’ त्या  ठणकावून सांगतात… 

‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत

भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे..।।

अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे… ।।

मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज

पायघडी देहाची ही घालूनी मी पाही वाट…

सुखवेडी  मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले…।।’

…. बाई गेल्यानंतरही त्यांच्या शांत, तेजस्वी चेहर्‍यावर ‘ देहोपनिषद सिद्ध झाले ’ हाच भाव होता.

इंदिराबाईंनी पती निधनानंतर अपार हाल सोसले, दुःख भोगलं. एकटेपणा जगतानाही, दैवाला दोष न देता, रडत न बसता, त्या ‘प्रारब्धाला’ही ठणकावून सांगतात….  

‘प्रारब्धा रे तुझे माझे, नाते अटीचे तटीचे,

हार जीत तोलण्याचे, पारध्याचे – सावजाचे.

जिद्द माझीही अशीच, नाही लवलेली मान,

जरी फाटला पदर, तुझे झेलते मी दान,

काळोखते भोवताली, जीव येतो उन्मळून,

तरी ओठातून नाही तुला शरण शरण….’

मला तर वाटतं, इंदिरा अक्कांची सात्त्विक, सोज्वळ कविता हा माझा ‘प्राण’ आहे, तर मला वेळोवेळी साहित्यतुषारात चिंब भिजवणाऱ्या आणि ‘देहोपनिषद’सारखा अपूर्व अभंग देऊन प्रथमच मला ‘संगीतकार’ म्हणून घडवणार्‍या दुर्गाबाईंचे दृढनिश्चयी, ओजस्वी विचार हा माझा ‘कणा’! दोघीही माझ्या जीवनातील  मोठे आधारस्तंभ ! त्यांची आठवण जरी झाली तरी त्याचा सुगंध, चंदनी अगरबत्तीसारखा कितीतरी वेळ माझ्या मनात दरवळत राहतो. दोघींच्या नितांत सुंदर लेखनाने, माझ्या आयुष्याला सुंदर वळण दिलं. गर्भरेशमी कवितेचा ‘ध्यास’ आणि ‘नाद’ दिला. सृजनाचा उत्कट आनंद घ्यायला आणि आयुष्य कसं जगावं, यातलं ‘अध्यात्म’ अनुभवायला शिकवलं… 

‘आत आपुल्या झरा झुळझुळे

निळा निळा स्वच्छंद,

जगणे म्हणजे उधळीत जाणे

हृदयातील आनंद !…’

— समाप्त —

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग -1 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग-1 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

कविश्रेष्ठ इंदिरा संत

विदुषी दुर्गाबाई भागवत

कविश्रेष्ठ इंदिरा संत आणि विदुषी दुर्गाबाई भागवत ही साहित्य क्षेत्रातली दोन उत्तुंग शिखरं ! या दोघींना पाहिलं, की मला नेहमी डॉ. आनंदी गोपाळ जोशी आणि पंडिता रमाबाई यांची आठवण होई. दोघीही तेजस्विनी, प्रखर स्वाभिमानी, ज्ञानी, मनस्वी आणि कर्तृत्ववान स्त्रिया ! परंतु दोघींनाही एकमेकींविषयी प्रचंड प्रेम आणि आदर ! दोघी एकमेकींपासून शरीराने दूर, पण मनाने एकमेकींना भेटण्याची असीम 

ओढ ! जीवनाविषयी या दोघींना अपार कुतूहल, उत्सुकता आणि प्रेम !

इंदिराबाई आणि दुर्गाबाई या खरंतर माझ्या आजी शोभतील, अशा वयाच्या. पण या दोघींचा मला स्नेह, सौहार्द, आशीर्वाद लाभला आणि माझं भाग्य मला ऐश्वर्यवंत करून गेलं! इंदिरा आणि दुर्गा लक्ष्मीचीच नावं. दोघी सात्त्विक आणि निर्मळ मनाच्या. साधं असणं, साधं वागणं, साधं बोलणं दोघींची सहजप्रवृत्ती ! या द्वयींच्या सहवासात वाटायचं, जणू प्राजक्ताच्या झाडाखाली मी बसलेय आणि धुंद गंधाच्या प्राजक्ताचा माझ्यावर अभिषेक होतोय ! यांच्याकडून किती टिपू आणि काय काय टिपू असं व्हायचं. ज्ञान टिपून घ्यायच्या बाबतीत दोघींचीही हीच अवस्था…. 

‘मी भुकेला सर्वदाचा, भूक माझी फार मोठी,

मंदिरी या बैसलो मी, घेऊनिया  ताट वाटी

ज्ञानमेवा रोज खातो, भूक माझी वाढताहे

सेवितो आकंठ तरीही, मी भुकेला राहताहे…’

वयाच्या नव्वदीतही, दुर्गाबाई त्यांच्या शरीराला न पेलवणाऱ्या वजनाच्या ग्रंथाचे भाषांतर करण्यात गर्क ! ‘मला अजून भरपूर काम करायचंय’ ही प्रचंड उमेद ! जगातली सर्वांत ‘आनंदयात्री मीच’ ही भावना  ! दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ ! जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा वाढदिवसासारखाच साजरा करावा आणि ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे’ हे जीवनाचं तत्त्व ! ९०व्या वर्षीही बाईंची बुद्धी तल्लख ! आणीबाणीविरुद्ध जनजागृती करताना, त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला होता, हे सर्वश्रुत आहेच. प्रखर सूर्याचं तेज त्यांच्या वाणीत होतं, तर मृदुभाषी इंदिरेच्या लेखनात चंद्रकिरणांकुरांची ‘शांताकार शीतलता’ होती. दोघींच्या नात्याची वीण मात्र जाईजुईच्या गुंफलेल्या गजऱ्यासारखी घट्ट होती !

‘ प्रत्येक साहित्यकृतीच्या निर्मितीत वाचकाचा, मूळ निर्मात्याइतकाच सहभाग असतो,’ अशी दुर्गाबाईंची श्रद्धा होती. ‘ खरी डोळस मेहनत वाया जात नाही. प्रत्येक अभ्यासकाने किंवा संग्राहकाने आपली कुशाग्र बुद्धी पणाला लावून, स्वतःच्या दृष्टिकोनातून आपली कृती साध्य करावी. प्रत्येकाची कुवत मर्यादित असते. पण एखाद्याने ती सीमारेषेपर्यंत ताणली तर स्वतंत्र कृती निर्माण होते आणि कर्त्याला अपार मानसिक समाधान देते;’ असे त्यांना वाटे. दुर्गाबाईंच्या अशा अनुभवांचा मला कविता गायनात खूप उपयोग झाला..

दुर्गाबाईंना कर्मकांडापेक्षा ‘कर्मयोग’ महत्त्वाचा वाटे. ध्यासी हे प्यासी, पर्यायाने कर्मयोगीच असतात. त्यांची पिपासा जगाला कल्याणकारीच असते. आपलं काम निष्ठेनं, भक्तीनं केलं तरी खूप झालं. परखड तसेच विचारपरिप्लुत व लालित्यपूर्ण लेखन करणार्‍या दुर्गाबाईंनी, आपल्या लेखनात अगदी पाककृतींपासून ते साहित्यसंस्कृती, समाजकारण, वैचारिक लेखन, राजकारण, प्राचीन इतिहास, अशा अनेक प्रांतांत लीलया संचार केला.

दुर्गाबाईंचे स्त्रीविषयक तर्कशुद्ध विचार आजच्या आणि उद्याच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरू शकतील. त्यांना ‘स्त्रीमुक्ती’ चळवळीचे अतिरेकीपण मान्य नव्हते. एकदा तर त्या मला म्हणाल्या, “अगं पद्मजा, रात्री अपरात्री दार वाजलं तर प्रथम आपण घरातल्या पुरुषासच पुढे पाठवतो ना?”  पण स्वतःच्या हिंमतीवर जगणार्‍या कर्तृत्ववान स्त्रियांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. कामाठीपुऱ्यातल्या स्त्रियांसाठी काम करताना अनेकदा त्यांना शिव्याशापांनाही  सामोरे जावे लागले. स्त्रीच्या आयुष्यातील निराशा, अडचणी, त्यांनी अचूक हेरल्या होत्या. 

इंदिराबाईंनाही स्त्रीची ही व्यथा व्याकूळ करते. एका अल्पाक्षरी कवितेत हे ‘वैश्विक सत्य’ त्या अगदी सहजपणे मांडतात…

‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,

गुलबाशीच्या  फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो…

काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यांत

एवढेच बोलली ती, घागरीला हात देत….’

इंदिराबाईंच्या मते कविता वाचन म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद लुटणे नव्हे. कविता वाचनात वाचकही निर्मितीक्षम असतो, असायला हवा. तरच त्या कवितेतील सूक्ष्म असलेले, मोलाचे काही उलगडता येईल. 

इंदिराबाईंच्या काव्याविषयी कविवर्य ग्रेस यांनी मला एकदा पत्रात लिहिले होते,

‘दिन डूबा, तारे मुरझाए,

झिसक झिसक गई रैन,

बैठी सूना पंथ निहारूँ,

झरझर बरसत नैन…’

मीरेची एकट एकाकी विरही वेदना, मराठीत अस्सल आत्मतत्त्वाच्या करांगुलीवर जर कोणी तोलून धरली असेल तर ती इंदिराबाईंनीच ! 

‘दुखियारी प्रेमरी, दुखड़ा रो मूल,

हिलमिल बात बनावत मोसो, 

हिवडवा (हृदयात) में लगता है सूल.’

“इंदिराबाईंच्या वेदनेचा हा काटा, पद्मजाबाई तुमच्या गळ्याला गायिका म्हणून नक्कीच झोंबला असणार….”  — ग्रेस. 

“चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत..” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात. त्यांची कविता आत्मस्पर्शी व आत्मभान असलेली आहे. ती वाचतानासुद्धा दुर्गाबाईंच्या लेखनासारखी चित्ररूपच कायम डोळ्यांसमोर येते. 

इंदिरा अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे, निसर्गातील कुठल्याही ‘अजीव’ गोष्टीतही त्यांना ‘चैतन्य’ दिसतं. निसर्गावर तर दोघींचंही प्रचंड प्रेम ! दुर्गाबाईंच्या ‘ऋतुचक्र’, ‘निसर्गोत्सव’, ‘दुपानी’ किंवा इतर लेखनातही हा निसर्ग जिवंत उभा राहतो. अक्कांच्या संवेदनशील मनानं ‘वंशकुसुम’ हा संग्रह तर चक्क पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय. फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं, तशी त्यांची कविता एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. ‘ दवबिंदूला स्पर्श करताच तो फुटून जाईल की काय या भीतीनं कवितेतील ‘कवितापण’ जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता हे कवीचं बाळच असतं.’.. ही त्यांची हळुवार तरल भावना. 

पती ना. मा. संत निवर्तल्यावर अक्कांनी व्रतस्थपणे लिहिलेली एक कविता… 

‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ

आणि चंद्र चांदण्यांचा दूर पोचतो ओहळ… 

पेट घेई मध्यरात्र, पेटे काळोखाचे जळ

दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ….’

यातील ‘तुळस वेल्हाळ’ हे शब्द म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच जणू ! अशा या सत्त्वशील योगिनींचा मला सुगंधी सहवास लाभला, हे माझे महत्भाग्यच ! 

— क्रमशः भाग पहिला. 

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तिचं मंगलपण…” भाग-2 ☆ सुश्री मृणालिनी चितळे ☆

सुश्री मृणालिनी चितळे

??

☆ “तिचं मंगलपण…” भाग-2 ☆ सुश्री मृणालिनी चितळे 

गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर

(करोना काळात  घराघरातून सॅनिटायझरने भाज्या, फळे धुतली गेली नि करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तशी ही कृती विस्मृतीत गेली. मंगलताई मात्र कटाक्षाने स्वयंपाकघरातील विज्ञान कायम आचरणात आणत आहे.) इथून पुढे —

प्रत्येक गोष्टीचा वापर… पुनर्वापर 

होता होई तो, एकही गोष्ट वाया घालवायची नाही आणि पर्यावरणाला हानी पोचेल असं काही करायचं नाही याचा वसा तिनं घेतला आहे. त्यासाठी तिच्यातील कलागुणांना तिनं कल्पकतेची जोड दिली आहे. सभासमारंभात मिळणाऱ्या शालींचे  मुलांसाठी गरम कोट स्वत: शिवून अनेकांना भेट दिले आहेत. लहान मुलांसाठी कपडे शिवताना कपड्यांना ती अस्तर अशा खुबीने लावते की त्याची शिवण अजिबात टोचू नये. साडीबरोबर येणाऱ्या डिझाईन्सच्या ब्लाउज पिसमधून नातींसाठी झबली, परकर पोलकी शिवली आहेत. नुकतंच तिनं मला मायक्रोव्हेवमध्ये ठेवून गरम करता येईल असं हिटिंग पॅड भेट दिलं. आयताकृती कापडाला कप्पे करून त्यामध्ये धान्य भरल्यानंतर ते शिवून टाकले होते. मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्यावर हे पॅड त्यातील धान्यासह गरम होते आणि बाहेर काढून मस्त शेक घेता येतो. हे पॅड कुणाकडे तरी पाहून तिनं बनवलं असलं तरी ते बनवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि सुबकता वाखाणण्याजोगी आहे. लॉक डाऊनच्या सुरवातीला जुन्या मऊ साड्या वापरून, तिनं तीन पदरी मास्क बनवले. अगदी एन ९५ मास्क इतकेच सुरक्षित ठरावेत असे. दरवर्षी राख्या ती स्वत: बनवते. एकदा तिच्या राहत्या इमारतीच्या वरती मधमाशांनी पोळी केली. माणूस बोलवून तिनं पोळी तर उतरवलीच पण त्यानंतर स्वच्छ कापडानं मध गाळून घरोघर वाटण्याचा उपद्व्याप केला. घरात नवा फ्रिज घेतल्यावर त्याचं भलं मोठं खोकं टाकून न देता नातींना खेळायला दिलं. नातींनी त्यामध्ये दारखिडक्या कापून एक झोपडी बनवली. उरलेल्या कचऱ्यातून मंगलताईनं झोपडीच्या दारांसाठी कड्या – नातींच्या शब्दात ‘क्लेव्हर बोल्ट.’ बनवले. आजीनातींचा खेळ अजूनही रंगला असता, परंतु दिवाणखान्यात ती झोपडी इतकी मध्येमध्ये यायला लागली की तिला आपल्या घरी घेऊन जाण्याचा वटहुकुम जयंतरावांना काढावा लागला. अलीकडे ते थकल्यामुळे पायी फिरायला बाहेर पडलं की त्यांना मध्येमध्ये बसावं लागे. वाटेत बाक असत, पण त्यांची उंची कमी असल्याने ते सोयीचे ठरत नसत. मंगलताईनं लगेच यावर तोडगा काढला. घरच्या उशीला पट्टा शिवला. पर्सप्रमाणे ती उशी स्वत:च्या खांद्याला लटकवून फिरायला जाण्यात खंड पडू दिला नाही.   

 

लेखन… वाचन… सामाजिक बांधिलकीचं भान…

जयंतराव आणि मंगलताई दोघांनाही अभिजात साहित्याची विलक्षण जाण आहे आणि आवडही. त्यांच्या दिवाणखान्यातील कपाटं पुस्तकांनी खचाखच भरलेली असतात आणि टीपॉयवर पुस्तकं नि मासिकं ढिगानं रचलेली असतात. दोघांनी विपुल लेखन केलं आहे. मंगलताईनं तिच्या लेखनातून आपल्या समाजातील चुकीच्या प्रथापरंपरांवर अनेकदा टीका केली आहे तर कधी अनेक गोष्टींमागचं विज्ञान उलगडून दाखवलं आहे. जयंतरावांनी लिहिलेल्या ‘आकाशाशी जडले नाते’ या ग्रंथांचे तिनं इंग्रजीत भाषांतर केले आहे. दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली, हे निश्चित ! तिला आवडलेली पुस्तकं अनेकांपर्यंत पोचावी, या उद्देशानं, ती पुस्तकांच्या प्रती विकत घेऊन ग्रंथालयांना भेटीदाखल देते. लेखनवाचनाइतकाच शिक्षकी पेशा तिच्या रोमारोमात भिनला आहे. तिचं वैशिष्ट्य असं की पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवताना तिला जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद पहिली दुसरीतल्या मुलांना शिकवताना मिळतो. काय शिकवतो यापेक्षा आपण जे शिकवतो ते समोरच्यापर्यंत पोचणं तिला महत्वाचं वाटतं. आत्तापर्यंत आर्थिक कमकुवत गटातील असंख्य शाळकरी मुलांना तिनं तन्मयतेनं शिकवलं आहे. अनेकांना शिक्षण, आजारपण यासाठी मदत केली आहे, परंतु लग्नखर्चासाठी म्हणून कुणी पैशाची मागणी केली तर ती नाकारण्याइतका सडेतोडपणा तिच्यापाशी आहे.

 

आजाराशी दोन हात

विविध आघाड्यांवर कार्यरत असताना १९८६ साली वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी कॅन्सरशी सामना करायची वेळ तिच्यावर आली. शरीरमनाची ताकद खच्ची करणाऱ्या आजाराला तिनं खंबीरपणे तोंड दिलं. त्यानंतर १९८८ साली आणि अलीकडे २०२१ आणि २०२२ साली त्यानं परत डोकं वर काढलं. प्रत्येक वेळी आपली सारी व्यवधानं सांभाळत अपराजित वृत्तीनं ती लढली आहे. आजही लढत आहे. तिच्या तिन्ही मुली आणि जगभर विखुरलेले असंख्य सुहृदजन तिची काळजी घेत आहेत. तिची हिंमत पाहून स्तिमित होत आहेत. 

मंगलताईच्या व्यक्तिमत्वाचं एका शब्दात वर्णन करायचं ठरवलं तर ओठावर शब्द येतो, ‘सहजता’. सहजता हाच तिच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव आहे. एकाच वेळी ती करत असलेल्या असंख्य गोष्टी पाहून बघणाऱ्याला वाटतं हे सगळं सहजसोपं असतं म्हणून. कारण हे सगळं करताना आपण खूप काही करतोय असा तिचा भाव नसतो नि अभिनिवेशही. असते ती तिची गणिती बुद्धी आणि कलावंताची मनस्वी वृत्ती. त्यामुळे काळ, काम वेगाचं व्यस्त गणित ती बिनचूक रीतीनं सोडवू शकली आहे. तिच्या वाट्याला आलेली प्रश्नपत्रिका नक्कीच सोपी नव्हती. कठीण प्रसंग… अवघड माणसं तिच्याही आयुष्यात आली. परंतु रडतकुढत न बसता सगळ्यांना तिनं व्यवस्थित कोष्टकात बसवलं. तिच्या बोलण्यात स्पष्टपणा असतो, तेवढाच मायेचा ओलावाही. शिस्त असते, पण शिस्तीची धास्ती वाटावी इतकी कठोर ती कधीच नसते. यातच तिच्या व्यक्तिमत्वातील ‘मंगलपण’ सामावलेलं आहे. 

***समाप्त***

© सुश्री मृणालिनी चितळे

मोबाईल ९८२२३०१७५० 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तिचं मंगलपण…” भाग-1 ☆ सुश्री मृणालिनी चितळे ☆

सुश्री मृणालिनी चितळे

??

☆ “तिचं मंगलपण…” भाग-1 ☆ सुश्री मृणालिनी चितळे 

गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर ! विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची पत्नी. माझी आत्ते नणंद. माझ्यापेखा पंधरा वर्षांनी मोठी, परंतु तिच्याशी गप्पा मारताना, ना कधी तिच्या बुध्दिमत्तेचं आणि प्रसिद्धीचं वलय आड येतं, ना वयातील अंतर. गप्पांच्या ओघात आपण मैत्रीच्या पातळीवर कधी उतरतो हे कळत नाही. हा माझ्या एकटीचा नाही, तर तिच्या सहवासात येणाऱ्या अनेकांचा अनुभव. नुकतीच १७ मे रोजी वयाची ८० वर्षे तिनं पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने तिच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची एक झलक.

गणित म्हणलं की भल्याभल्या हुशार लोकांना धडकी भरते, परंतु गणिताविषयी जन्मजात प्रेम असणाऱ्या मंगलताईसारख्या व्यक्तींच्या दृष्टीनं गणित म्हणजे नुसती आकडेमोड नसते तर पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी वहिवाट असते. या संबंधीची तिच्या लहानपणची एक आठवण. एकदा हौसेनं ती पुऱ्या तळायला बसली होती. तिला कुणीतरी काही विचारलं असता ती पटकन म्हणाली, “मध्ये बोलू नकोस, माझे आकडे चुकतात. पुरी तेलात टाकल्यावर सहा आकडे मोजून झाले की मी उलटते आणि बारा आकडे मोजून झाले की तेलातून काढते. त्यामुळे सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात आणि पाहिजे तेवढ्या खमंग होतात.” आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी अंकगणितामध्ये बसवायची आणि अचूक पद्धतीनं करायची तिला अशी लहानपणापासून आवड होती. 

मंगलताई ही पूर्वाश्रमीची मंगल राजवाडे. शालेय जिवनापासून अनेक बक्षिसे मिळवत ती एम.ए. झाली. मुंबई विद्यापिठात सर्वप्रथम आली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेमध्ये तिनं संशोधनाला सुरवात केली, परंतु तिच्या करिअरला यू टर्न मिळाला तो १९६६ साली जयंतरावांशी झालेल्या विवाहामुळे. जयंतरावांनी तरुण वयात फ्रेड हॉईल यांच्याबरोबर केलेल्या संशोधनामुळे जगप्रसिध्द शास्त्रज्ञ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होते. लग्नानंतर केंब्रिजमध्ये तिनं संसाराचे प्राथमिक धडे गिरवताना गणित विषयातील अध्ययन चालू ठेवले. तिची हुशारी बघून चर्चिल कॉलेजमध्ये टीचिंग फेलोशिपसाठी तिचं नाव सुचवलं गेलं, परंतु जयंतरावांना विविध देशांमध्ये व्याख्याते म्हणून निमंत्रित केलं जात असल्याने हा प्रस्ताव तिनं नाकारला. पुढे १९७२ साली भारतात परत येण्याचा निर्णय दोघांनी मिळून एकमताने घेतला. त्यामागे आपल्या मातृभूमीविषयी वाटणारं प्रेम तर होतंच शिवाय आपल्या वृध्द आईवडलांची जबाबदारी घ्यायला हवी ही जाणीव होती आणि आपल्या मुलींवर भारतीय संस्कार व्हावेत अशी इच्छाही. भारतात आल्यावर जयंतरावांनी टीआयएफआरमध्ये संशोधन आणि अध्यापनाचे काम सुरु केले. मंगलताईनं तिचं पीएच. डी. चे काम हाती घेतलं. १९८१ साली संश्लेषात्मक अंक सिध्दांत या विषयात पीएच. डी. मिळवली आणि पदव्युत्तर आणि एम. फिल.च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम सुरू केलं. अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणितगप्पा, गणिताच्या सोप्या वाटा यासारखी पुस्तकं लिहिली. ही झाली तिची औपचारिक ओळख. कुणाही कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या व्यक्तीची असते अशी; परंतु मंगलताईचं वैशिष्ट्य असं की गणितामुळे आत्मसात केलेलं तर्कशास्त्र आणि जयंतरावांच्या सानिध्यात वृध्दिंगत झालेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तिनं जपला. 

स्वयंपाकघर नव्हे प्रयोगशाळा

अनेकदा वेगवेगळ्या देशांत राहायची संधी मिळाल्यामुळे तेथील पाककृती तिनं शिकून घेतल्या. त्या जशाच्या तशा बनविण्यात ती वाकबगार आहे. चाळीस वर्षांपूर्वी तिच्या विदेशी पाककृतीसाठी लागणारे मालमसाले सहजगत्या उपलब्ध व्हायचे नाहीत. तेव्हा त्यांच्या योग्य देशी पर्याय तिनं निवडले. मॅपल सिरप ऐवजी वेगवेगळ्या स्वादाची काकवी. ओरॅगॅनोऐवजी ओव्याची ताजी पानं तर चीजकेकसाठी पनीर. ‘हर्बल टी’ बनविण्यासाठी बागेतील फुलापानांचा वापर ती करते, तेव्हा ते खाण्यायोग्य आहेत यांची शहानिशा केल्यावरच. घरच्या कुंडीत वाढलेली मोहरीची कोवळी रोपं सँण्डविच आणि सॅलेडमध्ये घातल्यावर स्वाद वाढविणारी कशी ठरतात याचा अनुभव मी तिच्याकडे घेतला आहे. बटाटेवड्याचं सारण हरबरा डाळीच्या पिठात बुडवून तळण्याऐवजी उडदाची डाळ भिजवून, वाटून त्याच्या पिठात बुडवून तिनं तळले तेव्हा वड्यांची चव अफलातून लागत होती. कुठेतरी वाचलेले किंवा कुणाकडे तरी खाल्लेले पदार्थ लक्षात ठेवून त्यात यथायोग्य बदल करण्याची प्रयोगशीलता तिच्याकडे आहे. रोजचा स्वयंपाक करताना किंवा पाहुण्यांसाठी बनवतानाही त्यामध्ये पिष्ठ, प्रथिन, स्निग्ध पदार्थांचा समतोल साधण्याचा तिचा प्रयत्न असतो. ठरावीक मोसमात मिळणारी फळं वर्षभर खायला मिळावीत यासाठी त्यावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करण्यात ती पटाईत आहे. एकदा तिच्या नेहमीच्या फळवाल्यानं ती मोठ्या प्रमाणात संत्री कशासाठी नेते म्हणून कुतूहलानं विचारलं. तेव्हा संत्र्यापासून बनवलेल्या मार्मालेडची बाटली तिनं त्याच्या मुलांसाठी भेट दिली. एवढंच नाही तर बियांमधील पेप्टीनचं महत्त्व त्याला सांगायला ती विसरली नसणार. कच्च्या पालेभाज्यांचा वापर करताना त्या पूर्णपणे निर्जंतुक करण्यासाठी पोटॅशियम परमँगनेटचा वापर ती करते. पोटॅशियम पाण्यात टाकलं की पाण्यातील प्राणवायू शोषून घेते. त्यामुळे त्या पाण्यात भाज्या बुडवून ठेवल्या की कीड मरून जाते, शिवाय पोषण मूल्य अबाधित राहते हे त्यामागचं शास्त्र! करोना काळात  घराघरातून सॅनिटायझरने भाज्या, फळे धुतली गेली नि करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तशी ही कृती विस्मृतीत गेली. मंगलताई मात्र कटाक्षाने स्वयंपाकघरातील विज्ञान कायम आचरणात आणत आहे. 

— क्रमशः भाग पहिला

© सुश्री मृणालिनी चितळे

मोबाईल ९८२२३०१७५० 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शाळेतील हुशार “पंचकन्या” ☆ सुश्री प्रभा सोनावणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

??

☆ शाळेतील हुशार “पंचकन्या” ☆ सुश्री प्रभा सोनावणे 

मी १९७३ ला अकरावी पास झाले, या वर्षी आम्ही एस.एस.सी.होऊन पन्नास वर्षे होत आहेत म्हणून शाळेत गेटटुगेदर करायचं ठरवतोय ! त्या निमित्ताने चार तुकड्यातील मिळून १७३ विद्यार्थी /विद्यार्थिनींची यादी शाळेत मिळाली ! त्यातील आम्ही पन्नासजण आधीच एका what’s app group वर २०१५ पासून एकत्र  आहोत ! आम्ही विद्याधाम प्रशाला -शिरूर जि.पुणे चे विद्यार्थी !

आत्ता या १७३ पैकी सुमारे शंभरजण एका what’s app group वर एकत्र आलोय ! मुलांपैकी  सुभाष जैन, डॉ. मारूती ढवळे, ऍडव्होकेट ओमप्रकाश सतिजा हे शालांत परीक्षेत अनुक्रमे पहिले ,दुसरे, तिसरे आलेले ! बँकेत ऑफिसर–नंतर वकिली आणि इतर स्वतंत्र व्यवसाय ! दुसरा एम.बी.बी.एस.डॉक्टर , तिसरा वकील आणि इतरही स्वतःची स्वतंत्र ओळख असणारे तिघे !`

आज मी लिहिणार आहे ते आमच्या बॅचच्या हुशार मुलींबद्दल ! त्या अकरावी अ मधल्या… माधुरी तिळवणकर, निर्मला गुंदेचा, शारदा मुसळे, शशी जोशी आणि फैमिदा शेख, या मुळातच हुशार,बुद्धिमान मुलींबद्दल !

वरील  पंचकन्याही हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ! माधुरी तिळवणकर ही नेहमीच गणितात शंभर पैकी शंभर मार्कस् मिळविणारी म्हणून माझ्या लक्षात राहिलेली ! निर्मला गुंदेचा पण खूप हुशार,या दोघींचा नेहमीच आमच्या अ तुकडीत पहिला दुसरा नंबर असायचा. चढाओढ या दोघींच्यातच पण त्या अगदी सख्ख्या मैत्रीणी, आजही त्यांची मैत्री टिकून आहे ! निर्मल अहमदनगरला असते ! माधुरी पुण्यात.  एस.पी.काॅलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यावर लगेचच तिला सरकारी नोकरी लागली ! खरंतर ती आयएएस वगैरे होण्याच्या गुणवत्तेची. पण लग्नानंतर पतीच्या सांगण्यावरून नोकरी सोडली !

आत्ता माधुरी स्वतःबद्दल म्हणते – ” शाळेत  बरी होते.  पण.घरासाठी  सरकारी नोकरी  सोडली. नंतर आयुष्य  बरे गेले पण फारसे यश मिळाले नाही. हा आपल्या  नशिबाचा भागआहे ..जीवनात  समस्याना तोंड  देत जगावे लागते. आयुष्यात नियोजन  कमी पडले, त्यात आजारपणाचे कारण झाले.असो…..” 

इतकी विनयशीलता पाहून मन भरून आलं म्हटलं, ” माधुरी तू शाळेत बरी नाही उत्कृष्ट होतीस !”

आमच्या प्रगती पुस्तकावर “बरा” तर तिच्या प्रगतिपुस्तकावर “उत्कृष्ट” शेरा असायचा  

निर्मल गुंदेचाचंही लवकरच लग्न झालं पण तिने लग्नानंतर बी.काॅम. एम.काॅम. केले. टेलिफोन एक्सचेंजमधे नोकरी केली, आता सेवानिवृत्त ! शशी आणि शारदा या सुद्धा क तुकडीतल्या हुशार,  स्कॉलरशिप मिळविणा-या ! अकरावीत अ तुकडीत गेलेल्या ! अकरावी अ मध्ये “फिजिक्स केमिस्ट्री” हा विषय घेणारे सगळेच हुशार विद्यार्थी ! या पंचकन्या अकरावीत अ तुकडीत असलेल्या ! दहावी पर्यंत अ तुकडीत असणारी मी अकरावीत अ तुकडीत नव्हते ! आम्ही “शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र” वाले सामान्य विद्यार्थी!

शशी बी.काॅम. झाली.  तिनं तिचा चित्रकलेचा छंद जोपासला आहे. तिच्या पेंटिग्जची प्रदर्शने भरत असतात ! शारदा एम.काॅम. झाली. लग्नानंतर मुंबईत असते ! फैमिदा शेख उर्दू शाळेतून विद्याधाममधे आलेली ! आठवीत असताना ती संस्कृतमधे पहिली आलेली, इंग्लिश/ गणितही चांगलं ! हिंदीच्या सरांना आडलेला ” परहेज” या शब्दाचा अर्थ तिने वर्गात स्पष्ट करून सांगितला होता ! “पथ्य” !

ती परवा म्हणाली “मला टीचर व्हायचं होतं…!” मी तिला म्हणाले,.. ” होय, पण तुझ्या वडिलांनी तुला Rich & Handsome नवरा बघून दिला ” …अकरावी नंतर लगेचच तिचं लग्न झालं ! काही वर्षे ती आबुधाबीला होती,आता मुंबईत आहे !

या पाच मैत्रीणींनी सुखाचे संसार केले ! त्या आदर्श गृहिणी, आदर्श माता आहेत ! पन्नास वर्षानंतर एकमेकींना नव्याने जाणून घेताना हे विशेष जाणवलं की हुशार मुलींच्या बाबतीतही…शिक्षण..करियर पेक्षा लग्नालाच अधिक महत्त्व दिलं जात होतं आमच्या काळात !

माधुरी एकदा मला म्हणाली होती, “राणी तू मराठीची प्राध्यापक झाली असतीस”! तिच्यासारख्या हुशार मुलीकडून असं काही ऐकून मी भरून पावले होते ! मी कधीच हुशार किंवा अभ्यासू नव्हते, अकरावी नंतर लगेचच माझंही  लग्न होईल असं मला वाटत होतं, कारण नववीत असल्यापासून मला “स्थळं” येत होती ! मी अजिबातच महत्वाकांक्षी नव्हते/ नाही. तरीही कुठल्या प्रेरणेतून मी पुणे विद्यापीठाच्या मास्टर डिग्रीपर्यत पोहचले माझं मलाच कळत नाही ! असो…..

आमच्या बॅचच्या या हुशार मुलींचं हे कौतुक आणि अभिनंदनही ! या पाचही जणी शाळेत असताना दिसायच्याही छान ! आजही छान दिसतात ! सलाम तुम्हाला पंचकन्यानो !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सात्विक पर्व संपले ” ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

??

☆ “सात्विक पर्व संपले ” ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

(३०जुलै १९२८—०४जुन २०२३)

४ जून ची संध्याकाळ. मावळत्या सूर्या बरोबर मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक तळपतं व्यक्तिमत्व अनंतात विलिन झालं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रत्येकाच्या मनात आपुलकीची, जिव्हाळ्याची जागा निर्माण करणारे एक सोज्वळ, शांत, हसरं व्यक्तिमत्व हरपलं ते म्हणजे सुलोचनादीदी.

त्यांचं मूळ नाव ‘रंगू’. पण त्यांचे बोलके डोळे बघून भालजी पेंढारकरांनी त्यांचं नाव ठेवलं ‘सुलोचना’. तेच खूप लोकप्रिय झालं. त्या सर्वांच्या ‘दीदी’ झाल्या.

त्यांनी असंख्य मराठी हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्या. आपल्या अकृत्रिम अभिनयाने प्रत्येक भूमिका त्या जगल्या आणि आई, वहिनी, बहीण आजी ही त्यांची नाती प्रेक्षकांच्या मनात दृढ झाली. त्यांनी साकारलेली आई म्हणजे साक्षात वात्सल्यमूर्तीच होती. त्यांच्या ऐतिहासिक भूमिका रूबाबदार, भारदस्त, करारी होत्या. त्यांचं शांत, सोज्वळ, प्रसन्न रूप आणि प्रेमाची वत्सल नजर कायम मनात कोरली गेली आहे.

कितीतरी गाणी ऐकली की नजरेसमोर त्यांचे सात्विक रूप तरळून जाते. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, पडला पदर खांदा तुझा दिसतो, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं  पाणी जातं, रे उठ रानराजा झाली भली पहाट ही गाणी त्यांच्या अभिनयाने मनात ठसली  आहेत.

प्रत्यक्ष जीवनातही त्यांच्या मायाळू, सात्विक,  सौहार्दपूर्ण वागणुकीने सर्वांशी त्यांचे जवळचे नाते जुळले होते. त्यांचे जाणे आज प्रत्येकाला हेलावून गेले. आपल्याच घरातली कुणी जिव्हाळ्याची व्यक्ती गेली अशीच प्रत्येकाची भावना आहे. ज्यांच्या जाण्याने चटका लागतो, एक पोकळी निर्माण होते अशांपैकीच त्या एक होत्या. त्यांच्या जाण्याने एक सात्विक पर्व संपले आहे.

🙏  त्यांना अतिशय विनम्र आदरांजली 🙏

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares
image_print