मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींची बिल्वपत्रे … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

आठवणींची बिल्वपत्रे … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

श्रावण महिना आला की आपोआपच श्रावणी सोमवार आठवू लागतात. लहानपणी रत्नागिरीला आम्ही विश्वेश्वराच्या देवळात सोमवारी जात असू. ते देऊळ कॉलेजच्या मागच्या बाजूच्या उतारा खाली होते …. त्यामुळे कॉलेज अर्ध सोडून बरीच मंडळी देवदर्शनासाठी जात असत… श्रावणी सोमवार हा खूप आनंददायी वाटत असे, कारण शाळेला अर्धी सुट्टी! आणि दर सोमवारी उपास सोडायला आई नवनवीन गोड पदार्थ करत असे. अर्धी शाळा सुटली की आम्ही घरी येत असू, तेव्हा स्वयंपाक घरातून छान छान गोड वास येत असे. मग कधी सांजा तर, कधी खीर, कधी रव्याची खांडवी, घावन असे पदार्थ आई उपास सोडायला करत असे.

पुढे मोठं झाल्यावर शिक्षणासाठी सांगलीला राहिले, तेव्हा हरिपूरची श्रावणातली जत्रा हे आनंददायी ठिकाण होते. हॉस्टेलवर राहत असल्यामुळे आमच्याकडे अशा गर्दीच्या ठिकाणी जायला आम्हाला रेक्टर बाई परवानगी देत नसत, पण तरीही कधी गोड बोलून तर कधी बाईंना चुकवून आम्ही हरिपूरच्या जत्रेला जात असू! हरीपुर ला कृष्णा वारणेच्या संगमावर संगमेश्वराचे शंकराचे देऊळ आहे. अतिशय रम्य आणि पवित्र ठिकाण! समोर वाहती नदी, सगळीकडे पसरलेला प्रसन्न हिरवागार परिसर आणि त्यातच हौशे, नवशे आणि गवसे अशा सर्व प्रकारच्या लोकांची गर्दी! म्हणजे देवाला येणारे लोक! तसेच जत्रेला म्हणून येणारे आणि काही असेच छोटी मोठी चोरी मारी करायला येणारे गवसे लोक ही असायचे!

पिपाण्या, शिट्ट्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आसमंतात घुमत असत. फुगेवाले, छोट्या मोठ्या वस्तू विकणारे फेरीवाले तिथे फिरत असत. रस्ता अगदी अरुंद होता, दुतर्फा चिंचेचे झाडं होती, वाहनांची, माणसांची खूप गर्दी असे, पण सर्व वातावरण उत्साहाने आनंदाने भरलेले असायचे.. हरीपुरची श्रावण सोमवारची जत्रा अजूनही आठवणींच्या कलशात एक खडा टाकून बसलेली आहे..

पुढे लग्न झाल्यावर श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी शंकराला जात असू.. प्रत्येक वेळी माझ्या मनात विचार येई की, हा भोळा शंकर कुठेतरी रानावनात गावापासून दूर असाच राहिलेला असतो ! त्याच्या प्राप्ती साठी पार्वती ने किती व्रतं केली.. कष्ट घेतले. बऱ्याच वेळा शंकराचे ठिकाण नदीच्या काठी किंवा रानावनात च असते…..

नंतर काही वर्षे मुलांच्या संगोपनात गेली आणि या शंकराची दर्शनं थोडी दुर्मिळ झाली! पण अशीच एक खास लक्षात राहिलेली ट्रीप म्हणजे भीमाशंकरची!

पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण पाहायचं राहिलं होतं! भीमाशंकर डोंगराळ भागात असलेलं, फारशा गाड्या नव्हत्या. त्यामुळे जाणं तितकसं सोयीचं नव्हतं, पण एक वर्ष योग जुळून आला. श्रावणामध्ये मी माहेरी आले होते, त्यामुळे दोन्ही भाऊ आणि वहिनी असे आम्ही सर्वजण भीमाशंकर ला जायचे ठरवले. तसं पुण्यापासून हे ठिकाण लांब आहे. इथली आम्हाला काहीच माहिती नव्हती आणि तेव्हा स्पेशल गाडी वगैरे प्रकार नव्हता. सरळ एसटीच्या बससाठी स्टैंड वर आलो. भली मोठी लाईन लागलेली होती, तरीही आज नक्की जायचं असं ठरवून आम्ही रांगेत उभे राहिलो. एकदाची आम्हाला बस मिळाली. भीमाशंकरला उतरलो तेही भर पावसात! बरोबर एखादी छत्री होती आणि पुण्याहून येताना इकडे इतका मोठा पाऊस असेल याची कल्पना नव्हती. स्टँडवर उतरल्यावर प्लास्टिकची इरली विकणारी मुले 

आमच्या भोवती जमा झाली. आम्ही लगेच दोन-तीन इरली विकत घेतली आणि ती डोक्यावर घेऊन रांगेमध्ये बारीक बारीक पडणाऱ्या पावसात उभे राहिलो. हा अनुभव आमच्यासाठी नवाच होता. आसपास बघितलं तर कुठेही हॉटेल वगैरे दिसत नव्हतं! तिथे काही तरी सोय असेल म्हणून आम्ही खाण्यासाठी डबे नेले नव्हते. त्यामुळे देवदर्शन झाल्यानंतर जेवण खाण्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न वाटत होता!

पण तो विचार मागे टाकून आम्ही प्रथम देवदर्शनासाठी गेलो. वातावरण अर्थातच खूप प्रसन्न होतं! भीमा नदीच्या उगमाचे हे ठिकाण आणि तिथे असणारे शंकराचे वास्तव्य, देवळाच्या मागून भीमेचा उगम बघायला जाणाऱ्यांची गर्दी दिसली. आम्ही सुद्धा त्याच वाटेने वर वर चढत गेलो, पण येणारा पाऊस आणि अंतर या दोन्हीचा विचार करता कधी एकदा उगम पाहतोय आणि खाली येतो असं आम्हाला झालं होतं!

तासभर इकडे तिकडे फिरून झाल्यावर आम्ही परत मंदिरापाशी येऊन बसलो. तितक्यात माझ्या वहिनीच्या ओळखीचे एक जण तिला दिसले आणि शंकराची कृपा इतकी की आम्हाला त्यांनी जेवणासाठी त्यांच्या घरी नेले! तिथे गरम गरम आमटी- भात खाताना खरोखरच मन भरून आलं! जिथे कोणी नाही तिथे परमेश्वर आपला साथीदार असतो याची जाणीव झाली. आपली श्रद्धा पाहिजे एवढे मात्र खरे!

या गोष्टीला सहज 40 वर्ष झाली असतील.. त्यानंतरच्या काळात आम्ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी जवळपास 11 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले होते. राहिला तो केदारनाथ! तो योग मात्र आला नाही, पण कसं कोण जाणे, पाटणला असताना तिथे असलेल्या शंकराच्या मंदिराला ‘केदारनाथाचे मंदिर’ म्हणत आणि त्याच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. त्याचेही नाव केदार ठेवले आणि नकळतच त्या केदारनाथाचे दर्शन मला झालं असं मला वाटतं.

दर श्रावणातील सोमवारी नकळतच ही शिवदर्शनाची आठवण होते … आणि या श्रावणातही आणखी एक आठवणींचा खडा माझ्या लेखन कलशात टाकला गेला !

जय भोलेनाथ !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चातुर्मास कहाणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “चातुर्मास कहाणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

“आज श्रावणी सोमवार आहे मी शंकराच्या मोठ्या देवळात आत्ता जाणार… “

तिनी सुनेला सांगितले.

“अहो आई आत्ता खूप गर्दी असेल.. असं करूया… सोनल शाळेतून आली की आपण दुपारी तीन वाजता जाऊ या तेव्हा गर्दी कमी असेल”

“मला फराळ करायच्या आधी दर्शन घ्यायचे आहे…. “गर्दी असली तरी असू दे… मी जाणार… “

बजावलंच तिनी सुनेला..

 

“जाऊदे सुनबाई ती नाही ऐकणार”

“हो…. नाहीच ऐकणार.. “

….. असं नवऱ्याला सांगत ती निघालीच… ती शेजारच्या मैत्रिणीकडे गेली 

” तू येणार नसशीलच तरी पण विचारते येणार आहेस का शंकराच्या देवळात दर्शनाला ?….. “

“अगं कस ग मला जमणार? सुनबाई दहाला ऑफिसला जाणार. नातं शाळेतून येणार, कामवाली…… “

” दे दे आयुष्यभर तू न येण्याची कारणंच दे “

 

आज ती जरा रागावलीच मैत्रिणीवर… आज एवढा श्रावणी सोमवार आहे हिला काही नाही त्याचं…..

 

निघायला साडेनऊ झाले. रिक्षानी निघाली. रिक्षा दुसऱ्याच रस्त्याला लागलेली बघून तिने विचारले,

“अरे रिक्षा इकडे कुठे?”

” आजी शंकराची रांग इकडे बोळात वळवली आहे. आज खूपच गर्दी आहे. श्रावणी सोमवार आहे ना.. “

” हो का? बरं.. “

 

तिने पूजेचे ताटं घेतलं. नारळ, हारं फुलं, साखर फुटाणे.. ती रांगेत उभी… बायका मुली मजेत होत्या. फोटो घेणं, गप्पा मारणं, व्हीडीओ काढणं चालू होतं. फोन चालू होते. रांग हळूहळू सरकत होती. पाऊण तास झाला होता. देऊळ अजून दूरच होत. हातातलं ताट जड वाटायला लागलं… मनातल्या मनात शिवमहिम्न म्हणायचं होत….. जय शिव ओंकारा आरती म्हणायची होती… पण गोंधळ गडबड आवाज… इतका होता की बस्स….. त्यामुळे मनाला शांतता नव्हती..

दीड तासानंतर देऊळ दिसलं. फुलांनी सजवलेलं लाइटिंग केलेलं आज वेगळच दिसत होतं.

 

आता रेटारेटी सुरू झाली. ताट हातात धरून हात भरून आला होता. लांबूनच दर्शन घेतलं.

 समोरची शंकराची छोटी मूर्ती आज हारात बुडून गेली होती. नारळ तिथल्या गुरूजींनी बाजूला असलेल्या नारळाच्या ढिगात टाकला. हार देवाला स्पर्श करून तो पण बाजुला ठेवला….. जेमतेम एक मिनिट दर्शन मिळालं… 

 

चार माणसं गर्दी हटवायला होते

” चला पुढे चला… ” म्हणत होते. ती आपोआप पुढे सरकली…

आज देवं नीट दिसलेच नाहीत…. केवळ दर्शनासाठी घरी कुणाचं न ऐकता अट्टाहासानी ती आली होती…

 लांबूनच कसंतरी दर्शन झालं.. खरंतर दर्शन झालं असं उगीचच म्हणायचं…. रुखरुखच लागली तिला….

 

रिक्षा करून ती घरी आली. दमली होती. दमण्यापेक्षा दर्शन नीट झाले नाही… त्यामुळे मनाला समाधान वाटत नव्हते.

 

मैत्रिणीचे दार उघडे होते. समोरच ती खुर्चीवर बसली होती. मैत्रिणीची नात नाचत समोर आली

म्हणाली.. ” आजी बाप्पाचा प्रसाद घ्यायला ये…. “

 

घरातला शंकराचा फोटो मैत्रिणीने टीपॉयवर ठेवला होता. त्याला हार, फुलं घातली होती. समई, निरांजन तेवत होतं. प्रसाद समोर ठेवला होता.

मैत्रीण म्हणाली.. ” ये ग… बैस थोडा वेळ. तुला काॅफी करते. दमल्यासारखी दिसतेस… “

असं म्हणून मैत्रीण आत गेली.

 

ती थकून खुर्चीवर बसली. मनात विचार सुरू झाले… सकाळी पूजेनंतर वाचलेली खुलभर दुधाची कहाणी तिला आठवली…. इतकी वर्ष आपण ती कहाणी वाचायची म्हणून नुसतीच वाचली…

…. तिला आज ते मनोमन जाणवले.. त्यात लपलेला खोल मतीतार्थ आपण कधी समजून घेतलाच नाही.

 

तिला आठवली शुक्रवारची कहाणी…

… सहस्त्र भोजन घालणारा भाऊ गरीब बहिणीला जेवायला बोलवत नाही. तरी ती जाते. भाऊ तिला हाकलून देतो. काही दिवसांनी तिचं दळींद्र जातं. ती समर्थ होते. मग भाऊ तिला बोलवतो. जेवायला गेल्यावर ती एक एक पदार्थावर एकेक दागिना ठेवते…. या कहाणीतून तर केवढा मोठा बोध घेता येईल………

 

दानाचं महत्त्व सांगणाऱ्या कहाण्या, व्रत का करावं हे सांगणाऱ्या, देव प्रसन्न कसा होईल ?, जगात कसे वागावे ?, चूक नसताना दोष देऊ नये,….. प्रत्येक कहाणीतून केलेले विचार प्रबोधन तिला आठवायला लागले…. ललिता पंचमीची, महालक्ष्मीची, श्रीविष्णूची कहाणी आणि इतरही कहाण्या अर्थ समजून परत नीट वाचायला हव्या आहेत.. हे तिच्या लक्षात आले.

 

अरेच्या…. म्हणजे यासाठी होत्या का या कहाण्या….

“ देवा चुकले रे मी.. मैत्रिणीने मुलाबाळांचा, सुनेचा, नातवंडांचा आत्मा तृप्त करून मग पूजा केली होती. मनाचा गाभारा कसा भरायचा हे आज कळले रे… या कहाण्यात सांगितलेला बोध प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा आहे. हे जाणवले…” 

 

आज आपल्याला बऱ्यापैकी भान आलेलं आहे. आता आपण स्वतःला बदलायचचं…

उतायचं नाही मातायचं नाही आता हा सुदृढ विचारांचा वसा टाकायचा नाही … अस मनोमन तिने ठरवलं.

तरच ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल……. हे तिच्या लक्षात आले.

 

मैत्रिणीनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला. आणि नातीला म्हणाली,

“आजीला, तु पाठ केलेलं म्हणून दाखव”.. नात फोटोसमोर ऊभ राहून म्हणायला लागली..

 ” कैलास राणा शिवचंद्रमौळी “…

 

नातीने प्रसाद हातात दिला. तिने शंकराच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला. चातुर्मासातल्या या नुसत्या कहाण्या नाहीत तर आपल्याला संपूर्ण जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत हे तिला समजले….

‘आता पावलं त्या वाटेनी टाकीन रे…. ’..

तिने कबुली दिली….. कहाणी संपली…..

तिचे डोळे भरून आले होते…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

(माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज)

शिरसाष्टांग प्रणिपात,

उद्या गुरू पौर्णिमा आहे. त्यामुळे आपले स्मरण मला होणे अगदीच स्वभाविक आहे.

आपले एक प्रसिद्ध वचन आहे. “जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।” हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल… !

प्रपंच करताना दिवस कसे पटापट निघून जातात ते कळत देखील नाही. कालच गोंदवल्यात जाऊन आलो असे म्हणता वर्ष कधी होत ते लक्षात देखील येत नाही. आम्ही बेमालूमपणे प्रपंचात गुरफटले जात असतो…..

आपण म्हणता की अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार… ?

मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न….. ! आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ ‘द्वाड’ आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!! हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!! आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो, अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण वळत काहीच नाही हो…… आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते….

श्रीमहाराज, एक करा…. तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल…. प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले…. आता आपणच माझे मायबाप!! 

प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे…! 

या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!

आपला,

दासचैतन्य.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिक्षक दिनानिमित्त… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ शिक्षक दिनानिमित्त… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

५ सप्टेंबर — शिक्षक दिन ! 

.. हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस! हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो..

मी शिक्षिका म्हणून शाळेत नोकरी केली नसली तरी शिक्षण देण्याचे काम घरात राहून बरेच वर्ष केले. माझे वडील आयुष्यभर शिक्षण खात्यात नोकरी करत होते.. बदलीनिमित्ताने ते महाराष्ट्रभर 

वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले होते. नांदेड जिल्ह्यातील अगदी लहानशा गावात असणाऱ्या सरकारी हायस्कूल वर हेडमास्टर म्हणूनही त्यांनी काम केले होते. ते खरे हाडाचे शिक्षक होते. एखादा विषय शिकवायचा म्हणजे जीव ओतून, अगदी मुळापर्यंत जाऊन शिकवणे!

त्यांचे स्वतःचे इंग्रजी खूप चांगले होते. ते घरी सुद्धा आम्हाला इंग्रजी शिकवत, पाठांतर करून घेत असत. आमच्या अभ्यासाकडे त्यांचे पूर्ण लक्ष होते. नोकरीनिमित्ताने ते मराठवाड्यात गेले आणि आम्ही मुले होस्टेलवर राहून आमचे शिक्षण पूर्ण केले. खरोखरच ते आम्हाला गुरु समान होते.

माझ्या लग्नानंतर मी सासरी आले. माझे मिस्टर मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. त्यामुळे मला नोकरीची गरज नव्हती आणि पहिली पाच वर्षे दोन मुलांच्या संगोपनात चालली होती. ज्यावेळी आम्ही सांगलीला बदली करून आलो, तेव्हा माझा मोठा मुलगा शाळेत बालवाडीत जाऊ लागला. तेव्हा माझी छोटी मुलगी तीन वर्षाची होती. तिला जवळपास बालवाडी नव्हती. त्याच वर्षी जून मध्ये माझे वडील माझ्याकडे आले होते. मी संसारात गुरफटून बाकी क्षेत्रात निष्क्रिय झाले होते. ते त्यांना बघवत नव्हते. ‘ अगं, तू एवढी शिकलीस, काहीतरी कर.. ‘ आणि त्याला निमित्त मिळाले की, छोटीला जवळ बालवाडी नाही, तेव्हा तू बालवाडी चालू कर’ असे त्यांच्या मनात आले आणि त्या दृष्टीने त्यांनी मला प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी एक कॅटलॉग आणून दिला. “दुर्वांकुर” बालवाडी मी सुरू केली. प्रथम माझ्या बालवाडीत फक्त पाच मुले होती. वाढत वाढत ही संख्या 25 मुलांपर्यंत वाढली, पण त्यासाठी घर लहान होते. तरीही रोज बारा ते अडीच शाळा आणि ३ वाजेपर्यंत डबा खायला देणे आणि मुलांचे पालक आले की मुलांना सोडणे…. असा कार्यक्रम सुरू झाला होता. श्लोक, गाणी, नाच, गोष्टी सांगणे यात दोन-तीन तास कसे जात हे कळत नसे. खेळायला आमच्या घराचे अंगण पुरेसे होते. या बालवाडीमध्ये माझे मन रमले होते, पण नंतर असे झाले की माझ्या बालवाडीतील मुलांना दुसऱ्या शाळेत पहिलीत प्रवेश घेताना अडचण येऊ लागली, कारण माझी बालवाडी रजिस्टर्डं नव्हती. शेवटी हा बालवाडी प्रयोग मी थांबवला आणि क्लासेस घेण्यास सुरुवात केली.

आता माझी मुले थोडी मोठी झाली होती. त्यामुळे मी गणित आणि इंग्लिश चे क्लास सुरू केले. प्रथम प्रथम मलाच कॉन्फिडन्स वाटत नव्हता की, आपण पाचवी, सहावी पासूनचे विषय शिकवू शकू की नाही! तेव्हा शेवटी गुरु कोण होते तर माझेच वडील! त्यांनी मला प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘तू सुरुवात तर कर, म्हणजे आपोआपच तुला क्लास घेणे कळू लागेल. इकडे सासर घरात ‘आमचे सगळे नीट करून मग उरलेल्या वेळेत तू काय ते कर’ असा दृष्टिकोन असल्याने मलाच थोडी तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी लवकर उठून गडबडीने सर्व आवरून साडेआठ ते साडेदहा/ अकरा पर्यंतच्या वेळेत क्लास चालू ठेवायचा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत क्लास घ्यायचा. त्यातही वेगवेगळ्या वर्गाची, शाळेची मुले- मुली ॲडजस्ट करत राहायचे.. ही सगळी कसरत तेव्हा स्वेच्छेने केली. कारण पैसा मिळवणं हा हेतू आणि मोठी गरज नव्हतीच!

माझ्या मुलांबरोबरची मुले- मुली क्लासला येऊ लागली. नकळत मुलांचाही अभ्यास चांगला होऊ लागला. साधारणपणे पंधरा वर्षे मी वेगवेगळ्या वर्गांचे क्लास घेत होते.

त्या नंतर मुलांच्या काॅलेज शिक्षणाच्या काळात मला क्लास बंद करावे लागले. पण या काळात मनाला खूप समाधान मात्र मिळाले. अजूनही जुने विद्यार्थी- विद्यार्थिनी भेटले की” बाई” म्हणून हाक मारतात,

 कधीतरी गुरुदक्षिणेची फुले मोबाईलवर देतात, तेव्हा आनंद वाटतो. ‘अरे, आपल्या नकळत हे विद्यादान थोडे तरी घडले आहे. आणि त्यातूनच काही मुले इंजिनियर, डॉक्टर, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रात काम करत आहेत, हे पाहिले की मन आपोआपच भरून येते! खूप काही घडवले असे नाही, पण आपणही या शिकवण्याच्या ज्ञान यज्ञात छोटासाच स्फुल्लिंग पेटवू शकलो याचे मनाला समाधान मिळते, हे तर खरेच! पण या सगळ्याच्या मुळाशी माझे वडील माझे गुरु होते, या भावनेने मन भरून येते ! 

त्या वडिलांच्या स्मृतीला मी आज वंदन करते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

डोळे

काही गोष्टी सहजच घडतात पण बालपण सरलं तरी ती आठवण आणि त्यातली गंमत मात्र जात नाही. कधी विषय निघाला आणि पुन्हा ती आठवण सहजपणे मनाच्या कोपऱ्यातून वाट काढत वर आली की नकळत हसू फुटतेच.

आमच्या पप्पांच्या व्यक्तिमत्वातली ठळक आणि आकर्षक बाब म्हणजे त्यांचे तेजस्वी, मोठे, पाणीदार डोळे. आम्हा पाचही बहिणींचे काहीसे मोठे डोळे म्हणजे पप्पांकडून आलेला वारसाच असे म्हणायला हरकत नाही.

तर त्या डोळ्यांचीच गोष्ट आज मला लिहिता लिहिता आठवली. गल्ली मधला आमचा सवंगड्यांचा चमू तसा फारच विस्तारित होता आणि कळत नकळत वयाच्या थोड्याफार फरकांमुळे असेल पण वेगवेगळे समूह सहजपणे बनले गेले होते. लहान गट, मध्यम गट, मोठा गट अशा प्रकारचे. गटागटातले खेळही वेगळे असायचे. एक मात्र होतं की हे ‘मुलींचे खेळ” हे “मुलांचे खेळ’ असा फरक नाही केला जायचा. विटी दांडू, गोट्या, पतंग उडवणे, हुतुतु (कबड्डी), क्रिकेट या खेळातही मुलींचा तितकाच दांडगा सहभाग असायचा. लहान गटातल्या मुलांचा मोठ्या गटातल्या मुलांशी खेळण्याचा खूपच हट्ट असायचा आणि ती पण कुणाकुणाची भावंडे असायची, त्यामुळे त्यांना खेळायला घ्यावंच लागायचं पण तत्पूर्वी त्यांना एक लेबल मिळायचं कच्चा लिंबू आणि या कच्च्या लिंबाला मात्र बऱ्याच सवलती असायच्या.

खेळातल्या नियमांची माफी असायची पण माझी धाकटी बहीण छुंदा हिला मात्र ‘कच्चा लिंबू” म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही. तिला तो ‘रडीचा डाव” वाटायचा. ‘रडीचा डाव खडी’ वगैरे तिला कोणी बोललं की तिला फारच राग यायचा. शिवाय तिचे स्वतःचेच तिने ठरवलेले नाही रे ही बरेच असायचे. ती नेहमीच काहीशी शिष्ट, भिडस्त आणि ‘मला नाही आवडत हे’ या पठडीतली होती पण गल्लीतल्या मोरया आणि शेखरशी तिचे मस्त जुळायचे. हे तिघेही तसे बरोबरीचेच होते आणि म्हणून असेल पण छुंदा, मोरया आणि शेखर यांची मात्र घट्ट मैत्री होती आणि या मैत्रीतली आणखी एक गंमत म्हणजे छुंदाला लहानपणापासून मुलांसारखे शर्ट— पॅन्ट घालायला आवडायचे आणि माझी आई, कधी आजीही तिच्यासाठी अगदी हौसेने तिच्या मापाचे शर्ट— पॅन्ट घरीच शिवत. त्यावेळी रेडीमेड कपड्यांची दुकाने फारशी नव्हती. कपडे शिवून देणारे शिंपी असायचे पण आमचे गणवेशापासून, रोजचे, घरातले, बाहेरचे सगळेच कपडे आई अतिशय सुंदर शिवायची.

तर विषय असा होता की शेखर, मोरया आणि ही मुलांच्या वेषातली बॉयकट असलेली मुलगी छुंदा. मस्त त्रिकूट. ते नेहमी तिघंच खेळायचे. खेळ नसला तर आमच्या घराच्या लाकडी जिन्यावर बसून गप्पा मारायचे. मोरया जरासा गोंडस आणि दांडगट होता. शेखर तसा मवाळ होता पण नैसर्गिकपणे असेल कदाचित ती दोघं छुंदाचं मात्र ऐकायचे. तिला त्यांनी कधी दुखवलं नाही. भांडणं झाली तरी परत दोघेही तिला हाक मारून खेळायला घेऊन जायचे.

आज हे लिहीत असतानाही मला ती एकाच उंचीची, एकाच वयाची, निरागस तीन मुलं जशीच्या तशी दिसत आहेत. खरं सांगू गद्र्यांचा नवसाचा मोरया, मोहिलेंचा शेखर… गद्रे, मोहिले आमचे टेनंट्स, त्यांच्याशी असलेली स्वाभाविक बनती बिघडती नाती पण या साऱ्यांचा छुंदा— मोरया— शेखर यांच्या मैत्रीवर काहीच परिणाम कधीच झाला नाही. बाल्य किती निष्पाप असते ! छुंदा त्यांच्या घरातही सगळ्यांची फार आवडती होती.

सर्वसाधारणपणे आम्ही सारीच मुलं गल्लीतच खेळायचो. गल्लीच्या बाहेर खेळायला जायची फारशी वेळ यायचीच नाही आणि जायचंच असलं तर घरून परवानगी घेतल्याशिवाय तर नाहीच. शिवाय संध्याकाळचं दिवेलागणीच्या वेळेचं शुभंकरोति, परवचा, गृहपाठ हे कधी चुकायचं नाही पण त्या दिवशी खेळता खेळता.. मला वाटतं मुल्हेरकरांच्या दिलीपच्या लक्षात आलं की हे त्रिकूट कुठे दिसत नाही.

गेलं कुठे ?

घराघरात, पायऱ्या पायऱ्यांवर, जिन्यात, सगळीकडे शोधाशोध झाली. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एव्हाना खात्री पटली “हे तिघे हरवले. ”

यांना स्वतःची नावं, घराचा पत्ता तरी सांगता येईल का ?

कुठे गेले असतील ?

तसं त्यावेळेस ठाणे एक लहानसं गावच होतं आणि हे गावही अनेक गल्ल्यागल्ल्यातूनच वसलेलं होतं. कुणीतरी म्हणालं, “ठाण्यात मुलं पळवण्याची टोळी आलेली आहे. ”

बापरे !

आई, पप्पा, जीजी आणि आम्ही सारेच पार हादरून गेलो.

संध्याकाळ होत आली. घरोघरी दिवे लागले. तोंडचं पाणी पळालं तरी या तिघांचा पत्ता नाही. शोध मोहीमही असफल ठरली. आता शेवटचा मार्ग— पोलीस चौकी. मागच्या गल्लीतली, त्या पलीकडची, इकडची, तिकडची बरीच माणसं गोळा झाली.

मुलं हरवली.

कुणी म्हणालं, ”पण अशी कशी हरवली ?”

दिलीप तापट. आधीच बेचैन झालेला. तो ताडकन म्हणाला, “कशी हरवली माहीत असतं तर सापडली नसती का ? काय विचारता काका तुम्ही…?”

आणि हा सगळा गोंधळ चालू असताना एकाएकी त्या लहानशा गल्लीत पांढरी, मोठी, अँम्बॅसॅडर गाडी हाॅर्न वाजवत शिरली. घोळक्यापाशी थांबली आणि गाडीतून ठाण्यातील मान्यवर आणि प्रसिद्ध समाजसेविका मा. विमल रांगणेकर आणि त्यांच्या समवेत ही तीन मुलं उतरली. विस्कटलेली, भेदरलेली, रडून रडून डोळे सुजलेली, प्रचंड भ्यायलेली… छुंदाने तर धावत जाऊन जीजीला मिठी मारली. आता त्या मुलांच्या मनात भीती होती.. घरच्यांचा मार बसणार की काय याची.

विमलताई म्हणजे प्रसन्न व्यक्तीमत्व. उंच, गोऱ्या, मोहक शांत चर्या. सुप्रसिद्ध क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या त्या पत्नी. यांना कुठे सापडली ही मुलं आणि या स्वतः मुलांना घेऊन आल्या? घंटाळी रोडवरच्या कोपऱ्यावर खंडू रांगणेकरांचा प्रशस्त बंगला होता. आजही आहे. ही तिघं मुलं गप्पांच्या नादात चालता चालता रस्ता चुकले असावेत. रांगणेकरांच्या बंगल्यासमोर कोपऱ्यात बावरलेल्या, रडवेल्या स्थितीतल्या या मुलांना विमलताईंनी पाहिले आणि त्यांनी चौकशी केली.

त्या सांगत होत्या, ”या मुलांना काहीही धड सांगता येत नव्हतं. नावं सांगितली. तीही पूर्ण नाही. कुठे राहतात, घराचा पत्ता त्यांना काहीही सांगता येत नव्हतं. खूप घाबरलेली होती म्हणूनही असेल. मी निरखत होते या मुलांना आणि त्यापैकी एकाच्या डोळ्यात मला ओळखीची चमक दिसली. मनात म्हटलं हे तर ढग्यांचे डोळे पण ढग्यांना तर मुलगा नाही. तरी मी याला विचारलं, ‘तू ढगे का ?’

हा म्हणाला, ”हो”

“तूच ढग्यांचा मुलगा आहेस का ? पण… ”तेव्हा तडफदार उत्तर आलं,

“नाही. मी मुलगी आहे. ”

मग सारा उलगडा झाला.

खंडू रांगणेकर आणि पप्पा दोस्तच होते. त्यांना आमचं घर माहीतच होतं.

हरवलेली मुलं सापडली.

तर असा हा गमतीदार किस्सा.

आजही, वेळप्रसंगी गल्लीतली ती माणसं कशी आपुलकीनं जोडलेली होती याची जाणीव झाली की मन भरून येतं. आता जग बदललं.

पण खरी ही गोष्ट डोळ्यांची.

गोष्ट मोठ्या डोळ्यांची. आयुष्यभर पपांनी आम्हाला स्वतःचे संरक्षण स्वतःच कसे समर्थपणे करावे याचे भरपूर धडे दिले पण या पप्पांसारख्याच असलेल्या डोळ्यांमुळे माझ्या धाकट्या, लाडक्या बहिणीचे असे रक्षण झाले, याला काय म्हणावे ?

आज हे आठवत असताना सहज ओठातून ओळी येतात..

या डोळ्यांची दोन पाखरे

फिरतील तुमच्या भवती

पाठलागही सदैव करतील

असा कुठेही जगती…

वंश, कुल, जात, गोत्र, नाव याची परंपरा भले तुटली असेल पण आम्हा बहिणींच्या परिवारात या डोळ्यांची परंपरा अखंड वाहत आहे आणि या डोळ्यातच ढग्यांची प्रतिमा आजही टिकून आहे. आता थांबते. भावूक होत आहे माझी लेखणी..

 – क्रमशः भाग दहावा

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

 (शिक्षकदिनाचे औचित्य साधून..) 

आई आपली आद्य गुरू हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नंतर वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या समुहात वेगवेगळ्या क्षेत्रात आपले गुरू बदलत जातात. अर्थात कितीही गुरू बदलले तरी त्या सगळ्यांनी दिलेल्या ज्ञानामुळेच केलेल्या मार्गदर्शनामुळेच आपण घडलेलो असतो. म्हणून त्या सगळ्यांचे स्मरण आज होणे गरजेचे आहे. त्या सगळ्यांना आदरपूर्वक वंदन 🙏🙏

पण या सगळ्यामधे लोक म्हणतात अनुभव हा गुरू मोठा आहे तर कोणी म्हणतात निसर्ग हा गुरू मोठा आहे. किती छान वाटते ऐकायला. हो आहेतच हे गुरू. पण या गुरुंबद्दलचे ज्ञान आपल्याला आपले मन देत असते. त्यामुळे मन हा मोठा गुरू आहे.

अनुभव जेव्हा आपल्याला येतो तेव्हा ती परिस्थिती काय चांगले काय वाईट याचा सारासार विचार करायला आपली बुद्धी आपले मन हे कार्यरत झालेले असते. ते मन आपल्याला त्या अनुभवांची तारतम्यता सांगत असते आणि ते तारतम्य देणारे मन हे अतिशय महत्वाचे असल्याने मन हा एक मोठा गुरू आहे.

निसर्ग हा पण गुरू आहे म्हटले तरी निसर्गातील प्रत्येक गोष्टीत काही चांगले आणि काही वाईट गुण हे असतातच. पण फक्त चांगल्या गुणांकडे बघायला आपले मन आपल्याला शिकवते म्हणून निसर्गातील एखादी गोष्ट आपल्याला आवडते. म्हणून ते शिकवणारे ते जाणणारे मन हा अतिशय मोठा गुरू आहे.

बघा ना फुलावर भिरभिरणारे फुलपाखरू पाहून आनंद नाही झाला असा माणूस विरळाच असेल. पण अशावेळी फुलपाखरू आधी सुरवंट होते किंवा याचे आयुष्य अवघ्या दीड दिवसाचे आहे हे माहित असले तरी त्याकडे कानाडोळा करायला त्या क्षणी त्या फुलपाखराचे स्वछंदी बागडणे बेधुंद होत मधु प्राशन करणे आपले रंगीबेरंगी पंखांनी उघडझाप करत लोकांच्या काळजाच्या फुलावरही अलगद बसणे याचा आनंद घ्यायला मनच शिकवत असते.

मन हा असा गुरू आहे की तो आपल्याला दिसत नाही पण एक क्षणही तो आपल्याला सोडत नाही. म्हणून आपल्या अंतर्मनाचा आवाज त्याची शिकवण जो नित्यनेमाने जपतो त्याला विजयाच्या शिखरावर जाता येते.

तसेच आपल्या हिताचा सर्वात जास्त विचार आपला गुरू करत असतो. मग या वेगवेगळ्या गुरुंपेक्षाही जास्त आपले हित आपले मनच प्रार्थित असतो. म्हणून आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या ज्ञात अज्ञात गुरुंबरोबरच माझ्या मनाच्या गुरूलाही साष्टांग नमस्कार 🙏

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – २  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

 (जमिनीची कृषी संबंधित उत्पादन क्षमता कमी होऊ लागली आहे, पाण्याच्या उपलब्धतेच्या अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले आहे.) – इथून पुढे —-

 Climate change, वाढते तापमान यामुळे चक्रीवादळे, त्सुनामी यासारख्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत, त्याने infrastructure चं प्रचंड नुकसान होऊ लागले आहे, विमा कंपन्यांची आर्थिक गणितं विस्कळीत झाली आहेत.

तापमान वाढल्याने जास्त air conditioning वापरलं जाऊ लागलं आहे, आणि या अधिक वापराने आणखी कार्बन फुटप्रिंट तयार होऊन तापमान आणखी वाढतंय, असं एक कापूसकोंड्याच्या न संपणाऱ्या गोष्टीसारखं दुष्टचक्र सुरू झालंय.

पुढचं विश्वयुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी होईल म्हणतात, या वाढत्या ग्रीन हाऊस गॅसेसने तो दिवस आणखी आणखी जवळ येत चालला आहे. नैसर्गिक साधन संपत्तींसाठी झगडे होणार आहेत, स्थलांतरं होणार आहेत, होऊ लागली आहेत. ” 

मुलगा अत्यंत कळकळीने कैफियत मांडत होता.

 “अरे बाप रे. यातल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या घटना माहीत होत्या, पण यामागे सूत्रधार कार्बन फुटप्रिंट आहे, हे माहीत नव्हतं. पण मग या सगळ्यापासून वाचण्यासाठी उपाय काय ?” एखाद्या ऋषी मुनींनी शाप दिला, की ज्या अजीजीने उ:शाप मागितला जातो, तद्वत मी विचारता झालो.

“बाबा, उद्योगधंदे असोत किंवा तुम्हीआम्ही असोत, कार्बन फुट प्रिंट कमी करण्याचे काही मार्ग कॉमनच आहेत.

कमी इंधन वापरणारी यंत्रसामुग्री वापरणे – घरी मिक्सर, फ्रीज, AC चांगल्या energy rating चे घेणे. कमी ऊर्जा वापरणारे LED बल्ब वापरणे, कारखान्यांमध्ये शक्य असल्यास पवन ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, single use plastic चा वापर टाळणे, घन कचरा व्यवस्थापन (solid waste management), rainwater harvesting या आणि अशा अनेक गोष्टी घर आणि उद्योगधंदे या दोन्ही पातळींवर अतिशय समर्थपणे राबवता येतील.

 विशेषत: व्यवसायांत, जेथे शक्य आहे तेथे कागदाचा वापर कमी करता येईल का हे तपासून पाहणे. एकट्या भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकिटे वापरायला सुरुवात केल्यावर रोजच्या रोज टनावारी कागदाची बचत होऊ लागली आहे. प्रत्यक्ष meetings घेण्याऐवजी जर online meeting घेतल्या, तर प्रवासासाठी देण्याचे कंपनीचे पैसेही वाचतील आणि इंधन जाळणे टाळता येईल.

आयएसओ १४००१ सारखी पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली राबविल्यानेही कार्बन फुटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी करता येईल.” 

माझा चेहरा हळूहळू मी वर्गात बसल्यावर जसा बधीर होऊ लागायचा तसा होऊ लागतोय हे ध्यानात येताच चिरंजीवांनी चाणाक्षपणे चर्चाविषय गृहपातळीवर आणला.

“गरज नसताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे, AC चे तापमान २६° किंवा त्याहून जास्त ठेवणे, गळक्या नळांची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळणे या आणि अशा उपायांनी खर्चही कमी होतील आणि कार्बन फुटप्रिंटही. ” 

ही उदाहरणे माझ्या परिचयाची आणि आवाक्यातली होती, त्यामुळे मला ती चटदिशी समजली. “म्हणजे स्वार्थही साधला जाईल आणि परमार्थही, ” मी अनुमोदन दिले.

“Electric अथवा hybrid गाड्यांचा वापर करणे, शक्यतो सार्वजनिक परिवहन (public transport) चा वापर करणे, दोघा चौघांनी मिळून गाडीतून प्रवास करणे (carpooling), छोट्या अंतरासाठी शक्यतो पायीच जाणे, किंवा चारचाकी गाडीऐवजी दुचाकी वापरणे या सर्व गोष्टीही अवलंबता येतील. “

हा घाव जरा वर्मी लागला. “हो, म्हणजे, morning walkला मी उद्यानापर्यंत मोटारसायकलने जातो, ते उद्यापासून पायीच जात जाईन, ” मी कबूली दिली.

“आईच्या राज्यात असंही आपण पटकन कोणती वस्तू फेकून देत नाहीच म्हणा, ” माझ्या जबाबाकडे काणाडोळा करत चिरंजीवांनी ज्ञानामृत पाजणे सुरूच ठेवले, “जुन्या पँटच्या पिशव्या, जुन्या पिशव्यांची पायपुसणी असं recycling आपल्याकडे चालूच असतं, ” आई आजूबाजूला नाही याची खात्री करून घेत तो म्हणाला, मी मात्र चांगलाच कावराबावरा झालो. “टाकाऊतून टिकाऊ यानेही कार्बन उत्सर्ग कमी करण्यात मदत होते, ” त्याचं चालूच होतं.

“खरंतर, मांसाहार करण्याने कार्बन फुटप्रिंट खूप वाढतो. प्राण्यांचे १ किलो वजन वाढवण्यासाठी त्यांना ६-७ किलो अन्नधान्य खावे लागते. त्यामुळे चिकन मटणापेक्षा शाकाहार केल्याने निसर्गाला कमी त्रास होईल.

जसं ज्यायोगे कार्बन उत्सर्जन वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तसंच ज्या उपायांनी निर्माण झालेला कार्बन शोषला जाईल ते उपाय केले पाहिजे. सगळ्यात सोप्पं म्हणजे खच्चून बेदम झाडं लावली पाहिजेत. गेल्या वेळी म्हणे महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी झाडं लावली होती. अशी झाडं खरंच लावली असतील, तर त्यांचे संगोपन केलं गेलं पाहिजे. ही वृक्षवल्लीच तयार झालेला कार्बन डायऑक्साइड वापरेल आणि कार्बन फुटप्रिंट कमी करेल.

फिलिपाईन्स सरकारने २०१९ सालापासूनच विद्यार्थ्यांना पदवी मिळवायची असेल तर दहा झाडे लावणे आणि त्यांची निगा राखणे अनिवार्य केले आहे. दिल्ली विद्यापीठानेही अशा प्रकारचा उपक्रम २०२१ पासून सुरु केला आहे. राजस्थानमध्ये पिपलांत्री गावाच्या परिसरात प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर ग्रामस्थ १११ झाडे लावतात. ही आणि अशी उदाहरणे आपल्यासाठी आशेचा किरण आहेत.

कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय, तो कमी का व कसा केला पाहिजे याविषयी जनजागृती केली पाहिजे, ” इतकं सगळं बोलून चिरंजीव श्वास घेण्यासाठी थांबले.

मी आता त्याच्याकडे नव्या आदराने पाहू लागलो होतो. आपण समजतो तशी ही नवी पिढी अगदीच वाया गेलेली नाही. सामाजिक विषयांची त्यांना जाणीवही आहे, भानही आहे, आणि त्याविषयी ते कृतीशीलरीत्या जागरूकही आहेत, हे पाहून मी निश्चिंत झालो आणि गाडी, AC आणि अन्नाची नासाडी याविषयी शेजारच्या काकांचे बौद्धिक घ्यायला ताबडतोब निघालो.

(मी एखाद्या गोष्टीचे पैसे भरले आहेत, मग मी त्या गोष्टीचे काय वाट्टेल ते करेन – असा एक उद्दाम मतप्रवाह हल्ली आढळतो. मग यातूनच लग्न कार्यात अथवा हॉटेलांत ताटात भरपूर अन्नाची नासाडी करणे, भांड्यातील अथवा बाटलीतील थोडेसेच पाणी पिऊन बाकीचे फेकून देणे असे प्रकार सर्रास दिसतात.

माझ्या एकट्याच्या अशा कृतीने काय फरक पडणार आहे असं लंगडं समर्थनही केलं जातं, पण आपल्या सर्वांच्या अशा एकत्रित कृतीचा परिणाम भयाकारी असतो.

गाडीच्या आरशावर लिहिले असते त्याप्रमाणे objects in the mirror are closer than they appear – आपण जर वेळीच जबाबदारपणे वागू लागलो नाही, तर आपली व सभोवतालच्या निसर्गाची अपरिमित हानी होईल, ही जाणीव राखली पाहिजे.)

— समाप्त —

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझा बाप्पा… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ माझा बाप्पा… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

गणपती बसवायचं ठरवलं तेव्हाची गोष्ट … कोणाला विचारायला गेलेच नाही

रीती रिवाज घराणं परंपरा…… नकोच ते … माझ्या मनालाच विचारलं

 

प्रत्यक्ष देवाला घरी आणायचं मग भीती कशाची? सुबक छानशी पितळी मूर्ती घेऊन आले

लहानगी दोन्ही नातवंड एकदम खुष.. त्यांनी आरास केली.. हौसेनी बाप्पाला सजवलं.

पूजा नैवेद्य आरती अथर्वशीर्ष यथासांग झालं

 

नंतर विसर्जन…..

अहो ते तर मोठ्या पातेल्यातच … ते पाणी घातलं तुळशीला

एक सांगू ? विसर्जन कशाचं करायचं ते आता नीट समजलं होतं…

 

परत बाप्पा जाऊन बसले जागेवर.. राहू देत की घरीच…. नाहीतरी मी काय करते हे बघायला घरात कोणीतरी मोठं हवंच ना..

 

हे करताना विचार केला होता … 

चौकटी असतातच.. वापरून वापरून थोड्या झिजतात खराब होतात.. बेढब दिसायला लागतात

अट्टाहासानी तशाच का ठेवायच्या ? बदल करायला हवा ना.. ‘ राहु दे.. तशाच ‘… म्हणणारे असतील

तरी विचार करून त्या बदलाव्या, नीट नेटक्या कराव्या, नविन कल्पनांनी अधिक देखण्या सुंदर दिसतील

हळूहळू शहाणपण येत जातं. आपल्याही मनाला न दुखवता बदल सुचतो आपला आपल्याला.. अनेक ठिकाणी आवश्यक असलेला … चौकटीत राहुनच आपण केलेला … कुणाला न भिता केलेला … आणि 

तो खराखुरा आनंद देतो

गणपती बाप्पाला आपण काय प्रार्थना करतो….

” प्रारंभी विनती करू गणपती विद्या-दयासागरा 

अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा “

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिरवी भिशी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ हिरवी भिशी… ☆ सुश्री शीला पतकी 

फोनची रिंग वाजली म्हणून फोन उचलला तर पलीकडून अंजूचा आवाज उर्मी उद्या माझ्याकडेबरोबर पाच वाजताभीशि आहे पण वेगळी हं! म्हणजे हिरवी मिशी! सर्वांनी हिरवे पोशाख परिधान करून या सगळे हिरवे! मी पदार्थही हिरवे करणार आहे तिची ती भन्नाट कल्पना ऐकून मी पांढरी फटक पडायची वेळ आली. मी म्हंटल बर बर येते बाई !

फोन खाली ठेवल्यापासून डोक्याला हिरवाईने घेरलं…. साडी हिरवी. कुंकू हिरवं.. कानातले गळ्यातले हिरव्या खंड्यांची अंगठी.. हिरव्या वादीची चप्पल, बांगड्या, हिरवी साडी हिरवी पर्स !माझा हा सगळा जामानिमा पाहून हे म्हणाले, ” आता हिरवी लिपस्टिक लाव म्हणजे ध्यान दिसशील” एवढ काही नको हं हे एवढ छान केलय तुम्हाला मेल कौतुकच नाही! या वाक्याने आमचा संवाद संपला…?

मंजूकडे गेले बंगल्याच्या फाटकासमोर हिरव्या पानांची सुंदर रांगोळी काढली नव्हे गालीचा होता. मध्ये फक्त थोड्याशा रंगीत पाकळया दारावर आंब्याचं तोरण आणि हिरव्या वाटाण्यानी सजवलेली नक्षीदार महिरप… फार सुंदर सजलं होतं दार ! दोन्ही बाजूला सुंदर हिरव्या कुंड्या त्यात डेरेदार उंच मयुर प्लॅन्ट… दारात हिरवी पायपुसणी हॉलमध्ये हिरवे पडदे…. सोफ्याला हिरवे कव्हर हिरव्या नक्षीदार छोट्या उषा खाली हिरवा गालीचा पसरलेला हिरव्यागार छोट्या छोट्या छोट्या पोपटांचे कॉर्नर्स हँग केलेले. एका भिंतीवर हिरव्या फॅनेलचा बोर्ड त्यावर हिरव्या रंगाचे वर्णन असलेल्या गाण्याच्या दोन दोन ओळी लिहिल्या होत्या आणि त्या हिरव्या पानांनी पिनअप केल्या होत्या हिरव्या हिरव्या रानात;

हरियाली और रास्ता; हिरवे हिरवे गार गालीचे…. इत्यादी सारखी गाणी होती ! माझ्या अंजूच्या घराची ती हिरवाई न्याहाळतांना मी थक्क झाले आणि तिचं कौतुकही वाटले. इतक्यात अंजू बाहेर आली बाई ग.. मी तर बघतच राहिले! गोरीपान अंजू.. हिरवी पैठणी.. हिरवे दागिने.. सुंदर हेअरस्टाईल त्यावर हिरवा बो आणि त्यावर हिरव्या पानांची फुल करून माळलेला गजरा मध्ये फक्त चार शुभ्र फुले होती. दागिने सुंदर होते आणि सगळे हिरव्या रंगांना धारण करणारेही होते! मी तर बाई बघतच राहिले….. ! पाठोपाठ तिची मुलगी आली तिनेही हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला. “बाई समद झालया नव्ह” असं म्हणत दोन कामवाल्या बाया बाहेर आल्या त्यांनी हिरवी इरकली लुगडी नेसली होती. हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.

हळूहळू सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या प्रत्येकीच्या एंट्रीला कुतूहल !अय्या काय गोड दिसतेस! किती सुंदर! झकास! टाळ्या काय न वाजणाऱ्या शिट्या काय….. प्रत्येकीची एन्ट्री दणाणून सोडत होती. प्रत्येकीच्या बौद्धिक क्षमतेची जणू परीक्षा होती. इतक्यात हिरव्या टी शर्टचा तिचा मुलगा बाहेर पडला आणि आम्हा सर्वांवर नजर फेरीत म्हणाला, ” मम्मा कोण म्हणतंय कि सोलापुरात यंदा कमी पाऊस झालाय “असं म्हणत त्यांना पोबारा केला. आम्ही खूप हसलो! वेलकम ड्रिंक म्हणून तिने वाळ्याचे सरबत ठेवले होते सुंदर हिरव्या ट्रेमधून हिरव्या रंगाच्या ग्लासामध्ये, त्या ग्लासाला छोट्या हिरव्या छत्र्या हिरवे सुंदर स्ट्रॉ वर्ती हिरव्या पुदिन्याची पानं पेरलेली होती पेय सुंदर रंगतदार होत… !

खूप गप्पा झाल्या काही गेम्स झाले शेवटच्या गेममध्ये एका हिरव्या प्लास्टिकच्या डिशमध्ये खूप नाणी होती ती हातानी उचलायची.. किती प्रयत्न केला तरी एक दोन चार नाण्याच्या वर जास्त मजल जात नव्हती आम्ही जिंकलेली सर्व नाणी एका हिरव्या बटव्यात एकत्र केली.

मग आले खाद्यपदार्थ सुंदर हिरव्या पत्रावळींचे डिझाइन असलेल्या डिशेश त्यात पालक पुलाव त्यावर खोबरं पलीकडे हिरव्या कोथिंबिरीची खोबऱ्याची चटणी हिरव्या मटारची उसळ पालक पुरी आणि हिरव्या रंगाची पिस्ता बर्फी…. अहाहा… बेत चवदार लज्जतदार तसा रंगतदार ही होता !

खाणे पिणे झाले शेवटी पिस्ता आईस्क्रीमचे सुंदर कप त्यावरचा पिस्ता खाताना खूपच मजा आली अंजूच्या कल्पकतेचे कौतुक प्रत्येकजण तोंडभरून करत होता इतक्यात हिरव्या सुबक केळीच्या पानात मस्त हिरवेगार गोविंद विडे आले… मी म्हणाले अंजू पुरे ग किती धक्के देशील? ती म्हणाली थांबा तिने आपल्या सहकारी मावशांना बोलावले आणि मगाचे हिरवे बटवे आमच्या काही ज्येष्ठ भगिनींच्या हस्ते त्या महिलांना बक्षीस म्हणून दिले त्यांनाही खूप आनंद झाला या तिच्या कृतीने आम्ही भरून पावलो म्हणजे या सुंदर प्रसंगाला एक छान भावनेची बाजूही होती आणी ती हिरवी कंच होती अंजूच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक करीत मिळालेल्या नवीन कल्पनेचा सुखद हिरवट गारवा अंगावर लपेटत मी घरी आले ओठावर गाणं होतं हिरव्या हिरव्या रानात ——-

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जरासं बदलून बघा ना…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “जरासं बदलून बघा ना…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर दोघेही वकील आहेत. तीनी पितळेचा किंवा चांदीचा गणपती घेऊ म्हटलं तर ते म्हणाले,

” नाही…. मला चालणार नाही. यावर नोऑर्ग्युमेंट”

ती म्हणाली 

“लग्नाला 50 वर्षे झाली आहेत पण घरातल्या निर्णयात कायम तेच जज्ज…. ते म्हणतील तेच फायनल…..

मी बोलू पण शकत नाही. ऊगीच वाद नको. म्हणून गप्प बसायच. “

हं………

 

मीनाचे मिस्टर बहात्तर वर्षाचे आहेत. ते म्हणाले 

“मला एकदम पटलं पण दादा काय म्हणेल?”

दादा म्हणजे त्यांचे भाऊ वय वर्ष 76

मीना म्हणाली 

” दादाला भीत भीतच यांच आयुष्य गेलं. पुढचंही जाणार… यांना निर्णय क्षमता कधी येणार कोण जाणे?

दरवेळेस दादा काय म्हणेल……. “

……..

नानांनी तर डिक्लेअरच केलं

” मी मेलो की काय करायचं ते करा… “

……….

बहुतेकांचं म्हणणं असं की सगळं पटतं पण भितीच वाटते….

काही विपरीत झालं तर…

त्यापेक्षा नकोच ते…..

 

वसुधा म्हणाली” माझा मुलगा आणि सून किती वर्ष म्हणत होते. पण माझाच विरोध होता. खरंतर कारण असं काहीच नाही. पण होता..

पण आता एकदम कसा होकार द्यायचा ? “

 

लिली चा फोन आला

” मावशी यस यु आर राईट.. पण नंतर गर्दी होईल म्हणून मी आधीच ऑनलाईन गणपती बुक केला होता. त्यांनी कालच डिलिव्हरी दिली आहे. आता नेक्स्ट टाईम मी पितळेचा घेईन…. “

 

जया म्हणाली 

“आमच्या पप्पांच मम्मींसमोर काही चालत नाही. त्यांना खरतर हे आवडलं असतं. मी त्यांच्याशी बोलले. पण ते म्हणाले मम्मीला चालणार नाही काही बोलू नकोस…. “

 

चार वर्षांपूर्वीची गोष्ट आशाकडे चांदीचा गणपती होता. तिनी चौरंग आणला. त्यावर गणपती बसवला. हार घातला. समया, निरांजन, लावलं. लाईटची माळ लावली. छान डेकोरेशन करून सजवलं.

पण नणंद बाई रागवल्या,

“हे काय चाललय तुझं ?आपल्याकडे गणपती बसवत नाहीत तू हे काय नवीन सुरू केलेस? इत्यादी……. “

झालं….

तेव्हापासून बंद..

 

अमेरिकेत असलेल्या अमोलंनी आईला विचारलं ती म्हणाली

” गणपती बसव, गौरी कर, नवरात्र घाल, काय वाटेल ते कर तू थोडंच माझ ऐकणार आहेस ?… “

थोडक्यात काय तर……

 

दोन वर्षांपूर्वी सुधानी मेटलचा गणपती आणला.

तिची नात जाम खुश झाली.

बाप्पा बाप्पा म्हणत हातात घेऊन नाचली. मग शेजारी झोक्यावर बाप्पाला घेऊन बसली.

तिच्या बाबांनी बाप्पासाठी छोटा झोपाळा आणला. तिनी तो सजवला. बाप्पाला त्यात बसवल.. फोटो काढले…

नात खुष झाली….

 

बाप्पाला आपण म्हणतो 

“आम्हाला सुखात.. आनंदात ठेव…. ” खरंतर तसं राहणं बरंचस आपल्याच हातात आहे. सगळंच कशाला देवावर सोपवायचं?

थोडा प्रयत्न आपणही करू या की.

 

काय खरं की नाही?

मग म्हणा की

” गणपती बाप्पा मोरया…. “

आणि थोडं बदला की……

ज्यांना जमेल त्यांनी घरी मातीचा गणपती करा. घरीच विसर्जन करा. आता काही शाळेतही शिकवतात. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात.

 

श्री शंकराचार्यांनी लिहिलेलं

” श्री गणेश पंचरत्न स्तोत्र “खूप छान आहे.

यावर्षी ते पाठ करा. मी म्हटलेलं तुम्हाला पाठवत आहे तुम्हाला युट्युब वर मिळेल.

बाप्पाला तुम्ही समोर बसून मनापासुन म्हटलेलं आवडेल.

 

बदल कशाचा, कधी, कसा करायचा हे समजलं की आपले आपण आनंदात राहतो.

बघा प्रयत्न करुन….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares