मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तरुणाई … ☆ श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

☆ तरुणाई… ☆ श्रीरंग खटावकर  ☆

मॉर्निंग वॉकला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूने आवाज आला. ” काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं, आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते. मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला.”

तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट! “दात दोनच असले, तरी कडक बुंदीचा लाडू खातो अजून.”

“खातोस की चघळतोस रे” ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.

“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले!”

असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील, मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही. फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.

“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो “

“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?

एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!

त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.

” अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना!त्यालाच सोडायला गेलो होतो”

“कुठे??”

अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ” त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!” “काही म्हणा, मन्या भाग्यवान हो!

लेक अमेरिकेतून येतो काय, हाटेलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला, तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”

बाकी सगळे खिन्नपणे हसले. मी म्हंटलं, “तात्या इतकं लाईटली घेताय?”

“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”

मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!

दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या, आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”

“पार्टी?”

“अरे, नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे, फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”

“बास एवढंच ना? दिलं!”

“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते, आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो, आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”

मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!

मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो, आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला  असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल?

असायलाच हवी!

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,

“कल खेल में, हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यहीं दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहाँ मरना यहा,

इसके सिवा जाना कहा!!”

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-२ ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-२ ☆ श्री सतीश मोघे

(तसे न करता आपण त्यांना नको तेवढी स्पेस देवून आपल्या जन्मदात्यालाच बेडरूममधे झोपायला स्पेस नाही, असे म्हणत असू ,तर ही स्पेस नात्याच्या, जिव्हाळ्याच्या, कुटुंबव्यवस्थेच्या विनाशाकडे नेणारी आहे, हे निश्चित.) – इथून पुढे —-

कुणीतरी आपल्याला निमंत्रण देतो, घरी बोलावतो, आपण जातो.  यजमानांचा मुलगा दहावीला असतो. परीक्षेला अजून ५ महिने बाकी असतात. मुलगा त्याच्या बेडरुममध्ये असतो. आई त्याला बोलवायला जाते. हेतू हा, की बाहेर येऊन आपल्याला त्याने भेटून मग जावे. आई, दारावर हळूच टकटक करते. “काका-काकू आले आहेत, थोडावेळ बाहेर येवून भेट त्यांना”. आतून नकार येतो. आई नाराज होऊन बाहेर येते. “उद्या क्लासमध्ये त्याची परीक्षा आहे, अभ्यास झालेला नाही “, असे सांगून, वेळ मारुन नेते. दुसरा असाच प्रसंग. आपण नातवाईकांकडे जातो. चहा-पोहे, गप्पा सर्व होतात. एक तासाने आपण जायला निघतो. त्यावेळी सहजच त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाची, अमितची आठवण होते. आपण सहजच म्हणतो, “अमित शाळेत असेल ना! त्याला सांगा ,आठवण काढली काकांनी.” असे म्हटल्यावर अमितचे बाबा म्हणतात, “अरे सॉरी, त्याला आज सुट्टीच आहे.त्याला बोलवायला विसरलो. आहे त्याच्या रुममध्ये, बोलवतो”  आणि ते त्याला हाक मारतात. “अरे  काका निघाले आहेत, लवकर ये” तो येतो. तोपर्यंत आपण लिफ्टच्या दारात असतो. या दोन्ही प्रसंगात प्रश्न निर्माण होतात की, आई-बाबा या मुलांना, “ते काही नाही. दोन मिनिटे बाहेर ये, नमस्कार कर आणि पुन्हा जा”, असे दटावून का सांगू शकत नाहीत? त्यांचा त्यांच्या मुलावरचा हक्क गमावला गेला आहे? की ही नाती पुढच्या पिढीने सांभाळायची आवश्यकता नाही, असेच संस्कार त्यांना करायचे आहेत ? की मुलांना स्पेसमधून बाहेर काढले की ते उगाच नाराज होतील, ही भीती त्यांना सतावते आहे? 

या आणि याला आनुषंगिक अशा असंख्य प्रश्नांची गर्दी डोक्यात होत असते.याची उत्तरे आपल्याला आणि त्या मुलांच्या आईबाबांनाही ठाऊक असतात.आपल्या पेक्षा त्यांना त्यांच्या मुलांची मने जपणे,ती दुखवू न देणे हे  प्राथम्याचे असते,हे आपल्याला समजून घ्यावे लागते. त्यांच्यात आणि आपल्यात मोठी स्पेस आहे,हे सत्य स्वीकारावे लागते.

कुटुंबात परस्परांना इतकी स्पेस दिली जाते, घेतली जाते की, नात्यात नकळत भावनिक अंतर पडायला लागते आणि एकमेकांवरचे प्रेमाचे हक्क गमावले जावू लागतात. घरी कोणीही नातेवाईक, कुटुंबातील कुणाचेही मित्र, मैत्रिण आले आहेत समजल्यावर खरे तर प्रत्येकाने आपली स्पेस सोडून स्वतःहून बाहेर येऊन त्या व्यक्तीला अल्पवेळ का होईना भेटणे, बोलणे आवश्यक आहे. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे या सवयी बालवयातच लावणे आवश्यक आहे.

पूर्वीच्या आणि आताच्या कुटुंबसंस्थेतील नातेसंबंधावर, व्यवहारांवर एका हिंदी विचारवंताचे खूप छान भाष्य आहे. ते म्हणतात, “पहले सबकुछ दिलसे होता था, क्योंकि दिल को दिमाख नही था… अब दिल को दिमाख आ गया है”. हदयाला स्वार्थी बुद्धीचे कोंब फुटले आहेत. माझे अस्तित्व, माझे हक्क, माझे विचार, माझे सुख या केंद्राभोवती ज्याची त्याची स्वतः ची वर्तुळे तयार होत आहेत. ही वर्तुळे कुटुंबाच्या वर्तुळात  

गुण्यागोविंदाने राहतात तोपर्यंत ठिक आहे. पण त्यापलिकडे ती विस्तारायला लागली की नात्यात सुवर्णमध्य गाठणे कठिण होऊन बसते. हदयाला बुद्धीचे कोंब फुटणे हे डोळसपणा म्हणून  चांगलेच.पण ते केवळ स्वार्थबुध्दीचे कोंब नकोत स्वार्थबुद्धीबरोबरच विवेकबुद्धीचेही त्याला कोंब फुटावेत आणि हे विवेकबुद्धीचे कोंब स्वार्थबुद्धीपेक्षा मोठे असावेत. तरच  स्पेस घेतांना सुवर्णमध्य साधला जातो. कुटुंबाची सोनेरी झळाळी आणि नात्यातली ओल, हिरवेपण टिकून राहते. 

नात्यात अधिकाधिक वेळ स्पेस घ्यायला मोबाईलचे आक्रमण हेही एक कारण आहे.हातात मोबाईल आल्यापासून तर प्रत्येक जण त्याला हवी तेव्हा हवी तेवढी स्पेस घेत असल्याचे दिसते. याला मी, तुम्ही कुणीही अपवाद नाही. पण याचा सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे. संध्याकाळी सर्वजण कामावरुन, शाळेतून, व्यवसायाच्या ठिकाणाहून घरी येतात, एकत्र जमतात. अशावेळी तरी थोडा वेळ दिवसभरातल्या गंमतीजमती, घडामोडी यावर गप्पा व्हायला हव्यात. तेव्हाही दिवाणखान्यात बसून सर्वजण मोबाईलमध्ये डोके घालून बसली असतील तर ही स्पेस नात्यात, अंतराळात असते तशी पोकळी निर्माण करणारी ठरते. कुछ ऐसे हो गए इस दौर के रिश्ते…आवाज अगर तुम न दो तो बोलते वह भी नही.. अशावेळी कुटुंबात एकतरी जागरुक सदस्य असावा की जो सर्वांना “मोबाईल खाली ठेवा, आता थोडे बोलू या”, असा आवाज देईल. नाहीतर घराचे घरपण संपून त्याला लॉजिंग बोर्डींगचेच स्वरुप येईल.

स्पेस घेण्यावरच्या मर्यादा या कुटुंबव्यवस्था, आपापसातले प्रेम, आपुलकी, संवाद टिकविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत.म्हणून त्या ठळकपणे सांगितल्या. पण मुलांचे करियर, उज्वल भविष्य घडायला हवे असेल आणि त्यासाठी त्यांना घडवायचे असेल तर त्यांना स्पेस द्यावीच लागेल आणि ती देणे योग्यही. मूले म्हणतात, “तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले आहे. फक्त तसे करायला थोडा स्पेस द्या आम्हाला” इथे स्पेस म्हणजे ‘वेळ’ ते मागत असतात. ही स्पेस त्यांना द्यायला हवी. कधी ती म्हणतात, “तुम्ही सांगता ते योग्य आहे. ते करेनही मी. पण तुम्ही म्हणता त्याच पद्धतीने करायचा आग्रह धरु नका. मला थोडी स्पेस द्या”. इथे ते स्पेस म्हणजे करण्याच्या पद्धतीचे स्वातंत्र्य मागत असतात. ही स्पेसही त्यांना द्यायला हवी. बऱ्याचदा एखादी गोष्ट त्यांना करायची नसते. पण ती करण्याचा आग्रह होण्याची शक्यता जिथे असते, तिथे जाणे ते टाळतात. तिथे त्यांना ही स्पेस म्हणजेच न येण्याचे स्वातंत्र्य घेऊ द्यावे. त्यांचे करियर,जीवनाच्या वाटा, मूल्ये  याबाबत घरातल्या मोठ्यांच्या सांगण्याशी तत्वतः सहमत होऊन वाटचाल करताना त्यांनी त्यांना हवा तेव्हढा वेळ घेतला,हवी तशी पद्धत अंगिकारली तर त्यांचे हे स्पेस घेणे सुवर्णमध्य साधणारे होते. कोणीही दुखावले जात नाही.दोघानाही वेळ आली तर सहजपणे एक पाऊल मागे म्हणजेच बॅकस्पेसला सहज येता येते. नात्यांची वीण घट्ट राहते. अतिप्रेमाने नाती गुदमरत नाहीत वा कमी प्रेम मिळाले, अशी नात्यांत तक्रारही राहत नाही. एका मोठ्या वर्तुळात प्रत्येकाची वर्तुळे हातात हात घालून सुखात राहतात.

स्पेस तर प्रत्येकालाच हवी. पण ती अशी घ्यावी की, तेवढ्या काळात ताजेतवाने होऊन, उत्साहित होऊन पुन्हा बॅकस्पेसला जावून, उमटलेल्या नकारात्मक गोष्ट डिलीट करुन तिथे नवीन प्रेमाची, आपुलकीची अक्षर उमटविणे सहज शक्य होईल.स्पेस हवी,असे कोणी म्हटला,तर त्याला सांगू या,स्पेस जरूर घे..पण एकच अट..दूर रहकर भी दूरियां न लगे ,बस इतनासा रिश्ता बनाए रखना…

– समाप्त –

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-१ ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-१ ☆ श्री सतीश मोघे

संगणक वापरतांना आणि अलीकडे कुटुंबात वावरतांना एक गोष्ट नेहमी द्यावी लागते, ती म्हणजे ‘स्पेस’. संगणकावरील लिखाणात दोन शब्दात स्पेस दिल्याने वाक्याचा अर्थ समजणे सुकर होते तर कुटुंबात स्पेस दिल्याने नाती राखणे सुकर होते. ‘स्पेस’ या मराठीत रुळलेल्या इंग्रजी शब्दाचा शब्दकोशातला अर्थ अवकाश, अंतर, प्रदेश, जागा असा आहे. पण नात्यांमध्ये हा शब्द वापरतांना तो उसंत, वेळ, मोकळीक, स्वस्थता, सवलत, सूट अशा अनेक भावछटांच्या अभिव्यक्तीसाठी उपयोगात आणला जातो. 

‘मला स्पेस हवी’, ‘मला थोडी स्पेस द्या’ अशी मागणी अलीकडेच  मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे,हे खरे असले तरी  स्पेस देण्याघेण्याची ही क्रिया पूर्वापार चालत आली आहे. फक्त तेव्हा स्पेस मर्यादेत व ठरलेल्या वेळी, आई-वडील जेव्हढी देतील तेव्हढीच घेतली जायची. कुटुंबात स्वत:चे व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे अधोरेखित करण्याची वृत्ती नव्हती. डब्यांमध्ये ठरलेले अंतर ठेऊन कुटुंबाची ‘समझोता एक्सप्रेस’ ठराविक वेगात, ठराविक वेळेत धावत असायची. स्पेस मागायला जागाच नसायची आणि स्पेस मागायची वेळही यायची नाही. कारण छोटी घरे आणि भरपूर कामे. छोट्या घरांमुळे याची रुम वेगळी, त्याची वेगळी असे शक्यच नसायचे. एकाच खोलीत आजी-आजोबा, तिथेच बाबा, तिथेच मूले. स्पेस घ्यायची म्हटली तरी दुसरी मोकळी जागा उपलब्धच नसायची. तसेच भरपूर कामांमूळे स्पेस घ्यायला वेळच नसायचा. पाणी भरा, दळण दळून आणा, भाजीबाजार, रेशनिंग, किराणा, धुणी-भांडी, अभ्यास ही सर्व कामे कुटुंबातील सर्वांनीच विभागून करायची. या कामात संपूर्ण दिवस निघून जायचा. स्पेस घेण्यासाठी वेळही शिल्लक नसायचा. मुलांची धडपड, प्रयत्न, आई वडिलांचे कष्ट कमी करुन आई वडिलांना स्पेस (म्हणजे कष्टातून उसंत) देण्यासाठी तर आईवडिलांची धडपड मुलांनी स्पेसमध्ये (अवकाशात) भरारी घ्यावी म्हणून त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी, याची जाणीव दोघांना असल्यामुळे सर्व व्यवहार हदयाचा. बद्धीचे ‘पण’ ‘परंतू’ हे शब्द शब्दकोशातच नव्हते. त्यामुळे वेगळ्याने “स्पेस हवी…  स्पेस द्या” असे चिडून वैतागून म्हणण्याची वेळ यायची नाही. आईवर कधीतरी हे वेळ यायची. कुटुंबात कामाच्या ओझ्याने दबलेली आईच असायची. तिच्यामागे काही हट्ट, अभ्यासातली शंका यासाठी खूप मागे लागलो की कधीतरी ती म्हणायची, “आता जरा थांब. मला माझे हे काम करु दे”. अर्थात ती देखील  निवांत बसण्यासाठी नव्हे तर हातातले काम वेगाने पूर्ण करण्यासाठी ही स्पेस मागायची.

मध्यमवर्गीय  आणि श्रीमंत कुटुंबात स्पेस घेणे आणि देणे हल्ली अनिवार्य आणि त्याच जोडीला सहज शक्य झाले आहे. कारण मोठी घरे आणि बऱ्यापैकी मोकळा वेळ. प्रत्येकाला वेगळे बेडरुम. मोकळीक हवी असली की आपल्या बेडरुमध्ये शिरायचे की मिळाली स्पेस. घरात धुणी-भांडी,केरकचरा, स्वयंपाकाला  मोलकरणी, किराणा, भाज्या, पीठ इ. सर्व घरपोच. त्यामूळे मुलांना अभ्यास सोडला तर इतर कामे नाहीत,त्यामुळे स्पेस घ्यायला बऱ्यापैकी मोकळा वेळ, असे झाले आहे खरे. याबद्दल तक्रार करण्याचेही कारण नाही. कारण नशिबाने ही सर्व सुखे त्यांना, आपल्याला मिळाली आहेत. ही जरुर उपभोगावीत . पण एव्हढी सुखे आणि भरपूर स्पेस मिळत असूनही जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य दुसऱ्याला, “तू माझ्या डोक्यात जातेस/जातोस” असे सरळ तोंडावर बोलून, रागाने पाय आपटत आपल्या खोलीचे दार धाडकन आपटून आपल्या खोलीत जाते आणि बराच वेळ बाहेर येत नाही, तेव्हा या ‘स्पेस’ घेण्यावर आणि त्याला स्पेस देण्यावर विचार करावा लागतो. 

हे असे का घडते? याचा विचार केला तर दिवसेंदिवस कमी होत जाणारी सहनशीलता, हे त्याचे उत्तर म्हणावे लागेल. जीवन म्हणजे सहन करणे आहे. स्वत: ला आणि इतरांनाही. आपण जर संवदेनशील असलो तर आपल्या वागण्यातल्या चुका लगेच समजतात. रागावलो तरी थोड्याच वेळात वाटते, उगाच रागावलो. कुणाला काही हिताचे सांगितले आणि तो नाराज झाला की वाटते उगाच आपण सांगत बसलो. हे असे बऱ्याचदा  घडले की आपलाच स्वभाव आपल्याला सहन होत नाही. थोडक्यात ‘काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे’ , असे होते आणि या नैराश्यात आपलाच आपल्याला राग येऊन आपण कोपऱ्यात जावून बसतो. नको तेवढी स्पेस द्यायला आणि घ्यायला सुरुवात करतो. आपल्याला आपण सहन करू शकत नाही. तसेच इतरांनाही आपण सहन करु शकत नाही. कुटुंब, प्रवास, नोकरीचे ठिकाण आणि जिथे जिथे आपल्याला जावे लागते अशा सर्वच ठिकाणी भिन्न प्रकृतीच्या,स्वभावाच्या व्यक्ती असतात. अशा व्यक्तींना सहन करण्याची आपली क्षमता अत्यल्प असल्याने तिथेही आपण अंतर ठेवून आणि मौन राखून राहायला लागतो. आपण अंतर ठेवले तरी त्या व्यक्ती जवळ यायच्या थांबत नाही.बोलायच्या थांबत नाहीत. अशा व्यक्ती जवळ आल्या,काही बोलल्या की त्या डोक्यात जातात. त्रास आपल्यालाच होतो. हा त्रास कमी करायचा तर स्पेस घेण्याची वृत्ती न वाढविता सहनशीलता वाढविणे आवश्यक आहे.

सहनशीलता ही बाल वयातच वाढू शकते. पूर्वी संस्काराचे वय सोळा वर्षापर्यंत होते. आता ते कमी होऊन सात ते आठ वर्षापर्यंत आले आहे. या वयातील मुलेच तुम्हाला समजून घेण्याच्या, स्वत: त बदल करण्याच्या, सहनशीलता वाढविण्याच्या मनस्थितीत असतात. या वयात त्यांच्यावर योग्य ते संस्कार झाले पाहिजेत. काका-काकू,वडीलधारी पाहुणे मंडळी घरी पाहूणे म्हणून आले तर मुलांना त्यांना नमस्कार करायला सांगितले पहिजे. “त्यांना खाली झोपता येत नाही.त्यांचे गुडघे,पाठ दुखतात. ते तुमच्या बेडरूममध्ये बेडवर झोपतील. तुम्ही हॉलमध्ये गादी घालून खाली झोपा”,असे त्यांना प्रेमाने सांगितलेच पाहिजे. दिलेली स्पेस केव्हा सोडायची, बॅक स्पेसला कधी जायचे, हे त्यांना समजले पाहिले.

या बाबतीत एका मित्राने सांगितलेला प्रसंग खरंच विचार करायला लावणारा आहे. पत्नीचे निधन झाल्यावर त्याचे व्यवसायाचे ठिकाण सोडून मुलाकडे राहण्याची इच्छा त्याने  व्यक्त केली. मुलगा म्हणाला, ” हरकत नाही. पण माझी मुले त्यांचे बेडरुम कुणाला शेअर करू देत नाहीत. तेव्हा तुम्हाला हॉलमध्ये झोपावे लागेल.” मुलांना स्पेस देणाऱ्या या वृत्तीला काय म्हणावे ! बरे मुलांची वयेही ७ वर्षे आणि ९ वर्षे. या वयातच त्यांना स्पेस कधी सोडायची हे शिकविता येते. कारण आई बाबा सांगतात ते योग्यच आहे, अशी ठाम समजूत असल्याने शिकवितांना ते नाराज होण्याची शक्यता कमी असते आणि नाराज झाले तरी वाद न घालता ते कृती करत असतात. तसे न करता आपण त्यांना नको तेवढी स्पेस देवून आपल्या जन्मदात्यालाच बेडरूममधे झोपायला स्पेस नाही, असे म्हणत असू ,तर ही स्पेस नात्याच्या, जिव्हाळ्याच्या, कुटुंबव्यवस्थेच्या विनाशाकडे नेणारी आहे, हे निश्चित.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंगलेली (?) मैफिल  ☆ श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

रंगलेली (?) मैफिल  ☆ श्रीरंग खटावकर  ☆

काही दिवसांपूर्वी एका मैफिलीला गेलो होतो.  शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच्या वातावरणात एक प्रकारचा भारदस्तपणा उगाचच येतो. अभिजन, महाजनांची गर्दी, त्यात आमच्यासारखे काही नुसतेच सामान्यजन ! 

मंद सुगंध थिएटर भर पसरलेला, आधीच कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झालेला…. 

एकदाचा पडदा उघडतो.  दोन तानपुरे, डावीकडे तबला, उजवीकडे पेटी, मधोमध एक किडकिडीत व्यक्ती बसलेली. पडदा उघडल्यावर त्या व्यक्तीने हातानेच साथीदारांना खूण केली, तानपुरे छेडले जाऊ लागले, पण बुवांचे काहीतरी बिनसले, एक तानपुरा स्वतःकडे घेतला, खुंट्या पिळू लागले, हस्तिदंती मणी खालीवर करू लागले, जवारी नीट करू लागले. इथे आमच्यासारख्या अनेकांची चुळबुळ सुरू झाली. 

मला नेहमी हा प्रश्न पडतो, की हे लोक पडदा उघडायचा आधी हे सगळं का करत नाहीत?… बरं पंधरा मिनिटं झटापट केल्यावर सगळं सुरळीत झालं ( असं वाटलं ) आणि तंबोरा मागे दिला. तेवढ्यात तबला वादकानी त्याची हातोडी काढली, गठ्ठे वर खाली करू लागला, मधेच टण टण करू लागला. त्याचं झालं मग बुवांनी गाणं सुरू केलं. ” पायल बाजे मोरे झान्झर प्यारे ” ….. त्यांची पायल वाजायला सुरुवात होत नाही तेवढयात बुवांनी माईकवाल्याशी काहीतरी खाणाखुणा सुरू केल्या. त्यांना मॉनिटरमधून हवा तसा फीडबॅक मिळत नव्हता वाटतं. मग परत ती पायल सुरू झाली. आता पेटीवाला खुणेनेच माईकवाल्याला सांगू लागला की तबल्याचा फीडबॅक कमी कर पेटीचा वाढव.

अरे काय चाललंय काय यार? पडदा बंद असताना पण हे आवाज येत होते की, मग तेव्हा काय याची रंगीत तालीम केली काय?

बरं एवढं सगळं होऊन परत बुवांचा काही मूड नव्हता. त्यांची पायल एकदमच पुचाट वाजत होती. मी हळूच मित्राशी तसं कुजबुजलो तर बाजूचा म्हणाला, त्यांचं तसंच असतं नेहमी ! मी कपाळावर हात मारला. 

का ? का असे लोक अंत बघतात रसिकांचा काय माहीत?  बरं आजूबाजूला बघितलं तर सगळेच आपसात गप्पा गोष्टी करत होते. मग आम्हीही खुसपुसत सुरू झालो, 

” काय रे काल कुठे उलथला होतास रे?” 

“ नान्यानी पार्टी दिली ना, VP  झाला म्हणे ! “

” काय म्हणतोस ? नान्या आणि VP? अजून नीट शेम्बुड पुसता येत नाही ! ” 

” अरे त्याचा बॉस त्याच्याहून शेम्बडा रे ! केला ह्याला VP “

…. मग मन्या, विकी, सुऱ्या, सगळ्यांच्या यथेच्छ उखाळ्या पाखाळ्या झाल्या.

मधेच गाणारे बुवा यायायाया, यायायाया करत एखादी जीवघेणी तान घेत होते ( म्हणजे आमचा जीव जात होता ) लोक टाळ्या वाजवत होते, ते लवकर संपावे म्हणून. पण उलट बुवांना अजूनच चेव येत होता. 

तबला पेटीवाल्याची तर नुसती तारांबळ उडाली होती बुवांना पकडायला.

…. आणि इकडे आम्ही मस्त टवाळक्या करत आमची मैफिल रंगवत होतो. 

अर्थात तुम्ही म्हणाल ‘ तू कोण रे टीकोजी राव लागून गेलास त्यांच्यावर टीका करायला?’

… अरे यार आम्ही तानसेन मुळीच नाही  पण कानसेन नक्कीच आहोत हो !

मला खरं सांगा अशा अनेक मैफिली तुम्हीही रंगवल्या असतील ना?

ह्या मैफिली गाण्याच्याच असल्या पाहिजेत असे नाही. एखादा रटाळ सेमिनार, विशेषतः पोस्ट लंच सेशन ! 

अहाहा ! ते मस्त जेवण, आणि जेवण झाल्यावर ते त्या हॉलचं गारेगार वातावरण, त्या व्याख्यात्याचे मेस्मरायझिंग (डोक्यावरून जाणारे शब्द) बोलणं. काय गाढ झोप लागते म्हणून सांगू ! अगदी दोन जायफळं घालून प्यालेल्या दुधानी पण येणार नाही अशी पेंग येते. किती टाळू म्हंटली तरी टाळता येत नाही. त्यात जर आपली खुर्ची मागची असेल तर विचारूच नका. झोपेच्या, पेंगेच्या लाटांवर लाटा येऊन थडकत असतात डोळ्यावर ! हो की नै ? ….  

…. किंवा एखादा व्यक्ती गंभीरपणे, “अमुक एक करा ..  बघा वैराग्याच्या खांबांवर मनाचा हिंदोळा कसा झुलायला लागेल ” असं काहीबाही बोलत असतो, तेवढ्यात बाजूच्या खुर्चीतून पॉsssss असा भयानक आवाज आणि पाठोपाठ दर्प येतो, आणि एकदम फसकन हसायला येतं. ते हसूही आवरता आवरत नाही. आणि तो आवाज काढणाराही विचित्र नजरेने आपल्याला दटावतो, तेवढ्यापुरतं गप्प बसतो.  पण पुढच्याच क्षणाला परत फस्स्स करून सुरू!

एक माझी मैत्रीण तर नेहमी ते क्रोशा का काय म्हणतात त्याची ती हुकवाली सुई आणि दोऱ्याचे बंडल प्रत्येक मैफिलीला घेऊन जाते, आणि अशी रटाळ मैफिल असली, की क्रोशाची तोरणं, ताटाभोवतालची फुलं, टेबलावर टाकायला काहीतरी असं एकतरी पूर्ण करते. पूर्वी नाही का आज्या कीर्तनात वाती वगैरे वळायच्या तसंच ! 

पण खरं सांगतो अश्या मैफिलीत, सेमिनार, व्याख्याने यात यामुळे माणसांची खूप कामं होतात हो. 

आणि मला सांगा त्यात आपल्याला मरणाचे येणारे हसू, न टाळता येणारी झोप, सुचलेले किस्से, मारलेल्या गप्पा यांच्या मैफिलीला खरंच तोड नसते. .. शिंची अशी झोप कधी घरी लागत नाही.

काय बरोबर ना?

काय हो झोपलात की काय ? का क्रोशाची तोरणं विणताय ? नाही ना? 

मग वाजवा की टाळ्या ….. संपली आमची मैफिल !!!!

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

मी आणि बायको, आमच्या अनुक्रमे ५ आणि ३ वर्ष वयाच्या लेकरांना घेऊन, सामानाने गच्च भरलेली ट्रॉली ढकलत तेवढ्याच गच्च भरलेल्या मॉलमध्ये बिलिंग काऊंटरकडे मार्गक्रमण करत होतो, आणि ते मगाचचे आजोबा परत आमच्याशी बोलायला आले होते.

तशी आजच्या संध्याकाळची सुरुवात काही फारशी चांगली झाली नव्हती. 

आज शुक्रवार होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना लोकांच्या डोळ्यासमोर संध्याकाळी सुरू होणाऱ्या वीकएंडची रम्य दृश्यं तरळत होती, मला मात्र सोमवारी एक अर्जंट प्रेझेन्टेशन होतं, घरी गेल्यावरही तेच काम घेऊन बसायला लागणार होतं हे जाणवत होतं. मुलांना मॉलमध्ये नेण्याचं प्रॉमिस केलं होतं, पण त्यांना काहीतरी थाप मारून टाळायचं, हेही ठरवलं होतं.  

पण घरी पोचलो आणि कळलं की माझ्या सासूबाईंची प्रकृती थोडी बिघडली होती, nothing serious, पण त्या आणि माझे सासरे उद्या इथे आमच्या घरी येणार होत्या. त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवणं, तपासण्या करून घेणं अशी कामं होती.

सासू सासरे येणार म्हणून आणि बाकीचीही वाणसामान आदि खरेदी होती, बायकोला एकटीला ते सगळं सामान आणणं जमलं नसतं. त्यामुळे न सुटके मला आल्यापावली परत बाहेर पडावं लागलं. या घटनेला दोन तास होऊन गेले होते, आणि आत्ता आम्ही खरेदी संपवून मॉलमधून निघण्याच्या मार्गावर होतो. 

आमची खरेदी चालू असताना एक t shirt, बर्म्युडा घातलेले मॉडर्न आजोबा लेकरांना बघून आमच्याजवळ आले. त्यांची नातवंडं अमेरिकेत असतात, या दोघांना बघून त्यांना त्यांची आठवण आली, म्हणून ते आवर्जून या दोघांशी गप्पा मारायला आले. 

आज आमच्या मुलांचा सौजन्य-सप्ताह चालू होता बहुतेक. या नव्या आजोबांशी त्या दोघांनी छान गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर हसले – खेळले, enjoy केलं. मुलांना टाटा करून आजोबा त्यांच्या खरेदीला निघून गेले. 

आणि आत्ता आम्ही निघत असताना ते परत आले होते. 

” यंग मॅन, हे सोनेरी दिवस पुन्हा येणार नाहीत,” ते माझ्याशी बोलत होते, ” मला कल्पना आहे की तुमच्या करीअरच्या दृष्टीने ही महत्त्वाची वर्षे आहेत, खूप कामं असतील, पण या लेकरांची ही वयं पुन्हा गवसणार नाहीत. मी पण कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम केलं आहे, ती धावपळ – ती रॅट रेस काय असते हे मीही अनुभवलं आहे….. एकदा माझ्या मुलीला तिच्या बाहुल्यांसाठी डॉल हाऊस बनवायचं होतं. शाळेचा प्रोजेक्ट वगैरे नव्हता, तिलाच तिच्यासाठी हे करायचं होतं. मला नेहमीप्रमाणे काहीतरी deadline होतीच. 

तिनं माझ्याकडे डॉल हाऊस करायला मदत करायचा हट्ट धरला. माझ्या कामाच्या व्यापात आणि घाई गडबडीत मी तिला ठाम नकार दिला, आत्ता काही अर्जंट नाहीये, नंतर करू, मी बिझी आहे वगैरे सांगितलं आणि जायला निघालो…. निघालो खरा, पण तिचा तो बिच्चारा चेहरा नजरेसमोरून हलेना. काहीतरी तुटलं आतमध्ये. आणि मी परत फिरलो…. तास दोन तासांचंच काम होतं, डॉल हाऊस पूर्ण झालं. त्याक्षणीचा तिचा तो उत्फुल्ल चेहरा आजही आठवतो. त्या दिवशी काय deadline होती, ते आठवतही नाही, पण ते डॉल हाऊस आता माझ्या मुलीच्या मुलीकडे अजूनही थाटात दिमाखात उभं आहे…. लक्षात ठेव, म्हातारपणी – निवृत्तीनंतर, ऑफिसचं अमुक काम करायचं राहिलं, तमुक काम करायचं राहिलं ही रुखरुख नसेल, पण लेकरांचं बालपण निसटून गेलं ही रुखरुख मात्र नक्की असेल.”

आजोबा निघून गेले, बायको माझ्याकडे सहेतुक पहात होती.

भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली साक्षात्कार झाला, मला गच्च भरलेल्या मॉलमध्ये, गच्च भरलेली ट्रॉली ढकलताना साक्षात्कार झाला. मी काय गमावून बसणार होतो हे ध्यानात आलं. तसं होऊ देता कामा नये हा पक्का निर्धार झाला. आणि मुलांचे हात हातात धरून त्याच निर्धाराने मी पुढे निघालो.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या प्रिय भारतियांनो… 🇮🇳 ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

??

☆ माझ्या प्रिय भारतियांनो… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मु. पो.- ६८⁰ द. अक्षांश

दक्षिण ध्रुव, चंद्र 

उपग्रह – चंद्र

ग्रह – पृथ्वी

दि. २३ ऑगस्ट २०२३

माझ्या प्रिय भारतीयांनो, 

सर्वांना माझा स. न. वि. वि.

मी इकडे चांदोमामाच्या घरी सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी आजची चंद्रमोहीम फत्ते केली न् भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. अगदी भारावून गेलोय मी! तब्बल ४० दिवसांचा अथक प्रवास…. लाख्खो किलोमीटरचा! तसं पाहिलं तर, मी खूप दमलोय…. पण तुम्ही सर्वजण माझी खुशाली जाणून घ्यायला उत्सुक असाल आणि काही चांगली गोष्ट झाल्यावर ती आपल्या माणसांना शेअर केली की, आनंद अजून वाढतो ना! म्हणून पोहोचल्याबरोब्बर हे पत्र लिहीत आहे. 

दि. १४ जुलैला अवघ्या भारतीयांच्या साक्षीने माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. उण्यापुऱ्या दीडशे कोटी शुभेच्छांचे गोड ओझं सोबतीला होतेच. हुरहूर, उत्सुकता, भीती आणि आपणां सर्वांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा…. यामुळे थोडं दडपण आलं होतं खरं! त्याचबरोबर चांदोबाच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पहिला मान ‘आपल्याला’ मिळणार म्हणून जाम खूष पण होतो !

पृथ्वीमातेपासून दूर जाताना पाय निघत नव्हता. थोडे दिवस तिच्याभोवतीच घुटमळत होतो खरा… पण दि.१ ऑगस्टला मनाचा हिय्या केला आणि चांदोबाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. त्याच्याभोवती फिरत फिरत थोडा अंदाज घेतला. माझा दादा चंद्रयान-२ ने केलेल्या चुका (चुका नव्हे…. थोडा चुकीचा अंदाज) टाळत हळूहळू चांदोबाच्या जवळ जाऊ लागलो. आणि आश्चर्य…. चांदोबाच्या अगदी जवळ गेल्यावर तिथे दादानं, चंद्रयान-२ ने ‘welcome buddy’ म्हणत त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. दादाने केलेल्या स्वागतनं मला अजूनच स्फूरण चढलं. योग्य अशी जागा शोधून soft landing करत अलगदपणे चांदोबाजवळ गेलो. अगदी प्रेमभरानं स्वागत केलं त्याने माझं! इतका लांबचा प्रवास हिरीरीने पार पाडल्याबद्दल जवळ घेऊन कौतुकानं माझी पाठ थोपटली. त्यामुळे माझं मन अगदी भरून आलं. आत्ता तिथे पृथ्वीवर तुम्ही सर्वजण माझ्या यशस्वी landing चा सोहळा ‘ Yesssssssss, we have done it ‘ म्हणत जल्लोष करताहात. हळूच डोळ्यांच्या कडांचं पाणी टिपत एकमेकांना wish करता आहात. हे मी इतकं लांबवर असूनही अनुभवतोय. कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न मी पूर्ण केलंय, याचं मला खूप खूप अभिमान वाटतोय. आपला भारत- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश ! एकदम भारी वाटतंय बुवा! भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेलाय, हे नक्की…. अर्थात यामागे आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांंचे अपार कष्ट आहेत आणि तुमच्या सदिच्छाही ! 

आणि अरे हो ! रशियाचे चंद्रयान Luna-25 फक्त १० दिवसच प्रवास करुन चंद्रावर पोहोचणार होतं…. तेही माझ्यानंतर निघून माझ्याआधी ! पण उतरताना त्याचं क्रॅश लॅंडिंग झालं. So sorry ! मग माझा ४० दिवसांचा प्रवास ससा-कासवाच्या गोष्टीसारखा ’ slow but steady wins the race ‘ प्रमाणे झालाय; असंच म्हणायला हवं, नाही का ?

असो…. आता थोडा फ्रेश होऊन लगेचच कामाला सुरुवात करणार आहे. फक्त १४ दिवसांच्या कालावधीत करायच्या कामांची भली मोठ्ठी यादी आहे. विक्रम व प्रज्ञान यांच्या मदतीने प्रयोग, अभ्यास, निरीक्षणेही करायची आहेत. इथं पाणी आहे का? हे पहायचं आहे. विविध नमुने गोळा करायचे आहेत. जमलं तर चंद्रयान-२दादाला भेटणार आहे मी. अर्थात इथे घडणारी प्रत्येक गोष्ट मी वेळोवेळी पृथ्वीवर कळवत राहणार आहे. एक गंमत सांगू? इथं गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे. त्यामुळे अगदी तरंगत तरंगतच चालल्यासारखं वाटतं इथे ! मज्जाच मज्जा वाटतीय….

फावल्या वेळात चांदोबाशी गप्पा मारायच्या आहेत. ‘ तू एक उपग्रह नाही, आमचा नातलग आहेस. बालगोपाळांचा चांदोमामा आहेस. ते ‘चांदोमामा, चांदोमामा भागलास का?’ म्हणतच जेवतात. अंगाईगीतात तू आहेस. आमची आई तुला भाऊ मानते. तुला पाहिल्यानंतरच आमचा संकष्टी चतुर्थीचा उपवास सुटतो. तुझ्या वाटचालीनुसार भारतीय महिन्याची तिथी, सणवार साजरे होतात. युवतींच्या सुंदर चेहऱ्याला तुझी उपमा देतात( ते कितपत योग्य? इथं आल्यावर मला ते सत्य कळ्ळलं बरं) प्रेमीजन तुझीच साक्ष ठेवून आणाभाका घेतात. अनेक गाण्यांतही तू गुंफला आहेस….’ अशा खूप खूप गोष्टी त्याला सांगणार आहे. 

फारसं लिहीत नाही. बाकीचं नंतर सविस्तरपणे लिहीन. कामासंदर्भातील माहिती व फोटो  updates पाठवत जाईन ! एक सांगू….. हे पत्र लिहिताना माझ्या अंगावर कितीतरी वेळा रोमांच उभे राहिलेत आणि पत्र वाचताना तुमच्याही अंगावर उभे राहणार, हे नक्की ! 

पुन्हा एकदा …. I am proud to be an Indian! 🇮🇳

कळावे,

आपल्या सर्वांचा लाडका,

चांद्रयान -३

पत्ता – 

मु. पो. – प्रत्येक भारतीयाचे हृदय

देश –  भारत

खंड – आशिया

ठळक खूण – कर्क वृत्त 

(हिंदी महासागराजवळ)

ग्रह – पृथ्वी (सूर्यमालेतील तिसरा ग्रह)

मंदाकिनी – आकाशगंगा

लेखक : अज्ञात. 

प्रस्तुती –  सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फूल उमलताना…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “फूल उमलताना” ☆ सौ राधिका भांडारकर 

मी एक गोष्ट सांगते तुम्हाला.

दोन शेजारी होते.  एक निवृत्त शिक्षक आणि दुसरा तरुण बँकर.  एक दिवस ते दोघं एका नर्सरी मधून काही झाडांची रोपे आणतात.  ती रोपे आपापल्या अंगणात लावतात. निवृत्त शिक्षक रोपांना अधून मधून पाणी घालत असत. रोपांची जेवढी घ्यायची तेवढी काळजी ते घेत असत. तरुण बँकर मात्र रोपांना रोज रोज भरपूर पाणी घालत असे. त्यामुळे त्याची रोपे अधिक हिरवीगार आणि टवटवीत असत.  निवृत्त शिक्षकाचीही रोपे वाढतच होती मात्र दर्शनी पाहता बँकरची रोपे अधिक आकर्षक भासत होती.

एकदा काय झालं अचानक तुफान आलं आणि त्या तुफानात बँकरची वाढलेली हिरवीगार रोपं उन्मळून गेली. मात्र निवृत्त शिक्षकाची रोपे तुफानाचा सामना करत ताठ उभी होती.

“हे कसं?”

बँकरला  प्रश्नच पडला.

” मी तर माझ्या झाडांना रोज पाणी घालत होतो.  किती काळजी घेत होतो! “

त्यावेळी शिक्षक त्याला म्हणाले ,”अति पाणी घातल्याने, अति काळजी घेतल्याने तुझी रोपे बाह्यांगी वाढली पण त्यांच्या मुळांना काहीच ताण न मिळाल्यामुळे ती जमिनीत खोलवर पाण्याच्या शोधात पसरलीच नाहीत.  म्हणून तुफान आल्यावर अशी उन्मळून पडली.  याउलट माझी झाडे स्वयंपूर्ण बनली.  जास्त पाणी न मिळाल्यामुळे जमिनीत त्यांची मुळं पाण्याच्या शोधात खोलवर रुजत गेली आणि जमीन पकडून राहिली.”

मुलांचे व्यक्तिमत्व घडवताना नेमकं हेच घडतं.  त्यांना जे हवं ते, जेव्हां हवं तेव्हां मिळत गेलं,  त्यांचे प्रत्येक हट्ट लाडा कौतुकाने किंवा अतिरिक्त भावनेने पूर्ण होत गेले तर मुलं स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनू शकत नाहीत.  त्यांच्यात  स्वतः काही मिळवण्याची जिद्दच निर्माण होऊ शकत नाही किंवा मिळवण्यासाठी स्वतः काही धडपड करण्याची त्यांची इच्छा, क्षमताच खुंटून जाते आणि अशा वातावरणात वाढल्याचे पडसाद पुढच्या आयुष्यात गंभीरपणे उमटू शकतात.  प्रचंड नैराश्य, उदासीनता, अकार्यक्षमता, कधीकधी गुन्हेगारी वृत्ती, व्यसनाधीनतेला ही मुलं बळी पडू शकतात.  त्यामुळे मुलांना घडवताना पालकांनी आपली मुले जबाबदार कशी होतील याचा प्रथम विचार करायला हवा.  जबाबदारी आली की स्वातंत्र्य येते आणि आत्मविश्वास बळावतो. 

मुलांचं व्यक्तिमत्व घडवणं ही खूप संवेदनशील बाब आहे. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपलं मूल सर्वगुणसंपन्न असलं पाहिजे,  जगातलं जे जे बेस्ट ते त्याला मी मिळवून देईन पण त्याला “द बेस्ट चाइल्ड” चा पुरस्कार हा मिळालाच पाहिजे.  कधी कधी तर मुलांच्या यशात आई-वडील आपलंच स्टेटस शोधत असतात आणि अगदी लहानपणीच एक स्पर्धात्मक व्हायरस त्यांच्या जडणघडणीच्या काळात तेच ढकलतात.  सुरुवातीला जरी चित्र देखणं वाटत असलं तरी काळा बरोबर हळूहळू त्याचे रंग उडू लागतात.  त्यातूनच एक तर न्यूनगंड निर्माण होऊ शकतो किंवा विद्रोहाची भावनाही उफाळून येऊ शकते.  पण याची जाणीव जेव्हां होते तेव्हां  खूप उशीर झालेला असतो.

डॉक्टर गेनोट हे उत्तम बालमानसशास्त्रज्ञ.  त्यांनी एक संकल्पना मांडली. 

व्हॉइस आणि चॉईस

मुलांना बोलू द्या, त्यांना निवडीचा हक्क द्या, त्यांना काय हवंय हे सांगण्याचे स्वातंत्र्य  द्या.  म्हणजेच एकीकडे मुलांना शिस्त लावताना,वळण लावतानाच मुलांशी संवाद कसा होईल याची दखल घेणे हे जरुरीचं आहे.  ज्या घरात मुलांशी संवाद असतो, ज्या घरातली मुलं आपली मतं मांडू शकतात… ती अधिक धीट, धाडसी आणि आत्मनिर्भर होतात.  एक गोष्ट कधीही विसरू नये की लहान मुलालाही स्वतःचं असं मत असतं.  अगदी दोन महिन्याचं मूल ज्याला बोलून व्यक्त होता येत नाही ते रडून, गोंधळ घालून आपल्या मनासारखं करून घेतच की नाही?  प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याची ही पहिली पायरी असते.

पहिलं  मूल घडवताना तर  आई-वडिलांची खरोखरच तारांबळ उडते कारण तेही प्रथमच पालक झालेले असतात.  त्यामुळे त्यांच्या पालकत्वात कुठेतरी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांचं बालपण आणि त्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांची एक भूमिका दडलेली असते. शिवाय बदलत्या काळानुसार आजूबाजूच्या जगाबरोबर मुलाला वाढवताना मनात खूप गोंधळ उडालेला असतो. पुस्तकी ज्ञानाचाही प्रभाव पडलेला असतो आणि कधी कधी आपलंच मुल आपणच ओळखण्यात कमी पडू शकतो.

मला आजही आठवतं, माझी मुलगी पाच सहा वर्षाचीच असेल.  मी तिला काहीतरी करायला सांगितलं. थोडक्यात एक जॉब दिला मी तिला. ती नाही म्हणाली नाही. पण थोड्यावेळाने माझ्यासमोर दोन्ही हात सरळ करून ताठ उभी राहिली आणि म्हणाली,

” मम्मी चिमणीला पोहता येईल  कधी ?आणि बदक हवेत उडू शकेल का?”

बापरे!  प्रचंड हादरले होते मी तेव्हां. या एवढ्याशा मुलीत हा विचार आला कुठून?  मग मी माझी थिअरी बदलली. मी बेसावध राहिले नाही किंवा तिच्या बाबतीतला सावधपणा सोडला नाही पण तिच्या इवल्या इवल्या मतांनाही मान देत राहिले आणि तिच्याशी संवाद साधत, सांभाळत, काय बरोबर, काय चूक, काय चांगलं, काय वाईट हे यथाशक्ती दाखवत राहिले.

मुलं अत्यंत संवेदनशील असतात तसेच अनुकरणप्रिय असतात थोडक्यात कॉपीबहाद्दर असतात.  त्यामुळे पालकांच्या वागण्याचा, बोलण्याचा नकळत प्रभाव त्यांच्या मनावर पडत असतो. शिवाय मुलं निष्पाप असतात. जेव्हां ती काही बोलतात तेव्हा त्यात उद्धटपणा नसतो तर ते फक्त व्यक्त होणं असतं आणि त्यात पालकाच्या वागण्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं.  ज्यावेळी पालक मुलांना सांगतात “तू हे करू नकोस, हे वाईट आहे. किंवा ही काय भाषा तुझी? कुठून शिकलास?”

अशावेळी एखादं मूल झटकन उत्तर देत.,” तू नाही का त्या दिवशी बोलताना असं म्हणालीस.” अशावेळी पालक निरुत्तरच होतात.  म्हणून अशी वेळच येऊ नये याचा पालकांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. अशावेळी स्वत:च्या काही सवयी बदलणं गरजेचं असतं.

संस्कार हा ही असाच एक गहन विषय आहे.

“ये रे बाबा मी तुझ्यावर आता संस्कार करते” असा “तुला जेवण वाढते” सदरातील हा विषय नाही. संस्कार हे नकळत घडत असतात आणि ते घडवण्यासाठीचे वातावरण कसे आहे त्यावर त्यांचे चांगलेपण अथवा  वाईटपण अवलंबून असते. 

आणखी एक मुद्दा म्हणजे मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यांना सतत काहीतरी करायचं असतं. त्यांच्या डोक्यात सतत प्रश्न असतात. प्रचंड औत्सुक्य असतं आणि प्रत्येक बाबतीतले  असंख्य “का” त्यांच्या प्रवाहात वहात असतात आणि त्यांची उत्तर ते शोधत असतात. अशावेळी,

” तुला नाही कळणार”

किंवा,

“हे करू नकोस”

” अजून तू लहान आहेस”

” याला हात लावू नकोस”

“मोडून ठेवशील”

“अरे पडशील ना..?”

” किती पसारा रे तुझा?”

” आणि हे काय? अशा भिंतीवर रेघोट्या मारून ठेवल्यात.तुला कितीदा सांगायचं?”

ही सारी बोलण्यातली नकारात्मकता आहे आणि ती त्यांच्या ऊर्जेचं खच्चीकरण करत असते.

तुम्हाला एक गंमत सांगते .

माझे पती आर्किटेक्ट आहेत.  बऱ्याच वर्षांपूर्वी एका तरुण जोडप्याच्या बंगल्याचं त्यांनी स्केच केलं.  ते तरुण जोडपं ऑफिसात  आलेलं असताना माझ्या पतींनी, केलेलं ते स्केच त्यांना दाखवलं.  त्यांच्या पसंतीसही उतरलं पण त्यांच्याबरोबर त्यांची छोटी पिंकी ही होती. ती माझ्या पतींना धिटुकलेपणाने म्हणाली,” काका आमच्या या बंगल्यात ना एक पसारा खोली पण करा माझ्यासाठी. आणि अशी एक भिंत ठेवा की जी फक्त माझी असेल आणि मी त्याच्यावर कशापण रंगरेघोट्या काढेन”       .

तिच्या या बोलण्यावर त्यावेळी आम्ही सगळे खळखळून हसलो होतो.  पण मामला गंभीर होता, डोळ्यात अंजन घालणारा होता याचीही जाणीव  झाली होती.पालकांच्या नकारात्मकतेला दणका देणारी होती.

पण काहींचे पालकत्व मात्र  खरोखरच लक्षवेधी असते. अरुण दाते, सुप्रसिद्ध गायक.  कुठल्यातरी एका शालेय परीक्षेत ते अगदी शेवटच्या नंबरावर होते. जवळजवळ नापासच होते म्हणाना.  घरी येऊन प्रगती पुस्तक कसे दाखवावे ही चिंता त्यांच्या बालमनाला कुरतडत होती.  रामू भैया —अरुण दाते यांचे वडील— त्यांनी ते ओळखले आणि ते आपल्या मुलाला म्हणाले, “अरे पण तुझ्यासारखं कुणाला गाता येतं का?  तिथे तर तुझाच पहिला नंबर आहे ना ?”

या दोन वाक्यांमुळे अरुण दाते सारखा एक महान गायक घडला.

आज हा लेख लिहिताना, मागे वळून पाहताना, माझ्या गतकाळातल्या पालकत्वाला निरखत असताना माझ्या कडून पालकत्वाच्या झालेल्या काही चुका मला खूप वेळा भेडसावतात आणि गंमत म्हणजे आई म्हणून माझ्या हातून झालेल्या चुकांची भरपाई नातवंडांच्या बाबतीत करताना माझी मुलगी मला म्हणते,” थांब ग आई!  तू आमच्यात आत्ता पडू नकोस. तू ही  तर आम्हाला अशीच रागवायचीस ना?”

तेव्हा जाणवतं पालकत्व हा अव्याहत वाहणारा विषय आहे.  काळाप्रमाणे बदलणारा आणि शिकवणाराही आहे.शिवाय तो एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणारा प्रवास आहे.एक सूक्ष्म लिंक असते त्यांच्यात. त्यात नेमकं असं काहीही नाही.  कारण प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येक सुजाण पालकत्वाच्या व्याख्याही  निराळ्या असतात.

फूल उमलताना कुणी पाहिलं आहे का? पण जमिनीतल्या मुळांशी त्याच्या उमलण्याचं नातं असतं.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परातभर लाह्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ परातभर लाह्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

” परातभर लाह्या त्यात  बंदा रूपया” असं कोडं सासूबाई माझ्या मुलीला घालत असत आणि मग त्याचे उत्तर त्याच देत असत, “आकाशभर चांदण्या, मध्ये असलेला चांदोबा!”

मनाच्या कढईत या आठवणींच्या लाह्या फुटायला लागल्या की त्या इतक्या भरभरून बुट्टीत जमा होतात की ती बुट्टी कधी भरून ओसंडून वाहू लागते ते कळतच नाही!”

नागपंचमी जवळ आली की आमच्या घरी लाह्या ,तंबिटाचे लाडू,मातीचे नागोबा तयार करणे, या सगळ्या गोष्टी सुरू होत असत ! त्यामुळे पंचमीच्या लाह्या म्हटल्या की मला सासूबाई डोळ्यासमोर येतात. आपुलकीने, उत्साहाने सर्वांसाठी लाह्या घरी करणाऱ्या ! सांगली- मिरजेकडे घरी लाह्या करण्याचे प्रमाण बरेच होते. आषाढी पौर्णिमा झाली की लाह्या करण्याचे वेध आईंना लागत असत !

सांगलीत असताना आमच्या घरी लाह्या बनवणे हा एक खास सोहळा असे. शनिवारच्या बाजारातून खास लाह्यांची यलगर ज्वारी मी आणत  असे. ती ज्वारी आणली की मग लाह्या केव्हा करायच्या तो वार ठरवून आई तयारीला लागत. त्यासाठी मोठी लोखंडाची पाटी बाईकडून घासून घ्यायची. ज्या दिवशी लाह्या करायच्या, त्याच्या आदल्या दिवशी रात्री चाळणीत ज्वारी  घेऊन त्यावर भ रपूर गरम पाणी ओतले जाई. याला ‘उमलं घालणं ‘ असं म्हणतात. ते पाणी निथळले की त्यावर पंचा किंवा सुती पातळ दाबून ठेवत असत  ! हे सर्व त्यांच्या पद्धतीने चालू असे. सकाळी उठून ती ज्वारी जरा कोरडी होण्यासाठी पसरून ठेवायची. लाह्या फोडायच्या म्हणून चहा, आंघोळ वगैरे कामे लवकर आटपून त्या तयारी करत असत !

गॅसच्या शेगडीवर मोठी लोखंडी पाटी ठेवली जाई. एका रवीला कापड गुंडाळून त्याचे ढवळणे केले जाई. तसेच लोखंडी पाटीवर टाकण्यासाठी एक कापड घेतलेले असे. शेजारीच एक बांबूच्या पट्ट्यांची टोपली (शिपतर) लाह्या टाकण्यासाठी ठेवले जाई. एवढा सगळा जामानिमा  झाला की आई लाह्या फोडायला बसत. लोखंडी पाटी चांगली तापली की, चार ज्वारीचे दाणे टाकून ते फुटतात की नाही हे बघायचे आणि मग मूठभर ज्वारी टाकून लाह्या फोडायला सुरुवात करायची ! मुठभर ज्वारी टाकून रवीने जरा ढवळले की ताडताड लाह्या फुटायला सुरुवात होई आणि त्या बाहेर पडू नयेत म्हणून त्यावर छोटे फडके टाकले जाई. त्या लाह्यांचा  फटाफट आवाज येऊ लागला की माझ्या मुलांना आनंदाच्या उकळ्या फुटत ! घरभर लाह्यांचा खमंग वास दरवळत असे. एक किलो ज्वारीत साधारणपणे मोठा पत्र्याचा डबा भरून लाह्या होत असत ! मग काय आनंदी आनंदच ! लाह्या सुपामध्ये चांगल्या घोळून घ्यायच्या. खाली राहणारे गणंग वेगळे काढायचे. लाह्या गरम असताना मिक्सरवर लाह्यांचे पीठ करायचे. तरी बरं आमच्या घरी ‘जाते’ नव्हते, नाहीतर माझ्या आजोळी लाह्यांचे पीठ लगेच जात्यावर काढले जाई !

मग सासुबाई दिव्याच्या अवसेला समयीसाठी आणि नागपंचमीच्या नागाच्या पूजेसाठी लाह्या वेगळ्या काढून ठेवत. मग तो मोठा लाह्यांचा डबा आमच्या ताब्यात येई. भरपूर शेंगदाणे घालून फोडणीच्या लाह्या, तर कधी तेल, मसाला, मीठ लावलेल्या लाह्या, आंब्याचे लोणचे लावून लाह्या, दुपारच्या खाण्यासाठी असत. त्या किलोभर ज्वारीच्या लाह्या खा ण्यात आमचे आठ पंधरा दिवस मजेत जायचे !

आता गेले ते दिवस ! अजून कदाचित सांगली मिरजेकडे हा लाह्या फोडण्याचा कार्यक्रम होत असेल, पण पुण्यात आल्यापासून गेली ती यलगर ज्वारी आणि त्या पांढऱ्या शुभ्र, चुरचुरीत खमंग लाह्या ! दुकानातून छोट्या पुडीतून लाह्या आणायच्या नैवेद्यासाठी । आत्ताच्या मुलांना मक्याचे पॉपकॉर्न आवडतात, पण आपले हे देशी पॉपकॉर्न फारसे आवडत नाहीत बहुतेक ! त्यामुळे लाह्या घरी कशा बनवतात तेही त्यांना माहित नाही ! असो ….  कालाय तस्मै नमः!!

श्रावणाचा सुरुवातीचा सण म्हणजे नागपंचमी ! त्यादिवशी नागोबाला लाह्यांचा  नैवेद्य दाखवतात .म्हणून या लाह्या फोडण्याचे महत्त्व ! निसर्गाशी जवळीक दाखवणाऱ्या आपल्या अनेक सणांपैकी नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण ! सांगलीजवळ बत्तीसशिराळा येथे नागपंचमीला मोठी यात्रा असते. तिथे नाग, साप यांची मिरवणूकच काढली जाते. आम्ही पूर्वी बत्तीस शिराळा येथील नागपंचमीचा उत्सव पाहिला आहे .

श्रावणातील सणांची लगबग या दिवसापासून सुरू होते. झाडाला झोका बांधून मुली मोठमोठे झोके घेतात, फेर धरून गाणी म्हणतात. हाताला मेंदी लावतात, नवीन बांगड्या भरतात. माहेरवाशिणी नाग चवतीचा उपास करतात. चकल्या, करंज्या फराळाला बनवतात. ते दृश्य अजूनही डोळ्यासमोर उभे राहते. आत्ताही माझे मन त्या जुन्या आठवणींबरोबर श्रावणाची गाणी गात फेर धरू लागले आहे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लालयेत पंच वर्षांनी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “लालयेत पंच वर्षांनी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लालयेत पंच वर्षांनी, दश वर्षांनी ताडयेत ।

प्राप्तेतु शोडषे वर्षे,  पुत्रं मित्रवदाचरैत ।।

…. असे एक संस्कृत वचन आहे.  मुलांचे पाच वर्षे लाड करावेत, दहा वर्षे धाकात ठेवावे आणि सोळाव्या वर्षानंतर मुलांशी मित्राप्रमाणे वागावे असा सरळ अर्थ…. मूल झाल्यावर पहिली पाच वर्षे लाडाची असतात. त्यावेळी मुलं हा आपला आनंद असतो.  लाडाच्या या पाच वर्षात आपण मुलांपासून मिळवलेला आनंद अवर्णनीय असतो व आपल्या आयुष्याला तो अर्थ प्राप्त करून देत असतो.  नंतरची दहा वर्षे मुलांवर संस्कार करायचे असतात.  अशावेळी मुले ही आपली जबाबदारी असते.  त्यांना जबाबदार समाजघटक बनवण्यासाठी सुसंस्कारित करणे व उत्तम नागरिक म्हणून तयार करणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी असतेच असते. त्यासाठी त्यांना धाक दाखवून का होईना परंतू सुसंस्कारित करणे व पुढील आयुष्यासाठी त्यांचा पाया भक्कम करणे ही जबाबदारी असते.  

त्यानंतर मुले पालकांच्या ऐकण्याच्या पलिकडची असतात.  त्यामुळे त्यांच्याशी मित्रत्वाचे म्हणजेच सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय कौटुंबिक संबंध सुरळीत रहात नाहीत. जबाबदारीची दहा वर्षे संपल्यावर मुलांना त्यांच्या पायावर उभे राहून पुढील आयुष्याच्या वाटचालीत त्यांचे मित्र, साथीदार,  भागीदार या भूमिकेतून त्यांच्याशी वागून कौटुंबिक संतुलन टिकवणे हे आपल्या स्वतःच्या सुखा समाधानासाठी आवश्यक असते.  मुलांच्या एकूण जडणघडणीत व पालन पोषणात कुठेही गुंतवणूक हा विचार करणे ही गोष्टच मला चुकीची वाटते.  मुलेही म्हातारपणाची काठी वगैरे जुने विचार आजच्या काळाच्या संदर्भात योग्य आहेत की नाही याचा विचार निश्चितच आवश्यक ठरेल.

पूर्वीच्या पालकांच्या व आत्ताच्या पालकांच्या परिस्थितीत मनस्थितीत तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीत खूपच फरक पडलेला आहे.  चिंतायुक्त पालक पूर्वीचेही होते व आजचेही आहेत.  परंतु त्यांच्या चिंतांमध्ये फरक आहे.  पूर्वी फक्त एकच माणूस कमावत असे.  त्याच्या कमाईमध्ये घरखर्च चालवणे ही तारेवरची कसरत असे.  आवश्यक गोष्टींसाठी उत्पन्नाची तोंडमिळवणी करताना नाकी नऊ येत असत. त्यामुळे चैनीच्या गोष्टी करणे अशक्यच असे. आजचे पालक त्यामानाने जास्त कमावतात. बहुतांश घरात आई वडील दोघेही कमावते असतात. स्वतःच्या सुखात फारशी तडजोड न करता त्यामध्ये मुलांचेही कोड कौतुक करणे, सर्व कुटुंबाने मिळून काही किमान चैनीच्या गोष्टी करणे सर्वमान्य झाले आहे. 

यामध्ये स्वतःच्या सुखाला मुरड घालून फक्त मुलांसाठीच काही करणारे पालक अपवादात्मकच.  त्यामुळे मुलांनी म्हातारपणाची काठी बनावी अशी अपेक्षा ठेवणे हीच चुकीच्या विचारांची गंगोत्री ठरावी.  जे पालक अशा गुंतवणुकीच्या अपेक्षेने मुलांसाठी काही करत असतील तर ही रिस्की गुंतवणूक आहे हे ध्यानात ठेवावे.  मुलांनी जर पुढे विचारले नाही तर ज्याप्रमाणे चुकीच्या पतपेढ्या बँका वगैरे मधील अधिक व्याजाच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक कधीकधी बुडीत होते तशी ही गुंतवणूक सुद्धा बुडीत होण्याची शक्यताही गृहीत धरली पाहिजे. नातेसंबंधातील प्रेमळ सहजीवनाच्या विचारापेक्षा व्यावहारिक विचार जेव्हा प्रबळ होतात त्यावेळी त्यात व्यवहारांमधील रिस्क ही सुद्धा गृहित धरली पाहिजे. 

पुराणकाळाचा विचार केल्यास मुले ही म्हातारपणाची काठी वगैरे विचार त्यावेळी नसावेत असे वाटते.  पंचवीस वर्षे गृहस्थाश्रमाची पूर्ण केल्यावर म्हणजे साधारणपणे मुले गृहस्थाश्रमाच्या टप्प्यावर आल्यावर पालकांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची जी समाजव्यवस्था होती असे ऐकिवात आहे ती चांगलीच.   साधारण २५ ते ३० वर्षादरम्यान गृहस्थाश्रम व ५५ ते ६० वर्षादरम्यान वानप्रस्थाश्रमात प्रवेश ही खरेतर आदर्श समाजव्यवस्था म्हटली पाहिजे.  आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास रिटायरमेंटनंतर पालकांनी वानप्रस्थ स्वीकारणे हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह ठरेल.  वानप्रस्थाश्रम म्हणजे आजच्या संदर्भात मुलांच्या संसारात लुडबूड न करता स्वतंत्रपणे राहून समाजोपयोगी कार्यात स्वतःला गुंतवणे.  स्वतःचे अनुभव, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन यावर आधारित एखादे  समाजोपयोगी कार्य निरपेक्ष बुद्धीने पत्करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आयुष्याची पुढील वाटचाल करणे.  आज अनेक समाजोपयोगी संस्था कार्यरत आहेत.  अनेक संस्था उत्तम कार्य करतात.  फार मोठ्या धनलाभाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या चरितार्थाच्या गरजेपुरते अर्थार्जन करून अशा संस्थांच्या कार्यात झोकून देण्याची आज गरज आहे.  अशा गरजांची पूर्तता या वानप्रस्थाश्रम संकल्पनेतून आजच्या काळात करता येणे शक्य आहे.  मुलांच्या संसारात लुडबूड न करता समाजोपयोगी कार्याचा आदर्श त्यांचे पुढे ठेवला तर त्यांनाही पालकांविषयी निश्चितच आदर वाटेल. 

यावर कुणी असे म्हणतील की असले फालतू व्यवहारशून्य आदर्शवाद नकोत.  प्रॅक्टिकली बोला. 

ठीक आहे, प्रॅक्टिकली बोलू….. पहिली पाच वर्षे तुम्ही मुलांसाठी काय करता हो ? खरं म्हणजे तुम्ही मुलांच्या कौतुकात येवढे मग्न असता की, सर्व जगाचे भान विसरता.  जळी स्थळी  मुलांचा विषय व कौतुक याने तुमचे आयुष्य भरून व भारून गेलेले असते.  तो आनंद, ते भारलेपण व कौतुकाची नशा आयुष्यामध्ये येवढे विविध रंग भरते की,  तुमचे आयुष्य हे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे झालेले असते. म्हणजे या पाच वर्षात तुम्ही मुलांसाठी जेवढे करता त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक आयुष्यात सुख, आनंद मिळवता.  म्हणजे पहिली पाच वर्षे तुम्ही फायद्यातच असता.  पुढील दहा वर्षांचा विचार करता असे पहा की तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या, तुम्हाला अक्षय सुखाचा झरा देणाऱ्या कुटुंबाच्या सौख्यासाठी (म्हणजे त्यात तुमचे सुख सुद्धा आहेच)  पडलेली जबाबदारी तुम्ही स्वीकारली, म्हणजे तुम्ही मुलांसाठी काय केलं ?  जे केलं ते स्वतःच्या कर्तव्य पूर्तीसाठी केलं. म्हणजे ही दहा वर्षे ना नफा ना तोटा या परिस्थितीत.  

पंधरा वर्षानंतर आपण मुलांचे कौटुंबिक भागीदार म्हणजे पुन्हा बरोबरीतच. आता व्यावहारिक विचार असा की, तुम्ही गृहस्थाश्रमाच्या काळात जी काही संपत्ती मिळवली असेल तेवढाच तुमचा भाग. तो जर तुम्ही मुलांना दिलात तरच फक्त ती गुंतवणूक. यात काहीही वडिलोपार्जित इस्टेटीचा भाग नाही आणि जर तुम्ही वडिलोपार्जित इस्टेटसुद्धा खर्च केली असेल तर तुम्ही मुलांचे कर्जदारच . अन् स्वकष्टार्जित संपत्ती मुलांना देतानाच जर तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांचे समोर मांडून अथवा लेखी एग्रीमेंट करूनच त्यांना दिली तर व्यवहाराचा भाग पूर्ण झाला.  आणि ही एवढीच फक्त तुमची म्हातारपणाची काठी झाली.  परंतु या पद्धतीने तुम्ही काही समाजसेवी संस्थांशीही एग्रीमेंट करू शकता. त्यासाठी ते मुलाशीच केले पाहिजे असेही बंधन कुठाय ?  मुलांशी पटत नसल्यास व तुमचेकडे संपत्ती असल्यास म्हातारपणी जगणे कठीण व अशक्य नाहीच.  त्यासाठी म्हातारपणाची काठी विकत घेण्याची तुमची क्षमता असतेच.  ज्यांची अशी काठी विकत घेण्याची क्षमता नाही त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यात झोकून देण्याची गरज व आवश्यकता आहेच.  सहसा सध्या प्रत्येकजणच वृद्धापकाळाची सोय म्हणून काही उत्पन्नाची तजवीज करून ठेवत असतोच.  फक्त सर्वात दुर्दैवी असे पालक की जे दुर्धर रोगाने आजारी आहेत, मुले विचारत नाहीत अथवा प्रॅक्टिकली त्यांना ते शक्य होत नाही व जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न नाही.  या व्यक्ती मात्र खरोखरच दुर्दैवी. त्यांचेसाठी सरकारनेच काही सोय करावी.  एक पर्याय असा की त्यांचा वृद्धापकाळाचा खर्च सरकारने उचलावा.  अथवा त्यांचेसाठी इच्छामरणाचा कायदा करावा.  माझ्या मते मुले ही म्हातारपणाची काठी नव्हेतच.  आणि ती गुंतवणूक तर अजिबातच नाही व जबाबदारी फक्त मर्यादित कालावधी पुरतीच. पालकत्व हे आव्हान नव्हे तर ती कौटुंबिक सुखांसाठी आपण होऊन स्वीकारलेली जबाबदारी. ही जबाबदारी ज्यांना नको आहे व टाळताही येत नाही त्यांना वाटणारे आव्हान.  

शेवटी आपल्या पिढीने तरी असे काय भव्यदिव्य केलंय की ज्यामुळे पुढच्या पिढीने आपले उपकार मानावेत ?  म्हणूनच या एकविसाव्या शतकातील तरुणांना मी म्हणतो —

एकविसाव्या शतकातील तरुणांनो,.. आम्ही तुमचे बाप आहोत,

म्हणूनच,

तुम्हाला मिळालेला जन्मसिद्ध शाप आहोत. आम्हीच दिले तुम्हाला, भ्रष्ट स्वातंत्र्याचे वरदान ? 

सामाजिक अराजकतेचे दान ? ढासळत्या पर्यावरणाचे थैमान…. 

आम्हीही होतो तरुण एकेकाळी,… पण नाही थोपवू शकलो हा प्रवाह, नाही परतवू शकलो या लाटा, 

पराभूत अन्  प्रवाहपतिताचं जिणं…   

जरी जगलो तरी………. 

नाही गेलो भोव-याच्या तळाशी.  

प्रवाहातील पत्थरांना चुकवत, 

कपाळमोक्ष नाही होऊ दिला…. 

म्हणूनच अजूनही अशा आहे, प्रवाह वळवता येईल, बिघडलेलं सावरता येईल,

सुकृताच्या अनुभूतीवर विकृताचा आकृतिबंध सुधारता येईल. 

खरंच येईल तरुणांनो …. 

आम्हाला आशा आहे. आमच्या शापित जीवनाला शिव्या घालत बसण्यापेक्षा, 

आमच्या सुकृताच्या अनुभूतीचं सार जाणून घ्या. विचार करा, कृती करा. 

या कृतीत आमचं जीवन संपून जाणं अनिवार्य असेल तरी कचरू नका, 

पण प्रवाहपतित होऊ नका. इतिहासाची पुनरावृत्ती करू नका. भविष्यकाळाच्या भल्यासाठी, 

भूतकाळाच्या छातीत खंजीर खुपसणं, आवश्यकच असेल तर …  

… हे नव्या पिढीतील ब्रुटसांनो,  हा वृद्ध सीझर, निशस्त्र होऊन, तुमचा वार झेलण्यास सिद्ध आहे, 

अन गर्जना करतोय …. 

…. देन सीझर मस्ट डाय.

…. देन सीझर मस्ट डाय.

(माझी पंधरा वर्षांपूर्वीची ही बहुतेक सारी मते आजही मला जशीच्या तशी मान्य आहेत)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या लोकांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. सध्या एकूण १०० सेवेकरी या टीममध्ये आहेत.

या महिन्यातही खराटा पलटणच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

रस्त्यावर वृद्ध याचक पावसात भिजत आहेत, त्यांना रेनकोट देणे गरजेचे आहे…. परंतु सरसकट हे रेनकोट न वाटता, हे जिथे बसतात तिथली स्वच्छता यांच्याकडून करून घेऊन यांना सन्मानाने रेनकोट दिले आहेत. 

…. हे रेनकोट देताना मी त्यांना सांगितलं आहे की ही रेनकोट भीक म्हणून देत नाही, तुमच्या कष्टाची मजुरी म्हणून देत आहे. 

…. आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा “मजुरी” म्हणून द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

दोन पाच रुपये देऊन पुण्य मिळवण्याच्या मागे लागू नका, पुण्य इतके स्वस्त नाही…! दोन पाच रुपयात पुण्य विकत घ्यायची लोकांची सवय सुटली, तर भीक मागणाऱ्या लोकांची भीक मागण्याची सवय सुद्धा नक्की सुटेल…. ! माझं हे वाक्य कदाचित कोणालातरी बोचेल परंतु माझा नाईलाज आहे, सध्याची हीच वस्तुस्थिती आहे….!!! 

रस्त्यावर भिक्षेकरी दिसायला नको असतील, तर तुम्ही भीक देणे बंद करा !!! 

“एका दिवसात” हे होणार नाही….  परंतु “एके दिवशी” नक्की होईल… 

भीक नको बाई शिक

१. मागील दोन वर्षांची फी भरली नाही म्हणून शाळेने ऍडमिशन देण्यास नकार दिला..  या मुलीची दोन्ही वर्षांची फी भरून पुन्हा शाळेत तिला ऍडमिशन घेऊन दिले आहे. 

२. थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती असलेल्या आणखी अनेक मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य दिले आहे.  शाळा कॉलेजच्या फी भरून झाल्या आहेत. 

दुर्बल घटकातील अशाच आणखी ५२ मुली- मुलांना तुम्हा सर्वांच्या साथीने शैक्षणिक मदत करत आहोत… ! 

यातील आमच्या एका मुलाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मध्ये Bsc Computer Science, साठी मागील वर्षी प्रवेश घेऊन दिला, तो प्रथम वर्षात शिकत आहे, हेच मुळात विशेष… !!

आज रिझल्ट लागला आणि तो A+ ग्रेडने उत्तीर्ण झाला…! 

जिचे पालक भीक मागत आहेत, अशी मुलगी बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (BBA) करत आहे.  ती सुद्धा A+ ग्रेडने उत्तीर्ण झाली…! 

आनंद व्यक्त करण्यासाठी खरंच माझ्याकडचे शब्द संपले… !!

त्यांचे पालक म्हणून आम्ही जे काही करत आहोत, त्याचे त्यांनी चीज केले… !!!

त्यांना आम्ही जी काही शैक्षणिक मदत केली, खरंतर ती तुम्हा सर्वांकडून आमच्यापर्यंत आली आहे… 

…. आपण सर्वजण त्यांचे आणि आमचे सुद्धा पालक झालात…  आणि म्हणून त्याचं हे यश आपल्या पदरात घालत आहे… 

…… आम्ही आपल्यापुढे नतमस्तक आहोत. 

भिक्षेकरी ते कष्टकरी

१.  भीक मागणारं संपूर्ण एक कुटुंब… कुटुंबातील प्रौढ महिला पूर्णतः अपंग. या ताईला नवीन व्हीलचेअर देऊन, या कुटुंबाला रस्त्यावर खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे.  

२.  अनेक वर्षे आजारी असणारी एक प्रौढ व्यक्ती …यांनाही या महिन्यात खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे. 

३.  पॅरालीसीस झालेली एक प्रौढ व्यक्ती… यांचा पूर्वी सायकल रिपेअरिंगचा व्यवसाय होता…. पुढे आयुष्याचं चाकच पंक्चर झालं…! ‘ मला सर्व साहित्य घेऊन द्या, मी मला जमेल तसं पुन्हा काम सुरु करतो ‘, – त्यांच्या या जिद्दीला सलाम करत सायकल रिपेअर करण्याचं सर्व साहित्य यांना घेऊन दिलं आहे. बाणेर रोड येथे हा व्यवसाय रस्त्यावर सुरू आहे…! एकदा त्यांची कर्मकहाणी सांगत असताना ते मला कळवळून म्हणाले होते,  ‘ माज्याच लोकांनी माजे पायओढले हो…! ‘ 

मी म्हणालो होतो, ‘ हरकत नाही बाबा, आपण आनंद यात मानायचा की,  पाय ओढण्यासाठी का होईना… पण शेवटी आपल्या पायापाशीच बसावं लागलं ना त्यांना… !’ 

– यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य पाहून, नव्या दिवसाची सुरुवात करणारा, “सूर्योदय” वाटला मला तो चेहरा…. !!! 

घर देता का घर ?

रेनकोट आणि छत्री —- रस्त्यावर वृद्ध निराधार याचक पावसात भिजत आहेत यांना छत्री किंवा रेनकोट द्यावेत असं वाटलं. पण अशा सरसकट वाटण्याने आपला हात पुन्हा वर राहणार आणि त्यांचा हात खाली…. एकूण काय एक वेगळ्या प्रकारची भीकच ती… ! 

आणि मग ते जिथे बसतात त्या परिसराची स्वच्छता करवून घेऊन त्यांना चांगल्या क्वालिटीचे रेनकोट किंवा छत्र्या सन्मानाने देत आहोत. सफाई भी सम्मान भी….. यांना छत्री आणि रेनकोट ची “किंमत” नाही समजली तरी चालेल… परंतु देणाऱ्याच्या भावनेचं त्यांना “मोल” कळावं … 

…. हात फक्त भीक मागण्यासाठी नसतात, कष्ट करून सन्मानाने जगण्यासाठी असतात, हे बिंबवण्यासाठी आम्ही केलेला हा एक उपक्रम…. !!! 

मनातलं काही …. 

काम करणाऱ्या सर्वांना रेनकोट वाटून झाले…. एक रेनकोट मी स्वतःसाठी ठेवला…. पुढे गेल्यानंतर मला एकाने रेनकोट मागितला… मी मग माझाच रेनकोट त्याला दिला. यानंतर पुढील स्पॉटवर गेलो, तिथे एक व्यक्ती छत्र्या वाटत होती….  काम करत असताना धो धो पाऊस सुरू झाला…. माझा रेनकोट मी दुसऱ्याला दिल्यामुळे माझ्याकडे आता काहीही साधन नव्हते…. ! मी भिजलो…. माझ्याकडचे सर्व साहित्य भिजुन गेले …. ! 

तेवढ्यात एक भीक मागणारे वृद्ध आजोबा आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर छत्री धरली आणि छत्री माझ्या हातात देऊन ते स्वतः तिथून भिजत निघाले…. ! 

मी त्यांच्या मागे जात म्हणालो, ‘ अहो, तुम्हाला मिळालेली छत्री तुम्ही मला कशाला देताय ? ठेवा तुम्ही….! ‘ 

ते बाबा गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘ मी भीजलो तर मी एकटाच भीजेल… पण तू भिजलास तर हजार लोक भिजतील… माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे…. !’ 

आभाळातल्या पावसाशी माझे अश्रू स्पर्धा करू लागले…. ! 

ती तारीख माझ्यासाठी खूप महत्त्वाची…..  कारण त्या दिवशी कोसळणाऱ्या आभाळाला थोपवणारा मला एक बाप मिळाला…. !!! 

प्रणाम…. !!! 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print