मराठी साहित्य – विविधा ☆ “गाव बदलाचा ‘पाडोळी’ प्रयोग…” ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? विविधा ?

☆ “गाव बदलाचा ‘पाडोळी’ प्रयोग…” ☆ श्री संदीप काळे ☆

धाराशिवमध्ये ‘फॅमिली गाईड’च्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपवून मी आता लातूरकडे निघत होतो. तितक्यात ज्येष्ठ पत्रकार, माझे मित्र योगेंद्र दोरकर (नाना) आले. सकाळपासून मी नाना यांची वाट पाहत होतो. चहापान झाल्यावर नाना मला म्हणाले, ‘‘मी मुंबईवरून माझे मित्र शेषराव रावसाहेब टेकाळे यांनी सुरू केलेला प्रोजेक्ट बघायला आलोय. महावितरणमध्ये ते इंजिनिअर होते. आता ते सेवानिवृत्त झालेत. त्यांनी त्यांच्या गावी सुरू केलेल्या ‘मागे वळून पाहताना’ या उपक्रमाला खास भेट देण्यासाठी मी आलोय. तो उपक्रम समजून घेऊन मलाही माझ्या गावात तसा उपक्रम सुरू करायचा आहे.’’

टेकाळे यांनी सुरू केलेला तो उपक्रम नेमका काय आहे? तो कशासाठी सुरू केला? त्याचे स्वरूप नेमके काय आहे, हे सगळे मी दोरकर नाना यांच्याकडून समजून घेत होतो. खरं तर मलाही तो उपक्रम पाहण्याची उत्सुकता लागली होती. आम्ही रस्त्याने निघालो. काही वेळामध्येच लातूर-बार्शी रोडवर असलेल्या ‘पाडोळी’ या गावात आम्ही पोहोचलो.

टेकाळे आमची वाटच पाहत होते. त्या उपक्रमाच्या ठिकाणी खूप प्रसन्न वाटत होते. लहान मुलांसाठी इंग्रजी शाळा, मुलांना कुस्ती, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग, तरुणांची स्पर्धा परीक्षा, महिला बचत गटाचे प्रशिक्षण हे सारे काही तिथे सुरू होते. समोर भारत मातेचे मंदिर होते. टेकाळे म्हणाले, ‘‘चला अगोदर भारत मातेचे पूजन करू या. मग तुम्हाला मी सर्व प्रोजेक्ट दाखवतो.’’

दर्शन घेऊन आम्ही तो सारा प्रोजेक्ट पाहत होतो. ती कल्पना जबरदस्त होती, तिथे होणारी सेवा अगदी निःस्वार्थपणे होती. ते पाहताना वाटत होते, आपण हे सर्व आपल्या गावी करावे. लहान मुले, महिला, तरुण, शेतकरी, वृद्ध माणसांसाठी एकाच ठिकाणी सर्वकाही शिकण्यासाठी, मनोरंजनासाठी, माहितीसाठी, नवीन स्वप्न पाहण्यासाठी जे जे लागणार होते, ते ते सर्व काही तेथे होते.

ही संकल्पना, हा उपक्रम नेमका काय आहे. हे सारे आम्ही टेकाळे यांच्याकडून समजून घेतले. जे गावाशी संबंधित आहेत, ज्यांनी गाव सोडून बाहेर आपल्या मेहनतीमधून साम्राज्य उभे केले, त्या, गावाशी नाळ जोडलेली असणाऱ्या प्रत्येकाला कुठे ना कुठे वाटत असते की आपण आता खूप मोठे झालो. आता आपण आपल्या गावासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या मातीसाठी काहीतरी केले पाहिजे. त्या प्रत्येकासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे एक उतम उदाहरण होते. तो प्रोजेक्ट पाहण्यासाठी दोरकर नाना यांच्यासारखे अनेक जण आले होते.

आम्ही प्रोजेक्ट पाहत होतो. तितक्यात आमची भेट विजय पाठक यांच्याशी झाली. पाठक रत्नागिरी जिल्ह्यातील होते. पाठक डीवायएसपी म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना त्यांच्या गावासाठी काहीतरी करायचे होते. यासाठी त्यांनी टेकाळे बंधू यांच्या पाडोळी येथील ‘मागे वळून पहा’ या उपक्रमास भेट दिली. भेटीमध्ये पाठक म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांनी आयुष्यभर गावाची पूजेच्या माध्यमातून सेवा केली. त्यांचीही इच्छा होती, गावासाठी काहीतरी करावे. आता हा उपक्रम मी माझ्या गावात सुरू करणार आहे.’’

मी ‘व्हिजिटर बुक’ पाहत होतो. तिथे रोज हा उपक्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मी, दोरकर नाना, टेकाळे, त्यांचे भाऊ अशी आमची गप्पांची मैफल रंगली. ज्याला आपल्या माणसांविषयी, मातीविषयी आत्मियता असते. तेच या स्वरूपाचा उपक्रम राबवू शकतात हे दिसत होते.

पाडोळी जेमतेम दोन-अडीच हजार लोकसंख्या असलेले गाव. पाडोळीच्या आसपास अशीच छोटी-छोटी बारा-पंधरा गावे असतील. पाडोळी, पिंपरीसह ही सर्व गावे या प्रोजेक्टचा भाग होती. राज्यातल्या कानाकोपऱ्यामधून या उपक्रमाला आपलेसे करणाऱ्यांची संख्याही खूप होती.

वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रचंड प्रगती करणाऱ्या पाच भावांनी ठरवले, आपण आपल्या गावासाठी चिरंतन टिकणारे काहीतरी करायचे‌ त्यांनी मनाशी हा चंग बांधला होता. जनक टेकाळे हे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम करायचे. तरुणाईला नेमके काय द्यायचे म्हणजे ते बुद्धीने मोठे होतील हे ठरवून त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केले.

सूर्यकांत टेकाळे, रमाकांत टेकाळे, जनक टेकाळे, शेषराव टेकाळे, शशिकांत टेकाळे हे पाच भाऊ, या पाच भावांमध्ये जनक आणि शेषराव हे दोघेजण शासकीय नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचे. या दोघांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमावले. आई-वडिलांना अपेक्षित असणाऱ्या कुटुंबासाठीचे कर्तव्यही पार पाडले.

आपल्या गावासह पंचक्रोशीत असणाऱ्या सर्व गावांसाठी आपण पाठीराखा बनून काम करायचे या भावनेतून त्यांनी ‘किसान प्रतिष्ठान’ची स्थापना केली. ‘किसान प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी शहर आणि गावामधली पूर्णतः दरी कमी करायचे काम केले. कोणाची मदत न घेता पदरमोड करून या कामामधून हजारो शेतकरी आधुनिक शेतीकडे वळवले. युवक गावातून शहराकडे जाण्यासाठी स्वप्न पाहू लागले. सरकारी मानसिकतेमध्ये अडकलेली अनेक कामे तातडीने मार्गी लागू लागली.

या प्रोजेक्टच्या कामाची १९९७ ला सुरुवात झाली. पिंपरीला टेकाळे बंधूंच्या आई केवळाबाईंच्या नावाने जमीन होती. ती जमीन या उपक्रमासाठी कामाला आली. तिथे भारत मातेचे मंदिर उभारले गेले. ज्या भारत मातेसमोर प्रत्येक जाती धर्मातला माणूस येऊन हात जोडत नतमस्तक व्हायचा. तिथे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने वाचनालय सुरू झाले. आज त्या वाचनालयात चार हजार पुस्तके आहेत.

लोकांसाठी काहीतरी करायचे एवढ्यापुरते आता हे काम मर्यादित राहिलेले नव्हते, तर बेसिक लागणाऱ्या इंग्रजी मीडियमच्या शाळेपासून ते यूपीएससीच्या शिकवणीपर्यंतचा सगळा मेळ एकाच ठिकाणी बसवला गेला. ‘एव्हरेस्ट’ इंग्रजी स्कूलमध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा इंग्रजी भाषेची कास धरू लागला. ध्यानगृह, शिशुगृह, घोड्यावर बसण्यापासून ते गाडी चालवण्यापर्यंत सगळे विषय एकाच ठिकाणी शिकवणे सुरू होते.

स्वच्छता अभियानामध्ये पाडोळी गाव पहिले आले. असे अनेक सुखद धक्के या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या अनेक गावांना मिळू लागले. पाहता पाहता पंचक्रोशीत, जिल्हा आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या उपक्रमाची माहिती पोहोचली. लोक पाहायला येऊ लागले. ‘मी माझ्या गावासाठी मागे वळून पाहिले पाहिजे’ मी माझ्या गावातल्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, ही मनामध्ये असलेली छोटीशी इच्छा हा प्रयोग जाऊन पाहिल्यावर विशाल रूप धारण करू लागते.

आम्ही प्रोजेक्टवर सगळीकडे फेरफटका मारत होतो. टेकाळे यांच्या आई केवळाबाई वय वर्षे ९२. त्यांच्या मुलाविषयी, तिथे झालेल्या कामाविषयी अभिमानाने सांगत होत्या. “गावकुसात असणाऱ्या बाईच्या आयुष्यात चूल आणि मूल या पलीकडे काहीही नसते. पण माझ्या मुलांनी दाखवून दिले, गावातली मुलगी, महिला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन तिचे कौशल्य दाखवू शकते. अभ्यासामध्ये हुशार असलेली मुलगी परदेशात जाऊन करिअर करू शकते. ज्या महिलेला घरच्या घरी चटणी बनवता येते ती जगातल्या बाजारपेठेत तिची चटणी विकू शकते. हे सगळे पाहायला पोराचा बाप पाहिजे होता, तो बिचारा खूप लवकर गेला,” असे म्हणत टेकाळे यांच्या आई चष्मा काढून अश्रूने भरलेले डोळे पुसत होत्या.

जनक आणि शेषराव या दोन भावांनी मिळून या कामाला प्रचंड गती दिली होती. हे दोघे जण शासकीय अधिकारी होते. आता सेवानिवृत्तीनंतर या दोघांनाही प्रचंड वेळ मिळतो, ज्या वेळेमध्ये त्यांनी तिथल्या कामाला अधिक गती दिली आहे.

जनक मला सांगत होते, प्रत्येकाला सतत वाटत असते, आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे. सुरुवात काय करायची आणि सुरुवात केल्यानंतर त्याला गती कशी द्यायची, हा विषय होताच होता. आम्ही सुरुवातही केली आणि त्याला गतीही मिळवून प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो शेतकरी आणि उद्योगाच्या प्रशिक्षणातून जेव्हा शेकडो युवक कामाला लागले. तेव्हा कळले की आपले काम किती मोठे झाले.

शेषराव टेकाळे (9594935546)  म्हणाले, ‘‘आमच्या वडिलांना सामाजिक आस्था जबरदस्त होती. लोकसेवा करायची तर त्याचा इतिहास झाला पाहिजे, हे ते सातत्याने सांगायचे. त्यातून मग आम्हाला प्रेरणा मिळाली.’’

मी, दोरकर नाना, टेकाळे बंधू, त्यांची आई, आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होतो. तिथल्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मुलांशी, महिलांशी, माणसांशी आम्ही बोलत होतो, ती माणसे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून खूप समृद्ध झाल्याचे जाणवत होते. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या स्वयंपाकाचा मेनू आमच्यासमोर आला. जेवण झाले. आम्ही सर्वांचाच निरोप घेऊन निघालो. आईने माझ्या गालावर हात फिरवून कडकड बोट मोडले. “पुन्हा लवकर या भेटायला”, असा आग्रहही धरला.

आम्ही रस्त्याला लागलो. मी, दोरकर नाना गाडीमध्ये चर्चा करत होतो. जिथे आत्मियता आणि निःस्वार्थीपणा असतो तिथल्या कामाला चार चांद लागतात. असेच काम टेकाळे बंधूंनी त्यांच्या गावामध्ये उभे केले होते. केवळ पाडोळी, पिंपरी ही दोन गावे नाही तर शेकडो गावं या कामाचा आदर्श घेऊन कामाला लागले होते. जे हात गावातल्या मातीमध्ये मिसळून सुगंधित झाले, त्यांनी शहरांमध्ये त्या सुगंधातून कीर्ती मिळवली. अशा प्रत्येक हातालाही गावाच्या मातीची ओढ अजून निश्चितपणे आहे. आता खूप झाले, आपण ते मागे वळून पाहू. चांगले काम करण्यासाठी पुढाकार घेऊ.

तुम्हालाही तुमच्या गावाची ओढ निश्चित असेल. तुम्हालाही वाटत असेल, आपण आपल्या गावासाठी ‘मागे वळून पाहिले पाहिजे’, पण सुरुवात कशी करायची हे पाहायला एकदा तुम्हाला पाडोळीला नक्की जावे लागेल. बरोबर ना…!

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रीमंतांची चलती तेथे गरिबांची गळचेपी…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “श्रीमंतांची चलती तेथे गरिबांची गळचेपी…” ☆ सौ राधिका भांडारकर 

*श्रीमंतांची चलती येथे गरिबांची गळचेपी* ही ओळ मुळातच समाजातील विषमता दर्शवते. श्रीमंत आणि गरीब असे दोन निराळे भाग पाडते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीचे दर्शन घडवते. शिवाय श्रीमंत कसे पाॅवरफुल आणि गरीब कसे बिच्चारे, दुर्बळ असा एक मनोभेद अधोरेखित करते. नकळतच एकीकडे तिरस्कारयुक्त भावना आणि त्याचवेळी दुसरीकडे सहानुभूतीचा एक दृष्टिकोन आपोआपच तयार होतो.या ओळीत अवरोध आहे. उपहास आहे.

या विषयावर लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनात एक सहज विचार आला की श्रीमंत कोणाला म्हणायचे आणि गरीब कोणाला म्हणायचे? श्रीमंत आणि गरीब यांच्या नक्की व्याख्या कोणत्या? ढोबळमानाने आपण असं म्हणूया जे धनवान आहेत, ज्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, जमीन जुमला आहे, ज्यांच्या पायाशी जणू लक्ष्मी लोळण घेते ते श्रीमंत आणि ज्यांना सकाळ संध्याकाळच्या जेवणाची ही भ्रांत आहे, अन्न— वस्त्र— निवारा या प्राथमिक गरजांपासून जे वंचित आहेत ते गरीब.
यापेक्षा अधिक निराळ्या व्याख्याही असू शकतात. श्रीमंत ते आहेत ज्यांच्या हाती सत्ता आहे. आणि गरीब ते आहेत ज्यांना सत्ताधारींच्या हाताखाली गुलामगिरीचे जीवन जगावे लागत आहे आणि अशा अहंकारी, अरेरावी करणाऱ्या, सत्तेचा माज असलेल्या लक्ष्मीपुत्रांकडून गरिबांची मुस्कटदाबी होते, गळचेपी होते. लाचारी आणि मानहानीचे जीवन त्यांना जगावे लागते आणि अशा श्रीमंत माणसांच्या मनोवृत्तीमुळे ही दरी अधिकाधिक रुंदावत जाते.

तरीही नक्की कोण किती श्रीमंत आणि कोण किती गरीब हे एका व्यापक सामाजिक दृष्टीतून पाहिले तर ते ठरवणे ही कठीण आहे. ते बरंचसं भोवतालची परिस्थिती, त्या त्या समाजातलं त्यांचं असणं, जीवन पद्धती आणि गरजा यावरही अवलंबून आहे.म्हणजे बघा मी माझ्या मदतनीसाबरोबर माझ्या आर्थिक स्थितीशी तुलना केली तर मी श्रीमंत आहे पण मी माझी अंबानीशी तुलना केली तर गरीबच नाही का? थोडक्यात या आर्थिक स्थितीचं हे गणित काहीसं रिलेटिव्ह आहे.

तुलनात्मक आहे.

मी मुंबईत किंग जाॅर्ज हायस्कूल मध्ये काही काळ शिक्षिका होते. सातवीपर्यंतच्या मुलांना मी भाषा हा विषय शिकवत असे. त्यावेळी मी मुलांना *गरिबी* या विषयावर निबंध लिहायला दिला होता. एकीने लिहिलेला निबंध माझ्या अजूनही लक्षात आहे.

तिने लिहिले होते,

“नंदा माझी मैत्रीण आहे. ही माझी मैत्रीण खूप गरीब आहे. त्यांच्याकडे खूप जुन्या मॉडेलचा फ्रिज आहे. त्यांच्या हॉलमधला गालीचा फाटलेला आहे. त्यांच्या बंगल्यांच्या भिंतींना रंग लावलेला नाही आणि त्यांच्याकडे फक्त एकच गाडी आहे.” आणि असे बरेच काही तिने लिहिले होते जे वाचून मला हसावे की रडावे समजेना. आणि मग जाणवले की श्रीमंतीतच वाढणार्‍यांना गरिबी कशी समजणार? गरिबी ही एक सोसण्याची स्थिती आहे. “जावे त्याच्या वंशा आणि त्यांनाच कळे” अशी परिस्थिती आहे.

तेव्हां श्रीमंतांची चलती येथे गरिबांची गळचेपी हा या मनोवृत्तीचा परिणाम आहे.

श्रीमंत नेहमीच पुढे जातात आणि गरीब मागे राहतात. *दाम करी काम* किंवा *रुपया भवती फिरते दुनिया* असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे नाही. कारण ती सत्य परिस्थिती आहे. पैशाने सारे काही विकत घेता येते. दुनिया उलट पालट करता येते. पैशाचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की कुठल्याही क्षेत्रातलं यश त्यांच्या मुठीत येऊ शकते. पैशाने मतं विकत घेता येतात, सत्ता बळकावता येते, पदवी, नोकरी मिळवता येते,काहीही प्राप्त करण्याचं उद्दीष्ट असू दे ते सहज साध्य होऊ शकते आणि अशा रीतीने पैशाला पैसा जोडला जातो.मात्र याच बाबतीत नेमकी निर्धन माणसाची गळचेपी होते. तो गुणी आहे, लायक आहे, पात्र आहे. केवळ निर्धनतेमुळे लाचार आहे. गरिबांसाठी मात्र परिस्थितीच्या मर्यादा आड येतात त्यांच्याभोवती सारीच विरोधातील प्रतिकूल परिस्थिती असते. आणि या प्रतिकूल परिस्थितीला ओलांडण्याची ताकद नसल्यामुळे जीवनात होणाऱ्या गळचेपीला पर्यायच न उरल्यामुळे सामोरं जावं लागतं.

जेव्हा आपण म्हणतो समाजात भ्रष्टाचार वाढलाय पण हा भ्रष्टाचार एकतर्फी नसतो. त्यात दोन घटक असतात एक देणारा आणि एक घेणारा. देणाऱ्याचा खिसा भरलेला असतो आणि घेणाऱ्याचा रिकामा. पुन्हा या घेणाऱ्यांमध्ये विविध वृत्ती जाणवते, काहींना एका रात्रीत श्रीमंत व्हायचे असते. पैशाचा लोभ असतो. भोगवादी वृत्ती साठी हा शॉर्टकट असतो. पण काही घेणारे मात्र खरोखरच लाचार असतात, त्यांना जीवनात अनेक संसारिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी केवळ,प्रचलीत स्पर्धेला तोंड देण्यासाठी, असहाय्यतेमुळे हे करावे लागत असेल. मनातल्या स्वप्नपूर्तींची गळचेपी किती सहन करायची या भावनेतूनही हे होत असेल. अर्थात हे समर्थनिय नाही. पण हे एक सामाजिक सत्य आहे हे नाकारता येत नाही.

गरिबांच्या गळचेपी विषयी काही भाष्य करताना मला सहजच एका प्रसंगाची आठवण झाली.

मी कॉलेजमध्ये होते. माझ्या कॉलेजच्या इमारती जवळ काही बांधकाम चालू होतं. आजूबाजूला खडी, सिमेंट, वाळूचा पसारा पडला होता आणि बरेच मजूर तिथे काम करत होते. त्यातला एक मजूर अत्यंत संतप्तपणे बोलत होता. त्याचे एक वाक्य जाता जाता माझ्या कानावर पडलं आणि ते आजही माझ्या आठवणीत आहे…

“ अरे मेरे भैय्या! हम सेठ के तो सेठ नही है लेकिन हमारे दिल के तो सेठ है ना? छोड दुंगा एक दिन मैं ये सब!”

कुठल्यातरी प्रचंड असंतोषातून हे वाक्य त्याच्या तोंडून त्याच्या मनातली आग ओतत होती.

आणि आता असंतोष या शब्दापाशी माझं मन येऊन ठेपतं. गळचेपीतूनच असंतोषाचा भडका उडतो.

श्रीमंत आणि गरीब यामधल्या दरीचा विचार करताना आणखी एक विचार मनात येतो.

श्रीमंतांचे वर्ग आहेत.

काही गर्भ श्रीमंत असतात, काहींना वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळतो तर काही मात्र शून्यातून स्वतःची धनराशी जमवतात. सर्वसाधारणपणे ज्यांना आयती संपत्ती मिळालेली असते ते उर्मट, अरेरावी, जुलमी, सत्तांध असतात (काही अपवाद असू शकतात)आणि ते नेहमीच त्यांच्यापेक्षा कमी आर्थिक बळ असलेल्यांवर रुबाब करतात. त्यांच्या जरुरीचा फायदा उठवतात, त्यांना ताब्यात ठेवतात. त्यांच्यावर हुकूम गाजवतात. पण बऱ्याचदा जे शून्यातून वर येतात त्यांना गरिबीची जाण असते आणि ते त्यांची गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्यात धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास,जिद्द, विरुद्ध दिशेने जाण्याची क्षमता असते. असे लोक उत्पादक ठरतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या श्रमिकांच्या जबाबदारीची त्यांना जाणीव असते. त्यामुळे या दोघांमधल्या आर्थिक अंतराला मानवतेचे रूप मिळते. इथे देणारा —घेणारा आपुलकीच्या नात्याने जोडले जातात.

आपण नेहमी म्हणतो श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब गरीबच होत जातो. कधी मनाला प्रश्न विचारा असं का?

आपल्यावर लहानपणापासून असेच संस्कार झालेत.

*अंथरूण पाहून पाय पसरावेत*

*ठेविले अनंते तैसेच राहावे*

*हाती नाही बळ त्याने फुलझाड लावू नये*

या संस्कारांचा मनापासून आदर राखून मी म्हणेन की का नाही आपण आपले अंथरूण विस्तारावे?

का स्काय इज द लिमिट आपल्या स्वप्नांसाठी नसावे?

हातातले बळ वाढवण्याचा का नाही प्रयत्न करावा?

चांगल्या मार्गाने श्रीमंत होताच येत नाही.

तत्वांची प्रचंड गळचेपी करावी लागते.हाही एक समाजमान्य विचार.

क्षणभर लटक्या अस्मितांचे पडदे थोडे दूर सारून आपल्या अंगभूत गुणांचा विकास करून, समाजात एक छान आदर्श उदाहरण आपण रचू नाही का शकत?
मला असे सांगावेसे वाटते श्रीमंती विचारांची असावी.जो विचारांनी समृद्ध तो खरा श्रीमंत. आणि वैचारिक दारिद्र्य माणसाची दैना करते. गळचेपी करते.

जाता जाता एकच किस्सा सांगते. लेख लांबच चालला आहे याची कल्पना आहे तरी सुद्धा…

मी स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले म्हणजे गरिबीची झळ पोचली नाही पण श्रीमंतीचा तोराही अनुभवला नाही.

माझ्या वर्गात ज्योती ताम्हणे नावाची श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी होती. त्या बालवयात मला जगातली ती सर्वात भाग्यवान व्यक्ती वाटायची आणि माझ्या वाटेला का नाही असे भाग्य असेही वाटायचे. माझा नंबर पहिल्या पाचात असायचा तिचा पंधरावा विसावा असा असायचा. पण तरी वर्गात तिचा खूपच रुबाब असायचा. ती माझी वर्ग मैत्रीण होती पण मी तिच्या खास ग्रुप मध्ये नव्हते. खूप वेळा तिच्यापुढे मला न्यूनगंड जाणवायचा. मी तिच्या जीवन पद्धतीपर्यंत कधीच पोहोचू शकत नव्हते.मला दु:ख व्हायचे.

पण आज जेव्हा मी त्या वेळच्या माझ्या मानसिक स्थितीचा विचार करते तेव्हा जाणवतं की मी जर कधी काही हट्ट केला असेल त्यावेळी, तर वडिलांनी तेव्हां असे कधीच म्हटले नाही की,” बाबी आपल्याला हे परवडण्यासारखे नाही.”

मनातून त्यांना मी दुखावलं असेलही. पण ते म्हणायचे,” कर दुनिया मुट्टी मे ..अपना हात जगन्नाथ ही भावना ठेव मग तुझ्या जीवनातही अशी पहाट उगवेल.”

म्हणूनच, *श्रीमंताची चलती येथे गरिबांची गळचेपी* ही सामाजिक भावनाच बदलण्याची गरज आहे. गळचेपी न्युनगंडामुळे जाणवते.म्हणून थिंकटँक बदलला पाहिजे. सोपं नाही पण अशक्यही नाही.

मुळातच हा विषय परिसंवादाचा आहे या विषयाला दोन बाजू आहेत. एक नकारात्मक आणि एक सकारात्मक. कोणी कसा विचार करायचा हे व्यक्तीसापेक्ष आहे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पा य री ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

पा य री ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“स्वतःची पायरी ओळखून वागायला शिका !”

असा उपदेश देणारे आणि तो ज्या व्यक्तीला योग्य प्रकारे कळेल असे घेणारे, असे दोघेही सांप्रतकाळी लोप पावलेले आहेत ! त्याला कारणं काहीही असतील, पण हे वाक्य ऐकून घेणाऱ्याला त्याकाळी या एका वाक्या मागील शब्दांचा मार इतका जिव्हारी लागायचा, की ती व्यक्ती एखाद्या फिनिक्स पक्षा प्रमाणे चांगल्या अर्थाने बंड करून उठे !

हल्ली असा शेलका उपदेश कोणी कोणाला द्यायच्या भानगडीत पडत नाही, कारण आजकाल सगळ्याच लोकांची मानसिकता वेगळ्याच पायरीवर गेल्यामुळे असं होत असावं ! मुळात वर म्हटल्या प्रमाणे असं कोणी कोणाला बोलायच्या भानगडीत हल्ली पडतच नाही, लोकं लगेच त्याच्या पुढची पायरी गाठून हात घाईवरच येतात आणि ताबडतोब मुद्द्यावरून गुद्यावर ! भांडण तंटा मिटवायची मधली कुठली तरी पायरी असते हे रागाच्या भरात विसरूनच जातात ! मग अशा वेळी त्या तंट्याचे पर्यवसान कशा प्रकारे होतं, हे आपण रोज पेपरात वाचत असतोच. जसं की, बापाने तरण्या ताठ्या मुलावर हात उचलला, म्हणून रागाच्या भरात त्याने आत्महत्या करण्या पर्यंतची पायरी गाठली किंवा एखाद्या मुलाने, आपल्या वडिलांनी नवीन मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्या जन्मदात्यावरच चाकूने हल्ला करून, नको इतकी टोकाची पायरी गाठलेली असते ! असो !

“अहो काय सांगू तुम्हांला, या वयात सुद्धा, मी त्या अमुक तमुक देवळाच्या आठ हजार पायऱ्या चढलो बरं कां ! अजिबात कसला त्रास म्हणून झाला नाही बघा, सगळी त्याचीच कृपा !”

आपण कुठंतरी घाई घाईत महत्वाच्या कामाला, चाळीच्या जिन्याच्या पायऱ्या उतरून जात असतो आणि आपल्याला एखाद्या पायरीवर उभं करून, चाळीतले अप्पासाहेब आपल्याला हे ऐकवत असतात. चाळीच्या दोन जिन्याच्या फक्त चाळीस पायऱ्या चढून वर आलेल्या अप्पाना, वरील वाक्य बोलतांना खरं तर धाप लागलेली असते, पण आपण सुद्धा, “हॊ का, खरंच कमाल आहे तुमची अप्पासाहेब, या वयातसुद्धा तुम्ही बाजी मारलीत बुवा !” असं बोलून आपली सुटका करून घेतो.  देव दर्शनाला कोणी किती पायऱ्या कुठे चढाव्या अथवा कुठे उतराव्या, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न. मी बापडा उगाच त्यांच्या श्रद्धेच्या पायऱ्यांच्या आड कशाला येऊ ? मग याच अप्पाकडून कधीतरी ऐकलेले “ईश्वर सर्वव्यापी आहे, फक्त तो बघायचा भाव मनी हवा, की त्याचे दर्शन झालेच म्हणून समजा !” हे त्यांचे वाक्य आठवते. पण मी स्वतःची पायरी ओळखून असल्यामुळे, अप्पासाहेबांना त्यांच्या या वाक्याची आठवण करून देत नाही इतकंच. उगाच कशाला आपण आपली पायरी सोडून बोला !

“शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये” असा उपदेश पूर्वीचे बुजुर्ग लोकं त्या काळच्या तरुण पिढीला करत ! हे सांगतांना त्यांनी स्वतः किती वेळा, किती कारणांनी कोर्टाची ती पायरी चढल्ये हे सांगण्याचे मात्र शिताफिने टाळत. एकंदरीतच कोर्टाची पायरी चढण्या मागे कुठलाच शहाणपणा नाही, उलट वेळ आणि पैशाचा नको इतका अपव्यय ती एक पायरी चढल्यामुळे होतो, हे खरं तर त्यांना यातून सांगायचं असावं ! या  सिद्धांता मागची कारणं काहीही असली तरी, काही वेळा काही भांडण तंट्यानी इतकी टोकाची पायरी गाठलेली असते, की ती सोडवण्यासाठी शेवटी दोन्ही वादी आणि प्रतिवादींना ती नको असलेली कोर्टाची पायरी चढल्या शिवाय गत्यंतरच उरत नाही ! मग स्वतःच्या सांपत्तीक पायरी प्रमाणे, ते वादी आणि प्रतिवादी दोन नामांकित वकील करून आपापली केस, कोर्टाच्या कंटाळवण्या पायरीवर सोडवायचा चंग बांधतात. त्यांना त्यांची कोर्टाची पायरी लखलाभ ! असो !

काही थोर लोकांनी समाजाबद्दलची बांधिलकी जपतांना, स्वतः वेगळ्या अर्थाने पायरीचा दगड बनून, अनेक जणांना यशाच्या शिखरावर बसवलेल आपण पाहिलं असेलच. अशा प्रकारचा “पायरीचा दगड” बनणे सर्वांनाच जमतं असं नाही.  त्यासाठी मुळात अशा दगडाची जडण घडणच वेगळ्या प्रकारची झालेली असावी लागते. अनेक न दिसणारे, छिन्नी हातोड्याचे घाव, अशा दगडांनी आपल्या आत झेलून लपवलेले असतात, याची आपल्या सारख्या सामान्य लोकांना कल्पनाच नसते. याच घावांना लक्षात ठेवून हे दगड, आपल्या पुढच्या पिढीला असे घाव सोसावे लागू नयेत म्हणून, अनेकांसाठी “पायरीचे दगड” बनून समाजऋण फेडायच कामं इमाने इतबारे, स्वतः अलिप्त राहून करत असतात ! समाजातील अशा महान व्यक्तींचा हा आदर्श, थोडया फार प्रमाणात जरी आपण डोळयांपुढे ठेवून, आपल्या कुवती प्रमाणे, समाजाच्या कल्याणासाठी छोटीशी का होई ना, पायरी बनायला कोणाला कुठलीच अडचण नसावी असं मला वाटतं !

मंडळी, मला स्वतःला असं वाटून काय उपयोग आहे म्हणा ? शेवटी, हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक, वैचारिक पातळीवरील पायरीचा प्रश्न आहे ! पण आपण सर्वांनीच, अगदी माझ्यासकट, अशी छोटीशी पायरी होण्याचा प्रयत्न करायला कोणाची हरकत नसावी, असं मला मनापासून वाटतं. बघा विचार करून !

शुभं भवतु !

ताजा कलम – आता थोडयाच दिवसात आपल्याला “पायरी हा ss पू ss स ss” अशा आरोळ्या कानावर यायला लागतील, तर त्यातील त्या “पायरीवर” पुन्हा कधीतरी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हवा संवाद… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ हवा संवाद… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काहीं मराठी मालिका मध्यंतरी बघण्यात आल्या. त्यात काही लहान मुले काम करीत होती म्हणजेच आपली भुमिका पार पाडीत होते. खरंतर लहान मूल म्हणजे देवाघरचे फुल. परंतु ह्या विरुद्ध ती आक्रस्ताळी, जे हवयं ते हातपाय आपटून मिळवणारी मुल बघीतली आणि मन विषण्ण झाले. त्यांचं ते ओरडून चिडून बोलणे ऐकले आणि आभासी असूनही हात शिवशिवत होते. मनात आले कुठून बरं शिकत असतील हे सगळं ?

पण एक विसरून पण चालणार नाही मुल ही कधीकधी अनुकरणातून शिकतात. मुलांना घडविण्यात काही हिस्सा हा पालकांचा, शिक्षकांचा पण असतो आणि ही तरं सगळी मोठी, सुज्ञ मंडळी असतात.

इतक्या लहान वयात प्रचंड इगोस्टिक मुल बघून मन काळजीत पडतं. कधी कधी मनात येतं ही आजकाल जी सुबत्ता, चंगळ सुरु आहे त्यामुळे मन ही कधी मारायला पण आलं पाहिजे हे पालक पण जणू विसरूनच गेले आहेत. जरा स्पष्ट बोलायचं तरं हा इगो मुल बघतात, शिकतात कुठून ?

ही मुलं शिकतात आपल्याकडून, समाजाकडून, सोशल मिडियामुळे, टीव्हीमधून.

आपल्या वेळेचा आणि आपल्या आधीच्या पिढीचा काळ बऱ्यापैकी सारखा होता. परंतु आताच्या पिढीसाठी सगळ्याच बाबतीत काळ खूप जास्त वेगाने बदललाय. मग हा काळ स्पर्धा, शिक्षण, प्रगती, अर्थार्जन, चंगळवाद, मोकळीक ह्या सगळया बाबतींत लागू पडतो. साधारण आपल्या पिढीपर्यंत आपण एकदा का एखाद्या नोकरीच्या तत्सम क्षेत्रात शिरलो की तेथून बाहेर पडण्याचा मार्ग थेट ५८ वा ६० व्या वर्षीच आपल्याला सापडायचा. नोकऱ्या बदलणे हा विचार फारसा कुणाच्या डोक्यात, मनात शिरतच नव्हता. पण आता काळ खरचं खूप बदलला, आपल्याला नविन पिढीतील भरपूर पगार चटकन डोळ्यात भरतात पण त्यामध्ये असणारी अस्थिरता आपल्याला फारशी जाणवत नाही. आजची पिढी आज जगायला शिकली आहे. त्यांना फारसा उद्याचा विचार करायचा नसतो. कारणं तो करुन फायदा नसतो असं ह्या पिढीच स्पष्ट मत.

आजच्या लेखात नविन पिढीचा स्ट्रगल, वाढती महागाई, निरनिराळी प्रलोभने, मोठया शहरातील बेसुमार खर्च आणि त्यामधील अस्थिरता  समजावून सांगितली आहे. आपल्या पिढीला एवढे मोठे पगाराचे आकडे ऐकायची सवयच नव्हती त्यामुळे ते ऐकून आपले डोळेच फिरतात आणि त्या नादात आपण त्यातली अस्थिरता विसरून जातो. ह्या लेखामध्ये  जी तरुण पिढीची घुसमट होते आहे ती सांगितली आहे. आपल्या पालकांना ताण येऊ नये, काळजी वाटू नये म्हणून हा तरुण वर्ग आई वडिलांच्या प्रेमापोटी त्यांच्या समस्या पालकांसमोर उघड करीत नाही.

पण ह्या लपाछपीच्या खेळात पालक आणि पाल्य ह्यांच्या दरम्यान गैरसंमजाची एक दरी तयार होते. त्यामूळे आपल्याला येणाऱ्या समस्या मुलांनी आईवडिलांना खुल्या दिल्याने सांगितल्या तर नक्कीच ह्यातून पालकांच्या अनुभवांच्या गाठोड्यातून हमखास नामी उपाय हा सापडून जाऊ शकतो. पाल्यांमध्ये पण आपण एकट नसून आपले पालक आपल्याबरोबर कुठल्याही परिस्थितित ठामपणे पाठीशी उभे असल्याचे बघून एक वेगळाच आत्मविश्वास तयार होईल जो निश्चितच त्यांना उत्कर्षाच्या वाटेवर आणून सोडेल. मात्र ह्यासाठी दोन्हीही पिढीमध्ये मोकळे बोलण्याची, संवाद कायम साधत राहण्याची, परस्परांना समजून घेण्याची सवय ही असायलाच हवी. म्हणजेच काय तर आधी पालकत्व शिकावं लागेल तरच पुढील दिवस शांततेत घालवू शकू.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसंतोत्सव…सृजनाचा उत्सव… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

🌸 विविधा 🌸

☆ वसंतोत्सव…सृजनाचा उत्सव… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

वसंत ऋतू म्हणजे सौंदर्य

वसंत म्हणजे आनंद. वसंत म्हणजे सृजन, वसंत म्हणजेचैतन्य. फाल्गुनातच वसंतऋतूच्या पाऊल खुणा दिसू लागतात. वसंत ऋतू,साऱ्या ऋतूंचा राजा.तो येतो ते हातात जादूची छडी घेऊनच.

शहरी वातावरणात राहणारे आपण निसर्गा च्या या सौंदर्याच्या जादूला नक्कीच भुलतो. शिशिरातील पानगळीने, तलखीने सृष्टीचे निस्तेज उदालसेपण आता संपणार असते. कारण ही सृष्टी वासंतिक लावण्य लेऊन आता नववधू सारखी सजते. वसंत राजाच्या स्वागतात दंगहोते.कोकिळ आलापां वरआलाप घेतअसतो.

लालचुटुक पालवी साऱ्या वृक्षवेलींवर डुलत असते.उन्हात चमकताना जणू फुलांचे लाललाल मणी झळकत असल्याचा भाह होतो.चाफ्याच्या झाडांमधून शुभ्रधवल सौंदर्य उमलत असते.

आजून जरा वेळ असतो, पण कळ्यांचे गुच्छ तर हळुहळू दिसायला लागतात.फुलझाडांची तर गंधवेडी स्पर्धाच सुरु असते.केशरी देठांची प्राजक्त फुले, जाई, जुई चमेली, मोगरा, मदनबाण, नेवाळी, सोनचाफा अगदी अहमहमिकेने गंधाची उधळण करत असतात.

* वसंतोत्सव *

सृष्टी लावण्यवती झाली

वसंतोत्सवात अशी रंगली 

घालते जणू सुगंधाचे उखाणे. ‌

या सुगंधी सौंदर्याला रंगांच्या सुरेख छटांनी बहार येते.फार कशाला घाणेरीचीझुडपं.लाललाल आणि पिवळ्या,केशरी पांढऱ्या, जांभळ्याआणि गुलाबी अशा विरुद्ध रंगांच्याछटांच्या फुलांनी लक्षवेधी ठरतात.पळस पांगारा फुललेले असतात. बहावातर सोनपिवळी कळ्याफुले लेवून अंगो पांगी डोलतअसतो. वसंत ऋतूचेहक्का चे महिने चैत्र, वैशाख. पण खरा तो रंगगंधानी नहातो चैत्रात. कारणफुलांच्या,मोहोरा च्यागोड सुगंधा बरोबर फळातील मधुरसही असतो.म्हणूनच हाखऱ्या अर्थाने मधुमास.  वसंतऋतू चैतन्याचा. कुणासाठी काहीतरी करण्याचा. नर पक्षी मादीला आकर्षित करण्याच्या खटपटीत. सुगरण पक्षी आपली कलाघरटी बांधून प्रदर्शित करतात आणि मादीला आकर्षित करतात. काही नर पक्षी गातात, काही नाचतात.  इकडंझाडं, वेली फुलोऱ्यात रंगून ऋतूराजा चे स्वागत करण्यात मश्गु लअसतात.साऱ्या सृष्टी तच हालचाली, लगबग.

वसंत ऋतूचे हक्काचे महिने चैत्र, वैशाख. पण खरा तो रंगगंधानी न्हातो चैत्रात.  कारण फुलांच्या, मोहोराच्या गोड सुगंधा बरोबर फळातील मधुरस ही असतो.म्हणूनच हा मधुमास. निसर्गाचा मधुर आविष्कार.म्हणून तर चैत्र मास “मधुमास” होतो.

त्यातच कालपर्यंत शुकशुकाट असलेल्या झाडांवरलहान, मोठी, सुबक, बेढब, लांबोडकी, गोल घरटी दिसू लागतात.नव्या सृजनाची तयारी. साधारण पणे वसंतोत्सव हा वसंत पंचमी पासून साजरा केला जातो.

… वसंतोत्सव हा सृजनाचा उत्सव. वसंतो त्सव अमर वादाचेही प्रतीक आहे. वसंताची पूजा करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे.

आपण निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे. त्यातून ताणतणाव विसरून निर्भेळ सुखाची प्राप्ती होईल.निसर्ग निर्व्याज असतो.त्याला षड्रिपुंचा  वारा लागलेला नसतो. तो आपल्याला नवचैतन्य देतो.

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ असं आहे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ असं आहे… ☆ श्री विश्वास देशपांडे

मधुकर तोरडमल यांचे ‘ तरुण तुर्क म्हातारे अर्क ‘ हे नाटक बहुतेकांनी पाहिले असेल. पाहिले नसले तरी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्या नाटकात प्रा बारटक्के यांच्या तोंडी घातलेली ‘ ह हा हि ही… ‘ ची बाराखडी बहुधा सर्वांच्या परिचयाची असेल. व्यवहारात अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांना बोलण्यासाठी पटकन शब्द सापडत नाहीत. अशी माणसे मग ‘ ह हा हि ही ‘ चा आधार घेतात. समोरच्या व्यक्तीला संदर्भाने त्यांचे म्हणणे समजून घ्यावे लागते. पण कधी कधी अशा बोलण्यातून भयंकर विनोद वा क्वचित गैरसमजही होऊ शकतो. पु ल देशपांडे, मधुकर तोरडमल, लक्ष्मण देशपांडे यांच्यासारखी निरीक्षण चतुर मंडळी लोकांच्या अशा लकबी बरोबर हेरतात आणि खुबीने त्यांचा आपल्या लेखनात वापर करून घेतात. ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ‘ या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात तर प्रत्येक पात्रागणिक त्यांनी अशा लकबींचा सुरेख वापर केला आहे. त्यातून त्या पात्रांचे स्वभाववैशिष्ट्य तर दिसतेच पण त्यातून निर्माण होणारा विनोद श्रोत्यांना पोट धरून हसायला लावतो.

माझ्या संपर्कात अशी काही माणसे आली आहेत की बोलताना त्यांच्या लकबी किंवा विशिष्ट शब्दांची त्यांनी केलेली पुनरावृत्ती माझी नेहमीच करमणूक करून जाते. अर्थात तुमच्याही संपर्कात अशी माणसं आली असतीलच.

माझे एक सहकारी कोणतीही गोष्ट बोलताना नेहमी ‘ नाही ‘ ने सुरुवात करीत असत. ‘ नाही, ते असं नाही. नाही, माझं ऐकून घ्या. नाही ते असं करायचं असतं… ‘ वगैरे. त्यांचीच भाऊबंद असलेली ( नात्याने नाही बरं का, तर बोलण्याच्या लकबीमुळे ) एक ताई आपल्या बोलण्याची सुरुवात ‘ नव्हे ‘ ने करीत असत. कधी कधी बिचाऱ्यांना आपले म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी ‘ नव्हे नव्हे ‘ चा दोन वेळा वापर करावा लागायचा. खरं म्हणजे दोन नकारांचा एक होकार होतो असं म्हणतात. म्हणजे ‘ ते खरं नाही असं नाही ‘ या वाक्यात दोन नकार आले आहेत. त्यांचा अर्थ होकारार्थी होतो. म्हणजे ‘ ते खरं आहे. ‘ पण आमचे हे ‘ नाही नाही ‘ किंवा ‘ नव्हे नव्हे ‘ म्हणणारी मंडळी त्यांच्या मतावर इतकी ठाम असतात की त्यांच्या दोन्ही नकारांचा अर्थ ‘ नाहीच ‘ असा होतो.

हे ‘नाही नाही’ किंवा ‘नव्हे नव्हे’ कसं येत असावं ? प्रत्येक गोष्टीची सुरुवात नकारार्थीच का व्हावी ? एकदा मी कुठेतरी वाचलं होतं की लहानपणी नुकत्याच जन्मलेल्या रडणाऱ्या बाळाला हॉस्पिटलमधली नर्स जेव्हा शांत करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती त्याला हातात घेऊन ‘ नाही नाही ‘ असं म्हणते. मग पुढे आई आणि त्या बाळाला घेणाऱ्या आयाबाया तिचाच कित्ता गिरवतात. त्या रडणाऱ्या बाळाला हातात घेऊन ‘ नाही नाही, असं रडू नाही. ‘ वगैरे चा भडीमार त्या करतात. लहानपणापासून असं ‘ नाही नाही ‘ ऐकण्याची सवय झालेलं ते बाळ आपल्या पुढील आयुष्यात ‘ नन्ना ‘ चा पाढा लावील त्यात नवल ते काय ?

आमचे आणखी एक सहकारी होते. ते वयाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ होते. ते ‘ नाही नाही ‘ जरी म्हणत नसले तरी त्यांना दुसऱ्याचे बोलणे कसे चुकीचे आहे हे नेहमी सांगण्याची सवय होती. आपण त्यांना एखादी गोष्ट सांगितली की ‘ प्रश्न तो नाही रे बुवा… ‘ अशी त्यांची सुरुवात असायची. मग तेच म्हणणे ते जरा वेगळ्या शब्दात सांगायचे. चार लोक एकत्र बोलत असले की ते अचानक यायचे आणि एखाद्याला ‘ अरे इकडे ये, तुझ्याशी महत्वाचं काम आहे ‘ असं म्हणून बाजूला घेऊन जायचे. पण खरं तर महत्वाचं काम वगैरे काही नसायचं पण मी कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.

आमच्या नात्यातले एक गृहस्थ चार दोन वाक्ये बोलून झाली की ‘ असं आहे ‘ असं म्हणतात. त्यांच्या बोलण्याचं सार इंग्रजीत सांगायचे झाले तर ‘ Thus far and no further. ‘ म्हणजे हे ‘ असं आहे. मी सांगतो ते फायनल. यापुढे अधिक काही नाही. ( आणि काही असले तरी ते सांगणार नाहीत. हा हा )

आमचे एक प्राध्यापक होते. ते वर्गात शिकवताना दोन चार वाक्ये बोलून झाली की ‘ असो ‘ असं म्हणायचे. मुलांना ते सवयीचे झाले होते. कधी कधी एक दोन वाक्यानंतर त्यांच्या तोडून ‘ असो ‘ बाहेर पडले नाही तर मागील बाकावरून एखादा खोडकर विद्यार्थी हळूच ‘ असो ‘ म्हणायचा. मग सगळा वर्ग हास्याच्या लाटेत बुडून जायचा. ते प्राध्यापकही हे गमतीने घ्यायचे आणि हसण्यात सामील व्हायचे. आणि पुन्हा ‘ असो ‘ म्हणून शिकवायला सुरुवात करायचे.

माझ्या परिचयातील एक गृहस्थ आपण काहीही सांगितलं की ‘ हो का ‘ किंवा ‘ खरं का ‘ असे विचारायचे. मग त्यांना पुन्हा ‘ हो ‘ म्हणून सांगावे लागायचे. जसं वर ‘ नाही ‘ ने सुरुवात करण्याचा किस्सा सांगितला आणि त्यामागे नर्सपासून सगळे जबाबदार होते ( खरं तर अशा लोकांना पकडून जाब विचारायला हवा की तुम्ही ‘ नाही नाही ‘ असे का शिकवले ? कोण विचारणार त्यांना ? जाऊ द्या.

हे म्हणणं म्हणजे लग्नानंतर पती पत्नीत वादविवाद झाले तर मध्यस्थ कोण होता किंवा लग्न लावून देणारे गुरुजी कोण होते त्यांना बोलवा असं म्हणण्यासारखं आहे. ) तसंच ‘ हो का ‘ किंवा ‘ खरं का ‘ असं विचारण्यामागे त्या व्यक्तीचा संशयी स्वभाव किंवा समोरच्या व्यक्तीवर विश्वास नसणे या मानसिकतेतून आलं असावं. असे सारखे ‘ हो का ‘ विचारणाऱ्यांचे नाव आम्ही खाजगीत ‘ होकायंत्र ‘ ठेवले होते.

अशीच काही व्यक्तींना आपण काही सांगितले तर ‘ अच्छा ‘ किंवा ‘ अरे वा, छान ‘ अशी म्हणायची सवय असते. त्यांना जरी सांगितले की ‘ अहो, तो अमुक अमुक आजारी होता बरं का ‘ यावर ते आपल्या सवयीने पटकन बोलून जातील, ‘ अच्छा ‘ किंवा ‘ अरे वा, छान… ‘ आता काय म्हणावे अशा लोकांना ? कोल्हापूर, साताऱ्याकडची मंडळी प्रत्येक वाक्यानंतर समोरच्याला बहुधा ‘ होय ‘ अशी छान तोंडभरून प्रतिक्रिया देतात. सोलापूर, पंढरपूरकडील मंडळी त्याहीपुढे जाऊन ‘ होय की ‘ असं गोड प्रत्युत्तर देतात. हे ‘ होय की ‘ त्यांच्या तोंडून ऐकायलाच मजा वाटते.

काही मंडळींना चार दोन वाक्ये झाली की समोरच्याला, ‘ काय कळले का ? ‘ किंवा ‘ लक्षात आलं का ? ‘ असं विचारण्याची सवय असते. अशी मंडळी या जन्मात नसली तरी पूर्व जन्मात शिक्षक असावी असे माझे पक्के मत आहे. त्यांचेच काही भाऊबंद ‘ माझा मुद्दा लक्षात आला का ? ‘ असे विचारणारी आहेत. कधी कधी तर दोन मित्र फिरायला निघाले असतील तर एखाद्या मित्राला अशी सवय असते की तो आपली बडबड तर करत असतोच पण समोरच्याचे लक्ष आपल्या बोलण्याकडे आहे की नाही यासाठी त्याचा हात किंवा खांदा दाबत असतो. माझ्या एका मित्राला अशीच खांदा दाबण्याची सवय आहे. आम्ही फिरायला निघालो की तो बोलत असतो. माझे त्याच्या बोलण्याकडे लक्ष असले तरी खात्री करून घेण्यासाठी तो माझा खांदा वारंवार दाबत असतो. मग एका बाजूचा खांदा पुरेसा दाबून झाला की मी चालताना बाजू बदलून घेतो मग आपोआपच माझा दुसरा खांदाही दाबला जातो.

काही माणसांना फोनवर बोलताना पाहणे किंवा ऐकणे हाही एक मोठा गमतीदार अनुभव कधी कधी असतो. हास्यसम्राट प्रा दीपक देशपांडे यांनी आपल्या एका कार्यक्रमात अशा बोलण्याचा एक नमुना सादर केला होता. एक व्यक्ती फोनवर बोलत असते. समोरच्या बाजूला कोणी तरी भगिनी असते. हा आपला प्रत्येक वाक्याला, ‘ हा ताई, हो ताई, हो ना ताई ‘ अशी ‘ ताईची ‘ मालिका सुरु ठेवत असतो. काही माणसे फोनवर बोलताना सारखं ‘ बरोबर, खरं आहे ‘ यासारखे शब्द वारंवार उच्चारताना दिसतात तर काही ‘ तेच ना ‘ याची पुनरावृत्ती करतात.

अजून काही मंडळी बोलताना जणू समोरच्या व्यक्तीची परीक्षा पाहतात. त्यांच्या सांगण्याची सुरुवातच अशी असते. ‘ काल काय झालं माहितीये का ? ‘ किंवा ‘ मी आज केलं असेल माहिती आहे का ? ‘ आता समोरच्या व्यक्तीला कसं माहिती असणार की काल काय झालं किंवा तुम्ही आज काय केलं ? मग पुढे अजून ‘ ऐका ना.. ‘ ची पुस्ती असते. आता आपण ऐकतच असतो ( दुसरा पर्याय असतो का ) तर कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याला मी फार महत्वाचं सांगतो आहे किंवा सांगते आहे असा आव आणून ‘ हे पहा मी सांगतो. तुम्ही एक काम करा… ‘ अशी सुरुवात करतात. असो मंडळी. तर असे अनेक किस्से आहेत. ‘असो. ‘, ‘ असं आहे बुवा सगळं. ‘ आता तुम्ही एक काम करा. लेख संपत आलाय. तेव्हा वाचणं थांबवा किंवा दुसरं काही वाचा. आणि हसताय ना ? हसत राहा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसंत वैभव ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

वसंत वैभव ☆ सौ कल्याणी केळकर बापट

फेब्रुवारी महिना हा घरातील लग्नकार्यामुळे खुप जास्त गडबडीत गेला आणि आता मार्च महिना तर कायमच आम्हा बँकर लोकांसाठी धावपळीचाच. मात्र फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याची सुरवात ही भ्रमंती साठी एकदम बेस्ट. ह्या दिवसात गारठा तर कमी होतो पण उन्हाची काहीली सुध्दा सुरू झालेली नसते. त्यामुळे हा मोसम फिरण्यासाठी खासच.

तसही ह्या मोसमामध्ये जरा शहराबाहेर भटकंती करण्याची मजा काही ओरच.मस्त सगळीकडे पळस फुललेला असतो.पळस म्हणजे अफलातून सौंदर्याचे काँम्बीनेशन.त्याचा तो मखमली केशरी रंग, त्या केशरीरंगाला साजेसा शेवाळी हिरवा पर्णसांभार,आणि ह्या सगळ्यांनी बनलेला त्याचा लफ्फेदार तुरा,खरचं वेडं लावतो अक्षरशः. एखादा ह्या फुलांचा गुच्छ खूप सुंदर भासावा आणि लगेच दुस-या गुच्छाकडे नजर टाकावी तो दुसरा त्याहुनही सुंदर भासावा,अशी ही सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करणारा हा पळसाच्या फुलो-याचा आपला फेब्रुवारी, मार्च महिना हा खासच. अमरावती जवळ पोहो-याच्या जंगलात टिमटाळ्याला ह्या केशरी फुलांचे विस्तीर्ण पसरलेले जणू पठारच आहे असे म्हणतात. त्या सौंदर्य स्थळालाही एक दिवस निश्चितच भेट देईनच.पळसाचे नानाविध रंग असतात असे म्हणतात पण ज्याप्रमाणे नानारंगाच्या पैठण्या असल्या तरी पैठणी म्हंटली की डोळ्यासमोर ती जांभळट रंगाची टिपीकल पैठणीच उभी राहते त्याचप्रमाणे पळसाचे फुलं म्हंटले की ते मखमली केशरीच.

अजून जरा गावाबाहेर शेतांच्या बाजूला भटकंती वळवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या बाळकै-या झाडांना लटकून हवेच्या झोताबरोबर हिंदोळे देत आपल्याला खुणावत असतात.बाळकै-या बघितल्या की खूप द्विधा मनस्थिती होते.त्यांचं ते अजून पूर्ण विकसित न झालेलं,पिल्लासारखं, अवखळ रुप आपल्याला त्याला तोडण्यासाठी हात लावण्यापासून दूर खेचतं,तर त्याची किंचीत तुरट,आंबट चव ही जिभेवर रेंगाळायला मोहात टाकते डेरेदार लटपट लागलेल्या आंबट चिंचानी लदलदलेले झाड बघून अगदी दिवसभरलेली पहिलटकरीण वा लेकुरवाळी माहेरवाशीण घरी आल्याचा फील येतो.

खरचं कारमध्ये ड्रायव्हिंग सिटच्या बाजूला बसून, खिडकी उघडी करून अलवार मंद हवेच्या झुळुका अंगावर झेलतं,वा-यामुळे डोळ्यांवर येणाऱ्या अवखळ केसांच्या बटांना दूर सारतं फुललेल्या केशरी पळसाच्या सौंदर्याचे मनमुराद निरीक्षण करणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही हे त्याक्षणी तरी वाटतं.

ह्या सौंदर्याच्या बरोबरीनेच वसंत ऋतू हा प्रेमाचे प्रतीक. कोणाचा व्हँलेटाईन तर कोणाला भारुन टाकणारी वसंतपंचमी ह्याच महिन्यातील.फेब्रुवारी महिना हा आम्हां नोकरदारांसाठी पण जरा आवडता महिना.अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा हा महिना का कोण जाणे पण लौकर आला आणि लौकर गेला असा भासणारा हा मास.  ह्या आवडत्या फेब्रुवारी मासाचा,पळसाच्या सौंदर्याचे आणि प्रेमाच्या वसंतपंचमी चे काहीतरी अनोखे नाते मात्र असते.ह्या निमित्ताने मी मागेच केलेली एक रचना खालीलप्रमाणे…

सुरु आहे सध्या फेब्रुवारी मास,

प्रेमीजीवां साठी पर्वणी खास ,

आसमंतात दरवळे प्रेमाचा सुवास,

खरेच असेल प्रेम की निव्वळ आभास?।।।

 

काहीवेळा जाणवे विरहातही गहिरे प्रेम,

कधी उपभोगापेक्षा  त्यागातही भासे प्रेम,

कधी अंतरातील दूरी घालवे हे प्रेम,

स्वच्छ नजरेने अनुभवले तरच कळेल हे पारदर्शी प्रेम।

 

प्रेमात असे ताकद, प्रेमात अनोखी शक्ती,

न्यारी असे राधेची श्रीकृष्णावरील भक्ती,

ना चाले ह्यात कधीच कुणाची सक्ती,

खरचं प्रेम ही नितांतसुंदर अनुभूती ।।।

 

प्रेमात सगळंच आपलं असतं ,

तुझं माझं काही नसतं,

पाडगावकर म्हणालेच ना हे  सेम टू सेम असतं,

सगळ्यांचचं सेम टू सेम असतं ।।।।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भांडणाच बदलत रुप…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “भांडणाच बदलत रुप…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

घरात भांडण असत का? होत का? हा वेगळा प्रश्न आहे. भांडण नकोच. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात भांडण झालं, तर त्याच स्वरूप सुध्दा बदललं आहे. याला कारण असणारा आणि मिळणारा वेळ.

आजकाल क्रिकेटच्या खेळात जसं टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच असते. तसंच भांडणाचही झाल आहे.

क्रिकेट मॅच कशा वेगवेगळ्या कारणांनी असतात, अगदी एखाद्या स्थानिक नेत्याच्या वाढदिवसापासून वर्ल्ड कप पर्यंत. तसंच करावसं वाटलं, तर भांडणाला कोणतही कारण चालतं, पण वेळेचं बंधन मात्र असत. कारण दोघांनाही कामावर वेळेवर जायचं असतं.

देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय असे सामने असतात. तशीच भांडणाची कारणं सुध्दा घरगुती, आणि बाहेरची अशी असू शकतात.

आता कारण काय….. अगदी सकाळी दुध ऊतू गेल्यापासून रात्री बाथरुमचा लाईट तसाच राहिला या पर्यंत, किंवा जागा सोडून ठेवलेली टुथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, व आंघोळीनंतर हाॅलमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या टाॅवेल पासून, रात्री पसरवून ठेवलेला पेपर. किंवा जागा दिसेल तिथे ठेवलेला रिमोट. किंवा वागण्यावरून, आपलं वय किती? मुलं मोठी झाली आहेत. चार लोकांत कसं राहिलं पाहिजे? या सारखं कोणतही, छोटं मोठ कारण पण चालतं. कारण कोणतं, आणि आपल्याला वेळ किती, यावर भांडण करायचं का? आणि कसं करायचं? हे ठरतं.

आणि वेळेनुसार हे भांडण टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच सारखं स्वरूप धारण करतं.

सकाळचं भांडण हे टी २० सारखं असतं. थोडक्यात आटपायच. ती डबा करण्याच्या गडबडीत असेल तर माझ्या दृष्टीने तो पावर प्ले असतो. कारण पावर प्ले मध्ये जसं एका ठराविक कक्षेच्या आतच बरेच खेळाडू लागतात. तसंच या काळात ती स्वयंपाक घराच्या कक्षेतच असते. अगदी मनात आलं तरी ती वेळेअभावी स्वयंपाक घराच्या कक्षेबाहेर येत नाही. या काळात मी थोडी रिस्क घेऊन (तोंडाने) फटकेबाजी करुन घेतो. आणि तिची डब्याची तयारी झाली असेल, आणि मी दाढी करत असेल तर…… तर मात्र तिचा पावर प्ले असतो. कारण मी आरशासमोरच्या कक्षेत असतो. आणि ती मनसोक्त फटके मारण्याचा प्रयत्न करते, अगदी क्रिज सोडून बाहेर येत फटके मारतात, तस ती स्वयंपाक घर सोडून बाहेर येत फटकारते. आणि बऱ्याचदा यशस्वी पण होते‌.

संध्याकाळच असेल तर मात्र वन डे स्टाईल त्यातही डे नाईट असतं. म्हणजे वेळेनुसार संध्याकाळी सुरू झालेलं हे रात्री झोपण्याच्या वेळी पर्यंत चालतं. यात जेवणाच्या वेळी ब्रेक असतो. मग जेऊन ताजेतवाने होऊन परत आपला मोर्चा सांभाळतात.

पण विकेंड, किंवा त्याला जोडून सुट्टी आली तर मात्र ते टेस्ट मॅच सारखं लांबत जात. यात मग काही वेळा कोणीतरी वरचढ ठरल्यामुळे लिड सुध्दा घेतं, मग आपली पडती बाजू पाहून दुसऱ्याला सावध पवित्रा घेत मॅच निर्णायक होण्याऐवजी बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न होतो.

मॅचमध्ये जसे काही उत्साही प्रेक्षक वाजवण्याची साधनं आणतात आणि वाजवत बसतात. तसे प्रेक्षक प्रत्यक्ष भांडणाच्या वेळी नसले तरी आवाजाची भर मिळेल त्या साधनाने पूर्ण करतो. मग यात सोयीनुसार भांड्यांचा आवाज, कटाची दारं वाजवीपेक्षा जोरात लाऊन येणारा आवाज, पाॅलीशची डबी, किंवा ब्रश हे मुद्दाम पाडून केलेला आवाज, मी लावलेल्या रेडिओ चा आवाज यांनी ती थोडीफार भरून निघते.

मॅचमध्ये थर्ड अंपायर असतो. तो निरीक्षण करून कोणाच्या तरी एकाच्या बाजूने निर्णय देतो. पण या अशा आपल्या भांडणात मात्र असा अंपायर नसावा असं दोघांनाही वाटतं. (किती समजूतदार पणा…..)

अस आहे हे भांडणाच बदलतं रूप……

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुरक्षा सप्ताह ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ मराठी चित्रपटांचा ‘दादा ‘ ☆ सौ कल्याणी केळकर बापट

14 मार्च !  विनोदी चित्रपटांतील बेताज बादशाह दादा कोंडके ह्यांचा स्मृतिदिन.

चित्रपट हे बहुतांश लोकांना आवडत असले तरी त्यामध्ये आवडीनिवडी ह्या भिन्न असतात. काहींना भावनाप्रधान चित्रपट आवडतात तर काहींना वास्तविकता असलेले. काहींना शांत संथ चित्रपट आवडतात तर काहींना दे दणादण हाणामारीचे, काहीं कथेला जास्त महत्त्व देतात  तर काहीं गाणे संगीत ह्यांना. तसचं काही लोक कलाकार बघून चित्रपट बघतात तर काही दिग्दर्शक बघून.

मात्र सगळ्यांना आवडतं असलेले चित्रपट कोणते तर एकमताने उत्तर येईल विनोदी चित्रपट. एकतर ह्या चित्रपटांनी मनावरचा ताण नाहीसा होतो,समजून घ्यायला फारशी बुद्धी वापरावी लागत नाही. अर्थातच विनोदी चित्रपटांमध्येही खूप विवीधता आढळते विनोद हा वेगवेगळ्या रसांनी दर्शविता येतो.

14 मार्च  ही   तारीख तर जणू नियतीने आपल्या कला साहित्य ह्या क्षेत्रावर चांगला घाला घालण्यासाठीच जणू राखीव ठेवली असावी. आजच्या तारखेला ज्ञानपीठ  पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर, मराठी गझलचे बादशहा सुरेश भट व वेगळ्या धर्तीच्या विनोदी चित्रपटाचे बादशहा दादा कोंडके ह्यांचा स्मृतीदिन.

दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. दादा म्हंटले की डोळ्यासमोर येते ती त्यांची लांब नाडा लोंबणारी हापपँन्ट,बंडीवजा ढगळा शर्ट, ती बावळट हसरी मुद्रा. आणि हाच अभिनय आणि वेषभूषा कठीण असूनही बाजी मात्र मारुन जायची. पांढरपेशा वर्गाला दादांच्या जरा अश्लीलते कडे झुकणा-या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण खास आवडीवाल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली.अर्थातच त्यांच्या खास  प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काहीच देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला होता.

दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात – दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी सिनेमागृहात  शिट्या वाजवत खास चवीने चित्रपट बघत ,त्यावर  चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा ‘मायबाप’ होता.

८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.मिलमजुराच्या घरात जन्मलेले मूल ते दादांच चित्रपट क्षेत्रातील योगदान हा प्रवास थक्क करणारा होता.

कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग ‘सेवा दलात’ प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या “खणखणपूरचा राजा” ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या “विच्छा माझी पुरी करा” ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले ‘विच्छा माझी पुरी करा ह्या नाटकाचा ‘  मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी द्विअर्थी शब्द वापरून मग जरासा पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.

…१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या “तांबडी माती” ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या “सोंगाड्या ” ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. ‘सोंगाड्या’ ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या “कामाक्षी प्रॉडक्शन” ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले.

त्यांचे गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे ,एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा,  पांडू हवालदार,  तुमचं आमचं जमलं,  राम राम गंगाराम, बोटं लावीन तेथे गुदगुल्या,  ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर,  मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात व सासरचे धोतर. हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले.

…एखाद्याला आपलं मानलं की मग पूर्ण विश्वास त्याच्यावर कसा टाकावा हे दादांकडून शिकावे.त्यामुळेच कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली.त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर – पार्श्वगायनासाठी तर ‘बाळ मोहिते’ प्रमुख दिग्दर्शन साहाय्यक ही माणसं वर्षोनुवर्षे जुळल्या गेली होती.

लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले.

त्यांचे हिंदी चित्रपट पुढीलप्रमाणे, तेरे मेरे बीच में ; अंधेरी रात में दिया तेरे हात में , खोल दे मेरी जुबान , आगे की सोच .

सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा ‘टर्निंग पॉंईंट’ ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या ‘आये’ ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या ‘नाम्या’ ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

१९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा बोलबाला इतका झाला होता, की खुद्द राज कपूरने ऋषीकपूर ला  लॉंच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.

१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. ‘पांडू हवालदार’मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते.

परत एकदा करंदीकर, सुरेश भट व दादा कोंडके  ह्या कला,साहित्य क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणा-या ह्या कोहिनूर हि-यांना विनम्र आदरांजली.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझ्या मातीचे गायन… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ माझ्या मातीचे गायन… ☆ श्री विश्वास देशपांडे

काल पेपर वाचत असताना एका लेखाने माझे लक्ष वेधून घेतले. दै. पुण्यनगरीत आलेल्या या लेखाचे शीर्षक होते ‘ इस्रायल हृदयात; पण मराठी रक्तात .’ हा लेख चंद्रशेखर बर्वे यांचा आहे. या लेखात त्यांनी सुरुवातीला असे म्हटले आहे की मराठीला संजीवनी देणारे दोन निर्णय जागतिक पातळीवर घेण्यात आले आहेत. पहिला महत्वाचा निर्णय घेतला तो महाराष्ट्र सरकारने. दहावीपर्यंत मराठी सक्तीची करून. आणि दुसरा निर्णय घेतला गेला तो इस्रायलमध्ये. मराठी भाषा आपल्या व्यवहारात सदैव राहावी याची काळजी महाराष्ट्रापेक्षा जास्त बेने इस्रायल यांना वाटते.

खरं म्हणजे या बातमीवर माझा विश्वास बसला नाही. पेपरमध्ये काहीतरी चुकीचे छापले गेले असावे किंवा वाचताना आपलीच काहीतरी चूक होत असावी असे मला वाटले. पण मग मी काळजीपूर्वक तो लेख वाचत गेलो. आणि जसजसा तो लेख वाचत गेलो, तसतसा आपण भारतीय असल्याचा, त्यातही महाराष्ट्रीयन असल्याचा आणि आपली मातृभाषा मराठी असल्याचा अभिमान वाटला . तो आनंद तुमच्यासोबत वाटून घ्यावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.

इस्रायल हे एक चिमुकले राष्ट्र. पण राष्ट्रभक्ती, शौर्य, जाज्वल्य देशाभिमान इथल्या लोकांच्या नसानसात भिनलेला. तसा या राष्ट्राला चार साडेचार हजार वर्षांचा इतिहास आहे. पण दुसऱ्या महायुद्धानंतर १९४८ मध्ये इस्रायल स्वतंत्र देश म्हणून खऱ्या अर्थाने आकारास आला. जगाच्या पाठीवरील हा एकमेव ज्यू लोकांचा देश. जेरुसलेम ही या देशाची राजधानी. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांसाठी सुद्धा पवित्र असे हे ठिकाण. होली लँड . या देशातल्या लोकांनी वंशविच्छेदाच्या आणि नरसंहाराच्या भयानक कळा सोसल्या. वंशाने किंवा जन्माने ज्यू म्हणजेच यहुदी असणे हाच काय तो एकमेव या लोकांचा अपराध. इंग्लंड, जर्मनी आणि अरब राष्ट्रांनी या लोकांची ना घरका ना घाटका अशी स्थिती केली होती. डेव्हिड बेन गुरियन या बुद्धिमान, लढवय्या आणि दूरदृष्टी नेत्यामुळे हा भूभाग एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अभिमानाने उभा राहिला

यानंतर जगभरातून हजारो ज्यू आपल्या देशात म्हणजे इस्रायलमध्ये परतू लागले. भारतातून इस्रायलमध्ये परतणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. भारतातून कोचीन, कलकत्ता, गुजरात आदी ठिकाणांहून हे लोक परतले. त्यातही सर्वाधिक संख्या आहे ती महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांची. या लोकांना तिकडे जाऊन आता जवळपास सात दशके झाली. पण मराठी मातीशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. मराठी संस्कृती आणि भारतीय संस्कृती या लोकांनी टिकवून ठेवली आहे. महाराष्ट्रीयन आणि भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणात असतात. महिला साडी नेसतात. जे महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत, त्यांच्या घरात मराठी बोलली जाते. ‘ मायबोली ‘ नावाचे मराठी मासिक तेथे गेल्या ३५ वर्षांपासून चालवले जात आहे. तेथील मुलांचे शिक्षण हिब्रू भाषेत होत असल्याने ते हिब्रू भाषा चांगल्या प्रकारे लिहू, वाचू आणि बोलू शकतात. मराठी बोलणे आणि वाचणे त्यांना कठीण जाते. म्हणून या मासिकात हिब्रू भाषेतील सुद्धा काही साहित्य अंतर्भूत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याचा उद्देश हा की हिब्रू वाचता वाचता त्या मुलांचे लक्ष मराठीकडे जावे. मराठी साहित्याचे त्यांनी वाचन करावे, मराठीची गोडी त्यांच्यात निर्माण व्हावी.

५० च्या दशकात तेथे गेलेल्या काही ज्यूंनी तेथे चांगली वागणूक मिळत नसल्याने भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पं नेहरूंनी लगेच विमान पाठवून शेकडो ज्यूंना भारतात परत आणले. हे लोक आज भारतीय संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. त्यांची आडनांवेही अस्सल भारतीय आहेत. त्यांचं हे भारतावरचं प्रेम आणि भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ कदापिही तुटणे शक्य नाही. सिनेगॉग हे त्यांचे प्रार्थनास्थळ. दिल्लीतील सिनेगॉगचे धर्मगुरू इझिकल इसहाक मळेकर म्हणतात. ” इस्रायल आमच्या हृदयात आहे ; पण मराठी आमच्या रक्तात आहे. या जगाच्या पाठीवर भारतासारखा दुसरा देश नाही. सहनशीलता, वसुधैव कुटुंबकम , अतिथी देवो भव आणि विश्वची माझे घर असं मानणारा कोणता देश या पृथ्वीतलावर असेल तर तो फक्त भारत होय. ” ( संदर्भ दै पुण्यनगरी दि २/३/२०२० )

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares