श्री संदीप काळे

? विविधा ?

☆ “गाव बदलाचा ‘पाडोळी’ प्रयोग…” ☆ श्री संदीप काळे ☆

धाराशिवमध्ये ‘फॅमिली गाईड’च्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपवून मी आता लातूरकडे निघत होतो. तितक्यात ज्येष्ठ पत्रकार, माझे मित्र योगेंद्र दोरकर (नाना) आले. सकाळपासून मी नाना यांची वाट पाहत होतो. चहापान झाल्यावर नाना मला म्हणाले, ‘‘मी मुंबईवरून माझे मित्र शेषराव रावसाहेब टेकाळे यांनी सुरू केलेला प्रोजेक्ट बघायला आलोय. महावितरणमध्ये ते इंजिनिअर होते. आता ते सेवानिवृत्त झालेत. त्यांनी त्यांच्या गावी सुरू केलेल्या ‘मागे वळून पाहताना’ या उपक्रमाला खास भेट देण्यासाठी मी आलोय. तो उपक्रम समजून घेऊन मलाही माझ्या गावात तसा उपक्रम सुरू करायचा आहे.’’

टेकाळे यांनी सुरू केलेला तो उपक्रम नेमका काय आहे? तो कशासाठी सुरू केला? त्याचे स्वरूप नेमके काय आहे, हे सगळे मी दोरकर नाना यांच्याकडून समजून घेत होतो. खरं तर मलाही तो उपक्रम पाहण्याची उत्सुकता लागली होती. आम्ही रस्त्याने निघालो. काही वेळामध्येच लातूर-बार्शी रोडवर असलेल्या ‘पाडोळी’ या गावात आम्ही पोहोचलो.

टेकाळे आमची वाटच पाहत होते. त्या उपक्रमाच्या ठिकाणी खूप प्रसन्न वाटत होते. लहान मुलांसाठी इंग्रजी शाळा, मुलांना कुस्ती, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग, तरुणांची स्पर्धा परीक्षा, महिला बचत गटाचे प्रशिक्षण हे सारे काही तिथे सुरू होते. समोर भारत मातेचे मंदिर होते. टेकाळे म्हणाले, ‘‘चला अगोदर भारत मातेचे पूजन करू या. मग तुम्हाला मी सर्व प्रोजेक्ट दाखवतो.’’

दर्शन घेऊन आम्ही तो सारा प्रोजेक्ट पाहत होतो. ती कल्पना जबरदस्त होती, तिथे होणारी सेवा अगदी निःस्वार्थपणे होती. ते पाहताना वाटत होते, आपण हे सर्व आपल्या गावी करावे. लहान मुले, महिला, तरुण, शेतकरी, वृद्ध माणसांसाठी एकाच ठिकाणी सर्वकाही शिकण्यासाठी, मनोरंजनासाठी, माहितीसाठी, नवीन स्वप्न पाहण्यासाठी जे जे लागणार होते, ते ते सर्व काही तेथे होते.

ही संकल्पना, हा उपक्रम नेमका काय आहे. हे सारे आम्ही टेकाळे यांच्याकडून समजून घेतले. जे गावाशी संबंधित आहेत, ज्यांनी गाव सोडून बाहेर आपल्या मेहनतीमधून साम्राज्य उभे केले, त्या, गावाशी नाळ जोडलेली असणाऱ्या प्रत्येकाला कुठे ना कुठे वाटत असते की आपण आता खूप मोठे झालो. आता आपण आपल्या गावासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या मातीसाठी काहीतरी केले पाहिजे. त्या प्रत्येकासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे एक उतम उदाहरण होते. तो प्रोजेक्ट पाहण्यासाठी दोरकर नाना यांच्यासारखे अनेक जण आले होते.

आम्ही प्रोजेक्ट पाहत होतो. तितक्यात आमची भेट विजय पाठक यांच्याशी झाली. पाठक रत्नागिरी जिल्ह्यातील होते. पाठक डीवायएसपी म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना त्यांच्या गावासाठी काहीतरी करायचे होते. यासाठी त्यांनी टेकाळे बंधू यांच्या पाडोळी येथील ‘मागे वळून पहा’ या उपक्रमास भेट दिली. भेटीमध्ये पाठक म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांनी आयुष्यभर गावाची पूजेच्या माध्यमातून सेवा केली. त्यांचीही इच्छा होती, गावासाठी काहीतरी करावे. आता हा उपक्रम मी माझ्या गावात सुरू करणार आहे.’’

मी ‘व्हिजिटर बुक’ पाहत होतो. तिथे रोज हा उपक्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मी, दोरकर नाना, टेकाळे, त्यांचे भाऊ अशी आमची गप्पांची मैफल रंगली. ज्याला आपल्या माणसांविषयी, मातीविषयी आत्मियता असते. तेच या स्वरूपाचा उपक्रम राबवू शकतात हे दिसत होते.

पाडोळी जेमतेम दोन-अडीच हजार लोकसंख्या असलेले गाव. पाडोळीच्या आसपास अशीच छोटी-छोटी बारा-पंधरा गावे असतील. पाडोळी, पिंपरीसह ही सर्व गावे या प्रोजेक्टचा भाग होती. राज्यातल्या कानाकोपऱ्यामधून या उपक्रमाला आपलेसे करणाऱ्यांची संख्याही खूप होती.

वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रचंड प्रगती करणाऱ्या पाच भावांनी ठरवले, आपण आपल्या गावासाठी चिरंतन टिकणारे काहीतरी करायचे‌ त्यांनी मनाशी हा चंग बांधला होता. जनक टेकाळे हे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम करायचे. तरुणाईला नेमके काय द्यायचे म्हणजे ते बुद्धीने मोठे होतील हे ठरवून त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केले.

सूर्यकांत टेकाळे, रमाकांत टेकाळे, जनक टेकाळे, शेषराव टेकाळे, शशिकांत टेकाळे हे पाच भाऊ, या पाच भावांमध्ये जनक आणि शेषराव हे दोघेजण शासकीय नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचे. या दोघांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमावले. आई-वडिलांना अपेक्षित असणाऱ्या कुटुंबासाठीचे कर्तव्यही पार पाडले.

आपल्या गावासह पंचक्रोशीत असणाऱ्या सर्व गावांसाठी आपण पाठीराखा बनून काम करायचे या भावनेतून त्यांनी ‘किसान प्रतिष्ठान’ची स्थापना केली. ‘किसान प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी शहर आणि गावामधली पूर्णतः दरी कमी करायचे काम केले. कोणाची मदत न घेता पदरमोड करून या कामामधून हजारो शेतकरी आधुनिक शेतीकडे वळवले. युवक गावातून शहराकडे जाण्यासाठी स्वप्न पाहू लागले. सरकारी मानसिकतेमध्ये अडकलेली अनेक कामे तातडीने मार्गी लागू लागली.

या प्रोजेक्टच्या कामाची १९९७ ला सुरुवात झाली. पिंपरीला टेकाळे बंधूंच्या आई केवळाबाईंच्या नावाने जमीन होती. ती जमीन या उपक्रमासाठी कामाला आली. तिथे भारत मातेचे मंदिर उभारले गेले. ज्या भारत मातेसमोर प्रत्येक जाती धर्मातला माणूस येऊन हात जोडत नतमस्तक व्हायचा. तिथे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने वाचनालय सुरू झाले. आज त्या वाचनालयात चार हजार पुस्तके आहेत.

लोकांसाठी काहीतरी करायचे एवढ्यापुरते आता हे काम मर्यादित राहिलेले नव्हते, तर बेसिक लागणाऱ्या इंग्रजी मीडियमच्या शाळेपासून ते यूपीएससीच्या शिकवणीपर्यंतचा सगळा मेळ एकाच ठिकाणी बसवला गेला. ‘एव्हरेस्ट’ इंग्रजी स्कूलमध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा इंग्रजी भाषेची कास धरू लागला. ध्यानगृह, शिशुगृह, घोड्यावर बसण्यापासून ते गाडी चालवण्यापर्यंत सगळे विषय एकाच ठिकाणी शिकवणे सुरू होते.

स्वच्छता अभियानामध्ये पाडोळी गाव पहिले आले. असे अनेक सुखद धक्के या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या अनेक गावांना मिळू लागले. पाहता पाहता पंचक्रोशीत, जिल्हा आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या उपक्रमाची माहिती पोहोचली. लोक पाहायला येऊ लागले. ‘मी माझ्या गावासाठी मागे वळून पाहिले पाहिजे’ मी माझ्या गावातल्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, ही मनामध्ये असलेली छोटीशी इच्छा हा प्रयोग जाऊन पाहिल्यावर विशाल रूप धारण करू लागते.

आम्ही प्रोजेक्टवर सगळीकडे फेरफटका मारत होतो. टेकाळे यांच्या आई केवळाबाई वय वर्षे ९२. त्यांच्या मुलाविषयी, तिथे झालेल्या कामाविषयी अभिमानाने सांगत होत्या. “गावकुसात असणाऱ्या बाईच्या आयुष्यात चूल आणि मूल या पलीकडे काहीही नसते. पण माझ्या मुलांनी दाखवून दिले, गावातली मुलगी, महिला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन तिचे कौशल्य दाखवू शकते. अभ्यासामध्ये हुशार असलेली मुलगी परदेशात जाऊन करिअर करू शकते. ज्या महिलेला घरच्या घरी चटणी बनवता येते ती जगातल्या बाजारपेठेत तिची चटणी विकू शकते. हे सगळे पाहायला पोराचा बाप पाहिजे होता, तो बिचारा खूप लवकर गेला,” असे म्हणत टेकाळे यांच्या आई चष्मा काढून अश्रूने भरलेले डोळे पुसत होत्या.

जनक आणि शेषराव या दोन भावांनी मिळून या कामाला प्रचंड गती दिली होती. हे दोघे जण शासकीय अधिकारी होते. आता सेवानिवृत्तीनंतर या दोघांनाही प्रचंड वेळ मिळतो, ज्या वेळेमध्ये त्यांनी तिथल्या कामाला अधिक गती दिली आहे.

जनक मला सांगत होते, प्रत्येकाला सतत वाटत असते, आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे. सुरुवात काय करायची आणि सुरुवात केल्यानंतर त्याला गती कशी द्यायची, हा विषय होताच होता. आम्ही सुरुवातही केली आणि त्याला गतीही मिळवून प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो शेतकरी आणि उद्योगाच्या प्रशिक्षणातून जेव्हा शेकडो युवक कामाला लागले. तेव्हा कळले की आपले काम किती मोठे झाले.

शेषराव टेकाळे (9594935546)  म्हणाले, ‘‘आमच्या वडिलांना सामाजिक आस्था जबरदस्त होती. लोकसेवा करायची तर त्याचा इतिहास झाला पाहिजे, हे ते सातत्याने सांगायचे. त्यातून मग आम्हाला प्रेरणा मिळाली.’’

मी, दोरकर नाना, टेकाळे बंधू, त्यांची आई, आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होतो. तिथल्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मुलांशी, महिलांशी, माणसांशी आम्ही बोलत होतो, ती माणसे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून खूप समृद्ध झाल्याचे जाणवत होते. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या स्वयंपाकाचा मेनू आमच्यासमोर आला. जेवण झाले. आम्ही सर्वांचाच निरोप घेऊन निघालो. आईने माझ्या गालावर हात फिरवून कडकड बोट मोडले. “पुन्हा लवकर या भेटायला”, असा आग्रहही धरला.

आम्ही रस्त्याला लागलो. मी, दोरकर नाना गाडीमध्ये चर्चा करत होतो. जिथे आत्मियता आणि निःस्वार्थीपणा असतो तिथल्या कामाला चार चांद लागतात. असेच काम टेकाळे बंधूंनी त्यांच्या गावामध्ये उभे केले होते. केवळ पाडोळी, पिंपरी ही दोन गावे नाही तर शेकडो गावं या कामाचा आदर्श घेऊन कामाला लागले होते. जे हात गावातल्या मातीमध्ये मिसळून सुगंधित झाले, त्यांनी शहरांमध्ये त्या सुगंधातून कीर्ती मिळवली. अशा प्रत्येक हातालाही गावाच्या मातीची ओढ अजून निश्चितपणे आहे. आता खूप झाले, आपण ते मागे वळून पाहू. चांगले काम करण्यासाठी पुढाकार घेऊ.

तुम्हालाही तुमच्या गावाची ओढ निश्चित असेल. तुम्हालाही वाटत असेल, आपण आपल्या गावासाठी ‘मागे वळून पाहिले पाहिजे’, पण सुरुवात कशी करायची हे पाहायला एकदा तुम्हाला पाडोळीला नक्की जावे लागेल. बरोबर ना…!

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments