मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

स्वतःची सहीसुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची उगीच तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा..

A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा..

मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ..

आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा..

व्हाट्सऍप वर लिहिताना केवळ ‘कंटाळा येतो म्हणून’ विचित्र मिंग्लिश भाषा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना धन्य धन्य शुभेच्छा..

फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणाऱ्या किंवा टीसी (‘काळजी घे’ चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा…

टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर झुरळ पालींचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय?.. त्यांनाही आज शुभेच्छा..

सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यांत, बँकेत किंवा इतर स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना, ‘मराठीचा किमान एका संधीसाठीही’ वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा…

वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक – चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकाशी संबंध नसणाऱ्या, तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या, पण इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ करणाऱ्या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा..

फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा…

मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा… 

जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित नसाल, तरच हा संदेश पुढे पाठवा अन्यथा वाचून सोडून द्या ;पण केवळ औपचारिकता म्हणून किंवा लेखन आवडले म्हणून किंवा आपणही मराठीवर प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी, हा शुभेच्छा संदेश पुढे पाठवू नका.

कवी – अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वांग्याचं भरीत’… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘वांग्याचं भरीत‘… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

माझा स्वयंपाक चालू होता. इतक्यात लेक धावत आली, “आई, मधूमावशीचा फोन आलाय”.

मी कणीक मळत होते, लेकीला म्हणाले,” टाक स्पिकरवर.” कामाचं बोलून झाल्यावर गाडी आपोआप जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळली. “आज स्वयंपाक काय केलास?”

मी म्हणाले, “भरीत.”

मैत्रीण म्हणाली, “मी पण आज भरीतच केलंय आणि श्रुतीकडेपण आज भरीत.”  यावर आम्ही दणदणीत हसलो.

इतका वेळ मुलगी माझा स्पिकरवर टाकलेला फोन हातात घेऊन उभी होती. ती, काय विचित्र बायका आहेत, कशावर पण हसतात, अशा अर्थी चेहरा करून बघत होती. “टाटा, बाय बाय, भेटू, चल ठेवते, चल ठेऊ आता,” असं साडेनऊ वेळा एकमेकींना म्हणून मग तिने फोन ठेवला.

फोन ठेवल्यावर मुलीने अपेक्षित असा चेहरा करून विचारलंच, “आई, तुम्ही कशावर पण हसता का ग? भरीत केलंय, यावर काय इतकं हसायचं?”

“आमचं सिक्रेट आहे ते…”

सिक्रेट म्हणाल्यावर मुलीचे कान  सशाइतके लांब झाले. “सांग, सांग” असा तिचा मंत्र दहा वेळा म्हणून झाल्यावर, “भांडी लाव. मग सांगते”, “जरा कोथिंबीर निवड. मग सांगते” असा तिचा जरा अंत पाहिला.

आता ती माझी मुलगी असली तरी तिच्यात सहन शक्ती कमीच. “नको मला ते सिक्रेट, उगाच सगळी काम करून घेत आहेस माझ्याकडून.” ती सटकून जायला लागली. म्हणून मी पण जरा सबुरीने घेतलं.

“ऐक  ग बायडे, माझी सासू म्हणजे तुझी आज्जी एकदम कमाल बाई. खूप शांत, समजूतदार आणि शांतपणे विचार करणं तर त्यांच्या कडून शिकावं . पण या गुणांच क्रेडिट त्या त्यांच्या सासरे बुवांना देत.

अनेक आघात आजीनी लहान वयात सोसले होते. आई खूप लहान वयात गेली. त्यामुळे मुळात त्या खूप हळव्या होत्या. मग एकत्र कुटुंबात लग्न झालं. घरात वयाने सगळ्यात लहान. त्यामुळे सतत सगळ्यांचे सल्ले ऐकावे लागायचे. घरात मोठ्या जावा, आत्तेसासूबाई, आजेसासूबाई काहीतरी चुका काढून कान उपटायला तयार असायच्या. या वयाने आणि मानाने लहान. त्यामुळे आजकाल तुम्ही मुलं जसं फटाफट बोलता तसं दुरुत्तर करायच्या नाहीत.

मग सगळी कामं झाली की त्या मागच्या अंगणात तुळशीपाशी रडत बसायच्या.

सासरेबुवांनी दोन तीन वेळा हे पाहिलं. एक दिवस त्यांना सासरेबुवांनी खोलीत बोलवून विचारलं, “काही होतंय का? तुम्ही का रडत असता. घरची आठवण येते का… कुणी काही बोलतं का… आमचे चिरंजीव त्रास देतात का?”

पण आज्जी मान खाली घालून उभ्या.सासरे बुवांनी वडिलांच्या मायेने डोक्यावरून हात फिरवला, तेव्हा आजींना एकदम रडू कोसळलं .

“मग आत्तेसासूबाई, मोठ्या जाऊबाई कशा ओरडतात! त्या पण कधी कधी चुका करतात, पण मलाच बोलतात.” हे बालसुलभ भावनेने सांगून टाकलं.

सासरेबुवा हसले आणि म्हणाले, “आज मी सांगतो ते मनापासून ऐका. जपा. खूण गाठ बांधून घ्या. आयुष्यात आनंदी रहाल.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला सगळं कळतं, सगळ येतं, आपण शहाणे, बाकी सगळे पौडावरचे वेडे असाच समज असणारी अनेक माणसे असतात. बरं.ही माणसं वयाने मोठी असतात. जवळच्या नात्याची असतात.त्यामुळे काही बोलायची सोय नसते. कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. पण अशा अतिशहाण्या लोकांना वाटतं, आपण म्हणजे सर्वगुणसंपन्नतेचा महामेरू आहोत. बरं. ही माणसं चुकली, तर यावर ते स्पष्टीकरण देऊन आपण कसे बरोबरच होतो, समोरचाच चुकला हे पटवून देतात. पण हे स्वारस्य वयाने लहान माणसाला नसते. पण यामुळे नात्यात ताण येतो, मोकळेपणा जाऊन, एक प्रकारे दबून जाऊन नात्यात, वागण्यात अलिप्तता येऊ लागते. ज्याला सतत सल्ले ही माणसं देत असतात, त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो. मन हळवं होऊन जातं. भीती वाटत राहते – आपण चुकलो तर? आपल्याला जमले नाही तर?

काय?असंच होतंय का ?” आजीला सासरे बुवांनी विचारलं.

सासूबाईंच्या अगदी मनातलं त्यांच्या सासरेबुवांनी ओळखलं होतं.

“पण मग वागायचं कसं अशावेळी?” तुझ्या आजींनी घाबरत विचारलं.

“हे बघा, खूप त्रास करून घ्यायचा नाही. त्या दिवशी जेवणात सरळ भरीत करायचं.”

आजीला काही उमगलं नाही.

“म्हणजे?… “

“कुणी तरी आपल्याला दुखावलं, आपल्याशी वाईट, चुकीचं वागलं की आपल्या मनाला त्रास होतो.. मनात विचारांचे द्वंद्व सुरू होतं… हे विचार कुणाशी बोलून मन शांत होणार असेल तर ठीक, पण काही वेळा या गोष्टी ऐकतील असे उत्तम कान आणि सुदृढ मन आपल्यापाशी नसतं. या अस्वस्थ विचारांचा निचरा तर व्हायला हवा. हो ना? नाहीतर त्याची मोठी जखम मन सांभाळून ठेवतं .”

आजीचं वय लहान. मग तिला समजेल, असं त्यांना समजवायचं होतं.

“ऐका सूनबाई, हे आपल्या दोघांचं गुपित असेल हा. कुणाला बोलायचं नाही.

एक मोठं वांगं घ्यायचं. ते वांगे म्हणजे असं समजायचं, ज्या माणसांनी तुम्हाला दुखावलं आहे, ती व्यक्ती.त्याला भाजायला ठेवण्याआधी हळुवार तेल लावायचं.हे हळुवार तेल लावणं म्हणजे तुम्ही त्यांची काढलेली समजूत किंवा तुम्ही तुमच्या वागण्याची दिलेली सफाई असं म्हणू.वांग्याचं चुलीवर भाजणं म्हणजे तुम्ही सफाई दिली म्हणून उठलेला फुगाटा (म्हणजे आलेला राग). आता हे भाजलेलं वांग घ्यायचं आणि त्याला सोलून चांगलं रगडून घ्यायचं. मनात आलेला सगळा राग ते वांगे रगडताना काढायचा. बघा. मन आपोआप शांत वाटेल. आणि मग, निर्मळ मनाने भरीत करायचं.कारण जेवणात आपल्या चांगल्या वाईट भावना उतरत असतात. त्यामुळे  भरीत करताना मन शांत, आनंदी ठेवूनच करायचं.”

आजींना ही कल्पना खूप आवडली होती.  पुढे हे सासरेबुवांचं गणित योग्य वेळी वापरलं. त्याचा अतिरेक होऊ दिला नाही.

जेवणात भरीत झालं की सासरेबुवा हळूच हसायचे आज्जी कडे बघून. दोघांचं सिक्रेट होतं ते.

 “एकदा माझ्या सगळ्या  मैत्रिणी आपल्या घरी आल्या होत्या, तेव्हा श्रुती मावशी तिच्या सासूबाईंच्या वागण्यामुळे दुखावली गेली होती. त्या सतत तिच्या चुका काढून तिला बोलायच्या… हे ती आम्हाला सांगताना तुझ्या आजींनी ऐकलं आणि आम्हाला ही भरीत कथा सांगितली.”

आजी लहान होत्या. त्यांचं मन दुखवायचं नव्हतं , घरातलं वातावरण बिघडवायचं नव्हतं आणि आजींच्या मनावर फुंकर पण घालायची होती. हे सगळं आजींच्या सासरेबुवांनी खूप छान समजावलं. त्याला रोजच्या व्यवहारातील गोष्टीची उपमा दिली.

आजींनी ही गोष्ट सांगितल्यावर आम्हीसुद्धा भरीत थेरपीचे फॉलोअर्स झालो.”

“Wow.. हे भारी आहे की”, लेक किंचाळली..

“आई, म्हणजे आत्ता गॅसवर जे वांगे भाजायला ठेवलं आहेस तो बाबांवरचा राग आहे वाटतं? त्याला आता रगडून बाहेर काढायचा आहे?”

“गप ग. पळ तू आता इथून.”

मी मस्त शांत मनाने भरीत केले.. जेवायला वाढले.. तेव्हा लेक आणि तिचा बाबा.. गालातल्या गालात हसत होते.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मायमराठी…” – कवयित्री : सुश्री दीपाली ठाकूर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मायमराठी…” – कवयित्री : सुश्री दीपाली ठाकूर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

(वृत्त – भुजंगप्रयात)

नसे घेतला मी तिच्या जन्म पोटी,

नसे देवकी माय माझी जरी ती,

जिचे स्तन्य सांभाळते भान माझे,

यशोदाच ती माय माझी मराठी ॥

*

तिचा ‘छंद’ माझ्या नसांतून वाहे,

तिचे ‘वृत्त’ श्वासांतुनी खेळताहे,

जरी भंगण्याचा असे शाप देहा,

‘अभंगातुनी’ ती चिरंजीव आहे ॥

*

तिची एक ‛ओवी’ मलाही स्फुरावी,

कधी ‛शाहिरी’ लेखणीही स्रवावी ,

तिचे ओज शब्दांत ऐसे भरावे,

सुबुद्धी जनां ‛भारुडातून’ व्हावी ॥

*

दिसे बाण ‛मात्रेत’ तो राघवाचा,

निळा सूर ‛कान्यातला’ बासरीचा, 

‛उकारात’ डोले तुझी सोंड बाप्पा,

‛अनुस्वार’ भाळी टिळा विठ्ठलाचा ॥

*

तिची ‛अक्षरे’ ईश्वरी मांदियाळी,

अरूपास साकारती भोवताली,

तिचा स्पर्श तेजाळता ‛वैखरीला’,

युगांची मिटे काजळी घोर काळी ॥

कवयित्री : सुश्री दीपाली ठाकूर

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जोडणारा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “जोडणारा” – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एका गावात एक शेतकरी राहत होता.रोज सकाळी तो झऱ्यातून स्वच्छ पाणी आणण्यासाठी दोन मोठ्या घागरी घेऊन जात असे. तो त्या  खांबाला बांधून खांद्याच्या दोन्ही बाजूला लटकवत असे .त्यापैकी एकीला कुठेतरी तडा गेला होता. ती फुटलेली होती आणि दुसरी धड,परिपूर्ण होती .अशाप्रकारे तो दररोज घरी पोहोचेपर्यंत शेतकऱ्याकडे फक्त दीड घागरी पाणी उरत असे .

उजव्या घागरीला अभिमान होता की ती सर्व पाणी घरी आणते आणि तिच्यात कोणतीही कमतरता नाही. दुसरीकडे,फुटलेली घागर घरापर्यंत फक्त अर्धेच पाणी पोहोचवू शकत होती  आणि शेतकऱ्यांची मेहनत व्यर्थ, वाया जात होती.या सगळ्याचा विचार करून ती फुटलेली घागर खूप व्यथित व्हायची. एके दिवशी तिला ते सहन झाले नाही.ती शेतकऱ्याला म्हणाली, “मला माझी लाज वाटते. मला तुमची माफी मागायची आहे.”

शेतकऱ्याने विचारले,”का? तुला कशाची लाज वाटते?”

तुटलेली घागर म्हणाली , “कदाचित तुम्हाला माहीत नसेल; पण मी एका ठिकाणी फुटले आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून मी जेवढे पाणी घरी आणायला हवे होते,त्यातील निम्मेच पाणी आणू शकले आहे.ही माझ्यातली मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे तुमची मेहनत वाया गेली आहे.”

घागरीबद्दल ऐकून शेतकरी थोडासा दुःखी झाला आणि म्हणाला,”काही हरकत नाही. आज परत येताना तू वाटेत पडलेली सुंदर फुले पाहावीस , अशी माझी इच्छाआहे.” तुटलेल्या घागरीने तसे केले.तिला वाटेत सुंदर फुले दिसली.असे केल्याने तिचे दुःख काही प्रमाणात कमी झाले; पण घरी पोहोचेपर्यंत अर्धे पाणी सांडले होते.निराश होऊन ती शेतकऱ्याची माफी मागू लागली .

शेतकरी म्हणाला,”कदाचित तुझ्या लक्षात आलं  नाही.वाटेत सगळी फुलं होती.ती फक्त तुझ्या बाजूने होती . घागरीच्या उजव्या बाजूला एकही फूल नव्हते. कारण तुझ्यातला दोष मला नेहमीच माहीत होता आणि मी त्याचा फायदा घेतला.तुझ्या दिशेच्या वाटेवर मी रंगीबेरंगी फुलांच्या बिया पेरल्या होत्या.

तू त्यांना दररोज थोडे थोडे पाणी पाजलेस आणि संपूर्ण मार्ग इतका सुंदर बनवलास .आज तुझ्यामुळेच मी देवाला ही फुले अर्पण करू शकलो आणि माझे घर सुंदर करू शकलो.

जरा विचार कर, ‘तू जशी आहेस तशी नसतीस,तर मी हे सर्व करू शकलो असतो का?’

आपल्या प्रत्येकामध्ये काही उणिवा असतात,पण या उणिवा आपल्याला अद्वितीय बनवतात.म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच राहा.त्या शेतकऱ्याप्रमाणे आपणही सर्वांना तो जसा आहे, तसा स्वीकारला पाहिजे.त्याच्या चांगुलपणाकडे लक्ष दिले पाहिजे.जेव्हा आपण हे करू तेव्हा तुटलेली घागरही चांगल्या घागरीपेक्षा अधिक मौल्यवान होईल.

लेखक:अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हयातीचा दाखला…” – लेखक : श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “हयातीचा दाखला…” – लेखक : श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

काल सकाळी अगदी बँक उघडल्याउघडल्याच बँकेत जाऊन, नियमांनुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून, मी जिवंत असल्याचं सिद्ध करून आलो.वरचं आमंत्रण मध्येच आलं नाही तर पुढचं वर्षभर पेन्शन सुरळीतपणे मिळावं म्हणून. मनात आलं, जवळजवळ चाळीस वर्षं

नोकरी केली; पगार घेतला आता पुढची चाळीस वर्षं पेन्शन खात जगायला मिळालं तर…..!

एक महत्त्वाचं काम हातावेगळं केल्याच्या समाधानात बँकेतून बाहेर पडलो आणि बाजूच्याच टपरीवरच्या ताज्याताज्या भज्यांचा घमघमाट नाकाशी दरवळला. जीभ चाळवली, पावलं थबकली. गरमागरम कांदा भजी आणि मग कडक चहा. सुख म्हणजे आणखी काय असतं, मनात आलं. ऑर्डर देणार तोच… तोच कालपरवाच व्हॉट्सअपवर वाचलेला कुणा डाएटीशीयनचा लेख आठवला…. वयानुसार बीपी-कोलेस्टेरॉल, शुगर किती असावं, कुठल्या वयात काय खावं-काय खाऊ नये, काय करावं-काय करू नये वगैरे वगैरे. हे सगळं पाळणारा शतायुषी होऊ शकतो, असंही त्यात लिहिलेलं आठवलं. शंभर वर्षं पेन्शन खायचं असेल तर आत्ता भजी खाऊन कसं चालेल, मनात आलं. एव्हढा तरी संयम पाळायलाच हवा, स्वतःलाच बजावलं आणि मागं फिरलो.

येताना वाटेवरच्या भाजीमार्केटमधनं मोड आलेली कडधान्यं आणि फळं घेतली. त्या डाएटीशीयनच्या म्हणण्यानुसार माझा आहार आता असाच असायला हवा होता. पुढची ३७ वर्षं आता हेच खायचं. निरामय जीवनाचा मार्ग आता आपल्याला सापडलाय, या आनंदात घराकडे येणारा मार्ग कधी संपला कळलंही नाही.

“पटापट आंघोळ, देवपूजा आटपा हं, आज तुमच्या आवडीची झुणकाभाकर, लसणाची चटणी…” बायकोचं वाक्य पुरं व्हायच्या आतच तिच्या हातात कडधान्य, फळं देत म्हटलं, “सखे, करूया फलाहार, नको झुणकाभाकर अन् जगूया आपण वर्षे शंभर.” काही बोलली नाही ती त्यावर, अवाक् का काय म्हणतात, तशी झाली असणार. तिनं झुणकाभाकरच खाल्ली. वर “नाही जगायचे मज फुकाचे वर्षे शंभर, चवदार चविष्ट खाऊनी मी जगणार मस्त कलंदर” म्हणाली. जेवल्यावर तिखटमीठ लावलेली पेरूची फोड खातखात, “मला नाही अळणी खायला आणि जगायला आवडत,” असंही म्हणाली.

“मी नाही येणार,” मी त्यांना म्हणजे कट्टयावरच्या माझ्या मित्रांना म्हटलं. वीकेंडला कुठल्याश्या रिसॉर्टवर जायचं ठरवत होते सारेजण.

खायचं -प्यायचं, गायचं- नाचायचं, हास्यविनोद – धमालमस्ती. पण मी “नाही” म्हटलं. शंभर वर्षं जगायचं तर असला बेबंदपणा करुन कसं चालेल? “तू आलंच पाहिजे” असा माझा फारच पिच्छा पुरवला त्यांनी, तेव्हा मग मी त्यांना माझा शंभर वर्षं जगण्याचा प्लॅन सांगितला, तर ते हसून कट्टयावरच गडबडा लोळले, म्हणाले, “च्युतिया आहेस साल्या. यातलं काही करणार नाहीस, खाणार-पिणार नाहीस तर मग शंभर वर्षं जगून करणार काय तू?” बँकेत लागण्यापूर्वीचे दिवस आठवले. नोकरीच्या शोधात असतांना दिलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं की मी असाच खजील होऊन समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांकडे बघत बसत असे.

“ऐकताय का, शेजारच्या जोशीवहिनी विचारत होत्या, चारधाम यात्रेला येताय का म्हणून. ते दोघं जातायत. एकमेकांना कंपनी होईल, ट्रिपही होईल आणि वर तीर्थयात्रेचं पुण्यही पदरी पडेल म्हणत होत्या. जाऊया ना?” रात्री बेडवर पडतापडता बायको विचारत होती. “छे, अजिबात नको. डोंगरदऱ्यांतून घोड्यावर बसून देवदर्शनाला जायचं म्हणजे केवढं रिस्की. च्यायला! घोड्याचा पाय घसरला तर वर जाऊन समोरासमोरच देवाचं दर्शन व्हायचं. त्यापेक्षा शंभर वर्षं पेन्शन घेत, देव्हाऱ्यातल्या देवाचं रोज दर्शन घेतलेलं बरं.” मी तिचा प्रस्ताव धुडकावून लावला. ती पुन्हा उठून बसली, म्हणाली, “शंभर वर्षं जगायचं, हे काय खूळ डोक्यात शिरलंय हो तुमच्या? आहे ते आयुष्य मजेत जगावं की माणसानं. पाडगांवकरांची कविता वाचली आहे ना तुम्ही … ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा!’ तिने अख्खी कविता ऐकवायच्या आत डोक्यावरनं पांघरूण घेऊन झोपल्याचं सोंग घेऊन मोकळा झालो.

“गुड मॉर्निंग मंडळी,” वरच्या मजल्यावरचे पाटीलकाका हातातलं नुकतंच उमललेलं टवटवीत जास्वंदाचं फूल बायकोच्या हातात देत सोफ्यावर विसावले.

बायकोनं दिलेल्या थालीपीठाचा तुकडा मोडत ते मला काही विचारणार, तोच बायको म्हणाली “ते नाही खायचे असलं काही. काल हयातीचा दाखला देऊन आल्यापासून शतायुषी व्हायचं खूळ शिरलंय त्यांच्या डोक्यात.”

“च्यामारी, काय करणार आहेस रे तू शंभर वर्षं जगून? म्हणजे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी जगायचं असेल इतकं, तर ठीक आहे. अदरवाईज हे नाही खाणार, ते नाही करणार, तिकडे नाही जाणार असं करत घरकोंबड्यासारखं शंभर वर्षं जगण्यात कसली मजा आहे? काही समजत नाही बुवा मला. एकविसाव्या वर्षीच समाधी घेणारे आपले ज्ञानोबा, पन्नासाव्या वर्षीच स्वर्गस्थ झालेले छत्रपती शिवाजी महाराज हे कुठे जगले होते शंभर वर्षं? पण ते काय करून गेले त्यांना मिळालेल्या आयुष्यात, हे वेगळं सांगायला नको. महर्षी कर्वे एकशे चार वर्षं जगले; पण स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी. तसं काही करणार आहेस का तू? वाटत तर नाही तसं – तुला काय आज ओळखतोय का मी? अरे आपण छोटी माणसं. म्हणूनच सांगतोय – माणसानं जिंदादिल रहावं नेहमी. खावं-प्यावं, हिंडावं-फिरावं, छंद जोपासावेत आणि हो, अडलेल्या नडलेल्यांना जमेल-झेपेल इतपत मदतही करावी. हा खराखुरा हयातीचा – तुझ्यातला माणूस जिवंत असल्याचा दाखला. काल बँकेत जाऊन करून आलास ती तू हयात असल्याची कागदोपत्री नोंद.”

दरवाज्यापर्यंत पोचलेले पाटीलकाका परत वळले आणि राजेश खन्नाच्या स्टायलीत म्हणाले … “बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए,लंबी नहीं….”

मनापासून हसलो. काकांनी दिलेलं जास्वंदाचं फूल आता जरा जास्तच टवटवीत दिसत होतं.

थालीपीठ खातखात “जिंदगी एक सफर है सुहाना” गुणगुणलो.

लेखक :श्री.मिलिंद पाध्ये

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

आयुष्य म्हटलं की कष्ट आले, त्रास आला ,

मनस्ताप आला ,भोग आले आणि जीव जाई,पर्यंत काम आलं.मग ते घरचं असो नाहीतर दारचं.

बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात.

75 वर्षाच्या म्हातारीने पण भाजीतरी चिरुन द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते….

ही सत्य परिस्थिती आहे…..

आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे रहाणारच……

त्यामुळे ही जी चार भांडीकुंडी आपण आज नीटनेटकी करतो,ती मरेपर्यंत करावी लागणार.

ज्या किराण्याचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही करावा लागणार.

‘मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खूप शिकल्यावर त्यांच्याकडे खूप पैसे येतील. मग माझे कष्ट कमी होतील.’ ही खोटी स्वप्नं आहेत.

मुलं , मुली कितीही श्रीमंत झाले तरी,”आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तूच बनव,”असं म्हटलं की,झालं पुन्हा सगळं चक्र चालू.

 

आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या अभिमन्यू .

 

पण..पण ..जर हे असंच राहणार असेल,जर परिस्थिती बदलू शकत नसेल, तर मग काय रडत बसायचं का?

तर नाही.

परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं.

 

मी हे स्वीकारलंय. खूप अंतरंगातून आणि आनंदाने.

 

माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते. खूप ऊर्जा आणि ऊर्मीने भरलेली.

 

सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते आणि रात्री दहा वाजताही.

आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत.दुसरा दिवस हा नवाच असतो.

काहीच नाही लागत हो,

हे सगळं करायला .

रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा.

छान आपल्या छोट्याश्या टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या.आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा.

आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या.

इतकं भारी वाटतं ना!अहाहा!

सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा.

अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला,ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त आल्याचा चहा पित खिडकीबाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना,

की भारी वाटतंं!

 

रोज मस्त तयार व्हा.

आलटून पालटून स्वतःव र वेगवेगळे प्रयोग करत राहा.

कधी हे कानातले,कधी ते गळ्यातले.

कधी ड्रेस,कधी साडी.

कधी केस मोकळे.कधी बांधलेले.

कधी ही टिकली तर कधी ती.                                 

रोज नवनवीन साड्या. एक दिवस आड केस मोकळे सोडलेले.स्वतःला बदला. जगाला घेऊन काय करायचं आहे!दुनियासे हमें क्या लेना? तुम्ही कसेही रहा, जग बोंबलणारच.

सगळं ट्राय करत रहा.नवं नवं. नवं नवं.

रोज नवं.

रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजे.

 

स्वतःला बदललं की, आजूबाजूला आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल .तुमच्याही नकळत.

आणि तुम्हीच तुम्हाला हव्याहव्याशा वाटू लागाल.

 

मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे….

माझ्याबद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं की माझे कान आपोआप बंद होतात.काय माहीत काय झालंय त्या कानांना!

 

आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते.

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते.

 

जे जसं आहे,ते तसं स्वीकारते आणि पुढे चालत रहाते.

कुणी आलाच समोर की “आलास का बाबा?बरं झालं,” म्हणायचं.पुढे चालायचं.

अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची.

माहीत आहे मला.सोपं नाहीये.

पण मी तर स्विकारलं आहे.

आणि एकदम खूश आहे.

आणि म्हणूनच रोज म्हणते,

 

” एकाच या जन्मी जणू

फिरुनी नवी जन्मेन मी

हरवेन मी हरपेन मी

तरीही मला लाभेन मी”

लेखक :अज्ञात

 

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मध्यमवर्गीय!… – लेखिका :श्रीमती नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मध्यमवर्गीय!… – लेखिका :श्रीमती नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

मी मध्यम वर्गीय!

“नेहा ,  मी  आज दुपारी दादरला जाऊन येणारे…..” माझं  वाक्य पूर्ण व्हायच्या  आत नेहा म्हणाली, “आई, ओला,  उबेर किंवा टॅक्सीने  जा हं .. “

सोफ्यावर पेपर  वाचत बसलेला नवरा हसून  लगेच  म्हणाला,

“नेहा, ती मध्यमवर्गीय  आहे . ती  ट्रेन किंवा बसनेच जाणार.”

“अरे!साठी  उलटून गेली तरी ट्रेन, बसने फिरू शकते,  याचं  खरं  तर कौतुक करायला हवं  तुम्ही. माझी काटकसर  कसली बघता!” मीपण हसण्यावर  नेलं  ते .

“काहीतरी खायला करून ठेवीन .म्हणजे अथर्व शाळेतून  आल्यावर  त्याची पंचाईत नको व्हायला. “

“आई, अहो  एक दिवस आणेल की काही तरी पार्सल. बाबाही  एन्जॉय करतील. बर्गर किंवा  वडापाव . “

“नेहा , अबब! एवढाले  पैसे  खर्च करायचे ते जंक फूड खायला!तुझ्या मध्यमवर्गीय सासूला पटणार  का ? “नवऱ्याने  मला बोलायची संधी  नाहीच सोडली.

“बरं  चालेल. “असं  म्हणून मी  विषय संपवला.

मुलगा  त्याच्या बेडरूममध्ये अजूनही लॅपटॉपवर  काम करत होता.

“सुजित, आज ऑफिसला नाही जायचं?”

“अगं, आज गाडी गॅरेजमध्ये दिलीय. कुठे ते टॅक्सी शोधत  बसा?’वर्क फ्रॉम होम ‘करतोय.

बाय द वे,तू आज दादर ला कशासाठी जातेयस?”

आता याला ‘का जातेय’ हे सांगितलं,  तर परत माझ्या  मध्यमवर्गाचा  उद्धार  होईल. म्हणून मी  “काम आहे,” एवढंच  मोघम उत्तर दिलं.

पूर्वीच्या  आमच्या  दादरच्या  शेजारी मालतीकाकू, घराला हातभार लावायला , त्यांच्या  भावाने कोकणातून पाठवलेले पदार्थ  विकतात . दुकानातून  घ्यायचं, तर मी  त्यांच्या कडे जाऊन आणते.  तेवढीच त्या भावंडाना मदत .

पण हे आमच्या घरच्यांच्या पचनी पडणं  जरा कठीणच.

म्हणून मी  सुजितला काही बोलले नाही.

दुपारी गर्दीची वेळ टळून गेल्यामुळे  आरामात ट्रेनने दादर  ला गेले.

इकडतिकडची विचारपूस केली.  गप्पा टप्पा केल्या. आणि चहा पिऊन बस स्टॉप वर आले.

याच्यासाठी घे,  त्याच्यासाठी  घे (टिपिकल मध्यम वर्गीय!) असं करताना सामान अंमळ  जडच  झालं.

कष्ट  उपसायचे,  असा काही हव्यास नव्हता  माझा.

मी टॅक्सी करायचं ठरवलं .

नकळत स्टॉप वर उभ्या असलेल्या दोघी- तिघीना  विचारलं, “पार्ल्यापर्यंत जातेय. कोणाला वाटेत सोडू का? “

‘टिपिकल मध्यमवर्गीय!’ – हा मीच  मला टॉन्ट मारला बरं का.

अरे एवीतेवी  दोनशे रुपये खर्चच  करायचे तर एकटी साठी कशाला?नाही का?

माझं मलाच हसू आलं .

घरी जर  हे सांगितलं  तर सुजितचा तर स्फोटच  होईल. माझं  फुटकळ  समाज कार्य  कसं  अंगलट  येऊ शकतं,  याच्यावर  हिरीरीने चर्चा होईल .

‘काळ  बदललाय,   पण तरीही सतत अविश्वासाचे  चष्मे घालून का रे वावरता? चांगुलपणा अजूनही येतो अनुभवायला.’हे माझं  म्हणणं  मोडीत काढलं  जाईल  किंवा मध्यम वर्गीय विचारात  त्याची गणना  होईल .

हे मला माहीत होतं.

मी  घरी आले तर मस्त मॅकडॉनल्डच्या पार्सलवर तिघांनी ताव मारल्याची वर्दी ओट्यावरच्या  पसाऱ्याने  दिली.

सवयी नुसार  टेक अवेचे  कंटेनर  धुऊनपुसून   कपाटात ठेवले.

कामवाल्या  बाईंना , मावशींना, पदार्थ घालून द्यायला उपयोगी  पडतात. ‘टिपिकल  मध्यमवर्गीय’ वागणं.

सोफ्यावर जराशी टेकले. आणि मनात विचार आला –

‘मध्यमवर्ग ‘ हा  स्तर जरी  पैशाची   आवक  यावरून  पडला असेल तरी मध्यमवर्गियांचे  विचार,  वागणूक,  संस्कार  यात खूप श्रीमंती आहे.

आज पैशाची थोडी उब मिळाली,  सुबत्ता आली म्हणून हे संस्कार पाळायचे नाहीत हे कितपत  योग्य आहे?

चालत जातायेण्यासारखं  अंतर असेल ,  किंवा बस ट्रेननी  जाणं  सोयीचं  असेल तर परवडतंय  म्हणून टॅक्सीने जाणं  जर मला चैन वाटत  असेल तर त्यात  मध्यम वर्ग  कुठे आला? काटकसर कुठे आली? पैशाची नाहक उधळमाधळ  नको, ह्या  संस्काराची  जपणूक आहे यात.

सहजपणे  कोणाला  मदत करणं,

वस्तू जपून वापरणं,

आपुलकीने  कोणाशी  वागणं,

गरजा मर्यादित ठेवणं,

उच्च  राहणीमान ठेवूनही दिखाऊपणा न करणं

या वागण्याचा संबंध  आजची पिढी पैशाशी  का जोडू पहाते? हे वागणं  टिपिकल  मध्यमवर्गीय  म्हणून त्याची खिल्ली का  उडवते?

हे आकलनाच्यापलीकडे  आहे आणि न पटणारे आहे.

आजकालच्या  आत्मकेंद्रित  पिढीला या कशातही रस  वाटत नाही . 

एकमेकांच्या  संपर्कात  राहणं, जुडलेलं  राहणं, ‘थेट’ भेटणं  हे  मध्यम वर्गीय  का वाटावं  या पिढीला? “आई, आजकाल असं  नाही आवडत  लोकांना. त्यांना त्यांची अशी स्पेस  हवी असते” असं  म्हणत आपसातलं  अंतर वाढवणं, हे   उच्चभ्रू ?माझ्या मध्यमवर्गीय विचारात न बसणारं  आहे हे.

आपल्याला हवं  तसं  वागायची  मोकळीक  आहे ना आपल्याला? मग मनातल्या मनात तरी कशाला चर्चा करायची?  मी  मध्यमवर्गीय आहे  याचा मला  अभिमान आहे ना. मग झालं की!

असं  म्हणून सगळ्यांसाठी फक्कड  चहा करायला स्वयंपाक  घरात  घुसले.

लेखिका :श्रीमती नीलिमा जोशी

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेरपण… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ माहेरपण… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

*

एकदा नवऱ्याने तिला सहज विचारले,

बरेच दिवसात माहेरी गेली नाहीस ?

*

हल्ली नसतं का तुझ माहेरपण…?

आता जाऊन, परत नसतं का जगायचे तुला रम्य ते बालपण…?

*

पूर्वी जरा काही झाले की, माहेरची आठवण यायची,

अन् काम करता करता डोळ्यातून आसवं गळायची…

*

यावर तिचे मार्मिक अन् मनाला भिडणारे उत्तर

ऐकताच क्षणार्धात तो झाला निरूत्तर…

*

ताई ताई म्हणणाऱ्या बहिणी, गेल्या सासरी त्यांच्या घरी…

वहिनी तशी चांगली पण, होत नाही त्यांची बरोबरी…

*

सागरगोटे खेळणाऱ्या मैत्रिणी लग्न होऊन गेल्या परगावी,

कुणाशी हितगुज करणार अन् सांगणार कल्पना भावी…

*

भाचरंही मोठी झाली आपापल्या विश्वात रममाण झाली,

अवतीभवती नाचत नाहीत आत्या आली आत्या आली…

*

आईच्या गळ्यात पडून जे काही सांगायचं असतं,

तिला कमी ऐकू येतं म्हणून सांगताच येत नसतं…

*

बाबांची नजरही अधू झालीय समोर गेले तरी कळत नाही,

मला बघून होणारा आनंद त्यांच्या डोळ्यात पाहता येत नाही…

*

तिकडे गेले तरी मन इथेच अडकलेले असते आपल्या घरी,

उगाचच वाटत राहतं तुमचं अडेल माझ्यावाचून परोपरी…

*

बरीय मी आता इथेच माझ्या कोषात संसारी रमलेली,

इथल्या सुखदुःखांशी आता माझी गट्टी जमलेली…

*

म्हणून कल्पनेतच अनुभवते आता मी पूर्वीचे माहेरपण,

अन् आठवणीतच जगून घेते रम्य ते बालपण…

*

ऐकता ऐकता नकळत नवऱ्याचे दोन्ही बाहू पसरले,

अन् त्याच्या हक्काच्या स्पर्शाने भिजताच, तिचे माहेरपण विसरले

*

कवी :अज्ञात

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आदिशक्ती परमेश्वर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आदिशक्ती परमेश्वर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

एकदा एका अत्यंत श्रीमंत इस्रायली माणसाची टीव्हीवर मुलाखत घेण्यात आली.

मुलाखती दरम्यान त्यांना विचारण्यात आले की, “त्यांच्या आयुष्यात अशी कोणती घटना घडली, की ज्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले?”

ते म्हणाले, “एकदा मी रस्त्यावर फिरत असताना अचानक मला एका इस्पितळाच्या बाहेर झाडाखाली बसलेला एक माणूस दिसला. त्याने हात जोडून डोळे मिटले होते. पण त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू  वाहत होते आणि तो प्रार्थनेत पूर्णपणे गढून गेला होता.

त्याची प्रार्थना पूर्ण होण्याची मी धीराने वाट पाहत राहिलो. मग मी त्याला विचारले की “तुम्ही इतके अस्वस्थ आणि दुःखी का आहात?”

त्याने सांगितले, ” मला पत्नीच्या ऑपरेशनसाठी तातडीने 1 लाख रुपयांची गरज आहे, अन्यथा ती मरेल.”

मी विचारले, “तुम्ही देवाकडे मदत मागत होतात का?”

तो म्हणाला, “हो.मी फक्त माझ्या देवाची प्रार्थना करत होतो.”

योगायोगाने माझ्याकडे त्यावेळी खूप पैसा होता. म्हणून मी त्याला एक लाख रुपये दिले.

त्याने लगेच डोळे मिटले आणि मान वाकवून देवाचे आभार मानले आणि मी केलेल्या मदतीबद्दल माझेही आभार मानले.

त्याच्या हावभावाने मी खूप प्रभावित झालो आणि मी त्याला माझे कार्ड दिले, ज्यावर माझा वैयक्तिक फोन नंबर आणि वैयक्तिक ईमेल लिहिलेला होता.

मी त्याला म्हणालो, ‘कधीही तुला आणखी कशाची गरज असेल, तू फक्त मला फोन कर. तुझ्याकडे मदत येईल.’

पण त्याने माझे कार्ड आणि प्रस्ताव दोन्ही नाकारले.”

अब्जाधीश पुढे म्हणाले, “त्याने सांगितलेले कारण ऐकून माझे आयुष्य बदलले.तो म्हणाला, ‘मला तुमचा वैयक्तिक फोन नंबर आणि ईमेल पत्ता दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण जेव्हा जेव्हा मला कशाचीही गरज असेल तेव्हा मी तुम्हाला बोलावणार नाही तर माझ्या हृदयात बसलेल्या माझ्या रामाला, ज्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला बोलवीन.’

त्याच्या रामावरच्या गाढ श्रद्धेने क्षणात माझ्या अहंकाराचे तुकडे केले.

कोणत्यातरी शक्तीने मला तिथं आणलं, असा विचार करायला भाग पाडलं आणि त्याला मदत करून मला खूप आनंद झाला. तेव्हापासून जेव्हा मी कोणाला मदत करतो, तेव्हा मी लगेच त्या देवाचे आभार मानतो ज्याने मला यासाठी पात्र मानले.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दृष्टान्त… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ दृष्टांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

एखाद्या समारंभाचे फोटो बघताना माझ्या लक्षात येते की ज्याने काहीच कामे केली नाहीत असे अनेक चेहरे फोटोत आहेत.

यांनी फक्त फोटोच्या वेळी उभे राहण्याचे काम केले.

त्या वेळी माझे मन त्या लोकांचा शोध घेत असते, ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळाली नाही. ते फक्त कामच करीत राहिले.

म्हणून रामायण वाचताना शत्रुघ्नाच्या निस्सीम कार्याकडे आपण आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे.

कल्पना करा की,

राम आणि लक्ष्मण दोघे भाऊ वनात आहेत.

बंधू भरत नंदिग्रामात आहे.

चौदा वर्षेपर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे.

ज्या साम्राज्याला राजा नाही असे राज्य सांभाळायचे आहे.

तुम्ही राजनीतिशास्त्र कधी वाचले असेल. राजनीतिशास्त्रामधे राज्यावरचे सर्वात मोठे संकट अराजक हे आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते.

राजनीतीप्रमाणे -असा एकही दिवस नसावा, ज्या दिवशी राजा नाही.

अयोध्येला चौदा वर्षे राजा नाही. पादुकांची सेवा करीत श्रीभरत नंदिग्रामात बसलेले होते .

दोघे भाऊ वनात होते .

वडील स्वर्गाला गेले.

मग अयोध्येचे राज्य चौदा वर्षे कोणी सांभाळले?

ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते.

काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचा. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते ते लक्षात येईल.

शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते. घरामध्ये असलेल्या सहा महिलांना सांभाळायचे होते .

प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न होती . कौसल्यामाता रात्रंदिवस अश्रुपात करत होती.

कैकयीमाता अंत:करणातून दग्ध होती. तिला  आपल्या कर्माचा पश्चात्ताप होत होता .

ऊर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नव्हता .

मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदिग्रामात होता . पण ती तिथे जाऊन पतीला भेटू शकत नव्हती .

थोडा या परिस्थितीचा विचार करा. पण चौदा वर्षे इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही. शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे आहे.

अयोध्येचे संपूर्ण कुटुंब, राज्य आणि सेना त्याने चौदा वर्षं सांभाळली.

आणि एवढे करूनही चौदा वर्षांनंतर रामचंद्र परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वांत पुढे नाही.

पुढे गुरुदेव वसिष्ठ गेले .

नंतर रामांच्या पादुका घेऊन भरत गेला .

भगवान राम परत आल्यानंतर सारे जण राम-भरत-भेटीचे वर्णन करतात.

पण शत्रुघ्नाचे वर्णन कोणी करत नाही.

ही मंडळी फोटोकरता नाहीतच.

पण ते फोटोत दिसत नाहीत, म्हणून त्यांनी काही काम केले नाही, असे म्हणणे कृतघ्नपणा आहे.

एखादे उत्तम देवालय उभे असते. लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात. भिंतीकडे पाहतात. सुंदर कलाकुसर पाहतात. पण हे सगळे मंदिर पायातल्या ज्या दगडांवरती उभे असते त्या दगडांकडे कोणाचे लक्ष जात नाही.

हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीच निघत नाही. फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो, तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ, तर ते मंदिर किती वेळ उभे राहील?

इतके सुंदर मंदिर उभे आहे, कारण पायातले दगड स्वत:ला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत.

म्हणून मला तर नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो. त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे.कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले आहे.

आपल्या व्रताचे पालन करताना १४ वर्षात बेसावध क्षणी देखील सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार शत्रुघ्नाच्या मनाला कधीही शिवला नाही.

वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे.

नंदिग्रामात राहूनसुद्धा ते नियम पाळणे सापेक्षतेने सोपे आहे.

पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंत:करणाने संन्यासी राहणे हे फार कठीण आहे.

आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवत नाही.

जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करा.

त्या पायाखालच्या दगडाला आठवा. म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे ते कळेल.

मी सगळी कामे व्यवस्थितपणे पूर्ण करीन. पण मला काहीही नको. आपल्याला हे जमेल का?

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
image_print