☆ दोन हिरे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
एका व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता. आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली. व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला !
घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले..! काजव्याच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली, ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरे व रत्नांनी परिपूर्ण आहेत ..! सेवक ओरडला, ” मालक , तुम्ही एक उंट विकत घेतला, परंतु त्या बरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा !”
व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखीच चमकत होते.
व्यापारी म्हणाले: “मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे !”
नोकर मनात विचार करत होता, ” माझा मालक किती मूर्ख आहे….!”
तो म्हणाला: ” मालक यात काय आहे हे कुणालाही कळणार नाही !” तथापि, व्यापाऱ्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली.
उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, ” मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान हिरे मी काजव्याखाली लपवले होते. आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा!”
व्यापारी म्हणाला, ” मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे, म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही !” जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता….!
शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला: “ खरं तर मी थैली परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते. “ या कबुलीजबाबानंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने थैली रिकामी केली आणि त्यातील हिरे मोजले !
— पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जसेच्या तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही, तेव्हा तो म्हणाला, “ हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान हिरे कोणते ? “
व्यापारी म्हणाला…. ” माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान….!”
विक्रेता मूक होता !
— ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, ‘ स्वाभिमान अन् प्रामाणिकपणा ‘, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे….!
आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते
आणि….
जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते !!*……
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुख म्हणजे नक्की काय असतं ! संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटीवेशनल शिबिर आयोजीत केलं होतं.
विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते.
शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता आनंदाने कसं जगावं?
मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,
सुख म्हणजे काय?—–
उत्तरं अगदी भन्नाट होती.
कोणी लिहिले,
निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख.
एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख.
एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर पोट साफ होणं म्हणजे सुख.
एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख.
कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख.
तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख.
सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.
साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं, प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे—- म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे,
कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे,
कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत….
आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे.
— म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे.
हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय. आहे की नाही गंमत.
— मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकीत झाले.
हीच तर सुखाची गंमत आहे. आपण सुखात असतो. पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं.
जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे… एवढा वेळ आपण सुखात होतो.
लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलंबित्व. केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय. मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा.
— प्रत्येक गोष्टीत टेन्शन.
— जागा शोधायचं टेन्शन.
— कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन.
— ऑफीसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन.
त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं.
गृह्स्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं, संसारसंगे बहु कष्टलो मी ! केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय.
मुलं मोठी होतात तेव्हा आपण वृद्ध झालेलॊ असतो. आणि गात्रं कुरकुर करू लागतात. तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता.
माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले. शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,
“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”
तर ते म्हणाले, “ प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो. काय झालं, एक दिवस रात्री लघवी कोंडली. प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना. ओटीपोटावर भार असह्य झाला. मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो. अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली. दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं तर ते म्हणाले युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा. युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले. म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं. वेदना असह्य होत होत्या. ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भीती निर्माण झाली होती. शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं. आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला — आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.”
परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे.
— हातपाय धडधाकट आहेत. दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय?
— परमात्मा मेहेरबान होऊन पावसा पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय?
— घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे हे सुख नव्हे काय?
’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठ्वतय,,
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं
मित्र हो, जाणिवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात.
चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा, सारी निराशा झटकून टाका, आणि आनंदाने जगू लागा.
संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता. परंतु जेव्हा बिभीषणासारख्या भक्ताला लाथ मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही !
अशाच प्रकारे हस्तिनापूरमध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त रहात होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून त्यांना राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की ‘ काका! आपण तीर्थयात्रेला जावे ‘. जसे विदुराने हस्तिनापूर सोडले, तसे कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले, आणि कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !!
याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा ! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली ओहोटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परिवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !! सोबत काही घेऊन आलो नाही व जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा..!!
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एकदा ब्रह्मदेव रथातून जात असताना सारथी अचानक रथ थांबवतो. ब्रह्मदेवाने कारण विचारले असता, तो सांगतो की एक छोटा प्राणी बसला आहे. तो रस्त्यातून बाजूला होत नाही.. म्हणून रथ थांबवावा लागला. “ त्याला बाजूला होण्याची विनंती कर.” …. थोड्या वेळाने ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर सारथ्याने सांगितले की, तो प्राणी पूर्वी होता त्यापेक्षा मोठा झाला आहे.
ब्रह्मदेवाने सांगितले की, “ त्याला चाबूक दाखव म्हणजे तो बाजूला जाईल.”
ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर कळले की, तो प्राणी अधिकच मोठा झाला आहे. आता तो प्राणी तर एका डोंगराएवढा मोठा झाला आहे. आणि रथावर चाल करून येत आहे.
हे ऐकताच ब्रह्मदेव म्हणाले, “ रथ मागे घे आणि त्याला सांग की, ‘तूच श्रेष्ठ आहेस, आम्ही रथ वळवतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो. “
सारथ्याने हे सांगितल्यावर तो प्राणी एकदम मुंगी इतका छोटा झाला आणि रस्त्यातून बाजूला झाला.
आश्चर्यचकित झालेल्या सारथ्याने ब्रह्मदेवास याचे कारण विचारता देवाने सांगितले की, “ त्या प्राण्याचे नाव “ईर्षा” असे होते. आपण जेवढे महत्त्व त्याला देऊ तेवढा तो मोठा होत जाईल. मात्र आपण स्पर्धेतून दूर झाल्यावर “ईर्षा” राहिली नाही आणि तो सामान्य स्वरूपात आला.”
—सर्वच स्पर्धा जिंकण्यासाठी खेळायच्या नसतात. काही वेळा फालतू स्पर्धेत भाग घेतल्यामुळे उगाच ऊर्जा व्यर्थ खर्च होते. काही वेळा नमते घेतल्यामुळे फायदाच होतो.
याचप्रमाणे जग लोकांच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावे. आपण सुखी आहोत, याची पावती लोकांकडून घेण्यापेक्षा आपले सुख आपणच अनुभवावे.
आपला निर्णय आपण घ्यावा आणि त्यास जबाबदार राहावे.
लोक काय म्हणतील, याचा फार विचार करू नये. कारण एक दिवस प्रमाणापेक्षा कोणीही आपल्याला जवळ करणार नाही, तेव्हा आपले सुख-दुःख आपणच अनुभवावे, आयुष्य तणावमुक्त होते.
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ एक अनुकरणीय विचार… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
संबंध जोडणं ही एक कला आहे… परंतु संबंध टिकवणं मात्र एक साधना आहे.
आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोघांनाच माहीत असते… एक “परमात्मा” आणि दुसरा आपला “अंतरआत्मा”
विहिरीचे पाणी सर्व पिकांसाठी सारखेच असते तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर, चिंच आंबट होते.
लक्षात ठेवा हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे. फक्त दोष आपल्या कर्माचा असतो…
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूसच पैसे कमावतो, तरी पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही. आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी की माणूस पैसे कमवूनही त्याचे पोट मात्र कधीच भरत नाही..?
चांगल्या माणसांची कधीही परीक्षा घेऊ नका… कारण ते पाऱ्यासारखे असतात.. म्हणूनच जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात तर नाहीच. पण निसटून मात्र शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात..
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
९२ वर्षांचे गुरुवर्य पंडित वसंतराव घोटकर हे वृद्धापकाळातील आजारामुळे कोमामध्ये होते. दहा एक दिवस वाट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे पुत्र विवेक घोटकर यास सांगितले की गुरुजी आता काही तासांचेच पाहुणे आहेत, तेव्हा सर्व कुटुंबाला एकदा बघून जायला सांगा. हे कळताच दुसऱ्याच दिवशी गुरुजींचा पट्टशिष्य प्रकाश वाडेकर त्यांना भेटायला आला आणि त्यांच्या पायाजवळ बसून त्यांना “गुरुजी गुरुजी” अशी हाक मारु लागला. पण गुरुजी काही केल्या ओ देईनात. सुमारे अर्धा तास असाच गेला शेवटी प्रकाश म्हणाला की “ दादा मला तबला दे. मी गुरुजींच्या पायाजवळ बसून शेवटचा तबला वाजवतो, तेव्हडाच मला आशीर्वाद मिळेल. “ प्रकाशने असे म्हणताच विवेकदादाचा मुलगा शुभम हा तबला घेऊन आला, आणि प्रकाश गुरूजींच्या पायाजवळ बसून तबला वाजवू लागला. त्यांनी दिलेल्या वेगवेगळया चीज़ा एकानंतर एक वाजवू लागला आणि पाहतो काय?— गेल्या दहा दिवसांपासून बेशुद्धावस्थेत मौन असलेले गुरुजी हळुवारपणे पुटपुटले— ” कोण? प्रकाश? ” हे ऐकताच घरातील सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. सगळे जण आश्चर्यचकित होऊन तो चमत्कार पाहू लागले आणि आता गुरुजी फक्त उठलेच नव्हते, तर मृत्युशय्येवर असून सुद्धा चक्क तबला शिकवू लागले होते. सांगत होते, चुका दुरुस्त करत होते, आणि वाजवून सुद्धा दाखवत होते. आणि असेच जवळपास दहा – पंधरा मिनिटे शिकवून ते पुन्हा झोपी गेले ते सरळ पंचतत्वात विलीन होण्यासाठी – ईश्वराच्या चरणी जाण्यासाठी.
ही माहिती, सरस्वतीची उपासना काय असते? गुरु कसे असावे? भारताची गुरु-शिष्य परंपरा काय आहे? गुरु शिष्यांची श्रद्धा आणि प्रेम काय असते? याबद्दल बरंच काही सांगून जाते .
संग्रहिका : शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
काहीही कारण नाहीये .फक्त तुम्ही अपहरणकर्ते सांगतील, त्याप्रमाणे पैसे काढण्याचे काम करा !
—-पण तेव्हा, आपल्या ATMचा PIN उलटा टाईप करा—
समजा, जर का आपला PIN १२३४ असेल, तर त्या जागी ४३२१ असा टाईप करा.
आणि मग त्यानंतर पाहा काय होतं ते. तुम्ही PIN क्रमांक उलटा टाईप केल्याने ATM मशीनला कळेल की,
तुम्ही काही तरी अडचणीत आहात. त्यामुळे तुम्ही फारच अडचणीत आहात हे जाणवल्याने ATM मशीन तुमच्या बँकेला आणि जवळच्या पोलीस स्टेशनलाही सूचना देईल. आणि त्याचबरोबर ATM चा बँकेचा दरवाजा देखील लगेचच बंद होईल.—- आणि अपहरणकर्त्याला काहीही न कळता तुम्ही सुरक्षितरित्या वाचू शकता.
ATM मध्येपहिल्यापासूनच सिक्युरिटीबाबत अशी सोय करण्यात आली आहे. याबाबत फारच थोड्या लोकांना माहिती आहे — तर तुम्ही अपहरणकर्त्याला सहजपणे पकडून देऊ शकता.
तुमच्या मित्रांना पण ह्याबद्दल सांगा…
From…Mumbai Police, Maharashtra Police
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈