शाळेत असताना टीचरकडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे….कारण मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो.
माझे सगळे टीचर मला क्लासमध्ये उभा रहायला सांगून शिकवत असत.कारण माहितीये? ….ते सगळे माझी खूप इज्जत करत असत.
माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्याचदा माझ्या आई- पप्पांना घेऊन यायला सांगत असत , कारण ते काहीही मला direct सांगायला घाबरत असत…
मी जे काही लिहायचो, ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे, माझे हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे. त्याच कारणास्तव ते बरेचवेळा मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत…
कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती chalk माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत…ही गोष्ट वेगळी की ती कॅच सुटून मलाच chalk लागत असे.
उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावं . हीच काय ती अपेक्षा होती त्यांची माझ्याकडून.
परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजूबाजूला पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत.
कितीतरी वेळा मला बेंचवर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,
कारण मी बाकी मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि मला वर्गातल्या सर्व मुली व्यवस्थित दिसाव्यात, हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.
शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती.
माझ्या शरीराला vitamin D आणि मोकळी हवा मिळावी, ह्यासाठी मला बरेच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात मैदानाला 10 फेर्या मारायला सांगितल्या जात असत.
जेव्हा की बाकी मुलं वर्गात घाम गाळत , गुदमरत शिकत असत.
मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत….
तू शाळेत का येतोस?..तुला ह्याची गरज नाहीये…
वाह ! काय ते सोनेरी दिवस होते!
लेखक – अज्ञात
संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत “मोह” म्हटले आहे.
जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत “लोभ” म्हटले आहे.
कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो, त्याला गीतेत ” ईर्षा” म्हटले आहे.
काही वेळेस कुल्फी संपण्याच्या आधीच कुल्फी कशी खायची असते, हे न समजल्याने दांडी हातात राहून कुल्फी गळून जमिनीवर पडते, त्याला गीतेत ” क्रोध” म्हटले आहे.
झोप पूर्ण होऊनसुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात, त्याला गीतेत “आळस”असे म्हटले आहे.
हॉटेलमध्ये भोजन झाल्यावर, ओंजळभर बडीशेप व साखर खातो, त्याला गीतेमध्ये,
“भिकारी”पणाचे लक्षण म्हटले आहे.
बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पहाणे, ह्याला गीतेत “भय” म्हटले आहे.
व्हाॅटस् अपवर मेसेज पाठवल्यावर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहणे किंवा फेसबूकवर एखादी पोस्ट टाकली तर त्याला किती लाईक्स मिळाले, हे सतत पहात रहाणे, ह्याला गीतेत “उतावळेपण” म्हटले आहे.
पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी, “साधी पुरी, कधी मसाला पुरी, कधी गोड पुरी दे रे, भैय्या,” असे म्हणतो, त्याला गीतेत “शोषण ” म्हटले आहे.
फ्रुटी पिऊन झाल्यानंतरही स्ट्राॕने शेवटच्या थेंबापर्यंत फ्रुटी ओढत राहणे, ह्याला गीतेत ” मृगतृष्णा” म्हटले आहे.
चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे, ह्याला गीतेत “अक्षम्य अपराध ” असे म्हटले आहे.
जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा जिलेबी वाढणारा येत आहे, हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन आणि अख्खी जिलेबी तोंडांत कोंबून आणखी जिलब्या ताटात वाढून घेतो, त्याला गीतेत “छळवाद” असे म्हटले आहे.
ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे ” मोक्ष.”
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘स्पर्शाचं महाभारत.!’ ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
ज्येष्ठ पती-पत्नींनो, तुम्ही एकमेकांना शेवटचा स्पर्श हल्ली कधी केला होता?
…आठवतं का?
बर्याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका.
अंधशाळेच्या प्रिन्सिपल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि
त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचं सुंदर मिश्रण होतं त्यात..
नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम.
शबाना आजमी प्रिन्सिपल आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा “स्पर्श” हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे..
हे सगळं आठवायला एक कारण घडलं.
काल-परवा
आपलं माणूस
हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम..!
नाना आणि सुमित राघवन..
त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमितला बोलता-बोलता
विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना, या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतांस?
कधी आउटिंगला?
बाहेर जेवायला?”
सुमित गप्प…
इथपर्यंत ठीक..
पण नंतर नाना सुमितला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्याला?”
आणि अंगावर सरसरून काटा आला..
नाना पुढे म्हणतात,
“एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे स्पर्श करत नाही,ही साधी गोष्ट नाही.” हा तर पुढचा कहर..
किती साधी गोष्ट.. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. एकमेकांशी बोलतो आपण, एकमेकांची काळजीही घेतो, पण खरंच स्पर्श टाळतो का?
आणि
तो खरंच इतका महत्वाचा असतो?
आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे-कसे स्पर्श करतो आपण?
खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक.
स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते..
लहानशी गोष्ट. स्पर्श… पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवतात, आणि आठवत राहतात..
पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय?
आपलाच स्पर्श, पण किती अनोळखी वाटतो?
आणि मग असे कितीतरी स्पर्श आठवू लागतात!
उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श..
दिवाळीत आंघोळीआधी,
पाडव्याला आईने,
भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना, त्यांच्या तळव्यांचा स्पर्श..
तळवे सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे थांबलेला.
रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित..
ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श..
मायेने ओथंबलेले असतात कधी कधी धीट, तर कधी आक्रमक असतात, पण ते बोलतात..
पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो…
आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता वृध्द हात, त्यावेळी कदाचित नकोसा वाटला तरी, आता सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो..
स्पर्श रेशमी असतात..
जाडेभरडे असतात..
आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात..
आज माझी आई सत्तरीच्या पुढे
आहे. कधी-कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टीव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते,“रोड झालास रे”. ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत
कितीतरी देवाण-घेवाण करते..
स्पर्शांना धर्म, जात, देश कसलेच बंधन नसते.. ईदच्या दिवशी
एकमेकांना आलिंगन देऊन मुबारक बाद दिली जाते, तशीच दसर्याला सुद्धा गळाभेट असतेच की.
पाश्चात्य संस्कृती मध्ये
शेकहँड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. ही
परिचयाची, भेटीची पद्धत.
इथेही स्पर्श महत्त्वाचा..
का असेल स्पर्श महत्त्वाचा?
मला वाटतं इतर ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतात पण स्पर्श फक्त खरं बोलतात..
हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं..
मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे.
आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर ..?
म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो. “शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्याला?”
लक्षातच येत नाही आपल्याला..
हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं
काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श नाही ना थकत..
केळीचे लोंगर बागेत दिसायला लागल्यावर वानरांनी बागेत येऊन धुडगूस घालायला सुरुवात केली. केळी, पपई ….. एकही फळ हाताशी लागेना. आमच्या जमिनीत वडाच्या झाडाखाली अक्कलकोट स्वामींचे मंदिर बांधलेय. देवळात वीज आल्यावर एक दिवस जपयंत्र आणलं. सूर्यास्ताला जपयंत्रावर गायत्री मंत्राचा जप सुरू करायचा, तो चांगलं उजाडल्यावर बंद करायचा. आठ पंधरा दिवसातच एक गोष्ट अनुभवाला आली. जपयंत्र जरी रात्री सुरू असलं तरी दिवसभर बागेत होणारा वानरांचा धुडगूस आपोआप बंद झाला. वानर बागेच्या कुंपणापर्यंत यायचे. पण बागेत यायचे नाहीत. नुकसान करायचे नाहीत. रात्रीच्या वेळी मात्र तोच कळप तळ्याकाठच्या त्याच झाडावर वस्तीला असायचा. आज घराभोवती पाच फळबागा उभ्या राहिल्या असून वानरांमुळे होणारं नुकसान पूर्णपणे थांबलं. गायत्री मंत्र आणि वानर यांचा नेमका काय संबंध – हे मात्र अनाकलनीय आहे. आज अनेक शेतकरी हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहेत.
‘रानगोष्टी’ या डॉ. राजा दांडेकर यांच्या पुस्तकातील हा उतारा. गायत्री मंत्राचा महिमा सांगणारा. आजच त्याची आठवण होण्याचे कारण काय ? कारण कोकणातील एक फेसबुक मित्र श्री.अविनाश काळे यांची पोस्ट. ‘कोकणचे दुःख कोणी दूर करेल ?’ ह्या मथळ्याच्या पोस्टचा मथितार्थ असा की कोकणातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान माकडे आणि वानरे यांच्यामुळे होत आहे. त्यांचा बंदोबस्त न झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वानर आणि माकड यांना उपद्रवी पशू जाहीर करून मारायला सुरुवात केली. महाराष्ट्रातसुद्धा असे करण्याची गरज आहे.
हे वाचताना गायत्री मंत्राचा प्रभाव आठवला. वानरे, माकडे यांना जीवनिशी मारण्यापेक्षा शेतकरी मित्रांनी हा साधा, निरुपद्रवी उपाय करून पहायला काय हरकत आहे ?
‘एखाद्या मंत्राचा प्रभाव मान्य करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा?’ चा वाद जुनाच आहे. अशीही शक्यता आहे की एखादी विज्ञानाधिष्ठीत गोष्ट देवाधर्माच्या नावे सांगितली की लोकांना पटते, ते ऐकतात हे लक्षात आल्याने आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी हुशारीने लोकांच्या गळी उतरवल्या असतील. आपल्याला त्यामागचे विज्ञान माहित नसल्याने आपण त्याला अंधश्रद्धेचे लेबल लावून मोकळे होतो !
भारतीय मानसिकतेला मंत्राचा प्रभाव, त्यामुळे होणारे चमत्कार हा मुद्दा नवीन नाही. मूल अक्षरओळख शिकण्याच्या आधीपासून घरच्यांकडून रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकू लागते. अक्षरे ओळखता येऊ लागली की पौराणिक कथा वाचू लागते. (आताच्या नवीन पिढीत बहुधा हे होत नसावे.) बालवयातच ‘कुमारी माता’ कुंतीची कथा सामोरी येते. कुंतीने मनापासून दुर्वास ऋषींची सेवा केल्याने त्यांनी संतुष्ट होऊन अपत्यप्राप्तीसाठी देवांना वश करण्याचा मंत्र तिला दिला. तिने कुतूहलापोटी मंत्रजप करून सूर्याला आवाहन केले. सूर्य प्रगट होताच भयभीत होऊन त्याला परत जाण्यास सांगितले. मात्र ‘मंत्र व्यर्थ होऊ शकत नाही,’ असे सूर्य म्हणाला आणि सूर्यपुत्र कर्णाचा जन्म झाला.
भयकथा, गूढकथा यातही अघोरी विद्यांमध्ये विशिष्ट मंत्रांचे सामर्थ्य किती अचाट आहे हे वाचायला मिळते. ‘वशीकरण मंत्र साक्षात मनुष्यरुपात प्रगट झाला,’ वगैरे वाचताना मला भयंकर कुतूहल वाटत असे. जर खरेच असे काही प्रत्यक्षात घडत असेल तर ते आपल्याला निदान एकदा तरी बघायला मिळावे, असेही वाटून जाई.
विशिष्ट शब्द विशिष्ट पद्धतीने उच्चारणे म्हणजे मंत्र. या मंत्रोच्चारणाचा विधायक वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात करू शकलो तर आपले कितीतरी प्रॉब्लेम्स सुटतील! खरंच मंत्रात शक्ती असते का ? अलीकडेच व्हाॅट्स अप वर एक पोस्ट वाचायला मिळाली. त्यात या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पोस्टचा मथितार्थ असा की एखाद्या माणसाने आपल्याला उद्देशून अपशब्द उच्चारले, शिव्या दिल्या तर आपल्याला संताप येतो. म्हणजेच त्या शब्दांमध्ये ताकद आहे. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तयार होते. ह्याउलट कुणी आपले कौतुक केले, प्रेमाने बोलले तर आपल्याला प्रसन्न, आनंदी वाटतं. म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते अगदी ह्याच प्रकारे मंत्रातील शब्दांतदेखील ऊर्जा, सामर्थ्य असते. हे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी, जे वैज्ञानिक होते, संशोधनातून सिद्ध केले आहेत.
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड,विश्वविख्यात नेमबाज अंजली भागवत यांच्यासारखे अनेक खेळाडू ज्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात होते ते क्रीडामानसशास्त्रज्ञ व माजी इंटेलिजन्स ऑफिसर भीष्मराज बाम यांनी हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. ते म्हणतात,’ मंत्र म्हणजे काही शब्दांच्या किंवा वाक्यांच्या आधारे प्रगट होणारा एखादा प्रभावी विचार असतो. काही वेळा एखादा शब्द किंवा ओंकारासारखे अक्षर मंत्रजपासाठी वापरले जाते. तर कधी कधी काही ओळींचाही मंत्र असू शकतो. मंत्रजप हा एकाग्रतेसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्या विचारांवर आपला ताबा नसेल तर विचार भरकटतातच. पण त्यासोबत आपलीसुद्धा अत्यंत त्रासदायक अशी फरफट होते. विचारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्र उपयुक्त ! मंत्रातले शब्द ज्या अर्थाने वापरले असतील त्यावर तुमची पक्की श्रद्धा असायला हवी. म्हणून तर मंत्र हा तुमची ज्या गुरुवर श्रद्धा असेल, त्याच्याकडून मिळवायचा असतो. किंवा तो मंत्र तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध झालेला हवा. मग आपोआप तुमची त्याच्यावर श्रद्धा बसते.’
प्रभावी स्वसंवाद ( स्वतःसाठी सूचना) लिहून काढून त्याचा मंत्रासारखा वापर करण्याबाबतही बाम सरांनी लिहिले आहे. Winning Habits या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा ‘विजयाचे मानसशास्त्र’ या नावाने वंदना अत्रे यांच्या सहाय्याने मराठी अनुवाद केला आहे.
दैनंदिन जीवनात मारुती स्तोत्र, रामरक्षा (किंवा आपले आवडते स्तोत्र / मंत्र) म्हटले की प्रसन्न वाटतं, नकारात्मक विचार पळून जातात हा अनुभव तर सर्वांनीच घेतला असेल. ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’ अशीच रामरक्षेची सुरुवात आहे. बुधकौशिक ऋषींना स्वप्नात रामरक्षा स्फुरली. कुरवपूर (कर्नाटक) येथे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या अठरा अक्षरी प्रभावी मंत्राचा साक्षात्कार झाला.
अखंड नामस्मरण, मंत्रजप यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता येत असेल, फायदा होत असेल तर ‘श्रद्धा – अंधश्रद्धा’ चा काथ्याकूट कशाला ? नियमितपणे, श्रद्धेने मंत्र जपावा हे उत्तम.
संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी-नाईक
फोन नं. 8425933533
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खरे तर त्याच मेन्यू कार्डची त्याला उत्सुकता, प्रतीक्षा असते. दोन्ही कार्डांवर बारकाईने नजर टाकून तो वेटरला ऑर्डर देतो. थोड्या वेळाने तो वेटर खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि सोबत एका सुंदर तरुणीला घेऊन येतो. समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते. ‘हॅव ए गुड टाइम.. एन्जॉय !’ अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो.
टेबलावर ते दोघेच. अनोळखी. अपरिचित. काही क्षण नि:शब्द जातात. मग दोघेही एकमेकांचा परिचय करून देतात. या जुजबी ओळखीपाळखीनंतर ‘ति’च्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते. दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद हळुवारपणे रंगत जातो. उभयतांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगलेला असतानाच वेटर बिल घेऊन येतो. दोघांचाही हिरमोड होते. ‘पुन्हा भेटू’, म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन तो हॉटेलबाहेर पडतो!
‘लिसनर’ नावाच्या शॉर्टफिल्मचे हे संक्षिप्त कथानक. जगभर ही फिल्म दाखविली गेली आणि तितकीच नावाजलीही गेली. ही शाॅर्टफिल्म बनविण्यामागे संदर्भ होता-अमेरिकेतील वॉल्डेन युनिव्हर्सिटीच्या ‘ॲन्युयल रिविव्ह ऑफ सायकॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख. ‘संवाद हरवलेली कुटुंबं’ हा त्या लेखाचा विषय. अर्थात, तो अमेरिकेतील एकल कुटुंब व्यवस्थेवर आणि त्यातही ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, आयबीएमसारख्या आयटी कंपन्यात काम करणाऱ्या कपल्सवर आधारित. ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं (सोशल मीडिया) जन्माला आली तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती नि:शब्द, निरस आणि एकलकोंडी असतात, हा त्या लेखाचा निष्कर्ष. या ‘लिसनर’ शॉर्टफिल्मची प्रेरणा घेऊन कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत, जिथे तुम्हाला, तुमचं मन मोकळं करता येतं! मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागतात! ते तुमच्यात गुंतत नाहीत; पण तुम्हाला गुंतवून ठेवतात. भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पैसे मोजून तासभर संवाद साधायला ‘गिऱ्हायकं’ येतील की नाही, याबाबत हाॅटेलमालक थोडे साशंक होते. पण त्यांची शंका क्षणभंगुर ठरली. बघता-बघता अशा प्रकारची ‘टॉक-टाइम’ हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली!
संवाद हरवलेली कुटुंबं, ही आता जागतिक समस्या बनली आहे. जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली, राहणीमान उंचावले, पण कामाचा ताण, नोकरीची धास्ती आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे मनस्वास्थ्य हरवून बसलेली माणसं आपल्या घरात आहेत. ही केवळ नोकरदार वर्गाची समस्या नाही.
विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध असे सगळे संवाद हरवून बसलेल्या एक प्रकारच्या मानसिक आजाराचे शिकार आहेत. मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे नुकत्याच झालेल्या जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत या विषयावर अतिशय गांभीर्याने चर्चा झाली. विशेषत: कोरोना महामारीनंतर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमागे संवादाचा अभाव हे कारण असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ हे त्याचे एक प्रमुख लक्षण. प्रत्येकाला काही तरी सांगायचे आहे, पण ऐकणारेच कुणी नाही, अशा एका विलक्षण कोंडीत जग अडकले आहे. हा कोंडमारा जीवघेणा ठरतो आहे. परवा नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी वाचून आई-वडिलांना धक्काच बसला. त्याने लिहिले, ‘मी गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय; पण तुम्ही ऐकूनच घेत नाही. माझ्याच घरात जर कुणी ऐकणारं, समजून घेणारं नसेल तर मी कोणाजवळ मन मोकळं करू?’ या मुलाने लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुराने आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे! अन्यथा, पैसे देऊन संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून देणारी हॉटेल्स आपल्याकडेही येऊ घातली आहेच!
सारांश : बोला, व्यक्त व्हा, संवाद साधा, कुठेतरी मन मोकळे करा. मित्र, मैत्रिणी असो की नातलग
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
आपल्या जीवनात आपण योग्य मार्गावर असण्यासाठी वेळोवेळी स्वतःचे तटस्थपणे आत्मपरीक्षण करता आले पाहिजे.एकदा एक गोष्ट वाचण्यात आली…..
एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
तरुण : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?
तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खूश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो.
तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.
महिला : नको. मी एका महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.
तरुण: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !
महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?
तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!
महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
तरुण हसत हसत फोन ठेवून निघाला.
दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, “तू प्रयत्न केलास, पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस.”
यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, “मला नोकरी नकोय. नक्की नकोय.”
दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?
तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो. तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही, हे चेक करत होतो.
असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.
सांगण्याचे तात्पर्य म्हणजे अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही नोकर असा की मालक. ते महत्वाचे नाही. तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का, हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो?तर आपण स्वतः !!
जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो.
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈