☆ “या हृदयीचे त्या हृदयी” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
चष्मा साफ करता करता एक वयस्कर काका आपल्या बायकोला म्हणाले : अगं,आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.
काकू : हो ना ! पण बरोबर 5 वाजून 55 मिनिटांनी मी पाण्याचा ग्लास घेवून दरवाजात यायची आणि तुम्ही पोहचायचे.
काका : मी तीस वर्षे नोकरी केली पण मला आजपर्यंत हे समजलं नाही की, मी यायचो त्यामुळे तू पाणी आणायचीस की तू पाणी आणायचीस, त्यामुळे मी लवकर यायचो.
काकू : हो. आणि अजून एक आठवतं की तुम्ही रिटायर व्हायच्या आधी तुम्हाला डायबीटीस नव्हता व मी तुमची आवडती खीर बनवायचे, तेव्हा तुम्ही म्हणायचे की, आज दुपारीच वाटलं होतं की आज खीर खायला मिळाली, तर काय मजा येईल.
काका : हो ना .. अगदी. ऑफिसमधनं निघताना मी जोही विचार करायचो घरी आल्यावर बघतो, तर तू तेच बनवलेलं असायचं.
काकू : आणि तुम्हाला आठवतं ? पहिल्या डिलीव्हरीच्या वेळी मी माहेरी गेले होते, तेव्हा मला कळा सुरू झाल्या होत्या. मला वाटलं, हे जर माझ्याजवळ असते तर ? आणि काय आश्चर्य, तासाभरात तर स्वप्नवत तुम्ही माझ्या जवळ होतात.
काका : हो. त्या दिवशी मनात विचार आला होता, की तुला जाऊन जरा बघूयात.
काकू : आणि तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून कवितेच्या दोन ओळी बोलायचे.
काका : हो आणि तू लाजून पापण्या मिटवायचीस व मी त्या कवितेला तुझा ‘लाइक’ मिळाला असं समजायचो.
बायको : एकदा दुपारी चहा करताना मला भाजलं होतं. त्याच दिवशी सायंकाळी तुम्ही बर्नोलची ट्यूब अापल्या खिशातनं काढून बोललात,’ही कपाटात ठेव’.
काका : हो..आदल्या दिवशीच मी बघितलं होतं की ट्यूब संपलीय. काय सांगता येतं, कधी गरज पडेल ते? हा विचार करून मी ट्यूब आणली होती.
काकू : तुम्ही म्हणायचे की आज ऑफिस संपल्यावर तू तिथंच ये. सिनेमा बघूयात आणि जेवण पण बाहेरच करूयात.
काका : आणि जेव्हा तू यायचीस तर मी जो विचार केलेला असायचा तू अगदी तीच साडी नेसून यायचीस.
काका काकूजवळ जावून तिचा हात हातात घेत बोलले : हो, आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते पण आपण कनेक्टेड होतो.
काकू : आज मुलगा आणि सून सोबत तर असतात,पण गप्पा नाही, तर व्हाट्सएप असतं. आपुलकी नाही, तर टॅग असतं. केमिस्ट्री नव्हे, तर कॉमेंट असते. लव्ह नाही, तर लाइक असते. गोड थट्टामस्करीच्या ऐवजी अनफ़्रेन्ड असतं. त्यांना मुलं नकोत, तर कैन्डीक्रश सागा, टेम्पल रन आणि सबवे सर्फर्स पाहिजे.
काका : जाऊ दे गं! सोड हे सगळं. आपण आता व्हायब्रेट मोडवर आहोत. आपल्या बॅटरीची पण 1 च लाइन उरली आहे.
अरे ! कुठं चाललीस ?
काकू : चहा बनवायला.
काका : अरे… मी म्हणणारच होतो की चहा बनव म्हणून.
बायको : माहिती आहे. मी अजूनही कवरेज क्षेत्रात आहे आणि मेसेजेस पण येतात.
दोघेही हसायला लागले.
काका : बरं झालं,आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.
मित्रांनो !
खरंच आतापर्यंत बरंच काही निसटून गेलंय व बरंच काही निसटून जाईल.
बहुतेक आपली ही शेवटची पिढी असेल की जिला प्रेम, स्नेह, आपलेपणा ,सदाचार आणि सन्मानाचा प्रसाद वर्तमानपिढीला वाटावा लागेल. गरजेचं पण आहे.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले . कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतपटू.’
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कृष्ण अंधारात जन्मला.त्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी त्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.
कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…!
अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…
चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही.
कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.
चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे, असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.
फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…
तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…
अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.
श्रीकृष्ण “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…
विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था
कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…
अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥
जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…
असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो…
रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवांत मी, पांडवांत मी,अणुरेणुत भरलो
तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…
म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.
कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.
श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.
श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.
आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.
कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….!
।।जय श्रीकृष्ण।।
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
परदेशी नोकरी करणाऱ्या माझ्या मुलाचा व्हॅाट्सॲप मेसेज :
‘प्रिय बाबा,
आज आम्ही दोघेही बाहेर जेवणार आहोत. त्यासाठी ह्या हॅाटेलात मी आम्हा दोघांसाठी टेबल बुक करुन ठेवलं आहे. मला इथं येऊन अर्धा तास झाला आहे, तरी अजूनही सुनीता आलेली नाही. बहुतेक तिला ॲाफिसमध्ये अचानक काम लागलं असेल. मला वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला मेसेज लिहित बसलोय…
बाबा, दरवर्षी आम्हाला ह्या दिवशी वेगळं काहीतरी करावंच लागतं. पत्नीवर आपलं ‘प्रेम’ आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. व्यक्त व्हावं लागतं. तुम्हाला हे नाही कळणार, कारण तुम्हाला खात्री होती की, आई तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही. कधीतरी ती थकलेली दिसली की, तुम्ही कोपऱ्यावर जाऊन चटकदार ओली भेळ सर्वांसाठी घेऊन यायचा. तेवढ्यानेच ती खुश होऊन जायची. तुम्ही कधी तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं का? की तुमच्या भावना न बोलताच तिच्यापर्यंत पोहचत होत्या?
तुम्ही दरवर्षी गौरी गणपतीला, गौरीला नेसवायला दोन भारी साड्या घेऊन यायचे. आई त्याच साड्या पुढे वर्षभर वापरत असे. त्या साड्या आणल्यावर आई त्यावरुन हात फिरवत म्हणायची, ‘साडीचा पोत किती छान आहे, रंग किती खुलून दिसतोय.’ हीच तिची ‘थॅन्क्यू’ची भाषा होती का? की यातून ती तुम्हाला ‘आय लव्ह यू’ सूचित करीत होती, जे तुमच्यापर्यंत सहज पोहचत होते?
तुम्ही कधी आईसाठी ‘गिफ्ट’ आणल्याचं मला आठवत नाही. मात्र दरवर्षी अक्षय्य तृतीयेला जमेल तशी सोन्याची वेढणी न चुकता आणत होतात. खरंच ती मुहूर्ताची खरेदी होती की एक प्रकारची गुंतवणूक की आईवरील तुमचं ‘प्रेम’, हे मला कधीच कळलं नाही…
बाबा, मला सांगा..तुमच्या भावना न बोलताच आईला कशा कळायच्या? आज सुनीता, मला एक छानसा शर्ट भेट देणार आहे. तुम्हाला कधी आईनं भेट दिल्याचं मला आठवत नाही. मात्र गरम गरम पुरणपोळ्या खाऊन झाल्यावर तुम्हाला आलेला तृप्तीचा ढेकर, हीच तिच्याकडून छान भेट मिळाल्याची पोचपावती असायची का?
काहीच न बोलता, ‘स्पेशल’ काहीच न करता तुम्ही एकमेकांना कसे समजून घेत होतात? की काही अपेक्षाच नव्हत्या कधी तुम्हाला एकमेकांकडून. की फक्त बघूनच सारं कळत होतं? बरोबर राहूनच न बोलता सर्व उमजत होतं?
बाबा, मला इथं येऊन एक तास होऊन गेला. अजूनही सुनीता आली नाही. तिची वाट पाहून मी देखील कंटाळून गेलो आहे. ॲाफिसच्या कामातून तिला बाहेर पडायला जमत नसावं, असं दिसतंय.
आज आमच्याकडे प्रेम आहे, पैसा आहे, मात्र वेळच नाहीये, ते प्रेम व्यक्त करायला…त्यामानानं तुम्ही खरंच भाग्यवान होता… आयुष्यभर आईवर अव्यक्त प्रेम करीत राहिलात आणि ती देखील तुम्हाला सावलीसारखी साथ देत राहिली…
बाबा, मी आता आटोपतं घेतो. मेसेज खूपच मोठा झालाय. वेळ आहे ना, तुम्हाला वाचायला?
तुमचाच,
अजय
मी मोबाईल बाजूला ठेवला व भाजी आणायला गेलेल्या हिची वाट पाहत बसलो. खरंच आम्ही आमच्या सहजीवनात कोणतेही ‘डे’ साजरे केले नाहीत, नव्हे तसे करण्याची कधी गरजही वाटली नाही…
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
फेसबुकवर एका मित्राने प्रश्न विचारला होता, असं फक्त एक पुस्तक सांगा, ज्या पुस्तकामुळे तुमचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.
तो प्रश्न वाचला आणि माझं मन दहा वर्षं मागे धावलं.
मी गरोदर होते तेव्हाची गोष्ट. तिळी मुलं पोटात आहेत, हे कळल्यामुळे आधीच धाकधूक होत होती.
पहिले तीन महिने तर इस्पितळाच्या वाऱ्या करण्यातच निघून गेले होते.
पाचव्या महिन्यात नुकतंच सगळं थोडं स्थिरस्थावर झालं होतं. सुटकेचा निःश्वास सोडते न सोडते तोच एका दुपारी अचानक पोटात खूप दुखायला लागलं.
डॉक्टरना फोन केला तर ते म्हणाले की लेबर पेन्स असू शकतात. ताबडतोब इस्पितळात भरती व्हा.
तसेच अंगावरच्या कपड्यानिशी इस्पितळात गेले. तपासणी करून डॉक्टर गंभीर चेहेऱ्याने म्हणाले, “प्री-टर्म लेबर पेन्स आहेत. पुढच्या चोवीस तासात कधीही बाळंतपण होऊ शकतं!”
लगोलग पोटातल्या बाळांच्या फुफ्फुसांची वाढ होण्याकरता Steroidsची इंजेक्शन्स देण्यात आली आणि वेदना कमी करण्यासाठी मला एक औषध ड्रीपवर लावलं.
ते औषध एक Muscle Relaxant होतं. गर्भाशय हा एक मोठा स्नायू आहे, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी दिलेलं. पण ते शरीरातले सगळेच स्नायू शिथिल पाडतं, अगदी हृदयाचे देखील. त्यामुळे सतत Heart Monitor वर राहावं लागायचं.
लघवीसाठी केथेटर. जेवण म्हणजे सलाईन आणि गळ्यापासून खाली जवळ जवळ Paralysis झाल्यासारखीच स्थिती. सगळ्या जाणीवा शाबूत, पण काहीही करता यायचं नाही स्वतःहून.
अशा परिस्थितीत असताना तिथल्या डॉक्टरनी तिथल्या कायद्याप्रमाणे दिलेली एकूण परिस्थितीची आकडेवारीसकट माहिती. ‘येत्या चोवीस तासात बाळं जन्माला आली तर त्यांची जिवंत राहण्याची शक्यता इतके टक्के, मतीमंद निपजण्याची इतके टक्के, रेटीनल आंधळेपणाची इतके टक्के, मेंदूला गंभीर इजा होण्याची इतके टक्के’.
हादरूनच गेलो होतो मी आणि नवरा दोघेही. आम्ही दोघंच इस्पितळात. मला तो आणि त्याला मी.
आई-बाबांना व्हिसा नाकारलेला. सासूबाई परत भारतात जाऊन आठवडा पण झाला नव्हता, त्यामुळे त्याही इतक्या लवकर परत येण्याची शक्यता नाही.
अशा वेळी धीर देणारं, पाठीवरून हात फिरवणारं एखादं वडिलधारं आपलं माणूस जवळ नाहीये, ही जाणीव किती भयानक असते, ते सांगून समजणार नाही.
त्यात औषधामुळे सुरु झालेल्या जबरदस्त हेल्यूसीनेशन्स!
बाहेर जर काही खुट्ट आवाज झाला की छातीत धडधडायला लागायचं.
टीव्ही बघायला लागले तर टीव्हीवरची बातम्या सांगणारी बाई आता बाहेर येऊन माझा गळा दाबणार, अशी अनावर भीती वाटायची.
नवरा दोन क्षण जरी खोलीबाहेर पडला, तरी सैरभैर व्हायचे मी. दहा-दहा मिलीग्रामच्या झोपेच्या गोळ्या घेऊनही जेमतेम तास-दोन तास झोप लागायची. बाळं इतक्या लवकर जन्माला आली तर त्यांचं काय होणार ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षण सतावणारी. विचार करून करून अक्षरशः वेडी झाले होते मी.
नवरा सतत बरोबर होता. आई-बाबा, मोठे दोघे भाऊ, इतर नातेवाईक, मैत्रिणी सगळे फोनवरून धीर द्यायचे, पण काही सुचत नव्हतं. जगण्याची ऊर्मीच संपलेली होती. एखाद्या विकल क्षणी वाटून जायचं, सगळं संपवून टाकावं एकदाचं, खूप झोपेच्या गोळ्या एकदम घेऊन. मोठ्या निकराने तो विचार मागे ढकलायचे. पण चांगले विचार यायचेच नाहीत मनात. सारखी मनाला ग्रासून बसलेली भीती. केसाळ, कुरूप, हिंस्त्र!
अशाच एका काळ्याकुट्ट क्षणी नवऱ्याने हातात पुस्तक ठेवलं. रणजीत देसाई यांचं श्रीमान योगी. घरून त्याने ते मुद्दाम आणलं होतं. ‘वाच’, तो म्हणाला.
मला तर पुस्तकाचं पानही उलटवता येत नव्हतं स्वतःहून. पण नवऱ्याने डॉक्टरला सांगून एका स्टॅन्डवर ते पुस्तक ठेवलं आणि मी वाचायला लागले. आधी श्रीमान योगीची पारायणं केली होती. पण त्या दिवसांत मला जिजाऊ जशी भेटली, तशी ती आधी कधीच कळली नव्हती.
मी वाचत गेले, पानं नवरा उलटायचा किंवा नर्स.
त्या पुस्तकात एक प्रसंग असा आहे, शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंगच्या तंबूत पंचहजारी मनसबदारी स्वीकारायला जातात आणि अपमानाने विद्ध होऊन परत राजगडावर येतात. ते कुणाशीच बोलू इच्छित नाहीत.
शेवटी जिजाऊ स्वतः त्यांच्या महालात जातात, महाराजांना समजवायला. महाराज एकदम निराशपणे बोलत असतात. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकत नाहीत. तेव्हा जिजाऊ एकदम संतापाने फुत्कारतात.
आता नेमके शब्द आठवत नाहीत, पण त्यांच्या संवादाचा साधारण आशय असा होता:
तो उतारा वाचला आणि अंगाला एकदम झिणझिण्याच आल्या! टेक्सास मधल्या इस्पितळातल्या त्या खिडकी नसलेल्या, तुरुंगासारख्या खोलीत, अंगात पाच-सहा नळ्या खुपसलेल्या अवस्थेत मी तो उतारा कमीत कमी पंचवीस वेळा तरी वाचून काढला असेल.
एकदम स्वतःची लाज वाटली. वाटलं, त्या माउलीने इतकं सगळं सोसून जगाला शिवाजी दिला आणि मी माझ्या पोटातल्या, माझ्या रक्तामांसाच्या गोजिरवाण्या बाळांसाठी एवढंही सहन करू शकत नव्हते?
पुस्तकातल्या जिजाउंचा एकेक करारी शब्द एखाद्या आसूडासारखा माझ्या देहा-मनावर फुटत होता, मला धिक्कारत होता, फटकारत होता आणि त्याच वेळी आईच्या डोळस मायेने मला परत उभं राहण्यासाठी गोंजारतही होता.
कडयाच्या टोकावर उभी होते मी तेव्हा. सभोवताली सगळा अंधारच होता. कुठूनही कसलाही आशेचा किरण दिसत नव्हता. तीन जिवांची जबाबदारी
डोक्यावर होती. त्यांचं पुढे काय होईल ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षणी मनाला ग्रासून होती. त्या विलक्षण नाजुक मनःस्थितीत असताना श्रीमान योगीमधल्या त्या एका उताऱ्याने मला परत जगण्याची जिद्द दिली.
परिस्थितीशी लढण्याची ताकद दिली. खऱ्या अर्थाने माझा स्वतःकडे, माझ्या परिस्थितीकडे, माझ्या देहांत वाढत असलेल्या त्या तीन जिवांकडे बघायचा दृष्टीकोन पार बदलून गेला.
डॉक्टरांचे सर्व निष्कर्ष धाब्यावर बसवत मी पुढे जवळ जवळ नऊ आठवडे त्या इस्पितळात काढले. त्याच शरपंजरी अवस्थेत. त्या दिवसांत मी श्रीमान योगी कमीतकमी पाचवेळा तरी वाचून काढलं असेल.
मुलं जन्माला आली ती सातवा महिना संपल्यावरच. त्या नऊ आठवड्यांमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने नवीन जीवन लाभलं होतं.
कदाचित गरोदर असताना श्रीमान योगी इतक्या वेळेला वाचल्यामुळे असेल, पण माझ्या मुलांना शिवाजी महाराजांच्या गोष्टींचं, त्यांच्या एकूणच चरित्राचं, त्यांचे किल्ले पाहण्याचं अनावर आकर्षण आहे!
योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, एखाद्या प्रतिभावान लेखकाच्या लेखणीतून उतरलेले शब्द, एखाद्या डोंगराएवढ्या मोठ्या व्यक्तीचं चरित्र खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं!
☆ “भारतातहोळीसाजरीकरण्याच्याविविधपरंपरा…” लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल ☆ सुश्री हेमा फाटक ☆
होळी हा रंगांचा सण आहे. रंगांशी खेळण्यासाठी आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो. होळी हा भारतातील महत्त्वाचा सण असल्याने तो उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळी हा सण एकच असला तरी तो सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दक्षिण भारतातील लोक उत्तर भारतातील लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. एकूणच, एकच सण साजरे करण्याची ही मनोरंजक विविधता भारताला विविधतेचे प्रतीक बनवते. भारतातील होळी साजरी करण्याच्या विविध विचित्र आणि परंपरां.ज्या जाणून आपण देखील आश्चर्यचकित व्हाल.
लाठमारहोळी, बरसाना –
बरसाणे यांची लाठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. या निमित्ताने लोकांनी इथे यावे आणि लोक या परंपरेचे पालन कसे करतात ते पहावे. हे ठिकाण मथुरेपासून २७ किमी अंतरावर आहे. येथे होळी केवळ रंगांनीच नाही तर काठ्यांनीही खेळली जाते. असे म्हटले जाते की बरसाना येथे भगवान कृष्णाने राधाचा पाठलाग केला, त्यानंतर तिच्या मित्रांनी भगवान कृष्णाचा काठीने पाठलाग केला. तेव्हापासून येथे महिला पुरुषांचा काठीने पाठलाग करतात
योसांग, मणिपूर –
मणिपूरमध्ये होळीचा सण पाच दिवस साजरा केला जातो. जो यावल शुंग या नावाने ओळखला जातो. या दिवशी लोक भगवान पखंगबाला वंदन करतात. सूर्यास्तानंतर, लोक यासोंग मैथबा नावाची झोपडी जाळण्याच्या विधीसह या उत्सवाची सुरुवात करतात. हे नाकथेंग परंपरेचे पालन करते, जिथे मुले घरोघरी देणगी गोळा करतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मुली दान मागतात. तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी एकमेकांना रंग लावून अनोख्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो.
होलामोहल्ला, पंजाब
पंजाबमध्ये होळीनंतर एक दिवस शीख धर्मीयांकडून होला मोहल्ला साजरा केला जातो. दहावे शीख गुरु गुरू गोविंद सिंग यांनी समुदायातील युद्ध कौशल्य विकसित करण्यासाठी होला मोहल्ला उत्सव सुरू केला. ती येथे योद्धा होळी म्हणून ओळखली जाते. येथे योद्धे आपले पराक्रम दाखवण्यासाठी स्टंट करतात.
मंजुलकुली, केरळ –
दक्षिण भारतात होळी हा सण उत्तर भारतात तितक्या धूमधडाक्यात साजरा केला जात नसला तरी काही समुदाय हा सण साजरा करतात. केरळमध्ये होळीला मंजुळ कुली म्हणून ओळखले जाते. येथील गोसारीपुरम तिरुमाच्या कोकणी मंदिरात रंगांचा हा सण साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी लोक मंदिरात जातात आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण एकमेकांवर हळदीचे पाणी शिंपडतात आणि लोकगीतांवर नाचतात.
शिग्मो, गोवा –
गोवा हे खुद्द मौजमजेचे शहर आहे. होळीचा सणही येथील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. येथील लोक पारंपारिक लोकनृत्य आणि पथनाट्य सादर करून या उत्सवाचा आनंद घेतात. शिग्मो उत्सवाचे दोन प्रकार आहेत. धतोक शिग्मो आणि वडलो शिग्मो. ग्रामीण लोक धतोक शिग्मो साजरे करतात तर सर्व वर्गातील लोक वडलो शिग्मो साजरा करतात.
रंगपंचमी, महाराष्ट्र –
महाराष्ट्रात रंगपंचमीची धूम असते. महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरुन मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते. नाचणे-गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी माठ फोडण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. मासेमारी करणारा समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
महाराष्ट्रात होळी खूप वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने साजरी केली जाते. होलिका दहनानंतरच्या दुसऱ्या दिवशी या उत्सवाला रंगपंचमी म्हणतात. या दिवशी लोक एकत्र येतात आणि एकमेकांना गुलाल लावतात. या दिवशी इथल्या प्रत्येक घरात पुरणपोळी खास बनवली जाते. या काळात तुम्ही इथे असाल तर नक्कीच त्याचा आस्वाद घ्यावा.
लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल
मो ९५६१५९४३०६
संग्रहिका : सुश्री हेमा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈