मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शृंगार मराठीचा’… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘शृंगार मराठीचा’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

अनुस्वारी शुभकुंकुम ते 

भाळी सौदामिनी |

*

प्रश्नचिन्ही डुलती झुमके 

सुंदर तव कानी |

*

नाकावरती स्वल्पविरामी

शोभे तव नथनी |

*

काना-काना गुंफुनी माला 

खुलवी तुज मानिनी |

*

_वेलांटी_चा पदर शोभे

तुझीया माथ्याला |

 

_मात्रां_चा मग सूवर्णचाफा

वेणीवर माळला |

*

_उद्गारा_चा तो गे छल्ला

लटके कमरेला |

*

_अवतरणां_च्या बटा 

मनोहर भावती चेहर्‍याला |

*

_उ_काराचे पैंजण झुमझुम

पदकमलांच्यावरी |

*

पूर्णविरामी तिलोत्तम तो 

शोभे गालावरी ॥

*

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

आयुष्याला क्षणभंगुर का म्हणतात हे मला एक अख्खा दिवस मावळण्याच्या आतच कळलं होतं.

वेग, धावपळ लोकांचा घोळका, मित्रांच्या मैफिली, कौतुक, टाळ्या, हशा जाऊन त्याची जागा काळजी आणि सहानुभूतीने घेतली ते कळलच नाही. तरीही दीड वर्ष मी काहीतरी चांगले क्षण हेरत राहिलो, कधी सावधानतेच्या कड्याकुल्पातून हळूच चोरत राहीलो.

गेले दोन सव्वा दोन महिने मी स्वतःला शारीरिक कड्या कुलपात ठेवले 

कागज के फूल या गुरुदत्तच्या सिनेमात कैफी आझमीने लिहिलंय ….

“वक्त है मेहरबा आरझु है जवा

फिक्र किसी बात की करें इतनी फुरसत है कहा “

… या अशा आयुष्यात लोळायला फार बरं वाटतं. त्यावेळी असं वाटायचं वेळ मिळाला की हे वाचायचं, ते पाहायचं आहे, या विषयावर लिहायचय, अनेक संकल्प डोळ्यासमोर असायचे आज वेळ आहे संकल्पही आहेत पण काही करण्याची ती उर्मी कमी झाली. लिखाण करण म्हणजे माझ्यासाठी समाधी लागण असल्यामुळे मी अधून मधून लिहीत असतो. काही गोष्टी करताना आनंदाच् वातावरणात असणं फार महत्त्वाचं असतं.

सध्या कैफीची जागा सुरेश भटांनी घेतली. त्यांच्या कवितेचे शब्द अधून मधून कानामध्ये लाऊड स्पीकर लावल्याप्रमाणे ऐकू येत असतात.

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले 

एवढे मी भोगले की मज हसावे लागले “

ही कविता त्यानी आपल्यासाठी लिहिली का असं वाटायला लागलं.

हळूहळू लक्षात यायला लागला की माणूस बदललेल्या परिस्थितीत आयुष्याशी जुळवून घेतो. आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. मन नावाचा भुंगा फक्त फुल बदलतो. नसेल ते फुल पहिल्या इतक सुंदर, पण त्यातला मकरंद शोधतच राहतो 

मी कुठल्या गोष्टी बंद करायला हव्यात याची लिस्ट डॉक्टर ने दिल्यानंतर चेहरा पडण्यासाठी मला दिलीप कुमारच्या अभिनयाच्या गुणवत्तेची गरज नव्हती.. तो नैसर्गिकपणे पडला माझ्या मुलाने माझ्या चेहऱ्यावरचं नैराश्य पटकन वाचलं आणि तो एक वाक्य उच्चारला.. ते वाक्य करवतीने लाकूड कापत जाव तसं मन कापत गेल. तो म्हणाला “पब्लिक, चाहते, टाळ्या मित्र, घोळका, कौतुक यातच तुम्हाला सुख आहे का?आम्ही तुमचे कोणी नाही का?'”

आयुष्यात कधीतरी आमच्यासाठी जागा ठेवा हे तो सांगत होता आणि त्याचं काही चुकलं नाही. माणूस आजारी एकटा पडत नाही. तो कुटुंबाला घेऊन आजारी पडतो. शारीरिकदृष्ट्या तो त्रास भोगतो पण मानसिक दृष्ट्या सर्व कुटुंबच त्यात गुंतलेल असतं. आता कुटुंब पहिलं बाकी इतर सगळ्या गोष्टी नंतर असं ठरवून टाकलं.

मुलाकडे राहत असल्यामुळे आजोबा आणि नातू किंवा नात हे नातं सगळं विसरायला लावत, हे लक्षात आलं. दहा-बारा दिवसासाठी नात येऊन गेली आणि नात ( स्वरा) आणि नातू ( कियांश)यांच्याबरोबर खेळताना ते दहा-बारा दिवस किती पटकन निघून गेले हे कळलच नाही. पण त्या गोड आठवणी पहिला लेख जपून ठेवावा तशा मी जपून ठेवल्या. मी पुन्हा लहान झालो जवळपास त्यांच्याच वयाचा त्यांच्याबरोबर खेळलो, कधी पत्ते कधी लहानपणी खेळलेला व्यापारसारखा खेळ (सध्या नवा अवतार पाहायला मिळतो). जणू बालपण पुन्हा अवतरल. त्यांच्याबरोबर खेळताना आपण हरायच असतं हे मला उमगलं. आदर्श विचार केला तर हे चुकीच असेल. लहान मुलांना पराभव झाला तर तो स्वीकारायचा हे शिकवायला हवं ही गोष्ट खरी आहे. पण बऱ्याचदा आजोबाचं मन हे आदर्शवादाला जुमानत नाही. ते नात किंवा नातवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला आसुसलेलं असतं. बऱ्याच गोष्टीने मी घरची शिस्त बिघडवतो. नातवाच्या आई-वडिलांना वाटतं की त्याने जास्त टीव्ही किंवा मोबाईल पाहु नये आणि ते योग्यच आहे पण नातवासाठी आजोबा आणि आजी हे फार सॉफ्ट टार्गेट असते. चेहऱ्यावर अजीजीचे भाव आणून “आबा पाच मिनिटांसाठी मोबाईल दे” असं म्हटल्यावर मी पाघळतो. त्या पाचची पंधरा मिनिटे कधी होऊन जातात कळत नाही.

मला पटतं मी चुकतोय.. पण वळत नाही. माझा नातू सहा वर्षाचा आहे. त्याच्यात मी पूर्ण गुंतून गेलो. सकाळी तो शाळेत जाताना त्याने मला कॉपी दिली नाही तर तो येईपर्यंत मला चैन तू काय दिवसभर माझ्याबरोबर खेळत नाही पण त्याचा आसपासचा वावर माझ्यासाठी भरलेल्या ऑडिटोरियम इतकाच प्रिय आहे. त्यालाही मी हळूहळू मॅच्युअर होताना पाहत आहे. त्याच वाढलेलं प्रेम आणि दिवसागणीक मधासारखं गोड आणि अत्यंत घट्ट होत जाणाऱ् नातं मला सुखावत. अगदी, माझ्या कुठल्याही वैयक्तिक आनंदापेक्षा. पूर्वी आमच्या घरून मुलाच्या घरी आल्यावर परतताना तो सांगायला “आजी येताना काहीतरी घेऊन ये. एखाद टॉय आण. आणि त्याची टॉय ठरलेली असायची, कधी विमान, कधी बोट कधी, बंदूक. मुलांकडून पुन्हा दम यायचा त्याला अशा सवयी लावू नका. मध्यंतरी दहा-बारा दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाताना मी सहज विचारलं, ” काय घेऊन येऊ? ‘

तो म्हणाला ” काहीही आणू नका. फक्त तुम्ही या. तुमची वाट बघतोय” माझे आणि बायकोचे डोळे पाणवले त्याच्यातला हा बदल सुखावत होताच पण मनाला एक वेगळा आनंद देऊन गेला. मध्यंतरी माझ्या व्याहांचा 70 वा वाढदिवस होता. घरातली सगळी मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेली. मी नाही जाऊ शकलो. माझ्या नातवाने आई-बाबांना भंडावून सोडलं की आबा आणि आजी का नाही आले ?आणि मला भेटल्यानंतर तो म्हणाला, “मी ती पार्टी एन्जॉय नाही करू शकलो कारण तुम्ही दोघेजण नव्हता. ” त्याची एक, दोन मिनिटांची मिठी बरंच काही सांगून जाते. त्या मिठीची उब अचानक अंगावर प्रेमाची वीज पडल्यासारखी वाटते. अंग मोहरून जात. कधीतरी तो माझ्याकडे हट्ट करतो, ” आबा क्रिकेट खेळायला चला किंवा मला बोलिंग टाका. किंवा मी सायकल चालवतोय चला ना खाली चला चला ” या क्षणी त्याच्या मागे मला पळणे शक्य नाही. मन पळायला तयार आहे पण शरीर परवानगी देत नाही. मी त्याला समजून सांगण्याचा एकदा प्रयत्न केला तेव्हा अत्यंत निरागसपणे तो मला म्हणाला, “आबा तू कधी बरा होणार?. लवकर हो. ह्या वाक्याने मनात निर्माण झालेला भावना कल्लोळ यांचे वर्णन मी नाही शब्दात करू *शकत. मी त्याला म्हणालो” अरे लवकरच बरा होईन.. मग आपण क्रिकेट खेळू. सायकल चालवू सगळं करू ” आणि मग आकाशाकडे पाहत परमेश्वराला म्हटलं “अरे माझ्यासाठी जाऊ देत नातवासाठी तरी तथास्तु म्हण. निदान हे नवं बालपण तरी मला पुन्हा नीट उपभोगून दे”

 

लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘खरा प्रॉमिस डे याला म्हणतात !’ — लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘खरा प्रॉमिस डे याला म्हणतात ! — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

प्रॉमिस डे म्हणजे

राजं तुम्ही विशाळगड गाठा एक भी गनिम पुढे सरकू देत नाही –

असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे बाजीप्रभू देशपांडे

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

राजं आधी लगीन कोंडाण्याचे, मगच माझ्या रायबाचं –

– असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे तानाजी मालुसरे

प्रॉमिस डे म्हणजे – 

थुंकतो मी तुझ्या जहागिरीवर, माझा जीव स्वराज्यासाठीच

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे मुरारबाजी देशपांडे 

*

प्रॉमिस डे म्हणजे- 

आमचं राज्य घेणं तर राहूदे औरंग्या, तुझीच कबर या मातीत बांधली जाईल

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे संताजी धनाजी 

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

राजं ६० मावळे द्या, एका रात्रीत गड घेतो –

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे कोंडाजी फर्जंद

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न पूर्ण केलं –

-असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे छत्रपति शिवाजी महाराज

*

असा असतो खरा

प्रॉमिस डे…

ते शिकूया, तसे प्रॉमिस पाळूया !

जय भवानी, जय शिवाजी…

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

एके दिवशी तुकोबा 

असे तीरावरी आले..

अन् इंद्रायणीलागी थोडे 

हसून म्हणाले…

*

तुला द्यायचीच होती 

माझी गाथा परतुन..

मग पहिल्याच दिशी,

दिली का न तू आणून?

*

उगा मला तिष्ठविले असे 

तुझिया काठाला

दिस चवदा असा तू माझा

अंत का पाहिला.. ?

*

बोले इंद्रायणी मग..

तुम्ही भक्तांचे भूषण

अशा जगाच्या गुरुचा 

अंत मी कसा पाहीन.. ?

*

ऐका तुकोबा..

कधीच कोणा कळली न मात..

काय घडले सांगते 

खोल माझिया डोहात..

*

अशी गाथा त्या दिवशी 

आली डोहाच्या तळाशी..

जणू कुबेराचे धन 

आले माझिया हाताशी..

*

असा अमृताचा घट 

येता सहजी चालून..

कोणी देईल का ??

थोडी चव घेतल्या वाचून ?

*

तशी गाथा अवचित 

माझ्या हाताला लागली..

सारे विसरून जग 

मीही वाचाया घेतली..

*

पुरे चवदा दिवस केले 

तिचे पारायण

आणि मगच तुकोबा..

दिली तुम्हा परतून.. !

*

तुम्ही आभाळाएव्हढे..

अंत मी काय पाहीन..

गाथा तारी जगताला 

तिला मी काय तारीन ?

*

सारे जग शुद्ध होते..

बुडी माझ्यात घेऊन..

गाथा वाचून तुमची 

गेले मीच उद्धरून

कवी : केशवानंद

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कधीतरी स्वतःसाठी… – लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ कधीतरी स्वतःसाठी… – लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

आनंदात रहायचे असेल तर कमी बोला. इतरांच्या खोचून टोचून बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. दिखावा करू नका, की दुसऱ्यांना मी असा मी तसा सांगण्यात वेळ घालवू नका. तुमच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा. स्वतःला आत्मसन्मान नक्कीच द्या. तुम्ही कुणासाठी नाही, पण स्वतःसाठी खुप अनमोल अमूल्य आहात. हे पक्के लक्षात घेऊन जगणे गरजेचे आहे. सतत त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू नका. त्यात कोणीही इंटरेस्ट घेत नाही.. सगळे माझ्यासारखेच वागले पाहिजेत हा हट्ट सोडा. तुम्ही सर्व जगावर कार्पेट घालू शकत नाहीत. हा, पण स्वतःच्या पायात नक्की चप्पल घालू शकतात.

मेडीटेशन, अध्यात्म, व्यायाम ह्या गोष्टी तुमच्या शरीराला टॉनिक आहे त्याचा कंटाळा करू नका. प्रत्येक गोष्टीत काहीना काही भावार्थ असतो. व्यायाम तब्येत शेवटपर्यंत ठणठणीत ठेवते. अध्यात्म तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. मेडीटेशन तुमचा राग लोभ मद मोह मत्सर यावर नियंत्रण ठेवायला शिकवते.

मुलांकडून फार अपेक्षा ठेऊ नका त्यांच्या आणि आपल्या पिढीत फार मोठा फरक असतो आणि तो कधीच मॅच होणार नाही ही भावना ठेवा म्हणजे अपेक्षांचे ओझे त्यांच्या बाबतीत रहाणार नसते. काळानुसार गरजा व्यक्ती बदलत जातात. अगदी साधे उदाहरण 2000 ची नोट जी पूर्वी आपण फार जपून ठेवली आता रस्त्यात पडली तरी कोणी उचलणार नाही. कारण काळानुरूप त्याचे महत्व कमी झाले. *नाती कितीही जवळची असली तरी वेळ आली की लोक काढता पाय घेतातच. आपण रामायण महाभारत वाचतो ते दुसरे तिसरे काहीही नसून जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. रामासारखा पती असून देखील सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. भर सभेत द्रौपदी वस्त्रहरण झाले एव्हढे सर्व समोर आपली लोक असूनदेखील द्रौपदीला वाचवायला प्रत्यक्ष नारायण ह्यांना यावे लागले. केवळ तिच्या एका चींधीने श्रीकृष्णाने तिची लाज राखली. त्यामुळे सत्ययुग, द्वापार युगातील ही एकवचनी लोक असूनदेखील असे दाखले दिसतात तर कलयुगात आपण अपेक्षा कुणासाठी आणि का ठेवायची. लोकांकडे, नको त्या आठवणी, नाते संबंध फार चर्वीचरन करत बसू नका. जास्त लक्ष न देता, आपले जगणे कसे छान होईल हे बघा.

मी माझ्या रोजच्या जीवनात खूप छान छान सकारात्मक बदल घडवून आणले आहेत का? याचा अभ्यास केला पाहिजे. तेच ते पुन्हा पुन्हा बोलणे विचार करणे माझ्याकडून होते का. आणि त्यात मी स्वतःला गुरफटून घेतले का? त्यातून माझे काढून घ्यायला, काय केले पाहिजे. हेही कळणे तितकेच महत्वाचे आहे. अहो उद्याचा दिवस आपला आहे की नाही ह्याचा भरवसा नाही. मग कशासाठी मनाला त्रास देऊन जगत रहायचे. दिलखुलास मनमोकळे जगणे, म्हणजेच आपणच आपले फुलत राहणे होय. ह्यामुळे ताणतणाव कमी होऊन, मनाची अवस्था आनंदित राहते. कधीच स्वतःला दुर्लक्षित करू नका. तुम्ही खूप महत्त्वाची व्यक्ति आहात. स्वतःला सक्षम बनवा. आदर करा स्वतःचा. कुणा दुसर्‍याची गरजच पाडणार नाही.

दुसर्‍याने तुमची स्तुती केली तरीही हुरळून जाऊ नका, आणि दुर्लक्ष, तिरस्कार केलत तरीही मनाला लावून घेऊ नका. त्यात आपल्याला आपले अनमोल आयुष्याचे अजिबात दिवस घालवायचे नाहीत, भारी जगायला आपण आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा, त्यातून तुमच्या मनाचे प्रतिबिंब उठून दिसते… हसायला फार पैसे लागत नाहीत. त्यात अजिबात कंजूषी करू नका. रोज सकाळी उठून जसे जमेल तसे मस्त व्यायामाने सुरुवात करा. दिवसभर चांगली एनर्जी टिकून राहते. वेळ नाही वेळ नाही, ही नुसती पळवाट असते. वेळ मिळत नसतो. तो काढावा लागतो. उपवास शरीराला चांगला. तसेच मनाला आनंदी, फ्रेश ठेवायचे असेल तर. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नको तो विचारांचा गुंता, त्यात अडकायचे नसते. मानस शास्त्र असे सांगते की दिवसाला तुमच्या डोक्यात 80 हजार विचार येतात. जर तुम्ही सगळेच घेऊन बसलात तर जगणे हराम होईल. आपली आण, बाण, शान आपणच आहोत हे लक्षात घेऊन जगणे सुरू ठेवले की मग फारसे काही जाणून बुजून करावेच लागत नाही, की नको ते प्रश्न फारसे डोक्यात पिंगा घालत नाहीत.

परमेश्वराची आठवण स्मरणात राहू द्या. केवळ आणि केवळ तोच तरून नेणारा आहे. फक्त आपला त्यावर विश्वास पाहिजे. देव कधीही कुणाचे चांगले किंवा वाईट करत नाही. मनुष्य आपल्या कर्मानेच चांगले वाईट दिवस आणतो. देव कुठे माझ्याकडे लक्ष देतो असे म्हणून त्याच्यावर अविश्वास दाखवू नका किंवा त्याला टाळू नका. कितीही पैसा प्रॉपर्टी आली तरी सगळे इथेच सोडून जायचे आहे ही जाणीव ठेवली की मग अहंकार आपोआप गळून पडतो. ख-या गरजवंताला नक्की मदत करा. आपण फक्त शंभर वर्षाच्या लिजवर इथे आलो अहोत हे लक्ष्यात ठेवले तर मीपणा निघून जातो, आणि आयुष्याचे सोने झाल्याशिवाय रहात नाही. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यांना मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.

लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी

प्रस्तुती – श्री अनिल वामरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

खरंच आम्ही वांझ आहोत…

(बहुतांश उच्चशिक्षित लोकांच्या घरातील भयाण वास्तव.) 

“नमस्कर सुधाकरराव, फार दिवसांनी भेटलात.”

“होय खरे आहे, मी इथे नव्हतो. तिकडे कॅनडा ला गेलो होतो.” सुधाकरराव बोलले.

“कॅनडाला?” शंकरराव म्हणाले.

“होय दोन मुले होती. एक आहे कॅनडाला, दुसरा ऑस्ट्रेलियाला.”.. सुधाकरराव म्हणाले

”अहो. होती काय म्हणत आहात?” शंकररावांनी आ वासुन विचारले.

…”नाहीतर काय म्हणणार. आज भारतात आम्ही दोघेच आहोत.” शंकरराव बोलते झाले…” वय झालं आहे. तिचं सततचं दु:खणं असतं. दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही. साधी दूधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे. तो शेजारचा आसाराम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे. चारपाच मुलं, दोन-तीन मुली, आठ दहा नातवंडं… नुसता गोंधळ असतो. त्याचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, तर कुणी डोक्याला तेल लावतं असतं… साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात, दवाखान्यात नेतात, सलाईन लावतात. पलंगावर दोघं जण उषा पायथ्याला बसतात. दवाखान्याबाहेर आठजण बसून असतात. कुणी शिरा आणतं, कुणी सफरचंद आणतं, कुणी बिस्किटं आणतयं. आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं…… आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, अलिशान गाडी, पण साधं गेट उघडायला कुणी नाही. गाडी चालवायला कुणी नाही. त्या आसारामच्या दारात मोडक्या तोडक्या का असेना चार पाच बाईक उभ्या असतात. कुणी भाजी आणतयं, कुणी पिण्याचं जार आणतंय, कुणी दळण आणतंय, कुणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जातंय, कुणी स्टॅन्डवरच्या पाहुण्याला आणायला जात असतंय. म्हतारी दोनचार नातवाला घेवून किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते.

रात्री बारा वाजेपर्यंत यांचा आरडा ओरडा, गप्पा, हास्य कल्लोळ चालुच असतो. दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं… माझ्या कॅनडाच्या मुलाला ३० लाखांच पॅकेज, ऑस्ट्रेलिया वाल्याला ३५ चं पॅकेज आणि आम्हांला लाख भर पेन्शन… त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जेवण सोन्यावाणी.

आता कोण सुखी तुम्हीच सांगा शंकरराव…… तो आसाराम का मी एक्स कमिशनर… माझ्याकडे कुत्रं नाही. आसारामकडे माणसंच माणसे… आता बोला आम्ही वांझ नाही तर काय आहोत.

परवा मोठ्या मुलाला ही बोलली ‘ एकदा ये महिनाभरासाठी ‘. तर तो म्हणाला ‘ महिनाभरासाठी? मला एक तासाचा वेळ नाही. ’…. चिडून ही म्हणाली,”मेल्यावर तरी येणार का? नाही. तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला. सांगा शंकरराव आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत ? … मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यावर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. नापास मुलंच आई बापांचा खरा आधार आहेत. आसारामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण त्याच्या इतका सुखी कुणी नाही….. परवा आसारामच्या मुलानं हिला दवाखान्यात नेलं आणलं. आसारामच्या सुनाने स्वयंपाक करुन दिला.

काय मिळवलं मी कुणासाठी?… मुलं म्हणतात आम्हाला तुमचं घर नको शेती नको…

… आणि आणि तु…. म्हीही न.. को.. त.”

सुधाकररावांचे डोळे भरून आले. शंकररावांनाही नाही आवरले.

शकंररावांनाही मुलं जास्त काही मोठी झाली नाही याची जी खंत होती, ती दुर झाली.

सुधाकरराव एकदम कठोर झाले. म्हणाले…

“मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार. बाकी काही नको.”

जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे.

मुलं आय आय टी झाली आणि आय माय टी ला म्हणजे चहाला महाग झाली.

मुलं असावीत पण कामाची असावीत. नसता काय नुसती पाटी लावायला कशाला हवीत.

… शंकररावांनी घरी परततांना नातवंडासाठी एक नाही दोन टरबूज घेतले आणि समाधानाने घराकडे धावले. त्यांचं गोकुळ त्यांची वाट पहात होते.

– – सहकुटुंब सहपरिवार …. तेथे आनंदाला नाही पारावर.

– – – वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे.

मोठे घर पोकळ वासा, हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहीजे.

पैसा हवा की, समाधान शांती…. प्रेम हवयं की, दुरावा….. एकलकोंडे रहायचं की, आनंदी परीवारात.

… माणुसकी हवी की, फक्त पैसा……. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची खरी गरज आहे…

म्हणून पालकांनो आपल्या मुलींना गोकुळासारखे घर भरलेले असलेल्या परीवारातच द्या. म्हणजे ती एकटी पडणार नाही. तुमच्या मुलीला सुख समाधान समृध्दी आनंद अशाच परीवारात मिळेल जेथे माणसेच रहातात. चांगली माणसें चांगला परीवार पाहून आपण आपल्या मुली अशाच घरी द्या.

योग्य वेळी योग्य वयातच मुलामुलींचे विवाह करा. भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करु नका. हे क्षणिक सुख आहे…….

इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणसं ।

माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं ।।

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.

जिभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे.

माणूस हवा तेवढा वृध्द होवो, देहावर कितीही सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच टिकून राहतो !

जिभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणं, कठीणातलं कठीण काम आहे

मुख-म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत. पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते.

कुणाला ती घायाळ करते,

तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते.

तिच्यातून अमृत झरते,

तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.

जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात, तसेच काटेही उगवतात.

अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही. अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर उत्तम ताबा मिळवू शकतात, तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात. कटू, पण त्रिकाल सत्य…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवघर… लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

देवघर… लेखक –  अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

आपण सगळे सश्रद्ध लोक वर्षातून एकदोनदा किंवा आणखी काही वेळा निरनिराळ्या तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन घेतो.

काही आणखी सश्रद्ध माणसं तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवदर्शन घेतात. एखाद्या मठात, देवळात नित्यनेमाने जातात. देवालय हे एक पवित्र स्थान असते, यात शंका नाही. कारण, देवळात रोज त्रिकाळ पूजाअर्चा, अभिषेक, मंत्रोच्चार वगैरे सुरु असतात. तिथे वेगळी शक्तिस्पंदने असतात.

पण माझ्या मते आपल्या निवासस्थानातील देवघर ही जागादेखील तितकीच बलवान आणि उत्कृष्ट असते, हेही कायम लक्षात ठेवा.

तुमच्या देवघरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली नसेलही, रोजच्या रोज कदाचित षोडशोपचार पूजाही होत नसेल; पण आपल्या खाजगी कौटुंबिक देवघराविषयी आपल्या मनात खास स्थान असते. आपण निदान तिथे रोज हात जोडून प्रार्थना करत असतोच. आपल्या प्रार्थनांची सकारात्मक शक्ती देवघरात एकवटलेली असते. तुमच्या देवघरातील मूर्तींशी तुमचं विशेष कनेक्शन असतं…आईने माहेरहून दिलेली अन्नपूर्णा, बाळकृष्ण, आजोबांनी हरिद्वारहून कोणे एके काळी आणलेला शाळिग्राम, आजीने रामेश्वरहून आणलेलं दगडी शिवलिंग, एखादं पुरातन नाणं, अनेक पिढ्या देवघरात सुखेनैव असलेला खंडोबाचा टाक… काय नं काय…

ही सगळी मंडळी तुमची परिचित असतात. रोज तुमच्या प्रार्थना ते ऐकतात, तुमच्या खापर पणजोबांचे शब्दही त्यांच्या कानी पडलेले असतात. तुमचे कठीण संघर्षांचे, कटकटीचे, आनंदाचे, सुखाचे सगळे दिवस त्यांच्यापैकी प्रत्येकाने अनिमिष नेत्रांनी बघितलेले असतात. तुम्ही कधीही घराबाहेर गेलात तरी तुमच्या अनुपस्थितीत देवघर घराची काळजी घेतं, यावर तुमचा ठाम विश्वास असतो. जुने देव भग्न झाले किंवा अन्नपूर्णेची पळी मोडली तरी तुमचं मन खट्टू होतं. काही अपरिहार्य कारणांमुळे देव विसर्जन करावे लागले तर तुम्ही डिस्टर्ब होता, नवीन बनविलेल्या मूर्तींशी कनेक्ट व्हायला तुम्हाला वेळ लागतो.

प्रत्येक मूर्तींशी तुमचं सुरेख नातं असतं.

जुन्या शाळिग्रामवरचा एक चकचकीत ठिपकाही तुम्हाला माहिती असतो. समर्थांच्या मूर्तीच्या पाटावरचं डिझाईनही तुमच्या नीट लक्षात राहतं.

लक्षात ठेवा…. तुमचं देवघर हे खूप सुरेख शक्तिपीठ आहे. ते कायम सुंदर ठेवा, स्वच्छ ठेवा, फाफटपसारा न मांडता आटोपशीर आणि देखणं ठेवा. रोज जमेल तशी पूजा करा.मूर्ती अधूनमधून उजळवा. रोज तुपाचे निरांजन, चंदन उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न ठेवा. तुमचे घरचे देव, कुलदेवता आणि सद्गुरु  पण महत्त्वाचे आहेत.

लेखक: अज्ञात

संग्राहक – श्री अनंत केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बायको वाल्या कोळ्याची…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “बायको वाल्या कोळ्याची…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

बायको कशी असावी ?

बायको असावी तर, वाल्या कोळयाच्या बायकोसारखी…

वाचायला जर विचित्र वाटतंय ना ?पणआज तिचीच गरज आहे.

 रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस, या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण, म्हटले की, आम्हां भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो.

रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात… !

 

 ‘पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा’!

 ‘पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !’,

भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !’,

 ‘पत्नी असावी तर, सीतेसारखी !’

 ‘भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी!’

 

सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, ‘बायको कशी असावी?’

 

 मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा.

तो म्हणजे,

‘बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !’

कारण तीच खरी रामायणकर्त्याची ‘कर्ती ‘ आहे !हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षितच राहिले आहे.

 

रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.

 

वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात

अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा.

एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले!

 

“अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस ?”असे विचारल्यावर, “माझ्या बायको-पोरांसाठी!”

 असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, “जा. तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय?”

“तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो, ” असे म्हणत, वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारून घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात.

वाल्या बायकोला धमकावून विचारतो. “बोल. तू माझ्या पापात सहभागी आहेस की, नाही?”

 

 आता असा विचार करा! शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खांद्यावर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रूरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षित, अडाणी, परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार?

 

पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता, “नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!”असे सडेतोडपणे सांगितले.

 

नंतर तीच घटना वाल्या कोळ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.

 

गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षित तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात.

तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दीक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकीऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो.

 

ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही? की,

समजा, वाल्या कोळ्याच्या बायकोने, ‘व्हयं.. आम्ही आहोतच की, तुमच्यासंगं !’ असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?

 

नारदाचं काही खरं नव्हतंच.

पण, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते?

अशी रास्त शंका घेता येऊ शकते !

 

पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या ‘सुसंस्कृत भारतीय गृहिणी’ नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल.. !

 

फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे.

असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल !

पुन्हा एकदा आपल्या भारत ‘भू’ वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळी वाल्मिकी मुनींमध्ये रूपांतरित झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल… यात शंकाच नाही…!

  ☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मीच माझी व्हॅलेंटाईन!… कवी : सौ. शुभांगी पुरोहित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

मीच माझी व्हॅलेंटाईन!... कवी : सौ. शुभांगी पुरोहित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

माझ्या मनाचे गाणे

 माझ्यासाठीच गाईन

आवडत्या ठिकाणी माझ्या,

माझ्याच बरोबर जाईन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

मीच माझी व्हॅलेंटाईन.

 

इतरांसाठी जगण्याचा

काळ मागे गेला,

वाळूसारखा हातातून

काळ निसटून गेला.

 

दुसऱ्यांचे शब्द जितके

फुलासारखे झेलले.

तितके तितके तेही मला

गृहीत धरत गेले.

 

ताट होते माझे

पण मेन्यू होता त्यांचा.

प्रवास होता माझा

 पण व्हेन्यू होता त्यांचा.

 

यालाच मी प्रेमाची

व्याख्या म्हणत गेले.

बेमालूमपणे मनाला

अलगद फसवत गेले.

 

फसवे असले बंध सारे

हलकेच सोडवत जाईन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

 मीच माझी व्हॅलेंटाईन.

 

मित्र मैत्रिणी, सगे सोयरेही

 महत्त्वाचे असतात.

स्टेशन येता ज्याचे त्याचे

उतरून सर्व जातात.

 

कुठे माहीत कोणा कोणाची

कुठपर्यंत साथ?

आपल्या हाती शेवटपर्यंत

 फक्त आपलाच हात.

 

सन्मान करेन स्वतःचा,

स्वानंदात राहीन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

मीच माझी व्हॅलेंटाईन.

 

गुलाबाची सुंदर फुले

स्वतःलाच घ्यायची.

दुसरं कोणी देईल म्हणून

 वाट कशाला पाहायची?

 

शुगर आहे, बी पी आहे

असायचंच की आता.

देवाइतकाच धन्वंतरी

या देहाचा त्राता.

 

८०% डार्क चॉकलेटचा

अख्खा बार घेईन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

मीच माझी व्हॅलेंटाईन.

कवी: सौ. शुभांगी पुरोहित

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares