📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साई…  – कवयित्री : सुश्री अर्चना दिनकर फडके  ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

साई

कवयित्री: श्रीमती अर्चना दिनकर फडके

प्रस्तुती: श्रीमती शीतल कुलकर्णी

 

नवीन सुनेचा गृहप्रवेश झाला, सून म्हणाली सासूला

“काय हाक मारु आजपासुन मी तुम्हाला? “

सासू संभ्रमात, का हिला असा प्रश्न पडला?

वाटलं, पटकन म्हणावं, ” अगं, आईच म्हण मला”

पण हे नातं आहे, कुठला कागद नाही चिकटायला

वेळ द्यावा लागेल नातं आकार घ्यायला

सावरून स्वतःला म्हणाली सुनेला

“मनापासून जे वाटेल ती साद घाल मला

जे नातं जोडशील ते निभावून न्यायचंय तुला आणि मला”.

 

नव्या नवलाईचे दिवस सुरु झाले

मुलगा सून संसारात रमले

रोज नवीन बेत आखले गेले

कधी नाटक कधी सिनेमे बघितले

रोज नवनवीन पदार्थ होऊ लागले

कधी सासूने कधी सुनेने केले

वर्षाचे सण मजेत साजरे झाले

पण सासूच्या एक लक्षात आले

सुनेने तिला प्रेमाने साद घालायचे टाळले

मन खट्टू झाले पण वेळीच स्वतःला सावरले

 

ओठात एक नि पोटात एक, सून नाही अशी आपली

साद घालेल ती कायमची, ही सासूची खात्री पटली

 

दिवस सरले नवीन पाहुण्याची चाहुल लागली

गोड बातमी सर्वत्र पसरली

सासरी माहेरी कौतुकाला उधाण आले

सुनेचे मोठ्या प्रेमाने लाडकोड सुरु झाले

प्रसंगी मुलाला दटावले सुनेला पाठीशी घातले

सासूची लगबग सून डोळे भरुन पाहू लागली

सुनेचं दिवसागणिक बदलतं रूप सासू डोळ्यात साठवू लागली

 

दिवस काही सरले आणि सुनेने प्रेमाने साद घातली

” साई”

सासू गोंधळली. सुनेकडे पाहून विचारती झाली

“मला हाक मारली? “

सून प्रेमाने हसली आणि म्हणाली,

“सासू तुम्ही आहात पण आई माझी झालात

दोन नात्यांची सांगड घालून ‘साई’ म्हणायला केली सुरुवात”

सासू आनंदली, सून तिला बिलगली

दोघींच्या मनातली किल्मिषं दूर झाली

मग सासू म्हणाली सुनेला, “मानलं आहेस मला आई

तर आईसारखं कधी रागवले तर चालेल ना तुला बाई? “

सून म्हणाली, ” मानलं आहे तुम्हाला आई

मुलीसारखी रुसले तर सावराल ना हो साई? “

एक नातं आकार घ्यायला लागलं

सासू-सुनेचं चांगलच सूत जमलं!

 

दोघींनी मिळून मग निर्णय घेतला काही

घरातल्या पुरुषांना वादात कधी गुंतवायचं नाही

पुरुष याबाबत असतात अलिप्त

मोडू नये त्यांची ही शिस्त

दोघींनी करायची एक एक वही

लिहायचं त्यात सर्व काही

हेवेदावे, रुसवेफुगवे सगळं काही

कैद करायला वापरायची ती वही

आठवड्यातून एकदा करायची वहीची अदलाबदल

वाचून करायचा त्यानुसार स्वभावात थोडा बदल

 

वहीत लिहायला सुरुवात केली

मनातली अढी कमी होत गेली

एकमेकींच्या चुकांची दोघींना गम्मत वाटू लागली

क्षमाशील मनाची नव्याने ओळख पटली

 

मुलांच्या संसारवेलीवर फुले उमलली

मुलगा सून आता कर्तीसवरती झाली

नात्यांची वीण आता अधिक घट्ट झाली

तशी दोघींची वही आता कोरीच राहू लागली

वही आता कोरीच राहू लागली!

 

नवीन नात्याच्या उंबरठ्यावर उभी एक आई

येईल ना तिला पण होता कुणाची तरी “साई”?

 

कवयित्री: श्रीमती अर्चना दिनकर फडके

प्रस्तुती: श्रीमती शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments