मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तटस्थता..” ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “तटस्थता ..”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची  वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही. मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट, हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची, ह्याचे जणू काही  प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे? ती महत्वाची आहे का? आपल्या मताची गरज आहे का? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात, त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते. 

आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण, परके कोण? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का? किंवा मग जी होती ती आपली होती का? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं, ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला  हवं तशी माणसे वागतच नाहीत, हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझं हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होतं . हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणं कमी होते. कर्तव्यभावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते. त्यामुळे तटस्थता येते.

आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं.  हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच; पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलंही ओझं नसत. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल, ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे होऊ शकत नाही; पण दूर राहून ती करू शकतो, हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो, त्या गोष्टी किती फोल होत्या, हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण  केलं जातं .

नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहीत झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय  करू नये. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं/उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.

तर, काहींचे आयुष्य मात्र ‘आम्ही अजूनही शिकतोय !’

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो;

नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

 

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो;

नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

 

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो;

नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.

 

आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली;

नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

 

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो;

मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.

 

आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला;

नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

 

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम;

नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.

 

थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते;

तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !!

 

दोन्हीच कॉकटेल बनवुन आयुष्य सुखी करीत आहे .

आयुष्य सुंदर आहे !

प्रस्तुती : सौ.शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘प्रिय आशाताई…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘प्रिय आशाताई…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(सुरेश भटांची आशाताईंना समर्पित एक नितांत सुंदर कविता…)

तारुण्य तुझ्या हृदयाचे हें असेच बहरत राहो !

वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो !

 

आता न तुझे कुठल्याही जखमेशी देणेघेणे !

पाऊस तुझ्यावर सा-या सौख्यांचा बरसत राहो !

 

हा कंठ तुझा अलबेला ! हा रंग तुझा मतवाला !

तलवार तुझ्या गाण्याची बिजलीसम चमकत राहो !

 

तू सरगम सुखदुःखांचा जपलास कसा ? उमजेना,

तो कैफ तुझा माझ्याही धमन्यांतुन उसळत राहो !

 

तुज बघून हटल्या मागे आलेल्या वादळलाटा….

सुखरूप तुझ्या गीतांचे…. गझलांचे गलबत राहो !

 

तू अमृतमय मद्याचा खळखळता अक्षय प्याला !

एकेक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवत राहो !

 

ही सांज न आयुष्याची ! आताच उजाडत आहे…

चंद्राला उमगून गेले ! सूर्याला समजत राहो !

 

उदंड निरामय आयुष्यासाठी खूप शुभेच्छा

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत…” लेखक : डॉ. नील वाघमारे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत…” लेखक : डॉ. नील वाघमारे 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

आज संध्याकाळी इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण करेल.

आपण सर्वजण या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार होऊ.

या पार्श्वभूमीवर, इस्रोच्या आर्मीत असलेल्या एका हिऱ्याची गोष्ट शेअर करायची आहे.  त्यांचे नाव श्री भरत कुमार के, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ…

कोळशाच्या खोल खाणीत पडलेला हा हिरा श्री रामदास जोगळेकर आणि त्यांच्या वहिनी सौ वनजा भावे यांनी भिलाई (छत्तीसगड) जवळील चारोडा गावातून 10’x 10’ च्या झोपड्यातून शोधून काढला.  गावाच्या आजूबाजूला कोळसा आणि लोखंडाच्या खाणी आहेत आणि तिथे तासभर उभे राहिल्यास कोळशाला हात लावला नाही तरी तुमचे कपडे काळे होतील अशी परिस्थिती आहे….

श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना कळले की सेंट्रल स्कूल, भिलाई मार्शलिंग यार्डमधील एका मुलाने गणित आणि भौतिकशास्त्रात 99% आणि रसायनशास्त्रात 98% गुण मिळवले आहेत आणि त्याला इंजिनीअरिंग करायचे आहे, तेव्हा ते त्याला भेटण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी गेले. त्यांना त्या मुलामध्ये ‘स्पार्क’ दिसला आणि त्यांनी त्याच्या आयआयटी कोचिंगची फी भरली.

मुलाने आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळवला त्याची फी देखील दोघांनी भरली आणि श्री. भरत कुमार के हा टॉपर होता आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 8 पैकी 7 सेमिस्टरमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले!!

आयआयटी, धनबादमधून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये SAIL ने सिलेक्ट केलेला तो एकमेव कॅन्डीडेट होता आणि फायनली 2019 मध्ये इस्रोने त्याची निवड केली.

त्यांचे वडील सुरक्षा रक्षक आहेत आणि आई खाणीतील कामासाठी वाट पाहत असलेल्या रोजंदारी कामगारांना इडली विकते.

..  श्री. भरत कुमार के आणि त्यांच्या पालकांना सलाम.  कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून तो चमकदार बनवण्याचे श्रेय श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना जाते. त्या दोघांनाही नमन….

लेखक : डॉक्टर नील वाघमारे

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्य…एक चकवा..… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आयुष्य…एक चकवा. ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आज दोघंही खूपच आनंदात होते..पुण्याहवाचन करण्याची खूप इच्छा होती पण मुलांच्या रूटिनमध्ये व्यत्यय नको म्हणून एकत्र मानसपूजा केली..लगबगीनी आपल्या वाटणीची कामे आटोपली..मुलांना …नातवंडांना सरप्राईज द्यायचं ठरवून दोघंही संध्याकाळीच घराबाहेर पडले…

“आता कळवू मुलांना” उतावीळपणानी तिनी विचारले..अन् होकाराची वाट न बघताच मोबाईल काढला..

तोच मुलाचा फोन वाजला…टेलिपथी..म्हणतच तिनी आनंदानी फोन घेतला…आणि…काही बोलण्यापुर्वीच तिकडून मुलानी निरोप दिला..

“आई..आज आमचा स्वयंपाक नको करूस हं…हिची मैत्रिण खूप वर्षांनी भारतात आली..तिच्यासोबत डिनरला जायचेय..मुलंही चलणार अाँटीला भेटायला…तुम्ही जेवून घ्या हं…आणि हो..औषध – गोळ्या घ्यायला विसरू नका हं..बाय”…

काहीही न बोलता तिनी फोन ठेवला..

तो किंचीत हसला अन् बोलला..”मुलांचा कार्यक्रम ठरलाय नं”..

तिनी मान हलवली..तो उदासला..म्हणाला..”आता..?..ह्या सरप्राईजचं काय?..”

“आपलंच सरप्राईज..आपणच एंजॉय करायचं..”

त्याचे डोळे भरले…. पण ती शांतच…. “ चल घे…”

रात्री मुलाची व्हॉट्स ऍप पोस्ट आली..” आम्ही पोहोचलो…तुम्ही लवकर या..”

आईनी पोस्ट टाकली..” तुम्ही झोपा..”

मुलानी पुन्हा विचारलं..” तुम्ही कुठे,? “

आईनी दोघांचा हॉटेलमध्ये अरेंज केलेल्या डिनरचा फोटो टाकला..

“त्या” दोघांच्या मागच्या कट-आऊटनी मुलगा दचकलाच…

त्यानी थेट फोन लावला…”आई तुम्ही कोणत्या हॉटेलात आहात..? मी येतोय..”

आई शांतपणे म्हणाली..”असू दे बाळा…आम्ही हॉटेल सोडलंय..आणि हो..आज आम्ही घरी येणार नाही..लोणावळ्यासाठी निघालोय..तुम्ही शांतपणे झोपा..आणि हो..बाबांचं  नेहमीचं दरवाजे लावण्याचं काम आजच्या दिवस करून घे हं बेटा..सर्वांना आजच्या विशेष दिवसाचा विशेष आशिर्वाद सांग…बाय..”

मुलानी पुन्हा व्हॉट्स ऍप उघडला..आणि भरल्या डोळ्यानी वाचलं…”50th..Wedding Anniversery”…..

त्यानी हळूच तिचा हात हातात घेतला..डोळ्यांच्या कडा पुसत ती म्हणाली…” जीवन म्हणजे चकवा असतो नाही?…फिरून त्याच जागी आणणारा..?. ..वैवाहिक जीवनाची सुरूवात आपण दोघांनीच केली होती नं?…आजही आपण दोघंच उरलोयत..”

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गणपती का बसवतात ?… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ गणपती का बसवतात ?… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

गणपती का बसवतात ? त्याचे विसर्जन अनंत चतुर्दशीला का होते?…. 

आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले. परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली व त्यांना महाभारत काव्य लिहिण्याची विनंती केली. मला गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल, त्यामुळे गणपतीला थकवा येईल त्यावेळी पाणीही ‌ वर्ज्य होते अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास ऋषींनी गणपतीच्या शरीरावर मृतिकेचे लेपन केले. आणि भाद्रपद चतुर्थीला त्याची यथासांग पूजा केली. मातीचे लेपन असल्यामुळे गणपती अडकून पडला. म्हणून यांना पार्थिव गणपती हे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर गणपतीच्या शरीराचे तापमान वाढले आहे आले. हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात ठेवले. तेव्हापासून चतुर्थीला गणपती बसवला जातो.  त्याला वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले जातात आणि अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन होते ही प्रथा पडली.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईची आई… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आईची आई… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

ज्यांना ज्यांना आई आहे, मग ती तरुण असो की वृद्ध, त्या सर्वांनी मुद्दाम खालील लेख वाचून तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा…!

( पेशाने सर्जन असणाऱ्या मुलाने लिहिलेला अतिशय सुंदर लेख !) 

 

वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. सर्व अवयव नव्वदीतले. 

झिजलेल्या कंबरेवरचा मुकामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं.

तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच… वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता. 

पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. 

 

सल्ला मसलतींचा पाउस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर… मनाला पटेना.

अनेक पर्यायांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचा दुष्काळ.

मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं. चिडक्या, हट्टी म्हातारबाळाची आई व्हायचं.

 

लाळेरं लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा… दमदाटी करत भरवलेलेचे चिऊ काऊचे घास. 

कधी ठसका, कधी मळमळ तर कधी उलटी… बहाणेच बहाणे.

 

पेशाने सर्जन, मलमूत्र रोगांशी जुनी दोस्ती. त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं. डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला  पर्यायच नव्हता. वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसून, पावडर लावून कपडे घालण्यापासून ते तेल लावून वेणी फणी करण्यापर्यंत सगळं.

 

दिवसातून दोन तीनदा घर ते हॅास्पिटल, हॅास्पिटल ते घर अप-डाऊन. धावपळ होत होती; पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात माझाही पान्हा फुटत असावा. 

मनाच्या कुठल्यातरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो. कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आईपण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं ! 

 

पण फार काळ नाही. काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणीने गड सोडला.

 

मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली. कुणीतरी म्हणालं पुण्य कमावलंस. 

त्यांचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेसं होईल.

 

देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू. देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं। असं कुठंतरी वाचलेलं. त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई.

 

रामची असो की शामची.

कैकयी असो की गांधारी.

आई सगळ्यांची सारखीच.

 

शरीराने आणि मनाने आपल्या गूढ देवराईतील शक्ती देवता… फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या ओंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी… प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुवतारा…  तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपे‌क्षाही भारी. खालून वर नेणारं… बिजांडातून ब्रम्हांडात पोहचवणारं.

तिच्या बिजांडात अंकुरलेला सूक्ष्म कोंब म्हणजे आपण… एक दशांश मि.मि.पेक्षाही लहान. गर्भाशयाच्या भिंतीवर ‌मुळं पसरून, तिचंच रक्त शोषून तगणारं बांडगुळ.

 

मधेच केव्हातरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून. त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरुवात होते… चैत्राच्या पालवीसारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव. तिचीच ऊर्जा घेऊन सुरू झालेली इंजिनं… आदिपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारी.

नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या ह्रदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा. 

नॅनोग्रॅम पासून ते किलोग्राम पर्यंतची वाढही तिच्याच कोठारातील.

 

कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका….  

कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा. 

लाथा मारणारं बाळ, आणि लाथा मारणारी परिस्थिती, दोघांना झेलत तारेवर झुलणारी डोंबारीण.

 

नऊ महिने नऊ दिवसांची कसरत. .. ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव. 

पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचं घुमजाव.‌

 

बाळनिवासाच्या पायाभरणीत फिक्कट करणारे दिवस. .. धापा टाकत टाकत केलेलं रांधा वाढा, उष्टी काढा. .. सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटीका भरल्याची नांदीच.

 

चंद्र, ग्रह, तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले, की सुरू झालेल्या प्रसव कळा.

खोल, गूढ, अगम्य कृष्ण विवरातील वादळ.

सुरुवातीला समुद्राच्या हळुवार लहरींचे हिंदोळे. .. नंतर याच लहरींवर स्वार झालेल्या भरतीच्या धडका…  

एकामागून एक…  

…. बाळाच्या ओढीने वाढलेल्या कळा जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा. काही सौम्य काही रौद्र… उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत घट्ट आवळून घेतलेल्या, कळांवर कळा…

 

प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यासाठी भिंतीपासून विलगू लागतो… 

मुळापासून विस्थापित होण्याच्या भितीने बाळही अस्वस्थ होऊ लागते.. .

अशुभ संकेतांची टिटव्यांची टिवटिव… गुदमरणाऱ्या बाळासाठी, खचलेला धीर मुठीत आवळून एक जोराची किंकाळी आणि  निकराची एक शक्तीशाली कळ.

 

किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढयात तरंगत आलेलं आणि दाईने झेललेलं गोंडस बाळ.

…. मातेने सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद, म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास.

…. दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृतकुंभाला शोधणाऱ्या अधाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे.

…. फुटलेल्या पान्ह्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळाच्या ओठांवर विसावले की, अमृताच्या अभिषेकात न्हाऊन तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो.

 

माता कुराणातील असो वा पुराणातील. तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं… 

अनुसूया असो की आदिती….. दिगंबराची असो किंवा पैगंबराची… 

…. आई शेवटी आईच असते !

 

जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं त्याचं नातं अद्वैत…  

तिने शून्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता… 

त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शुन्यच. 

 

जगभर फिरला, पण तिच्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॅाल नाही दिसला.

 

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबुकं ही या नात्यात फक्त कागदं आहेत…..  

आईचं कर्ज फेडण्याइतका त्यात बॅलन्स कुठे आहे ?

 

या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग… एक उतराई…..  

…. शक्य असेल तर जरूर बना !

 

लेखक : अज्ञात.

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मास्तरच्या लेखणीतून …” – लेखक : एक अज्ञात मास्तर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मास्तरच्या लेखणीतून …” – लेखक : एक अज्ञात मास्तर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

विद्यालयाच्या जागेपायी

कुणीच इथं भांडलं नाही

अन् देवालयाच्या जागेसाठी

रक्त कमी सांडलं नाही..

 

माझाच देव मोठा म्हणण्यात

रक्ताच्या नद्या वाहील्या

ज्ञानगंगा कोरडी पडत

ओसाड शाळा झाल्या…

 

शाळा अजूनही तशीच

पडक्या, तुटक्या भिंतींची 

गरीब माझ्या देशामधी

उभी मंदिरं सोन्याची…

 

शाळेमधली दानपेटी

भरलेली कधी पाहिली नाही

अन् मंदिराची दानपेटी

रिती कधी राहिली नाही…

 

शाळेतला पालक मेळावा

पालकांवाचून राहून गेला

देवालयात चेंगराचेंगरीत

माणूस मात्र तुडवून मेला…

 

विद्या, ज्ञान सर्व देऊन

गुरूजी गरीबच राहीला

अन् अंधश्रद्धेचं दान घेऊन

पुजारी मात्र धनवान झाला…

 

खरंतर धर्म नावाचं पुस्तक 

शाळेत कधीच उघडत नाही

अन् धर्माच्या नावाशिवाय

देशात पानही हाललं नाही…

लेखक : एक अज्ञात मास्तर

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘दहीकाला…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘दहीकाला…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

ब्रह्मरूप दहीहंडी टांगलीसे आकाशात ।

दहीदूधरूपी मोद भरुनी राही तयात।।१।।

 

आनंद तो मिळवण्या मानव करितो यत्न ।

परी उपायांनी नाना नाही होत हस्तगत ।।२।।

 

कामक्रोधादिक गोप जेव्हा शिर नमविती ।

आत्मरूप तो श्रीकृष्ण । चढे त्यांच्या खांद्यावरती ।।३।।

 

अहंकार घट फुटे परब्रह्मरूप भेटे ।

साधकास मिळताती आनंदरूपाचे  साठे ।।४।।

 

मग परब्रह्म हंडी येई तयाच्या हातात ।

गोपरूपी इंद्रिये ती आनंदाने नाचतात ।।५।।

 

सारे काही एकंकार मावळले आपपर ।

परमात्मस्वरूपी त्या आत्मा झाला तदाकार ।।६।।

 

ऐसा दहीकाला झाला जीव शिवासी भेटला ।

ऐसा कृष्णजन्म आम्ही साजरा असे तो केला ।।७।।

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तर, आयुष्य खूप सुंदर आहे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

तर, आयुष्य खूप सुंदर आहे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

माणसाचे कपडे फाटले तर, ते शिवता येतात. 

पण विचारच फाटके असतील, तर आयुष्याच्या चिंध्या होतात. 

 

काय बोलावे हे ज्ञान ठरवते, 

कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, 

किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, 

…. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही,

हे आपला संयम आणि, संस्कारावर अवलंबून असते. 

 

चुकीला चूक, आणि बरोबरला बरोबर .. म्हणायला शिकलं पाहिजे. 

नुसतं स्वार्थासाठी जगणं, सोडून दिलं पाहिजे. 

जिथे चूक नाही तिथे झुकु नका. आणि जिथे सन्मान नाही, तिथे थांबू नका. 

 

उशिरा मिळालेले सत्य हे, कुलूप तोडल्यानंतर, चावी मिळाल्यासारखे असते. 

यशस्वी होण्यासाठी, चुकणं आणि शिकणं, दोन्ही महत्वाचं असतं. 

कुठे व्यक्त व्हायचं, आणि कधी समजून घ्यायचं, 

हे कळलं तर, आयुष्य भावगीत आहे.!! 

 

किती ताणायचं, आणि कधी नमतं घ्यायचं, 

हे उमजलं तर, आयुष्य ‘निसर्ग’ आहे. !! 

किती आठवायचं, आणि काय विसरायचं, 

हे जाणलं तर, आयुष्य ‘इंद्रधनुष्य’ आहे. !! 

किती रुसायचं, आणि केव्हा हसायचं, 

हे ओळखलं तर, आयुष्य ‘तारांगण’ आहे.!! 

कसं सतर्क रहायचं, आणि कुठे समर्पित व्हायचं, 

हे जाणवलं तर, आयुष्य नंदनवन’ आहे.! ! 

 

कुठे,? कधी,? किती,? काय,? केव्हा,? कसं,? 

याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे… 

 

काही माणसं लाखात एक असतात, 

आणि काहींकडे लाख असले, तरी ते माणसात नसतात. 

 

दु:खांच्या दिवसांमध्ये, आनंदाची आशा ठेवणारी माणसं, 

कुठल्याही प्रसंगी, ठामपणे उभी राहतात. 

 

ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता, याचे ‘भान’, 

आणि भान म्हणजे कधी काय करू नये, याचं ‘ज्ञान’, 

 

दुःख गिळून आनंद व्यक्त करणे, म्हणजे जीवन… 

कष्ट करून फळ मिळवणे, म्हणजे व्यवहार… 

स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे, म्हणजे सहानुभूती… 

आणि माणूसकी शिकून, माणसासारखे वागणे, म्हणजे अनुभूती… 

 

प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. 

ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर, 

काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. 

 

सुख‌ म्हणजे नक्की काय,? ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे …. 

भरलेलं घर, आणि एकमेकांची साथ…!!

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जुन्या वाड्याच्या आठवणी…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “जुन्या वाड्याच्या आठवणी…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

अनेक कुटुंबे गुंफणारा

वाडा म्हणजे हाराचा धागा असतो,

समूहगानातला मल्हार असतो

तो भूप असतो आणि भैरवीही असतो.

 

वाड्याचे अंगण म्हणजे नंदनवन असते

छोट्यांचे क्रिडांगण असते,

महिलांचे वृंदावन असते,

पाणवठा असते, शिळोपा असते,

मोठ्यांचे कधी कुरुक्षेत्रही बनते

अंगण सगळ्यांनाच बोलावत असते.

 

वाड्यात अनेक बिऱ्हाडे असतात

कुटुंब मात्र एक असतं,

एका घरातल्या फोडणीची चर चर

सगळीकडे पोहोचत असते

वाड्यात कुणाचेच काही खाजगी नसते.

 

जोशाचं बाळ कुलकर्ण्यांकडे झोपते

बंडुला घरच्यापेक्षा शेजारच्यांची भाजी आवडते,

मिनी लोखंडयांकडे अभ्यासाला बसते

देसाईआजी पावशांची भाजी निवडत असते.

 

भावाकडे मुंज आहे ना, मग अशी कशी जाते

माझ्या पाटल्या घेऊन जा,

नव्या साडीची घडी मोडायचिये घेऊन जा

कुणाचे दागिने, कुणाची पैठणी

कुणाची वेळ कशी साजरी करायची ते वाड्यालाच माहित.

 

जा रे , शेजारून वाटीभर डाळीचे पीठ आण

देसाई वहिनी थोडं दूध द्या,

तुमचा गॅस संपलाय, आमचा घेऊन जा,

पाहुणे आलेत तुमची मोठी सतरंजी द्या

हे संगीत केवळ वाड्यातच गायलं जातं.

 

जोशी वहिनींचे वडील वारले कोकणात

तार मिळताच वातावरण बदललं,

जोशी वाहिनिंचे घर माणसांनी भरलं

वाड्यासह अंगणही गहीवरलं,

सुख दुः खाचं वाटप केवळ वाड्यातच असतं.

 

वाडा प्रेमळ होता, त्याचा धाक होता

कुणालाच एकाकी ठेवत नव्हता,

वाडे गेले, फ्लॅट आले, घरे मोठी पण मने छोटी झाली,

सोयी वाढल्या , रुबाब वाढला

कुटुंबाची संख्या वाढली,

एकाकी कुटुंबाच्या गर्दीची आता सोसायटी झाली.

 

वाडा गेला, नुसताच गेला नाही

माणसामाणसांना बांधणाऱ्या रेशीम धाग्याच्या गाठी उकलून गेला,

वाडा गेला, वाडा गेला

उरला फक्त आठवणींचा पाला.

 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares