☆ अनिल गेला… ✒️ अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
अनिल गेला ! तशी त्याची प्रकृती काही दिवसांपासून बिघडतच चालली होती. आता तर हॉस्पिटलमधूनही त्याला घरी आणल्यापासून आंनंद नाडकर्णीकडून त्याच्या प्रकृतीविषयीची बातमीपत्रं रोज मिळत असत. पण आनंदनं परवाच एक काळीज कापत जाणारी कविता लिहिली. त्यात लिहिलं होतं –
‘डोळे मिटत जातात
त्यापेक्षाही कठीण ..
त्यांना कोरडे निर्विकार
होताना पहाणे
.
.
वाटते आपणच हळूवार
मिटून टाकावे त्यांना
आणि मोकळे करावं
त्यातल्या प्रकाशाला
अथांग यात्रेसाठी’
अनिल अर्धवट शुद्धीवर असताना त्याच्या शेजारी रात्रंदिवस बसून त्याची काळजी घेणाऱ्या आनंदनं या ओळी लिहिल्या होत्या. त्या वाचून मनात चर्र झालं. आता काय घडणार आहे याची चाहूल सगळ्यांना लागलीच होती. मी न राहून आनंदला फोन लावला. ‘अनिल क्वचित माणसं ओळखतोय, पण काहीच चेतना नाही; क्वचित तोंडानं अन्न घेतोय, एकदम काहीतरी बोलतोय, पण ऑक्सिजन लेव्हल खाली जातेय; तो फारसं रिस्पॉन्ड करत नाहीये ….’ आनंद बोलत होता आणि मी ऐकतच राहिलो. त्यावेळी आमच्या मैत्रीचा बोलपट माझ्या डोळ्यासमोर उलगडायला लागला.
१९७० च्या आसपासचं कुठलंतरी वर्ष असावं. त्यावेळी मी ‘मागोवा’ नावाच्या एका गटात सामील झालो होतो. एका बाजूला विवेकवाद, विज्ञानवाद आणि मानवतावाद याचबरोबर समाजवाद आणि मार्क्सवाद या सगळ्याच विचारांनी मी भारावून गेलो होतो. अनिल त्यावेळी ‘युक्रांद’ नावाच्या संस्थेत कार्यरत होता. कुमार सप्तर्षी आणि अनिल अवचट हे युक्रांदचे खंदे वीर होते. आनंद करंदीकर आणि इतरही आमचे लढवय्ये मित्र त्यात सामील झाले होते. आमच्यात वैचारिक मतभेद असूनही आमच्यामध्ये मैत्री मात्र होती. एकदा परळला कामगारवस्तीत मी अनिलचं भाषण ऐकायला गेलो होतो. त्यावेळी तो आवेषात बोलत होता हे चांगलंच आठवतंय. अगदी काल परवा घडल्यासारखं.
पण मग मध्ये बरीच वर्षं गेली. मी कॉम्प्युटरच्या जगात रमलो आणि सक्रीय चळवळीतून बाहेर पडलो. अनिलही कालांतरानं सक्रीय चळवळीतून बाहेर पडला होता. आनंदकडून अनिलविषयी बातम्या कळत होत्या. १५-१६ वर्षांपासून पुन्हा आमचं येणं जाणं वाढलं. त्यानं अनेक पुस्तकं लिहिली होती आणि मीही लिखाणात रमायला लागलो होतो.
अनिलनं आनंदबरोबर ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्तीकेंद्र चालू केलं होतं. त्याचं बांधकाम चालू असताना मला एकदा तो तिथे घेऊन गेला होता. पु. लं.ना स्कूटरवर मागे बसवून त्यानं त्यांना ते कसं दाखवलं होतं, पु.लं.नी मग त्याला मदत कशी केली होती याविषयी तो मला सांगायचा.
मुक्तांगणमुळे अनिलनं आणि आनंदनं शेकडो घरांना आधार मिळवून दिला होता. एक उत्कृष्ट लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याचं नाव गाजत होतं.
एकदा आमची मैत्रीण अभिनेत्री रीमानं अनिलकडे घेऊन जाण्याबद्दल माझ्याकडे आग्रह धरला. मी तिला अनिलकडे घेऊन गेलो होतो. मग बऱ्याच गप्पा झाल्या.
मला आठवतंय एकदा ईटीव्हीवर आनंद अवधानीनं अनिल अवचट, मी आणि इतरही काही लोकांच्या मुलाखती ठेवल्या होत्या. त्यावेळी आम्ही एकत्रच गप्पा मारत परतलो होतो. एकदा त्याला मौजेच्या श्री. पु. भागवतांना भेटायचं होतं. श्री. पु. हे माझे मामेसासरे. मग मौजेचा आणि श्री. पुंचा विषय निघाला आणि बऱ्याच गप्पा झाल्या.
यानंतर गेल्या दहा वर्षांत आमच्या वारंवार गाठीभेटी होत राहिल्या. दर काही महिन्यांनी माझी पत्रकार नगरात चक्कर व्हायचीच. तिथे दुसऱ्या मजल्यावर तो अत्यंत साधेपणानं राही. त्यावेळी त्याची आई त्याच्याबरोबर रहायची. ‘माझ्या आईला तुझी पुस्तकं आणि लेख आवडतात आणि ती तुझ्या टीव्हीवरच्या मुलाखती ऐकते’ असं तो सांगायचा. काही वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हा मात्र अनिल एकाकी पडला होता. पण मी त्याच्याकडे गेलो की गप्पांचा फड रंगायचा.
गंमत म्हणजे अनिलचे हात कागदांच्या वस्तू बनवण्यात सतत गुंग असायचे. त्याला ओरेगॅमीचं एव्हढं वेड होतं, की कुठल्याही कार्यक्रमात स्टेजवर असतानाही तो काहीतरी पक्षी, प्राणी, बोटी, घरं करतच बसायचा. तो ज्या खोलीत बसे, तिथे मागे बरीच पुस्तकं आणि पुढे त्यानंच तयार केलेली शिल्पं, लाकडावर केलेली कार्विन्ग्ज, चित्रं, बासऱ्या असं सगळं पडलेलं असायचं. मग मधूनच तो बासरी काढायचा आणि काहीसं वाजवायचा. मग कित्येकदा वेगवेगळ्या रागातल्या बंदिशी गायचा. मग मीही माझा गळा साफ करायचो. तो मलाही गायचा आग्रह करायचा. एखादी बंदिश आठवली नाही की तो माझ्या सुलभाताईला फोन करायचा. मग ताई फोनवरच त्याला कित्येक बंदिशी गाऊन दाखवत असे. सोलापूरला गेल्यावर तो नेहमी सुलभाताईला भेटायचा आणि काही वेळा तिथे उतरायचाही.
गंमत ही की तांत्रिकदृष्ट्या संगीत न शिकलेला हा माणूस बेसूर मात्र कधीच होत नसे. त्याची सुरांची जाण खूपच चांगली होती आणि माझ्याप्रमाणेच संगीतातल्या व्याकरणापेक्षा त्याच्या भावविश्वावरच प्रेम करणं हे त्याला खूप महत्त्वाचं वाटायचं. त्यालाही गाण्यातलं उच्च-नीच मान्य नव्हतं. कित्येकदा तो गुलाम अलींच्या गझलाही ऐकत आणि गुणगुणत असे.
पण गाणं हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असला तरी तो एकच भाग होता. एका माणसाच्या अंगात किती कला असाव्यात ! चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, ओरेगॅमी, कविता, लिखाण हे सगळं एकच माणूस तितक्याच लीलया आणि उत्कृष्टपणे कसं करू शकतो हे मला न उलगडणारं कोडंच होतं.
मला त्याचं लिखाण खूप आवडायचं. आमच्या लिखाणाची स्टाईल आणि विषय वेगळे असायचे. माझे जास्त ज्ञानशाखांविषयी आणि तात्विक होते. मग त्यात अर्थशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, गणित असे अनेक विषय होते; आणि त्याचं लिखाण मात्र माणुसकीनं आणि विवेकवादानं बहरलेलं होतं. त्याचं ‘माणसं’, ‘प्रश्न आणि प्रश्न’ आणि इतर काही पुस्तकं वाचली आणि मी आतून बाहेरून हादरून गेलो. हमाल, वेश्या, सफाईकामगार, मच्छीमार यांच्यापासून तळागाळातल्या अनेक थरातल्या अनेकांना भेटून त्यांची आयुष्यं बघून ती चितारण्याची एक विलक्षण कसब त्याच्याकडे होती. एका अर्थानं रिपोर्टाजमधलं त्यानं एक वेगळाच मापदंड निर्माण केला होता. एव्हढं रसरशीत पण तरीही त्यांच्याविषयी आत्मीयतेनं असलेलं, समानतेचा आग्रह धरणारं, अन्यायविरुद्ध आणि अंधश्रद्धेविरुद्ध, अविवेकवादाविरुद्ध शांतपणे आरडाओरड करणारं लिखाण मी तरी अजून वाचलेलं नाहीये.
यात कुठेही कटुता नव्हती; कुठेही आग पाखडणं नव्हतं आणि तो स्वत: जात, धर्म यांच्या कुठलीच बंधनं न पाळणारा असला तरी त्याचे सगळ्या जातीत, धर्मात मित्र होते. याचं कारणच मुळी त्याचं लिखाण हे सर्वसमावेशक, समतोल राखणारं तरीही ठाम असणारं होतं.
त्याला माझं आत्मचरित्र ‘मुसाफिर’ खूपच आवडलं होतं. त्यानं त्या पुस्तकासाठी लिहिलेला ब्लर्बही लोकांना खूप आवडला होता. आमच्या ‘कॅनव्हास’ पुस्तकासाठीही त्यानं झकास ब्लर्ब दिला होता; आणि ‘झपूर्झा’चं पुस्तक प्रकाशन त्याच्याच हस्ते झालं होतं.
अनिलच्या डोक्यात सुंदर जगाचं एक स्वप्न होतं. या जगात स्पर्धेपेक्षा सहकार्य होतं; जात, धर्म, रंग, लिंग असे कुठलेच उच्चनीच भेदाभेद त्याच्या जगात नव्हते. सगळे एकमेकांशी प्रेमानं वागताहेत; एकमेकांना मदत करताहेत, या जगात द्वेष नाहीये, युद्धं नाहीयेत; मारामाऱ्या आणि गुन्हेगारी नाहीये असं जग त्याच्या स्वप्नात असावं. त्याच्या भाषणातून मला नेहमी हेच जाणवे. या क्रूर, युद्धखोर, असमान जगानं त्याचं स्वप्न केव्हाच पायदळी तुडवलं असलं, तरी तो स्वप्न बघतच राहिला असावा असं मला नेहमी वाटे. आता त्याच्याबरोबर ते स्वप्नही विरून गेलंय !
आज तो प्रेमाचा, वात्सल्याचा, आपुलकीचा, माणुसकीचा, विवेकवादाचा आणि विज्ञानवादाचा झरा कायमचा आटलाय. मला शब्दच सुचत नाहीयेत. श्रद्धांजली इतकंच !
– श्री अच्युत गोडबोले
प्रस्तुती श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ गोष्ट छोटी डोंगराएवढी☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
( ——असे होणार का कधी भारतात..??? )
नुकताच मकरंद अनासपुरेने आय.बी.एन.लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला.
तो काही वर्षांपूर्वी सिडनीला गेला होता, तेव्हाची गोष्ट.—
(खरं तर छोटी पण डोंगराएवढी)—-
एअरपोर्टवर ठरल्याप्रमाणे त्याला घ्यायला जोशी आडनावाचा त्याचा एक मित्र गाडी घेऊन आला होता. तो मित्र मूळचा ठाण्यातला. पण गेल्या २५ वर्षांपासून ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालेला.
रस्त्याने गाडीतून जात असताना मकरंद म्हणाला,
“अरे कसले सुंदर रस्ते आहेत यार इथले. एक खड्डा लागला नाही आतापर्यंत.
नाही झेपणार रे असला प्रवास मला, थोडी तरी आदळआपट झाली पाहीजे राव.”
यावर त्याचा मित्र हसला म्हणाला,
“तुला माहीत आहे हे रस्ते कोणी बनवले?”
मकरंदने विचारलं,
“कोणी?”
“या तुझ्या ड्रायव्हर ने!”
“काय???” मकरंदला खूप आश्चर्य वाटलं.
” तू बनवलेस हे रस्ते ?—-अरे मग भारतात राहून का नाही बनवलेस असे रस्ते?”
यावर मित्र हसला, आणि फक्त एवढंच म्हणाला पुढे—–
“अरे भारतात रस्ते ‘इंजिनिअर’ नाही तर ‘राजकारणी’ बनवतात.” राजकारण्यांच्या तावडीतून विकासाला मुक्त करा.”
विजय जोशी हे ठाण्याचे असून त्यांना order of Australia हा भारतरत्नच्या तोडीचा पुरस्कार तेथील सरकारने दिला आहे… कडू आहे पण सत्य आहे.
संग्राहक : – श्री सुनीत मुळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
कावळा: नको मेल्याने पेल्यात बुडवून माझं आयुष्य कमी केलं, नाहीतर आणखी काही वर्ष जगलो असतो मी. त्याचं काही खरं नाही, ताटाभोवती पाणी फिरवायचं सोडून मद्याचे थेंब टाकले असतील मला आकर्षून घ्यायला. पुन्हा अडकायच नाहीये मला व्यसनात. असले मित्र नकोच.
कावळी: मग माझ्या जिवलग मैत्रिणीकडे जाऊ.
कावळा: तिथेही नको तुमच्या गप्पा सुरू झाल्या तर मी उपाशी राहीन.
कावळी: अहो गप्पा मारायला आता आपण काही मनुष्य नाही, विसरलात का ?
कावळा: लक्षात आहे. पण तुम्ही बायका भिंतीशी सुद्धा बोलू शकता. तू तरी कावळी आहेस.
कावळी: खबरदार मला कावळी म्हणाल तर. किमान या पंधरा दिवसात तरी मला खूपच मानाने वागवतात लोक.
कावळा: ठीक आहे बाई– नाही म्हणत कावळी. तू तर डोमकावळी.( तू तर चाफेकळी चालीवर)
कावळी: पुरे आता. कुठे जायचं ते ठरवा पटकन. कधीची छान तयार होऊन बसलेय.
कावळा: मी काय म्हणतो, आपण घरीच जेऊया का ? आता आपुलकीने बोलावणारी माणसं राहिली नाहीत. राहिलाय तो फक्त सोपस्कार. लोक आपल्या नावाने स्वयंपाक करणार, छोट्याशा ताटात नैवेद्य दाखवणार. आपण खातोय की नाही हे सुद्धा नाही पाहणार. आणि स्वतः मात्र खीर-वड्याच्या जेवणावर आडवा हात मारणार. ज्यांनी जिवंतपणी आपल्याला नीट नाही वागवलं त्यांच्याकडून मेल्यानंतर चांगल्या वागणुकीची काय अपेक्षा करणार ?– त्यापेक्षा तू खिचडी टाक.
कावळी: झाsss लं. सगळंच बारगळलं. तेव्हाही हॉटेलला नेतो म्हणायचात आणि शेवटी असंच काहीतरी सांगून घरी खिचडी करायला लावायचात—पण तुमचं म्हणणं पटतय. –शेवटी कोणी नाही आपलं. आपणच जगतो एकमेकांसाठी, म्हणूनच तर भगवंताने बांधल्या आपल्या जन्मोजन्मीच्या गाठी.
कावळा: सरकार माझं ते आवडतं गाणं म्हणा नं, फक्त थोडं एडिट करून—
कावळी: आता पूर्वीसारखा कोकीळकंठी आवाज लागणार नाही बरं.
कावळा: हरकत नाही दोघांचा रंग तर सारखाच ना. घेईन मी ऍडजस्ट करून.थोडं खर्जात गाशील.
कावळी: सांज ये गोकुळी, कावळी कावळी. कावळ्याची जणू कावळी ——-
जिवंतपणी नातीगोती जपा.
संग्राहक : – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा (साधारण वय वर्ष आठ) एका कोपर्यात बसून इतरांचा पकडापकडीचा खेळ बघत होता.
कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता. पण खेळत नव्हता.
मी त्याला विचारले…
” बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?”
त्याने खेळावरील नजर न हटवता मला उत्तर दिले .
” आय नको म्हनत्या ….”
” आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील ! “
त्याने उत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला.
मलाच त्याला चिडवण्याची खुमखुमी गप्प बसू देईना….
” मला माहिती आहे, आई तुला खेळायला का नको म्हणते !!! अजिबात अभ्यास करत नसशील !! “
माझा टोमणा त्याला बरोबर बसला असावा. खेळातला खेळकरपणा त्याच्या चेहर्यावरून गायब झाला. त्याने थेट माझ्या नजरेला नजर भिडवली , जगातले विखारी सत्य त्याने मला सांगितले…
” आई म्हनत्या…खेळू नको….खेळून भुक लागल….मग खायला मागशील “
त्याच्या डोळ्यात किंचीत पाणी आले होते. तडातडा उठून तो कुठेतरी निघून गेला.
मी अजूनही बेचैन आहे. आणि गेल्या वर्षभरात भूक लागावी, अन्न पचावे म्हणून औषधांवर किती खर्च केला याचा हिशोब करत बसलो.
संग्राहिका : – अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈