मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुस्वागतम् की स्वागतम्? – श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सुस्वागतम् की स्वागतम्?श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी

हा अनुभव बारामतीतच नाट्यसंमेलनाच्या वेळी आला. त्या नाट्यसंमेलनाचा एक भाग म्हणून विद्याधर गोखल्यांच्या हस्ते कवी मोरोपंतांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित केले होते. ठरलेल्या वेळी गोखले, जब्बार पटेल वगैरे प्रतिमा पूजनासाठी सिद्धेश्वर मंदिरामागच्या मोरोपंत स्मारकाच्या जागेत आले. त्या वेळी तो जुना वाडा होता. मोरोपंतांच्या खोलीची नि बाहेरची सजावट करण्याचे काम माझ्याकडे दिले गेले होते. मी बाहेर पताका वगैरे लावून रांगोळीने ‘सुस्वागतम्’ असा शब्द लिहून ठेवला होता.

गोखल्यांनी प्रतिमेचे पूजन केले. नंतर त्यांना ‘चार शब्द’ बोलण्याची विनंती केली गेली. गोखल्यांनी कवी मोरोपंतांबद्दल, स्मारकाच्या व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. पण त्यानंतर मात्र “रांगोळी छान काढली आहे, पण मराठीच्या शुद्धलेखनाची किमान मोरोपंतांच्या बारामतीत तरी हेळसांड होऊ नये”, असे शब्द ऐकवले.

रांगोळीत “सुस्वागतम्” हा एकच शब्द होता. त्यात काय चुकले हे मला कळेना. शिवाय गोखल्यांनी ‘चार शब्द’ बोलताना जाहीरपणे हे सांगितल्याने काहीशी अपमानकारक स्थिती झाली होती. शेवटी त्यांनीच खुलासा केला.

“सुस्वागतम् या शब्दाचे मूळ ‘ग’ या संस्कृतमधील धातूमध्ये आहे. त्याला व्याकरणाच्या नियमानुसार ‘तम्’ हा प्रत्यय लागून गतम् असा शब्द बनतो. गतम् शब्दाला ‘आ’ हा उपसर्ग लागून ‘आगतम्’ असा शब्द बनतो. त्या आगतम् शब्दाला ‘सु’ हा आणखी एक उपसर्ग लागून तो शब्द ‘स्वागतम्’ असा बनतो. एकदा ‘सु’ हा उपसर्ग लावल्यावर पुन्हा ‘सु’ लावून “सु सु” का करता? ” असे त्यांनी बोलून दाखवले.

त्या वेळी सगळ्यांच्या समोर चूक काढल्यामुळे गोखल्यांचा मनातून राग आला होता. पण पुढे त्यातूनच व्याकरणाचा अभ्यास कमी पडतो आहे, हे जाणवले. माझ्या शुद्धलेखनाबद्दल नि मराठीच्या भाषिक प्रभुत्वाबद्दल कौतुकाचे शब्द अनेक वेळा ऐकायला मिळतात. त्याचे श्रेय कै. गोखल्यांचे आहे. त्यांच्यामुळेच मराठी, संस्कृत व्याकरणाचा अभ्यास नि गुजराथी, कानडी, बंगाली, उर्दू वगैरे लिपी शिकाव्या वाटल्या.  नाट्यसंमेलनाच्या वेळच्या या घटनेला आता निदान २५ वर्षे तरी झाली असतील. पण अजूनही व्याकरणाचा अभ्यास करावा वाटतो. हे सगळे गोखल्यांमुळे घडले. 🙂

 – श्री अनिल कुमकर

संग्राहिका : सुश्री सुलु साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणूस सुखी आहे… ☆ प्रस्तुती – श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? वाचताना वेचलेले ?

☆ माणूस सुखी आहे… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

माणूस दुःखी नाही, माणूस सुखी आहे.

एक अत्यंत म्हातारी बाई मंदिराच्या समोर बसून भीक मागत असे. एक महात्मा तिला म्हणाला तुझा मुलगा तर खूप मोठा आहे, खूप कमावतो आहे मग तू भीक का मागतेस?

म्हातारी म्हणाली, माझा नवरा कधीच मरण पावला आहे, माझा मुलगा परदेशात नोकरी करत आहे, जाताना मला खर्चाला काही रूपये देऊन गेला होता ते सारे खर्च होऊन गेले आता माझ्याजवळ काहीच पैसा नाही म्हणून मी भीक मागते.

महात्मा म्हणाला, तुझा मुलगा तुला काहीच पैसे पाठवित नाही का? म्हातारी म्हणाली काहीच पाठवित नाही पण दर महिन्याला एक रंगीत कागद पाठवतो तो कागद काय उपयोगाचा सारे कागद भिंतीवर चिकटवून ठेवले आहेत. महात्मा तिच्या घरी आला आणि पाहिले भिंतीवर साठ बॅंक ड्राफ्ट चिकटवून ठेवले होते. प्रत्येक ड्राफ्ट पन्नास हजार रूपयांचा होता. म्हातारी शिकलेली नसल्यामुळे तिला कळले नाही की आपल्या जवळ किती संपत्ती आहे.

महात्म्याने तिला त्याची जाणीव करून दिली की ती किती श्रीमंत आहे.

आमची अवस्था सुध्दा या भीक मागणाऱ्या म्हातारीप्रमाणे झाली आहे. आमच्या जवळ ज्ञानोबाराय आहेत, तुकोबाराय आहेत, ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, महाभारत, गाथा आहेत. पण तरीही आम्ही विषयांची भीक मागत आहोत, सुखाची भीक मागत आहोत, दुःख भोगीत आहोत कारण हे सारे ग्रंथ फक्त घरात भिंतीवर कपाटात लावून त्यात सजवून ठेवले आहेत, त्यांचा कधी वापर करीत नाही, त्यांचा जर आपण वापर करू, अभ्यास करू, चिंतन करू, नाम घेऊ तर त्यांचा उपयोग होऊन आपले जीवन सुखी होईल.🙏

प्रस्तुती – श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 5 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 4 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९.

आपलेच ओझे आपल्याच खांद्यावर

घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मूर्खा!

स्वतः च्याच दाराशी भिक्षा मागणाऱ्या

भिक्षेकऱ्या!

 

समर्थपणे ओझं पेलणाऱ्या हाती ते ओझं दे

पश्चातापानं तुला परत पहावं लागणार नाही.

 

तुझ्या आकांक्षांच्या श्वास-स्पर्शानं

तुझ्या अंतरीच्या

ज्या ज्ञानदीपाला तू स्पर्श करतोस

तो तुझ्या श्वासातल्या फुंकरीनं

क्षणात विझून जातो.

 

वासनेनं माखलेल्या पापी हातातून

तू दान घेऊ नकोस

शुद्ध पवित्र प्रेमानं अर्पण केलेलंच स्वीकार.

 

१०.

सर्वात दरिद्री, पददलित आणि सर्वस्व गमावलेल्यांच्य वस्तीत तुझे चरण स्थिरावतात,

तिथेच तुझ्या पादुका असतात.

 

सर्वात दरिद्री, पददलित आणि सर्वस्व गमावलेल्यांच्या वस्तीत त्या तुझ्या चरणांच्या गाभाऱ्यापर्यंत

किती यातायात केली तरी मी वाकूनही पोहोचू शकत नाही.

 

सर्वात दरिद्री, पददलित आणि सर्वस्व गमावलेल्या

सामान्यांची वस्त्रे मिरवत तू जात असतोस

आमचा गर्व आम्हाला तुझ्यापर्यंत येऊ देत नाही.

 

सर्वात दरिद्री, पददलित आणि निराधार असलेल्या,

सोबत हरवलेल्यांना तू सोबत देतोस.

माझ्या अंत:करणाला तिथं यायचा मार्ग सापडत नाही.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विज्ञानाचे मूळ… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ विज्ञानाचे मूळ… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते जगातले पहीले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज…

सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो).

माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.

उदय-अस्ताचे प्रमाणे |

जैसे न चालता सूर्याचे चालणे |

तैसे नैष्कर्म्यत्व जाणे |

कर्मींचि असता ||

सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध आहे.

मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,

शुक्र-शोणिताचा सांधा |

मिळता पाचांचा बांधा |

वायुतत्व दशधा |

एकचि झाले ||

शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.

सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते.

पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे.

माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.

पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा |

तरी हा भूगोलचि काखे सुवावा |

तैसा विस्तारू माझा पाहावा |

तरी जाणावे माते ||

भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.

पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.

परंतु माऊली ज्ञानोबाराय ७२५ वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.

तया उदकाचेनि आवेशे |

प्रगटले तेज लखलखीत दिसे |

मग तया विजेमाजी असे | सलील कायी ||

सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी,

मी सूर्याचेनि वेषे |

तपे तै हे शोषे |

पाठी इंद्र होवोनि वर्षे |

मग पुढती भरे ||

विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.

या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलीं ज्ञानोबारायांनी ७२५ वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे अस्तित्व सांगतात,

ना तरी भौमा नाम मंगळ |

रोहिणीते म्हणती जळ |

तैसा सुखप्रवाद बरळ |

विषयांचा ||

किंवा

जिये मंगळाचिये अंकुरी |

सवेचि अमंगळाची पडे पारी |

किंवा

ग्रहांमध्ये इंगळ |

तयाते म्हणति मंगळ |

इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र: परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे |

किंवा

स्वाती नक्षत्र:

स्वातीचेनि पाणिये |

होती जरी मोतिये |

तरी अंगी सुंदराचिये |

का शोभति तिये ||

कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते

जेथ हे संसारचित्र उमटे |

तो मनरूप पटु फाटे |

जैसे सरोवर आटे |

मग प्रतिमा नाही ||

अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.

या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल.

विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्या-या संत वाड़मयाच्या सहवासात यावे.

संग्राहिका :– सौ शशी नाडकर्णी नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट कर्णाची आहे…☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ गोष्ट कर्णाची आहे…☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

गोष्ट कर्णाची आहे.

कर्ण एकदा आन्हिक करत बसलेला असतांना एक ब्राह्मण दक्षिणा मागण्यासाठी आला.

कर्णाच्या डाव्या हाताला काही मोहरा ठेवलेल्या होत्या.

ब्राह्मणाने मागता क्षणी डाव्या हातात भरतील एवढ्या मोहरा कर्णाने त्याला तात्काळ देऊन टाकल्या.

ब्राह्मण हसला आणि म्हणाला

‘हे कर्णा तू शेवटी सूतपुत्र तो सूतपुत्रच राहिलास.

दक्षिणा डाव्या हाताने देऊ नये एवढेही तुला कळले नाही?’

कर्ण हसला आणि म्हणाला “हे विप्रा, दान देतांना काहीच गृहीत धरू नये.

तुला दान देण्यासाठी मी दान उजव्या हातात घेऊन दिले असते तर मला तीन गोष्टी गृहीत धराव्या लागल्या असत्या.

पहिली गोष्ट ही की दान डाव्या हातातून उजव्या हातात येईपर्यंत मी जिवंत राहीन. दुसरी ही की तू जिवंत राहशील कारण माणसाची पुढच्या क्षणाची देखील शाश्वती नसते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दान या हातातून त्या हातात येईपर्यंत माझा विचार बदलणार नाही!

शास्त्रापेक्षा दान वेळेत पोचणे महत्वाचे.

आयुष्याला एवढे गृहीत धरून चालत नाही

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे ! ☆ प्रस्तुति – सुश्री उषा आपटे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे ! ☆ प्रस्तुति – सुश्री उषा आपटे ☆

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो 

जो जातो तो सुटतो, परीक्षा असते मागे राहणाऱ्याची

कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ?

मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?

पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?

निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची, मुलींची, सुनांची….

 

थोडक्यात काय तर

दोघांपैकी एकजण गेल्यानंतर

मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे!

 

लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात

आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात

स्वतः उपाशी राहून, काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.

 

म्हणून आता ही आपली जबाबदारी असते, त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची

असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील नाहीतर ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या !

केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

 

🙏विचारधारा आवडली तर नक्कीच पुढे पाठवा🙏

प्रस्तुती – सुश्री उषा आपटे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 4 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 4 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

७.

माझ्या गीतानं सर्व अलंकार उतरवलेत

सुशोभित वस्त्रांचा अभिमान त्याला उरला नाही

 

आपल्या मीलनात त्याचा अडथळाच आहे.

त्यांच्या किणकिणाटात

आपल्या कानगोष्टी बुडून जातील

 

केवळ तुझ्या दर्शनानेच माझ्या

कवित्वाचा अहंकार गळून गेला आहे.

हे कविश्रेष्ठा, मी तुझ्या पायाशी आलो आहे.

 

या बांबूच्या बासरीप्रमाणं माझं जीवन

साधं, सरळ बनवू दे.

आता तुझ्या स्वर्गीय संगीतातच

ते भरुन जाऊ दे.

 

८.

ज्याच्या अंगाखांद्यावर राजपुत्राप्रमाणं

उंची वस्त्रं घातली आहेत,

ज्याची मान रत्नजडित दागिन्यांनी

जखडली आहे,

त्या बालकाच्या खेळातला

आनंद हिरावला जातो.

त्याचं प्रत्येक पाऊल त्याच्या

कपड्यात अडकून पडतं.

 

धुळीनं ती राजवस्त्रं मिळतील,

त्यांना डाग पडतील,

या भयानं ते बालक जगापासून दूर राहतं.

त्याला हालचालीची पण भिती वाटते.

धरणीमातेच्या जीवनदायी धुळीपासून कप्पाबंद

करणारे आणि अंगाला जखडून ठेवणारे

हे अलंकार, हे माते, निरुपयोगी आहेत कारण,

ते साधारण मानवी जीवन यात्रेच्या प्रवेशद्वारातून

जायचा हक्क हिरावून घेतात.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवा तुझे खूप खूप आभार! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ देवा तुझे खूप खूप आभार! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

🕉️देवा तुझे खूप खूप आभार!

👏हे ईश्वरा!!👏…..

कोणताही अर्ज केला नव्हता की कुणाचीही शिफारस नव्हती,…..

असे कोणतेही असामान्य कर्त्तृत्व ही नाही तरीही अखंडपणे तू माझे हे हृदय चालवत आहेस…..

चोवीस तास जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस…..

मला माहीत नाही खाल्लेले न थकता पचवून सातत्यपूर्ण कोणतीही तक्रार न करता चालणारे कोणते यंत्र तू फिट करुन दिले आहेस..,..

पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेश वहन करणारी प्रणाली कोणत्या अदृष्य शक्तीने चालते आहे काही समजत नाही…..

मी मात्र ती कशी चालते हे सांगून खोटा अहं पोसतो आहे…..

लोखंडाहून टणक हाडांमध्ये  तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे याचा मला मागमूसही नाही……

हजार हजार मेगापिक्सल वाले दोन दोन कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्ये टिपत आहे…..

दहा दहा हजार टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर,…..

अगणित संवेदनांची जाणीव करुन देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली,…..

वेगवेगळया फ्रिक्वेंसीची आवाज निर्मिती करणारी स्वरप्रणाली आणि त्या फ्रिक्वेंसीचे कोडींग डीकोडींग करणारे कान नावाचे यंत्र,…..

पंच्याऐंशी टक्के पाण्याने भरलेला शरीर रुपी टँकर हजारो छिद्रे असतानाही कुठेही लिक होत नाही…..

अद्भूत,…..

अविश्वसनीय,…….

अनाकलनीय……

अशा शरीर रुपी मशीन मध्ये कायम मी आहे याची जाणीव करुन देणारा अहं देवा तू असा काही फिट बसविला आहे की आणखी काय मागाव? मी……

आता आणखी काही हवंय अशी मागणी सुद्धा शरम वाटायला भाग पाडते……

आजच्या दिवशी एव्हढेच म्हणावेसे वाटते मी या शरीराच्या साहाय्याने तुझ्या प्रेम-सुखाची प्राप्ती करावी! यासाठीच्या तुझ्या या जीवा शिवाच्या खेळाचा निखळ, निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहीन अशी सद्बुद्धी मला दे……

तूच हे सर्व सांभाळतो आहे याची जाणीव मला सदैव राहू दे……

देवा तुझे मनापासून मरेपर्यंत खूप खूप आभार……..

🕉️

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काहीच नाही आपले इथे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ काहीच नाही आपले इथे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

काहीच नाही आपले इथे

हेच खरे दुखणे आहे

श्वास सुद्धा घेतलेले

काळाकडून उसने आहे

ज्याला त्याला वाटत असते

माझे असावे अंबर सारे

मर्जीनुसार झुकून फिरावे

गुलाम माझे होऊन वारे

पान आपण झाडावरचे

कधीतरी गळणे आहे

श्वाससुद्धा घेतलेले

काळाकडून उसने आहे

आतमध्ये प्रत्येकाच्या

लपून असतो एक चोर

टपून असतो एक कावळा

संधी शोधत बनून मोर

 नियतीकडून घर आपले

कधीतरी लुटणे आहे

श्वास सुद्धा घेतलेले

काळाकडून उसने आहे.

हवे ते मिळत नाही

मिळते ते रूचत नाही

दुःखच काय सुखसुद्धा

कुणालाही पचत नाही.

सुर्य जरी झालो तरी

एक दिवस ढळणे आहे

श्वास सुद्धा घेतलेले

काळाकडून उसने आहे

गंमत भारी आयुष्याची

कळून सुद्धा वळत नाही

जिंकणाऱ्या सिकंदरासही

हरणे काही टळत नाही

तारा होऊन चमकलो तरी

अखेर खाली निखळणे आहे

श्वास सुद्धा घेतलेले

काळाकडून उसने आहे.

किती खेळलो खेळ तरी

आपल्या हाती डाव नाही

स्मशानाच्या दारावरती

राजालाही भाव नाही

देहाचे या राज्य अखेर

सरणावरती जळणे आहे

श्वास सुद्धा घेतलेले

काळाकडून उसने आहे.

 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ती बाहेर जाता– लेखन सुश्री उन्नती गाडगीळ ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ती बाहेर जाता– लेखन सुश्री उन्नती गाडगीळ ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆ 

🚶‍♂️स्त्री बाहेर जाते, तेव्हा घर,दार सुद्धा गदगदते. आडवते. विनवते..

🧜🏻‍♀️ ती बाहेर जाता–

ती बाहेर जाता..

उंबरा येतो आडवा..

करून स्वर रडवा..

धरतो ..चरण..

म्हणतो.. माझे ठेव स्मरण।।

 

     ती बाहेर जाता..

कडकडाट करते कडी..

म्हणे.. मज घालून बेडी?

कुठे चालली तू वेडी??

 

      ती बाहेर जाता…

दरवाजा येई पाठी..

जणू.. बाळ घट्ट मारे मिठी..

     .. .धरून.. पदर…

म्हणे.. येई लवकर।।

 

    .. ती बाहेर जाता..

रांगोळी हासे गालात..

म्हणे नको बसू कोंडून घरात

     बाहेरचं येईल रंगत।

 

        ती बाहेर जाता..

दारावरील गणेश आसनस्थ

म्हणे स्वत्व उजळं,कर्म कर स्वच्छ..

.तथास्तु।शुभं भवतु।

 

उन्नती गाडगीळ🌹🙏🏾

संग्राहिका –  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares