मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आश्चर्य… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? वाचताना वेचलेले ?

🤔 आश्चर्य 🤔 … अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

पोट दुखो, पाठ दुखो,

हात दुखो, मान ।

डोकं दुखो, पाय दुखो,

नाक दुखो, कान ॥

 

काही झालं तरी औषध

पोटातच घ्यायचं ।

औषधाला कसं कळतं,

कुठल्या गल्लीत जायचं?

 

जिथे दुखतं, तिथे कसं,

हे औषध पोचतं?

उजेड नाही, दिवा नाही,

त्याला कसं दिसतं?

 

हातगल्ली, पायगल्ली,

पाठीचं पठार ।

छातीमधला मोठा चौक,

पोटाचा उतार ॥

 

फासळ्यांच्या बोळामधून,

इकडेतिकडे वाटा।

औषधाला कसं कळतं,

कुठून जातो फाटा?

 

लालहिरवे दिवे नाहीत,

नाही पाटी, खुणा ।

पोलीसदादा कुठेच नसतो,

वाटा पुसतं कुणा?

 

आई, असं वाटतं की,

इतकं लहान व्हावं ।

गोळीबरोबर पोटात जाऊन,

सारं बघून यावं ॥

 

आईनं गपकन धरलं,

म्हणे, बरी आठवण केली ।

आज तुझी आहेच राजा,

एरंडेलची पाळी !!!!

😖  🥴  😫

काव्यरचना : अनामिक.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 8 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 8 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

१४.

माझ्या इच्छा खूपच आहेत;

माझं रुदन दीनवाणं आहे

पण वारंवार निर्दयपणे नकार देऊन

तू मला सावरलंस

तुझ्या दयेनं माझं आयुष्य

पूर्णपणे भरलं आहे

 

मी न मागता छोट्या पण महान भेटी

तू मला देत असतोस

हे आकाश, हा प्रकाश, हे शरीर

आणि हे चैतन्य

या साऱ्या तुझ्याच भेटी,मला अवास्तव मागण्यांच्या धोक्यापासून वाचवतात,

दूर ठेवतात

 

खूपदा मी निरर्थकपणे भटकत असतो,

जागृतावस्थेत माझ्या स्वप्नपूर्ततेकडे

वाटचाल करीत असतो

पण निर्दयपणे तू माझ्या समोरून अदृश्य होतोस

 

 मला दुर्बल बनवणाऱ्या

 चंचल वासनांच्या जंजाळापासून

दूर नेऊन व त्यांना नकार देऊन

दिवसेंदिवस मी स्वीकारायोग्य कसा होईन

हे पाहतोस.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘माहेरवाशीण’ – लेखिका – प्रणिता खंडकर ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘माहेरवाशीण’ – लेखिका – प्रणिता खंडकर ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

मृणालला जाग आली  आणि किती वाजले बघायला  मोबाईल घेण्यासाठी हात सवयीनं बाजूला करायला गेली. अरेच्चा! हाताला हे काय अडकतंय? तिनं खडबडून डोळे उघडले आणि हाताला लावलेल्या सलाईनकडे तिचं लक्ष गेलं. आपण हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहोत याची तिला जाणीव झाली.

काल सकाळी जरा कणकण वाटत होती, पण करोना काळात  अत्यावश्यक सेवेत असल्याने तिला रजा घेणं कठीणच होतं. ती महानगरपालिकेची कर्मचारी होती आणि सध्या कामाचा ताण भरपूर होता. काही कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीय करोना बाधित झाल्याने कामावर येऊ शकत नव्हते. म्हणून काम भरपूर आणि स्टाफ कमी अशी अवस्था होती. त्यामुळेच ती ८.४० ची  सी. एस. टी. लोकल पकडून शिस्तीत आॅफिसला गेली. फ्रेश होऊन कँटिनवाल्याकडून एक कडक काॅफी घेतल्यावर जरा बरं वाटलं आणि ती कामाला लागली. पण साडेबाराच्या सुमारास तिला अस्वस्थ वाटायला लागलं. चक्कर येतेय, श्वास अडकतोय अशी विचित्र अवस्था झाली. मैत्रिणीनं गरम पाणी दिलं, अॅसिडिटी असेल तर म्हणून, पण फरक पडेना. मग मात्र गाडी बोलावून त्यांनी तिला हाॅस्पिटलमध्ये आणलं. करोनाची लक्षणं म्हणून तिची रक्त तपासणी आणि छातीचा  एक्सरे काढला गेला. आणि विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार सुरू झाले होते. त्यानंतरचं तिला काही आठवत नव्हतं आणि आत्ता सकाळी जाग आली होती.

बापरे! आपल्या घरी काय हाहाकार माजला असेल? सवितानी मुकुंदला फोन करून आपल्या घरी कळवलं असेलच. तिच्या घरी मुकुंद – तिचा रिटायर्ड नवरा, विशाल-विराज हे दोन्ही मुलगे – नोकरी करणारे, सासूबाई वय ८० – बी. पी., डायबेटिस पेशंट, जेमतेम स्वतःचं करणाऱ्या आणि ७६ वर्षांची आई संधिवाताने अंथरूणाला खिळलेली. कसं होणार या सगळ्यांचं या विचाराने तिचं डोकं परत गरगरायला लागलं.

मृणाल एकुलती एक मुलगी. ग्रॅज्युएट झाल्यावर महानगरपालिकेत नोकरीला लागली. आणि पुढच्याच वर्षी कर्णिकांच्या घरात सून म्हणून प्रवेशली. मुकुंद केमिकल इंजिनियर,त्याचे वडील दोन वर्षांपूर्वीच निधन पावलेले. मोठ्या बहिणीचं लग्न होऊन ती अंधेरीला राहात होती. त्यामुळे घरी फक्त आई आणि तो, अशी दोनच माणसं!  मुलुंडला थ्री बीएचके फ्लॅट होता त्यांचा. घरात पोळ्यांना आणि वरकामाला बाई होती. सासूबाई तेव्हा तब्येतीने ठणठणीत होत्या, पण सुनेनं आपल्याला सगळं हातात दिलं पाहिजे, या वृत्तीच्या. मृणाल तशी सोशिक स्वभावाची, शिवाय आईला दुखवायचं नाही, हा नवऱ्याचा बाणा! त्यामुळे तिची कायम फरपट होत राहिली. पुढे दोन वर्षांच्या अंतराने विशाल, विराजचं आगमन झालं. दोन्ही बाळंतपणं तिच्या आईनेच केली. घरी आल्यावर लांबून कौतुक करण्याइतपतच सासूबाईंना नातवंडांचं प्रेम!

मुलांना सांभाळायला मात्र पाळणाघरात ठेवायचं नाही हो, हा त्यांचा आदेश! त्यामुळे त्यांना सांभाळायला घरातच बाई ठेवली होती. मुकुंदला त्याचवेळी प्रमोशन मिळालं आणि तो बेंगलोरला गेला. मग काय महिन्यातून दोन-तीन दिवसच घरी यायचा. तसाही घरात तो तिला काही मदत करत नव्हताच. मुलांचं संगोपन ही आईचीच जबाबदारी, हा साई-सुट्ट्यो ! सासूबाई हाॅल मध्ये सोफ्यावर बसून टी. व्ही. मालिका बघणार, जेवणार खाणार आणि निवांत झोप काढणार, सून घरात असेल तोवर तिला आपल्या तालावर नाचायला लावणार आणि कुरबुरी करत राहणार, हाच त्यांचा दिनक्रम होता. मृणाल तारेवरची कसरत करत गाडा रेटत राहिली. विशाल – विराज, दोन्ही मुलं हुशार निघाली. एक सी. ए. आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झाला.

पाच वर्षांपूर्वी मृणालचे बाबा गेले. पण आग्रह करूनही आई तिच्याकडे राहायला तयार झाली नाही. ती एकटीच कळव्याला राहात होती. पण दोन वर्षांपूर्वी आईला संधिवाताने गाठलं आणि ती बिछान्याला खिळली. मग मात्र मृणाल तिला आपल्या घरीच घेऊन आली.तिच्यासाठी दिवसा आणि रात्री अशा दोन केअरटेकर ठेवल्या होत्या. सासूबाई आणि आई अश्या दोघी वयस्कर, आजारी! मुलं आपल्या नोकरीत आणि स्वतःत रममाण होणारी, मुकुंद मागच्या वर्षी रिटायर झाला, त्यालाही बी. पी., शुगर आणि एक हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेलेला. त्यामुळे सगळी धडपड, धावपळ मृणालनंच करायची. जीव मेटा…

लेखिका – प्रणिता खंडकर

संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ राजा फळांचा… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ राजा फळांचा… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

 

आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् |

आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||

अर्थात :-

फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून..

नारळाच्या पोटात [मनात] पाणी  झालं.

फणसाच्या अंगावर काटा उभा राहिला.

उंब्राचं फळ तर फुटलंच.

केळ्यानी मानच खाली घातली.

द्राक्ष काळपट तर पडलीच आणि लहानही झाली.

जांभूळ [हेव्यानी] जांभळ पडलं.

हे सगळं  मत्सरामुळे बरं.!

आम्रऋतुच्या शुभेच्छा !!🥭

 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 7 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 7 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

१३.

जे गाणे गायला मी आलोय

ते अजूनही गायचे राहिले आहे

माझ्या वाद्यांच्या तारा पुन्हा पुन्हा

जुळविण्यातच दिवस सरले

 

खरंच, तशी वेळ आली नाही,

शब्द नीट जुळत नाहीत

इच्छेची तगमग ह्रदयात आहे

 

वारा मंद वाहतोय,

पण ऋतू फुलला नाही

 

मी त्याचा चेहरा पाहिला नाही की,

त्याचा आवाज ऐकला नाही

माझ्या घरावरून जाणाऱ्या पथावर

त्याचा पदरव ऐकू येतो

 

त्याच्यासाठी आसन तयार करण्यात दिवस गेला,

दिवा पण लावला नाही,

‘माझ्या घरात ये’ असं कसं म्हणू?

 

त्याची भेट होईल या आशेवर मी जगत आहे,

पण भेट अजून होत नाही.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सावित्रीबाई….गजानन घोंगडे ☆ संग्राहिका – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? वाचताना वेचलेले ?

⭐ सावित्रीबाई….गजानन घोंगडे ⭐  संग्राहिका –  सौ.अस्मिता इनामदार ⭐

प्रिय सावित्रीबाई

नमस्कार ! सकाळीच रेडिओवर ऐकलं

की आज तुझी पुण्यतिथी

बायकोला सांगितलं,

अगं, आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी.

मग स्वतःलाच विचारलं

सावित्रीबाईंची पुण्यतिथी ?

कसं शक्य आहे ?

अगं, माझ्या गावातली, शहरातली,

देशातली प्रत्येक मुलगी

जेव्हा शिक्षण घेऊन

एखाद्या मोठ्या पदावर जाते,

शिक्षणाच्या भरोशावर एखादा

सन्मान प्राप्त करते

तेव्हा – तेव्हा तूच तर

जन्माला आलेली असतेस

यंदा माझी पुतणी पदवी घेईल

म्हणजे यंदा तू माझ्या घरातही

जन्माला येणार आहेस

सुरुवातीला प्रश्न पडला

तुला काय म्हणावं ?

बाई म्हणावं की आई म्हणावं ?

आमच्याकडे गावात

मोठ्या बहिणीला बाई म्हणतात

मग विचार केला

माझी आई शिकलेली,

थोरली बहीण शिकलेली,

मावशी शिकलेली,

माझी पुतणी शिकतेय

म्हणजे तू तर प्रत्येकच रूपात

माझ्याभोवती आहेस,

सरकारचं घोषवाक्य आहे

‘मुलगी शिकली, प्रगती झाली !

मला वाटतं त्यात आणखी एक जोडावं ‘सावित्रीबाई जन्माला आली’.

आजही वाटतं तुला

भारतरत्न मिळायला हवं होतं

मग लक्षात येतं की

या देशातले अनेक भारतरत्न जे आहेत

ते तुझ्या शिक्षण यज्ञामुळे झालेले आहेत

जेव्हा कुठल्या महिलेला

भारतरत्न मिळत असेल तेव्हा तू

ज्योतिबांना सांगत असशील

‘अहो ऐकलं का आपल्या लेकीला

भारतरत्न मिळालं’

तुझ्या बद्दलचा मुळातच असलेला आदर

सहस्त्र पटींनी वाढतो तो तुझ्या स्वभावामुळे

दगड, शेण, असभ्य शब्दांचा मार

सहन करीत तू तुझं काम करीत राहिली

म्हणजे आतून तू किती कणखर

असली पाहिजेस

ते जिब्राल्टर रॉक म्हणतात तशी.

तसूभरही ढळली नाही

आणि दुसरीकडे अत्यंत नम्र आणि प्रेमळ

कधी – कधी वाटतं टाईम मशिनने

काळाच्या मागे जावं,

लहान बनून तुमच्या घरात यावं

ज्योतीबांच्या कोटाच्या खिशातल्या गोळ्या त्यांच्याच मांडीवर बसून खाव्या

तुझ्याकडून लाड पुरवून घ्यावेत.

मला एक प्रश्न नेहमी पडतो

आपण करतो आहोत

ते काम क्रांतिकारी आहे याची तुला

जराशीही कल्पना नव्हती का ?

कारण नखभर ही अटीट्युड नव्हता तुझ्यामध्ये

नखभर सोडा, अणू – रेणू इतका

सूक्ष्म पण नाही

हे कसं साध्य करायचीस ?

नाहीतर आम्ही बघ

हीतभर करतो आणि हात भर

त्याचा हो हल्ला, कल्ला करत

ती दुखणी सांगत

ते यश सांगत गावभर हिंडतो

कदाचित म्हणूनच

तू त्यावेळच्या स्त्रियांना

शिक्षित करण्यासाठी म्हणून

जी अक्षरं पाटीवर गिरवलीत

ती काळाच्या पाठीवर गिरवला गेलीत

आणि या भारतात

जेव्हा – जेव्हा कोणी मुलगी, स्त्री

शिक्षित होत राहील

तेव्हा- तेव्हा ती अक्षरं गडद होत राहतील

पुन्हा – पुन्हा सावित्री जन्माला येत राहील.

 

–  गजानन घोंगडे

9823087650

संग्राहिका : – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ झाड़े – प्रदीप आवटे ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ झाड़े – प्रदीप आवटे ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

आपणच राखले नाही ईमान

आणि वर म्हणालो, ऋतू बेईमान झाले.

तसं असतं तर,

रस्त्यावरच्या अमलताशने

चैत्र आल्याची बातमी

सगळ्यांआधी कशी सांगितली असती?

तुला झाडाचे नाव नाही ठाऊक

पण झाडाला माहीत आहेत, तुझे ऋतू

तुझे सण, तुझे उत्सव !

म्हणून तर हिरव्या पोपटी पानांची गुढी

त्याने कधीची उभारली आहे..

आणि

त्याच्या अनोळखी फुलांचा बहर वाहून नेणाऱ्या

वाऱ्याने, व्हायरल केली आहे बातमी

वसंत आल्याची !

झाडांना काढाव्या वाटत नाहीत

मिरवणुका,

वाजवावे वाटत नाहीत

ढोलताशे

ती फक्त आतून आतून पालवतात

आणि शांत उभी राहतात

कोसळणाऱ्या उन्हात

एखाद्या तपस्व्यासारखी!

वसंताच्या इशाऱ्यावर

वाहत राहते सर्जनाची

गंध भारीत वरात

त्यांच्या धमन्यातून..!

कर्णकर्कश्य खणखणाटाशिवाय

तुला व्यक्त करता येत नाही,

तुझा आनंद.

झाडाला पुरुन उरते

किलबिल पाखरांची

आणि

आनंदविभोर खार

खेळत राहते झाडाच्या अंगाखांद्यावर.

मुळे वाहून आणतात

मातीमायचे सत्व

त्यांच्या रक्तवाहिन्यापर्यंत…

कळ्यांच्या हळव्या नाजूक देठापर्यंत !

 

तुला असे उमलता येत नाही

खोल आतून

म्हणूनच तुला

फुले येत नाहीत.

झाडं कधीच नसतात ‘खतरे में ‘,

दुसऱ्या झाडांमुळे.

झाडांना नीट असते ठावे

प्रत्येक झाडाचा हक्क असतो

मातीच्या प्रत्येक कणावर!

 

मातीतून उगवणारे आणि

त्याच मातीत मिसळणारे

प्रत्येक झाड

समृध्द करत असते माती

मातीशी एकजीव होता होता..!

 

अवघी पृथ्वी काबीज करण्याच्या

नादात,

स्वतःच्याच मुळांवर घाव घालणारा शेखचिल्ली

आहेस तू,

झाडांना भीती वाटते

फक्त तुझ्या ‘गोतास काळ ‘

कुऱ्हाडीची !

 

 – प्रदीप आवटे.

संग्राहक -सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विलक्षण श्रीमंत मराठी भाषा… ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ विलक्षण श्रीमंत मराठी भाषा… ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

विलक्षण श्रीमंत मराठी भाषा…

रस्ता – मार्ग

* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.

* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

खरं – सत्य

*  बोलणं खरं असतं.

* सत्याला  सोबत पुरावा जोडावा लागतो.

घसरडं – निसरडं

* पडून झालं की घसरडं.

* सावरता येतं ते निसरडं.

अंधार – काळोख

* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.

* निसर्गात जाणवतो तो काळोख.

पडणं – धडपडणं

* पडणं हे अनिवार्य.

* धडपडणं हे कदाचित सावरणं.

पाहणं – बघणं

* आपण स्वत:हून पाहतो.

* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

पळणं – धावणं

* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.

* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

झाडं – वृक्ष

* जे माणसांकडून लावलं जातं ते झाड.

* जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष.

खेळणं – बागडणं

* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.

* जे मुक्त असतं ते बागडणं.

ढग – मेघ

* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.

* जे नक्की बरसतात ते मेघ.

रिकामा – मोकळा

 * वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा.

* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.😊

निवांत – शांत

*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.

* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

आवाज – नाद

* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.

* जो घ॔टेचा होतो तो नाद.

झोका – हिंदोळा

* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.

* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

स्मित- हसणं

* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.

* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.

अतिथी – पाहुणा

* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.

* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

घोटाळा – भानगड

* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.

* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.

आभाळ- आकाश

भरून येतं ते आभाळ.

निरभ्र असत ते आकाश.

आहे की नाही आपली अमृताशीही पैजा जिंकणारी ही मातृभाषा,अतिशय श्रीमंत??😊🙏

 

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो आणि तो… सुश्री वंदना चिटनविस ☆ प्रस्तुती – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

? वाचताना वेचलेले ?

☆ तो आणि तो… सुश्री वंदना चिटनविस ☆ प्रस्तुती – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

लग्न गाठीच नव्हे तर माणसा माणसातल्या सगळ्याच गाठी कुठल्यातरी अद्भुत शक्तीनुसार पडतात कि काय अस झाल खर. नाझ फाऊंडेशन च्या दिल्ली हायकोर्टा समोरच्या याचिकेत, २-७-२००९ च्या मा. न्यायमूर्ती अजीत शहांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंत ‘ त्या दोघांचं’, ‘त्या दोघींच’, ‘त्यांच’,’त्यांच’ आणि ‘त्यांच ‘ जग कस ढवळून समाजासमोर आल. त्यांचा एक समूह(LGBTQ) म्हणून विचार व्हायला लागला. जणू काही मानवाची नवी प्रजातीच भारतात नव्यान सापडल्यासारख झाल. समलिंगी, तृतीय पंथी, , उभयपंथी , लिंगभेदाच्या पलीकडचे, अलैंगिक , बृहद्लैंगिक , स्त्रीपुरूष या दोन्ही जाणीवांची सरमिसळ झालेले , विरूद्धलिंगी वेशभूषा करू इच्छिणारे, ज्यांची लैंगिक ओळख काळानुसार बदलते असे, ,अशा एकूण , सामान्यांपेक्षा वेगळ्या , बावीस लैंगिक ओळखी आहेत हे कळल. त्या प्रकरणातला अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ६-९- २०१८ च्या न्यायनिर्णयानंतर भारतीय घटनेच्या कलम १४१ /१४२ प्रमाणे ‘कायदा’ झाला आणि तेव्हा पासून कलम ३७७ भा.दं.वि . अंतर्गत समलिंगी संबंध हा आता भारतात गुन्हा नाही

तोपर्यंत ही, स्त्री चा मासीक धर्म, कुमारीमाता, विधवांच शोषण, तरूणांचे विवाह पूर्व संबंध, यासारखी न बोलायची गोष्ट होती. म्हणजे अगदि , ” हालचाल करत नाहीये,डोळे मिटून निपचित पडला आहे,प्रतिसाद देत नाही” अशा त्या पोपटासारखी. दिसतय पण ‘मेला’ म्हणायच नाही.

फार पूर्वी फडक्यांची ‘मन शुद्ध तुझ’ वाचल्याच आठवत होत. ‘बेगम बर्वे ‘ पाहिल होत. ‘ त्यांच्या’ रॅलीजचे चित्रविचित्र फोटो अगदि अदभुत काही तरी पाहिल्या सारखे पहायचे. रेल्वेत,ट्रॅफिकला कोणी कानाशी टाळ्या वाजवल्या तर एकतर घाबरून जायचं, नाहीतर ते नकोस वाटायच हे सार्वत्रिक. काही हिंदी सिनेमात बटबटीत व्यक्ती रेखा त्याही आधी यायला लागल्या होत्या. प्रादेशिक चित्रपटात संवेदनपूर्ण चित्रणहि आली. मराठीत ‘जोगवा’ , बंगालीत ‘नगरधन’ ही चटकन् आठवणारी उदाहरण. दीपा मेहतांचा ‘फायर’ वेगळ्याच कारणांसाठी गाजला आणि त्यामुळे तेव्हा पहायला मिळाला नाही. आश्चर्य वाटल जेव्हा, सख्त सेन्साॅरशिप असलेल्या पाकिस्तानचा ‘ बोल ‘ चित्रपट पाह्यला होता. धाडसीच होता. मनात उत्सुकता भरभरून. तरी पण ‘ तो’ विषय नकोच. असं. बर्याच पुरोगामी ‘रिपोर्ताज’ पद्धतीने लेखन करणार्या पत्रकार लेखक मंडळी नी लिहिलेल हळूहळू बाहेर यायला लागल . शिखंडी, विष्णुचा मोहिनीअवतार, इतिहासात, जनानखान्यात नेमणूका होत असलेल्या हिजरा व्यक्ती , जोगत्ये अशा विषयावर सामाजिक , वैद्यकीय अंगाने बरच वाचायला मिळायला लागल.

मग प्रकाशातल्या व्यक्ती व्यक्त व्हायला लागल्या. त्यातून कलावंत, पत्रकार, मोठी घराणी , राजेरजवाडे, बुद्धी जीवी घरातल्या व्यक्ती, अभिनेते, लेखक अशा अनेक स्तरातील अभिव्यक्ती कळायला लागली. त्यांच साध म्हणण होत ,”आम्ही असेच आहेत, वेगळे असू पण अनैसर्गिक नाही. दोषी नाही. रंग, रूप, पालक, जात , जन्माने लाभते,तसच हे. आम्हाला तुमच्यासारखच निवडीच स्वातंत्र्य नव्हत. आम्हाला वगळू नका, तिरस्कार करू नका.”

आपल उच्च आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय जगही बोलक व्हायला लागल. चक्क टी.व्ही वर मुलाखती दिसायला लागल्या. स्टॅडअप काॅमेडियन यावर विनोद करायला लागले, त्यावर श्रोतेहि हसायला शिकले. रोस्ट्स व्हायला लागले. हे एक वेगळ्या पद्धतीच , वेगळ्या संवेदनांच, प्रामूख्याने शारिरीक शोषणावर उभ असलेलं , तिरस्कारान भरलेल , बहुतेकवेळी पालकांनीच नाकारलेल , क्वचित डोळसपणे स्वीकारलेल अशाअनेक आयुष्यांचं ,मनाचं,भावनांचं प्रतिबिंब ,साहित्यात, समाजात, दृकश्राव्य माध्यमात स्पष्ट दिसायला लागल. जणू आतापर्यंत त्यांना फक्त देहच होते. उच्चशिक्षित , प्राचार्य पदावर गेलेल्या व्यथित व्यक्तीच निवेदन वाचण्यात आल.पोलीस खात्यात नेमणुका झाल्याची उदाहरणं दिसायला लागली. दुःखाला वाचा फोडणारी व या चळवळीतील कार्यकर्त्यांची आत्मचरित्र वाचताना मती गुंग झाली. हे काय, कसल्या पातळीवरच दुःख असेल? कस सोसत असतील ती घुसमट?अस वाटायला लागल. विषय, मध्यमवर्गाच्या बंद दारातून आत आला. मधेच यासंदर्भात एड्सची भीतीपण दाखवली गेली. कुणी त्यांना ‘सैतानाची मुल ‘असहि संबोधलं. ‘पैसे काय मागतात, धडधाकट तर असतात.’ अशी एक खुसपुस पुढे आली. पण अलिकडे तर यांच्यासाठी नोकर्यात आरक्षण, काॅर्पोरेट जगताची जबाबदारी, उद्योजक स्वयंनिर्भरता यांची पण चर्चा चालू झालीय. स्कूटरवर असताना चौकात थांबल्यावर कानाशी टाळी वाजवणारी दीपा( ही रोज वेगळ नाव सांगते) आता मला घाबरवत नाही. चहासाठी 10 रूपये मागते आणि दिले तर “थॅन्क्यू काकू” म्हणते. बघणारे पोलीस पण हसून तिला घालवतात. मनाची दारं थोडी किलकिली झाली आहेत ती पूर्ण पणे उघडायला हवी .थोडा वेळ लागेलच. सवय ही काही लवकर लागत नाही. पिढ्यानपिढ्याचा सामाजिक, वैचारिक गोंधळ निस्तरायचा आहे. एकेकाळच्या बहिष्कृतांना सामावून घ्यायची आपल्या सर्वांवर जबाबदारी आली आहे . नियतीच्या हातून तुटलय पण आपण सांधायला हवच. होईल .होण अटळ आहे. संधिप्रकाश संपून उजाडेल. उम्मीदपे दुनिया कायम है |

 – सुश्री वंदना चिटनविस, नागपूर.

संग्रहिका –  सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 6 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 6 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

१२.

प्रदीर्घ काळ माझा प्रवास चालू आहे,

वाट सरत नाही

 

सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर

मी रथारूढ झालो,

कितीतरी तारका आणि ग्रहांच्या पथावर

माझी पावले उमटवीत आलो

 

स्वतः च्या नजीक येण्याचा

हा मार्ग किती पल्ल्याचा,

किती गुंतागुंतीचा,

पण किती सरळ, सोप्या सुरांकडे नेणारा!

 

स्वतः च्या दाराशी पोहोचेपर्यंत मुशाफिराला

प्रत्येक अनोळखी दरवाजा खटखटावा लागतो

अंतर्यामीच्या मंदिरात पोहोचण्यापूर्वी

किती परके प्रदेश धुंडाळावे लागतात!

 

दूरवर टक लावून माझे डोळे न्याहाळीत होते,

ते मी मिटून घेतले आणि

‘इथे आहेस तू!’ असं मला समजलं

 

‘कुठे शोधू तुला?’ हा चित्कार

हजारो प्रवाहांच्या ओघात

अश्रुरुपात विलीन होतो,

‘मी आहे’या आश्वासक महापुरात

विश्व भरून टाकतो.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares