☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
विडा घ्या हो अंबाबाई
‘ठेविले अनंते तैसेची रहावे ‘ अशी आईची समाधानी, आनंदी वृत्ती होती. हातात कांचेच्या बांगड्या, गळ्यात काळी पोत आणि चेहऱ्यावरचे समाधानी हास्य हेच होते आईचे दागिने आणि वैभव.. शेवटपर्यंत सोने कधी आईच्या अंगाला लागलंच नाही. आई गरीबीशी सामना करणारी, आहे त्यात संसार फुलवणारी होती . नानांच्या पिठाला तिची मिठाची जोड असायची. मसाले करून देणे. सुतकताई, पिंपरीला कारखान्यात काम करायला पण जायची . विद्यार्थ्यांना डबा करून देणे अशी छोटी मोठी कामे करून मिळणारी मिळकत हाच तिचा महिन्याचा पगार होता.
माहेरी मोकळ्या हवेत हेलावणारा तिचा पदर सासरी आल्यावर पूर्णपणे बांधला गेला .वेळात वेळ काढून महिला मंडळ, एखादा सिनेमा हाच तिचा विरंगुळा होता. त्यावेळी सिनेमाचे तिकीट 4 आणे होतं. प्रभात टॉकीज मध्ये (म्हणजे आत्ताच कीबे) माझे काका विठू काका ऑपरेटर होते. त्यांचा आईवर फार जीव. ते आईला कामात खूप मदत करायचे. तिला मराठी सिनेमाचे पास आणून द्यायचे. तेवढाच तिच्या शरीराला आणि मनाला विसावा.
तिचा कामाचा उरक दांडगा होता. घरच्या व्यापातून वेळ काढून घरी पांच पानांचा सुंदरसा गोविंदविडा (हा सुंदरसा विडा करायला माझ्या वडिलांनी तिला शिकवलं होतं.)देवीसाठी तयार करून ती रोज जोगेश्वरीला द्यायची. हा नेम तिचा कधीही चुकला नाही.रात्रीच्या आरतीच्या वेळी तबकामध्ये निरांजनाशेजारी सुबक आकाराचा, पिरॅमिड सारखा गोविंदविडा विराजमान व्हायचा. “विडा घ्या हो अंबाबाई” म्हणून अंबेला रोज विनवणी असायची. एक दिवस कसा कोण जाणे विडा द्यायला उशीर झाला. (गुरव )भाऊ बेंद्रे आणि भक्त विड्याची वाट बघत होते. तबकात जागा रिकामी आहे हे सगळ्यांनी ओळखलं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. विडा विसरला असं कधीच झालं नव्हतं. विड्याची वाट बघत सगळेजण थांबले होते. भाऊ बेंद्रे तबक घेऊन उभेच राहयले.भक्त आईची विडा घेऊन येण्याची वाट बघत होते…
आणि इतक्यात लगबगीने आई पुढे धावली, विडा देवीपुढे ठेवला गेला. आणि टाळ्यांच्या गजरांत आरतीचा सूर मिसळला…
“विडा घ्या हो अंबाबाई, ही विनंती तुमच्या पायी.”
… आई अवघडून गेली. आपल्याकडून उशीर झाला म्हणून आईला अगदी अपराध्यासारखं झालं होतं. तिने देवीपुढे नाक घासले. त्यानंतर कधीही तिचा हा नियम चुकला नाही. आम्ही नंतर पेशवेकालीन मोरोबा दादांच्या वाड्यात राहायला गेलो, तरीसुद्धा आईने हा नियम चालू ठेवला होता. ती म्हणाली, “ जोगेश्वरी आईनी आपल्याला पोटाशी होतं ते पाठीशी घालून तिच्याच परिसरात तिच्या नजरेसमोरच ठेवलंय.” कारण मोरोबा दादांचा पेशवेकालीन वाडा जोगेश्वरीच्या पाठीमागेच… म्हणजे आप्पाबळवन्त चौकातच होता.
आज देवीचे नवरात्र बसले आहे. ती देवी कशी आहे ? – – –
केसापासून पायाच्या नखा पर्यंत सर्वांग सुंदर आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी, प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. ती विश्वाची स्वामिनी, जगतजननी आहे. अशी ही देवी सुंदर, कोमल, शांत, नाजूक आहे. , , पण इतकच तिच वर्णन आहे का? नाही….. ती अष्टभुजा आहे. तिच्या हातात गदा, चक्र, शंख, धनुष्य बाण, शुल, पाश, खड्ग अशी अनेक शस्त्रे आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे. ती चंडिका आहे. प्रत्यक्ष देवांनीही तिची स्तुती केलेली आहे… अत्यंत नाजुक, शांत, कोमल पण वेळप्रसंगी भयानक रूप धारण करून दृष्टांचा नाश करणारी आहे. राक्षसांना शिक्षा करणारी आहे. निरनिराळ्या रक्षसांना शासन करून तिने यमलोकात धाडलेले आहे.
या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता…. एक स्त्री म्हणून बघूया… ती पण आपल्यासारखीच आहे. अशा या देवीचा अंश आपल्याही शरीरात आहे.
आपण तिची प्रार्थना करूया. प्रार्थना करून झाली की आपण तिच्याकडे काहीतरी मागतो.
आता असा विचार करा की काय मागायचे?… लौकिकात जे हवे आहे ते सगळे मागून झालेले आहे. आता थोडं वेगळं काही मागू या…
राक्षस म्हटलं की अति भयंकर, क्रूर, अक्राळ विक्राळ असं काहीस स्वरूप आपल्यासमोर येतं…
पण लक्षात घ्या की…
राक्षस ही एक वृत्ती आहे… ती विचारात, कृतीतही असू शकते.
ते प्रचंड, मोठेच असतात, त्यांचे आकार भयानक असतात असे नाही… काही मनाला नकळत सूक्ष्मपणे सतत त्रास देणारेही असतात… काही बहुरूप्यासारखे असतात… वरून गोड गोड बोलून फसवणारे ही असतात. त्यांच्यातला राक्षस ओळखायला शिकुया…..
आपण त्यांच्याशीही लढू या… अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात. त्यासाठी देवी सहाय्य करेलच. पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे हे लक्षात ठेवायला हवे.
त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे आहेत.
अगदी साध्या साध्या गोष्टींचा विचार करा. एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायला पण अंगी सामर्थ्य यावं लागतं. ते यायला हवं….. तसंच वेळ प्रसंगी शांत राहण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक असते. ” मौन” ही आपली आपण आपल्याशीच लढलेली लढाई असते. ती पण जिंकता आली पाहिजे.
पण आता तेवढ्याने भागणार नाही. आता परिस्थिती अशी आहे की आपल्या अंगात जोश ही यायला हवा…. शत्रूला भ्यायचं नाही तर… त्याच्याशी सामना करायचा.. निकरानी आणि सर्व शक्तीनिशी.. लढायचं… असं ती आपल्याला शिकवते… शत्रूला नामोहरम करून मगच देवी थांबते… विजय मिळेपर्यंत झुंजायचं ही तिची वृत्ती आपणही अंगी बाणू या.
देवीच गुणगान करा. श्री सूक्त. कुंकुमार्चन, देवी अथर्वशीर्ष, सप्तशतीचा पाठ हे सर्व काही करा.
मात्र आता तिच्याकडे ही प्रार्थना करा…..
हे देवी मला निर्भय आणि सबल कर… आज जगात वावरताना प्रत्येकीला.. प्रत्येकीला असं बनायला हवं आहे. तसेच तिला आश्वासन द्या की मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन आणि तो मनापासून करा.
देवी यश देईलच..
दोन भुजा असलेल्या अनेक जणी अष्टभुजा असल्यासारख्या अनेक आघाड्यांवर लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत.. त्यांच्या इतक आपल्याला जमलं नाही तरी चालेल… पण थोडा आपण प्रयत्न जरूर करूया. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या. आईसाहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच.
त्या मातृरूपेण संस्थिता, लक्ष्मी रुपेण संस्थिता इत्यादी वर्णनानंतर देवीच वर्णन ” शक्ति रूपेण संस्थिता ” असेही आहे… हे आपण निश्चित लक्षात ठेवूया.
अशा या देवीला माझा नम्रपणे नमस्कार.
एका मागणीचा जोगवा तुझ्यासमोर पदर पसरून मागते ग आई…….
माझ्या अंगणात एक कुंदाच झाड आहे. जाई, जुई, मोगरा, गुलाब, जास्वंदि यांच्या दिसण्याचा आणि सुवसाचा मोह सगळ्यांना, बिचाऱ्या कुंदाकडे कुणाचंच लक्ष नाही.
आता थंडी सुरू झाली, दरवळणारी जाई आणि जुई नाजूका गारठली, मलूल झाली. पण कोणताही गंध नसणारी, शुभ्र पांढरी कुंदकळी भरून आली. एकदम मस्त ताजीतवानी, भरभरून बहरली.
टपोरी, स्वच्छ, निर्मळ फुल परडीत विसावली. दातांच्या शुभ्र कुंदकळ्या अशी उपमा देतात, त्याचीच आठवण आली.
तिच्याकडे पाहिलं आणि वाटलं किती साधी, सरळ आहे ही, एरवी फारसं लक्ष देत नाही, म्हणून रागवत नाही, फुगत नाही, रडवेली होत नाही, आणि अजिबात उन्मळूनही पडली नाही.
खरचं खूप शिकता येईल हिच्याकडून … आपलं काम आपण चोख बजावत रहायचं, मग इतरेजन कसे वागतात, काय करतात त्याचा कशाला विचार करायचा !
मी सकाळी उठून देवासमोर उभी होते, तर लक्षात आलं, काल देवाला वाहिलेली कुंदाची फुलं काल होती तितकीच आज अजूनही शुभ्र आणि टवटवीत आहेत. अशी ही कुंदाची फुलं…… खरचंच खूप प्रेरणादायी वाटली…..
☆ “दुनिया फक्त विश्वासावर चालते…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
आळेफाटा ते करमाळा प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक मॅडम बसल्या होत्या. चार तासांचा प्रवास होता.
लेडीज बाजूला असल्यानंतर जरा अवघडल्यागत होतंच. दोन तास होऊन गेले. छोट्या छोट्या स्टँडवर गाडी थांबत होती. प्रवासी उतरत होते, चढत होते. आणि मला तहान लागली होती. गाडी मिरजगाव स्टँडला थांबली. एक वडापाव विकणारा माणूस खिडकीजवळ येऊन ओरडायला लागला.. ”गरमा गरम वडापाव. ” मला पाणी हवं होतं पण त्याच्याकडे फक्त वडापाव होते. मी त्याला म्हणलं “पाण्याची बाटली नाहीय का दादा?” त्यावर तो बोलला “नाहीय भाऊ. पैसे द्या मी आणून देतो लगेच. ” मी पटकन त्याला वीस रुपये दिले. आणि तो वीस रुपये घेऊन गर्दीतून वाट काढत बाटली आणायला निघून गेला.
माझ्या बाजूला बसलेल्या त्या मॅडम मोठ्याने हसल्या आणि म्हणाल्या, “गेले तुमचे वीस रुपये. ” आणि त्या पुन्हा हसायला लागल्या. मी म्हणलं, “तो पाणी घेऊन येईल. ” त्या पुन्हा हसत म्हणाल्या “तो येणारच नाही. त्यावर मी त्यांना म्हणलं, ” मॅडम तो येईल कारण, दिवसभर घसा ताणून ओरडुन एक एक रूपया कमवणारा तो माणूस आहे. त्याला वीस रुपयाचे महत्त्व माहित आहे. ही कष्टावर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि ही दुनिया विश्वासावर चालते. यावर माझा विश्वास आहे. ” त्या मॅडम पुन्हा म्हणाल्या “बरं बघूया काय होतंय पुढे. ?”
गाडी सुरू झाली. कंडक्टरने दार ओढून घेतलं आणि बेल वाजवली. तशा मॅडम पुन्हा माझ्याकडे पाहून हसल्या. त्यांनी त्यांच्याजवळची पाण्याची बाटली बाहेर काढली व मला म्हणाल्या “घ्या प्या पाणी. आणि इतकाही विश्वास ठेवून जगणे बंद करा जरा.. ” त्यांचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटत होतं.
गाडी सुरू होऊन स्टॅण्डच्या गेटवर आली आणि ड्रायव्हरने कचकन गाडीला ब्रेक मारला. आणि माझ्या खिडकीजवळ उभा होता तो वडापाव वाला. धावत पळत येऊन त्याने आवाज देऊन गाडी थांबवली होती. त्याने माझ्या हातात बाटली दिली. बाटली देताना तो म्हणाला. ,
“भाऊ दुनिया फक्त विश्वासावर चालते. ” माझा डायलॉग त्याने सेम मारला होता. गाडी पुढं निघाली. आणि माझी मान ताठ झाली.
त्या मॅडमची बाटली मी त्यांना परत दिली. आणि विश्वासाने हातात आलेली पाण्याची बाटली मी ओठाला लावत म्हणालो, “मॅडम भुकेची वेदना ओंजळीत लपवून जगण्याचा अभंग गाणारी माणसं या जगात आहेत…फसवणाऱ्या लोकांची संख्या कितीही वाढलेली असली तरीही, ही दुनिया विश्वास ठेवणाऱ्या आणि विश्वास जपणाऱ्या लोकांमुळे टिकून आहे.. म्हणूनच दुनिया फक्त विश्वासावर चालते यावर माझा विश्वास आहे.
आई मरावी पण ही जगावी असं महत्त्व प्राप्त झालेलं नातं म्हणजे मावशी! आणि बहिणीवर असलेलं प्रेम आपल्या म्हणजे भाचरांच्या माध्यमातून व्यक्त करणारा आपल्या आईचा भाऊ म्हणजे मामा! दोन्ही नात्यांच्या संबोधनांचा आरंभ ‘मा’ या अक्षराने होतो.. मा म्हणजे… माया, मार्दव आणि मातृत्व!
रुग्णालयांत डॉक्टर्स, नर्सेस (सिस्टर्स) यांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवा करणाऱ्या महिलेला मावशी आणि पुरुषाला मामा असे संबोधण्याची सुरुवात आपल्याकडे अगदी नकळत झालेली असावी! यामागे योगायोग नाही… रुग्ण कोणत्याही वयाचा असो… त्याने मामा, मावशी यांचे थोडे का असेना प्रेम आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेले असतेच. या अनुभवामुळे केवळ असे संबोधन असलेल्या व्यक्ती सुश्रुषा करीत असतील तरी सकारात्मक परिणाम होत असावा!
रुग्णाची प्रत्यक्ष शारीरिक स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांत हे मामा, मावशी अग्रभागी असतात, असे दिसते. रुग्णालयातील सिस्टर्स, वॉर्ड बॉईज, ब्रदर्स यांच्याप्रमाणे मामा, मावशी प्रशिक्षित नसतात… हे सेवक कित्येक वर्षांच्या अनुभवातून पारंगत होत जातात… त्यांच्या कामात आपसूक सफाईदारपणा येत जातो. किंबहुना एखाद्या रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा बराचसा भार ही वैयक्तिक पण आता सार्वजनिक पातळीवर रूढ झालेली नाती पेलत असतात, असे वाटते!
डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांनी आपापले व्यवसाय स्वतः निवडलेले असतात… पण मामा, मावशी गरजेतून उदयाला येतात! रुग्णाला धीराचे चार शब्द सांगण्याचा, एखादा सल्ला देण्याचा अधिकार यांना वयपरत्वे प्राप्त होत जातो… आणि बरे होऊन घरी निघालेल्या रुग्णाच्या नातेवाईक मंडळी कडून बक्षिसी मिळवण्याचा हक्कही (काही) मामा – मावशींनी स्वयंप्रेरणेने पदरात पाडून घेतलेला आढळून येतो!
छोट्या रुग्णांना हे न टोचणारे लोक भावत असावेत. कुणी काहीही म्हटले तरी शरीर धर्म चुकत नाही आणि त्याची घाण तर असतेच. या वासाची तमा न बाळगता, घृणा न करता मामा, मावशी रुग्णसेवा करीत राहतात… या कामाची कितीही सवय असली तरी हे काम सोपे नाही हे मान्य करावेच लागेल!
अर्थात, वेगवेगळ्या रुग्णालयांत रुग्णांना या नात्यांकडून येणारे अनुभव निरनिराळे असू शकतात. पण ही सुद्धा अखेर माणसेच आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी यांनी स्वीकारलेले काम अंती मानवसेवेचे ठरते, हेही खरेच !
एका मुक्त, मोकळ्या, स्वतंत्र वातावरणात आम्ही पाच जणी वाढत होतो, घडत होतो. मुक्त, मोकळे वातावरण म्हणजे आम्ही स्वैर होतो, बेशिस्त होतो, मोकाट होतो असे मात्र नाही. आम्हा पाचही बहिणीत एकमेकात आणि घरात आई वडील, आजी यांच्याशी एक सुसंवाद होता. आम्ही मोकळेपणाने बोलू शकत होतो, प्रश्न विचारू शकत होतो, बालवयातल्या आणि नंतर समज येऊ लागल्यानंतरच्याही कितीतरी शंकांना, अडचणींना, हवं नको वाटणाऱ्या अनेक बाबींना आम्ही बिनधास्त मांडू शकत होतो आणि मुख्य म्हणजे, “अजून तू लहान आहेस, तुला काही कळत नाही” अशी असमाधानकारक अधांतरी उत्तरं आम्हाला कधीच मिळाली नाहीत.
मागे वळून पाहताना आज मला एक प्रकर्षाने जाणवते की मनातली वादळं, शंकांचं निरसन, जर घरातच आपल्या प्रिय आणि मोठ्या व्यक्तींकडून झालं तर ती व्यक्ती सक्षम आणि निर्भय बनते. स्वतःच्या चुकांची कबूली देण्याचंही बळ तिला मिळतं. निर्णय शक्तीची एक सर्वसाधारण प्रक्रिया तिच्या व्यक्तिमत्त्वात सहजपणे घडत जाते आणि किंकर्तव्यमूढतेपासून ती व्यक्ती आयुष्यभर दूर राहते. आम्हा पाचही बहिणींच्या बाबतीत हे निश्चितपणे घडलं.
घर लहान की मोठं हा प्रश्नच नसतो. आनंदाच्या क्षणी जिथे आख्ख घर नाचतं, गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत जे घर कुशीत घेतं, छोट्या-मोठ्या मन मोडून टाकणाऱ्या भावनांना जे घर पदरात घेतं तेच खरं सुरक्षित घर. अशा एका सुरक्षित घरात आम्ही वाढलो. “मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरं का ?” अशी फट्टू वाक्यं आम्ही आमच्या घरात कधीच ऐकली नाहीत. “तुला हेच करायचं आहे का ? कर मग. समोर येणाऱ्या अडचणींना तुझं तुलाच सामोरे जायचं आहे हे मात्र लक्षात ठेव. यथाशक्ती आम्ही तुझ्या पाठीशी राहूच. ” असं प्रेरणा देणारही, सावध करणारही आणि आधार देणारं सामर्थ्य आम्हाला अशा शब्दांतून नक्कीच लाभलं.
एक आठवण मला सांगावीशी वाटते. ज्या सुंदर, मोठ्या, डोळ्यांमुळे हरवलेली छुंदा सापडू शकली तशाच माझ्या मोठ्या डोळ्यांनी मात्र मला एका वाईट क्षणी न्यूनगंड प्राप्त करून दिला. आमच्या गल्लीत एक कोंबड्या पाळून अंडी विकणारी मुस्लिम वयस्कर बाई राहायची. तिला आम्ही बटूबाई म्हणायचो. ती एकटीच राहायची. तिच्या आयुष्याविषयी फारशी कुणाला माहिती नव्हती पण अंडी विकण्याच्या निमित्ताने तिचा घरोघर संचार असायचा. ती काहीशी फटकळ आणि कर्कश्यही होती पण वाईट नव्हती. बरी होती. खेळता खेळता कधी कोणाला तहान लागली तर ती पटकन पाणीही प्यायला द्यायची पण त्या दिवशी मात्र मला तिचा अत्यंत राग आला. रविवार असावा. आमचा बालचमुचा लगोरीचा खेळ मस्त रंगात आला होता आणि त्याचवेळी माझ्याकडे बघून ती म्हणाली, “ए बटारे ! जरा इकडे ये तर.. ” मोठ्या डोळ्यांची म्हणून हीने मला “बटारी” म्हणावे ? प्रचंड राग आणि प्रचंड दुखावल्यामुळे मी ताडताड जिना चढून घरी आले आणि खिडकीतूनच तिला जोरात म्हणाले, ”मला बटारी म्हणतेस तू कोंबडी चोर आहेस. ” आणि जिजीच्या कुशीत शिरून मी बेफाम रडले.
माझं बालमन विदीर्ण झालं होतं. माझ्या आईचा माझ्या पाठीवर मायेचा हात होता आणि माझ्या चारही बहिणी माझ्या भोवती कडकडून भेदरल्यासारख्या उभ्या होत्या. त्यांच्याही डोळ्यात मला रडताना पाहून अश्रू जमले होते. एरवी आम्ही एकमेकींशी कितीही भांडत असू पण आमच्यापैकी कोणालाही बाहेरच्या कुणा व्यक्तीने दुखावलं तर मुळीच खपवून घेतलं जायचं नाही. अशा अनेक क्षणांनी त्यावेळी आम्हा पाचही जणींना ही एक जाणीव दिली होती की आमची पाच जणींची एक वज्रमूठ आहे. सगळ्या मतभेदांना, विचारांना, निराळ्या स्वभाव छटांना डावलूनही ही घट्ट मूठ कधीही सैल झाली नाही हे विशेष.
आता उषा—निशाही मोठ्या होत चालल्या होत्या. त्यांच्या जाणिवा बहरत होत्या. त्या जुळ्या असूनही त्यांच्यात काहीच साम्य नव्हतं. दिसण्यात, वागण्यात, स्वभावात, संपूर्णपणे त्या एकमेकींपासून भिन्न होत्या. काही ना काही किरकोळ कारणांनी सतत भांडायच्या. उषा जास्त आक्रमक होती. निशा मजबूत, दांडगी असली तरी ती तितकीच समंजसही होती. ”जाऊ दे !” वाली होती. “चल आता ! शाळेत जायला उशीर होतोय आपल्याला” म्हणून भांडता भांडताच त्या एकमेकींचा हात घट्ट धरून शाळेला निघायच्या. त्यांच्या मागे दोन लांब, घट्ट वेण्या उडवत, ठुमकत छुंदा निघायची कारण त्या तिघींची शाळा आणि शाळेची वेळ एकच होती आणि या तिघींना असे एकत्र बघत असताना मला मी यांची मोठी बहीण अशी एक बलशील भावना स्पर्शून जायची. कधी ती सुखद असायची तर कधी थोडीशी त्रासदायक होई.
एखादे वेळेस मला उगीच वाटून जायचं की घरातली सगळी कठीण, अंग मेहनतीची, क्लिष्ट कामं मलाच करावी लागतात. रोज आईला पाट्यावर वाटण वाटून देणे, कधी घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून कचरा काढणं, उंच दोरीवर काठीने कपडे वाळत घालणे, रात्री गाद्या घालणे, आंब्याच्या सीझनमध्ये पातेलं भरून आंब्याचा रस काढणे, शिवाय जीजीचे तर फारच उद्योग असायचे. अनारशासाठीचे ओलसर तांदूळ जात्यावर दळताना तिच्या जात्याच्या खुंट्याला फिरवू लागणे, पावसाळ्यात पप्पा टोपली भरून “करंदी” आणायचे ती बारीक “करंदी” (हा एक कोलंबीचाच प्रकार) सोलत बसणे, शाळेला सुट्टी लागली, मे महिना आला की आमचं घर म्हणजे एक वर्कशॉपच होऊन जायचं. आजच्यासारखी मुलांसाठी भरणारी, व्यक्तिमत्व विकास घडवणारी शिबिरं वगैरे तेव्हा नव्हती. सुट्टीत घर हेच शिबीर व्हायचं. विविध उपक्रम राबवले जायचे या शिबीरात.
मे महिना म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यातली वाळवणं सुरू व्हायची. पोह्याचे पापड, उडदाचे पापड, साबुदाण्याच्या चिकवड्या, तांदळाच्या कुरडया, कमळाची देठं दह्यात भिजवून, गोल गोल चिरून वाळत घालणं, गवारीच्या शेंगा मीठ लिंबू तिखट लावून वाळवून त्याची भिशी करायची, ताकातल्या सांडगी मिरच्या असायच्याच. एक सारखं कुटणं, लाटणं, वाळत घालणं आणि संध्याकाळी परत आवरणं. या साऱ्याभोवती आमचं आख्ख घर गुंतलेलं असायचं आणि खास अलिबागहून मागवलेले कितीतरी शेर कडवेवाल निवडायचे. त्यातले चाडे दाणे वेगळे करायचे. वर्षभर लागणारा अत्यंत आवडता पदार्थ म्हणजे वालाचं बिरडं ! मग त्याची उस्तवावर नको का करायला ? शिवाय हे स्वत:च्या घरापुरतंच मर्यादित नसायचं. गल्लीत एकमेकांकडे पापड लाटायला जाण्याचीही एक वेगळीच मजा असायची. प्रत्येकाच्या सोयी, सवलतीप्रमाणे “पापडदिन” ठरायचा. संध्याकाळी घरी परतताना त्याच पापडांचा वानवळा असायचा. उषा—निशा यथाशक्ती आणि गंमत म्हणूनही आवडीने या कामात सहभागी असायच्या. आमच्या बहिणींमध्ये छुंदा ही अत्यंत हुशार आणि अभ्यासू. सतत कुठल्या ना कुठल्या परीक्षाच देत असायची. त्यामुळे सहजच तिला या घरगुती कामांपासून रजा मिळत असे. उषाचे वेगळेच, तिचे तिचेही उपक्रम असायचे. कोऱ्या कागदावर चित्रं काढायचा तिला फार नाद होता. तसे तिचे अनेक उद्योग असायचे आणि घरभर पसारा असायचा आणि तो सगळा पसारा निशा आणि आई सतत आवरत असायच्या. ताई आजोबांकडेच राहायची पण आमच्यात असली की मात्र अगदी सारं काही नीटनेटकेपणाने करायची. आजोबांच्या निरनिराळ्या गंमती सांगायची. अखंड बडबड असायची तिची. पण ती एक वेगळीच एन्टरटेनमेंट होती.
मे महिन्याच्या सुट्टीत आई भरतकाम, विणकाम, शिवणकामही आम्हा मुलींना शिकवायची. त्यात माझी प्रगती शून्य असली तरी ताईचा मात्र अव्वल नंबर लागायचा. निशा लहान असली तरी तिला या साऱ्या कामांची आवड होती की नाही हे माहीत नाही पण ती अत्यंत मेहनती होती. तिला लहानपणापासूनच प्रचंड उरक होता. उपजतच तिच्यात एक व्यवस्थापनेचा गुण होता. तिचाही घरकामातला वाटा आणि सहभाग मोठाच असायचा. शिवाय मी तिला माझी काही कामे पासऑन करायची. माझ्या बॉसिंग करण्याच्या पद्धतीनुसार.. पण तिने कधीही आदळआपट केली नाही. पप्पा ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी त्यांची बॅग तर तीच भरायची आणि पपा तिलाच विचारायचे, “ निशू आज तू बॅगेत नॅपकिन ठेवायला विसरलीस. ”त्यावेळी मला पपांचा रागही यायचा. निशा बिचारी वाटायची. ईवलीशी तर होती ती !
पण अख्खा दिवस काम करून थकलेल्या आईचे पाय मात्र उषाच दाबून द्यायची. पप्पांचं डोकंही दाबून द्यायची. त्यांना झोप लागावी म्हणून म्हणायची, “थांबा तुम्हाला मी एक छान गोष्ट सांगते, ” मग तिची गोष्ट सुरू व्हायची. “एक होता निजाम.. ” अशीच तिच्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात असायची आणि हा तिचा निजाम मुक्तपणे पृथ्वीपासून चंद्रापर्यंत प्रवास करायचा. तो कधी शाळेतही जायचा. कधी शिक्षक असायचा तर कधी विद्यार्थी. कधी चार पट्ट्यांचा मार खायचा तर कधी दहा पट्ट्यांचा मार कुणाला द्यायचा पण तिचा निजाम शूर होता, लढवय्या होता, पराक्रमी होता आणि तितकाच हळवा आणि स्वप्नाळू होता. उषाच्या कथेतला हा असा बहुरूपी, बहुरंगी, बहुढंगी निजाम आज उषा या जगात नसली तरी आमच्या मनात मात्र अमर राहिला आहे.
असो ! अजून खूप बाकी आहे. मन अनंत आठवणींनी तुडुंब भरलेलं आहे. या गाठोड्यात आयुष्यभराचा पसारा बांधून ठेवलाय. एकदा का ते उघडलं की त्यात कसं हरवून जायला होतं….
☆ “अन्नसंस्कार — सर्वांना उत्तम अन्न मिळावे…” – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
आमची आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. तिच्या खेडोपाडी बदल्या व्हायच्या. मग माझे वडील त्या गावात जास्तीत जास्त चांगले घर भाड्याने मिळवायचे आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायचे. वडिलांची जिल्हा बदली व्हायची आणि आईची गावागावात. त्यामुळे आम्ही सगळे फक्त शनिवारी रविवारी एकत्र यायचो.
ज्या गावात राहत आहोत त्या गावातल्या चांगल्या दुकानात आई किराणाचे खाते काढायची. एक दोनशे पानी वही केलेली असायची. तिला आम्ही किराणा वही असे म्हणायचो. किराणा वहीच्या सुरुवातीच्या पानावर आईचे नाव पत्ता लिहिलेला असायचा. फोन नसल्यामुळे फोन नंबरचा प्रश्नच येत नव्हता. पहिल्या पानावर ||श्री|| असे लिहून खाली क्रमवार किराणाची यादी केली जायची. महिन्याचा किराणा एकदम भरण्याची पद्धत होती. त्यानंतर एखादी गोष्ट संपली तर पुन्हा वहीत लिहून सामान आणावे लागायचे.
आणलेल्या सामानासमोर त्याची किंमत लिहून त्याखाली त्याची टोटल मारून किराणा दुकानदार सही करायचा. दर महिन्याला पगार झाला की आई त्याचे बिल चुकते करायची. घरोघरी अशा किराणा वह्या असायच्या आणि किराणा भरायची हीच पद्धत होती. दर महिन्याला किराणाच्या पिशव्या घरी आल्यानंतर आई त्या स्वच्छ जागी ठेवायची. त्याच्या भोवती पाणी फिरवून हळदीकुंकू वाहायची आणि नंतर सामान डब्यात भरले जायचे. दर महिन्याला डबे घासून सामान भरायची पद्धत होती. आम्ही भावंडे किराणा सामानातले कपड्याचे आणि अंगाचे साबण काढून त्याची गाडी गाडी खेळायचो. साबण रॅकमध्ये जाईपर्यंत हा खेळ सुरू राहायचा.
थोडक्यात किराणा आणणे हा सुखकारक सोहळा असायचा. यादी लिहिण्यापासून ते सामान डब्यात जाईपर्यंत शेंगदाणे मुरमुरे गूळ खोबरे मनसोक्त तोंडात टाकायला मिळायचे.
आई जेव्हा किराणाच्या पिशव्यांची पूजा करून हात जोडायची त्यावेळी मी सुद्धा तिच्याबरोबर हात जोडायची. आईच्या चेहऱ्यावर कृतार्थ भाव दिसायचा. कष्टाने मिळविलेल्या अन्नाचा सन्मान करणे आणि त्याला सांभाळून वापरणे हा साधासुधा संस्कार होता. बोधीच्या जन्मानंतर किराणा भरल्यावर मी पूजा करताना छोटा बोधी पण हात जोडायचा आणि डोके जमिनीवर टेकवून पिशव्यांना नमस्कार करायचा. त्यानंतर तोही सामानातले साबण काढून गाडी-गाडी खेळायचा….
अन्न ही मनुष्याची मूलभूत गरज आहे. अन्न मिळाल्यानंतर मनुष्याला आनंद होणे साहजिक आहे. अन्न जेव्हा कष्ट केल्यावर मिळते तेव्हा सात्विक आनंद होतो. तृप्तता मिळते. जेव्हा अन्न भ्रष्टाचाराने किंवा अयोग्य मार्गाने किंवा एखाद्याला लुटून मिळते तेव्हा ते अन्न आरोग्य आणि शांतता देऊ शकत नाही.
दुसऱ्यावर अन्याय करून किंवा भ्रष्टाचाराने मिळवलेले अन्न खाल्ल्यानंतर अन्नदोष निर्माण होतो. असे अन्न रोग आणि मानसिक त्रास निर्माण करते. कलह आणि लसलस निर्माण करते. असले अन्न खाताना संपूर्ण घरदार एकमेकाकडे चोरटेपणाने किंवा संशयितासारखे पाहत असते.
आपण अन्न तयार केल्यानंतर त्यातले चार घास दुसऱ्याला देण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होते. भुकेल्याच्या मुखात चार घास दिले तर घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. म्हणून भारतीय दर्शनात अन्नदानाला फार महत्त्व दिले गेले आहे. अन्नदान तुमच्यातली दुसऱ्याची भूक जाणण्याची क्षमता विकसित करते. तुम्हाला माणूस म्हणून जगायला मदत करते.
लॉकडाऊन च्या काळात तर लोकांना किराणा सामानाचे महत्त्व फारच पटले. त्याकाळी भीतीपोटी लोक दुप्पट किराणा भरू लागले. किराणा दुकान उघडल्याबरोबर पटकन सामान आणून ठेवू लागले. गरजूंना गावोगावी किराणाचे किट वाटले गेले. खरोखरच किराणा सामानाला आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. महिन्याचा किराणा एकदम घरात येणे हे संसारातले फार मोठे सुख आहे. दिवाणखान्यातले महागडे डेकोरेशन किंवा भारी-भारी शोभेच्या वस्तू हे घराचे सौंदर्य नसून, गहू, तांदूळ, साखर, डाळींनी भरलेले डबे हे घराचे खरे सौंदर्य आहे.
घरात शिधा भरलेला असला तरच कुठलीही बाई शांत चित्ताने राहू शकते. अन्नाची विवंचना संपल्याशिवाय कुठल्याही स्त्रीचे मन स्थिर होऊ शकत नाही. आपल्याला कोणी अन्न दिल्यानंतर आपण हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आभार मानले पाहिजेत
दिलेल्या अन्नाचा कृतज्ञतेने स्वीकार करावा कारण अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते तुमचा पिंड पोसते. अन्न फक्त रक्त धातू मांस मज्जा इतकेच निर्माण करते असे नाही तर भावना आणि विचारसुद्धा अन्नातूनच निर्माण होतात. हे अन्नाला पूर्णब्रह्म मानण्यामागचे खरे कारण आहे. म्हणूनच सात्विक अन्न खाल्ल्यानंतर मिळणारी तृप्ती आणि शांतता याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.
अन्न बाह्यस्वरूपी निर्जीव दिसत असले तरी ते शरीरात गेल्यानंतर ऊर्जा निर्माण करते. अन्नामध्ये पोटेन्शिअल एनर्जीचा मोठा साठा असतो. जिवंत शरीरात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याची अन्नात क्षमता असते. अन्न जेव्हा बीज रूपात असते आणि मातीत पेरले जाते त्यावेळी ते पुन्हा नवीन अन्नाची निर्मिती करण्याइतके सक्षम असते.
अन्न हे पूर्णब्रह्म हे अगदी खरे आहे
लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.
प्रस्तुती : मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आता पक्ष पंधरवडा सुरू झाला आहे पितरांचं स्मरण करायचं.. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची.
श्राद्धपक्ष करायचं. गोडधोड करायचं. पितरांच स्मरण करून तर्पण करायचे… म्हणजे त्यांना तृप्त करायचे..
त्यासाठी आई वडील सासू सासरे …. यांच्या बद्दल लेख लिहून झाले.
मनात विचार आला … फक्त पितरंच कशाला? पितरांप्रमाणेच आपल्याला प्रेम, माया, स्नेह देऊन ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्यांची थोडीशी आठवण काढू…
म्हणून हा माढ्याच्या काकूंवर लेख लिहिला – – – –
… लग्न होऊन मी पुण्यासारख्या शहरातून सोलापूर जवळच्या माढा या छोट्याशा गावात गेले. हे तिथल्या स्टेट बँकेत नोकरीला होते. एका डॉक्टरांच्या वाड्यात वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. डॉक्टरांच्या आईंना काकू म्हणत असत. त्यांचा मला मोठा आधार वाटायचा. मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनच शिकले.
वाड्याच्या दरवाज्याच्या दारात एक मोठा आडवा कट्टा होता. संध्याकाळ झाली की त्या कट्ट्यावर काकु येऊन बसायच्या. आसपासच्या बायका गप्पा मारायला यायच्या. जाणारे येणारे थांबून बोलायचे.
गावात लायब्ररी होती. पुस्तकं बदलायला, भाजी आणायला मी संध्याकाळी बाहेर जात असे. येताना काकु म्हणायच्या … ” ये बैस थोडावेळ “
तो कट्टा म्हणजे गंमतच होती. अनुभवानी मला तर त्या कट्ट्याच वेडच लागलं. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं.
चार घर पलीकडे टाकून असलेली कमला लहान बाळाला घेऊन आली. “काकु बघा ना. हा नुसता रडतोय झोपतच नाहीये. “
” अग जरीची कुंची घातलीस टोचतीय बाळाला. “
” माझ्या आईनी शिवलीय”
” म्हणून काय झोपताना घालशील? जा साध टोपडं घेऊन ये”
काकुंनी कुंची काढली. पदरानी बाळाचा चेहरा, मान पुसली. पेपर घेऊन वारा घालायला लागल्या.. काही वेळातच बाळ गाढ झोपलं. जरा वेळाने येऊन ती बाळाला घेऊन गेली.
एक वेडसर मुलगा कधीतरी यायचा.
” ये बस ” काकुंनी म्हटलं की तो जमिनीवरच बसायचा. आत जाऊन त्याला पोळी, भाजी एखादं गोड काही असेल ते घेऊन यायच्या. मला म्हणाल्या,
” अशी माणसं देवाची असतात बघ.. देवानंच त्यांना असं घडवले. त्यांचा कधी राग राग करू नये. मनाने निर्मळ आहे ग ते लेकरू”
एक अतिशय सुंदर, शालीन बाई जरीची साडी नेसलेली डोक्यावरून पदर घेतलेली रस्त्याने जाताना काकुंना ” बऱ्या आहात का “?म्हणाली
” हो मी बरी आहे”
” जरा देवीला जाऊन येते. “
“ये हो”
मी म्हटल “किती सुंदर आहेत ह्या बाई. कोण आहेत”
“तू नवीन आहेस. तुला अजून काही माहित नाही. “
तेवढ्यात एक बाई म्हणाली.. ” खूप मोठं घर आहे तिचं… आणि हंड्या, झुंबर आहेत तिच्या घराला “
मी म्हटलं ” कधीतरी बघायला पाहिजे “
लगेच काकु कडक आवाजात मला म्हणाल्या, ” खबरदार काही बघायला जायची जरूर नाही. तिच्या घरी कधी जायचं नाही. पाटलाची रखेल आहे ती. “
… मी एक धडा घेतला.
पलीकडच्या घरातली नुकतच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. ” काकु वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालंय. सासुबाई गावाला गेल्यात. काय करू?”
” चार बटाटे उकडून भाजीत घाल. तिखट, कूट घाल. “
” पण त्यानं वाढीव भाजी होईल.. ”
” उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर घाल आणि त्याची थालीपिठं कर “
“चांगली होतील का “?
“अग करून तर बघ. आणि लक्षात ठेव अशा गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात”
दुसरे दिवशी ती सांगत आली, ” सगळ्यांना थालपीठं फार आवडली. कोणाला काही कळलं नाही. अगदी तुला मला झालं. “
…. संसाराला सुरुवात करतानाच अन्नाचा मान राखायचा, वाया घालवायचं नाही. हा संस्कार तिला मिळाला आणि मलाही…
एके दिवशी मी खाली कट्ट्यावर गेले नव्हते. शेजारची बायडी मला बोलवायला आली.
” खाली चला काकूंनी तुम्हाला बोलावलंय. बायजा येणार आहे. “
कोण बायजा मला कळेना. खाली गेले तर कट्टा फुल भरलेला होता. खाली मातीत सुद्धा बायका बसल्या होत्या. एक साधीशी बाई डोक्यावरून पदर घेतलेली…. तीच बायजा ओटीवर बसली होती. मला फारच उत्सुकता लागली. सगळ्या जमल्या तस काकूंनी तिला सांगितलं
” हं कर सुरू “
बायजानी संत तुकाराम, संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग सुरेल आवाजात म्हटले. एक जण म्हणाली,
” ए ते जनीच गाणं म्हण ना, तुझं ते गाणं आम्हाला आवडत. “
मग जनाबाईची गाणी झाली. गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या बायजानी म्हणून दाखवल्या.
आज वाटतं तेव्हा त्या लिहून ठेवायला हव्या होत्या. सगळ्या तिचे कौतुक करत होत्या.
… नंतर लक्षात आलं की तिथे एका गायिकेचा लाईव्ह कार्यक्रम सादर झाला होता. जाणारे येणारे पण ऐकत उभे होते. काकुंनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला…
“देवानी आवाजाची देणगी दिली आहे तुला. भाग्यवान आहेस बघ. ” बायजानी काकूंना वाकून नमस्कार केला. बायजाच्या कलेचा छोटासा सन्मान त्यांनी केला. इतरांना त्याचा आनंद दिला… किती गोड कल्पना… एखाद्याच्या कलेला कशी दाद द्यावी हे मी शिकले.
काकूंचा मुलगा डॉक्टर होता. पण पेशंट काकुंनाच औषधं विचारायचे. घरगुती उपायांची तर त्यांच्याकडे पोतडीच होती.
गुराखी, रात्री येणारा रामोशी जाताना दिसला की त्याला जवसाची, तिळाची, दाण्याची चटणी दे. नाहीतर जे काही घरात असेल ते त्याला बोलवून त्या द्यायच्या.
माझ्या मुलाला आनंदला पहिला भात त्यांनीच भरवला. काकुंनी सांगितलं
“लहान लेकराला सारखं घरात ठेवू नये. सगळीकडे न्यावं म्हणजे लेकराला काही बाधत नाही. “
आज लक्षात येतं … मुलांची प्रतिकारशक्ती सहज कशी वाढवायची हे काकूंनी मला शिकवलं.
ही जुनी जाणती माणसं म्हणजे चालती बोलती ज्ञानाची पुस्तकं असतात. हे आज लक्षात येतं.
जगात वावरताना लागणाऱ्या अनेक गोष्टी नकळतपणे मी त्या कट्ट्यावर शिकले.
रोज काहीतरी तिथं नवं घडत असायचं. कधी तरी काकू एकट्या पण असायच्या…
सुनेला भाकरी करता येत नाही अशी तक्रार करण्याला बाईला त्या म्हणाल्या.. ” लोकाची पोर आपल्या घरी आली आहे. आता ती आपली झाली आहे. घे सांभाळून… पुरुषांच्या चार भाकरी तू कर. तिच्या तुटक्या भाकरी तुम्ही खा. हळूहळू शिकेल ती पोर… “
त्यांच इतकं सहज सोपं तत्वज्ञान होतं. प्रश्न फार पुढे जाऊ द्यायचेच नाहीत. तिथल्या तिथे उपाय सांगायच्या…
अशी निर्मळ मनं, प्रेमळ नाती अनुभवायला मिळाली आजही काकू… आणि त्यांचा तो कट्टा स्मरणात आहे.
एकदा काकू एकट्याच कट्ट्यावर होत्या. म्हटलं
“आज कोणी नाही तर तुम्हाला करमत नसेल ना ?”
तर म्हणाल्या, ” सांगू का तुला.. कोणी नसेल ना तर मी आपला ‘श्रीराम जय राम जय जय राम ‘ जप करत बसते. तो रामराया आपल्या जवळ आहे असं वाटतं बघ. ”
असं खरखुरं अध्यात्म काकू जगत होत्या……
“ साधं सोपं जगणं हीच श्रीमंती आहे. ”.. हे काकूंच्या वागण्यावरून मी शिकले. अशी माणसं आयुष्य समृद्ध करतात. आणि आयुष्यभर लक्षात राहतात. ही माणसं आयुष्यात आली हे माझ भाग्यच..
… आज त्यांच्या आठवणीने गहिवरूनच आलं आहे … थांबते आता इथं….
☆ मोठ्या मनाचा छोटा सेल्समन —☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता…
‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला.
मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती.
पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा, पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो. कितीला देणार ?
क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला.
त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं विकतोयस ?
तर म्हणाला,
पुस्तकच नाही तर मला हातात जे काही मिळत ते सगळं मी विकतो.
मला जाता जाता ‘सेल्स’ मधला एक गुरु भेटला होता. नाव विचारलं म्हणाला ‘दत्तू’, गाव उमरगा.
मनात म्हणलो चला आज गुरुवार, बहुतेक प्रत्यक्ष ‘दत्तगुरूंच ‘आले आपल्याला ज्ञान द्यायला.
त्याला म्हणालो, “काही खाणार ?”
बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला
‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का नंतर ?’
हसू आलं मला. म्हणलो दे पुस्तकं आणि घे पैसे. १० सेटचे १०० दिले.
वरती शंभरची नोट ठेवली त्याच्या हातात, म्हणलो असुदे तुला बक्षीस.
एक मिनिट तो शांत झाला आणि म्हणाला,
‘चला साहेब, आपण डोसा खायला जाऊ, समोर लई भारी डोसा भेटतो बोलत्यात’.
अस्मादिकांनी गाडी पार्क केली रस्त्यावरच. त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून समोर ‘मॉर्डन कॅफे’मध्ये शिरलो. त्याच्याबरोबर आत शिरताना मला काऊंटरवरच्या अण्णांनी थोडसं आश्चर्यानी पाहिलं.
आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकामं होतं. समोरच बसलो. त्याला मेनुकार्ड दिलं. म्हणलो काय हवं ते मागव. समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्याने झोकात मसाला डोस्याची ऑर्डर दिली. वरती ‘अमूल ज्यादा मारना’ असही ऐकवलं, माझी ऑर्डर घेत, वेटर त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकत काही न बोलता निघून गेला. मला पोराच्या ‘कॉन्फिडन्सचं’ कौतुक वाटायला आधीच सुरुवात झालेली होती.
आजुबाजूची टेबले आमच्याकडे कुचेष्टेनी बघतच होती.
मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखादा ठेवणीतला पुणेरी कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो. (मला काय किडा कमी नाहीये, पण त्याच्याबद्दल परत कधीतरी)
मग आली आमच्या मुलाखतीची वेळ, म्हणलो, “काय रे दत्तू, पुण्यात कधी आलास ?”
२-३ वर्षे झाली म्हणाला. “आईबा मजुरी करायची, बा वारल्यावर तिला कामं मिळण कमी झालं. मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण हाय, मग एका नात्यातल्या मामानी सांगितलं पुण्यामुंबैकडे लई कामं भेटत्यान, तिकडच जा, ऱ्हावा आणि खावा. आईनी जरुरीपुरती चार भांडी, होते नव्हते ते कपडे गोळा केले, घराला अडसर लावला आणि आलो मंग पुण्याला. ”
आई सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामं करते, मी इकडे येतो.
त्याला विचारलं ‘कोण देतं रोज विकायच्या गोष्टी ?’
म्हणाला “हाय ना ठेकेदार आमचा”.
रोज सकाळी ‘बॉम्बे’ वरून आलेल्या वस्तू देतो, काय बोलायचं असत ते आणि भाव सांगतो, पैसे घेतो आणि निघून जातो. ”
आता धंद्याच्या गप्पा सुरु झाल्यावर पोरगा बोलायच्या मूडमध्ये आला होता.
मी विचारलं ‘म्हणजे कमिशन वर काम करतोस का ?’
तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो”
मी विचारलं, बहिणीचं काय ? तिला तरी शाळेत पाठवता का ?
हां मंग? ती जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत. शिकते, अन मलाबी थोडं शिकवते. गावाकडे पन जास्त नाही जायचो शाळेत. पर आई बोलते थोडातरी लीव्ह्याला वाचायला शिक, कुठंतरी उपेगाला येईल. म्हून थोडं शिकतो. सायेब दिवसभर बाह्येर फिरल्यावर लई कटाळा येतो. पर आता धाकल्या बहिनीसमोर गप बसतो. ते पाढे अन इंग्लिश भाषेचे धडे काय केल्या डोक्यात नाही शिरत, पर आईला दाखवायला हो हो करतो. आता एकदोन वर्ष जावूदे, मग बघा आईचे काम बंद करायला लावतो का न्हाई ? पलीकडच्या सोसायटीमध्ये flat घेणार भाड्यानी. तिकडे राहणार.
मी मनात म्हणलं दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला “कन्व्हिन्स” करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे नाही म्हणता आले तर ? आणि या वयात सगळा घरचा खर्च भागवणाऱ्याला कशाला आले पाहिजेत पाढे यायला ?
तेवढ्यात आमचा डोसा आला. दत्तूनी एकदा माझ्याकडे हळूच बघत दिलेला काटा-चमचा बाजूला ठेवून मस्तपैकी हातानी चटणी, सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली. मला तर कधीच डोसा हा प्रकार फोर्क नि खाता येत नाही, त्यामुळे मी पण तसाच खायला सुरुवात केल्यावर एकदम मनमोकळ हसला. म्हणला, “साहेब आज तुम्ही आणल ना बरोबर म्हणून हॉटेलवाल्यांनी आत घेतला, नाही तर बाहेरूनच “चल जा असं म्हणत्यात. आपले कपडे नसतात ना चांगले म्हून. नाय तर आपणपण इथल्या वेटर एवढंच कमावतो”.
क्षणभर विचार आला;
श्रीमंतीची व्याख्या कुठेही गेलं तरी साधारण एकसारखीच. प्रत्येकाला दुसऱ्या बरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो. मग तो खराखरा पैशांनी श्रीमंत असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा.
सहज विचारलं किती सुटतात रे महिन्याचे ?
म्हणाला, ”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो”
मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार ?
आयला, माझी आजची ऑर्डर झाली असती तर त्यात मला जेमतेम २० हजार मिळाले असते, ते पण सगळं सुरळीत पार पडल्यावर एक महिन्यानी.
मनात म्हणलं, “लेका तुला सगळ्या वेटर्सपेक्षा जास्ती पैसे मिळतात. कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस ? तू तर स्वतःचा राजा आहेस”
डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार ?
म्हणाला तुम्हीच सांगा तुम्ही काय घेणार साहेब ?
मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे, तर आता तू सांगायचं.
आपण ऑर्डर करू.
दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे ?
आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी.
मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे ?
मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना? म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार ?” त्याचा कोमेजलेला चेहेरा समजत होता, म्हणाला, नको साहेब, भूक संपली. आता मला जेवण पण नाय जानार, जाऊ आपण”
बाहेर पडत असताना हॉटेलच्या काऊंटरवरचा अण्णा जरा सलगीत येवून म्हणला, “साब ये बच्चा दिनभर इधर चौकमे क्या क्या बेचता रेहता है, हम लोग हमेशा देखते है उसको । आज पेहेली बार इधर अंदर आके खाना खाके गया ।बहोत अच्छा बच्चा है, गंदे बच्चोसे हमेशा दूर रेहता है । लेकीन क्या करे साब, हम लोगका भी धंदा है ना ? हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा ।” मला त्याचंही पटले.
पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना ?
जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर जे लोक बसलेले होते, त्यातल्या कित्त्येकांपेक्षा तो पोरगा कितीतरी जास्त कमवत असणार. फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ‘ते स्टेट्स’ नव्हतं.
बाहेर पडलो तर दत्तू गाडीपाशी जावून थांबला होता. आत बघत होता. त्याला विचारलं, “मारायची का एक चक्कर गाडीतून ?”
तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव पाहिले ना, खल्लास.
त्याला शेजारच्या सिटवर बसवून एक छोटीशी चक्कर मारून पुन्हा सिग्नलला सोडले. गाडीच्या बाहेर नवलाईने बघत होता. उतरल्यावर बघून समाधानानी हसला.
म्हणाला “साहेब, पुन्हा कवा येनार?”
म्हणलो अरे मी येत असतो मधूनमधून इकडे, आता तुला बघितलं की थांबीन नक्की.
“हात मिळवल्यावर तर ते दत्तगुरू एकदम प्रसन्नच झाले”
नक्की या म्हणाला,
मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं घेऊन सिधा घरी जानार. सांगनार आज आपण गाडीतून चक्कर मारली, अजून माझ्याबरोबरची कोणी पोरंपन गाडीच्या आत बसली नाय. मीच पहिला. ” मी नंबरात आलेल्या त्या पोराला हसून टाटा केला.
तो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत?
याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे……
पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींपेक्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते….. !!
हा पोरगा नक्की पुढे जाणार आयुष्यात, अशी खुणगाठ मनात बांधून गाडी सुरु केली, रेडियो लावला,
नेमकं अनाडीमधलं ‘किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार’ लागलं.
योगायोगच म्हणायचा नाहीतर काय…. !!
लेखक : एक सच्चा पुणेकर
प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
आमची आई.. .
आईने केला कोंड्याचा मांडा. माझी आई सौ. इंदिरा द. माजगावकर, दुसरी श्यामची आई होती. इतके दिवस नाही पण आता संसारात पडल्यावर जाणवतय, आईने कसा संसार केला असेल ? घरात आई नाना, आम्ही चौघी बहिणी, एक भाऊ, माझे काका (अण्णा), आत्या (आक्का) इतकी माणसे होती. पण मिळवणारे एकटे नानाच होते. त्यातून शिक्षकांना अगदी अपुरा पगार, पण आईने कोंड्याचा मांडा करून संसार सजवला.
45 ते 50 चा तो काळ, रेशनचे दिवस होते ते! धान्य आणून स्वच्छ करून निवडून रेशनला लाईनीत उन्हातान्हांत उभं राहून जड ओझं घरी आणायचं, घामाघूम व्हायची बिचारी! शिवाय आम्हा मुलांचं सगळ्यांचं आवरून हे सगळं आई एकटी करायची. आई माहेरी धाकटी होती. शेंडेफळ म्हणून लाडाकोडात वाढलेली आई सासरी मोठी सून म्हणून आली, हे मोठेपणाच शिवधनुष्य वेलतांना तिची खूपच दमछाक झाली.
आईचं लग्न अगदी मजेशीर झालं, माझे मामा (दादामामा )आणि माझे वडील नाना दोघे मित्र होते. एकदा नाना अचानक दादा मामांना भेटायला म्हणून आईच्या घरी गेले. बाहेर ओसरीवर माझ्या आईचा सागर गोट्यांचा डाव रंगात आला होता, नाना म्हणाले, “अहो यमुताई (आईचं माहेरचं नाव) दत्तोपंत आहेत का घरात? हे कोण टिकोजी आले मध्येच. ‘ असं पुटपुटत सागर गोट्याचा रंगलेला डाव सोडून आईने गाल फुगवले आणि परकराचा घोळ सावरत दादा मामांना बोलवायला ती आत पळाली. तिला काय माहित या टिकोजीरावांशीच आपली लग्न गाठ बांधली जाणार आहे म्हणून. लग्नानंतर आपल्या मित्राला, म्हणजे मोठ्या मामांना, हा किस्सा आमच्या वडिलांनी आईकडे मिस्कीलपणे बघत रंगवून सांगितला होता. मग काय मामांच्या चेष्टेला उधाणच आलं,
आम्ही मोठे झाल्यानंतर ही गंमत आमच्यापर्यंत मामांनी पोहोचवली होती. तर अशी ही आईनानांची पहिली भेट. नंतर संसाराची निरगाठ पक्की झाली, आणि त्यांचे शुभमंगल झाले. नाशिकच्या जोशांची कनिष्ठ कन्या मोठी सून म्हणून माजगावकरांच्या घरांत आली. कर्तव्याची, कष्टाची जोड देऊन तिने नानांचा संसार फुलवला. आता ति. आई नाना दोघेही नाहीत पण आठवणींची ही शिदोरी उलगडतांना मन बालपणात जात, आणि त्यांच्या आठवणीने व्याकुळ होत… व्याकुळ होतं..