मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका गृहिणीचं मनोगत – श्री सुहास आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

? मनमंजुषेतून ?

☆ एका गृहिणीचं मनोगत – श्री सुहास आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

माझं असं का होत माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं पण उत्तर काही मिळत नाही !

 

घरात प्रचंड पसारा असतो त्याचवेळी सगळे येतात,

फर्निचरच्या धुळीवरून हळूच एक बोट फिरवतात !

मी मनात खजील, तर ते गालातल्या गालात हसत असतात,

बाई फारच आळशी म्हणून चक्क एक शेरा ठोकतात !

घर टकाटक आवरल्यावर कुणीच कसं येत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं पण उत्तर काही मिळत नाही !

 

दिवसभराच्या कामानं मीही दमलेली असते !

रात्री फक्त खिचडी हीही ठरलेली असते !

किचनचा लाइट off  करणार, तेवढ्यात बेल जोरात वाजते,

surprise म्हणून पाहूणे येतात, खिचडीला पाहून नाके मुरडतात,

चार पदार्थ वेगळे असतात तेव्हा कुणीच कसं येत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बर, दर वेळेला असच होत पण उत्तर काही मिळत नाही !

 

कधीतरी माझ्या हातात चार पैसे खुळखुळत असतात,

लक्ष्मी रोडवरचे dress आता मला बोलवायला लागतात,

त्यांच्या हाकेला ओ देऊन मी लगेच पुण्याला जाते,

नेमके त्याच वेळी सेल संपून हाय प्राइस लागते !

matching आणि size चे ही गणित का जुळत नाही,

माझं असं कां होतं माझं मला कळत नाही !

बर, दर वेळेला असंच होतं, पण उत्तर काही मिळत नाही !

 

गणिताचाच पेपर माझ्या स्वप्नात येतो,

पेपर चालू झाला पण मला उशीर झालेला असतो,

मायनस झिरो मार्क मला दिसायला लागतात,

भीतीने लटपट पाय कापायला लागतात !

स्वप्नात तरी मी विद्यापीठात पहिली का येत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं पण उत्तर काही मिळत नाही !

 

नेहमीच मी ठरवते जरा कमी बोलायचं,

स्वतःचीच टकळी लावण्याआधी दुसऱ्याचं थोडं ऐकून घ्यायचं !

परदेशातून मावशी आली, मी माझीच cassette लावली,

Backlog भरून काढण्यासाठी मी बडबड चालू केली !

मौनाचं महत्त्व माझ्यासाठी का applicable होत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं ,दर वेळेला असंच होतं, पण उत्तर काही मिळत नाही !

 

आत्ताच मी ठरवलं मुद्दाम काही लिहायचं नाही,

ओढून ताणून शब्द जुळवून कविता त्याला म्हणायचं नाही !

कुणीही काहीही म्हटले तरी कवयित्री अशी होत नसते,

आपलीच फजिती इतरांना सांगून पाठ आपली थोपटायची नसते !

तरीही मी लिहायचं कधी सोडत नाही,

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं, पण उत्तर काही मिळत नाही……।।

 

– श्री सुहास आपटे. 

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्र क्षणांचे… सुश्री स्वाती महाजन -जोशी ☆ सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मैत्र क्षणांचे… सुश्री स्वाती महाजन -जोशी ☆ सुश्री मीनल केळकर ☆ 

मैत्र क्षणांचे लिहून बरेच महिने उलटून गेले असतील. लोकलमध्ये भेटलेल्या काहीजणींच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न. या भेटलेल्या प्रत्येकीमुळे माझ्यात काही ना काही बदल झाला हे नक्की. बावीस वर्षांचा रोज सरासरी साडेतीन तास एवढे माझ्या लोकल प्रवासाचे आयुष्य आहे. आपण अजून जिवंत आहोत ना हे बघायचे असेल तेव्हा मी सरळ उठते आणि लोकलने कुठे तरी जाऊन येते. जाताना गर्दी नसेल अशी वेळ निवडायचे पण येताना अगदी चेंगराचेंगरीत लोकलमध्ये चढायचे. असा प्रवास आणि लोकलमधले वातावरण याने पुढील काही महिने जगण्याची ऊर्जा मिळते. पण करोनाने सर्वसामान्यांसाठी ट्रेनचा प्रवास बंद होता. तेव्हा काही कारणाने रेल्वे स्थानकाच्या आसपास जावे लागले. ती ओकीबोकी स्टेशनं बघून खरच भडभडून आले. 

लोकल बंद मग त्यावर अवलंबून असलेल्या फेरीवाल्या कुठे गेल्या असतील हा विचार मनात येत असतानाच डोळ्यांसमोर उमा आली. तिला अगदी ती तीन-चार महिन्यांची असल्यापासून मी ओळखते. एका अंध जोडप्याची मुलगी. ते जोडपे लोकलमध्ये भीक मागायचे. त्या दोघांची प्रेमकहाणी आणि लग्न या सर्वांची मी साक्षीदार होते. पण ते दोघे जरा तिरसट असल्याने इतरांप्रमाणे त्यांच्याशी कधी संवाद व्हायचा नाही. त्यांना मुलगी झाली. मग ती बाई त्या छकुलीला घेऊनच लोकलमध्ये येऊ लागली. फार गोंडस मुलगी होती. सर्व प्रवासी महिलांसाठी अगदी कौतुकाचा विषय होती. तिची आई खूप प्रोटेक्टिव्ह होती. तुमची मुलगी खूप गोड आहे हो असे मी एकदा तिला म्हटलं त्या क्षणी तिने आपल्या मुलीभोवतीची मिठी अजूनच आवळली. उमा नाव ठेवल्याचे थोडे दिवसांनी तिने मला आपणहूनच सांगितले. एक दिवस उमाच्या वडिलांनी विचारले, आमची उमा गोरी आहे का काळी? ‘ छान गोरी आहे. आणि तिचे डोळे खूप बोलके आहेत.’ हे ऐकताच ते दोघेही खूप खूष झाले. उमा मोठी होत होती. दोन वर्षांची असल्यापासून ती आईवडलांना कोणते स्टेशन आले ते सांगू लागली होती. आम्हालाही फार गंमत वाटायची. ती अतिशय हुशार होती. तीन वर्षांची झाल्यावर लोकलमधल्याच प्रवाशांनी आग्रह करून तिला शाळेत घातले. दोन वर्षे नियमित शाळा सुरू होती. तिला भाऊ झाल्यानंतर आईवडलांच्या मदतीसाठी उमाची  शाळा सुटली. भाऊ झाल्याचा तिला खूप आनंद झाला होता. गणेश नाव ठेवल्याचे तिने पूर्ण डब्यातल्या बायकांना सांगितले होते. तिच्या वयापेक्षा जास्त मोठी बनून ती  आपल्या भावाला सांभाळत होती. सोबत आणलेल्या बाटलीतले दूध नासले नाही ना हेही ती तपासायची. उमा-गणेश लोकलमध्येच मोठे होत होते. उमा पुन्हा शाळेत जाऊ लागली. पण काही महिन्यात शाळा सुटली. नेरूळचे तिचे घर पडले. ते घणसोलीला रहायला गेले. मग शाळा सुटली ती सुटलीच. आईवडलांना तर शाळा हा विषय बिनमहत्त्वाचा होता. पण उमाला शिकायची आवड होती. ती जेवढं शिकली होती, त्याचा ती सारखा सराव करायची. एक दिवस मला म्हणाली, “ मॅडम मला एबीशी शिकवा ना. तिला मी ए टू झेड अक्षरे एका कागदावर लिहून दिली आणि मग गिरवून घेतली. दोन दिवसांनी भेटली तेव्हा तिला अक्षर येऊ लागली होती.  मग लोकलवर चिकटवलेल्या जाहिरातीतील अक्षर ओळखण्याचा तिला नादच लागला. तिचे पालक भीक मागत तेव्हा ती दारात शांतपणे बसून  असे. एक दिवस रुमाल विकायला आणले.  सात-आठच होते पण ती आनंदात होती. मी विचारले कुठून आणले ग. एका ताईने तिच्याकडचे दिले. मला पैसे देणार आहे. एवढं सांगून घाईने निघून गेली. परत भेटली तेव्हा म्हणाली मला सगळे भिकाऱ्याची पोरगी म्हणून चिडवतात. मला आवडत नाही. काही माल विकायचा तर पैसे नाहीत. मग मी असाच माल विकून पैसे जमवणार आणि मी पण  वेगवेगळा माल विकणार. त्यावेळी तिचे वय फक्त आठ होते. मला खूप कौतूक वाटले. उमा खूप दिवसांनी भेटली. गणेशला आश्रमशाळेत घालणार असल्याचे सांगितले. तळेगावच्या  आश्रमशाळेची  माहिती तिला गाडीतल्याच कोणी तरी दिली होती. खूप खूष होती. काही दिवसांनी मी पण शिकायला जाणार, असेही तिने सांगितले. मध्येच एकदा सगळे तळेगावला जाऊन आले. जूनपासून दाखला झाला होता. भावाचे शिक्षण मार्गी लागणार याचा तिला खूप आनंद झाला होता. आपलेही शिक्षण सुरू होईल ही आशा होती. काही दिवस ती गाडीला दिसायची. नंतर ते सर्वचजण गायब झाले. गाडीत येणे बंद झाले. नक्की कुठे गेले कोणत्याच फेरीवाल्यांना माहित नव्हते. गणेशचे शिक्षण सुरू झाले असेल का? उमाच्या स्वप्नाचे काय? या प्रश्नांनी मी अस्वस्थ होते. जरी शिक्षण सुरू झाले असले तरी लॅाकडाऊनमध्ये पुन्हा बंद पडलं असेल. खरंच एक हुषार मुलगी, आपल्या भावावर आईसारखी माया करणारी बहीण, आणि वयापेक्षा जास्त प्रगल्भ असलेली मुलगी परत कधीच बघायला मिळाली नाही. आता एकदा जाऊन उमाला शोधणार आहे हे नक्की.  

लेखिका – सुश्री  स्वाती महाजन -जोशी

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पदर…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ पदर…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली 

आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या पदराची ओळख झाली.

पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला,

आणि मी आश्वस्त झालो …

तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला

आणि मग तो भेटतच राहिला … आयुष्यभर… … 

शाळेच्या पहिल्या दिवशी –तो रुमाल झाला

रणरणत्या उन्हात –तो टोपी झाला,

पावसात भिजून आल्यावर –-तो टॉवेल झाला

घाईघाईत खाऊन खेळायला पळताना –तो नॅपकीन झाला

प्रवासात कधी –तो अंगावरची शाल झाला 

बाजारात भर गर्दीत कधीतरी आई दिसायची नाही

पण पदराच टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो …

मग त्या गर्दीत –तो माझा दीपस्तंभ झाला

गरम दूध ओतताना –तो चिमटा झाला

उन्हाळ्यात लाईट गेल्यावर –तो पंखा झाला

निकालाच्या दिवशी –तो माझी ढाल व्हायचा.

बाबा घरी आल्यावर, चहा पाणी झाल्यावर, तो पदरच प्रस्ताव करायचा ….

‘छोटूचा रिझल्ट लागला…चांगले मार्क पडले आहेत.. एक-दोन विषयात कमी आहेत, 

पण …पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय..बाबांच्या संतापाची धार बोथट होताना

मी पदराच्या आडून पाहायचो.. हाताच्या मुठीत पदराच टोक घट्ट धरून !

त्या पदरानेच मला शिकवलं…… कधी – काय – अन कसं बोलावं

तरुणपणी जेव्हा पदर बोटाभोवती घट्ट गुंडाळला तेव्हा त्याची खेच बघून आईने विचारलंच,

“ कोण आहे ती…नाव काय?? ”

लाजायलाही मला मग पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला.

 

रात्री पार्टी करून आल्यावर … जिन्यात पाऊल वाजताच,  दार न वाजवता … पदरानेच उघडलं दार.

कडी भोवती फडकं बनून …कडीचा आवाज दाबून …त्या दबलेल्या आवाजानेच  नैतिकतेची शिकवण दिली

पदराकडूनच शिकलो सहजता

पदराकडूनच शिकलो सौजन्य

पदराकडूनच शिकलो सात्विकता

पदराकडूनच शिकलो सभ्यता

पदराकडूनच शिकलो सहिष्णुता

पदराकडूनच शिकलो सजगता

काळाच्या ओघात असेल, अनुकरणाच्या सोसात असेल, किंवा… स्वतःच्या “स्व”च्या शोधात असेल,

साडी गेली… ड्रेस आला 

पँन्ट आली… टाॅप आला

स्कर्ट आला… आणि छोटा होत गेला

प्रश्न कपड्याचा नाहीच आहे ,

प्रश्न आहे तो,……  आक्रसत जाऊन , गायब होऊ घातलेल्या पदराचा !

कारण पदर हे पद नसून , जन्मभराची फक्त आणि फक्त  जबाबदारी आहे . आणि ती जाणीवपूर्वक व नि:स्वार्थपणे – पेलू शकते केवळ आई ! 

खरं तर – शर्टालाही  फुटायला हवा होता पदर …

पण खरं सांगू … शर्टाला तो झेपणार नाही !!!

 

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परतफेड… अज्ञात ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ परतफेड… अज्ञात ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

“ कसे आहात..?”

एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला.., आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो..

तो म्हणाला.. ” भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधीसुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही..”

त्यानंतर त्याने जे काही सांगितलं.. त्यामुळे माझा अंतरबाह्य असा  कायापालट झाला..!

त्याने काय सांगितलं..??—-

तो शांतपणे म्हणाला की, “ आपण हा जो मनुष्यजन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाही, किंवा नसावा.. कारण  आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!

माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी…

जसं तुमचा आयुष्यातला जोडीदार अचानक हे जग सोडून गेला, तुम्ही त्याचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्याचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली.. तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..,

मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत किंवा आपल्या लाडक्या लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केले– ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही… तेव्हा मनातल्या मनातसुद्धा परमेश्वराला उद्देशून ” तू मला का जगवलंस..?” हा प्रश्न विचारू नका…. जे झाले ते चांगले झाले, जे होईल ते चांगले होईल असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जीवन जगा व इतरांना प्रेरणा द्या.

कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं.. तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा, आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा..

बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर,  ‘Account Closed..’ असा शिक्का मारतात ना…,  त्याप्रमाणे जेव्हा एकांत मिळेल तेव्हा आपले किती ‘Account Closed’ झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका…

कदाचित सुरुवातीला तुम्हाला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं..

तेव्हा मनाला सांगा.. ” बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त केलं..!”

हा प्रयोग करा…  आणि किती खाती पटापट बंद होताहेत ह्याची प्रचिती घ्या.. मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही.. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती असं समजा..

परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त.. ” परतफेड आणि परतफेड ” हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल…..”

आणि “ मी येतो… “ असं म्हणत तो निघून गेला..

—– आज ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली.. मी आयुष्य खूपच मस्त जगत आहे.. तृप्त आहे…. तुम्ही ‘ सहन करतो, सहन करतो.. ‘ हे इतक्या वेळा सांगितलंत, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत.. तुम्ही फक्त दुःख वाटत असता…. 

जो सहन करतो ना.. तो कधी बोलत नाही..!

—— चला तर मित्रांनो, आजपासून आपणसुध्दा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षाभंग करुन घेण्याऐवजी 

–फक्त ” परतफेडीचं ” आयुष्य जगायला सुरुवात करून आयुष्य मजेत घालवू या…… 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(“ खरं म्हणता काय ??? “ — तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता.) इथून पुढे —-

आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतक्या वेळा ती ओरबाडली गेली होती की, कोणताही ” मोबदला ” न देता कुणीतरी मदत करू शकतो, या गोष्टीवर आता तिचा विश्वासच नव्हता… 

“ होय ताई… खरं म्हणतोय …” 

तरीही या पार्श्वभूमीवर, तिचा माझ्यावर इतका सहजासहजी विश्वास बसणं शक्यच नव्हतं… !

ओरबाडणाऱ्या लोकांच्या यादीत तेव्हा तिने माझं नाव टाकलं असावं, हे तिच्या वागण्यावरून मला स्पष्ट जाणवत होतं….

यानंतरच्या प्रत्येक भेटीत चिऊताईने मलाच उलट सुलट आजमावण्याचा प्रयत्न केला…. 

यानंतरच्या प्रत्येक भेटीतून मी तिचा थोडा थोडा भाऊ होत गेलो…. आणि ती थोडी थोडी ताई होत गेली… !

मी ” भाऊच ” असल्याची जेव्हा “ तिची ” पूर्ण खात्री पटली, त्या दिवशी तिने तिच्या “चिमणीची” आणि माझी भेट घडवून आणली.

तो दिवस होता शनिवार… २ जुलै २०२२ !

माझ्यासाठी हा दिवस म्हणजे फक्त तारीख किंवा वार नाही…

माझ्यासाठी तो माझा जन्मदिवस होता…! माझा विजय दिन होता…!! 

कारण याच दिवशी तर चिऊताईच्या मनामध्ये भाऊ म्हणून माझा जन्म झाला होता…माझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला होता…आणि म्हणून इतकी वर्षे लपवून ठेवलेल्या “चिमणीला” तिने माझ्यासमोर आणलं होतं …

 “ मामाच्या पाया पड…”  चिऊताई ने माझ्यामागून चिमणीसाठी बोललेले हे “तीन” शब्द…! 

तिच्या या तीन शब्दांनी ” तीनही जगाचा स्वामी ” या शब्दाचा खरा अर्थ मला तेव्हा कळला….

चिमणी खरोखरीच गोड मुलगी होती…. ! चिखलातच कमळ फुलतं हेच खरं…. !

यानंतर सर्व चक्र भराभर चालवून, अक्षरशः सोमवारी 4 जुलै रोजी या चिमणीचं, पुण्यातील नामांकित कॉलेजात वर्षाची संपूर्ण फी भरून ” बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ” (BBA) साठी  ऍडमिशन पक्कं केलं…

यात माझा सहकारी मंगेश वाघमारे याचे योगदान फार मोलाचं आहे….! 

चिमणीच्या नकळत… चिऊताईच्या कानात म्हणालो, “ हे भीक मागणं सोड आता, एखादा व्यवसाय कर घरबसल्या….. मी टाकून देतो….कारण आता येत्या तीन वर्षात एका बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरची तू आई होणार आहेस…. भीक मागणं शोभत नाही तुला…. त्यापेक्षा एखादा बिझनेस टाक…”

चिऊताई सुखावली….! ‘ व्हय, ‘ म्हणत तिनं डोळ्याला पदर लावला होता…. ! 

इकडे ऍडमिशन पक्कं झाल्यानंतर…चिमणी, ऍडमिशन पक्कं झाल्याचा कागद माझ्या तोंडापुढे फडफडवत म्हणाली, “ बघ मामा, मी आता BBA होणार… आहेस कुठं?” – ती उड्या मारत होती…. 

मी पण मग उड्या मारत तिला म्हणालो, “ गप ए शाने, मी पण आता “बिजनेस ऍडमिनिस्ट्रेटर” चा मामा होणार… आहेस कुठं….???”

यानंतर चिमणी रडत… भावुक होत, माझ्या उजव्या खांद्याशी येऊन उभी राहिली….माझा सहकारी मंगेश याने लगेच मोबाईलचा कॅमेरा चालू करून हा क्षण टिपण्याचा प्रयत्न केला….

तेवढ्यात तिकडून चिमणीच्या आईचा, म्हणजे चिऊताईचा हसत आवाज आला….

“मंगेशा…थांब रं बाबा … काटी अन् घोंगडं घिवून द्या की रं…. मला बी जत्रला यीवून द्या की रं … !”

चिऊताई मग माझ्या डाव्या खांद्याशी बिलगली…. ! मंगेशने काढलेल्या फोटोचा “क्लिक” असा आवाज आला… आणि त्याबरोबर हा क्षण माझ्या मनात अजरामर झाला…! 

आमची “जत्रा” झाली होती…. ! फोटो काढताना चिमणी माझ्या कानाशी येऊन म्हणाली, “ मामा आता आम्हाला सोडून कुठे जाऊ नकोस बरं का ..” 

मी तिला म्हणालो, “ मी कुठे जाणार नाही… पण तूच सोडून जाशील आम्हाला … !” 

“ मी का जाईन तुला आणि आईला सोडून ?” तिच्या भाबड्या चेहऱ्यावरचा, भाबडा प्रश्न…. ओठांचा चंबू करून तिने मला बाळबोधपणे  विचारला…

“ अगं म्हशी…. लगीन करशील का नाही ? तेव्हा कन्यादान मलाच करावं लागणार आहे ना…. ? 

तू तेव्हा खूप मोठी झालेली असशील…. पण तेव्हा या “गरीब मामाला” आणि तुझ्या “आईला” विसरू नकोस बरं…!! “

यावर या चिमणीने रडत… मला घट्ट मिठी मारत… म्हटलं , “ माझा मामा गरीब नाही…..खूप “श्रीमंत” आहे “. 

तिच्या या वाक्यानं माझ्यासारखा  ” भिकारी डॉक्टर ” एका क्षणात ” श्रीमंत ” झाला…! 

पलिकडे चिऊताईने तिच्या डोळ्याला पदर लावला होता…. 

आणि मी ” बिझनेस / मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेटरचा ” मामा असून सुद्धा… डोळ्यातल्या वाहणाऱ्या अश्रूंना ” मॅनेज ” करू शकलो नाही…. !

काही गोष्टी मॅनेज करणं कुठं आपल्या हाती असतं ….??? 

— समाप्त —

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक आटपाट नगर होतं … या नगरात एक चिऊताई राहायची.

गरीब घरातल्या या चिऊताईचं एका कावळ्याशी लग्न झालं …

चिऊताईने कावळ्याशी आनंदाने संसार मांडला…काडी काडी जमवून घरटं बांधलं …. यानंतर काही दिवसांनी चिऊताई आणि कावळ्याला एक मुलगी झाली, त्यांनी तिचं नाव “चिमणी” ठेवलं…. !

पण काळा कावळाच तो…. काही दिवसांनी चिऊताईला आणि या छोट्या चिमणीला सोडून तो पळून गेला… त्याने नावाप्रमाणे तोंड काळं केलं…! 

चिऊताईला कळेना, की छोट्या बाळाला…या माझ्या चिमणीला आता खाऊ काय घालायचं ?

बिन बापाच्या या चिमणीला कुणाचा आधार नव्हता…. चिऊताईने तिच्या या बाळाच्या डोक्यावर आपले पंख धरले…. पण तिचे इवलेसे ते पंख अपुरे होते….

छोट्या चिमणीसाठी अन्न शोधायला….चिऊताई काम शोधायला निघाली… वाटेत खूप गिधाडं भेटली…. त्यांनी चिऊताईला हवं तसं “ओरबाडून” घेतलं …! काम कोणीच दिलं नाही आणि केलेल्या कामाचे पैसे सुद्धा  !

तिच्या कडून मात्र “मोबदला”  घेतला.

सगळे पर्याय संपल्यावर, चिऊताईला भीक मागणे हा पर्याय सोपा वाटला… भीक मागून तान्ह्या चिमणीला तिने वाढवलं …. चिऊताई स्वतः निरक्षर होती…. परंतु शिक्षणाचे महत्त्व जाणून होती…भीक मागून चिऊताईने तिच्या छोट्या चिमणीला शिकवलं… पहिली… दुसरी… तिसरी …. चौथी नव्हे, तर तब्बल बारावी कॉमर्स पर्यंत शिकवलं…

नोकरी / जॉब असणारे … सिक्युअर्ड पगार असून सुद्धा मुलांना शिकवताना कितीतरी पालकांची तारांबळ उडते….

अशा परिस्थितीत भीक मागून, अनिश्चिततेच्या वातावरणात राहून, या चिऊताईने तिच्या चिमणीला बारावी कॉमर्स पर्यंत शिकवलं…. 

——महाराजांच्या गडावरील हिरकणीचं आधुनिक रूप होतं हे…. ! 

तर…. ही छोटी चिमणी आता बारावीपर्यंत पोहोचली…. स्वतंत्र विचार करू लागली….

आईला ती एके दिवशी म्हणाली, “ इतकं शिकवलं आहेस तू…. पण आता मला इथून पुढे ” बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ” मध्ये जायचं आहे…” बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन” (BBA) हा बारावी नंतरचा ग्रॅज्युएशनचा कोर्स करायचा आहे मला…”

निरक्षर चिऊताईला तर हे शब्द म्हणतासुद्धा येत नव्हते…

पण चिऊताईला हे जाणवलं…. आपल्या चिमणीची स्वप्नं फार मोठी आहेत…. ! 

या छोट्या चिमणीला माहीतच नव्हतं, की आपली आई भीक मागून आपल्याला शिकवते आहे….चिऊताईने आपल्या या छोट्या चिमणीला असं कधी जाणवूच  दिलं नव्हतं … 

चिऊताई च्या मातृत्वाला माझा सलाम ! चिऊताईने स्वतः भीक मागितली….पण मुलीला ते कळूही दिलं नाही…

हीच चिऊताई स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून, पोटच्या पोरीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द देत होती…. तिच्या पंखात बळ भरत होती…

—-आई… आई …. म्हणतात ती हीच असेल का ?

पण …. पोरीला ” बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन कोर्स ” करायचा आहे, हे ऐकून चिऊताई हबकली….

एका वर्षाचा खर्च साधारण ३५००० रुपये…. अशी तीन वर्षे….???

कुठनं आणायचे हे पैसे ?

चिमणीचं मन तरी कसं मोडायचं ??

चिमणी आता शिकणार… की… की आपल्यासारखीच भीक मागणार ????

चिऊताईचा रात्र रात्र डोळा लागत नव्हता… नेमकं काय करावं ? चिऊताई चिंतेत होती…. पण चिमणी निश्चिंत होती…. ! आई सर्व काही व्यवस्थित करेल यावर तिचा विश्वास होता…. आईच्या पदराखाली ती सुरक्षित होती….

आईच्या पदराला खिसा नसतो. परंतू जगायला बळकटी  देण्याचं सामर्थ्य याच जीर्ण पदरात असतं… जगातील सर्व संपत्ती इथेच दडलेली असते….!!!

तर, चिऊताई चिंतेत होती….

आणि नेमकी याच काळात माझी आणि या चिऊताईची भेट व्हावी…. हा कोणता संकेत असेल ? 

चिऊताई एकदा भीक मागताना मला दिसली… तरुण बाई भीक मागते…

माझ्या स्वभावाप्रमाणे मी तिला टोकलं… खोदत गेलो, खणत गेलो ..!  यानंतर रडत तिने वरची कहाणी मला सांगितली…. !

मी म्हणालो, “ मी जर तुझ्या चिमणीचं सर्व शिक्षण पूर्ण केलं तर चालेल का तुला ? “

माझ्या या वाक्यानंतर…. शॉक लागावा तशी ती माझ्यापासून दूर झाली ….साशंक चेहऱ्याने आणि कावऱ्या बावऱ्या नजरेने म्हणाली, “ पन या बदल्यात मला  तुमाला काय द्यायला लागंल ? “

मी हसत म्हणालो, “ फक्त एक राखी….! “ 

तिचा विश्वास बसेना… 

“ खरं म्हणता काय ??? “ तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. 

क्रमशः…

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हरवलेला मधुचंद्र… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ हरवलेला मधुचंद्र.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

मी तीस वर्षांनंतर पुन्हा महाबळेश्वरला चाललो होतो. मी गाडी चालवत होतो व माझ्या शेजारी  प्रतिमा बसलेली होती. कात्रजचा घाट सुरु झाला होता.. घाटातील प्रत्येक वळणावर, मला तीस वर्षांपूर्वीचा आमचा मोटरसायकलवरचा पहिला प्रवास आठवू लागला..

मी खेड्यातून शहरात येऊन शिक्षण घेतले. पुणे विद्यार्थी गृहात आश्रमवासी म्हणून राहून ते पूर्ण केले. तेथीलच प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिप्लोमा घेतला. माझ्या सरांच्या ओळखीने मला एका प्रेसमध्ये नोकरी मिळाली.  दोन वर्षांतच माझं प्रिंटींगमधलं कौशल्य पाहून प्रेसच्या मालकांनी मला स्वतंत्र प्रेस थाटून दिला. माझ्याकडे दोन ट्रेडल मशीन होती. मी रात्रंदिवस काम करुन या व्यवसायात यश प्राप्त केले..

मालकांशी माझे कौटुंबिक संबंध होते. सणावाराला ते मला घरी बोलवायचे. त्यांना प्रतिमा नावाची एकुलती एक मुलगी होती. तिचं काॅलेजचं शिक्षण चालू होतं..

पाच वर्षातच मालकांनी देऊ केलेल्या प्रेसची सर्व रक्कम मी आलेल्या कमाईतून फेडून टाकली. आता याच व्यवसायात मला उत्तुंग यश मिळविण्याची महत्त्वाकांक्षा होती.

एके दिवशी मला मालकांनी घरी बोलावलं. मी गेल्यावर दोघा उभयतांनी मला लग्नाबद्दल विचारलं. मी अजून तसा विचारच केला नव्हता. त्यांनी, आमच्या प्रतिमाशी तू लग्न करशील का? असं विचारल्यावर मी तर निशब्दच झालो.. खरं तर प्रतिमाला पाहिल्यापासून, मी तिच्या प्रेमातच पडलो होतो मात्र मालकांना काय वाटेल, या विचाराने शांत राहिलो.. आज तर त्यांनीच तिच्याविषयी विचारुन मला आनंदाच्या लाटेवरच ढकलून दिलं होतं.. 

महिन्याभरातच आमचं लग्न झालं. मी नुकतीच नवीन मोटरसायकल घेतलेली होती. त्यावरुनच आम्ही मधुचंद्रासाठी महाबळेश्वरला जायचं ठरवलं.. 

कात्रज घाटातून जाताना प्रत्येक वळणावर प्रतिमा घाबरुन मला घट्ट बिलगत होती.. आणि मी रोमांचित होत होतो.. रमत गमत आम्ही चार तासांनी महाबळेश्वरला पोहोचलो.. तिथं हाॅटेल मिळवून देणारी काही माणसं आमच्या मागे लागली. त्यातील एका बारा चौदा वर्षांच्या मुलाला मी जवळ बोलावून तुझं हाॅटेल कुठं  आहे हे विचारलं. ते बाजारपेठेतच असल्याने तिथंच उतरायचं मी नक्की केलं.. हाॅटेलच्या काऊंटरमागे एक पारशी मालक बसला होता. हाॅटेलमधील रुम ताब्यात घेतली व सामान ठेऊन फ्रेश झालो.. त्या मुलाच्या हातावर पाच रुपये ठेवल्यावर तो खुष झाला.. 

त्याला नाव विचारल्यावर त्यानं ‘सलीम’ असं सांगितलं.. तो गाईडचंही काम करीत होता.. मी त्याच्यासोबत महाबळेश्वरमधील सर्व पाॅईंट्स व प्रेक्षणीय ठिकाणं पहाण्याचा निर्णय घेतला.. साडेचार वाजले होते, आम्ही सनसेट पाॅईंटला जायचं ठरवलं..

तिथं पोहोचल्यावर पाहिलं, तर पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली होती.. आम्ही दोघांनीही घोड्यावरुन रपेट मारण्याचा आनंद घेतला..

प्रतिमा एका उंच टेकाडावर, लाल टोपी घालून बसलेली होती. मी तिचे क्लिक थ्री कॅमेऱ्याने फोटो काढत होतो.. तेवढ्यात एक स्केचिंग करणारा चित्रकार माझ्याजवळ आला व म्हणाला, ‘तुमची हरकत नसेल तर मी यांचं एक स्केच करु का?’ मी होकार देऊन, तो स्केच कसे काढतो ते पाहू लागलो.. अवघ्या दहा मिनिटात त्याने लाल टोपी घातलेल्या प्रतिमाचे व समोर पसरलेल्या निसर्गाचे अप्रतिम स्केच, कलर पेन्सिलीने पूर्ण केले.. 

प्रतिमा तर ते चित्र पाहून बेहद खुष झाली. तिनं न राहवून त्याला विचारलं, ‘हे चित्र, तुम्ही मला द्याल का?’ तो कलाकार फारच संवेदनशील होता, त्याने त्यावर ‘शुभेच्छा’ लिहिले व खाली सही करुन तिच्या हातात दिले. मी त्या दोघांचा, एक आठवण म्हणून फोटो काढला…

सनसेट डोळ्यात साठवून आम्ही परतलो.. ते चार दिवस आम्ही खूप भटकलो. तेथील काही ठिकाणं हिंदी चित्रपटातील गाण्यांतून अनेकदा पाहिलेली होती.. जुनं महाबळेश्वर पाहिलं.. बाजारपेठेत खरेदी केली. त्या चार दिवसांत हाॅटेलच्या, पारशी मालकाशी माझी चांगलीच ओळख झाली होती.. 

महाबळेश्वरहून आम्ही स्वर्गीय आनंद उपभोगून, परतताना हाॅटेल मालकाचा निरोप घेतला. त्यांनी पुन्हा कधीही आलात तर इथेच या असं आम्हाला आपुलकीनं सांगितलं…

आम्ही दोघेही संध्याकाळी घरी पोहोचलो. आमचा संसार सुरु झाला.  मी पुन्हा प्रेसच्या कामात गुंतलो.. कामं वाढली होती. नवीन प्रिंटींगची मशीनरी घेतली. स्टाफ वाढला. आम्हाला मुलगा झाला. त्याचं सगळं करण्यात प्रतिमा गुंतून गेली..

वीस वर्षे हा हा म्हणता निघून गेली. मुलांचं शिक्षण पूर्ण झालं. माझा प्रेस हा शहरातील सर्वोत्तम प्रिंटींगची सेवा देणारा म्हणून सर्वांना परिचित झाला.. 

बंगला, कार, बॅंक बॅलन्स सर्व काही प्राप्त झालं. मुलाचं लग्न झालं. त्यांचा संसार सुरु झाला. आता आम्ही जबाबदारीतून मुक्त झालो होतो.. 

इतक्या वर्षांत आम्हा दोघांना बाहेर पडता आलं नव्हतं, म्हणूनच पुन्हा एकदा महाबळेश्वरला निघालो होतो.. खेडशिवापूरला जिथं तीस वर्षांपूर्वी ‘कैलास भेळ’ नावाची साधी शेड होती, तिथं आता मोठी पाॅश इमारत उभी होती. महाराष्ट्रीयन व दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रवाशांनी गर्दी होती. आम्ही तिथं मिसळचा आस्वाद घेतला व पुढे निघालो..

सुमारे तीन तासांनी आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो. महाबळेश्वर ओळखू न येण्याइतपत बदलून गेलेलं होतं.. आम्ही पूर्वीचं हाॅटेल शोधत होतो.. तेवढ्यात एक चाळीशीतला तरुण माझ्याकडे निरखून पाहू लागला.. मी सलीम पुटपुटताच त्यानं मला ओळखलं.. माझ्या रुपेरी केसांमुळे तो साशंक होता.. त्याने ते पूर्वीचं हाॅटेल दाखवलं.. हाॅटेलचं काऊंटर आता फर्निश्ड होतं. मालक मागील बाजूस हार लावलेल्या फोटोमध्ये गेले होते.. त्यांचा मुलगा काऊंटरवर होता.. आम्ही गेल्या वेळचीच रुम त्याला मागितली.. 

फ्रेश होऊन आम्ही दोघेही बाहेर पडलो. सनसेट पाॅईंटला गेलो. पाॅईंटवर गर्दी भरपूर होती. घोडेवाले  फिरत होते, मी प्रतिमाला विचारलं, ‘मी रपेट मारु का?’ तिनं मला हात जोडले.. सनसेट पाहून आम्ही परतलो.. वाटेतच जेवण केलं. चार दिवसांचा प्लॅन करुनही दोन दिवसांतच दोघेही कंटाळून गेलो. प्रत्येक ठिकाणं पुन्हा पहाताना दोघांनाही भूतकाळ आठवत होता.. पूर्वीचा निसर्ग आता आधुनिकीकरणामुळे राहिलेला नव्हता.. बाजारपेठ आता शहरासारखीच गजबजलेली होती. रात्री मुलानं व्हिडिओ काॅल करुन चौकशी केली. इकडची काळजी करु नका, आणखी दोन दिवस रहा.. असं म्हणाला..

रात्री मी विचार करीत होतो, तीस वर्षांपूर्वी जो आनंद मिळाला.. तसा आता मिळत नाही.. तेव्हा जी स्वप्नं पाहिली, ती आज सत्यात अनुभवतो आहे.. काळ हा कधीच थांबत नाही.. आज मी तोच आहे, मात्र सभोवतालचं जग बदललं आहे.. हा बदल मान्य करायलाच हवा… प्रतिमाला गाढ झोप लागली होती.. मी तिच्या अंगावर ब्लॅंकेट घातले व झोपी गेलो…

सकाळी आवरुन आम्ही निघालो.. हाॅटेलचं बिल पेड केलं.. गाडी स्टार्ट केली.. तेवढ्यात सलीम पुढे आला, प्रतिमानं त्याला बक्षिसी दिली व आम्ही रस्त्याला लागलो.. या तीस वर्षांत जग जरी बदललं असलं तरी एक गोष्ट अजिबात बदलली नव्हती.. ती म्हणजे प्रतिमा !! आज या प्रतिमेमुळेच जनमानसात माझी  ‘प्रतिमा’ उंचावलेली आहे…

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अखेरचा प्रवास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ अखेरचा प्रवास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

अनुजाचा, मायाच्या मुलीचा फोन आला. माया आमची जवळची मैत्रीण. खरे तर आमच्याहून मोठी,

पण झाली खरी जवळची मैत्रीण. अनुजा मायाची मुलगी. काय काम असेल, असा विचार करत होते, तेव्हा अनुजाचा पुन्हा फोन आला—-“ मी भेटायला येऊ का मावशी ? “ आणि अनुजा संध्याकाळी भेटायला आली. 

——माया हल्ली एकटीच रहात असे. तिचा मुलगा आनंद गेली अनेक वर्षे जपानला स्थायिक झाला होता. माया आणि तिचे मिस्टरही अनेकवेळा जपानवाऱ्या करून आले होते. आनंदच्या जपानी बायकोचे आणि जुळ्या मुलींचे फोटोही बघितले होते आम्ही. अनुजाही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होती. माया कॉलेजमध्ये प्रोफेसर होती .आणि तिचे यजमान एका कंपनीतल्या चांगल्या पोस्टवरून निवृत्त झाले होते. हल्ली खूप महिन्यात माया भेटलीच नव्हती मला. मध्यंतरी अचानकच मायाच्या यजमानांचे हृदयविकाराने निधन झाले, तेव्हा आम्ही सगळ्या भेटून आलो होतो.

माया स्वतःच्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. मायाने आपला छान ग्रुप जमवला होता. कधी ते ट्रीपला, कधी कोणाच्या farmhouse वर जात. एकटी राहणारी माया चांगली खम्बीर होती. तिचे आयुष्य तिने छान बेतले होते. तिच्या मैत्रिणी, कॉलेजचे मित्रमंडळी–अगदी  व्यस्त असे दिनक्रम मायाचा. पैशाची ददात नव्हती, आणि 

हौसही होतीच. कधीतरी आम्हालाही भेटायची माया. पण गेल्या जवळजवळ वर्षभरात भेट झालीच नव्हती तिची.

अनुजाचे काय काम असावे या विचारात मी पडले. अनुजा आली आणि म्हणाली, “ मावशी  वेळ न घालवता, मुद्द्याचेच बोलते. बाबा गेले तेव्हा अतिशय धीराने घेतले आईने. मी, दादा,म्हणालो,आई एकटी राहू नको, आमच्या घरी ये राहायला. पण ती म्हणायची,अरे तुम्ही आहातच की. पण होतंय तितके राहीन की मी. तुम्ही मुले काय रिकामी आहात का. आणि येतेच की मी अधूनमधून.” आम्हीही याला कधीच हरकत घेतली नाही. मी दर आठ्वड्याला चक्कर मारतेच. पण गेल्या वर्षभरात आईमध्ये हळूहळू बदल होताना दिसला मला. मावशी, तिचे लक्षच नसते आम्ही बोलतो त्याच्याकडे.अस्वस्थ हालचाल करते बोटांची. घरही पूर्वीसारखे छान आवरलेलेले नसते. अशी आई कधीही मी बघितलेली नाही ग. ती हल्ली स्वयंपाक तरी नीट करते की नाही, जेवते का नाही ,तेही मला माहित नाही.” 

“अनुजा,तू असे कर. काही दिवस तुझ्या घरी रहायला घेऊन जा, म्हणजे तुला ती चोवीस तास कशी रहाते हे नक्की समजेल. तिने विरोध केला,तरी नेच तिला. मला दर आठवड्याला फोन करून कळवत मात्र जा हं.”

अनुजाने मायाला तिच्या घरी नेले. नातवंडांनी उत्साहाने स्वागत केले आजीचे. त्यांना पूर्वीची आजी हवी होती. 

पण आत्ताच्या आज्जीमध्ये लक्षात येण्याइतका बदल झालेला त्यांनाही जाणवलाच . अनुजाने मायासाठी दिवसभराची बाई ठेवली. नशिबाने त्या बाई खरोखरच चांगल्या मिळाल्या. मायाबरोबर त्या पत्ते खेळत, तिला पुस्तक वाचायला बसवत. मायामध्ये जरा सुधारणा होत असलेली दिसली.औषधेही चालू केलेली होतीच.

मध्यंतरी महिनाभर बाई रजेवर गेल्या. आता मायाला २४ तास कोण कसे देऊ शकणार होते? पुन्हा माया तिच्या कोशात गेली. हळूहळू मायाचे बोलणे कमी झाले. टक लावून नुसती बघत बसायची.

“आई,अग घास घे ना, चावून खा ग.” मायाला  हळूहळू तेही उमजेनासे झाले.दैनंदिन नैसर्गिक विधीवरचा  तिचा ताबा सुटला. अनुजाने अथक प्रयत्न केले. बायकाही ठेवल्या. पण ते अनुभव काही फारसे चांगले आले नाहीत.

मायाचे घर तर केव्हाचेच बंद झाले होते. एकदा अनुजाने  मायाला  त्या  घरी नेले. तिच्या फ्लॅटजवळ आल्यावर माया नुसतीच भिरभिर बघत राहिली. शेजारच्या काकू भेटायला आल्या.“ मायाताई,चला आमच्याकडे कॉफी प्यायला.” काकूंनी प्रेमाने हात धरला. मायाने तो हिसडून टाकला,आणि ‘या कोण’ असे मुलीला विचारले.

‘ घरी– घरी ‘असे पुटपटू लागली. काकू हे बघून घाबरूनच गेल्या. हताश होऊन अनुजा मायाला घरी घेऊन आली.

 आता अनुजालाही आईला  सांभाळणे अतिशय अवघड होऊन बसले होते. 

अशी चार वर्षे गेली. मध्यंतरी आनंद येऊन भेटून गेला.“अनुजा,काहीही झाले तरी आईला वृद्धाश्रमात ठेवायचे नाही हं.” असे बजावून गेला. अनुजाला भयंकर रागही आला,आणि दुःख तर झालेच.’ काय हा मुलगा. आज इतकी वर्षे मी एकटी आईला सांभाळते आहे,कधी चौकशी केली का? किती ,कोणत्या अवघड परिस्थितीतून मी जातेय 

याची ‘– माझा नवरा देव माणूस आहे,तोही आईचे सगळे करतो. मला फक्त हा उपदेश करून आनंद मात्र निघून गेला. वावा.” अनुजाचा तोल सुटला होता . ती आनंदला म्हणाली होती ,” हो का? मग जा घेऊन जपानला. करते का बघू तुझी ती बायको. हे बघ आनंद, मला हौस नाही आईला वृद्धाश्रमात ठेवायची. पण तो निर्णय मी घेईन.पुन्हा मला असले सल्ले देणार असलास तर तू न आलेलाच बरा .” 

एक दिवस माया बाथरूममध्ये पाय घसरून पडली. खुब्याचे हाड मोडले आणि तिच्या यातनांना पारावार उरला नाही. हाडे इतकी ठिसूळ झाली होती की डॉक्टर ऑपरेशन करायला तयार होईनात. अनुजाने एका चांगल्या नर्सिंग होममध्ये मायाला हलवले. दिवस दिवस माया नुसती पडून राहू लागली.

आम्ही मैत्रिणी तिला भेटायला गेलो.“ माया,लवकर बरी हो ग. पुढची भिशी तुझ्याकडे करायचीय ना ?”

मायाच्या डोळ्यातून नुसतीच धार लागली. तिला बोलता तर येत नव्हतेच. खूप वाईट वाटले आम्हाला.

आणि आमच्याही भविष्याच्या सावल्या भेडसावू लागल्या. सगळ्यांचीच मुले दूरदेशी. “आज निदान अनुजातरी आई जवळ आहे, मला कोण आहे ग?” निर्मला हताशपणे म्हणाली. निर्मलाला दुर्दैवाने मुलं झालीच नाहीत.

मायाचा प्रवास झपाट्याने उतरणीकडे सुरू झाला. तिला फीडिंग ट्यूबने अन्न भरवावे लागू लागले. तिच्याकडे जाऊन आले, की खरोखरच वाईट वाटे. एका उमद्या,आनंदी जीवाची ही परवड बघवेनाशी झाली.

आणि एक दिवस अनुजाचा फोन आला, “ मावशी,आई गेली. तुझ्या ओळखीच्या नेत्रपेढीचा फोन नंबर दे. आईचे नेत्रदान करणार आहोत.”

आम्ही सगळ्या तिचे अखेरचे दर्शन घ्यायला गेलो. ‘ सुटली बिचारी,’ असेही वाटले.

—–पण असे आयुष्य तिच्या काय, कोणाच्याच वाट्याला येऊ नये असे वाटून आमचा जीव नुसता कासावीस झाला.

अनुजाच्या पाठीवर सांत्वनाचा हात ठेवून, काहीच न बोलता, आम्ही आपापल्या घरी परतलो —–

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय सावित्रीबाई… श्री गजानन धोंगडे☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

☆ प्रिय सावित्रीबाई… श्री गजानन धोंगडे☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

नमस्कार ! सकाळीच रेडिओवर ऐकलं की आज तुझी पुण्यतिथी. 

बायकोला सांगितलं, “अगं, आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी.”

मग स्वतःलाच विचारलं, “ सावित्रीबाईंची पुण्यतिथी ? कसं शक्य आहे ? अगं, माझ्या गावातली, शहरातली, 

देशातली प्रत्येक मुलगी जेव्हा शिक्षण घेऊन एखाद्या मोठ्या पदावर जाते, शिक्षणाच्या भरोशावर एखादा सन्मान प्राप्त करते, तेव्हा – तेव्हा तूच तर जन्माला आलेली असतेस. यंदा माझी पुतणी पदवी घेईल, म्हणजे यंदा तू माझ्या घरातही जन्माला येणार आहेस.  सुरुवातीला प्रश्न पडला की तुला काय म्हणावं ? बाई म्हणावं की आई म्हणावं ? आमच्याकडे गावात मोठ्या बहिणीला बाई म्हणतात. मग विचार केला, माझी आई शिकलेली, थोरली बहीण शिकलेली, मावशी शिकलेली, माझी पुतणी शिकतेय –म्हणजे तू तर प्रत्येकच रूपात माझ्याभोवती आहेस . 

सरकारचं घोषवाक्य आहे ‘ मुलगी शिकली, प्रगती झाली !’– 

मला वाटतं त्यात आणखी एक जोडावं ‘सावित्रीबाई जन्माला आली ‘.

आजही वाटतं तुला भारतरत्न मिळायला हवं होतं. मग लक्षात येतं की या देशातले अनेक भारतरत्न जे आहेत ते तुझ्या शिक्षण यज्ञामुळे झालेले आहेत. जेव्हा कुठल्या महिलेला भारतरत्न मिळत असेल तेव्हा तू ज्योतिबांना सांगत असशील ,  ‘अहो ऐकलं का आपल्या लेकीला भारतरत्न मिळालं ‘. 

तुझ्याबद्दलचा मुळातच असलेला आदर सहस्त्र पटींनी वाढतो तो तुझ्या स्वभावामुळे. 

दगड, शेण, असभ्य शब्दांचा मार सहन करीत तू तुझं काम करीत राहिलीस, म्हणजे आतून तू किती कणखर असली पाहिजेस–ते जिब्राल्टर रॉक म्हणतात तशी. तसूभरही ढळली नाही . आणि दुसरीकडे अत्यंत नम्र आणि प्रेमळ. 

कधी – कधी वाटतं टाईम मशिनने काळाच्या मागे जावं. लहान बनून तुमच्या घरात यावं.  ज्योतीबांच्या कोटाच्या खिशातल्या गोळ्या त्यांच्याच मांडीवर बसून खाव्यात. तुझ्याकडून लाड पुरवून घ्यावेत. 

मला एक प्रश्न नेहमी पडतो–’आपण करतो आहोत ते काम क्रांतिकारी आहे याची तुला जराशीही कल्पना नव्हती का ? कारण नखभर ही एटीट्यूड नव्हता तुझ्यामध्ये– नखभर सोडा, अणू – रेणू इतका सूक्ष्म पण नाही . 

हे कसं साध्य करायचीस ? नाहीतर आम्ही बघ– वितभर करतो आणि हात भर, त्याचाही  हल्ला, कल्ला करत ती दुखणी सांगत, ते यश सांगत गावभर हिंडतो. 

कदाचित म्हणूनच तू त्यावेळच्या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी म्हणून जी अक्षरं पाटीवर गिरवलीत, ती काळाच्या पाठीवर गिरवली गेलीत. 

आणि या भारतात जेव्हा – जेव्हा कोणी मुलगी, स्त्री शिक्षित होत राहील,  तेव्हा- तेव्हा ती अक्षरं गडद होत राहतील 

— पुन्हा – पुन्हा सावित्री जन्माला येत राहील. 

लेखक – गजानन घोंगडे

9823087650

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गवसले की हरवले – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ गवसले की हरवले – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(समोर पिंपळाचा पार होता . त्याभोवती असलेल्या ओट्यावर बसून घरूनच आणलेला डबा अनेक प्रवाशी खायचे. ) 

इथून पुढे —

बस थांबली की हॉटेलचा हलवाई कढई चा जाळ वाढवायचा तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी तो पाण्याचे छिटे मारायचा त्याचा चर्र चर्र आवाज यायचा, तेल गरम झाले की मग भजी तळली जायची, त्याचा गंध परिसरात पसरायचा, बरेच प्रवाशी गरम भजी घ्यायचे हॉटेलात टेबल वर बसून घरची शिदोरी खायचे. मालक कुणालाही विरोध करायचे नाही उलट पाणी पाठवायचे कधी कांदे मिरची द्यायचे. आई मला कधी भजी घेऊन द्यायची. तो कडकं मिशी वाला  मालक मला आठवतो लहान मुले असली की जिलबी चा एखादा आडा द्यायचा. मला मात्र दोन आडे द्यायचा. त्यामुळे तो मला अधिक आवडायचा. खाणे पिणे आटोपले की ड्रायव्हर ची वाट पाहात सर्व प्रवासी चर्चेत रंगायचे. एकमेकांची चौकशी केली जायची अनेकाचे नातेवाईक गावचेनिघायचे, जुन्या ओळख्या असल्याप्रमाणे लोक आत्मीयतेने  चर्चेत रंगायचे. मदतीची भावना एवढी तीव्र की अनेकांचे अवजड सामान उतरविण्यासाठी लोक बसवर चढायचे. बस लागणाऱ्या लोकांचे कान झापायचे त्यांना पाणी द्यायचे. एखादा प्रवाशी हळूच एखादी गोळी द्यायचा. कुणी आजीबाई पिशवीतून लवंग विलायची काढून द्यायची. तेव्हड्यात कंडक्टर काका जोरजोराने घंटी वाजवायचे. सर्व प्रवाशी धावपळ करीत चढले की ड्रायव्हर काका ला कुणीतरी तंबाखू द्यायचे नी ते चढले की दोनदा  टन टन वाजले की बस निघायची. आता बस ची गती थोडी वाढायची कारण पुढे घाट लागायचा व हळूहळू बस चालवावी लागायची त्यामुळे ड्रायव्हर काका गती वाढवायचे,मला मात्र घाट आवडायचा,रस्त्याची वळणे,तीव्र चढ़ाव उतार कुठे समोरुन येनारी वाहने त्याना साइड देतानाची घसाघिस सर्व मजेशिर वाटायाचे. सर्वात आवडणारी बाब म्हणजे पळसाची केसरी फुले, नी बहाव्याची पिवळी फुले त्यांनी बहरलेली झाडे, मध्येच शेळ्या मेंढ्यांच्या कळप हाकनारे आदिवासी, लभान समाजाच्या लोकांचे तांडे दिसायचे. त्यांच्या स्त्रियांचे रंगबिरंगी पेहराव हातातील पांढऱ्या बांगड्या नी कानातील लोंबकळत असलेली कर्णफुले सर्व पाहत रहावेसे वाटायाचे. सर्वात लक्षवेधक असायचे ते डोंगरावरून पडणारे धबधबे नी पाण्याचे वाहणारे ओहोळ. घाट संपला की एका खेड्यात बस थांबायची दुधाच्या खव्यासाठी हे आदिवासी गाव प्रसिद्ध होते तिथूनच शहराला खव्याचा पुरवठा व्हायचा,खव्यामुळे तिथे गुलाबजामुन ही मिठाई विकणारे हॉटेल होते . लोक मनसोक्त आस्वाद घ्यायचे सोबत खवा व गुलाब जामुन पार्सल घ्यायचे. आई मामासाठी हमखास खवा घ्यायची मला मात्र गुलाब जामून खायला मिळायचे. . . .

आणखी एक महत्वाचे म्हणजे बस थांबली की काही आदिवासी स्त्रिया यायच्या त्यांच्या जवळ विकण्यासाठी  सीताफळे,आवळे,जांभळं, टेंबर, खीरण्या,येरोण्या,बोर,कवठ असा रानमेवा असायचा लोक कमी पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न करायचे मात्र आई त्यांना योग्य किंमत द्यायची,म्हणायची रानावनात फिरून आणतात बिचाऱ्या दोन पैसे मिळालेच पाहिजे त्यांना. मी मात्र त्या स्त्रियांच्या अंगावर गोंदलेली चित्रे न्याहाळीत असो.

 स्पीड बेकरच्या धक्क्याने माझी तंद्री तुटली समोर टोल नाका होता यांत्रिक सुविधेने आपोआप त्याचे पैसे देऊन कार समोर निघाली.

 बस आता दहा मिनिटात माझे शहर येणार होते. नवीन महामार्गांने प्रवास सुकर झाला होता. वेळ वाचला होता. पण लहान असतानाच आलेला तो एकही अनुभव आला नाही. सिमेंटचे महामार्ग बनले काळाची गरज म्हणून पण  अनेक गोष्टींना पारखे करून. मनात विचार घोळू लागले या महामार्गांमुळे खरंच बरेच मिळविले की बरेच हरपले?

— समाप्त —

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares