मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… परिवर्तन – भाग – ३९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… परिवर्तन – भाग – ३९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ठाण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागच्या गल्लीतल्या गांगल बिल्डिंग मधल्या वन रूम किचन ब्लॉक मध्ये ताईच्या संसाराची घडी हळूहळू बसत होती. अनेक नकारात्मक बाजूंना आकार देत स्थिरावत होती. ताईचे मोठे दीर प्रकाशदादा आणि नणंद छाया नोकरीच्या निमित्ताने ताई -अरुणच्या घरी रहात असत. काही दिवसांनी ताईची धाकटी नणंद अभ्यासाच्या दृष्टीने चांगले म्हणून त्यांच्या सोबत रहायला आली. ताई -अरुणने सर्वांना ममतेने, कर्तव्य बुद्धीने आणि आपुलकीने सामावून घेतले. ताईचे सासू-सासरे मात्र सासऱ्यांच्या निवृत्तीनंतर लोणावळ्यात राहायला गेले होते तिथे त्यांनी एक बंगला खरेदी केला होता. एकंदर सगळे ठीक होते.

विशेष श्रेणीत कला शाखेत एमए झालेली हुशार ताई “रांधा, वाढा, उष्टी काढा यात अडकलेली पाहून माझं मन मात्र अनेक वेळा कळवळायचं. चौकटीत बंदिस्त असलेल्या गुणवंत स्त्रियांच्या बाबतीत मी तेव्हापासूनच वेगळे विचार नेहमीच करायचे मात्र त्यावेळी माझे विचार, माझी मतं अधिकारवाणीने मांडण्याची कुवत माझ्याकडे नव्हती. मी आपली आतल्या आत धुमसायची पण ताईचं बरं चाललं होतं.

बाळ तुषारच्या बाललीला अनुभवण्यात आणि त्याचं संगोपन करण्यात ताई अरुण मनस्वी गुंतले होते पण जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ. तुषार अवघा दहा महिन्याचा होता.

एके रात्री ऑफिसच्या पार्टीला जाण्याची तयारी करत असताना अरुणच्या पोटात अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. सुरुवातीला ताईने घरगुती उपचार केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही तेव्हा तिने दादाला (मोठे दीर) फोन करून सर्व हकीकत सांगितली आणि ताबडतोब घरी यायला विनविले. दादांनी तात्काळ ऑफिसच्या गाडीतून अरुणला फॅमिली डॉक्टर अलमेडा यांच्याकडे नेले. त्यांनी तात्पुरते बॅराल्गनचे इंजेक्शन देऊन घरी पाठवले पण दुखणे थांबले नाही उलट ते वाढतच होते. अरुणचे मेव्हणे, ठाण्यातले प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मोकाशी यांनी “हे दुखणे साधे नसल्याचे” सुचित केले व त्वरित ठाण्यात नव्यानेच सुरू झालेल्या शल्यचिकित्सक डॉक्टर भानुशालींच्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये अरुणला दाखल केले. अरुणला “पँक्रीयाटाइटिस”चा तीव्र झटका आलेला होता. अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. १९६८साल होते ते. आजच्या इतकं शल्यचिकित्सेचं विज्ञान प्रगत नव्हतं. डॉक्टरांनी ताईला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. ” पेशंटची स्थिती नाजूक आहे. डॉक्टरांच्या हाताबाहेरचे आहे कारण या व्याधीवर लागणारे Trysilol हे औषध भारतात उपलब्ध नाही. तेव्हा आता फक्त भरवसा ईश्वराचाच. काही चमत्कार झाला तरच…”

ताई इतकी कशी धीराची! ती पटकन म्हणाली, ” डाॅक्टर! तो मला असे सोडून जाऊ शकत नाही. चमत्कार होईल. माझी श्रद्धा आहे. मी तुम्हाला हे औषध २४ तासात मिळवून देईन. “

त्यावेळी अरुण लंडनच्या B O A C या एअरलाइन्समध्ये इंजिनीयर होता. (आताची ब्रिटिश एअरलाइन्स). ताईने ताबडतोब सर्व दुःख बाजूला ठेवून प्रचंड मन:शक्तीने पुढचे व्यवहार पार पाडले. अरुणच्या मुंबईतल्या ऑफिस स्टाफच्या मदतीने तिने सिंगापूरहून ट्रायसिलाॅल हे औषध इंजेक्शनच्या रूपात डॉक्टरांना २४ तासात उपलब्ध करून दिले आणि अरुणची हाताबाहेर गेलेली केस आटोक्यात येण्याचा विश्वास आणि आशा निर्माण झाली. डॉक्टर भानुशाली यांनी लगेचच ट्रीटमेंट सुरू केली. अरुणने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. आता त्याने धोक्याची रेषा ओलांडली होती. अरुणचे आई-वडील, भाऊ, बहिणी, इतर नातेवाईक सारे धावत आले. ताई सोबत आम्ही होतोच. याही सर्वांचा ताईला मानसिक आधार मिळावा हीच अपेक्षा असणार ना? पण ताईच्या जीवनातल्या एका वेगळ्याच कृष्णकाळ्या अंकाला इथून सुरुवात झाली.

पुन्हा एकदा मनात खदखदणाऱ्या घटनांचा प्रवाह उसळला. जातीबाहेरचे, विरोधातले लग्न, आचार विचारांतली दरी, पुन्हा एकदा पट्टेकरी बुवा विचारधाराही उसळली. वास्तविक आमचं कुटुंब सोडलं तर आमच्या आजूबाजूचे सारेच या पट्टेकर बुवांच्या अधीन झालेले. तसे पट्टेकर बुवा पप्पांशी, माझ्या आजीशी भेटल्यावर आदराने बोलत पण कुणाच्या मनातलं कसं कळणार? पट्टेकरांना पप्पांच्या बुद्धिवादी विचारांवर कुरघोडी करण्याची जणू काही संधीच मिळाली असावी. सर्वप्रथम त्यांनी अरुणच्या परिवारास “ढग्यांची आजी ही करणी कवटाळ बाई आहे” असे पटवून दिले. परिणामी आमच्या कुटुंबास हॉस्पिटलमध्ये अरुणला भेटायला येण्यापासून रोखले गेले. हाच “बुवामेड” कायदा मुल्हेरकरांनी ताईलाही लावला.

अरुण त्याच्या आईला विचारायचा, “अरु कुठे आहे? ती का आली नाही. अरुणची आई उडवाउडवीची उत्तरे द्यायची.

पप्पा ऑफिसातून जाता येता हाॅस्पीटलमध्ये जात. अरुणच्या रूममध्ये बाहेरूनच डोकायचे. अरुण अत्यंत क्षीण, विविध नळ्यांनी वेढलेला, रंगहीन, चैतन्य हरपलेला असा होता. तो हातानेच पपांना आत येण्यासाठी खुणा करायचा. खरं म्हणजे पप्पा बलवान होते. ते या सगळ्यांचा अवरोध नक्कीच करू शकत होते पण प्राप्त परिस्थिती, हॉस्पिटलचे नियम, शांतता अधिक महत्त्वाची होती. ते फक्त डॉक्टर भानुशालींना भेटत व अरुणच्या प्रकृतीचा रोजचा अहवाल समजून घ्यायचे. डॉक्टरांनाही या मुल्हेरकरी वर्तणुकीचा राग यायचा पण पप्पा त्यांना म्हणत, ” ते सर्व जाऊद्या! तुम्ही तुमचे उपाय चालू ठेवा. पैशाचा विचार करू नका. ”

अत्यंत वाईट, दाहक मनस्थितीतून आमचं कुटुंब चालले होते. बाकी सगळे मनातले दूर करून आम्ही फक्त अरुण बरा व्हावा” म्हणूनच प्रार्थना करत होतो ज्या आजीनं आम्हाला कायम मायेचं पांघरूण पांघरलं तीच आजी नातीच्या बाबतीत कशी काय “करणी कवटाळ” असू शकते. काळजाच्या चिंध्या झाल्या होत्या. ओठात केवळ संस्कारांमुळे अपशब्द अडकून बसले होते.

आजारी अरुणला ताईने भेटायचेही नाही हा तिच्यावर होणारा अन्याय, एक प्रकारचा मानसिक अत्याचार ती कसा सहन करू शकेल? ती तिच्याच घरी याच साऱ्या माणसांसोबत त्यांची उष्टी खरकटी काढत लहानग्या तुषारला सांभाळत मनात काय विचार करत असेल? एक दिवस डोक्यात निश्चित विचार घेऊन मीच ताईच्या घरी गेले आणि उंबरठ्यातच ताईला म्हणाले, ” बस झालं आता! बॅग भर, तुषारला घे आणि चल आपल्या घरी. ”

ताईचे सासरे जेवत होते. ते जेवण टाकून उठले. त्यांनी माझ्या हातून तुषारला घेण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या मोठ्या डोळ्यांनी त्यावेळी मला साथ दिली. ते घराबाहेर गेले. ताईने मला घट्ट मिठी मारली आणि ती हमसाहमशी रडली. मी तिला रडू दिले. एक लोंढा वाहू दिला. शांत झाल्यावर तिला म्हटले, ” चल आता. सगळं ठीक होईल. बघूया.”

ताई आणि तुषारला घेऊन मी घरी आले. हा संपूर्ण निर्णय माझा होता आणि आमचं संपूर्ण कुटुंब त्यानंतर ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं!

दोन अडीच महिन्यांनी अरुणला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. तिथून त्याला त्याच्या ठाण्यातल्याच मावशीकडे नेलं. त्यानंतर एक दोनदा ताईने मावशीच्या घरी जाऊन अरुणची विरोधी वातावरणातही भेट घेतली होती. नंतर अरुणच्या परिवाराने अरुणला लोणावळ्याला घेऊन जाण्याचे ठरवले. त्यावेळी अरुणने “तूही लोणावळ्याला यावेस” असे ताईला सुचवले पण ताईने स्पष्ट नकार दिला. म्हणाली, ” आपण आपल्याच घरी जाऊ. मी तुझी संपूर्ण काळजी घेईन याची खात्री बाळग” नाईलाजाने तिने तो हॉस्पिटलमध्ये असताना काय काय घडले याची हकीकत सांगितली आणि या कुटुंबीयांवरचा तिचा विश्वास ढळल्याचेही सांगितले. अरुणने ऐकून घेतले पण तरीही लोणावळ्याला जाण्याचा बेत कायम राहिला. समस्त कुटुंब लोणावळ्याला रवाना झाल्यावर ताईने एक दिवस गांगल बिल्डिंग मधल्या तिच्या घरी जाऊन घर आवरून त्यास कुलूप घातले आणि ती कायमची आमच्या घरी राहायला आली.

ताईच्या वैवाहिक जीवनातल्या कष्टप्रद अध्यायाने आणखी एक निराळे वळण घेतले.

एक दिवस अरुणचे पत्र आले. अरुणच्या पत्राने ताई अतिशय आनंदित झाली. तिने पत्र फोडले आणि क्षणात तिचा हर्ष मावळला. अरुणने पत्रात लिहिले होते, ” तुझे माझे नाते सरले असेच समज.. ”

पत्रात मायना नव्हता. खाली केलेल्या सहीत निर्जीवपणा, कोरडेपणा होता. “सखी सरले आपले नाते” या गीत रामायणातल्या ओळीच जणू काही हृदयात थरथरल्या पण या वेळेस ताई खंबीर होती. ती अजिबात कोलमडली नाही, ढासळली नाही, मोडली पण वाकली नाही. तिने डोळे पुसले, ढळणारे मन आवरले आणि जीवनातलं कठिणातलं कठीण पाऊल उचलण्याचा तिने निर्धार केला.

संकटं परवानगी घेऊन घरात शिरत नाहीत पण ती आली ना की त्यांच्या सोबतीनं राहून त्यांना टक्कर देण्यासाठी मानसिक बळ वाढवावं लागतं.

शिवाय यात ताईचा दोषच काय होता? खरं म्हणजे तिचा स्वाभिमान दुखावला होता. तिच्या अत्यंत मायेच्या माणसांना अपमानित केलेलं होतं. त्यांच्या भावनांना, वैचारिकतेला पायदळी तुडवलेलं होतं. NOW OR NEVER च्या रेषेवर ताई उभी होती आणि ती अजिबात डळमळलेली नव्हती. नातं खरं असेल तर तुटणार नाही आणि तुटलं तर ते नातच नव्हतं या विचारापाशी येऊन ती थांबली. आयुष्याच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी जणू तिने शूर सैनिकाचं बळ गोळा केलं आणि या तिच्या लढाईत आमचं कुटुंब तिच्या मागे भक्कमपणे उभं होतं. पिळलेल्या मनातही सकारात्मक उर्जा होती.

काही काळ जावा लागला पण अखेर हा संग्राम संपण्याची चाहूल लागली. या साऱ्या घटनांच्या दरम्यान प्रकाश दादाने (ताईच्या दिराने) अनेकदा सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हे त्यांनी अगदी मनापासून केले. त्याच्या कुटुंबीयांनी ताईच्या बाबतीत किती चुका केल्या आहेत याची जाणीव ठेवून केले पण तरीही ताईने माघार घेतली नाही. तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा, अस्तित्वाचा, स्वयंप्रेरणेचा स्त्रोत तिला विझू द्यायचा नव्हता. प्रचंड मानसिक ताकदीने ती स्थिर राहिली.

एक दिवस अरुण स्वत: आमच्या घरी आला. त्याचे ते एकेकाळचे राजबिंडे, राजस रूप पार लयाला गेले होते. दुखण्याने त्याला पार पोखरून टाकलं होतं. त्याच्या या स्थितीला फक्त एक शारीरिक व्याधी इतकंच कारण नव्हतं तर विकृत वृत्तींच्या कड्यांमध्ये त्याचं जीवन अडकलं होतं त्यामुळे त्याची अशी स्थिती झाली होती. जीजीने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे मुके घेतले. अरुणने जवळच उभ्या असलेल्या ताईला म्हटले, “अरु झालं गेलं विसरूया. आपण नव्याने पुन्हा सुरुवात करूया. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ”

ताईने त्याला घट्ट आलिंगन दिले. त्या एका मिठीत त्यांच्या आयुष्यातले सगळे कडु विरघळून गेले.

इतके दिवस ठाण मांडून बसलेली आमच्या घरातली अमावस्या अखेर संपली आणि प्रेमाची पौर्णिमा पुन्हा एकदा अवतरली.

त्यानंतर माझ्या मनात सहज आले, अरुण फक्त घरी आला होता. तो जुळवायला की भांडायला हे ठरायचं होतं. त्याआधीच जिजी कशी काय इतकी हळवी झाली? मी जेव्हा नंतर जिजीला हे विचारलं तेव्हा ती म्हणाली, “भांडायला येणारा माणूस तेव्हाच कळतो. अरुणच्या चेहऱ्यावर ते भावच नव्हते. ”

माणसं ओळखण्यात जिजी नेहमीच तरबेज होती.

“फरगेट अँड फरगिव्ह” हेच आमच्या कुटुंबाचं ब्रीदवाक्य होतं.

शिवाय जीजी नेहमी म्हणायची, ” सत्याचा वाली परमेश्वर असतो. एक ना एक दिवस सत्याचा विजय होतो. ”

त्यानंतर ताई आणि अरुणचा संसार अत्यंत सुखाने सुरू झाला. वाटेत अनेक खाचखळगे, काळज्या होत्याच. अजून काट्यांचीच बिछायत होती पण आता ती दोघं आणि त्यांच्यातलं घट्ट प्रेम या सर्वांवर मात करण्यासाठी समर्थ होतं. बिघडलेली सगळी नाती कालांतराने आपोआपच सुधारत गेली इतकी की भूतकाळात असं काही घडलं होतं याची आठवणही मागे राहिली नाही. ढगे आणि मुल्हेरकर कुटुंबाचा स्नेह त्यानंतर कधीही तुटला नाही. सगळे गैरसमज दूर झाले आणि प्रेमाची नाती जुळली गेली कायमस्वरुपी. ही केवळ कृष्णकृपा.

आज जेव्हा मी या सर्व भूतकाळातल्या वेदनादायी घटना आठवते तेव्हा वाटतं युद्धे काय फक्त भौगोलिक असतात का? भौगोलिक युद्धात फक्त हार किंवा जीत असते पण मानसिक, कौटुंबिक अथवा सामाजिक युद्धात केवळ हार -जीत नसते तर एक परिवर्तन असते आणि परिवर्तन म्हणजे नव्या समाजाचा पाया असतो. यात साऱ्या नकारात्मक विरोधी रेषांचे विलनीकरण झालेले असते आणि जागेपणातली किंवा जागृत झालेली ही मने शुचिर्भूत असतात याचा सुंदर अनुभव आम्ही घेतला. तेव्हाही आणि त्यानंतरच्या काळातही. खरं म्हणजे आम्हाला कुणालाच ताईचं आणि अरुणचं नातं तुटावं असं वाटत नव्हतं पण ते रडतखडत, लाचारीने, कृतीशून्य असमर्थतेत, खोट्या समाधानात टिकावं असंही वाटत नव्हतं. कुठलाही अवास्तव अहंकार नसला तरी “स्वाभिमान हा महत्त्वाचा” हेच सूत्र त्यामागे होतं त्यामुळे त्यादिवशी समारंभात भेटलेल्या माझ्या बालमैत्रिणीने विचारलेल्या, ” इतक्या खोलवर झालेले घावही बुझू शकतात का?” या प्रश्नाला मी उत्तर दिले, “ हो! तुमची पायाभूत मनोधारणा चांगली असेल तर खड्डे बुझतात नव्हे ते बुझवावे लागतात.”

 – क्रमश: भाग ३९

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “English prayer…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “English prayer…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

रोज वेळ मिळेल तेव्हा नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीं आणि अनोळखी वाचक यांच्याशी फोनवर मस्त गप्पा मारण्यात एक वेगळीच मजा येते. आणि मी ती नेहमीच एन्जॉय करतो.

आज सकाळी कॉन्व्हेंट मधून शिकलेल्या आणि माझ्याबरोबर कॉलेजमध्ये असलेल्या मैत्रिणीशी गप्पा मारताना, मैत्रीण (नाव छाया) म्हणाली – 

छाया : मी रोज सकाळी एक श्लोक म्हणून देवाची प्रार्थना करते. पण श्लोकाचा अर्थ काहीच समजत नसतो आणि बऱ्याच शब्दांचे उच्चार पण नीट करता येत नाहीत. त्यामुळे प्रार्थना म्हणण्यात मनापासून मजा येत नाही. इंग्रजीमध्ये देवाची काय प्रार्थना करता येईल ? 

तुझं चौफेर लिखाण असल्यामुळे तू नक्कीच इंग्रजी मधली सोपी प्रार्थना सांगू शकशील. मला रोज इंग्रजी मध्ये प्रार्थना म्हणायला नक्कीच आवडेल. आणि प्रार्थना सोपी असेल तर मी सकाळ, संध्याकाळ आणि वेळ मिळेल तेव्हा म्हणत जाईन. मला प्रार्थना म्हणायला खूप आवडतं.

इंग्रजीमध्ये प्रार्थना सूचवणं आणि ते पण मी, हे जरा अवघडच होतं. मी थोडा विचार केला, वर बघितलं, म्हणजे देवाकडे बघितलं, आणि मला एक छान आणि अगदी सोपी प्रार्थना क्लिक झाली. आणि गंमत म्हणजे मला स्वतःला पण ती मनानी तयार केलेली प्रार्थना खूप आवडली.

मी म्हटलं : एकदम सोपी प्रार्थना सांगतो. इंग्रजीमधे आहे. तुझ्यासारख्या इंग्लिश मीडियम वाल्यांना तर एकदमच सोपी. आणि देवाने जर तुझी ही प्रार्थना ऐकली तर जगामधले सगळेच जण आयुष्य एन्जॉय करतील.

प्रार्थना अशी आहे –

Hey God, let my mind and all parts of my body always remain and grow as per your original design for human body.

And let this logic apply to everyone on the earth.

छाया एकदम खुश झाली. म्हणाली, अरे एकदम सोपी आहे आणि अर्थपूर्ण तर आहेच आहे. पाठांतर पण करायला नको. आणि तिनी मला ही प्रार्थना लगेचच तिच्या इंग्लिश स्टाईल मध्ये म्हणून पण दाखवली. तिची बोलण्याची स्टाईल जरा इंग्लिश असल्यामुळे ऐकताना मजा आली.

असं म्हणतात देवाला प्रार्थना आपण कुठल्या भाषेत करतो ते महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं की प्रार्थना मनापासून आहे की नाही. आणि प्रार्थना नीट म्हणता आली आणि प्रार्थनेचा अर्थ जर समजला, तरच ती मनापासून होऊ शकते. आणि मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच एक वेगळाच आनंद देते आणि चेहऱ्यावर प्रसन्नता आणते.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमाचे झाड… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ प्रेमाचे झाड… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. हळूहळू मोठे होत होत ते आमच्या गॅलरीपर्यंत आले. कोवळी पोपटी मऊशार पानं दिसायला लागली. त्यावरून अलगद हात फिरवावा असं वाटे.

हळूहळू पान मोठी होत जाताना बघणं फार आनंदाच वाटत होत. अगदी गॅलरीतल्या कठड्या जवळच फांद्या होत्या. काही फांद्या आतही आल्या…

एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली..

“अरे म्हणजे आता चिंचा येणार “

मी अगदी आतुरतेनी वाट पाहायला लागले. कोवळी नाजूक चिंच दिसली….

हळूहळू मोठी होत गेली… निसर्गाचा तो सोहळा बघताना फार मजा येत होती. रोज उत्सुकतेनी मी बघत होते.

होता होता चिंच चांगलीच मोठी झाली. चिंचेचे आकडे तयार झाले.

ते बघून शाळेच्या दारात चिंचा विकणाऱ्या मावशी आठवल्या… तेव्हा चिमणीच्या दाताने तोडलेला तुकडा आठवला. मैत्रिणी, शाळा, बाई आठवल्या……..

आणि नंतर या झाडाची गंमतच सुरू झाली.

घरी कोणी आलं की आधी त्यांना घेऊन गॅलरीत जायचं आणि हे झाड दाखवायचं..

एकदा मैत्रिण व तिची जाऊ आली. तिच्या जावेने तर फांदी हातात घेऊन अगदी गालाजवळ नेली… तिचे डोळे भरूनच आले होते. ती म्हणाली

“अग नीता आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या. पण दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीतच आम्ही अभ्यास केला तिथेच मैत्रिणींशी गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा त्याच्या सावलीत झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खूप समाधान वाटलं बघ.. त्याच झाडाची आठवण आली. “

विलक्षण प्रेमाने ती बोलत होती.

झाडाला बघून तिचा हळवा कोपरा उघडला होता…. निघताना पण तिने हलकेच फांदीवरून हात फिरवला…

झाड मोठं व्हायला लागलं. चिंचा आता छान वाळल्या होत्या.

एक मध्यम वयाच जोडपं आलं. झाड झोडपून देतो म्हणाले.

“आम्हाला थोड्या चिंचा द्या बाकी तुम्ही घेऊन जा “म्हणून सांगितलं.

त्यांनी चिंचा पाडल्या. पोती भरली. आम्हाला दिल्या. खुश होऊन निघाले. निघताना त्या बाईं झाडाजवळ गेल्या झाडाला डोकं टेकवलं….. कवटाळलं नमस्कार केला… देवाला करावा तसा..

मी बघत होते 

“फार झोडपल बघा झाडाला… पण चिंचा पाडण्यासाठी असं करावंच लागतंय बघा… “

त्या म्हणाल्या.

झाडाबद्दल तेवढी कृतज्ञता..

पुढे सांगत होत्या..

“आम्ही शेतकरीच आहोत भाऊकी सुरू झाली…. छोटा तुकडा वाट्याला आला.. मग शेती विकली. पैसा घेतला आणि आता शहरात आलो जगायला… “

काय बोलावं मला पण काही सूचेना…. डोळे भरून आले..

” बरं ताई येतो आम्ही परत पुढच्या वर्षी” असं म्हणून दोघं निघाले.

निघताना दादांनीही झाडाला डोकं टेकवलं…

हाडाचे शेतकरीच होते ते…

काही दिवसांनी लक्षात आलं की झाडावर दोन पक्षी येऊन बसत होते. त्यांचे विभ्रम चालायचे..

मैत्रीण आली होती तिला सहज सांगितले.

“हेच दोघे येऊन वेगळे बसतात बघ. प्रेमात पडलेले असतील बहुतेक” 

ती बघायला लागली..

” चल ये आत कॉफी करते”

म्हटलं तर ती तिथेच उभी…

लक्ष त्या पक्षांकडेच म्हणाली “पक्षांमध्ये जात, धर्म, पंथ नसतात हे किती बरं आहे ना… सुखात राहू दे यांची जोडी… “

पक्षांना बघून तीच खूप जुनं दुःख नकळत वर आलं होतं…

अशावेळी काही बोलूच नये..

शांतपणे मी आत आले.

नंतर पण घरी आली की गॅलरीत जाऊन झाड बघून यायची…

का… अजून काही आठवायची…………

खारूताईच चिंच खाणं बघत राहावं असं असायचं. बाईसाहेब मजेत दोन पायांच्या मध्ये चिंच धरायच्या आणि खात बसायच्या…

ह्या झाडाच्या तर मी प्रेमातच पडले होते.

री डेव्हलपमेंट होणार म्हणून काही दिवस घर सोडायचे होते. झाडाला सोडायचे वाईट वाटत होते.

दोन्ही नातवंड साहिल शर्वरी आले. चिंचा काढल्या. त्यांनाही झाडाबद्दल विलक्षण प्रेम वाटत होतं. ममत्व होतं….

“आता खाली पार्किंग येणार मग आपला फ्लॅट अजूनच वर जाणार आपल्या गॅलरीत हे झाड नसणार रे” साहिलला मी म्हणाले.

तर तो म्हणाला 

“अग आजी तोपर्यंत झाड पण वाढणार नाही का? मग ते आपल्या गॅलरीत येणार… “

“अरे हो खरंच की”

त्याच्या बोलण्याने मन आनंदुन गेलं.

येताना झाडाचाही निरोप घेतला.

भेटू काही वर्षांनी…

आणि मधुन मधुन येत जाईन रे तुला बघायला… झाडाला सांगितलं.

वारा आला.. फांद्या हलल्या…

माझं मलाच छान वाटलं…

असा जीव जडला की लांब जाताना त्रासच होतो…

मग तो झाडावर जडलेला असला तरी…

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट !

त्यावेळी मी रशियातील मॉस्को इथे होते. एका रविवारी मी बागेत गेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते पण हलका रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हवेत सुखद गारवा आला होता. बाग अतिशय सुंदर होती. एका चबुतऱ्याखाली बसून मी त्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेत होते.

अचानक माझी नजर एका युवक युवतीच्या जोडीवर पडली. अगदी थोड्या वेळापूर्वीच लग्न झाले असावे त्यांचे !

ती नववधू अगदी सुंदर होती ! पंचवीस एक वर्षांची, सोनेरी केसांची आणि निळ्या चमकत्या डोळ्यांची ! जणू बाहुलीच ! नवरा मुलगाही साधारण त्याच वयाचा वाटत होता ! तडफदार आणि आकर्षक ! त्याने सैन्याचा पोशाख घातला होता. नववधूच्या अंगावर सॅटिनचा पांढराशुभ्र, मोती आणि नाजूक लेसने सजवलेला पोशाख होता. तिच्या दोन मैत्रिणीही तिच्यामागे उभ्या होत्या. नववधूचा पोशाख मळू नये म्हणून त्यांनी तो हातांनी उचलून धरला होता. एका मुलाने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती. पाऊस पडत होता ना ! नववधूच्या हातात फुलांचा सुंदर गुच्छ होता. दोघांची जोडी अगदी साजेशी आणि सुरेख दिसत होती.

मी विचार करु लागले, ‘ बाहेर पाऊस पडत असताना इतके छान कपडे घालून हे दोघं लगेच असे बागेत का बरं आले असावेत ? लग्न लागल्यावर त्यांच्याकडेही एखादा काही समारंभ वगैरे असेलच की !’ 

मी आता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहात होते. ते दोघेही बागेत असलेल्या युद्ध-स्मारकाकडे गेले. हातातला गुच्छ त्यांनी त्या स्मारकावर अर्पण केला. तिथे दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांनी मनोमन श्रद्धांजली वाहिली व ते हळूहळू परत फिरले.

आता मात्र माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना !

या जोडीबरोबर एक वृद्ध गृहस्थही आलेले होते. मी त्यांच्या जवळ जाताच त्यांनी माझी साडी पाहून विचारलं 

“ आपण भारतीय आहात का ?”

“ हो, मी भारतीय आहे. “

मग नकळत आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना विचारलं, “ आपल्याला इंग्रजी कसं येतं ?” 

“ मी काही दिवस परदेशात काम करत होतो.”

“ मला एक गोष्ट सांगता का ? हे नवविवाहित जोडपं लग्नानंतर लगेचच या युध्दस्मारकाला भेट द्यायला का आलं आहे ? “ न राहवून मी लगेच माझी शंका एकदाची विचारून टाकली.

ते म्हणाले, “ ही रशियातली परंपरा आहे. इथे कोणाचाही विवाह नेहमी रविवारीच होतो, मग ऋतू कोणताही असू दे ! विवाह-नोंदणीच्या रजिस्टरवर सह्या केल्यानंतर त्या जोडप्याने तिथल्या जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन तिथे श्रध्दांजली अर्पण करणं बंधनकारकच आहे असं म्हणता येईल. काय आहे.. ह्या देशात प्रत्येक युवकाला कमीत कमी दोन वर्षे सैन्यात नोकरी करावीच लागते. लग्नाच्या दिवशी आपला सैनिकी पोशाख घालूनच लग्नाला उभं रहावं लागतं.. मग तो कोणत्याही पदावर वा कुठल्याही खात्यात असू दे.” 

“ आणि याचं कारण काय ? “ मी विचारलं.

ते जरासे सरसावून बसले आणि सांगू लागले……

– – “ हे कृतज्ञतेचं प्रतीक समजलं जातं. आपल्या कितीतरी पूर्वजांनी आपल्या देशासाठी कितीतरी युद्धांमध्ये भाग घेतला होता. किती जणांनी प्राणांची आहुती दिली होती.. काही युद्धं जिंकली, काही हरली ! पण त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं ते फक्त आमच्या या देशासाठी… त्यांच्या त्यागाचं मोल फार मोठं आहे. आणि प्रत्येक नवविवाहित जोडप्याला ह्याची जाणीव असणं फार आवश्यक आहे. ज्या शांत स्वतंत्र राष्ट्रात ते दोघं आता आनंदाने राहणार आहेत ते राष्ट्र आज ह्या लोकांच्या बलिदानावर उभं आहे… ही जाणीव. आम्ही वयस्कर लोक ही परंपरा जपण्याचा आग्रह धरतो. विवाहाच्या दिवशी युद्ध-स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहणं ही गोष्ट प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी जणू अनिवार्यच आहे. मग लग्न कुठेही असो, मॉस्को, पिटर्सबर्ग अथवा रशियातल्या कोणत्याही शहरात !” 

मी विचारात पडले… ‘आता हे दोघं लग्न करताहेत’ म्हणून काय शिकवतो आपण आपल्या मुलांना ? महाग महाग साड्या आणि उंची कपडे, किंमती दागदागिने, महागडे जेवणाचे मेनू, अनावश्यक डेकोरेशन, आणि डिस्को पार्टी.. बस्.. फक्त एवढंच तर शिकवतो. एक भारतीय म्हणून आनंदाने आणि शांतपणे जगण्यास आतुर झालेल्या त्या जोडप्याला.. त्यांच्या आयुष्यातल्या त्या महत्वाच्या दिवशी आपल्या शहिदांची आठवण ठेवायला का शिकवत नाही आपण ? का त्यांचे महत्त्व आपण पटवून देऊ शकत नाही आपल्या पुढच्या पिढीला…. आणि खरं तर स्वत:लाही ?

माझे डोळे भरून आले ! मन दाटून आले !

खरंच !आपण भारतीयांनी रशियाकडून ही महान परंपरा आणि ही कृतज्ञतेची जाणीव शिकलीच पाहिजे. देशासाठी आणि पर्यायाने आपणा सर्वांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे त्यांचा योग्य तो सन्मान आपणही केलाच पाहिजे… आपल्या आनंदाच्या प्रत्येक क्षणी त्यांचे स्मरण तर केलेच पाहिजे.

– – पण केव्हा शिकू आपण हे ????

 

मूळ हिन्दी लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती कोण होती ? ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ ती कोण होती ? ☆  सुश्री नीला महाबळ गोडबोले

पंचवीसएक वर्षांपूर्वीची गोष्ट… लेकीचा जन्म अजून झालेला नव्हता.. मी आणि माझे यजमान दोघेच रहात होतो…

नक्की महिना कोणता ते आठवत नाही.. पण पावसाळ्याचे दिवस होते.

बहुतेक रविवार असावा…

यजमानांचा सेमिनार होता… ते दिवसभर बाहेर असणार होते..

सकाळपासून रिपरिपणारा पाऊस नि त्यामुळे झालेलं कुंद वातावरण…

मन उदास झालं होतं… त्यात एकटेपणा..

अपर्णाकडे जायचं ठरवलं.. बरेच दिवस ती बोलावत होतीच..

“जेवायलाच ये “.. तिचा हट्टी आग्रह.. नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं..

बरेच दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता. स्वयंपाकाचं झंझट नव्हतं…

पद्मजा फेणाणींची माझी आवडती कॅसेट लावली.. नि मस्तपैकी सगळी कपाटं आवरून काढली…

स्वयंपाकघर चकचकीत केलं. बरेच दिवस रेंगाळलेलं केस धुण्याचं कामही उरकून घेतलं…

छान तयार झाले.. पर्स घेतली नि बाहेर पडले. दाराला कुलूप लावणार एवढ्यात पुस्तक विसरल्याचं आठवलं.. माझ्याकडचं ” चारचौघी ” हे पुस्तक अपर्णाला वाचायचं होतं. ते घेऊन यायला तिने आवर्जून सांगितलं होतं..

तशीच पुन्हा आत गेले.. कपाटातून पुस्तक काढलं.. पर्समधे टाकलं.. नि बाहेर पडले..

कुलूप लावलं… नि चारचारदा कुलूप ओढून पाहिलं…

खरंतर मी संशयी नाही.. पण कुलुपाच्या बाबतीत मला नेहमी माझाच भरवसा वाटत नाही..

कुलूप व्यवस्थित बसल्याची खात्री करून एकदाची निघाले..

अपर्णाचं घर जवळच असल्याने चालतच गेले.. पावसात मस्त भिजत..

ती वाटच पहात होती.. तिचे यजमान पुण्याला गेल्याने तीही घरात एकटीच होती..

गॅलरीत बसून दोघींनी वाफाळतं टोमॅटो सूप प्यायलं.. वाहत्या रस्त्यावरची रहदारी न्याहाळत..

अपर्णानं मला जेवायला बसवलं नि गरमागरम आलू पराठे तव्यावरून माझ्या पानात वाढले…

माझे आवडते आलू पराठे.. तेही गरम नि आयते. घरच्या लोण्याचा गोळा, कवडी दही,. रायतं, कैरीचं लोणचं.. गृहिणीला अजून काय हवं असतं?

पण सुगरण अपर्णाने मला आवडतो म्हणून ढोकळाही केला होता.. गोड पाहिजेच म्हणून बदाम, केशर घातलेली शेवयाची खीर.. शिवाय पुलाव होताच…

भरपेट जेवण झालं.. खरंतर पोटात इवलीशीही जागा नव्हती.. तरी पोटभर गप्पा झाल्या..

यजमानांचा फोन आला.. तेव्हा संध्याकाळचे सात वाजल्याचं कळलं.. ते अर्ध्या तासात घरी येणार म्हटल्यावर मीही घरी जायला निघाले.. पंधरा मिनिटे पुन्हा दाराशी गप्पांची मैफिल झोडून घराकडे कूच केलं..

घराच्या कोप-यावर पोहोचायला नि दिवे जायला एकच गाठ पडली.. पावसाळी वातावरणात अंधाराने घातलेली भर भीतीला आवतण देत होती..

घराच्या दाराशी आले.. दाराच्या बाजूलाच स्वयंपाकघराची खिडकी.. सताड उघडी..

मी जाताना सगळी खिडक्या दारं घट्ट बंद केलेली.. नेहमीच्या सवयीने..

मग ही खिडकी उघडी कशी? कदाचित वादळ आलं असेल.. त्यामुळे उघडली गेली असेल वा-याने..

खिडकीतून आत डोकावून पाहिलं.. सगळा कट्टा भांड्यांनी भरलेला.. फुलपात्रे, ग्लास, चमचे, कप.. यांची मैफल भरलेली.. सोबत चिवडा नि बिस्किटांचा डबाही..

…. मी तर कट्टा साफ करून गेले होते.. मग एवढी भांडी कुठून आली? घरात कधीतरी एखादा उंदीर शिरतो.. किंवा या रिकाम्या खिडकीतून मांजरही शिरलं असेल..

पण उंदीर नि मांजर अशी भांडी कशी काढतील फडताळातून कट्ट्यावर ? शिवाय तो चिवड्याचा डबा?

आता मात्रं भीतीनं जीव कापायला लागला..

म्हणजे एखादा चोर शिरला असेल का घरात?

पण कुलूप तोडलेलं नाही.. कुठलंही दार उघडलेलं नाही.. खिडकीचं दार उघडं आहे पण खिडकीच्या जाळीमधून चोर शिरणं शक्य नाही…

मग. ?

म्हणजे ते भूत, प्रेत वगैरे तर नसेल ? की काळी जादु.. करणी. भानामती तसलं काही?

अरे देवा…

हो.. बरोबरच आहे.. आज अपर्णा म्हणतच होती अमावस्या आहे.. म्हणून तिने घरात नारळ फोडला…

पण असलं काही नसतं.. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.. असले विचार करणंही चुकीचं आहे.

पण मग हा कसला प्रकार ?.. खूप विचार केला.. डोक पिंजून काढलं…. आणि ट्यूबलाईट पेटली..

मिस्टरांकडे एक किल्ली असते.. तेच आले असणार.. चहासाठी भांडी काढली असणार.. चिवड्याच्या डब्यातून चिवड्याची फक्की मारली असणार… अन् मी मात्रं वेड्यासारखी काहीबाही विचार करत बसले होते.. स्वत:चीच मला लाज वाटली..

एकदाचं हुश्शही झालं..

आता निर्धास्तपणे मी कुलूप काढलं.. घरात संपूर्ण अंधार होता … बेडरूममधे टॉर्च होता.. तो आणला.. चालू केला… हॉलमधे टॉर्चचा प्रकाश टाकत स्वयंपाकघराकडे पाणी पिण्यासाठी निघाले..

…. कोप-यात टॉर्चचा उजेड पडला आणि डोळ्याला जे दिसलं ते पाहून जोराची किंकाळी तोंडातून बाहेर पडली..

त्या कोप-यात एक अतिशय कृश आणि बुटकी बाई पाय पोटाशी घेऊन बसली होती..

अंधाराशी स्पर्धा करणारा अव्वल वर्ण, पिंजारलेले मोकळे केस.. बारीक डोळे, नाकात मोठी चमकी नि कशीतरी नेसलेली इरकल साडी.. हे कमी होतं म्हणून की काय..

.. तिचे पुढे आलेले पांढरे पिवळे दात काढून ती माझ्याकडे पाहून हसू लागली..

” कोण आहे तुम्ही ?” मी धीर एकवटून विचारलं.. नि ती पुन्हा खदाखदा हसू लागली..

आता मात्रं माझं अवसान संपलं.. ही नक्कीच कुणीतरी हडळ बिडळ असणार.. माझी खात्री पटली.. मी भीतीने दाराशी पळत सुटले.. नि दाराशी आलेल्या माझ्या यजमानांना धडकले..

” काय झालं ? अशी का पळतेयस?”

माझ्या तोंडातून शब्दच फुटेना..

” भूत.. भूत “

मी कोप-याकडे बोट दाखवायला नि दिवे यायला एकच गाठ पडली..

मिस्टरांनी कोप-यात पाहिलं..

“चिन्नम्मा.. तू कधी आलीस ?”.. मिस्टरांनी तिला सहजपणे विचारलं..

उत्तर न देता ती पुन्हा तशीच हसली..

” तुम्ही या बाईला ओळखता ?”

” ओळखता काय? चांगला ओळखतो.. अगं हिनं दहा वर्ष आपल्या घरी काम केलय.. खूप प्रामाणिक.. अगदी घरच्यासारखं काम करायची.. मुलं मिळवायला लागल्यावर तिने काम सोडलं. परवाच हिचा मुलगा दवाखान्यात माझ्याकडे तपासायला हिला घेऊन आला होता.. हिला स्किझोफ्रेनिया झालाय… कोणीतरी कानात बोलतय.. कोणीतरी फोटो काढतय.. असे भास होतायत.. घरी न सांगता कुठेतरी हिंडत बसते..

अनेक वर्षांनी आज आपल्या घरी आली…. पण तू एवढी घाबरलीयस का? तूच तिला घरात घेतलं असशील नं?”

मी नाही म्हटलं नि घडलेलं सारं सांगितलं..

” पण मग ही घरात कशी शिरली ?”

आम्ही खूप चर्चा केली.. तिला विचारलं.. पण हसण्याशिवाय तिच्याकडून कोणताच प्रतिसाद नव्हता..

नि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.

मी अपर्णाकडे जाण्यासाठी दारात आले नि पुस्तक विसरलं म्हणून दार तसेच उघडे ठेऊन खोलीत गेले..

तेवढ्यात ही चिन्नम्माबाई घरात शिरली नि सरळ स्वयंपाकघरात गेली.. आणि मी दाराला कुलूप लावून निघून गेले..

हिने स्वयंपाकघरातील भांडी काढली.. भूक लागल्यावर कदाचित चिवडा, बिस्कीटे खाल्ली नि नंतर बिचारी हॉलच्या कोप-यात येऊन बसली..

– – आम्हाला या प्रकारावर हसावं की रडावं तेच कळेना..

मी तिला चहा करून दिला. चहा, बिस्कीटे खायला घालून, खणानी तिची ओटी भरली नि आम्ही दोघे तिला तिच्या घरी गाडीतून सोडून आलो..

तिच्या घरच्यांची दिवसभर शोधाशोध सुरूच होती. त्यांनी चारचारदा आमची क्षमा मागितली नि आभारही मानले..

चार दिवसांनी ती पुन्हा गायब झाल्याचं तिच्या मुलाकडून कळलं…

पण यावेळी मात्र ती आमच्याकडे आली नव्हती…

– – पंचवीस वर्षात ना ती कुठे सापडली.. ना तिची खबरबात मिळाली..

पोलीस स्टेशनमधे ती अजूनही ” मिसिंग ” आहे..

….. जायच्या आधी मात्र तिच्या ” डॉक्टरदादांना ” भेटून, आमच्या घरी चहापाणी करून गेली.. !!

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

“गझलनवाज पंडित भीमरावजी पांचाळे यांना महाराष्ट्र शासनाचा गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर… “ 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा असा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ गझल गायक गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे उर्फ दादा यांना जाहीर झाला आहे. यानिमित्ताने दादांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… ! 

तसेच मा. महेश मांजरेकर, अनुपम खेर, मुक्ता बर्वे आणि काजोल या मान्यवरांचेही विविध पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… !

गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी गझल गायकी रुजवण्याचा प्रयत्न अखंडपणे केला व आजही तो सुरू आहे. केवळ गझल गायकीच नव्हे तर मराठी हात मराठी गझलेकडे वळविण्याचे मोठेच काम दादांनी केले आहे आणि आजही ते करीत आहेत.

गझल सागर प्रतिष्ठान याची स्थापना करून, त्या अंतर्गत अखिल भारतीय मराठी गझल संमेलने भीमरावदादानी सर्वप्रथम सुरू केली. नुकतेच १० वे अखील भारतीय गझल संमेलन अकोला येथे मोठ्या दिमाखात पार पडले. एखाद्या काव्यप्रकाराचे स्वतंत्र दोन-तीन दिवसीय संमेलन हा एक अनोखा प्रयोग आहे.

गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी घेतलेली गझल संमेलने, गझल लेखन कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने आणि इतर सर्वच काम फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा गझलसम्राट सुरेश भट यांनी रुजवलेल्या मराठी गझल लेखनाचा सर्वांगीण विस्तार करण्यामध्ये गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांचे योगदान अतिशय भरीव स्वरूपाचे आहे. ते गेल्या ३५ ते ४० वर्षांहून अधिक काळ माझे व्यक्तिगत जवळचे स्नेही आणि मोठ्या बंधूसम आहेत. हा माझ्या आनंदाचा व अभिमानाचा विषय आहे. शिवाय ते माझे भारतीय स्टेट बँकेचे सहकारी ही एक वेगळी ओळख आहे.

त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्यात मला नेहमीच आनंद वाटत आलेला आहे. मी गझल सागर प्रतिष्ठानच्या अनेक गझल संमेलनात सहभागी झाले आहे. त्यातला एक प्रसंग सांगते. वाई येथे ” कृष्णा काठावर गणेश घाट आहे. ” अशा ठिकाणी ५वे अखिल भारतीय गझल संमेलन होते. नागपूरहून तिथे जाणं तसं मला कठीणच होतं. बँकेच्या नोकरीत सुट्टीचा प्रश्न होता. तरीही शुक्रवारी रातोरात प्रवास करून मी वाईला सकाळी १० ला पोचले. गेल्यागेल्याच दादांना भेटले. दादांनी मला सांगितलं की, एका ‘मुशायऱ्याचं ‘ आणि गझल मैफिलीचं सूत्रसंचालन मला करायचंय. माझ्यावर एवढा विश्वास दादांनी टाकला होता. मात्र प्रसंग बाका होता.

मुशायरा तर सहज केला मी. रात्रीच्या जेवणानंतर गझलेची मैफिल सुरू झाली. समोर श्रोत्यांमध्ये दस्तुरखुद्द राजदत्त साहेब बसलेले. श्रीगणेशाचं नाव घेऊन मी सूत्रसंचालनाला सुरुवात केली. हातातल्या कागदावर फक्त गायकांची नावे / आणि कुणाची गझल गाणार तेवढे नाव होते.. मला नोट्स काढायलाही वेळ मिळाला नाही. बाहेर कार्तिक पौर्णिमेचं चांदणं पसरलं होतं. पुढे सर्व दिग्गज बसलेले. खच्चून गर्दी झालेली. कदाचित माझ्यातही मंच संचारलं असावं. संगीताचा कान आणि गझलेची जाण यामुळे मी त्यावेळी निभावून गेले. अर्थातच मैफिल सर्वोत्तम झाली… आणि अनपेक्षित पणे राजदत्त साहेबांच्या हस्ते माझा विशेष सत्कार करण्यात आला. हे केवळ दादांचा माझ्यावरचा विश्वास यामुळे घडले. असे क्षण विसरता येत नाहीत. दादांनी असंच आजवर अनेक लोकांना घडवलंय !!!

दुसरा प्रसंग ! लोकव्रत पुणे प्रकाशनाने माझा “सावली अंबराची” हा गझलसंग्रह प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन व्हायचे होते. मा. शिरीष कुलकर्णी सरांशी माझे बोलणे झाले ! चर्चा झाली की, प्रकाशन कुणाच्या हस्ते व्हावे ? मी म्हटलं “माझ्या गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी दादांना विचारूया का? ” शिरीष सर म्हणाले, “पंडीतजी? ते येतील? ते खूप मोठे आहेत. व्यस्त असतात ते.” पण माझी खात्री होती. दादा हो म्हणतील याची. तसंच झालंही. दादांनी सहज होकार दिला प्रभाशनासाठी. भीमराव दादांच्या हस्ते माझ्या “सावली अंबराची” या गझलांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. शिवाय दादांनी त्याच पुस्तकातली एक गझलही म्हटली. अशा गोड आठवणी फक्त जपायच्या असतात. विशेष म्हणजे माझ्या “सावली अंबराची ” आणि “माझा विचार आहे ” या दोन्ही गझलसंग्रहांची पाठराखण – ब्लर्ब त्यांनीच केली आहे.

दादांनी गझल गायकीसाठी ऐन भरात असलेली भारतीय स्टेट बँकेची नोकरी सोडली. गझल गायकी त्यांना खुणावत होती. नोकरीमुळे “गाणं आणि नोकरी ” ही तारेवरची कसरत होती. कोणाला न्याय द्यायचा ? काय निवडायचं ? त्यांनी गझल गायन निवडलं ! कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. विशेष म्हणजे गीता वहिनी तुमचंही हार्दिक अभिनंदन. कारण तुम्ही दादांची सहधर्मचारिणी. खूप छान सांभाळलंत सगळं ! दादांची लेक डॉ. भाग्यश्री ! आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून, नवनवी आव्हाने स्वीकारत नव्या पिढीची दमदार मराठी गझल गायिका आहे. तुझंही अभिनंदन बाळा !

मराठी गझल कशी गावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे पंडीतजी. तीन तासांची बैठक / मैफल कशी संपते हे रसिकांना कळतच नाही. गझल ही शब्दप्रधान गायकी आहे. सुरांसोबत शब्दही तेवढेच महत्वाचे असतात. म्हणून गझलगायन वाटतं तेवढं सोपं नसतं. ते आव्हान दादांनी स्विकारलं. आज नव्या जुन्या अनेक गझलकारांचा गझल ते गातात. दादांनी गझल गायली की तो / ती गझलकारही प्रकाशात येतात.

गझले बरोबरच ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत अशा सर्व शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम संगीतामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठलीही बंधने कलेच्या आड येत नाहीत हेच खरे. मात्र त्यासाठी योगदानही तेवढेच असावे लागते. वेळ येताच शासन, समाज यांना त्याची दखल घ्यावीच लागते. त्यांचं गायन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या सीमा ओलांडून विदेशात गौरवलं गेलं आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी दादांना गौरवून स्वतः गौरवीत झाले आहेत.

हाही पुरस्कार त्याचं एक दृश्य रूप आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळालेला असताना ” मराठी गझल गायकीचा होणारा सन्मान म्हणजे ” दुधात साखरच नव्हे तर केशर वेलची सुद्धा आहे.

रुपये १० लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल श्रीफळ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन. एस. सी. आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

मराठी गझल गायकी सातासमुद्रापार पोचवणाऱ्या दादांना मानाचा मुजरा!!

दादांनी अजून खूप खूप गावं, अनेक सन्मान त्यांना मिळावेत हीच शुभेच्छा !!! दादा तुम्हाला लवकरच ” पद्मपुरस्कारानेही सन्मानीत केलं जाईल हा विश्वास आहे. ! त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

© प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा)

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२४ – तुळस नसलेली तुळशीबाग… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२४ – तुळस नसलेली तुळशीबाग… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

तुळस नसलेली तुळशीबाग… 

अक्कानी म्हणजे माझ्या आत्त्याने तुळशीबागेत रात्रीच्या आरतीला जाण्याचा नेम कधी चुकवला नाही. अधून मधून ती आम्हांलाही घेऊन जायची. सुरुवातीला वाटायचं एवढं काय आहे त्या तुळशीबागेत? पण नंतर लक्षात आलं, काय मिळत नाही ते विचारा तुळशीबागेत?. अहो पूर्वी म्हणे इथे खूप तुळशी होत्या. म्हणून तर नांव पडलं तुळशीबाग. पण गंमत म्हणजे आता तिथे नावालाही तुळशीचं रोपटं सुद्धा नाही. एकदा संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचलो, आत्या म्हणाली, “मला माझा राम भेटलाय, तुम्हाला जायचं असेल तर जा भटकायला. आम्हाला काय तेच पाहिजे होतं, आम्हीं पूर्ण देऊळ परिसर पालथा घातला. अगदी अलीबाबाच्या गुहेत गेल्यासारखं वाटलं. कानातलं गळ्यातलं, नाकातलं बांगड्यांच्या मोहात आम्ही पडलो. गंमत म्हणून सांगते तुम्हाला, प्रेमाच्या राज्यातून बाहेर पडून लग्न झालेली जोडपी पण तिथे ‘हाजीर ‘होती. त्यातल्या काही नवऱ्याचं लग्ना आधी बायकोला गुलाबाचे फुल, गजरा, गुच्छ, सेंट, अत्तर बाटल्या देऊन झाल्या होत्या. पण हाय रे देवा! ते रोमँटिक क्षण मागे पडले. आणि ते मागे सारून नवरे आता पूर्णपणे संसाराच्या बेडीत अडकले होते. आणि केविलवाण्या चेहऱ्यांनी, ताट वाट्या तवा पोळपाट हा संसारातील पसारा घेण्यासाठी बायकोच्या मागे मागे अगदी धरून पकडून आणल्यासारखे चालले होते. आम्हाला तर बाई हंसूच झालं त्यांच्याकडे बघून. तुझ्यासाठी आकाशातील तारे तोडून आणीन असं म्हणणारे ते ‘हिरो’ उलथन, झारे, चिमटे असं काही बाही विकत घेत होते. कारण तुळशीबागेत मिळणाऱ्या चमचे, चहा गाळणी, कुंचे, पातेली, सतेली घेऊन त्यांना संसार चालवायचा होता आणि बायकोला खुश करायचं होतं. जुन्या पिढीचं लक्ष होतं रामाकडे, तर तरुणाईंचे डोळे हार, कानांतले, नाकांतले, गोंडे, रिबिनी इत्यादी नकली साज शृंगार वस्तूंकडे वळत होते. मारुतीच्या पायरीवर आत्याने आम्हाला जबरदस्तीने बसवलं आणि म्हणाली, ” पुरे झाले हं, आता भटकणं! मी सांगते ते ऐका! तुम्हालाही माहीत असायला पाहिजे. ” आम्हा भाचरांना खाली बसवत ती म्हणाली, ” ही जागा खाजगी वाल्यांची होती. मंदिराची बांधणी मजबूत असून शिखर 140 फूट उंच व कळसच मुळी चार फुटाचा आहे. श्रीराम लक्ष्मण सीतामाईच्या मूर्ती इतक्या देखण्या आहेत की डोळ्याचं पारणं फिटतं, उमाजी बाबा पंढरपूरकरांनी ह्या शुभ, सुंदर, रेखीव मूर्ती मजुरांकडून चाळीस रुपये म्हणजे त्या काळातली मोठी बिदागी देऊन तयार करून घेतल्या होत्या. आपले पूर्वज व्यवहार दक्ष होते नियमित आणि अचूक हिशोब नोंदणी असायची त्यांची. त्यांच्या नोंदणी वहीत ही नोंदआढळली. आमच्या मनात खूप खूप शंका होत्या मी विचारलं, “आत्या पुण्यात खूप रामाची देवळे आहेत का ग? आणि कुठे आहेत?कुणी आणि कधी बांधली गं ? आमच्या बाल सुलभ उत्सुकतेला आत्त्याने हंसून दाद दिली. राम म्हणजे तिचा अत्यंत प्राणप्रिय, आवडीचा विषय श्रोत्यांकडून दाद मिळाल्यावर ती सरसाऊन म्हणाली, “हो तर! ऐका हं!पुण्यात अनेक राम मंदिरे आहेत रास्ता पेठेतला रास्त्यांचा राम, सदाशिव पेठेतला गाय आळीचा राम, रहाळकरांचा राम, फुटक्या बुरुजाकडे जाताना जोशीराम. तर आपल्या आप्पा बळवन्त चौकाकडून केसरी वाड्यावरून लकडी पुलाकडे जातांना लागतो तो भाजीराम. 1762 मध्ये ते मंदिर बांधलं गेलं. “आत्याला मध्येच थांबवत आम्ही ओरडलो, “नक्कीच तिथे भाजीवाले बसत असतील म्हणून तो भाजीराम झाला असेल, बरोबर नागं आत्या? खळखळून हंसत आत्या म्हणाली, “अगदीबरोब्बर. शंभरापैकी शंभर मार्क तुम्हाला. पण अगं तुम्हीं मघाशी चोरखण आळी म्हणालात ना?ते मात्र चूक आहे हं! चोर नाही चोळखण आळीतला वैद्य राम तर टिळक स्मारक, मंदिरात पण बाबा महाराजांचे राम मंदिर आहे. लक्ष्मी रोडवरचं लिखिते मंदिर आणि शिवाजीनगरच्या रोकडोबा समोरचं राम मंदिर पण प्रसिद्ध होत. आत्याला थांबवत आमचे मोठे शिकलेले चुलत बंधुराज म्हणाले, “आत्या तू तर सगळ्या पुण्यातल्या राम मंदिरातून आम्हाला फिरवून आणलंस, हो नागं? आत्या म्हणाली, “मग आता दमलांत की काय? ऐकून दमलात आता चालून दमा. उठा बरं! रामाला प्रदक्षिणा घालायचीय बर का!मगाशी तुळशी बागेला काही बाही खरेदी करायला दुकानं धुंडाळत बाहेरून फेरा मारलात ना! पण आतल्या श्रीरामाला प्रदक्षिणा घालायला विसरलात. उठा बरं लवकर!आणि पळा आता. मला जप करायचाय जपमाळेकडे जाणारे तिचे हात पकडून आम्ही म्हणालो, “अगं आत्तू माळेशिवाय शंभर वेळा जप मगाशीच झालाय तुझा. “तो कसा काय? ह्या तिच्या प्रश्नाला बगल देऊन आम्ही ओरडलो, “आत्तापर्यंत हे राम मंदिर ते राम मंदिर अशी खूप साऱ्या राम मंदिराची ओळख करून देतांना तुझ्या तोंडून हजार वेळा रामाचं नाव निघालं. मग आता कसला वेगळा जप करतेस?” आत्याने पाठीवरून हात फिरवून किताब “दिला, हुशार आहात. ” पण काही म्हण हं आत्या! तुझ्याकडून खूप छान आणि नवीन माहिती आम्हाला मिळाली. आता रामायणातल्या रामाची छानशी गोष्ट सांग ना घरी जाताना. आणि बरं का मंडळी, गोष्टी वेल्हाळ आत्याची रामकथा ऐकता ऐकता आम्ही जोगेश्वरी जवळच्या आमच्या घरी केव्हां पोहोचलो हे आम्हा मुलांना कळलंच नाही..

– क्रमशः भाग २४  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंबईया… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ बंबईया ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

‘संपर्कासाठी भाषा’ हा उद्देश ठेऊन जर तिसरी भाषा शिकवायची असॆल तर २३ वी राज्यभाषा म्हणून तत्काळ ‘बंबईया’ हिंदी ला मान्यता देऊन तिचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा ही विनंती, अध्यक्ष महोदय !

शिकण्यास, आत्मसात करण्यास सोपी.

घरातून निघाल्या पासून रिक्षा, बस, रेल्वे स्टेशन, लोकल, मेट्रो मुंबईतील प्रेक्षणीय ठिकाण, शाळा, कार्यालये ते परतीचा प्रवास, सगळीकडे कायम बोलली जाणारी ही भाषा पहिली पासून मुलांना (किमान MMRDA क्षेत्रातील) शिकवली तर ते त्यांना पुढील आयुष्यात फायद्याचे ठरेल.

मातृभाषेची ‘मुळं’

बंबईया हिंदीची खोडं’

आणि awesome हिंग्लीश ने भरलेली ‘पानं फुलं ‘

– – – असा हा भाषेचा वटवृक्ष, त्री-भाषा सूत्राचा कल्पवृक्षच जणू

या भाषेतील परीक्षेतील काही sample प्रश्ण

१) वडा-पाव कसा मागाल?

उत्तर: भाऊ, दो- वडा पाव ‘पार्सल’,

‘चटणी’ मत लगाना

२) पब्लिक ट्राॅस्पोर्ट मधील संवादाची उदाहरणे द्या.

उत्तर: अ) कंडक्टर : सुट्टा देना, सुट्टा देना. मेरे पास मोड नही है!

          ब) गर्दीच्या लोकल मधे- ए भैया, सरक बाजूला, बिच मे काय को खडा है बे !

३) मित्र/ मैत्रीणींमधील संवाद

उत्तर : out of सिलॅबस, हे शिक्षण १ ते ४ थी अभ्यासक्रमात सध्या तरी नाही

आणि म्हणून

या भाषेची लागवड पहिली पासूनच करावी ही परत एकदा सभागृहाला विनंती

…. (बंबईका सब से बडा स्ट्रगलर) अमोल 

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आम्हां काय त्याचें” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “आम्हां काय त्याचें” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ 

पुण्यात पहलगाम हल्ल्याची बातमी समजली, तेव्हा मी एका मिटींगमध्ये होतो. आजूबाजूला बरीच माणसं होती. काम संपवून मी बाहेर पडलो आणि तशाच अस्वस्थ मनस्थितीत घरी आलो. येताना डोळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मस्त निवांत आणि आनंदाने मजा करणारे “भारतीय नागरिक” दिसत होते. कुठं कुणी गटागटाने सिगारेट्सचे झुरके घेत उभे होते, कुठे कुणी खाऊगल्लीत मस्त आस्वाद घेत होते, कुठे एखाद्या हॉटेल बाहेर लोक वेटींग मध्ये होते, मॉल खचाखच भरुन वाहत होते. काश्मीरमध्ये काहीतरी विपरीत घडवून आणलं गेलं आहे आणि हिंदू व्यक्तींना वेगळं काढून मारण्यात आलं आहे,हे लोकांच्या खिजगणतीतही नव्हतं.

‘जन्माला आलो हेच कर्तृत्व’ अशा अनेकांच्या वाढदिवसाची तयारी केकशॉप्स च्या बाहेर सुरु होती. आजही बारा वाजता सात-आठ ठिकाणी वाढदिवसाचे फटाके वाजलेच..!

आमच्या बाजूच्या वस्तीत कुठल्याशा कार्यक्रमाचा डॉल्बी चालू होता. काश्मिरबद्दल दुःख व्यक्त करायला सवड कुणाला आहे इथं ?

“भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.” हे शब्द शालेय वर्षं संपली की लोक विसरुन जातात. नंतर “भारत कधी कधी माझा देश आहे” अशी त्यांची धारणा होते. आणि आणखी काही वर्षांनी “भारत माझ्या फायद्यापुरताच माझा देश आहे” अशी मनस्थिती होते. हेच सत्य आहे.

आपल्याकडे सिनेमा थिएटर्स मधून प्रत्येक शो च्या आधी राष्ट्रगीत होतं. पण किती खाजगी कोचिंग क्लासेस मधून प्रत्येक बॅच च्या सुरुवातीला दररोज राष्ट्रगीत होतं? किती भाजी मंडयांमधून रोज राष्ट्रगीत होतं? किती स्पर्धापरीक्षा सेंटर्स मधून दररोज प्रत्येक बॅच च्या सुरुवातीला राष्ट्रगीत होतं? किती मॉल्स मधून दररोज राष्ट्रगीत होतं? हे शोधलं आहे का कुणी? शालेय वयात रोज म्हटलं जाणारं राष्ट्रगीत नेमकं कळत्या वयात आल्यानंतर ऐच्छिक कसं होतं? याच्या उत्तरावर कुणी शोधपत्रकारिता केली आहे का?

हिंदू सणांना अवाढव्य डॉल्बी लावणारे, फ्लेक्स लावणारे आता निषेधाचे फ्लेक्स लावणार का? निषेध आंदोलन करणार का? श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करणार का? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? पहलगाम मध्ये अगदी वेचून काढून २८ हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, याच्या निषेधार्थ या डॉल्बीजीवी लोकांनी काय केलं? क्रिकेट मॅच जिंकल्यावर रस्त्यांवर एकत्र येऊन जल्लोष करणारे भारतीय नागरिक अशा दुःखद प्रसंगी एकत्र का येत नाहीत ? गाड्यांच्या नंबरप्लेट्स वर ‘हिंदू ‘ असं केशरी अक्षरांत लिहून घेणारे आता पहलगाम मधल्या हिंदूंच्या संहाराबाबत काय भूमिका घेणार?

“काश्मीर मध्ये आत्ता काय घडलं, ते तुम्हाला माहिती आहे का?” यावर कुणी पत्रकार किंवा व्हिडिओ जर्नलिस्ट पुण्यातल्या मॉल्स मध्ये मुलाखती घेत फिरला का? त्यानं मजा मारणाऱ्या तरुणांना विचारलं का? एका तरी आंदोलक संघटनेला “आता तुम्ही याचा निषेध का केला नाही?”असं विचारलं का? आयपीएल च्या टीम्स काळ्या पट्ट्या लावून खेळणार का? कालपासून एक तरी माध्यम प्रतिनिधी स्वतःच्या दंडाला काळी फित लावून वृत्तांकन करताना दिसला का?

एकाही दुकानाबाहेरची विद्युत रोषणाई काल बंद करण्यात आली नाही. कुठल्याही घराची मंगल कार्यासाठी केलेली रोषणाई काल बंद करण्यात आली नाही. उलट मोठमोठ्याने डॉल्बी लावून लोक नाचत होते. एखाद्या महापुरुषाच्या बाबतीत काही घडलं की, देशभर दंगली उसळतात. त्याप्रसंगी जे हातात दगड घेतात, बसेस फोडतात, वाहने पेटवून देतात, ते आज हिंदूंच्या अशा प्रकारे कत्तली झाल्यावर व्यक्त का होत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. सामान्य माणसांच्या भावना जितक्या त्यांच्या आराध्य महापुरुषांशी जोडलेल्या असतात, तशाच त्या राष्ट्रभावना आणि देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हिताशी जोडलेल्या असतात का? ह्याचं उत्तर आजतागायत कुणी शोधून काढलंय का?

कुणी कुठं एखादं वाक्य आक्षेपार्ह बोललं की, त्यावर त्याच्या फोटोला जोडे करण्यापासून ते त्याच्या फोटोवर लघुशंका करेपर्यंत आंदोलक निरनिराळी कृत्ये करतात. इथं तर भारताच्या २८ हिंदू नागरिकांनी केवळ हिंदू असल्यामुळे जीव गमावला आहे, आता कुणाचा आणि कसा कसा निषेध करणार?

काल एकाही मराठी कार्यक्रमाच्या आधी श्रद्धांजली आणि निषेधाची स्लाईड दाखवण्यात आली नाही. पुण्यातल्या चौकाचौकात डिजिटल जाहिरातींचे बोर्ड लावले आहेत, त्यावर निषेधाच्या स्लाईड दाखवण्यात आल्या नाहीत. भर गर्दीच्या चौकात हातात कुठलेशे पाचकळ बोर्ड हातात घेऊन रिल्स बनवणाऱ्यांनी काल निषेधाचा बोर्ड हातात घेऊन रिल्स केली नाहीत. एकाही स्टँड अप कॉमेडियनने “मी ह्या कृत्याचा निषेध करतो” असा बाईट केला नाही.

आपण भारतीय नागरिक अशा घटना मनाला लावून घेतच नाही. कारण त्यात आपलं स्वतःचं व्यक्तिगत असं काहीच नुकसान झालेलं नसतं. “ज्यांचं नुकसान झालं आहे, ते बघून घेतील, मला काय त्याचं?” ही अंगात मुरलेली वृत्ती आपण कधी आणि कशी उपटून काढणार? हा प्रश्न आहे.

अशा घटना घडल्यानंतर समाज म्हणून आपण काय करतो, हे आता तरी देशाचा घटक म्हणून स्वतःच्या आतल्या आवाजाला आपण विचारणार आहोत का?

किती शाळांमधून आज सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मैदानात एकत्र उभे राहून या मृत हिंदूंना श्रद्धांजली अर्पण केली? किती परिवारांमधून पालकांनी आपल्या मुलांशी या घटनेबाबत बसून सविस्तर चर्चा केली? किती कोचिंग क्लासेस नी श्रद्धांजली आणि निषेधासाठी एक मिनिट वेळ दिला? किती स्पर्धा परीक्षा सेंटर्स आणि अभ्यासिकांमधून सनदी अधिकारी होण्यासाठी अभ्यास करणाऱ्या मुलामुलींनी काल आणि आज या घटनेवर निषेधात्मक भूमिका व्यक्त केली? आहे का ह्याचं उत्तर कुणाकडे? हे सगळे म्हणतील – “ते आमचं कामच नाही आणि असा काही निषेध करायला आम्ही बांधील नाही. आम्ही कशावर व्यक्त व्हायचं अन् कशावर नाही, हे तुम्ही आम्हाला शिकवू नका.”

मला कालपासून प्रश्न पडला आहे की, आता विद्यापीठातल्या ललित कला केंद्राच्या वार्षिक परीक्षा सुरु होतील, त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा होईलच. काही काळापूर्वी रामायणावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाखवणारे विद्यार्थी पहलगाम च्या घटनेवर आधारित नाटक करणार का? पुरुषोत्तम करंडक किंवा फिरोदिया मध्ये पहलगाम घटनेवर आधारित एक तरी स्क्रिप्ट दिसणार का? मराठी नाट्यसृष्टी किंवा चित्रपट सृष्टी मध्ये या घटनेवर एकतरी वास्तव आली सत्य कथानक पडद्यावर येणार का? आहे का ह्याचं उत्तर?

मातृभूमीला माता मानणाऱ्या परिवारांमधून “आम्हा काय त्याचे” ही वृत्ती आधी खोडून काढली पाहिजे. घराघरांतून मुलांना “आपण असल्या भानगडीत पडायचं नसतं. तू तुझा अभ्यास कर” असले डोस देणं आधी बंद केलं पाहिजे. हा आपल्या देशाचा प्रश्न आहे आणि तो अत्यंत गंभीर आहे, हे आपल्या देशातल्या प्रत्येक कुटुंबानं मान्य केलं पाहिजे. कुटुंबातून राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याचे संस्कार जोवर प्राधान्यक्रमाने होणार नाहीत, तोवर “मला काय त्याचे ” ही भारतीयांची वृत्तीच शत्रूचं बळ वाढवणारी ठरणार आहे. संपूर्ण देश केवळ सोशल मीडियावर नाही तर प्रत्यक्ष सक्रिय रुपात एकत्र उभा राहिला तरच जगाला योग्य संदेश जाणार आहे.

नागरिक म्हणून आमचं चारित्र्य जितकं प्रखर राष्ट्राभिमानी असायला हवं तितकं आहे का? सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्याव्यतिरिक्त आमची स्वतःची भारतीय नागरिक म्हणून काही भूमिका आहे का? आणि निरपराध व्यक्तींना केवळ धर्मांधतेमुळे मुद्दाम मारण्यात आलं, ह्याचं सुतक देशातला प्रत्येक हिंदू पाळणार का? ह्या प्रश्नांची खरी आणि प्रामाणिक उत्तरं मिळू शकणार नाहीत. कारण, “मला काय त्याचे” ही वृत्ती आमच्या रोमारोमांत भिनली आहे.

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(ती मला स्वतःच्या तराजूत तोलते… स्वतः ज्या पायरीवर उभी आहे त्याच पायरीवर ती मला पाहते…

ती मला सुद्धा भिक्षेकरी समजते… स्वतःला जी दुःख आहेत तीच दुसऱ्याला असतील हे ती समजते… 

दुसऱ्याशी  ती एकरूप होऊन जाते… अद्वैत म्हणजे आणखी काय असतं ???) इथून पुढे — 

 

स्वतःला ठेच लागली की, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, हि असते ती वेदना…. 

दुसऱ्याला ठेच लागल्यावर मात्र आपल्या डोळ्यातून पाणी येतं, तेव्हा होते ती संवेदना… ! 

आपण स्वतःच्या वेदना कुरवाळतो… 

ती दुसऱ्याच्या संवेदना जपते…

गरीब कोण …. श्रीमंत कोण.. ? 

इथे माझे डोळे दगा देतात…

भर उन्हाळ्यात डोळ्यातून मग पाऊस कोसळतो… ? 

तिच्याच पदराला मग मी डोळे पुसायला खाली वाकतो… 

‘का रडतो रं…?’ ती माऊली विचारते

‘कुठे काय ?  मी कुठे रडतोय ?  घाम पुसत होतो…’ हुंदका आवरून मी तिला स्पष्टीकरण देतो. 

‘डोळ्याला कुठे घाम येतो बाळा…?’ कातरलेल्या आवाजात ती बोलते… 

तीच्या पदराला डोळे पुसायला वाकलेला मी…. 

आता माझ्या पाठीवर अश्रूंच्या धारा बरसतात… 

‘मावशी आता तु का रडते ?’ मी मान वर करून विचारतो

‘तुज्यागत माज्या बी डोळ्यांना घाम आला बाळा ….’ ती पदराने डोळे पुसत हसत बोलते. 

फसवा फसवीच्या या खेळात आम्ही रोज फसतो…. रोज रोज फसतो… आणि आपण फसलोच नाही असं दाखवत पुन्हा हसतो पुन्हा पुन्हा हसतो ! 

तर, इतक्या महागाचा हार आणला, पेढे आणले… 

अच्छा, मघाची गहन चर्चा वर्गणीसाठी चालू होती, या वर्गणी मधून हार पेढे आणि इतर साहित्य आणले गेले …

मी माझ्या लोकांना म्हणालो, ‘हा खर्च करायची काय गरज होती ? ऋण काढून सण करणे मला पसंत नाही… ‘ मी माझी नाराजी मोठ्या आवाजात बोलून दाखवली. 

ए आव्वाज खाली… 

शांत बसायचं गप गुमान…  

सांगटले तेवडंच करायचं… 

आज लय शान पना करायचा नाय… 

माझ्या वेगवेगळ्या माणसांकडून, वेगवेगळ्या धमकी वजा प्रेमळ सूचना येत राहिल्या… 

भिजलेल्या मांजरागत, भेदरून मी सर्व ऐकत राहिलो… ते सांगतील ते करत राहिलो.

यानंतर माझ्या लोकांनी रस्त्यावर माझं औक्षण केलं… 

एकाच वेळी उसाचा रस, लस्सी, पाणी, ताक, नीरा , लिंबू सरबत, गुलाबजाम (पाकातले आणि कोरडे), पेढे (खव्याचे/  कंदी /साखरेचे /कमी साखरेचे) केक, वडापाव, समोसा, प्रसादाची खिचडी, शिरा (पायनॅपल/ साधा शिरा /कमी साखरेचा शिरा) या सर्व बाबी पोटात घेऊन मी दिवसभर गर्भार बाईसारखा कमरेवर हात ठेवून मिरवत आहे. 

माझ्यासाठी जे पार्ले बिस्कीट, गुड डे बिस्कीट, शिरा, केळी गिफ्ट म्हणून मिळाली होती, ती सर्व एका बॅगेमध्ये माहेरी आलेल्या मुलीला, सासरी जाताना आई पिशवीत घालून देईल तशा पद्धतीने भरून दिलं. 

आज खूप लोकांनी विचारलं डॉक्टर आज काय विशेष ? 

हो… आज एक हात आणि पाय निसर्गात विलीन झालेली नवरा बायकोची मूर्ती भेटली. 

त्यांची नऊ वर्षांची मुलगी धडधाकट आहे, सुदृढ आहे, गोड बाळ आहे, शिकायची इच्छा आहे. 

मी या दिव्यांग मूर्तीला विचारलं मी काय करू शकतो ? 

ते म्हणाले आमचे आयुष्य संपले आहे, मुलीला शिकवा… 

आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी या दिव्यांग मूर्तींना वचन दिले आहे, ‘आज पासून ही पोरगी माझी, जोपर्यंत तिची इच्छा आहे तोपर्यंत मी तिला शिकवेन. मी जर जिवंत असेन, तर बाप म्हणून कन्यादान करून, तिचे लग्न सुद्धा लावून देईन.’

या वेळी आई बापाच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले…. 

माझ्यासारख्या पन्नास वर्षाच्या माणसाच्या पदरात, निसर्गाने वाढदिवसाच्या निमित्ताने एक पोरगी घातली…. 

यार, वाढदिवस वाढदिवस…. सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे अजून दुसरं काय असतं ? 

आपल्या वाढदिवशी आपलं अपत्य जन्माला यावं…. 

आपला आणि तिचा बड्डे सेम टु सेम दिवशी असावा, याहून भाग्य ते काय… ?? 

एका मुलीचा बाप होऊन आज माझा वाढदिवस साजरा झाला !!! 

साला आज मैं तो बाप बन गया…. ! 

मी आता निघालो. 

पारले, गुड डे, खिचडी, शिरा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची माझी बॅग तयार होती. 

बॅगेचे वजन असेल अर्धा ते एक किलो… ! 

एक आजी मध्येच आली आणि म्हणाली, हे पैसे ठेव आणि जीवाला वाटेल ते घेऊन खा…

ती वीस रुपयांची नोट होती… ! 

नाईलाजाने उचलला जातो तो बोजा…  .

दुसरे डोक्यावर टाकतात तो भार…  

आपणहून आपल्या माणसांचं उचलतो ते वजन… ! 

रोज शंभर ते सव्वाशे किलो वजनाचं साहित्य घेऊन या कडक उन्हाळ्यात मी रस्त्यावर फिरतोय… 

मला दिलेल्या गिफ्ट ने ही भरलेली बॅग मात्र उचलताना, आज ती मला अनेक पटींनी वजनदार जाणवली… !  

या बॅगेचे वजन तरी कसं करावं ? 

फुलांचं वजन होतं माऊली, सुगंधाचं वजन कसं करायचं ??? 

गिफ्टच्या बॅगेचं वजन होईल सुद्धा, पण प्रेमाच्या या भावनांचं वजन करण्यासाठी मी कुठला वजन काटा आणू  ? 

आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करताना दरमहा पाच लाख रुपये पगार घेत होतो, बँकेतून पैसे काढून, पाच लाख रुपये एका खिशात सहज मावायचे…. 

“जीवाला वाटेल ते घेऊन खा”… म्हणणारी वीस रुपयांची नोट मात्र आता खिशात बसेल, एवढा मोठा खिसाच आता माझ्याकडे नाही, माऊली… !!!

काय करावं ? कसं करावं ? माझ्याकडे उत्तर नाही… ! 

आज ती किलोभर बॅग आणि ती वीस रुपयांची नोट खूप खूप वजनदार भासली… !

रिटर्न गिफ्ट द्यायची हल्ली प्रथा सुरू झाली आहे… 

मला जे माझ्या माणसांकडून गिफ्ट मिळाले त्या बदल्यात मी त्यांना रिटर्न गिफ्ट काय देऊ ? 

काय देऊ…  काय देऊ…. 

अं… काय देऊ… ??? 

Ok… 

ठरलं….

17 एप्रिल 2025 नंतर माझं जे काही आयुष्य उर्वरित आहे, ते माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना माणसात आणण्यासाठी, जे काही मला करावे लागेल, ते करण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य त्यांना समर्पित…!!! 

यापेक्षा वेगळं माझ्याकडे रिटर्न गिफ्ट नाही…!!! 

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares