मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कळी म्हणाली…. ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार 

? कवितेचा उत्सव ?

☆ कळी म्हणाली….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

कळी म्हणाली दुज्या कळीला उद्या आपण उमलू

शेवटची ही भेट आपुली….दुनिया आपण बदलू…

                          

फुले होतील पहा आपुली होईल सुंदर माला

सुंदरशा त्या वधू वराच्या स्पर्श करू या गाला..

कदाचित ग जाऊ आपण जगजेठीच्या पायी

ललना ती सुंदर कुणी ग केसातच माळेल बाई

 

कृष्ण सख्याच्या गळ्यात शोभू होऊन सुंदर हार

माळतील ग गोपी सुद्धा सजे केशसंभार..

पराधीन ग जीवन आहे नाही आपुल्या हाती

तरीही वेली वरती फुले बघ गाणे मधुर ते गाती…

 

आनंदाचे व्रत आपुले.. जीवन त्यांच्या साठी

निर्माल्यच होऊन तयाचे भले होऊ दे माती

देवाचरणी गळ्यात अथवा पडो कुठेही देह

सेवा करणे ब्रीद आपुले तेच आहे ना प्रिय…

 

दारावर शोभती तोरणे.. वधुवरांच्या हाती

फुले मोगरा पहा माळूनी करवल्याही बघ गाती

फुले पाहता मुखकमले ही बघ ना कशी उमलती

सुगंध आणि मोद वाटणे आहे आपल्या हाती…

 

किती ते सुंदर कार्य आपुले सुखदु:ख्खाला असतो

लग्न असो वा असो ती ताटी तेथे ही आपण हसतो..

क्षणभंगुर हे आहे जीवन तरी मनी ना खंत

सुगंधीत हो माती,पडता.. मिळून होते खत…

 

आनंदाचा वसा असा हा नित्य पहा लाभावा

सेवा करता करता देह हा सार्थकीच लागावा

सेवा करण्या परते दुसरे महान नाही कार्य

झोकून देणे देह दुज्यास्तव….

                          साऱ्यांना वाटो… प्रिय…

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ आधार ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ आधार ☆ श्री सुहास सोहोनी ☆

वादळ आलं, वादळ गेलं …

होणारं ते होऊन गेलं …!

 

उसना पाऊस, संपून गेला …

उसना वारा, निघून गेला …

लाडका उकाडा, सुरू झाला …

घामाचा मार्ग, मोकळा झाला … ll

 

पक्ष्यांचं जग उध्वस्त झालं …

किलबिल टाहो फोडत राही …

अंडी फुटली, पिल्लं मेली …

जगायला कारण उरलंच नाही … ll

 

झाड पडलं, छप्पर फाटलं …

पोर उपाशी डोळ्यांत बघते …

खायला प्यायला देणार काय …

भूक कैदाशिण रोज रोज लागते … ll

 

‘घाबरु नको’ बोललं कोण …

पाठीशी उभं ठाकलं कोण ..

खांद्यावर खंबीर हात टेकला …

माणसाला माणसाचा आधार भेटला … ll

 

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 95 ☆ गज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 95 ☆

☆ गज़ल ☆

मी जरी नव्हतेच काही ऐनवेळी बोलले

एक दुखरे शल्य होते जे जिव्हारी लागले

 

मौन तेव्हा पाळले मी बोलले नाही कुणा

अर्थ त्याचे वेगळे अन फार जहरी काढले

 

काय झाले ते कळेना मीच ठरले वेंधळी

ना गुन्हा घडला परंतू कलम तेही लावले

 

आर्तता दाटून आली  या मनावर नेहमी

हुंदक्यांना दाबताना आसवांना रोखले

 

भाबड्या आहेत माझ्या कल्पना जगण्यातल्या

आडवाटा टाळल्याने राजरस्ते गाठले

 

© प्रभा सोनवणे

११ मे २०२१

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 95 ☆ भाग्यरेषा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 95 ☆

☆ भाग्यरेषा ☆

हिरवगर्द पान

त्यावर पडलेला सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाशातून दिसणाऱ्या

त्याच्या भाग्यरेषा पाहून

मीही माझ्या हातावरील भाग्यरेषा

निरखून पाहिल्या

दोन्हीत बरंचसं साम्य असलं तरी

माझ्या भाग्यरेषांमध्ये

एक स्वार्थी रेषा

ठळकपणे दिसत होती

पण ती रेषा त्या पानावर

कुठेच दिसत नव्हती

मुलाला वाढवताना

त्याच्याकडून माझ्याही काही अपेक्षा होत्या

झाडाचं मात्र तसं नव्हतं

ते देत राहलं फळं, सावली आणि

प्राणवायू देखील निस्वार्थपणे

म्हणूनच गळून पडलेल्या पानांना

पुस्तकात जपून ठेवावंस वाटतं

ती वर्षानुवर्षे राहतात पुस्तकात

सुकतात, जाळीदार होतात

पण दुर्गंध सोडत नाहीत

माणूस मात्र चोवीसतासातच….?

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ग़ज़ल – काय बोलू… ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ ग़ज़ल – काय बोलू… ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील ☆ 

सांग दुःखा मी तुझ्यावर काय बोलू

राख झालेल्या मनावर काय बोलू

 

पुसट झाल्या भाग्यरेषा सर्व माझ्या

भंगलेल्या प्राक्तनावर काय बोलू

 

आठवांनी चिंब केले काळजाला

सांजवेळी कातरावर काय बोलू

 

लपवले मौनामधे मी शब्द माझे

समजले नाही कुणावर काय बोलू

 

शोध माझाही मला ना लागलेला

तू कुठे आहेस यावर काय बोलू

 

मी उन्हाच्या काहिलीने त्रस्त झाले

गोठलेल्या पावसावर काय बोलू

 

काय येथे आपले आहे मनीषा

व्यर्थ उसण्या जीवनावर काय बोलू

 

© सुश्री मनीषा रायजादे-पाटील

मिरज .जि-सांगली

९५०३३३४२७९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू अन् मी ☆ श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ तू अन् मी ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

तू व्यक्त रंगात

रेखीव तुझी रांगोळी.

मी शब्द शब्द अव्यक्त

हरवून मला धुंडाळी.

तू स्थिर नदीचा काठ

मी अस्थिर खवळली लाट

तू अथांग वाहती सरिता

मी फसलेली एक कविता .

तू स्वप्न नभाचे थोर

स्वच्छंदी स्वैर पाखरु

बुजुर्ग सहनशील उरलो

मी पानगळीचा तरु.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[9]

डोळे मिचकावत

काजवा

अगदी शिष्ट  आवाजात

तार्‍यांना म्हणाला

विद्वानांच्या मते

उध्वस्त  होणार आहात

तुम्ही सारेच्या सारे

आज ना उद्या’

तारे?

काहीच बोलले नाहीत.

 

[10]

तुझ्या प्रार्थांनागीतांमध्ये

पुन:पुन्हा व्यत्यय आणत

शंख करणार्‍या

या माझ्या मूर्ख इच्छा

आसक्त…. अनावर

मला फक्त ऐकू दे

हे प्रभो…

 

[11]

पाखराला व्हायचं होतं

ढग

आणि ढगाला

पाखरू

 

[12]

पार सुकून गेलं

हे नदीचं पात्र…

भूतकाळासाठी आभाराचे शब्द

सापडत नाहीत त्याला

 

≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वि. दा. च्या स्मरणी……! ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ वि. दा. च्या स्मरणी……! ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

चिरुन भिंती    भेदून कारा

वचन सागरा     धन्य मायभू.

 

अजून गर्जना   वायूत लहरे

दिशात बहरे    स्वातंत्र्यानांदे.

 

पूर्वेचा अलोक   प्रभाती सांगतो

नितचा रंगतो   पराक्रमी त्या.

 

इतिहास थोर    कर्तव्या शौर्य

हिंदवीत धैर्य     मृदाभक्तीत.

 

प्रसन्न रत्नाकर  थरथरे जळ

विनायका बळ   हिंद तीराशी.

 

शब्दांतून ऊमटे  हृदयाची भाषा

घुमवीत दिशा    सावरकर.

 

प्रार्थना सचित्ती  भूमीत अखंड

पुरुषार्थी बंड    भारतदेशा.

 

गौरवा अनंत   क्षितीजा प्रणाम

लोचनात धाम    अथांगप्राण.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी कविता ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ माझी कविता ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

माझी कविता

पोपडतो कोंभ पर्णद्वयातून

आणि उमलते फूल कळीतून

तशीच फुलते शब्द कळ्यातून

कविता  माझी !

घुसमट होता शब्द छळांची

सैरभैर अस्वस्थ तळमळ

मुक्त होते प्रसववेदनेतून

कविता माझी !

विचार दगडावर शब्दांचे घण

घडते मूर्ती नामी त्यातून

शिल्पच साकारते सुंदर

कविता माझी !

आकाशी खेळते चंचल चपला

भेदून जाते घन ओथंबला

उतरते अलगद भूवर

कविता माझी !

स्वप्नामधली नुमजे पडझड

आठवत ती मनीची धडधड

शब्दा शब्दामध्ये मीच शोधते

कविता माझी !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्यवीर सावरकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वातंत्र्यवीर सावरकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

बॅरिस्टर होताच घेतले मातृभूचे वकीलपत्र

प्राणाहूनही प्रिय होते जन्मभूमीचे स्वातंत्र्य ||

 

मनी नित्य खूपत होती पारतंत्र्याची बेडी

क्रांतीस्तव सागरात बेधडक घेतली उडी ||

 

अंधारकोठडी एकांतात काव्यप्रतिभा फुलली

जनमानस जागृतीस्तव लेखणी दिव्य चालली ||

 

कोलू पिसला, कष्ट झेलले देश मुक्त झाला

समतेसाठी विज्ञानाचा पुरोगामी लढा दिला ||

 

तरुणपणातच केली मातृभूमीवर पतंगप्रीती

स्वातंत्र्यवीर सावरकरांची अनुपम देशभक्ती ||

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.?? २८मे २०२१

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares