मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मीच… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मीच… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(पादाकुलक)

मी येशूही मीच क्रूसही

स्वये निवडला पथ अंताचा

देह छिन्न हा पाठीवरती

मीच वाहतो सतत स्वतःचा !

 

     मीच माझिया गरुडाचे रे

     पंख छाटले निर्दयतेने

     खणिले थडगे माझ्यासाठी

     त्यास पारखी करिता गगने !

 

स्वर्णयुगाचा झालो कैदी

कोठडीत अन् चिणला गेलो

वर्षांमागुन सरली वर्षे

आणि अखेरी जिवाश्म झालो !

 

     गृहीतकांची चकवाचकवी

     कधी जाहले उलटे अंबर

     द्रवला नाही घन आषाढी

     पण पाषाणा फुटला पाझर !

 

उंबऱ्यात ये रथ किरणांचा

स्वागतास नच द्वार उघडले

अंगणात मग रथचक्रांचे

ठसेच अंधुक केवळ उरले !

 

     अवेळ आली भरती कैसी

     परतिच्या या वाटेवरती

     मीच बुडविल्या माझ्या नौका

     पुन्हा तरंगत लाटांवरती !

 

कधि न पाहिले वळून मागे

त्या बेटाची हाक ये कानी

दुभंग आता नाविक नौका

झुंज परतिची केविलवाणी !

 

     मीच चढविले मला क्रुसावर

     व्यर्थ ज्युडासा तुझी फितुरी

     हौतात्म्याचे तरी दाटले

     धुके माझिया थडग्यावरती !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #114 – बाप…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 114 – बाप…! ☆

बाप देवळातला देव पुजा त्याचीही करावी

आई समान काळजात मुर्ती त्याचीही असावी..

 

बापाच्याही काळजाला असे मायेची किनार

त्याच्या शिवीतही असे ऊब ओवीची अपार..

 

पोरांसाठी सारे घाव बाप हसत झेलतो

स्वतः राहून उपाशी घास लेकराला देतो..

 

बापाच्या कष्टाला नाही सोन्या चांदीचे ही मोल

त्याच्या राकट हातात आहे भविष्याची ओल..

 

लेकराला बाप जेव्हा त्याच्या कुशीमध्ये घेतो

सुख आभाळा एवढे एका क्षणांमध्ये देतो..

 

बापाला ही कधी कधी त्याचा बाप आठवतो

नकळत डोळ्यांमध्ये त्यांच्या पाऊस दाटतो..

 

कधी रागाने बोलतो कधी दुरून पाहतो

एकांताच्या वादळात बाप घर सावरतो..!

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ना निगराणी,नाही पाणी – ☆ श्री सुहास सोहोनी / सुश्री नीलांबरी शिर्के ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – ना निगराणी,नाही पाणी –  ? ☆ श्री सुहास सोहोनी / सुश्री नीलांबरी शिर्के 

ना निगराणी नाही पाणी …

ना माळ्याची जाग …

खडकांमधुनी बहरुन आली …

ही देवाची बाग … !

©  श्री सुहास सोहोनी 

सुश्री नीलांबरी शिर्के

विशाल शिळा जवळी जवळी

नाजुक हळवी मधेच वाट

दूर पणा हा जवळ करावा

विचार करी  शंभरशे साठ

हळूवारपणाने वाटेने मग

फुलबीज रूजविले स्वतःत

हळवी नाजूक सुमने फुलली

दोन शिळांच्या मध्यात

नाजुक गंधित फुलस्पर्शाने

आपसूक सांधली दोन मने

जरा न हलता जवळीक साधली

हिरव्या नाजूक सृजनाने

© सुश्री नीलांबरी शिर्के

चित्र  – अनामिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुझी याद यावी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ तुझी याद यावी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

अशा शून्य रात्री, तुझी याद यावी

सुखाची फुले, गात्र, गात्री फुलावी ||°||

 

गुलाबी तरी, बोचरे थंड वारे

कळ्यांना कळे, लाजरे ते इशारे

जरा पापणी, मंदशी थरथरावी ||१||

 

मनाची जरी बंद, उघडून दारे

पुसावे मला, “ईश्य ! जागाच का रे ?”

शहाऱ्यांत ओली, स्मृती चाळवावी ||२||

 

बदलता कुशी, स्पर्श केसांस व्हावा

कुणी फुंकरीने, दिवा मालवावा

तुझी सोनकाया, मिठीबंद व्हावी ||३||

 

तुझे श्वास, निःश्वास, गंधीत व्हावे

आणि लाजणे, चुंबनी विरघळावे

शहाळी सुधेची, अशी रिक्त व्हावी ||४||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 137 ☆ जुन्या डायरीतून – जखम… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 137 ?

☆ जुन्या डायरीतून – जखम… ☆

ठेच लागलेल्या बोटाची जखम

चिघळून ठसठसावी

 तशाच ठसठसतात ना आठवणी?

खरं तर कारणच नव्हतं–

ठेच लागण्याचं,

पण एखादा निसरडा क्षण

ठेऊनच जातो कायमचा व्रण!

 

वेळीच

भळभळणा-या जखमेवर

भरली असतीस

चिमूटभर हळद,

तर जखम झालीही नसती

इतकी गडद!

 

धूळभरल्या वाटेवर

दुख-या बोटानं

अनवाणी चालत राहिलीस

बेफिकीर!

 

धूळच माखून घेतलीस

मलम म्हणून !

आता ती ठेचच बनली आहे ना,

एक चिरंजीव वेदना,

आश्वत्थाम्याच्या जखमेसारखी!

 

अशा जखमा भरतही नाहीत औषध पाण्याने अथवा

ब-याही होत नाहीत

रामबाण उपायाने—

आणि करता ही येत नाही,

त्या ठसठसत्या आठवणींवर शस्त्रक्रिया!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनपाखरा…..! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मनपाखरा…..! ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

मनपाखरा रे मनपाखरा

झेप गगनी यशाचे घे जरा.

                                 

संकटांत पंखा ठेव खंबीर

दुःख जाणीवा सुखाचे या घरा

मनपाखरा रे मनपाखरा.

 

ऊंच-ऊंच ध्येया पार करिशी

हिम्मत ना सोडी तुझ्या भरारा.

मनपाखरा रे मनपाखरा.

 

मनानेच जिंकीले हे भूलोक

स्वप्न वारुळ मुंगीचे निर्धारा

मनपाखरा रे मनपाखरा.

 

मागे न फिरशी विहार पूर्ण

अलौकिक जीवनी सार्थ फेरा.

मनपाखरा रे मनपाखरा.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #143 ☆ शुद्र माशा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 143 ?

☆ शुद्र माशा  

भांडताना राग झाला जर अनावर

टाकतो देऊन त्याला मी सुळावर

 

गोडधोडाला जरा झाकून ठेवू

शुद्र माशा नजर त्यांची तर गुळावर

 

ज्ञान गीतेचे दिले भाषेत सोप्या

केवढे उपकार ज्ञानाचे जगावर

 

एवढा ताणून धरला प्रश्न साधा

येत नाही अजुन गाडी ही रुळावर

 

काळजाचे कैक तुकडे तूच केले

तेच तुकडे प्रेम करती बघ तुझ्यावर

 

तिमिर आहे फक्त आता सोबतीला

चंद्र गेला डाग ठेउन काळजावर

 

कर्म संधी चल म्हणाली सोबतीने

ज्योतिष्याच्या राहिलो मी भरवशावर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पितृ दिना निमीत्त – तीर्थ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पितृ दिना निमीत्त – तीर्थ… ☆ सौ राधिका भांडारकर

गेली ती गंगा

राहिलं ते तीर्थ

पपांचं हे वाक्य

जीवनी किती सार्थ!..

 

नाही झालात वृक्ष

तर व्हा लव्हाळी

मुळे त्यांची घट्ट

राहती वार्‍या वादळी…

 

कशास दु:ख हरल्याचे

का होशी निराश

पहा पुढे नको मागे

घेई कवेत तू आकाश..

 

ओझे तुझे तूच वहा

वाट बिकट चाल नेटाने

वाटेतल्या बोचर्‍या कंकरांना

लाथाळूनी दे धीराने..

 

संस्कार शिदोरी बापाने

बांधून दिली प्रेमाने

जगण्याच्या वाटेवर

चालले म्हणून मी मानाने….

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जयहिंद आणि जय जवान… ☆ श्री भाऊसाहेब पाटणकर ☆

?  कवितेचा उत्सव ? 

☆ जयहिंद आणि जय जवान… ☆ श्री भाऊसाहेब पाटणकर ☆

(नामवंत गझलकार आणि शायर म्हणून लोकप्रिय असलेले श्री भाऊसाहेब पाटणकर यांनी शायरीच्याच ढंगात लिहिलेले एक देशभक्तिपर गीत —–)

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला

नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला—

 

वीरतेची भारती या ना कमी झाली कधी

आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी

 

तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद

बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद

 

बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो

देऊन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो

 

धर्माहुनी श्रेष्ठ आपल्या देशास जो या समजला

मानू आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला

 

जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला

अध्यात्मही या भारताच्या युद्धात आहे जन्मला

 

कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे

कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे

 

हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा

पाहिली नसतील जर का बुजगावणी यांना बघा

 

पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे

नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे

 

आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची

फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची

 

हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही

बोलू आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही —–

 

© श्री भाऊसाहेब पाटणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वट पौर्णिमा… ☆ डॉ. स्वाती पाटील ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ वट पौर्णिमा… ☆ डॉ. स्वाती पाटील

कशाला हवेत सात जन्म,

या जन्मात च उत्सव करू जगण्याचा

एकमेकांसाठी असण्याचा,……

रुजू आपण पारंबी पारंबी त

विस्तारु प्रेमात अन् मुळांच्या रुपात,

एकमेकांची स्वतंत्र आस्तित्व जाणीव

जपु एकमेकांच्या परिघात,

असू आपण सदैव एकमेकांचे

जिव्हाळ्याच्या हळव्या क्षणांसाठी

आणि ठेवूया भान सहजीवनाचे

जपून एकमेकांची मने,

कशाला हवेत सात जन्म,

या जन्मातच उत्सव करू जगण्याचा,

एकमेकांसाठी असण्याचा,

घे कधी  कवेत मला तुझ्या 

येते वेळ जेव्हा हरण्याची

मी ही देईन साथ आश्वासक

जागवू उर्मी पुन्हा जिंकण्याची,

येतील अवघड कोडयांच्या परीक्षा

हरवतील वाटा आणि  संपतील आशा

होवु  मूक दिलासा एकमेकांचा

मनाच्या संवेदनशील आर्त स्पंदनांचा,

कशाला हवेत सात जन्म,

या जन्मातच उत्सव करू जगण्याचा,

एकमेकांसाठी असण्याचा,

आताशा होतात दगडी मने

गोठते माया होई  काळीज मुके

आपल्यातला  निर्झर खळाळता

ठेवूया  शेवटापर्यंत वाहता,

येतील मोहाचे  बेधुंद क्षण

आणि कातरवेळा फसव्या

सावरू निसरडा तोल एकमेकांचा

आधारवड होवू आपण एकमेकांचा, h..

कशास हवेत सात जन्म

या जन्मातच उत्सव करू जगण्याचा,

एकमेकांसाठी असण्याचा

© डॉ.स्वाती पाटील

सांगली

मो.  9503628150

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares