मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 102 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 102 ? 

☆ अभंग… ☆

युनिक असावं, लोकल नसावं

उत्कृष्ट करावं, काहीतरी..!!

 

सर्वांत असुनी, अलिप्त भासावं

विजन साधावं, योग्यवेळी..!!

 

शब्दांत आपुल्या, सामर्थ्य दिसावं

अनेका कळावं, प्रभुत्व पै..!!

 

दक्षता घेयावी, परी आचरावी

दसी पकडावी, सु-कार्याची ..!!

 

कवी राज म्हणे, अंतर संपावे

चरण दिसावे, श्रीकृष्णाचे..!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 124 – स्वप्नमहाल ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 124 – स्वप्नमहाल ☆

स्वप्नमहाल बांधण्याचे

स्वप्न होते महान ।

वास्तवाच्या बेड्यांचे  

नव्हतंच मुळी भान।।धृ।।

 

निश्चयाचे बळ होते

आकांक्षांच्या पंखांना।  

जिद्दीची किनार होती

प्रयत्नांच्या साथीला ।

बुद्धीचेही मिळालेले

दैवी जन्मजात दान ।।१।।

 

गरिबीचा बेड्यां घालत

पायात नेहमीच खोडे।

पैसा वाचून घोडे सारे

जागच्या जागीच अडे।

हुशारीलाही शोभायचं

कपड्यांचेच कोंदण ।।२।।

 

मोडायचे होते चालू

जगाची हे चलन ।

लुटायचं होत आं ता

विजयाचे हे दालन ।

म्हणून स्वीकारलं हे    

समर्थपणे आव्हान ।।३।।

 

विजयाला जाग आली

बुद्धी प्रभा झळकली ।

लक्ष्मीवल्लभांनी सुद्धा

स्तुतीं सुमने उधळली।

नाठाळही करती आज

बुद्धीचे गुण गाण।।४।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #146 ☆ ओवीबद्ध रामायण – खंड सीता स्वयंवर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 146 – विजय साहित्य ?

☆ ओवीबद्ध रामायण – खंड सीता स्वयंवर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(काव्य प्रकार – साडेतीन चरणी ओवी)

रामचरणांची ख्याती, पसरली सर्व दूर

कौतुकाचा एक सूर, मिथिलेत….!

 

राजा मिथिलापतीचे, विश्वामित्रा निमंत्रण

धर्मकार्या आमंत्रण, जनकाचे…..!

 

अलौकिक विहंगम, परिसर रमणीय

सौंदर्य ते स्पृहणीय, मिथिलेचे….!

 

धर्मनिती परायण, यज्ञकार्यी योगदान

शिवधनुष्याचा मान, जनकास….!

 

पवित्र ते शिवधनू, पुजनीय जनकाला

दिगंतश्या प्रतापाला, तोड नाही…!

 

दाशरथी युवराज, विश्वामित्र मुनिजन

मिथिलेत राममन, विसावले….!

 

राजनंदिनी सीतेच्या, स्वयंवराचा सोहळा

जमलासे गोतावळा, नृपादिक….!

 

भव्य दिव्य राजवाडे, गुढ्या तोरणे पताका

दुजी अयोध्या शलाका, भासतसे….!

 

मिथिलेत सौख्य पूर, सुवर्णाची छत्रछाया

दरवळे गंधमाया, कस्तुरीची….!

 

स्वयंवराची तयारी, मिथिलेत उत्साहात

प्रवेशले नगरात, रघुनाथ…!

 

सीता जनकनंदिनी, स्वयंवर रचियले

शिवधनू ठेवियले, पणासाठी…!

 

सीता जगतजननी, स्वयंवराचा हा घाट

पहा किती थाट माट, मिथिलेत…!

 

आदिनाथ रामरूप, सीता दर्शनात दंग

आदिशक्ती भवबंध, एकरूप….!

 

भरलासे दरबार, शिवधनुष्य भेदन

झालें गर्वाचे छेदन, राजधामी….!

 

लक्ष गजबल खर्ची, शिवधनू आणविले

स्वयंवरे आरंभले, जनकाने….!

 

शिवधनुष्याचे धूड, पेलवोनी पेलवेना

जिंकण्यास उचलेना, दिव्य धनू…..!

 

उचलेना शिवधनू, असफल ठरे शौर्य

अपमाने जागे कौर्य, नृपनेत्री….!

 

एक एक नृप येई, लावी सारे आत्मबल

सारे नृप हतबल, पणापाई….!

 

अवघड ठरे पण, चिंतातूर राणीवसा

आसवांनी भरे पसा, आशंकेने…!

 

सुकुमार जानकीस, मिळणार कोण वर

उंचावला चिंतास्वर, मंडपात….!

 

कुठे गेले क्षात्रतेज, कुठे गेले नृप वीर

झुकले का नरवीर, धनूपुढे…..!

 

गुरूआज्ञा घेऊनीया, रघुनाथ पुढे आले

जन चिंताक्रांत झाले, सभागृही…!

 

विनम्र त्या, सेवाभावे, धनू लिलया पेलले

लाखो नेत्र विस्फारले, रामशौर्यी…..!

 

कडाडत्या वज्राघाती, रामे प्रत्यंचा लावली

टणत्कारे थरारली, वसुंधरा…!

 

बलशाली त्या धनुचे, दोन तुकडे करुन

पण घेतला जिंकून, रामचंद्रे….!

 

अचंबित प्रजाजन, हादरले नृपवर

राम जिंके स्वयंवर , अकस्मात…!

 

राजगृही शंखनाद, झाला आनंदी आनंद

लज्जा कमलाचे कंद, सीतानेत्री…!

 

अधोवदनी सीतेचे, मोहरले तनमन

आला सौभाग्याचा क्षण, स्वयंवरे…!

 

घेऊनीया हाती माला, सीता घाली वरमाला

राम जानकीचा झाला, भाग्यक्षण…!

 

याचं लग्न मंडपात, श्रृतकीर्ती भगिनीचे

उर्मिला नी मांडवीचे, लग्न झाले.

स्वयंवर जानकीचे, रामचंद्र जिंके पण

अलौकिक दिव्य क्षण, अंतर्यामी….!

(एक अलौकिक साहित्य निर्मिती आज खुली करीत आहे. ओवीबद्ध रामायण या खंडकाव्य लवकरच प्रकाशित होईल. आपले अभिप्राय अपेक्षित आहे. काही चुक असेल तरी मोकळेपणाने सांगा. संपूर्ण रामायण दीड हजार ओव्यांचे आहे. त्यांतील सीता स्वयंवर प्रसंग प्रस्तुत आहे.)

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #131 – मैत्रीचं नातं…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 131 – मैत्रीचं नातं…! ☆ श्री सुजित कदम ☆

मित्रांनो वेळ काढून भेटा एकदा

खूप खूप बोलायचंय‌…

हरवलेलं बालपण एकदा

पुन्हा जगून बघायचंय…!

 

क्रिकेट विट्टी दांडूचा

खेळ पुन्हा मांडूया

टेन्शन बिन्शन नको काही

एकदा मनसोक्त जगूया..!

 

नावं सोडून टोपण नावांनी

एकमेकांना चिडवूया

दुरावलेली मैत्री आपली

पुन्हा जवळ आणूया..!

 

मैत्री जरी कायम असली तरी

हल्ली भेट काही होत नाही

वर्ष वर्ष एकमेकांचे आपण

चेहरा सुद्धा पाहत नाही..!

 

रोजच्या पेक्षा थोडं जरा

वेगळं वळण घेऊया

आपणच आपल्या साठी

एकदा पुन्हा लहान होऊया..!

 

कितीही मोठं झालो तरी

आपली मैत्री अजून कायम आहे

आपल्या साठी आपला कट्टा

अजूनही तोच आहे…!

 

आणखी खूप बोलायचंय मित्रांनो

सारं शब्दात मांडता येत नाही

मित्रांनो तुमच्या शिवाय वयाचं

भान विसरता येत नाही…!

 

म्हणून म्हणतो मित्रानो

एकदा वेळ काढून भेटायला हवं

मैत्रीचं नातं आपलं पुन्हा

घट्ट करायला हवं…!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नुसतंच… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ नुसतंच… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

गालावर तव ओघळला ,

दव वेलीच्या फुलांचा.

मी चकोर अधीर टिपण्या ,

कणकण साैंदर्याचा.

सुखदुःखाच्या लाटांची,

तू कालप्रवाही सरिता .

मी हरवल्या काठाची,

निर्बंध मूक कविता.

साक्षात काैमुदी तू,

तू चाँद पूनवेचा.

मी नाममात्र उरलो,

ऋतू शरद चांदण्याचा.

झाले कसे निखारे,

ओंजळीतल्या फुलांचे.

अरण्यरुदन ठरले,

अप्राप्य चांदण्याचे.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 153 ☆ पसारे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 153 ?

☆ पसारे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(वृत्त- भुजंगप्रयात)

कसे सांग हे सावरावे पसारे

किती काळ मी वागवावे पसारे

 

कशा स्वच्छ होतील सांदीफटीही

कळेना कसे घालवावे पसारे

 

इथे अंगवळणी पडावे कसे हे

जुने जाणते हाकलावे पसारे?

 

दिवाळीत जातात माळ्यावरी अन

पुन्हा वाटते साठवावे पसारे

 

असे वेंधळेपण सदासर्वदाही

कुणी का असे लांबवावे पसारे

 

मनाला मुभा मुक्त संचारण्याची

कुठेही कुणी पांघरावे पसारे

 

कुणा शल्य सांगू जिवीच्या जिवाचे

प्रभा वाटते आवरावे पसारे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #159 ☆ वळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 159 ?

☆ वळ… ☆

शब्दांच्या फटक्याने

भावनेच्या पाठीवर उमटलेले वळ

तू कोर्टात कसे सिद्ध करणार ?

त्यांनं तुला दिलेल्या वेदना

हे कोर्ट मान्य करू शकत नाही

डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेला

लागतात कागदी पुरावे,

काळजावरच्या जखमा

कोर्ट कधीच ग्राह्य धरत नाही

आणि काळजावरील

शब्दांचे वार टिपणारा कॕमेरा

अजून तरी अस्तित्वात आलेला नाही

मग कसा सादर करणार पुरावा

आणि कशी होणार त्याला शिक्षा

केस मागं घे म्हणणाऱ्यांना शरण जाणं

किंवा

पुराव्याअभावी

होणारी हार स्विकारणं

या शिवाय दुसरा पर्याय नाही

जर त्याला तुला शिक्षाच द्यायची असेल

तर स्वतःला सक्षम करून

त्याच्याशी कुठेही दोन हात करण्याची ताकद

तुला निर्माण करावी लागेल…

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆तोरण ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तोरण ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

न्याय रक्षणा उभे ठाकले

शौर्य प्रभावी अभिमानाचे

सुंदर मंदिर पावित्र्याचे

राज्य हिंदवी शिवरायांचे

 

माय भवानी आणि जिजाऊ

पाठीराख्या दोन देवता

बीज पेरले मनात त्यांनी

वेड लावले स्वातंत्र्याचे

 

सह्यगिरीच्या कडे कपारी

हर हर महादेवाने घुमल्या

मर्द मावळे झाले गोळा

स्वराज्य ठरले स्थापायाचे

 

चांद्यापासून बांधण्याचीशीव

निशान भगवे फडकायाचे

किती प्रभावी ठरले होते

राज्य हिंदवी पण रयतेचे

 

रयतेचा तो रक्षण कर्ता

महाराष्ट्राला देव लाभला

रायगडावर स्वप्न नांदले

होते तेव्हा मानवतेचे

 

अन्यायाला पाजत पाणी

मुलुख मराठी पावन केला

विश्र्व आजही धडे गिरवते

शिवरायांच्या सात्विकतेचे

 

राज्य हिंदवी आदर्शाचे

पुन्हा आणखी होणे नाही

घरास तोरण बांधून जगतो

शिवरायांच्या आठवणींचे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 101 ☆ हे विश्वची माझे घर… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 101 ? 

☆ हे विश्वची माझे घर… ☆

हे विश्वची माझे घर

सुबुद्धी ऐसी यावी 

मनाची बांधिलकी जपावी.. १

 

हे विश्वची माझे घर

औदार्य दाखवावे 

शुद्ध कर्म आचरावे.. २

 

हे विश्वची माझे घर

जातपात नष्ट व्हावी 

नदी सागरा जैसी मिळावी.. ३

 

हे विश्वची माझे घर

थोरांचा विचार आचरावा 

मनाचा व्यास वाढवावा.. ४

 

हे विश्वची माझे घर

गुण्यगोविंदाने रहावे 

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे.. ५

 

हे विश्वची माझे घर

नारे देणे खूप झाले 

आपले परके का झाले.. ६

 

हे विश्वची माझे घर

वसा घ्या संतांचा 

त्यांच्या शुद्ध विचारांचा.. ७

 

हे विश्वची माझे घर

सोहळा साजरा करावा 

दिस एक, मोकळा श्वास घ्यावा.. ८

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 123 – बाळ गीत – रिमझिम पावसाच्या सरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 123 – बाळ गीत – रिमझिम पावसाच्या सरी ☆

रिमझिम पावसाच्या सरीवर सरी।

खेळात रंगल्या चिमुकली सारी।।धृ।।

पावसात मारती गरगर फे ऱ्या ।

म्हणती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या।

मोठ्यांचा चुकवून डोळा सारी।।१।।

थेंब झेलती इवले इवले।

अंगही झाले चिंब ओले।

चिखलात पडती खुशाल सारी।।२।।

छत्रीची नसे कसली चिंता।

भिजू आनंद लूटती आता।

दप्तर घेऊनिया डोक्यावरी।।२।।

पावसात भिजण्याची मजाच न्यारी।

पायाने पाणी उडवूया भारी।

आईला पाहू थबकली सारी।।३।।

पोटात एकदम ऊठले गोळे।

रडून के ले लाल लाल डोळे।

आई ही हसली किमया न्यारी ।।४।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares