मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तप्त धरा….. ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

? कवितेचा उत्सव  ?

☆ तप्त धरा….. ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

(मधुदीप रचना)

या

तप्त

झळांचा

पेटवला

अग्नीचा कुंड

ग्रीष्मासवे

रवीने

भला

सोडला सुस्कार धरतीने जणू अंगार

भासते रुष्ट विरहपीडिता नार

भेटण्या प्रियतमास आतुर

फेकला लाल शेला पार

पलाश वृक्षावर

क्रोध अपार

 

नि

पीत

सुवर्णी

कर्णफूल

झेली बहावा

कानातील

धरेचा

डूल

चैत्रात नेसली नवीन हिरवी वसने

सुरकुतली सजणाच्या विरहाने

अंगाग मृत्तिका धुसमुसळे

वेढली उष्ण धुरळ्याने

तरी करी अर्जवे

पुन्हा प्रेमाने

 

तो

चंद्र

प्रियेला

मनवित

संध्यासमयी

अळवितो

प्रीतीचे

गीत

रतीमदनाचा जणू हा मिलनसोहळा

पवन देतसे हलकेच हिंदोळा

चांदण्या न कुंदफुलांचा मेळा

धरेच्या ओंजळीत गोळा

तृप्त युगुल मग

मिटते डोळा

 

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नीज नीज माझ्या बाळा ☆ कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर)

कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर)

? कवितेचा उत्सव ?

☆ नीज नीज माझ्या बाळा ☆ कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर) 

नीज नीज माझ्या बाळा,करू नको चिंता

काळजी जगाची सा-या आहे भगवंता !

 

अंगावर पांघरूण ओढुनिया काळे

देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले

लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून

पिता तो जगाचा बैसे जागत अजून

 

ज्याने मांडियला सारा विश्वाचा हा खेळ

तोच चालवील त्याला,तोच सांभाळील

झोपली पाखरे रानी,झोपली वासरे

घरोघरी झोपी गेली,आईची लेकरे

नको जागू,झोप आता,पुरे झाली चिंता

काळजी जगाची सा-या आहे भगवंता.

 

कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संमेलन ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संमेलन ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

रजनी देवीच्या रंग महाली

वृक्षलतांचे संमेलन भरले

संमेलनाला आगळा रंग चढे

संमेलनाला वेगळा रंग चढे

 

मोहरलेला आम्रवृक्ष हा

गुपित सांगे ‌कानात

मीच फळांचा राजा

सांगे अभिमानात

 

गगनासम हा उंच शेवगा

उभा कसा हा डौलात

शीतल छाया देतो समान

कडूनिंब सांगे तो-यात

 

दाराजवळील चमेली

हात जोडून स्वागत करी

रातराणीचा सुगंध सांगे

मी सर्वा बेहोश करी

 

सुवर्ण चंपक गर्विष्ठ ‌कसा ?

तोरा सांगे श्रीमंतीचा

फुलांचा राजा दावी रुबाब

गुलाबी  गुलाबी सौंदर्याचा

 

हिरव्या साडीला जांभळे बुट्टे

जांभळी उभी डौलात

प्रसन्न वदने‌ तेज विराजे

जाई, जुई नाचती तालात

 

धुंद सायली आणि बकुळी

नाचनाचुनी अखेर दमती 

निशीगंधाचे सुस्वर गान

तन मन धुंद करती

 

सप्तरंगाचा गोफ विणीला

वृक्ष लतांच्या संमेलनाने

गगन ठेंगणे हो निशादेवीला

आगळ्या, वेगळ्या प्रसन्नतेने

 

इतक्यात काय झाले ?

 

रविकिरणांचे झाले आगमन

पाहूनी हर्षित कुंदकळ्या

प्राजक्ता ने सडा शिंपिला

वसुंधरेच्या घाली गळा

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 82 – सारे सुखाचे सोबती ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 82 – सारे सुखाचे सोबती ☆

काठी सवे देते राया

हात तुज सावराया।

बेइमान दुनियेत

आज नको बावराया।

 

थकलेले गात्र सारे

भरे कापरे देहाला।

अनवाणी पावलांस

नसे अंत चटक्याला।

 

तनासवे मन लाही

आटलेली जगी ओल।

आर्त घायाळ मनाची

जखमही किती खोल।

 

मारा ऊन वाऱ्याचा रे।

जीर्ण वस्त्राला सोसेना।

 थैलीतल्या संसाराला

जागा हक्काची दिसेना।

 

कृशकाय क्षीण दृष्टी

वणवाच भासे सृष्टी।

निराधार जीवनात

भंगलेली स्वप्नवृष्टी।

 

वेड्या मनास कळेना

धावे मृगजळा पाठी।

सारे सुखाचे सोबती

दुर्लभ त्या भेटीगाठी।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन राऊळी…..☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ मन राऊळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मनाच्या राऊळी, विठ्ठल झाला हो जागा !

नाही पंढरी, मंदिरी, आहे तुझ्याच अंतरंगा!

 

मनाच्या राऊळी, घंटानाद होई पहाट प्रहरी!

मनातील विठ्ठला संगे, करू पंढरीची वारी !

 

वाळवंटी चंद्रभागेच्या, वारकरी गर्दी ना करे!

विठ्ठलाच्या डोळ्यातून, विरहाचे अश्रू झरे!

 

भक्तगण झाला, माझ्या संगतीला पारखा!

अश्रुंनी भिजला, भक्त पांडुरंगाचा सखा!

 

रोगराईने केली भक्त गणात दूरी दूरी!

 अंतरीच्या ओढीने, भक्त विठ्ठला साठी झुरी!

 

विठ्ठल म्हणे भक्ता, नाही तुझ्या माझ्यात अंतर!

तुझ्या मनाच्या राऊळी, असे मी निरंतर!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संविधान ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ संविधान ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

जमिनीवरच्या वृक्षाला असलेले

खोलवर रुजण्याचे स्वातंत्र्य

वृक्ष पालनपोषण कर्तव्य

दोन्ही बाजू एका नाण्याच्या !

स्वातंत्र्याच्या हक्काच्या वृक्षाने

सार्थ उंची गाठण्यासाठी

पसरावीत कर्तव्याची मुळे

संधी मिळवून खोलवर !

संधीचे शुद्ध सोन्याचे पाणी

फुलवेल हक्कांचा फुलमळा

सहज येतील त्याला गोड

टवटवीत समृध्दीफळे !

जी जगाच्या बाजारात

मिळवतील प्रतिष्ठेची प्रत

असा वृक्ष उंच फोफावेल

त्याची कीर्ती दिगंत पसरेल !

स्वातंत्र्याचा वृक्ष लावणाऱ्या

असंख्य हुतात्म्यांचे बलिदान

सार्थकी लागण्याचे समाधान

देशाला मिळवून देते संविधान !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 102 – घरकुल ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 102 – विजय साहित्य ?

☆ घरकुल ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

रंगत संगत पायाभरणी,सजले घरकुल छान 

अंतरात या तुला शारदे ,देऊ पहिला मान

 

अनुभव आणि अनुभूतीचा , सडा शिंपला परसात

व्यासंगाची सडा रांगोळी, हळव्या काळीज दारात

भाव फुलांची पखरण आणि, देऊ अक्षर वाण …!

 

किलबिल डोळे नवकवितेचे, कथा छानशी स्वागता

ललित लेख हा दिवाण खाणी, आवड सारी नेणता

पाहुणचारा चारोळ्या, किस्से, शायरी अक्षरांचे दान   ..!

 

पै पाहुणा आला गेला,बघ रंग रंगोटी जोरात

घर शब्दांचे,नांदत आहे, आयुष्याच्या सदनात

कलागुणांना काव्यकलेला सृजनाचे वरदान…!

 

घरकुल माझे साहित्याचे, अवीट नाते जडलेले

राग लोभ नी क्षमायाचना, आनंदाने भरलेले

कादंबरी चे रूप देखणे, या सदनाची शान …!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 88 – एक कविता तिची माझी..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #88 ☆ 

☆ एक कविता तिची माझी..! ☆

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

भिजलेल्या पानांची ..

कोसळत्या सरींची ..

निथळत्या थेंबाची ..

तर कधी.. हळूवार पावसाची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती.

गुलाबांच्या फुलांची ..

पाकळ्यांवरच्या दवांची ..

गार गार वा-याची ..

तर कधी.. गुणगुणां-या गाण्यांची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

वाहणा-या पाण्याची..

सुंदर सुंदर शिंपल्याची ..

अनोळखी वाटेवरची ..

तर कधी ..फुलपाखरांच्या पंखावरची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती.

उगवत्या सुर्याची ..

धावणा-या ढगांची..

कोवळ्या ऊन्हाची ..

तर कधी पुर्ण.. अपूर्ण सायंकाळची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

काळ्या कुट्ट काळोखाची..

चंद्र आणि चांदण्यांची ..

जपलेल्या आठवणींची ..

तर कधी.. ओलावलेल्या पापण्यांची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

पहील्या वहील्या भेटीची ..

गोड गुलाबी प्रेमाची ..

त्याच्या तिच्या विरहाची ..

तर कधी.. शांत निवांत क्षणांची ..!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

कधी तिच्या मनातली ..

कधी माझ्या मनातली..

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती..!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 110 ☆ अभंग ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 110 ?

☆ अभंग ☆

 कितीक चेहरे ।आणि मुखवटे ॥

पहातो आपण।सदोदित ॥

 

 असे का पहाता ।त्रासून नेहमी ।

हसू की जरासे ।कधीतरी ॥

 

 जग हे कृत्रिम ।परकेच वाटे ।

झाले अचंबित ।येथे देवा ॥

 

 कितीतरी भाव । मनात दाटती।

कधी प्रकटती । मुखावर ॥

 

लपविला मी ही । चेहराच माझा ।

नवा मुखवटा ।चढविला ॥

 

नका करू प्रेम ।माझ्यावर कुणी ।

तृप्त या जीवनी । तुम्ही असा ॥

 

 मला टाळणारे । सख्खे सोबतीच।

करू तकरार ।कोणाकडे ॥

 

सारे भाव माझे । दाविले तुम्हास ।

आता मात्र झाले । निर्विकार ॥

                     *

पंढरीच्या राया ॥ नाही आता वारी॥

तूच ये सत्वरी॥ घरी माझ्या!

          *

केली ज्यांनी वारी॥सदोदित पायी

घेई हृदयाशी ॥देवा त्यांना

           *

 एकदाच गेले ॥वारी मध्ये तुझ्या

 केली मनोमन ॥नित्य  पूजा

           *

थकले पाऊल॥अवेळीच माझे

नाही आले पुन्हा ॥तुझ्या भेटी

           *

 आली महामारी॥जगतात सा-या

पंढरीच्या फे-या ॥बंद आता

       *

तूच माझी भक्ती ॥तूच माझी शक्ती

फक्त बळ देई ॥ जगण्याचे

       *

 सांग आता भक्ता॥येऊ नको दूर

रे पंढरपूर ॥बंद आता

       *

 पांडुरंग ध्यानी ॥पांडुरंग मनी

झाले मी हो जनी ॥अंतर्बाह्य

         *

देह त्यागताना ॥डोळाभर दिसो

आत्म्यामधे वसो॥विठ्ठलचि 

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जिगिषा… ☆ सुश्री सुरेखा आपटे

? कवितेचा उत्सव ?

☆ जिगिषा… ☆ सुश्री सुरेखा आपटे ☆

हातोडा होऊन घाव  घातले आहेत

खिळा होऊन घाव सोसले आहेत

वास्तवाच्या भिंती तशाच राहिल्या

भगदाडं मनाला पडली आहेत.

 

कुणी शब्दांनं मारतं तर

कुणी शस्त्रानं

कोणी उपेक्षेने मारतं तर

कुणी गृहीत धरून.

एकाच उखळात सतरा घाव    चुकवत

आयुष्य पडतं खर्ची.

कोणताच ठाव नसलेल्या त्यानं कसं जगावं स्वतः साठी?

सगळं संपलं तरी;

मातीत गाडलेलं बीज सुद्धा

अंकुरतं ,फुलारतं ,तरारून उठतं

त्यामागे काय असतं ?

फक्त जिगीषा

जगण्याची जिद्द अन् आशा

आणि “त्याची ‘इच्छा!

 

©  सुश्री सुरेखा आपटे

पुणे  

मो 9372494220

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print