मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे कविते… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ हे कविते… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

अवेळी तुझं येणं नसतंच कधी

दस्तक देतेस तू तुझ्या आर्ततेचे

 

झंजावत असतेस तू …

घुसमटलेल्या हल्लकल्लोळांचा

 

घोंगावणारा वारा असतेस तू…

पिंगा घालणाऱ्या भावभावनांचा

 

कोसळणारा धबधबा असतेस तू…

उचंबळून येणाऱ्या आर्त हुंदक्यांचा

 

झेपावणारा झोत असतेस तू…

उत्तुंग भरारी घेणाऱ्या अग्नीपंखांचा

 

खळखळणारा झरा असतेस तू…

हर्षोल्लासाने चिंब झालेल्या सुखांचा

 

प्रज्वलित करणारा किरण असतेस तू..

पथ चुकलेल्यासाठी उचित मार्गदर्शकांचा

 

धगधगणाऱ्या ज्वाळा असतेस तू…

अन्यायांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या सत्यतेचा

 

भळभळणारा जखमी प्रवाह असतेस तू…

 अस्तित्वासाठी झगडलेल्या तीव्र वेदनांचा

 

ओघळणारा अश्रू-प्रवाह असतेस तू…

मनतळ्यातील थिजलेल्या यातनांचा

 

हे कविते, तुझ्या अनेक रूपांनी

तू समोर येऊन अवेळी उभी ठाकतेस.

अगदी अचानक…

 

© सुश्री पार्वती नागमोती

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #149 ☆ संत रोहिदास महाराज… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 149 ☆ संत रोहिदास महाराज… ☆ श्री सुजित कदम ☆

 रोहिदास महाराज

सुधारक संत कवी.

भक्ती गीते चळवळ

अध्यात्मिक दिशा नवी…! १

 

वाराणसी सीर गावी

गोवर्धन पुरामध्ये

जन्मा आले रोहिदास

चर्मकार कुलामध्ये… ! २

 

रविदास रोहिदास

अन्या सोळा उपनावे

महाराष्ट्र राजस्थान

पंजाबात नांव गाजे…! ३

 

देशहित जपणारे

रोहिदास संत कवी

दिली रहस्य वादाची

वैचारिक शक्ती नवी..! ४

 

कवी संत रोहिदास

अध्यात्मिक व्यक्तीमत्व

सुफी संत सहवास

सामाजिक ज्ञान तत्व…! ५

 

लक्षणीय योगदान

गुरू ग्रंथ साहिबात

रोहिदास साहित्याचा

समावेश जगतात…! ६

 

भेदाभेद टाळुनीया

दिला समता संदेश

कष्टकरी समाजात

मेहनत परमेश…! ७

 

भगवंत अंतरात

नको मग दुजे काही

सामाजिक सलोख्यात

सुख माणसांचे राही…! ८

 

मनुष्यास धर्म केंद्र

 दिशा वैचारिक मना

सर्व सुख प्राप्ती साठी

केला उपदेश जना…! ९

 

एकजूट समाजाची

समानता अधिकार

संत रोहिदास सांगे

श्रमशक्ती  मुलाधार…! १०

 

मन निर्मळ ठेवावे

ज्ञान गंगा अंतरात

केला निर्भय समाज

बोली भाषा अभंगात..! ११

 

संत मानवतावादी

देश आणि देव भक्ती

केले समाज कल्याण

दिली बंधुभाव शक्ती…! १२

 

पायवाट जीवनाची

नको असत्याचा संग

संत रोहिदास वाणी

ईश सेवेमध्ये दंग…! १३

 

चैत्र वैद्य चतुर्दशी

रोहिदास पुण्यतिथी

आहे चितोड गडात

पादत्राणे आजमिती…! १४

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – फुल किंवा पक्षी – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?फुल किंवा पक्षी ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

कळीचे हळुवार 

झाले फुल

फुल  इवले

झाडाचे मुल

पक्षापरी हे

फुल पाहूनी

आपसूक मना

पडते भुल

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भक्ती – शक्ती ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ भक्ती – शक्ती ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(शिवराय आणि रामदास गुरु शिष्य जोडीवर आधारित कविता)

भक्ती शक्तीचा इतिहास सांगतो,

      महाराष्ट्र माझा !

सह्यगिरीच्या खोऱ्यात गर्जतो,

       छत्रपती राजा !

 

पावनभूमी महाराष्ट्राची,

      संत महंतांची !

जिथे जन्मली ज्ञानेश्वरी,

     अन् गाथा तुकयाची!

 

दासबोध निर्मिती झाली,

  सह्य गिरी कंदरी !

ज्ञान न् बोधाची शिदोरी,

   जनास मिळाली खरी !

 

 शिवरायांनी शौर्याने त्या,

   गडकिल्ले घेतले !

हिंदूंचा राजा बनुनी ,

   छत्रपती  जाहले !

 

 राज्य घातले झोळीमध्ये,

   राजा शिवरायांने ,

 आशीर्वादे समर्थ हाते,

   शिवबास दिले गुरुने !

 

 रामदास – शिवराय जोडीची,

   अपूर्व गाठ पडली!

 आनंदवनभुवनी गुरु शिष्य,

    समर्थ जोडी गाजली!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 170 ☆ मिळे सन्मान शब्दांना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 170 ?

मिळे सन्मान शब्दांना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मला सांगायचे आहे जरासे

इथे थांबायचे आहे जरासे

किती दुष्काळ सोसावा धरेने

अता बरसायचे आहे जरासे

नदीला पूर आल्याचे कळाले

तिला उसळायचे आहे जरासे

कधी बेधुंद जगताना मलाही

जगा विसरायचे आहे जरासे

मिळे सन्मान शब्दांना स्वतःच्या

तिथे मिरवायचे आहे जरासे

मला या वेढती लाटा सुनामी

मरण टाळायचे आहे जरासे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ त्रिवार जयजयकार ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

💐 त्रिवार जयजयकार ☘️ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

त्रिवार जयजयकार सर्मथा,

त्रिवार जयजयकार सर्मथा,

दशदिशांनी गर्जे अंबर

महाराष्ट्र गाई तुझे सुस्वर

त्रिवार जयजयकार

 

यवनांपासून करूनी रक्षण

स्वदेश,स्वधर्माचे करुनी पालन,

जाणून जिजाईचा मनोदय

स्वातंत्र्य सूर्याचा केला उदय.

त्रिवार जयजयकार

 

समाज जागृती चे बांधून कंकण,

मंगल आचरणाची शिकवण,

विषय,विकारा दुय्यम लेखून,

न्याय नीती चे केले पालन.

 

दासबोधाचे अप्रतिम लेणे,

दासांसाठी तुवा कोरिले,

भवसागर हा पार कराया

दीपस्तंभ जाहले समर्था

त्रिवार जयजयकार.

 

विवेक वैराग्याची शिदोरी

दासाहाते देवूनी अनमोल,

प्रपंच परमार्थाची घालूनी सांगड

बोधी अध्यात्म सारं अमोल

त्रिवार जयजयकार.

 

शक्ती युक्ती चार करुनी संगम

दासांसी संवादे हृदयंगम

जिवाशिवाचा घालूनी मेळ

परिवर्तिला नियतीचा‌खेळ

त्रिवार जयजयकार.

 

दासबोध हे तुझेच रूप

अमरत्वाचे असे‌ प्रतीक

नश्र्वर देहाची सोडूनी‌आस

प्रबोधे आत्मारामाची धरा हो कास

त्रिवार जयजयकार.

 

मानवतेचा खरा पुजारी

समानतेचे चित्र चितारी

सामर्थ्याची असे वैखरी

कर्तृत्वाची उत्कृष्ठ ‌भरारी

त्रिवार जयजयकार.

 

अखिल जगाच्या वंद्य पुरूषा

अस्मितेच्या नवोन्मेषा

मानवतेच्या नीलांकांक्षा

त्रिवार वंदन तुला

समर्था त्रिवार वंदन तुला 

© सौ विद्या वसंत पराडकर

वारजे पुणे.

ई मेल- [email protected]

मो.नंबर – 91-9225337330 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #176 ☆ अन्याय… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 176 ?

☆ अन्याय… ☆

माणसांना पोसलेले तू दुधावर

केवढा अन्याय झाला वासरावर

 

हे दुधाचे राजकारण काय आहे ?

वाढती दर भार त्याचा माणसावर

 

बंद गोठे त्यात आम्हा कैद केले

काल सोबत कृष्ण यमुनेच्यातटावर

 

स्वार्थ जपण्या खाद्य पोषक देत आहे

फार मिळते दूध सरकी चारल्यावर

 

ताक मठ्ठा खालच्या लोकात वाटा

लक्ष माझे फक्त मलई चाखण्यावर

 

गाय विकली आज त्याने खाटकाला

काल होती माय आता ती जनावर

 

कोण मेले कोण जगले खंत नाही

राजकारण बेतते आहे जिवावर

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काफिल्याची खूण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ काफिल्याची खूण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(षडाक्षरी)

              होते गुंतलेले

              जेथे पंचप्राण

              झालो हद्दपार

              त्याच गावातून

 

              अनवाणी पाय

              भेगाळली भूई

              वाटले फाटले

              आभाळच डोई

 

              काळजावरती

              ठेवोनिया हात

              अनाम दिशांना

              होतो मी हिंडत

 

              वाटेवर एका

              प्रवासी भेटले

              नव्हती ओळख

              तरीही थांबले

 

              सोडले उसासे

              वाचून कहाणी

              कौतुके ऐकली

              भंगलेली गाणी

 

              दिली प्रेमभरे

              पाठीवर थाप

              वाटून घेतले

              झोळीतील शाप

 

              शांतावले दुःख

              त्यांच्या संगतीत

              आसूत हासले

              जीवनाचे गीत

 

              सगळ्यांच्या अंती

              भिन्न झाल्या वाटा

              वळणावरती

              उभा मी एकटा

 

              पावलांचे ठसे

              दिसती अजून  

              डोळियात चिंब

              काफिल्याची खूण !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 118 ☆ अभंग… साधना करावी, एकांक साधावा…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 118 ? 

☆ अभंग…  साधना करावी, एकांक साधावा

स्थिर ठेवा चित्त, छान होय पित्त

असेल हो वित्त, योग्य जागी.!!

 

साधना करावी, एकांक साधावा

अबोला धरावा, काहीकाळ.!!

 

स्वतःचा विचार, स्वतःच करावा

लिलया साधावा, मोक्षमार्ग.!!

 

मनुष्य जन्माचे, पारणे करावे

मुखाने जपावे, कृष्ण-नाम.!!

 

कवी राज म्हणे, ऐसा नेम व्हावा

हसत संपावा, आयु-भाग.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिवराय… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? कवितेचा उत्सव ?

☆ शिवराय… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆ 

शिवनेरीचे  दगडचिरे  उजळले,

क्षितिजावरल्या शिवसूर्याच्या प्रकाशात,

लोकपाखरांचा थवा घेऊन,

झेपावला हा गरूड,

भारतवर्षाच्या आभाळात;

जन्म दिला इतिहासाला,

अर्थ दिला वर्तमानाला,

दिशा दिली भविष्याला,

अर्पितो ही प्राजक्त शब्दफुले-

विश्ववंद्य राजाला,

शिवरायांना …

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares